मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

निसर्गातील विविधता, आकर्षकता, चकित करणारे बदल जे क्षणोक्षणी, दिवसा रात्री, ऋतुनुसार, भौगोलिक परिस्थिती नुसार वेगवेगळे व बऱ्याचदा अनपेक्षित असतात, नेत्रसुखद असतात, मानवाच्या बुद्धीच्या, शक्तीच्या पलिकडचे असतात. हे बदल अनुभवताना साहजिकच ही निसर्ग निर्मिती करणाऱ्या शक्ती पुढे आपण नतमस्तक होतो. ‘हे असं का’ हा प्रश्न आपल्याला पडतो तसा तो टागोरांना देखील पडतो. पण आपण त्याची शास्त्रीय, भौगोलिक कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो पण टागोरांचे हळुवार कवी मन वेगळाच विचार करतं ज्याने आपण चकित होतो.

हे सगळं नेमकं असंच का आणि कसं? म्हणजे फुलात इतके रंग का? फुलांमध्ये मकरंद का? फळात गोड रस का? समुद्राच्या लाटांना गाज का? पानांना सळसळ का? याची उत्तरं त्यांना लहान मुलांकडे पाहिल्यावर मिळतात. या सगळ्या गोष्टींचा संबंध लहान मुलांच्या आनंदाशी असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो म्हणजे अचानकच हा विचार त्यांच्या मनात चमकून जातो आणि मग त्यांच्या कवी मनाला त्यातली सगळी संगती उलगडत जाते. आणि या कविता वाचल्यावर आपल्याला पूर्णपणे पटतं की, “जे न देखे रवी, ते देखे कवी”

ते म्हणतात, रंगीत वस्तू बघितली की मुलांना खूप आनंद होतो म्हणून देवानं निसर्गात रंग निर्माण केले. गोड खाऊ मिळाला की मुलं खुश होतात म्हणून त्यानं मकरंद निर्माण केला, फळांमध्ये निरनिराळे रस निर्माण केले. मुलांना गाणी खूप आवडतात त्यावर ती आपसुकच नृत्य करायला लागतात. त्यासाठीच देवानं सूर निर्माण केले, पानांच्या सळसळीतून, समुद्राच्या लाटांमधून! निसर्गाची कोमलता आणि लहान बाळाची कोमलता यात काही नातं असलं पाहिजे असं टागोरांना वाटतं.

त्यांना असेही कांहीं प्रश्न पडतात की लहान मुलाच्या पापणीत नीज कुठून येत असेल? किंवा झोपेत बाळ कां हसत असेल? बाळाच्या अंगाची मऊ, लुसलुशीत, टवटवी कशी निर्माण होत असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे टागोरांना निसर्गात सापडतात. याबाबतीत तर त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. आपण अशा कल्पना करूच शकणार नाही.

रानात, काजव्याच्या प्रकाशात, लाजाळूच्या दोन कळ्या डुलत असतात; तिथून नीज येते आणि बाळाची पापणी चुंबून जाते.

तसंच शरदामध्ये चंद्राचे किरण पावसाळी मेघांना स्पर्श करतात आणि त्यामुळे दंव पडतं. या दंवाच्या वर्षावामध्ये उषा नहाते. त्यावेळी तिला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात बाळाचं झोपेतलं हास्य जन्म घेतं. आणि मग उषा काय करते, ते हास्य अलगद बाळाच्या गालावर ठेवते.

मऊ लुसलुशी मात्र त्यांच्या मते आईच्या तारुण्यात, तिच्या हृदयातल्या हळुवार प्रेमातूनच निर्माण होते आणि ती बाळाला गर्भातच मिळते. आहेत ना कधी न ऐकलेल्या कल्पना!

टागोरांचं मन किती संवेदनशील असेल की, त्यांना इतक्या नाजूक हळुवार कल्पना सुचाव्यात!

अशा निसर्गाची स्तुती करणं, भक्ती करणं, त्याच्यात एकरूप होऊन जाणं, हे सुद्धा सृजनाच्या निर्मिती मागचं अध्यात्मच आहे. यातून एक जाणवतं ना की, परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणिव होण्यासाठी कुठल्याही अध्यात्मिक अनुभवाची गरज नाही फक्त या लहान मुलांमध्ये समरस झालात की तुम्हाला त्यांच्यातच देव दिसतो, निसर्ग दिसतो. आणि आपण त्या निर्मात्यासमोर नतमस्तक होतो.

—–

गीत : ६१

THE sleep that flits on baby’s eyes does anybody know from where it comes? Yes,

there is a rumour that it has its dwelling where, in the fairy village among shadows of the 

forest dimly lit with glow-worms, there hang two timid buds of enchantment. From there it comes to kiss baby’s eyes.

The smile that flickers on baby’s lips when he sleeps does anybody know where it was born? Yes, there is a rumour that a young pale beam of a crescent moon touched the edge of a vanishing autumn cloud, and there the smile was first born in the dream of 

a dew-washed morning the smile that flickers on baby’s lips when he sleeps.

The sweet, soft freshness that blooms on baby’s limbs does anybody know where it was hidden so long? Yes, when the mother was a young girl it lay pervading her heart in 

tender and silent mystery of love the sweet, soft freshness that has bloomed on 

baby’s limbs.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६१

*

तान्हुल्याच्या पापणीत नीज,

कुठून येते बाई?

*

रानाच्या सावली, परीच्या त्या देशी,

लुकलूकणाऱ्या काजव्या प्रकाशी,

लाजाळूच्या दोन कळ्या डुलती गं

नीज येई तेथून चुंबाया पापणी गं॥

*

ओठांवर हसू, झोपेत पिल्लूच्या,

कुठून येते बाई?

*

शारदी मेघा, रश्मी चंद्राची स्पर्शी

उषाही नाहते, त्या दहिवर वर्षी

झोपेतले हास्य, जन्मे स्वप्नी तिच्या

अलगद ठेवी, ते गाली सानुल्याच्या॥

*

गात्रात बाळाच्या, मऊलुस टवटवी, कुठून येते बाई?

*

मखमाली तारुण्या, प्रवेशते आई

हळुवार प्रीती, गात्रे भारून जाई

तीच मिळे बाळा, गर्भात असता

धन्य होते आई, रूप देखणे पाहता॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

गीत : ६२

WHEN I bring to you coloured toys, my child, I understand why there is such a play of colours on clouds, on water, and why flowers are painted in tints when I give coloured 

toys to you, my child.

When I sing to make you dance I truly know why there is music in leaves, and why waves send their chorus of voices to the heart of the listening earth when I sing to make you dance.

When I bring sweet things to your greedy hands I know why there is honey in the cup of 

the flower and why fruits are secretly filled with sweet juice when I bring sweet things to your greedy hands.

When I kiss your face to make you smile, my darling, I surely understand what the 

pleasure is that streams from the sky in morning light, and what delight that is which the 

summer breeze brings to my body when I kiss you to make you smile.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६२

*

नभांत रंगबावरे इंद्रधनू कां?

फुलांत इतुक्या रंगछटा कां?

*

रंगीत खेळणी तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

पर्णांची सळसळ गीत गात कां?

लाटांची गाज धरणी ऐकत कां?

*

मम गीतावर तव नृत्य पाहतो,

तेंव्हा कळते!

*

मधुघट भरले पुष्पहृदी कां?

फळात मधुरस भरे कोण कां?

*

गोड खाऊ तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

प्रभात किरणे सुखवित जग कां?

वातझुळुक शांतवित तनमन कां?

*

तव भाल चुंबितो अन् तू हसतो,

तेंव्हा कळते!

*

निसर्ग निर्मिता जे सुख हरीला

तेच लाडक्या मिळते मजला!

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ६३

THOU hast made me known to friends whom I knew not. Thou hast given me seats in 

homes not my own. Thou hast brought the distant near and made a brother of the stranger.

I am uneasy at heart when I have to leave my accustomed shelter; I forget that there abides the old in the new, and that there also thou abidest.

Through birth and death, in this world or in others, wherever thou leadest me it is thou, the same, the one companion of my endless life who ever linkest my heart with bonds of joy to the unfamiliar.

When one knows thee, then alien there is none, then no door is shut. Oh, grant me my prayer that I may never lose the bliss of the touch of the one in the play of the many.

—–

मराठी भावानुवाद : गीत:६३

*

अपरिचित जागी जन्मा घालिसी 

अनोळखींना भाऊ बनविसी

*

बेचैन मन हे तिथेच गुंती

सोडूनि जाता नाती गोती

*

नव्यात जुनेही सारे वसते

अस्तित्व तुझे सोबत असते

*

अनंत जन्म साथ तू देशी

अन् प्रेमबंध तू नवे निर्मिशी

*

जे तुला जाणती, परके नसती

त्यांच्यासाठी सारी दारे खुलती

*

एकच वर दे, जाईन जेथे

अनेकात तू एकचि तेथे

*

– क्रमशः भाग २१..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

(भगवान बुद्ध जयंती विशेष)

प्रस्तावना

उद्या १ मे २०२६, शुक्रवार — वैशाख पौर्णिमा. हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्णतेचा नाही, तर मानवजातीच्या अंतःकरणात प्रकटलेल्या अपूर्व प्रकाशाचा आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले, अशी श्रद्धा जगभरच्या बौद्ध परंपरेत रूजलेली आहे . म्हणूनच बुद्ध पौर्णिमा ही करुणा, प्रज्ञा आणि निर्वैरतेचा पवित्र उत्सव मानली जाते.

लुंबिनीचा दिव्य जन्म

इ. स. पू. ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी वनात क्षत्रिय शाक्य वंशात सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्मलेल्या या बालकाच्या ठायी पुढे जगाला जागृत करणारा बुद्ध पुरुष दडलेला होता. राजसुख, वैभव, सौंदर्य आणि स्नेह यांच्या कुशीत वाढलेला हा राजपुत्र जन्मतःच विलक्षण तेजस्वी होता.

दुःखदर्शनाची जागृती

संसाराच्या राजमार्गावरून फिरताना सिद्धार्थांच्या दृष्टीस चार दृश्ये पडली — जर्जर वृद्ध, रोगाने गांजलेला मनुष्य, मृतदेह आणि संन्यासी. त्या चार दृश्यांनी त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. सुखाच्या मोहर्‍यांआड दडलेले दुःख प्रथमच स्पष्ट झाले. राजवैभवाचा त्याग करून वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला; हाच त्यांचा महाभिनिष्क्रमणाचा क्षण.

साधनेचा पथ आणि बुद्धत्व

कठोर तपश्चर्या, उपवास, मौन आणि ध्यान यांच्या वणव्यातून त्यांनी सत्याचा शोध घेतला. पण अतिरेकी काया-क्लेशाने मुक्ती मिळत नाही, हे उमगल्यावर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बोधगया येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या छायेत ध्यानस्थ होत त्यांनी अंतःप्रकाशाचा अनुभव घेतला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. त्या क्षणी मानवी वेदनेचा अर्थही उलगडला आणि तिच्या निरासाचा मार्गही दिसला.

धम्मचक्राचा पहिला सूर्य

ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ येथे पाच भिक्षूंना पहिले प्रवचन दिले. तो केवळ उपदेश नव्हता; तो धम्मचक्राचा पहिला फिरता प्रकाश होता. त्या प्रवचनातून संसार, दुःख, कारण, निरोध आणि मार्ग यांचा उलगडा झाला. पुढे बुद्धांचा सारा धम्मप्रवास चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाभोवती फुलत गेला.

बुद्धांचे करुणामय व्यक्तिमत्त्व

बुद्धांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रभावी नव्हते, तर अंतर्मनाला शांती देणारे होते. त्यांची मुद्रा स्थिर, त्यांची वाणी गंभीर, त्यांचे नेत्र करुणेने ओथंबलेले आणि त्यांचा सहवास मनात नवी प्रसन्नता निर्माण करणारा होता. ते जिथे जात, तिथे भय निवळे, अहंकार मावळे आणि मनात प्रशांत तेज उमटे. त्यांच्यातील सौंदर्य हे देहाचे नसून चेतनेचे होते; म्हणूनच त्यांचा प्रभाव काळाच्या पलीकडे पोहोचला.

धम्माचा गाभा

बुद्धांचा संदेश अत्यंत साधा, पण अत्यंत गहिरा होता — दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे, आणि त्या निरोधाचा मार्गही आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी — या सर्वांतून त्यांच्या धम्माची उंची आणि शिस्त प्रकट होते.

संघ, परिषदा आणि परंपरा

बुद्धधर्माचा पाया संघशिस्तीवर उभा होता. प्रवेश, आचरण, उपसंपदा, पवज्जा, पत्तिमोक्ख, पवारणा आणि गणतंत्रात्मक संघव्यवस्था यांमधून हा धम्म अधिक संघटित, अधिक शिस्तबद्ध होत गेला. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर धम्मपरिषदांनी त्यांच्या शिकवणीचे संकलन केले. पुढे हीनयान, महायान आणि वज्रयान हे प्रवाह निर्माण झाले; त्रिरत्न — बुद्ध, धम्म, संघ — हीच श्रद्धेची अमूल्य त्रयी राहिली.

महानिर्वाणाचा क्षण

कुशीनगर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी शिष्यमंडळींना धम्मावर दृढ राहण्याचा उपदेश दिला. त्यांच्या निधनातही विलक्षण शांतता होती; जणू एक दीपक विझला नाही, तर अधिक व्यापक प्रकाशात विलीन झाला.

अमर वारसा

बुद्धांनी दिलेला संदेश आजही मानवतेला नवा मार्ग दाखवतो. क्रोध, लोभ, मोह, द्वेष यांच्या धुक्यात अडलेल्या जगाला त्यांचे जीवन चिरंतन दिशा देत राहते. त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग, करुणेची भाषा आणि अंतःशुद्धीचा आग्रह — हेच त्यांच्या जीवनाचे खरे वैभव आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे त्या दिव्य जीवनाचा, त्या करुणामय दृष्टिचा आणि त्या जागृत प्रकाशाचा उत्सव.

बुद्धं सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि।
संघं सरणं गच्छामि।

🙏🙏🙏

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे क्र. ७४ आणि ७५ – –

वादो नावलम्ब्य: ||७४||”

बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च||७५||

अर्थ : भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते. (म्हणून भक्ताने वादापासून दूर रहावे)

विवेचनजगाच्या प्रारंभापासून सांगणारे व ऐकणारे कोट्यावधी होऊन गेले आहेत, पण वाद विवाद काही मिटले नाहीत. पण ज्या वादांत संशयाचे ढग व वादाची वादळे एकामागे एक अशी असंख्य उठत असतात ते वाद निव्वळ दंभ वाढवितात. म्हणून भक्ताने त्यांच्या मागे न लागता सत्संगातील संवादसुख तेवढे घेत जावे.

सर्व संत सांगतात की वाद टाळावा. जर सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर वाद होण्याची परिस्थिती निर्माण होणारच नाही याकडे लक्ष द्यावे. “व्यक्ती तितक्या प्रकृती” तसेच “जितकी मने तितके विचार” हे सूत्र ध्यानी ठेवून तसे वागायला शिकावे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या तिथल्या तिथे सोडून द्याव्या, तसेच पूर्व घटना आठवून त्याचा शोक करू नये. साधना करताना वाद विवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत राहावे, योग्यवेळी सद्गुरू खात्रीने कृपा करतात, हा विश्वास बाळगावा.

आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे वागतो? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात? हे सर्व पाहून देवाला आपल्या घरात राहावेसे वाटेल का? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर, आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.

आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी.  किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. “बोले तैसा चाले…. ” असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.

“तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं।

वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः॥

वादे वादे जायते तत्त्वबोधः।

बोधे बोधे भासते चन्द्रचूडः॥”

“मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥”

(दा. ११. ०२. २५)

दैनंदिन व्यवहार करताना अनेक विचारांची माणसे भेटतात. कधी एका विचाराच्या माणसांची चलती असते तर कधी दुसऱ्या… लोकं जातात पण विचार तिथेच रहातात. अर्थात दोन विचारांमधील वाद तसेच राहतात. अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनेक वाद (विचार) आहेत. द्वैत-अद्वैत हा तर प्रमुख वाद आहे. त्यानंतर शैव वैष्णव हा सुद्धा एक वाद आहे…. साधकाने या वादात फसू नये असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. कुठे वाद घालायचा आणि तो कुठे थांबवायचा ह्याचे तारतम्य कळले नाही, तर संवाद न होता तो फक्त वाद होतो आणि वादातून काहीही निष्पन्न होत नाही, असे इतिहास सांगतो. अध्यात्म क्षेत्रात तरी मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता सद्गुरू आज्ञेचे पालन करावे. एक गुरू आणि एक नाम, एक प्रमाण ग्रंथ इतक्या भांडवलावर मनुष्य आत्मारामाची प्राप्ती करून घेऊ शकतो.

संत्संग आपल्याला देवाकडे काय मागावे हे शिकवितो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि दुर्योधन श्रीकृष्णाचे सैन्य. आपल्याला नवीन काही शिकायचे असेल तर आपली पाटी कोरी हवी. आपण आपला अभिमान घेऊन देवाकडे गेलो तर देव सांगेल ते कधीच आपल्याला पटणार नाही. संवाद होणारच नाही मग हाती काय लागणार? म्हणून देवळात जाताना पायातील चप्पल आणि डोक्यावरील टोपी काढून जावे असे आपल्याला शिकविले जाते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

टीप : अधिक अभ्यास करायचा असल्यास मनाच्या खालील श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

वरील दोन्ही सूत्रांचे सुलभीकरण करून आपल्यापुढे मांडण्याचे कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले असल्याचे आपल्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकांत ते म्हणतात,

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

*
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

*

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

*

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

*

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

*

– – – – –   

भक्ति सूत्रे क्र. ७६ – – – 

भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि||७६||

अर्थ : भक्तीविषयक शास्त्राचे मनन करावे आणि भक्तीला सहाय्यभूत होणारी कर्मे करावी.

विवेचन :

“विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी | तेणे पथ्ये सांभाळावी” असे संत वचन आहे. भक्ति करताना मनुष्याने अधिकाधिक शुद्ध होण्याची अनिवार्यता असते. शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर जगात सर्वात शुद्ध आणि पवित्र कोण असेल तर तो एकमात्र भगवंत. त्याच्या इतके शुद्ध होण्यासाठी देहधारी साधकाची देहबुद्धी क्षीण होणे आवश्यक असते. एकदा सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पट्टशिष्याला अर्थात ब्रम्हानंद बुवांना प्रश्न विचारला की तू तर विद्वान आहेस. वेद, वेदांत यांत पारंगत आहेस. मी कसा तुझा गुरू झालो? आणि नंतर स्वतःच म्हणाले की कदाचित तुझ्यापेक्षा मी कणभर जास्त देहाला विसरलो असेन….! कथेतील भावार्थ इतकाच की देहबुद्धि क्षीण नव्हे, तर पूर्णपणे नष्ट होणे ही साधकाच्या भक्तीचे प्रमाण मानता येईल.

आता ही देहबुद्धि समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यक त्या आणि तितक्याच शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास साधकाने करावा. अन्यथा साधक साधक न रहाता शास्त्री होतो आणि पुन्हा कर्मठपणाचा दोष त्याच्या अंगी निर्माण होऊन तो पथभ्रष्ट होऊ शकतो.

श्रीमहाराज म्हणायचे की फार वाचू नये. जितके वाचावे तितके साधकाने आधी आचरणात आणावे, अन्यथा मी इतके इतके ग्रंथ वाचले, इतक्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा वृथा अभिमान बळावू शकतो.

भक्ति शास्त्र म्हणून समजून घेण्यासाठी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास हरकत नाही. आजपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्या सर्वांचे ग्रंथ अभ्यास करायचा म्हटले तर अनेक जन्म घ्यावे लागतील आणि मूळ हेतू मात्र विसरला जाईल. यावर सर्व संतांनी एक उपाय सांगितला. एक गुरू, एक ग्रंथ आणि एक नाम. या तिघांच्या सहाय्याने मनुष्य भगवतांची प्राप्ती करून घेऊ शकतो.

साधकाने आपले प्रत्येक कर्म अशा पद्धतीने करावे की जेणेकरून त्यातून भक्तीची वाढ होईल.

भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील आपल्याला झेपेल अशी व्याख्या प्रमाण मानावी. मला भावलेल्या दोन व्याख्या इथे देत आहे.

१. “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” (ज्ञाने. 10. 18)

२. प्रपंचात जेवढी आसक्ती | तेवढी भगवंतावर प्रीती || याचे नाव भक्ति”

साधकाने आपल्याला भावणारा ग्रंथ निवडावा आणि त्याचा साक्षेपाने अभ्यास करावा, त्यावर चिंतन, मनन करावे, म्हणजे त्याला पुढील मार्ग आपसूक दिसू लागेल.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७४, ७५, ७६..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके

रक्त उपलब्ध होत नाही तोवर शस्त्रक्रिया करणे अशक्य होतं. आज तिसरा दिवस. नऊ वर्षांच्या संतोषची प्रकृती आता अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली होती.

संतोष पटेल चे वडील बांधकाम कारागीर तर आई शेतमजूर. मोठ्या बहिणीच्या लग्नात आई-वडिलांनी जमा केलेली पुंजी खर्ची पडलेली. छोट्या संतोषच्या शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्यायला पोट भरण्याच्या लढाईत गुंतलेल्या वडिलांना फुरसत नव्हती. ते लोकांची घरं उभारून देत, पण स्वत:ला एक साधं छप्पर मिळवू शकलेले नव्हते निम्मं आयुष्य संपलं तरी. बांधकाम नसेल तेंव्हा विहिरी खोदून देण्याचं जोखमीचं काम करावं लागायचं…. अनेकदा विहिरी ढासळत, पण सुदैवाने डोक्यावर दगड नाही पडला. हात-पाय तर किती तरी वेळा जायबंदी झाले त्याची गणना नाही. आई शेतमजुरी करायची. आणि या दोघांनी मिळून जरा बरी कमाई केली की घरात तांदूळ यायचा. अन्यथा पुढचे दिवस गव्हाची भरड, आणि ती संपली की ज्वारीच्या कण्या… यावर गुजराण करावी! मजुरी आणि अर्धा एकर कोरडवाहू जमीन यापेक्षा जास्त नाही देऊ शकत!

संतोष अभ्यासात हुशार होता, पण आळस करी. मग आई त्याला झाडाला बांधून चोप देई… म्हणे…. या गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे…. शिक्षणाचा!

पोरगं आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिलं आलं तेंव्हा आई-वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९२% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तरीही पुढील शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न होताच. मग बांधकामावर विटा वाहणे आणि अशी अन्य कामे करून संतोष थोडाफार हातभार लावत होताच.

पुढे इंजीनियरींगसाठी भोपाळमध्ये आल्यावर भाजीवाल्याने मोफत दिलेल्या भाजीवर दिवस काढले. कुणीतरी मार्केटिंग मध्ये खूप पैसे आहेत, असे सांगितल्यावर तिकडे मोर्चा वळवला… आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. यावर आईने अशी काही खरडपट्टी काढली की विचारता सोय नाही! त्या माऊलीने गरिबीशी पैंज लावली होती….. मी नाही जिंकू शकले…. माझा मुलगा जिंकून दाखवेल तुझ्या विरोधातली लढाई!

— आईच्या शब्दांनी पुन्हा मार्गावर आणले खरे पण नोकरी काही मिळेना. वडील म्हणाले… घरी येऊन जनावरं सांभाळ, शेतात लक्ष घाल. बांधकामे तर मिळतात मला अजूनही…. मदतीला आलास तर चांगला रोजगार मिळेल!

गाव गाठलं. योगायोगानं वन विभागात रखवालदाराची तात्पुरती नोकरी मिळाली….. आणि तिथे अभ्यासाला वाव होता. जंगलातली शांतता आणि साहेब लोकांच्या निवासस्थानाबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश…. मार्ग सापडला. मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची (MPPSC) ची परीक्षा दिली… एकट्याने अभ्यास करून. केवळ चार गुणांनी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला… आणि मग आणखी नेट लावत, पंधरा महिन्यांनी झालेल्या त्याच परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE पदाला गवसणी घातली! पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्या दिवसापासून दाढी न करण्याची शपथ घेतली होती….. पंधरा महिने वाढलेली दाढी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याआधी काढली…. जिद्दच होती तशी.

लग्न केलं ते पारंपारिक पद्धतीने. नव्या नवरीची वरात सायकल रिक्षातून काढली होती. एका डी. एस. पी. अधिका-याचे असे लग्न लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असावे.

आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा इतरांना बसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. विविध माध्यमांमधून नवोदित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शनासाठी साहाय्य मिळवून द्यायला सुरुवात केली. सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर करीत संवाद वाढवत नेला. आज हजारो विद्यार्थी संतोष कुमार पटेल यांच्याशी जोडले गेलेले दिसतात! पडत्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना शोधून त्यांचे हात हातात घेऊन धन्यवाद देणारा हा अधिकारी… याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत!

नऊ वर्षांचा संतोष…. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, शहरात जायला पैसा नाही… मग गावातल्या झाडपाल्यावाल्या बाबांच्या आश्रयाला जाणे आलेच. शरीराच्या वरवरच्या जखमांवर झाडपाला उपयुक्त असतो, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा मोठ्या व्याधीने शरीर ग्रासले की मृत्यू ठरलेला. संतोष असाच मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर कुणाकडून तरी उधार उसनवारी करीत त्याला मोठ्या रुग्णालयात आणले होते. शस्त्रक्रिया करायची ठरले.. पण रक्त द्यावे लागणार होते. १९९९ चा तो काळ. त्यावेळी त्या भागात रक्तदान करणे म्हणजे स्वत:ला कमजोर करून घेणे, असा समज होता. त्यामुळे रक्तदान करायला कुणी सहजासहजी तयार होत नसे. संतोषची शस्त्रक्रिया त्यामुळेच वेळेमध्ये होऊ शकली नाही. एक एक दिवस उलटत होता!

संतोष दाखल असलेला WARD तिस-या मजल्यावर होता. संतोषचे वडील सुपारी चघळत असत. असेच चिंतागती बसलेले असताना त्यांनी तोंडातील सुपारी वरून खाली टाकली…. ते नेमके खाली असलेल्या एका सफाई कर्मचा-याने पाहिले. मोठ्या तिरीमिरीतच तो कर्मचारी संतोषच्या वडिलांची खबर घेण्यास वर आला…. त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच होता… पण संतोषचे वडील शांत उभे राहून दिलगिरी व्यक्त करीत होते. डोळ्यांत आसवे होती. त्या सहृदय कर्मचा-यास वाईट वाटले. त्याने परिस्थिती समजावून घेतली आणि “मी देतो रक्त! ” म्हणून रक्तदान करायला तो तयार झाला…. काहीही अपेक्षा न ठेवता. योगायोगाने त्याचा रक्तगट जुळला आणि संतोषचा जीव बचावला! सख्खे खानदान उपयोगात आले नाही पण हे खूनदान (रक्तदान) करायला अनोळखी माणूस आला…. संतू मास्टर त्याचे नाव! परिस्थितीने दोन गरीब कुटुंबांना रक्ताच्या नात्यात बांधले ते कायमचे.

संतोष पटेल साहेबांचे वडील अधून मधून संतू मास्टर यांच्या घरी जाऊन येत असत. नंतर त्यांचा संपर्क कमी झाला असावा. कारण दोघांची राहण्याची ठिकाणे दूर दूर होती. दिवस पुढे निघून गेले. मोठ्या होत गेलेल्या संतोषकुमार पटेल साहेबांना हे रक्ताचे काका आठवणीत होते. जीवनाच्या धकाधकीत काही गोष्टी मागे पडतात.

पुढे सतना स्टेशनमध्ये साहेबांचे काही काम निघाले आणि त्यांना लहानपणीची ती रक्तदानाची कथा आठवली. त्यांनी त्या रक्तदात्याचे घर शोधण्याचे ठरवले. तीन तास शोधाशोध केल्यावर एका अत्यंत गरीब वस्तीत संतू मास्टर रहात असत…. असे समजले. दोनच महिन्यांपूर्वी एका शाळेत सफाई करताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला होता!

डी. एस. पी. साहेब साध्या वेशात आपल्या सहकारी कर्मचा-यांसह संतू मास्टर यांच्या घरी पोहोचले. त्यांचा मुलगा मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. संतू यांच्या दोन मुली आणि थोरल्या मुलीच्या दोन लहानग्या मुलीसुद्धा होत्या घरात. मोठ्या मुलीच्या चेह-यावरून साहेबांनी तीच संतू मास्टर यांची मुलगी हे ताडले. तिच्या पायांना स्पर्श केला… हातावर काही पैसे ठेवले… आशीर्वाद मागितला. म्हणाले…. ‘ मी तुमचा भाऊच आहे…. तुमच्या वडिलांची भेट नाही होऊ शकली. पण त्यांचेच रक्त माझ्या शरीरात वाहते आहे. आयुष्यात काहीही गरज पडली तर तुम्हांला आणखी एक भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ‘.. असं म्हणत साहेबांनी त्या लहानग्या मुलींच्याही पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतले! संतू मास्टर यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नात कन्यादानाची जबाबदारी सुद्धा घेतली!

मागे एकदा बालाघाट दौ-यावर असताना त्यांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. साहेबांच्या पत्नीचा वाढदिवस त्यांनी त्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले होते. तेथील पूरन सिंग ठाकूर नावाच्या एका वृद्धाने पटेल साहेबांना खास पोलिसी पद्धतीने SALUTE केल्यावर पटेल साहेबांनी त्या वृद्धाची चौकशी केली. तर ते साहाय्यक फौजदार निघाले. पत्नीच्या निधनानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी घरदार सोडले, लहान मुलाला सोडून ते भटकत हिंडू लागले होते… व्यसने, आजार आणि मानसिक विकार यांनी ग्रासले गेल्याने त्यांना स्वत:बद्दल फार काही सांगता येत नव्हते… आणि त्यांनी घरदार सोडून चाळीस वर्षे उलटून गेली होती. पटेल साहेबांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधत तीन गोष्टी जाणून घेतल्या… त्या साहेबांच्या गावाची साधारण माहिती… आणि ते नोकरीत असताना फुटबॉल खेळत असत. या एवढ्या माहितीवरून पटेल साहेबांनी एक रील प्रसारित केला, त्यांच्या पोलिस खात्यातील मित्रांच्या मदतीने पूरन सिंग यांच्या मुलाचा शोध घेतला…. आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले! अशा अनेक कहाण्या आहेत… या प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असलेल्या पोलिस अधिका-याच्या!

वर्दीला मान आहे, सन्मान आहे आणि भीतीयुक्त आदरही. या पदावर पोहोचणारे कुठून तिथे पोहोचलेले असतात ते कुणास ठाऊक? पण जे आपली पाळेमुळे विसरून जातात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? अनेकजण तर मागे वळून पहात नाहीत. पण संतोष कुमार पटेल, D. S. P. पोलिस विभाग, मध्यप्रदेश यांच्यासारखेही हिरे असतात. पन्ना जिल्ह्यात जन्मलेला हा हिरा म्हणूनच अधिक चमकदार भासतो.

गांव का डीएसपी नावाने श्री. संतोष कुमार पटेल एक फेसबुक पेज चालवतात. याद्वारे विविध विषयांवर विडीओज बनवतात आणि प्रसारित करतात. तरुणांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात!

— — सकारात्मक गोष्टीही घडत असतात समाजात… त्या आपल्या दृष्टीस पडाव्यात म्हणून ही कहाणी सांगितली. तुम्हांलाही असे काही ठाऊक असल्यास लिहा.

जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ति सूत्रे ७० – – 

तन्मया : ||७०||

 अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.

विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.

*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*

*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*

(गीताई ०४. १०)

संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.

प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”

संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.

ते एका अभंगात म्हणतात,

*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*

(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

 जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७१ – 

*”मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति ||७१||”*

अर्थसिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.  

विवेचनदैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.

परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.

एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.

अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात… 

*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*

साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.

त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.

जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – – 

 *”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*

*”यतस्तदीय: ||७३||”*

अर्थश्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.  

विवेचनही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.  

भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.

संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.  

आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — – 

*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*

*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*

*दरबारी आले रंक आणि राव*

*सारे एकरूप नाही भेदभाव*

*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||||”*

 या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.

संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.

प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.

एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.

साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो

तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?

*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*

– – श्री गोंदवलेकर महाराज

भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.

अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.

भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.

अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.

भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.

यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.  

संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.

*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || || तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*

संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था

 जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७०, ७१, ७२, ७३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

“आता एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलणार आहेस का? ” आईच्या या निर्वाणीच्या वाक्यावर साहेब नि:शब्द झाले!

त्यांनी सैन्य प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचल्या पोहोचल्या तेथील अधिका-यांना अगदी खरं खरं सांगण्याचा निश्चय केला. आणि आईचा आशीर्वाद घेऊन ते रवाना झाले!

सैन्य प्रशिक्षण आणि त्यातून अधिका-यांचं विशेष प्रशिक्षण हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांचा कस पाहणारे असते. मिळू शकणा-या मोजक्या सुट्यांच्या दिवसांची हे धडधाकट, राकट लोक लहान मुलांसारखी वाट पहात असतात. आणि घरी आल्यावर अक्षरश: आपल्या आईच्या पदराखाली झोपतात… कारण हीच अशी एक जागा आहे जिथं सारं काही माफ असतं!

“मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” अशी तार प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचली आणि अभ्यासात गुंतलेल्या जंटलमन कडेटला त्वरीत कळवण्यात आले… जाण्या-येण्याचे दिवस गृहीत धरून तातडीची सुट्टी मंजूर करण्यात आली. कडेटची प्रवासाची व्यवस्था झाली!

अत्यंत काळजीच्या मन:स्थितीत साहेब गावात पोहोचले तर सनईचे सूर कानी पडले… साहेबांच्या जिवलग मित्राचं लग्न होतं. या फौजी साहेबाने लग्नात आवर्जून उपस्थित राहावं, असं त्या मित्राला वाटणं स्वाभाविकच होतं! पण या कारणांसाठी प्रशिक्षणातून सुट्टी मिळणं अशक्य होतं. त्या मित्रांनी मग एक वेगळी युक्ती केली. त्यांनी साहेबांना तार धाडली… ”मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” 

त्यावेळी मोबाईल, टेलिफोन इत्यादी संपर्क साधने फारशी सहज उपलब्ध नसल्याने काही चौकशी करणे अशक्य होते. साहेबांनी घाई-घाईत घर गाठले होते. मित्रांचा उद्देश ठीक होता… पण त्यांनी योजलेला उपाय कोणत्याही शिस्तीत अजिबात बसणारा नव्हता! साहेबांच्या मातोश्रींना मात्र हा प्रकार अजिबात रुचला नव्हता.

तरुण वय. साहेबांनी मित्राच्या लग्नाचा स्वागत समारंभ अगदी समरसून अनुभवला. गेल्या कित्येक वर्षांत न भेटलेले यार-दोस्त… दिवस कसे निघून गेले लक्षात नाही आलं. प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचण्यास एक पूर्ण दिवस उशीर होणार होता!

अतिशय कष्टात दिवस काढलेल्या त्या माऊलीच्या जीवनाचा पाया होता… सत्य… खरं… जे आहे ते! साहेब लहान असताना आई त्यांना म्हणायची… ”पुढे चांगले दिवस पहायचे असतील आयुष्यात, तर आता कठीण परिश्रमांन पर्याय नाही! अन्यथा तुझी जी क्षमता आहे, त्या क्षमतेला तू केवळ आळसामुळे न्याय दिला नाहीस… असं होईल!” 

कोणत्याही ग्रंथातील लांबलचक उपदेशांपेक्षा आईच्या हृदयातून आलेले हे शब्द या मुलाच्या काळजात घर करून बसले… आणि मग त्याने मागे वळून पाहिले नाही. शालेय जीवनापासून ते पदवीपर्यंत, आय. एम. ए. ची प्रवेश परीक्षा आणि एस. एस. बी. ची मुलाखत… हे सर्व टप्पे केवळ मेहनतीच्या जोरावर यशस्वीरीत्या पार पडले!

प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचताच लष्करी शिस्तीनुसार चौकशी झाली… पण साहेबांनी परिणामांची चिंता न करता चूक कबूल केली.. आणि जी शिक्षा दिली गेली ती निमूटपणे भोगली! ज्या प्लाटून कमांडर साहेबांपुढे या साहेबांनी आपला थेट कबुलीजबाब दिला होता, त्या कमांडर साहेबांनी पुढील कारकीर्दीत या साहेबांना त्यांच्याच लष्करी युनिटमध्ये नेमणूक दिली… त्यांना असा प्रामाणिक सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली हवा होताच!

मध्ये पस्तीस वर्षे उलटून गेली. हा प्रशिक्षणार्थी अधिकारी पुढे आपल्या सचोटी, मेहनत आणि शौर्य या गुणांच्या जोरावर भारतीय सैन्यात उत्तमोत्तम पदांवर काम करीत गेला. सैनिकी कर्तव्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच वेळा त्यांची नेमणूक झाली. या पाचही वेळा त्यांनी आपला नेतृत्वगुणांचा ठसा उमटवला. स्पष्ट, थेट आणि खरे बोलणे हा स्वभाव झाल्याने कारकीर्द अत्यंत यशस्वी म्हणावी अशी झाली. सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा पदाकाम्नी सन्मान झाला. आणि आता उद्या सेवेतील अखेरचा दिवस येऊन ठेपला अशी परिस्थिती निर्माण झाली.

अंबाला येथील लष्करी केंदावर मेजर जनरल रंजन महाजन, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल यांना निरोप देण्याची तयारी सुरु होती. साहेबांनी चालकाला त्यांचे वाहन काढायला सांगितले आणि ते थेट दिल्लीच्या दिशेने निघाले. सुमारे तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात त्यांना आईने आजवर दिलेल्या संस्कारांचे स्मरण होत होते. देशाप्रती निष्ठा, दयाभाव, संवेदनशीलता, संकटसमयी धीरोदात्त राहण्याचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास! हे गुण मुलांमध्ये जन्मत:च नसतात… ते पेरावे लागतात… त्याला खतपाणी घालावे लागते… स्वत: तसं वागून दाखवावं लागतं… तेंव्हा तिन्ही लोकी झेंडा फडकवणारी मुलं तयार होतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी… ती जगाचा असा उद्धार करू शकते. भारतीय सैन्यातील अशा अनेक मातांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे!

साहेब पूर्ण लष्करी गणवेशात होते. घराचा दरवाजा कुणीतरी उघडला… आईसाहेबांना दाराशी कोण आलं आहे ते समजलं नाही! साहेबांनी खास रुबाबदार पद्धतीने पावलं टाकली… आणि आईसाहेबांना कडक मानवंदना दिली! मातोश्रींनी सुद्धा थरथरत्या हातांनी मोठा साहेब झालेल्या लेकाला सल्यूट केला… आणि पुढच्या क्षणी त्याला मिठी मारली… त्याच्या गालाचे हळूवार चुंबन घेतले. यावेळी दोघा मायलेकांचे चेहरे हे जगातल्या सर्वाधिक आनंदी माणसांचे चेहरे होते!

माणूस आईसाठी सदैव लहानच असतो. आई नावाची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.

गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाजन साहेबांचे मातृछत्र हरपले! माझ्या आयुष्याला खरा अर्थ माझ्या आईमुळे प्राप्त झाला, असे महाजन साहेब मोठ्या अभिमानाने सांगतात 

(मेजर जनरल रंजन महाजन (सेवानिवृत्त) यांनी जम्मू-काश्मीर मध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या तेथील अनुभवावर आधारीत Kashmir in the life of fire… हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे मराठी, हिंदी भाषांतर व्हायला पाहिजे. माझाही प्रयत्न राहील. २०२३ मध्ये सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आधी घरी जाऊन आपल्या आईला मानवंदना देतानाचा महाजन साहेबांचा विडीओ लाखो लोकांनी पाहिला! आपल्यापैकी काही वाचकांनी हा विडीओ कदाचित पाहिला नसेल म्हणून हा लेख. दिवंगत मातोश्री यांचे नाव खूप शोधले पण कुठे उल्लेख दिसला नाही. असो… आईचे नाव… आईच! ) 

जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली 

दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष होते.

औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.२०२६ या वर्षी मोरोक्को ची राजधानी बरात हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे

२३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. भारत सरकारने २३ एप्रिल २००१ पासून हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला सुरवात केली. विनामूल्य पुस्तक वितरण, स्पर्धा, पुरस्कार अशा कार्यक्रमांद्वारे वाचनाविषयी आवड व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवर्षी जागतिक पातळीवर पुस्तकांची राजधानी निवडली जाते. आतापर्यंत शारजा, माद्रिद, मट्रीयल अमस्टरडम, क्रोनकी, बँकाक, अथेन्स, व्रोक्ला, बोगोटा, बैरूत, इंचिऑन, येरेवान आदि शहरे पुस्तक राजधानी म्हणून निवडण्यात आली. २००३ ला आपले नवी दिल्ली हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. पुस्तकाच्या राजधानीत वर्षभर पुस्तक स्वामित्व हक्क, वाचन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. मेक्सिकोतील गुडलजरा हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित झाले होते कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम झाले.

युनेस्को मार्फत पुस्तक राजधानी प्रमाणेच दरवर्षी वाचकांसाठी संदेश, theme, संकल्पना दिली जाते. 2024 ला, you are a reader तुम्ही वाचक आहात ही मुलांसाठी संकल्पना होती.२००३ ला दिल्ली पुस्तकाची राजधानी असताना, ‘ जीवनाचा दोस्त – पुस्तक ‘ असा संदेश होता. आतापर्यंत वाचन म्हणजे थंड हवा, एक पुस्तक द्या, आनंदाचे तास, जीवनाचा मित्र, वाचन एक अखंड यात्रा, अभ्यास, कायमस्वरुपी साक्षरता जीवन बदलते, वाचन हाच उपाय, भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्षे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विकास, प्रकाशन, मानवाधिकार, संस्कृती संपर्क, पुस्तक निर्मितीचा इतिहास – लिहण्यापासून डिजीटल पर्यंत, पुस्तके आणि अनुवाद, वाचन ही बौद्धिक संपदेची सुरक्षा, पुस्तक वाचा, हुशार व्हा, जग वाचा, वाचन माझा अधिकार, कथा share करा, पुस्तक : जगाची खिडकी अशा संकल्पना व संदेशावर काम करण्यात आले.

 

❀꧁꧂❀┉

लेखक : संजय थोरात

प्रस्तुती : हर्षल सुरेश भानुशाली

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त मा. राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष… ) 

मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर 

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम. बी. बी. एस. ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : डॉ. राजेंद्र भारुड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

वर्डस्वर्थ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.

टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.

आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.

टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.

—–

☆ गीत: ५८ ☆

LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and 

waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of 

pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५८ ☆

*

आनंदाचे स्वर अखेरच्या

गीतात माझ्या पाझरावे

अवखळ या हरिततृणावर

धरणीने त्या उधळावे

*

जन्ममरणाच्या यमलासी

विश्वात त्याने नाचवावे

कमळाच्या अश्रुत बसोनि

ओघळणे थांबवावे

*

आनंदाने त्या आनंदाला

मृत्तिकेसम उधळावे

या गीतातून तुला अखेरी

मी आनंदा अर्पावे

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ५९ ☆

YES, I know, this is nothing but thy love, O beloved of my heart ⎯ this golden light that 

dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead.

The morning light has flooded my eyes ⎯ this is thy message to my heart. Thy face is 

bent from above, thy eyes look down on my eyes, and my heart has touched thy feet.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ५९ ☆

*

प्रकाश किरण सोनेरी

हिरवाई वरी नृत्य करी

*

जलद आक्रमिती नभा

शिरी घेऊनि अमृतकुंभा

*

तृप्तता होतसे जीवाची

मंद झुळूक येता वाऱ्याची

*

भरभरुनि मज देशी सारे

प्रेम यालाच म्हणती ना रे!

*

प्रभात किरणे घेऊन येती

तव संदेशा, मला सुखविती

*

आज सहज मी पाही तुला

ओणवुनि तू निरखिता मला

*

नजरानजर झाली आपुली

शतजन्मांची ओळख पटली

*

आणि त्याच अद्भुत क्षणी

सर्वस्व वाहिले तुझिया चरणी

 *

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६० ☆

ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.

They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.

They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.

The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.

On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,

ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the 

seashore of endless worlds is the great meeting of children.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६० ☆

*

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥धृ॥

*

खाली बंडखोर सागर, वर अविचल आकाश

निरागस कोवळी मने, रचिती आनंदाची रास

वाळूचे घर, त्यावर सुंदर शिंपल्याची नक्षी

वाळल्या पानांच्या बोटी, लाटांच्या वक्षी

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥१॥

*

वाळूत रेघोट्या, किड्यांमागे धावती

आत तांडव लाटांचे, किनारी मुले खेळती

रंगीत खडे गोळा करता, आनंद बाल जीवाला

सारी दौलत गोळा केली, उधळती सागराला

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥२॥

*

मच्छीमार माशांसाठी, तर कप्तान व्यापारासाठी,

कुणा खजिन्याचा मोह, उडी पाण्यात मोत्यांसाठी

ना कसब पोहण्याचं, ना खजिन्याची आस

ना जाळं विणण्याची कला, खेळ चाले झकास

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥३॥

*

वाटाहीन नभ अन् वादळ घुमे दिशाहीन

उध्वस्त बोटी, मृत्यूचे तांडव, पाणी मार्गहीन

लाटांचं हास्य क्रूर, शांत हास्य काठात

अंगाईचा झोका हले, क्रुद्ध लाटांच्या गीतात

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥४॥

*

– क्रमशः भाग २० 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे

एका शांत आश्रमात एक साधक राहत होता. त्याने अनेक वर्षे तप, जप, ध्यान केलं होतं. आता सर्वजण त्याला “योगीजी” म्हणून ओळखू लागले होते.

एके दिवशी तो आपल्या गुरूकडे गेला—

“गुरुदेव, मला योग प्राप्त झाला आहे. आता मला पुढे काय करायचं? ”

गुरु हसले, पण काही बोलले नाहीत.

काही दिवसांनी तो पुन्हा आला—

“गुरुदेव, मला आता ज्ञानही झालं आहे. शास्त्रांचा अर्थ कळतो, आत्मा कळतो. ”

गुरु पुन्हा शांतच राहिले.

काळ गेला…

एक दिवस तो अत्यंत भावुक अवस्थेत आला— “गुरुदेव, आता माझ्या हृदयात अपार प्रेम आहे. मला वाटतं, मी प्रेमात पूर्ण झालो आहे. ”

यावेळी गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहून म्हणाल, “तू अजूनही ‘मी’ मध्येच आहेस. ”

साधक थोडा चकित झाला—

“गुरुदेव, मी इतकी साधना केली, तरी ‘मी’ कसा राहिला? ”

गुरु शांतपणे म्हणाले— “तू म्हणतोस— मी योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रेमी आहे.

जोपर्यंत ‘मी’ बोलतो आहे, तोपर्यंत तू त्या अवस्थांचा भोग घेतो आहेस, त्यात अडकलेला आहेस. ”

हे ऐकून साधकाच्या मनात काहीतरी हललं…पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे खोल पाहिलं. त्या रात्री तो एकटाच बसला.

ना जप, ना ध्यान… फक्त शांत साक्षीभाव.

हळूहळू त्याला जाणवलं—

योग, ज्ञान, प्रेम… हे सगळं येतं आणि जातं पण “मी” जो म्हणतो आहे, तोच खरा अडथळा आहे.

अचानक त्याच्या आत काहीतरी विरघळलं…

जणू “मी” हा शब्दच नाहीसा झाला.

फक्त शांतता उरली…

निर्विचार, निरहंकार, नितळ अस्तित्व.

दुसऱ्या दिवशी तो गुरूकडे गेला…

पण यावेळी तो काही बोललाच नाही.

गुरु त्याच्याकडे पाहून हसले—

“आता तुला कळलं…

जिथे ‘मी’ नाही, तिथेच खरा योग, ज्ञान आणि प्रेम आहे. ”

योग प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण योगी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण योगाचे भोगीच आहोत.

आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण ज्ञानी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण ज्ञानाचे भोगीच आहोत.

तसेच प्रेम प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण प्रेमी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण प्रेमाचे भोगीच आहोत.

आणि बंधूंनो, जो प्रेमाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘कामाचा’ भोगी होऊ शकतो.

जो ज्ञानाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘अज्ञानाचा’ भोगी होऊ शकतो.

आणि जो योगाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘भोगाचा’ भोगी होऊ शकतो.

आपली बुध्दी ही खऱ्या ज्ञानापर्यत पोहोचण्यातील खरा अडथळा आहे! हे जाणवणं म्हणजे खरी स्वयंजागृती! ज्याला मी समजतो तो मी मर्यादित आहे व आज बुध्दीचा विलय झाल्यावर उरला तो‌खरा मी आहे जो अनंत आहे अमर्याद आहे असीम आहे, अमर्याद आहे.

कुठे होता तो? आतच होता पण झाकोळला होता मर्यादित मी ने च! इतर कशाचाही अडथळा नव्हता असे समजल्यावर दोषारोप थांबतात व कृतज्ञताच प्रगट होते जी आतून, हृदयातून, सहजतेने प्रकट होते.

 “मीपण विरघळे(वृत्त: आर्या)

मीपण धरुनी अंतरी, म्हणे मी योगी ज्ञानी

भावांच्या या लहरींमध्ये, अडकला जीव अभिमानी ॥

ज्ञानदीप उजळता, उरला तरी सूक्ष्म अहंभाव ।

प्रेमाच्या त्या सागरात, उठती मीपणाचे ठाव ॥

शांत बसुनी पाहता, विरती सारे भाव हळूच ।

उरे न काही म्हणण्यास, साक्षी निखळ तोच ॥

जिथे नाही मीपणा, तिथेच सत्य फुले सहज ।

योग-ज्ञान-प्रेम एक, तेथेच परम तेज ॥

 

“‘मी’ हा सूक्ष्म धागा सुटेपर्यंत, साधना पूर्ण होत नाही;

तो विरघळला की सर्व एकरूप होतं.”

जोपर्यंत ‘मी’ आहे, तोपर्यंत साधना आहे;

जिथे ‘मी’ विरघळतो, तिथेच सत्य प्रकट होतं.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares