मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०९ – प्रेरक गाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०९ – विजय साहित्य ?

☆ प्रेरक गाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(दशाक्षरी)

☆

वात्सल्यांकीत, रूप दुर्गेचे

स्कंदमातेला, नमन करू

मनी मानसी, पद्मासनीला,

नामस्मरणी, हृदयी धरू ..!

*

शिवपुत्र जो,कार्तिकेय तो

पराक्रमी नी, केले सक्षम

युद्ध कलेची, दिधली शक्ती

उभी राहिली,पाठी भक्कम..!

*

 तारकासुरा, केले शासन

मरूगणासी,सुसज्ज केले

संकट हारी, संरक्षक ही

स्कंद मातेने, स्फूरण दिले .

*

स्कंद मातेची, करता पूजा

बालकापरी,करते माया

भक्ती शक्तीची, देत शिदोरी

सदैव देते, जीवन छाया..!

*

माय कृपाळू, सिंह वाहिनी

शक्ती पीठ हे, सामर्थ्य दायी

चराचराची, माय माऊली

भक्त रक्षणा, धावत जाई

*

परम शांती, वात्सल्य माया

नवदुर्गा ही, प्रेरक गाथा

नसे वंचना,नुरे वल्गना

घेता दर्शन, झुकतो माथा.

☆

© कविराज शब्दसम्राट विजय

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काय चूक आहे ? ☆ अरुणा मुल्हेरकर☆

अरुणा मुल्हेरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ काय चूक आहे ? ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त – मंजुघोषा (गालगागाx३) – सूट घेऊन)

☆

काय आहे चूक माझी ठाव घेते

का विषारी भाषणाचा घाव घेते

* 

स्पर्श होता पान मिटले हे शमीचे

नोवरी ती लाजुनी बघ नाव घेते

 *

पाहुनी रूपास या मी लुब्ध झालो

का असा तू एवढा मग भाव घेते

 *

योजिलेले खूप काही मी मनाशी

पूर्ण करण्या स्वप्न माझे धाव घेते

 *

खेळताना का रडी हो खायची ती

हार झाली तर पुन्हा मी डाव घेते.

☆

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ नाना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “नाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“अरे नाना तिसरी घंटा दिलीयं बरं!… तो   रंगमंचावरचा मखमली पडदा आता हळूहळू मागे मागे सरकू लागलाय.. नटसम्राट नाटकाचा आता अखेरचा तिसऱ्या अंकातील शेवटचा प्रवेशाला सुरवात होतेय… आणि तो झाला कि… अरे ऐकतो आहेस ना?… मग उठ बरं तुझ्या त्या भावसमाधीतून… ठाऊक आहे हे नटसम्राट नाटकाचा प्रयोग जेव्हा जेव्हा आपण निरनिराळ्या गावातून करतो त्यावेळी सगळं थिएटर रसिक प्रेक्षकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असतं आणि आणि तुझ्या त्या आप्पासाहेब बेलवलकरांची  भाव व्याकुळ भुमिकेने तर तिथला सारा माहोल  मंत्रमुग्ध होऊन बसलेला असतो… तुझी ती संंवादाची फेक, ते अखंड चालणारे संवाद, तुझ्या बोलण्यातलं कारुण्य, तुझी देहबोली, तो मूर्तीमंत अभिनय आणि  आणि  नाटकातील तुझ्याच दोन्ही मुलां बद्दल असलेला तो सात्विक संताप… त्यात तुझी कावेरी, तुझं जीवाभावाचं नि प्रेमळ सरकार असं मध्येच तुला सोडून निघून गेल्यानं तुझा सैरभैर झालेला स्वभाव… किती किती म्हणून अभिनायाचे कंगोरे नाना तू दाखवत गेलास… नाटक संपल्यावर तो पडदा सरकत येऊन रंगमंच झाकला गेल्यावरही प्रेक्षकागृहातला प्रेक्षक बसल्या जागी्च दिग्मुढ होऊन जायचा.. तेव्हा नाना तू स्वत: आणि या नाटकातील अभिनय करणारी नट मंडळी आपण सगळे पुन्हा रंगमंचावर येऊन विनम्र अभिवादन करून सांगताना त्यांना भानावर आणावं लागायचं.. रसिक मायबाप हो, नटसम्राट नाटकाचा प्रयोग समाप्त झालेला आहे आणि पुढील दुसऱ्या कार्यक्रमासाठी हा रंगमंच रिकामा करून द्यायला लागणार आहे… नटसम्राट नाटकाचं गारूड प्रेक्षकांच्या मनावर अजूनही उतरायला तयार नसतं आणि प्रेक्षक  आपल्या भावाकूल मनाला मुरड घालत जड अंत करणाने पाय ओढत प्रेक्षकगृहातून बाहेर पडतात…

संपूर्ण तीन तासाच्या या नटसम्राट नाटकाने तिथे आलेला प्रेक्षक विषण्ण अवस्थेत बाहेर पडत असतो हीच आपल्या या नाटकाची उत्तुंग यशाची पावती आपल्याला सगळी कडे मिळत असते… आणि त्याच वेळी तू तिकडे कोपऱ्यात जाऊन आपले डोळ्यात तरारले आसू मात्र कुणाच्याही लक्षात येणार नाही असं पाहून  नकळत बोटांनी पुसत असतोस… बाकी कुणाचं लक्ष असो वा नसो पण मी मात्रं त्यावेळेस तुझ्याकडे आवर्जून पाहत असतो… हे दर प्रयोगाला न चुकता हमखास घडतच असतं… मी तुझ्याकडे पाहतो हे एकदा तुझ्या लक्षात आलं आणि तू मला  कसनूसं हसून म्हणालास ( ते हसणं तुझं नैसर्गिक होतं… खरा खुऱ्या नानाचं) काय पाहतोस असा माझ्याकडे… अरे या नाटकाच्या प्रयोगात मी नाना आप्पासाहेब बेलवकरची भूमिका करत नसून… माझ्यात ते आप्पासाहेब बेलवलकरच प्रकट होतात… माझा मीच राहत नाही आणि नाटक संपल्यावर त्यांचा संचार उतरतो तेव्हा मला समोर भारलेले प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करताना दिसतात तेव्हा भानावर येतो… माझ्या अभिनयाला ते दाद देतात असे वरंवरं दिसणाऱ्याला वाटतं… पण मी कुठेच नसतो त्यात… मी असतो त्यावेळी इथं कोपऱ्यात आसू पुसत त्या नटश्रेष्ठ आप्पासाहेब बेलवकरची क्षमा मागत… त्यांच्या जीवनचरित्राचे  असा चारलोकाच्यां समोर रंगमंचावर त्यांच्या दूर्देवाच्या दशावताराचे धिंडवडे दाखवल्याचा बाजारीपणा मांडून आपली कलेची हौस फेडून घेण्याच्या गोंडस नावाखाली, आपले पोट भरून घेण्याचा स्वार्थीपणा केल्याबद्दल… मला आठवतंय नाना, एकदा तू मला म्हणाला होतास… आपण आता नटसम्राट करायचं थांबवूया… मला त्याचा अलिकडे खूपच त्रास होतोय… नि तसं वयाच्या मानानं त्या भुमिकेला आता माझ्याकडून म्हणावा तसा न्याय देणं होत नाही… त्यातील त्यांची झालेली ती फरफट माझ्याच्याने अभिनयात आता आताशा उतरावयाला खूपच जड जातयं… तेव्हा प्रेक्षकांनी कंटाळून नाटकाकडे पाठ फिरविण्यापेक्षा आपण  ज्या उंचीवर  नटसम्राट नेऊन ठेवलयं तिथूनच विराम घेऊया… प्रेक्षाकांनी विचारू देत… का?

आताच का थांबवत आहात नटसम्राट? हि प्रयोगाची पावनगंगा अशीच अखंड वाहत राहू दे… आणि हिच ती वेळ योग्य ठरेल सगळ्या जनमानसात या अभिजात नाट्यकृतीची अक्षय छबी राहण्याची… मी एक  निर्माता या नात्याने तुझ्या सच्चा कलावंताची ही मागणी योग्य वाटली त्यास तयार झालो ते फक्त हा आजचा शेवटचा नटसम्राटचा प्रयोग करून थांबयचा मी घेतलेला निर्णय तुला सांगितला… आणि त्याप्रमाणे आजचा प्रयोग तितकाच रंगतदार बहारदार झाला… न भूतो न भविष्यती.. तिसऱ्या अंकाचा हा शेवटचा प्रवेश सुरू होण्याचा काही अवधी राहिला असताना  नाना तुला कसली गाढ भावसमाधी लागली… मी विंगेतून तुला हाका मारतोय पण तू काहीच उत्तर न देता त्या खुर्चीत मान टेकवून… आणि आणि त्याच क्षणी मात्र ती तुझ्या डोक्यावरची काळी टोपी खुर्चीवर घरगंळून खाली खाली आली…

अरे नाना उठ जागा हो… हा क्लायमॅक्स चा प्रवेश म्हणजे तुझा हातखंडा असतो… आणि त्यात  ते तुझं ब्रुटस् यू टू हे वाक्य म्हणजे काळीज चिरत जाणारं… ते ते तेव्हढं एकदा कानावर पडू दे म्हणजे आमच्या सगळ्यांचे कानं  नि डोळे तृप्त होतील… उद्या लोक नक्कीच म्हणतील झाले बहू, होतीलही बहू.. पण असा आप्पासाहेब बेलवलकर पुन्हा रंगमंचावर  पाहायला मिळणार नाही… तेव्हा नाना उठं… तो तिसऱ्या अंकातील तिसरा नि शेवटचा प्रवेश राहिलाय… आम्ही तुझी कधीची वाट पाहतोय…

 

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शारदोत्सव ☆ अमृता देशपांडे ☆

अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ शारदोत्सव ☆ अमृता देशपांडे ☆

घरोघरीचे गणपती विसर्जन झाले आणि अनंतचतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम संपली की वेध लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे.

दरवर्षी नवरात्र आले की, हमखास आठवण होते ती आमच्या शाळेच्या

“शारदोत्सवाची.”

आमची शाळा फक्त मुलींची. म. ल. ग. हायस्कूल, कोल्हापुर. मी पहिली ते अकरावी तिथेच शिकले. आमच्या शाळेत अश्विन नवरात्रीत ” शारदोत्सव ” साजरा केला जात असे. त्यामुळे देवी उपासनेचे संस्कार घरात आणि शाळेत ही झाले.

कोल्हापुरवासिनी श्री अंबाबाई, घरची देवी श्री एकवीरा, आणि शाळेतली श्री सरस्वती अशा पूजनाच्या उत्सवाचे नवरात्रीचे दिवस संस्मरणीय आहेत. संस्कारक्षम वयातला देवीशक्तीचा उत्सव आध्यात्मिक आणि वैचारिक मानसिकतेचा भक्कम पाया ठरला.

शारदोत्सवाच्या आधीच्या आठवड्यात तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी 4/4 मुलींचे ग्रुप केले जायचे. डेकोरेशन करणे, पूजेची तयारी करणे – यात पूजेची भांडी रोज स्वच्छ करणे, तेल, तूप, अगरबत्ती, कापूर, हार फुले, प्रसाद ( फळे)याची जमवाजमव, खरेदी करणे, यातून टीम वर्क, कुठलेही काम करण्याची तयारी हे गुण अंगवळणी पडत. आम्ही मैत्रिणी या कुठल्याही कामामध्ये दरवर्षी अतिशय उत्साहाने सहभाग घेत होतो. त्यावेळी शाळेत वातावरण खूप प्रसन्न असायचे. शाळेत आहोत असं वाटण्यापेक्षा एका ऊर्जेने भारावलेल्या मंदिरात आहोत, असेच वाटायचे. अगरबत्तीच्या घमघमाटाने सगळे वातावरण भारावून गेलेले असायचे.

सर्व तयारी करून शाळा भरण्याच्या वेळी सामूहिक आरती होत असे. संगीत हा विषय शिकवणारे टेंबेसर व नंतर सौ. शैलाताई कुलकर्णी पेटी ( हार्मोनियम) वाजवून साथ द्यायचे.

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी ‘ ही आरती झांज, हार्मोनियम च्या तालावर सुरात म्हणताना एक प्रसन्न आनंद व्हायचा.

पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणा हाती असलेली, कमळात आसनस्थ, नेत्रांतून अपार प्रेम, माया बरसणारी देवी सरस्वतीची मूर्ती अजुनही डोळ्यांसमोर येते.

आरती-प्रसाद झाल्यावर शाळा सुरु होत असे. चार वाजल्यानंतरचे तास नसायचे. कारण त्यावेळेत रोज व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. पहिल्या दिवशी वेदशास्त्र संपन्न प. पू. जेरेशास्त्री यांचे देवी शक्ती, देवी अवतार अशा विषयांवर प्रवचन असे. त्यानंतर रोज प्रख्यात लेखक, वक्ते, निर्माते, चित्रकार, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, अशा थोर व दिग्गज व्यक्ती, कलाकारांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. प्रा. शिवाजी भोसले, श्रीमती लीलाताई पाटील, भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, कॅप्टन थोरात, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची व्याख्याने अजूनही आठवतात.

प. प. जेरेशास्त्री जे काही सांगायचे ते सगळेच तेव्हा समजायचे असे नाही, पण ते काहीतरी भव्य दिव्य छान वाटायचे.

आपल्या प्रवचनामध्ये सुंदर मानव बनण्यासाठी तुमचे मन सुंदर असले पाहिजे, निर्मळ असले पाहिजे, असे सांगायचे. त्याचा अर्थ पुढे आयुष्यात समजून आला. मोठ्या व्यक्ती कोण, त्या का मोठ्या आहेत, हे समजून घेणे याची शिकवण मिळाली. एका जागी तीन तास बसून व्याख्यान कसे ऐकायचे, याची सवय झाली. शारदोत्सवाचे ते नऊ दिवस अतिशय उत्साहाचे व भारलेले होते. सरस्वती पूजनाने व व्याख्यानाच्या विषयांतील शब्दांचा, विचारांचा परिणाम नकळत मनावर होत होता. आमचे शिक्षक आणि शिक्षिका ( आमचे सर आणि बाई) त्या विचारांना अनुसरूनच शाळेतल्या इतर कार्यक्रमांची आखणी करत, आणि भाषणातले विचार दैनंदिन व्यवहारात ही कसे अंगिकारायचे, हे आम्हां मुलींकडून करवून घेतले जाई. त्यामुळे दरवर्षी अकरावीची पास झालेली बॅच ही सुसंस्कारितच असेल, हेच आमच्या शाळेचे ध्येय, हेच प्रयत्न आणि हेच यश होते.

प्रत्येक स्त्री मध्ये देवीशक्तीचा अंश असतो. स्वतःतल्या शक्ती चा आदर ठेवून समाजात वावरणे, स्त्री अबला नाही तर सशक्त, स्वयंपूर्ण आहे, याची जाणीव मनात असणे, तसेच आत्मशक्तिचा अहंगंड न ठेवता किंवा आपण कुणापेक्षा तरी वरचढ आहोत, या भ्रामक कल्पना न बाळगता त्या शक्तीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सेवेसाठी, देशसेवेसाठी करणे ह्याचे बाळकडू देणारा शाळेतला शारदोत्सव त्या काळातल्या आमच्या पिढीच्या मानसिकतेचा सुसंस्कारित पैलू होता.

नवरात्र म्हटले की शाळेचे ते दिवस अजूनही आठवतात. मनोमन देवीला नमस्कार केला जातो.

त्यावेळी म्हणत होतो ते,

” या कुंदेन्दु तुषार हार धवला ” हा श्लोक आणि

” विधी तनये शारदे कामदे” हे गीत प्रत्येक नवरात्रात ओठावर येते.

श्री शारदा देवी, माझी शाळा आणि सर्व शिक्षक- शिक्षकांना श्रद्धापूर्वक नमस्कार!

 

©  अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघी… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दोघी… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

शेणाचा सडा मंदिरासमोर टाकून आजी आत आली. “रांगोळी काढते का ग मने.. ? अशी हाक मारून आजीने चुलीतलं लाकूड जरा हलवलं आणि चहाचं आधण ठेवलं…

मनी लाल जास्वंदाचे फुलं तोडीत होती… आजीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, “काढते ना आजी माय… एक एक काम होऊ दे की… “

आजीने चहा गाळला आणि मनीकडे घेऊन आली.. मनीने हार गुंफायला सुरुवात केली होती… आजीने तिला चहा दिला आणि प्रेमानं तिच्या तोंडावरून बोटं फिरवून कडकड आपल्या कपाळावर मोडली. “बघ किती माया हाय तुझ्यावर… “

तशी मनी गहिवरून म्हटली, “तू माया करणारी होतीस म्हणून तर जगले ना ग या कठीण आयुष्यात, नाहीतर कधीच सम्पलं होतं आयुष्य… “

आजी म्हणाली, “आयुष्य संपणं आपल्या हातात असतं तर मी मेली म्हातारी कशाला जगत बसले असते.. ? अगं आयुष्य एवढं सहज नसतं संपत. मग ते आहे तेवढं हिमतीने मात्र जगावं आणि ते ही स्वतःच्या कर्तुत्वावर…

मने तुझी आई लवकर गेली पण तुझ्याकडे पाहून मी जगले… तुझा बाप आणि आजा अपघातात गेल्यावर तर वाटलं… आता आपण हाताने आयुष्य थांबवावं आपलं, पण तेंव्हा ह्या मंदिरातल्या पुजारीन बाईनं आधार मागितला, म्हणाली, “ह्या दुर्गेच्या पायी सेवेला राहा… नातीला शाळेत घालू आणि आपण सेवा करू एकमेकिंचा आधार होऊन… तिने परत जगण्याला दिशा दिली…

तू शिकली, लग्न केलं पण तुझं दुर्दैव, लोकं त्रास देणारे भेटले, तुला घरात कोंडून मारणारे, पण म्हणून अश्या लोकांसाठी आपला जीव देणं हा मार्ग असतो का ग? आयुष्य सम्पवण्याचा,.. ?

तू त्यादिवशी जर रेल्वेखाली सापडली असती ना मने, मग ह्या आजीने आयुष्य खुप दुःखात काढलं असतं… तेंव्हा मला वाटलं असतं… जगण्याचं, विचारांचं बळ मी तुला द्यायला विसरले…

तुझ्यासारखी खुप शाळेत गेले नसले तरी… ह्या पुजारीबाईनं वाचायला शिकवून मला पुस्तकं वाचायला शिकवली… त्यांच्या कपाटातली सगळी पुस्तकं वाचली मी तू लग्न करून गेल्यावर ह्या पाच वर्षात..

पुजारी बाई गेल्या तेंव्हा मला जवळ बोलवून म्हंटल्या होत्या, ‘मावशी, स्त्रीला कस्पटासमान समजणाऱ्या ह्या समाजात आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असतं… शरीर जपायचं असतं आणि स्वबळावर उभं राहायचं असतं… हे जमलं ना मग स्त्री टिकली…

स्वतःचं अस्तित्व ह्या दुर्गेने त्या काळात टिकवलं त्या महिषासुराला पायाशी लोळवून.. ह्या काळातही वासनेचे, अहंकाराचे, दुष्ट विचारांचे महिषासुर आहेत, त्यांचा वध करून सन्मानाने जगणं यावं स्त्रियांना हेच वाटतं मला, म्हणून तेंव्हा नवऱ्याने मुल होत नाही म्हणून टाकून दिली तरी ह्या दुर्गेने वाचवलं मला… स्त्रीशक्तीचं हे नातं ह्या संदेशातून जपत चला… ‘

पुजारीन बाई गेली पण मला उभं करून गेली… म्हणून तर तू रेल्वेखाली सापडली असती तर पुजारीन बाईने स्वर्गातून नक्कीच दुःख व्यक्त केलं असतं, नाती पर्यंतही माझा संदेश पोहचवला नाही म्हणून.. “

मनी म्हणाली, “आजी तू ह्या नातीला आज काय दिलंस हे मी शब्दात सांगू शकत नाही, पण एक मात्र खरं.. पैसा, दागदागिने ह्यापेक्षा खुप मौल्यवान असं विचारांचं बीज तू माझ्यात पेरलं… आजपासून सुरू होणारी ही नवरात्री माझ्या आयुष्यातील नवी सुरुवात असेल… ” एवढं बोलून मनी रांगोळी काढायला गेली…

मंदिरातली नवदुर्गेची मूर्ती आज अधिकच प्रसन्न भासत होती… महिषासुराचा वध करण्याचा खरा हेतू स्त्रीशक्तीत असाच पेरला जावो असा आशिर्वाद देण्या ती मंद हास्य करत उभी होती…

आजी मात्र नातीच्या रांगोळीत भरले जाणारे रंग कुतूहलाने बघत होती आणि मनात म्हणत होती.

“प्रसंग येवो किती कठिणही

स्त्रीशक्ती तू उभी राहा,..

एकमेकांना साथ देऊ हा

जगण्याचा वसा घेत राहा.. “

☆

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमची देवी पूजा…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमची देवी पूजा…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

देवीची प्रतिष्ठापना झाली आहे…

नवरात्र सुरू झाले आहेत…

– – या निमित्ताने आम्ही सुद्धा देवीची पूजा सुरू केली आहे, मात्र आमची पूजा थोडी वेगळी असते… !

  1. आयुष्यभर ज्यांनी परिस्थितीशी लढाई केली, सामना केला, अशा अनंत माता माऊली आज रस्त्यावर त्याच परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून अजूनही उभ्या आहेत…

आम्ही अशा गरजू नवदुर्गा शोधून त्यांना पुरणपोळीचे जेवण आणि काहीतरी स्वीट्स देत आहोत.

(हे मान्य आहे, की रोज त्यांना उपवास घडतात तरीही श्रद्धेने त्या आताही उपवास धरत आहेत, परंतु आम्ही दिलेले ताट त्या दुसऱ्या चिल्ल्या पिल्याना, गरजू अंध अपंग भुकेल्यांना देतील, या आशेने आम्ही हे ताट नैवेद्य म्हणून दाखवत आहोत)

  1. ज्या माऊलीला मूलबाळ, नवरा संसार, कशाचेही पाश नाहीत, अशी माऊली अनंत वर्षे मंदिराच्या बाहेर भीक मागून जगत आहे, तिला या नवरात्रात आपण फुले आणि गजरा विकण्याचा व्यवसाय सुरू करून देत आहोत…
  2. फाटक्या लुगड्यातच जिचं आयुष्य गेलं, भाकरी उलथताना जीचा हात भाजला किंवा चूल पेटवताना जीव गुदमरला… आणि ज्यांच्यासाठी हे केलं ते आज सोबत नाहीत… अशा आईंना नवीन साड्या नेसवणार आहोत, (कुणी वापरलेल्या किंवा जुन्या नाही).

… माऊली ही तुझ्या हातावर मारलेली फुंकर समज, यातून तुझ्या वेदना भरून येणार नाहीत याची जाणीव आहे,

.. पण गोंधळ घालणारं, एक ना लायक कार्ट समजून तरी आमची ही सेवा रुजू करून घे… !

आजपर्यंत आपण जे काही दिलंत, त्यातलं आम्ही जे काही साठवून ठेवलं तेच आता वापरणार आहोत… याचसाठी केला होता अट्टाहास… !

आई… आई ये… गोंधळाला ये…

आई नक्की ये… आ SS हा…

आणखी एक.. सर्वात महत्त्वाचं, माझा एक मुलगा… काही वर्षांपूर्वी नाईलाजाने याचा डावा पाय गुडघ्या खालून तोडावा लागला… मनाची अवस्था काय झाली असेल हे फक्त त्यालाच माहीत, कारण घरात एकटा तोच कमावता…

 काही महिन्यांपूर्वी आपण याला कृत्रिम पाय मिळवून देण्यासाठी मदत केली…

… तरीही त्या पायावर त्याला वजन झेपत नव्हते (No weight bearing) म्हणून त्याला मागील आठ दहा दिवसांपूर्वी एक वॉकर घेऊन दिला…

आता तो बऱ्यापैकी स्थिरावला…

 मग त्याला कानात हळूच खुसपुसत म्हणालो, ‘आता तू बरा झाला आहेस, काहीतरी व्यवसाय करशील का… ? ‘

यावर त्याने जोराने आरोळी मारत, हात उंच करत मला उत्तर दिले, हो sssss सर… !

– त्याची ही आरोळी म्हणजे मला वाघाची डरकाळी वाटली…

… ही डरकाळी म्हणजे आजपर्यंतच्या त्याच्या अपंगत्वावर आणि आलेल्या डिप्रेशन वर त्याने स्वतः मिळवलेल्या विजयाचे प्रतीक होते ते… !

 मी कधी पाहिले नाही परंतु एव्हरेस्ट शिखर सर करणारा माणूस सुद्धा अशीच काहीतरी डरकाळी फोडत असेल…

हे असं शिखर सर करण्यात आणि स्वतःच्या अपंगत्वावर मात करण्यात मला तरी काही फरक वाटत नाही… !

ही डरकाळी आयुष्यभर माझ्या हृदयात राहील… ! कालपर्यंत बिन पायाने रांगत चाललेला बछडा, आज वाघ झालेला कोणत्या बापाला आवडणार नाही…?

असलेल्या निधीमधून यालाही व्यवसाय टाकून देणार आहोत… !

आत्ता लिहिताना जाणवले, देवीचे वाहन खुद्द वाघ आहे, सध्या नवरात्र आहे, देवीची प्रतिष्ठापना झाली आहे…!

खरंच हा निव्वळ योगायोग समजायचा…?

 

© डॉ अभिजित सनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी आमची शेवटचीच पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ अशी आमची शेवटचीच पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

तेव्हा सायकल तीन टप्प्यात शिकली जायची.

पहिला टप्पा कैची,

दुसरा टप्पा दांडा,

आणि तीसरा टप्पा सीट.

तेव्हा सायकल चालवणं इतकं सोपं नव्हतं कारण तेव्हा घरात एकच सायकल असायची जी फक्त बाबा चालवायचे.

तेव्हा सायकलची उंची चोवीस इंच असायची जी उभं राहिल्यावर आमच्या खांद्या येव्हडी यायची.. अशी सायकल सीटवर बसून चालवणं शक्यच नव्हतं.

कैची ती कला होती ज्यात आम्ही सायकलच्या फ्रेममधल्या त्रिकोणात घुसून दोन पायडलवर दोन पाय ठेवून सायकल चालवायचो.

आणि जेव्हा आम्ही अशी सायकल चालवायचो तेव्हा आम्ही छाती पुढे काढून कमरेतून तिरपं होऊन हँडलच्या मागून आमचा चेहरा बाहेर काढून ट्रींग ट्रींग करून घंटी वाजवायचो जेणे करून रस्त्यावरच्या लोकांना कळेल की आम्ही सायकल चालवतोय.

आजची पिढी ह्या साहसापासून वंचित आहे. त्यांना कल्पनाच नाही करता येणार की आठ दहा वर्षाच्या वयात चोवीस इंची सायकल चालवणं हे विमान उडवण्यासारखंच होतं. आठवत नाही आम्ही कित्येकदा आमचे गुढगे, मांडी आणि तोंड फोडून घेतलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा त्याने अजीबात दुखायचं नाही. पडल्यावर पटकन इकडे तिकडे बघून चड्डीला लागलेली माती झाडत गुपचुप उभं रहायचो.

आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे आता तिसऱ्या वर्षीच मुलं न धडपडता सायकल चालवतात कारण बाजारात दोन दोन फुटी सायकली आल्या आहेत व त्याला side support आले आहेत आणि श्रीमंतांची मुलं तर थेट बाइक चालवतात.. तश्या छोट्या बाईक्स मिळतात बाजारात.

… पण आजच्या मुलांना हे कधीच कळणार नाही की लहान वयात त्या मोठ्या सायकलवर संतूलन मिळवणं हा आयुष्यातला पहिला धडा असायचा.. जबाबदारीची पहिली पायरी असायची जी चढल्यावर तुम्ही गिरणीतून गहू दळूण आणण्यालायक झालेले आहात हे नक्की व्हायचं आणि तुमच्यावर ती जबाबदारी टाकली जायची. जाताना दळणाचा डबा कॅरीयरवर ठेवून सायकल ढकलत चक्कीपर्यन्त जायचं आणि येताना कैची चालवत यायचं.. पण खरंच.. ही कष्टदायक जबाबदारी पार पाडताना खूप आनंद वाटायचा. आता कैची ही प्रथा लोप पावलेली आहे.

– – आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी सायकल ही अशी तीन टप्प्यात शिकली.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी घरात बसून परीच्या आणि राक्षसाच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या, जमिनीवर किंवा पाटावर बसून जेवलो.. बशीतून चहा प्यायला.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी लहानपणी घराच्या अंगणात किंवा पटांगणात मित्रां बरोबर विटी दांडू, लपाछपी, कबड्डी, खोखो, गोट्या, आंब्याच्या कोया, भोवरे, पतंग, पावसाळ्यात खुपसणी, सूर पारंब्या, लगोरी, डबा ऐस पैस, लंगडी, आट्यापाट्या ह्या सारखे परंपरागत खेळ खेळले आहेत.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात गृहपाठ केला आहे आणि चांदोबा आणि कॅामिक्स वाचली आहेत.

आम्ही त्याच पिढीतले लोक आहोत ज्यांनी आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी भावनांची देवाण घेवाण पत्रातून केली आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी त्यांचं बालपण कूलर एसी फ्रिज फोन गाडी शिवायही आनंदात घालवलं आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी दिवाळीत भल्या पहाटे उठून लाल रंगाचं सुगंधी तेल केसांना लावलंय आणि मोती किंवा म्हैसूर सँडल सोपनी अभ्यंग स्नान केलंय.

आम्ही त्याच शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी शाईचं पेन वापरताना वह्या, पुस्तकं, कपडे, दप्तरं आणि हात निळे केले आहेत.

आम्ही शेवटचे लोक आहोत ज्यांनी शिक्षकांचा, कुटूंबातल्यांचा व नातेवाईक, शेजारी यांचा भरपूर मार खाल्ला आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी गोदरेजच्या गोल डब्बीतल्या साबणानी दाढी केली आहे. गुळाचा चहा प्यायला आहे. भल्या सकाळी राख, काळ्या, लाल किंवा पांढऱ्या दंतमंजनानी बोटानी दात घासले आहेत, न्हाणीकडच्या चुलीत आग घालून त्यावर ठेवलेल्या हंड्यामधील गरम गरम पाण्यानी आंघोळ केली आहे आणि उन्हाळ्यात विहिरीवर जाऊन थंड पाण्याने आंघोळी केल्या.

आम्ही नक्कीच ते शेवटचे लोक आहोत ज्यांनी चांदण्या रात्री अंगणात झोपून ट्रांझिस्टरवर ॲाल इंडिया रेडिओ, बीबीसीच्या बातम्या, विवीध भारती, बिनाका गीतमाला ऐकलं आहे.

आम्हीच ते शेवटचे लोक आहोत जे रात्री घरासमोरच्या अंगणात चटया टाकायच्या आणि रात्रीचा थंडगार वारा असायचा आणि सगळ्यांना शांत झोप लागायची. सकाळी ऊन आल्यावरही तोंडावर पांघरूण घेऊन झोपून रहायचो. ते पण आबा खाडेने सकाळी येऊन पांघरूणे ओढून नेली नाही तर!!!

आणि हो… न्हाव्यासमोर घरातल्या पाटावर बसून हजामत (haircut) करवून घेतली आहे.

… आता हे सगळं नाही राहिलं डब्यांसारख्या खोल्यांमधे कूलर किंवा एसी लाऊन रात्र होते.. दिवस पुढे सरकतात.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी नात्यांमधला गोडवा जपणारी आणि वाटणारी माणसं बघीतली आहेत, पाहुणे परत जातांना देवळाकडे किंवा घोगळावर पायी जावून एसटी बसची वाट पाहत बसलो आहोत, आणि त्यांना निरोप देवूनच आलो… अशी माणसं आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत.

आम्हीच ते नशीबवान लोक आहोत ज्यांनी नात्यांची गोडी अनुभवली आहे.

आमची पिढी ही अशी एकमेव पिढी आहे जिनी नेहमी आपल्या आई वडिलांचं ऐकलं आणि आता आपल्या मुलांचंही ऐकते आहे.

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. ३ ☆ वीणा कुलकर्णी ☆

वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. ३ ☆ वीणा कुलकर्णी ☆

परिचारिका (Nurse)… सेवेतली दुर्गा

दिवस असो वा रात्र असो, तिची ड्युटीवर जाण्याची वेळ ठरलेली असते; पण काम संपण्यास वेळेची 

तिला मर्यादा नसते. ड्युटीवर कटाक्षाने वेळेत काय, वेळेच्या आधीच पोचणे हे तिच्यासाठी रोजच एक टास्क असते.

 

ड्युटीवर येताच घरचे घरी सगळे प्रश्न तिथेच ठेवून पुढे आलेले काम विनातक्रार पूर्ण करायचे हे ट्रेनिंग 

तिला पांढरा पेहराव परिधान करतेवेळीच दिलेले असते. त्याशिवाय तन मन ओतून काम करताच येत नाही.

.. हे तत्त्व उरी बाळगून निस्पृह सेवा देण्याचे पवित्र काम ती करत असते.

 

आल्या आल्या एकदा आपल्या पहिल्या सखीकडून कामाचा चार्ज घेतला की तिचा कामाचा दिवस सुरू.

सकारात्मक भावना ठेवायची, समोरचा रुग्ण आपला माणूस मानून इमानेइतबारे सेवा करायची हेच ध्येय.

 

रुग्णांची माहिती घेणे, औषधांच्या वेळा तपासणे, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे, रुग्णांचे तापमान व रक्तदाब मोजणे, इंजेक्शन देणे, जखमांची काळजी घेणे, गंभीर रुग्णांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे… 

अशा नानाविध कामांची अखंड मालिका सुरू होते.

 

रोजचा दिवस यांच्यासाठी नवीन… कडू गोड आठवणींचा.

 

कधी एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक बिघडते,

तर दुसऱ्याला धीर देण्याची गरज असते.

कुणाच्या वेदना कमी करायच्या असतात,

तर कुणाच्या नातेवाइकांना समजावून सांगायचे असते.

.. नेमून दिलेल्या कामाशिवाय अनेक कामे करावी लागतात ते निराळेच.

या सगळ्या धावपळीत स्वतःच्या जेवणाची वेळ चुकून गेली याचेही भान नसते तिला. घरीदारी कामाचे डोंगर असतात. विश्रांती अपुरी राहते; पण रुग्णसेवेत कसूर होता कामा नये, याकरिता तिची धडपड असते.

 

ड्युटी संपते, आता सुटका होते घरी जाण्यासाठी, पण मनातल्या काळजीची ड्युटी संपतेच असे नाही.

– – घरी परतल्यावर आई, पत्नी, मुलगी किंवा सून म्हणून नवी जबाबदारी सुरू होते. हे सगळेजण तिच्या येण्याची आतुरतेने वाट पहात असतात. पुन्हा भूमिका बदल करून नव्या दमाने या सगळ्यांच्या सेवेसाठी सज्ज व्हायचे असते.

 

सगळ्यांची काळजी घेणाऱ्या, आपुलकीने व ममतेने सर्वस्वी सेवा पुरवणाऱ्या या स्त्रीची आपणही समाजाचा एक भाग म्हणून काळजी घेतली पाहिजे.

 

तिच्या सेवेचा आदर करणे व तिच्या कष्टांची जाणीव ठेवणे.. हे एक सामाजिक ऋण ठरेल.

 

तिच्यातही एक दुर्गा आहे!

– लेख क्र. ३

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… दुकोरी / दुकडीबाला – लेख क्र. ५ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… दुकोरी / दुकडीबाला – लेख क्र. ५ ☆ मंजिरी येडूरकर ☆

दुकोरी / दुकडीबाला – – 

हिचा जन्म १८८७ मध्ये पश्चिम बंगाल मध्ये झाऊपाडा या गावी झाला. वडील नीलमणी चटोपाध्याय अतिशय गरीब होते. तरीही जोखीम पत्करून क्रांतिकारकांना मदत करत होते. लहानपणीच दुकडीबालाचे लग्न फनी भूषण चक्रवर्ती यांच्याशी झाले. तिचा, सामान्य स्त्री सारखा संसार सुरू झाला.

त्या काळात बंगाल हे विध्वंसक कारवायांचे केंद्र झाले होते. त्यामुळे बंगाली लोकांची राजकीय शक्ती कमकुवत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. १६ ऑक्टोबर १९०५ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या फाळणीची औपचारिक घोषणा केली. बंगाली लोकांनी तत्काळ त्याचा निषेध केला. कट्टर राष्ट्रवादी व संघटन आंदोलनांना फाळणीमुळे चालना मिळाली. ‘निबारनचंद्र घटक’ हा क्रांतिकारक गटाचा सदस्य होता. तो दुकडीबालाचा नातेवाईक होता. जवळच्याच गावात तो राहत असल्याने वरचेवर दुकडीबालाकडे यायचा. क्रांतीकारक गटाच्या संकल्पना, त्यांचे विचार यांनी दुकडीबालाला प्रभावित केले होते.

२६ ऑगस्ट १९१४ या दिवशी बंगाली क्रांतिकारी संघटना ‘अनुशीलन’ समितीच्या ‘युगांतर’ गटाच्या सदस्यांनी कलकत्त्यातील बंदुकांचे व्यापारी मेसर्स रोडा अँड कंपनी यांच्याकडे पिस्तूल व दारुगोळा नेणारी गाडी कस्टम हाऊस मधून कंपनीच्या गोदामाकडे जात असताना अडविली गेली व त्यातील शस्त्रे घेऊन क्रांतिकारी पसार झाले. दिवसाढवळ्या झालेला हा सर्वात मोठा दरोडा होता. निबारणचंद्र व त्याचे साथीदार यात सामील होते. या सर्वांना मग गुप्तपणे राहावे लागले. त्यावेळी या भूमिपुत्रांना दुकडीबाला ने फार जवळून पाहिले. तिलाही आपण मातृभूमीसाठी काहीतरी करावे असे वाटत होते, पण निबारणचंद्र तिला या धोकादायक कारवायात सामील करून घेण्यास तयार नव्हता. पण ती मात्र आपल्या मतावर ठाम होती त्यामुळे लवकरच दुकडीबालाचे घर गनिमी कारवायांचे केंद्र बनले.

तिने भूमिपुत्रांकडून पिस्तूल व इतर हत्यारे चालविण्याचे शिक्षण घेतले. निबारणचंद्र वेगवेगळ्या ठिकाणी पेट्या पोहोचवण्याचे काम करीत होता. काही पिस्तुले व काडतुसे दुकडीबालाच्या घरी ठेवली होती. त्यावेळी दुकडीबालाचे बाळ दूध पिते होते. पोलिसांचे काम जोरात चालले होते. अखेर ८ जानेवारी १९१७ ला पोलीस दुकडीबालाच्या घरी आले. तिच्या घराचे दार बंद होते

दारावर टकटक आवाज करून पोलिसांनी तिला दार उघडण्यास सांगितले. तिने आतूनच सांगितले, बाळ दूध पिते आहे मी दार उघडू शकत नाही्. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. आम्हाला दार तोडून आत यावे लागेल असा त्यांनी धमकीवजा इशारा दिला. दरम्यानच्या काळात दुकडीबाला ने काडतुसे व पिस्तुले काढून दुपट्यात गुंडाळली. व बाळ दुपट्यात घेऊन दार उघडण्यासाठी गेली. व पोलिसांना म्हणाली एकटी बाई घरात असताना तुम्ही आत येऊ शकत नाही. थांबा, मी शेजाऱ्यांना बोलावून आणते. असे म्हणून ती शेजारी गेली. हळूच सगळा माल शेजारी ठेवून आली. तोपर्यंत पोलिसांनी सगळे घर पालथे घातले होते. पण त्यांना काहीही मिळाले नाही. निराश होऊन ते बाहेर पडले. तेवढ्यात कोणीतरी फितूर निघालाच आणि त्याने चोरी चव्हाट्यावर आणली आणि दुकडीबाला पकडली गेली.

तान्ह्या बाळाला घरात सोडून तिला पोलिसांबरोबर जावे लागले. तिला अटक झाली. तुरुंगात तिचा प्रचंड छळ केला गेला. तिने क्रांतिकारकांची नावे सांगावीत, ठाव ठिकाणा सांगावा, म्हणून तिच्यावर दबाव आणला गेला. पण तिने तोंड उघडले नाही. शेवटी तिला दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. रोज करावे लागणारे प्रचंड श्रम अंग पिळवटून टाकत होते. तरीही रोज वडिलांना, मी चांगली आहे असं सांगून बाळाची काळजी घेण्याची विनंती करत होती.

शस्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन कारावास भोगावा लागणारी दुकडीबाला ही पहिली महिला क्रांतिकारक होती.

स्वतंत्र भारतात १९७० साली तिचे निधन झाले. तरीही तिच्या कार्याचा उल्लेख फार कोठे सापडत नाही की तिची स्मृती कुठे जतन केली गेली नाही हे आपले दुर्दैव!!

– क्रमशः भाग ५  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देशाला ‘परमवीर’ देणारे ‘प्रहार’ निर्माते… नाना पाटेकर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

 

.श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “देशाला ‘परमवीर’ देणारे ‘प्रहार’ निर्माते… नाना पाटेकर!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

“साब, क्यों अपनी जान खतरे में डाल रहें हो? ” कमांडो प्रशिक्षण केंद्रामध्ये तैनात असलेल्या एका ज्येष्ठ सैनिकाने नाना पाटेकरांना हा प्रश्न विचारला तेंव्हा नाना पाटेकर नुसते हसले होते! आणि मग पुढे एवढंच म्हणाले होते, ”साब, आर्मी अफसर का किरदार निभाना है… वह सौ फिसदी सच ही लगना चाहिये… इसके लिये मैं सब कुछ करुंगा… जो यहां के जवान, अफसर करते हैं! ”

मोकळ्या मैदानात चौकोनी आकाराचा स्विमिंग पूलसदृश पाण्याचा साठा… खोली सुमारे १७ फूट. पाण्यात दोन टॉवर्स.. या दोन टॉवर्सदरम्यान सुमारे ५० फुट उंचीवर आडवी लाकडी फळी.. तिची रुंदी जेमतेम २४ इंच… काठावरून पाण्यात उडी घ्यायची.. पोहत टॉवरच्या लोखंडी उंच पाय-या भरभर चढत त्या लाकडी फळीवर पोहोचायचं… आणि तोल सांभाळत पुढे चालत जायचं… तिथंही काही पाय-या वर चढून पुन्हा खाली उतरायचं… डोक्यावर एक दोर लटकत असतो… त्या दोराला माकडासारखं उलटं लटकत दोराला पायांची कैंची करून धरायचं आणि हातांच्या साहाय्याने दोराच्या मध्यावर पोहोचायचं.. पाय अधांतरी खाली सोडायचं… शरीर स्थिर करायचं… आणि तिथून म्हणून सुमारे ६० फूट खाली सुमारे साडेसोळा फूट खोल असलेल्या पाण्याकडे एखाद्या लाकडाच्या सरळसोट ओंडक्यासारखं शरीर सोडून द्यायचं… पाण्यात पाय आधी शिरले पाहिजेत… पाण्यावर शरीर आपटलं तर एखाद्या खडकावर आदळल्यासारखं लागतो पाण्याचा मार. युद्धात पाण्यातून, उंच डोंगरावरून सैनिकाला पुढे जावं लागतं… पाण्याची, उंचीची भीती मनातून कायमची घालवण्यासाठी कमांडो कोर्स मध्ये ही लिडो किंवा लिओ जंप अतिशय महत्त्वाची असते!

नियमित लष्करी प्रशिक्षण घेणा-या सैनिकांसाठीही ही उडी एक आव्हानच ठरते… नाना पाटेकर यांनी अशा कित्येक उड्या अगदी न घाबरता घेतल्या होत्या! ते पाहून त्या ज्येष्ठ सैनिकाने काळजीच्या भावनेने त्यांना तो प्रश्न विचारला होता… कारण नाना काही नियमित सैनिक नव्हते! हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते आणि बहुतांश अभिनेते धोकादायक दृश्ये स्वत: सहसा देत नाहीत… DUPLICATE अर्थात BODY DOUBLE वापरतात… म्हणजे त्यांच्याऐवजी अन्य कुणीतरी ती कृती करतो मात्र चित्रपटात प्रेक्षकांना असं भासवलं जातं की त्या अभिनेत्यानेच ते साहसी काम केलेलं आहे!

पण इथं विश्वनाथ ऊर्फ नाना गजानन पाटेकर नावाचं वादळ येऊ घातलं होतं चित्रपटसृष्टीवर. प्रत्यक्ष सैन्यात भरती झालेला नसला तरी मनाने सैनिक असलेला हा तरुण भारतीय लष्करासंबंधी एक चित्रपट बनवू पहात होता.. त्यासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावण्याचा निश्चय केला होता. युद्धाची, लष्करी पार्श्वभूमी असलेले अनेक चित्रपट तोपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलेले होते… पण त्यात केस, पोट वाढलेले, नाजूक देहयष्टी असलेले कलाकार नकली अभिनय करताना पाहावे लागले होते.. अर्थात याला काही अपवाद होतेच. पण आपण चित्रपटात साकारणार असलेल्या मेजर चौहान नावाच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप होण्यासाठी नानांनी स्वत: नखशिखान्त मेजर चौहान होण्याचा निर्णय घेतला! भारतीय लष्कराला ‘घातक’ कमांडो देणारी प्रशिक्षण संस्था कर्नाटक राज्यात बेळगावी येथे स्थित आहे. लष्करी विषयावर चित्रपट बनतो आहे या विचाराने संरक्षण मंत्रालयाने नाना पाटेकर यांना या केंद्रामध्ये सराव, चित्रीकरण करण्यासाठी रीतसर परवानगी प्रदान केली. आणि पुढील तीन वर्षे नाना पाटेकर या प्रशिक्षण केंद्रात राहिले.. प्रशिक्षणात अन्य सैनिकांच्या, अधिका-यांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळत राहिले. अर्थात एका सामान्य नागरिक व्यक्तीला ते अत्यंत आव्हानात्मक प्रशिक्षण संपूर्णतया घेणं अशक्यच होतं.. पण नानांनी त्यातील बराचसा भाग आत्मसात केला. मात्र त्यांना अधिकृत ‘कमांडो’ म्हणून प्रमाणपत्र दिलं गेलं नाही… मात्र त्यांच्या प्रशिक्षणाचा उल्लेख असलेलं पत्र मात्र दिलं गेलं असावं.

बेळगावी येथे प्रशिक्षण सुरु असतानाच नाना ‘प्रहार’ चित्रपटाची कथाही लिहीत होते. सहकथा लेखक म्हणून सुजित सेन आणि हृद्य लाणी यांनी मदत केली. नानांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधाकर बोकाडे यांना ‘प्रहार’ची कथा ऐकवली आणि त्यांनी हा चित्रपट निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली.. चित्रपट निर्माता चित्रपटाचा सर्व खर्च स्वत: करतो. या चित्रपटात नानांनी दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडलीच आणि मेजर चौहान यांची मध्यवर्ती भूमिकाही केली. त्यांच्यासोबत डिम्पल कपाडिया, माधुरी दीक्षित, मकरंद देशपांडे, गौतम जोगळेकर असे प्रथितयश आणि काही अगदीच नवखे कलाकार होते. क कुणालाही ‘मेकअप’ करण्याची परवानगी नव्हती.. अगदी डिम्पल किंवा माधुरी यांनाही! चित्रपटात सर्वकाही खरेखुरे असावे याकडे नानांनी कटाक्ष ठेवला. मूळचे नागपूरचे असलेले कर्नल सुनील देशपांडे हे मराठा लाईट इन्फंट्रीच्या काळी पाचवी बटालियनचे अधिकारी नानांच्या मदतीला होते. त्यांनी चित्रपटासाठी लष्करी सल्लागार म्हणून काम केले. त्यामुळे सर्वकाही अस्सल असावे, हे नानांचे उद्दिष्ट्य साध्य झाले. ब्रिगेडीअर चंद्रशेखरन साहेब हे त्यावेळी Maratha Light Infantry Regimental Centre (MLIRC) चे कमांडंट होते. त्यांनी या चित्रपटासाठी सहकार्य केल्यानेच या ठिकाणी चित्रपट चित्रित होऊ शकला. नानांनी काही दृश्यांत लष्करातल्या ख-याखु-या अधिकारी, सैनिकांना काही भूमिकेत दाखवलं. यात त्यावेळी लेफ्टनंट कर्नल आणि बेळगावीच्या प्रशिक्षण केंदात प्रशिक्षक असलेले व्ही. के. सिंग साहेबही होते. सिंग साहेब पुढे जनरल आणि लष्कर प्रमुख पदावर पोहोचले. ‘प्रहार’चे बरेचसे चित्रीकरण लष्करी केंद्रातच केले होते… तेथील सर्व नियम पाळून. यातून ‘Prahar-The Final Attack’ हा उत्कृष्ट चित्रपट तयार झाला!

कारगिल युद्धात आपल्या अतुलनीय पराक्रम गाजवून हुतात्मा झालेले आणि मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित झालेले मेजर विक्रम बात्रा साहेब त्यांच्या कुमारवयात हा चित्रपट पाहून खूपच प्रभावीत झाले होते… आणि त्यांनी भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचा निश्चय केला होता… आणि तसे ते झालेही होते. एका अर्थाने नानांनी देशाला एक ‘परमवीर’ मिळवून दिला!

‘प्रहार’ नंतरच्या पुढील तीन वर्षांत नानांनी भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेत रीतसरपणे प्रवेश मिळवला, प्रशिक्षण पूर्ण केले आणि ते १९९० मध्ये मानद कॅप्टन बनले. वर्षातून सहा महिने या सेनेतील सैनिक, अधिका-यांना लष्करी कर्तव्ये सोपवली जातात.

वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरु झाले. लष्करी बाणा अंगात भिनलेले नाना स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी सीमेवर जाऊन लढण्याची इच्छा जाहीर केली. नागरी व्यक्तींना तशी परवानगी मिळणे अशक्य होते. पण नानांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना गळ घातली… आपण लष्करी प्रशिक्षण घेतले असल्याचे पटवून दिले आणि विशेष बाब म्हणून त्यांना परवानगी दिली गेली… नाना सीमेवर जाऊन रुजू झाले. प्रत्यक्ष लढाईत जायची परवानगी त्यांना दिली गेलेली नसली तरी त्यांनी दुस-या फळीमध्ये राहून मोठी कामगिरी बजावली. लढणा-या सैनिकांना साहाय्य करणा-या QRT अर्थात Quick Reaction Team मध्ये नाना सक्रीय राहिले. सीमावर्ती भागांत रात्रीची सशस्त्र गस्त घातली. गरज पडली तेंव्हा लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांची सेवा-सुश्रुषा केली. यावेळी अनेक हिंदी चित्रपट कलाकार रुग्णालयांत जाऊन सैनिकांची केवळ सदिच्छा भेटी घेत असत, त्याच्या सचित्र बातम्या वर्तमानपत्रे, दूरदर्शनवर प्रसिद्ध होत असत. नाना पाटेकर यांना त्यात रस नसे.

नाना तब्बल साठ दिवस लष्करी कामगिरीवर तैनात होते… या काळात त्यांचे तब्बल वीस किलो वजन घटले होते. खंदक, तंबूमध्ये प्रत्यक्ष सैनिकांसोबत राहिल्याने, उंच पर्वतांवर काम केल्यामुळे नानांना सैनिकांना कोणत्या परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते, प्राणांचे बलिदान द्यावे लागते… हे जवळून पाहता आले. खरेखुरे सैनिक एक हिरो आपल्यासोबत आहे यासाठी आनंदी असत तर नाना ते स्वत: देशाच्या ख-याखु-या हिरोंसोबत आहेत, म्हणून त्या सैनिकांना प्रचंड सन्मान देत. या काळात नानांनी त्यांच्या वाट्याला आलेली सर्व कर्तव्ये पार पाडली… युद्धात काहीही होऊ शकले असते.. पण त्यांची देशासाठी प्राण देण्याचीही तयारी होती.

पुढील आयुष्यात नानांनी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत केली. तेरा वर्षे प्रादेशिक सेनेत सेवा बजावून लेफ्टनंट कर्नल (मानद) Lieutenant Colonel (Hon.) या पदावर असताना नाना सेवानिवृत्त झाले. लष्करी प्रशिक्षणादरम्यान रायफल शुटींग मध्येही प्राविण्य मिळवलेले असल्याने नानांनी पुढे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही रौप्यपदक प्राप्त केले होते.

भारतीय लष्कराबद्दल आत्यंतिक जिव्हाळा, प्रेम आणि अभिमान असलेले नाना पाटेकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. बाबा आमटे यांचा कुष्ठरोगी सेवा प्रकल्प असो की मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतक-यांची कुटुंबे असोत किंवा कुठलाही सामाजिक उपक्रम असो.. नानांचा हातभार लागलाच. आलिशान कार खरेदी करण्यासाठी जमा केलेले सुमारे दीड कोटी रुपये नानांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना वाटून दिले. गेली काही वर्षे स्वत:च्या मालकीच्या शेतात राबणारे नाना पाटेकर एक विशेष व्यक्तिमत्व होते यात शंकाच नाही. त्यांची चित्रपटातली, नाटकांतली कारकीर्द यशस्वी तर आहेच पण एक देशप्रेमी म्हणून त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात बजावलेली भूमिका अजरामर राहील, यात शंका नाही. ‘प्रहार’ चित्रपटाने त्यावेळच्या तरुणांना खूप मोठी प्रेरणा दिली, हेही खरेच.

विल्यम शेक्सपियरच्याHamlet नाटकात राजपुत्र Hamlet म्हणतो “What a piece of work is a man, How noble in reason, how infinite in faculty, In form and moving how express and admirable. ” And “yet to me, what is this quintessence of dust? ” अर्थात “निसर्गाने किती सुंदर माणूस घडवला आहे ना! त्याची विचारक्षमता, त्याची बुद्धी, गुण अद्भूत आणि अमर्याद आहेत. त्याचे शरीर किती देखणं आणि हालचाली मोहक. पण या माणसाची अंती राखच होऊन जाते! ” नाना पाटेकर याच विचारात जगले असावेत.

स्वत:च्या अंत्यसंस्कारांसाठी बारा मण लाकडं आधीच जमा करून ठेवणारा माणूस दुर्मिळच म्हटला पाहिजे.

जय हिंद.. लेफ्टनंट कर्नल (मानद) नाना पाटेकर (सेवानिवृत्त)… आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद.. जय हिंद की सेना. 🇮🇳

☆

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares