मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ४ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ४ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

” चार लोक काय म्हणतील…? “

थ्री इडियट हा सिनेमा जवळजवळ सर्वांनी पाहिला असेल…! त्यात एक विदारक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अभियंत्याचा मुलगा अभियंता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि तत्सम बरेच काही दाखवले आहे…

आपली सध्याची शिक्षण व्यवस्था उपजत अंगी असलेल्या गुणांना उपयोग करून स्वतःची प्रतिभा वापरून प्रगती साधण्यास वाव देण्याऐवजी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक पर्यायांमध्ये आपापल्या गुणांचा उपयोग करून प्रगती करण्याची संधी देते असे म्हणावे लागेल आणि तेही एका अमर्यादित स्वरूपात… ,. असे खेदाने नमूद करावेसे वाटते…

– – त्यामुळे आपल्याकडील विद्यार्थी प्रचंड दबावात शिक्षण घेत आहेत असे आपल्या लक्षात येईल…! शिक्षण आनंददायी असावे असे आपण सर्वजण म्हणतो, पण ते खरेच आनंददायी होते का, हे पाहणं मात्र पालकांकडून होताना दिसत नाही…!!

सध्या सर्वसाधारण विद्यार्थी विद्यार्थीनी क्लास, शाळा, संध्याकाळी परत क्लास (अन्य छंदाचा), सर्व क्लासेस् चा गृहपाठ, पालकांच्या अपेक्षा, सामाजिक माध्यमांची चमकधमक, नैसर्गिक रित्या शरीरात होणारे हार्मोन्स मधील बदल, बदलत्या सामाजिक वातावरणाचा मुलांवर होणाऱ्या परिणाम, एक मूल असलेले, कुटुंब, मैदानी खेळांचा अभाव, मनातील भावनिक आणि शारीरिक घुसमट बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेले मर्यादित पर्याय, यांनी गांजून गेली आहे…! हे सर्व वेताळ आहेत आणि यातले अर्धे अधिक पालकांच्या मनात आणि बाकीचे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत… यातूनच आत्महत्या आणि अनेक दुष्कृत्य करण्यास विद्यार्थी धजावत आहेत… आणि यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे… पटतंय ना?

बरेच वेळा सामान्य मनुष्य द्विधा मनस्थितीत असतो…! अहो, ते कशाला, महाभारतात अर्जुनसारख्या महान भक्ताला साक्षात परमात्मा सोबतीला असताना विषाद वाटला… युद्ध करावे की न करावे असा संभ्रम झाला तिथे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याची काय कथा?

… सांगायचा मुद्दा इतकाच की सामान्य मनुष्याचा गोंधळ होणे, संभ्रम होणे अगदी स्वाभाविक आहे…!

सध्याच्या काळात कोणतीही गोष्ट करताना मनुष्याला आणिक एक प्रश्न भेडसावतो…!

… जगातील आज जे पर्यंत न सुटलेले प्रश्न आहेत, त्यामधील हा प्रश्न प्रमुख म्हणता येईल… सूज्ञ वाचकांच्या हा प्रश्न लक्षात आलाच असेल… आता मी आपली उत्सुकता फार ताणत नाही…

– – ” चार लोकं काय म्हणतील…?  “

अहो, जसे आपल्याला प्रश्न आहेत, तसे जगातील प्रत्येक माणसाला विविध प्रकारचे आणि विविध कंगोरे असलेले प्रश्न असतात, आहेत आणि हे पुढेही चालू राहील…! समर्थ रामदास स्वामी म्हणतात, *”त्याप्रमाणे जगी सर्व सुखी असा कोण आहे…? “* तर या प्रश्नाचे उत्तर कोणीही सुखी नाही असेच आहे.

… यामुळे ही जी चार लोकं आहेत, त्यांनाही आपल्यासारखे किंबहुना आपल्यापेक्षा जास्त गहन प्रश्न असतील… , ते त्यांचे प्रश्न सोडविण्यात इतके मग्न आहेत की त्यांना आपले प्रश्न पाहण्यात काडीचाही रस नसेल..

…. म्हणूनच तिकडे लक्ष न देता मनुष्याने आपल्याकडे उपलब्ध साधनांचा उपयोग करून, नीती धर्मांचे आचरण करून आपला सोडविण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी भगवंताकडे मदत मागावी. हा उपाय सर्वमान्य आणि उचित ठरू शकेल…!!

– – त्या चार लोकांचा विचार त्यांचा त्यांनाच करू दे, आपण आपला *”स्वार्थ”* पाहू…!

पहा, पटतंय का?

क्रमशः भाग चौथा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांनी जवळजवळ सर्व साहित्य प्रकार हाताळले. त्यांनी कथा लिहिल्या, ज्यातील कांही जगप्रसिद्ध झाल्या. त्यांची अनेक भाषांतून भाषांतरे झाली. दूरदर्शनवर त्या कथा मालिकेच्या स्वरूपात आल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या काही चित्रपटाचा साज लेऊन आल्या. त्यांचं बाल साहित्यातील योगदान देखील लक्षणीय आहे. त्यांनी निबंध, आठवणी, टीका, प्रवास वर्णनं, नाटकं व नृत्य नाटिका पण लिहिल्या. अनेक नाटकं, नृत्य नाटिकांचं रंगमंचीय सादरीकरण पण झालं. विशेष म्हणजे या नाटकांचे ते लेखक, कवी, संगीतकार इतकच नाही तर अभिनेता देखील असायचे. पण त्यांच हृदय मात्र कवीचच होतं. त्यांनी कांही दीर्घ काव्यं, खंडकाव्यं (छ. शिवाजी महाराजांवर) पण रचली.

वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी चित्रं काढायला सुरुवात केली. मात्र या कलेतील आपलं कौशल्य त्यांनी लवकरच सिद्ध केलं. त्यांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन ‘रविंद्रनाथ – कवी व चित्रकार’ या शीर्षकासह, सन १९३० मधे पॅरिसच्या गॅलरी पिगले (Gallery Pigalle) येथे भरविण्यात आले. यामुळे त्यांच्या कलेला जागतिक ओळख मिळाली. त्यांचं काव्य व चित्रं यांतील नातं इथे सुस्पष्ट होत होतं. नंतर युरोपमध्ये त्यांची अनेक यशस्वी प्रदर्शने भरवली गेली. त्यांची चित्रे साधेपणा, सुस्पष्ट रूपे व लयबद्धता यासाठी ओळखली जात. कालांतराने त्यांच्या १५० व्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून लंडनमधील ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट’ संग्रहालयाने टागोरांची ५० चित्रे प्रदर्शित केली होती.

टागोरांच्या साहित्याचा अभ्यास, जगातील व भारतातील अनेक विद्यापीठात आज १०० वर्षांनंतरही केला जात आहे. याबाबतीत त्यांची तुलना कालीदास, शेक्सपिअर यांच्याशी केली जाऊ शकते.

गीतांजलीतील अध्यात्म, जगन्नियंत्याची संकल्पना ही उपनिषदांवरून प्रेरित असावी. त्यामुळेच ती कालातीत आहे व देशाच्या, धर्माच्या सीमा ओलांडून ती वाचकांच्या हृदयाला भिडते. आणि त्यामुळेच हे साहित्य अजरामर असं वैश्विक साहित्य झालं आहे. ब्रिटिश युनिटेरियन ‘हिमन्स फॉर लिव्हिंग’ मधील “नाऊ आय रिकॉल माय चाइल्ड” हे स्तोत्र गीतांजलीतील गीत क्र. ९७ वर बेतलेले आहे. यावरून या साहित्याची वैश्विकता सिध्द होत नाही काय?

—–

☆ गीत:- १९ ☆

If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it. I will keep still and wait like the night with starry vigil and it’s head bent low with patience.

The morning will surely come, the darkness will vanish, and thy voice pour down in golden streams breaking through the sky.

Then thy words will take wing in songs from everyone of my birds’ nests, and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:– १९ ☆

*

ऐकून माझ्या हृदीची साद

कां न देतसी तू प्रतिसाद?

*
अंतरी भरुनी तुझे मुकेपण

सोसत जाईन हे एकलपण

*
अवसेच्या घन तिमिरातला

साहत राहीन तुझा अबोला

*
चांदण्यांत जशी अवसरात्र

मिटून घेते गात्र न् गात्र

*
तसाच मीही मिटून जाईन

नव्या उषेची वाट पाहीन

*
सुवर्ण रविकिरणांवरुनि

दूत तुझे येतील उतरुनि

*
तव शब्दांचे पंख लेऊनि

उपवनातील फुले फुलवुनि

*
पाखरे मज संदेश देऊनि

गाणी सुस्वर जाती गाऊनि

*
आश्वासक तव बोल यातुनि

उतरतील नभीच्या तमातुनि

*
प्रभात पसरील तिची रक्तिमा

क्षणात वितळुनि रातीच्या तमा

*
तोवर मी पाहीन वाटुली

तोवर मी पाहीन वाटुली

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत: २० ☆

On the day when the lotus bloomed alas, my mind was straying, and I knew it not. My basket was empty and the flower remained unheeded.

Only now and again a sadness fell upon me, and I started up from my dream and felt a sweet trace of a strange fragrance in the South wind.

That vague sweetness made my heart ache with longing and it seemed to me that it was the eager breath of the summer seeking for its completion.

I knew not then that it was so near, that it was mine, and that the perfect sweetness had blossomed in the depth of my own heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २० ☆

*

तुझ्या कृपेचे कमळ उमलले

मज मूढाला नाही कळले

परडी माझी रिक्त फुलांची

कमळ माझिया दृष्टी न पडले॥

*
पुनःश्च उतरले ढग दुःखाचे

सावरले मग मी घर स्वप्नांचे

जिथे सुगंधी दक्षिण वारा

दूत पाठवी मधुगंधाचे ॥

*
उत्सुक, आतुर वसंतवारे

शोधित होते गोडी सारे

ती तर माझ्या अंतर्यामी

तुझ्या कृपेने घडले सारे॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत: २१ ☆

I must launch out my boat. The languid hours pass by on the shore—– Alas for me!

The spring has done it’s flowering and taken leave. And now with the burden of faded futile flowers I wait and linger.

The waves have become clamorous, and upon the bank in the shady lane the yellow leaves flutter and fall.

What emptiness do you gaze upon! Do you not feel a thrill passing through the air with the notes of the far awaysong floating from the other shore?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २१ ☆

*

नाव सोडतो अता प्रवाही,

विश्रांतीचा काळ संपला

वसंत ऋतु ही आला, गेला

फुलांफुलांतुन तो मोहरला॥

*
दाह ग्रीष्म दे त्या पुष्पांना

व्यर्थच जीवन, गळत भूवरी

भार घेऊनि मम हृदयावरी

रेंगाळत मी इथे किनारी॥

*
आज नदीच्या काठावरती

लाटा उसळत अन् घोंघावत

सुकली पाने उडुनि पसरत

पहात मी हे, नजर शून्यवत्॥

*

पैलथडीच्या संगीत लहरी

खुणाविती मज अष्टौप्रहरी

तव भेटीस्तव अधीर अंतरी

प्रवास अंतिम अता सुरु करी॥

– क्रमशः भाग सातवा 

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशाची यशस्विता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ यशाची यशस्विता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

— श्री. जयंत साळगावकर

यशाची यशस्विता :::: 

काही वर्षापूर्वी एक माणूस खाकी अर्धी चड्डी घालून मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये गाडीतून उतरला. मालवणहून मुंबईत तो पहिल्यांदाच आलेला असतो..

उतरताच मुंबईने त्याला आपला रंग दाखवला, त्याची पिशवी चोरीला जाते. आता करायचे काय ह्या मायानगरीत?  असा प्रश्न त्याच्या मनात आला..

मुंबईत एकमेव माणूस ओळखीचा माणूस आणि आधार तो म्हणजे गंगाधर. खिश्यात पैसा नाही, मग चालत गंगाधरचे घर गाठले. त्याकाळी दुसर्‍याला आधार देण्याची प्रथा होती. दुसर्‍या दिवशी गंगाधरने त्याला ह. रा. महाजनी (लोकसत्ता दैनिकचे संपादक आणि अभिनेता रविंद्रचे वडील)च्या पुढ्यात उभे केले, कारण त्याला नोकरीची गरज होती. या अर्धचड्डीत उभ्या असलेल्या माणसाला महाजनीने नाव, गाव विचारले आणि ते ऐकताच महाजनी म्हणाले, अरे शब्दकोडे सोडवून पाठवतोस तो तूच का..?

मग आजपासून शब्दकोडे रोज बनवून देणे, हीच तुझी नोकरी. अश्यातर्‍हेने पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढे वेळ मिळेल तेव्हा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्याने नाव कमावले आणि त्यामुळे त्याची ओळख महाराष्ट्राच्या मान्यवर लोकांबरोबर झाली..

पुढे स्वस्थ न बसता दिनदर्शिका काढली, ती सुरुवातीला दुसर्‍याकडून छापून घेतली, पण नंतर स्वतःची प्रेस काढून, दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकाचे मागचे पान रिकामे असे, म्हणून त्यावर भविष्य आणि अनेक गृहोपयोगी गोष्टी छापल्या. त्यामुळे दिनदर्शिकेची लोकप्रियता आणि खप खूप वाढला, मग दुसर्‍या भाषेत पण, दिनदर्शिका छापणे सुरू केले. खूप पैसा मिळवल्यावर दादर इथे एक इमारत विकत घेतली. ज्या इमारतीमध्ये आज पारसी लोक त्याचे भाडेकरू आहेत…

ही यशोगाथा आहे मालवणहून आलेल्या एका मराठी तरुणाची, ज्यांचे नाव आहे…

“कालनिर्णयकार.. “

“आदरणीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर” यांची आणि त्यांना सुरुवातीच्या काळात मदत करणारा तो सद्गृहस्थ गंगाधर म्हणजे “कवि गंगाधर महांबरे”..

एका मराठी माणसाची ही यशोगाथा केवळ प्रेरणा मिळावी म्हणून थोडक्यात सादर…

लेखक : अज्ञात  

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वरिष्ठता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वरिष्ठता… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

वरिष्ठता – 

 – – वयपरत्वे शांती पूजा – – 

कोणीतरी मला विचारले – 

“आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या वयांचा इतका मोठा उत्सव का करतो?  हे आकडे आध्यात्मिक आहेत की फक्त सांस्कृतिक परंपरा?  ”

– – याचे उत्तर आपल्याला महाभारतातील राजा ययाती यांच्या प्रभावी कथेत सापडते.

ययातीने आयुष्य मनसोक्त जगले — सत्ता, भोग, यश, सर्व काही. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो हादरला. खोल चिंतनानंतर त्याला एक अत्यंत प्रामाणिक सत्य उमगले – – 

“ भोगाला मर्यादा आहे, पण इच्छा कधीच संपत नाही. ”

– – या एका जाणिवेने त्याचे जीवन बदलले. त्याने वृद्धत्व स्वीकारले आणि सांगितले की *आयुष्यात पाच अंतर्गत वळणे (inner turning points) असतात* — ती वयावर नाही, तर समजुतीवर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे आपल्या भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या टप्प्यांशी जुळतात. हे सर्व आपल्याला समजेल अशा शब्दांत पाहूया.

६० – षष्ठी (Shashti)

संचयातून समजुतीकडे मन वळते – ६० च्या आसपास काहीतरी बदलते — शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात.

“आणखी किती मिळवता येईल? ” हा प्रश्न मागे पडतो आणि

“आता खरंच महत्त्वाचे काय आहे? ” असा प्रश्न पुढे येतो.

– हळूहळू अंतर्मुखता सुरू होते. आवाज, कौतुक, टाळ्या यांची गरज उरत नाही. स्पष्टता हवी असते.

– – हे वार्धक्य नाही — महत्त्वाकांक्षेला गाठणारी प्रगल्भता आहे.

७० – भीमरथ शांती (Bheemaratha Shanthi)

शांतता सिद्ध करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान वाटते

– ४० आणि ५० मध्ये आपण जगाला स्वतःबद्दल सांगत असतो.

– ७० व्या वर्षी मात्र एक आश्चर्यकारक बदल होतो.

– तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. वाद आकर्षित करत नाहीत. भांडण जिंकण्यापेक्षा नाती टिकवणे महत्त्वाचे वाटते.

– – तेव्हा उमगते —

बरोबर असण्यापेक्षा शांत असणे अधिक मोलाचे आहे.

म्हणूनच ७० व्या वर्षाचा उत्सव केला जातो.

८० – शताभिषेकम् (Sathabhishekam)

*तुमची उपस्थितीच औषध बनते. *

– – ८० व्या वर्षी लोक सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोल शोधायला येतात —

ही खात्री की आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते.

– या वयात तुमची उपस्थितीच आशीर्वाद ठरते. जास्त बोलण्याची गरज नसते.

– तुमचे अस्तित्वच सांगते —

“सगळं ठीक होतं. आयुष्य मार्ग काढतंच. ”

– – म्हणूनच ८० हा टप्पा पवित्र मानला जातो.

९० – नवती (Navathi)

अहंकार शांतपणे निवृत्त होतो.

९० व्या वर्षी एक दुर्मिळ गोष्ट घडते.

– लोकांना दुरुस्त करावेसे वाटत नाही. मतांवर चिकटून राहावेसे वाटत नाही. गोष्टी वैयक्तिक घेतल्या जात नाहीत. लवकर दुखावले जात नाही.

– – कमकुवतपणामुळे नाही — तर आयुष्य खूप काही दाखवून गेलेले असते, म्हणून किरकोळ गोष्टींवर ऊर्जा वाया घालवावीशी वाटत नाही.

– – एक सौम्य शांतता येते.

ही नम्रताच खरी आध्यात्मिकता असते.  

१०० – शतमानम् (Shatamanam)

आयुष्य वैयक्तिक कथांपलीकडे जाते.. १०० गाठणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या नाही… ते एक अशी अवस्था आहे जिथे मोठे चित्र दिसू लागते.

– ज्या गोष्टींची काळजी केली, त्या बहुतेक अनावश्यक होत्या, हे कळते.

– ज्यांना प्रेम दिले, तेच खरे महत्त्वाचे होते.

– आणि आयुष्य नेहमीच एखाद्या गूढ, दयाळू शक्तीने धरून ठेवलेले होते, याची जाणीव होते.

१०० व्या वर्षी माणूस “व्यक्ती” कमी आणि “उपस्थिती” अधिक बनतो.

सारांश (Essence)

*आपल्या ऋषींनी वय साजरे केले नाही. वयामुळे होणारे अंतर्गत परिवर्तन त्यांनी साजरे केले. *

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात
  • ७० – शांतता हीच शक्ती ठरते
  • ८० – उपस्थिती उपचारक होते
  • ९० – अहंकार शांत होतो
  • १०० – आयुष्य पूर्णत्वाला पोहोचते

– वय म्हणजे अधःपतन नाही.

– – वय म्हणजे गाळण — ज्यातून शहाणपण, कोमलता आणि कृपा शुद्ध होऊन उरते.

*आजचा विचार.. *

वय वाढणे म्हणजे आयुष्य कमी होणे नाही; तर – – 

ते अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होत जाणे आहे

– – – -ही जर अवस्था आणि कृती घडत नसेल तर तुमचं वय आकड्याने वाढले आहे, तुम्ही प्रगल्भ व परिपक्व झालेले नाहीत…

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – नॉर्मन कझिन्स.. मूर्तिमंत सकारात्मकता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – नॉर्मन कझिन्स.. मूर्तिमंत सकारात्मकता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नॉर्मन कझिन्स हा एक अमेरिकन पत्रकार, प्राध्यापक आणि जागतिक शांततेचा खंदा पुरस्कर्ता! त्याची कथा मोठी विलक्षण आणि प्रेरणा देणारी आहे. अमेरिकेतून निघणाऱ्या The Saturday Review चे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांची दोन पुस्तके म्हणजे कोणत्याही कारणाने आयुष्यात निराश झालेल्या माणसाला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. The Anatomy of Illness, Head First आणि The Healing Heart ही त्यांची गाजलेली पुस्तके. या पुस्तकातून त्यांची जीवनगाथा लोकांसमोर आली.

नियती एखाद्या माणसाची किती कठोर परीक्षा घेऊ शकते ते नॉर्मन कझिन्स यांच्या आयुष्याकडे पाहिले म्हणजे लक्षात येते. १९६४ मध्ये त्यांना अँकीलोझिंग स्पॉन्डीलाईटीस हा दुर्मिळ आणि दुर्धर आजार झाला. स्नायू आणि सांध्यांच्या आजाराने या माणसाला बिछान्याला जखडून ठेवले. आपल्या कामात नेहमी कार्यरत राहणाऱ्या या उत्साही माणसाला अंथरुणाला खिळून राहावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे निदान केले आणि त्यांना सांगितले की हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर असा आजार आहे यातून बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी. पाचशे व्यक्तीतून एखादीच व्यक्ती या आजारातून वाचू शकते.

त्याच्या आजाराचे हे निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात हा आजार झालेला एकही रुग्ण बरा झालेला पाहिला नव्हता. डॉक्टरांचे आपल्या आजाराविषयीचे हे बोलणे ऐकल्यानंतर एखादी व्यक्ती हादरून गेली असती, निराश झाली असती, खचली असती. अशा व्यक्तीने मग एकतर आता आपले काही खरे नाही म्हणून मृत्यूला तोंड देण्याची तयारी केली असती किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करला असता. पण नॉर्मन कझिन्स यांची जगण्याची इच्छा दुर्दम्य होती, प्रचंड आशावाद होता, आजाराला आणि मृत्यूला हरवण्याची ताकद त्यांच्या मानसिकतेत होती. त्यांनी असा विचार केला की ५०० मधील एक व्यक्ती तरी वाचते ना! मग ती व्यक्ती आपणच का असू नये?

नॉर्मन यांचे वैद्यकीय ज्ञान तर अफाट होतेच परंतु मानवी मनाचा देखील त्यांचा अभ्यास होता. विचार करताना त्यांना असे आढळून आले की भय, दुःख, शोक यासारख्या भावनांचा आपल्या शरीरावर तात्काळ परिणाम दिसून येतो. जेव्हा प्रचंड भीतीची भावना मनात निर्माण होते तेव्हा हृदयाची धडधड वाढते, छातीचे ठोके वाढतात. दुःख आणि शोक या भावनांचे देखील विपरीत परिणाम लगेच जाणवतात. या नकारात्मक भावनांचे जर असे परिणाम होत असतील तर आनंद, हर्ष, उल्हास, उत्साह, प्रेम, आशा, विश्वास यासारख्या सकारात्मक भावना आपल्या शरीरावर चांगले परिणाम नक्कीच करू शकत असतील. आणि बरे होण्यासाठी याच भावनांचा आश्रय घेण्याचे त्यांनी ठरवले. रुग्णालयाच्या निराशाजनक वातावरणातून बाहेर पडून आपल्या स्वतःची उपचार पद्धती त्यांनी स्वतःच ठरवली. त्यात आशावादी राहणे, दिवसातून दहा मिनिटे तरी खळखळून हसणे आणि व्हिटॅमिन सीचा डोस घेणे या गोष्टींचा प्रयोग त्यांनी सुरू केला. या गोष्टींचे आश्चर्यकारक परिणाम त्यांना मिळाले. हास्यामुळे एंडॉर्फिन या सकारात्मक आणि उपयुक्त हार्मोन्स निर्मिती होते. त्यांना असे आढळून आले की दहा मिनिटांच्या खळखळून हसण्यामुळे आपल्या वेदना कमी होतात आणि शांत झोप लागते. त्यामुळे वेदनाशामक औषधे घेणे त्यांनी थांबवले. त्यांनी मग काही विनोदी चित्रपटांच्या कॅसेट्स मागवल्या. काही विनोदी पुस्तके मागवली. दुर्दम्य इच्छाशक्ती, सततचे प्रयत्न यामुळे ते चक्क या आजारातून बरे झाले.

त्यांच्या या अनुभवातून जन्माला आले ते Anatomy of Illness हे त्यांचे पुस्तक! आपल्या वेदनांचे रडगाणे न गात बसता या माणसाने त्याचे सुंदर गाणे केले आणि जगाला सकारात्मक राहिल्याने काय होऊ शकते याचा संदेश दिला. आपलं मन, शरीर आणि आत्मा यांचा अतूट संबंध आहे हा संदेश दिला. या गंभीर आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मेडिकल ह्युमॅनिटीजचे प्राध्यापक म्हणून काम केले.

या माणसाची पुढे नियतीने आणखी परीक्षा घेतली. या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर १६ वर्षांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करून बायपास करायला सांगितले. परंतु त्यांनी डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हृदयाची स्वतःच बायपास शोधण्याची क्षमता असते या गोष्टीवर विश्वास ठेवला. पुन्हा एकदा सकारात्मक जीवनशैली, आहार, व्यायाम या गोष्टींवर भर देऊन हृदय रोगावर मात केली. यावेळी त्यांचे वय ६५ वर्षे होते. यानंतर दहा वर्षे ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी आयुष्य व्यतित केले. त्यांना गोल्फ टेनिस खेळण्याचे आवड होती. ते खेळणेही त्यांनी सुरू ठेवले होते. त्यांच्या अनेटॉमी ऑफ या इलनेस या पुस्तकावर आधारित त्यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील निघाला. ३० नोव्हेंबर १९९० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून त्यांनी आधुनिक वैद्यक शास्त्राला हा संदेश दिला की बरे होण्यासाठी फक्त औषधोपचार आणि शस्त्रक्रिया याच गोष्टी पुरेशा नसतात तर मानवी मनाचा सहभाग त्यात अतिशय महत्त्वाचे काम बजावतो. त्यांनी जगाला हा संदेश दिला की एकदा तुमचे मन दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाने भरले की तुमचे शरीर देखील तुमच्या या इच्छाशक्तीला साथ देऊ लागते तुमचे सर्व अवयव त्यानुसार कार्य करू लागतात. कुठल्याही आजाराकडे संकट म्हणून न पाहता एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा आणि हसतमुखाने त्याला सामोरे जा. आज छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होणाऱ्या आणि आत्महत्येचा सोपा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुणांना नॉर्मन कझिन्स यांचे आयुष्य म्हणजे एक मोठा सकारात्मकतेचा संदेश आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७३  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

माणूस

एक गोष्ट निश्चित, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की प्रपंचात रमणारी माझ्यासारखी आणि माझ्यासारखीच अनेक, कितीही म्हणोत की, ” आयुष्यात जे जे करायचं ते ते सर्व अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्य बुद्धीने पार पाडलंय. आता निवांत निवृत्ती अनुभवावी. ”पण खरंच असं होतं का?

दोन्ही मुलींचे विवाह पार पाडल्यानंतर काहीसे असेच आम्हालाही वाटले होतेच पण थोड्याच दिवसांनी हेही लक्षात आले की तसे नसते. फक्त वाट बदलते, वळण बदलते. पुढच्या बदललेल्या वळणावरही निरनिराळ्या प्रकारची जीवनातली गुंतवणूक ही नाही सुटत पण तरीही “आता आपापले छंद, आवडीनिवडी जोपासायच्या, जमेल तितका प्रवास करायचा, देश विदेशातल्या आयकॉन ठिकाणांना भेटी द्यायच्या” हे मात्र आम्ही ठरवले.

आम्हाला दोघांनाही तशी प्रवासाची खूप आवड पण आयुष्याचा एक मोठा काळ मुलांचे संगोपन, शिक्षण, आर्थिक सुबत्तेसाठीची धावपळ, नातीगोती, रीती परंपरा, घरातल्या वृद्धांची काळजी यात अडकून पडलेला असतो. तरीही दरवर्षी आम्ही चौघं कधी मित्र-मैत्रिणींबरोबर कधी बहिणींच्या परिवाराबरोबर छोट्या-मोठ्या सहली, प्रवास करतच होतो आणि प्रत्येक वेळी प्रवासात आलेल्या अनुभवांच्या आठवणींनी नकळत समृद्ध होत असू. त्याचत्याच चक्रातून बाहेर पडून काही दिवसांसाठी तरी जगलेलं वेगळं जीवन मनाला दर वेळेस एक वेगळे चैतन्य, उभारी देते हे नक्कीच.

“केल्याने देशाटन मनुजा येई शहाणपण”

अशा घोकून पाठ केलेल्या सुभाषितांच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की रिक्रीएशन किंवा बदल नेहमीच मनाला ताजेतवाने करतात म्हणून जशी जमेल तशी यथाशक्ती भ्रमंती प्रत्येकाने जरूर करावी.

खरं म्हणजे प्रवास ही एक संस्कृती आहे. लहानपणी जर आम्हाला कोणी या वाटेवर चालायला शिकवलं असेल ते वडिलांनी आणि आजोबांनी. जवळजवळ प्रत्येक सुट्टीत आजोबा आम्हाला आणि माझ्या मावशीच्या परिवाराला घेऊन दूरच्या प्रवासाचे बेत आखत आणि अत्यंत उत्तमरीत्या ते पारही पडत. जवळजवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आमचा आजोबांमुळे घडला आणि त्या अनुषंगाने पर्यटनाची आवड आणि गरजही आयुष्यात निर्माण झाली. नकळतच या बालपणी केलेल्या प्रवासाने वेगळेच भौगोलिक, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक संस्कार आमच्या बालमनावर झाले. काही काही प्रसंग अजूनही स्मरणातून गेलेले नाहीत. एक छोटासा पण तरीही माणूसपणाचं दर्शन घडवणारा एक प्रसंग सांगते.

आम्ही गोव्याहून परतत होतो. त्यावेळी आंबोलीच्या घाटात आमची बस नादुरुस्त झाली. (त्यावेळी आता सारखे वेगवेगळे महामार्ग, दुपदरी चौपदरी रस्ते नव्हते) किर्र काळोख, गर्द झाडी, भयाण सामसूम, एकाकी रस्ता! मुख्य म्हणजे सहलीतील सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. जवळ खायलाही काहीच उरले नव्हते. पुढच्या टप्प्यावर एका ठिकाणी रात्रीचे जेवण घेण्याचा बेत ठरलेला होता पण तोही बस फेल झाल्यामुळे लांबला होता. आम्ही सारे हताशपणे, भुकेले बसच्या बाहेर येऊन त्या जंगलाने वेढलेल्या रस्त्यावर उभे होतो. तेवढ्यात कुठूनतरी दोन माणसं आमच्याजवळ आली. त्यांच्या हातात काठ्या आणि अंगावर फक्त देह झाकण्यापुरतीच वस्त्रं होती. गरीब, आदिवासी, जंगलात राहणारी ही लोकं आम्हाला म्हणाली, ” इथं जवळच आमची वस्ती हाय. चला तुमी पावनं. तुमच्या खाण्यापिण्याची बेस सोय करतालो. ”

ते भराभरर चालत गेले त्यांच्यापाठी काट्याकुट्यातून आम्हीही. त्यांनी घरात आवरावर करून निवांत बसलेल्या त्यांच्या बायकांना आमच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले आणि काय आश्चर्य त्या बायकांनी बघता बघता आम्हा पंधरा-सोळा जणांसाठी इतकं आनंदाने रांधलं आणि वाढलं! “हुलग्याची आमटी आणि तांदळाची भाकरी. ” आमटी चांगलीच झणझणीत होती. खाताना सारेच घामाघूम झाले होते. पांढऱ्या शुभ्र मऊसूत भाकऱ्यांची चवही खरपूस न्यारीच होती. आजही त्या जेवणाची चव माझ्या जिभेवर आहे आणि त्याहीपेक्षा त्यांचा प्रेमळ पाहूणचार आणि आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो. यांना का गरीब म्हणायचं?  हाच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात उमटला होता. ना नात्याचे ना गोत्याचे. पोटातल्या भुकेने जोडले गेलो होतो इतकेच. आम्ही देऊ केलेले पैसे त्यांनी घेतले की नाही ते मला आठवत नाही पण खरं म्हणजे आम्हीच कर्म दरिद्री म्हणून त्यांच्या अर्जवीपणाचा, प्रेमाचा आणि कष्टाचा हिशोब मात्र मांडला. असो!

प्रवास बालपणीचे, लग्नाआधी मित्र मैत्रिणींबरोबरचे, शाळा कॉलेजातल्या सहली आणि नंतरच्या आयुष्यात नवरा, मुलींबरोबर आणि आम्ही दोघांनीच नामांकित ट्रॅव्हल कंपनीं बरोबर केलेले अनेक प्रवास म्हणजे अनुभवांची, आनंदाची मनोरंजक भलीमोठी शिदोरीच म्हणावी लागेल.

अजंठा वेरूळच्या लेणी आणि तिथल्या पेंटिंग पासून ते पॅरिसच्या लुओरे (louvre)म्युझियम मधल्या कलाकृती पर्यंतचे सर्वच प्रवास अनोखे आणि आनंददायी होतेच पण तुमच्या कानात हळूच एक सांगते, ” प्रचंड तंगडतोड करत पॅरिसच्या जगद्विख्यात म्युझियम मधले जगभरात गाजलेले, खूप बंदोबस्तात ठेवलेले “मोनालिसाचे” पेंटिंग आम्ही पाहिले आणि मला अजंठाच्या दगडात कोरलेल्या पद्मपाणीच्या अलौकिक सुंदर लयबद्ध, भावपूर्ण आणि चिंतनयुक्त पेंटिंगची आठवण झाली आणि मी खरोखरच सहजपणे उद्गारले “कुठे ते आणि कुठे हे? ”

“मोनालीसा” पेंटिंग वरचे अनेक कलाकारांचे. ” ते का आणि कसे छान आहे” हे सांगणारे अनेक लेख मी वाचले आहेत त्यांचा सन्मान ठेवून मी माझे हे मत व्यक्त केले. बाकी म्युझियम मधल्या अनेक इतर कलाकृती बघतानाना मात्र खरोखरच आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.

अशाच प्रकारचे आणखीही अनेक अनुभव मला माझ्या परदेश सफारीत आले. अमेरिकेत कुठेही कॅस्केड (छोटा धबधबा) पाह्यला आलेले अनेक टुरिस्ट्स मी अशा पर्यटन स्थळी पाहिलेत. आम्हीही त्यात असायचो. भव्य, सुंदर, आखीव रेखीव आणि अत्यंत स्वच्छ, देखणा पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेला परिसर. खूप पायपीट करून कॅस्केड पर्यंत पोहोचल्यानंतर कुठल्यातरी डोंगरातून एखादी बारीकशी पाण्याची धार वाहत असताना पाहिली की मनात “फूस्स” व्हायचं. वाटायचं त्यापेक्षा पावसाळ्यात आमच्या लोणावळा खंडाळ्याला सह्याद्रीतून वाहणारे झरे-धबधबे पाहायला या की! पण परदेशात फिरताना सतत जाणवतं ते पर्यटनाचे राष्ट्रीय महत्त्व आणि त्यासाठी प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा (यात प्रामुख्याने स्वच्छतागृहे)आणि शिस्तबद्ध प्रवासीही. एकेका स्थळाचं जपलेलं सौंदर्य आणि महत्त्व मग तो *नायगारा* असो किंवा असाच एखादा छोटासा झरा- कॅसकेड! नैसर्गिक सौंदर्याची अपार जपणूक हा गुण तिथे विशेषत्त्वाने जाणवतो. आपल्याकडे स्थळांपेक्षा भेळपुरीचे कागद, खाल्लेले बुट्टे, रिकाम्या बाटल्या, असंख्य कागदांचा देखावा सभोवताली माजलेला पाहायला मिळतो. असो!

असाच आणखी एक मनाला छेदून जाणारा प्रसंग.

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातली ती सुरेख कोरीव कामशिल्पं पाहताना आम्ही सारेच अंतर्मुख झालो होतो. शिवपार्वतीच्या अनेक नृत्यांतून, पदन्यासातून, स्थिती आणि लयबद्ध आसनांतून साकार झालेली ती शृंगारिक लेणी आणि त्यातून झिरपणारं पावित्र्य, मांगल्याचं कामसूत्र न्याहाळताना मन अगदी हरखून गेलं होतं. डोळ्यात मावत नव्हतं असं ते सौंदर्य आणि ती कला किमया तृप्त मनाने नजरेत साठवून आम्ही पचमढीला जाण्यासाठी इटारसी स्टेशनवर आलो. गाडी यायला थोडा अवकाश होता. खजुराहो मंदिराला भेट दिल्यानंतर आता अनुभवत असलेला हा स्टेशनवरचा परिसर अत्यंत बकाल आणि दरिद्री होता आणि त्यातच कुठून तरी अचानक एक वेडगळ! बडबड करणारी, मातकट, केस पिंजरलेली पण संपूर्ण नग्न स्त्री भीक मागत स्टेशनवरच्या त्या गर्दीत केविलवाणी पण तरीही काहीशी बेफिकीर आणि बेशरमपणे फिरताना आम्ही पाहिली आणि मन इतकं कळवळलं! खरं म्हणजे एकच नग्नता! दगडात कोरलेली ती सुंदर, पवित्र भासणारी निर्जीव नग्नता आणि ही साक्षात समोर येऊन ठाकलेली बकाल, ओंगळ पण सजीव करूण, हतबल नग्नता. नाही विसरू शकत भ्रमंतीतले हे दृष्य कधीही.

आमची पहिली परदेश सफर म्हणजे १९९६ सालची लंडनची टूर. त्यावेळी ज्योतिका लंडनला होती. एमबीटी कंपनीतर्फे तिची तिथे नेमणूक झाली होती आणि तिथे ती शेअरिंग मध्ये एका सुंदर बंगल्यात राहत होती. मी विलास आणि मयुरा आम्ही ज्योतिकाला भेटण्याच्या निमित्ताने लंडनला गेलो होतो. दीड दोन महिने आम्ही लंडनला राहिलो आणि अर्थातच त्या संपूर्ण वास्तव्यात आम्ही लंडन ब्रिज फॉलींग, पासून ते आपल्या कोहिनूर हिऱ्यापर्यंत, तिथले हिरवेगार पार्क्स, तलावात पोहणारी मुक्त बदकं, तिथले कॅसल्स, मादाम तुसाड(जिथे अनेक जगप्रसिद्ध लोकांचे मेणाचे पुतळेआहेत) तिथल्या बिन गर्दीच्या आरामशीर लोकल ट्रेन्स, गुलाबी थंडी, भुरभुरणारा पाऊस, धुकं आणि मुख्य म्हणजे शिस्त आणि स्वच्छता अगदी भरपूर अनुभवली. अगदी भारावून जाऊन अनुभवली पण याही सहलीतला एक क्षण मात्र माझ्या मनात अजूनही ताजा आहे. वेगळ्या कारणाकरिता.

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवलं आणि मनात आलं आज आपण राणीच्या देशात आलोय. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्या ब्रिटिशांच्या भूमीत आज आपण आहोत. अतिशय विलक्षण क्षण होता तो! संमिश्र भावनांचा. आम्ही आमचं इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगेजसह बाहेर आलो आणि ज्योतिकाने दूरूनच धावत येऊन विमानतळावर आम्हाला इतकी घट्ट मिठी मारली की आम्हा सर्वांचे डोळे त्यावेळी ‘वियोगानंतरची भेट” म्हणून पाणावलेले पाहून एक ब्रिटिश सहप्रवासी आमच्या शेजारीच हातातल्या बॅगा खाली ठेवून क्षणभर स्तब्ध उभा राहिला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाला “व्हॉट अ ब्यूटीफुल फॅमिली यु आर! ”

सर्वसाधारणपणे ही ब्रिटिश माणसं खूप शिष्ट असतात. उगीच कुणाशी बोलतही नाहीत या पार्श्वभूमीवर मात्र जाणवलं की, “जगात तुम्ही कुठेही जा माणूस हा मूलभूत कुटुंबवत्सल असतो” आणि हे मी माझ्या अनेक देश विदेशी केलेल्या सफरीत नेहमीच अनुभवत आले आहे.

मी किती फिरले, किती देश पाहिले आणि त्या त्या ठिकाणच्या सुंदर पर्यटन स्थळांबद्दलची वर्णने येथे करत बसण्यात मला अजिबात रस नाही(आजकाल विविध टूर कंपन्यांमुळे अथवा इतर कारणांमुळे बहुसंख्य लोक प्रवास करत असतात) पण विविध देश, विविध ठिकाणं पाहताना तिथली सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, वैचारिक, कला गुणसंपन्न जीवनपद्धती अनुभवताना मला अगदी सातत्याने एकच जाणवत राहतं की विविध पेहरावांच्या, विविध चेहऱ्यांच्या आतला माणूस मात्र अगदी एकच आहे. काळ्या गोऱ्या मागे अदृश्यपणे वाहत असलेल्या भावनिक झऱ्यांमध्ये मात्र कमालीचे साम्य आहे, एकच ”ग्लोबल सेन्सिटीव्हीटी” जागतिक संवेदनशीलता.

म्हणूनच आपल्या बहिणाबाईने माणसाला मारलेली ती आर्त हाक पृथ्वीच्या कणाकणात सामावलेली आहे असेच वाटते.

– क्रमशः भाग ७३.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग -२ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग – २ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भारत माता : एक राष्ट्रीय दैवत संकल्पना, उगम आणि विकास 

(— या चित्रणामुळे स्वातंत्र्यसैनिकांमध्ये एक प्रकारची धार्मिक जिद्द निर्माण झाली. देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणे हे केवळ राजकीय कर्तव्य नसून ते एक धार्मिक पवित्र कार्य आहे, अशी भावना जनमानसात रुजली.) 

इथून पुढे – – 

अबनिंद्रनाथ टागोर

भारत मातेचे दृश्य स्वरूप साहित्य आणि भाषणांमधून निर्माण झालेली भारत मातेची प्रतिमा प्रत्यक्षात चित्राच्या रूपात मांडण्याचे काम १९०५ मध्ये अबनिंद्रनाथ टागोर यांनी केले. बंगालच्या फाळणीविरुद्ध सुरू असलेल्या स्वदेशी चळवळीच्या काळात त्यांनी हे चित्र रेखाटले.

चित्रातील प्रतिकात्मकता – – 

अबनिंद्रनाथांनी रेखाटलेली भारत माता ही एक चतुर्भुज तपस्विनी आहे, जिने भगवी वस्त्रे परिधान केली आहेत. तिच्या चार हातांमध्ये चार महत्त्वाच्या वस्तू आहेत, ज्या भारताच्या संस्कृतीचे आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात:

 * वेद (हस्तलिखित): हे शिक्षणाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

 * तांदळाची लोंबी (धान्य): ही देशाच्या अन्नाचे आणि सुजलाम-सुफलाम भूमीचे प्रतीक आहे.

 * जपमाळ: ही भारताच्या आध्यात्मिक वारशाचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे.

 * पांढरे वस्त्र: हे देशातील कापूस उत्पादन आणि आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक आहे.

– – भगिनी निवेदिता यांनी या चित्राचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या मते, हे चित्र राष्ट्रवादाला मानवी रूप देण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न होता. भारत माता ही केवळ जमिनीचा तुकडा नसून ती आपल्या मुलांना ‘शिक्षा, दीक्षा, अन्न आणि वस्त्र’ देणारी एक साक्षात देवता आहे, हे या चित्रातून स्पष्ट झाले.

भारत मातेची मंदिरे : राष्ट्रभक्तीचे तीर्थस्थान

भारत मातेची संकल्पना केवळ चित्रात किंवा साहित्यात मर्यादित राहिली नाही, तर तिला प्रत्यक्ष मंदिरांचे स्वरूप देऊन एक सार्वजनिक धार्मिक श्रद्धास्थान बनवण्यात आले.

वाराणसीचे भारत माता मंदिर (१९३६)

भारतातील पहिले ‘भारत माता मंदिर’ वाराणसी येथे महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आले. शिवप्रसाद गुप्ता यांनी हे मंदिर बांधले आणि १९३६ मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही देवाची मूर्ती नसून जमिनीवर संगमरवरात कोरलेला भारताचा अखंड नकाशा आहे.

– – गांधीजींनी उद्घाटनावेळी म्हटले की, “हे मंदिर सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांसाठी एका वैश्विक व्यासपीठाप्रमाणे काम करेल आणि देशात धार्मिक एकता, शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी मदत करेल”. या मंदिरात मैथिलीशरण गुप्त यांची कविता भिंतीवर कोरलेली आहे, जी सर्व भारतीयांना एकतेचा संदेश देते.

हरिद्वारचे भारत माता मंदिर (१९८३)

स्वामी सत्यमित्रानंद यांनी हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी ८ मजली भारत माता मंदिर उभारले. १९८३ मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या मंदिराचा प्रत्येक मजला वेगळ्या विषयाला समर्पित आहे:

 * पहिला मजला: भारत मातेची भव्य मूर्ती.

 * दुसरा मजला (शूर मंदिर): झाशीची राणी, भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा.

 * तिसरा मजला (मातृ मंदिर): अहिल्याबाई होळकर, मीराबाई यांसारख्या महान महिलांच्या प्रतिमा.

 * चौथा मजला (संत मंदिर): भारताच्या महान संतांच्या प्रतिमा.

– – | भारत माता मंदिर | वाराणसी | १९३६ | महात्मा गांधी (उद्घाटक) | संगमरवरी नकाशा, मूर्ती नाही. |

– – | भारत माता मंदिर | हरिद्वार | १९८३ | इंदिरा गांधी (उद्घाटक) | ८ मजली भव्य इमारत, संतांचे आणि शूरवीरांचे दर्शन. |

– – | जातीय शक्तिपीठ | कोलकाता | २०१५ | केशरी नाथ त्रिपाठी | जगत्तारिणी दुर्गेच्या रूपात भारत मातेची पूजा. |

भगिनी निवेदिता आणि राष्ट्रप्रेमाचा मंत्र

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी भारत मातेच्या संकल्पनेला प्रचंड गती दिली. त्या स्वतः जपमाळेवर ‘भारतवर्ष’ या मंत्राचा जप करत असत. त्यांच्या मते, भारतीयांनी दररोज संध्याकाळी ‘आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला कोणीही विभागू शकत नाही’ असा विचार करणे हीच खरी देशपूजा आहे. निवेदिता यांनी अबनिंद्रनाथ टागोरांच्या भारत मातेच्या चित्राचा प्रसार केला आणि भारतीयांच्या मनात आपल्या देशाबद्दल एक प्रकारची ‘भक्ती’ निर्माण केली. “देशासाठी जगणे आणि स्वतःला भारत मातेच्या चरणी अर्पण करणे” हाच त्यांच्या जीवनाचा संदेश होता.

भारत माता की जय : वाद आणि संवाद

‘भारत माता की जय’ ही घोषणा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि आजही अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, अलीकडच्या काळात यावरून काही राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाले आहेत. काही समुदायांचे म्हणणे आहे की, त्यांच्या धर्मात ईश्वराव्यतिरिक्त इतर कोणत्याही मानवी रूपाची किंवा प्रतिमेची पूजा करण्यास मनाई आहे.

तथापि, अनेक विचारवंतांच्या मते ‘भारत माता’ हे केवळ धार्मिक प्रतीक नसून ते एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या जन्मदात्री मातेला मान देतो, त्याचप्रमाणे ज्या भूमीवर आपण लहानाचे मोठे झालो, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ‘भारत माता की जय’ म्हणणे होय. भारतीय सैन्यात देखील या घोषणेचा वापर शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून केला जातो.

विनायक दामोदर सावरकर आणि भारत माता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील भारत मातेच्या संकल्पनेला अत्यंत प्रखर राष्ट्रवादाची जोड दिली. सावरकरांच्या मते, ही भूमी केवळ आपली पितृभूमी (वडिलोपार्जित जमीन) नसून ती आपली पुण्यभूमी (पवित्र जमीन) देखील आहे. त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून आणि भाषणांमधून भारत मातेला दैवताचे स्थान देऊन तिच्या मुक्तीसाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन तरुणांना केले. सावरकरांच्या राष्ट्रवादात भारत माता ही एक जिंतंत, चैतन्यमयी शक्ती होती, जिच्या संरक्षणासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्गही समर्थनीय होता.

एक शाश्वत प्रेरणा – – 

“भारत माता हेच दैवत” असे पहिल्यांदा किरण चंद्र बॅनर्जी यांनी आपल्या नाटकाद्वारे मांडले असले, तरी या विचाराला जनचळवळीचे आणि आध्यात्मिक क्रांतीचे रूप स्वामी विवेकानंदांनी दिले. १८७३ पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तितकाच जिवंत आहे. भारत माता ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नसून, ती कोट्यवधी भारतीयांच्या अस्मितेचे, श्रद्धेचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

– – विवेकानंदांनी सांगितलेली ती ‘पन्नास वर्षे’ संपून आता काळ पुढे निघून गेला असला, तरी आजही भारतापुढील आव्हाने पाहता त्यांच्या विचारांची गरज संपलेली नाही. “स्वदेशासाठी सेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा मंत्र जोपर्यंत भारतीयांच्या मनात जिवंत आहे, तोपर्यंत भारत माता हे दैवत भारतीयांना प्रगतीच्या आणि एकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करत राहील.

 समाप्त –

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन धजावत नव्हतं…

ऑक्सिजन ८२… ८०…  मॉनिटरचा तो लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज!

NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजांची सवय असते, पण कालची रात्र वेगळी होती.

 

२२ दिवसांचं बाळ. फुफ्फुसात संसर्ग (Sepsis). श्वासासाठी आम्ही त्याला बबल CPAP (कृत्रिम श्वास) मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक्स, सलाईन, नेब्युलायझर… सगळं सुरू होतं… पण बाळ मशीनला रिस्पॉन्सदेत नव्हतं. ते चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. ते जेवढं रडायचं, तेवढं ऑक्सिजन लेव्हल खाली पडायचं.

 

माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं,

बाळ खूप रेस्टलेसआहे. सिडेटिव्ह (झोपेचं इंजेक्शन) द्यायचं का? “

इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. अशा औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न (Respiratory Drive) मंदावण्याची भीती होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं, त्यात जर श्वास आणखी मंदावला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

 

ती रिस्क घ्यायला माझं मन धजावत नव्हतं.

मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती. डोळे सुजलेले, जीव कासावीस.

मी टीमला म्हणालो, “इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. “

तिला आम्ही पूर्ण गाउन-मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हाताने त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा, सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला…

बाळा… “

– – पुढच्या ३० सेकंदात जे झालं, ते बघून आम्ही डॉक्टर्स असूनही अवाक झालो.

 

जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईचा स्पर्श होताच एकदम शांत झालं.

त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली.

श्वास लयीत आला.

– – आणि मॉनिटर?

जे ऑक्सिजन ८० वर अडकलं होतं, ते बघता बघता ८८… ९२… ९५… ९८% वर गेलं!

हे कुठलंही मॅजिकनव्हतं. हे सायन्स होतं.

.. आईच्या स्पर्शाने बाळाच्या शरीरात ऑक्सिटोसिन‘ (Love Hormone) तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन-किलर आणि स्ट्रेस-बस्टर आहे.

– – जेव्हा बाळ रिलॅक्स होतं, तेव्हा आमची औषधं सुद्धा १००% काम करतात.

 

बाळ आता धोक्याबाहेर आहे.

जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो,

ताई, आभार आमचे नका मानू. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला बरंतुमच्या स्पर्शाने केलंय. “

– – कधीकधी स्टेथस्कोप ला जिंकायला ‘आईच्या स्पर्शाची’ही साथ लागते.

* * * *

लेखक : डॉ. सुजित भरत पाटील

बालरोगतज्ज्ञ, पुणे

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क्ष…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क्ष…” – भाग – ३ ☆ श्री कौस्तुभ परांजपे

क्ष…  481

अक्षर ओळख करतांना अगदी क्ष किरणासारखा शिरलेला हा क्ष तंबूत शिरलेल्या उंटासारखा ठाण मांडून बसला आहे. अनेक शब्दात तो येतो.

सुरुवातीला सुटे, दशक…… लक्ष, दशलक्ष यापासून अंकात आला, मग क्ष ची किंमत काढा अस म्हणत गणितात शिरला. लक्ष देण्यावरून मनात बिंबला. पुढे पुढे तर भाषा बदलत एक्स आणि वाय अक्ष असा क्ष आणि य करत आलेखाच्या कागदावर पण अवतरला. आणि इथेच आमचा वाढत जाईल अस वाटणारा आलेख क्ष आणि य या दोन्ही अक्षावर क्षय ग्रस्त झाला. य अक्षावर तो वाढला नाही. क्ष अक्षावर तो पसरलाच नाही.

गणितात या क्ष ची किंमत शोधावी लागली. तर मित्रांमधे बरीचशी गुपितं सांगणारी व्यक्ती ही क्ष च असायची. क्ष व्यक्तीने सांगितल असं म्हणत त्या व्यक्तीच नांव गुप्त ठेवलं जायचं.

क्षमा या शब्दात तो नम्रता आणि मोठेपणा घेऊन आला, तर क्षोभ या शब्दात जहालपणा शिकवून गेला. क्षय या शब्दात अस्ताकडे जाणारा वाटला, तर क्षीण मधे तो कमजोर झाला. क्षेमकुशल विचारतांना प्रेमासोबत भावनांसह वावरला. तर क्षमता सिध्द करतांना सगळ्या गोष्टींवर मात करण्याची हिंमत देणारा ठरला.

तो साक्षरात आहे, निरक्षरातही आहे. क्षणात आहे, लक्षणात आहे. विलक्षणातही आहे. लक्ष आणी लक्ष्य यात आहे, पण सगळीकडे अर्थ वेगळा आहे. तो एकटा आला तसाच जोडाक्षरात पण आला. तीक्ष्ण मधला टोकदार वाटला, सुक्ष्म मधला शोधावा लागला.

तो पक्षात जाणवला, भक्षात गिळंकृत करून गेला. कधी कधी तो लक्षात आला नाही. आणि भक्तीत साक्षात दिसलाच नाही. संस्कृत मधे क्षीर या पदार्थाच्या नावाने आला, तर पदार्थ विज्ञानात क्षार नावाने मिसळला. क्षेत्रीय आणि क्षत्रिय यातही आला. वृक्षात सावली धरली, रुक्षात निरस वाटला, क्षितीजात विस्तीर्ण जाणवला.

अशा पध्दतीने क्ष हा अक्षर ओळखीपासून ओळखापाहू या वेगवेगळ्या सदरात वेगवेगळ्या पध्दतीने येतच राहिला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कराचीची ट्रंक!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ ती कराचीची ट्रंक!!! डॉ. माधुरी जोशी 

पेपरमधे रावळपिंडीला आपलं घर पहायला जाणाऱ्या आजींची बातमी वाचली. १५ वर्षाच्या असतांना फाळणीत त्या भारतात आल्या. आता ७५ वर्षं झाली…. नव्वदीच्या झाल्या त्या…. पण ते जुनं घर, मित्रमैत्रिणी, गल्ल्या, रस्ते, घरं, कॉलेज सगळं पहावसं वाटलं परत….. आणि परवानगी घेऊन त्या गेल्या गतकाळातल्या स्म्रुती जागवायला……

.. क्षणात मला ४७ च्या फाळणीत नेसत्या वस्त्रानिशी, जीव मुठीत धरून, कसेबसे हिंदुस्थानात पोहोचलेले माझे सासूसासरे आठवले. तेंव्हा त्यांच्या डोळ्यापुढे सगळा अंधार…. कुठे जायचं? कुठे रहायचं? हातात कामंच नसेल तर कसं जगायचं? खरंच… केवढी भयाण पोकळी ही…. अनपेक्षित…. भयप्रद… जरी नातेवाईक असले तरी काही काळासाठी… कायम कसं चालेल भार टाकून!! आणि हिंदुस्थानात पण ऑलवेल नव्हतंच ना.. सगळं अस्वस्थ, कासावीस, अस्थिर, उधळलेलं….. स्थिरं व्हायला काळ लागणारंच होता.

एकीकडे बोटीनं काही सामान आलं. होतं. ज्यात काही भांडीकुंडी, एक लोखंडी ट्रंक असं काहीबाही होतं. एक सुखवस्तू जीवन, शिक्षकी पेशाच्या उत्तम नोकऱ्या, रहायला बऱ्यापैकी घर, घरात सोयीचं सारं सामान, आसपास ओळखीची घरं….. अशा सगळ्या कराचीतल्या सम्रुद्ध वातावरणातून आता जिवंत तरी पोहोचू की नाही आणि पोहोचलो तरी जगायचं कसं असे भयाण प्रश्न अचानक आ वासून उभे राहिले. जरी नातेवाईक असले तरी किती काळ? आपलं आपण उभं रहायलाच हवं…. पण कसं? कधी? कुठे??? सारी प्रश्नचिन्हंच प्रश्नचिन्हं….

सासुबाई मूळच्या धारवाडच्या. त्या काळातल्या ग्रँज्युएट.. संस्क्रुत वर प्रभुत्व असणाऱ्या…. ते घरंच सुशिक्षितांचं…. घरात वकील, डॉक्टर्स असे वडीलधारे… स्वतःचं मोठसं घर…. घरात राहणारी चुलत, मामे, मावस, आते भावंडं….. घराघरात अशी प्रथाच होती एकत्र जगण्याची…. एक सुशिक्षित, सुखरूप, सुखवस्तू, सम्रुद्ध जगणं होतं त्यांचं….

धारवाड फुलांचं, रसरशीत मातीचं, सुंदर हवामानाचं शांत गाव असं म्हणत त्या….. घरापासून कॉलेजपर्यंत जातांना येणारा मोगरीचा गंध, तिची टपोऱ्या मोत्यांसारखी फुलं, अबोलीनं बहरलेली सदैव टवटवीत शेंदरट अबोली घोसांची अगणित झुडपं, लाल पाठीच्या कुंदाच्या चांदण वेली, शेवंतीवर डोलणारे गुच्छांचे ताटवे…. लाल मातीवर केशरी, पिवळी, पांढरी, पखरण आणि सुगंध पण जपणारी रंगपंचमी…. आणि शांत, चढ उताऱ्याच्या रस्त्यांवरून बहिणी, मैत्रिणींबरोबर रोजचं चालंत जाणंयेणं….. असं सुंदर धारवाड…. त्यांना पाकिस्तानात कराचीला शिक्षकाची नोकरी करणाऱ्या सासऱ्यांचं स्थळ आलं. ते गणिताचे स्कॉलर, विद्यार्थी प्रिय शिक्षक, दिसायला चांगले… नीटस… कसल्या जबाबदाऱ्या नसणारे… तरी पण घालमेल झालीच.. ।एकदम पाकिस्तान? काय करायचं? पण तो बंध नियतीनंच बांधलेला होता… लग्न झालं आणि त्या कराचीला म्हणजे चक्क फॉरेनलाच गेल्या की….. शिक्षणामुळे त्यांनाही नोकरी मिळाली आणि एक छान, सुखाचा, सुरक्षित संसार सुरू झाला.

कराची पण भावलं त्यांना. सम्रुद्ध, संपन्न कराची…. शांत, समजूतदार शहर…. त्या सांगत आपल्याकडे भाजीची गाडी येते तशी ड्रायफ्रूट येत ढिगानी विकायला…. शेंगदाण्यासारखे पिस्ते बदाम आक्रोड खायचो आम्ही…. सुंदर ताज्या भाज्या… रसरशीत सगळं….. माणसं जिवाला जीव देणारी…. शिक्षक म्हणून जरा जास्त मान…. संध्याकाळी शाळेतून आल्यावर जरा फेरफटका मारून यावं तर वाटेवर दमदमीत सुगंधाच्या जुई मोगरीच्या लदलेल्या गाड्या… साऱ्या गल्लीत दरवळ… ।….

असं छान चाललेलं असतांना अचानक वादळ उठलं सुसाट… भयाण विचारांचे वारे.. ।।आपण सुरक्षित नाही अशा चर्चा.. त्या भितीदायक भावनेन ंशाश्वतीच उरली नाही आनंदानं जगण्याची… ।नव्हे!! जगण्याचीच… मग घाबरलेले सगळे भारतीय एकत्र आले… लपूनछपून कुठे कुठे आश्रय घेतले आणि एक दिवस त्या ट्रेननी ना जाणो कोणकोण, कुठून, कसे, कुणाच्या मदतीनं हिंदुस्थानात परत  आले. इथलं जगणंही नव्या लढाईचं होतं. एक मात्र सबळ, भक्कम गोष्ट होती ती म्हणजे दोघांच्या हातातलं शिक्षण… शिक्षकी नोकरीचा अनुभव… कासव गतीनं का होईना हळुहळू गणितं सुटली आणि एका अपमानित, अस्थिर, भयाण वातावरणाला पूर्णविराम मिळाला.

पुण्यात सुरवातीला त्यांच्याकडे ती ट्रंक होती. त्यात त्या वाण्याकडून आणलेल्या सामानाच्या पुड्या ठेवत. तेच कपाट आणि तेवढीच ग्रोसरी…. लागेल तेवढीच आणायची… जपून, पुरवून वापरायची…. ती ट्रंक नव्या संसाराच्या सुरवातीचा आधार… हळुहळूहळू स्थिरावत गेलं. सरकारी नोकऱ्या मिळाल्या. कधी एकत्र कधी वेगळ्या बदल्या झाल्या. महाराष्ट्रभर…. पण आता लढाई जरा वेगळ्या अर्थी सोपी होती…. जगणं आर्थिक, मानसिक सुरक्षित झालं. अक्षरशः शून्यातून त्यांनी पुन्हा संसार उभा केला.

या सगळ्या प्रवासात ही ती ट्रंक, जी सोबत होती. साक्षीदार होती. साधारण सव्वा फूट उंची, रुंदी, खोलीची चौकोनी, लोखंडी, काळी, भक्कम कडीकोयंड्याची… दोन्हीकडे धरायला कड्या आणि चांगलं दीड दोन इंचाचं उंच झाकण असलेली ती ट्रंक मग माझ्या घरात आली. त्यावर ऑईलपेंटनं नाव लिहीलं होतं S. M. Joshi Karachi असं….. मग आमच्या घरातले हातोडी, पाने, स्क्रू ड्रायव्हर, पकड, वायर्स, पिना असं नेहमी न लागणारं पण कामाचं सामान त्यात राहिलं. मग नको असलेली वाट्या भांडी किसणी स्टीलची गाळणी…. मग असंच काहीबाही…. शेवटी काही न ठेवता ट्रंक अडगळीत माळ्यावर गेली. जणू विस्मरणात गेली. जुनी झाली, , गंजली…

अलीकडे रंगकाम आवश्यक झालं माळ्याला ओल आल्यानं… सगळ्या सामानाबरोबर ट्रंक खाली आली. एकदम वाटलं काय करावं हिचं!! १९४७ ते २०२२!! बापरे!! अम्रुत महोत्सव की हिचा. ७५ वर्षांची झाली ही… जरा जास्त गंज धरला होता… झाकण जरा वाकडं झालं होतं… पण बरीचशी होती तशीच होती. भंगारात देण्याचा प्रश्नंच नव्हता. कराचीपासून या क्षणापर्यंत तिनं सोबत केली. केवढा काळ, केवढी स्थि्त्यंतरं, सभोवती कायकाय बदलतांना पाहिलं हिनं…. त्या ट्रेन प्रवासात ती पण भेदरली असेल मालकासारखी? पण तिनं साथ सोडली नाही हे मात्र नक्कीच…..

एकदम मनात आलं हिला चांगली घासूनपुसून लख्खं करावी. सुंदरसा मेटल स्प्रे कलर करावा आणि नव्या रुपात, ऐटीत, समाधानानं, क्रुतज्ञतेनं माळ्यावर नाही तर अगदी बैठकीत सन्मानानं ठेवावं हिला. तिचा गौरव करावा. मग शोध घेतला. पर्याय सापडला आणि ती गंजलेली, S. M. Joshi Karachi नावाची पेटी गेली पुढच्या रुपांतराला…. १०/१२ दिवस झाले. आणि नीतळ, झुळझुळीत, सिल्व्हर कलरची ट्रंक घरी आली. मुलांना या उद्योगातलं काहीच माहिती नव्हतं… पण त्या काळ्या ट्रंकेचा हा सुखद कायापालट भावला सगळ्यांना…. त्यांच्या आजीआजोबांची ती आठवण अधिक सुंदर होऊन अगदी हॉलमधे विराजमान झाली आहे. जणू आम्ही तिचे ऋण मानले. ७५ वर्षांपूर्वी कराचीच्या तिच्या अस्तित्वानंतर आज तिला नवजीवन मिळालं.

आता माझ्या शोभेच्या नाजुक वस्तू, फुलांचे हार, तोरणं, नाजुक पणत्या, यांना छान जागा मिळाल्येय त्या ७५ वर्षांच्या बुजुर्ग ट्रंकेच्या कुशीत!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares