डॉ. नेहा भटकर
अल्प परिचय
‘मन अंकुरे अंकुरे’ या नावाचा ललित लेख संग्रह ज्ञानपथ पब्लिकेशन्स अमरावती द्वारा प्रकाशित.
साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कविता वाचन केलेले आहे.
वृत्तपत्रामधून सातत्याने विविध विषयांवर लिखाण.
मनमंजुषेतून
☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
त्याच झालं असं, की परवा स्वयंपाकघरातील काळी नॉनस्टीक भांडी आरोग्यास किती व कशी बाधक आहेत वा नाहीत याबद्दलच लेखन वाचनात आलं. तसंही अलीकडे सर्वत्र केवळ स्टीलची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरावीत असा प्रचार होतोयं पण गैरसोय अशी होते की, स्टील उष्णतेचा चांगला वाहक नसल्याने, भांड्याला सर्वत्र सारखा जाळ लागत नाही त्यामुळे पदार्थ लगेच करपतो. हे सगळं मनाशी घोळत असतानांच मला दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडी गुलाबभाई घरी येऊन सर्व स्वयंपाकघरातील शिजवण्याची, खाण्याची वा अन्न काढून ठेवण्याची सगळी पितळी भांडी; उष्णतेची उत्तम वाहक असलेली, कल्हई करून अगदी चांदीसारखी चकचकीत करून द्यायचे, जेणेकरून कुठलाही पदार्थ कळकून त्याची बाधा होऊ नये आणि आम्ही कसे निर्धास्त व्हायचो हे आठवलं
कंदील भडकतोयं, गुलाबभाई. पावसाळ्याच्या तोंडी भाड्यांना कल्हई करायचीयं, गुलाबभाई. तेल संपलेल्या डब्यांची झाकणं कापून घ्यायचीयं व त्यापासून वापरायला सोयीचे डबे बनवायचेतं तर गुलाबभाई. बादलीला वाळा बसवायचायं, कुठल्या गळक्या जुनाट गुंड वा कळशीला डाग द्यायचायं, गुलाबभाई. धान्याचा हंगाम जवळ आलायं धान्य साठवायच्या कणग्या ठिकठाक करून घ्यायच्यायं तर गुलाबभाई. उन्हाळ्यात गावच्या कुंभारवाड्यातून नुकत्याच आणलेल्या नव्या कोऱ्या मातीच्या माठासाठी अडणी करायची तरी गुलाबभाई. तर एकंदरीत कुठलंही तांबा पितळ, लोखंडी वा टपरी पत्र्यांचं आणि कल्हई वगैरे कामं करायचं तर अशा कित्येक कामांसाठी आमची भिस्त केवळ गुलाबभाईवरच. अशा प्रकारची कामे करणारा आसपासच्या खेड्यांसकट एकमेव माणूस गुलाबभाई. आज ही असली कामे कुणी करवून घेत नाहीत. त्याची गरजही नाही किंवा ती कालबाह्य झालेली आहेत. आजच्या वापरा आणि फेका वा युज अँड थ्रो जमान्यात, वर्षानुवर्षे एकच, वारंवार भडकणारा कंदील पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरणाऱ्या लोकांचं जग कालौघात केव्हाच मागे पडलेलं. कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धुसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालयं व आज बहुतेकांसाठी तितकंच ते अनोळखीचही आहे. आजची पन्नाशीच्या पलीकडची, खेडेगावांशी बऱ्यापैकी परिचीत असलेली पिढी, कोणे एकेकाळी त्या जगाचा भाग होती. जसजसा काळ सरकत गेला तसतशा लहानपणीच्या दुनियेतील अगदी रोज भेटणाऱ्या खुणा एक एक करून दिसेनाशा होताहेत. तो निसर्गाचा नियमच आहे; त्याचे काय विशेष. कालपरत्वे स्थित्यंतरे ही घडणारच. गतकाळात भेटलेली कितीतरी माणसे, घडलेल्या घटना, विस्मृतीत गडप होतात. पण कधी कधी, कुणास ठाऊक कशी, अत्यंत साधी वाटणारी माणसं किंवा तेव्हा तितक्याशा महत्वाच्या नसणाऱ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना, कुठेतरी मनाच्या पार आतल्या कप्प्यात जपलेल्या असतात, इतक्या की त्यांना पाठीशी घालत आपण कितीतरी काळ पुढे चालत आलेलो आहोत याचाही विसर पडतो, इतक्या त्या ताज्या असतात.अगदी कसं सगळं परवाच भेटल्या वा घडल्या सारखं लख्ख. त्यापैकीच एक भांड्यांना कल्हई करुन चकचकीत करणारे गुलाबभाई.
सहा फुटाच्या जवळपास उंची आणि सडपातळ शरीरयष्टी, कुठलेही भाव नसलेला उभट चेहरा, कुणी काय सांगतोय हे त्यांचे डोळेच ऐकायचे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पांढरा ढगळ पायजमा शर्ट व डोईवर कायम काळी साधी टोपी. टोपी न घातलेले गुलाबभाई मी बघितले नाहीत. भ्रमण वा स्थिर यापैकी कुठलीही दूरध्वनी सुविधा हाताशी नव्हती व तसल्या सोयीची पुसटशीही कल्पना त्याकाळी गावामध्ये कोणाच्याही मनीमानसी असण्याचे काही कारणही नव्हते. गावात कोणालाही काही सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष भेटणे हीच पद्धत. यामुळे घरात गुलाबभाईसाठी कुठलेही काम निघाले असेल तर गुलाबभाईंच्या थेट घरीच थडकावे लागे आणि हमखास ती कामगिरी घरात लहान असल्याने माझ्याकडेच यायची. हो घरीच, त्याकाळी घर आणि व्यवसाय हे दोन्ही बहुतेक एकाच ठिकाणी असायचे किंवा कारागीर, ज्यांचे कोणाचे काम असेल त्यांच्या, घरी जाऊन ते काम करून द्यायचे. आजच्यासारखे वेगळे वर्कशॉप किंवा वेगळे दुकान अशी पद्धत नव्हतीच. गुलाबभाईंचे स्वतःचे घर नव्हते. ते राहायचे गावाला अगदी लागून असलेल्या शेतामधील डॉ. अशोक यांच्या वाड्याच्या परिसरात, दर्शनी भागातील डाव्या कोपऱ्यातील ओसरीत. अर्थातच तोच त्यांचा निवारा आणि वर्कशॉपही. त्यांचे छोटेसे कुटुंब मीयॉं, बिबी आणि दोन मुली अत्यंत उद्यमशील असा हम दो और हमारे दो असा चौकोनी संसार. वाड्याच्या समोरच्या भागात गुलाबभाई तर मागच्या बाजूला आणखी एक का दोन कुटुंब राहायला असल्याचे आठवतं. पण एकुणच सर्व गावाचा संबंध यायचा तो गुलाबभाईंशी आणि आजारी पडल्यास डॉक्टरांशी.
डॉक्टरांच्या शेतामध्ये अगदी कुंपणाला लागून, गुलाबभाईंच्या ओसरीच्या जरा डाव्या बाजूला मोठाल्या चिंचेच्या झाडांची रांग होती. वाऱ्याच्या झुळुकेसरशी डुलणारे चिंचांचे झुपके मनाला नेहमी खुणावत असत. शेताच्या कुंपणापलीकडील एका कार्यालयामध्ये शिपाई असणाऱ्या सदाभाऊंचा मात्र आमच्या चिंचा गोळा करण्याला कडाडून विरोध असे. अर्थात त्याला कारणही तसंच असायचं म्हणा. आम्हा शाळकऱ्यांचा घोळका चिंचेखाली एकदाचा जमला की इतका गोंधळ नि गोगांट करायचा की बाजूच्या कार्यालयीन कामात अडथळा यायचा पण आम्ही आपले सदाभाऊंच्या नावाने सदा बोटं मोडायचो. अशावेळी आम्ही गुलाबभाईच्या मुलींना हाक मारायचो आणि त्या आम्हाला चिंचेखालची चार-दोन बोटूकं अगदी सहज द्यायच्या आणि आमची बोळवण करायच्या. चिंचेच्या झाडांची रांग जेव्हा माकडांनी गजबजायची तेव्हा झाडावरची माकडं आणि आम्ही खालची माकडं यांच्यात करार होऊन गुलाबभाई आणि सदाभाऊ यांची चांगलीच कोंडी करत असू. माकडांच्या गोंधळात आमचाही गोंधळ मिसळून जायचा. तेव्हा माकडं गावात बाराही महिने मुक्कामाला नसायची. काही दिवसांची ही पाहुणी माकडं आमची फार आवडती होती.
वाड्यात शिरण्यासाठी, पहिले तर वाड्याच्या भल्या मोठ्या लोखंडी पत्र्याच्या फाटकाशी झुंजाव लागायचं. फाटक ढकलून आत मध्ये पाऊल पडल्याशिवाय वाड्याचा आतला परिसर काही दृष्टीपथात यायचा नाही कारण फाटक एकसंघ पत्र्याचं. त्याला मध्ये कुठलीही खिडकी वा फट नसल्याने फाटकाशी उभे राहून आत मधील कोणाला बाहेरून आवाज देणे अशक्यच म्हणून लहान मुलांसाठी ती झुंजच, पण अनिवार्य. त्यातल्या त्यात सोयीचा भाग म्हणजे फाटकाला वर किंवा खाली कडीकोंडा लागलेला नसायचा फक्त ते ढकलायचे अन् त्याचा कर्र… असा होणारा आवाज कानात घेऊन आतील ऐसपैस पटांगणात शिरायचे. फाटकाचं कर्र…एकदाच बंद झाल्यावरही जर का करकर, खडखड, ठकठक असे आवाज जर आपल्या डावीककडून येत असतील तर गुलाबभाई घरीच आहेत अन्यथा ते कुठे गावामध्ये कोणाकडे काहीशा असल्याच कामासाठी गेलेले असावेत हा अंदाज फाटकातच यायचा. गुलाबभाईंशी संवाद साधने म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम. त्यांची कामानिमीत्त चाललेली ठोकपिट आणि भरीत भर गुलाबभाई दोन्ही कानाने ठार बहिरे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी गत व्हायची. मी फक्त त्यांना एवढं सांगून घराकडे येत असे, ते म्हणजे तुम्हाला काही कामासाठी आईने बोलावले आहे आणि बहुतेक हा संवाद हातवारे जास्त आणि शब्द कमी असाच व्हायचा. यावर गुलाबभाई फक्त मानेने होकार द्यायचे.
गुलाबभाईंचे कामातील कसब व सफाईदारपणा आणि माझ्या आईच्या संसारोपयोगी नवनवीन कल्पनांच्या समन्वयाची परिणीती व्हायची ती नाविन्यपूर्ण घरगुती वापरातील सुलभ उपकरणांच्या निर्मितीमध्ये. चिळ्या कंदीलांमध्ये रॉकेल भरायच्या डब्याला तोटी लावून घेऊन काम अधिक सोपे करणे तर कधी दिवालगिरीच्या वातीच्या पुंगळी भवती खबरदारी म्हणून आधीच आणखी एक जास्तीची पुंगळी बसवून घेऊन तिच्या कधी काळी भडकाण्यावर उपाय करावा. कित्येकदा बनवलेले झाकण बाहेरून नीट बसत नाही तर अशावेळी ते आत मधून बसवावे म्हणजे अधिक नीट बसेल का, असले प्रयोग करायला कधी गुलाबभाई थकत नसतं. घरोघरी दिवाळीच्या आधी होणाऱ्या वार्षिक साफसफाईच्या वेळी तर कित्येक अडगळीतल्या सामानांची दुरुस्ती करावी आणि त्यांना उपयोगात आणावे अशा विचाराने आणि इतर अनेक नियमित वापरातल्या सामानाच्या दुरुस्तीचा चेव बऱ्याच जणांना यायचा.त्यामुळे या सुमारास गुलाबभाईंच्या घराबाहेर बराच मोठा वैविध्यपूर्ण मोडक्या वा नादुरुस्त वस्तूंचे ढीग, किंवा ढीगभर काम त्यांना पडायचे. अशावेळी ते सारखे लगबगीत, प्रत्येकाची डेडलाईन सांभाळायचे. “हा हा दिवाली के पहेलेही बना दूंगा” असं पुटपुटल्यागत बोलायचे पण त्यांचा कामाचा झपाटा आणि ठोकपिटीचा आवाज त्या काळात फार वाढायचा.
कुणाच्याही कधी अध्यात मध्यात नसणारे, आपलं काम भलं आणि आपण भले या नियमाने चालणारे. सदैव कामाचीच भाषा बोलणारे व आवाजाचा एकच पोत ठाऊक असलेले. भोवतालच्या जगाला त्यांच्या व्यक्त्तीमत्वाचा केवळ गुलाबभाई डागवाला वा कल्हईवाला एवढा एकच पदर ठाऊक असलेले, कामात अत्यंत प्रामाणिक आणि तितकेच हरहुन्नरी. कधीही कुठली तक्रार नसणारे, माणुसकीचा वसा घेतलेले. कधीही कामा पलीकडे न बोलणारे, आजूबाजूच्याच काय तर कधी स्वत:बाबतही व्यक्त न होणारे गुलाबभाई; आज मात्र मला फार गूढ वाटतात.
┉❀꧁꧂❀┉
© डॉ. नेहा विनोद भटकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



अभिनंदन स्नेहा ताई,
ग्रामीण जीवनाचे सशक्त लेखन.
हरहुन्नरी गुलाब भाई , प्रसंगीच ज्यांची आवर्जून आठवण यावी असे पण प्रसंग निभावून नेणारे..
अभिव्यक्ती वरील पहिलेच पाऊल, दमदार लेखनाचे.
शुभेच्छा शुभचिंतन.
धन्यवाद!
खूप छान लिखाण! अगदी त्या काळात घेऊन जाणारे. 👌👌🙏
धन्यवाद!