श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३७ व ३८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३७ आणि ३८.
भक्तीसूत्र ३७ – –
लोकेऽपि भगवतगुणश्रवणकीर्तनात् ॥३७॥
अर्थ :- साधकाने प्रपंचातील कामे करताना, लोकांमध्ये वावरताना भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन करावे म्हणजे भक्ति संपन्न होते.
विवेचन:
मागील छत्तिसाव्या सूत्राचेच हे अधिक स्पष्टीकरण आहे असे म्हटले तरी चालेल. तेथे ‘भजन’ असे पद आहे. भजनात श्रवण-कीर्तनादिकाचाही अंतर्भाव होतो. लोकव्यवहारात भक्ती उत्पन्न होण्याकरिता भगवद्गुण श्रवण-कीर्तनादि साधनाचा अवलंब केला जातो. सत्संगतीत श्रद्धापूर्वक हरिगुण श्रवण-कीर्तनादिकानेच अंतःकरणात भगवतभाव निर्माण होतो व प्रेमवृद्धी होत असते. असा सर्व भक्तिमान पुरुषाचा अनुभव आहे.
आज संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. माध्यम कोणतेही असले तरी त्याचा मुख्य हेतू ‘सुसंवाद’ हाच असतो आणि तोच असायला हवा. येत्या काळात आणखी काही साधनांची भर यात पडू शकेल. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ‘श्रवणकला’ अपरिहार्य राहील, यात दुमत असणार नाही.
दैनंदिन व्यवहार पाहिला तर लोकांची ऐकून घेण्याची क्षमता आज खूप क्षीण होत चालली आहे असे लक्षात येते. सध्या वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनात एक गोष्ट लक्षात येते की एकतर लोकं पूर्णपणे ऐकत (श्रवण) नाहीत किंवा त्यांना ऐकायचेच नसते. आपलं लोकांनी ऐकावं असे प्रत्येकाला वाटते, परंतु दुसराही असा विचार करीत असेल, हे त्याच्या ध्यानातच येत नाही. याचा परिणाम असा होतो की लोकं स्वतःला व्यक्त करायचे टाळतात आणि त्यांच्या मनात अनेक बऱ्यावाईट गोष्टीं साचत जातात. जरा, आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिले तर याचे दुष्परिणाम प्रत्येकाला नक्कीच जाणवतील, काही जणांनी याचे चटके भोगलेही असतील, सहनही केले असतील.
– – सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो मनुष्य शांतचित्ताने, पूर्ण एकाग्र होऊन श्रवण करतो, *त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊन जाते*. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. नज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे? कसे ऐकायचे? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. *’समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे. ‘*
– – मनुष्याला भगवंताने दोन कान आणि एक तोंड दिले आहे. कान ऐकण्याचे एकच काम करते, परंतु एकमेव असलेले तोंड बोलणे आणि खाणे अशी दोन कामे करीत असते. मनुष्याने दोन्ही कानांनी नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यानुरूप उत्तम अशी कृती केली जावी अशी भगवंतांची ईच्छा असावी. परंतु, सामान्यपणे मनुष्य बरेचवेळा नीट ऐकत नाही आणि जिथे त्याचा स्वार्थ साधला जाईल, तीच कृती करतो. यामुळे जरी तत्काळ फायदा होत असला तरी मनुष्याच्या पूर्ण आयुष्याचा विचार केला तर ते घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मनुष्याने ‘अवधान’ देऊन ऐकावे आणि आपल्या सद्गुरूंना भूषण वाटेल अशी कृती करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ‘विवेका’ची कास धरावी. जो मनुष्य प्रत्येक गोष्ट विवेकाने करतो, तो मनुष्य यशस्वी होतो असे सर्व संत सांगतात.
*”ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।*
*असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति।।”*
(दा. 4. 1. 29)
भगवदगुण श्रवण हे अनेक अंगाने होत असते. कीर्तीश्रवण, चरित्रश्रवण, लीलाश्रवण, अवतारकथाश्रवण, भजनश्रवण, इ. नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती ही प्रथम सांगितली आहे. संसारातही एखाद्या वस्तूचे नाम व त्या वस्तूचे विशेष गुण याचे ज्ञान त्या त्या वस्तूचा वाचक जो शब्द त्याच्या श्रवणानेच होते. त्या वस्तूच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी असली म्हणजे त्या वस्तूचे प्रेम निर्माण होते, म्हणून कथाश्रवणानेच भगवदभक्ती निर्माण होत असते.
*”तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।*
(ज्ञा. 9. 1)
श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. *
“ज्ञाना’ची ईश्वर असलेली आपली ज्ञानेश्वरमाऊली आपल्याला कळकळीने सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्राण्याने केलेली देह-मनाची सिद्धता होय. अवधानात जाणिवेचे केंद्रीकरण असते आणि इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. थोडक्यात, अवधान देणे म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकणे.
– – *मनुष्य अवधान देऊन ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे वाटते. आपण ‘अवधानी’ होण्याचा प्रयत्न करू. *
जय जय रघुवीर समर्थ।
भक्तिसूत्र ३८ – –
मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥
अर्थ : प्रामुख्याने पराभक्ती ही केवळ सत्पुरुषांच्या कृपेमुळेच किंवा भगवंताच्या अल्पशा, अंशात्मक कृपेमुळेच प्राप्त होत असते.
विवेचन :
मागील चौतिसाव्या सूत्रात त्या भक्तिप्राप्तीची साधने आचार्यगुण सांगतात असे सांगून पुढील सूत्रातून विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्गुण-श्रवण, कीर्तनादि साधनांचा अनुवाद केला आहे. जेव्हा अनेक साधने सांगितली जातात तेव्हा त्यांत गौणमुख्यभाव निर्माण होतो, मग या साधनांत श्रेष्ठ व मुख्य कोण, असा संशय आला असता या अडतिसाव्या सूत्रात त्याचे उत्तर देतात. ही मागील साधनेही तत्त्वतः अमुख्यच आहेत. मुख्य साधन महात्मे जे संत त्यांची कृपा अथवा भगवतकृपेचा अंश का होईना पण तो प्राप्त होणे हे आहे. जे जे भक्तिमान पुरुष म्हणविले गेले ते महात्म्यांच्या कृपेने किंवा भगवत्कृपेनेच प्रेमभक्तीचे अधिकारी बनले. इतर सर्व साधनांना फलद्रूप होण्याकरितादेखील महात्म्यांची कृपा लागते.
शेतकऱ्याने धान्य पिकविणे आणि साधकाने भगवंत प्राप्तीसाठी साधना करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असे मला वाटत नाही. दोन्ही ठिकाणी फळ अपेक्षित आहे. जो हाडाचा शेतकरी आहे, तो अन्य फुटकळ गोष्टीत वेळ न घालवता, आपल्या जमिनीची पुरेशी मशागत करतो. पावसाचा अंदाज घेऊन उत्तम अशा बियाण्याची पेरणी करतो. आवश्यक ती खते पुरवितो, शेतात मध्येच उगवणारे तण काढतो. बांधबंदिस्ती करतो. पाखरांपासून शेताची राखण करतो. पीक चांगले येईल या एका आशेने देवावर विश्वास ठेवून तो हे सर्व काही करीत असतो. जमिनीत पेरलेले बियाणे नक्की रुजेल असा त्याचा विश्वास असतो. यातील एक पाऊस सोडला तर बाकीच्या गोष्टी सर्वसाधारणपणे त्याच्या हातात असतात. भगवंत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पाडतो, तेव्हा शेतकऱ्याला मुबलक आणि उत्तम प्रतीचे धान्य मिळते असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. परमार्थ साधनेत सुद्धा हेच सूत्र उपयोगी पडते. साधक साधना नेटाने करू शकतो, पण त्यावर पाऊस रुपी कृपेचा वर्षाव करणे हे निव्वळ त्याच्या कृपेमुळेच शक्य आहे. अनेक साधकांचे चरित्र अभ्यासले तर आपल्याला सहज लक्षात येईल.
सर्वश्रेष्ठ भक्त प्रल्हादाचे चरित्र आपण पाहू. बाळ प्रल्हाद नारायण नारायण असा जप करीत असे. त्याच्या पित्याने त्याला अनेक वेळा, अनेक प्रकारे छळले. त्याने ते सर्व छळ अत्यंत शांत राहून सोसले. मग भगवंताला दया आली आणि मग तो स्तंभातून प्रगट झाला. अमुक एक गोष्ट केली की भगवंत प्रगट होतो, दर्शन देतो असे सांगता येणार नाही.
माता शबरी भगवंत येणार म्हणून आपली कुटी सजवत होती, आपल्या घरासमोरील पायवाट झाडून ठेवत होती. असे करता करता ती वृद्ध झाली, मग एक दिवस प्रभू श्रीराम तिच्या कुटीत आले. तिच्या हातची उष्टी बोरे खाल्ली.
महर्षी नारद एक गोष्ट इथे अधोरेखित करतात, ती म्हणजे सत्संगती. काहीही झाले तरी साधकाने सत्संगती सोडू नये. आणि आजच्या भीषण कलियुगात नामासारखी शुद्ध संगत असूच शकत नाही असे सर्व संत सांगतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात,– –
“नाम घेता वांयां गेंला । ऐसा कोणे आईकिला ॥१॥
सांगा विनवितो तुम्हांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥२॥
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥३॥
सलगींच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥४॥”
(संदर्भ~ अभंग क्रमांक २२७३. सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था.)
जय जय रघुवीर समर्थ!
– – नारद भक्तीसूत्र ३७ आणि ३८..
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





