मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

देवबाभळी असे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो.

खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे?

यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तुकारामांची पत्नी आवली हिच्या पायात बाभळीचा काटा मोडतो. तो काटा काढण्यासाठी कोण मदत करतं तर प्रत्यक्ष विठुराया. विठुरायाने पायातला काटा काढला तरी पायातल्या वेदनेची आणि जखमेची ठसठस घेऊन आवली नाटकभर वावरते. विठुराया केवळ तेवढं करून थांबत नाही, तर तिच्या मदतीला आपली पत्नी रुख्मिणी हिला पाठवतो. त्यावेळी आवली पोटुशी असते. देवबाभळीचा काटा मोडणं हे खरं तर निमित्त! पण या निमित्ताने विठुरायाचे आपल्या भक्तांवरील प्रेम दिसते. या निमित्तानेच रुख्मिणी आवलीच्या घरी येते. या दोघींचंही दुःख कुठेतरी एकसमान आहेत. पण त्या दोघींच्या मनातील वेदना, स्त्री सुलभ भावना आणि आपल्या पतीबद्दल असलेलं प्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. या सगळ्या गोष्टींना कारण ठरते ती देवबाभळी!

नाटकाचा पडदा उघडतो आणि शेणानं आपलं अंगण सारवणारी आवली दृष्टीस पडते. सारवताना ती गात असते. सकाळचे प्रसन्न वातावरण दृष्टीला पडते. स्वयंपाकघरातून डोकावणारी सूर्यकिरणे दिसतात. चुलीतला धूर दृष्टीस पडतो. आवली भाकऱ्या करते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर असणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच तुकाराम बुवांना त्या नेऊन देत असते. तुकारामबुवांना हाक मारताना ‘ आवो आवो… ‘ अशा तिच्या आर्त हाका हृदयाला स्पर्शून जातात. डोंगर उतरताना आवलीच्या पायात बाभळीचा काटा घुसतो आणि ती खाली कोसळते. पुढचं तिला आठवत नाही.

आवलीला शुद्ध येते तेव्हा ती आपल्या स्वयंपाकघरात पडलेली असते. चुलीजवळ कोणीतरी स्त्री भाकऱ्या करताना तिला दिसते. आपल्या घरात ही कोण नवीन बाई? तुकारामबुवांनी काही नवीन तर..? अशी शंका तिच्या मनात येते. ती त्या स्त्रीला विचारते, ‘ कोण ग तू? आणि माझ्या घरात कशी आलीस? ‘ तेव्हा ती सांगते, ‘ माझं नाव लखुबाई. मला तुमची काळजी घ्यायलाच पाठवलं आहे. ‘ ही लखुबाई म्हणजेच रुख्मिणी. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सांगण्यावरून ती इथं आली आहे. तशी आवली कजाग बाई. विठ्ठलाला चक्क शिव्या घालत असते. पण त्याचं कारणही तसंच असतं. तिचा पती म्हणजेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नादी लागलेले असतात. आपल्या पत्नीकडे, घराकडे, संसाराकडे त्यांचे काडीमात्रही लक्ष नाही. त्यामुळे ती विठ्ठलाला शिव्या देते. आपल्या पतीला हे ‘ पंढरीचे भूत ‘ लागले आहे आणि त्याने आपल्या सगळ्या संसाराचे वाटोळे केले आहे अशी तिची भावना असते.

आवली विठ्ठलाला ‘ चिघळलेली जखम ‘ म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग आहे असे म्हणते. पण आता घरात आलेल्या रुख्मिणीला मात्र तिचे हे विठ्ठलाला म्हणजे आपल्या पतीला शिव्या देणे आवडत नाही. अशी ही कजाग आवली असली तरी वरून काटेरी फणसासारखी दिसणारी आहे. अंतर्यामी मात्र फणसाचे गोड गरे आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की आवली विठ्ठलाला शिव्या देत असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण ती घेते त्याचेच नाव! या अर्थाने आवलीही विठ्ठलभक्त आहेच!

रुख्मिणी तिचा पाय हातात घेते. त्याला मलमपट्टी करते. तिच्याच घरात तिच्यासाठी भाकऱ्या बडवून तिला मदत करते. तेव्हा रुख्मिणी विचारते, ‘ यातला मला एखादा तुकडा दिला तरी चालेल. ‘ तेव्हा आवली म्हणते, ‘ तुकडा कशापायी? पूर्ण भाकरीच देईन की तुला. ‘ यातून आवलीचा प्रेमळ स्वभावही दिसून येतो. रुख्मिणी चुलीजवळ बसून जेव्हा भाकरी करते, तेव्हा चुलीतल्या निखाऱ्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्याने तिचा मुळातच तेजपुंज असलेला चेहरा उजळून निघतो. तिचं भाकरी करणं, भाकरी शेकणं हे कुठेही नाटकातलं वाटत नाही, इतकं ते जिवंत साकारण्यात ती आणि दिग्दर्शक दोघेही यशस्वी झाले आहेत. आवली जेव्हा घर सारवते, तेव्हाही ते नाटकातलं दृश्य वाटतच नाही.

घर सारवणं नाहीतरी आजकाल कोणाला माहिती आहे? पण आजच्या पिढीला ते यात माहिती होऊ शकेल.

आवलीचा तुकारामबुवांवर राग आहे तसाच रुख्मिणीचा सुद्धा विठ्ठलावर आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुख्मिणीची देऊळं वेगवेगळी आहेत. विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला आला, तेव्हाही त्याने राधेशी असणारी प्रीती, स्नेहभाव कायमच ठेवला होता. त्यामुळे रुख्मिणी रागावून दिंडीर वनात निघून गेली होती. तोच संदर्भ इथे आहे. या कारणानेच रुख्मिणी विठ्ठलावर नाराज आहे. विठ्ठलाला आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक प्रिय आहेत अशी तिची तक्रार आहे. विठ्ठलाने जेव्हा आवलीच्या पायातला काटा काढला, तेव्हा स्त्री सुलभ भावनेतून रुख्मिणी बघायला आली की कोण ही की जिच्या पायातला काटा आपला पती काढतो आहे. आवली त्याच्या भक्ताची पत्नी आहे. त्याची काळजी घेणारी ती आहे. ती गर्भार अवस्थेतही आपल्या पतीला जेवण घेऊन येते. म्हणून विठुराया रुख्मिणीला आवलीच्या घरी जाऊन तिची सेवा करायला सांगतो.

अशा या परिस्थितीत आवली आणि रुख्मिणी जवळ येतात. एकमेकींची दुःख समजून घेतात. त्यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी तर आहेतच पण खूप काही सांगून जाणारे आहेत. तुकाराम बुवा घरात अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वयंपाकघरातील डबे, भांडी रिकामी आहेत. खरं तर आवलीच माहेर श्रीमंत होतं. ती आपल्या माहेरी परत जाऊ शकली असती. रुख्मिणी तिला विचारते, ‘ मग काय आहे तुमच्याकडे? कसा चालतो तुमचा संसार? ‘ त्यावेळी आवली उपरोधिकपणे तुकारामबुवांचा अभंग वापरून उत्तर देते, ‘ आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने… ‘ त्यावेळी प्रेक्षक अंतर्मुख होतात.

रुख्मिणी विचारते, ‘ मग तू निघून का जात नाहीस? ‘ त्यावर आवलीने दिलेले उत्तर सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘ निघून जाऊन काय करू? मी आहे म्हणून त्यांना जेवण तरी मिळते. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला रुसून निघून जाण्याचा अधिकार कुठे आहे? मी काही रुख्मिणी थोडीच आहे रुसून निघून जायला? आणि निघून गेल्यावर घरी परत यावंसं वाटलं तर आल्यावर घर तरी जागेवर असेल का? मग कुठे जायचं? ‘ यातून तिने रुख्मिणीला बोध तर केला आहेच पण आजकाल क्षुल्लक कारणावरून नवऱ्यावर चिडून घरातून निघून जाणाऱ्या मुली, काही झाले की लगेच घटस्फोट घेणाऱ्या मुली यांच्यासाठीही दोन मोलाचे शब्द यातून तिने सुनावले आहेत असे वाटते. एकदा का घर सोडून निघून गेल्या आणि नंतर परत यावेसे वाटले तरी घर (पती) जागेवर असेलच याची शाश्वती कोणी द्यावी?

रखुमाई म्हणते, ‘ मी आणि तू दोघं गाभाऱ्याच्या बाहेर आहोत, पण तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस. ‘ आवली जशी रुख्मिणीला तिची चूक दाखवून देते, तशीच रुख्मिणी सुद्धा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आवलीला सांगते. ती पावसात आवलीला घेऊन जाते. हात पसरून सांगते, ‘ बघ पावसात असं मनसोक्त भिजायचं असतं सगळं विसरून. मुक्त, आनंदी व्हायचं असतं. ‘ या नाटकातील संवाद असेच हृदयाला हात घालणारे आहेत. नाटकाचा काळ प्राचीन असला तरी आजही हे संवाद स्त्री मनाची अवस्था स्पष्ट करतात. ‘ करपायच्या आत खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फोडणी तांबूस झाल्या झाल्या ओतायची भाजीत, उतू जायच्या आत उतरवायचं भांडं… का? कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी का गं फिरायचं आपण बायकांनीच? ‘ आणखी एका संवादात म्हटलं आहे, रखुमाई आवलीला म्हणते, ‘ स्वतःसाठी जग. जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव. ‘ ‘ प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं शेत नांगरून ठेवायचं असतं. पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते. ‘ ही वाक्यं कुठेतरी गीतेतल्या उपदेशाशी नातं सांगणारी आहेत असं मला वाटतं. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करावं. बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढचं ईश्वरावर सोपवावं असंच गीतेत सांगितलं आहे ना!

एकंदरीत हे नाटक आपल्याला थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगीतिक अनुभव देतं. या नाटकात एकाच रंगमंचावर जणू देहू नगरी अवतरली आहे. तुकारामबुवांचा वाडा, आवलीच स्वयंपाकघर, भंडाऱ्याचा डोंगर, इंद्रायणीचा घाट हे सगळे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यात प्रकाश योजना, नेपथ्य या साऱ्यांचा भाग आहेच. आवली किंवा रुख्मिणी कपडे धुताना, इंद्रायणीच्या पाण्यात हात घातल्यानंतर होणारा आवाज इतका हुबेहूब आहे की खरोखरच इंद्रायणी नदी तिथे असल्याचा भास होतो. यात पारंपरिक संगीत वाद्यांचा वापर केला आहे. तबला, पखवाज, संवादिनी, सतार आदी वाद्यांचे स्वर मन प्रसन्न करणारे आहेत. प्राजक्त देशमुख यांचे संवाद आणि अभंगरचना यांना शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रुख्मिणी /लखुबाई) यांनी न्याय दिला आहे असे म्हणण्यापेक्षा त्याचे सोने केले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आनंद भाटे यांचे तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पार्श्वगायन भक्तिरसाचा अनुभव देणारे आहे.

शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा जिवंत अभिनय हे नाटकाचं वैशिष्ट्य. आवली जेव्हा तुकारामांना साद घालते तेव्हा तिचे, ‘ आवो आवो ‘ हे शब्द अक्षरशः काळजाचं पाणी पाणी करतात एवढी ताकद, एवढी आर्तता त्या स्वरात आहे. मानसी जोशी विठ्ठलाच्या मूर्तीशी संवाद करीत असताना ती केवळ मूर्तीशी बोलते आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आहे असे वाटते. तुकाराम बुवांची गाथा वाचताना आवली आणि रुख्मिणी दाखवल्या आहेत. आवलीचे गूढ रम्य स्वप्न, वाऱ्याने उडणारी तुकोबांच्या गाथेची पाने, इंद्रायणीत पडून वाहून जाणारी गाथेची पाने हे सगळे प्रसंग कमालीचे जिवंत वाटतात. चित्रपटाच्या तुलनेत दृश्ये दाखवताना नाटकांना अनेक मर्यादा पडतात पण इथे त्या सगळ्या मर्यादा असूनही सगळं काही रंगमंचावर जिवंत करण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांना एक भव्यदिव्य अनुभव त्यांनी दिला आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनने अनेक दर्जेदार नाटके दिली, त्याच परंपरेतील हे नाटक आहे. मच्छिंद्र कांबळी यांची दर्जेदार नाटकांची परंपरा प्रसाद कांबळी यांनी नुसतीच चालू ठेवली नसून आणखी पुढे नेली आहे. देवबाभळी हे संगीत नाटक असूनही इतर संगीत नाटकांपेक्षा आगळेवेगळे. प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. आनंद ओक यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या नाटकातील गीते शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी दर वेळी प्रत्यक्ष गातात. इतर नाटकांप्रमाणे त्या गीतांची रेकॉर्ड लावली जात नाही.

प्राजक्त देशमुख यांचे संवाद हृदयाला भिडणारे आहेत. लोकसंगीत, अभंग, ओवी इ. चा सुरेख वापर या नाटकात केला गेला आहे. संतपरंपरा, लोकपरंपरा आणि अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या नाटकाला एकूण ४४ पारितोषिके मिळाली आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी इ. विविध पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विक्रम या नाटकाने रचले आहेत. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने या नाटकाची सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून नोंद घेतली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी हे नाटक गौरविले आहे.

केवळ दोनच स्त्री पात्रे एवढा सशक्त अभिनय करून दोघींच्या बळावर एखादे नाटक एवढे यशस्वी करू शकतात हे विस्मयचकित करणारे आहे. त्यासाठी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघीना सलाम. या नाटकाची वाटचाल लवकरच पाचशेव्या प्रयोगापर्यंत होईल. ज्यांनी अजूनपर्यंत एकदाही हे नाटक पाहिले नसेल त्यांनी एकदा तरी ते जरूर पाहावे असे आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथांचा जन्म उच्चवर्णीय, गर्भश्रीमंत, जमीनदार व उच्चशिक्षित घराण्यातला. त्यांच्या व्यापक विचारांना जाती धर्माची, वर्ण पंथांची, देश वा राज्याच्या सीमांची बंधनं मान्य नव्हती. ते अखिल मानव जातीच्या भल्याचा विचार करीत. कदाचित् त्यामुळेच समकालीन विचारवंतांच्या मनात त्याच्या विषयी नेहमीच संशयाचे धुके असत असे. परंतु त्यांचं आपल्या देशावर, या वसुंधरेवर निरतिशय प्रेम होतं. त्यांचे विचार प्रगल्भ होते. बुद्धिमत्ता अलौकिक होती. आरशासारखं स्वच्छ मन होतं.

त्यांच्या मते प्रत्येकाला शिक्षणातून स्वतःचा उत्कर्ष घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार व समान संधी मिळायला हवी. त्यासाठी देश, प्रांत अशा सीमारेषा नसाव्यात. त्या काळातही ते जागतिकीकरणाचे ध्येय बाळगून होते.

गीतांजलीतील आपल्या ३५ व्या कवितेत त्यांनी अत्यंत सकारात्मक असे हे विचार मांडले आहेत. जेथे जात, पंथ, वर्ण, रूढी, भाषा अशा कोणत्याही भेदभावाच्या भिंती नाहीत, समानता आहे, परस्परांबद्दल आदर आहे, नैतिकता, विवेक, सत्यवचन यांचा अंगिकार करणारं मन आहे अशा विश्वाची, मानवजातीची आस त्यांनी इथे व्यक्त केली आहे.

समाजात भयमुक्त, संघर्ष मुक्त वातावरण असावे. दडपशाहीच्या निंदनीय वास्तवातून बाहेर पडले पाहिजे अन्यथा वाळवंटातील रेती मध्ये रुतल्याप्रमाणे बसावे लागेल. ते ओलांडून गेलो तरच प्रगतीशील भविष्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा स्वच्छ प्रवाह निर्माण होईल, जो कधीच थांबणार नाही. एकसंध, निष्पक्ष असा परिपूर्ण भारत, परिपूर्ण जग निर्माण केले पाहिजे.

ते ह्या काव्यातून प्रत्येक मानवासाठी नैतिक, बौद्धिक व आध्यात्मिक स्वातंत्र्याची मागणी करतात. तसेच वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध भाष्य करतात. वैयक्तिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सर्व बंधनांना तोडून जे स्वातंत्र्य लाभेल ते स्वर्गासम असेल. त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जागे कर, अशी ते विधात्याकडे प्रार्थना करतात.

त्यांचे हे काव्य म्हणजे जणू सगळ्या मानवतेला आवाहन आहे. विचारही इतके दूरदर्शी, सार्वकालिक आणि व्यापक आहेत की आजही ते सर्वांना मार्गदर्शक ठरतील. या कवितेने स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली. स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्ता बदल नाही. तर भयमुक्त समाज निर्माण करणे जेथे परस्परांबद्दल आदरभाव असेल, समानता असेल.

हे काव्य संपूर्ण विश्वात गाजले कारण यातील विचार वैश्विक आहे. यात सामूहिक प्रबोधनाचे आवाहन आहे. न्याय्य, खुल्या भयमुक्त मानवी जगाच्या निर्मितीचं आवाहन आहे. ही कविता फक्त भारतातच नाही तर बांगलादेशातही पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते.

सन १९१७ च्या कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रविंद्रनाथांनी ही कविता ‘इंडियन प्रेअर’ म्हणून प्रस्तुत केली होती. तिचं सिंहीली भाषेतही भाषांतर झालं आहे. सन १९१० च्या आधी त्यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. नंतर त्यांच्या ‘नैवेद्यम्’ या कवितासंग्रहातून ‘प्रार्थना’ या शीर्षकाखाली ती प्रसिद्ध झाली. ही मूळ कविता क्रांतिकारी वळणाची व अधिक आवेशपूर्ण होती. तिचे इंग्लिश मध्ये भाषांतर करताना टागोरांनी त्यात

काही बदल करून ती बरीच

सौम्य केली आहे.

—–

गीत ३४

LET only that little be left of me whereby I may name thee my all.

Let only that little be left of my will whereby I may feel thee on every side, and come to

thee in everything and offer to thee my love every moment.

Let only that little be left of me whereby I may never hide thee.

Let only that little of my fetters be left whereby I am bound with thy will, and thy purpose

is carried out in my life ⎯ and that is the fetter of thy love.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३४

☆ 

सायुज्य मुक्ती नकोच देऊ

जरा विलगता आपण ठेऊ

असेल जर का थोडे अंतर

पाहिन रुपडे तुझे निरंतर

घडोघडी तव चरण सेवा

माझ्या हातून घडेल देवा

असशील जर तू आजुबाजूला

तू माझा, मी दाविन सकला

क्षणोक्षणी तुज अर्पिन प्रीती

म्हणून करतो ही तुज विनती

एकरूपता नकोच मजला

थोडे अस्तित्व दे गोपाला

☆ 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३५ ☆ 

WHERE the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free; Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls; Where words come out from the depth of truth; Where tireless striving stretches its arms towards perfection;

Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit; Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action ⎯

Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ३५ ☆ 

जेथे मनी भिती नाही

मान सदा ताठ राही

जेथे ज्ञान असेल मुक्त 

संकुचित भिंती होती लुप्त

*

असं विश्व माझं घर असेल

सत्याच्या गर्भातून शब्द बरसेल

कर्तव्यनिष्ठा, चिकाटी न् अचूकता

असेल आचार विचारांची प्रगल्भता

*

वाट दाखवणारा जर तू असशील

तर धरतीवर असा स्वर्ग वसवशील

तुझ्या कृपेचा असेल वरदहस्त

तर असाच असेल माझा भारत

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆  गीत ३६ ☆ 

THIS is my prayer to thee, my lord ⎯ strike, strike at the root of penury in my heart.

Give me the strength lightly to bear my joys and sorrows.

Give me the strength to make my love fruitful in service. Give me the strength never to disown the poor or bend my knees before insolent might.

Give me the strength to raise my mind high above daily trifles. And give me the strength to surrender my strength to thy will with love.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत ३६ ☆ 

☆  हे देवा! ☆ 

☆ 

घाव एक तो असा घाल की 

दारिद्र्य मनाचे समूळ जाऊ दे

दीन दुबळ्यांची सेवा आणिक

परोपकार हातून घडू दे

*

असोच इतके बळ मनाचे

सुखदुःखाच्या पार जाऊ दे

सत्तेच्या या माजापुढती

कधी न मजला नत होऊ दे

*

तुच्छ गोष्टींना महत्व देऊन

मन कोते ना कधी वाटू दे

इच्छा तुझिया पूर्ण कराया

शक्ती माझी खर्ची पडू दे

☆ 

– क्रमशः भाग १२.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके

शामा आन बसो ब्रिंदावन में 

मेरी उमर बीत गयी गोकुल में 

मैं तो बन के दुल्हन आज सजी

बस तुमही हो मेरे तन मन में ।। 

श्रीकृष्ण नावाचं एक गारूड गेली कित्येक युगे सहृदय मानवांच्या मनावर राज्य करीत आलेलं आहे. विविध रूपांत भगवान श्रीकृष्ण कोट्यवधी लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. कृष्णलीला अगाध आणि अनंत आहेत.

मानवी देहात अवतरीत झालेला हा देव देहाच्या, वासनेच्या अंगभूत मर्यादा ओलांडून केंव्हाच पुढे, अगदी पुढे निघून आलेला दिसतो. माना मानव वा परमेश्वर… मी स्वामी पतितांचा म्हणत हा कर्माचा योगी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सबंध जगतातील अनेकांच्या मनात वसलेला दिसतो.

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ISKON अर्थात International Society for Krishna Consciousness या संस्थेने कृष्णाची आणि जगाची गाठ घालून दिली, असे म्हणता येईल. पाश्चात्य जगतातील विज्ञाननिष्ठ लोक मोठ्या संख्येने कृष्णनाम जपताना दिसतात, तेंव्हा ही जाणीव निश्चितच अगदी उच्च पातळीवरची असेल, यात शंका नाही!

हजारो परदेशी युवक-युवती भारतात कृष्णाच्या शोधात येताना दिसतात, भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी, त्यांनी लीला केल्या त्या वृंदावनात रमताना दिसतात…. गाताना दिसतात. मोठ्या श्रद्धेने ही मंडळी श्रीकृष्ण भावानामृत ग्रहण करतात. यामागील कारणे काहीही असोत… त्यांना त्यांच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी हा मार्ग योग्य वाटतो… हे महत्त्वाचे!

इंटरनेट वर सध्या एका रशियन युवतीने अत्यंत तल्लीन होऊन गायलेल्या एका हिंदी कृष्ण भजनाचा रील खूप मोठ्या संख्येने पाहिला जातो आहे. उच्चार, गायनाची धाटणी काहीशी वेगळी असली तरी ती ज्या भावनेने गाते आहे…. ते ऐकण्यासारखे आहे. विशेषत: तन मन में हा उच्चार तर केवळ अवीट गोडीचा.

मन:शांतीच्या शोधात असणा-यांना कृष्णभक्ती हा एक उत्कृष्ट मार्ग उपलब्ध आहे. किंबहुना अध्यात्माच्या जगतात कृष्ण नाम हा परवलीचा शब्द बनला आहे. राम कृष्ण नामे ही (ये) दोन्ही साजिरी… हृदयमंदिरी स्मरा का रे… आपली आपण करा सोडवण… संसार बंधन तोडा वेगी… असं माऊली म्हणतात. राम आणि कृष्ण अर्थात श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही नामे साजिरी, गोड आहेत….. या नामांच्या केवळ उच्चाराने संसार बंधनातून सुटका होऊ शकते, असा विश्वास श्री ज्ञानोबारायांनी दिला आहे. असो.

परदेशी लोकांनी आपला हा ठेवा आपलासा केला आहे… हेच खरे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महारुद्र जे मारुती रामदास

कलीमाजि जे जाहले रामदास

श्री समर्थ रामदास स्वामींना मारुतीचा कलियुगातील अवतार असे म्हणतात. त्यांना सुरुवातीपासूनच हनुमंता बद्दल अत्यंत ओढ होती. हनुमानावर त्यांची श्रद्धा होती. भक्ती होती. प्रभू श्रीरामांनी त्यांना दृष्टांत दिला तेव्हापासून समर्थांनी ” समर्थ ” होईपर्यंत पुढे कार्य समाप्ती पर्यंत हनुमानाची अखंडित सेवा, साधना केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

शक्तीने मिळती राज्ये

शक्ती नसता विपन्नता

मोंगलांच्या आक्रमणाच्या काळात श्री रामदास स्वामींचा अवतार झाला. मोगलांनी जनतेला सळो कि पळो करून टाकले होते. त्यांची केव्हाही धाड पडायची. घरावर नांगर फिरवला जायचा. आपलीच माणसे क्षुल्लक वतनांसाठी, जहागिरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान कोणाकडेच नव्हता. समाज अस्वस्थ झाला होता. समाज आपले शौर्य, धैर्य विसरला होता. या सर्व परिस्थितीवर समर्थांनी मात केली. आणि बल उपासनेसाठी त्यांनी हनुमंताची मंदिरे स्थापन करण्यास सुरुवात केली. शक्ती आणि भक्ती चा प्रचार केला. मठ स्थापन केले. त्यातून तरुण बलवान व्हायला लागले.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग २ – लेखक : श्री विकास आमटे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग २ – लेखक : श्री विकास आमटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

बाबा आमटें ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा…

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

(२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

‘‘क्या है? ’’ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!)

इथून पुढे – – 

चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, ‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है? ’’

मला झेपलंच नाही. मी म्हणालो, ‘‘जी हाँ, क्यूं नहीं? ’’

गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत! ’’

हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो.

एवढ्यात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, ‘‘आईये. ’’ *दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता! *

आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढयात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले!

मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, ‘‘ये आपने क्या किया? ’’

मला जवळ घेत ते म्हणाले, *‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना! ’’*

मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक *विजयकुमार चोपडम* पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात,

*‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे! ’’*

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि ‘का अडवली? , ’ असं विचारलं की म्हणत,

*‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’*

यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली.

इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत,

*‘‘Great heroes of history are nothing to me. The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life… ’’*

याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा *‘साधा’* माणूस होता, सर्वासाठी ‘Accessible’ आणि ‘Approachable’ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता.

न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण *‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे, ’* असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, *‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढया सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं. ’’*

एकूणात काय, तर ‘देव’ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं.

बाबा आमटे हा ‘घाईतला’ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता.

‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे, ’’ असं ते म्हणत.

बाबांना *‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढ्य इंजिन’* असं संबोधणाऱ्या *कवी कुसुमाग्रजांनी* बाबांवर *‘संत’* नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

 

सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात…

भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या

विराट वृक्षावर

अपराजित कुऱ्हाड मारणारा तू –

 

वणव्याच्या समोर

घनघोर पाऊस होणारा

दु:खाच्या समोर

फक्त निर्भेळ माणूस होणारा

 

दुबळ्या दयेच्या चिखलातून

माणुसकीला बाहेर काढणारा तू –

 

अरे आम्ही आहोत असे करंटे

 

की आमच्या पेठेत लागतात पताका

फक्त मंत्री आले तर

 

सोनेरी अंबारीचे ऐरावत

जेव्हा रस्त्याने झुलू लागतात

 

तेव्हा आमचे हिशेबी हात

जुळून येतात छातीवर

 

आणि तुझ्यासारखे संत

 

ऐहिकाच्या प्रपंचातील

ईश्वरी अंशाचे रखवालदार

निघून जातात

गस्त घालीत अंधारात

 

उद्ध्वस्त मनांच्या मोहल्ल्यातून

आसवांच्या दलदलीतून

दु:खानं उसवलेल्या दुनियेवर

अमृताचं सिंचन करीत…

 

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा

चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन

तू तुझ्या मार्गानं जा

 

मागे वळून पाहू नकोस

 

जो हिशेब कधी केला नव्हतास

तो यापुढेही करू नकोस

 

तुला साथसोबत आम्ही करणार नाही

 

आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश

तुझ्या रात्रीवर पडणार नाही

 

तुझ्या अलौकिक वेदनेसाठी

आम्ही रडणार नाही

 

आमच्या जयघोषांच्या जमावातही

तू राहणार आहेस एकटा

 

दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा

अगदी एकटा

 

पण असेच एकाकीपण

लाभले होते ख्रिस्ताला

 

ज्याच्या हाताचा ठसा

मला दिसतो आहे तुझ्या हातावर

 

असेच एकाकीपण

लाभले होते बुद्धाला

 

ज्याच्या प्रज्ञेचे किरण

मला दिसताहेत तुझ्या पथावर

 

हीच तुझी सोबत

आणि हेच तुझे संरक्षण…

 

‘जेथे जाशी तेथे..

तो तुझा सांगाती

चालवील हाती- धरोनिया.. ’

– समाप्त – 

लेखक : श्री विकास आमटे

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त दोन पैसे?? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ फक्त दोन पैसे?? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

फक्त दोन पैसे????

जे काम करोडोंच्या जाहिराती करू शकत नाहीत, ते काम दोन पैशांची श्रद्धा_आणि_परंपरा करून दाखवते.

कुंभमेळ्याचं ‘२ पैशांचं’ मार्केटिंग सिक्रेट; जेव्हा मालवीयजींनी इंग्रज व्हाईसरॉयलाच बुचकळ्यात टाकलं!

मंडळी, आजच्या काळात एखादा इव्हेंट गाजवायचा असेल, तर काय लागतं? तगडा ‘मार्केटिंग बजेट’, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, गुगल ॲड्स आणि बरंच काही. पण तुम्हाला माहितीये का, जगातील सर्वात मोठ्या मानवी समूहाला एकत्र आणण्यासाठी फक्त ‘दोन पैसे’ पुरेसे होते? हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, फक्त दोन पैसे!

ही गोष्ट आहे १९४२ सालची. जग दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत होरपळत होतं. तिकडे ब्रिटनने भारतीयांना त्यांच्या संमतीशिवाय युद्धात ढकललं होतं, ज्यामुळे देशात संतापाची लाट होती. याच काळात अलाहाबादमध्ये (आताचं प्रयागराज) कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्रजांना कुंभमेळ्यात प्रचंड रस होता, पण तो श्रद्धेपोटी नाही, तर त्यातून मिळणाऱ्या ‘करा’मुळे (Tax). त्यांनी कुंभला एक ‘महान जत्रा’ म्हटलं होतं आणि तिथून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याचा त्यांचा प्लॅन होता.

अशातच भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले. त्यांच्यासोबत होते महामना पंडित मदन मोहन मालवीय. मालवीयजींचं प्रयागवर आणि कुंभवर अतोनात प्रेम होतं. कुंभमध्ये जमलेली ती अथांग गर्दी, लोकांची अढळ श्रद्धा आणि शिस्त पाहून व्हाईसरॉय पार थक्क झाले. त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावत होता — एवढ्या लोकांना इथे कसं काय आणलं गेलं?

व्हाईसरॉयनी आश्चर्याने मालवीयजींना विचारलं, “पंडितजी, या जत्रेसाठी तुम्ही किती मार्केटिंग केलं? एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमवण्यासाठी प्रसिद्धीवर नक्की किती पैसा खर्च झाला असेल? ” मालवीयजींनी शांतपणे उत्तर दिलं, “फक्त दोन पैसे! “

लिनलिथगो यांना वाटलं मालवीयजी थट्टा करतायत. त्यांनी पुन्हा विचारलं, “काय म्हणालात? फक्त दोन पैसे? हे कसं शक्य आहे? ” तेव्हा मालवीयजींनी आपल्या खिशातून एक छोटं ‘पंचांग’ काढलं आणि व्हाईसरॉयच्या हातात ठेवलं. ते म्हणाले, “हे पंचांग फक्त दोन पैशांना मिळतं, जे प्रत्येक भारतीयाच्या घरात असतं. यात कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला कुंभ होईल आणि कोणत्या मुहूर्तावर स्नान असेल, हे स्पष्ट लिहिलं असतं. लोक ही तारीख पाहतात आणि आपोआप घराबाहेर पडतात. त्यांना बोलावण्यासाठी कोणत्याही जाहिरातीची किंवा सरकारी निमंत्रणाची गरज नसते. “

खरं सांगायचं तर, हे उत्तर ऐकून व्हाईसरॉय निरुत्तर झाले. ज्या काळात दळणवळणाची साधनं कमी होती, रेडिओ-टीव्हीचा पत्ता नव्हता, त्या काळात एका छोट्या पंचांगाने कोट्यवधी लोकांना एका ठिकाणी आणलं होतं. हाच तो ‘सांस्कृतिक अल्गोरिदम’ आहे, जो आजही जगाला बुचकळ्यात टाकतो.

आज २०२६ मध्ये आपण जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा परिस्थिती किती बदलली आहे, नाही का? नुकताच २०२५-२६ चा महाकुंभ पार पडला, जिथे ६६ कोटींहून अधिक लोकांनी श्रद्धापूर्वक डुबकी लावली. आजही तिथे डिजिटल तंत्रज्ञान, AI चॅटबॉट्स आणि हाय-टेक सुरक्षा आहे, पण मूळ आधार मात्र तेच ‘पंचांग’ आणि तीच ‘श्रद्धा’ आहे. अगदी अलीकडे, फेब्रुवारी २०२६ मध्ये केरळच्या ‘कुंभ’वरून (महामघम उत्सव) वाद सुरू झाला, तिथल्या पुलाच्या बांधकामावर बंदी आली, पण भाविकांची ओढ मात्र तसूभरही कमी झाली नाही.

मंडळी, मदन मोहन मालवीयजींची ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. जेव्हा तुमची संस्कृती आणि परंपरा लोकांच्या मनाशी जोडलेली असते, तेव्हा तुम्हाला महागड्या ‘ब्रँडिंग’ची गरज उरत नाही. इंग्रजांनी कुंभवर कर लावून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला, पण भारतीयांनी मात्र पंचांगाच्या बळावर आपली परंपरा जिवंत ठेवली.

आजच्या ‘व्हायरल’ जगात आपण अनेकदा मूळ गोष्टी विसरतो. पण लक्षात ठेवा, जे काम करोडोंच्या जाहिराती करू शकत नाहीत, ते काम दोन पैशांची श्रद्धा आणि परंपरा करून दाखवते.

तुम्हाला काय वाटतं? आजच्या हाय-टेक युगातही आपली ही पंचांग आणि मुहूर्ताची परंपरा तितकीच प्रभावी आहे ना?

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३ आणि ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३ आणि ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – श्लोक ३.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |

पुढे वैखरी राम आधी वदावा |

सदाचार हा थोर सांडू नये तो |

जगी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ : पहाटेच्या वेळी मनात श्रीरामाचे चिंतन करावे. त्यानंतर वाणीने त्याचे नाम उच्चारावे. जगात सदाचाराला अत्यंत महत्त्व आहे; तो कधीही सोडू नये. सदाचाराने वागणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

पहाटेची वेळ किती रम्य आणि शांत असते! आपल्या संस्कृतीत तर या वेळेला “रामप्रहर” असे सुंदर नाव आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटे मन स्वच्छ, प्रसन्न आणि स्थिर असते—जणू एखाद्या शांत डोहातील निर्मळ पाणी. म्हणूनच दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करावी, असे समर्थ सांगतात. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार.

प्रभाती मनात रामाचे स्मरण केले, त्याचे नाम घेतले, तर त्या नामाचा संस्कार दिवसभर मनावर राहतो. सकाळी ऐकलेले एखादे गाणे जसे दिवसभर ओठांवर रेंगाळते, तसेच पहाटे घेतलेले भगवन्नाम मनात गुंजत राहते. जसे एखादा रुग्ण सकाळी घेतलेल्या औषधामुळे दिवसभर सुदृढ राहतो, तसेच प्रभातीचे नामस्मरण मनाला अंतर्गत बळ देते.

समर्थ पुढे सांगतात—“पुढे वैखरी राम आधी वदावा”—म्हणजे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी मुखाने, वाणीने रामनाम उच्चारावे. पूर्वी घराघरांत सकाळी स्तोत्रपठण, भजन, आरती यांची परंपरा होती. आजच्या वेगवान जीवनात ती कमी होत चालली आहे. अनेकदा प्रश्न विचारले जातात—याचा काय उपयोग? परंतु प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर मोजता येत नाही; तरीही ती निरर्थक ठरत नाही.

प्रभातीचे चिंतन मनावर सुसंस्कार घडवते. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या पडद्याने नव्हे, तर भगवंताच्या नामाने झाली, तर एकाग्रता, सकारात्मकता आणि संयम यांची वाढ होते. वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते.

“प्रभाते” या शब्दाचा आणखी एक अर्थ लावता येतो—जीवनाची पहाट, म्हणजेच बालपण. लहान वयातच चांगल्या विचारांचे, सद्गुणांचे सिंचन झाले, तर ती शिदोरी आयुष्यभर साथ देते. म्हणूनच बालसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित होते.

समर्थ पुढे म्हणतात—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”

सदाचार म्हणजे शुद्ध, पवित्र आणि सुसंगत आचरण. सत्ता, संपत्ती किंवा पद यामुळे कोणी थोर होत नाही; तर ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे, तो खरा थोर. तुकाराम महाराज म्हणतात—“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ” संतांचे आचरणच त्यांची खरी ओळख असते. अशा सदाचरणाचा अंगीकार करणारा मनुष्यच जगात खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

नामस्मरण, शुद्ध विचार आणि सदाचार—या त्रिसूत्रीने दिवसाची आणि जीवनाची पहाट उजळून निघते.

स्वसंवाद

  • मी माझ्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करतो का?
  • मी करीत असलेले नामस्मरण ही केवळ सवय आहे की अंतर्मनाला बळ देणारी जाणीवपूर्वक कृती?
  • माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता राखण्याचा मी प्रयत्न करतो का? (क्रमशः)

– – – – – 

– – श्लोक ४.

मना वासना दुष्ट कामा नये रे |

मना सर्वथा पापबुद्धि नको रे |

मना धर्मता नीती सोडू नको हो |

मना अंतरी सार विचार राहो ||४||

अर्थ : हे मना, दुष्ट वासना, अहितकारक इच्छा मनात येऊ देऊ नकोस. पापबुद्धीला स्थान देऊ नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस. अंतर्यामी जे खरे, श्रेष्ठ आणि शाश्वत आहे त्याचाच विचार नांदू दे.

मनाच्या श्लोकांची एक साखळी आहे. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”या श्लोकात ते त्या सदाचाराची अंतर्गत पायाभरणी स्पष्ट करतात. सदाचार बाह्य वर्तनातून दिसतो खरा; पण त्याची सुरुवात मनातून होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” एक वेळ भ्रष्टाचार, अनितीने वागणे हे लौकिक व्यवहारात खपून जाईलही पण राघवाच्या पंथावर चालायचे तर मनामध्ये वाईट विचार आणि अनितीची वागणूक कशी बरं चालेल?

मन अत्यंत चंचल आहे. तेच आपले मित्र आणि तेच आपले शत्रू. म्हणूनच आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती. ” कधी कधी मनात येणारे विचार इतके तीव्र, भयंकर आणि नकारात्मक असतात की आपण स्वतःच दचकतो. पण असे विचार येणे ही मानवी प्रवृत्ती आहे; त्या विचारांना आपण पोषक खाद्य पुरवायचे की ते सोडून चांगले विचार जाणीवपूर्वक जोपासायचे हे आपल्या हातात आहे.

वाईट विचार मनात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सहज येतात. दूरदर्शनवरील धारावाहिक, हिंसाचार आणि भडक प्रणयदृश्ये असलेले चित्रपट, समाजमाध्यमे अशा विचारांना हातभारच लावतात. परंतु चांगले, उन्नत, हितकारक विचार जाणीवपूर्वक जोपासावे लागतात. हीच साधना आहे. पूर्वी मोठी माणसे सांगत, “चांगले बोला. आपल्या भोवती देवतांचा वास असतो त्या देवता तथास्तु म्हणत असतात. ” दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शब्दांनाही शक्ती असते. आपले विचार, शब्द आणि कृती यांचा परस्पर संबंध असतो. आपण जे वारंवार चिंततो, तेच आपण बोलतो; आणि जे बोलतो, ते आचरणात उतरते. म्हणूनच सद्विचारांचा जागर करणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे.

आपल्यासमोर दोन वाटा असतात. त्या म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे दीर्घकालीन हित आणि मूल्याधिष्ठित निवड असे म्हणता येईल. तर प्रेयस म्हणजे तात्कालिक सुख, आकर्षक वाटणारे पण शेवटी अहितकारक ठरणारी निवड.

तात्पुरत्या लाभासाठी अनैतिक मार्ग स्वीकारणे, सहजसोप्या सुखासाठी मूल्यांचा त्याग करणे ही प्रेयसाची उदाहरणे. पण कठीण असले तरी योग्य मार्ग स्वीकारणे, इतरांच्या आनंदात आनंद मानणे, मदतीचा हात पुढे करणे हे श्रेयसाचे लक्षण.

समर्थ म्हणतात, “मना धर्मता नीती सोडू नको हो. ” धर्मता म्हणजे धर्माचरण. पण धर्माचरण म्हणजे केवळ धार्मिक आचार नव्हे; तर न्याय, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संवेदनशीलता. नैतिकेने वागण्याची जबाबदारी. परस्त्रीला मातेसमान किंवा बहिणीसमान मानले पाहिजे असं काही कायदा सांगत नाही. परंतु भारतीय संस्कृतीने सांगितलेली नीतीमूल्ये आचरणात आणायची ठरवली तर आपल्याला सुरुवात तिथूनच करावी लागेल. असे झाले तर अनेक अनर्थ टळतील.

नीती म्हणजे आचरणातील सुसंगती. सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे. आजच्या काळात प्रसारमाध्यमे, सामाजिक वातावरण, स्पर्धेची धडपड या सर्वांचा परिणाम मनावर होत असतो. कधी कधी अनैतिक मार्गाने यश मिळताना दिसते. मग मन म्हणते, “ मीच कशाला चांगले वागू? माझ्यामुळे असा काय फरक पडणार आहे? ” पण समाजाचा पाया हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत नीतीवर उभा असतो. आपला छोटा तडजोडीचा निर्णयही मोठ्या अध:पतनाची सुरुवात ठरू शकतो.

या श्लोकात समर्थ पुढे म्हणतात, “मना अंतरी सार विचार राहो. ” सार म्हणजे जे खरे, टिकाऊ, मूल्याधिष्ठित आहे ते.

.. क्षणिक लाभ, राग, द्वेष, मत्सर—हे असार.

.. प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, संयम—हे सार.

आपली वाटचाल प्रेयसकडून श्रेयसकडे व्हावी, हीच समर्थांची अपेक्षा आहे. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक प्रभावी असतो. मनावर कठोर बंधने लादण्यापेक्षा छोट्या, पाळता येतील अशा नियमांनी सुरुवात केली तर संस्कार हळूहळू दृढ होतात. श्रेयसाचा मार्ग हा टप्प्याटप्प्याने चालायचा असतो. मन जसे घडवू, तसे जीवन घडते. म्हणूनच समर्थांचे हे आवाहन केवळ उपदेश नाही; ती अंतःकरण शुद्धीची दिशा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःशी थोडा संवाद साधू या.

स्वसंवाद

  • माझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना मी ओळखून त्यांच्यावर संयम ठेवतो का?
  • तात्कालिक फायद्यासाठी मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या निर्णयांत श्रेयस अधिक आहे की प्रेयस?
  • ‘सार विचार’ मनात टिकून राहावेत यासाठी मी रोज काय करतो?

– – क्रमशः श्लोक ३ आणि ४. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग १ – लेखक : श्री विकास आमटे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग १ – लेखक : श्री विकास आमटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

बाबा आमटें ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा…

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

१९९९ सालचा जानेवारी महिना. त्या दिवशी तापमान असेल ५-६ डिग्री सेन्टीग्रेड. बाबांचा पोशाख मात्र नेहमीचाच. खादीची बनियन आणि चड्डी. कंबरेला पट्टा. *पंतप्रधान अटलजी* मला बाजूला घेत म्हणतात,

‘‘विकास, तेरे बाप को ठंड नहीं लगती क्या?’’

मी त्यांना म्हणालो, ‘‘नहीं अटलजी, ये पैलवान आदमी है!’’

पुढे बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला. भारताने नुकतीच पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. अणुकार्यक्रमाचे जनक *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम* या पुरस्कार सोहोळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यादरम्यान त्यांच्याकडे जात बाबांनी त्यांना सुनावलं,

‘‘Dr. Kalam, we don’t need bombs, we need toilets! ‘National Highways’ have become national toilets! If you say we are a nation of Mahavir, Buddha, Guru Nanak and Gandhi, we don’t need bombs!’’

डॉ. कलाम अचंब्याने पाहतच राहिले! (आजच्या परवलीच्या *‘स्वच्छ भारत अभियाना’*ची नीव बाबांनी कधीच रचली होती.)

‘मेरा बाप पैलवान आदमी था..’ असं मी कायम म्हणतो याचं कारण- जसे बाबांनी अनेक प्राणघातक हल्ले, अपघात, आजारपणं पचवली, तशी त्यांनी विधायक कार्य असो वा संघर्ष- ‘ठाम भूमिका’ ही घेतलीच. त्यांनी कधीही कचखाऊ धोरण अवलंबलं नाही. त्यामुळे बाबांचं शारीरिक अस्तित्व संपल्यानंतर माणसं रडली निश्चित; पण खचली मात्र नाहीत.

ब्लड कॅन्सरशी लढता लढता बाबांनी ९ फेब्रुवारी २००८ ला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या या अखेरच्या आजारपणात रात्रीचा दिवस करत उपचार करणारे डॉ. विजय पोळ आणि विलास मनोहर त्यावेळी बाबांसोबत होते. बाबांची मनोभावे सेवा करणारे देवानंद सलामे, कमल उमरोटकर होते. इंदू, रेणुका, मी आणि भारतीही आनंदवनातच होतो. प्रकाश-मंदा लोकबिरादरी प्रकल्पावर. आमची पोरं बाहेर होती.

रात्रीपर्यंत सर्वजण आले. तो पूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा बाबांना बघण्यासाठी लोकांची रीघ कायम होती. दोन किलोमीटरची माणसांची रांग. कुठलाही आवाज नाही. फक्त बाबांना बघून हात जोडण्याची आस असलेली, सर्वदुरून आलेली ही माणसं. हजारोंची गर्दी लोटली होती.

केळीच्या पानात गुंडाळून आणि वरनं मीठ टाकून आपलं दफन केलं जावं, ही बाबांची इच्छा होती. त्याला दोन वैज्ञानिक कारणं होती. बाबा म्हणत, *‘‘एका मृतदेहाचं दहन करायला जेवढी लाकडं लागतात तेवढ्यात हजार माणसांचा तीन-चार दिवसांचा स्वयंपाक होऊ शकतो! ’’* (हा विचार अहमदाबादच्या ‘सद्विचार परिवारा’ने रुजवला होता. म्हणून बाबा-इंदूने त्यांचे फॉर्म्स भरत दहनाऐवजी दफन जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं.)

दुसरं म्हणजे _‘पशूपंछी भोजन करे, तन भंडारा होएँ’_ या संत कबिरांच्या दोह्याप्रमाणे, मर्त्य शरीरावर पशुपक्ष्यांचा, किड्यामुंग्यांचा अधिकार असतो. तेव्हा मृतदेह त्यांच्या हवाली केला जावा; जेणेकरून हे शरीर भंडाऱ्याप्रमाणे विरून जाईल! त्याप्रमाणे बाबांच्या देहाचं दफन केलं गेलं. ही तीच अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिलेची जागा- जिथे बाबांच्या जिवाला जीव देणारे त्यांचे शेकडो कुष्ठमुक्त सोबती वास करत होते.

९ फेब्रुवारी काय किंवा १० फेब्रुवारी- आनंदवनाला सुट्टी नव्हती. त्या दिवशीही काम सुरूच होतं. पॉवरलूम्स तशाच धडधडत होत्या. हातमाग खट्खट् आवाज करत चादरी-टॉवेल्स विणत होते. वेल्डिंग मशीन्स चरचर आवाज करत जोडणी करत होत्या. आनंदवन थांबलं नव्हतं.

२०१४ हे बाबा आमटेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष कसं ‘साजरं’ करणार, याबाबत नेहमीच कुणी ना कुणी विचारत. अशी विचारणा करणाऱ्यांना मी सांगत असे की, आनंदवनात साजरं होतं ते *‘कार्याचं गुणात्मक विस्तृतीकरण’! * समाजातील जास्तीत जास्त दुर्बल घटकांपर्यंत कार्याचा विस्तार हाच आमच्यासाठी सोहोळा. आनंदवनाच्या इतिहासात कधी कुणाची जयंती, पुण्यतिथी साजरी झाल्याचं मला स्मरत नाही. आणि भविष्यातही असं होणं नाही.

*बाबा आमटे* या व्यक्तीशी किती माणसं जोडली गेली होती याचा प्रत्यय आम्हाला ते गेल्यानंतर आला. बाबांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सुमारे तीन लक्ष तारांचा खच आनंदवनात पडला! अक्षरश: पोती भरभरून तारा येत होत्या.

असं काय होतं बाबांमध्ये ज्याने ही माणसं त्यांच्याकडे ओढली गेली आणि कायमची जोडली गेली? यात जशी राजकारण, प्रशासन, उद्योग, कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान-तंत्रज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांतली नावाजलेली मंडळी होती, तशीच देश काय आणि विदेश काय, समाजातल्या प्रत्येक स्तरातली लाखो सर्वसामान्य माणसंही होती. या अनुषंगाने मला काही छोटे-मोठे प्रसंग आठवतात ते सांगतो…

ते बहुधा १९५९ साल असावं. जबलपूरच्या ‘नवभारत’ दैनिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करणारी *चंद्र मोहन जैन* नावाची एक व्यक्ती आनंदवनात येते आणि काम बघून प्रभावित होत बाबांना म्हणते,

_‘‘बाबा, आपके हाथों को सेवा कि खुशबू आती है. ’’_ परत जाऊन जैन ‘नवभारत’मध्ये बाबांबद्दल विस्तृत लेख लिहितात. या लेखावरून जैन यांचा दैनिकाच्या मालकाशी वाद होतो. मालक म्हणतात,

_‘‘तू माझं दिवाळं काढणार! राजकारण, हत्या, भानगडी यांच्या बातम्या सोडून असे विधायक कार्याविषयीचे लेख छापून आले तर माझं दैनिक लवकरच बंद पडेल. ’’_

यावर जैन उत्तरतात, _‘‘जगात खून, आत्महत्या, अत्याचार यांव्यतिरिक्त चांगल्या गोष्टीही खूप घडत असतात. बाबा आमटेंनी आपलं आयुष्य कुष्ठकार्यासाठी वेचलं आहे. या माणसाचं काम सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. बाबा आमटेंविषयी छापल्यामुळे दैनिकाचं सक्र्युलेशन वाढणार नाही हे मला माहिती आहे. पण काळजी नसावी. मी बाहेर पडतो. तुम्ही तुमचं सक्र्युलेशन वाढवा, ’’_ असं म्हणत तत्क्षणी ते आपला राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकतात.

*हीच चंद्रमोहन जैन नावाची व्यक्ती पुढे जाऊन सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारक बनते… ज्यांना आपण सर्व ‘रजनीश-आचार्य- भगवान- ओशो’ म्हणून ओळखतो. *

जेआरडी टाटांना बाबांविषयी प्रचंड स्नेहादर होता. मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान बाबा मुंबईला असताना जेआरडींनी त्यांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, _‘‘मी आनंदवनाला काय मदत करू शकतो? ’’_

बाबा उत्तरले, _‘‘मी आपला ऋणी आहे. पण आनंदवनाला मदतीची गरज नाही. उलट, समाजाने नाकारलेल्या ज्या माणसांच्या कष्टांतून आनंदवन उभं राहिलं आहे, त्यांच्यात आज समाजातल्या मूलभूत समस्यांवर मात करण्याची जिगर आहे! ’’_

२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

_‘‘क्या है? ’’_ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री विकास आमटे

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ – 

– – श्लोक पहिला 

मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणत्याही महान कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने होणे ही भारतीय परंपरा आहे. समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ अनंत या राघवाचा ||

अर्थ : जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या—ईश्वराच्या—अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.

कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाच्या मंगलस्तवनाने केला जातो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे—तो अडथळे दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.

समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.

गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे—सरस्वतीचे—स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही.

शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी—या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.

या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे—आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.

समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात—रामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात—आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत.

आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.

आत्मचिंतनासाठी – – – 

  • कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?
  • माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?
  • शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?
  • श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?

– – –

– – श्लोक दुसरा

मना सज्जना भक्तीपंथेची जावे |

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||

अर्थ : हे सज्जन मना, तू भक्तीमार्गानेच वाटचाल कर. त्या मार्गावर चालल्यास तुला निश्चयाने परमेश्वराची प्राप्ती होईल. समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग कर आणि समाजहिताची, कल्याणकारी कर्मे पूर्ण भावाने आचर.

या श्लोकात समर्थ रामदासांनी मनाला “सज्जन” असे संबोधले आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. एखाद्याला सज्जन म्हटले, की त्याच्याकडून सज्जनासारखेच वर्तन अपेक्षित धरले जाते. कदाचित म्हणूनच समर्थांनी मनाला सज्जन म्हटले असावे—मनावर विश्वास ठेवत, पण त्याचबरोबर त्याला जबाबदारीची जाणीव करून देत.

मन स्वभावत: चंचल आहे. त्याच्या असंख्य वाटा आहेत. परंतु त्या सर्व वाटांमधून अंतिमतः हितकारक ठरणारी वाट म्हणजे भक्तीमार्ग—हे समर्थ येथे ठामपणे सांगतात.

ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग असे तीन मार्ग सांगितले जातात. त्यापैकी सर्वसामान्य माणसाला सहज आचरता येणारा, जीवनाशी सलग राहणारा आणि व्यवहारात उतरवता येणारा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. म्हणूनच सर्व संतांनी एकमुखाने भक्तीमार्गाचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. समर्थही येथे तेच सांगतात—भक्तीमार्ग हा सरळ, सोपा आणि थेट ईश्वराकडे नेणारा आहे.

खरं तर जीव हे परमेश्वराचेच स्वरूप आहे; पण अज्ञानामुळे तो त्या परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. जेव्हा जीव भक्तीमार्गावर चालू लागतो, तेव्हा ईश्वर त्याच्यासमोर उभा राहतो—ईश्वर संमुख होतो. आणि एकदा का ईश्वर संमुख झाला, की त्याच्या चरणांपर्यंतची वाटचाल आपोआप सुरू होते. म्हणूनच समर्थ येथे “भक्तीपंथ” हा शब्द वापरतात. हा केवळ विचारांचा नव्हे, तर प्रत्यक्ष चालण्याचा—आचरणाचा—मार्ग आहे.

या श्लोकातील तिसरी आणि चौथी ओळ विशेष अर्थपूर्ण आहे—

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे”

येथे ‘जनी’ म्हणजे केवळ सामान्य लोक असा अर्थ अभिप्रेत नाही. जनी म्हणजे समाजातील सज्जन, विचारवंत, ऋषितुल्य व्यक्ती—ज्यांच्या विवेकावर आणि आचरणावर समाज उभा राहतो. अशा सज्जनांना जी गोष्ट निंद्य वाटते, ती आपण टाळावी; आणि जी गोष्ट त्यांना वंद्य, म्हणजेच आदरणीय वाटते, ती पूर्ण भावाने आचरावी—हा या ओळींचा गाभा आहे.

आजच्या समाजजीवनात अनेक गोष्टी रूढ झालेल्या दिसतात. काही प्रथा, सवयी किंवा उत्सव साजरे करण्याच्या पद्धती काळानुसार बदलल्या आहेत. त्या सर्वच चुकीच्या आहेत असे नाही; पण त्या आपल्या संस्कृतीला, सामाजिक भानाला आणि संवेदनशीलतेला पूरक आहेत का, याचा विचार करणे आवश्यक आहे. लग्नसमारंभात आणि इतर वेळी डीजेचा वापर करणे, फटाके फोडणे, वाढदिवस प्रसंगी केक कापणे आणि दिवे विझवणे इ. सज्जन आणि विचारवंतांच्या दृष्टीने ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या समाजात सुसंस्कार वाढवतात, अशाच गोष्टींचा अंगीकार करणे—आणि ज्यामुळे समाजात विकृती, उथळपणा किंवा अनावश्यक अतिरेक वाढतो, अशा गोष्टी टाळणे—हेच समर्थ येथे सूचित करतात.

आपण इतरांनी केले म्हणून काही करायचे नसते. ज्या गोष्टी इतरांनी केल्या तर आपल्याला अस्वस्थ वाटते, त्या आपणही करू नयेत. आणि ज्या कृतींमुळे इतरांच्या मनात आनंद, समाधान किंवा प्रेरणा निर्माण होते, अशा कृती आपण कराव्यात. आधी स्वतः आचरणात आणले, मग सांगितले—हेच खरे नैतिक बळ आहे.

परमेश्वरप्राप्तीसाठी समर्थ ज्या भक्तीमार्गाचा उपदेश करतात, त्या मार्गावर चालण्यासाठी मन आणि आचरण शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. मन शुद्ध नसेल आणि आचरण स्वच्छ नसेल, तर भक्ती केवळ बाह्य स्वरूपाची राहते. म्हणूनच संतांनी आणि सज्जनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आहेत त्या टाळणे, आणि ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत त्यांचा स्वीकार करणे—हे भक्तीमार्गावरील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे.

आत्मचिंतनासाठी – – 

समर्थ मला “सज्जन मना” म्हणतात—मी स्वतःकडून तशी अपेक्षा ठेवतो का?

.. माझ्या दैनंदिन जीवनात भक्ती ही केवळ भावना आहे, की आचरणाचा मार्ग?

.. सज्जनांना निंद्य वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी मी अजूनही सवयीने करत आहे का?

.. माझ्या कृतींमुळे समाजात सुसंस्कार वाढतात की केवळ गोंधळ?

 – क्रमशः – श्लोक १ आणि २.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

… ती ‘आत्महत्या ‘ नव्हती… तो तुमच्या-आमच्या घरातल्या ‘मोबाईल’ने केलेला ‘मर्डर’ होता!

धप्प… धप्प… धप्प!

रात्रीचे २:३० वाजले होते.

गाझियाबादच्या एका सोसायटीतल्या ९ व्या मजल्यावरून तीन कोवळे देह खाली कोसळले.

– आणि त्यानंतर… सगळं संपलं.

– खाली रक्ताचा सडा आणि वर फक्त एक भयानक, जीवघेणी शांतता.

– – त्या रिकाम्या झालेल्या घरातल्या बेडवर आता फक्त तीन बाहुल्या पडल्या आहेत… पण त्या बाहुल्यांशी खेळणाऱ्या त्या १६, १४ आणि १२ वर्षांच्या चिमुरड्या हातांनी मात्र कायमची exit घेतली.

त्यांनी का जीव दिला?

गरिबीमुळे? .. नाही.

त्रास होता म्हणून? .. नाही.

– – त्यांना मारलं तुमच्या-आमच्या घरातल्या एका लाडक्या ‘पाहुण्याने’… ज्याचं नाव आहे ‘मोबाईल’!

टीव्ही ९ मराठीची बातमी वाचली आणि डोकं सुन्न झालं.

– – पोलिसांनी जे सांगितलंय, ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल.

– त्या मुली ‘व्हर्च्युअल गेम’ च्या जाळ्यात अशा अडकल्या होत्या की, त्यांना वास्तवातले – रक्ताचे आई-बाबा ‘दुश्मन’ वाटू लागले होते.

– – पालकांनो, हा फक्त ‘गेम’ नाही, हा ‘डिजिटल मर्डर’ आहे!

तुम्हाला वाटतंय, “माझं पोरगं हा गेम खेळत नाही, मी सेफ आहे? “

– गैरसमज काढून टाका डोक्यातून! हा गेम तर फक्त एक निमित्त आहे.

– – तुमच्या मुलाच्या हातातला ‘इन्स्टा रील्स’, ‘स्नॅपचॅट’ आणि ‘फ्री फायर’ हे सुद्धा त्यापेक्षा कमी नाहीत.

तुमच्या घरातली मुलं ‘जिवंत’ आहेत की ‘झोम्बी’ झालीत? बघा हे ३ सीन ओळखीचे वाटतात का :: 

१. “आई, तू गप्प बस ना! ” (लाज वाटणे):

– – जरा बघा मुलांकडे…

– तुमच्या मुलाला आता आईच्या हातचं साधं ‘वरण-भात’ किंवा ‘पोळी-भाजी’ नकोशी वाटते… आणि बाहेरचं ‘पिझ्झा-बर्गर’ किंवा ‘चायनीज’ भारी वाटतं?

– त्याला सणावाराला भारतीय कपडे घालायची किंवा तुमच्यासोबत बाहेर यायची लाज वाटते?

… सावधान! ते मूल शरीराने तुमच्या घरात आहे, पण मनाने ‘परदेशात’ गुलाम झालंय. त्याला स्वतःच्या रक्ताचाच तिरस्कार वाटू लागलाय.

२. डोळ्यात जीव नाही (The Zombie Stare):

– – तुम्ही मुलाला हाक मारता… एकदा, दोनदा, तीनदा. पण ते मान वर करत नाही. त्याचे डोळे स्क्रीनवर असे चिकटलेले असतात की, जगात काय चाललंय याचं भान नसतं.

– ते बाळ तुमच्यासमोर बसलंय, पण ते तिथे नाहीच आहे!

– त्याची नजर जिवंत माणसासारखी नाही, तर एखाद्या ‘झोम्बी’ सारखी झालीय.

– हे बघून तुमचं काळीज तुटत नाही का?

३. जेवणाचं टेबल की ‘स्मशान शांतता’?

– – घरातला हा सीन बघा, डोळ्यात पाणी येईल:

ताटात जेवण वाढलेलं आहे. पण जोपर्यंत आई युट्यूबवर व्हिडिओ लावून मोबाईल हातात देत नाही, तोपर्यंत पोरगं अन्नाचा घासही गिळत नाही.

आई आपल्या जगात, पोरगं मोबाईलच्या जगात.

एकाच छताखाली राहून आपण एकमेकांसाठी ‘अदृश्य’ झालोय.

घरात वाय-फाय फुल्ल आहे, पण संवाद ‘झिरो’ आहे.

– – जबाबदार कोण?

त्या तीन निष्पाप मुली? अजिबात नाही.

– – जबाबदार आपण आहोत!

– आपण आपल्या कष्टाचा स्मार्ट फोन त्यांच्या हातात दिला, पण बोलायला ५ मिनिटं वेळ दिला नाही.

– आपण त्यांना ‘अनलिमिटेड डेटा’ दिला, पण संस्कार मात्र ‘लिमिटेड’ दिले.

– आपणच आपल्या हाताने त्यांच्या बालपणाचा ‘सौदा’ केलाय.

उद्याची बातमी आपल्या शहरातली नको असेल तर…

– जेवताना स्क्रीन बंद: नियम म्हणजे नियम. अन्नाचा मान राखा, नात्याचा मान राखा. घास भरवताना आईचा स्पर्श हवा, स्क्रीन नको.

– मातीशी जोडा: त्यांना सांगा की इन्स्टावरचं जग खोटं आहे. मैदानातला घाम आणि घरातली माणसं खरी आहेत.

– मित्र बना: मुलांच्या जगात ‘पोलीस’ म्हणून नाही, तर ‘मित्र’ म्हणून शिरकाव करा. “तुला यात काय आवडतं? मला पण शिकव, ” हे प्रेमाने विचारा.

गाझियाबादच्या त्या तीन चिमुकल्या जीवांनी स्वतःचा बळी देऊन आपल्याला एक धडा दिलाय.

आज रात्री एक गोष्ट नक्की करा: 

जेव्हा तुमची मुलं गाढ झोपली असतील, तेव्हा त्यांच्या खोलीत जा.

त्यांच्या कपाळावर हळूच हात ठेवा आणि बघा…

हे तेच डोकं आहे का ज्याला आपण मांडीवर घेऊन थोपटायचो? की हे डोकं आता कोण्या ‘गेम’ने हायजॅक केलंय?

… त्यांना जवळ घ्या. त्यांना तुमची गरज आहे… मोबाईलची नाही.

वेळ जाण्याआधी सावध व्हा… 

ही पोस्ट आताच Save (Collection) मध्ये टाकून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांचं मोबाईलचं वेड हाताबाहेर जातंय, तेव्हा हे पुन्हा वाचा. तुम्हाला ‘नाही’ म्हणायची ताकद मिळेल.

एक कळकळीची विनंती: ही पोस्ट फक्त वाचू नका. तुमच्या वॉलवर फॉरवर्ड करा किंवा तुमच्या जोडीदाराला (नवरा/बायको) खाली टॅग करा. एका शेअरमुळे एखाद्या घरातला हरवलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो.

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares