मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रावणदान… लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ श्रावणदान… लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर

मावशी अनेक वर्ष मुंबईत एका माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. अगदी सात्विक आणि शांत स्वभाव. एकट्याच राहायच्या. लग्न न केल्यामुळे स्वतःचा गोतावळा नव्हताच पण इतर नातेवाईक वगैरेही फार कुणी नाही. जे थोडेफार असतील तेही लांबचे. त्यामुळे जाणं येणं तर नाहीच. नाही म्हणायला एकमेव विश्वासू भाचा आणि वरच्या मजल्यावर राहणारी समवयस्क मैत्रीण हे दोघेच त्यातल्या त्यात जवळचे. भाचा बडोद्याला रहायचा त्यामुळे प्रत्यक्ष भेट कमी व्हायची पण तरीही बऱ्यापैकी संपर्कात असायचा. मैत्रीण मात्र जाता येता दिवसातून एकदा तरी भेटायची. दोघींची चांगली गट्टी होती. मावशींना आता निवृत्त होऊनही दोनेक वर्ष झाली होती त्यामुळे निवृत्तीनंतरच्या दिनक्रमात देखील व्यवस्थित रुळल्या होत्या. दिवसभराची घरची कामं, पूजाअर्चना, वाचन, वामकुक्षी, थोडाफार टीव्ही, फेरफटका या सगळ्याच्या जोडीला काही सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय असायच्या.

मुळात गरजा कमी त्यात एकटा जीव. त्यामुळे पेन्शन मध्ये व्यवस्थित भागायचं. इतक्या वर्षांच्या नोकरीमुळे आज दोन पैसे गाठीशी असले तरी मावशींचं बालपण मात्र बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत गेलं होतं. पण त्या परिस्थितीतही मावशींना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी काबाड कष्ट केले. स्वतः अनेक हाल सोसले, तडजोडी केल्या पण मावशींच्या शिक्षणात कुठलीही कसर सोडली नाही. दुर्दैवाने, मावशी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांची आई गेली आणि त्यानंतर अगदी तीन महिन्यातच वडील सुद्धा हे जग सोडून गेले. आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची त्यांना नेहमीच जाणीव होती. कॉलेज पूर्ण झालं आणि त्यावर्षीच्या श्रावणात मावशींच्या एकदम मनात आलं की आपल्या आईवडिलांच्या नावे गरजूंसाठी काहीतरी दान करावं. त्यायोगे आईवडिलांबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटलं असेल. श्रावणदानाचं मनात आल्याआल्या लगेच त्याच दिवशी त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेत जाऊन यथाशक्ती देणगी दिली. त्यानंतर आजतगायत अगदी वयाच्या साठीपर्यंतही प्रत्येक श्रावणात दान करण्याचा नेम कधीही चुकला नव्हता.

शिक्षिका असल्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा वेगवेगळ्या संस्थांतर्फे अनेक मुलांना ज्ञानदान तर त्या करायच्याच पण दर श्रावणात मात्र कधी देणगी स्वरूपात तर कधी गरिबांना अन्नदान, कधी एखाद्या अनाथाश्रमात मुलांना कपडे, खेळणी, एखाद्या वर्षी वृद्धाश्रमात राहणाऱ्यांसाठी औषधं, रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं असं दरवर्षी काही ना काही दान श्रावण महिन्यात करायच्याच. आणि विशेष म्हणजे याचा कुठे गाजावाजा नाही की कधी साधी वाच्यतही नाही. अगदी भाच्याला आणि मैत्रिणीलाही या श्रावणदान संकल्पाची काहीही कल्पना नव्हती. आपल्या आईवडिलांचं स्मरण आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्या सगळ्याची जाणीव ठेवून कुणा गरजूच्या आयुष्यातली एखादी उणीव कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने दान हाच एकमेव हेतु.

असाच एक श्रावण उजाडला आणि यावर्षी काय दान करता येईल हा विचार मावशींच्या मनात घोळू लागला. लवकरच ठरवून त्याप्रमाणे वस्तु घेऊन या वर्षीचे श्रावणदान पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानंतर ८-१० दिवस झाले असतील. मावशी बाजारातून भाजी घेऊन येत होत्या. इतक्यात घरासमोरचा रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या एका वाहनाची धडक लागली आणि मावशी खाली कोसळल्या. बेशुद्धावस्थेत असलेल्या मावशींना आजूबाजूच्यानी हॉस्पिटलमध्ये नेलं. भाचा काही तासात पोचला पण शेजारची मैत्रीण मात्र नेमकी अमेरिकेत लेकाकडे गेली होती. पुढच्या महिन्यात येणार होती. पुढे ३-४ दिवस मावशींच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. मावशी जरी बेशुद्ध असल्या तरी त्यांच्या मनात यावर्षी श्रावणदान करणं शक्य होणार नसल्याची हुरहूर नक्कीच असणार.

अपघाताची बातमी ऐकल्यापासून अस्वस्थ झालेल्या मैत्रिणीला कधी एकदा भारतात येऊन मावशींना भेटतेय असं झालं होतं. शेवटी न राहवून लेकाला मिळेल तितकं लवकरचं तिकीट काढायला सांगितलं आणि अखेर ४ दिवसांनी मुंबईसाठी प्रयाण केलं. विमानतळावरून थेट हॉस्पिटल गाठलं आणि मैत्रिणीच्या उशाशी जाऊन बसली. बेशुद्धावस्थेतल्या मावशींना बघून मैत्रिणीला अश्रु अनावर झाले आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन शांत बसून राहिली. १०-१५ मिनिटांनंतर मावशींच्या सभोवताली जोडलेल्या विविध उपकरणांतून दिसणारे आकडे बघून डॉक्टरांची फौज धावत आत आली. तातडीने मावशींची तपासणी केली. पण जे घडू नये असं वाटत होतं तेच घडलं. मावशी सगळ्यांना सोडून गेल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

भाचाही तिथेच असल्यामुळे लगेच पुढची प्रक्रिया सुरू झाली. अमेरिकेच्या मोठ्या प्रवासातून परस्पर आलेल्या मैत्रिणीला हॉस्पिटलमधली प्रक्रिया होईपर्यंत थोडा वेळ विश्रांती घ्यायला घरी जाण्याचा आग्रह सगळ्यांनी केल्यामुळे ती जड अंतःकरणाने निघाली. गाडीपाशी आली आणि अचानक थबकली. काहीतरी आठवलं अन् एकदम वीज संचारल्यासारखी पळत पुन्हा वर हॉस्पिटलमध्ये गेली. मावशींनी ५-६ महिन्यांपूर्वी नेत्रदानाचा फॉर्म भरला होता ते तेव्हा तिच्या कानावर घातलं होतं. पण “ याची तुला इतक्यात गरजच पडणार नाही. शतायुषी होशील तू !” असं मैत्रीण तेव्हा थट्टेने म्हणाली होती. आजही आपली मैत्रीण आता काही दिवसात बरी होऊन घरी येईल याच आशेवर ती लगबगीने आली असल्यामुळे मावशींच्या नेत्रदानाचा विषयही मनाला शिवला नव्हता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मावशींच्या शेवटच्या क्षणी मैत्रीण तिथेच असल्यामुळे लगेचच नेत्रदानाबद्दल समजलं, संबंधित संस्थेशी त्वरित संपर्क केला आणि नेत्रदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला अवधी मिळाला.

अनेक दिवस निपचित पडून असलेल्या मावशींनी मैत्रीण येताच प्राण सोडले. किंवा आता आपलं जाणं अटळ आहे पण त्यामुळे आपल्या आईवाडिलांसाठी इतकी वर्ष नेटाने केलेल्या श्रावणदानात खंड पडू नये असा विचार कदाचित त्या अचल शरीरातल्या सक्रिय मनात सुरू असेल. जणू काही म्हणूनच नेत्रदानाबद्दल माहिती असलेली एकमेव मैत्रीण येईपर्यंत मावशींचे श्वास विधात्याने सुरू ठेवले होते. या सगळ्यामुळे एका दृष्टिहीन व्यक्तीच्या काळोख्या आयुष्यात उजेड तर येणारच होता पण श्रावण संपायच्या केवळ ३-४ दिवस आधी मावशींच्या पश्चातदेखील नियतीनेच पूर्ण करून घेतलं होतं मावशींचं…. “ श्रावणदान “

लेखक : श्री क्षितिज दाते

ठाणे

प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे – माहिती संग्राहक – अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे – माहिती संग्राहक – अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

चित्र प्रदीप तम्हाने

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला. शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची.

२६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी माध्यम शाळेत प्रदीपचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरचं वातावरण टिपीकल मध्यमवर्गीय असंच होतं. त्याकाळी टॅक्सीत बसणं म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असायची. वर्षातून दोन-तीन वेळाच टॅक्सीमध्ये बसण्याची संधी मिळे. एकतर लालबाग परळ सारख्या कोण्या नातेवाईकाकडे जायचे असेल तर, गावी जाताना एसटी डेपोत जाण्यासाठी किंवा कोणीतरी आजारी असेल तर. अशा त्याकाळच्या वातावरणात प्रदीप मोठा होत होता. मुळात हुशार असल्याने शालेय जीवनात तो यशाची एकेक पायरी चढत होता. हाच कित्ता महाविद्यालयीन आयुष्यात देखील गिरविला. दादरच्या किर्ती महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून त्याने पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी देखील संपादन केली. त्याच दरम्यान एका कंपनीत नोकरी मिळाली पगार होता फक्त ८०० रुपये. संशोधनाची आवड असल्याने दुसऱ्या एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात ‘कलर इनचार्ज’ म्हणून नोकरी केली.

कालांतराने औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीत प्रदीपला नोकरी मिळाली. या कंपनीची शाखा लंडन मध्ये होती. तिथे प्रदीप काम करायचा. उत्तम पगार, मर्सिडीज कार, राहण्यासाठी अलिशान घर अशा सगळ्याच सुख-सुविधा पायाशी लोळण घेत होत्या. ही कंपनी मुख्यत: रेडीमिक्स पावडर तयार करत असे. सुरुवातीला फक्त १३ किलो पावडर भारतात विकली जायची मात्र प्रदीपच्या तंत्रज्ञानाने काही दिवसांतच हे प्रमाण ५ हजार किलोवर गेले. भारतातील सर्वांत मोठ्या ५ औषधी कंपन्यांना हेच तंत्रज्ञान पुरविले जाई. मात्र त्याची किंमत अफाट होती. २५०० रुपये किंमतीची ती पावडर २५ ते ३० हजार रुपयांना विकली जाई. इतकी मोठी तफावत असे. ही तफावत या कंपन्यांच्या लक्षात येत होती. या विषयी त्यांनी प्रदीपला सांगितलं देखील. मात्र हे तंत्रज्ञान पुरविणारी ती जगातील एकमेव कंपनी होती आणि तिचा बॉस एक अमेरिकन होता, ज्याच्यासमोर प्रदीपचं काहीच चालत नव्हतं हे त्यांना माहित होतं.

खरंतर हा अमेरिकन बॉस प्रदीपचा चांगला मित्र होता. प्रदीपने शोधून काढलेल्या तंत्रज्ञानावर एके दिवशी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक देशांतील औषध निर्मिती करणारे उत्पादक, तंत्रज्ञ त्या व्याख्यानास आले होते. ४५ मिनिटाचं ते व्याख्यान त्या सगळ्यांना इतकं आवडलं कि “वेळेची मर्यादा तुम्हांला नाही तुम्ही बोलत रहा असे”, त्या व्याख्यानमालेच्या गोऱ्या अध्यक्षाने प्रदीपला सांगितले. तब्बल साडेतीन तासानंतर व्याख्यान संपले. व्याख्यानास उपस्थित असलेल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारले. व्याख्यान संपल्यानंतर प्रदीप कॉफीचा मग घेऊन बॉसच्या बाजूला बसला. बॉसने पण प्रदीपची तोंड भरुन स्तुती केली. ही योग्य वेळ आहे आपल्या भारतीय औषध निर्मात्या कंपन्याच्या व्यथा सांगण्याची, हे हेरुन प्रदीप बॉसला म्हणाला, “आपण भारतात आपलं कलर कोटींगचं तंत्रज्ञान पुरवितो. मात्र त्याचा दर प्रचंड आहे. तो दर कमी… ” हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच त्या साडे-सहा-सात फूट अमेरिकन बॉसने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटला. आणि प्रदीपच्या अगदी डोळ्याजवळ बोट नेऊन मोठ्याने जवळपास किंचाळलाच. “You have to pay for our technology’’. “तुम्हां भारतीयांना आमचं तंत्रज्ञान आम्ही सांगू त्या किंमतीत घ्यावंच लागेल”.

कोणाही भारतीयाला जिव्हारी लागेल असे ते शब्द ऐकल्यानंतर प्रदीपने २ मिनिटांचा अवधी मागितला. तो शांतपणे रिसेप्शनिस्ट जवळ गेला. तिच्याकडून एक कोरा कागद घेतला. एका ओळीत राजीनामापत्र लिहीले. आपल्या घराची, गाडीची चावी देऊन तो शांतपणे तिथून निघून गेला. मात्र मनाशी एक निश्चय होता. या अमेरिकन कंपनीला टक्कर देणारी स्वत:ची भारतीय कंपनी सुरु करण्याची. तो भारतात आला. आई, बाबा आणि पत्नीला सारं काही सांगितलं. घरच्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला आणि घरातल्या किचनमध्येच सुरु झाली प्रयोगशाळा. रात्री सगळ्यांची जेवणे उरकल्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ही प्रयोगशाळा चाले. तब्बल दीड महिन्यांचा अथक संशोधनानंतर यश मिळालं आणि रेडिमिक्स पावडरचं तंत्रज्ञान विकसित झालं.

हे तंत्रज्ञान त्या अमेरिकन औषधाच्या तुलनेत १० पटीने स्वस्त होतं. बाजारपेठेत औषधीकंपन्यासोबत ओळख होतीच. अशाच एका कंपनीच्या मालकाने ताम्हाणेंची ती रेडिमिक्स पावडर पाहिली आणि ताम्हाणेंना मिठीच मारली. एवढ्या स्वस्तात संपूर्ण भारतीय बनावटीची ती रेडीमिक्स कोटींग पावडर म्हणजे अविश्वसनीय बाब होती. त्याने तात्काळ ५ किलो पावडरची ऑर्डर दिली. मात्र आपल्याकडे एवढी लहान ऑर्डरसुद्धा पूर्ण करण्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही असं ताम्हांणेंनी सांगितलं. “तुम्ही जर आता ही ऑर्डर पूर्ण नाही करु शकलात तर आयुष्यात पुढे या क्षेत्रात काहीच करु शकणार नाही”. कंपनीच्या त्या मालकाचे शब्द ताम्हाणेंच्या जिव्हारी लागले. त्यांनी चंग बांधला. आणि ती ऑर्डर पूर्ण केली. पहिल्याच वर्षी त्यांची दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

काही दिवसांनी त्यांना एक व्यावसायिक भागीदार मिळाला. खरा तर तो एक विकासक होता आणि त्याला झटपट विक्री करुन पैसे पाहिजे होते. ताम्हाणेंच्या व्यवसायात संशोधन करुन उत्पादन निघण्याची प्रक्रिया होती ज्यास वेळ लागणार होता. तेवढा संयम नसल्याने अर्ध्यातच त्या भागीदाराने सोबत सोडली. कंपनी विकावी लागली. मात्र ताम्हाणेंनी धीर न सोडता १९९७ साली विनकोट्स कलर्स ऍण्ड कोटींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी उभारली. अंबरनाथला कारखाना सुरु केला. आज ही कंपनी जगातील ५० हून अधिक देशांमधील औषध निर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन पुरविते. मनुष्यबळाकडे ताम्हाणेंचे विशेष लक्ष असते. कामगार हा कार्यक्षम रहावा यासाठी अंबरनाथ स्टेशन ते कारखाना अशी कामगारांना ने-आण करण्यासाठी रिक्षासेवा त्यांनी चालू केली होती. संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर कामगाराला एक मिनीट देखील थांबविले जात नाही. त्याने जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवला पाहिजे याकडे कटाक्ष असतो. एखादा कामगार अडचणीत असेल तर कंपनी त्याच्यामागे भरभक्कम उभी राहते. एके काळी पत्र्याच्या घरात राहणारे कामगार स्वत:च्या टूबीएचके फ्लॅटमध्ये राहतात. जवळपास प्रत्येकाकडे किमान मोटरसायकल आणि कार आहेच. ताम्हाणेंकडे आज ५५ कामगार कार्यरत आहेत मात्र ५०० कामगारांच्या दर्जाचे काम करण्याची कार्यक्षमता त्यांनी अंगी जोपासली आहे.

अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “झुमका गिरा रे…” – लेखिका : सुश्री गौरी साने ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “झुमका गिरा रे…” – लेखिका : सुश्री गौरी साने ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

‘मेरा साया’ हा सिनेमा १९६६ चा. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में…! ’ हे या सिनेमातील अतिशय गाजलेले गाणे. या गाण्यात बरेलीच्या बाजारात नायिकेचा झुमका हरवलाय. पण ५४ वर्षांनी तो सापडला आहे. आता तो पहायला बरेलीलाच जावे लागेल.

बरेली हे उत्तर प्रदेशातील एक शहर. ५४ वर्षापूर्वी केवळ या गाण्यामुळे संपूर्ण भारतात प्रसिद्धिस आले.

त्याबद्दल बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एन एच २४ वर झीरो पॉइंट येथे एक झुमका उभा केलेला आहे. त्याची ऊंची १४ फूट व वजन आहे २०० किलोग्रॅम. पितळ व तांब्याचा हा झुमका बनवला आहे गुडगावच्या एका कारागिराने. त्याची किंमत आहे १८ लाख रुपये.

या ठिकाणांचे नाव आहे “झुमका तिराहा. ” ५४ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये झुमक्याचे हे स्मारक उभे राहिले आणि आता पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे.

या गाण्याचे गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान. गायिका आशा, संगीतकार – मदन मोहन. पडद्यावर गीत सादर केलय बहारदार नृत्य करून दिवंगत साधनाने.

‘मेरा साया’ (१९६६) हा सिनेमा मराठी ‘पाठलाग’ (१९६४) या सिनेमावरुन काढणेत आला. मूळ सिनेमाच्या कथेशी गाण्यातील बरेली या शहराचा दुरान्वयानेही संबंध नाही.

पण बरेली गावात झुमका पडल्याची कहाणी मात्र अगदी खरी आहे.

आणि त्या कहाणीचा संबंध आहे अमिताभ बच्चन परिवाराशी.

अमिताभ यांचे पिताश्री हरिवंशराय बच्चन व मातोश्री तेजी (माहेरचे आडनाव- सूरी) यांची पहिली भेट बरेलीला एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. त्यावेळी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात हरिवंशराय यांना एखादी कविता म्हणण्याचा आग्रह झाला. त्यांनी कविता अतिशय सुंदररित्या सादर केली. ती ऐकून तेजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हरिवंशराय यांचे डोळे तेजी यांची ही अवस्था पाहून भरून आले. या पहिल्या कविताभेटीचे रूपांतर नंतर एका प्रेमकथेत झाले. पण त्यांच्या लग्नाची बातमी येत नसल्याने सारे मित्र नेहमी चौकशी करीत. गीतकार राजा मेहंदी दोघांचेही चांगले मित्र होते. त्यांनी पण एकदा तेजी यांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या, “मेरा झुमका तो बरेली के बाजार में गिर गया है..! ” लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजी यांनी केलेले हे विधान राजा मेहंदी यांच्या अगदी डोक्यात बसले होते.

जेव्हा मेरा साया चित्रपटाची गाणी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना तेजी यांच्या या वाक्याची आठवण झाली. त्या वाक्यावर त्यांनी हे गाणे पूर्ण लिहिले. आणि या गाण्याने बरेली शहराला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याचे उतराई होण्यासाठी बरेली गावात ५४ वर्षांनी(२०२०) हा हरवलेला झुमका उभा राहिलाय.

सिनेमाची कथा वेगळीच आहे. या गाण्याचा व त्या बरेली गावाचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. बरेलीमध्ये पहिली भेट झाली अमिताभ यांच्या मात्या -पित्याची. त्यांचाही या सिनेमाशी काही एक संबंध नाही.

कशाचाही कशाशीही संबंध नसताना आज एका सिनेगीताचे-कलाकृतीचे असे अविस्मरणीय स्मारक उभे राहते ही आश्चर्यकारक घटना आपल्या बॉलीवुडमध्येच घडू शकते.

त्यावेळचे हे प्रतिभावान कलाकार त्यांच्या स्पर्शाने कोणत्याही घटनेला व त्यावर आधारीत कलाकृतीला अजरामर करून टाकत असत. अशा अनेक उदाहरणापैकी हे एक…!

लेखिका : सुश्री गौरी साने

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ए. ललिता : इंजिनीअर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ए. ललिता : इंजिनीअर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

अय्यला सोमयाजुला ललिता

जन्म:२७ ऑगस्ट. मद्रासला.

१५व्या वर्षी विवाह 

१८व्या वर्षी आई झाली. नंतर चारच महिन्यांनी तिच्या पतीचं निधन झालं.

उत्तरं नसणारे प्रश्न.. आणि कुशीत तान्हं बाळ!

पण तिची गोष्ट इथे संपली नाही.

खरं तर इथे सुरू झाली.

 

तिचं नाव होतं अय्यला सोमयाजुला ललिता.

आणि तिने पुढे काय केलं?

भारताची तयारी नव्हती, अशी गोष्ट तिने केली.

तिचे वडील पप्पू सुब्बाराव इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक. त्यांना तिच्या डोळ्यांत चमक दिसली.

त्यांनी तिचं फक्त सांत्वनच केलं नाही, तर तिचं भविष्य रिबूट केलं.

त्यांनी तिला गिंडीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घातलं.

पुरुषांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करणारी ती पहिली मुलगी होती.

१९४३

तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

भारतातील पहिली महिला इंजिनिअर.

आरक्षण नव्हतं. मोहीम नव्हती. फक्त धैर्य होतं.

इतर लोक कुजबुजत होते,

तेव्हा तिने भारतातील सर्वात मोठ्या धरणासाठी 

-भाक्रा नानगलसाठी ट्रान्समिशन लाइन्स डिझाईन केल्या.

जेव्हा राष्ट्रे भिंती बांधत होती, तेव्हा ती त्या प्रकाशित करत होती.

ती कोलकाताच्या असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज (AEI) मध्ये रुजू झाली.

तिथे तिने तीन दशके काम केले.

सिस्टिम डिझाईन केल्या.

अयशस्वी प्रकल्प यशस्वी केले.

ब्रिटिश हार्डवेअर आणि भारतीय महत्त्वाकांक्षा या दोन जगांवर तिने सेतू बांधला.

‘विधवांना प्रवास वर्ज्य’

त्यामुळे ती साइटवर जाऊ शकत नव्हती.

तिची बुद्धिमत्ता तिथे पोहोचत होती.

आपल्या टेबलावरूनच 

तिने विजेच्या तारांच्या जाळ्यांत (grid) वीज पोहोचवली.

तिने बढाया मारल्या नाहीत.

तिने विरोध केला नाही.

तिची स्पर्धा स्वतःशीच होती.

आणि ती रोजच जिंकत होती.

१९६४. न्यूयॉर्क.

महिला इंजिनिअर आणि संशोधकांची प्रथम आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स.

ती सहभागी होती.

साडी नेसलेली.

ज्या देशात तिचे नावही कोणाला माहीत नव्हते,

त्या देशाचे ती प्रतिनिधित्व करत होती.

१९६६ पर्यंत ती इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (लंडन)ची सदस्य झाली होती.

ही कथा फक्त भारतापुरती मर्यादित नव्हती. हे जागतिक विधान होते.

तुमची पाठ्यपुस्तके, इंजिनीअरिंग महाविद्यालये, धरणं आणि ग्रिड्स, व्होल्टेज.. सगळ्यांच्या लक्षात असतं तिचं नाव मात्र कोणालाच आठवत नाही 

म्हणूनच कोणी विचारलं,

“इंजिनीअरिंग हे नेहमीच पुरुषाचं क्षेत्र होतं का? ” तर हसून हळूच उत्तर द्या:

“पॅनल्स आणि धोरणं यांचं वर्चस्व व्हायच्या आधी ललिता प्रवाहाविरुद्ध पोहली होती.

– – तिने बंड पुकारलं नाही — तिने प्रचलित प्रथांना नव्याने डिझाईन केलं.. निषेध न करता पण अचूकपणे 

तिचं नाव होतं ए. ललिता

आणि तिने काढलेलं प्रत्येक विद्युतमंडल म्हणजे निर्बंधांना मारलेली चपराक होती.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विचार तर कराल…? ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ विचार तर कराल…? ☆ श्री जगदीश काबरे ☆

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो असताना रस्त्यात गणपती मूर्तींची विक्री करणाऱ्या दुकानांची रांग लागली. भक्तगण गणपती मूर्तीं विकत घेण्याच्या लगबगीत होते. कुतूहलाने त्या दुकानांमधील गणपतीच्या मूर्ती न्याहाळू लागलो. कारागिरांनी खरंच सुबक पद्धतीने मूर्ती रंगवल्या होत्या. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. (छायाचित्र झूम करून पहावे)

यावेळेस मूर्तींचे निरीक्षण करताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात आली, ती म्हणजे अनेक गणपतीच्या मूर्ती विविध प्रकारच्या कृत्रिम चमकदार रंगीत खड्यांनी सजवलेल्या होत्या. काही गणपतीच्या गळ्यात खड्यांची माळ होती, तर काही गणपतींच्या खांद्यावरून खड्यांचा शैला पांघरलेला होता आणि काही गणपतीच्या मुकुटावर खडे चमकत होते. अर्थात त्यामुळे त्या उठावदार दिसत होत्या हेही खरेच.

पण… हा पणच मला धोकादायक वाटत होता. या एकजात सगळ्या मूर्ती POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) ने बनवलेल्या होत्या. अर्थात सरकारनेच प्रदूषणकारी POP वापरायला परवानगी दिल्यावर आणखीन वेगळे ते काय घडणार! म्हणजे आत्तापर्यंत आपण नद्या, नाले, विहिरी, समुद्रामध्ये या पीओपीच्या गणपतींचे विसर्जन करून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण करत होतोच; पण आता यावर्षी मात्र या जलप्रदूषणात आणखी एक भर पडणार आहे, ती या न विरघळणाऱ्या चमकदार खड्यांची. पाण्यातील जलचर या चमकदार रंगीत खड्यांकडे आकर्षित होतील आणि त्यांना गिळतीलही. अर्थातच त्यामुळे ते मरणपंथाला लागतील हे वेगळे सांगायला नकोच.

देवभक्तीच्या उन्मादात रंगलेल्या भक्तगणांना जलचर मेले काय, जलप्रदूषण झाले काय, त्याचे फिकीर बाळगण्याचे कारण नाही. ढोलताशे जोरजोराने बडवून आणि दणदणाटी आवाजाने डीजे लावून ध्वनीप्रदूषण करणे तसेच लेझरबीमच्या साह्याने प्रकाशप्रदूषण करणे हा तर भक्तगणांना आताशा हक्कच वाटायला लागलेला आहे. या तरुणाईला अशा उन्मादी आणि उन्मत्त देवभक्तीपुढे आरोग्याची तमा वाटेनाशी झाली आहे. ’आम्ही भलेही आंधळे होऊ, बहिरे होऊ, अपंग होऊ, ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण अशा सगळ्या प्रकारच्या प्रदूषणात भर घालू! पण आमचे धर्मरक्षण करू’, असे त्यांना वाटू लागलेले आहे.

मला या भक्तगणांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात की, तुमच्या कुठल्या धर्मग्रंथात अशा प्रकारे आरोग्याची हेळसांड करून आणि लोकांना त्रास देत धर्मरक्षण करण्याचे लिहिलेले आहे? धर्मरक्षण म्हणजे उद्दामपणे वागणे आणि उन्मत्तपणा करणे असते काय? सगळ्या प्रकारचे प्रदूषण करून लोकांच्या आरोग्याशी खेळणे म्हणजेच धर्मरक्षण करणे असते काय? गणपतीच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीत दारू पिऊन आयटम गाण्यांवर आचकट-विचकट नाचणे म्हणजे धर्मरक्षण असते काय?

पर्यावरणपुरक सण साजरा करण्यास कोणाची आडकाठी असण्याचे कारणच नाही. कोणताही सण हा लोकांनी एकत्रित येऊन आनंदाने आणि शांततेने साजरा करण्यासाठी असतो… धांगडधिंगा करण्यासाठी नाही. तेव्हा समस्त भक्तगणांना पुन्हा एकदा विनंती करतो की, गणपती विकत आणून बसवायचाच असेल तर तो पाण्यात सहज विरघळणाऱ्या शाडूच्या मातीच्या मूर्तीचा असावा. त्याचे विसर्जन करताना घरातील बादलीतील पाण्यात विसर्जन करावे, आणि ते पाणी घरातील कुंड्यात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी वापरावे. निर्मल्य ’निर्मूलन कलशा’त टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. म्हणजे पर्यावरणपूरक सण साजरा केल्याचे समाधान सगळ्यांनाच मिळेल. भक्तगणांच्या लाडक्या पंतप्रधान मोदींनी ’स्वच्छ भारत’ घोषणा केली आहे, तिला अशाप्रकारे हातभार लावून खऱ्या अर्थाने आपण उच्चसंस्कृत आहोत, हे सिद्ध करण्याची संधी सोडू नये.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रुक्मिणी – लेख क्र. ११ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रुक्मिणी – लेख क्र. ११ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

कृष्ण हस्तिनापूराहून परत आले ते तिथला संहार पाहून, राणी गांधारीने दिलेली शापवाणी ऐकून, विमनस्क स्थितीत! त्यातच इकडे आल्यावर यादवांच्या संहाराबद्दलही ऐकावं लागलं आणि हताश झाले. वनातून जातांना शिकाऱ्याच्या हातून निघालेला बाण कृष्णांना लागला आणि त्यांनी लगेच अर्जुनाला बोलावून घेतलं. यादवांच्या विधवा, त्यांची अनाथ मुलं यांचं पुनर्वसन करण्यास सांगितलं. हे माझ्या कानावर येताच, त्यांच्या मनात काय चालू आहे याचा मला अंदाज आला. आणि त्यांचा जीव माझ्यात गुंतू नये, अर्थात कुणाच्यात गुंतणारे ते नव्हतेच, पण तरीही माझी आपली समजूत, म्हणून मी देह विसर्जित करण्याचे ठरविले व त्यांना निर्णय घेण्यासाठी मुक्त केलं.

आठवतोय तो सगळा भूतकाळ! लहानच होते मी त्यावेळी. नारदमुनी घरी आले की आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. बालपणीचा यशोदेला सळो कि पळो करून सोडणारा कृष्ण! बासरीच्या सुरांनी साऱ्या गोकुळाला भिजवणारा, रिझवणारा कृष्ण! बालपणापासूनच दैवी शक्तीची प्रचिती देणारा, दुष्टांचा विनाश करणारा, कृष्ण!! ते अगदी आत्मीयतेने सांगायचे आणि मी वेडी भान हरपून ऐकत बसायची. हळूहळू कधी मी मनाच्या देव्हाऱ्यात कृष्णांची स्थापना केली व मानसपूजा करायला लागले कळलेच नाही. आणि समजलं कि माझा शिशुपालांबरोबर विवाह निश्चित झाला आहे. बापरे! मला एवढा धक्का बसला की मी कृष्णाचा धावा करायला सुरुवात केली. माझा धावा ऐकून ते येतील याची मला खात्री होती. कारण मी त्यांची निस्सिम भक्त होते. लग्नाआधी गावकुसाबाहेरच्या देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा होती. तिथे काही सैन्य घेऊन कोणी जात नाही हे जाणून, रथावर अरुढ होऊन कृष्ण आले आणि मला अलगद उचलून घेऊन गेले सुद्धा. पण ही बातमी तिकडे बलरामदादा आणि इकडे शिशुपाल व रुक्मि यांनाही कळली. आधीपासूनच शत्रुत्व असल्याने उभय पक्षांना कल्पना आली व घनघोर युद्ध झाले. इतका वेळ रथात बसून त्या राजस चेहऱ्याचे मी अवलोकन करत होते. आता मात्र क्रुद्ध चेहरा बघितला नि मी थरथरायला लागले. काय करावं ते न सुचल्यानं, मी कृष्णांचे पाय घट्ट धरले व रुक्मिला जीवदान द्या म्हणून विनवणी करत राहिले. रुक्मिला जीवदान मिळालं. आम्ही सही सलामत मथुरेला पोचलो. पण माझं माहेर मात्र तुटलं, कायमचं!!

घरी गेल्यावर जणू काही झालंच नाही अशा थाटात म्हणाले, तुमच्या अनिच्छेने होणाऱ्या लग्नाला थांबविण्यासाठी तुम्हाला येथे घेऊन आलो. पण विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी कल्पना द्यावी म्हणून सांगतो. मी राजा नाही, राजकुमारही नाही. माझा महाल नाही, धनसंपत्ती, ऐश्वर्य काही नाही. मी फक्त जनतेचा सेवक आहे. आपण राजकन्या आहात, राजवाड्यात राहणाऱ्या! तुम्ही या कफल्लकाबरोबर राहू शकाल कां? अन्यथा शिशुपाल राजकुमार आहे. शूर आहे. आपली त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा असेल तर सांगा. मी परत पोचवायला येऊ शकतो. मीही मग तेवढ्याच धीटपणे सांगितलं की, ऐश्वर्याचा, दाग दागिन्यांचा, उंची वस्त्रांचा मोह मला कधीच नव्हता, नाही, व पुढेही असणार नाही. आपण मला पत्नीचा दर्जा देता आहात, यासारखे माझे दुसरे भाग्य कोणते? फक्त शेवटच्या श्वासापर्यंत आपला सहवास लाभावा एवढीच या भक्ताची इच्छा आहे. आपण तर माझे परमेश्वर आहात.

अखेरीस विवाह संपन्न झाला आणि माझी आनंदाच्या डोहात डुंबायला सुरुवात झाली. प्रत्येक दिवस कृष्णांची निरनिराळी लोभस रुपे घेऊन यायचा आणि मला त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं. सुखी संसाराला गालबोट लागायलाच हवं, त्याशिवाय नियतीचं अस्तित्व आपल्याला कळणार तरी कसं!

दुर्वास ऋषींना नेण्यासाठी आणलेला रथ त्यांनी आम्हा दोघांना ओढायला सांगितला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर दोघेही दमलो व पाणी पिऊ लागलो. पण दुर्वास ऋषींना आम्ही पाणी हवे कां हे आधी विचारले नाही. त्यामुळे संतापून आम्हाला शाप दिला. या शापाने १२ वर्षे दुराव्याची शिक्षा मिळाली. नंतर लवकरच बाळराजाची चाहूल लागली आणि मी सुखाच्या सर्वोच्च बिंदूवर‌ झुलायला लागले. बाळाचा जन्म झाला. ते निरागस, गोंडस रूप पाहून मातृत्व पाझरू लागलं. एक दिवस बाळाला पाळण्यात घातलं. नाव ठेवलं, प्रद्युम्न!! म्हणजे तेजस्वी, सुंदर, जणू कामदेवच. दाई म्हणाली, आता बाळाला सारखे कुशीत घेऊ नका. पाळण्यात ठेवा, हात पाय हलवू दे. भूक लागली की थोडं रडू दे. यामुळेच बाळाची वाढ चांगली होते. तरी मी त्यादिवशी पाळण्याची दोरी घट्ट हातात धरली. न जाणो आपल्याला बाळाचं रडणं ऐकू आलं नाही तर निदान पाळणा हलला की कळेल. पण कशी काळ झोप लागली कुणास ठाऊक! सकाळी उठून पाहते तर पाळणा रिकामाच! बाळ रडलेला आपल्याला ऐकू आलं नाही आणि आपली झोपमोड होऊ नये म्हणून दाई त्याला घेऊन दुसऱ्या कक्षात गेली की काय म्हणून सगळं घर फिरून आले. शेवटी कृष्णांना उठवलं. बाळ कुठेच नाही, कोणी पाहिलाही नाही. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मन सैर भैर झालं. कृष्णांनी तर अख्खा गाव पिंजून काढला. पण काहीही कळलं नाही. ते निरागस रूप डोळ्यासमोरून जाईना. तो कुशीत असल्याचा भास व्हायचा. त्याच्या बाललीला, खोड्या यांची दोघांनी मिळून रंगवलेली स्वप्नं, धुळीला मिळाली होती. माझ्या बाळावर कुणाचा कां राग असेल? माझा बाळ कुठे असेल? कसा असेल? कोण दुध पाजत असेल? शांत व संयमी कृष्ण मात्र माझी समजूत काढत होते. म्हणाले, त्याला कांही होणार नाही. तो येईल परत. काळजी करू नकोस. आणि मी वाटेला डोळे लावून बसायला लागले. हिशेब करायचे, बाळ आता केवढा झाला असेल. मग त्या वयाच्या प्रत्येक मुलाला तो प्रद्युम्न तर नाही ना म्हणून जवळ जाऊन पाहून घ्यायची. जस जसे दिवस सरले, तस तसं वाट पाहणं कमी झालं. पण एक मूल जाणं म्हणजे काय असतं हे कळायला आईच व्हावं लागेल!

दरम्यानच्या काळात कृष्णांची इतर लग्ने झाली. प्रत्येक लग्न हे कोणत्यातरी हेतूने केलं होतं. पण ते कधीच आपली कोणतीही पत्नी दुर्लक्षित ठेवणार नाहीत. तिच्याप्रती असणारी आपली जबाबदारी, कर्तव्यं पार पाडणार, यांची मला खात्री होती. मी कधीच कुठल्या पत्नीचा द्वेष केला नाही किंवा त्यामुळे माझ्यावरचं प्रेम कमी होईल असा ग्रह करून घेतला नाही.

प्रेम हे ओरडून सांगायचं नसतं की हरघडी पुरावे देऊन सिद्ध करायचं नसतं. प्रेम हे अबोल, अव्यक्त असतं. दुसऱ्यानं ते समजून घ्यायचं असतं. सत्यभामा, कृष्णांची दुसरी पत्नी! तिचा कक्ष माझ्या कक्षाजवळच होता. ती कायम दाग – दागिन्यांनी नटलेली, उंची वस्त्रांनी सजलेली असायची. थोडी अहंकारी होती पण युद्ध कलेचे शिक्षण घेतलेली व शूर होती. तिने हट्टाने स्वर्गातून पारिजातकाचे झाड कृष्णांना आणायला सांगितले व ते तिच्या अंगणात लावले. तिला वाटलं आपण या फुलांचा सुंदर गजरा माळला तर त्याच्या सुवासाने कृष्ण अनुरक्त होतील व आपल्या सहवासात जास्त वेळ घालवतील. झाड बहरलं पण त्याची फुलं वाऱ्याने माझ्या अंगणात आली. मी ती गोळा करून त्यांचा हार माझ्या दैवताला अर्पण केला. सत्यभामेला मी वेडीच वाटले. तिला तर हे ही कळेना, झाडाची मुळे माझ्या अंगणात पण फुले मात्र तिच्या अंगणात कशी? तिला किती सांगितलं, मी त्यांची भक्ती करणारी आहे तर तू त्यांची शक्ती आहेस, आधार आहेस. म्हणून तर तू नरकासुराचा वध करू शकलीस. अगं, मूळं घट्ट असल्याशिवाय झाड बहरत नाही. आणि फुलांना काय, वारा घेऊन जाईल तिकडे जातात. पण मी लाडकी कां ती लाडकी, या प्रश्नाने तिला कायम घेरलेलं असायचं. तिचा अहंकार कमी करण्यासाठी नारदांनी तो बिल्वदलाचा प्रसंगही घडवून आणला. खरं तर मला कृष्णांची खरी ओळख कधी झाली सांगू? एकदा आम्ही सगळे मिळून वृंदावनाला गेलो होतो त्यांना पुन्हा एकदा यमुना नदी, गोपगोपी यांना भेटायचं होतं. त्यांच्या पदस्पर्शाने यमुना नदीही खळाळली. गोप गोपी पण आनंदित झाले. त्याच्या समवेत भोजन सुरू असताना मला यमुनेच्या पैलतीरावर दुर्वास ऋषी दिसले. मनात आलं भोजन झालं आहे की नाही कुणास ठाऊक! थोडं नेऊन द्यावं. पण यमुनेवर कुठे नाव दिसेना. मी कृष्णांना विचारलं, नावाडी कोणी आहे का विचारता कां? तर म्हणाले, यमुनेला सांग, माझा पती ब्रह्मचारी असेल तर मला पलीकडे जाण्यासाठी वाट दे. मला कळेच नां, आठ लग्नं झाली, त्याशिवाय सोळा सहस्त्र स्त्रियांचा उद्धार झाला. हे ब्रह्मचारी कसे? पण त्यांना काही उलट प्रश्नही नाही करायचा आणि उलट उत्तरही नाही द्यायचं, हाच माझा स्वभाव! यमुनेजवळ जाऊन मी ते वाक्य म्हटलं आणि खरोखरच नदीने वाट करून दिली. आणि मी दुर्वास ऋषींना भोजन देऊन त्यांना विचारलं हे असं कसं झालं? तर ते म्हणाले, तो जे काही करतो ते कर्म म्हणून, धर्म म्हणून करतो निर्लेप आहे तो! अगदी जेवणाच्या बाबतीत सुद्धा! बघ जाताना म्हण, माझा पती रोज उपवास करत असेल तर वाट दे. आणि खरंच तिने वाट करून दिली. अशा माणसाचं प्रेम कुणावर जास्त आहे, कोण जास्त लाडकी आहे, यावरून आम्ही खुळ्या भांडत होतो.

काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं त्यातच शंबरासुराचा वध करून त्याची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारून प्रद्युम्न घरी आला. आणि आमच्या गोकुळातील रिकामी जागाही भरून निघाली. एकच गोष्ट बोचत राहिली. कुरुक्षेत्रावरचे युद्ध आणि यादवी आम्ही थांबवू शकलो नाही. कुरुकुलाचा, यादव कुलाचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. मी एवढे तातांकडे राज्यकारभाराचे गिरवलेले धडे सुद्धा निकामी ठरले. धर्म व अधर्म यांच्या युद्धात सगळेच होरपळून निघाले. माझ्यापुरतं एवढेच सांगेन कि माझी कथा ही फक्त रुक्मिणी-हरणाची नाही, तर ती भक्ती, निष्ठा व अमरप्रेमाची गाथा आहे.

– – लेख क्र. ११ 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सज्जनगड…” – लेखक : गो. रा. माटे (यांच्या पुस्तकातून) माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सज्जनगड…” – लेखक : गो. रा. माटे (यांच्या पुस्तकातून) माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

हा किल्ला सातारच्या नैऋत्येस सहा मैलावर आहे. उंची १०४५ फूट शिलाहारांनी तो दहाव्या अकराव्या शतकांत बांधला असावा.

१६६२ ’मध्ये अफझलखानाचा मुलगा येथे किल्लेदार होता.

२/४/१६७३ – शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून हा किल्ला घेतला व समर्थ येथे पौष शुद्ध नवमी १५९५ ह्या दिवशी कायमचे रहावयास आले. त्यामुळे पुष्कळ संत, साधु येथे येवू लागले त्यामुळे सज्जनगड हे नांव पडले. जिजोजी काटकर नावाचा किल्लेदार महाराजांनी येथे नेमला. महाराजांनी हा किला समर्थांना इनाम दिला.

कर्नाटक स्वारीवर जाण्यापूर्वी शहाजी राजे सहकुटुंब येथे येवून समर्थांना भेटून गेले.

१६९९ – औरंगजेबाने सातारच किल्ल्यास वेढा घातला असता परशुराम त्र्यंबक प्रतिनिधीने तेथून धन्य वगैरे मदत पाठवून सातारचा वेढा चालू ठेवण्यास मदत केली. सातारा पडलेनंतर लागलीच १७०० च्या जून मध्ये मोगलांनी वेढा वाढवून दीड महिन्यानंतर हा किल्ला घेतला. वेढ्याचा सेनापति रुहुलाखान बक्षी होता. पहिला हल्ला भिकाजी जाधव व गोविंद महादेव गोडबोले यांनी परतवला. परशुराम त्रिंबक हा किल्ला लढवित होते. परशुराम त्रिंबकांनी हा किल्लापडण्यापूर्वीच वासोटा किल्ल्यावर येथील राममूर्ती नेवून सुखरुप ठेवली व समाधी शिळेने बंद करुन टाकली. त्यामुळे ती शाबूत राहिली. किल्ला घेतलवर औरंगजेबाने नौरसतारा हे नाव किल्ल्याला दिले. जुने नांव आश्वलायन गड होते. त्याचेच अपभष्टरुप अस्वलगड असे झाले.

१६७८ मध्ये शिवाजी महाराजांनी संभाजीला समर्थांच्या सान्निध्यात त्यांच्या स्वभावात सुधारणा व्हावी म्हणून येथे ठेवले. संभाजीबरोबर त्याची पत्नी येसूबाई व मुलगी भवानी ह्या दोघीजणी होत्या. सुमारे महिनाभर राहून संभाजी सहकुटुंब येथून निघून गेले.

१६८० – पौष शुद्ध ९ ते माघ शुद्ध १५ पर्यंत शिवाजी महाराज येथे समर्थांच्या सान्निध्यात होते. समर्थांबरोबर अध्यात्म वगैरे विषयांवर चर्चा झाली. समर्थांनी महाराजांचा अंतकाळ जवळ आला आहे असे सूचित केले. (३१/१२/७९ ते ४/२/८०)

समर्थांनी अंगापूरच्या डोहांत सापडलेली आंग्लाईची मुर्ती येथे स्थापन केली. येथील आग्नेय कोपऱ्यात समर्थ जपास बसत. तेथेच जवळ असलेल्या पिसा बुरुजावर समर्थांची व शिवाजी महाराजांची खलबते होत. येथे समर्थांची वाऱ्याने उडवलेली छाटी आणण्यासाठी कल्याणानी कड्यावरुन उडी मारली ती जागा जवळच आहे. येथेच ध्वज लावीत असत. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला एक मारुती समर्थांनी स्थापन केला. त्याला धाब्याचा मारुती म्हणतात.

शिवाजी महाराजांचे मृत्यूने समर्थांना अत्यंत दु:ख झाले. त्यांनी संभाजींना येथून एक पत्र लिहिले.

शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा साक्षेप |

शिवरायांचा आठवावा प्रताप | भूमंडळी ॥

संभाजींचे उत्तर आले –

‘‘आज्ञा प्रमाण, ’’ व शके १६०३ च पौषांत संभाजी समर्थ दर्शनास येऊन गेले

शके १६०३ च्या माघ कृष्ण पंचमीस तंजावर येथून व्यंकोजी राजांनी मल्हारराव लिंबदेव थेऊरकर व केशव गोसावी ह्यांचेबरोबर धाडलेल्या श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आणल्या. त्या पाहून समर्थांना समाधान झाले. आपल खोलीतच त्या ठेवून समर्थांनी त्यांची यथासांग पूजा केली. नऊ दिवस समर्थांनी अन्न, पाणी वर्ज केले होते. माघ वद्य नवसीस श्रीराम मुर्तीकडे ध्यान लावून पद्मासन घालून समर्थ बसले व या जगाचा निरोप त्यांनी घेतला. २००० होन खर्चून शिवाजी महाराजांनी येथे एक मठ बांधलेला होताच. त्याच्या उत्तरेस एक मोठा खळगा होता. तेथेच समर्थांचे मानसपुत्र व प्रथम शिष्य उद्धव गोसावी ह्यांनी समर्थांच्या देहावर अग्निकार्य केले. (शके १६०३)

तर संभाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांकरवी राजगुरुच्या प्रतिष्ठेस शोभेल असा दानधर्म केला. दहनस्थळी समाधी बांधून चंदनाचा ओटा समर्थ शिष्य तारळेकर गोसावी यांच्या कडून करवून पादुका स्थापन केल्या. समाधीवर रामाची स्थापना करुन शिष्यांनी लहानसे देऊळ बांधले. नंतर संभाजी महाराजांनी सभामंडप व देऊळ रामचंद्रपंत अमात्य यांच्याकरवी बांधले. (१६८१)

सदर मंदिराची दुरुस्ती १८०० व १८३० साली वाई तालुक्यातील शिरगावच्या परशुराम भाऊंनी केली. मंदिराच्या ओवऱ्या यवतेश्वराच्या वैजनाथ भागवतांनी बांधल्या.

समर्थांनंतर त्यांच्या शिष्या आक्का उर्फ चिमणाबाई देशपांडे यानी येथील व चाफळ व अन् इतर ठिकाणचा कारभार चाळीस वर्षे केला. सव्वा दोन तपानंतर त्यांनी समर्थांचे पुतणे रामजीचे सुपुत्र गंगाधर यांचेकडे देवस्थानची सर्व व्यवस्था सोपविली. मंदिराचे पाठीमागील ओवरीत नारायण महाराज सासवडकर आणि वायव्य कोपर्यात वेणाबाईची समाधी व वृंदावन आहे. (शके चैत्र शुद्ध १४, १६३०) मंदिराचे पुढील बागेच उत्तरेस आक्कांची मठी व समाधी आहे. (कार्तिक शुद्ध १, १६४३)

येथील मठात समर्थांसंबंधीच्या खालील वस्तु दर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. समर्थांच्या वडिलांचे कुलकर्णीपण सोडून देऊन श्रीराम चरणी वाहिलेले पितळेचे कलम दान, समर्थांच्या चंदनाच्या पादुका, कुबडी, काठी, व बुद्धिबळाची पिवळी मोहरी, शिवाजी महाराजांनी दिलेला पितळी खुरांचा पलंग, समर्थांचे व्याघ्रांबर, वल्कल, शिरोभूषण, पिकदाणी, समर्थांनी रामामूर्ति आल्यावर ज्या ठिकाणी ठेवून मुर्तीची पूजा केली तो देव्हारा. कल्याणस्वामी उरमोडीचे पाणी भरून आणीत तो हंडा. चंदनी पादुका दत्ताने माहूर येथे त्यांना दिल्या होत्या 

शिवाजी महाराजांचे मृत्युनंतर सहा महिने ज्या घळीत समर्थांनी वास्तव्य केले ती घळ पूर्वेकडे तटाखाली आहे.

कलुषाने बाळाजी आवजी चिटणीस व त्याचा भाऊ शामजी बाळा आवजी याना उरमोडी काठी ठार मारले व त्यांची मालमत्ता जप्त केली.

१८१८ मध्ये इंग्रजांनी हा किला घेतला व येथे एक एतद्देशिय शिपायांची तुकडी ठेवली होती.

१८५७ मध्ये रंगोबापूजी गुप्ते येथे सहा आठवडे येवून राहिले होते. भोरकडून येणारे व सातारचे त्यांचे बंडात सामिल झालेले अनुयायी एकत्र करुन उठाव करण्याचा त्यांचा बेत होता. तो फसला. रामोशी, मांग वगैरे लोकांच तुकड्या त्याने तयार केले होत.

किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव आहे. त्याचे वायव्येस दोन प्राचीन हेमाडपंती देवळे आहेत. दक्षिणेकडील देऊळ जास्त जुने व ओसाड आहे. उत्तरेकडील देऊळ चांगल्या स्थितीत आहे. मुसलमानांनी उद्ध्वस्त केल्यावर हे बांधले गेले. ह्या दोन मंदिरांचे बांंधणीवरुन हा किल्ला मुसलमानांच्या पूर्वीचा असावा असे वाटते.

मिरजेचे देशपांडे घराण्यातील वेणाबाई याना लग्नाचे दिवशीच वैधव्य प्राप्त झाले. पुढे त्या समर्थांच्या शिष्या झाल्या. त्यांनी सीतास्वंयवर, निवृत्तिराम वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. त्या शके १६०० चैत्र वद्य चतुर्दशीला येथे समाधिस्थ झाल्या. त्यांची येथे समाधी आहे.

परळी गावात महारुद्र स्वामींची समाधी उरमोडीच्या घाटावर आहे. केदारेश्वराचे मंदिर फार जुने आहे. १८६१ मध्ये संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो ह्या विश्वासू सेवकास परळी गावी हत्तीच्या पायी दिले.

लेखक : गो रा माटे (त्यांच्या ‘असा घडला सातारा ‘ या पुस्तकातून)  माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

कथादिष्विति गर्गः ॥ १७ ॥

अर्थ : भगवत कथा, भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे भक्ती होय, असे गर्गाचार्य मानतात.

विवेचन: महर्षी व्यासांचे मत सांगितल्यावर नारद मुनी गर्गाचार्यांचे मत सांगतात. गर्गाचार्य हे गर्ग मुनी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मागील सूत्रात आपण विविध प्रकारचे पूजाविधी पाहिले. परंतु पूजाविधी करायला अनेक प्रकारचे साहित्य लागते, तसेच योग्य स्थलकालादिकाची आवश्यकता देखील असते. कीर्तन, श्रवणभक्तीकरिता विविध साधनाची अपेक्षा असतेच असे नाही. वीणा, मृदंग, तालादी वाद्ये उपलब्ध झाली तरी उत्तमच, पण ते नसेल तर काही अडत नाही.

संत एकनाथ महाराज सांगतात,

“कलियुगीं दोष बहुत ।

केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।

तेथें दोषत्यागें जे गुण घेत ।

ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥

*

हरिकीर्तनें शुध्द चित्त ।

दोषत्यागें गुण संग्रहीत ।

ऐसे सारभागी कलियुगांत ।

परममुक्त हरिकीर्तने ॥ ५ ॥

संत तुकाराम महाराज हे कथे विषयी अतिशय अनुराग ठेवणारे होते, ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात –

*

“सांडुनि कीर्तन न करी आणीक काज ।

नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥ १ ॥

*

(अभंग क्रमांक २२४७, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

स्वतः नारद महाराज हे कीर्तन भक्तीचे अध्वर्यू मानले जातात. सतत नारायण नारायण या नामाचे संकीर्तन करीत ते तिन्ही लोकांत फिरत असतात. कीर्तनाची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे भगवत्कथा, भगवतांचे गुण प्रेमाने गाणे, प्रेमाने श्रवण करणे.

संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.

सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावीं ।

सज्जनवृंदे मनोभावें आधी वंदावीं ॥ १ ॥

*

संतसंगें अंतररंगे नाम बोलावें ।

कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥ २ ॥

*

भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।

प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥ ३ ॥

*

जेणेंकरूनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची ।

ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥ ४ ॥

*

अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी ।

एका जनार्दनी मीमुक्त होय तत्काळी ॥ ५ ॥

*

कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. कीर्तनाला येणारे श्रोते आपल्याला काहितरी नवीन ऐकायला मिळेल या सुप्त हेतूने येत असतात. यासाठी किर्तनकार बहुश्रुत असणे अत्यावश्यक ठरते. बंध म्हणजे बंधन किंवा गाठ. श्रोता आणि वक्ता यात एक अनुबंध निर्माण व्हावा, जर हा बंध नसेल तर त्या कीर्तनात नियमाप्रमाणे सर्व काही होईल, पण त्याचा अपेक्षित प्रभाव जाणवेल असे म्हणता येणार नाही. त्या कीर्तनाची ‘कुडी आहे पण प्राण नाही’ अशी अवस्था होईल. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये ‘बंध’ निर्माण होण्यासाठी ते एकरूप झाले पाहिजेत. म्हणून समर्थ संप्रदायात ‘श्रोता वक्ता श्रीराम समर्थ’ असे आवर्जून म्हटले जात असावे. संतांचे ग्रंथ उदात्त हेतूने लिहिलेले असतात, त्यात पांडित्य नसते असे म्हणणे धाडसाचे ठरेल, परंतु ते ग्रंथ साधे, सोपे, सरळ असतात. त्यांचा अभ्यास केला, त्यानुसार आचरण केले की ते ग्रंथ मनुष्याला थेट आत्मारामाची भेट घडवून देऊ शकतात. म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यातून सरळ अर्थ काढावा आणि तो समाजापर्यंत पोहोचवावा. त्या शब्दाचे स्लेष काढत बसू नये.

संवाद साधायचा असेल तर शब्दांशिवाय पर्याय नाही. म्हणून किर्तनातच नव्हे तर दैनंदिन व्यवहारात देखील प्रत्येक शब्द जपून वापरावा. आमची आज्जी सांगायची घरात प्रत्येकाने जपून बोलावे, शब्द काळजीपूर्वक योजावे, कारण वास्तूदेवता सतत ‘तथास्तु’ म्हणत असते. बोलण्याच्या आधी विचार केला की बोलल्यानंतर आपल्याला विचार करावा लागत नाही असेही म्हटले जाते, यामागे मोठा अर्थ आहे. आपण तो समजून घ्यावा. आपली वाणी शुद्ध, वाचा नम्र आणि शब्द मनोहर असावेत. ‘चिंच म्हटले की तोंडाला पाणी सुटत असेल’ तर प्रत्येक शब्दाला किती मूल्य आहे हे आपल्या लक्षात येईल. इथे माझी एक कविता देत आहे.

‘ शब्द ‘

बोलके करतात ‘शब्द’

अबोल करतात ‘शब्द’

*

शुद्ध करतात ‘शब्द’

अशुद्ध करतात ‘शब्द’

*

मने जोडतात ‘शब्द’

मने दुभंगतात ‘शब्द’ 

*

पवित्र करतात ‘शब्द’

अपवित्र करतात ‘शब्द’

*

सबळ करतात ‘शब्द’

दुर्बळ करतात ‘शब्द’

*

नाती जोडतात ‘शब्द’

नाती तोडतात ‘शब्द’

*

विजयी करतात ‘शब्द’

पराजयी करतात ‘शब्द’

*

शस्त्र होतात ‘शब्द’

निःशस्त्र करतात ‘शब्द’

*

आधार देतात ‘शब्द’

निराधार करतात ‘शब्द’

*

जीवन देतात ‘शब्द’

मरण देतात ‘शब्द’

*

शब्द-शब्दात अडकला ‘शब्द’

शब्दातून सुटका करील ‘शब्द’

*

शब्द-शब्दात जप तू अर्थ

शब्दाविना ‘शब्द’चि व्यर्थ

*

रे मनुष्या…..! पाळ तू ‘शब्द’!

राजा हरिश्चंद्रही पाळी शब्द’!!

*

शब्द-शब्द पाळता ‘राम’

‘मृदूल’ शब्दे होई काम.

*

जय जय रघुवीर समर्थ!!

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ 

*

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १७

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झुळूक आणखी एक! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ झुळूक आणखी एक! ☆ श्री संभाजी बबन गायके 

काळ हेच औषध असतं, असं म्हणतात. पण हा काळ ज्याला कंठावा लागतो त्या जीवालाच ठाऊक त्या वेदनांचा दाह!

विस्मरण, स्मरण आणि मरण या एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणाऱ्या गोष्टी. एखाद्याला आपण विसरून गेलो तर आपल्या लेखी त्याचा मृत्यूच झालेला असतो. आणि हे जग सोडून गेलेल्यास आपण स्मरणात ठेवले तर तो जिवंत असतो. पण कित्येक वेळा, कित्येकांना स्मरण जणू मरणाचा अनुभव देत असावे. कालौघात विरहाची धार जराशी बोथट होत असेलही, पण स्मरणाच्या तारेला झंकारुन उठायला एखादी हलकीशी झुळूकही पुरेशी ठरत असावी… किंबहुना त्या तारा वाऱ्याची यासाठीच तर आळवणी करीत असाव्यात!

खरं तर कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत, वस्तूच्या, पदार्थाच्या बाबतीत उत्पत्ती, स्थिती आणि लय हा क्रम ठरलेला असतो. पण आधी जन्माला आलेला जीव नंतर जन्माला आलेल्या जीवाच्या आधी जावा… नंतर जन्मलेल्याने नंतर जावे… खरं तर हाच क्रम योग्य आहे. पण निसर्ग याबाबतीत खूप अन्यायी आहे. प्रत्येकाची मरणरेषा स्पष्ट आखलेली असते या श्वासांच्या शर्यतीत. आणि श्वास थांबवता येत नाहीत… अंतिम रेषा पार करे पर्यंत. कुणी बळजबरी केली आणि स्वतःचे श्वास स्वतःच थांबवले की ती शर्यत पुन्हा पहिल्यापासून आरंभ करावी लागते… पुढील जन्मात! ज्यांचे श्वास इतरांनी थांबवले, त्यांची शर्यत अपूर्ण राहते बराच काळ… पण सुटका नाही!

निष्प्राण देह जड होऊन जातो.. आणि हा देह वाहून नेणारे खांदे जर या देहापेक्षा ज्येष्ठ असतील तर हा जडपणा अधिकचा असतो… जगातला सर्वांत मोठा भार… हा भार जन्मभर खांद्यावरून उतरत नाही.

या स्मरण वेदनेवर काळ हा उतारा वरवर गुणकारी भासतो.. पण मनाला चकवा देऊन कळ उसळी मारतेच अधून मधून. त्यापेक्षा सतत स्मरण राखत राहिलं तर सवय तरी होऊन जाते.

काळीज जितकं जुनं तितकं ते हळवं. माणसांच्या गराड्यातून स्वतःच्या काळोखात एकदा का हे काळीज गेलं ना की त्याला फक्त त्याचीच धडधड ऐकू येते. हा एक हृदयविकारच जणू.

आणि म्हणून अशा काळजांना एकाकी नसतं राहू द्यायचं. त्यांचं अंधारात जाण्याचं शक्य तितकं लांबवत राहायचं! काही अंधारात एकाच्या जोडीला दुसरंही हृदय असतं.. आणि ते एकाअर्थी बरं असतं. ये हृदयीचे ते हृदयी समजू शकतं.

लोकांचं काय हो… लोक विसरून जातात. सोयरे सुतक फिटलं की मोकळे होतात. मित्र परिवार स्मृतिदिनापुरता उरतो. सांत्वने, आश्वासने घडीची सोबती असतात… शेवटी ज्याचे भोग ज्याचे त्यानेच भोगावेत.. अशीच जगरहाटी असते!

मरणाला कुठला आलाय विधिनिषेध? कुणी कुठल्या कारणानं, कधी, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कुणाच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं.. हे कोण ठरवत असेल तो असो… मृत्यू सर्वत्र एकाच चेहऱ्याने वावरतो… वेदनेच्या!

म्हणूनच ज्याला शक्य आहे, त्याने असे मरणस्पर्श झालेल्या मनांशी संवाद साधत राहायला पाहिजे… एक नित्योपचार म्हणून. मृत्यूच्या उतरंडीवर सर्वांत वर आहेत.. ते तरुण, देखण्या, सशक्त, नीडर सैनिकांचे मृत्यू.. अर्थात अकालमृत्यू!

या तरुणांचे प्राणहरण करण्यासाठी आलेल्या दुतांचेही हात थरथरत असतील त्यांना पाशात अडकवताना… पण त्यांना स्वर्गात नेण्याचे भाग्य लाभते यासाठी ते दूत दैवाचे आभारही मानत असावेत! गेल्या काही दिवसांत अशाच काही माता, पिता, बंधू, भगिनी यांच्याशी संवाद घडला… आणि लक्षात आलं… समाज आणि हे वेदनापिडित यांच्यात खूप मोठी दरी आहे! केवळ वेळ-प्रसंगीच आठवणी जागवत न राहता… त्यांच्या आठवणी जागत्या ठेवायला हव्यात… त्यांच्या अखेरीपर्यंत. आपल्या घरात दिवा लावताना त्यांच्याही अंधा-या घरांत एक पणती पोहोचवावी जाणत्यांनी! सुदैवाने असे जाणते आपल्याकडे फार अधिक नसले तरी मूठभर तरी आहेत. हे सुहृद सैनिकांच्या मुलांशी, पत्नीशी, आई-वडिलांशी सतत संपर्कात राहतात… त्यांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी सांगत असतात, ऐकत असतात. त्यांच्या मुलांच्या पराक्रमाच्या कहाण्या इतरांना सांगत असतात… पुन:पुन्हा! देव घ्या फुका.. देव घ्या फुका… न लगे रुका मोल काही! अर्थात देव मिळवायला काही खर्च लागत नाही… तुम्हीही असे देव शोधा…. त्यांनी घडवलेल्या सैनिकांच्या हौतात्म्याच्या कथा सर्वत्र पोहोचू द्यात… आणि या कथा सर्वत्र पोहोचत आहेत हेही त्यांच्यापर्यंत पोहोचावा! तुमच्या शब्दांची एक झुळूक.. त्यांच्या अंतरीच्या जखमा सुखावून जातील! हुतात्मा सैनिकांच्या परिवारांसाठी काम करणा-या सर्व बंधू-भगिनी-मातांना सप्रेम नमस्कार.

जय हिंद!!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – २ ’ ☆ श्री दिवाकर बुरसे

देवर्षि नारदांच्या सर्व उपदेशांचे सार असे की ‘सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तितै: भगवानेव भजनीय:’ म्हणजे सर्वदा सर्वभावाने निश्चिंत होऊन केवळ भगवंताचेच ध्यान करावे. नामस्मरण करुन आनंदात असावे.

श्री विष्णूचे अनन्य भक्त

देवर्षि नारद भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. ते भगवंताची भक्ति आणि माहात्म्य याच्या प्रचारासाठी आपल्या वीणेचा मधुर झंकार करीत, भगवंताचे गुणगान करीत निरंतर भ्रमण करीत असतात. त्यांना भगवंताचे मन म्हणतात. ते अप्रत्यक्षरूपात भक्तांना सहाय्य करतात. त्यांचे मंगलमय जीवन विश्वाचे मंगल करण्यासाठी समर्पित आहे. ते ज्ञानाचे स्वरूप, विद्येचे भांडार, आनंदसागर आणि सर्व भूतमात्रांवर प्रेम करणारे, विश्वकल्याण चिंतणारे आहेत. म्हणूनच सर्व युगात, सर्व लोकात, सर्व विद्यांमधे, समाजातील सर्व वर्गांमधे नारदांचे एक महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. केवळ देवतांनीच नव्हे तर दानवांनीही त्यांचा सदैव आदर केला आहे. वेळोवेळी सर्वांनी त्यांचा परामर्श घेतला आहे. श्रीमद्भागवत म्हणते की सृष्टिमधे भगवंतांनी देवर्षि नारदांच्या रूपात तीसरा अवतार घेतला आणि ‘सात्वततंत्र’, ज्याला ‘नारद पंचरात्र’ पण म्हणतात, त्याचा उपदेश दिला. यात सत्कर्मांद्वारे भव-बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. नारद हे ऋषिमुनींचे देवता आहेत व त्यांना ‘ऋषिराज’ म्हणूनही ओळखले जाते.

महाभारताच्या सभापर्वातील पांचव्या अध्यायात नारदांच्या व्यक्तिमत्वाचा करून दिलेला परिचय असा आहे… देवर्षि नारद वेद आणि उपनिषदांचे मर्मज्ञ, देवतांचे पूज्य, इतिहास – पुराणांचे विशेषज्ञ, पूर्वी होऊन गेलेल्या कल्पातील घटना जाणणारे, न्याय व धर्माचे तत्त्‍‌वज्ञ, शिक्षा, व्याकरण, आयुर्वेद, ज्योतिष आदिचे प्रकांड विद्वान, संगीत विशारद, प्रभावशाली वक्ता, मेधावी, नीतिज्ञ, कवि, महापंडित, बृहस्पतिसारख्या महाविद्वानांच्याही शंकांचे समाधान करणारे, धर्म -अर्थ- काम – मोक्ष या पुरुषार्थांचे यथार्थ ज्ञाता, योगबाळावर समस्त लोकांचे सर्व समाचार जाणण्याचे समर्थ, सांख्य आणि योग शास्त्रांचे सम्पूर्ण रहस्य जाणाणारे, देवता व दैत्यांना वैराग्य विषयाचे उपदेशक, क‌र्तव्य -अक‌र्तव्य यातील भेद करण्यात दक्ष, समस्त शास्त्रात प्रवीण, सद्गुणांचे भांडार, सदाचाराचे आधार, आनंदाचे सागर, परम तेजस्वी, सर्व विद्यानिपुण, सर्वांचे हित करणारे आहेत. अठरा महापुराणांमधे एक नारदोक्त पुराण; ‘बृहन्नारदीय पुराण’ या नावाने प्रख्यात आहे.

वायुपुराणात देवर्षि पदाचे लक्षण वर्णन असे केले आहे… देवलोकात प्रतिष्ठा प्राप्त करणा-या ऋषिगणांना देवर्षि म्हणून ओळखले जाते. भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे ज्ञाता, सत्यभाषी, कठोर तपस्येमुळे लोकविख्यात, गर्भावस्थेतच अज्ञान रूपी अंधकाराला नष्ट केल्यामुळे ज्यांना ज्ञानाचा प्रकाश लाभला आहे असा मंत्रवेत्ता आपल्या सिद्धिंच्या बळावर सर्व लोकात सर्वत्र संचार करण्यास सक्षम, समादेश घेणा-या लोकांनी वेढलेले, देवता, द्विज आणि नृप देवर्षि म्हणून ओळखले जातात.

असे असले तरी जनसाधारण देवर्षिंच्या रूपात केवळ नारदच परिचित आहेत. त्यांच्याइतकी प्रसिद्धि व लोकप्रियता अन्य कोणालाच लाभली नाही. वायुपुराणात सांगितलेली देवर्षि पदाची सारी लक्षणे नारदांच्या ठाई दिसतात.

मत्स्यपुराणात वर्णन आहे की श्री नारदजींनी ‘बृहत्कल्पप्रसंग’ मधे ज्या अनेक धर्म-आख्यायिका सांगितल्या आहेत, २५, ००० श्लोकांचा हा महाग्रंथच नारद महापुराण आहे. सध्या उपलब्ध असलेले नारदपुराण २२, ००० श्लोकांचे आहे. ३, ००० श्लोक कमी आहेत. प्राचीन पांडुलिपिचा काही भाग नष्ट झाल्यामुळे असे झाले असावे.

नारदपुराणात सुमारे ७५० श्लोक ज्योतिषशास्त्रवर आहेत. यात ज्योतिषाचे तीन स्कंधात सिद्धांत, होरा आणि संहिताची सर्वांगीण चर्चा केली आहे.

नारदसंहिता नावाने उपलब्ध अशा अजून एका ग्रंथात पण ज्योतिष शास्त्राच्या सर्व विषयांचे विस्तृत वर्णन मिळते. यावरून हे सिद्ध होते की देवर्षि नारद भक्तिप्रमाणे ज्योतिष विषयाचेही प्रधान आचार्य होते.

कीर्तन परंपरा

भारत देश विविधतेने नटलेला आहे हे सर्वज्ञात आहे. विविध भाषा, विविध, वेषभूषा, विविध संगीत परंपरा, विविध लोककला, विविध कथाकीर्तन परंपरा, किती किती म्हणून सांगावे! पण येवढी विविधता असली तरी संस्कृती एक आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडेही भक्तिमार्गात कीर्तन परंपरा आहेत. त्यात वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन व नारदीय कीर्तन, या तीन मुख्य कीर्तन परंपरा विशेष लोकप्रिय आहेत.

वारकरी कीर्तन परंपरा संत नामदेवांनी विशेष लोकप्रिय केली. त्यापूर्वी ती अस्तितौवात असेलही, तरी भागवत किंवा वारकरी कीर्तन परंपरेत नामदेवांचे नाव अग्रस्थानी आहे.

नामदेव महाराज उत्तम कीर्तन करीत असंत. असे म्हणतात की, नामदेव कीर्तन करू लागले की स्वतः विठ्ठल त्यांचे कीर्तन ऐकायला येऊन बसत. कीर्तनातील नामघोष करताना नामदेवांबरोबर स्वतः श्रीहरी सुद्धा तल्लीन होऊन नाचायला लागंत. नाचताना ते येवढे तल्लीन होत की स्वतः नेसूचा पीतांबर कधी फिटला याचेही हरीला भान रहात नसे!

रामदासी कीर्तन परंपरेचे प्रणेते श्री समर्थ रामदासस्वामी आहेत. या कीर्तनाचा वर्णविषय असतो प्रभु रामचंद्रांचे लीलाचरित्र वर्णन.

नारदीय कीर्तन परंपरा सर्वात प्राचीन आहे. तिचे प्रवर्तक स्वतः देवर्षी नारद आहेत. यात श्रीविष्णु राम, श्रीकृष्ण, विठ्ठल, यासारखे त्यांचे अवतार व देवतांच्या लीलांचे गुणगान तसेच थोर वैष्णव संतचरित्रांचे कथन, वर्णन केले जाते. काव्य, नाट्य, अभिनय, गायन, वादन, नर्तन या सर्व कलांचे प्रदर्शन करून हरिकथा अधिकाधिक रंगवून सांगितल्या जातात.

जगातील एकमेव नारद मंदीर महाराष्ट्रात व तेही पुण्यात आहे. तिथे नारदीय कीर्तनाचे विद्यापीठही आहे. हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी हौसेने तिथे कीर्तनकला शिकून जगभर आपली कीर्तने सादर करीत आहेत.

सध्या धार्मिक चित्रपट, टी व्ही मालिका, नाटके इ मधे नारदांचे जे चित्र दाखवले जाते ते देवर्षिच्या महानतेपुढे अगदीच ठेंगणे ठुसके आहे, सवंग आहे. नारदांचे पात्र ज्या प्रकारे रंगविले जाते त्यावरून नारद केवळ भांडणे लाऊन गंमत बघणारा, अंगविक्षेप, शब्दच्छल व कोट्या करणारा विदूषक वाटावा.

प्रकांड पांडित्य असलेल्या विराट व्यक्तिमत्वावर केलेला हा सरळ सरळ अन्याय आहे. ते लोक नारदजींचा उपहास करणारे, श्रीहरिच्या या अंशावताराचा अवमान करण्याचा अपराध करणारे आहेत.

भगवंताच्या अधिकांश लीलांत नारदजी अनन्य सहयोगी असतात. ते भगवंताचे पार्षद आहेतच खेरीज देवता गणांचे प्रवक्ता पण आहेत. नारदजी ख-या अर्थाने ‘गुरुंचे गुरु’ आहेत, देवांचे ऋषी- ‘देवर्षि’ आहेत!

ऋषीपंचमीनिमित्त सर्व ऋषी, महर्षींना साष्टांग नमस्कार.

— समाप्त —

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares