मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # कॅमेरा… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # कॅमेरा # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ॲक्शन.. साऊंड कॅमेरा… या परवलीचा शब्दाचा ध्वनी ऐकला मी भरभरा नुसती

समोरची दिसणारी ताजी चित्रंं टिपत जातो… कमीत कमीत पन्नास वेळा तरी त्यात कट कटचा व्यत्यय तो स्वयंघोषित दिग्दर्शक आणत असतो… त्याला कधीच कुठलीही ॲक्टींग त्याच्या मनासारखी होतेय असं वाटंत नसल्याचं असमाधान त्याच्या बथ्थड चेहऱ्यावर झळकत असतं.. मग प्रसंग कुठलाही असो.. आनंदाचा, दु:खाचा, रोमान्सचा, भांडणाचा मारामारीचा वा प्रेमाच्या गळाभेटीचा.. या सगळ्यात तो मात्र उदासिनच राहतो आणि समोरच्या कडून मात्र आभासी असला तरी सत्याचा प्रत्यय आणून दाखवशील का रे.. अशी अपेक्षा ठेवतो… आणि मला कॅमेरामनला अगदी नॅचरल, ॲक्शनवरच फोकस ठेवण्यासाठी सांगतो… माझं कामचं असते ते जे दिसेल आपल्या नजेरच्या टप्प्यात जसे असेल तसे टिपून संग्रही ठेवायचं.. मग मी टिपलेल्या प्रसंगात रासायनिक आणि तांत्रिक बदल घडवून त्याला हवा असलेला आकार रंग आणत असतो… रंग भरतो पण त्या त्या प्रसंगाच्या भावना मात्र मला आणता येत नाहीत, दाखवता येत नाहीत ही खंत जाणवते. मग एखादा बथ्थड चेहऱ्याचा कलावंत हावभाव दाखविण्यात कमी पडतो तेव्हा त्या प्रसंगाच्या बॅकग्राऊंडला तशीच आशयाची सिन सिनरी दाखवतो आणि प्रसंगाचा प्रभाव पाडतो… वर्तमानाला भविष्याचा आरसा दाखवत झुलवत नेणे आणि भुतकाळातील दु:खऱ्या जखमेवरची काळवंडलेली खपली काढून एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू याचा अनोखा संगम दाखवणे हीच माझी खासियत… कुणी त्याला फ्लॅशबॅक म्हणतात, जिंदगी का नया दौर… फिल्मी रीळ… सगळा मोह मायेचा बाजार असतो आणि कलावंत कठपुतली प्रमाणे दिग्दर्शकाच्या तालावर नाचत राहतात… त्याचं समाधान होईपर्यंत त्याला नाचावचं लागतं याशिवाय त्याच्याकडे कुठला दुसरा पर्याय असतो.. कारण शेवटी त्याचाही पापी पेट का सवाल असतोना भाई… बाकी कले करिता जीवन आणि त्यासाठी झोकून दिलेले तन मन आणि धन दुय्यम ठरते…

आणि तसं म्हणाल तर आपलंही दुसरं काय असतं हो? .. तो वरचा नियंताच्याच हातातील कठपुतलीच तर असतो.. तो नाचवतो आणि आपण… सारं काही आधीच त्यानंच ठरवून मग आपल्या इथं पाठवून देतो.. एकेक गोष्टीला संघर्ष करायला लावतो.. म्हणजे एक प्रकारे रिटेक असतो.. जोवर त्याचं समाधान होत नाही तोवर तुम्हालाही तुमच्या कार्याची यश सिद्धता मिळत नाही… तुमचा कॅमेरा फोकस करत राहतो तुम्ही ठरवलेल्या टार्गेटवर.. नि त्याच वेळेला तुमच्या वर्तमानातला वारू वाटेवर स्वार होतो तेव्हा भूतकाळाच्या कडूगोड आठवणींचे खाच खळग्यात अडखळतात. भविष्य उज्ज्वल आहे दाखवणारा चमचमत्या आरश्याला भुलून जातात… आणि हेच तर तुमच्या आमच्या जीवनाच्या चित्रपटाला कॅमेरा बंदिस्त करत असतो तेव्हा वरून निरंतर सुचना येत असतात

ॲक्शन.. साऊंड कॅमेरा… या परवलीचा शब्दाचा ध्वनी ऐकला मी भरभरा नुसती चित्रं टिपत जातो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # दिसते मजला सुखचित्र नवे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # दिसते मजला सुखचित्र नवे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… आता अशी हिरवाई फक्त चित्रातून पाहावी लागावी असे कपाळकरंटे आम्ही आहोत… आम्हीच कशाला आमच्या मागून येणाऱ्या कैक पिढ्या या निसर्गाच्या देखाव्याला मुकणार आहेत… वनश्रीने नटलेली वसुंधरा नवपरिणीत पुरंध्री सारखी हिरवा मखमली शालू नेसून बसलीय असेच वाटते… तिचं ते पावित्र्याचे तेज इतके आहे कि तिथून वाहणारा वारा सुद्धा अगदी काही क्षण तिच्या सान्निध्यात मंद मंद वाहतो… तिचा वस्त्राला आपल्या मुळे थरथर होऊ नये याची काळजी घेतोय… तिथल्या वातारणातला पसरलेला तो गंध आपल्या अंगाप्रत्यंगात सामावून घेत धुंदीत होउन जातो… आपण इथच थबकूया असं वाटत राहत त्याला… तिथून पायच निघत नाही त्याचा… पण इलाज नसतो.. वाहणं हा गुणधर्म त्याला विसरता येत नाही… प्रकाशाला धुक्याची शाल पांघरून पहुडावं वाटतं… झाडं लता वेली गवताची पाती, छोटी कोवळी तृणांकुराची पसरलेली हिरवी जाजमं जलाशयाच्या काठाला बसून हळूच गुदगुल्या करत बसतात… जलाशयातील आपल्याच प्रतिबिंबावर फिदा होतात… लहान मोठे पक्षी, प्राणी या वनश्रीच्या आधाराने आपलं जीवन सुखानं व्यतीत करत राहतात… इथं जीवो जीवस्य जीवनम चा मूलमंत्र विसरून जाऊन जगा आणि जगू द्या चा नारा जपला… आकाशीचा सूर्य आणि चंद्र तेही पडले प्रेमात वसुंधरेच्या… आपलीच प्रतिमा शांत जळी पाहताना भुलून गेले… कोणे एकेकाळी हा नजारा असा दिसत असे… स्वार्थसाधू माणसाची दृष्टी तिच्यावर पडली नव्हती… पण जेव्हा त्याला दुर्बुद्धी झाली तेव्हा पासून ओरबाडणे सुरू झाले… हिरवे जंगल लुप्त झाले आणि तिथं सिमेंटचे जंगल उभे केले…

प्रकाश, वारा, पाणी, अडले तटले… निसर्गाला संपवले आणि हळूहळू आपली वाटचाल अधोगतीकडे केली… मग हा निसर्गाचा चमत्कार मुकला म्हणून रुदन करु लागला… त्याच्या आठवणीतला कल्पनेचा कुंचल्याने चित्र काढून स्वतःची भलावण करत बसू लागला… आणि आम्ही फक्त अचंबित होऊन म्हणू लागू कि ये कौन चित्र कार है.. चित्र कार है..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अभिनेता… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अभिनेता # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

(झलक एका पडद्याआड माणसाची आणि पडद्यावरील अभिनयाची)

निळू फुले.

बाई तुम्ही आधी वाड्यावर चला…! ” हा एक साध्या शब्दातला संवाद आपण जेव्हा जेव्हा भाषेतल्या लकबिने आणि अंतस्थ हेतूने आवाज ओळखून ऐकतो त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व उभे राहाते ते म्हणजे हरहुन्नरी कलावंत साक्षात निळू फुले यांचं… काही वेळेला साध्या वाटणार्‍या संवादांना चिरंतन मूल्य लाभून जातं ते अशा दिग्गज कलावंताच्या कडून निघालले असल्याने. सिनेमा,नाटकातला त्या प्रसंगाचा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करून जातं. सामना असो वा पिंजरा… सिनेमात डॉ. श्रीराम लागू यांच्या बरोबर तमाशातील फडावर तर या दोन दिग्गज कलावंताची आपापल्या भूमिकांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहून तर डोळ्यांचे पारणेच फिटते. “मास्तर तुम्ही मला मारलंत…! ” असा छद्मीपणाने,डोळे बारीक करून चेहर्‍यावर बेरकी कावेबाजपणाची छटा आणून बतावण्या आपली कर्मकहाणी सांगतो तेव्हा तर अभिनय पराकोटीला पोहचतो. इथेही परत तेच संवाद. साधेच असतात. पण निळू फुले तेजेव्हा बोलतात तेव्हा त्यांतील गर्भित व्यथा प्रेक्षकांच्या काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही. त्या व्यक्तीबद्ल चीड येते पण त्याच्या अंतकरणात खोलवर रुजलेल्या त्याच्या व्यथेची आक्रंदन जेव्हा आपल्याला ऐकू येतात तेव्हा त्याच्या त्या अबोल भावनाची किव येते… शेवटी माणूस निर्सग धर्माला सोडून जगू शकत नाही हेच खरे… एकावेळी हे चित्र दिसत असताना दुसरीकडे डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत बोलणाऱ्या सरपंच, पाटील, भ्रष्टनेत्याच्याच प्रतिमेत अनेकांनी त्यांना पाहताना लबाड,कावेबाज,स्त्रीलंपट,राजकारणी… स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रसंगातील खलनायकाच्या रूपातला निळू फुले पाहताच त्या प्रेक्षकगृहातील समस्त भाबडा महिलावर्ग त्यांच्या नावाने तिथेच बोटं मोडत असताना, ‘मुडदया,एका गरीब बाईमाणसाची अब्रू लुटतोस.. वाटुळं वाटुळं हुईल तुझं.. तुझ्या घरी काय आयाभनी हायती का नाहीत. मुडदा बशविला तुझा तो…’

ही लाखोली वाहिली जायची. हा त्या खलनायकाच्या अभिनयाला दिलेली सन्माची पावतीच म्हणायला हवी. निळूभाऊंनी खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची जरबयुक्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री,मग्रूर भूमिकेसाठी पूरक ठरले. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरीजीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. निळू फुले यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. ‘एक गाव बारा भानगडी’ याचित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदीचित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४०चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी ‘चोरीचा मामला’,’पुढचं पाऊल’, ‘शापित’, ‘सामना’, ‘सिंहासन’ यांतील भूमिका विशेष गाजल्या.

व्यावसायिक रंगभूमीवरचं एक असं नाटक आलं, जे अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीसाठीच महत्त्वाचं ठरलंच,नाटक होतं विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाईंडर. त्यानंतर निळू भाऊंनी तेंडुलकरांचेच ‘बेबी’ हे नाटक, जयवंत दळवींचं’सूर्यास्त’, ‘जंगली कबूतर’, ‘राजकारण गेलं चुलीत’ यांसारखी नाटकं केली. सखाराम आणि निळू फुले हे नातं घट्ट असलं तरी स्वतः निळू फुलेंना’बेबी’ नाटकातली राघवची भूमिका प्रचंड आवडायची.

त्यांच्या कारकिर्दीची अभिनयाइतकीच महत्त्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत,सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध व सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशीआपली नाळ अखंडित ठेवली होती. 2003 या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निळू फुले यांची निवड झाल्याचं त्यांना कळविण्यात आलं होतं. निळूभाऊंनी हा पुरस्कार नाकारला. मी व्यावसायिक अभिनेता आहे, जे काम करतो त्याचा मोबदला घेतो. यात समाजासाठी काही केलं नाहीये. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांचं नावही सुचवलं.

कलाकाराचं पडद्यावरचं आयुष्य आणि प्रत्यक्षातली प्रतिमा यात अनेकदा विरोधाभास असू शकतो. निळू फुलेंच्या बाबतीत तर तो अतिशय ठळक आहे. पडद्यावर वेगवेगळ्या ढंगातला खलनायक रंगवणारा हा माणूस वैयक्तिक आयुष्यात मात्र नायक होता किंबहुना नायकापेक्षाही तो खऱ्या अर्थाने ‘मोठा माणूस’होता.

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # तो एक बाप माणूस असतो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # तो एक बाप माणूस असतो # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आपल्या मुलांच्या स्वप्नांना सत्यात उतरायला आजन्म आपला खस्ता खात जगतो…

दारिद्र्यानं नाडलं गरिबीनं जखडलं आणि संधीसाधू मालकानं लुबाडलं तरीही हतबलता संपता संपत नाही..

त्याच्या लेखी सूर्य उगवतो तो चला कामाला लागायची वेळ झाली इतकचं सांगतो.. आणि

चंद्र चांदण्यांची रांगोळी रजनी जेव्हा निळ्याशार आभाळात रेखते.. तेव्हा मालक आपल्या गड्यांना सांगतो.. गड्याहो मला आता लै झोप आली.. तवा उद्या सकाळच्या पारी लवकर या… असं म्हणताना आजच्या कमाईचे पैसं त्यांना देतो… ठरलेल्या पेक्षा ते कितीतरी कमी असतात… निदान आजच्या हमालीत रगत जेव्हढं आटवलं त्याच्या किमती एव्हढी तरी बिदागी हातावर टेकावयाची होती… पण नाही ना.. तशी सगळी बिदागी एकटाकी दिली तर लेकाचे गडी माजले जातील मस्तीला येतील… मग उद्याला हमालीला धतुरा दाखवून पुढं नाहीच आले तर धोका कशाला ओढवून घ्या… मालकाचा बेरकी विचार नेहमीच मजदूरीत काटा मारून ठेवत असतो..

मग जाशील कुठे तू रे चोरा… कष्टापुढे कसा दाखवशील तुझा तोरा…

घरात जोपासलेली असतात त्या बापानं उद्याची सोनेरी स्वप्नं… पाहत असतो आजच्या काटेरी कष्टाला येणारी सुंगधाची गुलाबी सुमनं..

पडू दे किती भारावर भार पेलायला हा बापाचा खांदा असतो कि नेहमीच तयार… असलो अडाणी निरक्षर मी जरी, पोरावो तुम्हाला शिकविल्या शिवाय हा गडी आता माघार नाही घ्यायचा. जे जे मागाल ते ते देईन मग भले त्यासाठी जिवाला ओलिस ठेवीन… पर तुम्ही एक एक शाळंची इयत्ता पार करत पुढं पुढं जाताना पाहून मन माझं आनंदानं फुलून येईल… दिसावे तुम्हाला सुखाचे दिवस हाच एक मनी ध्यास माझ्या… अन शेवटचा दिस गोड व्हावा हिच आहे एकमेव आशा…

तो एक बाप असतो… बाप माणूस असतो.. वरवर राकट दिसतो आणि आतून हळवा प्रेमळ असतो..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अरे कुणी वाट देता का वाट… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अरे कुणी वाट देता का वाट # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

एक भुकलेलं लेकरू आईच्या मांडीवर बसून रडून रडून बेजार झालयं… दोन तासाहून एका ठिकाणीच अडकून पडलयं, त्याचं वाहन या सुस्तावलेल्या अजगराच्या गर्दीच्या विळख्यात… टाहो फोडतयं रे मला काहीतरी खायला हवं.. पण आधीच बहिरे असणारे ते बाहेरचे कान वाहनांच्या बंद काचेच्या आडून शितल वायूच्या झुळकेत असंवेदनशील होऊन बसलेत. त्यांना कुठे ऐकू जाणार आहे हा टाहो… मुंगी शिरायला जिथं वाव उरलाच नाही तिथे ही भलीमोठी वाहनांनी इंच इंच जागा व्यापून एकमेकांशी खेटून बसल्यावर धड पुढे जाता येईना ना मागे फिरता येईना… स्थानबद्धतेची शिक्षा काय असते याची प्रचितीच यावी जणू… विकासाच्या प्रगती कडे नेणारा हा सुखसमृद्धीच्या महामार्गाला या चक्काजामच्या अघोषित आंदोलनाने खिळ घातल्या सारखे वाटते… सगळ्यांचे वेळेचं नियोजनच कोलमडून पडणार नाही का अश्यानं… चालतोची अजुनी वाट परि मुक्कामी पोहचेना असा निराशेचा, चिडचिडेपणाचा नि संतापाने लाल होणारा चेहरा ‘ ये साला रोज का ही मरना है.. भगवान जाने इससे कब राहत मिलेगी.. ‘असे क्रुद्ध दिनवाण्या चेहऱ्यांचं तिथं भरलेलं संमेलन… इंधनाच्या जळणाचा काळ्या धुराने आसमंत गेला की रे काळवंडून… शुद्ध हवेने आपले तोंड की रे घेतले लपवून… गगनभेदी हाॅर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदूषणाचा बुरखाच फाडून टाकला… नादामधे नाद घुमत राहिला… पण ऐकूच येईना कुणाचे कुणाला… आणि तसं ऐकणारंही होतं कोण? माझं अडलयं खेटर सरकून बाजूला व्हायला त्याला गरज असेल तर काढ म्हणावं वाट या चक्रव्यूहातून… रूग्णवाहिका कोकलून कोकलून झाली बेजार.. अरे माझ्यात पहुडलेल्या रुग्ण मोजतोय आपल्या शेवटच्या घटका चार… थोडं थोडं घेतलं सरकून आपापलं वाहन, तर जाईन बापडी पावन खिंडीतून शर्थ करून बाजी पणाला लावून… अखेर मिळाला जर त्याला वेळीच औषधोपचार.. तर आणखीन जगण्यासाठी करेल बापडा आयुष्याची उसनवार… पण कधी नी कसे जमावे… सुस्तावलेल्या आणि अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनानां शिस्त कोण लावणार.. ज्याला त्याला आपली पडलेय आपआपल्या मुक्कामाला पोहचण्याची घाई झालेय… एकीकडून निघालेला रस्ता संपता संपत नाही. तद्वतच त्यावरून सुसाट पळणाऱ्या या वाहनांच्या संख्येला अंत हा शब्द लागूच होत नाही… अर्ध्याहून अधिक आयुष्यातले तास या वाहतूकीच्या तुंबलेल्या गर्दीतच खर्ची पडतात… नि बचाकुचा समय में इतनी एनर्जी देहात कुठे शिल्लक असते कामाचं आऊटपुट द्यायला… रोजचं चाललयं असं तर या जटील समस्येवर रामबाण उपाय शोधायला काही मंदमती यंत्रणेतील विशेष भत्त्यावर नजर ठेवणारी तल्लख डोकी विचारांची चक्र दिवसरात्र चालवत असतात… पण पण त्यावर स्थानिक नागरिक आणि त्यांचे हितचिंतक यांना स्वताच्या मलिद्यावर गदा आलेली चालणार नसते… प्रस्तावाच्या ढिगाचे डोंगर होतात पण योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरतच नसते… इच्छा शक्तीचा अभाव मात्र जोर धरून फोफावतो… निघतो एखादा तोडगा उड्डाण पूलाचा या समस्येवर काढलेला म्हणजे सत्राणे उड्डाणे हुंकार वदती खाई खालचाच निम्मा रस्ता अन नव्या अडचणी सामोऱ्या ठाकती अशी गत होतेय… रोग परवडला पण त्या भळभळणाऱ्या जखमेवरची मलमपट्टी म्हणजे मीठ चोळण्याचा प्रकार झाला यात नवल ते कसले… ठेकेदारांनी मात्र आपले खिसे तुडुंब भरते झाले… आणि यात माझी तुमची याची त्याची सगळ्यांचीच गोची होते… नवनवीन वाहन निर्मिती थांबवली जात नाही, जुनी मुदत संपलेली वाहने रस्ता वरून हटत नाहीत… कामचलाऊ पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधांचा रोजच उडतोय बोजवारा. , खाजगी वाहनांचा राबता खुलेआम फिरता, रस्त्यांच्या दुर्दशेकडे डोळेझाक करायचे… टक्काच्या गणितापुढे पडलेल्या खड्डयांनीं टक्के टोणपे खाणाऱ्यांचे कुत्रे हाल आपण नाही तर कुणी खायाचे… शिस्तीमुळे राष्ट्र मोठे होते… मेरा देश महान रंग उडून गेलेल्या नि तडे गेलेल्या भिंतीवरील पोकळ घोषणा वाचून का कुठे शिस्त लागते… तुका म्हणे तेथे पाहीजे जातीचे ते येरे गबाळ्याचे काम नोहे… तोवर ही बिकट वाट वहिवाटीची तुमच्या आमच्या नशीबी अशीच राहणार असते..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # रहे ना रहे हम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # रहे ना रहे हम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… “हेच तर बाळा मी मघा पासून तूला सांगायचा प्रयत्न करत होतो! … पण मला बोलता येत नसल्याची खंत जाणवली आणि माझा जीवच गलबलून गेला की रे… कशा बरं  कळवाव्यात माझ्या भावना तुझ्या पर्यंत… तुला तुझ्या बद्दलचं अत्यंत महत्वाचं सांगायचं प्रयत्न करून पाहीला. जेव्हा तू सगळ्यात पहिल्यांदा तुझी धारदार कु-हाडीचा घाव माझ्यावर घातलास ना तेव्हा… तोच क्षण , होय तोच एकमेव क्षण असा जिवंत अनुभव देऊन गेला कि स्स.. स्स.. त्याने माझा सगळा देह अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंतचा भीतीने थरथरून शहारून गेला… ती भीती माझं अस्तित्व नष्टप्राय होईल म्हणून नव्हतीच मुळी… ती भीती होती मी नसण्याने  तुझं आणि तुझ्या नंतर येणाऱ्या पुढच्या पिढीच्यां अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण होणार आहे त्याची होती… ती भीती होती माझ्या अंगाखांद्यावर बांधलेल्या पक्ष्यांच्या अनेक घरट्यांची… त्यात असणाऱ्या चिमण्या नवजात बाळांची… ती भीती होती त्या माझ्याच आश्रयाला येणाऱ्या लहानमोठ्या प्राणी समूहाची… ती भीती होती भूमीची धूप आता कशी थांबेल याची.. ती भीती होती पुढचा दरवर्षी चा पाऊस पडेल का नाही याची… भीतीचा अंत लागतच नाही याची सुध्दा भीती वाटत होती… पण माझ्या अबोल भावनां तुला कशा कळाव्यात… इतका का अडचणीचा झालोय,जड झालोय  मी तुझा… जरा तुझ्या अवतीभोवतीच्या परिसरात पाहतोस काय.. काय करुन ठेवलेस तू… इतकी घनदाट वनराई होती तिचं एकेक वृक्षतोड करत भकास उजाड माळरान करून ठेवलसं… असं करण्यात  तुझा काय छुपा स्वार्थ असेल हे तुझे तुलाच ठाऊक मला त्याच्याशी काहीएक घेणं देणं नाही… कारण माझा मुळातच धर्म आहे तो देण्याचा… थकलेल्या सावली, भुकेलेल्या फळांचा आहार, निराश मनाला फुलाचा मनमोहक सुगंध.. आणि  आणि.. तहहयात काहीही मुद्दाम न घेता आणि घेतलेच तर परोपकारी बुद्धीने भरभरून परतफेड करयाचे.. हा आम्हाला सृष्टीने दिलेला परंपरागताचा  वसा पाळत आलो आहोत… खरं सांगू तुझे पूर्वज, इतकेच काय  तुझे वाडवडिलांच्या काळात देखील आम्ही घरातील एक सदस्य असल्यासारखी काळजी घेतली जायची आमची.. त्यावेळेचं ते आगळेवेगळे  समाधान दोघांचंही जीवन सार्थ करून गेलं… तुला सांगतो अरे पावसाळ्यात  कधीतरी कुठल्या झाडावर वीज पडली आणि ते झाडं त्यातं जळालं तर त्या घरातलीच नव्हे तर अख्खी पंचक्रोशीत गावातलाच माणूस गेल्यासारखी सुतकात जायची… हे तर काहीच नाही. एखादा वयोमानानुसार वृक्ष वठला पानं, फुलं, मोहोर, फळं फांद्या सगळे झडून गेली आणि निरुपयोगी झाडाचं वठलेला बुंधाच राहीला तरी देखील गावातील मंडळी मला उपेक्षित तर  करत नसतचं पण माझ्या भोवती पार बांधून सकाळ संध्याकाळ तिथं गावातलीच ज्येष्ठ मंडळी चार शिळोप्याच्या गप्पागोष्टी करत बसायची… मला त्या ऐकताना माझं मन हरखून जायचं. पण कधीही  त्यांच्या मनात हा वृक्ष आता तोडून टाकावा हा अभद्र विचार मनाला शिवला नाही.. उलट ती भोळीभाबडी मनं आज ना उद्या या वठलेला बुंध्याला कोवळी पालवी नक्कीच फुटेल अशा भोळ्या भाम्रक चमत्कारावर आशा धरून असायची… होय त्यावेळी  धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, श्रध्देप्रती असलेली दृढ आस्था होती त्यांच्या मनात… म्हणून तर त्यावेळी वसुधंरेवर नंदनवन फुललेलं होतं… निसर्गाचं चक्र देखील समतोल साधत राहून चरचराला आनंदाचं समाधानाचं वरदान देत राहीला… पण म्हणतात ना हे असे क्षणांना अल्पायुषीचा शाप असतो.. आणि ऐन भरात असताना याला उतरती कळा लागली… तुमची जुनी खोडं काळाच्या पडद्याआड गेली आणि नव्या मनूचा उदय झाला तोच मुळी स्वार्थ साधूपणाने अविवेकी विचाराने बुध्दीभ्रष्ट झालेला… भौतिक  विकासासाठी  विज्ञानाची कास धरून  सृष्टीचाच र्हास सुरू केला… जसे मारणारे हात होते तसे काही तारणारेही हात होतेच कि… जेव्हा जेव्हा आमच्या अस्तित्वात वर गदा आणली गेली तेव्हा ही वृक्षप्रेमी मंडळी उठाव करायची.. पण ती हाताच्या बोटावर असणाऱ्या नगण्य मंडळीचा क्षीण आवाज दडपशाहीने दाबून टाकत राहीले आणि दरवेळी आपले विजयोन्मादाचे आसुरी हास्याचा गडगडाट करू लागले… जशी तुमच्यात घरभेदी पणाची  प्रथा आहेना तशीच आमच्यातही तुम्ही या दुहीचं विष पेरून… आमच्यातल्यात वृक्षाच्या लाकडाचा कु-हाडीच्या दांड्यासाठी वापर करून आमचाच नाश करणं चालू ठेवलयं…

… तू माझ्यावर बराचवेळ पासून या कु-हाडीने घावावर घाव घालून दमलास.. म्हणून तर जराशी विश्रांती घेण्यासाठी इथं पहुडलास नां… घे घे जरा विश्रांती घे.. आणि पुन्हा तू तुझं उरलेलं काम पूर्ण करं… तुला विश्रांती घे म्हटलं खरं पण तुझ्यावर सावली टाकावी, एखादी वाऱ्याची झुळूक वाहत न्यावी.. अशी माझी स्थिती कुठं उरलीय बरं… मला फार वाईट वाटतयं की  अशा उध्वस्त स्थितीत   तुला ना धड वाऱ्याचा थंडावा देऊ शकत ना गडद सावलीचा गारवा जो तुझ्या थकल्याभागल्या तनामनाला उभारी देऊ शकेल… मला माफ कर.. आता खरचं मी काहीच उपयोगाचा उरलो नाही.. तेव्हा तू तुझी विश्रांती झाल्यावर तातडीने माझ्या उरल्यासुरल्या मुळावरच घाव घालून नेस्तनाबूत करून टाक… हेच माझं तुझ्याजवळ शेवटचं मागणं आहे.. तेव्हा तू ते लवकरच पूर्ण करं… आणि आणि एक सांगतो…

आता जो शेवटचा घाव माझ्या मुळावर घालणार आहेस  ना तो तुझ्या हातातल्या कु-हाडीने घालू नकोस… त्या कु-हाडीने ते आता घाव  माझ्यावर बसले जाणार नाहीत कारण  त्या कु-हाडीचा दांडा हा माझ्याच लाकडापासून बनलेला आहे… इतका वेळ त्याने माझ्यावर घाव घातले तेव्हा प्रत्येक घावाला त्याचं मनं आक्रंदत होतं नि मला म्हणत होतं मला माफ करं.. माफ कर.. आणि असं म्हणत असताना त्याचं अंत:करण विदीर्ण होताना मला दिसत होतं.. तो आता डळमळीत झालाय.. त्याची धार बोथट झालीय.. त्याकडून आता पहिल्यासारखे घाव घातले जाणार नाहीत… अपरंपार भावुकता त्याच्या मनात नि डोळ्यात दाटून आलीयं… आपण केलेल्या कुकर्माचा त्याला पश्चात्ताप झालाय.. परिणामी त्याचं अंग भीतीनं घामानं निथळू लागलंय.. तो थरथरतोय नि भीतीने लटपटतोय… मी फक्त त्याला एव्हढच म्हणालो कि तुझा कर्ता करविता दूसराच कोणी आहे हे मला ठाऊक आहे, त्यामुळे तुझा दोष नाही.. आणि तुझं जे कर्तव्य आहे ते तू प्रामाणिकपणे करत रहा… परिणामांची तमा करा करू नकोस… एव्हढचं आमचं बोलणं झालं आणि तू विश्रांती घेण्यासाठी थांबलास… तेव्हा आता नव्याने घाव घालण्यासाठी त्या कु-हाडीला जमेलच असं वाटत नाही.. आणि मलाही खरं म्हणजे माझ्याच रक्ताच्या माणसाकडून माझ्याच देहाचे तुकडे तुकडे झालेले सहन होणार नाही… तेव्हा तू दुसऱ्या कु-हाडीने मला…

आणि हेच तर बाळा मी मघा पासून तूला सांगायचा प्रयत्न करत होतो… पण मला बोलता येत नसल्याची खंत जाणवली आणि माझा जीवच गलबलून गेला की रे…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… समुद्र किनाऱ्यावरील अगदी टोकाचा त्याचा बंगला…

माणसांच्या वर्दळीपासून दूर.. त्या बंगल्याचा मालक एकल कोंडा.. माणसांचीच ॲर्लजी असलेला.. अवतीभवती भयाण शांतता चौवीसतास पसरलेली… त्याला याच माहोलाची आवड निर्माण झालेली… बंगल्याच्या व्हरांड्यातून मावळतीच्या सूर्याचे क्षितिजावरून होत असलेले सीमोल्लंघन बघत बसणे… घराकडे परतणाऱ्या पक्षांच्या काळ्या रंगाचा नेकलेस बघणे… आकाशाच्या छताला किरमीजी, लाल, सोनेरी, रंगाच्या उधळपट्टीचा गुलाल सांडलेला बघणे.. भरतीच्या उसळत्या लाटांची गाज ऐकणे… आणि मागेकुठे राहिलेलं एखादं चुकार पाखरू आपल्या जीवाच्या आकांतानं चित्कारत पुढे गेलेल्या आपल्या सोबत्यांचा शोध घेत भिरभिरतं जाताना पाहणं… हा त्याचा नित्याचा कार्यक्रम… संध्याकाळ अंधाराला शरण गेली कि रातकिडेचं संगीत अविरत सुरु होई… दूरवरचे दिवे लुकलुकताना दिसायचे… अंधाराला सुरीने कापून काढल्यासारखे… त्याच्या बंगल्याच्या त्या आवारात व्हरांड्यातला एक पिवळा बल्ब उदासिनपणे प्रकाशायचा… हळूहळू अंधार दाटला जायचा तरीही तो त्या वाळूत ठेवलेल्या खूर्चीतून कधी उठायचा नाही… त्याला तसं उठावसं वाटायचं नाही.. आणि उठून तरी काय करणार होता म्हणा… त्याच्याशिवाय घरात दुसरं असं कोणीच नव्हतं… तो गावात जेव्हा राहात होता तेव्हा तिथे त्याचे सगळे होते… त्याने रिटायर्ड झाल्यावर त्याची आणि त्याच्या बायकोची एकच इच्छा राहीली होती कि रिटायर्ड लाईफ समुद्राच्या काठी बंगला बांधून तिथं राहूनच घालवायचं.. आणि तसं त्यांनी ते साध्य केलं… रिटायर्ड फंडा च्या तला पैसा आपल्याला मिळणार नाही हे पाहतातच त्याच्या मुलाने नि मुलीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला… घरं सोडायला भाग पाडलं… वृद्धाश्रमाची पायरी न चढता त्याने कुणालाही याची कुणकुण न लागता या बंगल्यात ते दोघं राहायला आले… आणि रोज संध्याकाळी दोन खुर्च्या टाकून निवांतपणे निशब्द बसून सभोवताली बघत बसू लागले… त्यांचा संवाद फारच कमी व्हायचा आणि शांततेचा अनुभव घेण्याची त्यांना सवय लागली… फक्त शांततेचा भंग तो समुद्राच्या लाटांच्या आवाजाने होई… कोणी येणं नाही कोणी जाणं नाही.. फक्त दोघचं दोघं..

… बरेच दिवस असं एकांतात निशब्द बसून कंटाळा येऊ लागला.. तसा दोघांनी काही खेळं खेळायचं ठरवलं.. बालपणातले खेळचं खेळायचे या अटीवर… आधी गाण्याच्या भेंड्या झाल्या, मग पत्ते खेळून व्हायचे, व्हाॅलीबाॅल खेळून व्हायचा आणि मग पकडापकडी खेळात थोडी पळापळीचा खेळ व्हायचा… इतकं सगळं खेळून होईपर्यंत खूप दमायला व्हायचं मग थोडावेळ दम खाऊन रात्री उशिरापर्यंत बंगल्यात परतत असत… ते पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच इथं येणं होई…

त्या दिवशी पण हे सगळे खेळ खेळून झाले होते… शेवटचा पळापळीत करताना दोघांना भान राहिलं नाही आणि ते समुद्राच्या खूप खूप आत गेले होते… ओहोटी संपून भरतीला सुरवात झाली आणि एकेक लाट येऊन त्या दोघांना आणखी आणखी आत ओढू लागली… सुरुवातीला त्या दोघांना याची खूपच मजा वाटू लागली… तसे ते दोघेही एकमेकांपासून जरा दूर अंतरावर होते… तिच्यावर राज्य आलं होतं आणि तो तिला सारखा म्हणत होता ये कि आता मला पकडून दाखवं.. ती त्याच्या दिशेने जाऊ लागली तोच ऊंच लाटेचा मोठा तडाखा बसला आणि त्यात ती दिसेनाशी झाली… त्याला वाटलं आपल्याला पकडण्यासाठी तिनं लाटेखाली स्व:ताला लपवून घेतलयं आणि ती आता आपल्याला लवकरच पकडणार… तिला चुकविण्यासाठी तो समुद्राच्या बाहेर पडू लागला… पण त्याला ही ते शक्य होत नव्हतं.. त्यात त्याला तिचा कुठे मागमूस दिसत नव्हता.. ती कुठे आणि किती जवळ आलीय याचा अंदाजही कळत नव्हता… ती दिसत नाही म्हटल्यावर त्याने तिला बऱ्याच हाका मारल्या पण प्रतिसाद काहीच आला नाही… तो सारखा तिला हाकारत होता.. त्याचा आवाज तिथल्या सुसाट वाऱ्यात मिसळून जात होता… शेवटी त्याने आजचा आपला हा खेळ पूरे झाला… आता आपण समुद्राच्या बाहेर पडूया असं म्हटलं.. सारखा तिच्या नावाचा जप करत होता पण तिचा काहीही प्रतिसाद येईना… त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं… तसं त्याने त्या समुद्रात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला… त्याच्या पायाखालची वाळू भुरुभुरू घसरत चालली… उभे राहणं मुश्किल झालं.. एकेक लाट त्याला आता थोडं बाहेर आणि बरंच आत ओढत नेऊ लागली… किनाऱ्यावर अंधार, सुनसान एरिया जवळपास कोणी माणूस नाही… वाचवायला कुणाला बोलवायला तिथं कुणीच नाही… तो तिच्या नावाने सतत हाकारा करत राहिला आणि हळूहळू तो देखील समुद्राच्या पाण्यात लुप्तप्राय झाला…

दोन कलेवर दोनतीन दिवसांनी लांब लांबच्या किनाऱ्यावर आली… ओळख पटण्यासारखे त्यांच्या शरीरावर तसं काही शिल्लकच उरले नव्हते… बेपत्ता झाल्याची तक्रार तरी फुकटची कोण कशाला करणारं होतं त्यांची… विकतचं मढं घ्यायला ती पाषाण हृदयाची त्याची मुलं फिरकलीच नाहीत…

तो बंगला आजही तसाच उभा आहे आपल्या धन्याची वाट पाहत… आणि त्या वाळूत ठेवलेल्या त्या खुर्च्या ही.. त्यांना कोण हलवणार होतं… रोजच्या सारखीच संध्याकाळ तशीच येत असते… आणि.. अंधार पडल्यावर तो येतो आपल्या खुर्चीत बसतो… ती आता येईल मग येईल याची वाट पाहत… तिकडे दूरवर दिवे लुकलुकताना दिसतात… खूप वेळ तसाच बसून तो असतो… अंधार दाटत गडद होत जातो… तो निराश होतो… अजूनही त्याला तिनं पकडून आऊट केलेलं नसल्याने तिच्यावरचं राज्य तसचं असतं.. डाव अर्धा टाकून कुठे गेली ती… आता उद्यातरी तिनं आपल्याला धरावं असं मनाशी म्हणत त्या रिकाम्या खूर्चीकडे पाहत तो पुन्हा शांत झालेल्या समुद्राकडे तिचा शोध घेण्यासाठी आत आत निघून जातो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जोहार मायबाप जोहार… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “जोहार मायबाप जोहार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

जोहार मायबाप जोहार… लाख माणसातले तुम्ही एक दिलदार… सण आनंदाचा दिवाळीचा घरीदारी तुमच्या सजला नटला आणि रंगला बी… तुमच्या सदनी कंदील पणत्या लखलखीत तेजाने प्रकाशल्या… तुम्ही नव्या वसनांची घडी मोडलीत.. विविध पक्वान्नांनांच्या फराळाने ताटं भरलीत.. गोडाधोडाच्या चवीने रसनाची तृप्ती झाली… तुमच्या सहीत इष्टगणगोतांचे तुष्टले तन मन ते आनंदाच्या शिडकाव्याने.. सर्व मांगल्याची लक्ष्मी माता तुमच्या सदनी येता… सारं तुमचं लखलाभ होऊ दे हे माझंही तिजला विनम्र असे विनवणं… आणि ते तुमच्या जवळ सांगायला मन माझं बी संतोषलया… मी आलोय तुमच्या दारी परी तुमच्या कडं काहीच नाही मागायला… एक मागणं आहे त्या आई लक्ष्मी पाशी.. सांगाल का माझ्यावतीनं तिजपाशी… माझ्याही चंद्र मौळी झोपडीतपण क्षणभरासाठी येऊन जाशील आता इथं आलीस तशी…. ठाऊक आहे मजला… नि तूलाही… या लेकराच्या घरला गरीबी आणि दारिद्र्याचाच अंधार भरला ठायी ठायी…. स्वाभिमानाच्या पणती मधे कष्टाच्या तेलवातीचा मंदसा एकच आशेचा प्रकाश पसरलाय… माझ्याही घरी तू यावंस अशी भोळीभाबडी आस धरूनी मनी मालकांच्या दारी मी वाटपाहतोय… जोहार मायबाप जोहार… तुमच्या कडची तिची पूजाअर्चा झाली कि सांगाल ना माझा निरोप तिजला… म्हणावं विसरून जाऊन नकोस बरं अजून एक घर वाट पाहतयं तूझ्या आगमनाची आजच्या सांजच्याला… दोन हस्तक जोडून मस्तक झुकलेय खाली तुझ्या चरणावरती टेकण्यासाठी… आनंदाचे दीप उजळलेत या दोन डोळ्यांत… सुख समाधानाचा दर्या उचंबळून राहे हृदयात… कृपा तुझी अखंड राहो आई लक्ष्मी तूझे लेकरू करतेयं दीनवाणी हीच एक मागणी..

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ झेपावे उत्तरेकडे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “झेपावे उत्तरेकडे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

काळ्या नभांनी दाटून आलेल्या  डोईवरच्या आभाळाने झाकोळलेला सगळा परिसर… नुकतीच मान्सूनची सुरवात झालेली… दोन चार  मृगाच्या मोठ्या सरींनी पाणी पाजून तरतरीत आणि टवटवीत झालेली वृक्षराजी.. वैशाखातल्या वणव्याने भाजून निघालेल्या मातीवर मृगाच्या सरी पडल्या तेंव्हा तो बाहेर पडलेला मृदगंध…आपल्या अबोल प्रफ्फुलीत मनातला  ‘किती सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला ‘ ही भावना झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत गावभर पसरत गेला.. दरवर्षी चातकासारखी वाट पाहणाऱ्या  समुहाने राहणारा माणसांचा समाज चला यंदाचा पावसाळा समाधान कारक दिसतोय बरं.. पिकपाण्याचं अवंदा काही अरिष्ट यायचं नाही…अशी खोल कुठेतरी रूतलेली मरण चिंता या वर्षाला सतवाणार नाही…असे ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर  आशेचे गेंद फुलाचे डवरलेले दिसू लागले होते… बळीराजा सुखावला तर होताच भुईत पेरलेल्या बीजाला कोवळा अंकूर पालवलेला बघून त्याच्य अंगावर देखील आता पुढच्या ढोर मेहनतीकरिता मुठभर मांस चढवून सज्ज झालेलं… अन मालक तुम्ही एकलचं का बरं आम्ही बी हावं की तुमच्याबरूबर रानात खपायला असं माना डोलवत आपल्या शिंगावरील गोंडे एका लयीत डोलवत बैलं..ढोरं निघतात.. विहिरीला,नदीला आणि ओढ्याला मायंदाळ पाणी असल्यावर..सोळा आणे नसलं तरी बारा आणे पिकलेलं धान्याने आता कणगी तट्ट भरणारच… मग खुळखुळणाऱ्या पैशावर बॅंकेचं हप्तं,सावकाराचं कर्जावरचं व्याज, दिवाळसणाला घरच्यांना नवंकोरी धडुती, लुगडी… बरीच वर्षे बायकोच्या मनात रुतून बसलेला ठुशीचा डाग.. आणि आणि जमलं तर पहिल्या पोरीच्या लग्नाचा उडवून द्यावा बार.. म्हणजे  हा डोक्यावरचा भार सगळा एकदम उतरला गेल्यावर थोडसं जीवाला हायसं होईल…दसरा बी गोड अन पाडवा बी…आता यंदा काही माघाची वारी चुकवयायची नाही म्हणजे नाहीच…

हे आशेचं इंद्रधनुष्य मना मनाला भुरळ घालत राहू लागलं….साकार न झालेल्या स्वप्नांची सप्तरंगी चित्र डोळ्यासमोर नाचू लागतात… कल्पनेची उड्डाणं क्षितिजाला भिडताना दिसतात… दंग असतानाच अचानक लहरी निर्सग सुरुंग लावतो आणि आणि सगळी पाहिलेली सगळी स्वप्नं भंग करून जातो… काळे कुट्ट जमलेले ढग आपलं कपाळ पांढरं झालेलं दाखवतात.. तो इंद्रधनुष्याचा पट्टा आक्रसत आक्रसत जाऊन पाहता पाहता लुप्त होतो…. पावसाचा पत्ताच हरवतो… टळटळीत सूर्य तळपळत राहतो आणि काळ्या मातीला भेगाळून टाकतो… पाण्याची ओल  आता  फक्त ज्याच्या त्याच्या डोळ्यात दिसते… तेव्हढचं पाणी शिल्लक राहतं… गावा गावाचा फुफाटा होऊ लागतो हळूहळू मसणवाटा्याची कळा येऊ लागते.. राजकर्त्याचा आश्वासनांचा निवडूंग उजाड नि बोडक्या माळरानावर  दगडांच्या कपारीत तोंड लपवून दडलेला असतो…  गोठ्यातली दावणं बाजारात विकली गेलेली  गुरांची माघारी परत येण्याच्या आशेने डोळे लावून बसतात…. चुलीतला कोरडा जाळ पोटातील भुकेचा वडवानल चेतवत राहतो..घरात खाणारी तोंड भुकेने तडफडतात आणि घरच्या धन्याच्या हृदयाला पीळ पाडत राहतात…घरचा धनी मात्र घराच्या अंगणात उभा राहून वर आभाळाकडे डोळे किलकिले करत अंदाज घेत राहतो.. कुठे एखादे आशेचं इंद्रधनुष्य नजरेला पडतयं का पाहतो… तोच एखादी आभासी सप्तरंगी शलाका त्याला खुणावून सांगते… झेपावे उत्तरेकडे..

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सेल सेल चा व्हायरल फिव्हर… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सेल सेल चा व्हायरल फिव्हर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… “डॉक्टर काका या वर्षाचा पाऊस थांबला, तसा गेले दहा पंधरा दिवस हिला बरंच वाटत नाहीए! … सारखी या बेडवर झोपूनच असते.. काही खाणं नाही कि पिणं नाही! .. सारखं सारखं अस्वस्थ वाटतयं! कश्यातही मन रमत नाही! उत्साह वाटत नाही! मरगळल्यागत वाटतयं! शून्यात कुठंतरी नजर लावून हेच मला वारंवार सांगत असते… तरी बरं ही कुठं नोकरीबिकरी करत नाही ते! .. पण माझ्या मात्र हिच्या या आजारपणामुळे एक एक करून सगळ्या सिक लिव्ह कधीच संपून गेल्या की… त्यात माझ्या बाॅसने मला तंबी दिलीय पुढचा रजेचा अर्ज न पाठवता राजीनामा पत्र पाठवून द्या.. नाहीतरी कंपनीला अश्या दांडीबहाद्दरांची आवश्यकताच नाही समजलं… मला तर काहीच समजना झालयं! … असं झालंय तरी काय हिला? .. बरं आपल्या पहिल्या व्हिजीटला सांगितल्याप्रमाणे तिच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या वगैरे करून घेतल्या.. त्याचाही एकंदरीत सगळे रिपोर्टपण नाॅर्मल आले… तरीही आजाराचं निदान लागेना म्हणजे कमालच झाली म्हणायची! … डॉक्टर काका आता तुम्हीच सांगा बरं मी काय करू ते? हि अशी आजारी पडल्यामुळे घरभर उदासीनता पसरलीय.. माझंही कशाकशात लक्ष लागेनासं झालयं… आणि कधी कधी मीच आजारी पडलोय काय असंच वाटंतय! … आतातर शारदीय नवरात्र, दसरा- दिवाळी सारखे सणासुदीचे दिवस जवळ येतायेत.. मला माझ्या ऑफीसमधून सुट्टी मिळणं तर आता शक्यच नाही.. म्हणून तर माझे आईबाबा, ताई नि दादा वहिनी गावाहून इकडे येताहेत आणि या गावातलीच इथली तिच्या घरची मंडळीही एक एकदा येऊन भेटायला येणार आहेत आम्हाला.. आणि त्यात हिची ही अशी नरमगरम तब्येत राहीली तर कसं होणार… आईबाबांना आयत्या वेळी तुम्ही येण्याचं रद्द करावं सांगावं तर तिकिट रद्द करण्याचा नाहक भुर्दंड पडेल… बरं हिलाच हवापालट करण्यासाठी तिकडे पाठवून द्यायचं म्हटलं तरी या स्थितीत तिला प्रवासाची दगदग झेपणार नाही आणि आजार अजून जास्त बळावेल याची जास्त शक्यता संभवते असाच सल्ला तुम्ही मला दिलात… डाॅक्टर काका तुम्ही आमचे फक्त जुने फॅमिली डॉक्टर नव्हे तर तुमचा आमचा तितकाच जुना नि जिव्हाळ्याचाही घरोब्याचा संबंध आहे… तेव्हा काका मला नेमकं काय केलं पाहिजे ते सांगा म्हणजे हिचा आजार जाऊन पहिल्या सारखी खडखडीत बरी होऊन घरात वावरू लागली म्हणजे घराचं आनंदवन होईल…. सांगा काका सांगा! .. आता अधिक विलंब लावू नका! … माझा जीव कसा टांगणीला लागलाय तुम्हाला दिसतोय ना? तुमचं असं हे चिंतायुक्त तिच्या कडे मौन होऊन पाहणं मला अधिकच काळजी लागून गेल्यासारखं आहे… तेव्हा बोला काका! बोला काका! … “

“अरे अविनाश! का बरं असा पॅनिक होतोस? … काहीही काळजी करण्यासारखं अलकाला झालेलं नाही… पावसाळा संपता संपता आणि हे सणासुदीचे दिवस ऐन तोंडावर आले की हा व्हायरल जिकडे तिकडे पसरतोच पसरतो आणि मुख्य म्हणजे त्याची लागण हि फक्त घरच्या स्त्रियांना होते… असा हा स्त्री आजार आहे… मी इतकी वर्षे डॉक्टरकी करतोय आणि सुदैवाने माझ्या वैद्यकीय सेवेला चांगली लोकमान्यताही मिळालेली आहे हे तर तू जाणतोसच अरे मीच काय पण आमच्या वैद्यकीय व्यवसायातले भले भले डॉक्टर सुध्दा या सिझनल नि सिलेक्टेड पर्सनलाच लागण करणाऱ्या व्हायरल सिंड्रोमवर औषधोपचार करू शकलो नाही… हे आमचं अपयश आहे असं हवं तर तू म्हणू शकतोस… पण आम्ही त्यावर इतकं संशोधन केलयं आणि त्यावरून हा स्त्रियांना त्या विशिष्ट काळातच का बरं आणि कसा बरं संसर्ग होत असणार हे शोधून काढले आहे… कुठल्याही स्त्रीवर्गाला तिच्या नैसर्गिक स्वभावधर्मानुसार बाजारहाट करण्याचा मुलभूत जन्मजात(वाईट्ट) गुण असतो. त्यानुसार ती जेव्हा जेव्हा म्हणून या बाजारात येनकेन कारणाने जात असते तेव्हा सराफाच्या दुकानावरून, साडी, ड्रेसेच्या शोरूम वरून, मोठ्या माॅलमधून आणि टूकार सेल सेलच्या मेळ्यावरून तर कधी आत फिरून त्यांचे जाणे हे होते आणि मग तिथल्या त्या प्रचंड अवाढव्य गर्दीमुळे हा संसर्ग तिथे त्यांना होतो… त्याची कळत नकळत झालेली बाधा इतकी जालीम असते कि सगळ्यात प्रथम त्यांच्या मनावर तर याचाच पगडा बसतो… ध्यानीमनी त्याचं चित्त तिथं गुंतले गेयलयं हे त्यांच्याही लक्षात येत नाही.. मग त्या अशा विमनस्क होऊन वागत जातात… बरं हि लागण आणि त्याचे पिडीत स्त्री वर्ग हा काही ठराविक असत नाही तो सगळ्या घराघरात पोहचलेला असतो… अगदी मी डॉक्टर असून माझ्याघरी सुद्धा हि लागण झालेली आहे.. माझ्याबायको बरोबर माझी आई, दोन्ही मुलींना देखील हा संसर्ग झालेला आहे बरं… हे तू लक्षात घे… या आजारावर आमचं वैद्यकीय औषधाची मात्रा कुचकामी ठरली आहे… आणि त्यासाठी फक्त त्यांनी बाजारात कुठल्या दुकानावरून वा दुकानातून, सेल मधून, माॅलमधून हा संसर्ग आणला आहे त्याचा शोध घेणे हे महत्त्वाचे आणि त्याप्रमाणे त्यांच्या समाधानाची परिपूर्तता तेथूनच करून घेण्यातच हा झालेल्या संसर्गाची बाधा नाहीशी होते.. तेव्हाच तो ते आजारी माणूस खडखडीत बरा होतं.. आपल्या खिश्याला भला मोठा भसका पडतो त्यावेळी, पण त्यांना मिळालेल्या विजयाचा आनंदापुढे त्याची चिंता आपण करायची नाही… आणि समजा हा उपायच जर अमलात आणायचा नाही असं जरं का वेडंवाकडं तुझ्या मनात येत असेल तर तर… घराचं रणकंदनच झालं म्हणून समजं… तेव्हा अविनाश अलकाला माझ्या औषधाची गरज नाही… तिला झालेला हा सेल सेल चा व्हायरल फिव्हर आहे… तूला मी यावरचा उपाय सांगितला आहेच… मग बघ तुझा दसरा दिवाळीसण कसा जोमात नि आनंदात जाईल तो… तर मी आता निघतो कारण माझ्या घरची मंडळी माझी वाट बघत असतीलच… किती वेळ गेलेत पेशंटला बघायला.. यांना आपल्या स्वताच्या घरचं भानं ही नसतं आपल्या ही घरी आपली बायको मुली नि आई आजारी आहेत त्यांच्या तब्येतीकडेपण पाहायचं असते ते.. असा माझा नामघोष चालला असणार… काय करणार अविनाश आपण बिचारी पुरूष मंडळी पडलोना! .. सगळ्यांना पुरून उरणारे. असलो तरीही.. फक्त या सेल सेल चा व्हायरल फिव्हरला आपल्याला शरण गेल्याशिवाय पर्याय तेव्हढा नाही समजलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares