मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६९ आणि ७० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६९ आणि ७० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६९ – – 

सुखानंदकारी निवारी भयाते ।

जगीं भक्तिभावे भजावे तयाते ।

विवेके तजावा अनाचार हेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।

अर्थ – –  भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आणि भयाचे निवारण करणारा आहे.  त्याला भक्तिभावाने आराधना करावी.  विवेकाच्या साहाय्याने अनाचार म्हणजे अनीतीने वागणे आणि इतरांचा हेवा किंवा द्वेष यांचा त्याग करावा.  प्रभात समयी श्रीरामाचे (भगवंताचे) चिंतन करावे.

(सुखानंदकारी – सुख आणि आनंद देणारा, तजावा – सोडून द्यावा, अनाचार – अनीतीचे वागणे)

विवेचन – – भगवंताचे गुण वर्णन करताना समर्थ म्हणतात की भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे.  सुख आणि आनंद हे शब्द आपण सामान्यपणे समानार्थी समजतो पण त्यात फरक आहे.  सुख हे क्षणिक असून इंद्रिये आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते.  माणूस आयुष्यभर या सुखाच्या मागे धावत असतो.  आनंद ही एक वृत्ती किंवा मानसिक अवस्था असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे.  ती परिस्थितीवर अवलंबून नसते.  जो स्वस्वरुपी स्थिर असतो, त्याच्याकडे कायमच आनंदी वृत्ती असते.  भगवंत या दोन्हींचा दाता आहे.  तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे.  दुःख हरण केल्यानंतर उरतो तो आनंद आणि सुख.

भगवंत हा भयाचे देखील हरण करतो.  माणसाला या ना त्या कारणाने आयुष्यभर कुठल्यातरी भयाने पछाडलेले असते.  माझा पैसा टिकेल का, मुलेबाळे मला म्हातारपणी विचारतील का? एक ना दोन अशा अनेक चिंतांनी मनुष्य ग्रस्त असतो.  पण सर्वात मोठे भय असते ते मरणाचे.  भगवंत या भीतीतून देखील आपली मुक्तता करतो.  जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका झाली तर मृत्यूचे देखील भय नाहीच!

पण या सुखानंदकारी अशा भगवंताच्या कृपेचा अनुभव यायचा असेल तर त्यासाठी कोणती अट आहे? ती समर्थ पुढील ओळीत सांगतात.  ते म्हणतात, “जगी भक्तिभावे भजावे तयाते. ” अत्यंत भक्तिभाव आपल्या ठायी असला पाहिजे.  त्यासाठी मनाने आपण त्याचे होऊन जावे.  आपले सर्वस्व त्याला अर्पण करावे.  भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे अशी दृढ भावना आपल्या ठायी असली पाहिजे.  तुकाराम महाराज म्हणतात…  

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मतारीची ।

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी भगवंत आळवावा ।

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।

भगवंत प्राप्तीसाठी वनात जाण्याची जरुरी नाही.  कोणतेही कष्ट, उपासतापास करण्याची गरज नाही.  आपण आहोत तेथेच त्याचे नामस्मरण करावे.  मनाने त्याचेच होऊन राहावे.

पण भगवंत प्राप्तीसाठी निर्मळ, शुद्ध अंतःकरणाची गरज असते.  जी माणसे अनाचाराने म्हणजे अनीतीने वागतात, दुसऱ्यांचा द्वेष किंवा मत्सर करतात, अशांना भगवंत कसा प्राप्त होईल? स्वच्छ पाण्यातच प्रतिबिंब दिसते.  तसेच मनही शुद्ध, स्वच्छ हवे.  अनीती, मत्सर, हेवेदावे हा मनातील गाळ आहे.  तो काढून टाकायला हवा.  अनीती आणि अनाचाराने वागणारी माणसे कितीही शक्तिमान आणि बलवान असली तरी शेवटी त्यांचा नाश अटळ असतो.  रावण दुराचारी होता.  शक्तिमान आणि विद्वान होता.  पण त्याचा नाश झाला.  तो स्वतः, त्याची मुले यांचा नाश झाला.  अनीतीने वागणारे कौरव युद्धात मारले गेले आणि त्यांचे राज्यही नष्ट झाले.  आपण जसे वागतो, तेच कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे परत येते.  हेवा किंवा मत्सर केल्याने दुसऱ्याचे फारसे नुकसान होणार नाही.  पण हे दोष आपल्यालाच आतून संपवतात.  द्वेष केला तर द्वेषच वाट्याला येईल.  प्रेम दिले तर प्रेम परत मिळेल.  म्हणून अनीतीने वागणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे यासारख्या गोष्टींचा त्याग करायला हवा.

या गोष्टी परमार्थातील अडथळा आहेत.  त्यांचा त्याग विवेकाने म्हणजे विचारपूर्वक करावा.  मला इतरांनी माझ्याशी जसे वागायला हवे असे वाटते, तसेच मी इतरांशी वागायला हवे.  मला कोणी खोटे बोललेले आवडत नाही, कोणी माझा द्वेष केला तर मला आवडत नाही.  मग मीही इतरांशी तसेच वागायला हवे, नाही का? मागील एका मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ” असा विचारपूर्वक मनाला बोध करून, संयम, विवेक आणि वैराग्य यांची कास धरून वाटचाल केली तर भगवंत दूर नाही.  त्यासाठी पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि पुढेही दिवसभर आपली कामे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये.

स्वसंवाद :: 

१.  मी क्षणिक ‘सुख’ शोधतो की चिरंतन ‘आनंद’?

२.  माझ्याकडून नकळत का होईना पण कोणाचा ‘हेवा’ (मत्सर) किंवा द्वेष घडतो का?

३.  “इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच मी इतरांशी वागतो का? “

४.  पहाटे उठल्यानंतर मी प्रथम श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन करतो का?

===== 

श्लोक क्र.  ७० – – 

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।

कदा बाधिजेनापदा नित्यनेमे ।

मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।

अर्थ – अगदी मनापासून रामनाम घ्यावे.  नित्यनेमाने नाम घेणाऱ्यास संकटांचा त्रास होत नाही.  अहंकार आणि आळस या दुर्गुणांचा त्याग करावा.  आणि प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(वदा – म्हणा, पूर्णकामे – अगदी मनापासून, बाधणे – त्रास होणे, आपदा – संकट, मद – अहंकार, आलस्य – आळस)

विवेचन –  या श्लोकात भगवंताचे नाम अगदी मनापासून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत.  त्यासाठी त्यांनी ‘ पूर्णकामे ‘ हा सुंदर शब्द वापरला आहे.  व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला तिचे काय फळ मिळेल याकडे आपले लक्ष असते.  फळाची अपेक्षा ठेवूनच आपण कर्म करीत असतो.  पण जेव्हा रामनाम किंवा भगवंताचे नाम आपण घेतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये.  नाम फक्त नामासाठीच किंवा भगवंतासाठीच घ्यावे.  असे नाम जेव्हा आपण घेऊ त्यावेळी इतर सर्व अपेक्षा आपोआपच नाहीशा होतील.  ते नाम मग मनापासून घेतले जाईल म्हणजेच समर्थ सांगतात तसे ‘ पूर्णकामे. ‘

तसेच समर्थ म्हणतात की नित्यनेमाने नाम घेणाऱ्याला संकटे त्रास देत नाहीत.  नित्यनेमामुळे संकटे येत नाहीत असे नाही, तर संकटातही मनाचा समतोल राखण्याची आणि त्या आपदा सोसण्याची शक्ती रामनामामुळे मिळते असा याचा अर्थ आहे.  संकटांची धाव देहापर्यंतच असते परंतु अखंड नामस्मरण करणाऱ्याला त्यांचा त्रास होत नाही.

परंतु असे अगदी मनापासून नाम घेण्याच्या आड दोन मोठया अडचणी उभ्या राहतात.  एक म्हणजे आपला अहंकार.  मी कशाला नाम घेऊ? मला त्याची काय आवश्यकता? नाम घेणे हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे.  त्याशिवाय नुसते नाम घेऊन काय होणार? त्याच्या जोडीला ज्ञान नको का? असे नानाविध विचार मनात येऊन माणूस नाम घेण्याच्या विचारापासून परावृत्त होतो.  पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्याच संतांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे.  भगवंत प्राप्तीसाठी नामसारखे सोपे साधन नाही असे ते म्हणतात.  गोंदवलेकर महाराजांनी तर आपल्या प्रत्येक प्रवचनात निरनिराळ्या प्रकारे केवळ नाम घेण्याचा उपदेश केला आहे.

नाम घेण्याच्या आड येणारी दुसरी गोष्ट म्हणजे आळस.  आळसाने मोठमोठी कार्ये नासतात.  चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास करून आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो असे म्हटले जाते.  मनुष्य प्राण्यांखेरीज इतरांना विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली नाही.  या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेतल्याशिवाय पर्याय नाही.  मूळ स्वरूप म्हणजेच भगवंताचे ज्ञान.  आपली नित्यकर्मे करता करता आपण सहज भगवंताचे नाम घेऊ शकतो.  परंतु प्रत्येक वेळी आपला आळस आपल्याला या गोष्टीपासून प्रतिबंध करतो आणि नामस्मरण करायचे तर निवृत्तीनंतर करू.  आताच काय घाई आहे अशा प्रकारचा सोयीस्कर विचार आपण करत असतो.  पण तो बालपण खेळात जाते, तरुणपण धुंदीत निघून जाते.  मग म्हातारपणी काही करू म्हटले तर शरीर साथ देत नाही.  म्हणूनच समर्थ आपल्याला एका अभंगात सांगतात, “काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा… ” म्हणून जोवर शरीर साथ देते आहे तोवरच परमेश्वराचे नामस्मरण नित्यनेमाने करावे असे समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१.  मी करत असलेल्या उपासनेच्या किंवा चांगल्या कामाच्या मागे काही ‘भौतिक फळाची अपेक्षा’ असते का? की मी ते निरपेक्ष भावनेने करतो?

२.  “नामस्मरण ही केवळ निवृत्तीनंतर करण्याची गोष्ट आहे” असा सोयीस्कर विचार करून मी आजचा वेळ ‘आळसात’ घालवत आहे का?

३.  माझ्या ज्ञानाचा, पदाचा किंवा संपत्तीचा ‘अहंकार’ मला भगवंताच्या चरणी लीन होण्यापासून रोखत आहे का?

४.  काळाचा प्रत्येक क्षण वेगाने पुढे जात असताना, मी माझ्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी दिवसातील काही वेळ नित्यनेमाने नामस्मरणाला देतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६९ आणि ७०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंचीत जपलेले मौल्यवान धन…  – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ चंचीत जपलेले मौल्यवान धन…  – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

जे कधीही प्राथमिक शाळेत सुद्धा गेले नाहीत साधी अक्षरओळख सुद्धा नाही पण ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे अशा दोन महान विभूती महाराष्ट्रात होऊन गेल्या.  त्या म्हणजे गाडगे बाबा आणि बहिणाबाई चौधरी.  गाडगे बाबा यांच्या नावाने अमरावती येथे विद्यापीठ आहे तर बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे विद्यापीठ आहे आणि कित्येक विद्यालयात आणि महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात बहिणाबाई यांच्या कविता शिकविल्या जातात आणि त्यांच्या साहित्यावर कित्येकांनी Ph D मिळविल्या आहेत.  

जळगाव जवळील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार त्यांचे लग्न लवकरच म्हणजे त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी झाले.  त्यांना तीन मुले झाली पण वयाच्या ३० व्या वर्षी त्या विधवा झाल्या.  त्यांच्या ३ मुलांपैकी सोपानदेव चौधरी सुप्रसिद्ध कवी आहेत.  बहिणाबाई यांनी आयुष्यभर शेतात काम केले आणि काम करताकरता कविता रचल्या.  त्यातील फार थोड्या कविता आज उपलब्ध आहेत, त्या सोपानदेवांनी लिहून घेतल्यामुळे.  याबाबत सोपानदेव म्हणाले होते कि आई दिवसभर शेतात जाई आणि शेतात काम करता करता तिला कविता सुचत असत मग संध्याकाळी सर्वांची जेवणे झाली कि सोपानदेवांना..  त्या कविता सांगत त्या कविता सोपानदेव एका कागदावर लिहून ठेवत आणि तो कागद आईकडे देत आई तो कागद तिच्या कमरेला एक चंची असे त्यात ती ठेवून देत आणि ती चंची कागदाने भरली कि त्याच्या घरात जे आढे असे (आढे म्हणजे आडवे लाकूड असे ज्यावर छप्पर असते), त्या आढ्यावर खोचून ठेवीत. अशा अनेक चंची तिथे खोचून ठेवल्या होत्या.  मग सोपानदेव एम ए झाले आणि मुंबईला नोकरीला लागले ते सुद्धा कविता करत आणि त्या कविता त्यावेळी आचार्य अत्रे यांच्या ” दैनिक मराठा ” या दैनिकात प्रसिद्ध होत.  एक दिवस त्यांना मुबईला निरोप मिळाला कि घराच्या व शेतीच्या वाटण्या होणार आहेत तेव्हा तुम्ही गावी या.  तर ते गावाकडे आले.  गावचे पंच जमले होते आणि ते घराबाहेर खुर्च्या टाकून बसले होते.  सोपानदेव आल्यानंतर त्यांनी वाटणी करायला सुरवात करावी म्हणून त्यांच्या भावाने घरात जे काही असेल तर बाहेर आणायला सुरवात केली म्हणजे भांडी कुंडी वगैरे त्यात एक चंची होती तेव्हा सोपानदेव म्हणाले कि तेवढी चंची मला द्या मला बाकी काही नको.  पंचांना वाटले कि त्या चंचीत काही सोने वगैरे आहे काय? पण फक्त कागद निघाले ते सगळे जीर्ण झाले होते.  

मग ते ती चंची घेऊन मुंबईला आले आणि त्यांनी एका वहीत त्या कविता लिहून ठेवल्या आणि त्या कविता नेहमी त्यांच्याबरोबर त्यांच्या शबनम पिशवीत असत.

नेहमीप्रमाणे ते आचार्य अत्रे यांच्याकडे गेले पण ते “दैनिक मराठा” याचा अग्रलेख लिहीत होते म्हणून ते परत यायला निघाले वाटेत त्यांना आठवण झाली कि शबनम अत्रे यांच्या ऑफिस मध्येच राहिली आहे.  ती घेण्यासाठी म्हणून परत आले तेव्हा अत्रे त्या कविता वाचत होते आणि सोपानदेव आल्यानंतर त्यांना म्हणाले कि तुम्ही सोने लपवून ठेवले हा एक मोहरांचा हंडा आहे.  मग त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या.  अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर दोन अग्रलेख दैनिक मराठ्यांत लिहिले.

सोपानदेव म्हणतात कि पाऊस आला की त्यांच्या आईला फार आनंद होत असे त्यात श्रावण महिना आला कि तिला आनंद होत असे.  सकाळी जात्यावर दळताना, तसेच धान्य पाखडताना, घरात केरवारे करताना ती स्वरचित कविता म्हणे 

तिला एकदा विचारले कि तुला कविता सुचते कशी?

तर तिने सांगितले…  

माझी माय सरस्वती, मला शिकविते बोली /

 एका बहिणीच्या मनी, किती गुपिते पेरली //

 अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी / (घरोटा म्हणजे जाते)

 तसे तसे माझे गाणे, पोटातून येते ओठी //

बहिणाबाईंना माहेरचे खूप प्रेम असे.  त्यांचेकडे नेहमी एक योगी येत असे.  नेहमी माहेर माहेर करणाऱ्या त्या बहिणाबाईंना पाहून तो योगी त्यांना म्हणाला – –

माझे माहेर माहेर, सदा गाणे तुझ्या ओठी 

 मग माहेरून आले मग सासरी कशापोटी //

तेव्हा बहिणाबाई उत्तर देते 

अरे ऎक हे रे योग्या, ऐक काय मी सांगते / 

 लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते //

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाठ्यक्रम याचा भागच बनवला आहे.  माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत.  हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.  त्यातील बऱ्याच कविता या लोकांना माहित आहेत.  त्यांच्या कवितांच्या ओळीचे वर्णन म्हणीत झाले आहे 

…  “अरे संसार संसार /जसा तवा चुल्ह्यावर /आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर /”

…  “मन वढाळ, वढाळ/ उभ्या पिकातलं ढोर /किती हाकला हाकला /फिरून येते पिकावर /”

…  “मन मोकाट मोकाट /याच्या ठाई ठाई वाटा /जश्या वाऱ्याने चालल्या /पाण्यावरच्या रे लाटा /”

 त्यांच्या कमी प्रसिद्ध असलेल्या (अर्थात माझ्या मते) कविता खालिलप्रमाणे –

बिना कपाशीने उले त्याला बोड म्हणू नई / (उले म्हणजे उलगडले)

हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हणू नई /

 नही वाऱ्याने हलले त्याले पान म्हणू नई /

 नही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नई /

 पाटा विहिरीवाचून त्याले मळा म्हणू नई /

 नही देवाचे दर्शन त्याले डोळा म्हणू नई /

 निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नई /

 आखडता दानासाठी त्याले हात म्हणू नई /

 नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नई /

 जिते नही फुटे पान्हा तिले माय म्हणू नई /

 अरे, वाटच्या दोरीले कधी साप म्हणूं नई 

 इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूं नई /

इमानाले इसरला त्याले नेक म्हणूं नई 

जल्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूं नई / 

*दुसरी कविता*

धरित्रीच्या कुशीमध्ये बियबियाणी निजली /

 वर पसरली माती जशी शाल पांघरली /

 बीज डरारे मातीत सर्व कोंब आले वर /

 गहिवरले शेत जस अंगावरती शहार /

ऊनवाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून /

प्रगटली दोन पान जशी हात ती जोडून /

 टाळ्या वाजविती पान दंग देवाच्या भजनी /

 जशी कार्टी करुणा होऊ दे रे आबादानी /

दिसामासा होय वाढ रोप झाली आता मोठी /

आला पिकाला बहर झाली शेतामध्ये दाटी /

 कशी वाऱ्याने डोलती दाणे आले गाडी गाडी /

 देव अजब गारुडी देव अजब गारुडी /

 

या महान कवियत्रीला विनम्र अभिवादन…  

┉❀꧁꧂❀┉

लेखक /लेखिका : अनामिक 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पितृदिन… – लेखक : कचरू चांभारे ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पितृदिन… – लेखक : कचरू चांभारे ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

झिजुनी झुंजुनी राखीतो कुटुंब

पिता, तात, बाप ज्याचे नाव

 जून महिन्याचा तिसरा रविवार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगळता जगाच्या इतर भागात जागतिक पितृ दिन म्हणून साजरा करतात. भारतीय संस्कृतीत माता व पिता हे दोन्ही तत्त्व संसारात जोडीनेच उल्लेखिले जातात. माता पित्याचे कष्ट व संस्कारच कुटुंबाला यश, कीर्तीच्या वाटा दाखवत असते. आपल्या देशात पुरुषसत्ताक, पितृसत्ताक पद्धती असली तरी मातृत्व भावनेचे जेवढे कौतुक झाले आहे तसे कौतुक बाप भावनेच्या वाट्याला आलेले नाही. कुटुंबाचा कणा म्हणून बापच केंद्रस्थानी असतो. कुटुंबाच्या उभारणीसाठी झिजणा-या, झुंजणा-या पित्याचा सन्मान म्हणून आजचा दिवस पितृ दिन म्हणून साजरा करतात.

 पितृत्वाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची किनार जरी आजच्या दिवसाला असली तरी हा दिवस साजरा करण्याच्या इतिहासाला भयानक दुःखद घटनेची किनार आहे.  ती दुर्घटना आहे पश्चिम वर्जीनिया देशातील फेअरमोंट शहरातील. 6 डिसेंबर 1907 रोजी मोनोंगाह येथील खाणीत काम करताना तब्बल 210 कामगारांचा मृत्यू झाला होता. मृत्यूदेवतेने एकाचवेळी शेकड्याने मानवी देह कवेत घेतले होते. मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते.  नियतीच्या एकाच विपरित फटक्याने कित्येक संसार उघडे पडले होते, मुलंबाळं अनाथ केली होती. या दुर्घटनेतील पित्यांची आठवण म्हणून श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटन या माऊलीने 5 जुलै 1908 रोजी पिता दिनाचे आयोजन केले होते. पुढील वर्षीपासून दरवर्षी पितृ दिन साजरा होऊ लागला, तो आजतागायत कायम आहे.

 घराचे मांगल्य आई असते तर बाप हा घराचे अस्तित्व असतो. पुराण कथेतील पिता ते आजही मुलांबाळांसाठी झगडणारा पिता पाहिला की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पित्याची वेशभूषा, पेहराव बदलला असेल पण पितृत्व भावनेची जबाबदारी, काळजी आजही तशीच आहे. गतिमान आधुनिक जीवन काळात आणखी एक ठळक बदल आपल्याला पाहायला मिळतो.  तो म्हणजे पूर्वीचा कडक, कठीण बाप आता पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या ढेकळावानी मऊ झाला आहे.  पूर्वीच्या काळी मुलं आडदांडपणा करू लागली की त्यांना वडिलांना नाव सांगण्याची धमकी मिळायची. मुलगा त्या धमकीने गप्पगार पडायचा. आताचा मुलगा उलट पिता येण्याची वाट पाहत असतो. धोतर, पांढरा लांब बाह्यांचा

 गुडघ्यापर्यंतचा सदरा (नेहरु शर्ट), डोक्याला फेटा किंवा टोपी हा आपल्याकडील पारंपारिक पोषाख; पण आता धोतराची जागा पँटने घेतली, शर्ट शॉर्ट झाले व डोक्यावरील कापडी झाकण जवळपास कालबाह्य झाले आहे. बाप नावाचा पोषाख बदलला पण बाप नावाचे काळीज नाही बदलले.

 प्रसिध्द कवी इंद्रजीत भालेरावांची ‘माझा बाप’ नावाची कविता प्रत्येकाला आपल्याच बापाची जीवनकहाणी वाटते तर दोन तीन वर्षाखाली प्रदर्शित झालेल्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चित्रपट तर स्वतःसोबतच घडल्यासारखा वाटतो.

 संसारवेल विस्कटून जाऊ नये म्हणून पित्याला अनेक भूमिका साकाराव्या लागतात. लेकरांसाठी बाप असलेला व्यक्ती पत्नीचा पती असतो, आईवडीलांचा मुलगा असतो, रक्तसंबंधाने व मानसिक भावभावनांच्या वेगवेगळ्या नात्याने तो इतरांशीही बांधलेला असतोच. व्यवसाय व नोकरीच्या निमित्तानं तो कर्मयोगी असतो. पैसा हे विनिमयाचे साधन झाल्यापासून व पैसा हाच समाज व्यवस्थेत केंद्रस्थानी आल्यापासून बाप नावाचं नातं निभावणा-या व्यक्तीची फरफट झाली आहे. आर्थिक समस्यांना सामोरे जाताना घराच्या बाहेर अनेक कडू-गोड, अवमानाच्या प्रसंगांना बापास तोंड द्यावे लागते. चिमणा- चिमणीचा सुरेख संसार चालवताना चिमणा नावाचा घरधनी सतत घरट्याच्या सुरक्षेच्या विचारात असतो.

 लेकरांचं संगोपन ही आता सहज प्रक्रिया राहिली नाही.  ती आता शास्त्रीय कला बनली आहे. पाळण्यात बाळ असतानाच त्याच्या पाळण्याबाहेरच्या जगाचे नियोजन पाळण्याभोवतीच करण्याचा आज जमाना आला आहे. बाळाच्या लहानपणी त्याला पित्याच्या पाठीवरून घरातल्या घरात मानवी घोडेस्वारी करायला खूप आवडतं. घोडा घोडा खेळातून मूल पाठीवरून उतरले तरी बापाचं घोडेपण थांबत नाही.  ते सतत धावतं असतं. बाप नावाच्या व्यक्तीस त्याच्या लहानपणी न मिळालेल्या बाबी तो स्वत:च्या लेकराच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करत असतो.  स्वजीवनात आलेले भयंकर कष्ट लेकराच्या भोवताली फिरू नयेत म्हणून तो राखण करत असतो. उत्तम वस्त्र, चांगले शिक्षण, सुदृढ आरोग्य याविषयी आजचा बाप तडजोड करत नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे पण कुवतीतील सर्वोच्च देण्याचा प्रयत्न प्रत्येक पिता करत असतो.

 मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न याबाबतीत तर आजचा पिता कमालीचा सजग आहे. घरात जन्माला आलेल्या चिमणीचे लाडाकौतुकात संगोपन करायचे व हीच चिमणी, दुस-याच्या अंगणाची तुळस म्हणून पाठवायचे कर्म पित्यालाच करायचे असते. हुंदका दाबून, अश्रूंचा बांध रोखून व दुःखाचे आवंढे गिळून पिता आपले कर्तव्य पार पाडत असतो. घराबाहेचा संघर्ष बाप एकट्याच्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत असतो.

 महाभारतातल्या अर्जूनासमोर आप्त स्वकीयच शत्रू म्हणून उभे होते. रणांगणी गोंधळलेल्या अर्जुनाला कृष्णाने उपदेश केला व अर्जुन त्यातून तरला. आजचा प्रत्येक पिता अर्जुन आहे. शत्रू इथे दिसत नाही; पण लढणं मात्र टळत नाही. रोजच तो कुरूक्षेत्रावर उभा आहे. बापाच्या पायी मोडलेला काटा व भळभळ वाहत जाणारं रक्त धरतीत मुरतं, तेव्हाही ते लेकरासाठीच हिरवीगर्द स्वप्न पाहत असतं. वारंवार छाटलेल्या झाडांना योग्यवेळी पुन्हा पालवी फुटते; तसं बाप तत्त्व कितीही वेळा छाटलं गेलं, तरी ते अंकुरणं सोडत नाही. बिजातून अंकुर व अंकुरातून रोपटे व रोपट्यातून झाड तयार होत असताना मूळ बीज नष्ट होत असते. बीजाच्या त्यागावरच वृक्षाचं रुजणं अवलंबून आहे. बिजाप्रमाणेच स्वइच्छा त्यागण्यातच बाप मूल्याचे फलित आहे.

 बदलत्या काळासोबत आजचा पिता खरोखरच खूप प्रेमळ बनला आहे.  काळजीवाहू झाला आहे. काडी काडी जमा करुन पक्षी जसं घरटं निर्माण करतात, तसं पित्यालाही घरटं असतं. स्वतः झिजत झिजत खंगत खंगत, झुंजार आयुष्य जगणाऱ्या, लेकरांच्या चिमुकल्या गोड मिठीत विसावून सुख शोधणा-या सर्व विशाल हृदयी बाप पित्यांना पितृदिनी वंदन करतो.

लेखक : कचरु चांभारे

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ “आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे.  आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे…  तिथे गेल्यानंतर रांगेत उभ असताना हरिपाठ म्हणायचा. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं.  त्यांच्यामागे विठ्ठल रुक्मिणी आहेत.  लांबून त्यांना नमस्कार करायचा. मग उजव्या हाताला निघायचं…

ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले ती ही जागा आहे…

आत जाताना गुरु निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल..  सोपान मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार…

हे सगळं चित्र समोर उभ राहत…

किती विलक्षण आहे हे सगळं..

तिथे डोकं टेकवलं की पोटात गलबलून येत…  डोळे भरून येतात…  पाय रेंगाळतात..

माऊली आत कसे गेले असतील..  इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल… जे काम करायला ते आले होते ते झालं आणि ते गेले..

अक्षरशः ज्ञानाच भांडार त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे.  प्रतिकूल परिस्थितीत, समाजाचे घाव सोसत…  हे कस लिहिल असेल? त्यांचा सगळा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो.

इतक अफाट ज्ञान त्यांना जन्मजात होत.  देव जगात आहे हे त्यांच्या अभंगावरून मला नेहमी खरं वाटतं…  आई सारख समजावून सांगणाऱ्या ज्ञानदेवांना म्हणूनच

 “माऊली” म्हटलं जातं…

त्यांचे काही अभंग तर अनाकलनीय आहेत. त्याचा गुढार्थ तर वेगळाच आहे… त्यांना काय सांगायचं असेल…  असं काही वेळेस मनात येत.  तो अर्थ थोडा समजतो तेव्हा फार आनंद होतो.

मन भरून येतं…

आळंदीला जाऊन नुसतं दर्शन घेऊन यायचं नाही.  तिथल्या पायऱ्यांवर बसून शांतपणे विचार करायचा…  माऊलींच्या प्रेमाने हृदय आपोआप भरून येते. मंदिरात असताना मन करूणेने भरलेले असते.  त्या वातावरणाने भारलेले असते…

तेवढे क्षण खरे असतात..

त्या वेळा पुरता तरी जगाचा विसर आपल्याला पडलेला असतो.

मला तर वाटते आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असलेल्या निरागस शांत आणि खऱ्या मनाने ते माऊलींना भेटणं असतं..

विश्वासाठी कल्याण मागणारे ज्ञानदेव..

“अवघाची संसार सुखाचा करीन

आनंदे भरीन तिन्ही लोक”

ते सांगतात पंढरपूरला वारीला जाऊन माझे माहेर. म्हणजे… विठ्ठल त्याला मी आलिंगन देईन.  जे भक्त विठ्ठलाला भेटले त्यांना विठ्ठलाने आपलेसे केले.  

लाखों वारकरी त्यांचे अभंग गाऊन, वाचून आनंदात मार्गक्रमण करत आहेत.  अनेक संतांनी आपल्याला हा अनमोल ठेवा दिलेलाआहे.  पुढच्या पिढ्या हे ज्ञान समजून घेत आहेत.  त्याचा अभ्यास करत आहेत.  वारीचे वेध लागले आहेत…  म्हणून हे सगळे आज आठवले.  

जाऊन या एकदा माऊलींच्या दर्शनाला आळंदीला…

त्या ज्ञानराज माऊलींना विनम्र अभिवादन. 🌹🙏🌹

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पुस्तक म्हणजे काय गं आई?” ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल 

??

☆ “पुस्तक म्हणजे काय गं आई?☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पुस्तक म्हणजे काय गं आई?

अरे पुस्तक हे गुरू असतात

म्हणजे माझे टिचर का गं आई?

नाही रे पुस्तक हेच टिचर असतात. पण हे टिचर कोणीतरी अनुभवातून लिहून ठेवलेले ज्ञान देत असतात.  ज्ञान देणारे लिखीत टिचर म्हणजे पुस्तक!!

म्हणजे आपले NEWS PAPER का गं आई?

अरे अरे तसे नाही.  NEWS PAPER आजूबाजूला जे घडलेले असते ते सांगत असते.  पण पुस्तक म्हणजे तुम्ही शाळा शिकताना तुमच्या वेगवेगळ्या विषयाची माहिती एकत्रीत असते त्यातून बघून टिचर तुम्हाला शिकवतात ना ते म्हणजे पुस्तक!!!

म्हणजे टिचरचा लॅपटॉप का गं आई?

अरे बाबा ते पण नाही!! कसे सांगू तुला? अरे पुस्तक म्हणजे अशी गोष्ट आहे जी बघून तुम्ही शिकत असता केव्हाही कशीही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्या त्या विषयीची लिहिलेली माहिती तुम्हाला देत असते.

म्हणजे टिचरचा स्मार्ट फोन का गं आई?

अरे बाबा तुझ्यापुढे तर मी आता हातच टेकले.  कसं सांगू तुला? पुस्तक ••• पुस्तक•••म्हणजे बुक बुक•••

अगं आई तेच की मग.  टिचरच्या स्मार्ट फोन मधे eBook असते त्यातूनच तर आम्ही learn करतो ना?

अरे राजा ते नाही रेऽऽऽऽऽ

आईने बरीच शोधाशोध करून रद्दीतून एक पुस्तक काढून आणले आणि दाखवले.  बघ बाळा याला म्हणतात पुस्तक•••

ईऽऽऽऽऽऽऽ असले पुस्तक? किती हेवी ना? असले घेऊन फिरायचे? यातून रीड करायचे? त्यापेक्षा माझा मोबाईलच चांगलाय की.  काही वजन नको ओझं नको आणि कॅरी करायला इझी. शोधायला इझी रिफर करायला इझी.

अरे बाळा पण अशी पुस्तके हे वैभव असतात.  पिढ्यानुपिढ्या हा खजिना राहू शकतो.

आई राहू दे गं तुझा मोठेपणा तुझ्यापाशीच.  तुम्ही पुस्तक पुस्तक केलं आणी आता पुस्तक डे साजरा करता.  आता आम्ही पण मोबाईल डे साजरा करणार!!

काय करायचं? हा प्रश्नच असला तरी बदलणार्‍या युगातही पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!! 

© वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भेटी वेगवेगळ्या..  पण आयुष्य बदलवणाऱ्या… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ भेटी वेगवेगळ्या..  पण आयुष्य बदलवणाऱ्या☆ शीला पतकी 

भेट देणे भेट घेणे पहिली भेट शेवटची भेट ऊरा ऊरी भेटणे परमेश्वराला! हल्ली मिळणे या शब्दाला सर्रास..  मला पेन भेटला असं म्हणतात.  ते भेटणे.  लग्नामध्ये भेट बकरा… कदाचित हा शब्द काही वेगळा असावा…  तिथे सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात ते भेट ठीक आहे पण बकरा काय माहित नाही तो विडंबित बेड सुद्धा झाला आहे..  भेटीत तृष्टता मोठी ते वेगळच..  ती तृष्ठाता ऋणानुबंधाच्या गाठीशी संबंधित आहे…

मतदार संघात भेटीगाठीवर भर देण्यात आला ते प्रकरण वेगळे आहे तिथल्या भेटींना वेगळा अर्थ आहे.  विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना भेटले..  त्यांची बंद खोलीत भेट झाली हे वेगळच आहे इथे सगळे राजकारणच बदलतं…!

व्यावसायिक भेट तिथे करार ठरतात.  वेळेवर डॉक्टर भेटले म्हणून तो वाचला या भेटीला तर वेगळाच अर्थ आणि अनन्य साधारण महत्त्व आहे.

हल्ली सर्वात चर्चेचा विषय पंतप्रधान, ट्रम्प तात्यांना भेटले…  जागतिक खळबळ सुरू होते… खळबळजनक भेट…

अहो कुणीतरी आपल्याला भेटायला आले आहे आनंददायी घटना असते किंवा हल्ली कोणी येतच नाही किंवा फोन येतो मी भेटायला येऊ का वेळ घेऊन येणारे शिस्तबद्ध लोक…  इकडून चाललो होतो म्हणलं भेटून जाऊ… संधी साधू माणसं.  आवर्जून भेटायला आले आदर आणि प्रेम! परमेश्वरा कंटाळा आला एकदाचाये खाली भेट मला… वैतागल्यावर येणारे वाक्य!

भरत भेट… हा तर लहानपणापासून कोरला गेलेला धडा कारण रामाची त्याच्याशी भेट झाल्यावर रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तो आपल्या गावी गेला आणि त्या सिंहासनावर ठेवून त्याने 14 वर्षे राज्य केले हा भेटीतला व बंधू प्रेमाचा आदर्श.  

रिकामे ढग दिसले की धरती फाटून जाते तिला ओढ लागते त्याच्या भेटीची…  साहित्यिक भेट…! म्हणजे दुष्काळ पडणार पण डायरेक्ट सांगत नाहीत.

बापाबरोबर जन्मभर राहिलो 

बाप कधीच भेटला नाही 

तो गेल्यावर कळलं

 माझ्याशिवाय कोणासाठीच तो आयुष्यभर झटला नाही…!

नवकवींची काव्यमय भेट

 

येथे सागरा धरणी मिळते

 तेथे तुझी मी वाट पाहते.

गुगल मीट म्हणजे पत्ता!

दोन ओंडक्यांची होते भेट सागरात एक लाटतोडी दोघा पुन्हा नाही भेट

तत्वज्ञानी भेट!

के की मुसाची चाळीसगाव स्टेशन वरची भेट आपल्या प्रेयसी साठी रोज दोन माणसांचा स्वयंपाक करून तिच्यासाठी गुच्छ तयार करून येऊन एका विशिष्ट गाडीची वाट पाहत भेटीची अपेक्षा करणारा केकी… भारतातील महान चित्रकार ज्याची आपल्या प्रेयसीची कधीच भेट झाली नाही ही सत्य कथा आहे…  ती हळवी भेट!

पंडित जवाहरलाल नेहरू आपली पत्नी कमला नेहरू हिला टी बी झाल्यामुळे शेवटच्या आठ वर्ष भेटले नाहीत त्यांचा अंतिम संस्कार सुभाष चंद्र बोस यांनी केला अत्यंत संताप जनक…  न झालेली भेट

शबरीची रामाची झालेली भेट अपारंपार भक्ती आणि भक्तीची खात्री असलेली भेट याला श्रद्धा म्हणतात ही श्रद्धा भेट आहे.

रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची भेट… तरुणांमध्ये भारतीय विचार रुजवणाऱ्या महान वैचारिक वारशाची भेट!

जंगलातल्या ओसाड आश्रमाशी आल्यावर तिथे पडलेल्या शिलेला स्पर्श होताच अहल्या शाप मुक्त झाली ती राम भेट शाप मुक्तीची भेट आहे.

सावकार बापान ऋणमुक्तीसाठी लग्न करून आणलेली सून शोभण्याचा वयाची मुलगी…  तो हाक मारतो आई…  आणि मान वर करून पाहतो ती त्याचे प्रेयसी असते…  शारदा सिनेमातील मीनाकुमारी, राज कपूर यांची भेट…  तत्कालीन समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारी…  महिलांवर अन्याय करणारी…  मीनाकुमारी अगतिक पण निश्चयी नजर आणि राज कपूर ची धक्का बसलेली असाह्य दृष्टी दिग्दर्शकाची कमाल दाखवणारी भेट!

अशा असंख्य भेटी आजही स्मरणात आहेत.  कितीतरी लिहिता येईल पण कामवाली आली आहे ती पुन्हा भेटत नाही ना…  म्हणून लेखणीला विराम..  

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६७ आणि ६८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६७ आणि ६८  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६७ – – 

घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।

महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।

करी संकटी सेवकाचा कुडावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।

अर्थ – –  पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे.  तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे.  संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो.  अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे.

(कुडावा – रक्षण)

विवेचन – – मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे.  याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात.  आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात.  परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते.  परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे.  म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी.  या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत.  परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले.  त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते.  म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे (परमेश्वराचे) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत.

श्रीरामाचे रूप कसे आहे? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा.  ‘ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी… ‘ त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे.  वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत.  विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत.  ‘ सावळे सुंदर, रूप मनोहर.  राहो निरंतर हृदयी माझ्या… ‘ असे संत तुकाराम म्हणतात.  तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.  श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे.  ‘ लावण्य ‘ या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे.  त्यात माधुर्य आहे.  म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे.

या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ‘ महा धीर गंभीर पूर्णप्रतापी. ‘ ‘ महा ‘ हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते.  तो अत्यंत धैर्यशाली आहे.  तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे.  इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही.  तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे.  दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य सागराप्रमाणे अपार आहे.  सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे.  पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही.  तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत.  ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत.  श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.

अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात.  ते भक्तवत्सल आहेत.  ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत.  पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी.  त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते.  अनन्यभावाने म्हणजे ‘ हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही.  तूच माझे सर्वस्व आहेस. ‘ अशा प्रकारची वृत्ती हवी.  श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते.  हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते.  अशा या रामाचे (भगवंताचे) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत.

रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते.  पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते.  त्याचा तळ दिसतो.  पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे.  त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे.  सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल.  आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.  आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते.  त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप इ.  नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी.

स्वसंवाद – – 

१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते? चिंतेने की चिंतनाने?

२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?

३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का?

४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?

५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का? (क्रमशः)

===== 

श्लोक क्र.  ६८ – – – 

बळे आगळा राम कोदंडधारी ।

महां काळ विक्राळ तोही थरारी ।

पुढे मानवा किंकरा कोण केवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।

अर्थ – – धनुष्य धारण केलेला राम हा पराक्रमाने आगळावेगळा आहे.  सर्व प्राणिमात्रांचा विनाश घडवून आणणारा महाकाळ सुद्धा या रामापुढे थरथर कापतो.  तर अशा या रामापुढे (भगवंतापुढे) सामान्य माणसाची काय कथा? म्हणूनच प्रभात समयी रामाचे चिंतन करावे.

(कोदंडधारी – धनुष्य धारण केलेला, महाकाळ – काळाचाही काळ जो अखिल विश्वाचा विनाश घडवून आणतो, किंकर -दास/सेवक, केवा – महत्व)

विवेचन – – समर्थ या श्लोकाची सुरुवात करताना ‘ बळे आगळा राम कोदंडधारी ‘ असे म्हणतात.  श्रीरामाने कोदंड म्हणजे धनुष्य धारण केले आहे.  त्याच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्यावर काळाचा देखील थरकाप होतो.  सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी श्रीरामाने धनुष्य धारण केले आहे.  समर्थांच्या काळात जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले होते, तेव्हा सगळा समाज दुर्बल झाला होता.  गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती.  अशा वेळी समर्थांनी या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श समाजापुढे ठेवला.  तेव्हा साहजिकच श्रीरामाची केवळ पूजा न करता त्याचे गुण देखील अंगी बाणवणे आवश्यक ठरते.  म्हणूनच तर ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ असे समर्थ म्हणतात.

श्रीराम महापराक्रमी तर आहेच पण तो ‘ बळे आगळा का? ‘ तर ज्याची भिती कळीकाळालाही वाटते असा राम आपल्या शक्तीचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी करणारा आहे.  ज्यांच्याकडे शक्ती, सामर्थ्य आहे असे बरेचसे लोक अनादिकालापासून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. रावणाजवळही सामर्थ्य होते, पण त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला.  महाभारतात देखील कंसाने आपल्या शक्तीच्या साहाय्याने समाजातील सज्जनांना त्रास दिला. आज समाजात ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती आहे अशी बरीचशी मंडळी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात.  म्हणून श्रीराम ‘ बळे आगळा ‘ आहे.

जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे.  काळ हा सर्वशक्तिमान आहे.  सामान्य माणसासाठी यम म्हणजे काळाचेच एक रूप.  सामान्य माणूस यमाचे नुसते नाव जरी काढले तरी घाबरतो.  पण ज्याला सर्वच घाबरतात असा काळ देखील भगवंतापुढे थरथर कापतो.  तर सामान्य माणसाची त्यापुढे काय कथा? म्हणून आपण जर अनन्यभावाने भगवंताची आराधना केली तर अशा सर्वशक्तिमान काळाच्या कचाट्यातून, मरणाच्या भीतीतून देखील तो आपल्याला मुक्त करील.  जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करील.  मग काळाचा प्रभाव आपल्यावर राहणारच नाही.  तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामांच्या गुणांचे चिंतन कर.

स्वसंवाद – – 

१) मी श्रीरामाची भक्ती करताना केवळ पूजा करतो, की त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतो?

२) माझ्याकडे असलेली शक्ती, ज्ञान, पैसा, पद किंवा अधिकार मी इतरांच्या हितासाठी वापरतो का?

३) माझ्या जीवनात “बळ” म्हणजे काय? इतरांवर प्रभाव टाकणे की स्वतःवर संयम ठेवणे?

४) माझ्या दिवसाची सुरुवात प्रभाती सकारात्मक चिंतनाने होते का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६७ आणि ६८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यातील टांग्याची माहित नसलेली ओळख…” – लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्यातील टांग्याची माहित नसलेली ओळख…” – लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याच्या वाहतुकीचा आणि संस्कृतीचा एक काळ असा होता जो ‘टांग्यांच्या खडखडाटाने’ गाजला.  पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात वैभव शिखरावर पोहोचलेली पुण्याची टांगेवारी आज इतिहासजमा झाली असली, तरी तिच्या अशा काही रंजक, विस्मरणीय आणि अप्रकाशित बाजू आहेत, ज्या आजच्या पिढीला तर सोडाच, पण जुन्या पुणेकरांच्याही स्मरणातून पुसल्या गेल्या असतील.  पुण्याच्या टांगेवाल्यांविषयीची अशीच काही अनोखी आणि पडद्याआड राहिलेली माहिती

टांग्यांचे नंबर आणि शनिवार वाड्याची ‘पासिंग सिस्टीम’ आज जसे वाहनांचे आरटीओ पासिंग असते, तशीच कडक व्यवस्था ब्रिटिश काळात पुण्यात टांग्यांसाठी होती.  प्रत्येक टांग्याला पितळी नंबर प्लेट असायची.  दरवर्षी या टांग्यांचे पासिंग आणि घोड्यांची तपासणी शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर व्हायची.  तिथल्या मैदानावर टांगे रांगेत उभे राहायचे.  घोड्याचे आरोग्य ठीक नसेल किंवा टांग्याचे लाकूड कमकुवत असेल, तर त्या टांगेवाल्याला ‘पासिंग’ मिळत नसे.

पुण्याचे शाही छकडे विरुद्ध लोकल टांगे:- पुण्यात दोन प्रकारचे टांगे चालत, ज्यांची रचना आणि भाडे वेगळे असायचे.  शाही टांगा यात चार चाके असत आणि वरचे छत मागे-पुढे दुमडता यायचे.  हे टांगे फक्त लष्करातील गोरे अधिकारी, कॅन्टोन्मेंटमधील बडे प्रस्थ किंवा श्रीमंत व्यापारी, सावकार वापरत.  दोन चाकी टांगा (बग्गी): हा अस्सल पुणेरी टांगा होता.  याचे भाडे आण्यांमध्ये असायचे आणि तो सामान्य पुणेकरांसाठी धावायचा.

घोडा-बदली चे थांबे:- पुण्यातून जेव्हा दूरवर प्रवासी जायचे उदा.  पुणे ते खडकी, पुणे ते लोणावळा किंवा पुणे ते सासवड, तेव्हा एकाच घोड्याला संपूर्ण अंतर धावणे शक्य नसायचे.  यासाठी पुण्यात घोडा-बदलीचे थांबे असायचे.  पुणे स्टेशन, संचेती जवळचा परिसर आणि दापोडी येथे असे थांबे होते, जिथे दमलेला घोडा काढून दुसरा घोडा टांग्याला जोडला जाई.  या बदल्यांच्या काळात टांगेवाल्यांची आपापसात एक वेगळीच सांकेतिक भाषा असायची, जी सामान्य प्रवाशांना कधीच कळायची नाही.

अनेकदा तरुण विद्यार्थी टांगेवाल्यांशी दोन-दोन पैशांसाठी हुज्जत घालत.  यातून टांगेवाल्यांनी एक युक्ती शोधली होती, ते अशा हुज्जत घालणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आत सोडणार नाही, बाहेर रस्त्यावरच उतरवणार अशी धमकी द्यायचे.  त्या काळात डेक्कन जिमखान्यावरून कॉलेजच्या मुख्य इमारतीपर्यंत चालत जाणे प्रतिष्ठेचे मानले जात नसल्याने, विद्यार्थी अखेर टांगेवाल्याने मागितलेले भाडे निमूटपणे द्यायचे.

रात्रीची कंदील सक्ती आणि दंड:- ब्रिटिश राजवटीत पुण्याच्या टांग्यांसाठी अत्यंत कडक नियम होते.  सूर्यास्तानंतर प्रत्येक टांग्याच्या दोन्ही बाजूंना घासलेटीचे (केरोसिन) कंदील पेटवणे सक्तीचे होते.  जर रात्रीच्या वेळी शनिवार पेठ, सदाशिव पेठ किंवा कॅम्प भागात एखाद्या टांग्याचा कंदील विझलेला दिसला, तर पोलीस त्या टांगेवाल्याला जागेवरच दोन आणे दंड करायचे.  हा दंड चुकवण्यासाठी अनेक टांगेवाले कंदिलाच्या काचेवर काजळी धरू नये म्हणून त्यात खास तेलाचा आणि सुती वातीचा वापर करत.

टांगेवाल्यांची नजर आणि शनिवार पेठेतील नाके:- पुण्यातील जुने टांगेवाले हे केवळ चालक नव्हते, तर ते शहराचे माहितीगार होते.  शनिवार पेठेतील टांगा नाका किंवा लक्ष्मी रस्त्यावरील थांब्यांवर उभे असणारे टांगेवाले कोणत्या वाड्यात कोण आले, कुठली बैठक चालू आहे, याची खडानखडा माहिती ठेवत.  स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारक आणि भूमिगत नेते ब्रिटीश पोलिसांची नजर चुकवण्यासाठी टांग्याच्या मागच्या बाजूला पडदा लावून प्रवास करायचे आणि अनेक देशभक्त टांगेवाल्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली होती, ज्याची नोंद इतिहासाने फारशी घेतली नाही.

पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकणारी सांकेतिक भाषा:- क्रांतिकारकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना टांगेवाले अत्यंत हुशारीने काम करत.  पोलिसांची गस्त कुठे सुरू आहे, याची पक्की माहिती टांगेवाल्यांना असायची.

जेव्हा एखादा पोलीस अधिकारी किंवा गुप्तहेर टांग्यापाशी घुटमळत असे, तेव्हा टांगेवाले एकमेकांशी बोलताना किंवा घोड्याला हाकताना खास सांकेतिक शब्द वापरत.  उदा, घोड्याचा नाल सैल झालाय किंवा आज दाणा महाग मिळाला अशा वाक्यांचा अर्थ अडचण आहे, क्रांतिकारी प्रवाशाला आता वाड्यातून बाहेर काढू नका असा असायचा.  या कोड लँग्वेजमुळे अनेक मोठे नेते ऐनवेळी पकडले जाण्यापासून वाचले.

पडदा पद्धती आणि दुहेरी ओळख:- त्या काळात स्त्रियांसाठी टांग्याला दोन्ही बाजूंनी जाड कापडी पडदे लावण्याची सोय असायची, जेणेकरून आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही.  या सुविधेचा टांगेवाल्याने क्रांतिकारक यासाठी कल्पकतेने वापर केला.  अनेकदा बरेच क्रांतिकारक वेषांतर करून टांग्यात बसत.  जर पोलिसांनी टांगा थांबवलाच, तर टांगेवाला अत्यंत आक्रमकपणे किंवा पुणेरी उपरोधाने पोलिसांवरच डाफरायचा वाड्यातील बड्या घराण्यातील बायका आत बसल्या आहेत, पडदा बाजूला करून अब्रू घेता का? त्या काळात घरंदाज स्त्रियांच्या बाबतीत पोलीस सहसा कडक भूमिका घेत नसत, आणि टांगेवाल्यांच्या या धाडसामुळे क्रांतिकारक सुरक्षितपणे पेठां मधून पार होत.

गाडीत बसलेला प्रवासी साधा सुती कुर्ता घातलेला कार्यकर्ता आहे की ब्रिटीश सरकारचे १० हजार रुपयांचे बक्षीस असलेला नेता, हे ठाऊक असूनही टांगेवाले कधीही पैशांच्या आमिषाला बळी पडले नाहीत हे विशेष.

क्रांतीच्या साहित्याची अदृश्य वाहतूक:- केवळ नेत्यांचीच नाही, तर सरकार विरुद्धची पत्रके, बंदी घातलेली वृत्तपत्रे आणि काही प्रसंगी शस्त्रे व बॉम्ब बनवण्याचे साहित्य एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याचे काम या टांग्यांनी केले.  टांग्याच्या खालच्या बाजूला, जिथे घोड्याचा दाणा-पाणी आणि टांगेवाल्याचे सामान ठेवण्याची लाकडी पेटी असायची, तिथे हे प्रतिबंधित साहित्य लपवले जायचे.  वरून घोड्याचे घास-पेंढा टाकलेला असल्याने पोलिसांना कधी संशय आलाच नाही.

इतिहासात टांगेवाल्यांची नावे का नोंदवली गेली नाहीत, यालाही एक ऐतिहासिक कारण आहे.  भूमिगत चळवळीचा पहिला नियमच कमालीची गुप्तता हा होता.  अनेक टांगेवाल्यांना स्वतःलाही माहीत नसायचे की आपण ज्या प्रवाशाला सोडले त्याचे खरे नाव काय आहे, कारण ते एकमेकांना भाई, भाऊ किंवा गुरुजी अशा टोपण नावांनीच हाक मारत.

दुर्दैवाने संशयावरून पोलिसांनी काही टांगेवाल्यांना ताब्यात घेतले, त्यांना बेदम मारहाण केली, त्यांचे परवाने रद्द केले आणि त्यांचे घोडे-टांगे जप्त करून त्यांना कंगाल केले.  परंतु, तरीही त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडले नाही.

पुण्याच्या या श्रमकरी वर्गाने स्वतःच्या पोटाची आणि प्राणाची पर्वा न करता, केवळ देश स्वतंत्र झाला पाहिजे या एकाच भावनेने क्रांतीच्या या गाड्याला आपल्या घोड्याच्या टापांनी गती दिली होती.  म्हणूनच, पुण्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा या अज्ञात, देशभक्त टांगेवाल्यांच्या त्यागाशिवाय अपूर्ण आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरपूरचे वर्णन

संत तुकारामांच्या पाच हजाराहून अधिक अभंग असलेल्या या गाथेत आपण त्यांनी हाताळलेले विविध विषय आजपर्यंत पाहिले, त्यावर विचार केला आणि जमेल तेवढा अभ्यास केला. पंढरपूर हे तुकारामांचे माहेर, माऊली विठ्ठलाचे निवासस्थान! माहेर कोणाला प्रिय नसते? तुकाराम महाराजांनाही ते अत्यंत प्रिय! अशा त्यांच्या या माहेराचे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून केल्याचे गाथा वाचताना लक्षात येते. अशाच माहेरच्या वर्णनाच्या आणि मोठेपणाच्या काही अभंगांचा आपण आज परामर्श घेऊया.

पांडुरंग कुठे, कसा आणि कशासाठी उभा आहे, हे तुकाराम महाराज सामान्य माणसाला सांगत आहेत. ते म्हणतात,

 आता उघडी डोळे/ जरी अद्यापी न कळे/

 तरी मातेचिया खोळे/ दगड आला पोटासी/

 मनुष्य देह ऐसा निध/ साधीलते साधे सिद्ध/

 करुनी प्रबोध/ संत पार उतरले//

 नाव चंद्रभागे तिरी/ उभी पुंडलिकाचे द्वारी

 * कर धरूनिया करी/ उभा उभी पालवी*//

 * तुका म्हणे फुकासाठी/ पायी घातलीया मिठी*/

 होतो उठा उठी/ लवकरीच उतार//

या अभंगातून सामान्य संसारी माणसाला ते डोळे उघडायला सांगतात. तुला काहीच कसे कळत नाही, खरोखरच तुझ्या आईच्या पोटी तू दगड म्हणूनच जन्माला आलास का? असा प्रश्न त्याला विचारतात. ते म्हणतात, ” अरे तुला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा तू सदुपयोग का करून घेत नाहीस? या देहात तुझी सिद्धी करून घेशील ती तुला साधेल, ” असा बोध करून संत स्वतः विवेक करून संसाराच्या पार उतरले आहेत. तुला तरायचे असेल तर एक नौका आहे, ती चंद्रभागेच्या तिरावर पुंडलिकाच्या दारात कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि ती सर्वांना उभ्या-उभ्याच बोलावीत आहे. या नौकेला कोणत्याही प्रकारचे भाडे मोजावे लागत नाही. एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घातल्यास या भवसिंधुतून पार पडता येते. ” थोडक्यात काय तर पंढरपुरासी, चंद्रभागेच्या काठी पांडुरंग प्रपंचाची नौका पार करून देण्यासाठी भक्तांच्या सेवेला हजर आहे.

महाराजांचा विठ्ठल चरणी किती हा दृढ विश्वास आहे, हे या अभंगातून सहज समजते.

रे नामाची भरली पेठ/ वाहती वाट मार्ग/

वघेची येती वाण/ अवघे शकुन लाभाचे//

अडचणी केल्या दुरी/ देण्या उरी घेण्याच्या/

तुका म्हणे जोडी झाली/ ते आपुली आपणा//

या अभंगात पंढरपूरचे वर्णन करताना महाराज म्हणतात–

पंढरी ही भक्तांना इनाम म्हणून मिळालेली पेठ आहे. या पेठेत भक्तांचे थवेच्या थवे आहेत, तिकडे जाण्याचे मार्गही भक्तांनी भरलेले आहेत

(आषाढी- कार्तिकी वारीचा यात संदर्भ असावा) या पेठेत सर्व काही उपलब्ध आहे. लाभाचे शकून भक्तगणांना होतात. भक्तांच्या देण्या घेण्याच्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत.. लाभ करून घेतला, जे जे या पंढरपुर क्षेत्री गेले, त्या सर्वांना फायदा झालेला आहे.

अनुपम असे कार्तिकी वारीचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात.

कार्तिकीचा सोहळा/ चला जाऊ पाहू डोळा*/

आले वैकुंठ जवळा/ सन्निध पंढरीये//

पीक पिकले घुमरी/ प्रेम न समाये अंबरी/

अवघी मातली पंढरी/ घरोघरी सुकाळ//

चालती स्थिर स्थिर/ गरुड टकयांचे भार/

गर्जती गंभीर/ टाळ श्रुती मृदुंग//

मिळाली या भद्र जाती/ कशा आनंदे डुलती/

शूर उठावती/ एक एक आगळे//

नामामृत कल्लोळ/ वृंदे कोंदली सकळ/

आले वैष्णव दळ/ कळी काळ कापती//

आज करिती ब्रह्मादिक/ देखुनी वाळवंटीचे सुख/

धन्य धन्य मृत्यू लोक/ म्हणती भाग्याचे कैसे//

स्मरण मुक्ती वाराणसी/ पितृ ऋण गया नासी/

धार नाही पंढरीसी/ पायापाशी विठोबाच्या//

तुका म्हणे आता/ काय करणे आम्हा चिंता/

सकळ सिद्धीचा दाता/ तो सर्वथा नुपेक्षी//

कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना सोबतच्या भक्तांना उद्देशून म्हणतात,

चला हो आपण हा वारीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहू या. या पंढरपुरात प्रत्यक्ष वैकुंठ आपल्याजवळ आले आहे. हरी नामाचा घोष आसमंतात घुमतो आहे, हेच मोठे पीक पिकले आहे. प्रेम आकाशात मावेनासे झाले आहे. हरीच्या प्रेम भावनेने सर्व पंढरपूर दुमदुमले आहे. घरोघरी परमार्थाचा सुकाळ चालू आहे. वैष्णव जन आनंदाने भजन करत हळूहळू थांबत थांबत चालत आहेत. त्यांनी गरुडचिन्हे असलेले ध्वज धारण केले आहेत. टाळ, मृदुंग, एकतारी, वीणा यांच्या साथीने श्रीहरीच्या नामाची गर्जना चालू आहे. मोठमोठे हत्ती गजदळात जसे डोलत असावेत, तसे एकाहून एक श्रेष्ठ विष्णू भक्त आघाडीवर चालत आहेत. भक्त जन समुदाय हरिनामाच्या अमृतघोशाने न्हाऊन निघाला आहे. विष्णू भक्तांचे हे सैन्य पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत. पंढरीच्या वाळवंटातील भजनाचे सुख आपल्याला मिळावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. मृत्युलोक धन्य आहे, तेथील लोक भाग्यवान आहेत. काशीमध्ये मरण आले तर मुक्ती मिळते, पण या पंढरपुरात सर्व काही रोखीने इथेच मिळते. मग चिंता कशाची?

हा संपूर्ण अभंग वाचताना आपणही त्या वारीचाच एक भाग आहोत अशी भावना दृढ होते आणि देवाच्या द्वारी मुक्ती मिळाल्याचा पराकोटीचा आनंद मिळतो.

हे भू वरील वैकुंठ कसे आहे ते आता तुकारामांच्या वाणीतून ऐकूया.

जया दोषा परिहार/ नाही नाही धुंडीता शास्त्र/

ते हरती अपार/ पंढरपूर देखीलिया//

ज्या दोषांची प्रायश्चित्ते कोणत्याही शास्त्रात सापडत नाहीत, अशी पातके जरी हातून घडली तरी नुसत्या पंढरपुराच्या दर्शनाने ती नाहीशी होतात असा महिमा आहे.

धन्य धन्य भीमातीर/ चंद्रभागा सरोवर/

पद्म तिर्थी विठ्ठल वीर/ क्रीडा स्थळ वेणू नाद//

सकळ तीर्थांचे माहेर/ भू वैकुंठ निर्विकार/

नामाचा गजर/ असूर काळ कापती//

पंढरपूर हे भूतलीचे वैकुंठ आहे, सर्व तीर्थांचे जन्मस्थान आहे, तेथे कोणताही विकार नाही, तेथे हरी नामाचा गजर होतो त्यामुळे असुरांना, कळी काळाला कंप सुटतो.

नाही उपमा द्यावया/ समतुल्य आणिक ठाया/

धन्यवाद जया/ जे पंढरपूर देखती//

या क्षेत्राला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. ज्यांना ज्यांना पंढरपूरचे दर्शन झाले, ते सर्व धन्य होत.

उपजोनी संसारी/ एक वेळ पाहे पा पंढरी/

महादशा कैची उरी/ देवभक्त देखीलिया//

जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्यावे. येथील पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या दर्शनाने महापातके नष्ट होतात.

ऐसी विष्णूची नगरी/ चतुर्भुज नर नारी/

सुदर्शन घरटी करी/ रीघ न पुरे कळी काळा//

ते सुख वर्णावया गती/ एवढी कैची मज मती/

जे पंढरपुरा जाती/ ते पावती वैकुंठ//

अशी ही विष्णूची नगरी आहे. तेथील स्त्री-पुरुष चतुर्भुज संपन्न आहेत. सुदर्शन त्यांचे रक्षण करीत आहे, त्यामुळे काळाला इथे प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुराचे सुख वर्णन करण्याइतकी बुद्धी मजपाशी नाही. जे पंढरपुरास जातात त्याला वैकुंठप्राप्ती होते.

तुका म्हणे या शब्दांचा/ जया विश्वास नाही साचा/

तो अधम जन्मांतरीचा/ जया पंढरी नावडे//

त्यांचे असे म्हणणे आहे की या गोष्टींवर ज्यांचा विश्वास नाही आणि ज्यांना पंढरीची आवड नाही तो पूर्वजन्मीचा अधम होय.

तीर्थ केली कोटीवरी/ नाही देखिली पंढरी/

जळो त्याचे ज्यालेपण/ न देखेची समचरण//

योग याग अनंत केले/ नाही समचरण देखिले/

तुका म्हणे विठ्ठल पाई/ अनंत तीर्थे घडली पाही//

पंढरपूरचा महिमा महाराज सांगत आहेत. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या तरी ज्याने पंढरी पाहिली नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही

(आग लागो त्याच्या जगण्याला) कारण विटेवरी पांडुरंगाच्या समचरणांचे दर्शन ज्यांना लाभले नाही त्यांनी कितीही योगयाग केले तरी सारे व्यर्थ आहे. एका पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे.)

क्रमशः… २७ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ही सुद्धा आदिशक्तीच…!!” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ही सुद्धा आदिशक्तीच..!! ☆ संध्या बेडेकर ☆

… “जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदिशक्तीच नाही का ??”

आज बऱ्याच वर्षांनंतर माझी मैत्रिण ‘रिया’ भेटली. मधल्या काळात कधी तरी फोन वर बोलणं होतं असे. जून्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती लगेच म्हणालीच,  “ओळखलं नाहीस ना मला. “

अग !! मी पण तुला ओळखल नाही,  आम्ही दोघी मनमोकळेपणाने हसलो.

दोघींमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. क्षणभर व्यक्तिमत्वांची अदलाबदल झाली की काय ?? असं वाटलं 

रियाला बघून,  “हीच का ती स्टाइलिश रिया जाधव ?? “असा प्रश्न मनात आला.

त्यावेळेस आमच्या मैत्रिणींमध्ये ‘रिया ‘ म्हणजे सर्वात स्टायलिश, स्वतः भोवती गरगर फिरणारी. फॅशन, योग, जॉगिंग, फिटनेस, प्रोटीन शेक, diet यावर लक्ष देणारी. त्यातच ‘चेरी ऑन केक ‘म्हणजे छान इंग्लिश बोलणारी. आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगळीच उठून दिसणारी. आमच्याच वयाची असली तरी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची ती. कधी कधी हेवाही वाटायचा.

प्रत्येक भेटीत तिचा काही तरी नवीन फंडा असायचा. आता काय म्हणे ?? मी पहाटे चारला उठते व व्यायाम करते.

आता काय तर,  मी प्रत्येक वार प्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. म्हणजे सोमवारी पांढरा तर गुरवारी पिवळा. शनिवारी काळया रंगाचा ड्रेस घालणार. रंग तोच असला तरी प्रत्येक वारी ड्रेस वेगळा असायचा. आमच्या गृप मध्ये रिया म्हणजे सर्वात स्मार्ट, वेगळीच दिसायची. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान. व ती स्वतःला छान कॅरी करायची. एकदम ” smart impressive, fashionable, modern ” वजनावर कटाक्षाने लक्ष देणारी. तिला बघून असं वाटायचं जीवन जगावं तर असं.

स्वतः जशी टिपटॉप रहायची, तसंच तिच घरही असायचं. घर व इतर गोष्टी चां बॅलन्स तिला छान सांभाळता यायचा. मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं.

सर्व गोष्टींची एकानंतर एक आठवण आली. फॅशनमध्ये आम्ही कोणी तिच्या जवळपास ही नसायचो. खास करून मी तर अजिबात नव्हतेच.

तिच्या नवनवीन गोष्टी ऐकुन मला आश्चर्यच वाटायचे, आपल्याला कसं काहीच सुचत नाही, जमतं नाही. आपण घर, स्वयंपाक, मुल, त्यांचे डबे, परीक्षा, नवऱ्याची काळजी यातच गुंतलेलो असतो.

यातले एखादे काम कमी केले तर वेळ मिळेल का ? ? खरंतर मी अगदी चारला पहाटे वगैरे काही उठू शकत नाही, हे मला नक्की माहित होतं. पण गुरवारी पिवळी साडी किंवा ड्रेस घालणे ही साधी गोष्ट ही आपल्याला जमत नाही. मला तिच्या सारखं रहावं, फॅशन करावी असं वाटायचं, पण जमायच नाही. मनात खूप विचार यायचे. आपण बरोबर की चूक ? याचा गुंता सोडविण्यात मी बिझी असायचे.

जसं फोन मध्ये अनावश्यक डेटा सेव्ह झाला की फोन कसा हॅन्ग होतो ना, तसंच काहीसं माझ्या मनाचं व्हायच. आपल्याच वेळापत्रकाची उलट सुलट तपासणी करत रहायची. फॅशन तर काही कधी जमली नाही पण डिस्टर्ब मात्र नक्की व्हायची. कधी अगदी खूप ठरवून काही केलं तर बरं दिसतय का ?? लिपस्टिक खूप डार्क लावलं का ?? असंही वाटतं रहायचं. म्हणजे आत्मविश्वास असा नव्हताच.

फॅशन करायला एकतर मनापासून आवड असावी लागते, ती समज, तो सेन्स असावा लागतो. फॅशन तुमच्या पर्सनालिटी ला साजेशी असावी लागते. प्रसंगानुरूप, वेळेनुसार कपड्यांची, रंगाची निवड करता आली पाहिजे. फॅशन म्हणजे काही दुसऱ्यांची काॅपी करायची गोष्ट नाही. हे सर्व कळत होतं. तरी सुप्त इच्छा मात्र होती. रिया सारख कोणाला बघीतल की ती इच्छा पुन्हा पुन्हा जागृत व्हायची.

वयाप्रमाणे सर्व च बदलत गेले. मुलं मोठी झाली. अनघा कॉलेज मध्ये जाऊ लागली. अनघाला छान सुंदर तयार झालेलं बघताना मला छान वाटायचे. तिने खूप स्मार्ट रहाव‌ असं मला नेहमी वाटायचे. माझी अपूर्ण इच्छा अनघा पूर्ण करत होती.

एकदिवस अनघा म्हणाली, आई !! माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, “तुझी आई छान दिसते. She is very well maintained and looks young. “

आई तुझा व्यायाम व योग वर्ग बंद करू नकोस हं. अशीच छान रहा.

बाबा लगेच म्हणाले,  अगं !!! अनघा एकदा आईला बाजारात घेऊन जा. तिच्या personality ला साजेसे नवीन कपडे घे. गरज वाटल्यास प्रोफेशनल हेल्प घे. तिलाही खूप आवड आहे या सर्वांची.

ब्युटिशियन ‘ मालविका ‘.  अनघाची मैत्रिणी ने माझे ‘makeover ‘करून दिले. माझा हेअर कट केला. म्हणाली,

काकू हा ‘ salt n paper hair cut ‘ तुम्हाला छान दिसतोय. वेगवेगळे comfortable dresses घेतले. , make up चे प्रशिक्षण दिले. थोडक्यात मी पण फॅशन जगात / संस्थेत प्रवेश घेतला.

आपल्या वयाची मर्यादा सांभाळून मी पण उत्साहाने नवनवीन कल्पना आत्मसात करत होते. आता बऱ्यापैकी समाधान ही झाले आहे. स्वतः ला बदलणे म्हणजे आपल्या’ comfort zone ‘ मधून थोडे बाहेर निघावे लागते. हे कळले.

आता,

काकू छान दिसताय. हेअर कट छान दिसतोय. असे रिमार्क मिळताहेत.

चला, उशिरा का होईना, एक इच्छा पूर्ण झाली.

आज रिया पण म्हणाली,  अग !! छान दिसतेस.  Very Smart.

पूढे रिया म्हणाली,  एक जमाना था,  ” When I was very perticular about my looks. “

मधल्या काळात आयुष्याने एवढे रंग दाखविले की, आता रंगांचे तारतम्य विसरलेच बघ मी. रिया म्हणाली

रिया ची मुलगी  ऋतुजा म्हणाली,

“मावशी !!! मागची पूर्ण बारा वर्षे बाबा आजारी होते. आईने बाबांची खूप सेवा केली. आम्हाला सांभाळले. घराकडे लक्ष दिले. “

मावशी !! मला आईला पुन्हा पुर्वी सारखं बघायचंय. तिने पुन्हा तसंच जगाव असं मला वाटतं. बाबांची पण हीच इच्छा होती.

रिया ची मागच्या बारा वर्षांची कहाणी ऐकून तिने तिच्या वर आलेल्या कठीण प्रसंगाला तिने ज्या धैर्याने तोंड दिले ते ऐकून पुर्वीची स्टाइलिश रिया नव्याने दिसली. “

आज वेगळीच रिया समोर होती. कणखर, कर्तव्यदक्ष, संयमाने आपली जबाबदारी पार पाडणारी. न डगमगता एकानंतर एक येणाऱ्या समस्यांना तोंड देणारी.

एक वेळेस आपल्या स्त्रीत्वाचा सजून धजून जगण्याचा हक्क बजावणारी, आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेणारी.

आज कर्तव्याला तेवढ्याच जबाबदारी ने पार पाडणारी.

खरंच,

आयुष्याच्या प्रवासात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक गोष्टी घडतात. परिस्थिती नेहमी एकसारखी नसते.

“न डगमगता जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदीशक्तीच नाही कां ?? “

म्हणतात ना,

“उस नारी का कोई मुकाबला नहीं, जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो।”

रिया म्हणाली,  पूर्ण एक तप ग !!!

बहुतेक मागच्या जन्माची काही तरी परतफेड असावी. मला समाधान आहे की मी माझे कर्तव्य /सेवा मनापासून केली.

मी विचारलं, कस manage केलंस ग हे सर्व ???

रिया म्हणाली, अग म्हणतात ना,

“Mind is nothing but traffic of thoughts. Select your route carefully. “

मी संयमाने गरजेप्रमाणे वागत गेले.

या अवधीत मी फक्त एकच प्रार्थना करत होते,

हे देवा,

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय 

माझे मला कळाया, देई रे बुद्धी रामराया.

आज पुन्हा एकदा रिया ला बघून मी तिच्या आदरयुक्त प्रेमात पडले. काही लोकांच्या संगतीत आपलं आयुष्य घडत असतं. हे नक्की.

लेखिका : संध्या बेडेकर.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares