☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆
#प्रिय_आईस,
वर्ष झाले ना …. मी घरापासून लांब राहतोय …
खरं सांगायचं तर मला सुरुवातीला सगळं समजून घ्यायला म्हणजे कॉलेज, हॉस्टेल ,नवीन शहर ,नवे सोबती…. वेळ लागला…. त्यामुळे घरची आठवण येत नव्हती असं काही नाही. पण बाकीच्या उठाठेवीच खूप होत्या.
खरंच खूप चांगले आहे इथे.. अभ्यास आहे… वातावरण छान आहे मित्रांच्या पण अजून जवळून ओळखी होतात.
तू मला नक्कीच खूप मिस करत असशील ना…. आणि बाबा पण….
तू कशी आहेस? मलाच हसू येतंय…. की मी हा प्रश्न विचारतोय ! तुझ्यावर हसणारा.. काहीवेळा ओरडणारा … चिडणारा…
पण आज खरंच मनापासून वाटलं म्हणून विचारलं गं…. बरी आहेस ना तू….
परवा काय झालं अगं…. रूमवरच्या मित्राला जरा बरं वाटतं नव्हतं… म्हणून त्याला इंडक्शनवर मस्त गरम पाण्यात आलं उकळून लिंबू मीठ घालून गरमच प्यायला सांगितले….त्याच्यापुरती थोडी तुपावर डाळतांदुळाची खिचडी केली… त्याला खूप बरं वाटलं…. तरतरीत झाला तो..
सगळ्या नव्या मित्रांच्यामध्ये मी एकदम हिट झालो….. तेव्हा माझी कॉलर टाईट…. तेव्हा तू हवी होतीस….मला घरी तू सगळं करायला शिकवायचीस…. कधी कंटाळा करत तर कधी उत्साहात मी पण शिकलो. पण त्याचा असा कोणाला कधी उपयोग होईल वाटलंच नव्हतं… केलेलं कधी वाया जात नाही, तू म्हणतेस ना…. पटलंच एकदम…
कामावी तो सामावी असं तू म्हणतेस ना…. सगळ्या मित्रांना मदत पण करतो ……
घरी किती ओरडायची गं मला …. पण त्याचा उपयोग इथे होतो…. कसा माहीतेय…… माझं लवकर आवरून होतं…. कपाट नीट असतं…. अगदी वापरलेले सॉक्सपण रात्रीच भिजवून सकाळी आंघोळ करताना धुवून टाकतो….. बाकीचे मित्र म्हणतात … अरे आम्हाला पण आठवण करत जा ना….. तेव्हा तू आठवतेस……
मी चिडायचो तुझ्यावर सारखी भुणभुण करते म्हणून. पण तू म्हणायचीस….. बाहेरच्यांनी कोणी तुला बोललेलं मला चालणार नाही…… अगदी त्या श्यामची आई पुस्तकातल्या प्रमाणे….
फोनवर इतकं बोलता आलं नसतं गं… ..म्हणून आज हे पत्र…..
आज पासून घरून आणलेले पांघरुण मी वापरणार आहे…. इतके दिवस बाकीचे हसतील , मला कमकुवत समजतील म्हणून वापरत नव्हतो…. पण आता नाही… परिक्षा संपली की येईनच…. तू आतापासून तयारीला लागू नको काय….. मी परत फोन करेन….
अभ्यास करतोच आहे…..
आता घरी आल्यावर इथल्यासारखं वागायचा प्रयत्न करीन….. पण मग तुझा ओरडायचा कोटा पूर्ण कसा होणार….. ?
ओरडण्याचा आवाजच तर मला परत येताना साठवून ठेवायचा आहे …. कानात, मनात, ह्रदयात…..
बाबांना सांग…..
दोघे भांडू नका…..
मी आल्यावर काय करशील खायला?……
त्याची लिस्ट व्हाट्सअप करतो?
ए आई, आणि व्हिडिओ कॉल लावू नको गं…..
चल बाय– खूपच सेंटी होतोय मी……
काळजी करु नकोस…..
फक्त तुझाच
(अजून तरी??)
ले.: नेहा बोरकर देशपांडे
(नव्याने बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा. आईला तर वाटणारचं…. पण आज मुलाची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. )
…. कशी वाटली जरूर सांगा….
संग्राहक : संजय जोगळेकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने …गाणं ऐकताना मन कसं आनंदानं भरून गेलं ..अन तुझी आठवण आली . होय ! …कोण तू ? चेहरा …रंग रूप ..काही काही निश्चित नाही ,डोळ्यासमोर तुझे कुठलेच चित्र ,आकृती नाही; तरी मी तुझ्यासाठी ही स्वप्ने चुनते नुसते सातच का ?नाही ..अगणित रंगांची ,गंधाची ,आकारांची फुले वेगवेगळ्या ऋतूत बहरून येऊन आनंदाने श्रुष्टीत डोलावीत अन आनंदाचा सोहळा साजरा करावा अशीच ती नानाविध स्वप्ने मी तुझ्यासाठी विणते .तुला यत्किंचित कल्पनाही येणार नाही ..का ? हेही माहित नाही ती पूर्ण ही होत नाहीत …होणार नाहीत तरीही का ,का ही स्वप्ने मी गुंफावी ?कधी कधी कोडेच उलगडत नाही .
पण प्रत्येक क्षणाला स्वप्नांची माळ गुंफणे सुटत नाही. कारण ….कारण ती गुंफण्यात एक आनंद असतो …असा की खरेच त्या अनिश्चित आकाराच्या स्वप्नाला कोण पाहू शकत नाही पण मी अनुभवू शकते अन युगे न युगे ही स्वप्ने रचते फक्त फक्त तुझ्यासाठी कारण तुझ्यासाठी काही करताना मला आनंद होतो ! होय ,कधी राधा ,कधी मीरा ,कधी रुक्मिणी ,कधी उमा ,सत्यभामा ,सीता अन गीताही होऊन चरोंचरी तुझ्या साठीच फक्त …पण तू अनभिज्ञ .निर्विकार ,बेफिकीर …अजाणता ….तुला कळतच नाही अन कळणारही नाहीत या मनाच्या सुख संवेदना अन दुःखाच्या सूक्ष्म छटा …तरीही मी गुंफतेय …विणतेय …जपतेय ..रंगीत स्वप्ने फक्त तुझ्यासाठी …कारण ….तुला त्या स्वप्नात गुंफलेय म्हणूनच तर हे आंतरिक सुखावणे फक्त त्या अपूर्ण स्वप्नांसाठीच !!
स्वप्नातल्या कळ्यांची फुले फुलतच नसतात तरीही कळ्या उमलू पहातातच न ??
भारतातील अग्रगण्य स्ट्रक्चरल ऑडिट कंपनी या स्ट्रक्टवेल इंजिनिअरिंग चे सर्वेसर्वा श्री चेतन रायकर सर ही अशीच एक राष्ट्रभक्तीने प्रेरित वेडी व्यक्ती आहे..26/11 या दिवशी जेव्हा कसाबने मुंबईवर हल्ला केला आणि ताज हॉटेल जाळत त्याचे अपरिमित नुकसान केले त्यानंतर सर्व स्थिरसावर झाल्यावर श्री रतन टाटा यांनी ताज पुन्हा नव्याने उभारण्यासाठी अखंड भारतात निविदा मागवल्या..
बऱ्याच प्रथितयश कंपन्यांकडून भरपूर रकमेच्या निविदा दाखल झाल्या.. यथोचित दिवशी सगळ्या निविदा उघडल्या गेल्या आणि त्यात एक निविदा आश्चर्य रित्या घोषित केली गेली..
ज्यामध्ये ताज हॉटेलच्या संपूर्ण कामाचा मोबदला फक्त आणि फक्त नाममात्र एक रुपया होते…सगळेच खजील झाले अथवा हसले तरी असतील.. पण जेव्हा रायकर सरांना विचारले गेले तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात सांगितले ताज वरील हल्ला हा मी माझ्या राष्ट्रावरील हल्ला मानतो.. आणि राष्ट्राचे नुकसान हे पैशात मोजता येत नाही..
मिलिंद, एक वेळ उध्वस्त झालेल्या इमारती पुन्हा नव्याने उभ्या करता येतील पण दुभंगलेली मने पुन्हा सावरणे खूप कठीण.. ताज हॉटेल हे आपल्या राष्ट्राचे एक भूषण हॉटेल आहे.. रतन टाटांसारख्या सच्चा राष्ट्रनिष्ठेने भारावलेल्या व्यक्तीने ते कष्टाने बांधलेले आहे.. त्याचा चिरा आणि चिरा हा इमानदारीच्या घामाने उभारला गेला..
अशा वेळी त्याची पुनर्बांधणी करताना किती पैसे मोजायचे आणि टाटां सारख्या गब्बर उद्योगपतीला कसे लुबाडायचे हाच विचार इतरही निविदांमधून नक्कीच डोकावला असेल.. पण रायकर सर, हरीश साळवे सर यांच्यासारखी व्यक्तिमत्वे जो पर्यंत या भारतात आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाचा बाजार मांडलेला नाही तोपर्यंत हा देश अखंड अबाधित राहील.. ठरवून सुदधा याचे कुणी वाईट करू शकणार नाही. असो, अर्थातच जे अपेक्षित होते तेच झाले. टाटांनी श्री रायकरांना मानाने सन्मानाने पाचारण केले आणि हे देवकार्य त्यांच्याच पदरात टाकले… आणि हो, महत्वाचे म्हणजे रतन टाटा सुदधा तेवढेच देश भक्त आहेत हे आपण सगळ्यांनीच विसरता कामा नये.. कारण काम पूर्ण झाल्यावर त्यांनी श्री रायकरांना यथोचित सन्मानाने बोलावून रायकरांच्या निष्ठेचा गौरव करून त्यांना हट्टानेच झालेल्या कामाचा खर्च घ्यायला लावला. कारण शेकडो कामगार, इंजिनिअर ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करून देण्यासाठी अहोरात्र झटत होते.. टाटांचे याकडे बारीक लक्ष्य होते.. त्यांच्या सारख्या कर्मचाऱ्यांचा अतीव आदर करणाऱ्या उद्योगपती कडून ही गोष्ट कशी नजरंदाज होऊ शकते ?.
हे सगळं लिहिण्याचा खटाटोप एवढ्या साठीच की राष्ट्रभक्ती ही आपल्या देशवासीयांमध्ये कुटून कुटून भरलेली आहे..
मग तो सामान्य नागरिक असो की या देशाचा सर्वोच उद्योगपती असो की हरीश सरांसारखा मोठ्ठा आतंरराष्ट्रीय वकील असो, जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या अस्मितेचा , स्वाभिमानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा पैसा, मान, इज्जत, कुटुंब, व्यवसाय याहीपेक्षा राष्ट्र प्रथम ही भावना वाढीस लागते..कारण ते भूमीचे पिध्यापिढयांचे संस्कार आहेत..आणि म्हणूनच हा देश आजही इतक्या वर्षांनंतर सुदधा संपूर्ण जगात पाय भक्कम रोवून उभा आहे.. मानाचा मुजरा त्या हरीश साळवे सरांना, त्यांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या सुषमा स्वराज या माऊलीला, श्री चेतन रायकर सरांना आणि सदैव राष्ट्रासाठी जगणाऱ्या श्री रतन टाटांना..
धन्यवाद,
अनिल नलावडे
संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“नमस्कार, पण आज तुझा आवाज एकदम रडवेला का आणि खांदा कशाला चोळतोयस तुझा ?”
“काठी लागली पंत, डोक्याच खांद्यावर निभावलं, तुमच्यकडे आयोडेक्स असेल तर द्या जरा.”
“देतो देतो, पण सकाळी सकाळी बायको बरोबर भांडण…. “
“नाही हो पंत, जोशी काकूंची काठी लागली.”
“जोशी काकूंची काठी तुला कशी काय लागली ?”
“अहो हा सगळा त्या केळकर काकांचा फिटनेस फ़ंडयाचा प्रताप.”
“आता यात केळकर कुठून आला ?”
“सांगतो सांगतो. तुम्हाला माहीतच आहे सध्या सगळ्या जिम वगैरे बंद आहेत आणि सगळेच आपापल्या घरी अडकल्यामुळे… “
“तू मूळ मुद्यावर ये आधी, उगाच पाल्हाळ नकोय.”
“हां, तर घर बसल्या आणि चाळीत फिरून करायचे काही व्यायाम प्रकार केळकर काकांनी काही लोकांना शिकवले.”
“बर, पण त्यात जोशीणीचा काय संबंध ?”
“पंत केळकरांनी जोशी काकूंना शाखेत जसे काठीचे हात फिरवायला शिकवतात तसे काही प्रकार शिकवले.”
“पण तिच्या काठीचा आणि तुझ्या खांद्याचा… “
“अहो पंत त्याच काय झालं, आता जोशी काकू चाळभर, धुण्याची काठी घेऊन दोन्ही हाताने फिरवत फिरत असतात.”
“काय सांगतोस काय, अख्ख्या चाळभर ?”
“हो ना आणि त्यांच्या काठीचा प्रसाद माझ्या प्रमाणेच अनेकांना बसून चाळीत
भांडणांचे जंगी सामने सुरु झालेत.”
“अरे बापरे !”
“इतकंच नाही काकूंच्या काठीने चाळीतले यच्चयावत सार्वजनिक दिवे पण फुटले ते वेगळेच.”
“काय बोलतोयस काय ? सगळे सार्वजनिक दिवे… “
“फुटले आणि त्यावरून होणारी चाळकऱ्यांची भांडणं सोडवता सोडवता, माझ डोक फुटायची पाळी आल्ये.”
“बर बर, मी असं करतो तुला आयोडेक्स बरोबर अमृतांजन पण देतो मग तर झालं ?”
“पंत इथे माझी काय हालत झाल्ये आणि तुम्हाला विनोद सुचतायत !”
“यात कसला विनोद, तुझ्या दुखऱ्या खांद्यासाठी आयोडेक्स मागायला तूच आला होतास आणि आता तुझ लोकांच्या भांडणामुळे डोक फुटायची वेळ आल्ये म्हणालास म्हणून मी तुला आपणहून अमृतांजन.. “
“खरच आहे ते, अमृतांजन पण लागेलच मला, कारण तुम्हाला अजून बर्वे काका आणि साने काकांच्या भांडणा बद्दल… “
“आता ते दोघे कशाला भांडले एकमेकाशी ?”
“इथे पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडाच कारण झाला.”
“तो कसा काय ? “
“पंत त्यांच्या फिटनेस फ़ंडयात दोरीच्या उडया पण होत्या.”
“हो, तो पण एक चांगला घरगुती व्यायाम प्रकार आहे खरा.”
“पंत, सानेकाका त्यांच्या घरात दोरीच्या उडया मारत होते आणि त्याच वेळेस खालच्या मजल्यावरचे बर्वेकाका जेवत होते !”
“म्हणजे दोघेही आपापल्या घरीच होते ना, मग भांडणाचा संबंध आला कुठे ?”
“अहो पंत साने उडया मारायला लागले की खाली बर्व्यांच्या ताटात त्यांच्या सिलिंगची माती पडायची !”
“अरे चाळीस वर्षात चाळ खिळखिळी झाल्यावर सिलिंग मधून माती नाहीतर काय सोन पडणार आहे ? तूच विचार कर म्हणजे झालं.”
“हो बरोबरच आहे पण त्यामुळे बर्वे काकू आल्या माझ्याकडे तणतणत. मी काकूंना म्हटलं, बर्वे काकांना ताट घेऊन दुसरीकडे बसून जेवायला सांगा.”
“बरोबर आहे तुझ, मग ?”
“त्यावर बर्वे काकू मला म्हणतात कशा ‘ती ह्यांची जेवायला बसायची रोजची जागा आहे, दुसरीकडे बसून जेवलं तर त्यांना जेवण जात नाही’ आता बोला ?”
“अरे बापरे, असं म्हणाली बरवीण ?”
“हो ना, वर मला सांगायला लागल्या ‘तूच सान्याला सांग उडया मारायची त्यांची जागा बदलायला’ आणि गेल्या तरातरा निघून घरी.”
“मग तू काय केलंस ?”
“काय करणार, गेलो साने काकांकडे, झाला प्रकार सांगून त्यांना म्हटलं, तुम्ही प्लीज जरा तुमची दोरीच्या उडया मारायची जागा बदलता का ?”
“मग काय म्हणाला सान्या?”
“साने काका म्हणाले ‘मी माझ्या घरात कुठ उडया मारायच्या आणि कुठे नाही हे मला सांगायचा कुणाला अधिकार नाही. तूच बर्व्याला त्याची जेवायची जागा बदलायला सांग.’ असं म्हणून माझ्या तोंडावर धाडकन दार लावले त्यांनी.”
“फारच पंचाईत झाली असेल ना तुझी त्या वेळेस.”
“हो ना, दोघेही वयाने मोठे आणि हट्टाला पेटलेले.”
“मग कसा काय मार्ग काढलास त्यातून तू ?”
“मार्ग कसला काढतोय, घरी येवून मस्त ताणून दिली. पण पाच मिनिट आडवा पडतोय न पडतोय, तोच दाराची कडी वाजली.”
“उगाच तुझी झोप मोड झाली ना, पण दारात कोण आलं होत तुझी झोप मोडायला ?”
“अहो दार उघडून बघतोय तर काय, पहिल्या मजल्यावर जिन्याशेजारी राहणारे राणे काका, रागाने लालबुंद होऊन दारात उभे.”
“आता राण्याला राग यायच काय कारण ?”
“मी विचारलं राणे काकांना, तर मला म्हणाले वरच्या कोकणे काकांनी त्यांची झोप मोड चालवली आहे, जिन्याने सारखं वर खाली जाऊन येवून.”
“जाऊन येवून म्हणजे, मी नाही समजलो.”
“पंत हा पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडा.”
“म्हणजे त्यांचे भांडण पण केळकराच्या फिटनेस फ़ंडया मुळे झाले की काय? “
“हो पंत, केळकर काकांनी कोकणे काकांना घरी बसून बसून त्यांचे वजन वाढल्यामुळे आणि घुडघे दुखत असल्यामुळे, जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम सांगितला होता करायला.”
“बरोबरच आहे केळकराच आणि तुला दुसरा एक उपाय सांगतो गुडघे दुखीवर.”
“पंत इथे मी कशाला आलोय आणि तुम्ही मला….”
“अरे ऐकून तर घे, गुडघे दुखत असतील तर कमरे एव्हढया पाण्यात रोज अर्धा तास चालायचं, घुडघे दुखी कुठच्या कुठे पळून जाईल बघ तुझी.”
“आता मीच पळतो पंत, तुमचं बोलण ऐकून माझ डोक खरच फुटेल की काय अस वाटायला लागलं आहे.”
“सॉरी सॉरी, पण कोकण्याच्या जिन्याने खालीवर जाण्याने, राण्याची कशी काय बुवा झोप मोडायची, ते नाही समजलं !”
“अहो कोकणे काकांचा अजस्त्र देह जिन्याने खाली वर करू लागला की आपल्या चाळीचे आधीच जीर्ण शीर्ण झालेले लाकडी जिने… “
“दाण दाण आवाज करायचे आणि राण्याची खोली जिन्याजवळ असल्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं व्हायच, बरोबर ?”
“बरोबर पंत, त्यामुळे त्या दोघांचे पण कडाक्याचं भांडण झालं आणि दोघेही माझ्याकडे एक मेकांची तक्रार घेऊन आले आणि …. “
“तू नेहमी प्रमाणे माझ्याकडे यावर उपाय सुचवा म्हणून, काय खरं ना?”
“हो पंत, तुम्हीच चाळीत सगळ्यात जुने जाणते आणि अनुभवी …. “
“नेहमीची मस्काबाजी पुरे ! आता मला आधी सांग, आपल्या चाळीतले योगा शिकवणारे गोरे गुरुजी सध्या चाळीत….. “
“नाहीत ना, ते मध्यतंरी गावाला गेले आणि सध्याच्या परिस्थितीमुळे गावालाच अडकलेत.”
“बर बर आणि योगासन पण कुणाच्या तरी देखरेखी खाली केलेली बरी, नाहीतर उगाच कोणाला तरी त्याचा त्रास पण होऊ शकतो.”
“मग कसं करायच आता पंत.”
“अरे मी असतांना कशाला घाबरतोस. उद्याच्या उद्या एक पत्रक काढ, चाळ कमिटीचा अध्यक्ष म्हणून.”
“बर, पण त्या पत्रकातून काय सांगायचं लोकांना?”
“लोकांना सांगायचं की कोणीही केळकराचा फिटनेस फ़ंडा वापरायचा नाही.”
“मग पंत लोकांनी फिट राहण्यासाठी काय करायच?”
“माझा फिटनेस फ़ंडा वापरायचा !”
“तुमचा फिटनेस फ़ंडा, म्हणजे काय पंत ?”
“काही नाही, ज्या लोकांना या लॉक डाऊन मधे फिट रहायच आहे त्यांनी आपापल्या घरात रोज सकाळी फक्त बारा सूर्य नमस्कार घालायचे, बस्स.”
“त्यानं लोक खरंच फिट राहतील पंत ? “
“यात तुला शंका घ्यायच कारणच नाही. “
“ते कसं काय पंत?”
“अरे शास्त्र शुद्ध पद्धतीने घातलेल्या प्रत्येक सूर्य नमस्कारात सगळी योगासन समाविष्ट असतात, हे माहित्ये का तुला ?”
“नाही पंत, पण लोकांना शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार घालायला…. “
“मी शिकवणार आणि प्रत्येकला सांग, की घरात राहून ज्यांना ज्यांना फिट रहायच त्यांनी….”
“पंतांना भेटून शास्त्र शुद्ध सूर्य नमस्कार कसे घालायचे ते लवकरात लवकर शिकून घ्या आणि…. “
“केळकराच्या फिटनेस फ़ंडयामुळे होणारी चाळीतली भांडणे टाळा.”
माणसाचं जगणं हे त्याच्या विचारांनी सुंदर होत असते आणि त्याचे हे विचार जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्व जण नेहमीच आठवणीत ठेवतात.. ठेवत असतात..
सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे..
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते
जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘”सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत”…जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगलेच घडते..
आपण पाहावं तसं आयुष्य आपल्याला दिसतं. प्रत्येक क्षण जर रसरसून जगायचा ठरवला तर खरोखर तसा छान अनुभव यायला लागतो. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडले की आजूबाजूला जे जे म्हणून दिसेल, सजीव, निर्जीव वस्तू, परिसर त्याला मनातल्या मनात मी ‘”गुड मॉर्निग’” म्हणते तसेच मनातल्या मनात स्वत:लाच ‘”गुड मॉर्निग’” म्हणते व स्वतःलाच एक छानस स्माईल पण देते.. अशानं एक सकारात्मकतेची भावना आपोआपच मनातून शरीरभर झिरपत जाते व ताजंतवानं वाटायला लागते.. उठल्यापासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करते मग दिवसभरात कशीही परिस्थिती वा आव्हानं समोर आले तरीही त्या त्या क्षणांतला आनंद टिपते म्हणजे माइंडफुल राहायचं तो क्षण जगायचा. चहाच्या कपाला ओठांना होणारा पहिला स्पर्श असो वा चहाच्या पहिल्या घोटाची चव असो. मस्त एन्जॉय करते मी… पुढे घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेतला चांगला भाग शोधते तशी मनाला सवयच लावून घेतली आहे म्हणा ना..! विपरीत, प्रतिकूल परिस्थितीतही हे धोरण ठेवायचं बरं.. ! तश्या परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच असतं.. ते शोधायची मनाची धाटणी बनवायची. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्या विनाअट शांतपणे स्वीकारायच्या आणि शांतपणे पुढे जायचं…
आनंदी राहणं ही एक कला आहे. मुख्य म्हणजे ज्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे, क्षणांमुळे आनंद मिळतोय त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं…
आनंदी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड असते किंबहुना पीस आणि ब्लिस, आनंद, मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का ? किंवा येईल का ? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का ? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मात्रं त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं ‘रिप्रोग्रॅमिंग’ असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक आनंदाची निरंतर शक्यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील…
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल… इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किंमत करू नये किंवा ठरवू ही नये कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो नाही का?..
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“को जागर्ती, को जागर्ती, कोण जागं आहे? हे बघत शंकर-पार्वती आज आकाशातून फिरत जात असतात आणि म्हणून आज जागं राहायचं, म्हणजे सुख-समृद्धी आपल्या घरी येते” अशी कोजागिरी ची गोष्ट लहानपणी आम्ही मामा मराठ्यांच्या चाळीत ऐकत असू. ती गोष्ट वैद्य वहिनी अगदी रंगवून सांगायच्या आणि दरवर्षी ऐकली तरी त्यातील गोडी कमी व्हायची नाही! मराठ्यांची चाळ आमच्या घरापासून जवळच असल्याने आणि त्या चाळीत आमचे येणेजाणे असल्याने कोजागिरी साजरी करायला आम्ही तिथे जात असू.माझ्या जवळच्या मैत्रिणी तिथे रहात असत. साधारणपणे 1962 ते 71 आमचे बि-हाड रत्नागिरीत होते. तोच माझा शाळेचा ही कालखंड होता, त्यामुळे मैत्रिणींचे वेड घरच्यां पेक्षा जास्तच! एकत्र खेळायचं, शाळेला जायचं, शाळेतून येताना कोपऱ्यावर तासन-तास गप्पा मारायच्या असा आमचा दिनक्रम होता!
रत्नागिरी शहर तसं लहान! मराठ्यांची चाळ झाडगावात प्रसिद्ध… बटाट्याच्या चाळी सारखी! जवळपास सतरा अठरा बि-हाडे असतील तिथे! वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या व्यवसायातील माणसे तिथे आनंदाने राहत असत. चाळीतला गणपती उत्सव ही दणक्यात साजरा होत असे. पाऊस नसला तर करमणुकीचे कार्यक्रम होत असत. कोजागिरी पौर्णिमेला मात्र बहुतेक वेळा लख्ख चांदणे अनुभवता येई! आता इतका निसर्ग लहरी नव्हता बहुतेक! चाळीत कार्यक्रम ठरला की आमचे छोट्या मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम असतच! छोटी नाटिका,नकला, चित्रपटातील गाणी नाट्यछटा वगैरे. मीनाच्या वडिलांचा स्टुडिओ असल्याने तेथील मोठा पडदा कार्यक्रमासाठी मिळत असे.
संध्याकाळपासून आमची कार्यक्रमाची तयारी सुरु असे. त्यातल्या आठवणार्या एक-दोन नाटिका म्हणजे एक ध्रुवाची आणि दुसरी कृष्णाची! माझ्या मैत्रीण बरोबर अर्थातच त्यात माझी भूमिका असे. असे हे कार्यक्रम झाले की कोजागिरीच्या रात्री समुद्रावर फिरून येणे हा आनंदाचा भाग! टिपूर चांदण्यातून, चमचमणाऱ्या वाळूतून, समुद्राचे खळाळणारे रूप पाहात फिरताना अवर्णनीय आनंद मिळत असे. समुद्रावरुन घरी यायला नको वाटत असे पण भेळ आणि मसाला दूध याच आकर्षण अर्थातच चाळीत पुन्हा घेऊन येत असे. चंद्राला ओवाळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि आणि दुधाचा आस्वाद घ्यायचा, यामध्ये स्वर्गीय सुख होते. या सर्वासाठी सामूहिक वर्गणी असे. सगळेजण एकत्र येऊन काम करत असत. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आनंद घेण्यात सगळेच सामील असत. आतासारख्या मोठमोठ्या पार्ट्या नसतील तेव्हा, पण एकत्र येऊन भेळ खाणे, दुग्धपान करणे आनंददायी असे.त्या आटीव दुधाचा स्वाद अजूनही मनात रेंगाळत आहे! पावभाजी,वडा पाव यासारखे पदार्थ तेव्हा नव्हते! कधीकधी गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची यासारखे खेळही होत असत.
कोजागिरी जागवणे हे बहुतेक दर वर्षी होई. कोकणात पावसाचा सीझन संपला, आणि आकाश निरभ्र झाले की पावसाला कंटाळलेली माणसे कोजागिरीचा आनंद मनसोक्त घेत असत!
कोजागिरी पौर्णिमेला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात, कारण यादरम्यान ‘हळवं भात’ शेतात तयार झालेले असे. त्या नव्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य या दिवशी करतात. यानंतर दसरा-दिवाळी यासारखे मोठे सण येणार असल्याने कोजागिरी पौर्णिमे पासूनच वातावरण आल्हाददायक होण्यास सुरवात होत असे. कोजागिरी पासून एक महिना वेगवेगळ्या देवळातून (रामाच्या, राधा कृष्णाच्या, विठ्ठलाच्या) काकड आरती सुरू होत असे. त्या पहिल्या दिवशी तरी आम्ही देवाला जाऊन काकड आरती साजरी करत असू.थंडीची हलकीशी सुरुवात झालेली असे. स्वच्छ हवा, टिपूर चांदणे आणि समुद्रावरचे फिरणे अशा सर्व अविस्मरणीय अनुभवाचे वर्णन शब्दात करणे
अशक्य आहे…
आज इतकी वर्षे झाली तरी मामा मराठ्यांच्या चाळीत अनुभवलेली कोजागिरी मनात जपून ठेवली आहे. काळाबरोबर माणसे गेली,ती चाळही गेली ,पण आमच्या स्मरणात मात्र मामा मराठ्यांच्या चाळीतील ते चांदणक्षण कायमचे राहून गेले!
आमच्या घरी सरुबाई खूप वर्षे काम करतात. अतिशय गरीब, प्रामाणिक, आणि कष्टाळू. त्या दिवशी खूप अस्वस्थ होत्या. सकाळी चहा पण नको म्हणाल्या.
“ काय झालय सरुबाई.”
“ काय न्हाय व रोजचे तमाशे.. जीव नुसता नको झालाय. रोज रोज कटकटी, भांडणतंटे.
मुलं मोठी झाली तरी अक्कल येईना या नवऱ्याला,.दारू तरी किती ढोसावी–आता ही पोरं शिकून मार्गी लागली तरच आशा– कसलं व हे जिणं. बघा ना, तुमच्या ताई एवढंच असेल माझं थोरलं. ताई आपल्या किती अब्यास करत असतात ते बघतेय ना मी. आणि आमचं दिवटं–
अक्खा दिवस वस्तीत फिरत असत्यय शाळा बुडवून. आमची वस्ती ही अशी. बाई वेळ नाही व लागत बिगडायला. न्हाय म्हणायला,पोरगी मात्र आहे हुशार पण किती व काम लागतं तिला बी घरात.”
सरुबाईची समजूत घालून, खायला देऊन, पाठवले खरे,पण मन मात्र अस्वस्थच होते.
दिवस पळत होते. माझ्याच आयष्याची लढाई लढताना, मी तरी कुठे कोणाकोणाला पुरणार होते? —
दरम्यान,माझ्या हॉस्पिटलने चांगलाच जीव धरला। खूप छान चालायला लागले। मला दिवसाचे 24 तास पुरेनासे झाले आता मी सरुबाईना पगार वाढवला. माझ्या हॉस्पिटलच्या पेशंटचे जेवणखाण त्या करू लागल्या. मला ती काळजीच उरली नाही. मध्ये मध्ये समजायचे, मुलगी छान मार्क मिळवतेय, पण मुलगा काहीही करत नाही. नुसता अड्ड्यावर बसून जुगार खेळतो.
–आम्ही बघण्या खेरीज काहीच करू शकत नव्हतो.
सरूबाईंची मुलगी खूप वेळा यायची आईला मदत करायला. मोठी गोड मुलगी. वेळ मिळाला, की अभ्यासाचे पुस्तक उघडून बसायची. मला मोठे कौतुक वाटायचे तिचे..काही अडले,तर माझ्या मुलीला विचारायची—
त्या दिवशी मला तिने प्रगती पुस्तक दाखवले. कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकणाऱ्या या पोरीला आठवीत ९0 टक्के मार्क्स होते, पाच तुकड्यात ती पहिली आली होती.
आम्हाला अत्यंत आनंद झाला.आणि कौतुक वाटले. मी तिला मोठे बक्षीस दिले. माझ्या मुलींनीही तिला सांगितले, “ हे बघ,राधा,आता मागे वळून बघू नको. खूप हुषार आहेस तू.
आत्ता वाटेल तेवढे कष्ट कर, पण या परिस्थितीतून तू स्वतःला बाहेर काढ. अग, हेही दिवस जातीलच. आम्ही आहोत ना–कोणतीही मदत लागेल ती माग.”
राधाला दहावीला 92 टक्के मार्क मिळाले. मला विचारायला आली—
“ बाई, यापुढे मी काय करू? आई तर माझं लग्न करायला निघालीय, पण बाई,मला शिकायचंय हो। मला तुमच्यासारखे मोठे व्हायचंय. मला डॉक्टर तर होता येणार नाही, पण निदान काहीतरी करून दाखवायचं आहे. ”
तिची तळमळ अगदी काळजाला भिडली. सरुबाईना बोलावले आणि म्हटले,
“ लग्न करताय हो राधाचे? वाटतंय का जीवाला काही ? द्या असाच दारुडा बघून, की सुटलात.
जरा धीर धरा सरुबाई. ही मुलगी खरंच पुढे जाईल, पांग फेडील तुमचे. मी भरते तिची सगळी फी यापुढे.. “
“ अव, फी मस भराल बाई, पण लोक काय म्हणतील ? आणि हिला शिकलेला नवरा कुठून आणू मग.? “
मी चिडून म्हणाले,” गप बसा. आणेल तिचा ती शोधून. जा ग राधा, मी घेईन सगळी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी.”
राधा 12 वी झाली. इतके सुरेख मार्क होते, की तिला कुठेही सहज प्रवेश मिळू शकत होता.
पुन्हा राधा माझ्याकडे आली.‘ आता काय? ‘हा प्रश्न होताच कायम. माझी बहीण डि. एड. कॉलेजची प्रिंसिपल होती।
आधी राधाला विचारले, “ तुला शिक्षक व्हायला आवडेल का? बघ–तू 2 वर्षात डी एड होशील, आणि लगेच नोकरीही लागेल. मग बाहेरून कर बी. एड. नाही तर तुला नर्सिंगचाही पर्याय आहे–सहज मिळेल तुला ऍडमिशन दोन्हीकडे. “
राधा म्हणाली, “ बाई,मी जर नर्सिंग केले, तर मला सगळे फ्री होईल ना? हॉस्टेल, स्टायपेंड? “
” अर्थात राधा. तुला काहीही खर्च नाही पडणार.”
राधाने बी. एस्सी. नर्सिंगला ऍडमिशन घेतली. तिची जिद्द कायम होती. राधा आता एकदम स्मार्ट झाली. दिसायला छान होतीच, पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसू लागले.
राधा बी. एस्सी. ला डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. लगेच तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला. फुल युनिफॉर्ममधली राधा माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले. किती सुंदर दिसत होती राधा.
तीनच वर्षात राधा चीफ स्टाफ झाली. ‘ ऑपरेशन थिएटर सिस्टर ’ अशी मोठी जबाबदारीची पोस्ट तिला मिळाली.
एक दिवस ती माझ्या घरी एका मुलाला घेऊन आली—” बाई,आता हाही प्रश्न तुम्हीच सोडवायचा– नेहमी सारखा. “
राधाच्या चेहऱ्यावर लाजरे हसू होते.
“ बाई हा सतीश. माझ्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. एम.कॉम. आहे, आणि हॉस्पिटल ऍडमीनमध्ये आहे. मला लग्न करायचंय याच्याशी. “
मी सतीशची माहिती विचारली. छानच होता मुलगा. स्वतःचा छोटा फ्लॅट होता. आईवडील गावी असायचे. पगारही चांगला होता. पण सरुबाई —“ बाई ,जातीचा न्हाय आमच्या हा. “
“ सरुबाई, बास झाले. काय केलेत हो आजपर्यंत या लेकरासाठी तुम्ही? लग्नासाठी एक पैसाही न मागणारा असा उमदा जावई आपणहून दारात येऊन उभा राहिलाय. आणि मुले मोठी आहेत आता. मुकाट्याने परवानगी द्या. नाही तर ती लग्न करूनच येतील.”
सरुबाईना पटले– साधेसुधे लग्न झाले. किती सुंदर दिसत होती जोडी. मला वाकून नमस्कार करताना राधा म्हणाली, “ बाई तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्या दोन, तशीच तिसरी मुलगी मानलीत मला .” राधाने मला मिठी मारली. मला खूप समाधान मिळाले.
केव्हाही पायदळी तुडवली जाईल अशी ही वेल, माझ्या हातून मांडवावर चढवली गेली.
एका हाताने पाणी न दुसऱ्या हाताने पीठ मर्दत रहायचे,पाणी बेतानेच घालत रहायचं अन्यथा पीठ पातळ होते आणि भाकरी थापली जात नाही.तर पीठ मळत मळत छानसा मऊ गोळा तयार करायचा मग परातीत थोडेसे पीठ पसरून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने गोल गोल थापायला सुरुवात करायची,डावा हात कडेला लावून आकार एकसारखा राखण्याचा प्रयत्न करायचा.(अधून मधून जाळ एकसारखा करत रहायचं,एक म्हणजे एकच काम करत राहिले तर तवा थंड पडायचा.)थोडी पुढं सरकली भाकरी की मग दोन्ही हातानी थापायला सुरुवात करायची.उजवा हात मध्यभागी न डाव्या हाताने कडेवर एकसारखा हलकासा दाब देत देत गोळ्याच्या प्रमाणात भाकरीचा गोल ठरवायचा.(पण भाकरी थापताना पण एक गंमत होते-गोळ्या खाली पीठ जास्त झाले तर बाजूच्या कडांवर येते आणि भाकरी भाजली की ती खालच्या बाजूने पिठूळ पांढरी दिसते.पीठ कमी झालं तर भाकरी मधेच चिकटते आणि गोल फिरत नाही आणि पुढेही सरकत नाही; म्हणून खालच्या पिठाचा बिनचूक अंदाज अनुभवानेच येतो.)एकदम गोळा घट्ट झाला की भाकरी चिरते.भाकरी चिरली की तिथं मळलेल्या पिठाचा जोड दिला तरीही ती एकसंध होत नाहीच.गोळा घट्ट झाला तरी भाकरी पुढं सरकत नाही आणि गोळा पातळ झाला तरी खाली चिकटतो आणि भाकरी पुढं सरकत नाही किंवा भाकरी उचलून टाकताना तुकडे तरी पडतात किंवा मधेच हात जाऊन भसका तरी पडतो.इतकी सारी काळजी घेत थापलेली भाकरी हळुवार पणे कडेला नेत पटकन उचलून तव्यात न सुरकुती पडता चटकन टाकण्याचे पण कसब असावे लागते.पूर्वीचे लोखंडी तवे खोलगट असायचे भाकरी तव्यात टाकताना मनगटाच्या आतल्या बाजूने बांगडी जवळ चरदिशी चटका बसायचा,हा दुसरा चटका! आता जाळ पुन्हा एकसारखा करून समान जाळ लागतोय का बघायचे अन्यथा जिथं कमी जाळ लागत असेल तिथं तवा थोडासा उचलून दगडाची बारीक चिप सारायची मग भाकरीवर पुरेसे पाणी फिरवून दुसऱ्या भाकरीकडे वळायचे.जसजशी चूल तापू लागेल तसे निखारे बाहेर काढायचे,भाकरीला लावलेले पाणी सुकले असले तर भाकरी पलटी करून पुन्हा तव्यात टाकायची.( इथं पण एक गंमत अशी होते की पाणी जास्त झाले तर भाकरी पचत नाही लवकर आणि लावलेले पाणी सुकून गेले तर भाकरी चिरते न कडक होते त्यामुळं कींचित ओली आहे तोवरच भाकरी पलटायची)
चुलीतला जाळ एकसारखा करत तव्यातली सर्व बाजूनी भाजलेली भाकरी चुलीतले निखारे बाहेर छोट्या वाफ्यात बाजूला ओढून लावायचे त्याला चुलीचा आधार देऊन भाकरी उभी करायची,तोपर्यंत परातीत थापून झालेली भाकरी तव्यात टाकायची,जाळ एकसारखा करायचा,एखादी ढलपी,शेणकुटाचा तुकडा किंवा चार चिपाड आत सारून नवीन भाकरी थापायला घ्यायची, तोपर्यंत निखाऱ्यावरची भाकरी फुललेली असते,ती काढून बुट्टीत टाकायची.पहिल्या भाकरीतला एक छोटासा तुकडा काढून अग्नीला अर्पण करायचा आणि पाण्याचे चार शिंतोडे चुलीत मारायचे मग पुढच्या भाकरीकडे वळायचे. जळण बाभळीचे,लिंब करंज असे कठीण असले तर निखारे चांगले रसरशीत पडतात मग भाकरी पटपट भाजतात. नुसत्या चिपाडाचे निखारे पडत नाहीत त्यामुळं जळण चांगल्या दर्जाचे असले तरच भाकरी पटापटा होतात चूल एकसारखी धगधगत रहाते आणि कितीही भाकरी कराव्या लागल्या तर कंटाळा येत नाही.चिपाड मात्र सारखी विझतात आणि सारखा जाळ घालून भाकरी थापताना बाईचा जीव रडकुंडी येतो.या सर्वातून तावून सुलाखून बाई भाकरीत निष्णात होते.
तर कुणाच्याही भाकरीला इथून पुढं नावं ठेवताना भाकरियन नक्की आठवा.
आजकाल मुलींना कुणी स्वयपाक घरात येऊच देत नाही त्यामुळं आई स्वैपाक करताना निरीक्षण बिरीक्षण असली काही भानगड नसते शिवाय स्वैपाक करण्याची गोडीही लावली जात नाही. गॅसवर भाकरी चांगल्याच होतात .एखादं वेळेस भाकरी नाही आली तरीही चालते कारण दोन वेळेस चपातीच खाल्ली जाते. आमची मुलगी शिकल्या, नोकरी करणार मग स्वैपाकाची तिच्याकडून स्वैपाकाची अपेक्षा करू नका असे सांगणारे देखील आईवडील आहेत पण माणूस प्रेमाने बांधून ठेवण्यात चांगल्या स्वैपाकाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
असो,आम्ही अशा पद्धतीने शाळा शिकत शिकत सर्वच कामे करत जबाबदार झालो.त्यामुळं जीवनात कधीच कुठल्या प्रसंगाला मागे हटलो नाही कितीही स्वैपाक असो,धुणे असो की भांड्याचा खिळा काहीच वाटत नाही सहजच कामे करून टाकतो.
स्वतःचे पोट भरण्याइतपत तरी चविष्ट आणि सकस स्वैपाक प्रत्येकीलाच करता यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे.बाहेरचं कितीही महागडे चविष्ट खाद्यपदार्थ असले तरी घरच्या साध्या सात्विक जेवणाची सर नाहीच!