मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र –‘या पत्राबद्दल साहेबांना आत्ताच कल्पना द्यायला हवी. त्यांनी माझा अॅप्लीकेशन फॉरवर्ड करण्याआधी त्यांना हे समजायलाच हवं… ‘ हा विचार मनात येताच मी ते पत्र घेऊन तत्परतेने वखरे साहेबांच्या केबिनकडे निघालो. या क्षणी माझी पावलं प्रकाशवाटेकडे धाव घेतायत की मिट्ट काळोख्या अंधारवाटेकडे हे मात्र फक्त ‘त्या’लाच… त्या कर्त्या-करवत्यालाच माहित होतं!!)

“सर, माझा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड करण्यापूर्वी तुम्हाला कल्पना असावी म्हणून आजच माझ्याकडे आलेलं हे पत्र तुम्ही एकदा वाचून पहावं असं मला वाटतं. ” हातातलं एन्व्हलप त्यांच्याकडे देत मी म्हंटलं.

“कसलं पत्र? “

“मला नागपूर रिजनल आॅफिसकडून आलेला ‘शो काॅज’ मेमो आहे हा… “

माझं बोलणं सुरु असतानाच त्यांनी ते पत्र नजरेखालून घातलं आणि शांतपणे मला परत दिलं.

” आजपर्यंत आलेले सगळे अर्ज आज एकत्रच फाॅरवर्ड होतील. तुमचा एकट्याचाच अर्ज या कारणासाठी रोखून धरायची गरज नाहीय. तुम्ही या पत्राला तुमचं उत्तर तातडीने देऊन टाका. पुढं काय करायचं ते आपण पाहू. ” ते आत्मविश्वासाने म्हणाले. हे एरवी मला दिलासा देणारं वाटलंही असतं पण आज…?

” सर, आधीच्या पत्रात हेच सगळे आक्षेप होते. त्याला मुद्देसूद उत्तर मी आधीच दिलंय. ते त्यांना मान्य नाही एवढंच त्यांनी लिहिलंय. ते कां मान्य नाही, मी लिहिलंय त्यात नेमकं काय खोटं आहे, हे मी त्यांना विचारू शकत नाही. मग मी त्याच त्या प्रश्नांना तीच ती उत्तरं देत रहायचं आणि त्यांनी ते नाकारायचं याला शेवट नसणारच. त्यापेक्षा…? “

मी बोलावं की बोलू नये या संदर्भात…

“बोला ना.. ” ते म्हणाले.

“ज्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालाय किंबहुना केला गेलाय त्याची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां सर? कारण.. रिजनल मॅनेजर कांहीही म्हणत असले तरी त्यांचे वरिष्ठ म्हणून फायनल निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे ना सर? मी माझी बाजू तुम्हाला समजावून सांगितल्यानंतरच तुमच्याशी चर्चा करून त्यांच्या या पत्राला योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकेन असं मला वाटतं… “

त्यांनी क्षणभर विचार केला…

” मी आज रिजनल मॅनेजरशी एकदा फोनवर सविस्तर बोलून घेतो. त्यांना नेमकं काय म्हणायचंय पाहू तरी. अशा बऱ्याच गोष्टी कम्युनिकेशन गॅपमुळे विनाकारण चिघळत जातात. तसं होऊ नये म्हणून. बाकी कांही नाही. यू डोन्ट वरी.

आपण बोलू नंतर ” ते म्हणाले.

त्यांचंही बरोबरच होतं.

मी निरूत्तर झालो. आता मूळ प्रश्न कांही काळ तरी असाच लटकत रहाणार होता. दुसरा पर्यायच नसल्याने मी वाट पहायचं ठरवलं.

मी वखरेसाहेबांच्या केबिनमधून बाहेर पडलो ते अशा अधांतरी अवस्थेतच. माझ्या केबिनमधे माझी रोजची कामं वाट पहात होतीच पण प्रयत्न करूनही आज माझं कामात मन लागेना. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज प्रलंबित ठेवला जाईल म्हणून मी अस्वस्थ नव्हतो. तो मी न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून प्रलंबित ठेवला जाईल या कल्पनेने मी अस्वस्थ होतो. आजवरच्या तीस वर्षांच्या माझ्या स्वच्छ रेकाॅर्डवर कुणीही इतक्या सहजपणे शिंतोडे उडवू पहाणं मला अपमानास्पद आणि अन्यायकारक वाटत होतं याची ती अस्वस्थता होती. मी प्रतिकूल परिस्थितीत अकोला ब्रॅंचसाठी घेतलेले कष्ट, बॅंकेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जीव तोडून केलेली धडपड, क्रिमिनल केसेस् योग्य वेळेत तातडीने फाईल करण्यासाठीची माझी यशस्वी धावपळ हे सगळं विचारात न घेता, एका महत्त्वाच्या खुर्चीवर बसलेली ‘रिजनल मॅनेजर’ सारखी महत्त्वाच्या पदावर काम करणारी व्यक्ती बॅंकेच्या आर्थिक नुकसानीला मलाच विनाकारण जबाबदार ठरवण्याचा विचार करूच कशी शकते? ‘ हा प्रश्न माझं मन कुरतडत राहिला होता. हे माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आणि संतापजनकही होतं. आता मला कांहीही न करता स्वस्थ बसून रहायचीही भीति वाटू लागली

पण वाट पहाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. या विरोधाभासातून निर्माण झालेलं हे अधांतरीपण माझी घुसमट वाढवू लागलं.

मला यातून बाहेर तर पडायचं होतं पण ते कसं हेच समजत नव्हतं. या अशाच विचारात दंग असताना शिपायाने मला वखरेसाहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला आणि अंधारल्या मनात आशेचा एक किरण ओझरता डोकावून गेला!

” मी बोललोय रिजनल मॅनेजरशी. अकोला ब्रॅंचमधल्या थकीत कर्जखात्यांबद्दलच्या स्टाफ अकाऊंटॅबिलीटी बाबत सेंट्रल आॅफिसच्या त्यांना स्ट्रिक्ट इन्सट्रक्शन्स आल्यात. बऱ्याच थकित कर्जखात्यांबाबत रिजनल आॅफिसच्या रेकाॅर्डनुसार वसुलीबाबत तुमच्याकडून कांहीच पाठपुरावा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे” वखरेसाहेब म्हणाले.

” थकीतच नव्हे तर थकीत होऊ पहाणाऱ्या इतर सर्व खात्यांचाही मी नियमित पाठपुरावा केलाय सर. ते कसं हे मी कागदोपत्रीही सिध्द करू शकतो, पण त्यातील नेमक्या कोणत्या खात्यांबाबत मी समाधानकारक पाठपुरावा केलेला नाही हे आधी त्यांनीही सांगायला नको कां? माझ्यावर सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची कशी अपेक्षा करू शकतात सर? म्हणूनच या सर्व प्रश्नांबाबतची नेमकी पार्श्वभूमी मी सविस्तर सांगू कां असं तुम्हाला विचारलंही होतं सर. त्यानंतर तुमच्याच सल्ल्याने मी काय उत्तर द्यायचं ते ठरवणार होतो. ” मी म्हटलं.

मी कितीही शांतपणे आणि सहज बोललोय असं मला वाटलं तरीही त्यातली अस्वस्थता त्यांच्यापासून लपलेली नसावी. म्हणूनच ते मला समजावल्यासारखं म्हणाले, “जे कांही सांगायचंय ते तु्म्ही मला जरूर सांगा पण या सगळ्याचं असं विनाकारण दडपण घेऊ नका. होईल सगळं व्यवस्थित. नका काळजी करू. मी आहे ना? “

वखरेसाहेबांनी उच्चारलेल्या या शब्दांमधून ‘तो’च जणूकांही मला आश्वस्त करतो आहे हा विचार मनाला स्पर्शून गेला आणि एखाद्या तृषार्ताला घोटभर पाणी मिळालं तरी तो अगदी तृप्त होतो ना तसा दिलासा मला मिळाला. नाहीतरी रिजनल आॅफिसरनी कोणताही निर्णय घेतला तरी त्यावर सेंट्रल आॅफिसने शिक्कामोर्तब करण्यापूर्वी झोनल आॅफिसचं म्हणजेच पर्यायाने वखरेसाहेबांचं रेकमेंडेशन आवश्यक होतंच. मग मला भीति कसली? म्हणूनच ‘नका काळजी करू. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ‘ हे वखरेसाहेबांचे शब्द मला अनेकार्थांनी वरदान मिळाल्यासारखेच वाटत राहिले. पण…?

पण.. पुढे अचानक घटनाच अशा घडत गेल्या कीं कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर झालं.. आणि..?

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य ☆ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य ☆ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष, कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष, एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण ” गुढीपाडवा ” असे म्हणतो. याला वर्ष प्रतिपदा, तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी, एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचे आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:/” असे वेदाने प्रथम सांगितले. आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमधे चैत्रशुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ दिवस सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. नैसर्गिक आणि भौगोलिक — गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपावर येतो. (संपातबिंदू, क्रांतीवृत्त व विषुववृत्त हे दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांना छेदतात तो बिंदू) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्या काळात उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायीच असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षा ची सुरुवात करणे योग्य आणि आदर्श आहे.

‘गुढीपाडवा ‘ या सणाला पौराणिकही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला, तो हा दिवस. महाभारताच्या आदी पर्वात उपरीचर राजाने, त्याला इंद्राने दिलेल्या कळकाची काठी जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून “गुढीपूजन ” केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर पार्वती यांचे लग्न चैत्रशुद्ध प्रतिपदेला ठरले आणि तृतीयेला झाले. म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.

ऐतिहासिक दृष्टीने विचार करता, “शालिवाहन” नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य केले. आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने क्षात्रतेज संपलेल्या समाजात आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रुवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर, या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात. त्यामुळे हा दिवस वर्षारंभ मानला जातो. व्यावहारिक दृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका ही शुभ मुहूर्तच असल्याने वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही. गणेशयामल या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की, 27 नक्षत्रांपासून निघालेल्या लहरींमध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्रशुद्ध प्रतिपदेला सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे रास्त आहे

या दिवशी पूजा करण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. प्रत्येक रूढी परंपरेला शास्त्रीय आधार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून ब्रह्मदेवाची दवणा (थंड असतो म्हणून) वाहून नंतर महाशांती केली जाते. ” नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः’/ हा मंत्र म्हणून विष्णूची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे दान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते. आरोग्य लाभते. समृद्धी येते. अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करताना, एका उंच वेळूच्या टोकाला भरजरी खण किंवा साडी, साखरेच्या गाठींची माळ, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची डहाळी आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा

चांदीचा कलश अशी सजवून गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते. याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे, उत्साहाचे, आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडूलिंब आणि आंब्याच्या झाडांच्या पंचांगाचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. (ते देव वृक्ष आहेत). कलशरुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. (अँटेनाच्या कार्याप्रमाणे). या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्न करून, प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकात संबंध वाढवून एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणी सुरुवात करतात. पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुका काढून आनंद लुटतात.

आपल्या प्रत्येक सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. आज काल आपल्या संस्कृतीचे प्रतिक म्हणून अगदी छोट्या टेबलवर ठेवण्यासारख्या गुढ्या परदेशी लोक घेऊन जायला लागले आहेत.

या शुभदिनानिमित्त येणारे नवीन संवत्सर “परभाव ” संवत्सर, शालिवाहन शके 1948 सर्वांना सुखाचे आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

नेहा मॅडमनी सांगितलेलं काम पूर्ण करून पार्लरमधून बाहेर पडायला सोनलला थोडा उशीरच झाला होता. ठरलेल्या कॉर्नरजवळ सुरेखा तिची वाट पाहत होती. हातातली प्लास्टिक बॅग सोनल पुढे करत सुरेखा म्हणाली,

  ॓ आज शेठाणिच्या सुनेने दोन छान ड्रेसेस दिलेत. तुला आवडेल तो घे यातला.॔

 सुरेखा आणि सोनियाची बालपणापासूनची घट्ट मैत्री चाळीतल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होता. मैत्रीचा धागा अतूट होता. घेतलेली किंवा मिळालेली प्रत्येक गोष्ट वाटून घेण्याची दोघींची सवय कायम होती.

  ॓ बरं झालं तू इथे बोलावलंस ते! खूप दिवसांनी असं भेटायला, बोलायला मिळालं आपल्याला.॔

  ॓ एक बात कहूॅं क्या?॔ मूळची उत्तर प्रदेशची असल्यामुळे सुरेखाच्या तोंडून सहजपणे हिंदी येत असे.

  ॓हो. सांग ना.॔

॓ तुझा तो बॉयफ्रेंड मनोज अलीकडे दुसऱ्या एका मुलीबरोबर भटकताना दिसतो. ये नादान लडके भॅ॑वरे जैसे होते है.॔

  ॓चूक झाली. अगदी कंटाळले होते मी घरातल्या वातावरणाला! एकदा सुनील मार्गाला लागला की तुझ्या लग्नाचं बघता येईल असं घरातील लोक सतत सांगायचे.॔

  ॓पगली है तू. तुझा बॉयफ्रेंड, तुझे आई-बाबा, भाऊ सगळे तुला ब्लॅकमेल करताहेत. तुझी आई चार ठिकाणी घरकाम करते. पण तुझा पप्पा काय करतो? सुनील तरी कुठे स्टडी करतो? माझ्या बड्या भाईने सुनीलला दोन-तीनदा सांगितलं की मी तुला टॅक्सी चालवायला शिकवतो. रविवारी सकाळी येत जा. कुठे आला? मेहनत करायला नको त्याला. उलट तू सांगितलंस की आईकडून भांडून एक हजार रुपये घेऊन मित्रांबरोबर तिरुपतीच्या ट्रीपला गेला. काय बोलणार?॔

  ॓माझं लग्न होईल तेव्हाच मी या सगळ्यातून सुटेन. पण मी ही अशी काळी. सगळ्यांची माझ्या पैशावर नजर. पण रात्री झोपायला सुरक्षित जागा लागते ना म्हणून सगळं सहन करायचं.॔

  ॓माझ्या मॉ ने तर सगळ्यांना मेहनत करून कमवायला शिकवलं. सोनल, तू बारावी पास आहेस. सावळी पण स्मार्ट आहेस. पार्लरमध्ये नोकरीही करतेस. थोडे- थोडे तरी पैसे बँकेत जमा कर. वहीं तेरे काम आयेंगे.॔

 घर जवळ आल्यावर सुरेखा म्हणाली ॓आता मी या रस्त्याने जाते. इकडे नवीन बांधलेल्या टॉवरमध्ये एका घरी रात्रीचं बर्तन साफ करायचं काम करते हल्ली. मेरी पैसेवाली बात ध्यान मे रख. बाय.॔

 सुरेखाला बाय करायला सोनलनेही हात उंचावला. सुरेखाच लक्ष नकळत सोनलच्या उंचावलेल्या हाताकडे गेलं. त्या हातावरची भाजल्याची खूण अजूनही आपलं अस्तित्व दाखवत होती. क्षणभर त्याच्याकडे पाहून सुरेखाने चटकन पुढे होऊन सोनलला गळामिठी मारली. जिव्हाळ्याच्या मैत्रीचा आश्वासक ओलावा त्यात होता. दोघींच्या मनात तो प्रसंग जागा झाला होता. शाळेत असताना एका दिवाळीत सुरेखा नवीन ड्रेस घालून पणतीवर फुलबाजी लावत होती. फुलबाजीची ठिणगी ओढणीवर पडून तिने पेट घेतलेला सुरेखाच्या लक्षात आलं नव्हतं. त्याचवेळी आपला नवीन ड्रेस सुरेखाला दाखवायला आलेल्या सोनलने कसलाही विचार न करता हाताने ती पेटती ओढणी खेचून दूर केली म्हणून सुरेखा जीवानिशी वाचली होती. घाबरलेल्या दोघीजणी नंतर एकमेकींना मिठी मारून रडत राहिल्या. त्यांना शांत करायला, सोनलच्या भाजलेल्या हातावर औषध लावायला सुरेखाची मॉ॑ आणि शेजारी धावून आले होते.

 घराच्या दिशेने जाताना सोनलच्या मनात आलं,॓ गेल्या काही वर्षात किती भराभर बदल होत गेला. स्वप्नातल्यासारखे टॉवर्स उभे राहिले. मनोजच्या बाईकवरून भन्नाट वेगाने जाताना आपणही असाच संसाराच्या स्वप्नांचा टॉवर उभारला होता. मनोजनं बाईक दुसरीकडे वळविल्यावर तोसुद्धा कोसळला. आता काय म्हणे तर लोअर परळला अप्पर वरळी म्हणायचं. ज्यांच्या जीवावर हे टॉवर्स उभे राहिले त्यांच्या नशिबी फक्त माना उंचावून या टॉवर्सचं ॓ दूरदर्शन घेणं आलं.॔ विचारांच्या भोवऱ्यात गरगरत चाळीचा जिना चढून सोनल वर गेली. खोलीच्या दाराशी सँडल्स काढताना तिला आतलं बोलणं ऐकू आलं. रडवेल्या आवाजात आई म्हणत होती, ऀकिती वर्षं काम करतेय मी त्यांच्याकडे. त्यांचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे हो माझ्यावर. आता हे किल्लीचं असलं काम करायचं म्हणजे…

 ॓ काय झालं पपा?  ॔

॓काही नाही ग. माळ्यावरच्या एका जुन्या ट्रंकेची चावी शोधायला सांगितलय मी तुझ्या आईला.॔

 स्वतःचा विचारात गुंतलेल्या सोनालीचे आईच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले नाही.

 ताई आणि सुमन यांचं लग्न झालं तेव्हा घरातील परिस्थिती तशी ठीक होती पण बाबांच्या फॅक्टरीत संप सुरू झाला आणि आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मी आणि सुरेखाने तेव्हा नुकतिच दहावीची परीक्षा आटोपली होती.

 दहावीचा रिझल्ट लागायच्या आधीच सुरेखाचं तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्यात आलं. जास्त शिकली तर बिरादरीमध्ये कोण लग्न करेल हिच्याशी! सुरेखाच्या वडिलांच्या जुनाट विचारसरणीमुळे, प्रचंड कर्ज काढून सुरेखाच्या लग्नाचा घाट घातला होता. सुरेखाच्या कोरड्या डोळ्यातली उदासी लपत नव्हती. जिवलग मैत्रीण दूर अलाहाबादच्या पुढे सासरी जाणार म्हणून आपण रडत आहोत असं वाटून सर्वजण आपलीही समजूत घालीत होते. सुरेखाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. तिने कॉलेज बघून येण्याचा हट्ट धरला. कॉलेजच्या आवारात हमसाहमशी रडणारी सुरेखा आपल्या डोळ्यापुढे येत होती. दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दुपारी ढाराढूर झोपणाऱ्या बायका…!” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “दुपारी ढाराढूर झोपणाऱ्या बायका…!” ☆ शीला पतकी 

निशा तणतणतच ऑफिस मध्ये आली. ” काय झालं बाई आज मूड नाही तुमचा”… “काही नाही ग जावेच आणि माझं जरा वाजलं ती म्हणाली तुम्हाला काय पानावरून उठता आणि ऑफिसला जाता आता बाकी मला करावा लागत”. मी तीला सुनावल ” पण तुम्ही दिवसभर दुपारी ढाराढूर झोपता आम्हाला तिथे विश्रांती मिळत नाही काही ऑफिसमध्ये “.. चिडली थोडा वादही झाला… मी म्हणलं, ” चल सोड आज आपल्याला मुख्य ऑफिसमध्ये जाऊन रिपोर्ट द्यायचा आहे. दुपारी दोन वाजता बोलवले, दीड वाजता आपण जाऊ. आम्ही दोघीही कामाला लागलो… दीड वाजता मुख्य ऑफिस मध्ये जायला निघालो. आम्ही बनवलेले प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं, त्याबाबत चर्चा केली त्याप्रमाणे थोडे फेरफार करून सगळी सामग्री त्यांच्या ताब्यात दिली आणि ऑफिस बाहेर पडलो.

निशाला मी म्हणलं, ” निशा अग लीला आत्याचं घर जवळच आहे आपण जाऊया का तिथे? ऑफिसमध्ये जाऊन डबा खाण्यापेक्षा तिच्या घरी खाऊ”. ती म्हणाली, ” चालेल आपलं काम लवकर झालं आहे आपण थोडीशी शॉपिंग पण करून घेऊयात इथे “… मी म्हणलं, “ठीक आहे” लीला आत्याला फोन केला… ” आत्या आम्ही येतोच ग अर्ध्या तासात. तुझ्या घरी बसून डबा खाणार आहोत. दुपारी येणार असल्यामुळे तुला काही डिस्टर्बन्स तर नाही ना? … ” ती मला म्हणाली, ” चमे मला कधीपासून डिस्टर्बन्स व्हायला लागला आणि आमच्या पिढीला असल काही होत नाही बरं! , ये मुकाट्याने”… मला हे उत्तर माहीतच होतं तिचं… आम्ही थोडं शॉपिंग केलं आणि लीलाआत्याच्या घरी गेलो. तिने गार पाण्याने आमचं स्वागत केलं.. म्हणाली ” हात पाय धुऊन घ्या आणि पहिल्यांदा जेवायला बसा”. मी म्हणाले “. छे ग डबे आहेत ना आमचे” त्यावर तिने माझा कान पकडला. म्हणाली, “चमे आत्याच्या घरी डबा घेऊन येती होय? .. ” 

मग हातपाय धुवून आम्ही जेवणाच्या टेबलवर गेलो आत्याचं स्वयंपाक घर आवरलेलं.. टेबलावर दोन ताट वाट्या चमचे, पाण्याने भरलेले ग्लास… कुकर नुकताच पडला होता त्याचा खमंग वास… तिने वाढायला घेतलं… डाव्या हाताला मीठ चटणी कोशिंबीर… या बाजूला बटाट्याच्या काचऱ्याची भाजी.. वाटीत दोन गुलाबजाम, कडेला मठ्ठ्याचा ग्लास… आणि कुकर उघडून तिने कमालीची खमंग सुंदर वासाची खिचडी पानात वाढली. त्याच्यावर खोबरं कोथिंबीर पेरलं आणि भरपूर लोणकढं तूप घातलं, दोन पोह्याचे पापड आमच्या पानात ठेवले म्हणाली, ” चमे (हे तिचे लाडके नाव) पोटभर जेव. ” निशाकडे बघून म्हणाली “तू पण पोटभर जेव बाई” …

आणि मग जेवताना बऱ्याच गप्पा झाल्या. तिची ती चविष्ट खिचडी, पेरलेले कोथिंबीर खोबरं आणि लोणकढं तुपाचा खमंग वास.. मेंदूने सूचना दिली ‘चला चालू व्हा’ आणि आम्ही भराभर जेवायला सुरुवात केली शेवटी ग्लासभर मधुर ताक आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम खाल्ले. तृप्तीची ढेकर दिली म्हणाले,

“लीला आत्या सुखी भव”.. नंतर हातावर सुपारी घेत आम्ही सगळे हॉलमध्ये आलो. मी तिला म्हणलं,

“आत्या सॉरी आमच्यामुळे तुझी दुपारची झोप… ” त्यावर ती पटकन म्हणाली, ” तुम्हाला नोकरी करणाऱ्यांना असंच वाटतं की आम्ही दुपारी ढाराढूर झोपतो “.. निशाने पटकन चमकून बघितलं “अग बाई हिला कसं कळलं “… असच वाटलं.

“सगळ्यांचा हा गैरसमज आहे ही घरी बसणाऱ्या बायका फार निवांत असतात. टीव्ही पाहतात. मासिक वाचत बसतात. सगळे घरातले कामाला आणि शाळेला निघून गेले की या निवांत… नोकरी करणाऱ्यांचा गैरसमज आहे. अगं घरात बसणाऱ्या महिलाना 24 तास काम आहे. तुम्हाला एकच बॉस आहे… आम्हाला… विचारूच नकोस.. पहाटे पाचला उठते मी. माझी सून नोकरी करते ना.. तिची दोन मुलं त्यांना नऊला शाळेत सोडावं लागतं. त्यांचा नाष्टा आणि टिफिन, सुनबाईचा नाष्टा टिफिन, समीर आणि हे एकाच दिशेने ऑफिसला जातात त्यामुळे समीर त्यांना सोडून जातो.. त्यांचा डबा… मग काय मी आणि आबा आम्ही दोघेच. आबाना छोटी गरम पोळी लागते. तिच्यावर तूप घालून त्यांना कुस्करून करून मी खाऊ घालते… हल्ली जेवणाला नको म्हणतात मग रोज काहीतरी वेगळे वेगळे करून त्यांना द्यावं लागतं. म्हातारं माणूस आहे काळजी घेणार कोण ग माझ्याशिवाय? अक्का गेल्यापासून फार एकटे पडलेत. तरी मला जमेल तेवढं करते मी. म्हणतात… ‘लेकीसारखं करतेस बाई’…

सकाळी या सगळ्यांचे करेस्तोवर अकरा वाजतात. मध्ये आबांचा नाश्ता असतो पथ्याचा… त्यांना दोनदा चहा लागतो. मग दुपारनंतर घर आवरणं, कामवाल्या धुणेवाली, भांडेवाली, झाडू पोचावाली.. अंगण झाडणं एक मोठं काम झाले “… मग तिने आम्हाला खिडकीतूनच तिची छोटी बाग दाखवली… मी चाटच झाले… ” अग आत्या किती भाज्या लावल्यास? ” ती म्हणाली, ” कोथिंबीर मिरची काही पालेभाज्या काही वेल त्यामुळे आडीनडीला घरच्या भाज्या मिळतात. तर फार मेहनत नाही. घरातलं पालेभाज्यांचं खत घालते. पाच साडेपाच ला अर्धा तास बागेत वेळ घालवते. मनही प्रसन्न होतं आणि नातवंडही माझ्याबरोबर काम करतात.. मज्जा येते… हल्ली संध्याकाळचा स्वयंपाक असतो कुठे चमे? … संध्याकाळी सगळ्यांना वेगळं काहीतरी हवं असतं… मग दुपारपासून त्याची तयारी करून ठेवते… कधी बटाटेवडे, कधी कटवडा, कधी पावभाजी.. सगळ्याची तयारी करून ठेवते मग. मात्र सुनबाई… ती ऑफिस मधून दमून आलेली असते, हाताशी सगळे तयारी असली की ती पटकन करते अर्थात मी करते तिला मदत… शिवाय दुपारी काय नको काय हव काय संपले का त्या डब्यातला उरले का सगळं मला बघावं लागतं. फ्रिज स्वच्छ करून घेते. हव नको ते काढून ठेवते. सगळ्यांच्या चादरी उशीचे अभ्रे क्रमाने मशीनला लावते. त्या बाईकडून ते सगळे नीट वाळत घालून घेते… पाच वाजता वाळलेले कपडे घरात आणावे लागतात… घरच्या बाईला खूप काम असतात.. आबांना दुपारी पुन्हा चार वाजता चहा लागतो त्याबरोबर ते दोन बिस्कीट खातात त्यांचा हात थरथरत असल्यामुळे चहा हाताने पाजावा लागतो त्यांना. व्यायाम देणारा माणूस पाच वाजता येतो त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. सगळ्यातून एक पंधरा मिनिटे वीस मिनिटं मिळाली तर झोप मिळते…

तुम्हाला नोकरी करणाऱ्या मुलींना वाटतं घरी बसणारी बाई डाराडूर झोपते… चुकीचा समज आहे…! तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये एखादी डुलकी घेत असाल पण आम्हाला ती मुभा नाही. घरी बसणारी बाई म्हणजे बिन पगारी, पूर्ण वेळचा, मायाळू, कर्तव्यदक्ष नोकर “… यावर आम्ही खूप हसलो.. “. खरंच लिला आत्या किती करता हो घरासाठी”… निशा म्हणाली. आत्या म्हणाली… ” हे बघ बेटा घर सगळ्यांच असत. घरात एकट्याला सुख घेण्याचा अधिकार नसतो.. सगळे राबतात ना.. मी घर सांभाळते… ही विभागणी आहे. प्रत्येकाचे योगदान तेवढेच असतं आणि हे समजून घेतलं ना तर आपण घराला मंदिर बनवू शकतो नाहीतर मग काय वादविवादाचा कोंबड्याचा खुराडा व्हायला वेळ लागत नाही “.

मी निशाकडे पाहिलं. ती समजायचं ते समजली. तासा दीड तासाने आम्ही लिला आत्याच्या घरातून बाहेर पडलो. निशा काहीच बोलत नव्हती. कॅब केली आणि आम्ही ऑफिसकडे निघालो. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, ” आपल्यापेक्षा तुझ्या आत्याचं आत्ताचं प्रेझेंटेशन छान झालं बाई! जाताना मी माझ्या जावेला एक गिफ्ट घेऊन जाणार आहे आणि चक्क गळ्यात हात घालून तिला म्हणणारआहे “माझं चुकलं, मी तुला उगीचच म्हणाले.. तुम्हाला काय डाराडून झोपता येत दुपारी…” काही म्हण तुझ्या आत्या ग्रेट आहेत एवढं खर”… “मग आत्या कोणाची आहे आणि कळलं ना तुला” निशा आता दुपारी घरी बसून डाराडूर झोपणाऱ्या बायका काय काय करतात ते कळल ना? “

“ हो ग हो “ म्हणून निशानी माझा हात हातात घेतला आणि आपली चूक कबूल केली…!

घर सांभाळून नोकरी करणाऱ्या आणि नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या समस्त महिलांना मुजरा आणि हा लेख समर्पित आहे.

बायकांनो तुमच्यामुळे कुटुंब संस्था टिकली आहे आणि ती मजबूत आणि सुसंस्कृत झाली आहे..

… फक्त घरातल्या दोन महिलानी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.

… असो

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सण गुढीपाडव्याचा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “सण गुढीपाडव्याचा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

 गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बांबुची उंच काठी, त्याच्या टोकाला जरीच वस्त्र, त्यावर उलटे पात्र (कलश), फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी आणि साखरेची पदक माळ अस चित्र लगेच समोर येतं.

परंपरे प्रमाणे वर्षानुवर्ष आपण अशी गुढी ऊभी करत आहोत. ती अशीच का उभी करायला सांगितली असेल बरं? याचा कधी विचार केलात का?

 त्याचा निश्चितच शास्त्रशुद्ध अर्थ असणार…

राष्ट्रसेविका समितीच्या नित्य पाठाच्या पुस्तकात यावरचे एक सुरेख गीत आहे. त्या गीतात गुढीचा नेमका जो भावार्थ आहे तो सांगितलेला आहे. हिंदू संस्कृतीत कधीकधी प्रतिकांचा वापर असतो. त्यातून काहीतरी शिकवण आणि बोध आपण घ्यायचा असतो. यावर्षी आपण तो समजून घेऊ.

मान वर करून बघावं लागेल अशा ऊंच जागी गुढी उभी करायची. आपलं ध्येय हे नेहमी उच्च असावं… हेच ही काठी सुचवते. अर्थात हे सहजा सहजी होणार नाही. त्यासाठी आपण वेळ न घालवता सतत कष्ट केले तरच हे साध्य होते… असा कानमंत्र ती देते.

पहाटेच उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन गुढी उभी करायची.

सहजपणे लक्षात येतं… लवकर उठलं की कामं करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. घ्येय गाठायचं असेल तर कृती करताना काळाचं आणि वेळेचं भान ठेवायच हे गणित जमायला हव.

आज सण आहे म्हणून भरजरी वस्त्र गुढीला लावलेले आहे. ते सांगते.. जीवनात सतत आनंद मिळेल अशी वेडी आशा ठेवायची नाही. दुःखही अटळ आहे.. त्याची पण तयारी ठेवा.

कोणाला दान द्यायचे असेल तर आपण ते पात्र पूर्ण पालथे करतो. रिकामे करतो… त्याचेच प्रतीक हे गुढीवरचे पात्र आहे. म्हणूनच ते पालथे आहे. ढग पृथ्वीवर जलधारांचा वर्षाव करून पूर्ण रिकामे होतात… निसर्गातून आपल्याला हा संदेश दिलेला आहे. यातून आपला हात देणारा… मदतीचा असावा हे शिकवले जाते.

कर्तव्य निभावताना वेळ.. प्रसंगी कठोरपणे निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा ते कटु वाटले तरी..

 शेवटी ते हिताचे असतात. त्याने मनाला पुढे शांती मिळणार आहे. कडुलिंबाकडून हा बोध घ्यायचा.

गुढीवर साखरेचा मध्यभागी छान पदक असलेला हार असतो. बुद्धी वैभव आले तरी त्याचा गर्व नाही करायचा. अंगी नम्रता हवी. वाणीत गोडवा असावा.. शब्दात मधुरता असेल तरच लोक जोडले जातात.

तर असा हा आपल्या गुढीचा सुरेख अर्थ…

आता यापुढे गीतात जे सांगितले आहे ते फार महत्त्वाचे आहे.

आता अशीच गुढी यावर्षी आपण आपल्या मनात लावूया. ती लावताना मातृभूमीच्या प्रेमाचा सडा टाकायचा, अंतकरणात प्रखर देश निष्ठेची रांगोळी काढायची. मी आणि माझे इतके सिमित न राहता भारत मातेची सेवा हे उच्च ध्येय ठेवायचे.

अशी ही नवीन संकल्पनांची गुढी उभी करून.. आनंदानं नववर्षाचे स्वागत करायचं.

हातचं काही न राखता देशासाठी सर्वस्व अर्पण करायचं. हे ध्येय ठेवलं तर पुढचं वर्षच नाही तर आयुष्य आनंदात जाणार आहे.

इतका विशाल विचार राष्ट्रसेविका समितीच्या गीताने… प्रतिकात्मक अर्थाने आपल्याला दिलेला आहे. तो तर समजला. आता कृती करणे आपल्या हातात आहे.

मी काय करू शकेन.. काय करायला हवं… यासाठी मला कोण सहाय्य करेल… याचा विचार करा. आसपास शोध घ्या. तुम्हाला ऊत्तर मिळेल. प्रत्येकाने थोडे थोडे काम केले तरी सगळ्यांचे मिळून खूप काही होणार आहे. त्यासाठी एकत्र येऊया.

आमच्या राष्ट्र सेविका समितीत या… इथे हेच शिकवले जाते.

मी नेहमी सांगते ते आठवा बरं…

“संगत फार महत्त्वाची असते. “

हा नवा विचार मनात रुजावा… यावर्षी तो समजून घेऊन आपण गुढीकडे पहावे…

म्हणून हा लेखप्रपंच…

मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ”आगळा वेगळा Father’s Day.” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “आगळा वेगळा Father’s Day” ☆ संध्या बेडेकर ☆

आज morning walk ला श्री साठे आले नाहीत. सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. ज्येष्ठांचा हा दहा जणांचा गृप रोज बगीच्यात एकत्र होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करतात. walk करतात. सात ते आठ ही यांची व्यायामाची / walk ची ठरलेली वेळ आहे. त्यानंतर एक तास गप्पा गोष्टी.

 वर्तमान पत्रातील बातम्या, आयुष्याचे अनुभव, किस्से या जेष्ठांजवळ भरपूर असतात. नवीन टेक्नॉलॉजी चे अर्धवट ज्ञान असते, शेअर्स चे चढ उतार, अनेक अनुभवांनी श्रीमंत असलेला हा वर्ग, कधी कधी तर बायकांच्या वरताण गप्पा मारण्यात पटाईत आहेत, असं वाटतं. सध्या तर Cricket World Cup च्या रोजच मॅचेस असतात, त्यावर चर्चा होते, खरंतर गप्पा थाबवाव्या लागतात.

 येथे त्यांना हळु बोला,

अहो! हे खूपदा सांगनू झाले तुमचे,

असं म्हणणार कोणी नसतं.

सांगता सांगता विसरल तरी चालतं. नाव आणि आडनाव तर बहुतेक आठवत नाहीच, तरी सर्व ऐकतात, दाद देतात.

नाईलाजाने साधारण नऊ वाजता सगळे जण आपापल्या घरी जातात. या पिढीची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर्व रिटायर्ड पण वेळेवर येणार अन् वेळेवर जाणार.

संध्याकाळी पुन्हा बस स्टॉप वर एकत्र भेटतात, तास दोन तास गप्पा झाल्या की आपापल्या घरी जातात.

ही मंडळी काही लहान पणापासून चे मित्र वगैरे नाहीत. Retired झाल्यावर हळूहळू एकमेकांशी ओळख झाली आणि हा गृप वाढत गेला. आता तर भेटणे हा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक आनंदाचा कार्यक्रम झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर बगीच्यात जायचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.

काही कारणास्तव कोणी येऊ शकलं नाही तर ते स्वतः आणि बाकीचे सुद्धा बैचेन होतात. विचारपूस करताना कुठेतरी काळजी चे सूर असतात. आपली काळजी करणारे कोणी आहेत, ही भावना शक्ति देते. निराशा दूर करते. जगण्याचा आनंद वाढवते.

यांना एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे आयुष्य आनंदात जगायला, गप्पा मारायला मित्र लागतात.

हमारे दुनिया में अकेलेपन की कोई जगह नहीं है। किसी को अपना हम बनालो  

हा मंत्र त्यांना समजला आहे.

यातील प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. कोणी खूप चांगल्या नोकरीतून अवकाश प्राप्त अधिकारी आहेत. तर काही सर्व साधारण नोकरी केलेले आहेत. काही आजही सहजीवन जगतायेत, तर काही आज आयुष्याच्या संध्याकाळी एकटे आहेत. कोणी एकटेच राहतात तर कोणी आपल्या मुलासूने बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरांतील वातावरण, समस्या, आधार, प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे.

या गृपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः चां एकटेपणा घालवायला, active रहायला एक उत्तम मार्ग शोधला आहे. मधून मधून बाहेर जेवायला जातात. पार्टी करतात.

या गृपचे काही नियमही आहेत बरं का??

आपल्या घरातील गोष्टींची चर्चा येथे करायची नाही. औषध आजारपण याबद्दल ही बोलायचे नाही. मदत हवी असल्यास निःसंकोचपणे बिनधास्त मागायची. घरच्या चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना सांगायच्या, बरोबर त्यादिवशी चां चहा पण सर्वांना द्यायचा.

थोडक्यात रडगाणे गायचे नाही. आनंद शोधायचा आणि साजरा करायचा. त्यामुळे चहाच्या टपरीवर हा गृप वारंवार दिसतो.

आज माझ्याकडून चहा यांची सर्वांना आता सवय झाली आहे.

आनंदी जगायची यांनी सवय लावून घेतली आहे.

बरोबर आहे,

म्हणतात ना, •••

आनंदी जगणे ही निवड असावी, नाही की अपेक्षा. तुम्हाला तोपर्यंत कोणतीच गोष्ट आनंद देणारं नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची निवड करणार नाही.

Sometimes you hv to remind yourself that life can even more beautiful even though the things are not moving in your own way. 

**आज Father’s Day **

बहुतेकांची मुलं जवळ नाहीतच. बहुतेकांना मुलांचा 

**Happy Father’s Day** असा मेसेज आला.

पण श्री साठे या मेसेज ची, फोन ची वाट बघत होते. जूने अल्बम बघत होते, डोळ्यांतून अश्रू घळघळ वाहात होते. आयुष्याचा सिनेमा *Real story * डोळ्यासमोरून सरकत होती. श्री व सौ. साठे उदास होते. कधी कधी असं होतं, कितीही मनाला समजवा, पण चांगल्या तर नाहीच नाही, पण वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यातून आपलं अस्तित्व दाखवायला जराही वेळ लावत नाही.

आज श्री साठे मुलांच्या आठवणीने उदास होते.

मागच्या वर्षी श्री साठे आजारी पडले, दवाखान्यात अॅडमिट होते. सकाळी साताऱ्याहून *तो* आला आणि संध्याकाळी परत गेला. एक दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

एक फोन करण्याइतपत ही त्याला वेळ मिळत नाही का?? मग मेसेज चे तरी काय करायचे म्हणा??

श्री साठे म्हणाले, ••• 

अग!! आपण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का?? एखादं दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

सौ. साठे म्हणाल्या, ••• 

अहो!! असेल त्याला काही महत्वाचे काम. तुमची मित्रावळ आहे की आपल्याकडे, आधार द्यायला. सोबत आहे की त्यांची.

तेंव्हाच श्री कुलकर्णी श्री साठेंची विचारपूस करायला म्हणून घरी आले होते. दोघांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या.

एकंदर दोघांच्या मनस्थितीचा अंदाज त्यांना आला.

ते तसेच परत फिरले. श्री कुलकर्णी स्वतः बरोबरच बोलत होते. विचार करत होते.

खरंच श्री व सौ साठे मनाने हळवे झाले आहेत. बायका छोट्या छोट्या गोष्टीं आठवून रडतात. मन हलकं करतात. परंतु आज श्री साठे रडतायेत, तर रडू द्यावे. मनात साचून ठेवण्यापेक्षा रडून मोकळ व्हावे.

का पुरूषांना रडायची बंदी आहे का?? त्यांना मन नसतं की भावना नसतात?? त्यांना दुःख होत नाही का?? त्यांनी भावना का दाबून ठेवायच्या?? दुःख एकत्र झालं आणि हा बांध अचानक फुटला, स्फोट झाला तर अनर्थ होईल. •••

भावनांचा बांध फुटण्याआधी त्याला outlet देणे आवश्यक आहे. 

काय करणार?? लहान पणापासून मुलांनी हेच ऐकलेल असतं ना.

अरे!! तू मुलगा आहेस ना तरी रडतो. मुलं रडत नाहीत. 

हे चूकच आहे.

मनसोक्त हसावं, तसंच जेंव्हा रडावसं वाटतंय तेंव्हा मनसोक्त रडाव सुद्धा. रडून मन हलकं होतं. मनावरचं प्रेशर कमी होत. मनातील अडगळ, कचरा बाहेर पडणं आवश्यक आहे.

आपल्याच विचारात श्री कुलकर्णी घरी आले. त्यांना अस्वस्थ बघून सौ कुलकर्णी नी विचारले •••

काय झाले.?? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात??

श्री कुलकर्णीचें बोलणे ऐकून सौ कुलकर्णी ना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, •••

 ** आज सर्वांना घरी बोलवा हो. बहुतेकांची मुले बाहेरच आहेत. आपण सर्व एकत्र बसून, गप्पा मारू. सर्वांनाच बरं वाटेल आपला अजय तरी आपल्या जवळ कुठे आहे??

आज गृपवर श्री कुलकर्णी यांनी सर्वांना आमंत्रणाचा मेसेज पोस्ट केला.

आज माझ्याकडून वडापाव आणि चहा पार्टी.

सर्वांनी संध्याकाळी घरी यावे.

मी आणि आपण सर्वच चांगले बाबा होतो. आपली सांपत्तिक परिस्थिती, क्षमता, कुवतीनुसार आपण सर्वांनी आपापले परिवार छान सांभाळले. आज आपण सर्व आपल्या स्वतः चाच कौतुक समारंभ साजरा करूया. स्वतः चीच पाठ थोपटूया. 

**Father’s Day ** साजरा करूया.

आज श्री कुलकर्णींच्या घरी आगळावेगळा Father’s Day झाला. काहींच्या सौ. पण आल्या होत्या.

श्री व सौ साठेही आले होते. गप्पांत रंगले होते.

श्री व सौ कुलकर्णी यांचा उद्देश सफल झाला होता. खरंतर आजची पार्टी खास करून त्यांच्या साठीच होती.

बरोबर आहे, ••••

 ***आज कोणीतरी आपल्या मुळे आनंदी आहे. ***

ही एक सर्वोत्तम feeling आहे. ***

**When life gives you hundred reasons to break down and cry. Show life you have millions reasons to smile and laugh. ***

एकतर म्हातारपण म्हणजे वेगळीच फेज, त्यात शरीर नाजूक आणि मन हळव झालेलं असतं. त्यात भरपूर रिकामा वेळ हातात असतो. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, वेगवेगळे असतात. फक्त ते 

**स्वीकार करायची हिम्मत असावी/ ठेवावी, आणि त्याच परिस्थितीत सुधार करण्याची ईच्छा असली तर, ••••

Life becomes easy and happy. 

म्हणतात ना, •••

**You can not find happiness with negative mindset. Start thinking positive and happiness will find you. **

 श्री व सौ कुलकर्णी सारखा एक तरी मित्र प्रत्येकाला नक्की असावा.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

खूप वर्षापूर्वी`रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेली ही कथा. ती मनाच्या कुपीत कायमची वसली.

तेरा-चौदा वर्षाचा अंध मुलगा डेव्हिड हार्टमन, आपल्या बाबांना मोठ्या उमेदीने विचारतो, `बाबा… अगदी मनापासून सांगा हं… मी डॉक्टर होऊ शकेन? ‘

स्वभावाने प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले त्याचे बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. गहन विचारात गढून जातात. `काय सांगायचं या अंध मुलाला? पण या अति उत्साही आणि उमद्यामुलाचा तेजोभंग तरी कसा करायचा? ‘

ते म्हणतात, `डॉक्टर? बेटा, तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल? तू प्रयत्न करशील ना? ‘

जन्मताच डोळ्याच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन आलेला डेव्हिड, आठ वर्षाचा झाला आणि त्याला पूर्ण अंधत्व आलं. तेव्हापासून तो आपल्या बाबांना, `मी हे करू शकतो का? .. ते करू शकतो का? … ‘ असं सतत विचारायचा.

दहा वर्षाचा असताना त्याने बाबांना विचारले, `बाबा, मी बेसबॉल खेळू शकेन? ‘

`वेल, चल! प्रयत्न करूया. ‘ त्याचे बाबा म्हणाले. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला. बाबांनी तो बॉल जमिनीवरून सरपटत त्याच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. डेव्हिड हळूहळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून बॉल पकडायला शिकला. नंतर तो बॅटिंग शिकला. गवतातून फिरत येणार्‍या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला. काही काळाने त्याने यात प्राविण्य मिळवले.

Realm of possibility… काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात… या तत्वानुसार डेव्हिडच्या कुटुंबाने दृढ निश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी बनवायला सुरुवात केली. काही वेळा काहीच न दिसल्यामुळे तो रडायला लागायचा आणि म्हणायचा, `ममा, मी काहीच करू शकत नाही. ‘ मग त्याची आई त्याला कुशीत घेऊन म्हणायची, `माहीत आहे रे… ‘ डेव्हिडची बहीण बार्बरा मात्र कठोर होती. अर्थात त्याच्या भल्यासाठीच. आपलं ब्रेलचं घड्याळ जर पहिल्या मजल्यावर विसरला, तर डेव्हिड तिला आणून द्यायला सांगायचा. बार्बारा म्हणायची, `तुझा तू जा आणि आण. तुला काय वाटतं, कायम तुझ्या दिमतीला कुणी ना कुणी असणार आहे? ‘ 

– – तर असा डेव्हिड मोठा होऊ लागला. त्याला नक्की कळलं, की अंधत्व ही ट्रॅजिडी नाहीये. आपण काहीही करू शकतो. त्याचा हा आत्मविश्वास दिवसेंदिवस बळावत गेला. तेराव्या वर्षी त्याने आपल्या आई-बाबांना आणि बहिणीला सांगून टाकलं, की त्याला डॉक्टर व्हायचय…

डेव्हिडने शिक्षणाचा मार्ग नक्की केला आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरू केला. त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव `हारटाउन्स हायस्कूल ‘ मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of possibility चं.. तत्व मान्य होतं, तरीही… मनोदोष चिकित्सक होणं, त्या Realm of possibilityच्या नक्कीच बाहेरचं होतं. त्यांना वाटत होतं, डेव्हिडची महत्वाकांक्षा मूर्खपणाची आहे. कॉलेजमध्ये त्याच्या शिक्षकांनीदेखील त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, `तुझ्या आवाक्यातले इतर विषय का निवडत नाहीस? म्हणजे इतिहास वगैरे… ‘

डेव्हिड म्हणाला, `मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये. `मला दिसत नाही, हे खरय, पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतंच! मला वाटतं, जे कुणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत, ते खरं तर अपंग आहेत. मी सायकीअ‍ॅट्रिस्ट व्हायचं ठरवलय, कारण माझा माझ्यावर ठाम विश्वास आहे. मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकेन. ‘

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात त्याची भेट, मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या चेरील वॉकरशी झाली. हिरवे डोळे असलेली ही चेरील वॉकर अतिशय हुशार होती. नंतर त्यांच्या मैत्रिचं रुपांतर त्यांच्या प्रेमात झालं. १९७२मध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले.

डेव्हिडने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. त्यापैकी आठ कॉलेजेसनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला. २७ एप्रीलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजमधूनही नकाराचं पत्र मिळालं. त्याला वाटत होतं, की हे कॉलेज तरी त्याला प्रवेश देईल. पण इथेही नकारच आला. डेव्हिड मनातून एकदम खचला. हताश झाला.

– – फिलाडील्फियामधलं दहावं कॉलेज, टेंपल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन… त्याचे असिस्टंट डीन आणि प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख होते, डॉ. एम. प्रिन्सब्रिगहॅम. त्यांनी डेव्हिडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं, `जर आपण ऑलिम्पिकच्या समितीत असतो, आणि शंभर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता, तर आपण त्याला धावू दिलं असतं ना! … डेव्हिडने आधीच अनेक अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया, तो कुठपर्यंत जातो. ‘

दुसर्‍या दिवशी डेव्हिडला त्याच्या आईचा फोन आला, ती म्हणाली, `तू खूप दिवस ज्याची वाट पाहत होतास, ते पत्र तुला आलय. ‘ त्याच्या आईचा आवज दाटून आला. तिला पुढे फोनवर बोलणं अशक्य झालं. बार्बाराने फोन घेतला आणि म्हणाली, `यू हॅव डन इट… ‘ तिलादेखील अश्रू आवरले नाहीत. `तुला टेंपल युनिव्हर्सिटीने स्वीकारलय. ‘ आणि डेव्हिड ध्येयाच्या वाटेवर चालू लागला.

… वाट बिकट होती. डेव्हिडला त्याची कल्पनाही होती. पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप… त्याचं ध्येय दिसत होतं.

सुरुवातीलाच त्याला अ‍ॅनाटॉमीच्या इंट्रोडक्टरी कोर्सेसच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या. हातात रबराचे ग्लोव्हज घालून, अनेक मोठे अवयव तो चाचपून ओळखायला लागला. पण लहान अवयव विशेषत: nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोव्हज काढावे लागले. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधीर होत. हे सगळं चालू असताना डेव्हिडने या विषयांना अनुसरून असलेली असंख्य पुस्तके विकत घेतली. या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिकाही विकत घेतल्या.

मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेव्हिड आणि चेरीने लग्न केले. तिसर्‍या वर्षात असताना खरं आव्हान सुरू झालं. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं सुरू झालं. त्याला x-ray बघता येत नसल्याने, तो कान, डोळे, तोंड आपल्या सहका-यांच्यावाचून तपासू शकत नसे. x-ray चं वर्णन त्याला त्याचे सहकारी किंवा नर्स सांगतील, त्याप्रमाणे त्याला उपचार करावे लागत. त्या बाबतीत तो त्यांच्यावर अवलंबून होता, पण पुढे त्याने स्टेथॉस्कोप आणि स्पर्शज्ञान खूप विकसित केलं.

२७ मे १९७६ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली. त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली, की तो इतरांपेक्षा वेगळा नाही. त्याला अगोदर नकार देणारे प्रोफेसरही पदवीदान समारंभाला आले होते. ते म्हणाले,

` Devid is not normal… he is super normal… ‘

अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक लोक त्याच्या जिद्दीवर, अथक परिश्रमावर, दिगंत आत्मविश्वासावर भरभरून बोलले. RFB चे प्रेसिडेंट जॉन कॅसल, त्याचं कौतुक करताना म्हणाले, ‘माणसाच्या अत्युच्च तेजाचं हे दर्शन आहे. ‘ भाषण संपवताना ते म्हणाले, `डेव्हिडच्या या उदाहरणाने, आपल्याला एक नवीन विश्वास मिळालाय, तो म्हणजे, माणसाला काहीही मिळवणं शक्य आहे. ‘

… सभागृहातील सगळे जण त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले.

– – डेव्हिडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं, `माझ्या बाबांचं बरोबर होतं. ते म्हणायचे, ‘ प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल, तू काय करू शकशील ते? ‘

– – – आपण आपल्याकडे सगळं आणि भरभरून असलं, तरी `हे नाही, ते नाही’, म्हणून रडगाणं गातो. डेव्हिडचं आभाळाएवढं कर्तृत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.

लेखक :  अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वभावाला औषध असतं” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “स्वभावाला औषध असतं” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं.

– स्वभावातला स्व सोडून भाव जपायचा असतो!

– नाराजीतला ना सोडून राजी होऊन हसायचं असतं!

– अधीरातला अ सोडून धीरानं घ्यायचं असतं!

– मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं!

– हरामातला ह सोडून रामासारखं जगायचं असतं!

– संतापातला ताप सोडून संत व्हायचं असतं!

– संवादातला वाद सोडून सुसंवाद साधायचा असतो!

– अहंकारातला अहं सोडून ॐकारात विलीन व्हायचं असतं!

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ उत्पलमय ही फुलवंती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? उत्पलमय ही फुलवंती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : बालानंद, मात्रा : ८+६=१४)

पुष्करणीची जलवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

सरोवराला मोहविती

सरितेची जडली प्रीती

भ्रमरासाठी रसवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

रक्तिम निरज सजलेले

सुवर्ण पंकज रुजलेले

अंबुजातली मधुवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

श्वेत साजरी सरोजिनी

वागेश्वरी वरदायिनी

जलाशयातील भ्रमंती

उत्पलमय ही फुलवंती

*

कलिकांनी उमलू आले

पर्णांवर मोती झाले

हरितांगी जणू लजवंती

उत्पलमय ही फुलवंती

 *

मेघ जणू सरसी आले

पंकज नील रंगी न्हाले

काय देखणी निलवंती

उत्पलमय ही फुलवंती

*
पावस ऋतूत आलेला

वसंत रंगी न्हालेला

राष्ट्र फुलाची श्रीमंती

उत्पलमय ही फुलवंती

*

कधी कधी वाटते मला

कवनच द्यावे कमळदला

सरगममय अन् स्वरवंती

उत्पलमय ही फुलवंती

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फुलला असा बहावा… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

 

?️? चित्रकाव्य ?️?

? फुलला असा बहावा… ? प्राची अभय जोशी ☆

हिरव्यागार गवतपातीच्या,

तनुवरील थेंब पाण्याचे 

मनाला मोहून टाकती हे,

सोनेरी कवडसे उन्हाचे

*

चिंब पडलेला पाऊस,

भिजवी या आठवणींना

अलवार रेशमी जाणीवांनी,

हळवे करीतसे मनाला

*

अशा वळीव सरींनी 

बरसणाऱ्या नभाचा

जणू क्षण पुरे एक प्रेमाचा,

देतसे नजरेतला दिलासा

*

गुंफलेले क्षण नाजूक,

मनावर करतात राज्य

जणू ते ही एकमेकास,

मोहरुनी देतात हास्य

*

जाणते हे आपुले नाते,

उलगडावे असे हळूवार

प्रेमळ क्षणांनीच ते,

जपावे मनी अलवार

*

पिवळा सुन्दर सोनेरी 

फुलला असा बहावा 

पाहता मनात नाचला 

मनमोर आठवणींचा 

*

आपुले निरपेक्ष प्रेम असे,

जसे की बहरला हा बहावा

मनांमध्ये आपुल्या आपण,

हा अव्यक्त अर्थ जपावा…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares