तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

… चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले,  पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही,  कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला. त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं,  “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर. कथेमध्ये खून,  संशय,  गुंतागुंतीचा तपास,  रहस्य,  थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”

तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं?  एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी? “

स्वयंपाकघरातून पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं. मी काही न बोलता फक्त मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमणारा मोठा हसू हसला. “अरे वा! बस,  आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहीत असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की एखादी कडक थ्रिलर,  तुला नक्की जमेल! ” तो म्हणाला.

मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे,  तुला थट्टा वाटतेय का?  माझ्या आजवरच्या कथा आठव जरा. माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये साधं कडाक्याचं भांडण झालं,  तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून त्यांची प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त,  चाकू,  खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार आणि माझ्याकडून कसं होणार? ” माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला,  “बाबा,  बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल,  मग त्याची मनधरणी करेल,  ‘मला माफ कर’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील! ” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं,  तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते,  कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.

दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं,  “मर्डर मिस्ट्री.” थोडं थांबून,  खूप विचार करून मी कथेचं पहिलं वाक्य लिहिलं,  “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला,  “धारदार चाकू?  अगं,  एवढा धारदार कशाला?  चुकून जास्त लागलं तर?  चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला,  पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.

मी पुढे लिहायला सुरुवात केली,  “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मध्येच ओरडलं,  “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं,  “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग?  त्याने माणूस कसा मरेल?  त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार?  मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला. मनात विचार केला की मारामारी दाखवू. मी लिहिलं,  “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली,  “अरे,  पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर?  खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल! ” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं. असा करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती,  पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.

इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला,  “काय लेखिकाबाई,  झाला का मर्डर?  की पोलीस तपास सुरू झाला? ” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले,  “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला,  “अशी दारात उभी ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस?  आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक.” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं,  “अरे,  तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील! ” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला. मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको,  म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं,  “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं,  “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना?  एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द!

– क्रमशः भाग पहिला 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted