उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ औरत… (अनुवादित) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
(अनुवादित कथा)..(पूर्वार्ध)
थोडीशी घरघर. मंद होत जाणारा प्रकाश आणि विमान उडू लागले. समीरा हळू हळू छोट्या छोट्या होत जाणा-या घरांकडे खिडकीतून बघत होती. या सगळ्यात माझेही घर दिसेल का? एक दुसर्याला लागून असलेल्या अनेक घरात, तिचेही एक घर होते. कुठून दिसेल ते? तिला तिच्या बालपणाची आठवण झाली. तेव्हा उडत्या विमानाची घरघराट ऐकू येताच मोहल्ल्यातील सगळी मुले पळत पळत बाहेर येत असत आणि छोटं छोटं होत विमान अदृश्य होत नाही, तोपर्यंत सगळी मुले तिकडे बघत रहात. आज बरोबर उलटं आहे. ती विमानात बसलीय आणि घरं छोटी छोटी होताना ती बघतेय.
सुश्री गिरिमा घारेखान
थोड्याच वेळात विमान ढगांमधे शिरलं. समीरा, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहावं, तशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे दृश्य तिच्या नजरेसमोर साकार होऊ लागले.
‘नाही अम्मी, मला शादी करून इतक्या दूर जायचं नाही.’
‘अग वेडे, मस्कत कुठे इतक्या दूर आहे? ’विमानाने फक्त दोन-तीन तासात तिथं पोचता येतं. यापेक्षा जास्त वेळ ट्रेनने कोचीनला पोचायला लागतो.’
समीराला तर परदेश शब्दामुळेच पोटात भिंगरी फिरल्यासारखं गरगरायला लागलं.
‘पण अम्मी, अगदी अपरिचित देश, अपरिचित लोक… मी तिथे कशी राहू शकेन? ’
मग अम्मी, आपल्या मावशीच्या मुलीशी बोलली. ती किती तरी वर्षांपासून दुबईला होती. महालासारख्या घरात रहात होती. जास्त वेळा येणं तिला शक्य होत नसे. परंतु ईद- सणवार या निमित्ताने सगळ्यांसाठी खूप कपडे, अत्तरं, खजूर, सुका मेवा आणि चॉकलेटस पाठवते. तरीही समीराचं मन मानत नव्हतं. पावसाळ्यात त्यांच्या घराच्या गळणार्या छताप्रमाणे अम्मीच्या डोळ्यातून पाणी वहाणे सुरू झाले होते.
समीराला आपल्या घरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. तिला माहीत होतं, की तिचे अब्बा दिवसभर श्वास घेण्याइतकीही फुरसत न घेता काम करतात, तेव्हा कुठे घरातील सहा व्यक्तींच्या शरीराला त्यांचा ऑक्सिजन मिळत होता. त्यांच्या पगारानंतरचे दहा दिवस ईदप्रमाणे वाटायचे. नंतर हळू हळू रोजांना सुरुवात व्हायची.
दूरच्या एका नातेवाईकामार्फत, वीस वर्षाच्या समीराला, मस्कतमध्ये रहाणाऱ्या एका अरबासाठी मागणी आली. या नातेवाईकाने यापूर्वीही अनेक मुलींचे विवाह खाडीतील देशात रहाणा-यांशी ठरवले होते. त्यामुळे अविश्वासाचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे हुंडा न देता मुलीला तिचा ठिकाणा मिळतोय, तर समीराची अम्मी, परवीनच्या मनात अविश्वास दाखवण्याचा विचारही आला नाही.
त्या दिवशी समीरा नको… नको… म्हणत होती, तेव्हा परवीन तिला समजावत होती. आई आणि मुलीच्या अश्रूंची धार एकसारखीच होती. कारणं फक्त वेगवेगळी होती.
समीरा विचार करत होती, एक अगदी अपरिचित देशात, एका अपरिचित व्यक्तीबरोबर, ती सारं आयुष्य कसं व्यतीत करू शकेल? शिवाय, अरब देशांबद्दल तिने काय काय ऐकलं होतं. तिथे बुरख्यात रहायला हवं. घराबाहेर जास्त पडता येत नाही, अशा खूप काही गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या.
इथे भलेही पैशाची कमतरता असेलही, पण ती स्वतंत्रपणे हिंडू-फिरू शकते.
सरकारने दिलेल्या सवलतीमुळे ती बारावीपर्यंत शिकली होती. मुलांबरोबर एका वर्गात बसली होती. मॉनिटर बनण्याचा रुबाब दाखवला होता. शाळेत मुख्याध्यापिका बनून भाषण दिले होते. मैत्रिणीच्या अॅक्टिवावर बसून बाजारातून फिरून आली होती. तिच्या अब्बा-अम्मीने या सगळ्या गोष्टी करण्याबाबत तिला कधी नकार दिला नव्हता. बुरख्याखेरीज तिथे आणखी किती बंधने असतील? काय ती श्वास घेऊ शकेल ना!
पण, अम्मीचे नाईलाजाचे शब्द आणि लाचारीचे अश्रू यात समीरा विरघळली. तिने जेव्हा अम्मीकडे बघत होकारार्थी मान हलवली., तेव्हा, तिची अम्मी इतकी खूश दिसली, जशी काही तिच्या झुकलेल्या मानेत, तिला ईदचा चाँद दिसला. समीराचे कपाळ चुंबत, ती म्हणाली, ‘ शहाणी माझी बेटी! चल! तुझा चंद्रासारखा चेहरा नीट सजव. करीम चाचा त्या अरबाला घेऊन येणार आहेत. | रशिद – रशिद नाव आहे त्यांचं.’
आणि आज ती त्या रशिदची बीबी बनून त्याच्याबरोबर मस्कतला निघाली होती. पहिल्या मुलाखतीच्या वेळी तर समीराच्या पापण्यांवर जसा काही पहाड उभा राहिला. दुसर्या मुलाखतीच्या वेळी तिला वाटलं, रशिदमध्ये आपत्तिजनक काही नाही. उंच, गहूवर्णी, बांधेसूद शरीर.
दुसर्या मुलाखतीच्या वेळी तो समीराला म्हणाला, ‘त्या दिवशी आपल्या पापण्या उचलत नव्हत्या आणि माझे डोळे आपल्या चेहर्यावरून हटत नव्हते. मी हिंदुस्थानात आलो होतो, एखाद्या मुलीशी निकाह करायला आणि मला तर नूरजहाँ मिळाली. माझी तर बिना रोजा इफ्तारी (रोजा न करताच, रोजा केल्याचे पुण्य) मिळाली. हमदुल्ला! (अल्लाची कृपाच म्हणायची की! )’
तेव्हा, समीराच्या हृदयात एक अंकूर फुटला. निकाहनंतर रशिद, एखाद्या नाबाबाप्रमाणे सॅटीनचा, दुधासारखा सफेद, ज्याला ते, ‘कंदोरा’म्हणतात, त्या कुर्त्यावर मन मोहवणारा परफ्यूम शिंपडायचा, तेव्हा समीरा त्यांच्या वयातील अंतर विसरून जायची. त्याच्या कमरेला लटकणारा चांदीचा खंजीर आणि त्याच्याबरोबर बांधलेला चांदीचा पट्टा याने समीराचं मन पूर्णपणे बांधून टाकलं। हिंदुस्तानी संस्कार असलेलं आणि अजूनपर्यंत कुमारिका राहिलेलं समीराचं मन, त्या परदेशीविषयी कधी ओतप्रोत ओढीने भरून गेलं, तिला कळलंच नाही. तो अनोळखी माणूस ‘“शौहर” ची उपाधी प्राप्त होताक्षणी तिचं सर्वस्व बनला होता.
एअर होस्टेस थंड पेय घेऊन आली. रशीदने समीराला ढगांतून बाहेर ओढली. ‘ढगांतून पहिल्यांदा उडताना कसं वाटतय? ’
‘आपल्याशेजारी बसल्यावर वाटतय, विमान जसं काही सातव्या स्वर्गातून उडतय.’ समीरा रशीदच्या अधीकच जवळ सरकत म्हणाली.
निकाहनंतर ताबडतोब, तिला बरोबर घेऊन जाण्याच्या कार्यवाहीत व्यस्त असलेल्या रशीदला, समीराला खूप काही विचारायचे होते. तिने विचारणं सुरू केलं.
‘मस्कत कसं शहर आहे? आपलं घर कसं आहे? घरात कोण कोण आहेत? ’
रशीद हसत हसत म्हणाला, ‘मस्कत खूप सुंदर शहर आहे, पण आपल्याला सोहारमध्ये राहायचे आहे.’
‘सोहार! ’
‘हो! मस्कतपेक्षा थोडं छोटं शहर आहे. तिथे माझे घर आहे. फार्म हाउस- गार्डनवालं घर आहे. फार्ममध्ये, घरामध्ये, खूप नोकर-चाकर आहेत. तिथे तुला एकटेपण मुळीच जाणवणार नाही.’
‘फार्म! ’ समीराला वाटलं, खुदाने खरोखर तिच्यावर मेहेरबानी केली आहे.
’खूप मोठा फ़ार्म आहे. खजूराची झाडे आहेत. त्यांच्याकडे तुलाच आता बघायचे आहे. ‘हिंदुस्तानातल्या मुली खूप हुशार असतात, ’ असं ऐकून होतो.’
समीराच्या गालावर हलकीशी चापट मारत, रशीद म्हणाला.
समीरा आश्चर्याने सगळं ऐकत राहिली. तिच्या सचेत डोक्यात लगेचच एक प्रश्न निर्माण झाला, ‘रशीद असं का म्हणाला, ’तुला एकटं वाटणार नाही? ’ एकटीला तिला कसं आणि काय सांभाळायचं होतं? ’ तिच्या डोक्यात हे सगळं एकदम काही शिरलं नाही. तरीही यातच तिचं मन विमानाप्रमाणे उडत उडत तिच्या विचार-शक्तीच्या पुढे गेलं होतं. यावेळी जसं काही एक वाढलेलं झाड त्याच्या मुळासकट उखडून, कुठल्या तरी दुसर्या जागी, रुजवण्यासाठी आणलं जात होतं.
फिल्ममधून बघितलेल्या विमान-तळापेक्षा, अधीक भव्य असा मस्कतचा विमान-तळ बघून तिचे केवळ डोळेच नव्हे, तर डोकंदेखील चक्रावून गेलं. विमान-तळाबाहेर रशीदचा ड्रायव्हर एक मोठी गाडी घेऊन उभा होता. कोमल, चमकदार गाडीची चाके एखाद्या आफ्रिकन सुंदरीच्या गालासारखी रस्ता चुंबत पळत होती. जवळ जवळ एकशे पंचवीस किलोमीटर रस्त्यावर, समीरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लटकणारी खजुरी आणि रांगोळीसारखी दिसणार्या फुलांसारखे विखुरलेले बंगले आपल्या डोळ्यांनी न्याहाळत होती.
सोहारमध्ये, जेव्हा तिने आपल्या बांगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिला वाटलं, तिच्या आधी स्वर्ग या बंगल्यात राहायला येऊन गेला.
राशिदच्या प्रेमात बुडून गेलेली समीरा आपले कुटुंब, देश, वेळ व दिवसांची गणना करणं विसरून गेली. तो बंगला, त्यांच्या हनीमूनची रोमांचक वेळ बघत बघत रंगीबेरंगी प्रकाश पसरत राहिला. बाहेर उभे असलेले खजुराचे वृक्ष आपल्या पिवळ्या खजुरात अधीक माधुर्य भरत राहिले. एके दिवशी सकाळी रशीदच्या परफ्यूमच्या तीव्र गंधाने समीरा जागी झाली.
‘इतक्या सकाळी कुठे? ‘
‘‘मस्कतला चाललोय. आता काम तर करायला हवं ना! ’
‘म्हणजे? … अनपेक्षित धक्क्याने समीराच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळे मोठे मोठे करून ती रशिदकडे बघत राहिली. तिची झोप आता पूर्णपणे उडून गेली होती.
आपल्या कंदोर्यावर चांदीची पट्टी घालत घालत रशिद म्हणाला, ‘. ‘जानेमन, माझा मुख्य बिझनेस मस्कतमधेच आहे. आठवड्यातले पाच दिवस तिथेच रहाणार. जुम्मेच्या आधी आपल्या मलिकेजवळ तिचा शहनशाह हजर! ’
‘पण…’
‘अग, पाच दिवस कसे बघता बघता सरतील…’ हाताने चुटक्या वाजवत रशिद म्हणाला, ‘तू हा महाल सगळा नीटपणे बघशील, तोवर बंदा हजार! ’
रशिदने आलिंगनबद्ध समीराला नजाकतीने दूर केलं॰ ती त्या आघातातून बाहेर येण्यापूर्वीच रशिद निघूनही गेला.
ही गोष्ट त्याने आधी का सांगितली नाही, हे जाणून घेण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला, पण जाणू शकली नाही.
जंगलामध्ये निघालेल्या एखाद्या बालिकेचा वेळ, फांद्यांवर झुलण्यात, खाली पडलेली फळे उचलण्यात, पक्ष्यांच्या मागे पळण्यात, फुलांबरोबर बोलण्यात, जसा जातो, तसंच काही तरी समीराबाबत झालं होतं.
ती घरामध्ये हांतरलेल्या मखमली गालीचावर फुलपाखराप्रमाणे बसत होती. बाथरूममध्ये सुगंधित पाण्याने भरलेल्या टबात फेसाबरोबर एकरस होत होती. बगिचात नाचणार्या कारंजातील पाण्याच्या शिडकाव्याने ती अनेक वेळा इंद्रधनुष्य होऊन जायची. अनेक वेळा नक्षीदर मोठ्या आरशासमोर बसून अलंकार बदलत राह्यची आणि विचार करत असायची, रशिद जेव्हा येईल, तेव्हा ती काय घलेल? ती एखाद्या चातकाप्रमाणे गुरुवारची प्रतीक्षा करायची.
गुरुवारी सकाळी रशिद हजर व्हायचा आणि समीरा अपल्या या फ़रिश्त्याबरोबर स्वर्गात, स्वर्गाचा आनंद घेत रहायची.
रशिद हळू हळू खजुराच्या कारभाराबद्दल समीराला सांगत गेला. आणि चतुर समीरा थोड्याच काळात सगळं काम शिकली.
पिवळ्या झालेल्या खजुराला झाडांवरून खाली उतरवायचं. वजन केल्यानंतर पॅकिंग करायचं, लेबल लावायचं आणि मोठमोठ्या खोक्यात भरून मस्कतला पाठवायचं. ती ही सगळी कामे इथल्या लोकांकडून चांगल्या तर्हेने करवून घ्यायची. तिथे या सगळ्या लोकांचा मॅनेजर सईद होता. तो केरळहून आला होता. तो आता तिचा उजवा हात झाल्यासारखा झाला होता. आपल्याच मुलुखातून आलेल्या मालकिणीचा, त्याच्यावर जो विश्वास होता, त्याचा त्याला अभिमान वाटत होता.
गडद रंगाच्या दुपट्टयाने आपले केस झाकून, आपल्या लोकांवर हुकूम चालवणार्या समीराच्या गालावर जेव्हा तिचे सोनेरी केस यायचे, तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत रहायचा. ही सुरमा घातलेली मालकीण त्याला गावात असलेल्या त्याच्या प्रिय बहिणीची आठवण करून द्यायची.
– क्रमशः भाग पहिला
☆☆☆☆
मूळ कथा : औरत
मूळ लेखिका : गिरिमा घारेखान. – मो. 8980205909.
गुजरातीतून हिंदी अनुवाद : राजेन्द्र निगम, मो. 9374978556
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






