हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शशि साहित्य # ३८ – कविता – अविकारी… ☆ श्रीमती शशि सराफ ☆

श्रीमती शशि सराफ

(श्रीमती शशि सुरेश सराफ जी सागर विश्वविद्यालय से हिंदी एवं दर्शन शास्त्र से स्नातक हैं. आपने लायंस क्लब और स्वर्णकार समाज की अध्यक्षा पद का भी निर्वहन किया. आपका “लेबल शशि” नाम से बुटीक है और कई फैशन शोज में पुरस्कार प्राप्त किये हैं. आपका साहित्य और दर्शन से अत्यधिक लगाव है. आप प्रत्येक शुक्रवार श्रीमती शशि सराफ जी की रचनाएँ आत्मसात कर सेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता अविकारी…।)

☆ शशि साहित्य # ३८ ☆

? कविता – अविकारी… ☆ श्रीमती शशि सुरेश सराफ  ? ?

कंटीले बबूल को सौंप दी, बगिया की पहरेदारी,

फिर कभी खिल ना सकी, कोई फूलों की क्यारी…

*

रेत पर बने नक्शे कदम पर चलने की तैयारी,

और सौंप दी समुद्र को संरक्षण की जिम्मेदारी…

*

कहां निभाऊं, कहां खर्च करूं, अपनी उर्जा सारी,

पौधों को सहला रहे, हाथ में रखकर आरी…

*

इठलाती, बलखाती, दीवानी ने खो दी मिठास सारी…

अब ढूंढ रही है “एक कतरा अस्तित्व”  नदी बिचारी…

*

वादा किया है होठों पर, मुस्कान रहेगी तारी…

शर्त यह है कि आंखों से, अश्रु की धार रहे जारी…

*

कोशिश थी कि दीप जलाकर, दूर करें अंधियारी,

साथ बवंडर लिए फिरते हैं, कैसे हो उजियारी…

*

सभी स्वार्थ में डूब गए हैं, कैसे निभे यहां यारी,

मधुर वचन की आस लिए हम, उनके मुंह दो धारी…

*

सब कुछ आजमा लिया..!! देख रहा है “अविकारी”

हाथ जोड़कर समक्ष उसके, सौंप दी सारी जिम्मेदारी…

© श्रीमती शशि सराफ

जबलपुर, मध्यप्रदेश 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०६ – मृत्यू नंतर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०६ – विजय साहित्य ?

☆ मृत्यू नंतर…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अक्षर छंद – १७ अक्षरी द्विपदी. वीस ओळी.)

‌मृत्यूनंतर, यमलोकाचा,

प्रवास होतो, सुरू

आठवणींना, काळीज वेडे,

पहा लागते, स्मरू.

*

यमदूताच्या, सवे निघाली,

आत्म ज्योतीची, यात्रा

तिथे न चाले, कलेवरी त्या,

इहलोकीची, मात्रा.

*

मृत्यू नंतर, हिशेब होतो,

पदा पदांचा, जेव्हा

गंगा यमुना, गालावरती,

खळाळ धावे, तेव्हा…!

*

नश्वर देहा, सोडून जाते,

व्यक्ती ‌लाडकी, जेव्हा

प्रवास चालू, परलोकीचा,

आज्ञातातील, तेव्हा.

*

मृत्यू नंतर, सरते सारे,

उरे न काही, मागे

आप्त मंडळी, करती चर्चा,

आठवणींना, जागे

*

मृत्यू नंतर, फिरतो आत्मा,

मागे उरते, माया

दहा दिसांनी, पिंडदान ते,

श्रृती स्मृतींची, छाया.

*

आला एकटा, जाई एकटा,

कैक जोडली, नाती

काळ घेऊनी, पहा धावतो

कुणा न लागे, हाती.

*

मृत्यू नंतर, कुणी पाहिला,

प्रवास ज्याचा, त्याचा

ज्ञात क्षणांनी, कर्म फलाचा

संचीत केला, साचा.

*

असा प्रवासी, सखा सोबती,

दूर देशी त्या, राही

हळव्या नेत्री, दुनिया त्याची,

कशी वागते, पाही.

*

अंतरातले, आभास त्याचे,

पहा सांगती, काही

संपून गेला, प्रवास आता,

मागे फिरणे नाही.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रिमझिमल्या सरी… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ रिमझिमल्या सरी ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

रिमझिमल्या सरी माझ्या अंगणात

मृगाच्या आठवणी भरल्या मनात

गेल्या चिऊ काऊ आपल्या घरी

माती गंधाळली साऱ्या शिवारी

 *

भरे आनंद शेतकऱ्याच्या घरात

उद्याले पेरणी बीज पडेल शेतात

 *

हात जोडुनी बीज येई तरारुनी

शिवार फुलते गात अभंग गाणी

 *

पाऊस वाऱ्याने झाड लागे बोलू

हिरवं शिवार पिक लागले डोलू

 *

 शिवारात चालू झाली भांगलण

आनंदे माय येई वाऱ्याला उधाण

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पर्यावरण शिबीर… 3023… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पर्यावरण शिबीर… 3023… ” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“… मित्रांनो! हे जे चित्र दिसतय त्याला वृक्ष किंवा झाडं असे फार फार पूर्वी म्हणायचे. हे झाड निसर्गाचा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जात होता.आज जो आपल्याला प्राणवायू नळकांड्यातून घ्यावा लागतोय ना त्यावेळी प्राणवायू मुबलक होता आणि तोही झाडांमुळे.चराचराच्या आरंभापासून झाडांचे अस्तित्व अबाधित होते.निसर्गातला तो उपयुक्त घटक..पान, फूल, फळा बरोबर सावली, शुध्द हवा, वेळेवर पाऊस, जमिनीची धूप कमीत कमी धूप, अन्नधान्य, गरजेचा लाकूडफाटा, वनोंषौधी इ.इ.अगणित फायदे तेव्हा आपल्या पूर्वजांना मिळाले होते.त्यांनीही त्याचं जिवापाड जतन, संवर्धन केलेले होते.त्याला देवत्व बहाल करून त्याची पूजा करत होते.

आज आपण जिथे बसलो आहोत याच जागेवर हजारो वर्षांपासून या पर्यावरण विषयक अगणित शिबिरे, चर्चासत्र, परिसंवाद घडत आलेले आहेत.आपल्या सारख्या काही अतिसंवेदनशील,

पर्यावरणप्रेमी मित्रांनी या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इथेच तीव्र आंदोलन, धरणं, मुक मोर्चा काढले होते.तर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही पर्यावरण बचाव मोहीम आजही तशीच तितक्या गांभीर्याने पुढे सुरू आहे.मित्रांनो! हा प्रवास, हा लढा, हा संघर्ष अजूनही फलद्रूप ठरलेला नाही.याचं कारण काय म्हणून विचाराल तर हा आपलाच लढा आपल्याशी आपण करत आहोत.ऐकायला थोडसं विचित्र वाटेल.पण सत्य नजरे आड करू शकत नाही.आज आपण जिथे जमलो आहोत तोच भू भाग ऐके काळी हिरव्या हिरव्या घनदाट जंगलांनी व्यापलेला होता.केव्हढी प्रचंड जंगल संपत्ती होती तेव्हा, त्याचबरोबर जलसंपत्ती, वनौषधी संपत्ती, अन्नधान्य-फल संपत्ती, पशुपक्षी, कृमी किटक, इ. इ. अक्षय असा अवाढव्य संपत्तीचा साठा भरलेला होता.कशाचीच कमतरता कधीच भासली नव्हती, तेव्हा पर्जन्यमान भरपूर प्रमाणात वेळेवरच पडत असे, जमीनीची धूप होत नसे, ओढे, नाले, तळी, विहीरी जलाने तुडुंब भरलेल्या असत.पांथस्थांना गर्द सावलीचा निवारा मिळत असे.आणि आपल्या पूर्वजांची वस्ती या जंगलाच्या आसपासच्या परिसरापासून दूर दूर च्या मैलोगणती प्रांतात पसरली होती.आपले पूर्वज निसर्गप्रेमी होते.ते स्वतः बरोबर या पर्यावरणाची काळजी घेत .त्याचं संवर्धन करत असत.एकंदरीत त्यावेळी भूतलावर स्वर्गीचे नंदनवनच अवतरले होते म्हणाना.शुष्क काष्ठ झालेले वठलेलं एक झाडं तोडायचं त्यांच्या जीवावर येई.त्याच्यापायी असलेली कृतज्ञता त्याला असलं कृतघ्नपणाचं कामं करण्यास परावृत्त करीत असे.पण निसर्गाच्या नियमात नव्या कोंबाला विकास साधायला जुन्या खोडांना नेस्तनाबूत होण्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे अशी शुष्क काष्ठ झालेले वठलेलं एकेक झाडं कामाला येई.पण पण हे कृत्य करत असताना आपले पूर्वज एकाच्या ठिकाणी चार चार झाडं लावत गेले.आपली जशी आबादी जपली तशीच निर्सगाची सुद्धा.याचा इष्ट तो परिणाम त्यांना दिसून येत असे.सगळीकडे समृद्धी, आनंद सुख शांती अनुभवता येत असे.एक आनंदघन संगित निसर्गात गुंजत राहत असे.

पण हळूहळू काळ बदलत गेला… गुगल नि नेटचं जंगलाच़ जाळं पसरत गेलं… आणि पूर्वजांच्या नव्या नव्या पिढ्या पटी पटीने वाढत गेल्या त्यांचं जंगलामुळे जीवीतमान वाढत गेले तसे त्यांना जागेची टंचाई भासू लागली… एक झाड तोडले म्हणून काही जंगल नामशेष होत नाही ही स्वताची समजुत आपल्या हव्यासापायी त्याने घालून  घेतली नि हळूहळू एकेक करत जंगलाची कत्तल तोड सुरू झाली… कलीने ग्रासले… हव्यास, स्वार्थ, सारख्या षड्रिपूंने निर्सगाचे ओरबाडणे सुरू केले.जंगलतोड, लाकुडतोड, चंदन, औषधी, साग, साल झाडाची कत्तल करण्यात आली, ..जळणासाठी,  विक्री साठी, ..हे कमी होतं त्यात जंगलसपाट करून भू भाग बळकाविण्यासाठी ऐनकेन प्रकार अवलंबिले गेले… इतकचं काय आता ज्याच्यावर तुम्ही बसला आहात ते सुद्धा एकेकाळचे वटवृक्ष होते… पण ते त्यावेळी ठेकेदार, वनरक्षक, शासनबाबू, दरबारी यंत्रणा नियमांचे कागदी फुसके घोडे नाचवून तोडून टाकले गेलेले असे आहेत… कागदावर झाडांची नि जंगलाची संख्या वारेमाप दिसते.पण प्रत्यक्षात मात्र तिथे उजाड माळ नि वाळवंट आहे… सिमेंटची जंगलं उभा राहू लागली… नि नैसर्गिक जंगल सपाट झाली.. विकासाचा विधायक मार्ग जंगल बचावच्या इच्छाशक्तीच्या अभावी विघाताच्या विचारानुसार गेला… पर्यावरणाचा र्हास झाला प्रदुषणाचा विळखा पडला… साधी शुद्ध ताजी, प्राणवायूची हवा मिळेनाशी झाली, पाणी आटले, वनस्पती नाहीशी झाली, वन्यजीव उध्वस्त झाले..शिकार वाढली.अवैध धंदे वाढले… पर्जन्य घटले…

… या चित्रात तुम्ही पाहता आहात त्याला वृक्ष, झाडं असे नावाने ओळखले जात असे… आता ते आपल्याला कुठेच दिसत नाही… आणि हे वृक्षारोपण पुन्हा आपल्याला नव्याने सुरू करायला हवे… आता सुरुवात केली तर आपल्या नातवंड पतवंडानां सुखाचे जाईल… जी चूक आमच्या वाडवडिलांच्यापासून त्यांनी केली फक्त वृक्षारोपणाचे फक्त फोटोच मागे राहिले आणि वृक्ष जगलेच नाहीत, जगवलेच नाहीत… विकासाच्या कार्यात वृक्षतोड करताना एकास चार वृक्ष लावण्याची अट घातली गेली होती .पण तेही एकाचे चार फक्त कागदावर दाखवून पैका मात्र खोऱ्याने ओढला गेला… गळा मात्र सगळयांनी एकाच सुरात लावला… निसर्ग कोपला कोपला… झाडे लावा झाडे जगवा घोषणा मात्र दुमदमल्या नि भिंती भिंती रंगल्या… पण एक झाड काही जगले नाही ते नाहीच.या दुष्परिणामाला आपण बळी पडत आहोत.पण आपण हि चुक सुधारायाचा प्रयत्न केला पाहिजे… तर हि वसुंधरा तरेल आणि आपल्या वारसांना तारेल… नाहीतर जगणं या चित्रात दिसतय तस वाळवंट होईल… ”

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे ☆ श्री दिवाकर बुरसे

‘मी कसे जगावे?’ या प्रश्नापासून ‘मी कोण आहे?’ या अंतर्मुख प्रवासापर्यंत…

मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे नाव नसते, धर्माची जाणीव नसते, विचारांची निश्चित चौकट नसते. तो केवळ एक शक्यता असतो—जगण्याची, जाणण्याची, अनुभवण्याची आणि शोधण्याची.

हळूहळू त्याला शिकविले जाते—हे करावे, हे करू नये; हे पवित्र, ते अपवित्र; हे कर्तव्य, ते अकर्तव्य. तो ईश्वराचे स्मरण करायला शिकतो, प्रार्थना करतो, संस्कार स्वीकारतो, परंपरा शिकतो आणि जपतो.

परंतु या सर्वांच्या पलीकडे एक प्रश्न कधीतरी त्याच्या अंतर्मनाच्या द्वाराशी येऊन उभा राहतो—

“मी नेमका कोण आहे? ”

आणि त्याच क्षणी आणखी एक प्रश्न मनाला अंतर्मुख करतो—

“धार्मिक असणे म्हणजेच अध्यात्मिक असणे का? ”

धर्म ही बाह्य आचरणाची वाट आहे आणि अध्यात्म ही अंतःकरणात उजळत जाणारी यात्रा आहे का?

की या दोन्ही वाटा शेवटी एकाच सत्याकडे घेऊन जातात?

या प्रश्नांपासूनच धर्म आणि अध्यात्म यांच्यातील सूक्ष्म नाते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो.

दृश्य विश्वाच्या पलीकडे अदृश्याचा शोध

आपण ज्या विश्वात वावरतो ते दृश्य आहे. त्याला आकार आहे, रंग आहे, स्पर्श आहे, गंध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध परंपरांमध्ये या दृश्य विश्वाचे विवेचन पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भात केले जाते. त्याचबरोबर सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचाही विचार केला जातो. या घटकांच्या परस्परसंबंधातून प्रकृतीचे असंख्य आविष्कार प्रकट होतात.

आपले शरीरही याच प्रकृतीचा एक भाग आहे. जन्म, वृद्धी, परिवर्तन, क्षय आणि मृत्यू या सर्व प्रक्रियांना ते बांधील आहे.

परंतु प्रश्न इथेच संपत नाही.

या शरीराला जाणणारे ‘मी’ कोण?

नेत्र पाहतात; परंतु पाहणारा कोण?

कर्ण श्रवण करतात; परंतु ऐकणारा कोण?

मन विचार करते; परंतु त्या विचारांची जाणीव कोणाला होते?

याच शोधयात्रेतून अध्यात्माच्या प्रदेशाचा आरंभ होतो.

परमात्मा, ब्रह्म, ईश्वर किंवा चैतन्य—या संकल्पनांना विविध तत्त्वज्ञानपरंपरांनी निरनिराळी नावे आणि अर्थ दिले आहेत. मात्र त्यामागील मूलभूत जिज्ञासा एकच आहे—

दृश्याच्या पलीकडे अदृश्य काय आहे? आणि बाह्य विश्वाच्या पलीकडे माझ्या अस्तित्वाचे अंतिम स्वरूप काय आहे?

अध्यात्म म्हणजे या प्रश्नांना तयार उत्तरांनी झाकून टाकणे नव्हे; तर त्या प्रश्नांसमोर निःसंकोचपणे उभे राहणे.

अध्यात्म : स्वतःकडे वळलेली दृष्टी

‘अध्यात्म’ हा शब्द व्यापक अर्थाने आत्मतत्त्वाशी संबंधित चिंतन, आत्मशोध आणि अंतर्मुख साधना यांच्याशी जोडला जातो.

परंतु अध्यात्म म्हणजे केवळ नेत्र मिटून ध्यानस्थ होणे नव्हे.

अध्यात्म म्हणजे स्वतःच्या विचारांकडे पाहणे.

स्वतःच्या अहंकाराची जाणीव करून घेणे.

स्वतःच्या भयाचा मागोवा घेणे.

स्वतःच्या लोभाला प्रश्न विचारणे.

स्वतःच्या क्रोधाचे मूळ शोधणे.

आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—स्वतःविषयीच्या आपल्या समजुतींचीच चिकित्सा करणे.

आपण ईश्वराचे स्मरण किती वेळा करतो यापेक्षा, त्या स्मरणामुळे आपल्यात किती नम्रता निर्माण झाली, हा प्रश्न अध्यात्म विचारते.

आपण किती ग्रंथ वाचले यापेक्षा, त्या वाचनामुळे आपल्या आचरणात काय परिवर्तन झाले, हा प्रश्न अध्यात्म विचारते.

कारण ज्ञान मस्तिष्कात साठविणे आणि ज्ञान जीवनात उतरविणे यात मोठा भेद आहे.

अध्यात्म म्हणजे काही क्षणांचा विधी नसून, संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची एक अंतर्मुख दृष्टी आहे.

धर्म : केवळ उपासना नव्हे, तर जगण्याचे दायित्व

‘धर्म’ म्हटले की आपल्या मनात ईश्वर, देवालय, पूजा, उपासना, उत्सव, परंपरा, व्रते आणि धार्मिक विधी यांची चित्रे उभी राहतात. परंतु भारतीय विचारपरंपरेत ‘धर्म’ या संकल्पनेचा अर्थ यापेक्षा कितीतरी व्यापक आहे.

धर्म म्हणजे कर्तव्य, नैतिकता, सदाचार आणि जीवनाला व समाजाला धारण करणारी मूल्यव्यवस्था.

“धारयति इति धर्मः” — जे धारण करते, टिकवते, सांभाळते, त्याला धर्म असे म्हणण्याची व्याख्या याच व्यापक अर्थाकडे निर्देश करते.

अग्नीचा धर्म उष्णता देणे; जलाचा धर्म प्रवाहित होणे—अशा उदाहरणांत ‘धर्म’ म्हणजे एखाद्या वस्तूचा स्वभाव किंवा गुणधर्म असाही अर्थ अभिप्रेत असतो.

मग मनुष्याचा धर्म काय? 

सत्य, करुणा, न्याय, संयम, कर्तव्यबुद्धी, प्रामाणिकता आणि अन्य जीवांच्या अस्तित्वाचा आदर—हे मनुष्यत्व टिकविणारे गुण असतील, तर त्यांना आपल्या जीवनात स्थान देणे हीच धर्माची खरी कसोटी ठरते.

म्हणूनच धर्म केवळ देवतेसमोर हात जोडण्यात नसतो.

देवालयातून बाहेर पडल्यानंतर आपण मनुष्यांशी कसे वागतो, यातही धर्म असतो.

धर्म विचारतो— ‘मी कसे जगावे?’

धर्म मनुष्याला जीवनासाठी एक चौकट प्रदान करतो.

काय योग्य?

काय अयोग्य?

माझे कर्तव्य काय?

माझे दायित्व काय?

समाजाशी माझे नाते कसे असावे?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न धर्म करतो.

भगवद्गीतेच्या संदर्भात कर्तव्य आणि स्वधर्माचा विचार मध्यवर्ती आहे. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, त्यामागील आसक्ती आणि स्वार्थ कमी करणे आणि कर्म अधिक व्यापक भावनेने करणे—हा विचार निष्काम कर्माच्या दिशेने घेऊन जातो.

म्हणजेच  धर्म आपल्याला जगण्याची दिशा देतो. 

परंतु दिशा प्राप्त झाली म्हणून प्रवास पूर्ण होत नाही.

इथेच अध्यात्म पुढे येते.

अध्यात्म विचारते— ‘मी कोण आहे?’

धर्म म्हणतो—कर्तव्य कर.

अध्यात्म विचारते—कर्तेपणाची जाणीव कुणाला आहे?

धर्म म्हणतो—सत्य बोल.

अध्यात्म विचारते—सत्यापासून मी स्वतः का दूर जातो?

धर्म म्हणतो—अहंकार सोड.

अध्यात्म विचारते—हा ‘मी’ नेमका कोण आहे, ज्याला मी अहंकार म्हणतो?

धर्म बाह्य आचरणाला शिस्त देतो; अध्यात्म अंतर्मनाला दर्पण दाखवते.

धर्म समाजाशी असलेले आपले नाते सुसंवादी करण्याचा प्रयत्न करतो; अध्यात्म स्वतःशी असलेले आपले नाते समजून घेण्याचा प्रयत्न करते.

म्हणूनच—

«धर्म कर्तव्य शिकवतो; अध्यात्म कर्त्याचा शोध घेते. »

मग धार्मिक व्यक्ती म्हणजे अध्यात्मिक व्यक्ती का? 

हा प्रश्न टाळून धर्म आणि अध्यात्म यांचे नाते पूर्णपणे समजून घेता येणार नाही.

धार्मिक व्यक्ती अध्यात्मिक असते आणि अध्यात्मिक व्यक्ती धार्मिक असते, असे सरसकट म्हणता येईल का? 

उत्तर आहे—नेहमीच नाही.

एखादी व्यक्ती नियमित पूजा करू शकते, धार्मिक विधी पाळू शकते, तीर्थयात्रा करू शकते, धार्मिक ग्रंथांचे वाचन करू शकते; परंतु त्याच वेळी तिच्यात अहंकार, असहिष्णुता, द्वेष, असत्य किंवा स्वार्थ कायम राहू शकतो.

मग तिच्या धार्मिक आचरणाचा अंतर्मनावर किती परिणाम झाला आहे?

हा प्रश्न विचारावाच लागतो.

त्याउलट एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचे बाह्य आचरण करीत नसली, तरी ती सत्याचा शोध घेत असेल, स्वतःचे परीक्षण करीत असेल, करुणेने वागत असेल, लोभ आणि अहंकारावर संयम ठेवत असेल आणि जीवनाच्या अंतिम अर्थाचा शोध घेत असेल, तर तिच्यात अध्यात्मिक प्रवृत्ती असू शकते.

म्हणून—

धार्मिक असणे ही अध्यात्मिक असण्याची हमी नाही; आणि अध्यात्मिक असणे ही विशिष्ट धर्माचे अनुयायी असण्याची अट नाही. 

मात्र याचा अर्थ धर्म आणि अध्यात्म परस्परविरोधी आहेत, असा अजिबात नाही.

उलट, त्यांच्या श्रेष्ठ स्वरूपात ते एकमेकांना समृद्ध करतात.

धर्म अध्यात्मासाठी भूमी तयार करू शकतो आणि अध्यात्म धर्माला अंतःकरण देऊ शकते. 

विधी आणि अनुभूती यांच्यातील अंतर

भू – आरेखन (नकाशा) म्हणजे प्रवास नव्हे.

दिशा म्हणजे गंतव्य नव्हे.

शब्द म्हणजे अनुभूती नव्हे.

आणि धार्मिक विधी म्हणजे अध्यात्मिक अनुभूती नव्हे.

घंटानाद, मंत्रोच्चार, पूजा, ग्रंथवाचन—या सर्वांचे स्वतःचे महत्त्व असू शकते. ते मनाला एकाग्र करतात, परंपरेशी जोडतात, सांस्कृतिक स्मृती जिवंत ठेवतात.

परंतु पूजा संपल्यानंतरही मनातील क्रोध तसाच राहिला, प्रार्थना संपल्यानंतरही अहंकार तसाच राहिला, देवालयातून बाहेर पडल्यानंतरही मनुष्याबद्दलचा द्वेष तसाच राहिला—तर त्या साधनेचा अंतर्मुख परिणाम किती झाला, हा प्रश्न उरतोच.

धार्मिकतेचे बाह्य प्रदर्शन वाढले, म्हणून धर्माची अंतर्गत खोली वाढतेच असे नाही. प्रचंड ध्वनी, दिखाऊपणा, स्पर्धा, अनावश्यक व्यय आणि गर्दी—हे धर्माचे पर्याय होऊ शकत नाहीत.

ईश्वराच्या नामस्मरणाचा ध्वनी मोठा असण्यापेक्षा अंतःकरणातील कोलाहल शांत होणे अधिक महत्त्वाचे नाही का?

देवालयासाठी मोठी देणगी देणे पुण्यकारक असू शकते; परंतु आपल्या घरातील वृद्धाशी दोन प्रेमळ शब्द बोलणे, गरजू व्यक्तीला साहाय्य करणे, अन्यायाच्या वेळी सत्याच्या बाजूने उभे राहणे—हीसुद्धा धर्माचीच रूपे आहेत.

कारण धर्माची खरी परीक्षा पूजा सुरू असताना होत नाही.

पूजा संपल्यानंतर सुरू होते.

धर्म विभागतो की धर्माच्या नावाचा अहंकार विभागतो? 

धर्माच्या नावाने इतिहासात संघर्ष झाले, भेद निर्माण झाले, मनुष्यसमूह विविध ओळखींमध्ये विभागले गेले—हे वास्तव नाकारता येत नाही. विद्यमान स्थितीही तशीच आहे.

परंतु त्याचा दोष धर्माच्या मूलभूत मूल्यांमध्ये आहे की धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या अहंकारी ओळखींमध्ये?

धर्म जेव्हा करुणा, सत्य, संयम आणि कर्तव्य शिकवतो, तेव्हा तो मनुष्याला उन्नत करतो.

परंतु धर्म जेव्हा ‘माझेच सत्य अंतिम’ या अहंकारात परिवर्तित होतो, तेव्हा तो भिंत उभी करू शकतो.

अध्यात्माची खरी शक्ती इथेच जाणवते.

कारण आत्मशोध जितका सखोल होत जातो, तितका ‘मी’चा अहंकार विरघळण्याची शक्यता वाढते.

आणि ‘मी’च्या भिंती क्षीण झाल्या की ‘आपण’ची जाणीव विस्तारू शकते.
म्हणून अध्यात्म कोणत्याही धर्माचा विरोध करण्यासाठी नाही; तर धर्माला त्याच्या मानवी आणि नैतिक मुळाशी परत नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

धर्माचा पाया, अध्यात्माची उंची

धर्म आणि अध्यात्म यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.

धर्माविना अध्यात्म कधी कधी दिशाहीन होऊ शकते.

अध्यात्माविना धर्म कधी कधी केवळ बाह्य कर्मकांडात अडकू शकतो.

धर्म म्हणतो—कर्तव्य विसरू नकोस.

अध्यात्म म्हणते—कर्तव्य करताना स्वतःला विसरू नकोस.

धर्म जीवनाला शिस्त देतो.

अध्यात्म जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करते.

धर्म मनुष्याला सदाचार शिकवतो.

अध्यात्म त्या सदाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते.

म्हणून धर्म आणि अध्यात्म यांच्यात संघर्षापेक्षा संवाद अधिक आवश्यक आहे. 

एक बाहेरून आत जाणारी वाट आहे; दुसरी आतून बाहेर येणारी प्रकाशरेषा.

आणि अखेर…

मनुष्याने आयुष्यभर धर्म पाळला, परंतु मनुष्यत्व गमावले—तर त्याने काय प्राप्त केले?

त्याने असंख्य वेळा प्रार्थना केली, परंतु स्वतःच्या मनातील द्वेष ओळखला नाही—तर त्या प्रार्थनेने त्याच्यात किती परिवर्तन घडविले?

त्याने अध्यात्मावर शतावधी ग्रंथ वाचले, परंतु एखाद्या दुःखी मनुष्याच्या डोळ्यांतील अश्रू समजून घेतले नाहीत—तर त्या ज्ञानाचे प्रयोजन काय?

कदाचित धर्म आणि अध्यात्म यांचा अंतिम अर्थ याच ठिकाणी एकत्र येतो—

माणूस अधिक माणूस होणे.

मन अधिक निर्मळ होणे.

विचार अधिक व्यापक होणे.

कर्तव्य अधिक प्रामाणिक होणे.

अहंकार अधिक क्षीण होणे.

आणि आपल्या अस्तित्वाकडे पाहताना—‘मी’च्या पलीकडे ‘आपण’ची जाणीव जागृत होणे.

धर्माची खरी ओळख देवालयांच्या उंच कळसांत नसून, मनुष्याच्या आचरणात दिसते.

अध्यात्माची खरी ओळख ध्यानाच्या शांत कक्षात नसून, त्या शांततेतून बाहेर पडलेल्या मनुष्याच्या कृतीत दिसते.

शेवटी प्रश्न असा नाही की—

“मी किती धार्मिक आहे?”

किंवा,

“मी किती अध्यात्मिक आहे? ”

खरा प्रश्न कदाचित याहून अधिक साधा आणि अधिक कठीण आहे

“माझ्या धर्मामुळे माझ्यातील मनुष्यत्व वाढले का? ”

“माझ्या अध्यात्मामुळे माझ्यातील ‘मी’ थोडा कमी झाला का? ”

जर या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतःकरणातून शांतपणे ‘हो’ म्हणून उमटली, तर कदाचित आपण धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे निघालो आहोत.

आणि कदाचित ही यात्रा कुठल्यातरी देवालयात, तीर्थक्षेत्री किंवा ग्रंथाच्या पानावर संपणार नाही.

ती संपेल—त्या दिवशी, जेव्हा आपण स्वतःमध्ये डोकावून पाहू आणि जाणवेल की ज्याचा शोध आपण आयुष्यभर बाहेर घेत होतो, त्या शोधाचा आरंभ तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासूनच झाला होता!!

©️ लेखक: दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९५५२ ६ २९ २ ४ ५
कृष्णाष्टमी ४ सप्टेंबर २०२६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सरिता वहिनी आणि पेकाडे भाऊजी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “सरिता वहिनी आणि पेकाडे भाऊजी” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

नमस्कार वहिनी नमस्कार… सुहास भाऊजी आत येत म्हणाले. सरिता वहिनी म्हणाल्या, ” या पेकाडे भाऊजी अहो पाहिलंत का कोण आलयं… तुमचे परममित्र सुहास पेकाडे आले आहेत”… नवरा बाहेर आला आणि म्हणाला, ” ये ये सुहास अरे किती दिवसांनी? … आणि लंगडायला काय झालं तुला? . “” अरे काही नाही परवा विमानतळावर गेलो होतो मुख्यमंत्री येणार होते ना… वृत्त संकलनाला मला पाठवले होते. गर्दीमध्ये जरा चेंगराचेंगरीत पाय पडला आणि… ” इतक्यात सरिता वहिनी म्हणाल्या, ” आणि तुमचे पेकाड मोडले…! भाऊजी कशाला करता ती पत्रकारिता… एवढी मोठी शेती… गावाकडे जाऊन करा ना… “” सरिता आता तो विषय नको”, नवऱ्याने तिला दटावले अर्थात प्रेमानेच आणि म्हणाला, ” फक्कड दोन कप चहा टाक..! तुझ्या हातचा चहा सुहासला आवडतो… “. ती म्हणाली, ” हो हो करते “.. सुहास म्हणाला, ” कराल हो वहिनी बसा… बाकी कसे आहात तुम्ही? … आणि प्रगती आणि विकास काय म्हणतोय? “… ” भाऊजी मी छान आहे! “मी छान नसायला काय झालं सरकारची लाडकी बहीण आहे ना! … मी फुकट खाऊ… प्रगती मात्र खुंटली आहे आणि विकास उडाण टप्पू निघाला त्यामुळे तो भकास झालाय”… “वहिनी असं कोड्यात बोलू नका ना…! ” अगबाई! कोड का काय हे भाऊजी मी सरळ सरळ सांगते… मला सांगा प्रगती खुंटली आहे का नाही? पेपर मध्ये खोटे आकडे देऊन सरकार, न परवडणारी आश्वासन देऊन अमिषं दाखवून सत्ता मिळवतात आणि बळकट करतात त्यानंतर देशाची किती छान प्रगती झालेली हे तुम्ही लिहिता आणि विकासाचे खोटे खोटे आकडे देता… हे बांधलं ते बांधलं… ते उभं केलं… अहो… सगळी तरुणाई बेकार फिरते… गुटक्याच्या थुंक्याने रस्ते रंगलेत… त्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे बोंबलत फिरते तरुणाई… देशाचा विकास म्हणजे बिल्डिंगा नाहीयेत… आपल्या तरुण मुलांचा विकास झाला पाहिजे… सोलापुरात एक उद्योग धंदा नाही एक उद्योजक हे इथे यायला तयार नाही… का तर दहशतवाद…! इथली माणसं गुंड आहेत… मुंबई धडा धडा गोळ्या घालतात ते चालते काय? इथल्या माणसाना पोटाला खायला.. द्या हाताला काम द्या… त्यांच्या लेकरा बाळांना चांगले शिक्षण द्या… हो आणि यातलं फुकट काही देऊ नका. या सगळ्या फुकट्यांमुळे तरुण मुलांचं फावले काम नाही धंदा नाही मोकाट फिरतात गाव सोडून काम सुरू झाले गेलेत पोरं आणि फिरत आहेत पुढाऱ्यांच्या मागे म्हाताऱ्यांचा गाव झाले आमचं… हा आता विकासाच म्हणत असाल तर झालाय ना खूप झालाय… नगरसेवकांचा झालाय.. सरपंचाचा झालाय.. त्यांच्या पोरा बाळांचा झालाय… आमची गुलामगिरी ची मानसिकता जोपासण्यात ही सगळी मंडळी हुशार झालेत. पिढ्यान पिढ्या तीच माणसं खुर्च्यांवर बसली पाहिजेत त्यांच्याच घरातले सगळे सत्तेत हवेत अण्णासाहेब दादासाहेब मग भैय्यासाहेब ताईसाहेब मग बाळासाहेब आम्हाला आमच्या पोराबाळाना… कोणाला काही स्वप्न नाही.. कोणाला इच्छा नाही… हुशार हुशार पोरं गुजरेगिरी करण्यात आपला आयुष्य घालवतायेत.. आणि त्या पुढार्‍यांची बावळट कार्टी कुठलाही अभ्यास नाही… बापाच्या, आज्याच्या, आईच्या नावावर सत्तेवर बसतात आणि लगेच कोट्याधीश…? आणि तुम्हा पत्रकारांना एकालाही विचारवसं वाटत नाही का हो.. की बाबा रे तू नगरसेवक होऊन एक वर्ष झालं तू आमदार होऊन एक वर्ष झालं… तुझ्या नावावर एवढा पैसा कुठून आला? ते धाडस काय फक्त नाना पाटेकरांनी करायचं का? तुम्ही काय करणार? … तुमच्या वृत्तपत्रातनं मारा की बोंबा जरा… पण ते नाही, सगळी भलावण करायची… तुम्ही सगळे कुणाच्यातरी दावणीला बांधलेले… भाऊजी तुम्हाला पत्रकारांना दिसत नाही का हे सगळं? महात्मा गांधी म्हणाले होते. “खेड्याकडे चला” तर बरोबर उलटे झाले खेडी ओस पडायला लागलीत सगळे पळतायेत… मुंबई पुणे…! शहरालगत असलेल्या शेतकऱ्यांनी तरी आपल्या जमिनी करून विकून टाकल्या मग आलेल्या पैशातून तरी काही चांगलं केलंय? नाही.. व्यसनात आणि चैनीत घालून कफ्फलक झालेत… कसला बोडक्याचा विकास आणि काय? ” अहो वहिनी, भावजी म्हणाले” मी आपल्या प्रगती आणि

विकास बद्दल बोलतोय”… हो हो मला कळतं ते… मीही आपल्याच प्रगती आणि विकास बद्दल सांगितले तुम्हाला हे लक्षात घ्या! … ” सरिता जाऊ दे ना ग विचारा खूप दिवसांनी आलाय त्याला एक कप चहा दे ना करून”… “समीर म्हणाला. ” हो देणार देणार अगदी छान कडक चहा देणार आणि झणझणीत चिवडा सुद्धा…

बघू काय तिखटपणा येतोय का आज लेखणीला…! ” असं म्हणत सरिता वहिनी आत गेल्या समीर म्हणाला, “जाऊ दे लक्ष देऊ नको तिच्याकडे” “नाही रे समीर, लक्ष देण्यासारखंच बोलल्या त्या चूक काय आहे त्यांचं? आम्हालाही असा विचार करण्याची मुभा असती आणि लिहिता आल असत तर फार छान झालं असतं. “चल छोड यार तुझं कसं चाललंय… अशा गप्पा चालू असताना सरिता वहिनी चहा आणि चिवडा घेऊन आल्या चहा चिवड्या वर ताव मारून पेकाडे भाऊजी सरिता वहिनींचा निरोप घेऊन गेले. जाताना म्हणाले, ” वहिनी उद्या येतोय परत नवीन विषय घेऊन… तुमचे आशीर्वाद घ्यायला.. ” हो हो या या भाऊजी नक्की या मी बसले आहेच आशीर्वाद द्यायला” सगळेच हसत हसत निरोप घेऊन कामाला लागले.

– समाप्त – 

© शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वार्डरोब… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ वार्डरोब… ☆ डॉ. नेहा भटकर

परवा शांता शेळके यांची सुप्रसिद्ध पैठणी नावाची कविता पुन्हा एकदा वाचली. यावेळी केलेलं तीचं, अर्थात कवितेच माझ्याकडून होणार हे कितवं वाचन असेल, माहिती नाही. कवितेतील आजी कितीतरी प्रसंगांमध्ये फडताळात ठेवलेल्या गाठोड्यातील धानी रंगाची पैठणी नेसून मिरवली. पैठणीने आजीच्या आयुष्यातील कितीतरी उन्हाळे पावसाळे बघितलेत. ती कितीतरी प्रसंगांची साक्षीदार होतांना नकळतपणे वेगवेगळ्या मंगल प्रसंगातील दरवळ तिच्यामध्ये कायमचे भिनलेत, इतके की कवयित्री आजही त्यांना अनुभवते व आजीच्या आयुष्याचा संपूर्ण कालपट पैठणीच्या निमित्ताने कवयित्री समोर उलगडतो. अशा आशयाची अगदी पैठणी इतकीच तलम व सर्वांग सुंदर असलेली ही आशयघन कविता. ती वाचून संपली तरी मला मात्र डोळे मिटून पैठणीच्या नारळी पदरासोबत बराच वेळ रेंगाळावं असं वाटत असतानाच, हाताशी असलेला मोबाईल वाजला व फोनवर पलीकडे असलेल्या माझ्या मैत्रिणीशी बोलायला लागले. दोन्हीकडून सलामीची एक दोन वाक्ये झडली आणि मैत्रिणीने मूळ विषयाला हात घातला. मैत्रीणीला माहेरच्या नातेवाईकांकडील एका लग्नसोहळ्यात केवळ हजेरी लावायची नसून, लग्न निकटस्थ नातेवाईकांकडचे असल्यामुळे हौसेने भरपूर मिरवायचं होतं. मिरवण्यासाठी लागणाऱ्या विशेष महत्त्वाच्या बाबींपैकी एक बाब म्हणजे विविध वस्त्र प्रावरणे. म्हणूनच हल्लीच्या लग्न समारंभातील वेगवेगळ्या प्रसंगानुरूप निरनिराळ्या साड्या, काही देशी तर काही विदेशी पद्धतीच्या कपडे (Indian and western style outfits) खरेदीसाठी तिला माझी मदत हवी होती. मदत अर्थातच केवळ एक सोबत म्हणून आणि एखादवेळी निवड करतेवेळी उद्भवणाऱ्या अत्यंत बिकट किंवा निर्णायक प्रसंगी माझं मत देखील द्यायला हरकत नव्हती परंतु ते स्वीकार्य असेलच असे मुळीच नाही. मुळात या सगळ्या खरेदीच्या खटाटोपालाच मी नापसंती दर्शवत म्हटले, अगं सहा महिन्यापूर्वीच तर तुझ्या सासरच्या नातेवाईकांकडे झालेल्या लग्नप्रसंगासाठी तू बरीचशी खरेदी केलीय. आता आणखी कशाला वेगळी करायचीय तर ती म्हणते कशी; अगं तुला कसं कळत नाही, लग्न जरी माझ्या माहेरच्या नातलगाकडचं असलं तरी माझ्या सासरचे काही लोक तिकडे येणारच आहेत आणि मग बरं दिसत का, तेच ते कपडे घालून मिरवलेलं. य़ा युक्तिवादावर मी तिला परत आठवण करून देत म्हणाले, अगं मागे दीडेक वर्षांपूर्वी नाही का, आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा तू बरंच काही नवीन घेतलं होतंस, तेही चालेल ना गं यावेळी वापरायला कारण इकडे आपल्या मैत्रिणीकडच्या लग्नातलं कुणीही असणार नाही तुला बघायला, मी हसतच म्हणाले. ती आवाजाचा पोत जरा चिडका करंत म्हणाली अगं अशी काय म्हणतेस, वर्षाभरापूर्वीच्या कपड्यांचा आणि साड्यांचाही ट्रेंड आता बदललाय, आहेस कुठे, तेव्हाचे कलर कॉम्बिनेशन, डिझाईन, मटेरियल आता आउटडेटेड झालेत, म्हणून तर नवीनच घ्यायचं म्हणतेय. माझ्या डोक्यातून आपली कवितेतली धानी रंगाची पैठणी काही निघता निघेना, मी आपली नेटाने किल्ला लढवतच राहिले आणि तिला म्हणाले, अगं कसला आलाय ट्रेंड वगैरे आपण जे घातलं किंवा नेसलं त्यालाच आज घडीचा ट्रेंड म्हणायचं, नाहीतर काय वर्षभरापूर्वी आवडीने खरेदी केलेल्या महागड्या साड्या आणि ड्रेसेस कसे काय हद्दपार करायचे. सहाएक महिन्यात अगदी मोजून एखादे वेळेस वापरलेली कापडं पुन्हा नकोत, केवळ ती आपल्या अंगावर आधी कोणीतरी बघितलेली आहेत म्हणून, का ग बाई. हे ऐकल्यावर तिने ठीक आहे म्हणून बहुतेक रागानेच फोन बंद केला. तो दिवसच तसा होता, एक वेगळच वळण घेतलेला, पहिले पैठणी कविता आणि नंतर हे फोनवरचं संभाषण. दोन्ही प्रसंग मला एकमेकांपासून वेगळे करताच येईनात, नुसती सरमिसळ चाललेली. एवढे कमी होते की काय, म्हणून वस्त्र प्रावरणे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी अनुभवलेल्या जुन्या नव्या प्रसंगांची मालिकाच जणू, एका मागून एक सरकायला लागली.

कोणे एके काळी सर्वसाधारणपणे ठेवणीतले कपडे ठेवायला कापडाचे गाठोडे पुरेसे असावे, हे पैठणी कवितेवरून अगदी स्पष्टपणे लक्षात येतं. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे गाठोडे जाऊन पेटी किंवा ट्रंक आली आणि नंतर कुठे भिंतीतील तर कुठे वेगळ्या लाकडी वा लोखंडी कपाटांची ठेवणीतल्या कपड्यांचा रूबाब सांभाळायला मदत व्हायला लागली. मला आठवतं, माझ्या शाळकरी वयामध्ये घरातील सगळ्यांचे दररोज वापरायचे कपडे मागच्या ओसरीमध्ये बांधलेल्या दोरी वा आडव्या बांबूवर नीटपणे घड्या घालून तर काही भिंतीतील खुंट्यांवर टांगलेले असायचे. आताशा ओसरीवरची ही दोरी कुठेच दिसेनासी झालीयं. कुठे भिंतीतील लाकडी फळ्यांचे कप्पे असलेली उघडी वा क्वचितच पटं असलेली कपाटंही दिसंत. गाठोडे, पेटी, कपाट… असा हा मजल दर मजल करीत वर्षानुवर्षे चाललेला प्रवास, अख्खा ड्रेस वा सूट जसाच्या तसा घडी न घालता किंवा, रेशमी भरजरी, कडक खळाच्या सुती, कृत्रिम धाग्यांच्या सुळसुळीत; अगदी कांजीवरंमपासून ते बनारसी, गढवाली पर्यंत तर कलकत्ता, मणिपुरी पासून ते सुरत, इचलकरंजी मीलपर्यंत, कितीतरी प्रकारच्या साड्यांच्या लांबलचक घड्या सामावून घेणाऱ्या आताच्या वॉर्डरोब या मुक्कामी येऊन ठेपलाय. हा विचारांचा प्रवास कधी कालच्या ट्रंका, पेट्यांशी घुटमळे तर कधी आजच्या वार्डरोब या संकल्पनेशी येऊन थबकायचा. विचारांची आंदोलनं कधी मागे तर कधी पुढे हेलकावू लागली.

रागावलेल्या मैत्रिणीच्या फोनच्या पार्श्वभूमीवर, आठवणींच्या खोल डोहात पार तळाला जाऊन बसलेली ही एक हकीगत नकळत उसळी मारून वर आली. वर्षाकाठी हंगामावर कापसाच्या बंड्या अमरावतीच्या कापूस बाजारात विकल्यानंतरच, एक ना दोन पातळांच्या जोड्या खरेदी होत, त्याही परस्पर कापसाच्या बंडीसोबत गेलेल्या पुरुष मंडळींकडून. एखादवेळी म्हणजे अगदी अपवादात्मक प्रसंगी, जसे की घरच्या लग्नकार्यासाठी आणखी एखादं बऱ्यापैकी पातळ वाट्याला येत असे. आणि हो, घरच्या प्रत्येक शुभमंगल प्रसंगी तर नाहीच नाही. त्याकाळी एका पाठोपाठ मंगलकार्ये उरकतांना कर्त्या माणसांची चांगलीच दमछाक होत असे. त्यामुळे मागच्या वर्षी पुतणीच्या लग्नात सगळ्यांनी पाहिलेलं पातळ यावर्षी परत लेकाच्या लग्नात नेसलं तर बरं दिसेल का? हा असला विचार कुणाच्या गावीही नव्हता किंवा तसली चैन बहुसंख्य लोकांना परवडणारीही नसे म्हणा. लहान भावंडांच्या कुंडलीमध्ये तर मोठ्यांना आखूड झालेले कपडे वापरण्याचा तो कुठलासा योग कायमच ठाण मांडून बसलेला असायचा. परंतु अशाही आर्थिक ओढाताणीच्या दिवसांत अगदी सहजपणे घडणारी गोष्ट अगदी लख्खपणे आठवली. नवीन कोरं करकरीत पातळ किंवा साडी स्वतः नेसण्याआधी घरातल्याच दुसऱ्या कुणाला म्हणजे जावेला, सुनेला नंणंदेला किंवा अगदी शेजारणीला वा दोन घराआड राहणाऱ्या आपल्या सखीला प्रथम नेसायला द्यायचे. याला घडी मोडायला देणे असे म्हणत. तिने ते दिवसभर अंगावर मिरवायचे दुसऱ्या दिवशी धुवून मूळ मालकिणीला घडी घालून नेऊन द्यायचे. त्या ओढगस्त काळातील हा मनाच्या श्रीमंतीचा पदर आज जरा आणखीच जरतारी भासला, तेव्हा तो कधीही तितकासा ध्यानीही आला नव्हता. वाऱ्याच्या सुखद झुळकेसारखी ही आठवण विरण्याचाच अवकाश तर तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जाळीच्या दारातूनच पलीकडे उभ्या असलेल्या माझ्या शेजीबाई, कुंदाताई आल्याचं कळलं. त्या आत आल्या, जरा थकलेल्याच दिसल्या. त्या कुठलेसे परदेश पर्यटन करून दोन दिवसापूर्वीच परत आल्या होत्या. प्रवासाच्या दगदगीने थकल्यात या जाणिवेने त्यांना उल्हासित करावे म्हणून मी सहजच विचारले काय छान झालाय ना तुमचा फॉरेन टूर तर त्या अगदी उसळल्याच, अहो कसलं काय इतकी तयारी केली होती या टूरची पण बाई त्या वाह्यात टूर मॅनेजरचा सारखा धोशा लागलेला की बघून घ्या सगळं नीट. प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो काढण्यात फार वेळ घालवू नका, त्यात म्हणे फार वेळ वाया जातो आणि वेळापत्रक बिघडतं. फार फार तर नेमक्या स्थळांना जसे की तिथली स्मारकं, सृष्टीसौंदर्य, वास्तुशिल्प वगैरे वगैरे कॅमेरातून टिपत चला. मी बोलण्याला वेगळं वळण द्यावं म्हणून मध्येच विचारलं, पण झालं ना तुमचं सगळं नीट बघून तर त्या म्हणतात कशा, ते झालं म्हणा पण टूरसाठी म्हणून कितीतरी कपडे, त्यावर वेगवेगळ्या मॅचिंग एकसेसरीजची खरेदी केली होती हो, पण नीट फोटोच काढता आले नाहीत. त्यामुळे काही मजाच आली नाही. मी समजावणीच्या स्वरात म्हटले अहो यावेळी असं झालं असेलही पण पुढल्या सहलीला तुम्हाला कामी येईल, ही नवीन खरेदी, तर त्या आणखीच वैतागल्या आणि माझा निरोप घेता घेता म्हणाल्या नको ग बाई पुन्हा नवीन घेईल सगळे, नकोच यावेळीचे ते नाट लावे कपडे.

मैत्रिणीची संपूर्णपणे नवीन खरेदी करून लग्नात मिरवण्याची हौस तर शेजीबाईंचा पुढील फिरस्तीसाठी पुन्हा नवीन खरेदीचा मनसुबा, वार्डरोबमध्ये नवनवीन भर पडण्याची ही पण निमीत्त्ये असावीत, असतीलही कदाचित आणि मन परत आजीच्या जीवनपटातील नानाविध गंधात मुरलेल्या धानी रंगाच्या, नारळी पदराच्या पैठणीमध्ये गुंतले.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिळक, मला माफ करा… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ टिळक, मला माफ करा… ☆ श्री सुनील देशपांडे

त्या दिवशी तुम्ही स्वप्नात आलात आणि म्हणालात बाप्पाने तुम्हाला एक दिवसासाठी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आहे.

म्हणून मी मुद्दाम आमच्या गणेशोत्सव कमिटी मध्ये मीटिंगसाठी गेलो होतो.

मी घाबरत घाबरत हळूच विषय काढला आपण टिळकांचे व्याख्यान ठेवू, ते यायला तयार आहेत. बाप्पाने सुद्धा त्यांना परवानगी दिली आहे. त्यावर कुणी काही बोलेना सर्वांचा गोंधळ दुसऱ्या कुठल्यातरी कार्यक्रमाबद्दल चालू होता.

मी म्हटलं टिळक जर जुने वाटत असतील तर आपण आगरकर किंवा कर्वे किंवा किमान पक्षी दाभोळकरांना तरी पाठवण्याबद्दल बाप्पाला विनंती करू या का?

“ए बामना, तुझी अक्कल तुझ्याकडेच ठेव, या सर्वांसाठी कुणीतरी एक रुपया सुद्धा दील का? आणि किती टाळकी जमतील याचा विचार केलाय का?

हे बघ तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव. एक तर गप गुमान कोपऱ्यात बसून रहा. नाहीतर बाहेर जा.

अध्यक्ष साहेब, गौतमीचा कार्यक्रम फायनल करा. संत्या दादा दहा लाख रुपये देतो म्हणलाय! ” 

बहुमताच्या प्रचंड गजरात माझा प्रस्ताव बुडून गेला. टिळक मला माफ करा. तुम्हाला कल्पना नाही की आता पारतंत्र्य नाही, त्यामुळे चांगल्या कार्यक्रमांना माणसे आणि पैसे यांचे गणित जमवता येत नाही. दुर्दैवाने पुन्हा कधी पारतंत्र्य आल्यास मी प्रयत्न करीन.

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुण्यतिथी… एका हनुमान अंशाची! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ पुण्यतिथी… एका हनुमान अंशाची! ☆ श्री संभाजी बबन गायके 

नीम करोली बाबा ऊर्फ महाराजजी ५३वी पुण्यतिथी, शुक्रवार ११ सप्टेंबर!

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे! त्या दिवशी महाराजजींच्या देहावरील ते वस्त्र घसरून खाली पडलं!

देह हे आत्म्याने व्यवहारासाठी तात्पुरते परिधान केलेलं वस्त्रच. पण पंचमहाभूतांच्या अधिपत्याखाली असलेल्या मानवी देहाला एखादे भौतिक, धाग्यांनी विणलेलं वस्त्र अंगाभोवती गुंडाळून घ्यावंच लागतं कित्येकदा… जगासाठी!

काळाच्या प्रभावामुळे आपले नाविन्य क्षणोक्षणाने गमावत जाणारे हे वस्त्र इतके जुने होऊन जाते की ते त्यागावेच लागते… जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे!

देहाच्या आवरणातून आत्मा बाहेर पडतो आणि कालांतराने ‘मग नूतन वेढिजे’ अशी अवस्था होते. माऊली ज्ञानोबारायांनी भगवान श्रीकृष्ण यांचा ‘तैसें देहांतरातें स्वीकारिजे’ हा संदेश त्यांच्या अमृतशब्दांत सामान्यजनांपर्यंत पोहोचवला आहे!

लोककल्याणासाठी देहात अवतरलेल्या देवांनाही हा क्रम चुकला नाही… किंबहुना त्यांनी तो आदर्श जगापुढे ठेवण्याची लीला केली! हनुमान अंश असलेले ‘महाराजजी’ही या जन्म-मृत्यूच्या क्रमास आणि कर्मास अपवाद ठरले नाहीत!

नीम करोली आश्रम, कैंची धाम.. जिल्हा नैनिताल, उत्तराखंड. ८ सप्टेंबर, १९७३. शनिवारचा दिवस. दुपार उलटून गेलेली. महाराजजी त्यांच्या नेहमीच्या जागी, मोकळ्या जागेतल्या बाजेवर त्यांची ती चौकोन विणलेली कांबळ, घोंगडी पांघरून बसलेले आहेत. आश्रमातल्या एका कक्षात सत्संग भजन गायन सुरु आहे.

 “नीम करोली बाबा मर गया! ” महाराजजी मोठ्याने म्हणाले आणि त्यांनी आकाशाकडे बोट केलं… आणि म्हणाले, ”उपर गया! ” तिथे उपस्थित असलेल्या लोकांना याचे आश्चर्य तर वाटलेच पण संत मंडळीपुढे कुणी काय बोलणार? त्यांच्या शब्दांचे, कृतींचे अर्थ नंतरच समजू लागतात! तेवढ्यात कुणीतरी महाराजजींना म्हणाले, ”खाजगीत थोडं बोलायचं आहे! ” महाराजजी म्हणाले, ”आता वेळ नाहीये! ” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ”मग उद्या सकाळी? ” त्यावर महाराजजी उत्तरले, ”मी आज जिवंत राहिलो तर उद्या! ” आता यावरही कुणाला काही बोलता येईना. शनिवार उलटून गेला.. रविवारी महाराजजी सकाळी तयार होऊन बसले. अकरा वाजेपर्यंत दर्शन इत्यादी उपचार पार पडल्यावर त्यांनी त्यांच्या जवळच बसलेले त्यांचे परमशिष्य किशनदास तिवारी यांना म्हटलं, ”ध्यान करा! ” त्यावर ध्यान धारणेत पारंगत असलेले तिवारीजी क्षणार्धात खोल ध्यानात अर्थात समाधीवस्थेत गेले! खूप वेळ झाला तरी ते त्या स्थितीतून बाहेरच येईनात. अगदी एका डॉक्टरांनी त्यांना तपासले तेंव्हा लक्षात आले की श्वास सुरु आहेत… मात्र त्यांची मनोवस्था जणू कोमामध्ये गेल्यासारखी आहे! त्यावर महाराजजी उदगारले… ”यह रहेगा… मैं जाउंगा! ” 

खूप वेळाने महाराजजींनी स्वत: तिवारीजींना ध्यानातून बाहेर देहावर आणले!

त्यांच्या भोवती बसलेल्या भक्तांना त्यांनी ‘हनुमान चालिसा’, ‘संकट मोचन’ आणि ‘प्रणाम’ गायला सांगितले आणि शेवटी साश्रू नयनांनी आज्ञा दिली… ”आता ओम जय जगदीश हरे! गा! ” काही वेळाने आरती झाली, प्रत्येकाच्या कपाळावर चंदन तिलक लावला जाऊ लागला. महाराजजी यांनी यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांच्या कपाळावर लावलेला चंदन तिलक पुसला नाही… त्यादिवशी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी महाराजजी यांच्या कपाळावर चंदन तिलक रेखला!

दुपारचा भोजन-प्रसाद झाला आणि अडीच वाजता महाराजजी त्यांनी अचानक आग्र्याला जायला निघाले… चार-पाच दिवसांनी परतेन असं त्यांनी काही जवळच्या लोकांना सांगितले होते. कुणीतरी आजच निघणं गरजेचे आहे का? त्यावर उत्तर मिळाले होते, “मला अकरा सप्टेंबर रोजी एक महत्त्वाचे काम आहे! ” त्यावर प्रश्नकर्त्याने विचारले, ”आम्ही तुम्हांला भेटायला कधी येऊ? ” त्यावरही उत्तर आले, ”मंगळवारी भेटू! ” अकरा सप्टेंबर रोजी मंगळवार होता… अनंत चतुर्दशी होती!

निघण्याआधी आश्रमातील सेवेकरी महिलांचे त्यांनी वारंवार आभार मानले… ”तुम्ही खूप उत्तम सेवा केलीत माझी! ” 

आश्रमातल्या श्री हनुमानजींना वंदन केल्यावर इतर सर्व देवतांना नमस्कार करून महाराज वेगाने पावले टाकीत मोटारीकडे निघाले… जाताना मागे वळून म्हणाले “कारागृहातून निघून चाललो आहे! सेंट्रल जेल छोडूंगा…! ” आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावरची चादर ओघळून खाली आली… सेवकाने ती लगबगीने त्यांच्या अंगावर पुन्हा घातली खरी… पण आधी असं कधी झालेलं नव्हतं!

देहरुपी वस्त्र आता सांडण्याची, सोडून देण्याची वेळ बहुदा यातून प्रतीत झाली होती! पण कुणाला याची तसूभरही कल्पना आली नाही!

ते निघाले! मोटार रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावू लागली… आभाळात क्षितीजावर एक लखलखीत ठळक इंद्रधनुष्य आभाळाची शोभा वाढवत होतं… ते जणू या वाहनाचा पाठलाग करीत होतं… महाराजजी म्हणाले… ”केवळ निसर्गच ही किमया करू शकतो! माणसाच्याने हे शक्य नाही! ” ते इंद्रधनुष्य मोटार काठगोदाम रेल्वे स्टेशनजवळ पोहोचेपर्यंत दिसत राहिलं!

तिथून रात्रीची ट्रेन होती… महाराजजी आग्रा येथे निघाले. येथे एका हृद्यशल्य विशारद डॉक्टरांची त्यांना भेट घ्यायची होती. रेल्वे भल्या पहाटे आग्रा स्टेशनला पोहोचली. महाराजजी प्रवासात झोपले नाहीत.. त्यांच्या राम-दैनंदिनीमध्ये राम राम लिहित राहिले. रविवार उलटून सोमवार उजाडला होता. त्यांनी पुढच्या पानावर मंगळवार, ११ सप्टेंबर तारीख घालून ठेवली!

एका भक्ताच्या घरी महाराज उतरले. दर्शन, भजन करण्यासाठी अल्पावधीत अनेक लोक तिथे जमा झाले. सर्वांची चौकशी, चेष्टा-मस्करी करीत राहिले महाराजजी. अकरा वाजून गेले. “आणखी बारा कसे वाजले नाहीत? ” असे महाराजजी वारंवार विचारत राहिले. दुपारी बारा वाजता भोजन झाले. महाराजांनी यावेळी केवळ पालेभाज्या घेतल्या जेवणात. नंतर एक सेवक वगळता सर्वांना त्यांच्या खोलीतून बाहेर जायला सांगितले आणि त्यांनी संस्कृतमधील श्लोक म्हणायला सुरुवात केली… बहुदा ते श्लोक आईसंदर्भात असावेत!

दुपारी महाराजजी बाहेर पडले आणि डॉक्टरांना प्रकृती दाखवून आले. “तुमचं हृद्य ठीक आहे. फक्त आराम मात्र करा! ” असं डॉक्टरांनी सांगताच महाराजजी केवळ स्मित हास्य करीत राहिले!

रेल्वेने आग्रा येथून कैंची धामकडे जाण्याचे तिकीट काढण्यात आले. प्रवासात कैंचीला परतण्याचा बेत रद्द करीत महाराजजींनी मथुरा स्टेशनवर उतरून वृंदावन धामला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते आणि त्यांच्या सोबतची माणसं मथुरा स्टेशनवर उतरले. वृंदावनधाम कडे जाण्यासाठी मोटारीची व्यवस्था होईपर्यंत महाराजजी स्टेशनवरच्या पाय-यांवर बसलेले असताना त्यांची प्रकृती बिघडू लागली… त्यांनी डोळे उघडझाप करायला सुरुवात केली. त्यांचे अंग खूप गरम झाले. “वृंदावनला घेऊन चला”… महाराजजी बोलले… मोटारीतून त्यांचा प्रवास सुरु झाला… पण त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे पाहून त्यांना वृंदावन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले… तातडीने उपचार आरंभ झाले… कृत्रिम प्राणवायू देण्यास सुरुवात होताच महाराजजी उद्गारले… ”याचा काही उपयोग नाही! ” रात्रीचा एक वाजला होता… मुखातून ‘जय जगदीश हरे! ’ मंत्र उमटत होता… देहाची मर्यादा संपुष्टात आली… महाराजजी देहातून बाहेर पडले!

देश-परदेशातील असंख्य माणसांना जीवनाची दिशा दाखवणारा, वेळप्रसंगी अलौकिक चमत्कार घडवणारा परंतू कोणत्याही कर्माचे कर्तृत्व स्वत:कडे न घेणारा, शेकडो भक्तीमंदिरे, सेवाकार्ये, अन्नादान छत्रे उभारणारा एक दैवी अंश निमाला होता… ११ सप्टेंबर, १९७३. वर्ष १९०० मधल्या कोणत्या तरी दिवशी सुरु झालेला हा देहाच्या जन्माचा प्रवास ७३ वर्षांनी मरणाचे निमित्त होऊन संपुष्टात आला! आत्मा? तो तर अनादी नित्य सिद्धू… निरुपाधी विशुद्धु… शस्त्रादिकाने छेदला न जाणारा, अग्नी जाळू शकणार नाही, पाणी बुडवू शकणार नाही, वारा सुकवू शकणार नाही असा आहे… तो चिरंजीव आहे! संत जीवनमुक्त होऊन जाऊ शकतात… पण तो स्वार्थ ते साधत नाहीत… जगाच्या कल्याणार्थ दीर्घ काळ आत्मस्वरूपाने जगात वास करीत राहतात!

लौकिकार्थाने हे जग सोडून जाण्यापूर्वी म्हणजे त्यांच्या जीवनकाळातला अखेरचा भंडारा (महाप्रसाद) अभूतपूर्व व्हावा, अशीही योजना त्यांनी करून ठेवली… जून १९७३ मध्ये भोजन आणि दर्शनासाठी कैंची धाममध्ये आलेल्या भाविकांची संख्या आजवरची सर्वाधिक ठरली!

आपल्या मृत्यूनंतरही भंडारा सुरु रहावा. किंबहुना आपल्या मृत्यूनंतर केंचीधाम आणि वृंदावन येथे भेट देण्यासाठी असंख्य लोक येणार हे लक्षात घेऊन महाराजजींनी दोन्ही आश्रमांमध्ये तितक्या लोकांना पुरेल एवढा धान्यसाठा, इंधनसाठा कित्येक महिने आधीच करून ठेवला होता. तब्बल १७ ट्रकभरून जळणासाठीची लाकडे आणून घेतली होती… आणि विचारले होते.. ही लाकडं ऑक्टोबरपर्यंत पुरतील ना?

इतकंच नव्हे, तर आपल्या दहनविधीसाठी जी जागा लागणार होती, तीही निश्चित करून ठेवली होती… कुणाला काहीही न सांगता. आश्रमातील एका मोकळ्या जागेत जेंव्हा वृक्ष लावण्याचे काम सुरु होते, त्यावेळी महाराजजींनी एक विशिष्ट स्थान पुरेसे मोकळे ठेवण्याची आग्रहाची सूचना कित्येक महिने आधीच करून ठेवली होती! एवढंच नव्हे तर काही कारणांनी काही जुन्या भक्तांची आणि त्यांची कित्येक वर्षे भेट होऊ शकली नव्हती, त्यांना आवर्जून भेटीस बोलावून घेतले होते… एकंदरीत निर्वाणापूर्वीची नीरवानीरव सुरु होती…! एका भक्तांच्या घरी मुक्काम व्हायचा, पण ते घर भाड्याचे होते. आणि भक्ताची स्वत:ची जागा विकत घेण्याची, घर बांधण्याची ऐपत नव्हती… ही बाब चर्चेत येताच.. ”सब ठीक हो जायेगा” असं म्हणून महाराजजी तिथून परतले. काहीच महिन्यांत त्या व्यक्तीचे स्वत:चे नवे घर बांधून तयार होते.. महाराजजींचा पुढचा मुक्काम मग त्याच घरी झाला!

वडिलांवर रुसून शेकडो किलीमीटर्स अंतरावर निघून गेलेल्या मुलाला चमत्कारिकरीत्या दोन मिनिटांत स्वत: प्रत्यक्ष भेटून निरोप देऊन येणारे व त्याला परत येण्यास उद्युक्त करणारे, रेल्वे प्रवासात तपासनीसाने अपमानित करून उतरवून दिल्यावर ती रेल्वे कित्येक तास रोखून धरणारे, पुढे होणा-या घटना आधीच सांगणारे, पाण्याचे तुपात रुपांतर करणारे, एकाच वेळी दोन दोन ठिकाणी प्रकट होणारे, डोळ्यांसमोरून क्षणार्धात अदृश्य होणारे, युद्धात लढणा-या सैनिकाच्या दिशेने येणा-या बंदुकीच्या गोळ्या त्याच्यापासून शेकडो मैल दूर असताना स्वत:च्या अंगावर झेलणारे, कित्येकांची असाध्य दुखणी चुटकीसरशी दूर करणारे आणि असे ज्ञात अज्ञात हजारो चमत्कार नावावर असणारे लक्ष्मी नारायण शर्मा, किंवा लक्ष्मण दासजी महाराज, किंवा तलैय्या बाबा, हांडीवाले बाबा, तिकोनिया वाला बाबा, पाश्चात्य लोकांसाठी miracle बाबा किंवा नीम करोली किंवा नीम करोडी किंवा केवळ महाराजजी… एका बाजूला आणि…

शेकडो हनुमान मंदिरे स्थापन करणारे, कैंची धाम-उत्तराखंड, वृंदावन आश्रम आणि महासमाधी मंदिर, नीम करोली आश्रम-उत्तर प्रदेश, हनुमान सेतू मंदिर-उत्तर प्रदेश, जौनापुरा आश्रम आणि अन्नछत्र-नवी दिल्ली, हृषीकेश आश्रम, हनुमान गढी-नैनिताल, भूमिआधार आश्रम, काकरीघाट आश्रम यांच्या उभारणीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग-श्रेय असलेले महाराजजी…

Richards Alpert नावाच्या वेगळ्या वाटेवर गेलेल्या परदेशी व्यक्तीला सन्मार्गाला लावून त्याचे बाबा रामदासमध्ये रुपांतर करणारे, (की ज्याने अमेरिकेत जाऊन सेवा फाउंडेशन ही आरोग्य क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संस्था स्थापन केली) 

Jeffrey Kagel नावाच्या इंग्लीश कलाकाराचे कृष्ण दास या आध्यात्मिक गायक कलाकारात रुपांतर करणारे,

Larry Briliant नावाच्या बुद्धीमान डॉक्टरला जागतिक देवी रोग निर्मुलनाच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी होण्यास प्रवृत्त करणारे 

‘Love Serve Remember Foundation’ ही सेवाभावी संस्था, NKB Divine Meditation Foundation अध्यात्मिक प्रशिक्षण संस्था स्थापन व्हाव्यात यासाठी स्वत:च्या मृत्यूपश्चातही प्रेरणा देणारे महाराजजी…

 ज्यांच्या आयुष्यावर Windfall of Grace, Moved by Grace, American Yogi हे माहितीपट निघाले, श्री नीम करोली बाबा महाराज आणि हनुमान अंश हे हिंदी चित्रपट निर्माण झाले ते महाराजजी,

Apple संस्थापक स्टीव्ह जॉब्स, Whatsapp संस्थापक मार्क झुकेरबर्ग, प्रसिद्ध इंग्लीश अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स यांना मृत्यूपश्चातही प्रेरणा देणारे महाराजजी…

सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, अन्नदान करा, परमेश्वाराचे स्मरण करीत रहा, सत्य वचनी व्हा… अशी शिकवण देताना ती स्वत:च्या आचरणात आणून आदर्श निर्माण करून ठेवणारे महाराजजी…

बालपणी नकळतेपणी लावून दिलेल्या विवाहाची पुढे संसारात काही वर्षांसाठी बूज राखणारे, गावचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे, लांब-लचक प्रवचने, पुस्तकांचे लेखन, प्रसिद्धीसाठीचे उपक्रम, संपत्ती संचय यांपासून दूर राहणारे, सर्वांशी एखाद्या निरागस बालकासारखे प्रेमाने वागणारे महाराजजी…

भारताचे वैभवच नव्हेत का?

पाखंडी तथाकथित बुवा, महाराज, गुरू आणि नीम करोली बाबा महाराजजी, स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराजप्रभृतींना एकाच तराजूत तोलाणारे, धार्मिक, वैचारिक राजकारण करत संतांविषयी अभद्र भाषेचा उपयोग लोकही समाजात आहेतच. त्यांच्या आक्षेपांचा प्रतिवाद करण्यात आपण आपली शक्ती व्यर्थ दवडू नये, हेच श्रेयस्कर. रामजी सब देख लेंगे… असं म्हणून मोकळं व्हावं!

आणखी एक छोटीशी विनंतीवजा सूचना करावीशी वाटते… सर्वांनीच आता धावत-पळत जाऊन केंची धाम, वृंदावन इत्यादी ठिकाणी जाण्याची व विनाकारण प्रचंड गर्दी करण्याची, व्यावसायिकतेला अधिकचे खतपाणी घालण्याची आवश्यकता नाही. आपल्या जवळपासही उत्तम तीर्थक्षेत्रे आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संतांनी दिलेल्या शिकवणुकीचा व्यावहारिक आयुष्यातही अंगीकार करण्याचा प्रयत्न करीत राहणे… कारण आपल्या प्रत्येकात केवळ हनुमानाचाच नव्हे तर सर्वच देवांचा अंश असतो!

‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार आहेत, असे समजते. आपले महापुरुष, आपले संत, गुरु, शूर सैनिक यांच्या आयुष्यावर असेच उत्तम चित्रपट निर्माण होत रहावेत… हे चित्रपट आपला राष्ट्रीय ठेवा होतील… कारण चित्रपट हे खूप प्रभाव टाकणारे माध्यम आहे. असो.

संत, महात्मे, युगपुरुष ज्या तिथीला हे जग सोडून जातात त्या पुण्यतिथी म्हटले जाते. या थोर व्यक्तींनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचे कल्याण, ज्ञान प्रसार आणि भक्ती यामध्ये घालवलेले असते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण पुण्याचा (सत्कर्माचा) असतो. त्यांनी कमावलेल्या या प्रचंड पुण्याचा आणि ऊर्जेचा प्रभाव त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्या तिथीला ब्रह्मांडातील वातावरणात जास्त प्रमाणात जाणवतो, म्हणून तिला ‘पुण्यतिथी’ म्हणतात.

नीम करोली बाबा महाराजजींची ११ सप्टेंबर, २०२६ ही ५३वी पुण्यतिथी. या तिथीला आपण त्यांचे पुण्य-स्मरण करणे ही आपल्या कल्याणाचीच बाब ठरेल, असा विश्वास वाटतो! सीताराम!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घोंगडी – एक पवित्र वस्त्र… – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ घोंगडी – एक पवित्र वस्त्र… – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

वीर्यस्पृष्टं शवस्पृष्टं स्पृष्टं मूत्रपुरीषयोः ।

रजस्वलादिसंस्पृष्टमाविकन्तु न दुष्यति ।।

अर्थात — आविक म्हणजे घोंगडी वस्त्रास वीर्य, प्रेत, मल, मूत्र व रजस्वला यांचा स्पर्श झाला तरी ते वस्त्र दूषित होत नाही असे शास्त्र वचन आहे.

धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:

प्रत्येक साधकाकडे घोंगडी असणे गरजेचे असते आपण करत असलेल्या साधनेला उच्च स्थरावर घेऊन जायचे असेल तर साधना घोंगडीवर करावी.

पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता.

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा. वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे. पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे कारण घोंगडे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितृदोष असणाऱ्यांना. महालक्ष्मी पूजनासाठी सुद्धा घोंगडे वापरले जाते.

घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
  • झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.
  • घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो.. आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

 

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares