☆ “क्षणांचे सोने…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.
असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.
असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.
भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.
त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.
त्याला एक मुलगी असली तरी तो खूश असतो. दोन मुली असल्या तरी खूश असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.
त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो…
तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.
त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.
परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!
★★★
लेखक:पु. ल. देशपांडे
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चित्रपटांतील अभिनेते किंवा अभिनेत्री असे नेमके काय काम करतात की त्यांना एका चित्रपटासाठी ५० किंवा १०० कोटी रुपये मिळतात…?
काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशी चर्चा खूप झाली होती की अभियांत्रिकीतील टॉपर मुले-मुली पुढे शिक्षण घेण्याऐवजी चित्रपटसृष्टीची निवड का करतात?
ज्या देशात सर्वोच्च शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते इत्यादी लोक वर्षाला १० ते २० लाख रुपये कमावतात, ज्या देशाचा राष्ट्रपती वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा कमी कमावतो, त्या देशातील चित्रपट कलाकार वर्षाला १० ते १०० कोटी रुपये कमावतात..!
कमावोत; पण ते असे काय काम करतात? हा प्रश्न तर उपस्थित होणारच ना…?
आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे?
मोठमोठ्या शास्त्रज्ञांना १०० कोटी रुपये कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते आणि हे लोक एका वर्षात इतके पैसे कमावतात..!
प्रश्न तर उपस्थित होणारच…
आज ज्या तीन क्षेत्रांनी देशातील नव्या पिढीला मोहित केले आहे ती म्हणजे
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण
या तीन क्षेत्रांशी संबंधित लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा दोन्हीही मर्यादेपलीकडे गेली आहे. हेच आजच्या आधुनिक तरुणांचे आदर्श बनले आहेत. प्रत्यक्षात आज त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेव्हा एखादी गोष्ट महागडी असते, अविश्वसनीय असते, अप्रासंगिक असते, तेव्हा ती देश आणि समाजासाठी हानिकारक किंवा आत्मघातकी ठरते.
आज कोणताही सुशिक्षित युवक किंवा युवती या क्षेत्रांकडे आकर्षित झाला नाही तरच ते अस्वाभाविक वाटेल..!
बॉलिवूडमध्ये ड्रग्स आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग आणि ऑनलाइन जुगार, राजकारणात गुंडगिरी आणि भ्रष्टाचार.
या सगळ्यांच्या मागे मुख्य कारण पैसा हेच आहे..
आणि हा पैसा त्यांच्यापर्यंत आपणच पोहोचवतो, हीसुद्धा मोठी मूर्खता आहे..!
७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य वेतन मिळत असे. ३०-४० वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती. ३०-४० वर्षांपूर्वी राजकारणही इतके धनसंपन्न नव्हते.
हळूहळू आपण लुटले जात राहिलो आणि ते आनंदाने आपल्याला लुटत राहिले..!
आपण या माफियांच्या जाळ्यात इतके अडकलो आहोत की येणाऱ्या पिढीचे आणि देशाच्या भविष्याचे नुकसान करत आहोत..!
५० वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट इतके अश्लील किंवा फुहड नव्हते. क्रिकेटपटू आणि नेते इतके अहंकारी नव्हते. आज तर हे लोक देव बनून बसले आहेत..!
आता गरज आहे की यांना डोक्यावरून खाली उतरवून जमिनीवर आणावे, जेणेकरून त्यांना स्वतःची मर्यादा कळेल..!
एकदा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो-ची-मिन्ह भारतात आले होते.
त्यांची भेट भारतातील मंत्र्यांशी झाली. बैठकीत त्यांनी मंत्र्यांना विचारले, “तुम्ही सर्व काय करता? ” आपले मंत्री म्हणाले, “आम्ही सर्व राजकारण करतो. “
त्यांना हे उत्तर समजले नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले, “माझा अर्थ असा की तुमचा व्यवसाय काय आहे? ” मंत्री म्हणाले, “राजकारण हाच आमचा व्यवसाय आहे. “
हो-ची-मिन्ह थोडे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही. राजकारण तर मीही करतो, पण माझा व्यवसाय शेती आहे. मी शेतकरी आहे. माझा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. सकाळ-संध्याकाळ मी शेती करतो आणि दिवसा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतो. ” हे ऐकून भारतीय प्रतिनिधीमंडळातील लोक निरुत्तर झाले..!
नंतरच्या एका सर्वेक्षणात समजले की भारतात ६ लाखांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह राजकारणावर चालतो; आज ती संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचली आहे..!
जेव्हा कोरोनाने संपूर्ण युरोपला विळखा घातला होता, तेव्हा डॉक्टरांना अनेक महिने सलग सुट्टी मिळाली नव्हती आणि संपूर्ण युरोप संकटात सापडला होता. तेव्हा पोर्तुगालमधील एका डॉक्टरने संतापून म्हटले होते, “तुम्ही सर्व फुटबॉलपटू रोनाल्डोकडे जा. तुम्ही त्याला कोट्यवधी डॉलर्स देता, मग तोच तुम्हाला वाचवेल. आम्हाला सामान्य फी देऊन इतक्या मोठ्या अपेक्षा का ठेवता? “
माझे स्पष्ट मत आहे की ज्या देशातील तरुणांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी नसून, राजकारणी, क्रिकेटपटू आणि अभिनेते असतात; त्या देशाची वैयक्तिक प्रगती कदाचित होऊ शकते, पण देशाची सर्वांगीण प्रगती अशक्य आहे.
सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, धोरणात्मक दृष्टिकोनातून तो देश कायम मागे राहील.
अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील.
ज्या देशात अनावश्यक आणि अप्रासंगिक क्षेत्रांचे वर्चस्व वाढत राहील, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल.
देशात भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढत जाईल.
प्रामाणिक लोक मात्र उपेक्षित राहतील. राष्ट्रवादी लोकांना जगणे कठीण होईल.
तथापि, सर्व क्षेत्रांमध्ये काही चांगले लोकही असतात आणि ते माझ्या दृष्टीने आदरास पात्र आहेत.
गरज आहे की आपण प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समाजसेवी, देशासाठी काहीही करण्याची भावना असलेले, जिद्दी देशभक्त, राष्ट्रनिष्ठ वीर लोकांना आदर्श मानले पाहिजे…,
नाचणारे-गाणारे भांड, ड्रग्ज घेणारे, चारित्र्यहीन, गुंड, मवाली, जातीयवादी आणि दुष्ट देशद्रोही लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती आपण विकसित केली पाहिजे.
आपण असे केले तर ठीक, अन्यथा देशाची अधोगती निश्चित आहे.
तुम्ही स्वतः ठरवा,
सलमान, अमिर, शाहरुख, ह्रितिक, करिश्मा, करिना, आलिया किंवा सचिन, विराट यांचे देशाच्या सामाजिक मूल्यवर्धन आणि विकासात काय योगदान आणि सहकार्य आहे? (Value addition)
आपली मुले अशा लोकांना आदर्श मानतात जे स्वतः फक्त आत्मकेंद्रित आहेत, असे या लेखाचे मत आहे..!
भविष्यात माझ्या भारत देशाला अशा स्वयंमशगुल तारकांची फार गरज नाही.
डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांची गरज भासणार आहे.
म्हणून भारताचे भविष्य डोळे उघडून जागे होवो अशी आशा.
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे… पान स्वच्छ लागायचं.
खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत.
माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय, माझ्या लहानपणी, जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईसक्रीमपाशी सुरू झाला होता! त्या कपाच्या पातळ कव्हरापासून चाटणप्रवास सुरू झाला.
या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्याने त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधीक्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटणं म्हणजे “सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ. ” दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीतातत्त्व अंगात मुरणं ही या चाटणसंस्कृतीची देन आहे.
रात्रीचं जेवण झालेलं असतं, शेवग्याच्या शेंगांची ओलंखोबरं आणि चिंचगुळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृतकण चिकटलेले असतात, ते बोटाने निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो, तो ते पातेलं चाटणाऱ्यानेच अनुभवावा.
तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली अळूची भाजी (पुण्यात फदफदं म्हणतात) खाल्लेली असेल पण पंगतीच्या शेवटी उरलेली भाजी, वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली अळूची-साय कधी खाल्ली आहे? बेफाट लागते!
माझी नणंद गव्हल्याच्या खिरीचं पातेलं, खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याला स्वच्छ करते.
सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या आणि पातेले निपटून घ्यायच्या.
पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते. आणि, ती मन लावून खरवडणारं ध्यान, किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील.
या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत.
ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वाने संपावे, ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढीतरी बचत व्हावी.
आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढईपुरता मर्यादित नव्हता तर तो आंब्याच्या फोडी आणि कोयी खातानाही लागू व्हायचा.
खाऊन माजावं, टाकून माजू नये, भूखी तो सुखी अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारामध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच, अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही जास्त अन्न शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरी झालीच तर ती टाकून कधीच देत नाही.
आमटीची थालिपीठं, फोडणीचा भात, किंवा फोडणीची पोळी असेल किंवा, कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर माठ पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सुप असेल.
तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल. अशी टाकाऊतून टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला, या दिवाळीत मोठाच धक्का बसला.
घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू एका ओळखीच्या बाईने लेकाला खायला दिले, त्यानेही “ममी यम्मी”करत खाल्ले. (मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफटात मारावीशी वाटते…)
असो!
खरा कानफटात मारायचा प्रसंग तेव्हा उद्भवला जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहाते तो त्यात चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्याने चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर ”हल्ली मला नाही आवडत तो कचरा“ इतकं सरळ सोपं उत्तर आलं.
बारकाईने पाहिल्यावर अशा टाकणं-न खाताना, गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळपोळीच्या चंद्रकोरी टाकणाऱ्यांचीही एक जमात असते.
पावाच्या कडा टाकून मधला मऊभाग खाणारे महाभागही असतातच की.
मसालादूध म्हणजे माझा जीव की प्राण!!
पण त्यात जीव ओतून घातलेलं केशर आणि सुकामेव्याचं वैभव, तळाशी जाऊन बसतं ही एक समस्याच आहे. आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पाईकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही.
मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवापूड बोटाने चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही.
माझ्या एका मैत्रिणीकडे भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम. पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची!
अशा टाकणं-संस्कृती पाईकांना शनिवारवाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावल्या पाहिजेत.
बरं ही टाकणं- मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एम्बॅरॅसिंग वाटतं (टाकताना बरं नाही वाटत एम्बॅरॅसिंग).
खूप जणांना सवय असते, ते पूर्ण चहा पीत नाहीत, तळाशी उरवतात… म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय याना चहा!
काहींना चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवण्याची सवय असते. जी बघताना घाण वाटते.
पुन्हा तो कप साफ करणाऱ्याचा विचार केला आहे का कधी?
ह्या मुलांनी खाल्लेल्या हापूसच्या फोडी बघितल्या आहेत? विलक्षण वेदनादायी आहे त्या खाल्लेल्या फोडी टाकणं! शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना, आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो? आमच्यावेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना, जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचं अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो, आणि त्यानंतर बाठ कुणी चाखायची यावरून युद्धं व्हायची ती वेगळीच.
हल्लीच्या फूड फूड वगैरे चॅनेलवर येणारे समस्त कपूर-खन्ना लोकं, पदार्थ करुन झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात, ते पाहून अंगावर काटा येतो.
खरवडून घेणे, निपटून घेणे, चाटून घेणे, पुसून घेणे, विसळून घेणे या स्वैपाकघरातल्या पाच क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते.
आतेसासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गूळ किसत होत्या. किसण्याचे काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचे ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतले आणि म्हणाल्या दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल, मग मी ते आमटीसाठी वापरीन.
मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं. आता काही लोकांना या कृतीला “किती तो कर्मदरिद्रीपणा” असं म्हणावंसं वाटेलही पण उलटपक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचारदरिद्री म्हणेन.
बटाटेवडे अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा, ओवा-मीठ- तिखट – कोथिंबीर-कांदा युक्त चविष्ट ऐवज, सिंकस्वाहा करण्याऐवजी, विसळून आमटीत ढकलावा, त्या आमटीची चव अप्रतिम लागते.
आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्यादिवशी थालीपीठार्पण करावी. काय जबरदस्त होतं त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं.
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे
पेरणी, लावणी, छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल, त्याहीपुढे, रात्रीबेरात्री वाहने चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल, ज्या रस्त्यांवरून ती वाहने धावतात तो तयार करणाऱ्या मजूरांबद्दल असेल.
शेतातून सुरू होणारी ही ऋण-जाण-साखळी, वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ती अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत नव्हे त्याहीपुढे भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते. मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहेरे दिसतात.
काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी संस्थेत एका शिबिरात सहभागी झाले होते. त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता, तिथे मनाला भिडणारा एक श्लोक-संदेश भिंतीवर लावला होता…
वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे
कृषिवल कृषी करुनि, अन्न ते निर्मितात
कृषिवल कृषी कर्मी, राबती दिन – रात
स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल
उदर भरण आहे, चित्त होण्या विशाल.
जुनं-नवं, आमची पिढी-तुमची पिढी, यापलीकडे जाऊन, विविध मतभेद टाळून, निदान अन्न-ऋण-स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवे, नाही का?
लेखिका : योगिनी श्रीनिवास पाळंदे
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
गर्भगृह – जिथे “मी” संपतो, तिथेच सत्य सुरू होतं.
एक प्रश्न विचारतो.
उत्तर देण्याची घाई नको.
फक्त… आत जा.
तुम्ही कधी तरी गर्भगृहात उभे राहिलात?
नक्कीच राहिले असाल,
तेव्हा —
तुम्हाला नक्की काय वाटलं?
शांतता?
भीती?
ओढ?
रडू?
याखेरीज असंख्य भावना
की… काहीच नाही?
ते “काहीच नाही” हेसुद्धा उत्तर आहे.
कारण गर्भगृह तुम्हाला काहीतरी देत नाही —
ते तुमच्याकडून काहीतरी घेतं.
गर्भगृह म्हणजे फक्त एक खोली नाही.
मंदिराच्या आत जाताना आपण दरवाजे ओलांडतो —
पण ते दरवाजे केवळ भौतिक सामग्रीचे नसतात.
ते मनाच्या थरांचे दरवाजे असतात.
पहिला दरवाजा — बाहेरचा गोंगाट सोडून येणारा “मी”
दुसरा — प्रश्नांनी भरलेला, अपेक्षांनी थकलेला “मी”
तिसरा — उत्तराच्या शोधात असलेला, एकटा “मी”
आणि चौथा —
जिथे “मी” उरत नाही.
तिथेच गर्भगृह सुरू होतं.
गर्भगृहात अंधार का असतो?
गर्भगृह अंधारं असतं — हा योगायोग नाही.
जसा आईच्या उदरात अंधार असतो, तरीही तिथेच जीव आकार घेतो —तसंच गर्भगृहाच्या त्या काळोखात तुमचे संकल्प, तुमची श्रद्धा, तुमचं भविष्य आकार घेतं.
बाहेरचा प्रकाश डोळ्यांना दिसतो.
आतला प्रकाश आत्म्याला जाणवतो.
गर्भगृह तुम्हाला त्या आतल्या प्रकाशाकडे वळवतं.
म्हणून तिथे दिवे कमी असतात — कारण तिथे तुमचीच ज्योत पेटायची असते.
मंत्र का म्हणतात तिथे?
कारण तिथे भाषा चालत नाही — तर तिथे चालते कंपन, स्पंदन.
तुम्ही जेव्हा “ॐ नमः शिवाय” म्हणता —
तेव्हा तुम्ही फक्त शब्द उच्चारत नाही,
तुम्ही स्वतःच्या पेशींना एक संदेश देत असता.
त्या नादात तुमची भीती विरघळते,
तुमचा अहंकार झुकतो,
आणि त्या क्षणी —
देव तुमच्यात शिरतो, तुमच्यासमोर नव्हे.
हजारो वर्षांची ऊर्जा
जुन्या मंदिराच्या गर्भगृहात एक वेगळाच भार असतो —
तो दगडांचा नाही.
तो हजारो माणसांच्या अश्रूंचा, प्रार्थनांचा, श्रद्धेचा भार आहे.
शतकानुशतके तिथे कोणी आलं —
मुलासाठी, आजारासाठी, दारिद्र्यासाठी, प्रेमासाठी.
त्या सगळ्यांनी आपापलं काहीतरी तिथे ठेवलं.
ती मूर्ती दगडाची किंवा धातूची नाही — ती लक्षावधी माणसांच्या विश्वासाची घनमूर्ती आहे.
म्हणून तिथे गेलं की काहीतरी होतं.
ते “काहीतरी” विज्ञानाला अजून ज्याला नाव देता आलेलं नाही.
गर्भगृह “सगळ्यांसाठी” का नसतं?
इथे एक खरं बोलतो —
गर्भगृहाचे नियम कोणाला कमी लेखत नाहीत.
ते त्या जागेची कंपनशक्ती टिकवण्यासाठी आहेत.
जसं एखाद्या शस्त्रक्रियागृहात
सगळ्यांना आत सोडत नाहीत —
तिथे तयारी लागते, शुचिता लागते —
तसंच गर्भगृहात मनाची शुचिता लागते.
तुम्ही स्वच्छ आहात की नाही हे कपड्यांवरून नाही —
ते तुमच्या हेतूवरून ठरतं.
आणि हे सगळ्यात महत्त्वाचं — गर्भगृहात जायलाच पाहिजे असं नाही.
जर तुमचं मन स्थिर असेल, आणि जर तुम्ही कुठेही बसून डोळे मिटलेत आणि त्या शक्तीशी जोडले गेलात तर ती स्पंदनं तुमच्यापर्यंत येतात. अंतर नाही. भिंत नाही. दरवाजा नाही. तरीही ती स्पंदने पोचतात
श्रद्धा हाच रस्ता आहे.
शेवटी एकच प्रश्न —
तुमच्या कुलदेवतेचं स्थान तुमच्यासाठी काय आहे?
एक जिवंत ऊर्जास्थान —
जिथे तुम्ही रिकामे होऊन जाता आणि भरून येता?
की एक फोटो काढण्याची जागा?
की एक पर्यटन स्थळ?
हे वाचताना जर आत कुठेतरी काहीतरी हललं,
एखादा श्वास खोल गेला,
डोळे ओले झाले —
तर तुमचं गर्भगृह आत आहे.
ते कधीच बंद नसतं.
गर्भगृहात तुम्ही प्रवेश करत नाही —
तिथून परतताना
तुमचं सत्य घरी परततं.
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: स्वाती मंत्री
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात.
उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही, तोपर्यंत ‘घ्या’ म्हणायला माझं काय जातं म्हणा!
तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे.
पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत.
जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो, तसा जिलबी आणि… छे!
जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.
खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं
जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात.
रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत.
सकाळी यमन बेचव वाटतो.
सकाळी थालीपीठही बेचव वाटतं.
मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं.
सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.
बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं.
सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहोत, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत.
अधिकचं हे असं आहे.
लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात.
हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं.
शहाळ्याचं पाणी हापिसात बसून
पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत.
मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे.
आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.
खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेत्ते होते.
उपासाचं खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. ‘उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. ‘
लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. ‘हरहर महादेव’ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.
माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.
सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा.
सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.
होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा.
दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते.
संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर ‘गोड गोड बोला’ म्हणतील लोक.
कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दूध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं.
गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या?