☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – २ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
कालच्या लिखाणात शून्यामुळे आयुष्यात काय बदल जाणवले ते सांगितलं. पण विचार सुरुच होते. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी हे काम केल नसत तरी कोणीतरी ते केलच असत. कस ते सांगता येत नाही. पण केलच नसतं तर…
आपल्या दिवसभरातल्या अनेक गोष्टी कशा झाल्या असत्या… आज वाचता न येणाऱ्या संख्या आम्ही शब्दांच्या सहाय्याने लीहू शकतो त्या संख्यांच काय झालं असतं. कारण शब्दात लिहिण्यासाठी सुध्दा ती आकड्यातली संख्या वाचतातर यायला हवी. यासाठी संदर्भच हवा असेल तर महापालिकेपासून देशाच्या आर्थिक नियोजनाचे आकडे पहा. केवळ मुंबई महापालिकेच बजेट जवळपास चौर्याहत्तर हजार कोटी आहे. इतके हजार कोटी आकड्यात कसे लिहीणार. आणि वाचणार केव्हा. पण शून्यामुुळेेच हे आकडे अस्तित्वात आले. लिहीले आणि वाचलेही गेले.
हे खूप मोठं उदाहरण झालं. पण शून्य नसत तर आमचा आजचा पगार कीती सांगितला असता? … आमची प्रगती पैशाकडून रुपयांकडे झाली असती का… शून्यामुुळेेच आकडे ०९ नंतर १० नंतर १०० असे वाढले आणि वाढतच राहिले.
शंभर आकडा आला, आणि सुरु झाली टक्केवारी. शून्य आणि तो वापरायचे नियम शोधले नसते तर आज गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी काय शिकवलं असतं… हा प्रश्न अंक असणाऱ्या सगळ्याच विषयाबाबतीत आला असता.
आज गाडीत पेट्रोल भरतांना सुध्दा तो म्हणतो, हं झिरो म्हणजेच शून्य बघा. शून्य नसता तर आम्ही काय पाहिलं असतं. सुुरुवात कुठून केली असती. वेळेचे सेकंद, मिनीटं, तास कसे मोजले असते. गाडीचा वेग कसा सांगितला असता. महिना किती दिवसांचा असता. वर्ष कसं मोजलं असतं. थर्मामिटरने ताप कसा मोजला असता.
एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर म्हणतो शंभरवेळा, किंवा हजारदा सांगून झालयं. तेव्हा काय म्हंटलं असतं. शंभरला शेकडा, शत, शतक असे पर्यायी शब्द मिळाले असते का… “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ” “शत जन्म शोधिताना” “सौ साल पहले… ” “तुम जिओ हजारो साल” गाण्यात अशा ओळी आल्या असत्या का… सोनं शंभर नंबरी झालं असतं का… कौरव कीती होते, याच ऊत्तर काय दिल असतं.
जपमाळ एकशेआठ मण्यांची कशी झाली असती. आमची संस्कृती इतकी जूनी आहे तर मग रौप्य, सुवर्ण, हिरक, अमृत, शतकोत्तर महोत्सव कसा मोजला किंवा सांगितला आणि साजरा केला असता.
त्यामुळे शून्याचा शोध लावल्यामुळे काही गोष्टी थोड्या त्रासदायक वाटत असतील. पण त्यामुळेच अनेक गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. व्यवहार सहज आणि सोपे झाले आहेत.
आज गणितज्ञांंसह अनेकांनी प्रगती केली असेल. पण खरोखरच शूून्यातूून कोणी निर्मिती करून क्रांती घडवली असेल तर ती शून्याचा शोध लावणारा आणि त्याचे नियम तयार करणारा यांनीच. आणि याचं श्रेय जातं ते त्या दोन महान भारतीयांनाच. या भारतीयांनी शून्य आणि त्याचे नियम शोधले नसते, तर किती तरी काळ…
☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – १ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
आर्यभट्ट यांनी साधारण इ. स. ४५६ च्या आसपास शून्याचा ऊल्लेख केला. तर ब्रह्मगुप्त यांनी शून्याचे नियम निश्चित केले असं म्हणतात. सृष्टीची निर्मिती त्याच्याही आधी म्हणजे सुमारे १३ ते १४ अब्ज वर्षापूर्वी झाली असं म्हणतात. पण तरीही आपण सृष्टीची निर्मिती शून्यातून झाली असं म्हणतो.
मला याच्या इतिहासात जायचं नाही. पण शून्यामुुळेेच माझ्या आयुष्यात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.
शून्यातून सुरुवात करून बर्याच जणांनी ऊत्तुंग यश मिळवल्याचं आपण ऐकतो. मी ऊत्तुंग यश मिळवलं नसलं तरी, मला समजायला लागल्यापासून माझी सुरुवात सुध्दा शून्यापासून झाली आहे. अगदी २५ गुणांच्या परिक्षेत सुध्दा मला मिळालेले गुण अगदी ७, ८, ९ असे कितीही असले तरी ते लिहितांना मात्र ०७, ०८, ०९ याच पध्दतीने लिहिले गेले. म्हणजे आधी शून्यच लिहिला गेला. अशा रीतीने माझी सुरुवात शून्यापासून झाली. आणि नंतर त्याची सोबत कायम आहे.
अशा परिक्षेत परिक्षा २५ गुणांची, म्हणजे दोन अंकी होती. मिळालेले गुण ७, ८, ९ असेच एक अंकिच होते. फक्त ते ०७, ०८, ०९ असे लिहिल्यामुळे मला पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीतरी दोन अंकाच्या परीक्षेत मला दोनअंकी गुण मिळाले आहेत असा (गैर)समज मी करून घेत होतो. आणि तसा (गैर)समज मी अजूनही काही बाबतीत बाळगून आहे.
एक पदवी मिळवायला बरीच वर्ष जावी लागतात. शून्यातून सुरुवात करून यश मिळवणार्यांंनी सुध्दा काहीकाळ संघर्ष केला असेल. पण अक्कलशून्य, व्यवहारशून्य, विवेकशून्य, भावनाशून्य अशा शून्य असणाऱ्या बर्याच पदव्या मला विनासायास मिळाल्या. या पदव्या मिळवण्यासाठी माझे परिश्रम शून्य होते. आणि अशा पदव्या मला अल्पकाळात बर्याचदा मिळतात.
चांगल्या गोष्टींंच्या बाबतीत ती कुठे थांबवायची याला ऊत्तर नसलं तरी सुरुवात करावी लागते ती शून्यापासून.
मोबाईल फोनचं कार्ड घेतांनासुध्दा त्याने अगोदर दोन नंबर सांगितले. पण त्या नंबरमध्ये शून्य कुठेच नव्हता. मग काय मी ते कार्ड घेतलच नाही. आणि मग नंबरमधे शून्य असणारं कार्ड घेतलं. हा प्रवास इथेच थांबला नाही. परत प्रश्न आला तो रिंगटोनचा.
सुरुवातीला एक संगीत वाजणारी रिंगटोन होती. मी ती बदलली. आणि अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा या गाण्याची ओळ रिंगटोन म्हणून ठेवली. गाण्याच्या या ओळीत अर्थशून्य याचा अर्थ वेगळा असेल. पण मला अर्थ म्हणजे पैसा, आणि या पैशातून निर्माण होणारा कलह यात शून्य रस आहे. म्हणूनसुद्धा रिंगटोन मधेही मी शून्याची साथ सोडली नाही.
वेगवेगळ्या महत्वाच्या सामन्यांची आपली काही चिन्ह असतात. मला ऑलिंपिक सामन्याचे चिन्ह आवडते. कारण त्यात एक दोन नाही, तर चक्क पाच मोठीमोठी शून्य आहेत व ती एकमेकांत अडकली आहेत.
मला फक्त मारोतीस्तोत्र पाठ आहे. बाकीची स्तोत्र पाठ करण्याकडे मी पाठ फिरवली आहे. मारोतीस्तोत्र पाठ होण्याच कारण परत शून्य हेच आहे. त्यात वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा अशी ओळ आहे.
देवाची पुजा करतांना सुध्दा मी मारोतीस्तोत्र म्हणून झालं कि शांतपणे बसून राहिलेली पुजा संपवतो. पण घरच्यांना वाटतं मनापासून पुजा सुरु आहे. कसा बसलाय पहा शून्यात नजर लावून. आता मी शांत का बसलोय काय सांगणार त्यांना, दुसरं काही येत नाही… पण त्यांना माझी नजर शून्यात दिसते.
आपले रुपये सुध्दा पहा. १०, २०, ५०, १००, २०० असेच आहेत. हे असेच ठेवायला काही व्यवहारिक कारण असेल. पण शून्य आहेच.
मी काही गोष्टी शून्य टक्के व्याज आकारणार्या कंपन्यांकडून घेतल्या आहेत.
दूरदर्शनवर दाखवल्या जाणार्या मालिकेत आवडलेली मालिका म्हणजे पोलीसांनी गुन्हेगारांचा घेतलेला शोध. कारण या मालिकेच शिर्षक होत. एक शून्य शून्य…
शून्य प्रहर हा भारतीय संंसदेेच्या कामाचा एक भाग आहे. भारतीय संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास आणि कामकाजाचा तास यामधील वेळेचा काळ म्हणजे शून्य प्रहर. आता संसदेत सुध्दा एखादा प्रहर शून्य प्रहर म्हणून मान्य असेल तर मला शून्याला मान द्यावाच लागेल.
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” हे गाणं माझ्याच बाबतीत मी म्हंटल तर, “शून्या शून्या मैफिलीत माझ्या” असंच म्हणेल. कारण माझ्या आयुष्याच्या मैफिलीत असलेली शून्याची साथ…
☆ “ग्रेटनेस नेमका कशात आहे?” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी☆
उच्चशिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकऱ्या करणे ग्रेटच आहेत वाद नाही. ती तारेवरची कसरत,… वगैरे सगळे मान्य. पण उच्चशिक्षण घेऊनही बाय चॉइस गृहिणी होणे हेही तितकंच ग्रेट आहे की. पण हा ग्रेटनेस समाजमान्य नाही. एवढे शिकून घरातच बसलीय किंवा माझी नोकरी होती म्हणून 1 bhk मधून 2, bhk मधे तरी आलात, किंवा याउलट यापेक्षा नोकरी केली असती तर बरे झाले असते मी 24 तास घरात आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही माझी,… ही वाक्य सहज ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडायचे आणि पैसा मिळवायचा हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय का असावे.
खरे तर गृहिणी हा 24 hrs job by itself असतो. 24tas विनामूल्य सेवा. नोकरी आणि सेवा यांमध्ये फरक आहेच. नोकरी ही पैसे मिळवण्यासाठी असते. सेवा कोणत्याही अपेक्षेने केली जात नाही.
माझ्या मुलाला मॅगी खायला लागत नाही, त्याला डे केअर मधे ठेवायला लागत नाही, PTA meeting attend करणे एकमेकांवर ढकलावे लागत नाही, आल्या गेल्याला घराला कुलूप बघून परत जावे लागत नाही, यातही greatness आहेच की.
मला माझ्या स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचे काय वाटते की माझ्यामुळे घरातल्याना हवे तेव्हा येणाजण्याचे स्वातंत्र्य मिळते. तरीही त्यांना काय, कुठे, कधी, कसे विचारले की बंधन वाटते ही एक गमतीशीर बाबच आहे.
कदाचित नवऱ्याचा EMI शेअर करत नसेन पण म्हणूनच तो आईवडील, मुले, घर हे माझ्यावर सोपवून बिनधास्त कामावर जातो.
मग women empowerment वाले म्हणतील हे बायकानीच का करायचे, घरची जबाबदारी त्यांनीही घ्यावी.
घ्यावी ना, जरूर घ्यावी. पण दोघांनीही ते बाय चॉइस करावे. आणि बाय चॉइस असेल तर ते आनंदाने करावे. आपल्या त्या आनंदासाठी कुणीतरी राबत असते. कधी नवरा, कधी आई, कधी सासू, तर कधी पैसे देऊन ठेवलेली कामवाली. त्यासाठी आपण किती कृतज्ञ असतो.
आपले घर आपण स्वतः नीटनेटके ठेवणे, स्वच्छता करणे, उत्तम स्वयंपाक करणे, अंगणातली बाग ताजीतवानी ठेवणे, सण वार, देवधर्म, अगदी कपड्यांच्या छान एकसारख्या घड्या घालणं
यातसुद्धा आनंद असतो. घरी बसणाऱ्यांना नोकरी करणारे ग्रेट तर नोकरी करणाऱ्यांना घरी बसणारे नशीबवान वाटतात. नोकरदार स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य, आदर कमावलेले असले तरी गृहिणींनी आनंदाचे क्षण कमावलेले असतात. उदा. आपले मूल मोठे होताना पाहणे, मोकळा वेळ, एडस्टमेंट शिवाय सण समारंभ..
दोन्हीत श्रेष्ठ कनिष्ठ असे काहीच नाही. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट आपण स्वतः निवडली असेल तर त्यातला आनंद टिकवणे ही आपली जबाबदारी असते. खरा ग्रेटनेस त्यात आहे.
☆ ये रे पत्रा… ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
परवा एकदा कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं काम असलं, तरी ते वेळखाऊ आणि जिकीरीचं काम असल्याने नेहमी पुढे पुढेच ढकललं जातं. त्या दिवशी मात्र मी नेटाने बसलेच. कपाट आवरून झालं आणि मी माझी आवडती गोष्ट पुढ्यात घेऊन बसले. ती म्हणजे माझा पत्रांचा बॉक्स. माझी शाळेपासूनची पत्रे मी त्यात जपून ठेवली आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हणून मी कपाट आवरते, तेव्हा तेव्हा मी ती काढून, वेळ असेल तशी वाचत बसते. त्या दिवशी बॉक्स पुढे घेऊन मी फतकल मारून बसलेच.
सर्वात वरचं पत्र होतं सखा कलालांचं. या पत्राचं मला विशेष अप्रूप होतं, ते अशासाठी की अलिकडे अशी पत्रेच येईनाशी झालीत. सध्या टपाल येतं, ते फक्त वर्गणी संपली, किंवा मिळाली, किंवा मग कार्यक्रमाचं निमंत्रण, मिटींगची सूचना यासारखी. हे पत्र तसं नव्हतं. खूप दिवसांनी माझी कथा आवडल्याचं खुषीपत्र होतं ते. ‘समकालीन भारतीय साहित्यामध्ये माझ्या आलेल्या कथेचा हिन्दी अनुवाद वाचून त्यांनी लिहीलं होतं, युनिफॉर्म कथा वाचली. आवडली. मराठी लेखिकेची कथा हिन्दी भाषेत वाचण्याचा आनंद काही औरच असतो. ’ पुढे त्यांनी आवर्जून लिहीलं होतं, ‘तुमच्या नावलौकिकाची कथा अशीच सर्वदूर विस्तारत जावो. ’ असं पत्र कुणाचंही असतं, तरी आनंदच झाला असता, पण सखा कलाल म्हणजे नावाजलेले ग्रामीण कथाकार. त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी माणसाकडून मिळालेली दाद मोलाची वाटली.
हे कौतुक – पत्र घरच्यांना दाखवलं. त्यांच्याबरोबर पुन्हा वाचलं. मैत्रिणींना दाखवलं. तितक्या तितक्या वेळा त्या पत्रवाचनातून आनंद होत गेला. या पत्रामुळे मला झालेल्या आनंदात घरच्यांना, मैत्रिणींना सहभागी करून घेता आलं. फोनचं तसं नाही. बोलणार्याशी प्रत्यक्ष संवाद होतो, हे खरे. पण तो आपल्यापुरता असतो. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही आणि पत्रवाचनासारखा पुन:प्रत्ययाचा आनंदही घेता येत नाही.
अलीकडच्या गतिमान युगात पत्रलेखनाला खूप ओहोटी लागली आहे. घराघरातून दूरध्वनीची यंत्रे बसली. आणि दूरवरून विनाविलंब संबंधितांशी संपर्क साधता येऊ लागला. ते माध्यम सोयीचं वाटलं. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा प्रसारही झाला. आज-काल कथा, कविता, लेख आवडल्याची खुशी पत्रे नाही. खुशी फोन येतात.
मला अगदी लहानपणापासून पत्रलेखनची आवड आहे. त्याला आलेली उत्तरे मी जपून ठेवली आहेत. अगदी शाळेत असल्यापासूनची… ती पत्रे पुन्हा पुन्हा काढून वाचण्याचा मला छंदच आहे.
माझे कथा-लेख ८०-८२पासून छापून येऊ लागले. त्या काळात दूरदर्शन आणि दूरध्वनी घराघरात फारसा बोकाळला नव्हता. अर्थात मनोरंजन आणि माहितीसाठी वाचनावरच भिस्त असायची. त्यावेळी लोक, कथा-लेख वाचत आणि जे आवडेल, ते लेखकाला खुशीपत्र पाठवून कळवत. मला माझ्या लेखनाबद्दल अनेक खुशीपत्रे आलेली आहेत आणि अजूनही ती माझ्याजवळ आहेत. त्यात सर्वात देखणं पत्र आहे व. पु. काळे यांचं. दोनच ओळींचं पत्र. पण मांडणी इतकी सुरेख की पत्र म्हणजे एक रेखाचित्र वाटावं.
औपचारिक खुषीपत्रे सोडली, तर इतर जी नातेवाईक, स्नेहीमंडळींची पत्रे असतात, ती वाचताना, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात. त्यामुळेच अलीकडे पत्रलेखन कमी होत चाललय, नव्हे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे मन विषण्ण होतं. त्या दिवशी सखा कलालांचं असं अचानक आलेलं पत्र वाचलं आणि वळवाच्या पावसासारखं मन शांतवून, सुगंधित करून गेलं. मनात पुन्हा पुन्हा येत राहीलं,
☆ मूल्य आणि किंमत यात फरक आहे का? ☆ श्री हेमंत तांबे☆
मूल्य आणि किंमत यात फरक आहे काय? – तर, हो आहे!
मूल्य म्हणजे किंमत नव्हे, तर जे नैतिकतेशी जोडलं गेलं आहे ते मूल्य. ते सभ्यतेशी पावित्र्याशी जोडलं गेलं आहे आणि जी आर्थिक खर्चाशी निगडित आहे ती किंमत. उदाहरणार्थ — मूल्य व्यवस्था, नैतिक मूल्ये, मूल्याधिष्ठित समाज वगैरे वगैरे. मूल्ल्ये विकत घेता येत नाहीत, तर ती रक्तात म्हणून आचारातच असावी लागतात. मूल्य नागरीकत्वाशी जोडलं गेलं आहे, तर किंमत जाहिरातीशी जोडली गेली आहे. कसं ते पाहूया.
आपण मूल्य म्हणजे किंमत समजू लागलो आणि विचार प्रक्रिया बदलली. विचार बदलले की, आचारात बदल होतो. किंमत दर्जावर आधारित असावी. जेव्हा किंमत जाहिरातीवर ठरवली जाऊ लागली, तेव्हा दिखाऊपणा महत्वाचा झाला. जेव्हा दिखाऊपणा महत्वाचा होतो तेव्हा आदर्श बदलतात. “उस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलीया रंगा? ” असं चोखामेळा म्हणतो व योग्य काय आहे ते सांगायला लागतो!
आनंदी असणे ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे. आनंद आतून तयार होतो, तो Absolute असतो. त्याखालची उतरंड अशी आहे. – आनंदाच्या खालची पातळी सुख आहे तर, त्याखाली समाधान ही अवस्था आहे. समाधाना खाली तृप्ती असते आणि तृप्तीच्या खाली गरज असते. गरजा वाढत जातात तेव्हा विवेक कमी होत जातो. गरजेचं रुपांतर मजेत झालं की, विवेक संपून ऐष सुरू होते. ऐष आणि हाव यांच्या सिमारेषा धुसर असतात. हाव अमर्याद असते, ती विधी विधान पायदळी तुडवून अनैतिक अनैसर्गिक कृत्ये करवून घेते!
आपण सध्या हाव या रकान्यात उभे आहोत. याचे परिणाम पाहा. आपल्या आईवडिलांकडे स्वतःचं घर, शेत जमीन, गरजेला चार पैसे व काही सोनं होतं. ते स्वतंत्र होते, समाधानी होते!
आपण मोटारसायकल ते आयफोन ते कार ते घर कर्जावर घेऊ लागलो, कारण आपण जाहिरातीला बळी पडलो. जाहिरातीनं आपलं स्वातंत्र्य नष्ट झालं आणि आपण बेगडी उच्च दर्जाचे गुलाम झालो. आता आपण आर्थिक व्यवस्थापनाचे धडे, आर्थिक सल्लागारां कडून घेऊ लागलो. यासाठी आपण त्यांना सल्ला किंमत देऊ लागलो. थोडक्यात आपण पैसे देऊन आर्थिक जाळ्यात गुंतत गेलो, परिणामी गुलामगिरी आपला स्थायिभाव झाला!
आता मालमत्ता ही आर्थिक जबाबदारी झाली किंवा आर्थिक दायित्व वाढलं. जेव्हा क्षमतेपेक्षा दायित्व वाढतं, तेव्हा गुलामीच्या बेड्या मजबूत होत जातात. आजची आपली तरूण पिढी या गुलामीच्या बेड्या ठोकून घेण्यात फारच आघाडीवर आहे. याचं मुख्य कारण संदर्भ बदलत गेले. गेल्या दिड हजार वर्षांत श्रम व शेती यांची किंमत कमी होत होत, श्रमाला शिक्षेची किंमत दिली गेली आणि शेती हा जगण्याचा निकृष्ट मार्ग झाला. बरं, हे कुणाकडून निश्चित झालं? तर, “अन्न हे पूर्ण ब्रह्म” आहे असं सांगणाऱ्या विद्वान महाभागां कडून. विद्वान महाभाग कोण? तर, जो श्रम न करता ऐषोआरामाचं जगणं जगतो व तसं जगण्याचे सल्ले पैसे घेऊन देतो तो. खरं म्हणजे विद्वान या शब्दाचा अर्थ असा नाही, पण संदर्भ बदलले की अर्थ बदलतात. हल्ली विद्वान हा शब्द उपरोधानं वापरायला लागल्या पासून तो एवढा स्वस्त व गुळगुळीत झाला की मुर्ख लोक चक्क स्वतःला विद्वान समजू लागले!
विद्वान खरं म्हणजे बुद्धीमान नसून हुशार असू शकतो. पण बव्हंशी हुशारी स्वार्थाकडे जाते, तर बुद्धत्व सभ्यतेकडे जातं. जेव्हा श्रम व बुद्धी यांची फारकत होते, तेव्हा प्रगती ते अधोगती असा प्रवास सुरू झालेला असतो. आपल्या संस्कृतीत असं मानलं जात होतं की, राजात विष्णूचा अंश असतो. हे फक्त मानणं नव्हतं, तर आपल्या अनेक राजांचं चारित्र्य तसं होतं. श्रीरामाला तर आपण विष्णूचा अवतार म्हणतो, म्हणून रामराज्य अजरामर झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सैन्याला व सेनापतीला सक्त ताकीद दिली होती की, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही, कारण शेतकरी श्रम करून जगतो म्हणून, त्याचं जगणं जास्त नैतिकतेशी जोडलेलं असतं!
राजवटी गेल्या आणि सरंजामशाह्या आल्या. सरंजामशाह्या गेल्या आणि चक्क पारतंत्र्य आलं. पारतंत्र्य जाऊन कल्याणकारी लोकशाही कागदावर आली. प्रत्यक्षात तिचं रुपांतर घराणेशाहीत झालं. कागदी कल्याणकारी लोकशाहीत आश्वासनांचा पाऊस पडला आणि स्वार्थी घराणेशाहीचे आपण गुलाम झालो. विवेक तर आपल्यातून हजार वर्षांपूर्वीच गायब झाला होता. जेव्हा स्वार्थाच्या परमोच्च शिखरावर सर्व समाजच पोचतो, तेव्हा त्या समाजाचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक म्हणून काम करतील काय? विवेक हरवलेला समाज मग अशा सरंजामी वृत्तीच्या लोकांचा गुलाम होतो आणि लोकसेवकांच्या टोळ्या तयार होतात. टोळ्यांच्या जाहिराती सुरूच असतात. टोळी प्रमुखाची जाहिरात जेवढी आकर्षक, तेवढे विवेक हीन स्वार्थांध गुलाम आता त्याचे निष्ठावंत म्हणून पुढे येतात आणि समाज अधःपतनाच्या आणखी खालच्या पायरीवर जातो!
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चार पायांवर धावणारा माणूस जेव्हा दोन पायांवर चालायला लागला, तेव्हा ओघानंच तो दूरचं पाहू लागला. (चिंपांझी आणि माणूस काडीमात्र संबंध नाही. डार्विनची थिअरी या बाबतीत पूर्णपणं चुकीची आहे. या विषयावर मी आधी लिहीलं आहे. आणि ते कुणीही खोडून काढलेलं नाही.) जेव्हा तो दूरचं पाहू लागला, तेव्हा त्याला संकटाची चाहूल आधी येऊ लागली. सोबतच आता त्याचे हात मोकळे झाले होते. दूरदृष्टी, वैचारिक क्षमता आणि मोकळ्या हातांनी त्याला निर्मीतीकडे आणलं. अन्नाच्या शोधात भटकंती सोडून, तो हाती नागर धरून शेती करू लागला. नागराचा शोध हा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील महत्वाचा टप्पा. ज्याच्या हाती नागर तो नागरिक, तो सभ्य समाजाचा प्रतिनिधी!
काळ बदलला तशी माणसं बदलली, माणसं बदलली तसे संदर्भ बदलले. संदर्भ बदलले तसे शब्दांचे अर्थ बदलले. बदललेल्या शब्दांचे अर्थ जाहिरातीतून मनावर बिंबवले गेले. आता सर्व नालायक, स्वार्थी चोर, डाकू, लुटेरे, लफंगे, फुकटे, भ्रष्टाचारी – माननीय, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, प्रात:स्मरणीय झाले. चार पुस्तकं वाचलेले म्हणून शिक्षीत – चक्क सुशिक्षित विचारवंत बुद्धीजीवी झाले!
विवेकाची वानवा आणि जाहिरातीच्या माऱ्यानं आपल्याला सन्मार्गावरून वाममार्गावर केव्हा आणलं कळलंच नाही. दुर्जनांच्या सत्काराची चढाओढ सुरू झाली आणि त्यातील आर्थिक उलाढालीनं नेत्रदीपक यश मिळवलं. हे सर्व आपल्याला मूल्य आणि किंमत यातील फरक न कळल्यानं घडलं!
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
१) भक्ती
सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूर पंतांची
हा श्लोक लहानपणापासून आमच्या वडिलांच्या मुखातून आम्ही बहिणी ऐकत आलो आहोत.
पैकी अभंग आणि ओवी हे काव्यरचनेचे दोन प्रकार म्हणजे मराठी वाङ्मयाच्या पाठीचा कणा आहे. मराठी मनाला अभंगाचे वेड आहे आणि ओवीचा लळा आहे. ज्याला ओवी आणि अभंग रचना येते त्याच्यावर परमेश्वराची कृपा असलीच पाहिजे अशी मराठी मनाची धारणा आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया या अभंगात तुका झालासे कळस असे शब्दांकन करून कवीने असे दर्शविले आहे की संत तुकारामांची अभंग रचना सर्वोत्तम आहे. त्यामुळे भागवत संप्रदायाचा संपूर्ण विकास झाला आहे.
या गाथेतून तुकाराम महाराजांचे स्वतःच्या खडतर ऐहिक आणि दिव्य परमार्थिक जीवनाविषयी त्यांची कहाणी ते स्वतःच सांगत आहेत याचा प्रत्यय येतो.
ऐहिक जीवन जगत असताना गाथेतील पहिल्याच अभंगात ते म्हणतात,
समचरण दृष्टी। विटेवरी साजिरी।।
तेथे माझी हरि।वृत्ती राहो॥१॥
*
आणिक नलगे।मायिक पदार्थ।
तेथे माझे आर्त।नको देवा॥२॥
*
ब्रह्मादिक पदे। दुःखाची शिराणी।
तेथे दुश्चित्त झणी ।जडो देसी॥३॥
तुका म्हणे त्याचे ।कळले आम्हा वर्म।
जे जे कर्म धर्म ।नाशवंत॥४॥
*
अर्थात~
१) हे हरी, तुझी सुंदर मुर्ती विटेवर उभी आहे. त्या मुर्तीचे चरणकमल व सर्वांभुतीची दृष्टी सम आहे. अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती स्थिर राहो.
२) हे देवा, मला आणखी कोणत्याही माया पाशात अडकविणारी गोष्ट नको. त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये.
३) ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे. माझे चित्त अशा ठिकाणी लागूच नये.
या तिसऱ्या अभंगात तुकारामाने विठ्ठलाला झणी म्हटले आहे. (आपल्या अत्यंत प्रिय अशा मित्र-मैत्रिणीला किंवा सख्या~ साजणाला झणी, झडकरी असे संबोधण्याची प्रथा आहे. या झणी शब्दावरून तुकारामांच्या मनात पांडुरंगा विषयी किती प्रेम भाव आहे हे दिसून येते.)
४) अशा पदांची चुकून सुद्धा इच्छा माझ्या मनात उत्पन्न होऊ नये. आम्हाला या धर्माकर्माचे वर्म कळले आहे, हे तर सगळे नाशिवंतच आहे.
अत्यंत रसाळ वाणीने या अभंगात तुकाराम महाराज गीतेतील फार मोठे तत्व सांगून जातात. गाथा वाचत असताना क्षणोक्षणी पांडुरंगाची भक्ती हा एकच मुक्तीचा मार्ग आहे याची सामान्य संसारी माणसाला ते जाणीव करून देतात. अति सामान्य लोकांना शास्त्र कळत नाही, परंतु भक्ती करणे सहज कसे शक्य आहे हेच वेळोवेळी त्यांनी आपल्या अभंगांतून समजावले आहे.
मनुष्य व देव यांच्यातील द्वैत भाव संपूर्णपणे नाहीसा करून अनन्य भक्ती करणे हाच या गाथेचा विषय आहे. ते म्हणतात,
आयुष्य वेचे फुकासाठी।।
शाश्वत भक्ती हीच भवसागर तरुन जाण्यासाठी महाशक्ती आहे.
मज सोडवी दातारा।
कर्मा पासून दुस्तरा।।
करीसी अंगीकारा।।
तरी काय माझा भाग।।
जिवीच्या जीवना।
तुका म्हणे नारायणा||
संसार तापाने तुकाराम महाराज पोळले आहेत, म्हणून ते पांडुरंगाला साद घालत आहेत.
संसाराच्या तापे तापलो मी देवा।
करिता या सेवा कुटुंबाची।।
म्हणवुनी तुझे आठवले पाय।
ये बा माझे माय पांडुरंगे।
माय, बाप, बंधू, सखा हे सर्व एका पांडुरंगातच आहेत म्हणून ते म्हणतात,
जेणे घडे नारायणी अंतराय
होतं बाप माय वर्जावी ती।।
देवासाठी जवळच्या नातलगांनाही सोडावे लागले तरी हरकत नाही. प्रल्हादाने आपल्या पित्याचा, बिभीषणाने आपल्या वडील बंधूंचा आणि भरताने आईचा व राज्याचा त्याग केला. एक हरिचरण सर्वधर्म आहेत, त्या चरणांवाचून इतर सर्व उपाय अपायकारक व दुःखमूलकच आहेत.
(पूर्वसूत्र – त्यादिवशी आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते अनपेक्षितपणे बरंच कांही मिळाल्याचं समाधान घेऊन. अर्थात या सगळ्यामागचा कर्ता-करवता ‘तो’च होता! )
या घटनेनंतर माझ्या भावी आयुष्याला एक वेगळीच आनंददायी कलाटणी देणाऱ्या अशा कांही अनपेक्षित घटना लागोपाठ घडत गेल्या की आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळं आठवताना मला जितकं सुखकारक वाटतं तितकंच अनाकलनीयही!
माझ्या आयुष्याला प्रत्येकवेळी असं अनोखं वळण देणाऱ्या त्या अनेक घटनांपैकी लगेचच घडलेल्या एका घटनेला निमित्त ठरला तो मला आलेला एक अनपेक्षित फोन!
मी अकोल्याहून रिलीव्ह झाल्यानंतर इथे पुण्यातील आमच्या झोनल-ऑफिसला चीफ मॅनेजर म्हणून जॉईन झालो ती जुलै २००० मधली गोष्ट. त्यानंतर लगेचच झालेली एम्. डी. व्हिजीट आणि त्यावेळी निर्माण झालेला तो ‘लॉंग पेंडिंग कंप्लेंट’ चा इश्यू हे जे सगळं रामायण घडलं ते मी जॉईन झाल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात. या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या रूपातलं अचानक उद्भवलेलं ते चक्रीवादळ शांत होईपर्यंत अर्धा अधिक ऑगस्ट महिना उलटून गेला होता. त्या दरम्यान साठत गेलेली अनेक महत्त्वाची कामं मी हातावेगळी करत असतानाच एक दिवस अचानक तो फोन आला!
त्याकाळात मोबाईल्स नव्हते. ऑफिसचा लँडलाईन नंबर मी इमर्जन्सीसाठी आवश्यकच होता म्हणून फक्त आमच्या सांगलीतल्या घरी देऊन ठेवलेला होता. शिवाय रोज किंवा एक दिवसाआड घरी माझा संपर्क व्हायचा तो रात्री टेलिफोन बूथवरूनच. त्यामुळे हा माझ्या घरून आलेला फोन असायची शक्यता नव्हतीच. टेलिफोन ऑपरेटरने फोन कॉल कनेक्ट करून देताना ‘नाईक म्हणून एकजण बोलतायत’ असं सांगितलं होतं. त्यातून नेमका उलगडा झालाच नव्हता. फोन अॅटेंड केल्यावर समजलं, फोन भ. रा. नाईक सरांचा होता! मला आश्चर्यच वाटलं. सरांनी मला फोन कां केला असेल? आणि माझं हे पोस्टिंग, इथला नंबर हे सगळं त्यांना समजलं कसं?
सरांचा असा अचानक फोन येणं मला अनपेक्षित होतं. आज या फोनच्या निमित्ताने आम्ही खूप वर्षानंतर पुन्हा संपर्कात आलो होतो. बोलण्यासारखं खूप कांही होतं पण त्या बिझी श्येड्युलमधे मनमोकळ्या गप्पा होणं शक्यच नव्हतं. त्या क्षणीचा माझ्या मनातला हा विचार अलगद टिपून घ्यावा तसं सर म्हणाले,
“तू कामाच्या गडबडीत असणार आहेस याची मला कल्पना आहे पण.. “
“नाही हो सर. अहो ही कामं कधीच संपणारी नाहीत. त्याचं कांही विशेष नाहीय. बोला ना सर तुम्ही. माझं इथलं पोस्टिंग, फोन नंबर सगळं मिळवलंत कुठून? ” मी उत्सुकतेनं विचारलं.
“ते तू भेटशील तेव्हा सांगतो सगळं. मी काल संध्याकाळी राजू/नितिन कडे आलोय. उद्या प्रतिभाकडं मुंबईला गेलो कीं मग लगेच पुण्याला येणं होणार नाहीय. तू सध्या पुण्यातच आहेस असं समजलं तेव्हाच तुला फोन करायचं ठरवलं होतं. आज आॅफीस सुटल्यानंतर तू येऊ शकतील कां राजूकडे? म्हणजे भेट होईल. बघ जमलं तर. “
सरांच्या बोलण्यातून त्यांची भेटण्या-बोलण्याची ओढ प्रकर्षाने जाणवत होती. त्यांची धाकटी मुलगी राजलक्ष्मी आणि जावई नितिन देशपांडे पुण्यातच रहात असत. सर त्यांच्याकडे आले होते. ते दोघेही साहित्यिक. यादृष्टीने आम्ही तिघेही समानधर्मी. माझ्या ऑडिट टेन्युअरमधे माझा पुण्यात जेव्हा सलग मुक्काम असायचा तेव्हा झालेल्या आमच्या मोजक्या भेटी आणि गप्पांनंतर खूप दिवसांनी सरांच्यामुळे आज त्या दोघांनाही पुन्हा भेटण्याचा योग येणार होता.
“सर, मी येईन नक्की. ” मी मनापासून म्हणालो.
अहमदनगर आणि नंतर अकोला या लागोपाठच्या बदल्या आणि तिथले त्या त्या वेळचे व्याप यामुळे त्या मधल्या काळात मला फारसा कुणाशीच संपर्क ठेवता आला नव्हता आणि अर्थातच याला नाईकसरही अपवाद नव्हते. असं असताना मुद्दाम माझा नंबर मिळवून त्यांनी मला फोन करावा याचं मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही! या आधीच्या अगदी सुरूवातीच्या भागांमधे मी सविस्तर वर्णन केलेल्या प्रसंगांपैकी नाईकसरांच्या भेटींच्या संदर्भातले कांही मोजकेच प्रसंग आहेत. तरीही आम्हा दोघांच्या मनातला परस्परांबद्दलचा सद्भाव आणि आमचे ऋणानुबंध यांची कल्पना येण्यासाठी ते पुरेसे आहेत. त्या मोजक्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे त्या त्या प्रत्येकवेळी सर जेव्हा जेव्हा मला भेटले ते अगदी योगायोगाने भेटावेत तसेच पण त्या सगळ्याच भेटी मला खूप कांही देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेल्या असाव्यात तशा अतर्क्यच होत्या माझ्यासाठी! या संदर्भातली खूप वर्षापूर्वीची मी माधवनगर शाखेचा मॅनेजर म्हणून चार्ज घेतलेल्या पहिल्या दिवशीच अचानक झालेली सरांची भेट या अर्थाने प्रातिनिधिक ठरावी अशीच होती! आज अशा सगळ्या घटना प्रसंगांचं मनोमन विश्लेषण करत असताना तर सरांशी झालेल्या सगळ्याच भेटींमधलं हे वेगळेपण मला अधिकच लख्ख जाणवतंय. आणि अर्थातच आज सरांचा फोन आल्यानंतर झालेली आमची भेटही अशीच एक अतिशय मोलाची आठवण म्हणून माझ्या मनात मी कायमची जपून ठेवलीय!
मी ऑफिस सुटल्यावर परस्परच सरांना भेटायला देशपांडे कुटुंबीयांच्या घरी गेलो. त्या सर्वांना भेटणं, मनसोक्त गप्पा सगळंच अपेक्षेप्रमाणे भरपूर आनंददायी होतं. सरांनी नेहमीप्रमाणे माझ्या लेखनप्रवासाबद्दल आपुलकीने चौकशी केली. सरांचं विशेषत: आध्यात्मिक विषयांवरील लेखन ही त्यांची खासियत होती. शिवाय त्यांच्या मनात माझ्या कथा लेखनाबद्दलही विशेष औत्सुक्य आणि कौतुक होतं. त्यांच्या मनात असणारा माझे बाबा आणि आम्ही कुटुंबीय यांच्याबद्दलचा लोभच या कौतुकाला निमित्त ठरत असावा. कारण बँकेतल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामांचे व्याप यालाच माझं प्राधान्य होतं जे मी आवडीने आणि मनापासून करत होतो. त्यामुळेच आवड असूनही फारसं लेखन होत नसल्याची खंतही मला कधी जाणवतही नव्हती. मनातलं कुणाशी तरी मोकळेपणानं बोलून टाकावं असं कधीकधी उत्कटतेनं वाटतं तेव्हाच आपण जवळच्या व्यक्तींसमोर मनापासून ते व्यक्त करतो, तसंच माझं लेखनाच्या बाबतीत होत असे. कितीतरी कथाविषय सुचायचे, मनात ठाण मांडून रहायचे, कधी कधी खूप त्रासही द्यायचे तेव्हाच मुद्दाम वेळ काढून त्याला कथारूप दिलं जायचं. या अर्थाने माझं लेखन स्वान्त सुखायच असायचं. सरांनी प्रत्येकवेळी केलेल्या कौतुकाइतकंच त्यांनी माझ्या कथा आवर्जून वाचून त्यांचं केलेलं सखोल विश्लेषण मला प्रोत्साहित करणारं ठरत असे.
त्यादिवशी सहज गप्पांच्या ओघात सरांनी ‘राजलक्ष्मी आणि नितिनने त्यांची स्वतःची ‘चिरानी प्रकाशन’ संस्था सुरू केल्याचं’ ही आवर्जून सांगितलं. ती तासाभराची भेट आवरती घेत गप्पा संपवून मी सरांना नमस्कार करून सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
तिथून बाहेर पडल्या क्षणापासून घरी पोहोचेपर्यंत सरांच्या संदर्भातल्याच विचार आणि आठवणींनी मनात गर्दी केली होती. पण दुसऱ्या दिवशी नेहमीचं धावतं रुटीन नेहमीच्याच वेगाने पुन्हा सुरू झालं आणि सरांच्या आठवणींचा कप्पा मग आपोआपच बंद झाला.
सरांची अचानक झालेली ही भेट वरवर पहाता योगायोगाने घडलेल्या एखाद्या घटनेसारखी वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. ती भेट लवकरच मला अमूल्य असं कांही देण्यासाठी एक निमित्त ठरणार होती हे मला तेव्हा माहित नव्हतं एवढंच!
☆ “नवीन वर्षाला सामोरे जाताना…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
दर वर्षाप्रमाणे हे वर्ष संपत आले आहे आणि नवीन वर्षाचे द्वार किलकिले होत आहे, ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी मनात एक अनामिक हेलकावे खाणारी भावना निर्माण होते. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी जाग्या होतात, गेल्या बारा महिन्यांत आपण काय मिळवले, काय गमावले, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, कोणत्या राहिल्या, कोणावर रागावलो, कोणावर प्रेम केले, कोणते नातेसंबंध घट्ट झाले आणि कोणत्या नात्यांना तडे गेले, या सगळ्यांचे एक अदृश्य लेखांकन सुरू होते. मन एक विचित्र लेखापाल आहे. ते फक्त आर्थिक व्यवहारांचेच नाही तर भावनिक, नैतिक आणि आत्मिक व्यवहारांचेही हिशेब ठेवते. वर्ष संपतानाच ते ही सारी खाती उघडते आणि आपल्यासमोर ठेवते. मनाने मांडलेला हा लेखाजोखा पाहून धडाक्यात आपण कधी लाजतो, कधी हसतो, कधी खंतावतो, कधी पस्तावतो आणि कधी अभिमानाने छाती फुगावतोही. आत्मपरीक्षण हा एकमेव असा आरसा आहे जो कधी खोटं बोलत नाही; तो कितीही कठोर वाटला तरी त्यात आपली खरी प्रतिमा दिसते आणि हे आत्मपरीक्षणच नवीन वर्षाच्या स्वागताची खरी सुरुवात ठरते. नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे नाही; तर ते मनाला नवा अनुभव घेण्यासाठी, नव्या वाटांचे आमंत्रण स्वीकारण्यासाठी तयार करणारी घटना आहे. बदलाचा स्वीकार करत पुन्हा एकदा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा क्षण आहे.
दर वर्षाच्या अखेरीस जेव्हा कॅलेंडरची शेवटची पानं वाऱ्याने हलू लागतात, तेव्हा मनात एक अतिशय विचित्र पण गोडसं अस्वस्थपणं जन्माला येतं. वर्ष संपतंय, वेळ सरतोय, आपण कुठे येऊन पोहोचलो, आपण काय झालो, आपण कसे बदललो या सगळ्या प्रश्नांची एक शांत, पण अत्यंत खोल लाट मनावर आदळते. संपूर्ण वर्षभर आपण जगतो, धावतो, पडतो, उठतो, स्वप्नं पाहतो, जपत राहतो, चुकत राहतो, शिकत राहतो. पण या अखेरीच्या काही दिवसांत वेळ जणू मंदावतो आणि आपल्याला थांबवून म्हणतो, “स्वतःकडे एकदा नीट पाहिलंस का? ” वर्षभराच्या धांदलीत आपण स्वतःलादेखील भेटत नाही; पण वर्षाच्या या टप्प्यावर मात्र आपल्या अंतरंगाची दारं स्वतःच उघडू लागतात. आत्मपरीक्षण हा शब्द फक्त पुस्तकी नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाचे गाठोडे आहे. या क्षणी आपण नुसते विचार करत नाही; आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने अनुभवत असतो. आपण काय होतो, आपल्याला काय व्हायचं होतं आणि काय झालो, काय व्हायचं आहे, या तीनही काळांचा संगम जणू एखाद्या पवित्र क्षणासारखा सामोरा येतो. हा क्षण हलका नसतो; तो आपल्या अस्तित्वाला खडसावणारा, पण त्याचबरोबर हळुवार स्पर्श करणारा असतो. हा क्षण सांगतो, “तू जगलास, पण आता जगण्याचा अर्थही समजून घे. “
निसर्गाच्या काळाचा प्रवासही याच वेळी आपल्या मनाला अधिक जाणवतो. सूर्याच्या भोवती पृथ्वीचे ३६५ दिवसांचे परिभ्रमण हे फक्त खगोलशास्त्राचे गणित नाही; ते आपल्या जीवनाशी घट्ट जोडलेले एक अविचल सत्य आहे. पृथ्वी एका स्थानी थांबत नाही, मग आपण का थांबावे? पृथ्वीचा प्रवास आपल्याला सांगतो की जीवन प्रवाही असलं पाहिजे… स्थिर नाही, धडपडणारं असलं पाहिजे… गोठलेलं नाही. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते, तशी आपणही दिवसभर आपल्या भावनांभोवती, जबाबदाऱ्यांभोवती, नात्यांभोवती फिरत असतो. पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते, तशी आपल्या आकांक्षा, स्वप्नं, उद्दिष्टं याभोवती आपण परिभ्रमण करत असतो. दिवस-रात्र तयार होणं म्हणजेच आपल्या भावना उचंबळणं आणि पुन्हा शांत होणं. ऋतूंचे फेरबदल हे मनाच्या बदलत्या अवस्थांचेच प्रतिबिंब आहेत. कधी आपल्यात वसंत फुलतो, नवी उमेद उगवते. कधी उन्हाळा तापतो, अडचणी वाढतात. कधी पावसाळा भावनांना भिजवतो, मन ओलाव्यात भिजून शांत होतं आणि कधी हिवाळा जणू मनाला गारठवतो, जिथे आपण स्वतःला झाकून घेतो, शांत राहतो, थंड विचारांतून नवे निर्णय जन्माला घालतो. बदलत्या ऋतूंमध्ये जगणं म्हणजे बदल स्वीकारणं. कालगणना म्हणजे निसर्गाने दिलेली वेळ मोजण्याची पद्धत नव्हे, तर बदलांना समजून घेण्याची कला आहे.
ही कालगणना आदिमानवाने निरीक्षणातून निर्माण केली. सूर्य कुठे उगवतो, कुठे मावळतो, चांदण्यांच्या हालचालींमध्ये काय लय आहे, पावसाचे ढग का येतात, समुद्रात भरती-ओहोटी कोणत्या क्षणी वाढते, या सगळ्या निसर्ग एक नैसर्गिक घटनांचे निरीक्षण करून काळगणनेचा पाया घातला गेला. ही काळाची शिस्त होती आणि माणसाने त्या शिस्तीत स्वतःच्या आयुष्याला वळण लावले. पृथ्वी स्थिर नाही, म्हणून वेळही स्थिर नाही. वेळ वाहते, तसंच जीवनही वाहतं. या वाहण्याच्या प्रवाहात वर्ष संपतं म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या महासागरात पुन्हा एकदा डुंबण्याची संधी मिळते.
या सर्व नैसर्गिक समन्वयाच्या पार्श्वभूमीवर माणसाने संकल्पांची निर्मिती केली. वर्ष संपतं म्हणून काही तरी बदल करायचा, स्वतःला सुधरायचं, काही हवं ते साध्य करायचं ही भावना माणसामध्ये हजारो वर्षांपासून आहे. आजही नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे जणू कोऱ्या पानावर लिहिण्याची संधी. पण हे पान नवीन असलं तरी हातातील अक्षरं तीच असतात. म्हणूनच जास्तीत जास्त संकल्प काही दिवसांत विरतात. संकल्प करण्याचं काम सोपं असतं, पण संकल्प टिकवणं कठीण असतं. कारण संकल्प हे क्षणिक प्रेरणेचे फलित असतात, तर त्यांना टिकवणारी गोष्ट म्हणजे शिस्त. प्रेरणा नाजूक असते; ती येते आणि जाते. शिस्त मात्र कठोर असते; ती येत नाही, ती निर्माण करावी लागते. जणू लहानसा धागा असतो दिसायला बारीक, पण त्याची पकड मजबूत असते. शिस्त म्हणजे स्वतःला सतत म्हणत राहणं. “मी करू शकतो… आणि मला हे करायचंच आहे. ” याचे स्वतःला सतत स्मरण करून देणं. आजच्या धावपळीत, ताणतणावात, मोबाईलच्या व्यसनात, अनियमित झोपेत, गोंधळलेल्या भावनांमध्ये शिस्त राखणं हेच कठीण होतं. म्हणूनच संकल्प टिकत नाहीत. आपले संकल्प हे मोसमी पावसासारखे सातत्य ठेवत नाहीत. ते सातत्याने पडणाऱ्या हलक्या रिमझिम पावसासारखे असले पाहिजेत. ज्यातून हळूहळू सवयी उगवतात, आणि सवयींमधून बदल फुलतो.
आत्मपरीक्षण म्हणजे आपल्यातल्या सत्याचा आपणच सामना करणे. ते आपल्याला सांगतं की, आपण कोठे चुकीचे वागलो, कुठे रागाने उत्तर दिलं, कुठे अहंकाराने नातं दुखावलं, कुठे आळसाने संधी गमावली, कुठे जिद्दीने यश मिळवलं, कुठे प्रेमाने नातं जपलं. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणे केलेला संवाद. हा संवाद कधी कधी वेदनादायक असतो; पण तितकाच मनाला शुद्ध करणाराही असतो. नदीत स्नान केल्यावर जसा ताजेपणा येतो, तसाच आत्मपरीक्षणानंतर विचार शुद्ध होतो. मन जड असलं तरी हलकं वाटू लागतं. आत्मपरीक्षण करताना आपण आपला स्वभाव, आपली चुकांची पद्धत, आपल्यातील कमकुवत बाजू, तसेच आपल्या चांगल्या गुणांचीही जाण ठेवतो. आपण कोणाला दुखावले असेल तर ती खंत आपल्याला जाणवते. कुणाचा उपकार राहिला असेल तर त्याची जाणीव होते. जे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही त्याची हुरहूर राहते पण पुन्हा प्रयत्न करण्याची उमेदही निर्माण होते. ज्या क्षणी आपण स्वतःला स्वीकारतो, त्या क्षणीच नवीन वर्षाची पहिली खरी सुरुवात होते.
खरेतर नवीन वर्षच नाही, तर प्रत्येक दिवस हा नवा असतो. पण वर्षाचा पहिला दिवस हा नवेपणाचे प्रतीक आहे. कारण संपूर्ण जग त्या दिवशी स्वतःला नव्याने परिभाषित करत असतं. जगण्याचा अर्थ पुन्हा शोधायची ही संधी आहे. या संधीचा स्वीकार करताना मनात एक स्वच्छ, निर्मळ आशा जन्माला येते. आशा म्हणजे जगण्यासाठी नव्या दमानं चालण्यासाठी प्रोत्साहित करणारं कारण! आशा नसती तर माणूस पडल्यावर उठला नसता. आशा म्हणजे मनाचा सूर्य. अंधाऱ्या दिवसांत हीच आशा आपल्याला उजेड देते. नवीन वर्ष म्हणजे या आशेचा प्रकाश अधिक तेजोमय होण्याचा क्षण!
या वर्षात आपण अनेक गोष्टी अनुभवल्या… काही चांगल्या, काही वाईट, तर काही कठीण, काही अप्रिय आणि काही सुंदरही. या सर्व अनुभवांकडे आपण कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींचा आनंद घेणं सोपं असतं; पण अप्रिय गोष्टींनी दिलेल्या भानामुळे त्यांचं आभार मानणं हे आत्मपरीक्षणानं दिलेलं धैर्य असतं. दुखापत करणाऱ्या अनुभवांमध्येही ज्ञान असतं. अपयश आपल्याला शिकवतं, फसवणूक आपल्याला सावध करते, तुटलेली नाती आपल्याला मूल्यांची जाणीव करून देतात. या वर्षात कोणीतरी आपल्याला साथ दिली असेल, त्यांचे आभार मानणंही आत्मपरीक्षणाचाच भाग आहे. कधी कधी “धन्यवाद” आणि “माफ करा” या दोन शब्दांत शहाणपण दडलं असतं.
निसर्गाकडून आपण अजून एक मोठा धडा शिकू शकतो. निसर्ग कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी धरून ठेवत नाही. वसंत फुलतो, पण तोही जातो. पावसाळा येतो, पण थांबतो. थंडी कडक होते, पण हळूहळू हवीहवीशी वाटायला लागते तेवढ्यात तीही जाते. आपल्यालादेखील हेच शिकायचं आहे की, राग धरून ठेवायचा नाही, चिडचिड जपून ठेवायची नाही, दु:ख कायम मनात ठेवून कुढायचं नाही. भावना या ऋतूंप्रमाणे येऊ द्यायच्या, पण जड होऊ द्यायच्या नाहीत. नवीन वर्ष म्हणजे जुन्या भावनांचं ओझं हलकं करून पुढे सरकणं! जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही वर्ष बदलताना बदलते. गताकालच्या अनुभवामुळे आपण थोडे अधिक सहनशील होतो, थोडे अधिक समंजस होतो, थोडे अधिक शांत विचाराचे होतो. आपल्याला समजायला लागतं की, माणसं परिपूर्ण नसतात; आपणही नाही. त्यामुळे चुकाही होतात, पण सुधारण्याची इच्छा असेल तर काहीही शक्य आहे. मनात सकारात्मकतेचा ओलावा आला की, नातीही हिरवीगार होऊ लागतात. राग कमी होतो, शब्द सौम्य होतात, हसू सहज येऊ लागतं, आणि मनात शांततेचा झरा वाहू लागतो. ही शांतता म्हणजे नवीन वर्षाची सर्वात मोठी देणगी. यात निसर्गाची शिस्त आपल्याला दररोज शिकवत असते. सूर्योदय एका निश्चित वेळी होतो, सूर्यास्तही निश्चित वेळेला. चंद्राची कला निश्चित क्रमाने बदलते. वृक्ष ठरावीक ऋतूत पालवी धरतात. ही शिस्त पाळणं हा त्याचा स्वभावच आहे. माणसानेही हीच शिस्त रोजच्या जीवनात आणली तर तो केवळ यशस्वीच नाही तर अधिक संतुलित, समाधानी आणि शांत होईल. आरोग्य, आहार, वेळेचं नियोजन, मनाची स्थिरता, नात्यांची काळजी, कामातील सातत्य, ही सगळी शिस्त आपल्याला अंतर्बाह्य मजबूत करते.
या पार्श्वभूमीवर आपण नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण मनात एक स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमळ भावना ठेवू शकतो. स्वतःला माफ करणं, इतरांना माफ करणं, भूतकाळाला स्वच्छ मनानं स्वीकारणं, भविष्याला घाबरून न जाता त्याला धीराने आणि धैर्यानेही सामोरं जाणं, यातच नवीन वर्षाचं खरं सौंदर्य दडलं आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत, त्याच्यासारखं आपल्यालाही वाढता आलं पाहिजे, फुलता आलं पाहिजे. जगण्यासाठी आशा हवी, पण आशेला साथ देण्यासाठी आत्मविश्वास हवा, आत्मविश्वासाला दिशा देण्यासाठी संकल्प हवा आणि संकल्पाला टिकवण्यासाठी शिस्त हवी. या चारही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे होय.
या सर्व भावनांनी नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती, आरोग्य, आनंद, प्रगती आणि समाधान घेऊन येवो. तुमच्या आयुष्यात निरंतर नवे विचार उगवोत, नवी स्वप्नं फुलोत, नवी ध्येयं ठरवून त्यांना पूर्ण करण्याची जिद्दही वाढत राहो. पृथ्वीप्रमाणे गतिमानता, सूर्याप्रमाणे तेज, चंद्राप्रमाणे शांती आणि ऋतूंसारखी बदल स्वीकारण्याची वृत्ती तुमच्या प्रत्येक दिवसात दुग्गोचार होत राहो. तुमच्या मनातील संकल्प केवळ शब्द राहू नयेत, तर कृती बनावेत; कृती सवयींत रुपांतरीत व्हाव्यात आणि त्या सवयीनी तुमचे जीवन अधिक सुंदर व्हावे. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात उजेड, उमेद, उर्जा आणि सौंदर्य घेऊन येवो—हीच मनःपूर्वक सदिच्छा.
☆ विवाह : ‘संस्कार’ की इव्हेंट मॅनेजमेंट?☆ श्री विश्वास देशपांडे ☆
एका लग्नसमारंभाला उपस्थित राहायचं म्हणून गेलो होतो. मोठया घरचं लग्न होतं. वधू वर उच्चशिक्षित होते. समाजातील उच्चभ्रू मंडळी कार्यक्रमासाठी हजर होती. होमाचा विधी सुरु होता. वधुवर होमाला प्रदक्षिणा करत होते. गुरुजींचा मंत्रघोष सुरु होता. दोन फोटोग्राफर एक फोटो काढणारा आणि दुसरा व्हिडीओ शूटिंग करणारा यांची धावपळ सुरु होती. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट चालू होता. होमाचा विधी आपल्याला कॅमेऱ्यात कशा प्रकारे बंदिस्त करता येईल याची धडपड चालली होती. त्यामुळे मध्येच गुरुजींना थांबावे लागत होते. त्याबद्दलची नाराजी गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण सगळ्यांपुढे गुरुजी अगतिक झालेले दिसत होते.
फोटोग्राफर्स वधूवरांना विविध सूचना देत होते. ” थोडं उजवीकडे बघा. मान सरळ आणि समोर. थोडं हसा. इ. ” वधूवरांना देखील त्या विधीपेक्षा त्या चाललेल्या चित्रीकरणात जास्त आनंद दिसत होता. माझ्या मनात आलं की या सगळ्या आधुनिकीकरणाच्या गडबडीत आपण आपल्या चांगल्या विधीपरंपरांची वाट लावली, नाही का? आपल्या हिंदू संस्कृतीत ज्यांना सोळा संस्कार म्हटलं जातं त्यातील एक संस्कार म्हणजे विवाह. तो एक सुंदर सोहळा आहे. सोहळा म्हटलं की कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येणं, आनंदाने त्यात सहभाग घेणं या सगळ्या गोष्टी आल्या. हा भावनांचा उत्सव असतो. अशा सोहळ्यात पूर्वी गाणी, गप्पा गोष्टी, जेवताना म्हणायचे श्लोक, नाव घेणे यासारख्या प्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढत होती. मुहूर्ताचे गहू दळले जात. घरातील गृहिणींची त्यासाठी होणारी लगबग, त्यातील पारंपारिक गाणी या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाला एक वेगळा रंग आणत. पण आता हे सगळे प्रकार जणू कालबाह्य झाल्यासारखे दिसतात. त्यासाठी कोणाला वेळही नाही आणि त्यांची माहितीही नसते.
विवाह सोहळा स्मरणीय जरूर झाला पाहिजे. त्यासाठी उत्तम नियोजन जरूर झाले पाहिजे. त्यातील आठवणी देखील जपून ठेवल्याच पाहिजेत यात दुमत नाही. पण कुठेतरी लग्नविधी आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ घालता आला पाहिजे. पण हल्ली विधी कमी आणि उपचार जास्त असा प्रकार होत चालला आहे.
लग्नसोहळा असो की अन्य कोणताही कार्यक्रम, हल्ली त्याला दिखाऊपणाचे स्वरूप जास्त येऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टी सोहळा कमी आणि इव्हेंट जास्त असा प्रकार होतो आहे. इव्हेंट मॅनेजमेंट या नावाचा स्वतंत्र प्रकारच हल्ली अस्तित्वात आला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे लग्न समारंभासाठी खर्चही वाढला आहे. मेहंदी, वधूवरांचे आणि अन्य जवळच्या नातेवाईकांचे मेकअप, थीम सॉंग्स या सगळ्या गोष्टींवर अवाढव्य खर्च होतो आहे.
पूर्वी घरातील लग्नसमारंभ वा अन्य कोणताही कार्यक्रम असला तर घरातील किंवा नात्यातील लोक एकत्र येऊन त्या कार्यक्रमाची जबाबदारी वाटून घेत असत. हल्ली कोणालाच वेळ नसतो. त्यामुळे एका दृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या गोष्टी या काळाची गरज आहेतच. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. सोहळा अधिक आकर्षक आणि देखणा होतो. इंग्रजी शब्द वापरायचा तर ‘ कॅची ‘ होतो. पण त्यातील नैसर्गिकपणा, गाभा कुठेतरी हरवून जातो.
अनेक नवीन गोष्टी या लग्नसोहळ्यासारख्या पारंपरिक कार्यक्रमात शिरल्या आहेत. त्या चांगल्या की वाईट हे जाणकारांनी ठरवावे. अशा गोष्टींमध्ये प्री वेडिंग शूट, वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये फोटो काढणे, लग्नाच्या आधी वधूवरांनी एकत्र येऊन डान्स करणे, ते डान्स बसवण्यासाठी आधी सराव करणे, त्यासाठी अगदी कोरिओग्राफरची मदत घेणे या गोष्टी होत असतात. एका लग्न समारंभात तर एका बाजूला विधी सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या पडद्यावर वधू-वरांचे प्री वेडिंग शूट दाखवण्यात येत होते. जमलेली सगळी मंडळी हे प्री वेडिंग शूट पाहण्यात मग्न होती. लग्नाचे जे विधी सुरू होते, त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. फक्त वधू वर, त्यांचे आई-वडील आणि गुरुजी एवढेच त्या सोहळ्यात मग्न होते. मला हा सगळा प्रकार विचित्र वाटला.
वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने वधुवर लग्नापूर्वीच अनेकदा एकत्र येत असतात. त्यातून कदाचित एकमेकांना अधिक जाणून घेणे, आवडीनिवडी समजून घेणे यासारख्या गोष्टींनाही मदत होत असावी. पण लग्नानंतर एकमेकांच्या सहवासाची जी उत्सुकता असते ती नक्कीच हरवत असावी. कसा असेल माझा जीवनसाथी? तो मला समजून घेईल का? अशा अनेक गोष्टींची उत्सुकता असते. मधुचंद्राचा रोमांचक कालावधी असतो परंतु या सगळ्या गोष्टी या आधुनिकतेच्या गडबडीत हरवत असाव्यात.
हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले एक छान गाणे आहे.
लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
किती सुंदर ओळी! या गोष्टी जेव्हा दोघे अनोळखी असतात आणि एकमेकांच्या सहवासासाठी उत्सुक असतात तेव्हाच त्यातील गोडी अधिक असेल हे सुज्ञास सांगणे न लगे.
जे जे नवीन आणि आधुनिक तेथे सगळेच वाईट आहे असे नाही काळानुसार काही गोष्टी बदलायला हव्यातच आपणही जुन्या गोष्टी टाकून देऊन नवीन गोष्टींचा स्वीकार करायला हवा परंतु जुन्या गोष्टी सगळ्याच टाकाऊ नसतात किंवा सगळ्याच नवीन गोष्टी चांगल्या असतात असेही नाही म्हणून दोघांचा सुवर्णांमध्ये साधता आला पाहिजे हा जेव्हा होईल तेव्हा आपले जीवन अधिक, आनंदी, सुखी आणि समाधानी होईल. आपल्या मुलांच्या लग्नात खर्चाचे पारडे जड असावे की संस्कारांचा भाग महत्वाचा असावा हे संबंधितांनी विचारपूर्वक ठरवणे आवश्यक आहे.
रोज व्यायाम करताना योग गुरु यांच्या तोंडून काही शब्द वारंवार ऐकायला मिळतात. त्यांचे ऐकल्याने फायदे होतात हेही अनुभवाने लक्षात आले आहे. आणि ते वेळोवेळी त्या बद्दल माहिती सांगत असतात. तसेच एक शब्द कायम त्यांच्या तोंडी असतो. तो म्हणजे तीस सेकंद. “थर्टी सेकंड होल्ड करेंगे”
योगासनांमध्ये कोणत्याही स्थितीत ३० सेकंद स्थिर राहण्याला विशेष महत्त्व आहे. सुरुवातीला आपण फक्त हालचाल करतो, पण जेव्हा आपण त्या स्थितीत थांबतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचे फायदे शरीराला मिळायला सुरुवात होते.
३० सेकंद स्थिर राहण्याचे प्रमुख फायदे
१. स्नायूंची लवचिकता वाढते (Flexibility)
जेव्हा आपण ३० सेकंद एखादे आसन धरून ठेवतो, तेव्हा स्नायूंना ताणले जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होऊन शरीर लवचिक बनते.
२. रक्ताभिसरण सुधारते
विशिष्ट स्थितीत थांबल्यामुळे शरीराच्या ठराविक भागावर दाब येतो किंवा तिथे रक्तपुरवठा अधिक होतो.
३० सेकंदांच्या काळानंतर जेव्हा आपण आसन सोडतो, तेव्हा त्या भागात ताजी आणि ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाह वाढतो.
३. मानसिक स्थिरता आणि संयम प्राप्त होतो.
योगासन म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही. एकाच स्थितीत ३० सेकंद स्थिर राहिल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि चंचलता कमी होते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
४. स्नायूंची ताकद
स्वतःच्या शरीराचे वजन एका विशिष्ट स्थितीत ३० सेकंद पेलल्यामुळे स्नायूंची सहनशक्ती (Endurance) आणि ताकद वाढते.
५. श्वसनावर नियंत्रण
आसनात स्थिर असताना संथ आणि दीर्घ श्वसन करणे सोपे जाते. ३० सेकंदांच्या या काळात फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचतो.
तीस सेकंद ही खरी सुरुवात असते. ती सवय लागली की पुढे वेळ वाढवता येते. हे तीस सेकंद फक्त व्यायामासाठी महत्वाचे असतातच पण इतर बऱ्याच ठिकाणी महत्वाचे असतात. जसे….
१. जीव वाचवण्यासाठी (Life-Saving Moments)
अनेकदा अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत फक्त ३० सेकंदांचा उशीर किंवा तत्परता जीव वाचवू शकते.
रस्ता ओलांडताना घेतलेला ३० सेकंदांचा निर्णय.
हृदयविकाराचा झटका वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत मिळणारी तातडीची मदत.
२. संधीचे सोने करण्यासाठी
व्यावसायिक जगात ‘एलेव्हेटर पिच’ संकल्पना प्रसिद्ध आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा गुंतवणूकदाराला भेटण्याची संधी मिळाली, तर विचार मांडण्यासाठी फक्त ३० सेकंद असतात. हे ३० सेकंद भविष्य बदलू शकतात.
३. पहिला प्रभाव (First Impression)
मानसशास्त्रांनुसार, आपण जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याबद्दलचे मत पहिल्या ३० सेकंदांतच बनवते. पेहराव, बोलण्याची पद्धत आणि आत्मविश्वास या ३० सेकंदांत समोरच्यावर छाप पाडतो.
४. खेळातील महत्त्व
धावण्याच्या शर्यतीत किंवा फुटबॉल, कबड्डी सारख्या खेळांत शेवटचे ३० सेकंद पूर्ण खेळाचा निकाल बदलू शकतात. हारलेली टीम या काळात जिंकू शकते किंवा जिंकणारी टीम पराभूत होऊ शकते.
५. डिजिटल युग आणि लक्ष (Attention Span)
आजच्या सोशल मीडियाच्या काळात (Reels, Shorts) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त ३० सेकंद मिळतात. जर आशय पहिल्या ३० सेकंदांत आवडला नाही, तर लोक तो सोडून देतात.
ध्यानासाठी ३० सेकंद खूप लहान वाटू शकतात. पण मनाला शांत करण्यासाठी, भरकटलेल्या मनाला वर्तमानात आणण्यासाठी ३० सेकंद अत्यंत महत्वाचे असतात.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात ३० सेकंदांचे ध्यान ‘माइंडफुलनेस ब्रेक’ म्हणून काम करते.
ध्यानात तीस सेकंदांचे महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल:
१. त्वरित तणावमुक्ती मिळते.
जेव्हा आपण खूप कामात असतो किंवा चिंतेत असतो, तेव्हा फक्त ३० सेकंद डोळे मिटून दीर्घ श्वास घेतल्यास शरीरातील ‘कोर्टिसोल’ (Stress Hormone) पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे मज्जासंस्था शांत होते.
२. मेंदूला ‘रिसेट’ करण्याची संधी मिळते.
संगणक हँग झाल्यावर जसे आपण तो रिस्टार्ट करतो, तसेच ३० सेकंदांचे ध्यान मनासाठी ‘Reset Button’ सारखे काम करते. हे मनातील विचारांचा कोलाहल थांबवून नवीन ऊर्जेने काम करण्यास तयार करते.
३. एकाग्रता वाढते.
एका कामावरून दुसऱ्या कामाकडे वळताना जर ३० सेकंद शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केले, तर आपली एकाग्रता वाढते. यामुळे कामात चुका होण्याचे प्रमाण कमी होते.
४. भावनिक स्थिरता
एखाद्या गोष्टीचा राग आला असेल किंवा खूप अस्वस्थ वाटत असेल, तर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी ३० सेकंद थांबून ध्यान केल्याने आपण अधिक समंजसपणे वागू शकतो. यालाच ‘The 30-Second Rule’ असेही म्हणतात.
५. शिस्त आणि सवय
ज्यांना १०-२० मिनिटे ध्यान करणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी ३० सेकंद ही एक उत्तम सुरुवात आहे. ही लहान सुरुवातच पुढे जाऊन मोठ्या ध्यानाच्या सवयीमध्ये रूपांतरित होते.
३० सेकंदांचे ध्यान कसे करावे?
आपण जे काही करत आहोत ते क्षणभर थांबवावे.
श्वास घ्यावा, डोळे मिटावे, आणि एक खोल श्वास घ्यावा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या हालचालीवर लक्ष द्यावे.
शरीरात कुठे ताण जाणवत असेल तर तो सैल सोडावा.
असे ३० सेकंद करावे. मन बरेच शांत झालेले असते. डोळे उघडावे आणि शांत मनाने आपल्या कामाला सुरुवात करावी.
”ध्यान म्हणजे तासनतास बसणे नव्हे, तर प्रत्येक क्षणी जागरूक असणे होय.”
आपण तासनतास वाया घालवतो, पण जेव्हा आपण या ३० सेकंदांची किंमत समजून घेतो, तेव्हा आपण वेळेचे योग्य नियोजन करायला शिकतो. “छोटी छोटी पावलेच मोठा प्रवास घडवतात,” तसेच हे छोटे छोटे सेकंदच आपले आयुष्य घडवतात. असे हे महत्वाचे तीस सेकंद, “वेळ कोणासाठी थांबत नाही ” आणि छोट्या काळाचा सदुपयोग कसा करावा हे शिकवतात.
याचे महत्व आपल्यापूर्वीच्या अनुभवी लोकांना नक्कीच समजले असणार. म्हणून ते आजही काही कृती करायला सांगतात. जसे – ताण, चिडचिड झाल्यावर सांगतात सावकाश पाणी पी, अंक मोज, उलटे अंक मोज, शांत बसा, तीन दीर्घ श्वास घ्या, भरकटलेले मन जागेवर आणण्यासाठी हलकेच थोपटणे, चुटकी वाजवणे या सारख्या तीस सेकंदाच्या महत्वाच्या कृती सांगत असतात. अशा अनेक कृती आहेत ज्या तीस सेकंदाचे महत्व सांगतात. आपणही या तीस सेकंदाच्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ या.