मराठी साहित्य – विविधा ☆ ‘चिरयौवना रसना’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘चिरयौवना रसना’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

रसना, जिह्वा जीभ, एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय.  ज्या इंद्रियाने पदार्थाची रुची कळते ती रसना.  जे इंद्रिय विविध रसांचा आस्वाद घेते ती रसना.  काही भावना, संवेदनांचा प्रत्यक्ष जिभेशी संपर्क झाला नाही तरी त्यात एखादा रस असतो आणि तो आपण ‘चाखतो’, मग ते अक्षरवाङ्मय असो, संगित असो, गंध असो, शिल्प आणि चित्र असो.  थोडक्यात या ‘रस’ग्रहण’ करणाऱ्या रसनेलाच जिव्हा किंवा जीभ म्हणतात.

आपण एखाद्या कलाकृतीचा ‘रस’स्वाद’ घेतो, ज्ञानेश्वरी ‘रसाळ’ आहे, लता दिदींची सगळीच गाणी ‘मधाळ’, ‘रसाळ’ आहेत, मला त्याच्याशी बोलण्यात अजिबात ‘रस’ नाही, निजामपुरकर, कोपरकर, कळवणकर बुवांची कीर्तने ‘रसाळ’ असायची, बालगंधर्वांच्या नाटकांवर ‘रसिकां’च्या उड्या पडायच्या, श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्मकथनात ‘वात्सल्यरस’ अगदी दुथडी भरून वहातो, कांदा भज्यांचा वास आला आणि माझी जीभ ‘चाळवली’, ‘खवळली’, ‘तोंडाला पाणी सुटले’ इ इ.  या सगळ्या वाक्यात कोणता ना कोणता ‘रस’ आहे आणि रसाचा संबंध रसनेशी असतो हे आपल्याला चांगले ठाऊक आहे!

जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे.  हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो.  माणसाच्या सुमारे दहा सेंटीमीटर लांब आसलेल्या या मांसल अवयवावर सुमारे १०, ००० रुचिकलिका असतात.  त्यामुळे आपणास पदार्थाची चव कळते.  जिभेच्या विशिष्ट भागावर असणाऱ्या रुचिकालिका वेगेवेगळ्या चवीची जाणीव करून देतात अशी वैज्ञानिकांची समजूत होती.  त्यानुसार जिभेच्या टोकाकडे गोड, मागील बाजूस कडवट, दोन्ही बाजूस आंबट व खारट चव समजते असे वाटत होते.  परंतु आता संशोधनाने सर्व चवींची जाणीव जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडेच होते असे सिद्ध झाले आहे.  जीभ या अवयवाचे वजन सामान्यतः ५५-५६ ग्रँम असते.  

बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी सहाय्य करते.  जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य मुखाने निरनिराळे ध्वनी काढू शकतो.  

सर्व स्वर आणि व्यंजनांचे उगमस्थान म्हणजे माणसाचे मुख.  मुखातून ध्वनीरुपाने प्रकट होणारी ती ‘वाणी’.   परा, पष्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार.  आपण  ज्या वाणीने बोलतो ती ‘वैखरी’ वाणी.  कुणाच्या वैखरी वाणीतून आशीर्वचने बाहेर पडतात तर कुणाच्या तळतळाट, शिव्याशाप.  ‘जी दुसऱ्यास दुःख करी, ती अपवित्र वैखरी’ असे समर्थ दासबोधात सांगतात.  वैखरीचा उपयोग कसा करायचा हे उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते.

निसर्गाने सर्व प्राणिमात्रात पूर्ण विकसित कंठ केवळ मानवालाच प्रदान केला आहे.  त्याच्या बळावर, आपल्या प्रतिभेची जोड देऊन माणसाने अगणित भाषा आणि संगीत विकसित केले.  

रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, स्वरूप आणि ओलसरपणा या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

जीभ या अवयवावरून मराठीत किती तरी म्हणी आणि वाक्प्रचार प्रचलित आहेत.  उदा.  ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, ‘तुझ्या जीभेला काही हाड आहे की नाही?’, ‘लांब जीभ करून बोलू नकोस’, ‘हे म्हणायला माझी जीभ रेटली गेली नाही’.  ‘जिभेला लगाम घाल’, ‘जीभ हासडून टाकीन’, ‘जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा’, ‘जिभेचे फार चोचले नकोत’, ‘जगामध्ये जगमित्र, जिह्वेपाशी आहे सूत्र’ (दासबोध) जेव्हा ‘जीभ घसरते’ तेव्हा अनर्थ होतो.  (जीभ घसरल्यामुळेच तपस्वी कुंभकर्णाला इंद्रासनाऐवजी मरेपर्यंत निद्रासनावर पडावे लागले!) जीभ सैल सुटणे, इ. इ. इ.  वाचकांना या यादीत खूप भर घालता येईल.  

जिह्वाग्री भगवती सरस्वतीचा वास असतो.  बुद्धीची देवता श्री गणेश असली तरी वाणीची देवता सरस्वती आहे.  साक्षात श्रीमद्शंकराचार्यांनीही या जिह्वेची स्तुती केली आहे.  त्यांचे एक अपरिचित ‘जिह्वास्तुतिस्तोत्र’ उपलब्ध आहे.  ते असे….

श्रीमत् शंकराचार्यविरचित ‘जिह्वा प्रार्थना’

मत्प्रियसखिमज्जिह्वे मय्यनुकभ्यां कुरुष्व नौमि त्वाम्l

अन्यापवादरहिता भज सततोंम नमः शिवायेति ll१ll

*

वाणीगुणानुनिलये त्वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम् l

त्यजसकललोकवार्तां भज सतततों नमः शिवायेति ll२ll

*

कट्वम्ललवणातिक्त स्वादुकषायादिसर्वरसवाञ्छाम् l

जिह्वे विहाय भक्त्या भज सतततों नमः शिवायेति ll३ll

*

रसने रचितोयञ्जलिस्ते परनिन्दापरुषैरलं वचोभिः l

दुरितापहं नमः शिवायेत्यमुभादिप्रणमं भजस्व मंत्रम् ll४ll

*

(श्री.गोस्वामी संपादित ‘शंकराचार्यांची स्तोत्रे’ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात ते वाचकांना पहायला मिळेल. )

*

हठयोग आणि राजयोगात ‘खेचरी’ ही एक महत्वाची मुद्रा’ आहे.  या मुद्रेत जिभेचे कार्य अनन्यसाधारण आहे.  यात साधक आपली जीभ टाळूला समांतर उलटी वळवून टाळूकडून घशात उघडणाऱ्या ब्रह्मरंध्रातून झिरपणाऱ्या अमृत बिंदूंचे प्राशन करतो.  ही मुद्रा सिद्ध झाल्यावर साधक क्षुधा, तृष्णा, विष, रोग, मूर्च्छा, वार्धक्य, अकाल मृत्यू इत्यादींपासून मुक्त होतो, असे ‘हठयोगप्रदीपिका’ म्हणते.  (३. ३७-३८).  

रसनेला चिरयौवन प्राप्त झालेले आहे.  माणूस कितीही वृध्द होवो, त्याच्या देहावर हव्या तेवढ्या सुरकुत्या पडोत, डोळ्यांना अंधत्व येवो, शरीराची शक्ती आणि ऊर्जा क्षीण होवो, पण जिव्हा कधीच थकत नाही, वृद्ध होत नाही.  तिचा ‘वळवळ’ आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तशीच चालू राहते.  इतर अवयवांच्या तुलनेत जीभेचे रूप बरेच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणे कठीणातले कठीण काम आहे!

मुखरूपी म्यानात राहणारी जीभ हे दुधारी खड्ग आहे.  ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस सशस्त्र सैनिकांचे कडे तिच्याभोवती उभारले आहे, पण जीभ अशी चंचल, नाठाळ आहे की, कालांतराने ती त्या दातांना देखील उखडून टाकते.  आपल्या बोलण्याने दुसऱ्याकडून स्वतःच्या तोंडातले हे दात तोडूनही घेऊ शकते!

जीभ कुणाला घायाळ करते, तर कुणाच्या मनावरचे दुखरे व्रण बुजवू शकते.  तिच्यातून अमृत झरते तसेच हलाहल देखील पाझरते.   जीभरूपी भूमी अशी विचित्र आहे की, तिथे फुले उमलतात, तसेच काटेही उगवतात.  

वार्धक्यात अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात, मेंदू थकतो पण जिभेला असे यौवनाचे वरदान प्राप्त झालेले आहे की, तिला थकवा असा कधीच जाणवत नाही.  अनेक ‘शक्ती आणि सिद्धी’ प्राप्त झालेल्या ह्या इवल्याशा पण शक्तिशाली  जिभेवर ताबा मिळविणे हे अत्यंत दुष्कर कर्म आहे.  जे लोक जिभेवर ताबा (खाणे आणि बोलणे या दोन्हीवर) मिळवू शकतात ते खरंच धन्य धन्य होत!

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जीवन म्हणजे अनोळखी जागी अंधारात मारलेली उडी,ती कुठे कशी पडेल याचा अचूक अंदाज बांधणे सहज शक्य नाही. पण म्हणून ते त्यागताही येत नाही. त्याचे ओझे परमेश्वराने प्रत्येक जीवावर जबरदस्तीने लादलेले आहे. ते त्यागायचा नुसता प्रयत्न केला तरी माणसाच्या कपाळी डरपोक असल्याचा शिक्का समाजाकडूनच मारला जातो. म्हणूनच ते ओझे पेलतच जगावे लागते. त्या शिवाय माणसाजवळ कुठलाच पर्याय नसतो. संथ,शांत, धाडशी, चंचल, गंभीर, सोज्वळ, संयमी, सात्विक, बदफैली, निरागस ,अशा अनेक प्रकारे ते जगता येते. पण त्यासाठी सुध्दा बळकट मनोधैर्य, मनोनिर्धार असावाच लागतो. तो नसेल तर त्या जगण्याला अर्थच उरत नाही.

जगणारे ते स्वीकारतात, जगण्याचा पर्याय निवडतात आणि जगू लागतात. आपल्या जगण्याचा आराखडा तयार करतात. तो प्रयत्न पूर्वक राबवत असतात तिथेही जगणाराला अंदाजच बांधावा लागतो .तो कितपत यशस्वी होईल हे निश्चित सांगता येत नाही.सगळ जगणच असं विचित्र आवर्तनाने भरलेल आहे. हे माहीत असूनही जगणारा ते जगतच जातो. शेवटी जगणं म्हणजे गुडघाभर चिखलात चालायच, चिखलात भरभर, जोरात चालतात येत नाही, आणि दमल्यावर खाली बसताही येत नाही. कारण जगणं माणसांची दमछा करण्या साठीच दिलं गेलं आहे . माणसाला माणसाची ओळख पटावी म्हणूनच हे नियोजन असावं. प्रत्येकाच्या जगण्यात स्वर्थीमाणसं यायलाच हवीत त्याच्याशिवाय माणसाला निस्वार्थी माणसांची किंमतच कळणार नाही. देवही मोठाच डोकेबाज आहे .त्यानं माणसाला सहजपणे या जगण्याच्या चक्रव्यूहात अडकवून टाकलं आहे आणि तो बसलाय त्यांची गंमत बघत.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रवासातील सहप्रवासी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ प्रवासातील सहप्रवासी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

माझे पती केंद्रीय पोलीस सेवेत असल्यामुळे त्यांच्यासोबत पुर्ण देशभर प्रवासाचा योग येत असतो. हा प्रवास कधी ट्रेनचा, कधी बसचा तरकधी ट्रॅव्हल्सचा सुरू असतो. आता अगदी अलिकडे तर कर्नाटकमधून कारवार-पिंपरी बस तर माझ्या प्रवासाची चांगलीच सोबत झाली आहे. असो. खरे सांगायचे तर या प्रवासातील सहप्रवासी ते मात्र कधी कधी खूपच गमतीदार असतात. अगदी दिर्घकाळ लक्षात राहणारे म्हणा. हा प्रवास पण फार गमतीशीर असतो बघा. प्रवासात देखील आपल्या बर्‍याच ओळखी होतात. अगदी गावगल्ली पासून ते पै-पाहूण्यांचा माग काढला जातो. इतके आपण आपल्या सोबतच्या शीटवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत गप्पांत रंगून जातो.

आता ट्रेनच्या प्रवासाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर ट्रेनमध्ये आरक्षण न झालेल्या प्रवाशांची लुडबुड फारच असते पहा. अगदी लग्नात मिरवणाऱ्या बिनकामाच्या करवल्या आणि करवले असतात ना नेमकी तशीच पहा! उगी आपले इथून उठ तिथे बस पुन्हा तिथून उठायचे दुसर्‍या शिटवर बस. शीट रिकामी दिसली की आपलं टेकायचं लगेच. असे संपूर्ण प्रवासभर आपल्या सोबतच्या बॅगचे हाल करत त्याचा प्रवास चालू असतो. शेवटी पक्के आरक्षण असणाऱ्या प्रवाशास विनंती करून ते आपल्या बॅगपुरती तरी जागा मिळवतातच. स्वतः मात्र असेच फिरत रहातात नशीबाने मिळाली जागा की लगेच आपलं टेकायचं. असे सहप्रवाशी ट्रेनच्या नेहमीच्याच प्रवासात भेटत गेले. असो. काहीजण आठवणी राहिले नंतर विसरले.

एकदा मी कल्याण ते संभाजीनगर रेल्वेनी प्रवास करत होते मी माझा दहा वर्षाचा मुलगा आणि माझी लहान मुलगी असे तिघेजण आम्ही प्रवास करत होतो.

आमचे दोन शीटचे आरक्षण होते. मुलगी लहान होती त्यामुळे तिचे तिकीट नव्हते. बाजूला एकजण असे चौघेजण एका बर्थवर होतो. मी एकदम अलिकडे बसले होते. ट्रेन नाशिकरोडला थांबली आणि आमच्या डब्यात खूपच गर्दी झाली. कदाचित संध्याकाळी पाचसहा दरम्यान ऑफीस सुटण्याची वेळ त्यामुळे असेल. रेल्वेचा डबा अगदी खचाखच भरून गेला. डब्यात आल्यावर प्रत्येकजण थोडं टेकायला जागा मिळेल का ?असे प्रश्नचिन्ह चेहर्‍यावर ठेवून ठेवून ऊभे होते. माझ्या बाजुलाच एक बाई उभी होती. ती उभी असल्यापासून मला सारख्या ढोसण्या द्यायची. तिला कदाचित तिला वाटत होते मी जरा सरकून तिला बसायला द्यावे. तिच्या चेहर्‍यावर हावभाव पण तसेच दिसत होते. आम्ही आमच्या दोन शीटच्या आरक्षण मध्ये तिघे बसलो होतो. आणि आता या बाईला कुठे जागा देणार ? नंतर त्या बाईने मला थोडे सरकायला सांगितले, ते बघा एका वेगळ्याच अविर्भावात. मी काही तिला बसायला दिले नाही तेंव्हा ती अहो!चक्क मला ती म्हणाली, “काय माणूसकी हाय का नाय !”. नंतर पुर्ण प्रवासात ती माझ्याकडे अशी पहात होती की, तिच्याच रिजर्व आसनावर जणू मी बसले होते. ती उतरेपर्यंत माझ्याकडे रागाने पहात होती अगदीच साता जन्माचं वैर असल्या सारखे पहा. असो असतात असे ही काही प्रवासी समजा.

अशा या प्रवासात बरेच विचित्र प्रवासी भेटत असतात. गर्दीत कोणी ढोसण्या देणारे असते. कोणी उगी स्वत:चा तोल न आवरल्याने दुसर्‍याच्या अंगावर कोलमडणारे असते. कोणी आरामात खिडकीजवळची जागा भेटली की मस्त झोप काढणारे असतात. कोणी शेजारी बसलेलेल्या व्यक्तीबरोबर गप्पात रंगलेले असतात. कोणी पुर्ण प्रवास झोपेतच पुर्ण करणारे असतात. काही प्रवाशी तर इतके झोपाळू असतात बघा त्यांना त्यांचे उरण्याचे ठिकाण येऊन गेलेले माहीत नसते. प्रवासातील सहप्रवाशांसोबत असा गमतीशीर प्रवास सुरू असतो.

बसच्या प्रवासात प्रवाशांना घाई असते ती खिडकीच्या बाजूची शीट पकडण्याची. बस स्टॅडवर बस लागली रे लागली की, लगेच कोणी खिडकीतून आत रूमाल फेकतात, कोणी बॅग फेकतात. बापरे बॅग फेकताना तर बॅगचा चेंडू करून खिडकीतून आत बॅग कोंबली जाते. बसमधून प्रवासात या खिडकीचे मात्र खुपच किस्से पहायला मिळतात. अहो! त्या खिडकीसाठी चक्क भांडणे होतात. खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे एकमात्र असते त्यांना बसमधील इतर प्रवाशांसी काही घेणेदेणे नसते. खिडकी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्‍यावर झळकत असतो. खिडकीतून बाहेर पहात आपल्याच विचारात त्यांचा प्रवास चालू असतो. कधीकधी काही प्रवासी आपल्यातच इतके दंग असतात की, बस वाहकाला (कंडक्टरला) ओरडून सांगावे लागते. झोपाळू प्रवाशांची तर गोष्टच न्यारी बघा!शेजारी बसलेल्या प्रवाशाला सांगून झोपतात, “ माझा स्टाॅप आला की, सांगा बरं !”असो

काही प्रवाशांना उगाच सवय असते, “काय कुठे चाललाय?, गाव कोणते ? “ अशा नसत्या चौकशा करायची पहा. मग समोरच्याला आवडेल न आवडेल असे काय नसतेच पहा! एकदा मी ‘ कारवार – पुणे ‘ बसने गावी इस्लामपूरला जात होते. मी खिडकीच्या बाजूला बसले होते. मला सुध्दा प्रवासात खिडकी खुप आवडते. माझ्या बाजूला एक बाई बसली होती. ती इतकी बडबडी होती की, काय बोलायचे कामच नाही. उगी स्वतः बद्दल न विचारता माहिती देत होती रस्त्यात येणाऱ्या गावांची नावे सांगत होती. काही गरज नसताना ज्यादा माहिती म्हणजे या गावात माझी मावशी, कुठे मामा, कुठे मुलगी रहाते. असे तिने गरज नसतानाची माहिती देऊन मला नुसते बेजार केले होते. एकतर ती कर्नाटकमधून असल्यामुळे तिचे बोलणे काही समजत नव्हतेच. तिला हिंदी निट बोलता येत नव्हते. मध्येच मराठी शब्द आला की, थोडेफार चेहर्‍यावर हासू आणून मी तिला इच्छा नसताना खोटानाटा प्रतिसाद देत होते. एकदाचे बेळगाव आले आणि ती उतरली आणि मी सुटकेचा नि:स्वास टाकला.

अजून एकदा कारवार-पुणे बसमधून मी गावी येत होते. बसमध्ये फार गर्दी नव्हती त्यामुळे मला खिडकी जवळ ऐसपैस जागा मिळाली. मला खिडकी मिळाली याचा फार आनंद झाला. माझा गावी जाण्याचा प्रवास चालू झाला. माझ्या बाजूच्याच शीटवरती एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी बसली होती. अहो!काय सांगायचे तुम्हाला तिने नुसता माझ्या नाकात दम भरून सोडला. काय माहित सकाळी प्रातःविधि उरकून आली होती का नाही. एकदा तिला विचारले बाळा तू कुठे उतरणार आहेस. तिने सांगितले, “ पुणे “.

ती असे बोलताच मी माझी बॅग उचलून मागे दोन शीट सोडून बसले. वाचक हो ! हे असे ही प्रवासी भेटतात बरं.

बेळगाव नंतर एक सद्गृहस्थ बसमध्ये चढले. त्यांची पत्नीसुद्धा सोबत होती. त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते ती त्यांची पत्नी असावी. त्यांची वेशभूषा पाहून तर ते चांगले सुशिक्षित वाटत होते. दोन आसनाची शीट असलेल्या प्रत्येकाला ते विचारत होते, ” तुम्ही जरा उठता का आम्हा दोघांना(ते आणि त्यांची बायको)येथे एकत्र बसता येईल “. आता बघा बसमध्ये आटापिटा करून मिळवलेली खिडकीजवळची जागा कोण बरे सोडेल? नंतर अजून दोघा- तिघांना विचारत

ते माझ्या शिटजवळ येऊन म्हणाले, “वो ताई तुम्ही दुसरीकडे बसता का ? “ मी तर आजपर्यंत कधीच लांबचा प्रवास खिडकी वाचून केला नव्हताच. मी सरळ नाही म्हणताच त्यांना इतका राग आला की, ते मला “ ही बॅग उचला येथून तिकडे सरकून ठेवा. पर्स तिकडे ठेवा बसमध्ये सगळेच सोयीचे कुठून आणायचे. “ असे ओरडून बोलू लागले. अहो!आधी विनंतीच्या सुरात शीट मागणारे गृहस्थ, आता एकदम तापलेच बघा!

आणि सोयीचे कोणाला पाहिजे पहा, हे ऐंशी ओलांडलेले गृहस्थ यांना बसमध्ये सुध्दा बायकोच्या बाजूलाच बसून प्रवास करायचा आहे. आता वाचक हो! “तुम्हीच सांगा सोयीचे कोण पहात आहे ते “ नंतर त्याची बायको माझ्या बाजूला बसली आणि ते गृहस्थ पुढील शीटवरती बसले. पण सारखे बेचैन होऊन मागे वळून पहायचे आणि नंतर दोन-तिन स्टाॅप गेल्यावर त्या दोघात मिळून एक शीट मिळाली. क्षणात त्या गृहस्थांच्या चेहर्‍यावर हासू फुलले. पुढे प्रवास चालू झाला. प्रवासात सुध्दा आपल्या जीवनसंगीनी, तिची घेतलेली काळजी मात्र यातून दिसून आली.

एकदा इस्लामपूर वरून सांगलीला जात होते. त्या दिवशी बहुतेक एमपीएससी ची परिक्षा होती त्यामुळे एसटीमध्ये इतकी गर्दी होती की, सरळ ऊभे सुध्दा रहाता येत नव्हते. जास्त करून मुलींची गर्दी होती. गर्दीत मी इकडे तिकडे कोलमडलेली पाहून एका भल्या मुलीने स्वतः उठून मला बसण्यास जागा दिली. त्यापण दोन आसनाच्या शीटवर तिघीजनी बसल्या होत्या. मला थोडे बसायला मिळाले याचे समाधान वाटले. पण अहो! काय सांगयचे बाजूला बसलेल्या मुलीने मला सांगली पर्यंत नुसते जेरीस आणले बघा शेतावर बांधाची हद्द असावी तसे ती बसली होती. जराही इकडे तिकडे सरकून नाही. तिने मला कोपरखळीने बेजार केले. कितीतरी वेळा मी विनंती केली की,

“जरा आत सरकून बस “पण तिने ऐकले नाहीच. शेवटी मला वाटले ऊभी होते तेच बरे होते. मी मनाची समजूत घातली असेल हिच्याशी, कोणत्या तरी जन्माचे हद्दीपायीचे वैर …. असो

इतर प्रवाशांसारखी मला सुध्दा प्रवासात खिडकी हवी असते. मग काही प्रवाशी खिडकीतून बाहेर पाहण्यात दंग होतात तर काही खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यात मस्त डुलकी काढतात. खिडकीतून बाहेरचा निसर्ग पाहण्यात माझा मात्र प्रवास पाहण्यात नेहमीच आनंददायक असतो. मी निसर्गाशी इतकी एकरूप होते की, प्रवास कधी संपतो याचे भान उरत नाही. आपल्या प्रवासा बरोबर धावणारी झाडे जणू प्रवासातील सहप्रवासीच असतात.

आजकाल प्रवासात लोक मोबाईल चाळण्यात खुपच व्यस्त असतात. त्यांना बसमध्ये कोणी आले, कोणी उतरले याचे भानच नसते. काही प्रवासी मस्त गाणी ऐकण्यात धुंद असतात. दुसरे म्हणजे प्रवास आणि किटकिट नाही असे नाहीच! अहो!चक्क एक-दोन रूपये करिता सुध्दा कंडक्टर सोबत भांडणारे लोक असतात बसमध्ये. कुणी कुणाचा धक्का लागला म्हणून किटकिट करते. तर कधी सामान ठेवण्यावरून भांडण होते. एखांदा प्रवासी असा भेटतो की, ओळखी काढून गावापर्य॔त जाऊन पोहचतो. जास्त करून बाईमाणूस असेल तर खुपच खोलाची विचारपूस चालू असते. कारण बाई माणूस गप्प बसणारे नसतात. कुठून ? कशा ? ओळखी काढून गप्पा-टप्पा करत प्रवासात वेळ घालवतात. सागळ्या नात्या-गोत्याची कुस उसवून काढतात. असो.

अशा काही विनोदी, काही भांडखोर, काही त्रासदायी, काही बडबडे तर काही गुपचुप असे अनेक प्रवासी माझ्या प्रवासात भेटत गेले. . काही प्रवासी पहिल्याच वेळेस पाहिले तरी फार पुर्वीची ओळख असल्याचे भासमान होते.

खात्री आहे येथून पुढेसुध्दा नक्कीच असे गमतीशीर, मजेदार, विनोदी असे प्रवासी मला प्रवासातील सहप्रवासी म्हणून भेटत रहातील अशी आशा आहेच. त्यांच्यासोबतच्या प्रवासातील अनुभव आणि आठवणी मनाला सुखद करून स्मरणीय रहातील. माझ्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या प्रवासात भरपूर प्रवासी भेटले. काही चांगले काही त्रासदायी, काही आठवणींतून राहिले. काहींना प्रवास संपताच विसरून गेले.

असे हे सगळ्या प्रकारचे, आपापल्या विविध स्वभावगुणांचे प्रवासी माझ्या प्रवासातील सहप्रवासी झाल्याबद्दल त्यांचे खुप खुप धन्यवाद

© सौ.वनिता संभाजी जांगळे 

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “परत…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “परत…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

व्हाॅटस्ॲप वर आपण पाठवलेला एखादा मेसेज आपल्यालाच परत येतो. काहिवेळा तो थोड्या वेळातच येतो, तर काहिवेळा त्याला यायला वेळ लागतो. पण परत येतोच. हे मेसेजेस साधारण असतात. यात गुपित काहिही नसतं.

पण व्हाॅटस्ॲप यायच्या आधी आणि आता सुध्दा आपलाच आणि गोपनीय मेसेज आपल्यालाच परत मिळण्याचा अनुभव काहि जणांना आला असेल. कुणाला सांगू नका किंवा सांगू नकोस अशी सुरवात करून दबक्या आवाजात खणखणीतपणे सांगितलेली गोष्ट कधीकधी आपल्यालाच परत ऐकायला मिळते. कधी त्यात कशाची भर पडते तर कधी काही वगळलं जातं. वर परत कुणाला सांगू नका याची जोड असतेच.

यावेळी आपले चेहर्‍यावरचे भाव कमालीचे निरागस असतात. ठेवावेच लागतात.

कुणाला सांगू नका. अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट दोन प्रकारची असते. एकतर ती खरंच कोणाला सांगायची नसते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सगळ्यांनाच समजावी हि ईच्छा असते. पण मी सांगितली हे समजू नये असं वाटतं.

मग ती गोष्ट वरच्या दोनपैकी कोणत्या प्रकारची आहे हे आपणच ठरवतो. पहिल्या प्रकारची असेल तर एखाद्यालाच, जवळ कोणी नसतांना, त्याला जवळ करत सांगतो. त्यालाही आपण जवळचे आहोत याचा आनंद होतो. पण यात त्याच्या जवळचं पण कोणीतरी असेल याचा विसर पडतो.

दुसर्‍या प्रकारची असेल तर मग ती कुठे, कशी, आणि साधारण किती जणांना सांगावी हे ठरवतो. बर्याचदा ते ठरलेलंच असत, फक्त आपण सांगायच्या संधीची वाट बघत असतो. अशी संधी आली नाही तर ती आणतो.

कुणाला सांगू नका अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या चेहर्‍यावर त्यावेळी योग्य ते भाव आणि प्रतिक्रिया असतात. पण नंतर मात्र ते कुुणाला सांगू नका यातलं नका हे ते सोयीस्कर विसरतात, आणि कुणाला सांगू….. अशी त्यांची अवस्था होते.

आणि त्या अवघड वाटणार्‍या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग काढला जातो. आणि मग परत दबक्या आवाजात खणखणीतपणे ती गोष्ट पुढे सरकल्यावर थोड मोकळं वाटतं.

कुणाला सांगू नका यानंतर सांगीतलेल्या गोष्टीवर अरेच्या, काय सांगतोस, खरंच का, मला शंका होतीच, या सारखे अनेक उद्गार बाहेर पडतात. यात वाटत नाही तसं….. , असं म्हणतांना आपल्याला काय वाटतं याची चर्चा होते.

कोणाला सांगू नका हि गोष्ट माणसांना सांगीतली तरी ती स्त्री वर्गात पोहोचते. आणि स्त्री वर्गात सांगीतली तरी ती पुरुष वर्गात पोहोचते.

यावर जाऊ देत… आपल्याला काय करायचय….. यावर चर्चा संपलीतरी पुढे आपल्याच काहितरी करायचंय…. याची कल्पना काही जणांना होते. कारण त्यांनी काही केलं नाहीतर हा बातमीचा प्रवाह थांबणार तर नाही नां, अशी शंका त्यांना येते. आणि मग ती बातमी तशाच विश्वासू व्यक्तीला त्याच पध्दतीने सांगून ते आपलं मन मोकळं करतातच, पण त्या बातमीला वाहण्यासाठी मोकळंपण करतात.

कोणाला सांगू नका. यात नात्यांचा भेद नसतो. नात्यातल्या, मित्रांच्या, शेजारच्या, वरवर ओळख असणाऱ्या, तोंड ओळख असणाऱ्या, किंवा ओळख नसणाऱ्या अशा सगळ्यांच्या गोष्टींचा समावेश त्यात असतो. बर्‍याचदातर अरे ते….. ते नाहि का….. अरे तिथे कायम असतात…… आठवत नाही का. असं म्हणत त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न होतो.

कोणाला सांगू नका…. ही कानातून पोटात गेलेली गोष्ट जास्तवेळ पोटात रहात नाही. ती परत तोंडातून बाहेर पडत कोणाच्यातरी कानातून त्याच्या पोटात जाते. आणि तिथून त्याच प्रकारे बाहेर पडते.

आत्ता मी काय सांगितलं यात खास असं काहीच नाही. आणि गोपनीय तर मुळीच नाही. त्यामुळेच कोणाला सांगू नका असं मुळीच म्हणणार नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१५ आक्टोबर… वाचन प्रेरणा दिन…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? विविधा ?

☆ “१५ आक्टोबर… वाचन प्रेरणा दिन…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

📕📖📗📖📘📖📙

वाचून वाचावयास सांगावे , वाचून वाचवावे
वाचल्याविण वाचाल कैसे सभ्य जन हो
जो वाचतो तोच वाचतो, वाचून दुस-यास वाचवतो
वाचणे वाचवण्यासाठी मन दृढ राहो. ||

-सुहास रघुनाथ पंडित, सांगली.

१५ ऑक्टोबर.! भारत रत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस. तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने….

रांगेत ठेवलेल्या पुस्तकांची पाने फडफडू लागली

अचानक हवा दार ढकलून थेट आत घुसली

हवे सारखी तू ही कधीतरी इथे ये -जा कर ना!

शांता शेळके

कपाटातले पुस्तक म्हणते, बंंधो झटक ना माझी धूळ

बाजूला सार तुझे ते यंत्रा-तंत्राचे प्रचंड खूळ

वाट पहातो तुझ्या भेटीची, मित्रा श्वास इथे कोंडतो

लडिवाळशा स्पर्शाची स्वप्ने कधीची मी रचतो!

मंडळी, ही साद आहे पुस्तकांची! विनंती वजा आर्जव आहे, कैफियत आहे!! विचार करून बघा की… ज्या पुस्तकांना स्पर्श करावा, त्यांच्याच संगतीत तासन् तास घालवू बघणारे आपण… आता तीच पुस्तके आपल्या एका स्पर्शासाठी व्याकुळली आहेत. आसुसलेली आहेत. धूळ त्याच्या वर ही साचली आहे आणि आपल्या मनावर ही बहुतेक!

कारण जी पुस्तके स्वतः च एक प्रेरणा होती, त्यांना उघडून वाचन करणे ही आपली एक अत:प्रेरणा होती. कुठे गेली ती? बदलत्या कालौघात वाहून जाते आहे की काय? हा विचार व्हायलाच हवा.

तंत्रज्ञान आले आणि सोशल मिडिया ची अलिबाबा ची गुहाच उघडली आपल्यासमोर. डोळे दिपले… आणि त्या झगमगाटाच्या तेजाने जणू झापडंच आली डोळ्यांवर. आणि हळूहळू आपला कासीम होणार की काय? अशी भिती वाटायला लागली आहे. या भयापासून योग्य अशा मार्गाकडे नेणारा मार्ग आहे… वाचन!!

“सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पाना-पानातून जातो”!

विसरू नका त्या पुस्तकांसाठी राजगृह बांधणा-या महामानवाला! आठवण करून द्या आजच्या भावी पिढीला त्या… तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीची… ज्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच स्वतः ला एक नियम घालून घेतला होता की… जेवढं वय तेवढी पुस्तके वाचायची!!

आणि ते आयुष्याच्या अंतापर्यंत, वयाच्या नव्वदी पर्यंत एक अतृप्त, अस्वस्थ वाचक म्हणूनच जगले. मृत्यूच्या अंतिम क्षणी त्यांच्या छातीवर उपडे पडलेले पुस्तक हेच सांगत होते,

माणसाला अंत आहे, वाचनाला नाही!

हे आहेत वाचन प्रेरणा देणारे खरेखुरे आयकॉन्स! आयडॉल्स!!

आज बदलत्या काळाबरोबर धावतांना, सोशल मिडियाचे बोट धरून चालतांना, आपला पुस्तकांचा धरलेला हात कधी, कसा सुटतच गेला. वाचनाची साधने बदलली. , माध्यम बदललं. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग… यांनी आपल्या तना-मनाला व्यापून टाकलं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,

कक्षा, आयाम नवे आले, माध्यम बदलले तरी वाड्मय जिवंत राहिले.

या जिवंत वाड्मयाला ख-या अर्थाने अ-क्षर ठेवण्यासाठी आपल्याला वाचन चळवळ उभी करून, वाचकांचा सहभाग वाढवून, सुजाण वाचक घडवता कसे येतील हे बघितलेच गेले पाहिजे. वाचनाची प्रेरणा देणारे संस्कार देणारी संस्कृती रूजली पाहिजे, पाझरली पाहिजे… उतरली पाहिजे मना-मनात थेट… ” आंखोंसे जो उतरी है दिल में “… अशीच!!

वाचाल तर वाचाल… हे घोषवाक्य म्हणजे फक्त घोषणा न राहता, जीवनाच्या पाठ्यपुस्तकातला धडा ठरला पाहिजे, बोध मिळाला पाहिजे, घेतला पाहिजे त्यातून.

या घोष वाक्याचा मतितार्थ थेट भिडला पाहिजे.

वाचाल तर वाचाल याचा अर्थ…

वाचाल तर फुलाल

वाचाल तर शिकाल

वाचाल तर जगाल

असा समजून घेण्याची प्रेरणा दिली ही गेली पाहिजे आणि आपल्या अंत:प्रेरणेने ती घेता ही आली पाहिजे.

अगदी असं झालं पाहिजे की,

“लिहिणा-याने लिहित जावे

वाचणा-याने वाचत जावे

कधीतरी… वाचणा-याने लिहिणा-याचे शब्द घ्यावे! “

वाचनात इतकं सातत्य हवे की ते शब्द आपल्यासाठी.. सुरेश भट म्हणतात तसे… “पाहिले मी एवढे की, पाहणे सौंदर्य झाले.”… अगदी तसेच… वाचले मी इतके की, वाचणे सौंदर्य झाले!! इतकी एकात्मिक भावना वाचनाबद्दल प्रेरित व्हायला हवी.

वाचन तुम्ही ई-बुक, किंडल, मोबाईल, कशातून ही करा… पुस्तकांच्या फिरत्या, पलटत्या पानांशी असलेली मैत्री मात्र तुटू देऊ नका.

मातीला जसा एक पवित्र, धुंध करणारा सुगंध असतो ना, अंगचाच… अगदी तसाच गंध असतो पुस्तकाच्या पाना-पानातून दरवळणारा… ज्याच्या बद्दल गुलजार म्हणतात..

“जबांपर जायका आता था जो उंगली से पन्ने पलटनेका,

वो एक क्लिक से एक झपकी मे नहीं आता “!!!

आजच्या या वाचन प्रेरणा दिनी…

“पुस्तकाचे तुज| काय सांगू महत्त्व|

अक्षराचे एकत्व अंतरीचे||

वैखरीस यावा | लिपीचा आकार|

परेचा ओंकार| अनंत कोटी||

म्हणून एकच प्रण करू या…

वाचनाने आपुले, भरून जावो मन,

संतांचे अक्षर मनी राहो!!

तुका ज्ञानियाचा लागो जीवा छंद

विश्वशांती आनंद, विश्वा नांदो!!! 🙏🙏 

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- अचानक झालेली ती डी. जी. एम् साहेबांची अनपेक्षित भेट ‘ सगळेच दिवस सारखे नसतात’ हे आपल्या सर्वांच्याच बाबतीतले सत्य त्यांच्याबाबतीत अतिशय बोचरेपणानं सत्यात उतरलेलं असल्याची भावना निर्माण करणारी ठरली, जी पुढे कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिलेली होती!

माझ्या पुण्यातल्या त्या अल्पकाळातील असंख्य आठवणींपैकी अशा इतरही अनेक आठवणी मला नेमक्या वास्तव्याचं भान देत माझ्या विचारांना योग्य दिशा देणाऱ्या ठरलेल्या आहेत! )

या घटनेनंतर लगेचच आलेला एक अनुभव, माझी कसोटी पहाणारा आणि अखेर मला चटका लावून जाणाराही ठरला होता. त्या सगळ्याची सुरूवातही माझं तिथलं नवखेपण संपण्यापूर्वीच झाली होती. बँकिंग करिअरमधील त्यापूर्वीचा जवळजवळ तीस वर्षांचा माझा कार्यकाळ फिल्डलेव्हललाच व्यतित झालेला होता. अॅडमिनिस्ट्रेटीव्ह आॅफिसमधे आणि तेही या अधिकारपदावर काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. तोवर प्रत्येक प्रमोशननंतरची माझी पोस्टिंग्ज माझ्या नवीन ग्रेडनुसारच्या मोठ्या ब्रॅंचेस् ना ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेली. प्रत्येकवेळी सर्वसाधारण कामाचं स्वरूप तेच असलं तरी प्रत्येक ब्रँचची पार्श्वभूमी, प्रश्न, ब्रॅंचमधील स्टाफ-मेंबर्स आणि ग्राहक यामधे जाणवण्याइतकं वैविध्य असे. कधी सुसह्य तर कधी प्रत्येक क्षणी परीक्षा पहाणारं! त्यामुळे त्या त्या ब्रँचमधील वातावरणात मिसळून, अत्यल्प काळात त्याचाच एक भाग बनून कोणतीही अवास्तव तडजोड न करता सर्वांचं समाधान होईल असे रिझल्ट्स् देणं म्हणजे तारेवरची कसरतच असे.

उजाडणारा प्रत्येक दिवस ‘आज पुढं काय वाढून ठेवलं असेल’ ही विवंचना घेऊनच उगवायचा. या पार्श्वभूमीवर आमचं ‘रिजनल आॅफिस’ जे आमच्या ब्रॅंचेसचे वरिष्ठ-कार्यालय असे त्यांचा सर्व ब्रॅंचेस वर असणारा अंकुश आणि त्यांचे अधिकार याचे फिल्डवर्कर्सच्या मनावर अर्थातच एक वेगळं दडपण असायचेच. सर्वसाधारणपणे सर्वच ब्रॅंचमॅनेजर्सना तिथे काम करणाऱ्या अधिकारीवर्गाबद्दल अर्थातच हेवाच वाटायचा. रिजनल आॅफिस किंवा त्यावरील झोनल किंवा सेंट्रल आॅफिसमधे काम करण्यासारखं सुख ब्रॅचलेव्हलला काम करण्यात कुठून असायला? ‘ असंच वाटे. ‘.. तिथे ना कधी दिवसभराची ग्राहकांची सततची वर्दळ, ना कॅशची जबाबदारी, ना कामांची दडपणं.. सगळं कसं शांत आणि सुरळीत.. ‘ असा आमचा समज दृढ झालेला.

या पार्श्वभूमीवर माझं झोनल ऑफिसला झालेलं हे पोस्टिंग म्हणजे माझ्यासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला काम करायचा आयुष्यात प्रथमच मिळत असलेला नवा अनुभव होता. माझ्याप्रमाणेच आमचे डी. जी. एम् श्री. वखरे साहेब आणि त्यांच्या सोबतचे इतर दोन नवीन प्रमोटीज् यांचाही माझ्यासारखा हा पहिलाच अनुभव असल्याने आम्हा सर्वांच्याच पाट्या नवीन जबाबदारी स्वीकारताना कोऱ्याच होत्या!

या पार्श्वभूमीवर इथलं रुटीन सुरू झाल्यानंतरचा माझा अनुभव मनातला तो दृढ समज पुसून टाकणारा होता. इथं येऊन आठ एक दिवसच झाले असतील. त्यादिवशी मी मस्टरवर सही करून केबिनमधे जाताच ड्राॅवर उघडून डायरी घेऊन नेहमीप्रमाणे त्या दिवशी करायच्या कामांच्या नोंदींवरून नजर फिरवू लागलो तेवढ्यांत इंटरकॉमची रिंग वाजली. डी. जी. एम्. साहेबांनी मला तातडीने त्यांच्या केबिनमधे बोलावलेलं होतं.

मी जाण्यापूर्वीच माझ्याबरोबरचे इतर दोघे चीफ मॅनेजर्सही आधीच तिथे येऊन बसले होते. त्या तिघांचेही चेहरे कांहीसे गंभीर होते.

“मिस्टर लिमये, पी. अॅण्ड डी. डिपार्टमेंटमधील ‘लाॅंग पेंडिंग मॅटर्स’ ची पूर्ण माहिती घेऊन त्याची नोट तयार करून घ्या. सर्व पॅरामीटर्सवरील नुकत्याच संपलेल्या वर्षातला परफाॅर्मन्स आणि प्रेझेंट पोझिशन यांचं संपूर्ण स्टॅटॅस्टीक एकदा पाहून घ्या. वुई वुईल हॅव टू फेस अवर एम्. डी. पर्सनली. ही इज एक्पेक्टेट हिअर फाॅर हिज प्रीप्लॅन्ड व्हिजीट डे आफ्टर टूमारो. ” वखरेसाहेब घाईघाईने म्हणाले. मी नेमकं काय करायचंय हे समजलं होतं पण एवढ्या कमी वेळेत कसं करायचं याचा विचार करीत मी क्षणभर घुटमळलो.

“मिसेस् जोगळेकर तुम्हाला मदत करतील. शी नोज एव्हरीथिंग” माझी अडचण त्यांनी न सांगताच ओळखली होती.

मी माझ्या केबिनमधे येऊन मिसेस् जोगळेकरांना इंटरकाॅमवरून बोलावून घेण्याचा विचार करीत माझ्या केबिनचं दार ढकललं. पाहिलं तर मिसेस् जोगळेकर तिथे आधीच येऊन माझी वाट पहात बसलेल्या होत्या.

“गुड माॅर्निंग सर” म्हणत त्या अदबीने उठून उभ्या राहिल्या.

“गुड माॅर्निंग मॅडम.. कशा आहात? .. ” मी हसत विचारलं. त्या थोड्या रिलॅक्स झाल्या.

“आता एकतर्फी आक्रमण फेस करायची तयारी सुरू आहे. ” सोबत आणलेल्या दोन मोठ्या बॉक्स फाईल्सकडे निर्देश करीत कसनुसं हसत त्या म्हणाल्या.

त्या लगेचच होत असलेल्या एम्. डी. व्हिजीटबद्दलच बोलत होत्या हे उघडच होतं!

“एकतर्फी आकमण? ” मी न समजून विचारलं.

“तर काय? अशा मीटिंगची पंधरा पंधरा दिवस आधीपासून आम्ही तयारी करायचो. आता कसाबसा आजचा एकच दिवस हातात आहे. डिटेल डिस्कशनसाठी आपल्या सर्वांचा उद्याचा अख्खा दिवस डी. जी. एम् साहेबांच्या केबिनमध्ये जाईल. आजच सगळं निपटायला हवं. ” त्या म्हणाल्या.

“म्हणजे काय करायचं? “

“एम. डीं सोबत सर्व पोर्टफोलिओजचे तीन जी. एम् सुध्दा असतील. या नव्या एम्. डी. नीही गेल्याच आठवड्यात चार्ज घेतलाय. परवा होणारी ही व्हिजिट म्हणजे आधीच्या साहेबांमुळे या झोनची विस्कटलेली घडी तातडीने पुन्हा नीट बसवण्याची युद्धपातळीवर सुरू झालेली तयारी आहे. कारण पुढे लगेचच एम्. डी ऑफिसमधे सर्व झोनलहेडस् ची हाय लेव्हल मिटींग आहे. त्याची ही पूर्वतयारीच असणाराय. सर्वजण इथे येतील ते प्रत्येक डिपार्टमेंटमेंटसमधील त्रुटींची अख्खी कुंडली घेऊनच बघालच तुम्ही. मीटिंगमधील चर्चा म्हणजे फक्त एकतर्फी आक्रमण असणाराय नक्कीच. ते कसंबसं थोपवायचा प्रयत्न करायचा एवढंच. “

मिसेस् जोगळेकर पी अॅण्ड डी डिपार्टमेंटमधे गेल्या दोन वर्षांपासून अॅसिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. शिवाय ऑफिसर म्हणून त्यानी पुण्याच्या रिजनल ऑफिसमधेही पूर्वी काम केलेलं होते. त्यांच्या बोलण्यातून हा अनुभव जाणवतही होता. पण इथला काहीच अनुभव नसणाऱ्या माझ्यासाठी मात्र हाकेच्या अंतरावर असणारी ही एम्. डी. मिटिंग दडपण वाढवणाराच विषय होती!

मधले दोन दिवस आम्हा सर्वांनाच श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती अशी अवस्था!

ती एम्. डी. व्हिजीट आणि प्रत्येक डिपार्टमेंटची तिथं झालेली चिरफाड हा अक्षरश: अंगावर काटा आणणारा अनुभव होता. सुरूवातीच्या इंट्राॅडक्शन सेशनमधे आम्ही तिन्ही चीफ मॅनेजर्सनी इथे नुकताच चार्ज घेतल्याचे समजल्यामुळे आम्ही तसे सेफ झोनमधे होतो. कोणत्याही गंभीर बाबींबद्दल सविस्तर उत्तरं द्यायची वेळ येईल तेव्हा आमच्या डिपार्टमेंटमधील मॅनेजर्सना आत बोलावून घेतले जायचे. इतर डिपार्टमेंटसच्या तुलनेत मिसेस जोगळेकरांनी पी. अॅण्ड डी. डिपार्टमेंटची आघाडी मात्र खरोखरच हिंमतीने आणि त्यांच्या अंगभूत हजरजबाबीपणामुळे चांगली सांभाळली. तरीही एका प्रसंगात मात्र त्या निरूत्तर होऊन अस्वस्थपणे उभ्या होत्या. निमित्त झालं ते पुण्यातीलच आमच्या एका ब्रॅंचमधल्या ग्राहकाची गेल्या तीन वर्षापासून निराकरण व झालेल्या एका गंभीर तक्रारीचं! ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण न होता ते घोंगडं तीन तीन वर्षं भिजत पडलेलं पाहून एम्. डी. संतापले आणि वातावरण अचानक तापलं. चांगली ग्राहकसेवा हा बँकिंग इंडस्ट्रीचा पाया भक्कमच असायलाच हवा हे अतिशय कठोरपणे बजावून “सेंट्रल आॅफिसमधे लवकरच होणाऱ्या सर्व झोनलहेडसच्या मिटींगपूर्वी या लाॅंग पेंटिंग कस्टमर कम्प्लेंटचं कोणत्याही परिस्थितीत निराकरण व्हायलाच पाहिजे” असं त्यांनी निक्षून सांगितलं.

यासारखे इतर डिपार्टमेंटमधीलही बर्निंग इश्यूज्

होतेच. याबद्दलच्या सविस्तर चर्चा म्हणजे खरोखरच प्रतिकार करताच न येणारं फायरिंगच होतं आणि त्या त्या प्रत्येकवेळी स्वत:च्या त्या ए. सी. केबिनमधेही घामाघूम झालेल्या वखरेसाहेबांना खिशातून रुमाल काढून आपला घाम टिपत असताना पहाणं आम्हा सर्वांसाठीच अतिशय क्लेशकारक होतं!

जवळजवळ तीन तास चाललेली ती एम्. डी. मीटिंग म्हणजे इतकी वर्षे मनात रूजलेला ‘ब्रॅंचेसच्या तुलनेत ऍडमिनिस्ट्रेटीव ऑफिसमधे काम करणं किती सुखाचं असतं! ‘ हा भ्रम नाहीसा होत वास्तवाची लख्ख जाणिव करून द्यायला पुरेशी होती!

मीटिंग संपताच आम्ही बाहेर आलो तरी पुढे दीड दोन तास आत वखरे साहेबांसोबत सर्व जी. एम्. आणि एम् डी. साहेबांची हाय लेव्हल टॉक्ज् सुरू होतीच. त्याची सांगता होऊन सर्व टीम मुंबईला निघून जाताच आम्हा सर्व चीफ मॅनेजर्सना वखरेसाहेबांनी केबिनमधे बोलावून घेतलं.

मी आत जाण्यापूर्वीच जोगळेकर मॅडमनाही त्यांनी ‘कंप्लेंटस् फाईल’ घेऊन आत यायला सांगितलं होतं त्यामुळे माझ्यापाठोपाठ त्याही आत आल्या.

अर्थातच हा विषय इतक्या सविस्तरपणे माझ्यापुढे प्रथमच येत होता आणि त्यातलं गांभीर्य मलाही हादरवून सोडणारं होतं.

“तुम्ही या केसची फाईल वाचून पूर्ण समजून घ्या. कांहीही करून ही तक्रार समाधानकारक रित्या चार-सहा दिवसात मागे घेतली जायला हवी यासाठी काय करावं लागेल याचा विचार करून ठेवा. आपण संध्याकाळी इतर कामं आवरली की त्यावर चर्चा करू. ” वखरेसाहेब म्हणाले.

मिसेस् जोगळेकर माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे आल्या. “या तक्रारदाराला प्रत्यक्ष भेटणं, चर्चा करणं, आणि सामोपचाराने त्यातून मार्ग काढणं यासाठी करायचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत सर ” असं म्हणत त्या संबंधीच्या पत्रव्यवहाराची बॉक्स फाईल माझ्यासमोर ठेवून त्या खाली मान घालून बसून राहिल्या. तो क्षण माझ्यासाठी अतिशय हतबल करणाराच होता!

यापूर्वीच्या अशा प्रत्येक हतबल क्षणी ‘त्या’ची आठवण व्हायचीच आणि अतिशय अकल्पितपणे तो मदतीला धावून आल्याचा अलौकिक अनुभव मला दिलासा देऊन जायचा. ‘यावेळीही आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे. ‘तो’ आहेच. ‘ हा विचार मनात आला आणि मी सावरलो.

फाईल पूर्ण वाचून झाली तेव्हा मात्र मन अंधारून गेलं होतं. समोर कणभर प्रकाशही दिसेना. यापुढं येणारा प्रत्येक क्षण माझीच नव्हे तर ‘त्या’चीही कसोटी पहाणारा होता या विचाराने निर्माण केलेली अस्वस्थता मनातल्या अंधारावर तरंगत राहिली होती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी वाचनाची सवय- — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदी वाचनाची सवय- — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 मला आठवते आमच्या लहानपणी परीक्षा झाल्या की सगळी भावंडे (मावस, मामे, चुलत, आते) निरनिराळ्या नातेवाईकांच्या कडे जाण्याची पद्धत होती. आणि ते नातेवाईक सुद्धा पत्रव्यवहार करुन सर्वांना आग्रहाने बोलवायचे. आमचे बरेच नातेवाईक शिक्षण क्षेत्रात असल्याने त्यांच्या कडे पुस्तकाची मेजवानी असायची. इतर अनेक कार्यक्रम असायचेच. पण या सुट्टीत मुलांनी कोणती पुस्तके वाचायची हे आधीच ठरवलेले असायचे. एखाद्या मुलाने दुसऱ्याचे पुस्तक घेतले की, त्याला सांगितले जायचे, “ते वाचण्यासाठी तू अजून लहान आहेस. ते तू अजून २ वर्षांनी वाच. ” त्यावेळी फारसे लक्षात येत नव्हते. पण वाचनाची गोडी लावण्यासाठी हे किती आवश्यक आहे. ते मोठे झाल्यावर कळले.

पुस्तक वाचनाची सवय लागण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत

योग्य पुस्तक निवड

या साठी मोठ्या माणसांनी आपल्या मुलांचा वयोगट पाहून पुस्तके द्यावीत. सध्या तर इतकी आकर्षक व रंगीत पुस्तके आहेत की ती मोठ्यांना पण आकर्षित करतात. अगदी लहान मुले सुद्धा ती चित्रे आवडीने बघतात.

नेहमी एक पुस्तक सोबत ठेवावे.

असे म्हणतात, नजरेआड होणे म्हणजे मनाबाहेर जाणे. नेहमी एक पुस्तक सोबत ठेवायचे. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचे. प्रवास करताना किंवा रेस्टॉरंटमध्ये, कॅबमध्ये, रेल्वे स्टेशनवर – कुठेही मोकळा वेळ असेल तिथे वाचायचे. बरेच लोक प्रवासात वाचताना मी बघितले आहेत.

वाचन करायच्या पुस्तकांची यादी बनववणे

आपल्याला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात हे ठरवताना छंद/आवड लक्षात ठेवून पुस्तकांची यादी बनवायची. जर एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली तर ते पुस्तक आपल्या यादीत जोडायचे.

वाचनालयात किंवा जुनी पुस्तके मिळतात त्या दुकानात किंवा पुस्तक प्रदर्शनात जायचे

त्या ठिकाणी पुस्तके हाताळायला मिळतात. तिथे बसून पुस्तके बघण्याची व्यवस्था असते. काही रस्त्यावर बसलेल्या पुस्तक विक्रेत्यांच्या कडे मला खूप उत्तमोत्तम पुस्तके मिळाली आहेत. सध्या पुस्तक प्रदर्शने खूप भव्य आयोजित केली जातात. त्या ठिकाणी सहकुटुंब जायचे. बऱ्याच शाळा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातात. आणि सोबत असलेले शिक्षक त्यांना पुस्तकांची माहिती देतात.

टीव्ही आणि सोशल मीडियाचा वेळ कमी करायचा

टीव्ही आणि सोशल मीडिया आपला बराचसा उत्पादक वेळ वाया घालवतात आणि काही वैद्यकीय अहवालांनुसार त्यांचा आपल्या मेंदूवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. टीव्ही आणि सोशल मीडियावरील आपला वेळ कमी करणे सुरुवातीला थोडे अवघड वाटेल. परंतु एकदा प्रयत्न केले की पुस्तक वाचनासाठी किती मोकळा वेळ आहे हे पाहून आश्चर्य वाटते. कित्येक वेळा मुले जेवत नाहीत म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो. ही सवय अत्यंत घातक आहे. त्या ऐवजी त्यांना चित्रे दाखवावीत. त्यांची माहिती, गोष्टी सांगाव्यात.

वाचनाची वेळ ठरवून घ्यावी

 दैनंदिन वेळापत्रकात पुस्तक वाचनासाठी वेळ निश्चित करायची. जोपर्यंत आपण ते वेळापत्रक तयार करत नाही तोपर्यंत व्यस्त वेळापत्रकात कधीच वेळ मिळणार नाही. दिवसभरात १५ मिनिटे असली तरीही ती वेळ ठरवावी आणि काहीही झाले तरी ती वेळ पाळायची.

पुस्तकापासून दूर जायचे नाही

सुरुवातीला अशी पुस्तके शोधायची जी मजेदार आणि आकर्षक असतील आणि गोडी लावतील. जर एखादे पुस्तक वाचत असताना पहिली ५० पाने कंटाळवाणी वाटत असतील तर सोडून द्यायचे. म्हणजे ते पुस्तक बाजूला ठेवायचे. आणि दुसरे पुस्तक घ्यायचे. एकदा वाचनाची सवय लावली की तेच पुस्तक उचलून वाचू लागतो.

स्वतःला बक्षीस द्यायचे

आपल्या वाचनाचा वेळ आनंददायी बनवायचा. वाचताना चहा/कॉफी घ्या. आणि पुस्तक संपल्यानंतर आईस्क्रीम, एखादा आवडीचा पदार्थ याचा आस्वाद घ्यायचा.

घरातील मोठ्यांच्या सवयी

मोबाईल किंवा कोणताही स्क्रीन घरातील मोठ्या माणसांनी दूर ठेवून हातात पुस्तक घ्यावे. मुले तेच अनुकरण करतात.

पुस्तके हाताशी ठेवावीत

आपल्या बसण्याच्या जागी, झोपण्याच्या जागी जवळ सहज हाताशी लागतील अशा प्रकारे पुस्तके ठेवावीत म्हणजे ती पटकन वाचायला घेता येतात. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी जसे दवाखाना, पुस्तके हॉलच्या मध्यभागी ठेवलेली असायची.

भेटवस्तू म्हणून पुस्तके देणे

वाढदिवस आणि विशेष प्रसंगी अन्य गोष्टी देण्यापेक्षा पुस्तकेच भेट द्यावीत. चांगली पुस्तके असतील तर त्यातूनही वाचनाची आवड जोपासली जाईल.

चर्चा करणे

समविचारी किंवा समवयस्कर मित्रांनी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून तरी एकदा एकत्र येऊन आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करावी. त्यातूनही विविध पुस्तकांबद्दल माहिती मिळेल आणि आवड निर्माण होईल.

नोंद ठेवणे

आपण कोणत्या लेखकाची कोणती पुस्तके वाचली आणि ती आपल्याला का आवडली याची नोंद एका स्वतंत्र वहीवर करून ठेवावी. आपण वाचलेल्या पुस्तकातील चांगली माहिती, उतारे लिहून ठेवता येतील.

पुस्तक भिशी

ग्रुपने एकत्र अशी पुस्तक भिशी लावावी. म्हणजे विविध पुस्तके वाचायला मिळतील.

काही उपक्रम आम्ही शाळेत घेत असतो.

वाचन कोपरा

प्रत्येक वर्गात किंवा घरात असा वाचन कोपरा असावा. त्यावर विविध प्रकारचे वाचन साहित्य असावे. म्हणजे आपल्या आवडी प्रमाणे वाचता येते.

चावडी वाचन (प्रगट वाचन)

लहान मुलांना आपले कौतुक मोठ्यांनी केलेले आवडते. म्हणून त्यांना समूहा समोर वाचायला लावावे. किंवा घरी पाहुणे आल्यावर त्यांच्या समोर वाचायला सांगावे. त्यातून जी कौतुकाची शाबासकी मिळते ती वाचन आवड जोपासायला मदत करते.

वाचन स्पर्धा

शाळेत अशा स्पर्धा घेतल्या जातात. अशा स्पर्धा सार्वजनिक उत्सवात ठेवू शकतो.

वृत्तपत्र वाचन

शाळेत परिपाठाच्या वेळी असे वाचन घेतले जाते. असेच वाचन घरी येणाऱ्या वृत्तपत्राचे पालकांनी वाचन करुन घ्यावे. त्यातून सामान्य माहिती, जगातील घडामोडी समजतात. आणि त्यातून भावी स्पर्धा परीक्षांची तयारी पण होऊ शकते.

वाचनालये

सध्या वाचनालये पुस्तकांची घरपोच सेवा देतात. त्याचा लाभ घेता येईल. मोठ्यांनी कोणते पुस्तक घ्यायचे ते ठरवून ठेवावे. आणि मुलांनाही तसे सांगावे. सुरुवातीला मोठ्यांनी मुलांना मदत करावी.

 अशा प्रकारे आपण लहान थोर सर्वजण वाचनाची गोडी लावून घेऊ शकतो आणि इतरांना गोडी लावू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंद्र महिमा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ चंद्र महिमा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

“चांदोमामा चांदोमामा भागलास का?

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?”

आकाशातील चंद्र, पृथ्वीचा उपग्रह. पण तोच बालकांचा चंदामामा. ढगामागुन डोकावणारा आणि झाडामागे लपून बालकांशी लपाछपी खेळणारा. कधी त्याच्यावरील डागात मुलं सशाची जोडी पाहतात, तर कधी वहिनीला आणायला चांदोबाची गाडी पाठवायची तयारी करतात. असा हा मुलांचा जानी दोस्त. प्रियकराला मात्र तो प्रियेच्या मुखात भासतो आणि ते मुख चंद्रमुख होते. बंधू नसलेल्या स्त्रीचा भाऊ होऊन तिच्याकडून ओवाळण्याचा मान तो मिळवितो. गरोदर स्त्रीला आपले डोहाळे पुरविण्यासाठी चंद्रकोरीवर बसावे वाटते व चांदणी भोजनाची हौसही पुरवावी वाटते.

लक्ष्मीलाही त्याची प्रभा मोहित करते. तसे वस्त्र व कांती ती धारण करते. गणेशही या खट्याळ चंद्राला शिक्षा देतो. (गणेश उंदरावर बसून निघाला असला त्याचा तोल जातो म्हणून चंद्र त्याला हसतो. म्हणून गणेश त्याला शाप देतो. अशी कथा आहे). म्हणून आपले रूप कमी जास्त करण्याची व  पूर्ण नाहीसे करण्याची लीला त्याला करावी लागते आणि गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करणाऱ्यांवर चोरीचा आळ येतो, हा कलंक ही चंद्राला सहन करावा लागतो. अशा चंद्राला भगवंत मात्र आपली विभुती मानतात. ते म्हणतात,  ‘नक्षत्राणामहं शशी’. चंद्र शीतल, थंड, शांत म्हणून विषप्राशनाने झालेला दाह कमी करण्यासाठी भगवान शंकर  त्याला आपल्या भाळी स्थान देतात. म्हणून भगवान शंकर चंद्रमौळी नावाने ओळखले जातात.

रामाला तर बालपणी तो चेंडू वाटला. तो मिळावा असा बालहट्ट तो करतो व पुढे चंद्रासारख्या शांत स्वभावाचा म्हणून रामचंद्र होतो. समुद्रमंथनातून याचा जन्म झाला असे सांगितले जाते. चंद्र ही मनाची देवता. म्हणून ‘चंद्रमामनसोजातः’ असा पुरुषसुक्तात त्याचा उल्लेख आहे. गोपी कृष्णाच्या रासक्रीडेचा  साक्षीदारही तोच. आणि कृष्णाचा वंश ही चंद्रवंश. अशाप्रकारे पुराणकालापासून असलेले आपले महत्व तो आजही टिकवून आहे.

खगोलशास्त्रीय दृष्टीने पृथ्वीचा उपग्रह, म्हणणून त्याला पृथ्वीपुत्र म्हटले जाते. लाडक्या बालकाप्रमाणे अखडं पृथ्वीभोवती गोल गोल तो फिरतो व पृथ्वीच्या मदतीने सूर्याला झाकायचे धाडस करतो (यालाच ग्रहण म्हणतात). चंद्र आपल्या पूर्णत्वाने पृथ्वीवरील सममुद्राला आकर्षित करतो. (भरती, ओहोटी होतात).

आपल्या उगवण्याने चंद्रविकासी कमळाला (कुमुदिनी) उमलवितो. सोमकांत मण्याला पाझरायला भाग पडतो. आपल्या अमतृमय किरणांनी चकोराला तृप्त करतो. संत ज्ञानेश्वरांनाही मोहात पाडतो. त्यामुळे वेळोवेळी चन्द्राच्या दृष्टांतांची आपल्या ग्रंथात ते रेलचेल करतात. अनेक कवींच्या कवितांचा विषय होण्याचे भाग्य या चंद्राला लाभले. तो चिरंतन आहे म्हणून ‘आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ अशा स्वातंत्र्यगीतात त्याला स्थान आहे. आपली शीतलता व मंद प्रकाश कोणताही भेद न करता सर्वांना मुक्त हस्ताने वाटणारा संत ही तोच. आजारी दमेकऱ्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशातील औषध मानवते. वनस्पतीतील औषधी गुणधर्म ही त्याचीच किमया. विवाह यशस्वी होण्यासाठी लग्नापूर्वी पत्रिका बघताना आधी चंद्रबळ  बघीतले जाते. असे याचे बळ!

स्त्रियांचा तर लाडका, म्हणून  त्यांच्या रांगोळीत याला मानाचे स्थान असते. तसेच आपल्या भाळी कुंकवाची चंद्रकोर काढून त्या त्याला मिरवतात आणि गळ्यात चंद्रहार नावाचा दागिनाही घालतात. चंद्राच्या कलेप्रमाणे रोज एक एक घास वाढविणे व कमी करणे असे ‘चांद्रायणी’ नावाचे व्रतही स्त्रिया करीत. बालपणीचा मामा, बहिणीचा भाऊ, प्रेमाचा साक्षीदार, म्हातारपणी वयाची ऎंशी वर्षे झाल्यावरही सोबतीला असतो. ८१ वर्षांत १००० पौर्णिमा येतात. म्हणन ८१ वर्षे पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो.

हे सर्व झाले लांबून केलेले कौतुक. पण आपले शास्त्रज्ञ मात्र या लांबच्या अनुभवावर तृप्त नाहीत. त्यांना तेथे वस्ती करायचा आनंद उपभोगायचा आहे. त्यासाठी तेथील माती, हवामान, पाणी, गुरुत्वाकर्षण या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. त्यादृष्टीने आपले चांद्रवीर चंद्रावर जाऊनही आले आहेत. (नील आर्मस्ट्रॉंग आणि एडवर्ड ऑल्ड्रिन आता ही संख्या बारा झाली आहे.) इस्रोने सोडलेल्या यानाचा ऑरबिटर अभ्यासासाठी त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून आला. तर चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली.

अशाप्रकारे आपल्या विविधांगी व्यक्तीमत्वाने सर्वांना भुरळ पाडणारा, पुराणकालापासून सर्वांचे आकर्षण ठरलेला चंद्र विविध नावांनी मिरवतो यात नवल नाही. उदा. सोम, शशी, नील, सुधाकर, भौमिक, विकेश इ.

आपले पंचांगही चंद्राच्या फिरण्यावर आधारीत आहे. आपले विविध सणही आपण पौर्णिमेला साजरे करतो. जसे गुरुपौर्णिमा, राखीपौर्णिमा, वटपौर्णिमा. यातून गुरु-शिष्य, बहीण-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्याचा दुवा तो होतो. या शिवाय त्रिपुरीपौर्णिमा, नव्याचीपोर्णिमा, होळीपौर्णिमा  इ. सणही पौर्णिमेलाच असतात. प्रत्येक पौर्णिमेची नवलाई वेगळी. याशिवाय अश्विनपौर्णिमा किंवा शरदपौर्णिमा हिला कोजागिरीपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी रात्री चंद्राच्या अमतृवर्षावाने सुगंधीत व रसमय झालेले दूध पिऊन लोक नीरामय आयुष्याची इच्छा करतात. चंद्र पूजन करतात. आनंदाने एकमेकांच्या सहवासाचे सुख उपभोगतात. या रात्री लक्ष्मी ‘को जागराति?’ (कोण जागे आहे?) असे विचारत सर्वत्र संचार करते. अर्थात ही जागृती साधीसुधी नाही तर ही ज्ञानदृष्टीची जागृती आहे. आणि अशी जागृती झालेला साहजिकच परमसुखरूपी धनाचा आधिकारी होतो. या पौर्णिमेचे वैशिष्टय म्हणजे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या  जास्तीत जास्त जवळ येतो  व आपल्या अमतृधारा पृथ्वीरूप प्रियेच्या हिरवळीत मिसळून टाकतो.. अशी कवी कल्पना. आणि मग श्रीनिवास खळेंसारख्या कवीना काव्य स्फुरते,  ‘उगवला चंद्र पुनवेचा, मज हृदयी दरिया उसळला प्रीतीचा’.

चंद्राचे रोज निराळे लावण्य. आजची कला उद्या नाही. शंकराच्या भालप्रदेशावर प्रकट होते ती द्वितीयेची चंद्रशोभा. तर प्रतिपदेची अगदी कळत नकळत दिसणारी, शाखाचद्रंन्यासाने दाखविली जाणारी. अष्टमीच्या चंद्राचे सौंदर्य विशेष असते. पौर्णिमेला चंद्राच्या तेजापुढे तारका लोपतात. तर अष्टमीला वेचक तारकच दिसतात. अमावास्येचा आनंद तर फारच गंभीर. त्या दिवशी निस्तब्ध शांतता असते. चंद्राचा जुलमी प्रकाश नसल्याने लहान मोठे अगणित तारे पूर्णपणे चमचम करीत असतात. त्या दिवशी चंद्र सूर्याशी एकरूप होतो.

असा हा चंद्र आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनला आहे. इतर कोणत्याही ग्रहाला मिळाले नाही ते स्थान चंद्राला मिळाले आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचू आनंदे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वाचू आनंदे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बऱ्याच म्हणजे २५ वर्षा पूर्वीचा एक सिनेमा बघितला. त्यावेळी त्यात विशेष काही वाटले नव्हते. पण आता पुस्तक घेऊन वाचणे या विषयी जी अनास्था दिसते त्या मुळे हा सिनेमा काढणाऱ्यांचे कौतुक वाटले. त्याची कल्पना अशी आहे, सुरुवातीलाच एका ९ महिन्याच्या बाळाला त्याची आया पुस्तकातील चित्रे दाखवून माहिती व गोष्टी सांगत असते. त्या बाळाला

काही लोक पैशासाठी किडनॅप करतात. त्या नंतर या बाळाचा प्रवास सुरु होतो. त्याचा प्रवास आणि किडनॅप करणाऱ्यांना झालेला त्रास मजेशीर व बघण्या सारखा आहे. ज्यावेळी पोलीस घरी येऊन त्या बाळाचा प्रवास अर्थात लोकांनी सांगितलेला सांगतात. त्यावेळी ती आया आता बाळ कुठे असेल ते सांगते. कारण ते बाळ त्या पुस्तकातील चित्राच्या क्रमाने प्रवास करत अर्थात रांगत जात असते. त्या वरून ते बाळाला शोधतात. आणि ते बाळ त्या किडनॅपरची बिल्डिंग पण दाखवते. व ते पकडले जातात.

या वरून पुस्तकातील ज्ञानाचे महत्व नक्कीच लक्षात येते.

पुस्तक वाचनाचे पुढीलप्रमाणे काही फायदे लक्षात येतात.

ज्ञान वाढवणे

पुस्तके विविध विषयांची माहिती देतात. जसे इतिहास, विज्ञान, विविध शोध, विविध कला त्यांचा उगम आणि इतर अनेक माहिती मिळते.

त्या मुळे जगाची माहिती मिळून समज वाढते.

मेंदूसाठी व्यायाम

वाचन मेंदूला सक्रिय ठेवते. एखादे वाक्य किंवा माहिती वाचल्यावर त्याची मेंदूत साठवणूक होते. व मेंदूची कार्यक्षमता वाढते. आपल्या मेंदूची रचना अशी असते कि त्याला कायम नवीन माहिती हवी असते. त्यामुळे आपल्या मनाचे आरोग्य उत्तम राहते.

भाषा कौशल्ये

वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. नवीन शब्द शिकायला मिळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ समजतात. पूर्वीच्या लोकांची भाषा समजते.

भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवता येते.

तणाव कमी होतो

वाचनामुळे मनःशांती मिळते. आपल्या मनातील मरगळ दूर करुन पुस्तके आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. त्यामुळे

मानसिक तणाव कमी होतो. शांतता मिळते आणि आपल्याला मानसिक आराम मिळतो.

सर्जनशीलता वाढते

पुस्तके नवीन जगात घेऊन जातात. त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. एक विचार वाचताना त्या सारखे अनुभव किंवा विचार आठवतात. नवीन विचार सुचतात.

सर्जनशील विचारांचा विकास होतो.

एकाग्रता वाढते

पुस्तकांच्या नियमित वाचनाने इतर गोष्टींचा विसर पडतो. काही वर्षांपूर्वी पुस्तके हेच विरंगुळ्याचे साधन होते. त्यातून ज्ञान, रंजन होत होते.

लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. अगदी आजारी व्यक्ती सुद्धा आपले दुखणे विसरत असे.

भावनात्मक विकास

वाचनामुळे विविध लोकांच्या भावना, विविध प्रसंगातील विविध दृष्टीकोन समजतात. वेगवेगळ्या प्रसंगी लोक कसे वागले होते ते समजते. त्यातील योग्य कि अयोग्य याचे वर्गीकरण केले जाते.

विचार करण्याची क्षमता

पुस्तकात विविध गोष्टींचे विश्लेषण विविध गोष्टीतून, विचारातून, उदाहरणातून केलेले असते. त्यातून आपली वैचारिक क्षमता वाढते. पुस्तके आपल्याला  चिकित्सकपणे विचार करायला शिकवतात.

संज्ञात्मक कौशल्ये वाढतात

वाचनामुळे गंभीर विचार करण्याची सवय लागते.

जटील समस्या सोडवण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कठीण प्रसंगी कोणते निर्णय घ्यावेत याची कल्पना येते.

संवाद कौशल्य वाढते

योग्य व प्रभावी संवाद साधण्यासाठी आवश्यक शब्द, वाक्य पुस्तक वाचनातून समजतात.

ऐतिहासिक वारसा

पूर्वीच्या काळातील लोकांनी लिहून ठेवलेली माहिती, लावलेले शोध, आपल्या देशाचा इतिहास, वारसा समजतो.

असे म्हणतात की एखाद्या देशाला नेस्तनाबूत करायचे असेल तर तेथील वाचनालये नष्ट करावीत. इतके वाचन व पुस्तके यांचे महत्व आहे.

आरोग्य

वाचनामुळे आपल्या आरोग्यावर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत. कोणतेही घातक प्रकाश किरण डोळ्यात जात नाही.

उलट शांत झोप लागते. आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.

असे फायदेशीर वाचन करायलाच हवे. आणि त्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. घरात एक पुस्तक आले तर घरातील सर्वजण ते वाचू शकतात. त्यावर चर्चा करु शकतात. त्या निमित्ताने कमी होत चाललेले सांभाषण वाढू शकते. वाचून चर्चा केलेला अभ्यास सुद्धा चांगला लक्षात राहतो.

असे महत्वाचे पुस्तक वाचन जपायलाच हवे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पुनर्जन्म आणि मोक्ष काही प्रश्न?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “पुनर्जन्म आणि मोक्ष काही प्रश्न?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

बहुदा सगळ्याच लोकांना पुनर्जन्म आणि मोक्ष याबद्दल कुतूहल असते. माझ्याही मनात असे कुतूहल निर्माण झाले, म्हणून मी या विषयांचा धांडोळा घेऊ लागलो आणि प्रश्नांच्या गुंत्यात अडकत गेलो. ते प्रश्न आपल्या समोर मांडत आहे. पहा काही सुचतयं का?

१. मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही?

२. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा हवा ना?

३. समजा वरील प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार? भारताऐवजी मी ’टीटीलिस’ नावाच्या देशात जन्मलो तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार की मी भारतीय कायद्याच्या ‘ज्युरिस्डिक्शन’ मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार?

४. आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्याबाबत असे असेल तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का?

५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) ‘मनुष्यजन्मांचे’? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही ‘कन्सेंट’ मिळावेत अशा आईबापांपोटी… वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते?

५. १ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री ही पुरूष म्हणून नि पुरूष हा स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही?

५. २. मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय!) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हजबंड-वाईफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का?

६. दोन जन्मांच्या मध्ये भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणे! त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे! म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी-फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी-फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत ‘टीडीआर’ असतो का? लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात? रिलेटिव्हीटीला स्मरून एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या तर त्याला मनुष्य जन्म मिळतो असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का?

६. १ प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात?

७. पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हे संतुलन अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची शक्ती आहे त्याला रेकमेंड करून) ‘अकाउंट क्लोज्ड’ चा शिक्का का मारत नाहीत?

७. १. पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते?

७. २ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते?

७. ३. वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यूआर कोड देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यूआर कोडवाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घ्यायची?

७. ४. माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का?

८. मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट होते का? याचे उत्तर ‘हो’ असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर – थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर – हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही ‘मोक्षपत्र’ करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल?

९. फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का?

१०. पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ‘सिविल सोसायटी’च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे – खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले – विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण ‘शांभवी’च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?

आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर ‘सास भी कभी बहू थी’ सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होताच म्हणे!) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. 😂

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares