मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८१ ☆ आराधना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८१ ?

☆ आराधना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(२६ ऑगस्ट २०२५  – हरतालिका)

माझ्या घरासमोरचं एक,

भग्न शिवालय नेहमीच

आठवत राहतं….

शिवशंकर हेच आराध्य दैवत ,

केलं तिनदा “सोळा सोमवार व्रत”—

हरतालिका ही पूजल्या,

मनोभावे!

 

किती भाबडे होते ते दिवस,

क्षुल्लक कारणांसाठी,

केले जायचे नवस !

 

जगरहाटीच्या, अनुभवाच्या भट्टीत,

तावून सुलाखून,

निघाल्यानंतर—

आली आहे सोन्यासारखी,

स्थितप्रज्ञता!

 आजही शंकरच आहे,

आराध्य देव,

पटकन हाकेला ओ देणारा–

कर्पूरगौर, भस्म फासणारा,

अवघ्या आयुष्याची कुरवंडी करुन,

वाहिली त्यालाच!

 आता मनात एकच भावना,

अवघं अस्तित्वच व्हावं, शिव-आराधना !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समुद्रमंथन… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ समुद्रमंथन ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 

नाही जाणे ज्या गावाल खुशाल त्याची वाट पुसावी

ना घेणे ना देणे तरि त्या बाजाराची वाट धरावी

*

जमीन अनवट घ्यावी पायी परिपाटीला देउन फाटा

केले ज्याला विद्ध फुलांनी हळूच उचलुन घ्यावा काटा

*

वाळूवरले नाही अक्षर शिलालेख तव शब्द असू दे

करारनाम्यावर शपथेच्या रक्तस्वाक्षरी तुझी असू दे

*

दुःख एकले निघे प्रवासा काळोखाला घेउन सोबत

गळाभेट दु:खांशी होता दुःख होय हे स्वयंप्रकाशित

*

आव्हानांचा नित्य सामना इथे कसोटी पुरुषार्थाची

वैशाखाच्या वणव्यांची धग इथेच उधळण इंद्रधनूंची

*

अमरत्वाचा नाही पट्टा क्षणभंगुर हे आहे जीवन

क्षणाक्षणांवर व्हावे येथे युगायुगांचे प्रत्यारोपण

 *

अस्थिदान हे दधिचीचे अन् मांस शिबीने केले अर्पण

दीड वितीची नाही काया रक्तमांसमय हे नंदनवन

*

बरेच सुंदर, विरूप थोडे तरीहि अद्भुत आहे जीवन

विषामृताचा हा तर सागर अविरत चाले समुद्रमंथन!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – तुज मागणे ते देवा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – तुज मागणे ते देवा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

तुका म्हणे

तुज मागणे ते देवा /

आम्हां तुझी चरण सेवा // १//

*

आन नेघो देसी तरी/

रिद्धी सिद्धी मुक्ती चारी //२//

*

संतसंगती सर्व काळ/

थोर प्रेमाचा सुकाळ//३//

*

तुका म्हणे नाम /

तेणे पुरे माझे काम//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

देवा माझ्या कडून तुझी चरण सेवा घडावी येवढीच माझी तुझ्या चरणी मागणी आहे. माझी हीच मागणी पूर्ण कर. मग तू मला रिद्धी सिद्धी आणि चारी मुक्ती दिल्या नाहीस तरी चालेल. मला सततचा संतसंग दे. कारण त्यातच सर्व सुखसमाधान आहे. मला तुझे नामस्मरण करावयाचे आहे. त्यानेच माझे सर्व कार्य होणार आहे.

लोक देवाकडे रिद्धी सिद्धी मागतात कारण त्यांच्या प्राप्तीने लोकांना या जगात सुखी समाधानी आणि ऐश्वर्यात रहाता येईल असे वाटते. म्हणजेच या जगात समाधानी जगण्यासाठी लागणारा पैसाअडका, धनदौलत, धनधान्य, सत्ता, इंद्रिय सुख, मागतात. पण या सुखोपभोगाच्या पलीकडे गेलेली माणसे या पैकी कशाचीही लालसा बाळगत नाहीत. तुकाराम महाराज तसेच होते ते असले काहीच मागत नाहीत. ते देवाला विनंती करतात. देवा तू मला यातले काहीच देवू नकोस फक्त तुझे नामस्मरण करण्याचे बळ दे. संतांची संगती मला सतत लाभुदे. त्या मुळेच माझ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. मला मोक्ष हवा आहे आणि तो तूच देवू शकतोस.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “देव चिंतामणि आले हो अंगणी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – देव चिंतामणि आले हो अंगणी – ? ☆ श्री सुहास सोहोनी

🌹

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

सज्ज स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

🌹

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

🌹

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

🌹

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

🌹

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद, चौथ्यातुन…

🌹

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

🌹

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

🌹

©  श्री सुहास सोहोनी 

दि. २७-०८-२०२५

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #२९८ ☆ मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # २९८ ?

☆ मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

रात सरता सरता

उधळलं हे दवार

कसं मोत्यानं भरलं

सारं माझं हे शिवार

दवाचे हे झाले मोती

दिसे पाना-पानावर

परि वेचता येईना

असा कसा कारभार

अशी मांडली आरास

थोड्या वेळेसाठी सारं

*

काळ्या मातीनं शोषलं

कसं मोती थंडगार

आली किरणं वरती

थोडं भिनलं रं वारं

*

कसं व्हत्याचं नव्हतं

पुन्हा झालं सारं सारं

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संस्कृत स्तुती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ संस्कृत स्तुती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुधा प्राशिता शब्दाक्षरी

कवण सुचिते सुभाषिता.

*

मम मनी ती अभिलाषा

ज्ञान पुलकित आशिषा.

*

श्रावण तरुतल उमल

तैसीया प्रतिभा कमल.

*

राजस्वी आरुढ कुमार

भाषाही शोभित शृंगार.

*

शुध्द तिथी ऋतू संस्कृत

हृदय भाव तव स्वीकृत.

*

अब्द जलद वेग नभी

काव्यरचा मणी कौस्तुभी.

*

भृंगर नाद पुष्प दली

कोकिल शब्द लय झुली.

*

ऐसी श्रेष्ठ महती प्राप्ती

कवी मन पावन तृप्ती.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सदाचार… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ सदाचार… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

(वृत्त.. कलिंदनंदिनी)

[लगालगा लगालगा लगालगा लगालगा (अक्षरगणवृत्त)]

[अक्षरे.. १६ मात्रा.. २४]

कुणावरी हसू नको कुणास तू फसू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

*

हयात ही हवा असे क्षणातला दिवा असे

कुणी इथे नवा असे कुणी जरा जुना असे

इथेच राख तोल हा भ्रमात तू असू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

*

करू नकोस माज तू उगा भरून व्याज तू

जराच ठेव भान तू भरून ठेव ज्ञान तू

फुका कुठे कुणा घरी गहाण तू बसू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

*

उगाच काळजी तुझ्या मनात काजळी असे

धनास साध्य मानसी तनात वाळवी असे

विचार सोडुनी असा विराण तू दिसू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

*

कुणी असेल रावही कुणी असेल रंकही

तुझ्याच सावलीतूनी कुणा फुटेल पंखही

कुणी करेल घातही तरी कुणा डसू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

*

कुणावरी हसू नको कुणास तू फसू नको

बरे जपून वागणे कुणावरी रुसू नको

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुदाम्या खरंच भाग्यवान आपण ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुदाम्या खरंच भाग्यवान आपण  ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वर्गातल्या रोजच्या कामाला

कंटाळून भगवंताने मारली दांडी |

भगवंत अवतरले सुदाम्यासंगे

बघायला भूतलावरची दहीहंडी |

*
कुठे जावे विचार करून

आले दोघेही मुंबापुरीत |

आपला जयघोष ऐकून

हायसे वाटले या नगरीत |

*
भगवंत आश्चर्याने म्हणाले

कोणाचे प्रयत्न चालले अथक |

सुदामा हसत हसत उत्तरले

हे मुंबईतले गोविंदा पथक |

*
दही हंडी का रे टांगली 

त्यांनी इतक्या उंचावर |

पुढाऱ्यांनी महत्वाकांक्षेचे

लावलेत इथे थरावर थर |

*
मडक्यात काय घातलंय 

दही का नुसतेच पाणी |

व्यासपीठावरच्या मंडळीनीच

आधीच मटकवलंय लोणी |

*
अरे त्या कोण नाचताहेत 

तिथे त्या सुंदर गौळणी |

सेलिब्रिटी तारका डोलती 

डीजे वरची कर्कश्य गाणी |

*
लोणी नाही तर मिळेल का 

थोडंसं दूध अन् दही |

जीएसटी लागलाय आता 

प्रश्न विचारता तुम्ही काही |

*
सुदाम्या भाग्यवान आपण

द्वापार युगातच सरलो |

कलयुगात नामस्मरणासाठी

पोथीतच नाममात्र उरलो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिकत चला ना… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ शिकत चला ना… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नाही कळले का देवाने

चंद्र जडवला तुझ्या रुपाला

तुला लाभले रूप देखणे‌

भुलवत असते उभ्या जगाला

*

उंबरठ्याच्या आत कोंडता

तारूण्याचे कशास वादळ

सोडा त्याला खुल्या अंगणी

मुक्तपणाणे खेळायाला

*

आवेगाला नका थांबवू

हवी तेवढी मोकळीकद्या

कर्तृत्वाचा जोम वाढतो

जगणे सुंदर घडवायाला

*

मना सारखे उंच मनोरे

रचत जायला धमक लागते

जगात कोठे नसते किंमत

गुलाम केवळ बनणाराला

*

धनदौलत ही फसवी माया

हसवत येते रडवत जाते

तोडच नाही जगात कुठली

माणसातल्या आत्मसुखाला

*

कल्पनेतले रमणे नुसते

उपयोगाचे नसते काही

बसतो मोजत आपण तारे

आभाळाच्या किती छताला

*

जुन्यापुरान्या उचापतीना

गाडून किंवा पुरून टाका

शिकत चलाना अभिमानाने

जगणे सुंदर जगत जायला

*

माणुसकीला जपत जयला

इच्छा शक्ती खूप लागते

तीच तेवढी देत जायला

विनवत जावू देवाजीला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राया पावसात चला… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ राया पावसात चला ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(लावणी)

आला आला पावसाळा त्यात निसर्ग नटला

शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥धृ॥

*

बीज अंकुराया आलं ओल्या मातीच्या पोटात

रोप इवलं पाहुनी हासू मायेच्या ओठात

गंध मातीचा घेताना मनी आनंद दाटला

शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥१॥

*

कसं फुललं वावर डोलतया हे शिवार

तन माझं शहारलं सख्या मला तू सावर

भुरभुरतो पाऊस जलधारा या हो आल्या

शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥२॥

*

घेऊ हातामंदी हात फिरू हिरव्या रानात

मन हिरवं हिरवं भिजू पाण्यापावसात

आला ज्वानीला बहर दाणा मोत्याचा भरला

शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥३॥

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares