श्री संजय जोगळेकर

? जीवनरंग ❤️

☆ सेफ्टी डोअर ☆ श्री संजय जोगळेकर 

आज वंदनाताई वेगळ्याच मूडमध्ये होत्या. सकाळचे आठही वाजले नव्हते पण आज अंघोळ, पूजा आवरून तयार होत्या. आज एक ठेवणीतली साडी नेसून तयार होऊन बसल्या होत्या.

खरं म्हणजे नेहमीच्या रूटीन प्रमाणे सकाळची आठची वेळ म्हणजे वंदनाताईंची बाहेरच्या टेरेसवरील झोपाळ्या वर बसून चहा आणि मोबाईलचा आस्वाद घेण्याची.

पाच एक मिनिटापूर्वीच त्यांची सून आणि मुलगा लगबगीने ऑफिसला निघाले.

जाता जाता त्यांनी विचारले सुद्धा

“आई आज एवढी नटून थटून बसलीस….. कुठे लग्नाला वगैरे जायचं आहे का तुला? खूप छानसा बुके ही मागवला आहेस म्हणून विचारतोय”.

“अरे लग्नाला वगैरे नाही. काम झालं की तुम्हाला सांगेन आधीच सांगितलं तर ते काम होत नाही असं म्हणतात. ”

“बरं बरं…. ऑल द बेस्ट. ”

खरंच वंदनाताईंच्या दृष्टीने ते एक वेगळं काम होतं. काम म्हणजे काय त्यांची आज एक लाडकी मैत्रीण येणार होती बऱ्याच महिन्यांनी…. काहीतरी नवीन स्कीम घेऊन.

तिचं नाव होतं तन्वी…. “भान” संस्थेची एक सेविका. वेळेची अगदी पक्की.

तन्वीला यायला अवघी पंधरा मिनिटे बाकी होती, तेवढ्यात वंदनाताईंनी जमेल तेवढं घर आवरून घेतले. घराबाहेर एक छान उदबत्ती लावली.

हॉल मध्ये एक रूम फ्रेशनर देखील मारला.

त्या पंधरा मिनिटात विचारांचे अगदी काहूर माजले होते त्यांच्या डोक्यात. कशासाठी येणार असेल तन्वी? काय स्कीम असेल?

“भान” संस्थेची तन्वी भेटल्यापासून वंदनाताईंची लाईफस्टाईल बरीचशी सिस्टिमॅटिक झाली होती. ठराविक वेळीच घरची पूजा करणे, सकाळ संध्याकाळ घराबाहेर उदबत्ती लावणे, आठवड्यातून ठराविक दिवशी देवळात जाणे, संध्याकाळची प्रार्थना वगैरे वगैरे बरेच काही. असो.

इतक्यात दारावरची बेल वाजली.

तन्वीच आली होती… आज एक वेगळाच पेहराव होता तिचा. डार्क ब्लू कलरची जीन्स अर्थात कुठेही न फाडलेली. पिवळसर रंगाचा एक छानसा कॉटनचा कुर्ता, एक ब्रँडेड पर्स, गळ्यामध्ये बारीक मोत्याची माळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीन्स असून देखील तन्वीने लावलेली एक छानशी टिकली. ती टिकली लक्ष वेधून घेत होती. जरा एक special च होती ती.

अगदी मोहरून गेल्या वंदनाताई.

“अगं किती महिन्यांनी आलीस आणि किती सुंदर दिसतेस गं तू. घरी गेल्यावर आईला दृष्ट काढायला सांग”.

तन्वी फक्त गालातल्या गालात हसली.

तशी वंदनाताई म्हणाल्या, “ तन्वी…… वेळ न दवडता बोल बाई लवकर. नाहीतर तुमच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे तीन मिनिटापेक्षा जास्ती बोलायचे नसते ना? तीन मिनिटे केव्हाच संपायची. हो….. आणि safety door च्या आतूनच बोलतेय मी…… तुमच्या नियमाप्रमाणे. ”

“ सांगते सांगते….. नीट ऐका. “भान” संस्थेतर्फे मी जेव्हा काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे आले होते तेव्हा मी म्हटलं होतं की आमच्या संस्थेची कुठलीही स्कीम नाही, योजना नाही, आमची अपेक्षा नाही, पण “भान” ला नाईलाजाने बदलावे लागले. आता एक नवीन स्कीम आणली आहे…. फक्त तरुण मुलींसाठी. स्कीम म्हणजे काय फक्त आपली लाईफस्टाईल थोडीशी बदलायची.

आता स्कीम ऐका….

आपल्या देशाच्या सिंदूर मोहिमेला मे महिन्यात एक वर्ष झालं ना. वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही स्कीम सुरू केलीय. आमची संस्था प्रत्येक Interested स्त्रीला एक “सिंदूर” चे म्हणजे टिकल्यांचे पाकीट विकत देते, ज्यात साधारणपणे 400 टिकल्या असतात. पारंपारिक, काळ्या, लाल, मरून, हिरव्या, पिवळ्या अशा गोल आकाराच्या आहेतच पण त्याशिवाय राफेल, ब्रह्मोस, S 400, sky striker suicide, drone, धनुष्यबाण, त्रिशूल अशीही चित्रे या टिकली वर print केल्येत. अर्थात टिकलीचा आकार गोलच आहे कारण तो आम्हाला शक्यतो बदलायचा नाहीये.

या चारशे टिकल्यांपैकी तुमच्या आवडीच्या हव्या त्या टिकल्या तुम्ही लावायच्या….. त्या देखील प्रत्येक महिन्याच्या 7, 8, 9 आणि 10 या तारखेला. ओळीने तीन महिने असे करायचे आणि त्याचा foto तुमच्या फेसबुक किंवा instagram वर टाकायचा आणि आमच्या संस्थेला पाठवायचा. फोटो टाकल्यानंतर ती स्त्री दिवसभर टिकली ठेवेलच असं नाही. हे आम्ही गृहीत धरलं आहे किंबहुना आमची तशी फारशी अपेक्षाही नाही. ”

मध्येच थांबून वंदनाताईने तिला विचारले,

” तरीच तू लावलेली टिकली मला काहीतरी special वाटली. “

तन्वी म्हणाली, “हो, यात S400 चे चित्र आहे”

“अय्या, सॉलिड…… काय छान आयडिया आहे. Great. किती कल्पकता….. पुढल्या महिन्यातच हळदी कुंकू आहे. हळदी कुंकवाला लुटायला खूप छान item आहे हा. अगदी एक पाकीट जरी घेतले तरी 4 बायका adjust होतील त्यात. आणि हो…… किती किंमत असेल गं एका पाकिटाची?

तन्वी थोडीशी गंभीर होऊन म्हणाली, “ अहो ताई पैशाचे जाऊ द्या…. जी गोष्ट आपल्या मुलींकडून सहजतेने घडायला हवी ती घडत नाही म्हणून अशी कल्पकता आणि अशा स्कीम आणाव्या लागतात. आपल्या धर्माचे दुर्दैव दुसरं काय. नाईलाज आहे आमच्या संस्थेचा. नुसती कल्पकता नाही तर काहीतरी आमिष दाखवावं लागलं. या चारही तारखांचे सलग 3 महिने टिकली लावलेले ज्यांचे फोटो आमच्याकडे येतील त्यांना आम्ही दुप्पट पैसे म्हणजे 500 रुपये परत करू. अहो 250 रुपये तर ही फक्त त्याची manufacturing cost आहे. तसंच आमचे जे मासिक निघते ना त्यात या सगळ्यांचे फोटो देखील छापणार आहोत. ”

“अय्या किती मस्त” वंदनाताई म्हणाल्या.

आता तर वंदना ताईंच्या डोळ्यातून फक्त अश्रू यायचे बाकी होते. त्यांनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या, “अग तन्वी आत ये ना गं…. आजच्या दिवस तुमचा नियम मोड ना गं…. मी सेफ्टी डोअर उघडते. बैस तरी पाच मिनिट, तोंड गोड करते तुझं…… बस ना…. नेहमीच तू घाईत असतेस. “

त्या आनंदाच्या भरात वंदनाताईंनी सेफ्टी डोअर हळूच उघडले.

तन्वी म्हणाली, “नाही हो काकू, मला खूप काम आहे आत्ताशी कुठे तुमचं पहिलंच घर झालं आहे आणि अशा गप्पा मारत बसले आणि तोंड गोड करत सुटले तर माझं टार्गेट नाही पूर्ण होणार”

“अगं पण मला एक सांग…. खरंच पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या अपेक्षेने आम्हा बायकांनी तुमच्या टिकल्या विकत घेतल्या आणि लावल्या तर तुम्हाला किती भुर्दंड पडेल. पैसा तर किती खर्च होईल आणि असे तुझ्यासारखे कितीतरी कार्यकर्ते असतील ना मग किती संख्या होईल त्याची. कशाकरता हा आटापिटा? यातून फायदा तर नाही उलट संस्थेच्याच खिशातील पैसे जाणार. ”

तन्वी म्हणाली “अहो काकू हेच तर वाईट आहे ना. पैसे गेले तर गेले, पण या आपल्याच हिंदू मुली. आपलीच परंपरा जपताना लाज वाटते ना यांना. आमच्या संस्थेचे जाऊ द्या, पण युट्युब वर “भारतीय महिलांची टिकली” किंवा “कुंकू” असा तुम्ही टॉपिक टाकून बघा, कितीतरी शास्त्रोक्त आणि उपयुक्त माहिती मिळेल तुम्हाला. “

“आमच्या संस्थेवर तुम्ही नका अवलंबून राहू पण युट्युब युनिव्हर्सिटीचे तरी ऐका म्हणजे तरी तुमचा विश्वास बसेल. “

“आपल्या हिंदू मुलींना कितीतरी गोष्टी सांगाव्या लागतात, शिकवाव्या लागतात गळी उतरवाव्या लागतात आणि हे जर झाले नाही तर काहीतरी वेगवेगळ्या स्किम्स पैसा आणि प्रसिद्धीचे आमिष दाखवून आणाव्या लागतात. जाऊ द्या. ”

वंदनाताई ना काय बोलावे ते सुचेना. क्षणभर दोघीही शांत होत्या.

तन्वी ने विचारले “मग तुमच्या सुनेचे नाव Register करू ना? “

म्हणाल्या, “अगं विचारायचे काय? ”

“अहो, तसं नाही काकू, एकदा तिला फोन लावा…. तिला “हो” म्हणू द्या. ”

“अग ताई, माझी सून माझ्या शब्दा बाहेर नाही गं. आमच्या घरचे दोन मेंबर धर. ”

“दोन मेंबर कोण? ”

“अगं….. दुसरी मी. ”

“माफ करा वंदनाताई, तुम्ही मेंबर नाही होऊ शकणार. ”

“का बरं? ”

“मी पण आहे की इंस्टाग्राम वर फेसबुक वर व्हाट्सअप वर सगळीकडे आहे. अहो ताई एक सांगायचे राहिले. तुम्ही वयाच्या अटीत बसू शकत नाही, कारण ही योजना फक्त 20 ते 40 या वयोगटातल्या बायकांनाच लागू आहे. ”

इतका वेळ उत्साहाने बोलणाऱ्या वंदनाताई क्षणार्धात हिरमुसल्या….. रडवेल्या झाल्या.

तन्वीने देखील नाईलाजाने अगदी अलगदपणे सेफ्टी डोअर ओढून घेतले आणि म्हणाली, “वाट बघते तुमच्या सुनेच्या फोनची. “

– – वंदनाताई सेफ्टी डोअर मधून पाठमोऱ्या तन्वी कडे शांतपणे बघत होत्या

 

© संजय मुकुंद जोगळेकर

मो. 9867180426 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted