श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ अध्यात्म… – भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मी नेहेमीप्रमाणे ग्यालरीत बसले होते. सचिन सारिका कामावर गेली की मी मोकळी. या ग्यालरीत बसले की माझा वेळ छान जातो. समोर नवीन बिल्डिंग उभी राहिली होती, त्यात नवीन फ्लॅटधारक राहायला येत होते. त्या मंडळींचे टेम्पो, ट्रक आवारात येत होते, सामान उतरविले जात होते.. हमाल सामान वर नेत होते.. मग त्या फ्लॅटमधील मंडळी गाडीतून येत होती. फार्निचर लावत होती.. सुतारांचे ठोकणे.. त्त्यांचे ठोक ठोक आवाज अनेक फ्लॅटमधून बाहेर पडत होते.

नवीन नवीन चेहेरे समोर दिसत होते… काही मराठी बोलणारे, काही गुजराथी, काही हिंदी भाषिक… छोटी छोटी लहान गोजिरवाणी मुले, त्यांच्या सुंदर आया, देखणे बाबा, तरुण मुली, मुलगे, म्हातारे आजीआजोबा…

माझा वेळ मजेत जात होता. सात वर्षांपूर्वी आम्ही या जागेत आलो, तेंव्हापासून ही ग्यालारी मला प्रिय झाली. आम्ही येथे रहायला आलो तेंव्हा आमच्या बिल्डिंगच्या बाजूला मोकळी जागा होती. गुलमोहरची दोन झाडें सतत जाग करत असत, एक जुना आंबा होता.. किती वर्षाचा कोण जाणे? सकाळी सकाळी त्यावर पाखरे जमा होत आणि किलबिलाट करत. सायंकाळी तीच पाखरे घरट्याच्या ओढीने परत येत.

पण या माझ्या सुखाला दृष्ट लागलीच. एका दिवशी भराभर झाडें तोडणारे, जमीन साफ करणारे आलेच. विटा, दगड, लोखंड येऊन पडू लागले आणि भराभर बिल्डिंग उभी राहिली.

तीन वर्षात बिल्डिंग उभी राहिली. नवीन नवीन मंडळी राहायला आली. माझ्या ग्यालारीसमोरच्या फ्लॅटमध्ये नवराबायको जोडी आणि त्त्यांची सातआठ वर्षांची मुलगी राहायला आली.. त्या चुणचुणीत मुलीमुळे माझे दिवस आंनदात जाऊ लागले… मला ती हळूच हात दाखवू लागली, जीभ बाहेर काढून वेडावू लागली. तिची आई कवचितच दिसायची.. बहुतेक ती आतल्या खोलीत कॉम्पुटरवर काम करत असावी. तिचे बाबा कधी सकाळी दिसत, कधी दुपारी दिसत किंवा चारचार दिवस दिसत नसतं.

त्या छोटया परीला मी तिचे नाव विचारले..

मुग्धा..

आणि तूझ्या आईचे नाव?

आई.. पण बाबा तिला संध्या म्हणतात..

आई घरात काम करत असते काय? बाहेर जात नाही आणि ग्यालरीत फारशी येत नाही..

आई कॉम्प्युटरवर टायपिंग करते..

बर.. बर.. मी हसत म्हणाले.

मुग्धाने बहुतेक आपल्या आईला मी तिची चौकशी करत असल्याचे सांगितले असणारं, दुसऱ्या दिवशी मुग्धाची आई ग्यालरीत आली आणि माझ्याशी बोलायला लागली..

तुम्ही काल माझी चौकशी करत होतात असे मुग्धा म्हणाली..

होय.. तुम्ही बाहेर जाताना दिसत नाही पण घरात पण दिसत नाहीत म्हणूंन चौकशी केली..

मी घरातच असते पण मी DTP ची कामे करते एका प्रकाशकाची, त्यामुळे पुरा दिवस कॉम्प्युटरसमोर जातो आणि माझा नवरा सेल्सलाईनला आहे, त्यामुळे त्याच्या टूर असतात..

हो का.. बर बर..

पण आजी उदया सकाळी आमच्याकडे याल का.. मुग्धाचा वाढदिवस आहे उदया आणि तिचे बाबा बाहेरगावी गेलेत.. उदया दुपारी जेवायलाच या.. थोडया लवकर आलात तर गप्पा मारू..

हो हो.. येते.. तुम्हाला थोडी मदत पण होईल माझी.

दुसऱ्या दिवशी मी मुग्धाच्या घरी गेले. मुग्धा आणि तिची आई संध्या वाट पहात होती. संध्या वालाची उसळ करणार होती, त्या करिता काल रात्री पाण्यात भिजत ठेवलेले वाल ती सोलत होती, मी पण तिच्या शेजारी बसले आणि वाल सोलायला बसले.

या आधी तुम्ही कुठे राहत होतात संध्याताई..

या आधी आम्ही दोन जागा बदलल्या.. माझे लग्न झाले आणि मी मुंबईत आले, हे एका औषधंकंपनीत सेल्स लाईनमध्ये नोकरी करत होते, मी ग्रॅज्युएट होऊन DTP चा कोर्स केलेला, यांची कळव्याला चाळीत खोली होती. त्या खोलीत पाण्याचा प्रॉब्लेम, कधी पाणी येई कधी चारचार दिवस नाही. कॉमन संडास. मी कंटाळले.. यांना दुसरी जागा शोधायला सांगत होते पण पैसे नव्हते, म्हणूंन मी काम शोधू लागले, डोंबिवलीतील एका पुस्तक प्रकाशकाने मला काम दिले. माझे टायपिंग बिनचूक त्यामुळे मला भरपूर काम मिळाले. रात्रंदिवस काम करत होते आणि पैसे जमवत होते. पण माझी तब्येत बिघडली. मग आम्ही ती जागा सोडली आणि डोंबिवलीत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागलो. तेथेच मुग्धाचा जन्म झाला. मी परत काम करू लागले, आता प्रकाशन व्यवसायात माझ्या कामाची चर्चा होऊ लागली, मला पुण्याच्या प्रकाशकांची कामे मिळू लागली, दोन पैसे बँकेत जमू लागले आणि माझ्या नवऱ्याला हार्टअटॅक आला. सतत दौरे, त्यात सिगरेटचे व्यसन आणि अधूनमधून पार्टीच्या नावाखाली दारू पिणे. त्यातून त्याला बाहेर काढले तर जागामालक जागा खाली करायला मागे लागला… आता मी ठरवले आता स्वतःच्या मालकीची जागा विकत घ्यायची, भाडे देणे बस झाले. मग मी माझ्या सर्व प्रकाशकाकडे ऍडव्हान्स पैसे मागितले आणि यांनी पण कंपनीतून कर्ज घेतले आणि ही जागा घेतली. त्या आजारानंतर यांनी व्यसने सोडली, दौरे कमी केले आणि एकएक पैसा वाचवून माझ्याकडे देऊ लागले. आता या जागेत आमचा संसार सुरु आहे, मुग्धाला पण इथे चांगली शाळा मिळाली आहे, तुमच्यासारखे चांगले शेजारी आहेत.. पण जागा पण लाभावी लागते म्हणतात.. तशी ही जागा लाभावी.. आमचा संसार सुखाचा व्हावा हे मी देवाकडे मागते.

वाल सोलून झाले होते, ते घेऊन संध्या किचनमध्ये गेली आणि तिने वाटणं मिक्सरमध्ये लावल.

मी संध्याचे बोलणे ऐकत होते.. जागा लाभावी लागते.. तशी ही जागा आम्हाला लाभावी… खरे आहे तिचे, वास्तू पण तुमचे नशीब ठरवते, तुमचे सुख किंवा दुःख ठरवते..

संध्याने बहुतेक श्रीखंडपुरीचा बेत ठरविला होता. ती पुऱ्या करण्यासाठी पीठ मळू लागली. तिचे मघाचे बोलणे माझ्या मनातून जात नव्हते..

तिने तेल तापवायला घेतले. मी तिला म्हंटले..

संध्या.. मी पुऱ्या लाटून देते. तू तळून घे.

मी पुऱ्या लाटता लाटता तिच्याशी बोलू लागले..

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप रामदास केळुस्कर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted