☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११७ आणि ११८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ११७ – – –
धुरु लेकरू बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ।
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११७।।
अर्थ :ध्रुव बाळ बिचारा दीनवाणा बालक होता. त्याने भगवंताजवळ कृपेची याचना केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवंताने त्याला दर्शन दिले. आपल्या प्रेमभक्तीने त्याचे जीवन परिपूर्ण करून भगवंताने त्याला तारकामंडळात अढळ स्थान दिले. भगवंत आपल्या भक्तांचा अभिमानी असून तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
विवेचन : देव आपल्या भक्ताचा कैवारी कसा आहे ते समर्थ या श्लोकातही आपल्याला सांगतात. ध्रुव बाळाची गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनी बहुतेक ऐकलेली असते. परंतु परमेश्वराची कृपा काय असते ते समर्थ या श्लोकातून सांगतात. ध्रुव हा उत्तानपाद राजाचा मुलगा. या उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. सुनिती ही मोठी राणी होती आणि धाकटी होती सुरुचि. सुरुचि ही राजाची लाडकी आणि त्यामुळेच गर्विष्ठ झालेली होती. सुनीति मात्र अत्यंत समजूतदार आणि गुणी होती. तिचाच मुलगा ध्रुव. सुरुचि ही सुनीतिचा आणि तिच्या मुलाचा अतिशय द्वेष करीत असे. राजा तर पूर्णपणे सुरुचिच्याच कह्यात गेला होता. एक दिवस खेळता खेळता छोटा ध्रुव राजाच्या म्हणजे आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. सुरुचिला ते अजिबात आवडले नाही. तिने राजाच्या मांडीवरून ओढून त्याला हाकलले आणि ओरडून म्हणाली, ” जा चालता हो. पुन्हा इथे यायचे नाही. राजाची मांडी किंवा राज्याचे सिंहासन यावर बसण्याची तुझी पात्रता नाही.” ध्रुव बिचारा रडत आपल्या आईकडे गेला. त्याने आईला ही घटना सांगितली. आईला खूप वाईट वाटले पण ती काही करू शकत नव्हती. तिने त्याची समजूत घातली. ती म्हणाली, ” बाळा, मागील जन्मी काहीतरी पातक आपल्या हातून घडले असेल. त्यामुळे आज असे दिवस आपल्याला पाहावे लागत आहेत. पण एक लक्षात ठेव. राजाची मांडी किंवा सिंहासन या तात्पुरत्या गोष्टी आहेत. तू परमेश्वराची आराधना कर. तो सर्वांचे पालन करणारा आहे. तो प्रसन्न झाला म्हणजे तुला कोणी कुठूनही हाकलू शकणार नाही. “
आपल्या आईचे हे उद्गार ऐकून ध्रुव बाळाने परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा निश्चय केला. तो लहान असला तरी दृढनिश्चयी होता. त्याने जंगलाचा रस्ता धरला. वाटेत त्याची आणि नारदमुनींची भेट झाली. नारदांनी त्याची हकीगत जाणून घेतली. त्याला मंत्र देऊन भगवद्भक्तीचा मार्ग सांगितला. ध्रुवाने तहान -भूक कशाचीच पर्वा न करता कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले.
ध्रुव भगवंताच्या नामस्मरणात एवढा मग्न होता की प्रत्यक्ष देव त्याच्यासमोर उभा राहिला तरी त्याला त्याचे भान नव्हते. शेवटी भगवंताने त्याला म्हटले, ” बाळ, डोळे उघड. मी प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे.”
देवाचे मनोहर रूप पाहताच ध्रुव आपल्याला काय मागायचे आहे हे विसरला. भगवंताने आपल्या दिव्य शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला करताच त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो भगवंताची स्तुती करू लागला. भगवान विष्णूंनी त्याला त्याचे राज्य तर दिलेच परंतु आकाशातील तारकासमूहात त्याला असे अढळ स्थान प्राप्त करून दिले की जिथून त्याला कोणीही उठ म्हणू शकणार नाही. आपण आकाशात पाहतो तोच तेजस्वी ध्रुवतारा म्हणजे बाळ ध्रुव. तो परमेश्वरकृपेने चिरंजीव झाला.
परमेश्वर आपल्या भक्तांना न मागता सर्व काही देतो हे आपल्याला मागील श्लोकातील उपमन्यू किंवा या श्लोकातील ध्रुव बाळाच्या उदाहरणावरून समजते. तो आपल्या भक्तांचा कैवारी आहे. त्यांची तो उपेक्षा करीत नाही. उपमन्यू किंवा ध्रुव बाळाची कथा या प्रतीकात्मक आहेत असे आपण मानले तरी परमेश्वराची कृपा काय असते हे या उदाहरणांवरून आपल्याला दिसते. राजाची मांडी किंवा सिंहासन या प्रतीकात्मक गोष्टी आहेत. त्या ऐहिक सुखाचे प्रतिनिधित्व करतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. म्हणून आपण भक्तिमार्गाचा अवलंब केला पाहिजे असे समर्थ यातून सूचित करतात.
स्वसंवाद
१. ध्रुव बाळाप्रमाणे माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी माझा अपमान करतं, तेव्हा मी सूडबुद्धीने रागावत बसतो, की त्या दुःखाचे रूपांतर एखाद्या उच्च ध्येयाच्या (किंवा ईश्वराच्या) आराधनेत करतो?
२. “राजाची मांडी किंवा सत्ता ही तात्पुरती आहे, ” या सुनीतीच्या उपदेशाप्रमाणे, मला हे समजले आहे का की संसारातील भौतिक पदे क्षणभंगुर असून केवळ सत्कर्म आणि भक्तीच अढळ असते?
३. ध्रुव बाळासारखा दृढनिश्चय माझ्या अंगी आहे का? एखादे चांगले काम किंवा साधना हाती घेतल्यावर तहान-भूक विसरून मी त्यात पूर्णपणे मग्न होतो का?
४. जेव्हा मला ईश्वराची कृपा किंवा आयुष्यात मोठे यश प्राप्त होते, तेव्हा मी भौतिक गोष्टींची हाव न धरता केवळ कृतज्ञतेने ‘स्तुती’ (समाधान) करायला शिकलो आहे का?
=====
श्लोक क्र. ११८ – – –
गजेंद्र महा संकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धावताहे ।
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११८।।
अर्थ :गजेंद्रावर जिवावरचे संकट आले. त्याने भगवंताचा धावा केला आणि तो त्याची वाट पाहू लागला. त्याच्या सुटकेसाठी भगवंत धावून आले. (त्या संकट समयी) उडी घालून भगवंताने आपल्या भक्ताचे प्राण वाचवले. आपल्या भक्ताचा अभिमानी असलेला भगवंत त्याची कधी उपेक्षा करीत नाही.
(वास पाहे – वाट पाहत होता, जीवदानी – जीवदान देणारा)
विवेचन : आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत कसा धावून येतो हे समर्थ आपल्याला विविध उदाहरणांद्वारे पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकात आपण अंबरीष राजा, उपमन्यू आणि ध्रुव बाळाचे उदाहरण पाहिले. या श्लोकात समर्थ आपल्याला गजेंद्राचे उदाहरण देत आहेत. हा श्लोक समजून घेण्यासाठी आपल्याला ही पौराणिक कथा जाणून घ्यावी लागेल. भागवत आणि पद्मपुराणात या कथेचा उल्लेख येतो. फार पूर्वी पांड्य देशात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. एकदा त्याची भेट घेण्यासाठी त्याच्याकडे अगस्ती ऋषी आले. त्यावेळी राजा पूजेत मग्न होता. आपल्या स्वागतासाठी राजा आला नाही म्हणून अगस्ती ऋषी रागावले. ते म्हणाले, ” हे राजा तू उन्मत्त झाला आहेस. ऋषींचे आदरातिथ्य करण्याचे तुला भान नाही. तेव्हा तू माझ्या शापामुळे एक मदोन्मत्त हत्ती म्हणून जन्माला येशील.” राजाने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी त्याला उ:शाप दिला की हत्ती असताना जेव्हा तू प्राणांतिक संकटात सापडशील आणि भगवंताचा धावा करशील, तेव्हा भगवंत स्वतः येऊन तुझा उद्धार करतील. ऋषींच्या शापानुसार हत्ती झालेला हा राजा नंतर गजेंद्र म्हणून ओळखला गेला. तो एका हत्तींच्या कळपाचा नायक झाला.
एके दिवशी आपल्या समूहासह तो एका तळ्यात जलक्रीडा करीत असताना एका मगराने त्याचा पाय पकडला. त्याने सुटकेसाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च करूनही मगराच्या तावडीतून तो स्वतःला सोडवू शकला नाही. त्याच्या कळपानेही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता आपल्यापुढे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही असे लक्षात आल्याने त्याने भगवंताचा आर्ततेने धावा केला. तशाही जखमी अवस्थेत आपल्या सोंडेने तळ्यातील एक कमळ उपटून आकाशाच्या दिशेने फेकले. त्याचा आर्त धावा ऐकून भगवंत धावून आले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला.
या कथेतील जो मगर आहे, तो देखील आधीच्या जन्मात गंधर्व होता. परंतु देवल ऋषींच्या शापामुळे त्याला मगराचा जन्म प्राप्त झाला. या प्रसंगी भगवंताच्या हातून मृत्यू आल्याने मगराचा देखील उद्धार झाला आणि तो पुन्हा गंधर्व लोकात परत गेला. इंद्रद्युम्न राजा वैकुंठात भगवंताचा सेवक झाला.
थोडक्यात सांगायचे तर “माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते. संकटसमयी सर्व अहंकार सोडून मनोभावे आणि अनन्यभावाने ईश्वराचा धावा केल्यास तो भक्ताच्या रक्षणासाठी नक्कीच धावून येतो.” हाच या कथेचा मुख्य संदेश आहे.
स्वसंवाद
१. माझ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या बळाचा, पैशाचा किंवा ओळखीचा अहंकार बाळगून लढत राहतो, की माझ्या मर्यादा ओळखून ईश्वराला शरण जातो?
२. गजेंद्राने प्राणांतिक संकटातही जसे मनोभावे तळ्यातील कमळ भगवंताला अर्पण केले, तसा निस्सीम आणि शुद्ध भाव माझ्या प्रार्थनेत कधी असतो का?
३. “माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते” या सत्यावर माझा खरोखरच अढळ विश्वास आहे का?
४. संकटाच्या वेळी मदतीला न येऊ शकणाऱ्या जगावर विसंबून राहण्यापेक्षा, जो ‘भक्ताभिमानी’ माझी कधीच उपेक्षा करणार नाही त्या ईश्वराचा मी खऱ्या मनाने धावा करतो का?