मराठी साहित्य – विविधा ☆ “विचार तर कराल?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचार तर कराल?☆ श्री जगदीश काबरे ☆

पाश्चिमात्यांची भाषा, खाणंपिणं, पेहराव, राहणीमान, पब संस्कृती यांचा प्रभाव आपण आवडीनं अंगवळणी पाडून घेतलाय. पण त्यांच्याकडून आपण जे शिकायला हवं होतं, ते म्हणजे तर्कशुद्ध विचार, श्रमाला आणि कामाला प्रतिष्ठा, सार्वजनिक स्वच्छता, नियमांचे पालन करणे आणि स्वावलंबीपणा तेच नेमकं आपण दृष्टिआड केलं आहे.

आपण त्या लोकांचे नेमके दुर्गुणच का घेत असतो, सद्गुण का नाही? याचे ताजे उदाहरण म्हणजे मुसलमान धर्मांध आहेत म्हणून आपणही धर्मांध होत चाललो आहोत. ते धार्मिक दहशतवाद वाजवतात म्हणून आपणही धार्मिक दहशतवाद माजवायला सुरुवात केली आहे. पण त्याचबरोबर ते हजारोंनी एकत्र येऊन शांततेने नमाज पढतात आणि देवाची करुणा भागतात. हा त्यांचा सद्गुण आपण न घेता आपल्या देवळात मात्र आपण झांजा-घंटांचा ठाणाणा आवाज करत जोरजोराने आरत्या म्हणत असतो आणि प्रचंड ध्वनी प्रदूषण करत असतो. असे करून आपण आपला देव बहिरा आहे म्हणून त्याला जोराने आपले गाऱ्हाणे ऐकवणे क्रमप्राप्त आहे असे आपल्याला वाटते काय?

विकसित देशात सार्वजनिक मुताऱ्या एवढ्या स्वच्छ असतात की ती मुतारी आहे असे वाटत नाही. एवढेच काय पण त्यांची सहलीची ठिकाणेच नाही तर जंगलेही स्वच्छ असतात. हे मी स्वानुभवाने ठामपणे सांगू शकतो. याउलट भारतात कुठेही जा सार्वजनिक मुताऱ्या म्हणजे नरक असतो. दुर्गंध असह्य झाल्यामुळे नाक मुठीत धरून केव्हा एकदा मोकळे होतो असे होऊन जाते. नाव मात्र ‘स्वच्छतागृह’ असते. किती विरोधाभास हा! आपली सहलीची ठिकाणे तर प्लास्टिकच्या कचऱ्याने भरून वाहत असलेली दिसतात. जंगलातही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाची वेष्टणे इकडे तिकडे पडलेली दिसतात. एकूण सगळीकडे कचरा करणे आणि घाण करणे हेच आपले वैशिष्ट्य राहिलेले आहे.

पाश्चात्य देशातील रस्त्यांवर प्रत्येक गाडी लेन सिस्टीम पाळत पळत असते. ते सिग्नल कधीही तोडताना दिसत नाहीत– रस्त्यावर चिटपाखरू नसतानाही अगदी रात्री बारा वाजतासुद्धा! पादचाऱ्यांना तिथले गाडीवाले प्राथमिकता देत असतात. ते रस्ता ओलांडेपर्यंत शांतपणे थांबतात– अगदी कितीही महत्त्वाचे काम आणि घाई असली तरीही!…आणि आपल्याकडे काय परिस्थिती असते? एक तर आपण कधीही लेन सिस्टीम पाळत नाही. सिग्नल तोडणे हा आपल्या अभिमानाचा विषय असतो. एक दिशा मार्ग असेल तर उलट दिशेने गाड्या नेणे, चालत्या दुचाकीवर मान वाकडी करून फोनवर बोलणे आणि पादचाऱ्यांच्या अगदी अंगाजवळून गाडी नेत त्यांना घाबरवणे, हे आपले कर्तृत्व असते. एकंदरीत आपल्याला सगळ्याचीच घाई झालेली असते, पण काम मात्र कवडीचे नसते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत आपण खूपच संवेदनाशील आहोत, ते योग्य. पण मुसलमान आणि ख्रिश्चनांची प्रार्थनास्थळे जेवढी स्वच्छ असतात त्याच्या पार्श्वभूमीवर आपली देवळे जळमटांनी भरलेली असतात आणि प्रचंड अस्वच्छ असतात. असे का? चर्चमध्ये तर लोक पायात चप्पल घालून जातात; तरीही तिथे कुठेही घाण नसते, धूळ नसते… असते ती फक्त शांतता. अशी शांतता आपल्या देवळात का असत नाही? का सतत नुसता गोंगाट असतो? अशा देवळांमध्ये जाऊन आपल्याला खरंच मन:शांती मिळते काय?

आनंद उपभोगण्याच्या नादात आपण पर्वत आणि थंड हवेच्या ठिकाणांची जी काही अवस्था केली आहे त्याबद्दल पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. वारशात मिळालेल्या या सुंदर देशाला प्रदूषित करण्यासाठी ते आपल्याला जबाबदार धरतील….पण लक्षात कोण घेतो? एवढे सगळे दुर्गुण आपल्या अंगात असूनही आपण परधर्मीयांना तुच्छ लेखतो आणि स्वतःची संस्कृती उच्च समजतो! याला दांभिकपणा म्हणायचे नाही तर काय?

सार्वजनिक स्वच्छता ही शासनापेक्षा आपली जबाबदारी आहे हे आपल्या केव्हा लक्षात येणार? घराच्या भिंती स्वच्छ करणारे आम्ही गाडीच्या काचा खाली करून शेंगदाण्याची रिकामी पूरचुंडी, फ्रुटीचा शोषून पोचटलेला पुठ्ठ्याचा खोका, बिस्लेरीची रिकामी बाटली रस्त्यावर फेकतो. रंगलेल्या पानाच्या तोबऱ्याने महापालिकेने सकाळी स्वच्छ केलेले रस्ते आणि सरकारी कार्यालयाच्या भिंती रंगवातो. घर घर शौचालय बांधण्याच्या घोषणा केल्यावरही उघड्यावर रस्त्याच्या कडेला मलमूत्र विसर्जन अजूनही करतो. चाँकलेटचा कागद तसंच बरंच काहीबाही रस्त्यावर टाकून सार्वजनिक घाण करतो, वर सिंगापूर, दुबईच्या स्वच्छतेचे गोडवे गातो. तेव्हा आपले सामाजिक भान सुटलेले असते हेच खरे. सफाई हे जर शासनाचे काम असेल तर स्वच्छता राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे, हे आपण जाणले पाहीजे.

मुंबई-पुण्याच्या पलीकडेही राज्य आहे. तिथे नळाला पाणी येत नाही. टँकरच्या फेऱ्यांवर त्यांचे आयुष्य अवलंबून असते आणि एखाददुसऱ्या बादलीसाठी मैलोगणती बायाबापड्यांना फेऱ्या माराव्या लागतात. इकडे मात्र आम्ही बिनदिक्कतपणे बिस्लेरीची अर्धी बाटली रस्त्यात ओतून देतो. ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना ते देणे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे, हे ज्यांना मुबलक पाणी मिळते त्यांचे कर्तव्य नाही काय? तीच गोष्ट कबुतरांना दाणे घालण्याची. दररोज भरभरून हजारो कबुतरांना दाणे घालणारे कुपोषित बालकांना मात्र उपाशी ठेवत असतात. त्यांच्यासाठी कुठलीही मदत पोहोचवत नाहीत. तरीही आपण मात्र भूतदयेच्या मोठमोठ्या गप्पा मारत असतो.

पाश्चात्यांची चर्चेस अतिशय स्वच्छ असतात. मुसलमानांच्या मशिदीही तेवढ्याच स्वच्छ असतात. पण हिंदूंची देवळे मात्र तेवढी क्वचितच स्वच्छ दिसतात. मला तर अनेक मोठ्या श्रीमंत देवळातही जळमटं लटकतांना दिसली आहेत. त्याविषयी व्यवस्थापकांना विचारल्यावर उर्मट उत्तरेही ऐकावी लागली आहेत. म्हणूनच असे वाटते की, आपल्या सामाजिक सवयींवर नव्याने सर्वकष विचार व्हायला नको का? की नुसत्याच आपली ‘संस्कृती महान’च्या गप्पा मारायच्या! आपणास फक्त हक्क हवे आहेत; पण जबाबदारीची जाणिव केव्हा होणार?

*

शेवटी आपल्या अस्वच्छतेचे मर्म खालील कवितेतून व्यक्त करतो आणि थांबतो.

आम्ही शिकलेली माणसे, आम्हाला शिकवू नका बरे.

नागरिकशास्त्र आम्ही पहिली पासून शिकतो,

आम्हाला कळत सारे बरे!

अगदी बरोबर, पण होतं काय सांगू का खरे?

म्हणतात ना काही सवयी “हाडी माशी मुरे!”

रस्त्यातून चालताना चणेदाणे लागतात बरे

पण खाऊन झाल्यावर, पुडी कुठे जाईना का बरे!

बसचे तिकीट सांभाळताना भान असते पुरे,

पण बसमधून उतरता क्षणी ते वाऱ्यावर भिरभिरे!

गाडीतून प्रवास करताना हवे गरम वडे अन् फळांचे गरे,

पण कागद कुठेही टाकताना स्वच्छता ना स्मरे!

लॉटरीचे तिकीट घेताना मनी स्वप्न वसे सुनहरे,

‘निक्काल” पाहून निराश होताच उडून जाते ते चिटोरे!

देवाला वहायला घेतो आपण फुले, हार आणि गजरे,

पण निर्माल्य पाण्यात फेकताना मन जराही ना घाबरे!

थेंबे थेंबे तळे साचे… हे जेव्हढे असे खरे

थोडाथोडा कचरा साठून ढीग बने… हेही तेव्हढेच खरे!

लाल सिग्नल जरी आम्ही तोडतो खरे,

परी पोलिसाला चिरीमिरी देऊन सुटकाही करतो त्वरे!

इतरांनी केला तर तो भ्रष्टाचार असतो बरे!

अस्मादिकांसाठी मात्र शिष्टाचारच असतो हे खरे!

15 ऑगस्ट, 26 जानेवारीला देशभक्तीचे येणारे उमाळे जर असतील खरे….

तर नागरिकशास्त्र आणि पर्यावरणाचे धडे 12 महिने गिरवा

असे सांगती जगदीश काबरे.

*

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात अनेकदा येणाऱ्या अनपेक्षित अडचणीच्या वेळी प्रत्येकाची सर्वसाधारण प्रतिक्रिया नकारात्मकच असते.मीही त्याला अपवाद नव्हतो.माझ्या अकोला ब्रॅंचला झालेल्या बदलीच्या संदर्भात मीही तसाच विचार करत होतो. माझ्या त्या दृष्टीकोनातली निरर्थकता पुण्याला झालेल्या माझ्या पोस्टींगमुळेच मला समजू शकली. तोवर माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्याच तेव्हा प्रतिकूल वाटणाऱ्या घटनाही माझ्या कशा हिताच्या ठरल्या आहेत हे इथे आल्यामुळेच मला लख्खपणे जाणवलं!)

हे मला जाणवलं, त्यालाही निमित्त ठरली ती इथं माझ्यावर सोपवली गेलेली पी.अॅण्ड डी.(प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट)ची जबाबदारी. पुणे झोनल-आॅफिसच्या अधिकारात येणाऱ्या अडीचशे ब्रॅंचेसमधल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या सर्व प्रकारच्या बाबींचं व्यवस्थापन करणारा एक विभाग माझ्या पी.अॅंड डी. डिपार्टमेंटच्या अखत्यारीतच होता.त्यामुळेच पहिल्या डी.जी.एम्. साहेबांची अशा पद्धतीने एक्झिट होण्यामागची कारणे व पार्श्वभूमी मला अतिशय विश्वसनीयरित्या समजू शकली. आम्हा सर्वच अधिकाऱ्यांच्या प्रमोशन रिझल्टसवर तत्कालीन डी.जी.एम् साहेबांची त्यांनी अॅप्रेझल रिपोर्ट्समधे मार्क्स देताना दाखवलेली सरसकट नकारात्मकता दूरगामी परिणाम करणारीच ठरली असल्याचे चित्रही माझ्या अधिकारातील या स्टाफ डिपार्टमेंटमुळेच मला स्वच्छपणे दिसू शकले होते.

त्या डी.जी.एम् साहेबांची पुढे अशी अपमानास्पद एक्झिट होणं ही त्यांच्याच एकंदर नकारात्मक अॅप्रोच आणि मानसिकतेचीच परिणती होती. तथापी आश्चर्य हे किं याचा अतिशय वाईट परिणाम इतर अनेक अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरला असला, तरी डी.जी.एम् साहेबांच्या मला त्रास देण्यासाठी घेतलेल्या सर्वच निर्णयांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला मात्र नकळत काव्यगत न्यायच मिळाला होता, आणि तो तसा मिळावा याचसाठी वेळोवेळी मला सहन करावी लागलेली अडचणीची परिस्थिती हा ‘त्या’ने निर्माण केलेलाच एक भुलभुलैय्या होता हेही सगळं वादळ शांत झाल्यावर मी मनोमन केलेल्या विश्लेषणातून नेमकेपणाने माझ्या लक्षातही आलं होतं.

मी अहमदनगरला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं नव्हतं, तरी तिथला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच, मी तिथे चार्ज घेण्यापूर्वीच्या ऑडिट

रिपोर्टमधील त्रुटी व साचून राहिलेली महत्त्वाची कामे याला मीच जबाबदार असल्याप्रमाणे मला अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन माझी अकोला ब्रॅंचला केली गेलेली ट्रान्सफर, तिथे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून रहाताना माझी झालेली ओढताण आणि घुसमट, मला अतिशय अन्यायकारक वाटली होती. मी न केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षाच समजत होतो मी. पण ती शिक्षा नव्हती तर पुढे येऊ पहाणाऱ्या संकटापासून माझं रक्षण करणारं, ‘त्या’ने माझ्यासाठी आवर्जून निर्माण केलेलं एक सुरक्षाकवच होतं. हे माझ्या तेव्हा लक्षात येणं शक्य नसलं तरी ते तसंच होतं!

माझी अकोल्याला झालेली आणि मला तेव्हा त्रासदायक वाटत राहिलेली बदली, आणि डी.जी.एम.साहेबांनी अन्यायकारक पध्दतीने अॅप्रेझल रिपोर्टमधे दिलेले कमी मार्कस् या मुख्यत: माझ्या करिअरसाठी अडचणीच्या ठरु शकणाऱ्या दोन घटनांदरम्यानच्या सर्व प्रसंगांची ‘त्या’ने केलेली गुंफण केवळ माझं हित जपण्यासाठीच कशी केली होती हे समजून घ्यायला त्या सगळ्याच घटनाक्रमांचा मागोवा घेणे अगत्याचे आहे.

या सगळ्याची तर्कसंगत मांडणी करायची तर बॅकेच्या कार्यपध्दतीतील संबंधित तांत्रिक आणि क्लिष्ट वाटू शकतील अशा दोन गोष्टींची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.एक म्हणजे अॅप्रेझल रिपोर्ट्समधे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले मार्कांचं प्रमोशनसाठीचं महत्त्व आणि सेंट्रल ऑफिसकडून ठरवली जाणारी प्रमोशन पोस्टिंग संदर्भातली पॉलिसी.

अॅप्रेझलमधील मार्कांचं स्कोअरींग प्रमोशन मिळण्यासाठी आवश्यक गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अखेरच्या तीन वर्षातील अॅप्रेझल रिपोर्टसमधील मार्कांची सरासरी ग्राह्य धरली जाते.

अगदी माझ्या हितसंबंधांपुरता विचार केला तरी माझं हित आणि समाधान फक्त प्रमोशन मिळण्यावरच नव्हे तर त्याच्याइतकंच प्रमोशननंतरचं माझं पोस्टिंग कुठं होणार यावरही अवलंबून होतंच.

डी.जी.एम् साहेबांच्या जेमतेम दीड वर्षांच्या इथल्या कार्यकाळात स्टाफ मॅटर्समधल्या थेट हस्तक्षेपामुळे तोवर चांगलं रेकाॅर्ड असणाऱ्या कितीतरी अधिकाऱ्यांचं करिअर पणाला लागलं होतं. त्यांच्यापैकी अर्थात मीही एक होतोच. तरीही इतरांपेकी बरीच जणं त्यांना प्रमोशन न मिळाल्याने बळीचा बकरा तरी ठरले होते किंवा काहींचे अॅप्रेझल रिपोर्टमधील कमी मार्कस् मेरीट लिस्टमधे मागे पडायला निमित्त झाले होते. त्यामुळे आऊट आॅफ स्टेट पोस्टिंग झाल्याने ते न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहिले.

इतर अनेकांच्या अशा पार्श्वभूमीच्या तुलनेत डी.जी.एम्. साहेबांचा अॅप्रोच माझ्याबाबतीतही तितकाच नकारात्मक असूनसुद्धा मेरीट लिस्ट आणि प्रमोशन पोस्टिंग दोन्ही बाबतीत त्यांचा तथाकथित नकारात्मक अॅप्रोचच माझ्या पथ्यावर पडला होता तो केवळ ‘त्या’ने माझ्यासाठी निर्माण केलेल्या सुरक्षाकवचामुळेच!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या अतिशय कमी मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा तिथला कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन, त्या इंटरव्हृयूमधले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरले!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या किरकोळ मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. याउलट मी अहमदनगर ब्रॅंचलाच असतो तर ‘पुणे रिजनमधील प्रमोटी’ म्हणून माझे प्रमोशन पोस्टिंग नागपूर किंवा मुंबई रिजनला होणे अपरिहार्यच ठरले असते जे माझ्यासाठी सर्वार्थानी गैरसोयीचेच होते.शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्ह्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन तिथे मिळालेले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरलेले होते!

या सगळ्याच घटनाप्रसंगांचा मागोवा हा दिलासा देणारा ‘त्या’चाच हळुवार स्पर्श असावा तसा मला आयुष्यातल्या पुढील वाटचालीतही दिलासा देत रहाणार होता!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य स्वतःचे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ स्वातंत्र्य स्वतःचे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. एक वेगळाच उत्साह सगळ्या वातावरणात असतो. त्याचा सर्वांनी अनुभव घेतला आहे. पण माझ्या मनात वेगळेच विचार सुरु झाले. स्वातंत्र्य म्हणजे सत्ता बदल झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. विचार, आचार, भावना, कृती याचे स्वातंत्र्य मिळाले. आणि काही वेगळी आव्हाने समोर उभी राहिली. ती भौतिक आव्हाने जरी अवघड वाटली तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो.

आपण खरेच स्वतःला स्वतंत्र करु शकतो का? स्वतःचे स्वातंत्र्य म्हणजे इतर कोणत्या व्यक्तींच्या पासून स्वतंत्र होणे नव्हे तर आपल्या मनातील विकार, नकारात्मक विचार, क्रोध, भीती, न्यूनगंड, भूतकाळातील वाईट अनुभव, जखमा आणि भविष्यातील चिंता या पासून मुक्त होणे. मानवी मनात सतत उलट सुलट विचार चालू असतात. आपल्याला कोणी आपले जुने अनुभव किंवा आठवणी विचारल्या किंवा बोलण्याच्या ओघात आल्या तर त्या कटू किंवा वाईट आठवणी असतात. एखाद्या व्यक्ती विषयी सुद्धा बरेचदा चांगल्या आठवणी सांगितल्या जात नाहीत. या साठी मला एक अनुभव आठवतो. एकदा एका सरांनी वर्गात मोठ्या पांढऱ्या बोर्ड वर एक बारीक काळा ठिपका काढला त्यावेळी सर्वांचे लक्ष त्या छोट्या काळ्या बिंदू वरच जात होते. आणि जास्त असलेला पांढरा भाग मात्र दुर्लक्षित होत होता. असेच आपल्या मनाचे असते. आणि भविष्याचा विचार करताना चिंता जास्त वाटतात. या दोन्हीतून आपण स्वतःला स्वतंत्र करु शकलो, तरच मनाने खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ. आणि वर्तमानात राहू शकू. मात्र त्या साठी स्वतः साठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

या साठी आपल्याला आपल्या मनाशी मैत्री करावी लागणार आहे. आपण दुसऱ्यांशी मैत्री करण्यासाठी खुप वेगवेगळे प्रयत्न करतो.

पण मन तर आपलेच असते कायम आपल्या बरोबर असते. आणि ते आपल्याला आरसा दाखवत असते. त्याच मनाशी होणारा संवाद आपल्याला बदलायचा आहे. आत्मभान ठेवायचे आहे. आत्मविश्वास वाढवायचा आहे. विविध नवीन गोष्टी शिकताना वेगळं बघण्याची व आत्मविश्वासाने जगण्याची क्षमता मिळवायची आहे. स्वतः इतरांचे अंधानुकरण करण्यापेक्षा सजग व्हायचे आहे. मनाची शिस्त कायम ठेवायची आहे. स्वतःमधील संवेदनशिलता जपायची आहे. अंतर्मुख व्हायचे आहे. अंतर्मुख झालो की, सृजनशील विचार, कल्पना शक्ती व सकारात्मकता वाढते. तरच आपण इतरांशी मोकळे पणाने संवाद साधू शकतो. आणि त्या मुळे बरेच मानसिक अडथळे दूर करु शकतो. हे सगळे समाजासाठी सुद्धा उपयुक्त असते.

अशा काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी व बदल करुन आपण आपले मानसिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. आंतरिक अडथळ्या पासून मुक्त होऊ शकतो. विचारशक्ती, भावना आणि कृती याचा उत्तम समतोल साधू शकतो. आणि हेच खरे मनाचे, श्वासाचे, आणि अस्तित्वाचे स्वातंत्र्य!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नयन जादूगार…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ नयन जादूगार… ☆ सौ शालिनी जोशी

डोळे हे कवी मनाचा आवडता विषय.अनेक अजरामर काव्यातून डोळ्यांविषयी गोड संवेदना व्यक्त झाल्या.कोणी म्हणतात ‘डोळे हे जुलमीगडे ‘,तर कोण म्हणते ‘डोळ्यात वाच माझ्या ‘,क्षणभर उघड नयन’, हे नयन बोलले काहीतरी,नयन तुझे जादूगार, जे स्वप्न भाव वेडे नयनी मूर्त होते, रूप पाहता लोचनी, डोळे मोडीत राधा चाले, ही आणि यासारखी अनेक गाणी भावभावना व्यक्त करण्यासाठी डोळ्यांचा उपयोग करतात. म्हणजे नुसते बघणे एवढाच डोळ्यांचा उपयोग नसून मनातील भाव व्यक्त करण्याचे ते साधन. मनाचा आरसाच,कधी प्रेम कधी ममता,माया,भक्ती, निरागसता,डोळ्यातून व्यक्त होते असे शब्दविण संवाद साधणारे हे डोळे राग,लोभ, द्वेष,मोह,मत्सर, ही व्यक्त करतात.कुतूहलाने टकमक बघतात. रागाने वटारतात. क्रोधाने लाल होतात.आश्चर्याने मोठे होतात. नुसत्या नजरेने हात न उचलता एखाद्याकडे संकेत करता येतो. हेच डोळे कधी मादक,कधी लाजरे,कधी प्रेमळ,कधी निष्टुर,कधी लबाड तर कधी पाणीदार, सतेज,निष्पाप असतात.

असे हे विविध ढंगी डोळे तसे त्याचे रंग आणि आकार ही विविध.कोणाचे घारे तर कुणाचे काळे, निळसर किंवा तपकिरी. डोळ्याच्या रंगानुसार माणसाचा स्वभाव बदलतो. म्हणून घाऱ्या डोळ्याची माणसे लबाड असतात.प्रदेशानुसारही डोळ्यांचा आकार व ठेवण बदलते, तिबेटी लोकांचे डोळे बारीक असतात तर काही लोकांचे डोळे गोल, काहींचे बटबटीत,तर काहींचे लांबट असतात. डोळ्याला निरनिराळे प्रतिशब्द ही आहेत चक्षु,नयन,अक्ष,लोचन.

तसेच डोळा हा नुसता शरीराचा अवयव नाही. तर सौंदर्याचा मापदंड.म्हणून कमलाक्षी, कमलनयना,मृगनयना,मृगाक्षी असे याचे वर्णन करतात. नृत्यांमध्येही शरीराच्या हालचाली इतकेच डोळ्यांच्या हालचालीला महत्त्व आहे.डोळ्यांच्या नजरेच्या स्थितीवरून ध्यानाचेही प्रकार होतात खेचरी,भूचरि,साचरी, आणि अगोचरी.नाक, कान आपल्याला बंद करता येत नाही पण डोळे स्वच्छेने पापण्यांच्या संपुटात बंद होतात आणि मग माणूस बाह्य जगापासून अलिप्त होतो त्यामुळे एकांतात मनाशी व परमेश्वराची ऐक्य साधता येते.

डोळ्यावरून तयार झालेले कितीतरी म्हणी व वाक्प्रचार आपण वापरतो उदाहरणार्थ आंधळा देतो एक डोळा देव देतो दोन. डोळ्यात अंजन घालणे,डोळ्यात तेल घालून बघणे,डोळ्यात प्राण आणणे, डोळे झाक करणे,डोळे भरून पाहणे, डोळे पांढरे होणे इत्यादी.

असे हे डोळे ज्याच्यामुळे आपण साऱ्या जगाच्या सौंदर्याचा, आनंदाचा,दुःखाचा,ज्ञानाचा अनुभव घेतो पण ज्याला डोळेच नसतात किंवा कार्य करण्यास सक्षम नसतात ते या सर्वाला मुकतात. बाह्य जगाशी संपर्क डोळ्याकडून तुटला तरी त्यांचे मनोधैर्य त्यांना मार्ग दाखवते.त्यांचे अंतःचक्षु इतके प्रखर असतात की डोळसालाही लाजवेल असे ज्ञान त्यांना प्राप्त होते उदाहरणार्थ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज.आता नेत्रदानामुळे अंधानाही दृष्टी येणे शक्य झाले आहे.ब्रेल लिपीमुळे शिक्षणाचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले आहे.एकंदरीत दृष्टी तेथे सृष्टी मग ती बाह्य असो अंतर असो.

सर्व भावना आपल्या पोतडीत लपवणारे व प्रसंगानुरू व्यक्त करणारे जादूगारच हे डोळे म्हणूनच म्हणतात,’डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ग णि त ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 ग णि त ! 💃 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गणित” हे नुसते शीर्षक वाचूनच, किती वाचकांच्या कपाळावरील आठ्यांमधे, गणितातील वेगवेगळी चिन्ह उमटली असतील याची मी, माझं गणित पूर्वी पासून कच्च असलं तरी, बरोबर टक्केवारी काढू शकतो! मी (माझ्या मनातल्या मनांत) केलेल्या एका पाहणीनुसार, प्रत्येक शंभर माणसातील, निदान नव्वद माणसांचा तरी गणित हा नावडता विषय असतोच असतो, असा निष्कर्ष काढून मोकळा झालो आहे. हा निष्कर्ष आपल्याला पटत नसेल तर, मी जे म्हणतोय त्यात किती खरं, किती खोटं याच त्रैराशिक तुम्हीच तुमच्या पद्धतीने मांडा आणि माझं उत्तर चुकीचं आहे असं जर आपल्याला आढळल, तर मला तसं कृपया कळवा. पण एक मात्र खरं आहे, जरी आपली दोघांची उत्तरे वेगवेगळी आली तरी, आपल्या रोजच्या आयुष्यात गणिताला असलेलं स्थान वादातीतच आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही समीकरण मांडायची गरज नाही!

माझ्या लहानपणी, म्हणजे कधी, हे चौकसपणे कोणी विचारण्या आधीच, माझे सध्याचे वय बहात्तर आहे, हे सांगून मी मोकळा होतो आणि माझ्या लहानपणी म्हणजे केंव्हा, याचे गणित करायला तुम्ही मोकळे! हां, तर काय सांगत होतो, माझ्या लहानपणी (तुमचं माझ्या लहानपणीच्या वयाच गणित एव्हांना सोडवून झालं असाव) इंग्रजी व्याकरण पक्के होण्यासाठी, तडखडकरांची छोटी छोटी पुस्तकं होती. त्याच धर्तीवर गणितातील पाढ्यांसाठी एक “अंकल्पी” नावाची (खरा उच्चार “अंक लिपी” पण आम्ही मुलं तिला त्या वेळेस “अंकल्पी” असेच संबोधत असू) दोन बोटांच्या चिमटीत मावेल इतकीच, गुळगुळीत कव्हरची, जिच्यावर आई मुलाला मांडीवर घेवून शिकवत असल्याचा छान सुंदर रंगीत फोटो असलेली पुस्तिका होती. माझ्या सध्याच्या वयाच्या लोकांना ही “अंकल्पी” त्यांच्या लहानपणी वापरल्याचे आठवत असेलच!

त्या “अंकल्पीच्या” छान पुस्तिकेत, एक ते शंभर आकड्या पासून (अंकी आणि अक्षरी) ते थेट बे कं बेच्या पाढ्या पासून पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाएकी ते औटकी पर्यंतचे पाढे होते! या सगळ्या पाढ्यांमध्ये त्या काळी, मला पाठांतराच्या बाबतीत सर्वात जास्त त्रास कोणी दिला असेल, तर तो एकोणीस आणि एकोणतीस या दोन पाढ्यांनी! आताही माझे बऱ्यापैकी पाढे पाठ आहेत त्याच एकमेव कारण म्हणजे, पेढे खायच्या वयात रोज शाळेत म्हटलेले पाढे आणि संध्याकाळी रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणून झाल्यावर परत एकदा होणारी सगळ्या पाढ्यांची उजळणी!

त्या “अंकल्पीच्या” पुस्तिकेत त्या सगळ्या पाढ्या नंतरच्या पानांवर, सर्व वारांची नांव, मराठी महिन्यांची नांव, तिथींची नांव, बारा राशींची नांव आणि सत्तावीस नक्षत्रांची नांव यासाठी उरलेली पान खर्च केलेली असतं. आज सुद्धा मी न चुकता, ओळीने सर्व नक्षत्रांची नांव तोंडपाठ म्हणू शकतो!

वर उल्लेखलेल्या पाढ्यांच्या पाठांतरावरून एक गोष्ट आठवली. मी माझ्या लहानपणी (म्हणजे केव्हा ते एव्हाना आपल्या लक्षात आले असेल अशी आशा आहे) मे महिन्याच्या सुट्टीत, माझ्या मोठया बहिणीच्या घरी विरार जवळ असलेल्या आगाशीला रहायला जात असे. तिथे त्यांच्या घरात भाडेकरू असलेले गद्रे काका, त्यांच्या दोन मुलांच्या बरोबरीने मला पण संध्याकाळी परवचा म्हणायला बसवत. त्यांची दोन्ही मुलं बे कं बे पासून ते तीस पर्यंतचे पाढे न चुकता उलटे म्हणत! इथे सरळ पाढे म्हणतांना माझी तारांबळ व्हायची आणि तेंव्हा माझ्याच वयाच्या त्या दोन्ही मुलांचे ते उलट्या पाढ्यांचे पाठांतर बघून, मी नुसता आ वासून त्या दोघांना बघत बसे!

आजकाल आपण काही छोटी छोटी मुलं, अवघड गणित काही सेकंदातच सोडवत असल्याचे विडिओ पाहिले असतील. त्यातील खरे किती मानायचे आणि खोटे किती मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला, पण आपल्याच देशात होऊन गेलेल्या शकुंतलादेवी नामक गणितातील चमत्काराला आपण विसरणे शक्य नाही! त्यांचे नांव त्या काळी गिनीज बुकात सुद्धा प्रसिद्ध झाले होते व त्यांना लोकांनी हौसेने human computer म्हणून पदवी पण बहाल केली होती! तर अशा या शकुंतलादेवींनी, एकदा परदेशातील एका सभागृहात विचारलेल्या तेरा आकडी random संख्येला, दुसऱ्या तेरा आकडी random संख्येने मनातल्या मनांत गुणून केवळ 28 सेकंदात त्या गुणाकाराचे अचूक उत्तर दिले होते! खरंच त्या त्यावेळच्या human computer होत्या!

पण गणित या विषयाची खरी प्रगती झाली ती “शून्याच्या”

शोधाने! श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध, ही भारताने जगाला दिलेली एक अद्भुत देणगीच आहे हे जगातल्या विद्वानांनी कधीच मान्य केले आहे! सर्वाधिक लोक त्या शोधाचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. काही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान, पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी, तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला, असे मानतात! पण माझा शून्याशी जास्त संबंध शाळेत असतांना गणिताचे पेपर मिळाल्यावर जास्त येत असे, त्यामुळे ते शून्य अगदी डोक्यात अजून पक्के ठाण मांडून बसलं आहे, एवढं मात्र खरं. असो!

गणित हा विषयच इतका गहन आणि गुंतागुंतीचा आहे, की त्याचा संबंध आपल्या आयुष्याशी लावण्याचा मोह कुणालाही अनावर व्हावा, मग मी तरी त्याला कसा अपवाद असणार!

सांगड आपल्या आयुष्याची

घालून बघा गणिताशी,

धरा त्याचे ‘अवयव’

घट्ट तुमच्या हृदयाशी!

वाढवून लोक संग्रह

‘बेरीज’ करा अनुभवाची,

कास धरून ज्ञानाची

करा ‘वजाबाकी’ अज्ञानाची!

करा आनंदाला द्विगुणित

करून त्याचा ‘गुणाकार’

पर दुःख करून शीतल

होउदे त्याचा ‘भागाकार’!

वाढवा प्रगतीचा ‘आलेख’

नव्वद अंशी ‘कोनात’ सुरेख,

सोडवतांना आयुष्याचे ‘प्रमेय’

नका विसरू आपले ध्येय!

मदतीचे ‘मुद्द्ल’ वाढवा नव्याने

गर्वाची ‘टक्केवारी’ कमी करा जोमाने,

व्हावे उपकारातून उतराई

तुम्ही ‘चक्रवाढ व्याजाने’

आणि

ठेवा कायम लक्षात तुमच्या

आयुष्यरूपी ‘वर्तुळाचा मध्य’

फिरता फिरता ‘परीघावरी’

करा आपले ईप्सित साध्य!

करा आपले ईप्सित साध्य!

तर या बाबतीत मला असं वाटत की, प्रत्येकाने आपआपल्या आयुष्याचे गणित सोडवतांना, काही ठराविक गणितीय पद्धती, आपले डोके शांत ठेवून वेळोवेळी वापरल्या, तर कोणालाच आपल्या आयुष्याचे गणित फार अवघड वाटणार नाही! जसे, आयुष्य जगतांना कुठल्या माणसांची बेरीज करायची, कोणाची वजाबाकी, कुणाला आपल्या आयुष्यात गुणून घ्यायचे किंवा कुणाला कायमचे भागायचे, हे एकदा समजले, की आपल्याला आपल्या आयुष्याचे गणित सुटलेच म्हणून समजा!

शुभं भवतु!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाई… – लेखक: अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

☆ बाई… – लेखक: अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

(आधुनिक साहित्यातील काही शिंपल्या शोधत असताना अचानक लेखकाच्या नजरेस आलेला हा लेख)

***

बाई ऽऽ केवढा हा पाऊस सतत कोसळतोय….,

बाई ऽऽ आणि या विजांची तर आता भीती वाटते”… ही ‘बाई’ कोण बरं? नेहमी हा प्रश्न पडतो मला… या बाईचा पत्ता एकदा शोधून काढायला हवा. गोंधळात पडलात ना? मला असं म्हणायचं आहे की, तुम्हीच बघा हं… लहान मुलगी असू दे, तरुणी असू दे किंवा अगदी आजीबाई असू दे, ‘बाई’ हा शब्द प्रत्येक बाईच्या तोंडी असतोच…आता हेच बघा ना, मी काय म्हटलं, “बाई केवढा हा पाऊस!” म्हणजे भीती वाटली तरी ‘बाई’ असं म्हटलं जातं आणि “अगंबाई थांबला वाटतं हा पाऊस” असा आनंद झाला तरी ‘बाई’ हा शब्द येतो, म्हणून मी विचारलं ही बाई कोण?

पाऊस कोसळत असताना आपल्या प्रियकराच्या आठवणीने काळजीनं नायिका काय म्हणते ऐकलं आहे ना गाणं, “झिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे गं ‘बाई’, गेला मोहन कुणीकडे”

मोठ्या वयाच्या बायका असं “बाई” असं म्हणतात का… तर नाही एखादी छोटीशी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगून जाते

“तुझी नी माझी गंमत वहिनी

ऐक सांगते कानात

आपण दोघी बांधूया गं

दादाचं घर’बाई’ उन्हात”

दादाची तक्रार करताना सुद्धा ‘बाई!’ ‘बाई’ शब्दाचा उगम शोधायला गेलो तर काही मिळत नाही. बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजत, नकळतच हा शब्द येत असावा. खूप वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणानिमित्त म्हटली जाणारी एक ओवी एका पुस्तकात वाचायला मिळाली… “पंचमीचा सण बाई दणादणा आला मुराळी भाऊ आला

बाई जाते मी माहेराला… सासूबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेऊ घाला दही साखर भाकरीला

मी तर निघाले माहेराला…” बघितलं सख्यांनो ‘बाई’ हा शब्द किती वेळा आणि किती सहज या ओळींमध्ये आलाय…

अगदी हे गाणं सुद्धा आपण ऐकलं असेलच

कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई

कौसल्येचा राम….

सख्यांनो लहानपणी खेळलेला भोंडला आठवतोय?

खिरापत ओळखणं, पाटावरचा हत्ती, भोवती धरलेला फेर, भोंडल्याची गाणी… अगदी मजा असायची…

त्या गाण्यांमध्ये दडलेला हा ‘बाई’ शब्द हळूच या गाण्यातून कसा डोकावतो बघा…

अस्सं माहेर सुरेख बाई

खेळाया मिळतं

अस्सं सासर द्वाड बाई

कोंडूनी मारीतं…

म्हणजे बघा माहेरची आठवण काढून भावूक झालं म्हणून बाई आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच…

“कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई” आपल्याला या नाट्यपदाची सुद्धा आठवण येते….

असा हा शब्द ‘बाई ‘…

कवी आणि गीतकार मग ते पुरुष असले तरी त्यांनासुद्धा ‘बाई’ शब्द कवितेत, गाण्यात वापरल्याशिवाय राहवलं नाही. केदार शिंदे सारख्या दिग्दर्शकानं सुद्धा सिनेमाचा विषय बाईच्या मनातले ओळखता येतं, ऐकू येतं.. असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं “अगंबाई अरेच्या!!”

अगदी ग दि माडगूळकर यांना सुद्धा आपल्या गाण्यांमध्ये, गीतांमध्ये हा ‘बाई’ शब्द वापरावासा वाटला आणि गाणं तयार झालं

ऐन दुपारी यमुनातीरी

खोडी कुणी काढली…

गं बाई माझी करंगळी मोडली…

आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाड़मयाचा पगडा होता आणि अजूनही आहे. पूर्वी भावना व्यक्त करताना कवीला देवाधिकांचा आधार घ्यायला लागायचा असा एक काळ होता. राधाकृष्णा शिवाय प्रेम या विषयाला हात घालणं थोडंसं गैर समजलं जायचं. त्यामुळे पूर्वी स्त्रीच्या केशसंभाराविषयी लिहिताना सुद्धा कवी म्हणतात,

कसा गं बाई केला

कोणी ग बाई केला

राधे तुझा सैल अंबाडा…

हे लिहिता लिहिता अजून एका गाण्याची आठवण झाली ती म्हणजे

“नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम

बाई मी विकत घेतला शाम”

काय करणार… रेडिओवर RJ म्हणून पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक असं काम केल्यामुळे कोणताही लेख लिहिताना, काहीही बोलत असताना गाणी आणि बोलणं याची सांगड आपोआप घातली जाते. गाणी आठवायला लागतात भराभर.. आपण रिमिक्सचा जमाना बघितला, “बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला” हे गाणं रीमिक्स झालं आणि तरुणाईला आवडलं…भांगडा पाॅपवर ठेका धरणारी तरुणाई हळूहळू मराठी गाणी सुद्धा ऐकायला लागली… अर्थात ही किती चांगली गोष्ट नाही का!

आपण बघितलं की कितीही आपण माॅडर्न झालो, इंग्रजी भाषा शिकलो,तरी ‘अगंबाई’ (अर्थात OMG सारख्या अनेक इतर शब्दांनी किंवा मोबाईलच्या शॉर्ट शब्दांनी हळूहळू ती जागा काबीज केली आहे) च्या जागी दुसरा कोणताही शब्द पटकन वापरला जात नाही.

एक छोटीशी आठवण इथे सांगावीशी वाटते. आम्ही 10 – 12 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका छोट्याशा घरी गेलो होतो… आमच्या नातेवाईकांकडे….. तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरे नवीन आलेले होते. त्या कॅमेराच्या स्क्रिनवर चित्र दिसतं ही गोष्ट नवीन होती. आम्ही त्या घरातल्या आमच्या छोटुकलीचा नाच आणि तिचं गाणं जेव्हा त्याच्यावरती रेकॉर्ड केलं आणि तो स्क्रीन तिने बघितला मात्र… आणि तिने एका विशिष्ट कोकणी स्वरात एक हात कमरेवरती आणि दुसरा हात गालावरती ठेवून “अग्गेऽऽ बाऽयऽऽ” असं कोकणी विशिष्ट स्वरात म्हटलं, तेव्हा आमचे आम्हाला इतकं मस्त वाटलं आणि हसूच आलं.

आपल्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना आपल्याला, “दांडेकर बाई, कुलकर्णी बाई, देशपांडे बाई” अशी आपल्या शिक्षकांना बाई म्हणण्याची पद्धत होती… अर्थात मध्यंतरीच्या काळात बाई या शब्दाला काही चा वेगळा अर्थ सुद्धा प्राप्त झालेला होता. पण तरीही ‘बाई’ म्हटल्यानंतर मला तरी अजूनही शाळेतल्या बाईच आठवतात.

जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध व्हिलन निळू फुले यांचा ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हाट्सअप च्या जमान्यात त्याचे अनेक मिम्स तयार होतात….

मराठी किंवा हिंदी मालिकातून एक बाई दुसर्‍या बाईला कशी छळते, कट कारस्थान करते हे हल्ली भरभरून दाखवलं जातं… प्रत्यक्षात असं होतही असेल/नसेल, पण मला माहित नाही. मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेनमधून प्रवास करताना एकमेकींशी कचाकचा भांडणाऱ्या बायका प्रसंगाला बायकाच बायकांची मदत करतात हे ही मी डोळ्यांनी पाहिलं आहे…..

काय घ्यायचं, काय सोडायचं, कोणाशी कसं वागायचं, नाती कशी जपायची, संवाद कसा साधायचा… घराचं घरपण टिकवायचं, नोकरी – घर – मुलं – नातेवाईक या सगळ्यांचा बॅलन्स कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी बायकांना छान जमतात.

तसे हे बाई पुराण न संपणारी कहाणी आहे. त्यात म्हणाल तेवढी भर घालता येते व साहित्य पंगतीची रंगत वाढविताही येते.

शेवटी आपला नेहेमीचा संवाद लिहितो….

बरं बुवा आज तरी इथेच थांबवितो हे बाई पुराण.

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होईल ना सगळं नीट? : लेखिका: सुश्री धनश्री दाबके  ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ होईल ना सगळं नीट? : लेखिका: सुश्री धनश्री दाबके ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

माझ्या दोन्ही डिलिव्हरीज अगदी सुरळीत पार पडल्या. पहिल्या वेळेला थोडा जास्त वेळ लागला इतकंच. कुठच्याच प्रकारची शारीरिक कॉम्प्लिकेशन्स नसल्याने दोन्ही वेळेला गुटगुटीत बाळ घेऊन मी सुखरूप घरी आले. पहिल्या वेळेला आई बरोबर होती आणि दुसऱ्या वेळेला सासूबाई. पण दोघींनीही सारखीच माया, ममता आणि आधार दिला.

पुढचे दोन अडीच महिने माझी व बाळाची इतकी छान काळजी घेतली गेली की शरीराने आईपण झटकन स्वीकारलं. पण आईपणाची मानसिक कॉम्प्लिकेशन्स जी त्यावेळेपासून सुरू झाली ती आजतागायत अजूनही तशीच आहेत.

डिलिव्हरीनंतर रोज संध्याकाळी आई मला, बाळाला मांडीवर घेऊन रामरक्षा आणि अथर्वशीर्ष  म्हणायला लावायची. खरंतर हे दोन्ही लहानपणीच आईने शिकवलेलं होतं. पण आईचं न ऐकण्याच्या मधल्या गुलाबी काळात ते जरा मागे पडलं  होतं. आता आई झाल्यावर बाळावर संस्कार करता यायला हवे, त्यासाठी ते तुला आधी म्हणता यायला हवं असं म्हणून आईने माझ्यावर परत नव्याने संस्कार केले. तेव्हा वाटायचं की हीचं आईपण अजूनही संपत नाहीये. माझं  तर आत्ताच सुरु झालंय.  ‘होईल ना सगळं नीट माझ्या बाळाचं?’

‘होईल ना सगळं नीट?’ या प्रश्नाने तेव्हापासून जे मनात घर केलंय, त्याचा आजतागायत अंबानींना सुद्धा लाजवेल असा मोठ्ठा बंगला तयार झालाय. आणि तरीही ‘वाढता वाढता वाढे’ अशी त्याची गत आहे.

मला वाटतं ‘होईल ना सगळं नीट?’ हे प्रत्येक आईने तिच्या पाचवीला पुजलेलं पालुपद असावं आणि त्यामुळेच त्यावरचं उत्तर तिला कधीच मिळत नसावं.

दोन्ही मुलांनी पटापट मोठं होऊन आता आपापल्या आयुष्याच्या रथाचं सारथ्य स्वतःकडे घेतलेलं आहे. मोठ्याचं  शिक्षण संपून नोकरी सुरू झालेली आहे. धाकटा  नुकताच युके मधल्या ए लेव्हल्सची (म्हणजे भारतातल्या बारावीची) परीक्षा पास करून त्याला हव्या त्या लांबवरच्या युनिव्हर्सिटी मध्ये पुढच्या शिक्षणासाठी निघाला आहे. म्हणजे मुलांना हवा तो मार्ग आणि त्यासाठीचा योग्य वेग त्यांनी पकडलेला आहे. मला आता फक्त दिमाखात मागच्या सीटवर बसायचं आहे. पण नेमकं तेच जमत नाहीये.

लेक तर मोठा झालाय, पण पंधरा वर्षांपूर्वी  त्याला नर्सरीत सोडतानाची मी आणि आज त्याला युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये सोडतानाची मी तशीच आणि तिथेच उभी आहे. कारण आई म्हणून मी मोठी झालेलीच नाहीये.

कधी मला सोडून न राहिलेला धाकटा, एकटा तिकडे कसा राहील? सगळं नीट मॅनेज करेल का? जेवण खाण्याचे कसं करेल? सगळं सांभाळून इतका भलामोठा अभ्यास कसा करेल? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनातल्या बंगल्यावर मजलेच्या मजले चढवत आहेत.

आई चिल मार, एवढी काय काळजी करतेस, मी राहीन ग नीट, अजून एक महिना आहे अशी समजूतीची वाक्य सध्या मी सकाळ, संध्याकाळ ऐकते आहे.

‘तू आता मनाची तयारी कर’ असं घरातले तिघेही मला आणि काही अंशी स्वतःलाही सांगत आहेत. पण काही गोष्टींची तयारी कधीच पूर्ण होत नसते. त्यावर ‘go with the flow’ हा एकच उपाय असतो. कितीही ठरवलं तरी मन आणि त्याच्या तालावर फितूर होऊन डोळे भरून येतातच.

“अगं बघता बघता चार वर्ष जातील” काल माझ्या मूडचा अंदाज घेऊन नवरा म्हणाला. त्यावर धाकटा म्हणाला “हो बघता बघता चार वर्ष जातील आणि मग आई डीग्री तर मिळाली आता माझं करीअर नीट होईल ना याची काळजी करेल.” त्याचं हे म्हणणं मात्र मला मनोमन पटलं आणि नकळत चेहऱ्यावर स्माईल उमटलं.

मुलाला जन्म देतांना नाळ तोडण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर आईसोबत असतात. पण तेच मूल मोठं झाल्यावर दुसऱ्यांदा तोडायची नाळ मात्र आईला स्वतःलाच डॉक्टर होऊन तोडावी लागते जे अजिबात सोपं काम नाही. पण हे तुला कसं रे कळणार, असा मनोमन विचार करुन मी पुढच्या कामात मनाला गुंतवायचा प्रयत्न सुरु केला.

लेखिका: सुश्री धनश्री दाबके

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आदर फक्त उच्चारी नको” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आदर फक्त उच्चारी नको☆ श्री जगदीश काबरे ☆

परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. त्यांच्या या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्कं बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखवलाच पाहिजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असं नाही वाटत?

वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का माजवतो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे!

कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एक प्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनिचतेची सुरूवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला अति महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा.

नेमकं आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचं असं झालं की, नुकत्याच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काॅ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ देताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी एका प्राध्यापिकेवर कारवाईचा बडगा उगारला गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिलं! त्या पत्रातही त्याने मराठी भाषेच्या व्याकरणातील असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचं व्याकरण कळतं का, हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलीस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहीत आहे का?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरं झालं.

हे ‘उच्चारी आदर’ देण्याचं प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सॲप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेलं दिसतंय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगू लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. अशा वेळी मला हसू येतं. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरवणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजीराजांचा अपमान करत नाहीत, असं त्यांना वाटतं काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचं राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणंच महत्वाचं वाटतं. खरंतर शब्दांपेक्षा त्याच्यामागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे आपण उच्चरवाने काय बोलतो यालाच महत्व दिलं जातं.

विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान करतात असा होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवाला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसंच देवी आणि आईलासुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का खटकावा?

‘शिवाजी कोण होता?’ या कॉ. गोविंद पानसरेलिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यांत आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून तर, नको तिथे वाद उकरून काढणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातला मथितार्थ बदलणार आहे का?

तसंही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस असा उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणं आवश्यक आहे. पण ज्यांचं भाषेचं ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तीचा आदर्श आचरणापेक्षा नुसतं नामस्मरणच महत्वाचं वाटतं. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचं काहीच नसतं. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग 70 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसलो. अलगद डोळे मिटले आणि मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्यासमोर व्यक्त होत राहिली. मनातला अंधार विरुन गेला. मन शांत झालं! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं.आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच!)

माझं पोस्टींग पुण्याला झाल्यामुळे अकोल्यातल्या प्रतिकूल परिस्थितीतून अतिशय सन्मानाने माझी एक प्रकारे सुटकाच होणार होती. खरंतर त्यामुळेच मला निश्चिंत

करणारा आनंद माझ्या मनात भरून राहिलेला होता. पण हळूहळू तो विरून गेला. कां कुणास ठाऊक पण हा आनंद निखळ वाटेनाच. कां तेच समजत नव्हतं. गेल्या अठ्ठावीस वर्षांत मी जिथे जिथे काम केलं होतं तिथले माझे सर्व वरिष्ठ आणि माझे सहकारी, अकोला ब्रॅंचमधले सध्याचे स्टाफ मेंबर्स सर्वांकडूनच चोहोबाजूंनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता पण हसतमुखाने ते स्वीकारत असताना आतून मात्र मी कोरडाच होतो! एक अनामिक अशी रुखरुख मनाला जाणवत होती पण कारण मात्र समजत नव्हतं. त्या रात्री खूप उशीरा अंथरुणाला पाठ टेकली, त्या निवांत क्षणी मनातली ही बोच अधिकच तीव्र झाली. अचानक नजरेसमोर तरळून गेला तो आमच्या पुण्यातल्या झोनल ऑफिसमधील डी.जी.एम् साहेबांचा रागीट चेहरा! त्यांची संतप्त नजर माझ्यावर रोखलेली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा पांघरूण दूर करीत मी ताडकन् उठून बसलो. मनाला स्पर्शून गेलेला भासच तो, पण मनातली रूखरूख अधिकच तीव्र करणारा! त्याच क्षणी मनातल्या त्या अस्वस्थतेचं कारण त्या संतप्त नजरेतच लपलेलं असल्याचं मला लख्ख जाणवलं. कधीकाळी एका ब्रँच मॅनेजर्स मिटिंगमधे आम्हा सर्वांनाच समज देताना त्यांनी आम्हाला ऐकवलेल्या दमदाटीची आठवण मनात ताजी झाली…

“नाऊ यू फरगेट युअर प्रमोशन. आय वुईल टीच यू अ लेसन. माईंड वेल”.. हे त्यांचे जळजळीत शब्द आठवले. आता झोनल ऑफिसमधे जॉईन होणं म्हणजे रोजच्या मरणाला समोर जाण्यासारखंच होतं हेही लक्षात आलं. माझं झोनल आॅफीसमधे पोस्टिंग झाल्याचं समजताच आनंदून गेलेल्या माझ्या गाफील मनाला या वस्तुस्थितीची जाणीव नव्हतीच.माझ्या अंतर्मनात मात्र ती अव्यक्त रुपात मला टोचणी देत पडून राहिली होती!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी माझी अवस्था झाली. मला नवीन जबाबदारी आनंदाने स्वीकारायची तर होतीच, माझ्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा अकोल्यापेक्षा माझं पुण्यात असणं कितीतरी पटीने जास्त सोयीचं आणि सुखावहही असणार होतं, पण या सगळ्या सकारात्मकतेला डी.जी.एम. साहेबांच्या रूपातलं भयावह वास्तव छेद देत राहिलेलं! एक प्रकारच्या केविलवाण्या अगतिकतेने मन एकदम मलूलच होऊन गेलं. चोहोबाजूंनी अंधारून आलेल्या अशा मन:स्थितीत ‘त्या’च्याशिवाय मला सावरणारं त्या एकटेपणात दुसरं होतंच कोण? मी पांघरूण दूर सारुन आत धाव घेतली आणि देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. त्या प्रसन्न, हसतमुख दत्तमूर्तीसमोर बसलो. अलगद डोळे मिटून हात जोडले आणि मनातलं हे सगळं माझ्याही नकळत नि:शब्दपणे आपसूक ‘त्या’च्यापर्यंत पोचत राहिलं! ‘कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाच्या हाताखाली काम करणं सोडाच, त्याचं तोंड बघायचीही माझी इच्छा नाहीय’ ही माझ्या मनातली भावनाच त्याच्यापर्यंत नेमकी पोचलेली आहे याचं त्याक्षणीचं समाधान येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मला पुरेसं होतं!

आता आहे त्या परिस्थितीत शेवटच्या क्षणी कांहीही बदल होऊ शकणार नाहीय हे स्पष्टपणे माहित होतं.तरीही गच्च भरून आलेलं आभाळ गार वाऱ्याची एखादी झुळूक येताच तिच्या हळूवार स्पर्शाने एका क्षणात मळभ दूर होऊन मोकळं व्हावं तसा माझ्या मनातला अंधार क्षणार्धात नाहीसा झाला! कारण मला माहित होतं, आता यापुढे जे काही होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच आणि तेच माझ्या हिताचं असणार आहे! आश्चर्य म्हणजे माझ्या मनातला हा विश्वास काय आक्रीत घडवू शकतो याची प्रचितीही मला लवकरच येणार आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाच नव्हती!

सर्वांचा निरोप घेऊन मी अकोल्याहून प्रस्थान ठेवलं त्या क्षणी आणि पुढे रात्रीच्या पूर्ण प्रवासातही मनावर कसलंच दडपण नव्हतं. नगर आणि अकोला या दोन्ही ब्रॅंचेसमधे मी काम करीत होतो तेही पुण्याच्या त्याच डीजीएम् साहेबांच्या अधिपत्याखाली. पण तेव्हा त्यांच्या नजरेपासून मी कितीतरी दूरच्या अंतरावर होतो. पण आता मात्र उद्यापासून त्यांच्याच ऑफिसमधे त्यांच्या लहरीप्रमाणे काम करायचं म्हणजे रोज नव्या संकटाला आमंत्रण देत रहाण्यासारखंच होतं. पण म्हणून काय झालं? तिथे त्यांच्या हाताखाली इतरही पाच-पन्नास जणं काम करत होतीच की. त्यांच्यापरीनं ते निभावतच आहेत ना? तसंच आपणही निभवायचं. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? खरं सांगायचं तर हे असे दिलासा देणारे विचार प्रथमच माझ्या मनात येत होते! एखाद्या नकोशा परिस्थितीला सामोरं जाताना जे कांही दुःख, प्रश्न किंवा अडचणी असतात त्या फक्त आपल्यालाच आहेत असंच प्रत्येकाला वाटत असतं. मन जेव्हा शांत, समतोल विचार करतं तेव्हा मात्र त्यातली निरर्थकता आणि दुसरी बाजूही स्वच्छ दिसू लागते. माझंही तसंच झालं होतं. या उलटसुलट विचारांत प्रवासातली ती संपूर्ण रात्र मी जागाच होतो!

पुण्याला ऑफिसमधे सकाळीच मला रिपोर्ट करायचं असल्याने पुरेसा आराम मिळणं शक्यच नव्हतं.

आमच्या झोनल ऑफिसच्या त्या भव्य इमारतीत ब्रॅंचमॅनेजर्स मिटिंगज् किंवा इतरही कांही कामांच्या निमित्ताने यापूर्वी मी अनेकदा आलेलो होतो. त्यामुळे ती वास्तू आणि तो परिसर माझ्या ओळखीचा होता. तरीही आज तिथे मी येत होतो ते तिथलाच एक वरिष्ठ अधिकारी म्हणून. त्यामुळे मनात उत्सुकता होती, चलबिचल होती आणि पुढं काय वाढून ठेवलेलं असेल ही भीति आणि अनिश्चितताही!

मी लिफ्टमधून बाहेर येऊन कॉरिडॉरमधे पाऊल ठेवलं. डी.जी.एम् साहेबांच्या केबिनच्या दिशेने चालू लागलो. मी त्यांच्या प्रशस्त अशा त्या ए.सी.केबीनच्या बंद दाराबाहेर उभा. केबीनचं दार अलगद ढकलून मी तिथंच थबकलो.

“मे आय कम इन सर?”

समोर पाहिलं तर आतील प्रशस्त टेबलामागील रिव्हाल्व्हींग चेअरवर नेहमीचे डी.जी.एम् नव्हतेच. अतिशय प्रसन्न आणि हसतमुखाने माझं स्वागत करणारा हा चेहरा मला ओळखीचा वाटतोय पण यांचं नाव मात्र…..

” वेलकम मिस्टर लिमये. नो फाॅरमॅलिटीज्.प्लीज डू कम..” त्यांनी अतिशय आपुलकीने माझं स्वागत केलं.

यांना मी पूर्वी कधीतरी पाहिलंय पण यांचं नाव…..

हा भास तर नसेल? की स्वप्न?

” आय अॅम मिस्टर वखरे. बेसिकली आय अॅम फ्राॅम नागपूर रिजन. कालच मी चार्ज घेतलाय.”

” आणि इथले आधीचे डी.जी.एम्? ते रजेवर आहेत कां?” ही शक्यताही नाकारता येत नव्हतीच.

” ओह्..यू डिडन्ट नो द एपिसोड?”

“न..नाही सर”

” खूप भयंकर आहे ते. अॅन्ड व्हेरी अनफाॅर्च्युनेट फाॅर हीम. बोलू आपण. आणि तसंही बाहेर दिवसभर याचीच चर्चा चालणाराय. कळेलच तुम्हाला…’ वखरे साहेब हसत म्हणाले.

हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी. मला हवं ते हवं तसं आणि नेमकं हवं तेव्हा घडवणारा  आणि जे घडेल ते माझ्या हिताचंच असेल हा माझ्या मनातला विश्वास सार्थ ठरवणारा चमत्कार!..पण स्वप्नवत वाटावा असा हा चमत्कार घडला कसा हा मनातला प्रश्न मात्र अजून तरी अनुत्तरीतच होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

हा खरंतर आमच्या केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा. अगोदर लिहिलेल्या केदारनाथ यात्रेचा पूर्वार्ध. यमुनोत्री यात्रेत घोडेबाजार सह रस्ता, पायी, घोड्यावर, पीट्टू, आणि डोली ने प्रवास कसा होतो हे पाहण्याचा सगळा अनुभव पहिल्यांदा आला. आणि काहीप्रमाणात पुढील केदारनाथ प्रवास कसा असेल याची थोडीफार जाणीव झाली ती याच प्रवासात. पण जाणीव असणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती, यात काहिवेळा प्रत्यक्ष परिस्थिती थोडी बिकट असते असा अनुभव येतो. तो मात्र केदारनाथलाच आला.

एखाद्या पैसे गुंतवण्याच्या जाहिरातीत जसं काही जोखीम किंवा आर्थिक धोका असणार्या काही गोष्टी पटापट सांगीतल्या तर जातात, पण आपल्याला त्या नीट कळत नाहीत. तसाच काहीसा प्रकार यमुनोत्री आणि केदारनाथ प्रवासात जाणवला.

यमुनोत्री यात्रेत केदारनाथ यात्रेची कल्पना आली असली तरी ती फक्त चुणूक होती. कारण या यात्रेचा प्रवास छोटासाच होता. अंतर जास्त नव्हतं. वातावरण बदलाचा प्रभाव तेव्हढा नव्हता. आणि पायी, घोडा, किंवा डोलीच्या प्रवासाच्या अगोदर आणि नंतर पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.

पण घोड्यावर बसण्याचा त्रास लक्षात आला तो इथेच. आम्ही घोडे करायचे ठरवल्यावर त्या घोडेवाल्यांना आपलाच घोडा घेऊन आपल्यालाच पैसे मिळावेत याची इतकी घाई झाली की आमच्यापैकी दिसेल त्याला, बाई आणि माणूस यांना उचलून घोड्यावर बसवायची स्पर्धाच सुरु झाली आहे असं वाटलं.

मी वर जावं की नाही. जायचच असल्यास घोडा करावा की डोली. याचा विचार करण्याअगोदरच चारपाच जणांनी जमेल तसं उचलून एखाद पोतं चढवून त्याला हलवून नीट कराव तसं समोर असलेल्या घोड्यावर मला चढवलं सुध्दा. त्यातही पहीला प्रयत्न थोडा असफल झाल्यावर माझ्या शरीराकडे आणि हालचालींकडे पाहून एक त्यातल्यात्यात कमी उंचीचा घोडा आणला.

यावेळी मला दहीहंडी उत्सवाची आठवण झाली. फक्त तिथे पहिला प्रयत्न असफल झाल्यावर दुसरा संघ येतो. पण लक्ष्य तेवढंच उंच असतं. इथे मला घोड्यावर चढवणारा संघ त्याच घोडेवाल्यांचा होता. पण कमी उंचीचा घोडा आणून गोंविंदाला (मला) कमी उंचावर चढवलं जाणार होतं. यात मी मात्र कदाचित मनातल्यामनात खऱ्या गोंविंदाचा धावा केला असावा.

या सगळ्या गदारोळात आमच्यापैकी दोन तीन जणांना याच पध्दतीने घोड्यावर चढवलं सुध्दा होतं. असा प्रसंग अगोदर आला नसल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून कमी अधीक प्रमाणात, वेगवेगळे आवाज निघाले होते. या आवाजात भिती, किंचाळणं, सवय नसणं, या प्रकारे उचलतील याचा अंदाज नसणं याचे संमिश्र भाव होते. मला त्रास झाल्याने माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता, तर मला घोड्यावर बसायचंच नाही म्हणून मी चक्क ओरडत होतो. पण ते ऐकणार कोण……. कारण सगळ्यांच्याच बाजूला घोडे आणि घोडेवाले यांचीच गर्दी.

मी घोड्यावरुन काहिही करून खाली उतरण्यासाठी धडपडत होतो. आणि आलेलं गिर्‍हाईक जाऊनये याचा खटाटोप घोडेवाले करत होते. यात थोडा गोंधळ झाला. पण या सगळ्या गोंधळात एकच जण त्यातल्यात्यात शांत होता….. तो म्हणजे घोडा…….

म्हणजे माणसं घोड्यासारखी आणि घोडा माणसासारखा वागत होता…….

मी अगदी थोडावेळच घोड्यावर होतो. पण तेवढ्या अल्पकाळात माझ्या नजरेसमोर घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन, ती घोड्यांबरोबर चालवणारे मावळे. आणि पाठीशी लहान मुलाला बांधून मेरी झांसी नही दूंगी असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी येऊन गेले. आणि मनातल्यामनात त्यांची माफी मागत. तडफेने घोड्यावरुन पायउतार झालो.

राजकारणात पायउतार व्हाव यासाठी खटाटोप असतो. तर इथे मी पायउतार होवूनये म्हणून प्रयत्न सुरु होते. पण शेवटी विजय माझाच झाला असलातरी आता काय करावं?……. या विचारात घोडेवाले आणि माझ्या बायकोसह ज्यांनी मला बरोबर नेले होते ते सगळेच मान खाली घालून वीचार करत होते. शेवटी तुुम्ही सगळे जा…… मी यमुनोत्रीच दर्शन घेतलं नाही तरी चालेल….. या विचारावर माझा प्रवास थांबला आणि इतरांचा सुरु झाला.

यांच्या पूर्ण प्रवासाला दोनतीन तासांचा कालावधी अपेक्षीत होता. पण जेमतेम अर्धाच तास झाला असेल. माझ्या बायकोच्या सांगण्यावरून परत एक सहकारी कुलकर्णी यांचा फोन…….. काय विचार करताय….. परत केव्हा येणार आहोत…. करा हिंमत….. डोली करा पाहिजेतर……. आम्ही रस्त्यात, नाहीतर वर थांबतो, वाट बघतो.

मग काय?……. माझ्या अंगात परत एकदा झाशीची राणी, आणि मावळे यांच स्फुरण चढलं. फक्त चढाईसाठी घोड्याएवजी डोली वापरावी असा निर्णय माझाच झाला. (कधीतरी मी एकटासुध्दा धाडसी आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढला.) आणि परत आमच्या चारचाकीच्या सारथ्याला सोबत घेत मी एक डोली ठरवून त्यात त्याच डोलीवाल्यांच्या साहाय्याने अगदी पेशवाई थाटात नाही, पण पाय जमतील तसे जवळ लांब करत वीराजमान झालो. सुदैवाने वातावरण चांगले होते.

मी वीराजमान झाल्यावर आमचा प्रवास सुरु झाल्याची वार्ता उलट टपाली भ्रमणध्वनी द्वारे पाठवण्याची काळजी मीच घेतली. ती पोहोचेपर्यंत त्यांचा गड सर होत आला होता. त्यांच्यासाठी ही आनंदी वार्ता होती. बायको जवळ त्या वेळी तिथे साखर असती तर कदाचित तीने त्या बसल्या घोड्यावरुनच साखर वाटायचा आनंदही घेतला असता. पण तो योग नव्हता.

मी सुखरुप वर पोहोचलो. आमची मंडळी आणि सोबतचे सहकारी यांची भेट झाली. आणि यमुनोत्री दर्शन व परतीचा प्रवास सुखरुप झाला.

या वेळी एक गोष्ट घडली ती आमचे सहकारी नंदेश परदेशी यांनी लक्षात आणली. बर्‍याचशा सिनेमात लग्नाची द्रृश्य आवर्जून दाखवली जातात. या सगळ्या सोहळ्यात नयनरम्य द्रृश्य असतात. असच नयनरम्य द्रृश्य आमच्या या प्रवासात पण होतं. फक्त सिनेमात वर हा घोड्यावर असतो. आणि वधू डोलीत असते. आमचा लग्न सोहळा कधीच पार पडला होता. पण आज माझी बायको घोड्यावर स्वार होती. आणि मी मात्र डोलीत होतो. आज खर्या गोष्टीला क्रूतीची साथ होती. आणि साक्ष होती यमुनोत्री.

आजच नाही तर आजच्या आधीच्या इतर प्रवासातच काय….. बाहेर जातांना सुध्दा खर्या अर्थाने ती पुढाकार घेत असते, आणि मी त्यातल्यात्यात सुरक्षित आणि कमी खडतर मार्ग माझा असतो, आणि खडतर तिचा. पण आज ते घोडा आणि डोली या प्रवासात जाणवलं.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares