मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नभ: स्पृशम् दीप्तम् ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

नभ: स्पृशम् दीप्तम् ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

– – – पराक्रमाने लावले आभाळाला हात !

शनिवार,२५ नोव्हेंबर,१९७२…सकाळचे आठ वाजून तेहतीस मिनिटे झालेली आहेत. पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वाघोली गावात कै.विष्णुजी शेकोजी सातव शाळेतील शेकडो विद्यार्थी वर्गात अभ्यासात दंग आहेत…बहुदा दुसरी तासिका संपत आलेली आहे. 

शाळेपासून जवळच असलेल्या लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या अर्थात एअर फोर्स बेस वरून प्रचंड आवाज करीत आणि वायूवेगाने उड्डाणे भरणा-या विमानांची लगतच्या गावांना आणि या शाळेतील विद्यार्थ्यांनाही एव्हाना जणू सवयच झाली होती…१९३९ पासून. ब्रिटीशांनी त्यांच्या रॉयल इंडियन एअर फोर्स बेस साठी हा विस्तीर्ण, उंच टेकड्या नसलेला परिसर निवडला होता.

दुसरी तासिका संपण्याची घंटा घुमली. वर्गावरील शिक्षक दुस-या वर्गांत जाण्यासाठी वर्गांबाहेर पडले. शाळेच्या व्हरांड्यातून बाहेर पडणा-या एका शिक्षकांचे लक्ष सहज आभाळाकडे वेधले गेले….एक विमान शाळेच्याच रोखाने येते आहे…पण या विमानाचा आवाज मात्र ऐकू येत नाहीये…असं होत नाही कधी…म्हणजे आजवर कधीही असं झालं नव्हतं कधी…विमान दूरवरून येत असताना त्याचा आवाज कानी येत नाही लगेच…पण जवळ आलं तर आवाज यायलाच पाहिजे! पण तसं काहीही घडत नव्हतं….काही क्षणांतच ते विमान शाळेच्या अगदी जवळ आलं…काळजीची बाब म्हणजे हे विमान अतिशय कमी उंचीवरच उडत येत होतं… 

शाळेची इमारत काही फार उंची असलेली नव्हती त्यावेळी…पण तरीही त्या विमानाची उडण्याची पातळी पाहता…ते विमान शाळेवर कोसळणार अशी खात्रीच होती…त्या विमानाकडे पाहत असणा-या शिक्षकांना काही प्रतिक्रिया देण्याची संधी बहुदा मिळाली नाही…शाळेच्या अगदी वरून विमान क्षणार्धात पलीकडे निघून गेले होते! 

पण…काहीच सेकंदांत तेथून काहीच अंतरावर असणा-या विमानाच्या धावपट्टीजवळच्या शेतातून आगीचा,धुराचा भला मोठा लोळ उठलेला दिसला….स्फोटासारखा आवाजही आला पाठोपाठ! भारतीय लष्करी हवाई दलाचं मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले होते…त्यातील शेकडो लिटर्स अतिज्वलनशील इंधनाने पेट घेतला होता….सर्वांगाला ज्वालांनी वेढलेल्या अवस्थेत वैमानिक विमानाबाहेर पडले आणि कोसळले…पुन्हा कधीही न उठण्यासाठी! अवघ्या ३९ वर्षांचे आयुष्य क्षणार्धात कर्तव्याच्या चितेवर राख होण्यासाठी निजले होते…भारताने एक महावीर वैमानिक गमावला होता! 

विंग कमांडर साहेब त्यादिवशी मिग-२१ मधून त्यांचे आठवे प्रशिक्षण उड्डाण करणार होते. या आधी साहेबांनी कॅनबेरा,स्पीटफायर आणि तत्सम लढाऊ विमाने मोठ्या कौशल्याने हाताळली होती  जोधपूर येथे हार्वर्ड विमानाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे १९५८ मध्ये ते आग्रा येथील जेट बॉम्बर कन्वर्जन युनिट (कॅनबेरा विमाने) मध्ये गेले. 

१९३३ मध्ये केरळात एका उच्चशिक्षित प्राध्यापक-प्राचार्य-शिक्षिका दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या आणि इंदोर येथे बालपण व्यतीत केलेल्या या साहेबांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून पाऊल ठेवले होते. १९६१ मध्ये आफ्रिकेतील कांगो मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय मिशन मध्ये साहेब फ़्लाईट लेफ्टनंट म्हणून साहेबांनी जबरदस्त उड्डाणे करून वायू सेना मेडल पटकावले होते. १९६० च्या आसपास साहेबांनी इराक देशातील वैमानिकांना इराक येथे जाऊन मिग-१५,मिग-१७ विमाने उडवण्यात प्रशिक्षित केले होते….हवेत असताना आगीने वेढल्या गेलेल्या एका विमानाचे त्यांनी सुरक्षित landing करून त्यांनी दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि ते विमानही वाचवण्यात यश मिळवले होते!

स्क्वाड्रन लीडर या जबाबदारीच्या पदावर असताना ६ ते २१ सप्टेंबर,१९६५ या दिवसांत साहेबांनी तब्बल सहा वेळा पाकिस्तानात खोलवर चढाई करून बिनचूक बॉम्बफेक करून पाकचे कंबरडे मोडले होते….पाकिस्तानी सेबरजेट विमाने आणि विमानविरोधी गोळीबाराला त्यांनी प्रत्येक वेळी चकवा दिला…..हे जीवघेणे धाडस होते! या धाडसाचे कौतुक करताना भारताने या शूर,धाडसी,कौशल्यवान वैमानिकाला भारताचे द्वितीय क्रमांकाचे वीरता पारितोषिक ‘महावीर चक्र’ प्रदान करून गौरवले. साहेबांनी याच पराक्रमाची पुनरावृत्ती १९७१च्या भारत-पाक युद्धातही करून दाखवली…बॉम्बर स्क्वाड्रनचे कमांडर असताना उत्कृष्ट नेतृत्व करीत साहेबांनी ५ आणि ७ डिसेंबर,१९७१ अशा दोन्ही दिवशी पाकड्यांच्या मियांवाली विमानतळावर बिनचूक हल्ला चढवून शत्रूला पळता भुई थोडी केली होती. याच युद्धात साहेबांनी शत्रूच्या रेल्वे स्टेशन्सवर आणि अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणांवर यशस्वी रॉकेट आणि इतर शस्त्रांनी हवाई हल्ले चढवून त्यांना नेस्तनाबूत केले..यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे उड्डाण कौशल्य,नेतृत्वगुण आणि हिंमत असावी लागते….देशाने साहेबांना या कामगिरीसाठी पुन्हा एकदा ‘महावीर चक्र’ दिले! याला लष्करी भाषेत Mahavir Chakra & Bar असे संबोधले जाते. दोनदा महावीर चक्र प्राप्त करणाऱ्या मोजक्या व्यक्तींच्या पंक्तीत साहेब मोठ्या सन्मानाने बसले! असा पराक्रम करणारे हे वैमानिक भारतीय वायुदलातील विंग कमांडर जग मोहन नाथ यांच्या नंतरचे केवळ दुसरेच अधिकारी आहेत. 

१९७२ च्या आरंभी साहेबांना पुण्याच्या लष्करी हवाई तळावर ऑफिसर इन्चार्ज फ्लाइंग या महत्त्वाच्या पदावर ग्रुप कॅप्टन पदोन्नतीवर नेमण्यात आले..त्यांच्या अनुभवाचा फायदा येथे असणा-या अनेक युवा वैमानिकांना होऊ लागला होता. अत्यंत मितभाषी असणारे साहेब एकदा का विमानाच्या कॉकपिटमध्ये बसले की संपूर्णपणे बदलून जात! लढाऊ विमाने उडवण्यावर त्यांचे प्रभुत्व होते. विविध प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याची एकही संधी ते दवडत नसत. मार्च १९७१ म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरु होण्यापूर्वी साहेबांनी पायलट-नेवीगेटर यांच्या जोड्या तयार करून घेतल्या होत्या…सराव व्हावा म्हणून. सराव करण्यासाठी त्यांनी बिहार,उत्तरप्रदेश,बंगाल येथे बंद केल्या गेलेल्या हवाईतळांचा लक्ष्य वेधण्याच्या सरावासाठी उपयोग करून घेऊन आपल्या अनुभवाची,बुद्धिमत्तेची,नेतृत्वगुणांची अनोखी चमक दाखवून दिली होती..त्यामुळे पाकिस्तानवरील प्रत्यक्ष हल्ल्यांत याचा खूप फायदा झाला! मिट्ट काळोखात केवळ ५०० फूट उंचीवर उडत जाऊन लक्ष्य जवळ येताच तब्बल ७ हजार फुटावर पोहोचून बॉम्ब टाकून पुन्हा तीनशे ते पाचशे फुटापर्यंत खाली झेप घेऊन परतीला लागण्याचा सराव उपयोगी न पडता तरच नवल. म्हणून साहेबांना हवाई दलाच्या प्रत्येक मोहिमेच्या तयारीसाठी खास बोलावून घेतले जाई! कित्येक वर्षांची तपश्चर्या होती या मागे.

नम्र पण नर्मविनोदी स्वभाव, संगीताची आणि मर्सिडीज सारख्या कार्स चालवण्याची आवड जोपासणारे हे वैमानिक सहकारी वैमानिकांना धैर्य,शौर्य आणि भीती याबाबत सातत्याने मार्गदर्शन करीत. सर्वाधिक धोका असलेली उड्डाणे करायची असल्यास या साहेबांचे नाव आघाडीवर असायचेच. साहेबांचे दोन्ही बंधू हवाई दलातच कार्यरत होते. 

२५ नोव्हेंबर,१९७२…आज साहेबांनी मिग-२१ या विमानाची तपासणी करताना नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ घेतला. कारण हे विमान त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे पुणे विमानतळावर नेमणूक होण्यापूर्वी उडवलेले नव्हते. कोणतेही नवे विमान लवकरात लवकर पूर्ण शिकून घेण्याचा,त्याचा अनुभव घेण्याचा साहेबांचा परिपाठ होता….या आधी साहेबांनी या विमानातून सात training sorties (उड्डाणे) यशस्वीरित्या केली होती…हे त्यांचे आठवे प्रशिक्षण उड्डाण असणार होते. 

त्यांनी नेहमीच्या रुबाबदार पद्धतीने मिग-२१च्या कॉकपिटमध्ये प्रवेश केला…सहका-याचा सल्यूट स्वीकारत त्यालाही खास हवाई दल पद्धतीत सल्यूट केला…सर्व यंत्रणा कार्यान्वित करीत विमान धावपट्टीवर वेगाने पळवायला आरंभ केला…अत्यंत सफाईदाररीत्या मिग-२१ भला मोठा आवाज करीत हवेत झेपावले! पण हे मिग-२१ अपेक्षित उंची गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच दुर्दैवाने या विमानाचे एकमेव इंजिन बंद पडले…! विमान वेगाने जमिनीकडे झेपावू लागले…त्यातल्या शेकडो लिटर इंधनासह…ज्वालाग्राही इंधन! 

त्याचवेळी तिथल्या हवाईपट्टीवरून पुण्यातल्या एका डॉक्टर साहेबांचे खाजगी विमान आकाशात झेपावले होते..त्यांचा आणि एअर ट्राफिक कंट्रोलचा संवाद नेहमीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ एक मिनिटभर लांबला…तो संपल्यावर साहेबांनी संदेश उच्चारला…”वन फोर…इंजिन फेल्ड! इंजन बंद पडले आहे!” 

एकच इंजिन असते मिग-२१ मध्ये! 

“Ejecting? इजेक्ट करताय ना? छत्रीच्या साहाय्याने विमानाबाहेर उडी घेताय ना? विमानतळावरील सहका-यांनी त्यांच्याशी संपर्क स्थापित करून विचारले…”नाही! मी Belly Landing करतो आहे…म्हणजे विमान विमानाच्या पोटावर उतरवणार आहे….धावपट्टीजवळच्या शेतात! बाप रे! हे तर भलतेच धोक्याचे होते..या आधी मिग २१ असे उतरवलेले उदाहरण कुणाच्या ऐकिवात नव्हते..पण साहेब अनुभवी होते…ते हे करून दाखवतीलच अशी खात्रीच होती. शिवाय मिग २१ मधून उडी घेण्यासाठी पायलटच्या खुर्चीला वर उडवणारी जी यंत्रणा असते ती कार्यान्वित होण्यासाठी त्या विमानाने किमान तीनशे मीटर्सची उंचीवर असणे आवश्यक होते असे म्हणतात…ते विमान तर खाली कोसळत होते…शिवाय शाळेच्या इमारतीवर विमान कोसळू नये अशीही काळजी वैमानिकाने घेतली होती..त्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा वेळ म्हणजे काही क्षण खर्च झाले होते…धोका वाढला होता!

काहीच क्षणांत साहेब ते विमान घेऊन धावपट्टीच्या दूरवरच्या टोकावर आलेले दिसले…धावपट्टीच्या मागे असलेल्या, हिरवीगार पीक आलेल्या शेतात साहेबांनी विमान उतरवले….विमान वेग कमी कमी होत पुढे जाताना दिसत होते….पण…त्या शेतात असलेल्या एका खडकावर विमान आदळले….विमानातल्या शेकडो लिटर अति ज्वालाग्राही इंधनाने पेट घेतला…ते विमान आता जणू एक चिता झाले होते…विमानतळावर आता एक विचित्र शांतता पसरली होती..ग्रुप कॅप्टन श्री.पद्मनाभ गौतम साहेब या चितेवर पहुडले….आणि काहीच क्षणांत त्यांनी भारतमातेच्या सेवेला पूर्णविराम दिला! 

‘महावीर’ पद्मनाभ गौतम साहेबांनी त्या दिवशी त्या क्षणी समयसूचकता दाखवली…स्वत:चे प्राण धोक्यात घालून,विमानातून उडी मारण्याचे टाळून शेकडो विद्यार्थ्यांचा,नागरिकांचा जीव वाचवला…आणि प्राणार्पण केले! 

दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी सातव हायस्कूलमध्ये हुतात्मा विंग कमांडर पद्मनाभ गौतम साहेब यांना मौन श्रद्धांजली वाहिली जाते. मागील काही वर्षांपूर्वी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी साहेबांच्या कुटुंबीयांची या शाळेस भेटही घडवून आणल्याचे समजते. कारकीर्दीत सहका-यांमध्ये गौतम साहेबांची ‘पीट’ (अर्थात पीटर) आणि काहीवेळा ‘बॉब’ ही टोपणनावे प्रसिद्ध होती. साहेबांच्या पत्नी बंगळुरू येथे राहावयास गेल्या. लग्नाच्या वेळी केवळ १८ वर्षांच्या असलेल्या श्रीमती बाला यांनी साहेबांचे देहावसान झाल्यानंतर जिद्दीने बी.ए. आणि एम.ए. (इंग्लिश. प्रथम क्रमांक) पदव्या मिळवल्या. पुढे त्यांना Hindustan Aeronautics Limited च्या staff college मध्ये Assistant Personnel Officer म्हणून नेमले गेले. नंतर त्यांना faculty म्हणून जबाबादारी दिली गेली. त्यांच्या दोन्ही कन्या आणि एक मुलगा इतर क्षेत्रात कार्यमग्न असतात. साहेबांच्या दोन्ही बंधूंनी विंग कमांडर पी.अशोका आणि विंग कमांडर अजिथ हे सुद्धा भारतीय वायुदलातील उत्तम Test Pilot म्हणून नावारूपास आले ! 

 (विंग कमांडर कृष्णास्वामी पार्थसारथी साहेब यांनी इंग्रजीत लिहिलेला लेख, honour point fb पेज, bharat rakshak डॉट कॉम, विकीपिडीया, The Tribune, Deccan Herald, Samvaad world इत्यादी तसेच वर्तमानपत्रातील कात्रणे,फोटो (की. एस. नायर यांचे सौजन्य) ,बातम्या, सातव शाळेचे मुख्याध्यापक श्री.निंबाळकर सर, अजिनाथ ओगले सर इत्यादी माध्यमांतून या लेखासाठी माहिती एकत्रित केली आहे. या सर्वांचा मी आभारी आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’!’ – लेखक : डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’!’ – लेखक : डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

बोली काय अथवा भाषा काय, ती एकठायी अशी नसते. तिच्या उगमाचं अचूक स्थान सांगता येत नाही. तथापि, अनुमानानं भाषेचा शोध नोंदवता येतो. तशा नोंदी अनेक चिंतकांनी मांडून भाषेच्या वाटा दाखवलेल्या आहेत. पण हे अंतिम सत्य नव्हे. हा सत्याच्या दिशांचा शोध होय, असे खात्रीने सांगता येते.

चूल आणि भाषा यातील भाषिक नजाकत किंवा बोलीची आशयघनता असलेले शब्दधन मराठीच्या शब्दसंस्कृतीला मिळालेले वरदानच! खेडी आज पुष्कळशी बदललेली असली तरी अन्न हे पूर्णब्रह्म हे वचन अंगीकारत उदरभरणाचे खेड्याचे प्रधानस्थळ चूल तर आजही आहेच. हा चुलीचा परिसर भाषिक ऐश्वर्याचा एक असाधारण दाखलाच. चूल म्हटले की, महिला, श्रम, सैपाक, साधने, नावे आणि भाषा असा एक एकोपा कालानुकाल असलेला.

आज यात परिवर्तन जाणवत असले तरीही घरोघरी मातीच्या चुली आणि या अशा चुलीभोवती असलेले भाषिक ऐश्वर्य आमच्या मराठीची अभिजात शानच अधोरेखित करणारे आहे.

या गावसंस्कृतीचे उदरभरण करणा-या या चुलीभोवती मराठी बोलीतील शब्दधन काठोकाठ भरलेले आढळून येते. ही मराठी भाषिक वैभवाची समृद्ध अशी बाब म्हणायला हवी. खेड्यातील चुलीचा हा अवाढव्य आणि महत्त्वाचा परिसर चुलीशी जूडून असलेले भाषिक वैभवच दाखविणारा आहे. ग्राम, प्रदेश, संस्कृती, बोली, शब्द-धन, श्रम आणि महिला यांच्या एकसामायिक संघटनामधून आलेले हे भाषिक वैभव फारच मोलाचे आणि भाषिक उपकृततेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

चूल परिसरातील बोलीभाषेचे वैभव सोदाहरण पाहूया. कंसात त्या त्या शब्दांचा साररूप अर्थ दिला आहे. जसे की, सनकाडी (चूल पेटविण्यास लागणारी शीघ्र ज्वलनशील अशी वाळलेली अंबाडीची काडी), हुडवा (शेणाच्या वाळलेल्या गोव-या सांभाळून ठेवण्यासाठी हवाबंद केलेला ढीग, साठवण), ढेपसा (विझून शांत झालेली गोवरीची राख, जी खेड्यात आजही अनेकदा दात निर्मळ करावयास दंतमंजनासारखी वापरली जाते), वतोल (अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी न्हाणीघरात असलेला भलामोठा चुल्हा, जणू चुलीचा थोरला भाऊच), आहार (चुलीतला धगधगता लालबुंद निखारा), इसान (खूप गरम पाण्यात थंड पाणी मिसळून अंघोळीस अनुरूप करावयाची पाण्याची स्थिती), जळतन (वाळलेला लाकूडफाटा, केरकचरा जो चूल पेटविण्यास हवा असतो तो) चूल प्रज्वलीत करण्यासाठी ही सगळी साधनसामुग्री आणि त्याभोवती असलेले हे असे मोलाचे भाषिक-धन मराठीत सलग एकाठायी आलेले आढळत नाही.

गाव-चुलीवर केवळ सैपाक होत नाही, तर तिथे साधनभाषा आणि अनोखी शब्दसंपदाही नांदत असते. आता हे पहा, काठोट (भाकरीचे पीठ मळण्यासाठी दोन कान असलेली लाकडाची मोठी परात किंवा पराता), बेलने (गव्हाची पोळी लाटण्यासाठी दोन हातांनी पोळी करावयाचा रूळ), बुडगे (पितळी लहान पेला), येळनी (खापराची मोठी वाटी किंवा वाटा), ही गावचुलीची भाषा. तव्यावरची भाकरी परतवण्यासाठी ही भाषा उलथण्याला सराटा म्हणते. पाणी ठेवण्याच्या खापरी भांड्यांना ही गाव-माणसं माथन, केळी, बिनगी अशा अनेक नावांनी या भांड्यांची ओळख करून देतात.

गावी किंवा वावरात जाताना भाकर-चटणी ठेवायला येथे टिफीन नसतो. तिथे असतो पालव (कापडाचा जुना तुकडा) बाजारात जाताना सॅक, पिशवी कुठली? इथे तो असतो झो-या किंवा खलत्या. गावी, गरीबाघरी संसारात धातूची भांडी ती कुठली! मातीचा, खापराचा, गरीबीची संसार हीदेखील गावाची भाषिक, सामाजिक अभिजात अशीच ओळख पूर्वापारची. इथला सगळा संसार गाडगी-मडकी यांचाच. जिन्नस ठेवायला इथे असते उतरंड. म्हणजे खापरी भांड्यांच्या आतल्या घरातल्या रांगा किंवा चळती. या मडक्यांनाही येथील भाषेत अनेक नवी नावे असतात. गाडगं, मडकं, खापरी, सुगडे, डेरा इत्यादी. सारांश काय तर स्थळ, घटना, प्रसंग बदलला की, या खापराच्या वस्तू नवा शब्दांचा पेहराव करून वावरतात हे खास वैशिष्ट्य! चुलीचाच हा भवताल, भाषेचा नवा आयाम दाखविणारा!

शिवाय, चुली म्हटले की, जिभेच्या चवीचा चवदार तृप्तीचाही नजराणाच. या चुलीवर रटरटणाऱ्या किती तरी पदार्थांना एक हटके चव आहे आणि भाषेचीही त्यांना अवीट गोडी आहे. उदा. पुरणाची पोळी बुडवून खाण्यासाठी एक पातळ गोडसर पदार्थ बनवतात ते असते आळण. सगळी धान्य एकत्रित करून अशा पिठांच्या बनवलेल्या पौष्टिक भाकरीला म्हणायचे बेलडीची भाकर. हीच भाकर खान्देशात कयन्याची भाकर असते. हिरव्या हरभऱ्याची कोवळी पाने कुटून त्यात चटणीमीठ घालून जो तयार होतो तो असतो घोळाणा. जगातल्या कुठल्याही सॅलडला पराभूत करेल एवढा अस्सल हा पदार्थ. घोळाणाचे भाषांतरही अशक्य असा चवदार हा पदार्थ. नाव, भाषा, शब्दही लज्जतदार!

गावभाषेतील चूलपरंपरेत वसून असलेल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा नाद आहे आणि भाषा म्हणूनही खास अशी खुमारीही आहे. वळवट, सरगुंडे, बोटवे हे येथील महिलांनी अपार कष्ट करून बनवलेले भातांचे प्रकार आहेत. नूडल्सची ही आदिम रूपे आहेत. पण नूडल्सला मागे टाकणारी. गव्हाचा मूळ स्रोत वापरून वळवट, बोटवे केले जातात. साखर, दूध, तूप घालून खाल्ला जाणारे हे मुलायम स्निग्ध पदार्थ मूलतः सणासुदीला खाण्यात येतात. अळूची पाने इथे चमकुरा होऊन आलेली असतात. फळभाज्या उन्हात वाळवून ठेवतात. त्यांना उस-या म्हटले जाते. तसेच गूळ आणि पीठ घालून जेवणात गोड बनवलेला पातळसा पदार्थ खेडूतांच्या ताटात येतो तो लाभडे होऊन. हे धन जतन करायला हवे.

चूल ही आहार आणि आरोग्याचीही अन्नपूर्णाच. गावाची भाषा चुलीने अधिक रसदार आणि लयदार ठेवली यात काहीच शंका नाही. अशा एकेका स्थळाचा भाषिक महिमा सांगणारे अन्नपूर्णेचे नवे कोश सचित्र, साधार सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. हे तगडे परंतु सर्वेक्षणाचे, कष्टाचे काम आहे. हे घडले नाही तर एक मोठा ग्रामस्तरीय शब्दऐवज आपण गमावून बसू. मग आपल्याहाती उरेल ती फक्त रूखरूख! या अशा संपन्न गावरहाटीत रोज ताटात येणाऱ्या भाज्यांची नाम-भाषाही नूतन, वेगळी, रसरशीतच आहे! जसे की, कोथिंबीरऐवजी संबार, बटाटेऐवजी आल्लू, ढेमशाऐवजी दिलपसंद, छोट्या काकड्याऐवजी शैलन्या किंवा शेन्ना, भली मोठी काकडी याऐवजी वाळकं, भेंडी असं म्हणण्याऐवजी बोंडं किंवा भेंडरं म्हणणं. वांग्यांची गावाकडे बैंगनं झालेली असतात.

ज्या त्या फळ आणि भाज्यांना मातीतल्या सुवासाला धरून नावे देण्याची गावभाषेची ही रीत मराठी बोलीभाषेची चव आणि या बोलीची खचितच श्रीमंती वाढविणारी आहे. मुख्यत्वे ही सारीच्या सारी बोलीप्रवण शब्दसंपदा मातीचा आणि येथील समग्र समाजजीवनाचा भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, कालिक आणि महिलांच्या श्रमनिष्ठेचा अमोल ठेवाच! कुठलीची भाषा एकल नसते. एकट्याची नसते. भाषेचे पाझर दूर आणि खोलवर वाहाते राहिलेले असतात आणि ते समाजाच्या चलनवलनातून अखंडित राहिलेले असतात. समाज आटला की भाषा आटते. हे एवढे भाषिक मौलिकत्व जतन करण्याची जबाबदारी गावमाणसांसह जशी गावाची आहे तशी ती आपल्यातल्या प्रत्येकाचीही आहेच!

लेखक : डॉ. केशव स. देशमुख

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आषाढ तळावा.. श्रावण भाजावा.. भाद्रपद उकडावा.. !” लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आषाढ तळावा.. श्रावण भाजावा.. भाद्रपद उकडावा.. !लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सुश्री शोभा जोशी ☆

 – – – पण हे असंच का??

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं??

१) आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे!

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते!

म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.

शिवाय; पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा Instant Romantic अंतर्बाह्य “आषाढ डायट” जगात शोधूनही सापडणार नाही!

२) श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून श्रावणात “भाजलेलं” खाणं सर्वोत्तम आहे.

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी… ” असं म्हंटलेलं आहे.

३) भाद्रपद म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात “उकडलेलं” खाणं अगदी योग्य आहे.

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच! नाही का?

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ११ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ११ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

“लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधिषूदासीनता ॥ ११ ॥”

अर्थ : (भक्ताच्या) लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्मे करीत राहणे (म्हणजेच) त्याच्या विरोधी (प्रतिकूल) विषयात उदासीनता (ठेवणे) होय.

विवेचन : मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जिवाचे मुख्य कर्तव्य कोणते आहे याचा अभ्यास आपण मागील लेखांत केला आहे. त्यामुळे साधना पथावर चालू झालेल्या मनुष्याचे अंतिम ध्येय भगवंताची प्राप्ती हेच आहे किंवा हे ध्येय पक्के झाले आहे असे आपण समजून. इथून पुढे ध्येय म्हणजे अंतिम ध्येय अर्थात ईश्वराची प्राप्ती असे आपण समजूया.

मनुष्य जेव्हा कोणतेही ध्येय नक्की करतो, तेव्हा त्याला त्याच्या पूर्तीसाठी काही अधिक कर्मे करावी लागतात. तर काही नेहमीं करीत असलेल्या कर्मांचा त्याग करावा लागतो. शास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास त्या साधकाला काही विहित कर्मे करावी लागतात, तरी काही कर्मे त्याच्यासाठी निषिद्ध असतात, ती त्याला सोडावी लागतात, अर्थात त्यांचा त्याग करावा लागतो. विहित कर्मांमध्ये काही लौकिक असतात तर काही वैदिक असतात. इथे एक मुद्दा अथवा तत्व अंगीकारणे अतिशय महत्वाचे आहे असे वाटते. परमार्थ असो वा प्रपंच कोणताही निर्णय जर विवेकाने घेणे अतिशय आवश्यक असते, अन्यथा साधकाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यासाठी नित्यानित्यविवेक उपयुक्त ठरतो.

भगवतांच्या प्राप्तीसाठी भक्त प्रल्हादाने आपल्या (अर्थात भक्तीच्या आड येणाऱ्या)

वडिलांचे ऐकले नाही, भरताने त्यांना माता कैकयीचे ऐकले नाही, मिरेने विषाचा प्याला सहज तोंडाला लावला, आपले सोंग उघडे पडले तर आपला शीरच्छेद होणार आहे माहीत असूनही जीवा महाला छत्रपती रूपात पालखीत बसून गड उतरलाच, अहो ही भक्ती नव्हे तर काय? नव्हे! ही तर भक्ती साधनेतून निर्माण झालेली शक्ति.

वरील उदाहरणातून भक्ति करणे म्हणजे नक्की काय? आणि भक्तीची शक्ति कशी काम करते हे दिसून येते. अशी भक्ति करताना भक्त प्रल्हादाने भगवंताची प्राप्तीसाठी काय काय करावे लागते, ते आपल्या निदर्शनास येईल, नव्हे भक्तीसाठी जिवा महाला प्रमाणे आत्मार्पण ही करावे लागते, असे आपल्या लक्षात येईल.

सर्व संत सांगतात की भगवतांसाठी शक्य असेल ते सर्व करावे, प्राण देण्याची तयारी ठेवावी आणि साधना करताना प्राण गेला तर जीवनाचे सार्थक झाले असे समजावे…. !

(देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥)

(दास. ०४. ०८. ०८)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः … 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येसूबाई – लेख क्र. ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ येसूबाई – लेख क्र. ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

आम्ही येसूबाई शिर्के! “आस्ते कदम, महाराज गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराज ” म्हणजेच आबासाहेबांची स्नुषा आणि या सिंहाच्या छाव्याची पत्नी! समाधान इतकच आहे की आमची एवढीच ओळख न राहता, स्वराज्य टिकवण्यासाठी कोणत्याही हाल अपेष्टा सहन करणारी, गादीवर बसण्याचा शाहूंचा अधिकार असतानाही त्यांना औरंगजेबाच्या पिंजऱ्यात सोडून राम राजांना गादीवर बसवणारी, धूर्त, त्यागी येसू!

तसं आम्हाला राजकारण व युद्ध यांचं बाळकडू, कर्तबगार सरदार, आमचे वडील, पिलाजीराव शिर्के यांच्याकडूनच मिळालेलं! युवराज्ञी होणं म्हणजे काय असतं हे तर बालवयातच सोसावं लागलं. शिवाजी महाराजांनी संभाजी राजांसह आग्र्याहून सुटका करून घेतली हे तुम्हाला ठाऊकच आहे. पण त्यावेळी शंभूराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना दडवून ठेवले होते व युवराजांचा काळ आला अशी आवई उठवली. ती खरी ठरवण्यासाठी आम्हाला विधवेचं जीवन जगावं लागलं. नवरा जिवंत आहे हे ठाऊक असून काळजावर दगड ठेवावा लागला. “स्वराज्याचे लचके तोडणारा मग तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही” हे ब्रीद असल्यामुळे आमच्या सख्या भावाबरोबर युद्ध करावे लागले. आम्ही जिंकलो पण आमचं माहेर कायमच तुटलं आणि भोसल्यांचा एक शत्रू वाढला. त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागले.

आबासाहेबांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर बसले पण संकटांची मालिकाच त्यांच्यापुढे उभी राहिली. तसे राजकारणात ते आमची मसलत घ्यायचे. सल्ला विचारायचे. त्यामुळेच त्यांनी आम्हाला ‘ स्त्री सखी राज्ञी जयति ‘ असा शिक्का बहाल करून शिक्के कट्यारीचे पद दिले होते. त्यादिवशी, हो! त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना परोपरीने सांगितले “जाऊ नका. स्वकीयांनीच विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरच वातावरण अजूनही चांगलं नाही. दगा फटका होण्याची शक्यता आहे. ” पण हट्टी स्वभाव! आणि पुढचं सगळं विधीलिखित घडायचं होतं नं!

औरंगजेबाने कपटानं त्यांना कैद केलं. पण आम्ही डगमगलो नाही. आम्हाला ठाऊक होतं, हा सिंहाचा छावा कशालाच घाबरणार नाही. अगदी मृत्यूलाही नाही! स्वराज्यावर कोणतीही आच येऊ देणार नाही.

खरं वैधव्य आल्यावर आम्हाला मात्र हा साज शृंगार उतरवून हातात तलवार घ्यावी लागेल, हे ध्यानी आलं. आता आमची कसोटी होती. रायगडाला औरंगजेबाचा वेढा पडला. आम्हाला शिवरायांची शिकवणच होती कि प्रसंगी गड किल्ले जाऊ द्यावेत ते परत मिळवता येतात पण स्वराज्य टिकवावे ते परत मिळवता येत नाही. आम्ही आपली बाजू आता कमकुवत आहे हे मनोमन जाणून, ताबडतोब रामराजांना राज्याभिषेक केला. आमचाच पुत्र वारसा हक्काने राजा झाला असता पण रामराजांना मानणारी सरदार मंडळी बरीच होती. त्यामुळे अंतर्गत वाद कमी करण्यासाठी आम्ही ही खेळी केली आणि राजा, राजधानी तातडीने जिंजीला हलवली. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू दिला नाही. आणि आठ नऊ महिने आम्ही गड लढवला. अखेर औरंगजेबाची सरशी झाली आणि त्याने आम्हाला व आठच वर्षांच्या आमच्या शाहूला कैदेत टाकलं. त्याच्याच छावणीत ठेवलं. त्यामुळे छावणीचा मुक्काम जिथे असेल तिकडे आमची फरपट व्हायची. त्याही काळात आम्ही शाहूंना राज्यकारभार आणि युद्धाचे धडे देत राहिलो. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र दुसरे शिवाजी गादीवर बसले. पण राज्यकारभारात ते निष्णात नसल्यामुळे प्रधानमंत्री म्हणून मुत्सद्दी पेशव्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कर्ज काढून, फौजा उभारून, सर्व शत्रूंचा पराभव केला. सगळे सरदार एकत्र आणले व स्वराज्य मजबूत करायला सुरुवात केली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आमची दिल्लीला रवानगी करण्यात आली. दिल्लीला अंतर्गत बंडाळी, भाऊबंदकी, तंटे सुरू झाले. याचा फायदा घेऊन पेशव्यांनी आमच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. ‘ मराठ्यांनी दिल्लीकडे वळून सुद्धा पहायचं नाही’ या अटीवर त्यांनी शाहूंची सुटका केली पण आम्हाला ओलीस ठेवले. कदाचित शाहूंची सुटका करण्यामागं हा उद्देश असेल की आता छत्रपती पदासाठी भावाभावात भांडणे सुरू होऊन, मराठ्यांचा पाडाव करणे सहज साध्य होईल. आणि आम्ही ओलीस असल्यामुळे मराठे मोंगलांना त्रास देणार नाहीत. पण मुत्सद्दी कारभाऱ्यांनी दोन स्वतंत्र गाद्या निर्माण केल्या. शाहूंना सातारची गादी व दुसरे शिवाजी यांना कोल्हापूरची गादी दिली.

ज्या सय्यद बंधूनी फारूख सियरला गादीवर बसविले, त्याच्याशीच त्यांचे वितुष्ट निर्माण झाले आणि फारुख सियरला संपविण्यासाठी सय्यद बंधूंनी मराठ्यांकडे मदतीचा हात मागितला. त्यावेळी मराठ्यांशी तह करावा लागला. तहा मध्ये पहिली अट आमच्या सुटकेची होती. अखेर फारूख सियरचा शेवट झाला. आणि महंमुद शाह गादीवर बसला.

बारा वर्षांच्या दिल्लीच्या वनवासातून आमची सुटका झाली आणि आम्हाला पुत्र भेटीचा अपूर्व आनंद मिळाला. आम्हाला शाहूंचा अभिमान वाटला. मराठ्यांचे राज्य कलेकलेने वाढत चालले होते. आपले निशाण नर्मदा पार गेलेले पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आणि आम्ही सुखाने डोळे मिटले. पण ही कैदेतली २९ वर्षे कशी काढली ते आमचं आम्हालाच माहित!

वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं कि‌ आमच्या त्यागाची, कर्तृत्वाची दखल इतिहासाने कधीच घेतली नाही. केवळ एक स्त्री होतो म्हणून!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रखुमाई रूसली…! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रखुमाई रूसली…! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

“उद्या तुम्ही कुठे म्हणजे कुठे जाणार नाही.. नेहमी तुम्ही दुसर्‍यांची सेवा घेता.. उद्याचा दिवस माझा.. कळले ना?” रुक्मिणीने ठणकावून विठ्ठलाला सांगितले..

” हो ग.. मी का तुझ्या शब्दाबाहेर आहे.. तू म्हणशील तसे..” विठूरायाने मान डोलावली..

रामप्रहरी विठुरायाच्या कानी आवाज आला.. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता..’ त्याने डोळे उघडले.. शेजारी रखुमाई झोपली होती.. तो तसाच उठला आणि निघाला त्याच्या जनीकडे.. तिचे दळण दळून येईपर्यंत इथे रखुमाईने गरम पाणी काढून ठेवले होते.. “आलात दळण दळून.. बसा अंग चोळून देते.. स्नान झाल्यावर खायला देते तोवर तरी थांबा..” विठुरायाने परत होकार भरला.. “मागणे हेचि माझे देवा, दुजेपणा दुरी ठेवा, मी तू ऐसी नको उरी, जनार्दनकृपा करी..” रखुमाई आत गेली आहे तोवर याने लगेच श्रीखंड्याचे रूप घेऊन नाथांच्या घरची वाट धरली.. तिथे पाणी भरून होईतो. “नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जावो पाहे..” ती आर्त हाक ऐकून त्याचे पाय वळले कान्होपात्रेकडे.. तिला दिलासा देऊन घाबरत विठुराया आले घरी.. समोर रखुमाई थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा घेऊन उभीच होती.. 

” आता हे तरी शांतपणे खाणार कि अजून कुठे जायची घाई आहे?”

” मी कुठे जाणार तुला सोडून? बाकी थालीपीठ उत्तम झाले आहे ग..”

” हो ना.. मग आता दुपारी काय खाणार ते सांगा..”

” दुपारी भाजी भाकरी कर छान.. मी तर म्हणतो तो सावता कधीचा बोलावतो आहे तर एकदा त्याच्या मळ्यात जाऊन येऊ दोघे..”

” मी नाही येत. जा तुम्हीच..” चिडून रखुमाई बोलली.. पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठुराया निघाला.. “कांदा मुळा भाजी.. अवघी विठाई माझी..” सावताच्या मळ्यातील थोडी ताजी भाजी रखुमाईचा राग कमी व्हावा म्हणून घेतली.. तोच एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला..

“केशवाचे ध्यान धरूनी अंतरी मृत्तिके माझारी नाचतसे ” असे म्हणत बाळाला तुडवणारा गोरा कुंभार दिसला.. त्या बाळाला वाचवून त्याला त्याच्या हवाली करण्याच्या गोंधळात भाजी कुठेतरी राहून गेली.. तसेच मातीने भरलेले कपडे घेऊन तो पंढरपुरी परतला.. पण आज रखुमाईने भांडायचे नाही असे ठरवले होते ना.. “कपडे बदलून या.. तोपर्यंत भाकर्‍या करायला घेते..” तिने गरम भाकर्‍या करायला घेतल्या.. पण त्या काही त्याच्या घशाखाली उतरेना. तुपाची वाटी आणि नेवैद्य घेऊन उभा असलेला नामदेव सतत त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला.. आपण नेवैद्य ग्रहण करेपर्यंत तो काही खाणार नाही.. हा विचार पिछा सोडेना.. रखुमाईला भाकरी वाढ सांगून विठुराया आला नामदेवांनी.. तो म्हणतच होता “तरी वेणुनादी जेवण करा गोडु..” त्याच्या नेवैद्याचा घास घेऊन निघाला तर देहूला उन्हात “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी” असे गात असलेला तुकाराम दिसला.. त्याच्या डोक्यावर सावली धरली.. आणि शेवटी घरी परतला..

” थकला असाल.. जरा दम घ्या.” असे रखुमाईने सांगितले.. तिच्याकडे कृतज्ञतापूर्वक पाहून तो जरा कलंडला.. संध्याकाळी उठला.. “चल आपण दोघे सारीपाट खेळू..” त्याने रखुमाईला सांगितले..

“बघा हां, आपण खेळायला बसू.. आणि परत तुम्हाला काहीतरी आठवेल.. मग मात्र मी चिडून इथून निघून जाईन..”

” नाही असे होणार..” त्याने हसून तिची खात्री पटवली.. त्याच्या मोहक हास्याच्या जाळ्यात तीही अडकली..

खेळ रंगात आला.. आणि “विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले..” अशी साद आली.. त्या चार भावंडांकडे कसे दुर्लक्ष करणार.. डाव अर्धवट सोडून तो निघाला.. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवायला.. त्या चार भावंडांना भेटून विठुराया आला खरा.. पण तोवर त्याची रखुमाई चिडून खरेच निघून गेली होती.. हि गोष्ट सर्व संतांना समजली. सर्वांनी येऊन तिची मनधरणी केली.. “तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना.. एकल्या विठुरायाला संसार पेलेना..” पण ती हि एवढी हट्टी.. ती ऐकेचना.. शेवटी ती त्याच्यापासून वेगळी झालीच.. 

आता गेली अठ्ठावीस युगे तो विठुराया तिची विनवणी करतो आहे.. “येग येग रखुमाई, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी..”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नीरजा भनोत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ नीरजा भनोत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

आज आपल्यापैकी खुप जणांना नीरजा भनोत कोण हेही माहीत नसेल . 

नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची 

‘अशोक चक्र‘ हे वीरता पदक मिळवणारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगनेला विसरून गेले . 

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये “सीनियर पर्सर” म्हणून काम करणारी मुलगी. 

5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. 

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. 

नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले. 

नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले .. त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रके प्रवाश्यांपर्यंत पोहोचविली. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती .. तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. 17 तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला.

नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला ‘ माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.’ 

भारताने नीरजाला “अशोक चक्र” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने तिला “तमगा-ए-इन्सानियत” हा सर्वोच्च पुरस्कार दिला. 

अमेरिकेने “जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम” अवार्ड हा वीरता पुरस्कार देवून नीरजाला सन्मानित केले.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विचार तर कराल …! ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

विचार तर कराल..! ☆ श्री जगदीश काबरे ☆

परमेश्वर चराचरात भरलेला आहे, असं भक्तांचंच तत्वज्ञान सांगतं, तर मग असाल तिथंच आपल्या परमेश्वराची पूजा, अर्चा, प्रार्थना, आराधना करा ना, त्यासाठी मंदिरं, मशिदी, चर्चेस कशाला उघडावी लागतात?

लक्षात घ्या, कोणत्याही कागदावर अधिकृत नोंद नसलेली आणि कसलेही कर न भरणारी देशातली प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे ती धर्माच्या पुजाऱ्यांची. एवढा अमाप पैसा या पुजारी मंडळींवर हा देश देवाधर्माच्या भीतीपोटी विनाकारण खर्च करतोय.

परमेश्वर जर प्रत्येकाचा बाप आहे, तर त्याच्याशी बोलायला, त्याची साधना करायला आपला बाप आणि मुलं यांच्यात मध्यस्थ हे पुजारी लागतात कशाला? घरात तुमच्या बापाशी बोलायला तुम्ही बापाच्या पायाशी पैसा दान करता काय?

काय जो देवधर्म पाळायचाय तो आपल्यापुरता आणि व्यक्तिगत भक्तीपुरता पाळा आणि पुजारी टाळा, पैसा वाचवा आणि तो आपल्या कुटुंबासाठी लावा किंवा शाळा, दवाखाने उभे करायला दान करा.

देवाधर्माच्या नावावर प्रचंड पैसा कमवायची अगदी मोजक्या लोकांच्या हातातली कुठलाही कर न भरणारी आणि सामान्य धार्मिक लोकांचे शोषण करणारी ही इंडस्ट्री आहे.

देवधर्माला खरंच पैसे लागतात का, याचा एकदा शांत विचार करा. भक्ती आणि भक्त हा अतिशय व्यक्तिगत, मामला आहे. तुम्ही देव मानत असाल तर त्याच्या नामस्मरणात तल्लीन रहा ना, आणि तेही तुमच्या स्वतःच्या भाषेत, त्यासाठी मध्यस्थ, कर्मकांडं यांची अजिबात गरज नाही.

ज्याची देवावर खरी श्रद्धा आहे, त्याला देवधर्मावर एकही पै खर्च करावी लागत नाही. देवाच्या आणि भक्ताच्या नात्यात पैसा अजिबात लागत नाही. पैसा जिथं लागतो तिथं तो धंदा झाला, भक्ती नाही. आपल्या देवाशी आपणच एकट्यानं केलेला आपला संवाद म्हणजे अध्यात्म, खरी भक्ती, खरा धर्म. आणि आणि देवाच्या भक्तीसाठी मध्यस्थी करणाऱ्या दलालांवर खर्च होणारा पैसा हा आहे अधर्म.

जगाला आता एकाही देवळाची, मशिदीची, चर्चची गरज नाही. कारण मुळात चराचरात देव भरलेला असेल तर त्याची अशी बंदिस्त ठिकाणं करण्याची गरजच काय?

खरी गरज आहे ती शाळा, दवाखाने, पाण्याच्या सोयी, अन्न यांची. पैसा तिकडं वळवा आणि जगाला सुखी करा, स्वतः सुखी व्हा.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्रवासी आणि नावाडी…” लेखक – डॉ. सचिन लांडगे☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्रवासी आणि नावाडी…” लेखक – डॉ. सचिन लांडगे☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर 

एक जुनी गोष्ट आहे. आपण खूपदा वाचली असेल.. एकदा एक प्रवासी त्याच्या छोट्या बोटीतून नदी ओलांडत असतो. अचानक त्याची बोट खडकावर आपटून फुटते व प्रवासी पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतो..

भाग एक –

प्रवासी वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आरडाओरडा ऐकून एक प्रवासी वाहतूक करणारा नावाडी आपली बोट घेऊन तेथे येतो.

प्रवासी त्याला जीव वाचविण्याची कळकळीची विनंती करतो.. त्याबदल्यात त्याची सगळी संपत्ती तो नावाड्याला देईल असे वचन देतो..

नावाडी त्याला आपल्या बोटीत घेतो..

भाग दोन –

जशी बोट पुढंपुढं जाऊ लागते, तसंतसं प्रवाश्याला त्यानं दिलेल्या वचनाबद्दल पश्चाताप होऊ लागतो..

तो जरासा सावरून नावाड्याला म्हणतो, जरी मी सगळी संपत्ती देईन असं वचन दिलं असलं तरी माझी बायकापोरं काही ते मान्य करणार नाहीत.. सबब मी तुला अर्धीच संपत्ती देईन..

.. यावर नावाडी काहीच बोलत नाही..

भाग तीन –

किनारा अगदी जवळ आल्यावर तर प्रवाश्याला आपण दिलेल्या अर्ध्या संपत्तीच्या वचनाचं सुध्दा खूपच वाईट वाटतं.. तो स्वतःशी विचार करतो की, नावाड्याने त्याला नदीतून वाचवून अशी कोणती मोठी गोष्ट केली आहे!! ती तर नावाड्यांची ‘ड्युटी’च असते.. आणि शेवटी माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही..? सगळ्या गोष्टी पैशात थोडंच मोजता येतात..!! जर नावाड्याने आपल्याला वाचविलं नसतं तर त्याला पाप लागलं असतं.. आपणच उलट नावाड्याला पाप लागण्यापासून वाचवलंय..!!

मग तो नावाड्याला म्हणतो, अर्धी प्रॉपर्टी काही शक्य नाही, गड्या.. मी तुला पाव हिस्सा देईल फारतर..

नावाडी तरीही काहीच बोलत नाही..

भाग चार –

किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो नावाड्याला दहा रुपये देतो, आणि म्हणतो- जा ऐश कर.. चहा वगैरे पी, आणि घरी जाताना मुलांसाठी काही बिस्किटं पण घेऊन जा..

…. थोड्या वेळाने जेंव्हा त्या प्रवाश्याच्या आजूबाजूला त्याचे मित्र गोळा होतात, तेंव्हा तर तो नावाड्याची खरडपट्टी काढू लागतो.. त्याला खडकावरून ओढून नावेत घेताना ज्या खरचटण्याच्या जखमा त्याच्या अंगावर झाल्या त्याबद्दल तो नावाड्याकडून भरपाईची मागणी करतो.. अन्यथा कोर्टात जाण्याची धमकी देतो..

गोष्ट संपली….

 **

तुम्हाला राग आला का प्रवाशाचा..?

पण त्याला शिव्या देण्यापूर्वी जरा थांबा..

– – – कारण हा प्रवासी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपलाच समाज आहे.. आणि तो नावाडी म्हणजे डॉक्टर..!!

…आणि ही गोष्ट आहे भारतातल्या वैद्यकीय परिस्थितीची..!!

**

… या गोष्टीतला भाग एक ”इमर्जन्सी रूम” मध्ये घडतो.. तेंव्हा डॉक्टर हा प्रत्यक्ष देवच असतो..

“डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे लागू द्या, पण याला वाचवा हो.. प्लिज डॉक्टर प्लिज”.. असं पंचवीसेक तरी नातेवाईक विनवत असतात..

** 

भाग दोन आयसीयू मध्ये घडतो, जेंव्हा डॉक्टर हा प्रत्यक्ष देव नसला तरी अजून देवदूत तरी असतोच..

** 

 … गोष्टीतला भाग तीन हा हॉस्पिटलच्या वॉर्ड मध्ये घडतो, जेंव्हा पेशंटला ICU मधून धोक्याच्या बाहेर काढलेले असते.. आता डॉक्टर हा एक तद्दन व्यावसायिक असतो.. आणि ट्रीटमेंट देणं हा त्याच्या ड्युटीचा भाग असतो.. त्यात त्यानं माणुसकी (एकतर्फी) जपणं भागच असतं..

** 

 … आणि भाग चार म्हणजे डिस्चार्ज घेण्याची वेळ..!! तेंव्हा मात्र डॉक्टर हा लुटारू असतो..

बिल भरताना ते सुरुवातीचे पंचवीसेक जण गायब असतात आणि आता नातेवाईकांसोबत वेगळाच मॉब समोर असतो.. आणि डॉक्टरची नजर “डॉक्टर, कितीही महाग औषधे लागली तर लागू द्या, सगळा खर्च आम्ही करू” असं म्हणणाऱ्या माणसाला शोधत असते..

…. आणि समोर बिल कमी करण्यासाठी किंवा बुडविण्यासाठी लोक डॉक्टरला त्यांच्याच हॉस्पिटलच्या उणिवा दाखवत असतात किंवा छोट्या मोठ्या लोकल पुढाऱ्यांचे फोन आणत असतात..

 

 – – – आणि, हे काही आजचंच नाही.. “ गरज सरो, आणि वैद्य मरो.. ” ही म्हण खूप जुन्या काळापासूनच आपल्याकडे प्रचलित आहे..

 

 असो… या गोष्टीचं सार इतकंच आहे की –

.….. तुम्हाला व्याधीतून बाहेर काढणाऱ्या किंवा तुमचा जीव वाचविणाऱ्या उपकारकर्त्याच्या प्रयत्नांची आणि कष्टाची जाणीव तरी ठेवा, किमान त्याच्या उपकाराची फेड अपकाराने तरी करू नका..

 

लेखक : डॉ. सचिन लांडगे

भुलतज्ञ, अहमदनगर.

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहो! कैलास जीवन… ओह! कैलास जीवन! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

अहो! कैलास जीवन… ओह! कैलास जीवन! ☆ श्री संभाजी बबन गायके 

भारताचे पहिली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कैलासवासी बिपीनजी रावत साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या संदर्भात मी त्यादिवशीच्या रात्री एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या निमित्ताने माझ्याशी अनेकांनी फोनवर संपर्क साधला होता.

एके दिवशी सिंहगडावर गेलो असता असाच एक फोन आला. पोस्टसंदर्भात सुरुवातीला सविस्तर बोलणे झाले. शेवटी पलीकडून ‘कुठे राहता? ” “भेटू या! ’ असे आमंत्रण आले. कुठे राहता? या प्रश्नावर मी उत्तर देताच “मग तर निश्चित भेटू शकतो आपण..! ” असे जवळकीने सांगणे झाले! संभाषणाच्या आरंभी त्यांनी त्यांचे नाव, आडनाव सांगितले होते.

“तुम्हांला कैलास जीवन कारखाना माहीत आहे! ” मी हो म्हणाल्यावर ते म्हणाले “दुपारी एक ते चार असतो मी कैलास जीवनमध्ये! ” मी विचारले, ”तिथे काय करता आपण? ” ते म्हणाले “रखवालदार आहे कंपनीचा! ” तोपर्यंत कोल्हटकर आडनाव आणि कैलास जीवन हा सहसंबंध माझ्या डोक्यात नव्हता. जिथे मी राहतो, त्याच्या अगदी जवळच कैलास जीवन असा फलक मात्र नित्य बघण्यात येई. हो, मात्र कैलास जीवनाची जाहिरात मात्र माझ्या खूप आवडीची होती. त्यातील आजी आजोबांच्या तळपायाला कैलास जीवन चोळताना आजोबांनी केलेला अभिनय अगदी अस्सल होता. शिवाय कैलास जीवन कोणत्याही कारणासाठी वापरता येते आणि चक्क खाताही येते हे समजून तर भारीच वाटले होते.

मी माझ्या नोकरीत पडेल ती सर्व कामे करत असल्याने मी स्वत:ला कैलास जीवांची उपमा देत असे गंमतीने. यात डोकं दुखतंय.. अहो, कैलास जीवनच्या धर्तीवर मी डोकं फिरलंय.. अहो, कैलास जीवन असंही मी म्हणत असे. असो.

रखवालदार म्हणून नोकरी आणि तीही फक्त चार तास कशी… रखवालदार तर बारा बारा तास असतात! मग माझी ट्यूब कैलास जीवन न लावताही पेटली….. कोल्हटकर बोलताय ना तुम्ही?” मी अगदी संकोचून विचारले.. त्यावर ते जोरदार हसले! या मोठ्या माणसाच्या साधेपणाबद्दल मला अत्यंत आदर वाटला! त्यानंतर ती जाहिरात, डोकं फिरलंय.. इत्यादी बाबतीत बोलणे झाले आणि अर्थात हास्यविनोदसुद्धा! भेटायला आलात तर कैलास जीवांची डबी भेट म्हणून देईन असंही ते सांगायला विसरले नाहीत. पण माझ्याकडे ते आधीच भरपूर आहे हे मी त्यांना सांगितलं. “तरीही देईन!” ते म्हणाले. पुढे त्यांनी राजा केळकर संग्रहालयाजवळचा त्यांचा पत्ताही सांगितला. मी आणि कैलास जीवन हा सहसंबंध पुन्हा सविस्तर ऐकतानाही ते मनमोकळेपणाने हसले होते. जाहिरातीत काम केलेल्या अभिनेत्याचे नाव त्यांनी आवर्जून सांगितले होते.. पण ते नाव आता आठवत नाही. ती जाहिरातही शोधली पण आढळली नाही. असो.

मी whatsapp वर श्री. राम कोल्हटकर साहेबांचा DP पाहिला… नातवासोबत हास्यविनोद करणारे राम कोल्हटकर… कैलास जीवन या बहुपयोगी आणि प्रसिद्ध, आणि आंतरराष्ट्रीय brand चे निर्माते आणि मूळचे शिक्षक, कीर्तनकार असलेल्या कै. वासुदेव कोल्हटकर यांचे चिरंजीव. त्यांनी प्राप्त केलेल्या व्यावसायिक यशाबद्दल एक मराठी माणूस म्हणून मला कौतुक तर होतेच.

जवळ राहूनही कैलास जीवनची भेट जीवनात अजून घडली नाही. मात्र आज संतोष कारखानीस, ठाणे यांनी कैलास जीवन बद्दल लिहिलेली सविस्तर सुंदर पोस्ट स्वामीनी बाबतीवाले यांनी share केली. कैलास जीवनच्या बाटलीचे छायाचित्र पाहून उत्सुकता चाळवली आणि पोस्ट वाचली. त्यावरून कोल्हटकर, कैलास जीवन आठवले…. विस्मरणावरही कैलास जीवन हे मराठी माणसाने मोठ्या जिद्दीने प्रसिद्धीस आणलेले औषध काम करत असावे, असे वाटते.

(धन्यवाद श्री. संतोष कारखानीस आणि सौ. स्वामिनी बाबतीवाले — या माहितीसाठी)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares