☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆
समाराधना
गोविंदरावांच्या समाराधनेच कौतुक हा गावातल्या गप्पांचा नेहेमीचा विषय. नित्य अन्न संतर्पण होत असे . दुपारी बारा वाजता पहिली पंगत बसली की चार वाजून जाईस्तोवर पंगती सुरूच असत. स्वतः गोविंदराव पंगतीत फिरून सावकाश होऊ द्यात म्हणत असत . मोठे दत्त भक्त असा गोविंदरावांचा लौकिक होता . दत्त महाराजांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही, तेव्हा मी देखील दानधर्मात काही कमी करणार नाही हा त्यांचा विचार असे .
पंगतीत दत्त महाराजांची पदे म्हटली जात आणि अनेकदा स्वतः गोविंदराव गुरुचरित्रातील एखादा कथाभाग पंगतीत येऊन सांगत असत . त्याच गावी एक अत्यंत गरीब अशी म्हातारी राहत असे . फाटकं तुटकं नेसून ती त्या वाडयाच्या दाराशी येऊन बसे. सर्व पंगती झाल्यावर उरलेले पदार्थ ती घेऊन जात असे .ती अन्न घेऊन जाताना नेहेमी म्हणे, “अरे दोघाना पुरेल इतकं दे रे बाबा. “ ती झोपडीत एकटीच राहणारी, मग दुसरा कोण हा प्रश्नच असे .असेल कोणा प्राण्यासाठी म्हणून सर्व दुर्लक्ष करीत .
ती झोपडीत आल्यावर दार लावून घेत असे . झोपडीत एक जीर्ण अशी दत्त महाराजांची तसबीर होती . दत्त महाराजांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवीत असे. आणि म्हणे, “ दत्ता, दमला असशील ! ये S खा दोन घास माझ्या बरोबर “ एक मंद अशी चंदन सुगंधाची झुळूक त्या झोपडीत शिरे . एक दिवस चुकून दार लावायला म्हातारी विसरली आणि हे सर्व एका मनुष्याने पाहिले . त्याने ताबडतोब ही बातमी गोविंरावांपर्यंत पोहोचवली . ‘ आपल्या अन्नातील उरलेल्या अन्नाचा नैवेद्य दत्त महाराजांना ???’ ही कल्पनाच त्यांना सहन होईना .
त्यांनी त्वरित मुदपाकखान्यातील सर्व सेवकांना फर्मान सोडले, उद्यापासून त्या म्हातारीला काहीही देऊ नये. झाले — म्हातारीला दटावून सेवकांनी हाकलून दिले . आपल्याला खायला काही नाही
यापेक्षा दत्त उपाशी या जाणिवेने म्हातारी कळवळली. इकडे दत्त महाराजांची नित्य पूजा करणाऱ्या पुजारीवर्गाला त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला, “ अरे मला उपवास घडतोय ,त्या गोविंदाला जाऊन सांग. “ गोविंदरावांना हा दृष्टांत निरोप मिळाला ,त्यांनी पुजारी आणि सेवक वर्गाला विचारले “ काल नैवेद्य होता ना ? “ ‘ हो ‘ असे उत्तर सर्वांकडून मिळताच ते विचारात पडले .
दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दृष्टांत आणि ह्या खेपेस दत्त महाराजांची मुद्रा क्रोधव्याप्त अशी . सकाळ होण्याची वाट न बघता पुजारी रात्रीच धावत वाड्यात आला . घामाने ओलाचिंब आणि अत्यंत घाबरलेला– हा काय प्रकार असावा हे जाणून घेण्यासाठी गावातील सर्वांना सकाळी गोविंदरावांनी बोलावणे केले, तेव्हा तो म्हातारीच्या नैवेद्याची बातमी देणारा मनुष्य दिसला . तात्काळ काही तरी उमगून गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते तडक म्हातारीच्या झोपडीकडे गेले . उपवासाने क्षीण अशा अवस्थेत म्हातारी निजूनचं होती. तिचे पाय अश्रूंनी धुवत गोविंदराव म्हणाले “ आजपासून नित्य नैवेद्य दाखवत जा–”. झोपडीतील जीर्ण दत्त महाराजांच्या तसबिरीत एक बदल मात्र झाला होता. महाराजांच्या चेहेऱ्यावर मोहक हास्य दिसत होते– श्रीगुरुदेव दत्त !!!—
– अभय आचार्य
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
माझी आज्जी..बहुदा पहिली स्टेमसेल बॅंकेची मुहुर्तमेढ रोवणारी स्री असेल..!
भारत खरंच बुद्धीवंताचा देश ! कित्येक पुरावे मिळतात त्याचे ! त्यापैकीच हा एक !
आज्जीची स्वत:ची स्टेमसेल बॅंक होती..आजी शंभरी गाठलेली !पण गाडग्यांच्या ऊतरंडीत नाव,वयाप्रमाणे सर्वांची नाळ साठवलेली ! कित्येक वर्षे ! कुठलंही प्रिजरवेटीव न वापरता ठेवलेली ! त्या प्रत्येक गाडग्यात अर्ध्यावर गवर्यांची राख असायची !आणि त्यात वाळवून ठेवलेली नाळ असायची ! घरात कुणी जन्माला आलं की त्याची कापलेली नाळ सावलीत स्वच्छ पांढर्या कापडावर वाळविली जायची !आणि नंतर ती या राख भरल्या गाडग्यात जपून ठेवली जायची..त्याची ऊतरंड स्पेशल असायची..घुप्प अंधार्या खोलीत कोपर्यात ! अगदी माळवदाच्या थंड घरात ! मडक्यावर चुन्याने नावं लिहीलेली असायची प्रत्येकाची ! त्या ऊतरंडीला कुणाला हात लावायची मुभा नसे ! काय आहे त्यात विचारलं तरीही ऊत्तर रागातच यायचं !!
तर अशी स्टेमसेल बॅंक गावातल्या प्रत्येकाच्या घरी तिनं सुरु केली..आणि घरात कोणाला कोणताही आजार जो पंधरा दिवसापेक्षा जास्त असला की,लोक तिला विचारायला यायचे !! मग ती ज्याची नाळ असेल ते गाडगं मागवायची अनं त्या कोरड्या नाळेला आमच्या घरी एक शाळीग्राम सदृष्य दगड होता..त्यावर ती पाण्याचे चार थेंब टाकून घासायची !आणि त्या रुग्णाला चाटण्यासाठी द्यायची !! आणि रुग्ण कांही दिवसात पुर्ण बरा व्हायचा !!
माझ्या मोठ्या भावाला रिकेटस झालेला..!अर्थात डाॅक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही फरक नव्हता..वडिल माॅर्डन सायंन्सला मानणारे !पण जेव्हा औषधांनी फरक पडत नव्हता तर त्याला त्याची नाळ ऊगाळून दिलेली..आणि तो लवकरच बरा झालेला ! (मी डाॅक्टर आहे ! कुणाला हे चुकीचं ज्ञान असेल असं वाटण्याची दाट शक्यता)..असे कितीतरी प्रसंग आलेले.तो हाय ग्रेड फिवर असो की अजून कोणता आजार..औषध एकच ! नाळेची एक मात्रा ! माझ्या आईला डिलेवरी नंतर परप्युरियल मॅनिया झालेला..!औषधोपचार झाले ! फरक नव्हता.आज्जीने आईकडच्या आज्जीकडून आईची नाळ मिळविलेली ! आणि त्याची मात्रा आईला दिलेली..आई त्यातून सुखरुप बाहेर आली !!पण आज्जीने हा प्रयोग कदाचित अशा आजारासाठी पहिल्यांदाच केलेला !
हे सगळे संदर्भ मला माझ्या वडिलाकडून मिळालेले ! मी माझ्या मुलांची नाळ अशीच जपून ठेवलीय !! अजून तशी गरज पडलेली नाहीये !!
सो काॅल्ड नवे ज्ञानी मला आर्थोडाॅक्स विचारांचा म्हणतीलही हे लिहीलेलं वाचून !असं कांही नसतं हे ही म्हणतील पण सद्यस्थितीला स्टेमसेल स्मरुन ही प्रिजरवेशनची पद्धत जुनी असेलही पण त्यामागील वापराचे ज्ञान नक्कीच सारखे आहे !!स्टेमसेल अॅडव्हान्स असेलही..त्याचा बहुअंगी वापर आता खुप असेलही पण त्या जुन्या पद्धतीला जरी आज अडगळीत टाकलं गेलं असेल..तरीही त्यामागे नक्कीच खुप मोठं सायन्स होतं,आहे…ते खरंच एक पाऊल होतं जुन्या पिढीचं ! आजाराला सहज जिंकण्याचं ! विशेष माझ्या आईकडील आज्जी आणि वडीलांकडील आज्जीला दोघींनाही हे ज्ञान होतं..पण काळाच्या ओघात हे ज्ञान मागे जरी पडलं असेल तरीही त्यातील गुढ अजून कोणी शोधलेलं नाही…आणि ते पुर्णत:विकसित होतं यात शंका नाही..त्या त्या काळाची आपली एक ओळख असतेच तसेच त्या त्या काळात गरजेनुसार विकसित झालेले सायन्सही !
केशरबाई अन रतनबाईंचा हा वारसा खरंच वाखणण्याजोगा आहे !!
असे काही अनुभव आपले असतील तर जरुर शेअर करा ! स्टेमसेलचा हा जुना अवतार तितकाच भारी आहे जितका आजची सुधारित स्टेमसेल बॅकेचा आहे !!
#आज्जींनो तुम्ही आजही तुमच्या कतृत्वाने जिवंत आहात#
डाॅ. प्रेमेन बोथरा, हिंगोली.
मो 9518522393
(विचार करायला लावणारे– काहीतरी. प्रयोग करुन बघायला हवा– असे काहीतरी.)
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अंशूकांचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी ! बालपणापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सूडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली! कर्ण ! योध्द्यांनी गौरविलेला कर्ण ! प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण ! एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला ! शिशुपाल आणि मी, दु:शासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक नाही की काय ? या विचारानं कधी नव्हते ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले ! राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू ! त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामाच्या भयानं थरथरणारी पश्चातापदग्धताही नव्हती ! आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकांच्या ढिगार्यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून आलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सणक होती. अश्रुबिंदूंच्या स्वरूपात ती सणक उभी राहिली होती – तीही सूतपुत्र कर्णाच्या नेत्रांत ! सूर्यशिष्या साठी सूतपुत्राच्या डोळ्यांत अश्रू ! एक क्षणभरच मला वाटलं, मी सूतपुत्र झालो नसतो तर! कसं झालं असतं माझं जीवन !श्रीकृष्णासारखं ? का नाही ? झालंही असतं ? संस्काराच्या संघातांनी सामान्याचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं ! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या !
माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातांतल्या उत्तरीयावर पडून असेच विरले! ज्यांचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला, थकलेला दु:शासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचेच स्वर भयाण भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होतं ! सुवर्णधाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं ! मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं ! सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दु:शासनानं हात उचलला ! पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले.
“दु:शासन, एक सूतभरही आता पुढं सरकू नको ! शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव ते पितांबर आहे ! “
अंगी त्राण नसल्यामुळे हात खाली सोडून दु:शासन रखडत – रखडत कसातरी आपल्या आसनाजवळ आला. क्षणभर आसनाच्या हस्तदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला.त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे दोन थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूवर तो उभ्यानंच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला.आसनावर स्वेदबिंदू, स्वेदबिंदूवर दु:शासन ! शिसारीने मी मान फिरविली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता ! खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा !
(अंशुक म्हणजे स्त्रियांचे वस्त्र)
श्रीकृष्ण — ( रणभूमीवर अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन कर्ण पडला ती वेळ. )
त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व-सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं ! केवळ एकट्या माझ्यावरच !!
झटकन मी पुढे झालो ! त्याच्या पाळं तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो.” कौंतेया, तुझी अंतिम इच्छा ? “
त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ! दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते ! कसले होते ते !
दुःखाचे ? पश्चातापाचे ? ते ; धन्यतेचे !! कृतार्थतेचे !! मी – स्वतः मी त्याला ‘कौंतेया’ म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे! तोही हळूहळू पुटपुटू लागला, ” द्वारकाधीशा… माझी अंतिम इच्छा! इच्छा की… तू – तूच माझा अंत्यसंस्कार… एका… एका… कुमारी-भूमीवर करावा!! कुमारी-भूमी!! ” त्याच्या आवाज अत्यंत क्षीण झाला होता.
“कुमारी-भूमी!! म्हणजे ?” त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो.
“होय…कुमारी! ज्या भूमीवर… कधी – कधीच…तृणांकुरसुद्धा… उगवले नसतील… उगवणार नाहीत! माझी दुःखं…ती…ती पुन्हा – पुन्हा या मर्त्य भूमीवर – कोणत्याही रूपात उगवू नयेत!!! म्हणून… ही – ही पंचमहाभूते… कुमारी-भूमीत – लय – लय…!”
त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण आणि अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो! तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो. एकचित्तानं!
तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता-
” ली… ली… माता… माता… ण … न!”
तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं! तो वृषाली म्हणत होता की पांचाली! तो कुंतीमाता म्हणत होता की राधामाता!! शोण म्हणत होता की अर्जुन!!! मी ताडलं – तो दोन्ही म्हणत होता!!!
आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले! सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो! अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते!!
“ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यंऽऽऽ!” एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली! सर्वांनी श्वास रोखले! त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला! छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं! स्थिर झालं.
महान तेजस्वी असा, डोळे दिपवणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्त्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल-लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला! क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला!! त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले! अंधारले!
त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!!!
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग !—
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं. त्यांना वाटायला लागलं की आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता. त्याला बोलावलं. तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ती आलीय ,हे त्यानी ओळखलंच. त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. “दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे.”
यावर तो मुलगा म्हणाला , “सरजी, पैशाचा सवालच नाहीए. कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही.”
“का रे बाबा?”
“त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत. सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल, ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी.”
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले, “कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद, माझी पदवी, उच्च शिक्षण सार्या सार्याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत, ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.”.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈