मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यमेव जयते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

सत्यमेव जयते ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पुरणकाळापासून ज्या एका गोष्टीला अत्यंत महत्व दिले आहे ते म्हणजे सत्य. खरे बोलणे, खरे वागणे सत्याची कास न सोडणे या गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात.

त्यामुळेच नेहमी खरे बोलणारा राजा जेव्हा नरोवा कुंजरोवा असे अर्धसत्य बोलतो तेव्हा मरणोत्तर त्याला त्याची शिक्षा भोगायलाच लागली होती.

भगवान श्रीकृष्णाने धर्म युद्धात सत्याची साथ दिली होती.

हे जरी खरे असले तरी सत्याची व्याख्या कोणाला करता आली नाही.

संत ज्ञानेश्वर यांनी देखील सत्याचे अनन्यसाधारण महत्व जाणून ज्ञानेश्वरांच्या मते, सत्य म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा शोध घेणे आणि त्याद्वारे ईश्वराशी एकरूप होणे. हे एक आंतरिक आणि अनुभवात्मक ज्ञान आहे, जे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून प्राप्त होते असे सांगितले आहे. ते असेही म्हणतात “जे खऱ्या अर्थाने सत्य जाणतात, ते नेहमी आनंदी आणि समाधानी असतात. “

सत्याची एक व्याख्या अशी सुद्धा केली जाते की सत्य हे ईश्वर आहे, ईश्वर सुंदर आहे, म्हणून जे जे सुंदर आहे, ज्यात ईश्वराचे वास्तव्य आहे ते सत्य आहे. यातूनच सत्यम शिवम सुंदरम संकल्पना येऊन पुढे हेच शब्द घेऊन त्याचे एक गाजलेले गीत बनले.

परंतु सगळ्यात आधी मुंडक उपनिषेदात सत्याचा नेहमी विजय होतो हे सांगणारा सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः/ येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्//. असा श्लोक आहे. संपूर्ण मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.. सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही.. सत्य द्वारेच देवांना यात्रा पथचा जो मार्ग आहे तो विस्तीर्ण झाला, ज्या मार्गाचा आपण सर्वांनी उपयोग केला तर आपण आपले अंतिम ध्येय गाठू शकतो तसेच ऋषी गण यांनी या मंत्राचा उपयोग करूनच सत्याच्या आधारे लक्ष परमधाम प्राप्ती केली आहे. उपनिषदचे हे वाक्यांतील अंश ‘सत्यमेव जयते’ हे आदर्श वाक्य म्हणून याचा राष्ट्रीय प्रतीकात समावेश केला गेला आहे.

आपल्या राष्ट्रीय चिन्हावर हे वाक्य आपल्याला पहायला मिळते. सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य मानले जाते त्याचा अर्थ आहे, सत्याचा नेहमी विजय असे म्हटले जाते की सत्यमेव जयते हे वाक्य राष्ट्रपटलावर मान्यता मिळवण्यासाठी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारल्या गेल्यानंतर राष्ट्रीय प्रतीकांचा स्वीकार केला गेला. खरे तर अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेले असते.

आहे. 26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेल्यानंतर या राष्ट्रीय प्रतीकांना स्वीकार केला गेला. त्यामध्ये हे वाक्य सुंदर वाक्य म्हणून त्याचा राष्ट्रीय चिन्हात समावेश केला गेला.

गांधीजींनी सुद्धा सत्याचा आग्रह धरला. किंबहुना सत्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलाला सत्याग्रह म्हटले गेले. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र्यालासुद्धा माझे सत्याचे प्रयोग हे आहे.

तसेच सत्य हे न मरणारे शाश्वतवाटल्याने ज्योतिबा फुले यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.

जगातील त्रिकाला बाधित सत्य जन्मलेला तो मरणार आहे हे मानलेले असले तरी त्याहूनही मोठे असे सत्यमेव जयते हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते.

तसेच सत्याचा मोठा फायदा म्हणजे आपण काय बोललो होतो ते कधी लक्षात ठेवावेलागत नाही.

सत्यमेवची फोड सत्यम एव अशी आहे. एव म्हणजे ‘च ‘ त्वमेव माता पिता त्वमेव तूच माता तूच पिता, एकमेव एकच तद्वतच सत्यमेव म्हणजे सत्यच. सत्यमेव जयते सत्यच विजयी होते.

हे खरे आहे की सत्याच्याच मार्गावर असंख्य अडचणी असतात म्हणून लोक खोट्याचा सहज उपलब्ध असलेला पर्याय निवडतात. पण त्याची किती मोठी शिक्षा नंतर भोगावी लागते हे सत्य समोर आल्यावर कळते. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. म्हणूनच प्रत्येकानेच सत्याची कास धरली तर……

करा विचार आणि म्हणा सत्यमेव जयते

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ६ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ६ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

श्रावणी रविवार

श्रावण महिना संस्कार, माहिती, धार्मिकता, आयुर्वेद या सर्वच दृष्टीने अत्यंत महत्वाचा वाटतो. बाहेर पाऊस असतो. दिवसा पण अंधारून आलेले असते. उन्हाचे प्रमाण तसे कमीच असते. आणि आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्त्व माहिती व्हावे या दृष्टीने या महिन्यातील व्रते, पूजा महत्वाच्या असतात. आपल्या पूर्वजांनी याचा विचार केलेला होता. आणि अशी व्रते आपल्या कडून करून घेतली होती.

सूर्य व त्याची उपासना याचे महत्व सांगणारे हे व्रत आहे. या दिवसात सूर्य दर्शन कमी होते. अशा वेळी सूर्य दर्शन व्हावे, सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेता यावी या दृष्टीने हे व्रत महत्वाचे असते. स्नान केल्यावर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्त चंदनाने काढून त्याची पूजा करावी. गायत्री मंत्राचा जप करावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. हे सगळे करणे शक्य नसेल तर सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसून मानस पूजा करावी व गायत्री मंत्राचा जप करावा.

श्रावणी रविवारला  वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.  सूर्याला ऊर्जा आणि जीवनाचा स्रोत मानले जाते. त्यामुळे या व्रतामुळे आरोग्यासाठी चांगले फायदे मिळतात, असे मानले जाते.

श्रावणी रविवारचे वैज्ञानिक महत्व:

ऊर्जा आणि आरोग्य:

श्रावणी रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते, असे मानले जाते.

नैसर्गिक क्रिया:

श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने, वातावरणात ओलावा असतो. रविवारी सूर्याची उपासना केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.

नैसर्गिक समतोल:

श्रावण महिना निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. या महिन्यात उपवास आणि व्रतांमुळे शरीराचे नैसर्गिक चक्र व्यवस्थित राहते, असे मानले जाते.

मानसिक शांती:

श्रावणी रविवारी आदित्य राणूबाई व्रत केल्याने मानसिक शांती आणि स्थिरता मिळते, असे मानले जाते.

श्रावणी रविवारी व्रताचे महत्व:

सूर्य उपासना:

श्रावणी रविवारी सूर्याची पूजा करून व्रताचे पालन केले जाते. यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

आदित्य राणूबाई व्रत:

हे व्रत विशेषतः स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी करतात.

व्रताचे फायदे:

या व्रतामुळे घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, असे मानले जाते.

श्रावणी रविवार हा एक महत्वाचा दिवस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्ट्या दोन्ही दृष्टीने महत्व आहे.

असे आहे श्रावणी रविवारच्या व्रताचे महत्त्व!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लक्ष्मण रेषा आपली आपली…” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “लक्ष्मण रेषा आपली आपली…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

लक्ष्मण रेषा म्हणजे काही नियम, मर्यादा यांचे पालन करणे म्हणजे ठराविक मर्यादा ओलांडू नये.

साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी शाळेत पाचवी ते सातवी पर्यंत मुलींना फ्रॉक किंवा स्कर्ट घालण्याची मुभा असायची पण त्यानंतर साडी नेसणे सक्तीचे होते. माता, गुरु आपल्यावर संस्कार करत म्हणजेच आपले जीवन सुखमय, निर्वीघ्न व्हावे यासाठी ती लक्ष्मण रेषाच होती. त्याकाळी नियम काटेकोरपणे पाळले जात.

आता मात्र या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. हल्ली हवे तसे पोशाख केले जातात. पूर्वी गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घातली तर दारिद्र्याचे लक्षण समजले जायचे पण हल्ली फॅशनच्या नावाखाली सर्रास गुडघ्यावर फाटलेल्या पॅन्ट घालून मुले मुली वावरताना दिसतात.

पूर्वी संध्याकाळी मुलांनी सातच्या आत घरी यावे असा नियम होता. घरी आल्यावर तिन्ही सांजेला शुभम करोति, मारुती स्तोत्र, रामरक्षा यांचे पठण पुढे करत त्यानंतर पाढे असा क्रम होता. हल्ली मुले केव्हाही घरी येतात, पाढे येतच नाहीत मग राम रक्षा वगैरे दूरच! आले की मुले जेवणाचे ताट घेऊन टीव्ही समोर बसतात किंवा मोबाईल मध्ये डोके खूपसून असतात. त्यामुळे संवाद कमी झाले आहेत, नातेसंबंध दुरावले आहेत.

बोलताना सुद्धा मर्यादा पाळायला हवी. “शब्द कधी वज्राहून कठोर तर कधी फुलाहून कोमल असतात” याचे भान ठेवले पाहिजे. कटू शब्द मनावर ओरखडे उठवतात. हल्ली प्रत्येकाचा इगो आड येतो. , त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे म्हणून स्त्री असो वा पुरुष असो बोलताना शब्द जपूनच वापरले पाहिजेत. खरचं जगताना प्रत्येकाने आपापली लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे.

द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाचा अपमान केला. नसता, दुर्योधनाला “अंधे का पुत्र अंधा “असे वर्मावर घाव घालणारे वाक्य बोलली नसती तर द्रौपदी वस्त्रहरण झाले नसते, युद्धही टाळले असते. तसेच सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा ओलांडली नसती तर रामायण घडले नसते. म्हणून

“लक्ष्मण रेषा बंधनांची

आपणच आखावी

स्वैर मनाला लगामाची

संवय घालून घ्यावी”.

सौ. अर्चना देशपांडे, पुणे

लेखक – अज्ञात.

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मी, चारधाम, आणि घोडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मी, चारधाम, आणि घोडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

त्यांनी निर्णय घेतला. चारधामला जायचं आणि सोबत मलाही न्यायचं.

याच यात्रेत बर्याच वर्षांनी माझा आणि घोड्याचा परत एकदा संबंध आला तो केदारनाथला जातांना.

पहिल्यांदा बहूतेक जणांचा घोड्याशी संबंध येतो तसाच माझाही आला होता. हो बरोबर……. लग्नात. त्यावेळी घोड्यावर बसल्यानंतर येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायचे आहे हे माहीत होत. त्याची शारिरीक व मानसिक तयारी होती. आणि एक आनंदाची सळसळ मनात होती. पण यावेळी घोड्यावर बसल्यानंतर कोणत्या प्रसंगाला तोंड द्याव लागेल हे खरंच सांगतायेत नव्हत. आणि आता परत घोड्यावर बसून काय तोंड देणार……. कारण पहिल्या प्रसंगानंतर तोंड देण्याची वेळ वारंवार आली तसंच तोंडावर पडण्याची वेळही खूपदा अनुभवली होती.

पहिल्यांदा मी कोणाचातरी नाथ होणार म्हणून घोड्यावर (स्वत:हून) बसलो होतो. आता केदारनाथला जातांना मात्र मला अक्षरशः उचलून, जवळपास टांगाटोळी करतच कसबस घोड्यावर चढवल होतं. सगळ्या प्रवासात चढवणे आणि उतरवणे हा कार्यक्रम एकूण सहावेळा झाला. कदाचित या कार्यक्रमाला तो घोडाही कंटाळला असावा.

प्रवास संपल्यावर मी एकदाचा उतरल्यावर घोड्यावरच पाठीवरचंच काय मनावरचही ओझं उतरलं असेल. माझ्या ऐवजी घोड्यानेच सुस्कारा टाकला असेल. पण आम्ही दोघंही सुटलो होतो.

केदारनाथला जाणारी शेकडो माणसं होती. आणि बरेचजण घोड्यावर जातात. त्यामुळे तिथे जाणारे, घोडे, आणि घोड्यावर बसवून नेणारे यांची यात्रा नव्हे तर बाजार भरल्यासारखं वाटत होतं. घोडेवाले घोड्यांची आणि जाणारा त्यावर बसायची किंमत आपल्यापरीने ठरवत होता. राजकारणात घोडेबाजार हा शब्द ऐकला आहे. त्याची थोडी कल्पना आली.

तो घोडा आहे का खेचर हेच या घोड्याला म्हणजे मला समजलच नाही. पण सगळे घोडा म्हणत होते म्हणून मी पण त्याला घोडाच म्हणत होतो.

वाढत्या वयानुसार कोणी तसं वागलं नाही तर आपण सहजपणे म्हणतो. नुसता वाढला आहेस घोड्यासारखा…….. पण घोडा माणसाला काय म्हणत असेल? ……. असा प्रश्न पडला. पण घोडाच तो. काय म्हणेल? ….. घोडाच म्हणेल… अशी मी माझीच समजूत काढली.

सगळेच मला म्हणत होते, घोड्यावर नीट बैस… हे इतक्यावेळा सांगून झालं, की नंतर माझ्याबद्दल घोड्यालाही शंका आली असावी. आणि तो सुध्दा मनातल्यामनात मला म्हणाला असेल. घोड्या….. वर नीट बैस……..

पहिल्यांदा घोड्यावर बसलो होतो त्यावेळी घोड्याकडे आणि त्याच्या काही सवयींकडे नीट लक्ष दिलं नव्हत. गरज वाटली नव्हती. आता घोड्यावर चार पाच तास बसायचं असल्याने त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत होत्या.

पहिलं असं लक्षात आलं की इथे घोड्यांची काही कमी नाही…… आणि शक्यतो ते सतत आपल्या जोडीदाराबरोबरच राहण्याचा प्रयत्न करतात. काही कारणाने त्यांच्यात अंतर पडलच तर हर प्रकारे प्रसंगी थोड धावत पळत, वाट मिळेल तिथून, गरज पडल्यास मधे येइल त्याला हलकासा धक्का देत, इतरांच्या जोडीकडे दुर्लक्ष करत, आपल्या आणि आपल्याच जोडीदारासोबत राहतात. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नाहीत.

आणि आपण……. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नसलो, किंवा तो बरोबर असला तरी दुसर्यांचे जोडीदार कसे आहेत हे बघायचा मोह सोडत नाही.

या प्रवासात मला घोड्यावर शारिरीक धक्के खूप बसले. पण त्यांच हे बरोबरीने राहणं हा मला घोड्यान धक्का न देताही बसलेला धक्का होता.

पहिल्यांदा घोड्यावर बसलो तेव्हा….. आणि आता…… केव्हा एकदा खाली उतरतो असंच झालं होतं. फक्त दोन्हीवेेळा परिस्थिती आणि कारणं वेगळी होती.

इथे सगळेे पायी, घोड्यावर, डोलीने, पीट्टू करुन जातात. पीट्टू म्हणजे एक वेताची खूर्ची असते. त्यात बसवून ती खूर्ची पाठीवर ठेउन घेऊन जातात. पण कसाही केला तरी प्रवास सोप्पा नाही. कारण रस्ताच धड नाही. त्यातही चढाव आणि उतार. वातावरणाचा तसा भरवसा नाही.

पाउस असेल तर रस्ता ओला, निसरडा असतो. काही ठिकाणी थोडेफार वाहणारे किंंवा अंगावर उडणारे पाणी असते. डोंगरावरून घसरून आलेले थोडे दगड माती असते. घोड्यांनी केलेले नैसर्गिक विधी. (हे विधी साफ करायला ठिकठिकाणी माणसं असतात. पण जाणारे येणारेही काही कमी नसतात.) एकाच रस्त्यावर सगळेच, जाणारे आणि परत येणारे, घोडे, डोली, पीट्टू, रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थवाले. त्यात एका बाजूला डोंगर, पर दुसर्‍या बाजूस खोल दरी.

त्यातही मोबाईलवर फोटो काढणारे, शूटिंग करणारे, आणि व्हिडिओ काॅल करणारे. यांचा उत्साह पराकोटीचा होता. पण घोड्यावर बसून प्रवास करणार्‍या काही लोकांचे चेहरे खरच फोटो काढण्यासारखे होते. कदाचित माझाही चेहरा तसाच असेल. पण तो न काढल्याने घोड्याच्या एका बक्षीसपात्र फोटोस सगळेच मुकले.

डोली म्हणजे पाय थोडे लांब करुन बसतायेइल अशा खुर्चीला बाजूला दोन दांडू आणि त्या दांडूंना पुढे आणि मागे एक आडवा दांडू असतो. आणि पुढे दोन आणि मागे दोन असे चारजण मिळून उचलून घेऊन जातात. वर सांगितलेल्या गर्दीच्या आणि व्यवस्थित नसलेल्या रस्त्यावरून ते चौघं डोलीत बसलेल्या माणसाचं वजन सांभाळत घेऊन जातात. चढ आणि उतार काहिही असलं तरी वजन सांभाळत आपसात समन्वय साधत प्रवास पूर्ण करणं कठीण आहे. वजन घेउन चढतांना धाप लागते, आणि उतारावर तोल, वेग, आणि रस्त्यावर असणारी गर्दी सांभाळावी लागते.

त्यामुळे दोन्ही बाजूचा प्रवास सुखरुप झाला, तर देव भेटला. नाहीतर आपणच देवाला भेटण्याची तयारी करावी.

सगळा एकूण प्रवास (गौरी कुंडला पोहोचण्या पासून केदारनाथ पर्यंत) जवळपास वीस किलोमीटर.

मी केदारनाथला गेलो तेव्हा थोडा पाउस आणि वातावरणात गारवा होता. मी तर स्वेटर चढवून त्यावर रेनकोट घातला होता. शिवाय हाताशी आधाराला काठी होतीच. पायी जाणारे जवळपास सगळेच काठी घेतातच.

आम्ही पैसे देऊन दर्शन घेणार होतो. पण त्याची वेळसुद्धा पहाटे साडेतीन वाजता होती. आम्ही रात्री दोन वाजताच तयार झालो असलोतरी पैसे न देता दर्शन घेणाऱ्यांची चाहूल रात्रभर होती. अंधारात सुध्दा ते जात असले तरी त्यांच्यासाठी मंदिराची दारं मात्र पहाटे पाचलाच उघडणार होती.

चारधाम ला जायचं तर चारदाम खर्च होणार हे गृहीत होत. याच कारण दुकानदारांना चहा, साखर, मीठ ते पाण्याची बाटली आणि सिलेंडर अशा सगळ्याच गोष्टी खालूनच वर आणि माणूस किंवा घोडा यांच्याच मदतीने पैसे मोजून वर न्याव्या लागतात. चहा जरी तीस रुपयांना मिळत असला तरी पाण्याची बाटली मात्र ऐंशी नव्वद रुपयांना मीळते.

तसच परिस्थिती नुसार घोडे, डोली, पीट्टू यांचे भावही (दर) बदलत असतात. आम्ही केदारनाथ उतरायला सुरुवात करणार तेव्हातर पाऊस होता. वातावरणात झालेल्या बदलामूळे फक्त वरुन खाली जाऊ देत होते. खालून वर सोडत नव्हते. त्यामुळे उतरायला घोडे जवळपास मिळतच नव्हते. आणि डोली व पीट्टू यांचेही दर वाढले होते. काही जणांनी पायी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कारण वातावरण परत केव्हा निवळेल याची वाट बघण्यात वेळ जाणार होता. आणि परत एकाचवेळेस गर्दी वाढणार होती. आता निदान खालून वर येणार्यांची गर्दी नव्हती.

पण निसर्ग सौंदर्य अफाट आहे. ऊन, पाऊस, धबधबे, गारवा, हिरव्यागार डोंगरावर दिसणारा थोडा बर्फ, ढगाच्या वरुन जाणारा रस्ता. सगळच खास आहे. आमच्याबरोबर असणार्या तरुण मंडळींनी ते सौंदर्य पायी जातांना आणि येतांना अनुभवल. पण सहज आणि सोप्प आहे असं नाही.

चारधाम यात्रेत यमुनोत्री हि सराव परीक्षा आहे, तर केदारनाथ वार्षिक परीक्षा. कारण यमुनोत्री चं अंतर फक्त तीन चार किलोमीटर आहे. पण गंगोत्री आणि बद्रिनाथ सहज सोप्प आहे. तिथे सहज पायी जातायेत. चढाव उतार आणि अवघड रस्ता नाही.

अजूनही बरच काही सांगण्यासारखं आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आशा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? विविधा ?

आशा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

संत गाडगेबाबा म्हणतात ज्याच्या मनात आशा नाही तो जगाचा राजा आशा नसलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळच. मला तर वाटते माणसाला कळायला लागते तेव्हापासून त्याच्या मनाला आशा चिकटते. आशा करणे वाईट नाही. आशेच्या आहारी जाणे तसेच आशा सोडणे हे दोन्ही वाईट. मनात जर आशेची पालवी असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड  असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते आशावाद नेहमी जगायला बळ देतो असतो. आशावाद म्हणजे सकारात्मक ऊर्जा. मनातील विचार नेहमी सकारात्मक ठेवले तर आपले प्रयत्न ही योग्य दिशेने चालू राहतात आणि एक दिवस यशाचे शिखर निश्चित गाठता येते.

कोशिश करने वालों की हार नही होती प्रयत्न करण्यासाठी मात्र मनात प्रबळ इच्छा पाहिजे. म्हणजेच आशा पाहिजे.

आशा संपणे म्हणजे उमेद हरणे आशा संपणे म्हणजे नैराश्य येणे आशा संपणे म्हणजे आत्मविश्वास गमावणे जिथे आत्मविश्वास असतो तिथे अशा कधीच संपत नाही. आशा आहे म्हणून आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आहे म्हणून आशा आहे.हे चक्र नेहमी माणसाच्या मनात चालू राहिले म्हणजे आत्मविकास होऊन कार्यसिद्धी होते. आत्मविश्वासाला उमेदीची पंख असतील तर ध्येयपूर्ती निश्चित होते आशेचा एक किरण बुडणाऱ्याला आधार देतो. आशा, निराशा जीवनाच्या दोन बाजू आहेत. अपेक्षित गोष्ट झाली नाही की निराशा येथे आणि निराशा आली की आत्मविश्वास कमजोर पडतो. काही वेळेस टोकाचे निराशा येऊन जीवन उध्वस्त होण्याची भीती असते. म्हणून मनामध्ये नेहमी आशा तेवत ठेवली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

उषःकाल होता होता काळरात्र झाली

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे

स्पष्टिकरण:

‘अलक’ म्हणजे अति लघु कथा

(Terribly Tiny Tale)

‘अलका’ म्हणजे अति लघु काव्य

(Terribly Tiny Poetry)

**

सध्या ‘अलक’ या नावाचा एक अति लघु कथा प्रकार मराठी भाषेत तुरळकपणे दिसू लागलाय खरा, पण या वाङमय प्रकाराला कोणाचीही, कुठलीही अधिकृत मान्यता नाही. रसिक वाचकांकडूनही त्याला फारशी दाद मिळाल्याचे पाहण्यात नाही.

‘अलक’ किंवा ‘अति लघु कथा’ हा एक गद्य कथाप्रकार आहे. यात थोडक्या शब्दात एखादी, घटना, प्रसंग, विचार कथारूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. या कथेचा जीवच मुळी लहान असतो. अलक हा क्षुद्र कथाप्रकार सामान्यतः समाज माध्यमांवर आढळून येतो. तो अधिक जागा व्यापत नाही.

यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत, सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न असतो तर, नकारात्मक अलकमधे त्याउलट प्रयत्न दिसतो.

सध्या काही नवे हौशी लेखक काही तरी ‘हटके’ करायचे म्हणून आवर्जून, प्रयत्नपूर्वक अलक लिहून विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतात. आतपुढ म्हणजे ‘आले तसे पुढे ढकलले’ ही तर माध्यमांची संस्कृती. त्यामुळे ह्या अलक विविध समूहांवर फिरत असतात हे सत्य आहे.

मराठी कथा, लघुकथा, दीर्घकथा ह्या कथा प्रकारांना प्रदीर्घ, प्राचीन परंपरा आहेत. त्या सर्वश्रुत व सर्वपरिचित आहेत. त्यांना समाजानेही मानले आहे, स्विकारले आहे. थोडक्यात हे कथाप्रकार मराठी जनमानसात ‘सुप्रतिष्ठित’ झाले आहेत.

लघु आणि दीर्घ कथा

लघुकथा ही आकाराने, लांबीने लहान असली तरी ती एक पूर्ण कथा असते. दीर्घ कथा सुद्धा एक परिपू्र्ण कथा असून ती आकाराने काहीशी विस्तृत असते. त्यातील व्यक्तिमत्वे, प्रसंग, तपशील, कालमर्यादा इ. बाबतीत तिचा आवाका मोठा असतो.

सध्याच्या अलक

अलक हे कथेचे लघुकथेपेक्षाही अधिक लघुरूप असते असे गृहित धरले तरी ती एक पूर्ण कथा असावी येवढी अपेक्षा आहे. त्यातील कथानकात काही नाट्य, एखादी व्यथा, एखादा संदेश असे काहीतरी असायला हवे. प्रत्यक्षात मात्र पूर्ण कथानक सामावणारी, वरील सर्व किंवा काही लक्षणे असणारी अलक आजपर्यंत तरी माझ्या वाचनात आलेली नाही.

वाचनात आलेल्या तथाकथित अलक या पूर्ण कथा कधीच वाटल्या नाहीत. एखादे वाक्य, दोन-चार वाक्यात मांडलेला एखादा विचार, एखादा प्रसंग येवढाच त्यांचा जीव असतो. त्याला कथा असे म्हणताच येत नाही.

काही तरी नवीन करण्याच्या हेतूने काही उत्साही मंडळींनी अलिकडे हा उथळ कथाबंध हाताळायला सुरुवात केली आहे. पण त्यात चमकदार, विस्मयकारी कल्पना, हळुवार अनुभूती, एखादा कलापूर्ण प्रतिभाविष्कार आहे असे काहीही अजून तरी वाचनात आलेले नाही.

अलका- चारोळी

गेल्या तीन-चार दशकापूर्वी अस्तित्वात आलेला हा एक उथळ काव्यप्रकार असला तरी बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. विशेषतः यात तत्कालिक राजकीय व्यंगे मांडलेली असल्याने, काही चिमटे, कोपरखळ्या, टपला, चपेटे असल्यामुळे त्या त्वरित दाद घेऊन जातात. याअति लघु काव्याला आपण ‘अलका’ म्हणूया. अशा चारोळीत अगदी लहान कथाबीज, विचारबीज असते. त्या अगदी अल्पजीवी असतात.

अलका- हायकू

‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार म्हणून हा ही ‘अलका’. हा जपानी भाषेत लोकमान्य झाला असला तरी प्रयत्न करूनही मराठीत तो कधीच रुजला नाही. शिरीष पै यांनी या काव्यप्रकारात काही लेखन केले आहे पण त्यांच्याखेरीज इतर साहित्यिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. प्रतिभावान कवियत्री शांता शेळके यांनी काही जपानी हायकूंचा मराठीत अनुवाद करून त्याचे ‘पाण्यावरील पाकळ्या’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पण असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर हायकू मराठी मनाला आकर्षित करू शकले नाही हे वास्तव मान्य करावे लागेल.

अलका- सुभाषित

या पार्श्वभूमीवर संस्कृत वाङमयातील अत्यंत प्रभावी लोकप्रिय ‘सुभाषित’ ह्या लघुकाव्य – ‘अलका’ प्रकाराचा उल्लेख अटलनीय आहे.

जगातील भाषांमधील सर्वोत्कृष्ट भाषा ‘संस्कृत. ‘ त्यातील काव्य सर्वोत्तम आणि काव्यातही सर्वोत्कृष्ट प्रकार म्हणजे सुभाषित!

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण-भारती।

तस्माद्धि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सुभाषिताची व्याख्या

मिताक्षरं हितं सभ्यं वैश्विकं सार्वकालिकम् ।

सालंकृतं स्वयंपूर्णं सुबोधं तत् सुभाषितम् ।।

कमीतकमी शब्दयुक्त, हितकारक, सभेत शोभून दिसेल असे, विश्वात सर्वत्र आणि सर्वकाळी लागू पडणारे, अलंकार-युक्त, अर्थाने परिपूर्ण आणि हे सर्व असुनही जे समजण्यास सोपे असते, त्याला ‘सुभाषित’ असे म्हणतात.

अलका – शायरी

उर्दू भाषेतील ‘शेरोशायरी’ हा ही असाच एक अति लघु काव्यप्रकार- अलका विलक्षण लोकप्रिय आहे. अँड. भाऊसाहेब पाटणकरांनी सिद्ध केलेला, बोली भाषेत लिहिलेला ‘मराठी शायरी’ हा काव्यप्रकार विलक्षण प्रभावी, परिणामकारक आहे. त्याची भाऊसाहेबांनी दार्शनिक पद्धतीने केलेली व्याख्या अशी…

भावोन्मादोत्थित कल्पनाचमत्काराविष्कार विशेषः शायरी। कल्पना चमत्कृतित्वंतु विस्मय सहकृत सदभिव्यंजकत्वम्।

उत्कट भावनेतून निर्माण झालेल्या सद्भिव्यंजक अशा विस्मयकारक कल्पनेच्या अविष्काराचे एक तंत्र असा मी वरील व्याखेचा सामान्यतः अर्थ लावतो.

दुर्दैवाने भाऊसाहेबांच्या या मराठी शायरीचा वारसा पुढे चालवणारा कोणी शायर लाभल्याचे आढळात नाही. परिणामी पूर्णतः सप्रमाण, सप्रात्यक्षिक सिद्ध करून सुद्धा भाऊसाहेबांच्या पश्चात मराठी शायरी अंकुरली, फोफावली नाही. तिची परंपरा निर्माण झाली नाही.

वरील वाङमय प्रकारांचा विचार करता सध्याच्या ‘अलक’ अगदीच पुचाट, बेंगरूळ, रसहीन, अर्थहीन वाटतात.

ज्यांना ‘अलक’ हा कथाप्रकार सोईचा वाटतो, प्रभावी वाटतो, आवडतो त्यांनी लिहावे. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याचे रसग्रहण, मूल्यमापन करावे आणि ठरवावीत आपापली मते. अलकविषयी मी माझी ही व्यक्तिगत मते या निमित्ताने मांडतोय येवढेच.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुज सगुण म्हणो की… – भाग -१ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ तुज सगुण म्हणो की… – भाग – १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

पहाटेच्या काकड आरतीचे सूर कानावर आले म्हणून मंगला काकूंनी डोळे उघडले.

‘उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख.. ‘ ऐकता ऐकता त्यांनी रिद्धी सिद्धीच्या नायकाला अंथरूणातूनच हात जोडले. कराग्रे वसते लक्ष्मी.. म्हणत त्या उठल्या व देवघरात आल्या.

देवघरातील प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघत त्या खाली बसल्या.

“श्रीरामा, आजवर सारे आयुष्य तुझ्या आधाराने जगले. जप, तप, व्रतवैकल्य करताना आणि तू दिलेल्या आयुष्याला सामोरं जाताना सत्तरी कधी आली कळलच नाही.. आता एकच इच्छा आहे की तू सगुण रूपात येऊन दर्शन द्यावस. आता किती दिवस उरलेत कुणास ठाऊक! पण तू भेटत नाहीस. रागावले आहे बरका मी तुझ्यावर! ”

श्रीरामचंद्र हा त्यांचा सखा, सोबती होता आणि जन्मभरीच्या श्वासा इतुके अखंड राम नाम मोजियल्यामुळे त्याच्याशी फार वेगळं नातं होतं. त्याच्यावर रागावणं, रुसणे, फुगणं कधी मधी चालू असायचं. श्रीरामालाही त्याची सवय असावी. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य त्यांच्या रागाने कधीच लोपलं नव्हतं.

दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत त्या उठल्या. “आई आई ग…रामराया! तुझे गुडघे दुखतात का रे? बाबा रे, तुझं घोंगडं निर्गुणाचं.. न झिजणारं पण आमचं घोंगडं मात्र सगुणाचे.. झिजणारं.. असं म्हणून गेले माऊली. असं का केलस रे? ” उठताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे ते सुंदर रूप डोळ्यात साठवून घेतले आणि म्हणाल्या, “रागवत नाही रे तुझ्यावर पण एवढी एक इच्छा पूर्ण होईल का? माझी म्हातारीची बडबड सुरु राहते पण तुझ्याकडून एक नाही की दोन नाही. ”

मंगला काकूंनी सर्व आन्हिके उरकून काठापदराचे तलम पिवळं नऊवारी लुगडं नेसायला काढलं. त्याचे चंदेरी काठ हाताने सरळ करून ते लुगडं त्या चापून चोपून नेसल्या. रूपेरी केस विंचरून त्याचा एक छोटासा अंबाडा बांधला. त्यात सवयीप्रमाणे दोन मोगऱ्याची फुलं अडकवली.

कानात टपोऱ्या मोत्यांच्या सासुबाईंनी केलेल्या कुड्या घातल्या. स्थूल बांधा, गव्हाळ वर्ण, मध्यम उंची आणि सर्वांवर प्रेम करणाऱ्या मंगलकाकू आख्ख्या कॅालनीमधे काकू या नावाने प्रसिद्ध होत्या.

त्यांचे यजमान केशवराव ७५ वर्षाचे होते. ते काकूंना त्यांच्या कामात जमेल तेवढी मदत करत असत. मुलगा परदेशी होता व मुलगी मुंबईला होती. चारचौघांसारखा कभी खुशी कभी गम असणारा काकूंचा संसार ठीक चालला होता पण एकच खंत होती.. श्रीराम प्रभू भेटला नव्हता. जाणवला होता, भासला होता पण भेटला नव्हता. पण देव कसा भेटेल ही गोष्ट कधी कुणाला बोलली की ते हसण्यावारी नेत. टर देखील उडवतं.

“देव कधी भेटतो होय? ते ही आपल्या सारख्याला? आपण थोडेच तुकाराम- रामदास आहोत? ” या पलिकडे कुणी उत्तर देत नसे. “काय हा वेडेपणा! ” हा भावही काकूंनी बरेचदा अनुभवला होता.

शेजारच्या गोखले आजी खवचटपणे म्हणत, “मंगला, खरंच कधी आला राम तर मला बोलव बरका. ह्यांना पेन्शन मिळेल का विचारायचे आहे. ” त्यावर बर्वे वहिनी म्हणत, ” अहो आता पेन्शनच्या घोळात रामाला ओढू नका. काय बाई मागणं हे.. कसलं हे ऐहिकात रमणं म्हणत त्या गुडघेदुखी जाऊ दे असं मागुया म्हणत.

जोशी काका पक्के नास्तिक होते. ते म्हणत, ”अहो देव बिव काही नसतं. सगळं मानव निर्मित कुभांड आहे! ” पण काकूंना परमेश्वराची आस ठेवण्यात काही चूक आहे असे कधीच वाटले नाही.

कल्पवृक्ष काॅलनीत राहायला आल्यापासूनच त्यांनी आपल्या अवती भोवतीचा परिसर जमेल तसा सुधारण्याचे व्रत घेतले होते व आज वयाच्या सत्तरीमधे देखील ते व्रत चालू ठेवले होते.

कॅालनी मधे धुणभांडी करणाऱ्या शांतीच्या नवऱ्याला चहाची गाडी घेऊन देण्याची कल्पना त्यांचीच. ड्रायव्हरच्या मुलीला, सुमाला, शिवणाचे मशिन घेऊन देणाऱ्या काकूच. कॅालनीच्या मिटींग्ज मधे “अरे घरटी १००/२०० रूपये टाका रे पटपट.. फार नाही हो मागत. ५००० चं शिवणाचे मशिन सुमाला घेऊन देऊ सर्वजण. बिचारीला चार पैसे मिळतील. नवऱा वाईट निघाला ही काय तिची चूक? पटतय ना? ” म्हणून काकूंनी खड्या आवाजात सवाल केला की साऱ्या कॅालनीला माहित असायचं की शिवणाचे मशिन सुमाला मिळणारचं. कॉलनी मध्ये धुणे भांडी करणाऱ्या बायकांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्याची कल्पना त्यांचीच.

त्यांच्याकडे केरवारे करणाऱ्या पारूचा मुलगा श्रीपाद तर उत्तम ह्रदयरोग तज्ञ बनला होता. त्याच्या मेडिकल च्या फी साठी कॅालनीच्या लोकांना आवाहन करून पैसे जमवलेल्या काकूंचा श्रीपाद कायमचा ऋणी होता. काकूंमुळे कल्पवृक्ष कॅालनी नावाप्रमाणे मनातील गोष्टी पुरवणारी कॅालनी बनू लागली होती. काकू रंजल्या गांजलेल्यांना कधीच विन्मुख पाठवत नसतं आणि या सेवेत त्या रमून जात.

पण आज सकाळपासून मात्र काकूंचे मन श्रीराम दर्शनासाठी व्याकूळ झालं होतं. हट्टी पण झालं होतं. नसेना का आमची पात्रता समर्थ रामदासांएवढी म्हणून काय आम्ही अशी इच्छा पण नाही ठेवायची म्हणत त्या स्वयंपाक घरात आल्या.

दर रविवारी येणं जाणं खूप असतं म्हणून त्यांनी शिरा करायला घेतला. साजूक तुपात परतलेल्या रव्याच्या वासाने घर पवित्र झाल्यासारखं वाटलं. बेदाणे, बदाम, काजू युक्त शिऱ्यात साखर, वेलची पावडर व केशर घालून त्यांनी गॅस बंद केला.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्या गॅस बंद करून बाहेर आल्या. बघावं तर दारात दशरथ नंदन रघुवीर राम उभा होता. “ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं.. ” पिवळा पितांबर, जांभळा शेला, गळ्यात मोत्यांच्या माळा.. नील कमलासारखे शरीर.. “देवा आलास? ” त्या भारावून गेल्या.

“काकू, अग मी आशिष आहे! .. त्या भानावर आल्या.

शेजारचा आठवीतला आशिष शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रभू श्रीराम बनला होता.

“माते इक्ष्वाकू कुळातील मी दशरथ पुत्र राम आपल्याला नमन करतो” म्हणत आशिष नाटकीपणाने पुढे वाकला. काकूंनी त्याला जवळ घेतलं.

“अरे खरा रामच दारात आला असं वाटलं रे. थांब आत्ताच शिरा केलाय. दोन घास खा आणि निघ” म्हणत त्यांनी त्याला घाईने थोडासा शिरा दिला.

“काकू फसलीस ना! ” म्हणत हसत आशिष बाहेर पडला.

“अगबाई, रामाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा राहिला या गडबडीत! असुदे. दिसतेय सगळं त्याला! ” काकूंच्या मनात आलं.

त्या आत आल्या आणि जेवायची ताटे घेऊन त्यांनी केशवरावांना जेवायला बोलावले. जेवण संपे संपेपर्यंत कॅालनीतला डॅाक्टर शशांक मुलाच्या १२ वी च्या निकालाचे पेढे द्यायला आला. शशांक त्यांच्या मुलाचा मित्रच होता. काकूंकडे लहानपणी शिकवणीला यायचा.

“अहो डॅाक्टर आज काम नाही का?” केशवराव त्याला विचारत होते.

मंगलाताई लगबगीने बाहेर आल्या. “छान बातमी दिलीस हो शशांक. शिरा खाऊन जा.” त्या म्हणाल्या.

शशांक म्हणाला, “काम बाजूला ठेवून पेढे द्यायला आलोय काका! गप्पा मारता मारता काही वेळाने तो काकांना म्हणाला, “काका पावलावर थोडी सूज वाटते आहे. बघू का?”

केशवराव म्हणाले, “बघ की. अरे, कालपासून घशाशी पण येत आहे फार… आणि थोडी धाप लागतेय.. काय करू सांग. ” शशांकचा चेहरा बदलला.

“काका मी आत्ता श्री च्या क्लिनिक मधे चाललोच आहे म्हणून चला माझ्याबरोबर! काळजीचे कारण नाही पण बोलू एकदा श्रीपाद बरोबर. ” शशांकने लगेच श्रीपादला फोन केला.

“काकू, मी काकांना घेऊन जातोय श्री कडे” ते दोघे बाहेर पडले.

काकूंना वाटलं – “कालपासून हे सारखे ॲसिडिटी चा फार त्रास होत आहे म्हणत आहेत पण दाखवून या म्हटलं तर ऐकत नव्हते. बरं झालं शशांक आला ते! “

त्यांचा बसल्या बसल्या डोळा लागला. काही वेळाने शशांकच्या फोनमुळे त्यांना जाग आली.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्त्री नाही अबला.. ती आहे सबला” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “स्त्री नाही अबला.. ती आहे सबला☆ श्री जगदीश काबरे ☆

साथिंनो, स्त्रीया खरंच आहेत का अबला? या प्रश्नावर आपण आज विचार करणार आहोत आणि त्याचे उत्तरही शोधणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम जरा खोलात जाऊन आपण स्वतःलाच प्रश्न विचारूया की, स्त्रिया खरंच अबला आहेत काय? विचार केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळते? आपण दररोज पाहत असतो की, त्या दिवसभर एकाच वेळी अनेक व्यावधानी कामे करत असतात. म्हणजे असे की गृहिणी असो वा नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाची यादी काढली तर ती पाहून एवढी सगळी कामे ह्या स्त्रिया एका दिवसात कशा पार पडतात, हा प्रश्न आपल्याला नक्की पडतो. समजा स्त्रियांनी एक दिवस सुट्टी घ्यायची ठरवले आणि ती कामे पुरुषाने करायची ठरवली तर पुरुषाची किती त्रेधातिरपीट उडेल, हे पुरुषाला चांगलेच माहित आहे. म्हणून मला असे वाटते की, स्त्रीया मुळातच सक्षम असतात. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांचे सतत दमन करण्यात आलेले आहे, त्यांना दुय्यम लेखण्यात आलेले आहे आणि त्या दमनापोटी स्त्रियांमध्ये एकप्रकारचा न्यूडगंड तयार झाला आहे. म्हणून त्या स्वतःला अबला समजू लागलेल्या आहेत.

नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत ही दुय्यमता थोडी गळून पडलेली दिसते. पण गृहिणीची तर अवस्था वाईट आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेतील ‘गृहिणी’ या शब्दाची मला सुचलेली व्याख्या अशी आहे की, ‘जिचे कष्ट आम्ही सहज गृहीत धरतो ती गृहिणी. ‘ म्हणूनच ‘तू काय करतेस? तू तर घरातच असतेस!’ असे उद्दामपणे नवरे अथवा घरातील कर्ते पुरुष बोलताना दिसतात. बऱ्याच घरामध्ये तिला असे गृहीत धरले जाते. पण स्त्री ही गरोदर राहते या शारीरिक एका फरकापलीकडे कुठल्याही बाबतीत ती पुरुषांपेक्षा कमी नाही. तेव्हा आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवे की, ‘स्त्री नाही अबला, तर ती आहे सबला. ‘कष्टाला कधीही स्त्रिया हार जात नाहीत. म्हणूनच आज जगात सर्व क्षेत्रांमध्ये – विशेषत: जी जी क्षेत्रे पुरुषांशी संबंधित समजली जातात – त्याही क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत. स्त्रीया आज सैन्यामध्ये अधिकारी, वैमानिक म्हणून, कुस्ती आखाड्यात, राजकारणात, पोलीस खात्यात कमांडो म्हणून अशा अनेक पुरुषी क्षेत्रामध्ये लीलया वावरताना दिसत आहेत. म्हणजेच, स्त्री नाही अबला… ती आहे सबला!

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आपल्याला दिसतात. यात जवळजवळ शंभर टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. आता मला सांगा की, पुरुषाने आत्महत्या केल्यावर जी त्या घरातील निरक्षर स्त्री आहे तिच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी अचानकपणे येऊन पडते. तिने आजपर्यंत कधीही बाहेरची कामे केलेली नसतात. तेव्हा सुरुवातीला ती जरी गडबडली, घाबरली तरीही अशा स्त्रिया नंतर खंबीरपणे आपले तेच शेत कसून आपल्या घराचे त्या उदरभरण करत असतात, ते त्यांच्या जिद्दी स्वभावामुळेच ना? आलेल्या संकटावर मात करण्यासाठी कष्टाळूपणाने त्या आपल्या जीवनाचे रहाटगाडगे ओढत असतात. यावरून आपल्या लक्षात येईल की, पुरुष संकटाला घाबरून एक वेळ आत्महत्या करेल, पण स्त्री मात्र करणार नाही. म्हणूनच मी म्हणतो, ‘स्त्री नाही अबला… ती तर आहे सबला!’

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? वैयक्तिक निर्णय घ्यायचा जसा पुरुषाला अधिकार आहे तसाच प्रत्येक स्त्रीलाही अधिकार आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी ती एकटीच मूकपणे लढा देत असते. मग तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?

म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो, स्त्री नाही अबला… ती आहे सबला! तेव्हा पुरुषांनो, स्त्रियांना दुय्यम लेखणारा पुरुषी अहंकार सोडा. त्यांच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता व्यक्ती म्हणून आदर देत त्यांच्याशी समानतेने व्यवहार करा. मग पहा तुमचे जग किती सुंदर होते ते…!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हीच शिक्षा… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ हीच शिक्षा… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

झुंजूमुंजू झालं होतं. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. श्रीकृष्णांना हलकेच जाग आली होती. प्रसन्न मनाने ते उठले. नित्याप्रमाणे सगळी आन्हिकं आवरली. कपिलेचं धारोष्ण दूध पिऊन ते ताजेतवाने झाले. कालच स्वर्गात सगळ्या देवांनी अगदी प्रेमाने त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या आठवून त्यांना आजही अगदी छान वाटत होतं. त्यांनी आपली लाडकी बासरी घेतली आणि ते महालाबाहेरच्या बगिच्यात जायला निघाले. मग तिथे मोरांचा थवा जमणार … पाखरं अवतीभोवती चिवचिव करत फिरत राहाणार.. फुलांचा मंद गंध कवेत घेऊन गार वारा अवतीभोवती फेर धरणार.. झाडं आनंदाने डोलू लागणार.. हे सगळं अगदी नित्याचंच होतं. खरंतर या सगळ्यांसाठीच श्रीकृष्ण रोज सकाळी बगिच्यात जाऊन बासरी वाजवायचे.

आजही ते त्यांचा आवडता शेला अंगावर घेऊन निघणार इतक्यात बाहेर कुणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिलं तर चित्रगुप्त आणि त्यांचे सेवक महालाच्या बाहेर त्यांची वाट पाहत उभे होते. त्यांना आश्चर्य वाटलं खरं.. पण त्यांनी चित्रगुप्ताला आत बोलावलं … “ अरे आज इतक्या सकाळीच अचानक आलास भेटायला.. काही विशेष? “

कसं सांगावं याचा क्षणभर विचार करून चित्रगुप्त सांगू लागला – – “ देवा आज स्वर्गाच्या दाराशी भूतलावरच्या बऱ्याच लोकांनी गर्दी केली आहे. ”

“ पण तू न बोलावताच आपणहून थेट स्वर्गात येण्याची हिम्मत कशी काय झाली त्यांची? “ श्रीकृष्णाचा आवाज चढला होता.

“ देवा ते म्हणताहेत की तुमचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीत जी चेंगराचेंगरी झाली त्यात त्यांचा मृत्यू झालाय.. म्हणजे त्यांना स्वर्गातच जागा मिळणार अशी त्यांना खात्री वाटत होती, म्हणून थेट इथेच आलेत ते. देवा, फार दु:खी दिसताहेत सगळे. त्यांचं म्हणणं आहे की काल पृथ्वीतलावर त्यांनी आपला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला आणि त्यात तुमची आवडती दहीहंडी रचण्यासाठी वेगवेगळ्या गटांची अगदी चुरस लागली होती. जास्तीत जास्त उंच हंडी रचण्याचा प्रत्येक गटाचा अगदी हिरीरीने प्रयत्न चालला होता …. बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कुठे दहा थर.. कुठे बारा.. तर कुठे पंधरा थर. जोरदार पडणारा पाऊसही थांबायला तयार नव्हता. प्रत्येकाचीच ईर्षा वाढतच होती … आणि त्या नादात कितीतरी तरुण मुलं तोल जाऊन खाली कोसळली…. एकमेकांच्या अंगावर पडली.. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागेल अशी लक्षणं दिसताहेत देवा. बाहेर जमलेली गर्दी तुम्हाला अशी कळकळीची विनवणी करायला आली आहे की आता आपणच त्या सगळ्यांवर कृपा करावीत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभेल असा आशीर्वाद द्यावा. त्यांची ही प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलो आहे. मला तर काहीच सुचत नाहीये… “

श्रीकृष्णाच्या कपाळावर नकळत आठी पडली. मनाचा निर्धार करून ते चित्रगुप्ताला म्हणाले … …

“ जा त्यांना जाऊन सांग की आजपर्यंत केवळ भूतदयेपोटी या मानवांच्या असंख्य चुका मी माफ करत आलोय.. पण देवाच्या नावाखाली आपण अक्षम्य चुका करतोय हे त्यांना समजूनच घ्यायचं नसेल तर आता मीही त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. मी दहीहंडी का रचत होतो हे सांग त्यांना.. तुलाही त्याचं कारण माहिती नसेल तर तूही ऐक…. समाजात सगळेच काही एका स्तरावर राहात नाहीत ना? माझे सवंगडीही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले होते, पण म्हणून मी कधीच त्यांच्याबाबतीत भेदभाव केला नाही. वर मडक्यात टांगलेले दही – लोणी अगदी तळातल्या मित्रांपर्यंत पोहोचावे यासाठी तळमळ असायची माझी. त्या दृष्टीनेच फक्त चार थर रचायचो मी. सगळ्यात वर मी उभा असायचो.. आणि हंडी फोडल्यावर त्यातले सात्विक आणि पौष्टिक लोणी – दही अगदी खालच्या थरातल्या मित्रांपर्यंत पोहोचेल याची विशेष दक्षता घ्यायचो….. पण आता … “.. श्रीकृष्णांचा कंठ क्षणभर दाटून आला.. पण स्वतःला सावरून ते दृढ आवाजात म्हणाले.. “ आता त्यातला कुठलाच विचार कुणालाच नकोय. हंडीतल्या स्निग्ध पदार्थांची जागा आता पैशांनी घेतली आहे, आणि ते खालपर्यंत आपोआप झिरपू नयेत यासाठीच वरच्या थरातले लोक आटापिटा करताहेत … हे मी कधीच शिकवलेलं नाहीये.. कुणालाच.. मग याला मी माझ्यासारखी दहीहंडी म्हणूच शकत नाही.. माझ्या नावाखाली स्वतःचे दुष्ट हेतू झाकू पाहणाऱ्यांना मी कधीच माफ करू शकत नाही … मग आशीर्वाद देणं तर अशक्यच … जा चित्रगुप्त.. जाऊन सांग त्यांना … की या जीवघेण्या अपराधाला क्षमा नाही … आत्ताही नाही आणि यापुढेही कधीच नाही. “

……. आणि श्रीकृष्णांनी महालाचा दरवाजा स्वतःच बंद करून घेतला …. कदाचित कायमचा????

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वीकार… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ स्वीकार… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

समाजात वावरताना आपण बऱ्याच गोष्टीचा स्वीकार करतो. गर्दीची वेळ, ट्रॅफिक जॅम यामुळे होणारा वेळेचा जमा खर्च हे एकदा मनाने ठरवले की त्याचा मानसिक त्रास कमी होतो. हायवे वरून एखाद्या ठिकाणी जाताना एरवी जर पंधरा मिनिटे लागत असतील तर ट्रॅफिक जाममुळं चार तास लागले हे वास्तव ही आपल्याला पचवावे लागते आणि एकदा मनाला पटले की संयमाची किती आवश्यकता असते हेही लक्षात येते!

एखाद्या संकटाची कल्पना नसताना ते अचानक अंगावर आले की मन लगेच त्याचा स्वीकार करू शकत नाही, कारण त्याची तीव्रता मनापर्यंत पोहोचण्याइतका वेळच मिळत नाही! नुकतीच घडलेली पहेलगाम ची घटना घडली त्याबद्दल ज्यांनी तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला, त्या गनबोटे बाईंचे विचार ऐकताना लक्षात आले की, केवढ्या भयंकर प्रसंगाला यांना तोंड द्यावे लागले आहे! प्रत्यक्ष पतीचा मृत्यू डोळ्यासमोर घडलेला स्वीकारताना त्यांना किती दुःख झाले असेल याची कल्पनाच करवत नाही! तशीच ती नवीन लग्न झालेली, हनीमूनला गेलेली जोडी! त्या मुलीला काय वाटले असेल, आठ दिवसापूर्वी ज्याच्याशी लग्न केले त्याची पूर्ण ओळख होण्याआधीच त्याचा मृत्यू! किती भयंकर सत्य स्वीकारावे लागले असेल या घटनेत अनेकांना!

केवळ ह्या घडणाऱ्या घटना नशिबात होते म्हणून पत्करायचे म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार केला असेल.काळाबरोबर जखमा थोड्या भरतील, पण त्याचे व्रण मात्र मनावर कायमचेच राहतील! त्या जखमा पूर्णपणे कधीच भरणार नाहीत!

स्वीकारणे हे जगण्याचे एक तत्त्व आहे. निसर्ग, प्राणी सगळेच आपापल्या अनुकूल- प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करत असतात!

साध्या साध्या गोष्टी असतात पण घरात असणाऱ्या बाईला कित्येक घटनांचा स्वीकार करावा लागतो. घरात नेहमी येणारी कामवाली बाई वेळेवर आली नाही तरी घरातल्या बाईला मात्र कामं करावीच लागतात.नुकताच आलेला माझा अनुभव मला हे शिकवत होता.आज बरेच दिवसांनी रमा कामावर आली होती. अजूनही तिचा चेहरा सुजलेला, हातापायावर ओरखडे आणि किरकोळ जखमा दिसत होत्या. तिला काही विचारावे असा मनात विचार येत होता, पण तिच्या चेहऱ्यावरची ती व्याकुळता आणि पाण्याने भरलेले डोळे पाहून तिची चौकशी करण्याचा मला धीरच होत नव्हता. आमच्या सोसायटीजवळ असलेल्या झोपडपट्टीत रमा राहत होती आणि सोसायटीतील काही घरांमध्ये भांडी, केर – फरशीची कामे ती करत होती. दिसायला बारीकशी असली तरी काटक होती. तिच्या पस्तीशी च्या वयातच तीन मुले पदरात घालून नवरा आता निरुद्योग्यासारखा फिरत होता आणि रमा संसाराचा गाडा ओढत होती. नवरा काम करून जे काही पैसे मिळवत असे ते बरेचसे दारू, जुगारावरच खर्च होत असत. तिची ही स्थिती पाहून मी तिला नेहमी म्हणायचे, ‘सोड चिठ्ठी दे त्या नवऱ्याला! काही त्याचा उपयोग नाही तुला..’ रमा म्हणायची,’ ताई, देवाने गाठ बांधली त्याच्याशी, ती निभवायला नको का? दारू पिला की वागतो जरा वंगाळ, पण एरवी त्याचे लई प्रेम आहे माझ्यावर आणि मुलांवर!’

आमच्यासाठी तो बी धडपडतोय ना, हे व्यसन लय वाईट बघा! त्यानंच काय बी सुधरत नाही, पण एकदा पत्करला आहे ना त्याला,आता सोडणार नाही!’

तिचं ते बोलणं ऐकून वाटे, किती आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रद्धा! कसाही असला तरी नवरा देव आणि वाट्याला येईल ते स्वीकारायचं! वर म्हणणार काय, नारळ आणि नवरा जसं असेल तसं स्वीकारायला नको का?’

तिचं हे तत्त्वज्ञान ऐकून तर मी चाटच पडायची! अर्थात अगदी गरिबातच हे विचार आहेत असं नाही तर उच्चवर्णीयांमध्ये ही असेच विचार दिसतात! दिले ते स्वीकारायचं हेच ब्रीद असते. बऱ्याच व्यावसायिक मंडळींना जास्त येणाऱ्या पैशाबरोबरच बरीच व्यसने असतात, असेही आपण पाहतो पण त्यांच्या बायकाही हे स्वीकारणं करतच असतात ना?

अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायची जिद्द कमी पडते की, सोशिकता आणि संयम याच्या नावाखाली आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारतो हेच कळत नाही. कुटुंबातील स्वीकार हा तर असतोच पण घराबाहेर आणि समाजातही आपण कितीतरी गोष्टींचा स्वीकार करत असतो, चालवून घेतो आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या जातात!
वेळेच्या बाबतीतही आपण असा स्वीकार करतो. “इंडियन टाईम” या नावाखाली बरेच लोक कामावर येण्यास थोडा उशीर करतात, कामाची हयगय करतात. अशावेळी तेथील बॉस सुद्धा काही वेळा बोलत नाही! तक्रार करत नाही! काही वेळा ट्रॅफिक जॅम, पाऊस ,तात्कालीक येणाऱ्या अडचणी यामुळे सुद्धा उशीर होऊ शकतो तर काही वेळा व्यक्तीची वैयक्तिक अडचण असल्यामुळेही उशीर होतो. तेवढ्यासाठी त्याला दोषी धरणे किंवा जरब दाखवणे आपल्याला जमत नाही. समोरचा जर खरा तर चांगला असेल तर तो चूक स्वीकारून पुन्हा तशा गोष्टी होऊ देणार नाही, पण जर संधी साधू असेल तर त्याच्या बरोब्बर लक्षात येते की आपण उशिरा आलं तरी चालतंय! त्यामुळे कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा किंवा न करावा याचे तारतम्य आपल्याला बाळगावे लागते.

असंच काहीसे आपल्या अपत्यांच्या बाबतीतही होऊ शकते. दोन /तीन मुले असली तर ती एका सारखी एक असतील असे नाही!पण प्रत्येकाच्या गुणावगुणांसह स्वीकार करावा लागतो! एखादे मुल शांत तर एखादं हुशार आणि एखादं धडपडे आणि दंगेखोर! यामध्ये शांत, हुशार मुलांमध्ये विशेष फरक दिसत नाही पण दंगेखोर मूल मात्र गैरफायदा घेऊ शकते. त्याला मार्क्स कमी पडले किंवा तो गैर‌ वागला तर आई- वडील त्याला बोलतील पण मनात समजून घेतील की,’ याचा स्वभावच असा आहे.. अभ्यास करायला नको, दंगा हवा.. पण बाकी व्यवहारात हुशार आहे ना!’ म्हणून त्याच्या या वृत्तीचा स्वीकार केला जातो आणि त्यातूनही तो चांगला कसा वागेल, राहील याकडे पालक लक्ष देतात.

किंबहुना त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे असं मला वाटतं!

एकदा ‘स्वीकार’ हे जगण्याचे तत्व म्हणून स्वीकारले की, आपल्या लक्षात येते निसर्ग, प्राणी सगळेच आपल्या अनुकूल- प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करत असतात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे तीनही ऋतू एकमेकांच्या हातात हात गुंतवून येत असतात आणि नैसर्गिक परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे एक एक ऋतू आपले अस्तित्वही दाखवून देत असतो. म्हणूनच सृष्टीचे बदलते दिवस स्वीकारून आपण आनंद अनुभवत असतो. जोपर्यंत ही स्वीकारायची क्षमता असते तोपर्यंत मनुष्य उपभोग घेतो. अनुभवांना सामोरे जाऊन त्याचा उपयोग करून घेत असतो.

पण जेव्हा ही स्वीकारायची क्षमताच कमी होते तेव्हा नकळत उतरती कळा लागते! नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. शरीराबरोबर मन ही खचू लागते आणि नकळत मृत्यूचा स्वीकार कसा करायचा या विचाराने मन विषण्ण होते. जरी मृत्यू ही अटळ गोष्ट असली तरी त्याचा स्वीकार करणे माणसाला अवघड वाटते. मृत्यू हा अपरिहार्य आहे. ही अपरिहार्यता लक्षात आली की, माणसाचे मन त्या विचाराने खचणार नाही, तर मृत्यूचे स्वागतच करेल! लिहिता लिहिता हे स्वीकाराचे मूलभूत तत्व माझ्या मनात पूर्ण रुजले आणि कागदावर शब्दात व्यक्त होत गेले! नुकताच माननीय मोदींचा व्हिडिओ पाहिला. एका मुलाखतीत ‘जीवन और मृत्यू मे क्या निश्चित है?’ असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा ‘जन्म आपल्या हातात नाही,पण जन्माला आल्यावर मृत्यू निश्चित आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचाच नाही! जन्माबरोबरच मृत्यूला जन्म मिळतो, त्यामुळे त्याची भीती कशाला? जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे त्यासाठी कष्ट करा.काम करा, प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने घालवा..मृत्यू येणारच आहे, त्याचा विचार करू नका!’ केवढा मोठा विचार आहे हा! जीवनापेक्षा मृत्यूचा स्वीकार करायची तयारी हवी आणि जीवन जगण्यासाठी कष्टाची तयारी हवी!’ मोदीजींचे असे
विचार ऐकल्यावर जाणवले की,

हे खरोखरच किती वेगळे व्यक्तीमत्व आहे! अख्ख्या देशाचा भार ज्याच्या वर आहे ती व्यक्ती किती विचारी आणि मनाने संत आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares