☆ जे पेराल ते उगवेल – लेखिका : शोभा ननवरे ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆
☆
शुद्धबीजा पोटीं। फळे रसाळ गोमटीं ||१॥
मुखीं अमृताची वाणी। देह देवाचे कारणीं ॥ध्रु. ॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती। ताप दर्शनं विश्रांती॥३॥
जगद्गुरू संत तुकाराम महाराज जेव्हा “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी” असे म्हणतात, तेव्हा ते आपल्याला सावध करत असतात. आजचा तरुण वर्ग, आजचा समाज ‘इन्स्टंट” निकालाच्या मागे धावत आहे. कोणालाही कष्टाची पेरणी नको आहे, पण प्रत्येकाला यशाचे रसाळ फळ हवे आहे. पण निसर्गाच्या दरबारात लाच चालत नाही आणि वशिलाही चालत नाही. तिथे बाभळीच्या काट्यांची पेरणी करून हापूसच्या गोडव्याची अपेक्षा करणे म्हणजे स्वत:चाच घात करण्यासारखे आहे. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे केवळ धान्याचा दाणा नव्हे; तर बीज म्हणजे आपले विचार, आपले संस्कार, आपली संगत आणि आपली नीतिमत्ता.
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा काही आकाशातून पडला नाही. त्याच्या जडणघडणीत त्याच्या गुरूंनी – रमाकांत आचरेकर सरांनी पेरलेले ‘शिस्तीचे बीज’ महत्त्वाचे होते.
शिवाजी पार्कवर सराव करताना, जेव्हा सचिन थकून जायचा, तेव्हा आचरेकर सर स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि सांगायचे, “जो गोलंदाज सचिनला बाद करेल, त्याला हे नाणे मिळेल आणि जर सचिनने कोणालाही आपली विकेट दिली नाही, तर हे नाणे सचिनचे. “
त्या एका रुपयाच्या नाण्यासाठी सचिन जिवाची बाजी लावून खेळायचा. ते नाणे म्हणजे पैशाचे आमिष नव्हते, तर ते ‘कष्टाला पर्याय नाही’ आणि ‘एकाग्रता ढळू देऊ नको’ या संस्कारांचे बीज होते. पुढे सचिनकडे कोट्यवधी रुपये आले, पण त्या गुरुंनी दिलेल्या एका रुपयाच्या नाण्याची किंमत त्याच्यासाठी सर्वाधिक राहिली. हे ‘शुद्ध बीज’ होते. म्हणूनच, एवढी प्रसिद्धी मिळवूनही सचिनच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. त्याचे पाय जमिनीवर राहिले.
मित्रहो, हे प्रकरण वाचताना स्वतःला एक प्रश्न विचारा,
“आज मी माझ्या मेंदूच्या शेतात कोणते बीज पेरतोय?” जर तुम्ही आळसाचे बीज पेरले, तर उद्या दारिद्र्याचे पीक उगवेल.
जर तुम्ही व्यसनाचे बीज पेरले, तर उद्या विनाशाचे पीक उगवेल.
जर तुम्ही अहंकाराचे बीज पेरले, तर उद्या अपमानाचे पीक उगवेल.
जर तुम्ही कष्टाचे बीज पेरले, तर यश उगवेल.
जर तुम्ही नम्रतेचे बीज पेरले, तर सन्मान उगवेल.
आणि जर तुम्ही माणुसकीचे बीज पेरले, गेले तर समाधान उगवेल.
तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ भक्तीचा नाही, तर ती एक ‘वॉर्निंग बेल’ आहे आणि यशाची ‘गुरुकिल्ली’ सुद्धा आहे. तुमची परिस्थिती आज कशीही असू तुमचे ‘बीज’ (विचार आणि हेतू) शुद्ध असेल, तर तुमची फळे (भविष्य) रसाळ आणि गोमटी असणारच, यावर विश्वास ठेवा. कारण शेवटी निसर्गाचा नियम एकच आहे ज्याची पेरणी जबरदस्त, त्याचीच उगवण जबरदस्त!
☆
लेखिका :सौ शोभा ननवरे
प्रस्तुती : शीतल कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






