मराठी साहित्य – विविधा ☆ “जिथे भीती जन्म घेते…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “जिथे भीती जन्म घेते…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.

परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या व्यक्तीला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, तिच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. अशावेळी त्या व्यक्तीला प्रसंगासमोर ठामपणे उभे राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लागते. तिचा स्वभाव ऐन मोक्याच्या वेळी कचखाऊ होतो. उलट ज्या व्यक्तीला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाते, तिच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.

सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. लोक काय म्हणतील? , नोकरी जाईल, देव रागावेल, समाजातून बहिष्कृत केले जाईल, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.

मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.

थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो. भीती, चिंता, काळजी, या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्‍वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना आपल्या नियंत्रणात कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं झालं नाही आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच. आपल्याला जर सतत कशाची ना कशाची भीती वाटत राहिली तर समोर असणार्‍या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्या परिस्थितीचे खोटंखोटं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत. बर्‍याचदा असे घाबरून रहाण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो. आपल्या मनात सतत ‘असं होईल का? ‘ ‘तसं होईल का? ‘ ‘असं झालं तर काय..? ‘ ‘तसं झालं तर काय? ‘ असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक कल्पना करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो. उदाहरणार्थ भुताची कल्पना.

या भीतीतून बाहेर पडायचं कसं? यावर खालील उपाय करून बघण्यासारखे आहेत.

१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्‍याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.

२) ‘राईचा पर्वत बनवणं’ ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.

३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांचं आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते. मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्‍वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा. सांगा स्वत:ला, ‘I CAN DO IT, YES, I CAN DO IT. ‘

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com, मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यत्न तो देव जाणावा… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ यत्न तो देव जाणावा…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

“आई, मला हे झाड काढून दे ना. ” चित्रकलेच्या वहीत चित्र काढत बसलेला चारू आईला म्हणाला. चारुच्या आईनं त्याला स्पष्ट नकार दिला. चारू थोडा हिरमुसला. आजी, आजोबा, दादा आणि बाबा कुणीच त्याला मदत करायला तयार नव्हतं. आता त्याला हे चित्र पूर्ण करावंच लागणार होतं. ते त्याचं काम होतं. त्यालाच करावं लागेल, शिकावं लागेल, आपलं काम आपणच करावं, असा एक महत्त्वाचा संस्कार एका नकारानं झाला होता. खरंच, आपणच आपल्याला घडवायचं असतं, कुबड्या न वापरता चालायला शिकायचं असतं हे मुलांच्या मनावर ठसवणं हे मोठ्यांनी शिकायला हवं.

शिकता शिकता, तरबेज होता येतं, मोठं होता येतं. आपला प्रयत्न आपला आपण करायचा असतो. ज्याचा त्यानं करायचा असतो. ‘यत्न तोचि देव जाणावा. ’, असं सांगत समर्थांनी सुद्धा प्रयत्नांवर जोर दिला आहे. काही जण मात्र सगळं दैवाच्या हवाली करून मोकळे होतात. दैव मोठं की प्रयत्न हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण दैवाला जीवनात थोडे महत्त्व असलं तरी माणसानं जास्तीत जास्त जोर प्रयत्नांना द्यायला हवा.

“म्हणोनी अभ्यासास काही सर्वथा दुष्कर नाही. ” असं सांगणारे ज्ञानेश्वर प्रयत्नवादाला महत्त्व देतात. आत्मोन्नतीचा असा प्रयत्न आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मदत करतो.

 “असाध्य ते साध्य करता सायास

 कारण अभ्यास”, तुका म्हणे.

अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, दोन टक्के प्रतिभा आणि अठ्ठ्याणव टक्के प्रयत्न आहे. जो स्वतः: साठी, स्वतः प्रयत्न करतो तो स्वतः, स्वतःचा मित्र असतो. जो प्रयत्न करणं सोडून देतो, दुसऱ्याची मदत घेतो, तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. स्वत:ला पांगळा करतो, स्वतःला दुबळं बनवतो.

स्वतः प्रयत्न करणं याचा अर्थ मार्गदर्शनाची गरजच नाही असा नाही बरं. योग्य मार्गदर्शन मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. पण देणाऱ्याचा हात घ्यायचा नसतो हे ध्यानात ठेवावं लागतं. एका दिव्यानं दुसरा दिवा लागतो हे खरंच आहे. पण दुसऱ्या दिव्यात तेल, वात घालून तो सुसज्ज असेल तरच तो लागणार, हो ना? तेल, वात किंवा दिवा यातलं काही एक जरी जवळ नसेल, तर दिवा पेटणार कसा? या गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. तसंच केवळ गुरुकृपा, उपदेश, गुरुसंगती यांनी प्रगती होत नाही. ज्ञान मिळत नाही. ते प्रयत्न पूर्वक प्राप्त करून घ्यावं लागतं. कोणीच कोणाला सर्व ज्ञान देऊ शकत नाही. स्वतःच कष्ट करून ते मिळवावे लागतं. आयतं काही मिळत नाही. म्हणून आत्मविश्वास पूर्वक, निष्ठेनं प्रयत्न करत राहणं हाच एक योग्य मार्ग आहे. आपण तो विसरता कामा नये. मार्गदर्शन घ्यावं पण मार्गक्रमण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे हे लक्षात ठेवावं. सावधानता, सातत्य, चिकाटी या गोष्टी ध्येय प्राप्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. यात कुठंही उणीव निर्माण झाली तर अंध:पतन होणारच. म्हणतात ना, “सावधानता हटी तो दुर्घटना घटी. ” विवेक, सातत्य, उत्साह हे गुण आपल्याला आपला मित्र बनवतात. आळस, अळंटळं, अशा गोष्टी आपल्याला आपलाच शत्रू बनवतात.

जे अभ्यासाचं तेच आरोग्याचं. आरोग्य संपन्न राहणं अथवा आजारी पडणं, आपल्यावरच अवलंबून असतं. योग्य आहार, योग्य विहार असेल तर आरोग्य चांगलं राहतं. आजारी पडल्यावर डॉक्टर औषध देतात. पण ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. तसं न केल्यास आजार बरा होत नाही. म्हणूनच आपणच आपले शत्रू असतो.

“उद्धरेदात्मनात्मानाम् नात्मानमव साधयेत् |

 आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मन: ||”

गीतेतील सहाव्या अध्यायातील हा श्लोक प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. आचरणात आणला पाहिजे. चारुच्या पालकांनी तो आचरणात आणला आहे ना, तसा.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

सामाजिक माध्यमातील फेसबुक नंतर व्हाट्सअप समूह हा सर्वांचाच आवडता प्रकार आहे. व्हाट्सअपचा वापर करणारे, त्यावर व्यक्त होणारे लाखो रसिक असतील परंतु प्रकाशित होणाऱ्या पोस्टवर प्रतिसाद देणारे वाचक फार कमी आहेत.

व्हाट्सअप समूहाचे काही प्रकार अस्तित्वात आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे सर्व सदस्यांना स्वतःचे मत व्यक्त करता येणारा समूह. यात काही उपप्रकार आहेत. अनेक समूहावर सुप्रभात ते शुभरात्री असे अभिवादनाचे प्रकार, विशेष दिनी किंवा विशिष्ट कामगिरीसाठी अभिनंदन, शुभेच्छा तर दुःखदायक घटनांसाठी त्या प्रकारचे संदेश पाठविण्याची मोकळीक या समूहात असते. तसेच काही समूहांवर लेख, प्रतिसाद यांची मांदियाळी असते. काही समूहांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा, संवेदना यांना बंदी असते. अशा समूहांवर फक्त लेख, पुस्तक परिचय अशा गोष्टींना परवानगी असते परंतु अनेकदा नियमावलीत नसणाऱ्या गोष्टींचाही भडिमार होत असतो. समूह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, प्रसंगी दिलेली ताकीद याकडे कानाडोळा करून समूहाच्या नियमावलीत नसणाऱ्या गोष्टी सररास पोस्ट केल्या जातात त्यामुळे समूह प्रमुख काही सदस्यांना समूहाच्या बाहेर करतात. शेवटचा उपाय म्हणून समूह ‘ओन्ली फॉर ॲडमीन’ केल्या जातो. त्यामुळे सर्व सदस्यांच्या साद-प्रतिसादाला वाव नसतो.

अनेक समूह यापेक्षा स्वतःचे वेगळेपण राखून असतात. अशा ठिकाणी कादंबरी, कथा, पुस्तक परिचय, कविता, चारोळ्या असे साहित्य पोस्ट केल्या जाते. काही समूहांवर केवळ पुस्तक परिचय करून देण्याची संधी असते. यामुळे नवीन, जुन्या पुस्तकांचा परिचय होतो. गाजलेल्या पुस्तकांची माहिती मिळते.

अशा विशिष्ट समूहांवर इतर गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. विविध साहित्य प्रकाराचे लेखन वाचायला मिळते, त्या लेखनास प्रतिसाद देण्याची संधी असते. अनेक लेखक -वाचक प्रकाशित साहित्यावर साधकबाधक चर्चा करतात, त्या मंथनातून अक्षर-अमृताचे घट समोर येतात. ज्यातून उपयुक्त माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. विविध समूहांवर सातत्याने लेखन करणारे अनेक लेखक आहेत. त्यांच्या लेखनावर मिळणारा प्रतिसाद कुठे नगण्य असतो तर कुठे भरभरून मिळतो. जे लेखक इतर लेखकांच्या पोस्टवर स्वतःचं मत, अभिप्राय देतात त्यांना त्यांच्या लेखनावर चांगला प्रतिसाद मिळतो. जे लेखक स्वतः भरपूर पोस्ट टाकतात परंतु इतरांच्या लेखनावर व्यक्त होत नाहीत त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो. असा अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या लेखकांचे असे मत होते की, त्यांच्या लेखनावर जाणूनबुजून अल्प प्रतिसाद मिळतो तर इतर लेखकांना त्यांच्या लेखनावर उदंड प्रतिसाद मिळतो. हा प्रकार म्हणजे ‘पेराल तसे उगवेल’ असा असतो. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा ‘एक हात से दीजिए, दूसरे हाथ से लीजिए।’ असा प्रकार असतो. त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद मिळावा असे वाटत असेल तर मीही इतरांना तसाच प्रतिसाद दिला पाहिजे. काही लेखक-वाचक यांना जो लेखन प्रकार आवडतो त्यावर ते निश्चितपणे व्यक्त होतात. जसे ज्यांना विनोद आवडतो, जे स्वतः विनोदी लेखन करतात ते विनोदी लेखनावर व्यक्त होतात. कुणाला कविता, कुणाला चारोळ्या आवडतात ते त्या प्रकारच्या साहित्यावर व्यक्त होतात.

व्यक्त होण्याचे प्रकार म्हणजे अंगठा दाखवणे, विविध प्रकारच्या इमोजी पाठवणे ह्या गोष्टी खूप जण वापरतात. आजकाल रेडिमेड संदेश टाकण्याचे छंदही वाढताहेत. परंतु स्वतःच्या शब्दांमध्ये दिलेल्या प्रतिसादामध्ये एकप्रकारची आपुलकी असते, जवळीक निर्माण होते. त्यामुळे शाब्दिक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. अनेक सदस्य असतात, जे स्वतः काही पोस्ट टाकत नाहीत इतरांच्या पोस्टवर कधीच व्यक्त होत नाहीत. काही सदस्य आले, वाचले, पुढे ढकलले अर्थात इतरांच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचे काम इमानेइतबारे करतात.

बहुतांश व्हाट्सअप समूहांवर साधकबाधक चर्चा होतात, विनोदाच्या फुलझडी उडतात, समोरासमोर कधीही न भेटता ही मैत्रीचे बंध निर्माण होतात, काही समूह दरवर्षी समूहातील लेखकांसाठी दिवाळी अंक, ‌ई दिवाळी अंक प्रकाशित करतात. काही समूह दरवर्षी गेट टुगेदरचे आयोजन करतात इत्यादी चांगल्या बाबीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतात. ही बाब महत्वाची आहे…

‘लिहा, वाचा, भरभरून प्रतिसाद द्या. साधकबाधक चर्चा करा. ‘ हा मुख्य मंत्र असायला हवा.

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काल शेजारच्यांनी चांगल्या तीन चार नवीन गाद्या करून रिक्षेने आणल्या. या गाद्यांवर त्यांचा मुलगा आनंदाने एखाद्या राजासारखा राजेशाहीथाटात बसला होता. आणि…

गादी या शब्दावर मी भाळलो आणि लोळलो सुध्दा. कशाकशाच्या संदर्भात हा शब्द वापरतो हा विचार आला… राजेशाही, किंवा घराणेशाही. धार्मिक, आध्यात्मिक, किंवा संत परंपरेची. झोपायची, आणि अगदी जुन्या गोष्टीत असणारी पानाची गादी. पण तरीही गादी म्हंटलकी डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात त्या दोन गाद्या. एक राजघराण्यातली, आणि दुसरी अर्थातच आपली नेहमीची झोपायची. पानाची गादी हा शब्द बहुतेक जुने लेखक आणि सिनेमा यांच्या बरोबरच ईतिहास जमा झाला. वरच्या पैकी पानाची गादी सोडली तर सगळ्या प्रकारच्या गादींना ईतिहास आहे. पानाच्या गादीचाही ईतिहास असला तर तो इतरांबरोबर आपलाही असेल. राजघराण्यातला गादीला अर्थातच घराण्याचा, आणि आपल्या गादीला (कदाचित) घोरण्याचा.

राजघराण्यातल्या गादीवर आदराने बसवलं जात. डोक्यावर छत्र असत आणि शेजारी हातातल्या भल्या मोठ्या पंखाने वारा घालायला कोणीतरी. (म्हणजे असंच पाहिलं किंवा दाखवलं आहे.) आणि आपण मात्र अंगावर पांघरूण घेतलं असेल तर ते ओढून, आणि प्रसंगी ओरडून उठवतो. लगेेच उठला नाही तर… वर फिरणारा आणि वारा घालणारा पंखा कधीकधी मुद्दाम बंद केला जातो. आदर आणि बसवणं हे राजघराण्यातल्या गादीबद्दल असतं. तर कोणत्याही प्रकारचा आदर न ठेवता गादीवरुन उठवणं हे आपल्या गादीबद्दल. राजगादीवर बसल्यावर वारा घातला जातो, तर गादीवरुन उठवण्यासाठी वारा बंद केला जातो.

राज गादीवर बसल्यावर जयजयकार किंवा स्तुतीसुमनं ऐकायला मिळत असावीत. आम्हाला किंवा आम्ही गादीवरून उठवतांना आवाज सुरुवातीला कदाचित गोड निघाला नाही तरी काढण्याचा प्रयत्न असतो, पण ठराविक वेळेनंतर तो आवाज गोड वाटणरच नाही याचीच काळजी घेतो. स्तुती आणि सुमनं याचा संबंध नसतो. असतो तो सुस्ती घालवण्याचा खटाटोप.

राजगादीवर बसल्यावर अनेक बाबतीत बरेच चांगले सल्ले दिले जातात. आपल्या गादीच्या बाबतीत ऊठा आता हाच सल्ला असतो. हल्ली मुलांना झोपा आता असा सल्लाही द्यावा लागतो, पण ऊठा आता हाच जवळचा वाटतो.

राजघराण्यातल्या गादीवर व्यक्ती बसली कि तीला, व्यक्ती आणि गादी दोघांना वजन प्राप्त होतं. किंमत असते. आपली गादी किती किलोची आहे यावरुन गादीचच वजन व सोबत किंमत सांगितली जाते. आपल्याला आणि वजनालाही किंमत नसते. राजघराण्यातली गादी ही त्याच व्यक्तीची आणि गादीच असते. आपली मात्र सिंगल, डबल, नुसत्याच कापसाची, किंवा ब्रँडेड असते. तर राजघराण्याच्या गादीला त्यांचाच आणि आपलाच असा ब्रॅड असतो.

काय लागतं या गादीसाठी… म्हंटल तर बरंच काही… नाहीतर काहीही नाही. गादी कोणती, कधी, कशासाठी मिळणार यावर अवलंबून असतं.

राजघराण्याच्या गादीला त्या घराण्यात एकतर जन्म घ्यावा लागतो, किंवा दत्तक तरी जावं लागत. कर्तुत्व (असेल तर…) नंतरसुध्दा सिध्द करता येत. (अपवाद असु शकतात. काही घराणी आहेत. जे आजही कर्तृत्वाच्या शोधात आहेत. पण तरीही गादीवर आहेत असं वाटतं.)

धार्मिक, आध्यात्मिक, संत परंपरेच्या ठिकाणच्या गादीवर बसायला पावित्र्य, संस्कार, बौध्दिक व वैचारिक बैठक व पात्रता लागते. कर्तुत्वासोबत वक्तृत्व असाव लागतं. वाचन, मनन, चिंतन लागत. संस्कृती माहीत असावी लागते व तीचा अभिमान असावा लागतो. रितीरिवाजाची जाण असावी लागते. आणि अंगी नम्रता आणावी लागते. आणि हे सगळं आलं की बोलणं चांगलच वाटतं, कारण अहंकार नसतो.

राजघराण्यात कधीकधी गादीवरचा माणूसच बदलतो. यासाठी दगाफटका पण होतो. आपल्या बाबतीत मात्र तस नसतं. आमच्या गादीला या सगळ्यांची गरज असेलच असं नाही. फक्त ती व्यवस्थित राहण्यासाठी अधूनमधून तीला कडक ऊन मात्र दाखवावं लागतं. आणि याचवेळी आम्ही गादीवरच फटके मारतो. यात कोणताही दगा नसतो. काहीवेळा तर गादीच बदलतो.

राजघराण्यातल्या गादीवर बसल्यावर ती व्यक्ती बसल्या गादीवरुन आपलं राज्य विस्तारण्याचा प्रयत्न करते. आमचा संसार विस्तारला की आम्हाला नवीन गादीचाच विचार करावा लागतो. आणि देह विस्तारला तर असलेल्या गादीवरच तो पसरावा लागतो. म्हणजे राज्य पसरवणं, आणि आपण पसरणं यासाठी गादी लागते हे महत्वाच.

गादीवर बसवण्याचा समारंभ व सोहळा असतो. मुहूर्त पण असतो. यात मंत्रोच्चार असतात. गादीवरुन उठवण्याचा सोहळा रोजच असतो, आणि मंत्रोच्चार नसले तरी उच्चार मात्र वरच्या स्वरात असतात. आणि मुहूर्त पाहणार आहे का अशी विचारणा असते.

राजगादीवर आल्यावर कारभार पहावा लागतो. आणि सगळे कारभार आटोपले की आम्ही गादीवर येतो. अगोदर घरातल्या गाद्या सकाळी गुंडाळून ठेवल्या जात होत्या. आता सिंगल, डबल बेड आल्यामुळे त्या चोवीस तास पसरलेल्याच असतात. आणि आमच्या सोयीच्या वेळेने आम्ही त्यावर पसरतो.

वरच्या सगळ्या गाद्या या द्रृश्य स्वरुपात असतात. पण याशिवाय न दिसणारी एक गादी आहे जी आमच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल असते. या गादीला फार जूनी किंवा फारतर मागच्या पिढीची परंपरा असते. आणि त्याचा ऊल्लेख गादी चालवतोय असाच होतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माणसाचे माणूसपण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “माणसाचे माणूसपण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

मनुष्य हा जिवंत प्राणी असला, तरी केवळ जैविक प्रक्रिया आणि प्रेरणांनी चालणारे यंत्र नाही. भूक लागली की अन्न घेणे, तहान लागली की पाणी पिणे, किंवा लैंगिक प्रेरणेने प्रेमसंबंध निर्माण करणे हे सर्व नैसर्गिक आहे, पण या कृतींमध्ये केवळ शारीरिक क्रिया असेल तर त्यात ‘मानवता’ नसते. आपण या कृती करतो, पण एकवेळ अशी येते की आपल्या मनात “का?” हा प्रश्न उभा राहतो. आपण का जगतो, का खातो, का पितो, का प्रेम करतो, का द्वेष करतो, हे प्रश्नच आपल्या माणूसपणाची सुरूवात असते. यंत्राला “का?” विचारता येत नाही; ते फक्त ‘कार्य’ करते. पण मानव विचार करतो. विचारच त्याला जैविकतेच्या पलीकडे घेऊन जातो. ‘का?’ हा प्रश्न म्हणजे सज्ञानतेचा प्रारंभ. एकदा हा प्रश्न पडला की सर्व अनुभवांवर एक नवा प्रकाश पडतो. भूक लागली म्हणून खाणे आणि पोषणासाठी खाणे यात फरक जाणवतो. प्रेम हे केवळ शारीरिक नसून भावनिक आणि बौद्धिकही आहे, हे कळते. प्राण्यात दोन लिंग का आहेत? हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा जैविक रचनेपलीकडे जाऊन प्रजोत्पादन, समाजरचना, आणि लैंगिकतेच्या नैतिक-मानसिक अर्थाचा शोध सुरू होतो. अशा वेळी आपण यंत्र नसतो, तर चेतन प्राणी बनतो.

 मानवाचा विकास हा या ‘का?’ च्या शोधातच झाला आहे. आदिमानवाने आकाशातील वीज, पाऊस, आग, तारे, मृत्यू, जन्म या सगळ्यांविषयी स्वतःशीच का आणि कसे, असे प्रश्न विचारले आणि त्यातून वैज्ञानिक पद्धत जन्माला आली. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. धर्म, परंपरा, आणि समाजरचना अनेकदा उत्तरं देतात, पण तिथे प्रश्न विचारायला, शंका घ्यायला, चिकित्सा करायला वाव नसतोच. त्या उलट विज्ञान प्रश्न विचारतं, शंका घेतं चिकित्सा करतं. कारण का? विचारण्यातच प्रगती आहे. आपण जेव्हा भौतिकतेच्या पलीकडे विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवतेची खरी किल्ली सापडते. विज्ञान आपल्याला मानवतेकडे नेणारा मार्ग आहे. ते केवळ यंत्रे निर्माण करत नाही, तर आपल्या विचारांना सज्ञान बनवतं. विज्ञानामुळे आपण शरीर, मन आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा अर्थ शोधतो. यंत्र म्हणून शरीराचं महत्त्व नाकारायचं नाही; शरीर म्हणजे आपल्या अनुभवांचं माध्यम आहे. पण शरीराच्या मर्यादेपलीकडे जाणारा विचार म्हणजेच माणूसपण. शरीराला भूक लागते, पण मेंदूला अर्थाची भूक असते. शरीर तहानेने पाणी मागतं, पण मन म्हणजे मेंदू ज्ञानाची तहान बाळगतं. शरीर लैंगिकतेने प्रेम व्यक्त करतं, पण विचारांच्या उंचीवर ते सर्जनशीलतेत आणि करुणेत रुपांतरित होतं.

यंत्राला आदेश दिले की ते चालतं; पण माणूस विचार करून स्वतःचे आदेश घडवतो आणि इतराने दिलेले आदेश पाळायचे की नाही हे तारतम्याने ठरवतो. हीच त्याची ओळख आहे. जर आपण विचार थांबवले, प्रश्न विचारणे थांबवले, तर आपण पुन्हा यंत्र होतो — समाज, धर्म, बाजार किंवा राजकारण यांच्या नियंत्रणाखाली चालणारे यंत्र. पण ‘का?’ विचारणारा माणूस मुक्त असतो. तो कोणत्याही धर्माचा अंधानुयायी राहत नाही, कोणत्याही जात-लिंग-धर्माविषयी द्वेष बाळगत नाही, कारण त्याला समजतं की द्वेषाचं मूळ अज्ञानात आहे. मला परधर्मीयांचा राग का येतो? असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्यातील भीती, संस्कार, आणि इतिहासाकडे पाहू लागतो. त्या प्रक्रियेतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपला मानवतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न म्हणजेच आत्मजागृती. तो प्रश्न आपल्याला स्वार्थातून परमार्थाकडे, अंधश्रद्धेतून विवेकाकडे, आणि यंत्रमानवतेतून खऱ्या मानवतेकडे नेतो. विज्ञान म्हणजे या प्रवासाची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. विज्ञान सांगतं की निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या मागे काही कारण असतं, प्रत्येक क्रियेला परिणाम असतो, आणि सर्व विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच विज्ञान आपल्याला अंधानुकरणापासून वाचवतं, आणि प्रश्न विचारायला शिकवतं.

मानवाचा उत्क्रांती प्रवास हा फक्त शरीराच्याच नव्हे तर विचारांच्याही उत्क्रांतीचा प्रवास आहे. एकेकाळी आपण फक्त अन्नासाठी जगत होतो, पण आज आपण अर्थासाठी जगतो. या प्रवासात ‘का?’ हा प्रश्नच आपल्याला जगण्याची चालना देतो. शरीर मर्यादित आहे, पण विचार अमर्याद आहेत. शरीर मरण पावते, पण विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचारविश्वात रममाण होण्यात खरी मजा आहे. तिथे आनंद भौतिक सुखांपेक्षा गहिरा असतो, कारण तो ज्ञानातून, सत्याच्या शोधातून मिळतो. विज्ञानसाक्षरता म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर जीवनाकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती. ‘का?’ विचारणं म्हणजेच विज्ञानसाक्षरतेचा पाया आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला नव्या उत्तराकडे, नव्या शोधाकडे घेऊन जातो. आणि या नव्या शोधातून पुन्हा नवे प्रश्न निर्माण होतात आणि पुन्हा नव्या शोधाचा शोध आपण घेऊ लागतो. अशाप्रकारे सततच्या शोधक वृत्तीमुळे आपण यंत्रापेक्षा श्रेष्ठ ठरतो. कारण आपण फक्त जगत नाही, तर जगण्याचा अर्थ शोधतो असतो. माणूस म्हणून आपली खरी ओळख विचार करणारा प्राणी अशीच आहे. आपण खाणं, पिणं, प्रजनन करणं या क्रिया केवळ शरीर सुखासाठी करतो; पण विचार करणे, जाण येणे, प्रश्न विचारणे, हे मानव प्रजातीच्या उन्नतीसाठी करतो. शरीर जगण्यासाठी आहे, पण विचार हे जीवनाचं कारण आहेत. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न पडणं म्हणजे प्राण्यापासून मानवाकडे मारलेली उंच उडी आहे. विज्ञान हा त्या उडीचा धागा आहे; जो आपल्याला ज्ञान, करुणा, आणि मानवतेकडे नेतो. शरीर, यंत्र, जग ही सर्व साधनं आहेत; पण विचार हेच अंतिम साध्य आहे. त्या विचारविश्वात रममाण झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने ‘माणूस’ होतो.

थोडक्यात, माणसाचं शरीर जैविक यंत्र आहे. भूक लागली की खातो, तहान लागली की पाणी पितो, लैंगिक प्रेरणा आली प्रेम करतो. सगळं आयुष्य असेच गेलं तरी आपल्याला काही चुकीचे वाटत नाही. पण जर तुम्हाला ‘का?’ हा प्रश्न पडत असेल तर हे सर्व काही काळाने मिळमिळीत वाटायला लागते. आपण का खातो, का पितो, आपल्याला लैंगिक भूक का लागते? हे प्रश्न पडले तर आपण प्राणी राहात नाही; आपण माणूस होतो. तसेच परधर्मीय, पारलिंगी माणसांविषयी आपल्याला राग का? येतो हे कळल्यावर आपण माणूस होतो. कारण ‘का?’ हा प्रश्न पडल्यावर आपण प्राण्यापलीकडे जातो. माणसाला माणूसपण देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्याला मानवतेची किल्ली उघडून देणारा मंत्र आहे. प्राणी वाईट नाहीत, शारीरिक भूक भागवणे वाईट नाही; पण विज्ञानामुळे सज्ञान झाल्यावर, विज्ञानसाक्षर झाल्यावर प्राणी अवस्थेपलीकडे, शारीरिक भुकांच्या पलीकडे जात विचारविश्वात रममाण होण्यातच खरी मजा आहे… खरे माणूसपण आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समर्पण

पांडुरंगाची निर्व्याज भक्ती करता करता तुकाराम महाराजांच्या तनामनात विठु माऊली विषयी समर्पित भावना निर्माण झाली आहे. त्यासंबंधी काही अभंगांचे आपण येथे विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांना सर्व जग विष्णुमय वाटते आणि साधकांनाही ते हेच सांगतात.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म/

भेदाभेद भ्रम अमंगळ//

 आईकाजी तुम्ही भक्त भागवत/

 कराल ते हित सत्य करा//

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर/

वर्म सर्वेश्वर पूजनाचे//

तुका म्हणे एका देहाचे अवयव/

सुखदुःख जीव भोग पावे//

ते असे मानतात की, सर्व जग, त्यातील सजीव प्राणी आणि निर्जीव जड वस्तू हे सगळेच विष्णुमय आहे असे जाणावे. एखाद्या दगडाला शेंदूर फासल्याने त्याला देवत्व येते ना? हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, वाद

-विवाद म्हणजे भ्रम आहे. भागवत भक्त म्हणजेच भगवंताचे निस्सीम भक्त! तुम्ही हे ऐका आणि स्वहित करून घ्या असे संत तुकाराम कळकळीने सांगत आहेत. कारण ते स्वतः या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये, त्यातच सर्वेश्वराचे पूजन आहे. पुढे महाराज सांगत आहेत की, सर्व जीव हे एकाच देहाचे अवयव आहेत, त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगावी लागतात. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर पर्यायाने एका भगवंताचाच त्रास समजावा. भागवतात केलेला विश्वात्मकाचा उपदेश याहून वेगळा नाही. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती स्वतःला वाहून घेण्याची ही कृती आहे.

या अभंगात महाराज स्वतःची मनोवस्था अधिक स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात,

नींदी कोणी मारी/ वंदी कोणी पूजा करी//

मज हेही नाही तेही नाही/

वेगळा दोहीपासून//

देह भोग भोगे घडे/ जे जे जोडे ते ते बरे//

अवघे पावे नारायणी/ जनार्दनी तुकयाचे//

तुकाराम महाराजांची कोणी निंदानालस्ती करोत, किंवा कोणी त्यांना मारोत, (शब्दांचा मार)

कोणी त्यांना वंदोत नाही तर त्यांची पूजा करोत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही. त्यांना त्याचे सुखही नाही किंवा दुःखही नाही. सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग दैववशात केवळ देहाला भोगावे लागतात. संत तुकारामांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे जे काही बरे वाईट भोग आहेत ते एका जनार्दनाकडे, नारायणाकडे जातात. नारायणापाशी तुकाराम महाराजांच्या समर्पणाची ही अवस्था आहे.

सकळ चिंतामणी शरीर/

जरी जाय अहंकार समूळ आशा//

निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी/

निर्मळ स्फटिक जसा//

मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/

येती तया पासी अवघे जन//

तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/

मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

हरीच्या गुणे गर्जताती सदा/

आनंद तया मानसी//

तन मन धन दिले पुरुषोत्तमा/

आशा नाही कवणाची//

तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा/

काय महिमा वर्णू त्याची//

या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत. ज्याचा सर्व अहंकार विनाश पावला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी ज्याच्यामध्ये जराही उरली नाही, तो स्फटिका समान निर्मळ आहे. त्याचे सर्व शरीर जणू चिंतामणी आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशीला जाण्याची त्याला आवश्यकता नाही. उलट सर्व तीर्थ अशा पुरुषा पाशी येतात. कारण सर्व तीर्थाना पावन करणारा तो स्वतःच एक तीर्थस्थान झाला आहे. त्याच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला जपमाळ ओढायची काही आवश्यकता नाही. तो स्वतः सर्व भूषण मंडित आहे. जो सतत हरीचे गुणगान करीत नामघोष करतो तो निरंतर आनंदातच असतो. ज्याने आपले तन, मन, धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे, तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज हे स्वतः अशाच पुरुषांपैकी एक आहेत, म्हणून तर आपण त्यांना संत तुकाराम असे ओळखतो.

तुकाराम महाराजांना सर्वत्र एक पांडुरंग दिसत आहे. ते म्हणतात—-

दाता नारायण/ स्वयेभोगीता आपण//

आता काय उरले वाचे/ पुढे शब्द बोलायचे//

देखती जे डोळे/ रूप आपुलते खेळे//

तुका म्हणे नाद/ झाला अवघा गोविंद//

सर्व प्राण्यांना सर्वकाही देणारा दाता दुसरा तिसरा कोणी नसून नारायणाच आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच आहे. याचाच अर्थ असा की तुकाराम स्वतः नारायणमय झाले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग ते म्हणजे नारायण घेत आहे. अशा परिस्थितीत मी मिळवले, मी भोगले असे म्हणायला जागाच उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्यांना नारायणाचेच रूप दिसते. (या ठिकाणी भक्त प्रल्हादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.)

नर आणि नारायण यामध्ये भेद असा राहिलेलाच नाही. जेवढा शुद्ध नाद आहे, तेवढा गोविंद झाला आहे.

म्हणून खेळ मांडीयेला ऐसा/

नाही कोणी दिशा वर्जीयली//

माझिया गोते हे वसले सकळ/

न देखी जे मूळ विटाळाचे//

करुनी ओळखी दिली एकसरे/

न देखो दुसरे विषमासी//

तुका म्हणे नाही काळापाशी गोवा/

स्थितीमति देवावाचुनिया//

वरील अभंगात तुकाराम पुन्हा एकदा स्वतःच्या स्थितीविषयी बोलतात. ते म्हणतात, ” मी असा खेळ आरंभला आहे की त्यामध्ये कोणतीही दिशा वगळली नाही. सर्व दिशा शुभ आहेत. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे. त्याने सर्व जग व्यापले आहे, त्यामुळे विठ्ठलाचे मूळ जो भेदभाव तो माझ्या ठिकाणी उरलाच नाही. सर्वत्र पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्याने स्वतःच्या स्वरूपाची मला ओळख करून दिल्यामुळे मी त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहू शकत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही की गुंतलेले नाही. मी कालातीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. “

तुकाराम महाराजांचा देहाभिमान संपूर्ण तया गळून पडला आहे, परब्रम्हाशी ते एकरूप झाले आहेत.

या संदर्भात आणखी काही अभंगांचा परामर्श आपण पुढील लेखात नक्की घेऊ.

क्रमशः… ३१ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आजोबा’ (सुरकुत्यांमधील शहाणपण)

​’नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आणि आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ अनुभवली. या महावस्त्राला अधिक बळकट, समृद्ध आणि आदरयुक्त बनवणारा, कुटुंबाचा भक्कम पाया असणारा आणि अनुभवाचा समृद्ध सुवर्णकळस चढवणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘आजोबा’! आजोबा हे नातं म्हणजे वात्सल्य आणि शिस्तीचा एक अद्भूत सुवर्णमध्य आहे. ते कुटुंबासाठी केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती नसतात, तर ‘वात्सल्याची सावली आणि संस्कृतीचा वारसा’ असतात, ‘अनुभवाचे संचित आणि सुरकुत्यांमधील जिवंत शहाणपण’ असतात.

​मी आजी-आजोबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना समृद्धीचे ‘महावृक्ष’ म्हणतो. जंगलातील वृक्ष आपण सगळ्यांनी पाहिले असतील. एक वृक्ष मोठा होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कितीतरी उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात; वादळ, वारा, पाऊस स्वतःच्या अंगावर झेललेला असतो. झाडाचे वय कसे काढतात, हे आपण विज्ञानातून शिकलो आहोत. झाडाच्या खोडाचा जेव्हा आडवा छेद घेतला जातो, तेव्हा त्यावर दिसणारी वर्तुळाकार वलये जेवढी जास्त, तेवढे त्या झाडाचे वय अधिक आणि ते झाड तेवढेच जुने व समृद्ध मानले जाते. अशाच सुरकुत्या जेव्हा आजोबांच्या अंगावर आपल्याला दिसतात, तेव्हा त्या केवळ वयाचे लक्षण नसून त्यांच्या समृद्ध आयुष्याचं आणि अथांग अनुभवाचं दर्शन घडवणाऱ्या असतात.

​त्यांचं हे मोठेपण व्यक्त करणारे ‘पितामह’ आणि ‘मातामह’ हे अतिशय सार्थ व वजनदार शब्द आपल्या संस्कृतीत आहेत. वडिलांपेक्षाही ज्यांचं स्थान वरचं आहे, अशी आदरणीय व्यक्ती म्हणजे पितामह! आईचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजेच आपले आजोबा. महाभारत काळात भीष्मांना ‘पितामह’ म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांचा केवढा आदर त्या काळातली सगळी मंडळी करायची, हे आपण जाणतोच. आजी-आजोबांचे छत्र आणि त्यांची निर्मळ, अपार माया ज्यांना लहानपणी लाभली, ती मुलं खरोखरच खूप भाग्यवान! आई-वडिलांपेक्षा देखील संस्कारांचं खरंखुरं बाळकडू आजी-आजोबांकडून नातवंडांना मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्त्व नकळत समृद्ध होत जातं.

​आजोबांच्या चेहऱ्याकडे कधी आपण निरखून पाहिलं आहे का? त्यांच्या चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या प्रत्येक सुरकुतीत आयुष्यातील संघर्षाचा, कष्टाचा आणि यशाचा एक मोठा इतिहास दडलेला असतो. त्यांनी अनुभवलेलं जग, पाहिलेले ऋतूंचे बदल आणि आयुष्यात आलेले चढ-उतार हे संपूर्ण कुटुंबासाठी एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखे असतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब किंवा प्रपंच एखाद्या वैचारिक वादळात सापडतो, काय निर्णय घ्यावा हे सुचत नाही, अशा वेळी आजोबांचा एक शांत, धीरगंभीर शब्दही सगळ्या वादळाला शांत करतो आणि घरातील प्रत्येकाला जगण्याचं बळ देऊन जातो.

​शिस्त आणि हट्टाचा सुवर्णमध्य म्हणजे आजोबा! काळाचा एक काळ असा असतो जेव्हा हेच आजोबा आपल्या मुलांसाठी (म्हणजे आजच्या आई-वडिलांसाठी) अत्यंत कडक, करारी आणि शिस्तप्रिय ‘बाबा’ असतात. त्यावेळी त्यांचा घरात एक वेगळाच दरारा असतो. पण जेव्हा घरात नातवंडं जन्माला येतात, तेव्हा त्या जुन्या करारी शिस्तीचं रूपांतर एका अथांग, मुलायम मायेत कसं होतं, हे पाहणं निसर्गाचा एक चमत्कारच आहे. म्हणतात ना, ‘मुद्द्लापेक्षा व्याज जास्त प्रिय असतं’, आजोबांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरतं.

​मला आजोबांचं प्रेम दुर्दैवाने स्वतःच्या बालपणात लाभू शकले नाही; कारण माझे वडिलांचे वडील आणि आईचे वडील हे दोघेही माझा जन्म होण्याआधी, फार पूर्वीच देवानघरी गेले होते. परंतु आजोबा म्हणून माझ्या वडिलांचे जे निस्सीम प्रेम असायचे, ते माझ्या मुलांना मात्र भरभरून लाभले, याचा मला आनंद आहे. माझे वडील जेव्हा वारले, तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांनी नातवंडांवर मायेची पाखर घालत त्यांना खूप प्रेम लावले. माझा मुलगा तर त्यांच्यावर अतिशय जीव लावायचा आणि त्यांच्याबद्दल त्याला प्रचंड आदर होता; तो त्यांना आदराने नेहमी ‘सरकार’ म्हणून हाक मारायचा!

​माझी मुलगी लहान असताना जेव्हा घरात ‘गुलाबाई’ बसवायची, तेव्हा तिचे लाड पुरवण्यासाठी आजोबा बाजारातून कौतुकाने वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घेऊन यायचे. आजोबा म्हणून लाभलेले त्यांचे ते भरभरून प्रेम आणि मायेची ऊब माझी मुलं आजही विसरू शकत नाहीत. आजोबा असण्याचं आणि नातवंडं खेळवण्याचं हे कौतुक प्रत्येक घराचे भाग्य वाढवत असतं.

​आई-वडिलांचा ओरडा खाणाऱ्या, अभ्यास न केल्यामुळे किंवा हट्ट केल्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या नातवंडांना हक्काची पाठराखण आणि संरक्षणाची भक्कम ढाल मिळते ती फक्त आजोबांच्यामुळेच! जेव्हा आई-बाबा मुलांवर रागावतात, तेव्हा आजोबा ढाल बनून मध्ये उभे राहतात. ते केवळ नातवंडांचे लाड करत नाहीत, तर वेळप्रसंगी मुलांची (आई-बाबांची) सुद्धा प्रेमळ शब्दांत कानउघाडणी करतात. “आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त मारलं असतं तर तुम्ही आज इथे नसता, मुलांना प्रेमाने शिकवा,” हा त्यांचा हक्काचा सल्ला घरातील वातावरण पुन्हा आनंदी करून जातो. घराचे, नात्यांचे आणि अगदी वास्तूचे जे सूक्ष्म कोने-कोपरे आई-बाबांना समजत नाहीत, ते आजोबांच्या एका शब्दाने उलगडतात.

​आजोबा हे आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा जिवंत दुवा आहेत. रामायण-महाभारताच्या गोष्टी, जुने लोकव्यवहार, नात्यांमधील ओलावा, कौतुकाचे कौटुंबिक रीतीरिवाज आणि संस्कारांची खरीखुरी शिदोरी नातवंडांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजोबा अगदी सहजतेने, हसत-खेळत करतात. त्यांच्या ओसरीवर किंवा बैठकीत बसून घालवलेला वेळ हा केवळ खेळ नसतो, तर मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर घडणारं एक समृद्ध सुसंस्कारी विश्व असतं. आई-बाबा आपल्याला या जगात कसं जगायचं, कसं कमवायचं हे भौतिक ज्ञान देतात; पण आजोबा आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी आणि परंपरेशी घट्ट जोडून ठेवतात.

​निर्मळ मैत्रीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आजोबा! वयाचे अथांग अंतर विसरून, आपल्या पांढऱ्या केसांची पर्वा न करता, नातवंडांच्या बालविश्वात लहान मूल होऊन रमेलेले आजोबा हे जगातले सर्वात उत्तम मित्र असतात. कधी ते नातवंडांबरोबर बुद्धिबळ खेळून त्यांना बुद्धिबळाचे डावपेच आणि धडे देतात, तर कधी त्यांना आनंद देण्यासाठी स्वतः घोडा बनून पाठीवर बसवतात. संध्याकाळच्या पाऊलवाटेवर त्या चिमुकल्या हातांचे बोट धरून चालताना जगाची ओळख करून देणारे आजोबा हे प्रत्येक घरातलं एक हळवं आणि अत्यंत आदरयुक्त पान असतं.

​घरातल्या या वटवृक्षाचे कौतुक फक्त घरापुरते मर्यादित नसते. समाजात, ओळखीच्या माणसांमध्ये किंवा गावात जेव्हा चारचौघे एकत्र येतात, तेव्हा आजोबा आपल्या नातवंडांच्या गुणांचे, त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचे कौतुक एवढ्या मोठ्या अभिमानाने सांगतात की, ऐकणाऱ्यालाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटावा. नातवंडांचे गुण सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारा तो सार्थ अभिमान कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असतो.

​कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजोबांच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत. आजी-आजोबांमुळे भक्कम असणाऱ्या घराच्या भिंती आज केवळ एक पोकळ डोलारा म्हणून उभ्या राहत आहेत की काय, असे मला वाटते.

​आज ‘आजी-आजोबा’ म्हटले की अनेकांना थेट ‘वृद्धाश्रम’ डोळ्यांसमोर येतो. याला समाजाची प्रगती म्हणायचे की अधोगती? हा खरोखरच विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. नात्यांचा हा भक्कम पदर आज काळाच्या ओघात विरत चाललेला आहे. मुले आजोबांच्या वात्सल्याच्या छायेला मुकत आहेत, ही आजच्या काळातील सर्वात मोठी हानी आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटात किंवा नाटकात आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर किती अथांग प्रेम असते, ते पाहून डोळे हमखास ओलावतात; परंतु आजकालच्या जगात घरात नातवंडांवर जीव लावणारी अशी ज्येष्ठ माणसे देखील काहींना नकोशी झालेली दिसतात.

​घराला घरपण आणि नात्यांच्या या महावस्त्राला भक्कम आधार देणारा हा ‘आजोबा’ नावाचा पदर संपूर्ण घराला आपल्या मायेच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवतो. हा पदर जेवढ्या सन्मानाने आणि आदराने घरात जपला जाईल, तेवढा आपला समाज आणि आपली पुढची पिढी अधिक सुदृढ व सुसंस्कारी होईल.

 © श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

आषाढ पौणिमा, म्हणजे – गुरुपौर्णिमा

त्या निमित्त ही अक्षर गुरुवंदना !

“श्री गुरवे नमः”

आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

प्रास्ताविक

आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या गुरुंचे/गुरुतत्वाचे पुण्यस्मरण करण्याचा, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा दिवस.

गुरु कोण?

आपल्याला जो  शिकवतो, ज्ञान देतो तो आपला गुरु. गुरु देहधारी असू शकतो किंवा विदेही असू शकतो. येवढेच काय पण गुरु मानवेतर प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, वस्तू, धातू काहीही असू शकतो. साक्षात श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले होते हे सर्वश्रुत आहे. न्यूटनला झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाने ज्ञान दिले. ते फळ त्याचा गुरु म्हणता येईल. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

माणूस जन्मापासून मरेपर्यंतच्या आपल्या जीवनयात्रेत पदोपदी, क्षणोक्षणी, कळत नकळत काही तरी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. तो ते ज्ञान कुणाकडूनही घेत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जो आपल्याला काही शिकवतो तो गुरुच. गुरु हे एक तत्व आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सद्गुरु कोण?

समर्थ म्हणतात, जाणावे आपणासी आपण, या म्हणती ज्ञान (Absolute knowledge) या शुद्ध ज्ञानाव्यतिरिक्त मिळालेली सगळी केवळ माहिती (Information). असे शुद्ध, विमलज्ञान (Absolute knowledge) देणारा तो ‘सद्गुरु’. सद्वस्तु दाखवि तो सद्गुरु अशी सद्गुरु या शब्दाची सोपी व्याख्या समर्थांनीच केली आहे.

अध्यात्मक्षेत्रात  सद्गुरुला सर्वोच्च मानले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मा, सद्गुरु म्हणजे विष्णू, सद्गुरु म्हणजेच महेश्वर. सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱा सद्गुरु. जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे असा सद्गुरु. सद्गुरु हाच वेदांत, सद्गुरु हाच सिद्धांत आणि सद्गुरु हाच धादांत!

भारतीय अध्यात्म परंपरेत सद्गुरु हाच एकमेव मोक्षदाता आहे असे मानतात. सद्गुरुची महती सांगताना कबीरजी महाराज आपल्या एका दोह्यात म्हणतात,

गुरु गोविंत दोऊ खडे, काके लागू पाय

बलिहारी गुरु आपने, गोविंद दिये बताय।

साक्षात ईश्वर आणि सद्गुरु दोघेही समोर उभे ठाकले तर प्रथम सद्गुरुचे पाय धरावे नंतर गोविंदाचे. कारण सद्गुरुमुळे तर गोविंद लाभले आहेत! येवढे सद्गुरूचे महत्व आहे.

माणसाला सायुज्यमुक्तिदाता  सद्गुरु केवळ त्याच्या  पूर्वपुण्याईमुळेच मिळू शकतो. पण सध्याच्या काळात अशा योग्यतेचा सद्गुरु लाभणे कठीणच आहे.

परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती सद्गुरुविनाही होऊ शकते असे मानणारे थोर तत्वचिंतक जे. कृष्णमूर्तींसारखे काही मान्यवर आहेत त्यांचाही इथे उल्लेख करायला हवा.

सद्यस्थिति – गुरुहाट

सध्या अध्यात्म हा व्यवसाय, व्यापार होऊन बसलाय! समाजकारण,  राजकारण, नेतेगिरी, भाईगिरी, तशी अध्यात्मगिरी झालीय. देशाविदेशात अनेक गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, गुरुमाँ, बुवा, बाबा, बापू, श्री, श्री श्री, श्री श्री श्री आपापले मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, तख्ते, डेरे, दमदमे, दरबार,आखाडे उघडून बसले आहेत. तिथून जगभर पसरलेल्या भक्तांना सामुदायिक दीक्षा, मंत्रदीक्षा, अनुग्रह, शक्तिपात दीक्षा, आँनलाईन दीक्षा आणि अनुग्रह घाऊक प्रमाणात दिले जातात. काहींना एकांतदीक्षा, अंगसंगदीक्षाही देण्याची व्यवस्था असते. हे मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, दरबार इ. सर्व सुखसोयींनी युक्त असतात. मठाधिपती गुरु राजाश्वैर्य भोगत असतात. गुरुदेवांना स्वतःची झेड प्लस सुरक्षा असते. गुरुदेवांभोवती भक्त-भक्तिणींचे गराडे पडलेले दिसतात. गुरुदेवांच्या चरणी भक्त आपल्या निष्ठा, श्रद्धा, भक्तीबरोबर धनकोष व खिसेही रिकामे करतात. गुरु शेकडो हजारो कोटींचे स्वामी होतात पण भक्त बिचारे मात्र नंतर काही दिवसात  पस्तावतातही! याला अपवाद असू शकतील पण तरीही सामान्यांनी या पासून दूर रहावे हेच हिताचे. असो.

ग्रंथ हेच गुरु.

म्हणून मला वाटते की सध्याच्या विज्ञान युगात या गुरु, बुवा, बापूंच्या नादी न लागता माणसाने ग्रंथ हेच गुरु आणि त्यांचे वाचन हीच उपासना मानावी.

वाचनाला पर्याय नाही. विविध समाजमाध्यमे, आंतरजाल, गुगल, विकिपिडिया हे ही सध्याचे शक्तिशाली गुरुच आहेत. सूज्ञाने त्यांच्या भजनी लागून आपला उद्धार आपणच करावा.

ग्रंथमहात्म्य

‘ग्रंथदासा’च्या शब्दातच ऐका ग्रंथमहात्म्य

या साऱ्यांची (ग्रंथकारांची) कैक चिंतने। शिक्षणे, शिकवणे, निरीक्षणे। सिद्धांत, मते, अनुमाने। आपापल्या शास्त्राविषयी।।१२।।

त्यांचेच हे उपकार। लिहिले ग्रंथसंभार। ज्ञानाचे भरले भांडार। ग्रंथगर्भी।।१३।।

हे थोरांच्या अनुभवांचे बोल। साधके अभ्यासावे सखोल। जाणून विद्यार्जनाचे मोल। जन्म सार्थकी लावावा।।१४।।

ग्रंथ ज्ञानमार्गीचे वारू। ग्रंथ दवडिती अज्ञान तिमिरू। की भवसागराचे तारू। पैल लाविती।।१५।।

ग्रंथ हेचि गुरु। ग्रंथ परम उपकारू।त्यांना माझा नमस्कारू।अत्यादरे।।१६।।

ग्रंथांविषयी अनादरू। करिता हानि अपरंपारू।हे सत्य मनी धरू। स्वहिताकारणे।।१७।।

नाना विषयांचे नाना ग्रंथ। नाना भाषेतील नाना ग्रंथ। नाना कला शास्त्रांचे अद्भुत ग्रंथ। टीका, कोष, उपदेश।।१८।।

सकळ ग्रंथांविषयी आदरू। धरून मनी अपारू।धुंडाळावे ग्रंथांतरू। नित्य नेमे।।१९।।

नाना ग्रंथ वाचावे। सार शोधून घ्यावे। असार ते त्यजावे। हे विहित क्रिया।।२०।।

(ग्रंथदासविरचित ‘ग्रंथसंग्रह निगराणी प्रकरण’)

वाचन हीच उपासना. वाचनाचे महत्व आणि लाभ ग्रंथदास आपल्या ‘वाचनक्रिया निरूपण प्रकरणा’त लिहितो….

वाचन, चिंतन, मनन। मंथन आणि निधिध्यासन। हेचि साधकाचे लक्षण। यास उपाय नाही।।३६।।

जयास वाटे थोर व्हावे। त्याने अखंड वाचावे।वाचता वाचता जाड व्हावे।  गगनासारिखे।।३७।।

आता ऐका वाचनाचे लाभ। गळती बुद्धीचे मळभ। मार्ग सापडे सुलभ।ज्ञान मंदिराचा।।३८।।

वाचने संशय फिटती। वाचने आशंका आटती।वाचने क्षितिजे रुंदावती। जाणिवांची।।३९।।

वाचने विषय समजती। वाचने रहस्ये उकलती।  वाचने धोके टळती। अधोगतीचे ।।४०।।

वाचने लौकीक वाढे। वाचने लोकसंग्रह घडे। संतसमागम घडे। लाभे व्युत्पन्नता।।४१।।

वाचने कळे सभ्यता। अंगी येई विनम्रता। वाचने लोकप्रीयता। वाढीस लागे।।४२।।

ऐसे सारेच लाभते। भक्ती-ज्ञान-वैराग्य चढते।सार-असार कळो येते। चित्ता ये प्रसन्नता ।।४३।।

वाचने प्रज्ञा वाढे। वाचने अज्ञान झडे। वाचने वाचती वेढे। जन्म मृत्यूचे।।४४।।

वाचाल तरी वाचाल। नाही तर मराल। न करावा अन्य सवाल। या ऊपरी।।४५।।

(“ग्रंथदास”विरचित “वाचनक्रीया निरूपण प्रकरण”)

समारोप

आम्हाला ज्यांनी जन्मभर शिकवले, समजावले, शहाणे केले त्या सर्वांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. ज्या वेळी मातेच्या उदरातून आपण या जगात आलो त्यावेळी होतो केवळ एक जिवंत त्वचा-अस्थि-मांसाचा पिंड! त्यावेळी आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले होते खरे, पण व्यक्तिमत्व प्राप्त व्हायचे होते. त्या व्यक्तिमत्वहीन अस्थित्वचामांसपिंडावर जन्मल्या क्षणापासून पुढे क्षणोक्षणी कोणी ना कोणी काही ना काही संस्कार केले आणि त्या पिंडाला आकार देत राहिले. आज आपण जे आहोत, आपले जे व्यक्तिमत्व घडले आहे, जे जगाला दिसते आहे त्यामागे अनंत अज्ञात हात आहेत. ते हात या साऱ्या  ज्ञात अज्ञात गुरुंचे आहेत.

त्यात सर्वाधिक वाटा आहे असंख्य ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांचा. तेही सगळेच आपले गुरु आहेत हे नाकारता येत नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरुंचे, ग्रंथकर्त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे आभार मानणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी त्या सर्व गुरुजनांना आणि त्या मागील महद्गुरुतत्वाला माझा साष्टांग दंडवत! तस्मै श्री गुरवे नमः!!

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर्स डे : आत्मपरीक्षणाचा दिवस…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “डॉक्टर्स डे : आत्मपरीक्षणाचा दिवस…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

डॉक्टर्स डे : पहिली बाजू

दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा डॉक्टर दिन हा केवळ डॉक्टरांचा गौरव करण्याचा दिवस नसून, आरोग्य व्यवस्थेच्या एका मूलभूत विरोधाभासाकडे लक्ष वेधणारा दिवसही आहे. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या डॉक्टरांच्या स्वतःच्या आरोग्याची अवस्था अनेकदा चिंताजनक असते. इतरांना दीर्घायुष्याचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर स्वतः मात्र अनियमित जीवनशैली, प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि सततच्या कामाच्या ओझ्यामुळे विविध असंसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे डॉक्टर दिन हा केवळ अभिनंदनाचा नसून आत्मपरीक्षणाचाही दिवस ठरला पाहिजे.

वैद्यकीय व्यवसाय हा इतर अनेक व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. येथे प्रत्येक निर्णय एखाद्या व्यक्तीच्या जीवन-मरणाशी संबंधित असतो. त्यामुळे डॉक्टरांवर सतत मानसिक दबाव असतो. आपत्कालीन सेवा, रात्रपाळ्या, दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा, न्यायालयीन प्रकरणांची भीती, वाढती स्पर्धा आणि प्रशासनाचा दबाव या सर्वांचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेक डॉक्टरांना शक्य होत नाही. यातील सर्वात मोठी विसंगती म्हणजे डॉक्टर आपल्या रुग्णांना ज्या आरोग्यदायी सवयींचा आग्रह करतात, त्याच सवयी त्यांना स्वतः पाळता येत नाहीत. वेळेवर जेवण, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणाचे व्यवस्थापन आणि कुटुंबासाठी वेळ या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनातून अनेकदा हरवून जातात. परिणामी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य, बर्नआऊट आणि काही वेळा आत्महत्येसारख्या गंभीर समस्या वाढताना दिसतात. आधुनिक वैद्यकीय संशोधनही सातत्याने सांगते की दीर्घकालीन ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरातील दाह, हार्मोनल असंतुलन आणि जैविक वृद्धत्व वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. निरोगी डॉक्टरच अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतो. म्हणूनच डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याला दुय्यम न मानता व्यावसायिक जबाबदारीचा एक भाग मानले पाहिजे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन, शासन आणि समाज यांनीही डॉक्टरांना योग्य कामाचे तास, पुरेशी विश्रांती, मानसिक आरोग्य सहाय्य आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

कोविड-१९ महामारीने या वास्तवाला अधिक ठळक केले. त्या काळात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. अनेकांनी कुटुंबापासून दूर राहून हजारो जीव वाचवले, तर काहींनी स्वतःचे प्राण गमावले. या अनुभवाने डॉक्टर हा केवळ व्यावसायिक नसून समाजाचा अत्यावश्यक आधारस्तंभ असल्याचे सिद्ध झाले. मात्र अशा समर्पित सेवेनंतरही त्यांच्यावर होणारी हिंसा, अविश्वास आणि अपमान ही आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत घातक बाब आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास कमी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण उपचार प्रक्रियेवर होतो.

डॉक्टर दिनाचा खरा संदेश म्हणजे डॉक्टरांचा सन्मान केवळ शब्दांनी किंवा पुष्पगुच्छांनी न करता त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करून, त्यांच्याविषयी विश्वास आणि संवेदनशीलता निर्माण करून आणि त्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेऊन व्यक्त करणे. कारण स्वतः निरोगी असलेला डॉक्टरच समाजाला अधिक सक्षम, सुरक्षित आणि निरोगी भविष्य देऊ शकतो.

डॉक्टर्स डे : दुसरी बाजू

डॉक्टरकी हा व्यवसाय नसून सेवा आहे, असे आपण नेहमी म्हणतो. “वैद्यो नारायणो हरिः” असे म्हणत भारतीय संस्कृतीने डॉक्टरला देवासमान स्थान दिले. परंतु आज वास्तव वेगळे दिसते आहे. रुग्णालये अनेक ठिकाणी सेवेची मंदिरे न राहता उद्योगालये बनू लागली आहेत. काही डॉक्टरांवर व्यापारी वृत्तीचा प्रभाव वाढताना दिसतो. अर्थात अपवाद सगळीकडेच असतात. हजारो डॉक्टर आजही प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने काम करत आहेत. मात्र डॉक्टरकीच्या व्यवसायात ज्या अनिष्ट प्रवृत्ती वाढत आहेत, त्यांची परखड चिकित्सा करणे आवश्यक आहे. या समस्येची सुरुवात रुग्णालयातून होत नाही; ती घरातून सुरू होते. मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी, ही इच्छा अनेक पालकांची असते. ही इच्छा मुलाची आवड, क्षमता किंवा सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेली नसते; तर ती प्रतिष्ठा, पैसा आणि सामाजिक दर्जा मिळवण्याच्या आकांक्षेतून निर्माण झालेली असते. ‘डॉक्टर झाला म्हणजे आयुष्यभर पैशाची चिंता नाही, तो खोऱ्याने पैसा ओढेल’, ही समजूत अनेक कुटुंबांमध्ये आजही जिवंत आहे. त्यामुळे डॉक्टरकीकडे सेवेची नव्हे तर श्रीमंतीचा शॉर्टकट म्हणून अनेकदा पाहिले जाते.

याच मानसिकतेतून वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होते. काही विद्यार्थी प्रामाणिक मेहनतीने यश मिळवतात, पण काही पालक पैसा वापरून पेपरफुटी, गैरव्यवहार किंवा कॅपिटेशन फीच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शिक्षणाची सुरुवातच पैशाच्या बळावर होते, तेव्हा अशा लोकांकडून नैतिकतेची अपेक्षा करणे कठीण होते. कोट्यवधी रुपये खर्च करून मिळवलेली पदवी अनेकांच्या दृष्टीने सामाजिक जबाबदारी नसून आर्थिक गुंतवणूक बनते. या गुंतवणुकीवर परतावा मिळवण्याची मानसिकता पुढे डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय व्यवसायातही उतरते. मग काही ठिकाणी कमिशनसाठी रुग्णांना विशिष्ट तपासणी केंद्रात पाठवले जाते, अनावश्यक चाचण्या सुचवल्या जातात, आवश्यकता नसताना रुग्णालयात ऍडमिट व्हायला सांगितले जाते, गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या जातात, महागडी औषधे लिहून दिली जातात. अशाप्रकारे रुग्णालयातील प्रत्येक उपचाराकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाते. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही काही डॉक्टर सहभागी झाल्याच्या घटना समाजाने पाहिल्या आहेत. अशा घटना केवळ कायद्याचा भंग नाहीत; त्या वैद्यकीय नैतिकतेच्याही पराभवाचे प्रतीक ठरतात.

प्रश्न फक्त डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्याचा नाही तर प्रश्न असा आहे की त्यांना तसे वागण्यास पोषक व्यवस्था कोणी निर्माण केली? महागडे वैद्यकीय शिक्षण, शिक्षणाचे खासगीकरण, अपुरी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, कमकुवत नियम, भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर नियम वाकवण्याची संस्कृती यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात व्यापारीकरण वाढले. अनेकदा गैरप्रकार उघडकीस येतात, चौकशा होतात, पण प्रभावशाली व्यक्ती, पैसा आणि राजकीय संरक्षण यांच्या आधारे प्रकरणे दडपली जातात. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात अडकतात. या संपूर्ण प्रक्रियेत समाजाची मानसिकताही तितकीच जबाबदार आहे. आपण मुलाला डॉक्टर झाल्यावर ‘किती लोकांचे प्राण वाचवशील?’ हा प्रश्न विचारत नाही; तर ‘किती कमवशील?’ हा प्रश्न विचारतो. विवाहासाठी डॉक्टर मुलगा किंवा मुलगी म्हणजे मोठे स्थळ मानले जाते. कारण त्यामागे आर्थिक गणिते असतात. म्हणजेच समाज स्वतः डॉक्टरकीला सेवेपेक्षा उत्पन्नाचे साधन मानतो आणि नंतर डॉक्टर व्यापारी झाले म्हणून त्यांच्यावर टीकाही करतो. हा विरोधाभास समाजाचा दुटप्पीपणा उघड करतो.

याचवेळी ग्रामीण भागात, सरकारी रुग्णालयांत, आदिवासी क्षेत्रांत आणि आपत्कालीन सेवांमध्ये शेकडो डॉक्टर अत्यंत कमी साधनसामग्रीत आणि मोठ्या ताणाखाली काम करत आहेत, हे विसरून चालणार नाही. कोविड महामारीत अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे काहींच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण वैद्यकीय समुदायाला दोषी ठरवणे अन्यायकारक ठरेल. परंतु गैरप्रकार करणाऱ्यांना अपवाद म्हणून दुर्लक्षित करणेही तितकेच चुकीचे ठरेल. कारण ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. म्हणूनच प्रश्न दोषी कोण? असा नसून व्यवस्था अशी का बनली? असा आहे. याचे उत्तर बहुआयामी आहे. पालकांची अवास्तव महत्त्वाकांक्षा, शिक्षणाचे व्यापारीकरण, शासनाचे अपुरे नियंत्रण, वैद्यकीय शिक्षणातील आर्थिक विषमता, नियामक संस्थांची निष्क्रियता आणि समाजाचा पैशाला दिलेला सर्वोच्च मान, या सर्व घटकांनी मिळून ही परिस्थिती निर्माण केली आहे. डॉक्टर हा या व्यवस्थेचा एक भाग आहे; पण व्यवस्था घडवणारा समाजही त्यात तितकाच या परिस्थितीला कारणीभूत आहे.

म्हणून उपायसुद्धा सर्वांनी मिळूनच शोधावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण परवडणारे आणि गुणवत्ताधारित झाले पाहिजे. कॅपिटेशन फीची संस्कृती संपली पाहिजे. नैतिकतेचे शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू झाले पाहिजे. अनैतिक डॉक्टरांवर कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिक डॉक्टरांना संरक्षण, सन्मान आणि योग्य वातावरण मिळाले पाहिजे. समाजानेही डॉक्टरकीच्या पेशासंबंधीची आपली व्याख्या बदलली पाहिजे. ‘पैसा कमावणारा डॉक्टर नव्हे, तर विश्वास कमावणारा डॉक्टर घडविणे’ हेच खरे डॉक्टरांचे ध्येय असायला हवे. कारण ज्या दिवशी डॉक्टरकीचा व्यवसाय पेशा न राहता पूर्णपणे धंदेवाईक व्यापार बनेल, त्या दिवशी सर्वात मोठे नुकसान डॉक्टरांचे नाही, तर देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचे होईल. आरोग्य हा बाजारातील माल नसून मानवी हक्क आहे आणि हा हक्क टिकवायचा असेल, तर डॉक्टरकीच्या पांढऱ्या कोटामागे लपलेल्या व्यापारी मानसिकतेवर समाजाने आणि शासनाने तितक्याच धैर्याने बोट ठेवले पाहिजे… पायबंद घातला पाहिजे आणि समाजाचेही दुटप्पीपणाने वागणे थांबवले पाहिजे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आषाढीच्या स्वादातली भक्ती…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? विविधा ?

☆ “आषाढीच्या स्वादातली भक्ती…“ ☆ तृप्ती देव ☆

आषाढ मास सुरू झाला, की वातावरणात एक वेगळाच ओलसरपणा आणि आल्हाददायक गारवा पसरायचा. आभाळ भरून यायचं आणि त्या ढगांच्या गडगडाटात पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींच्या टाळ-मृदंगाचा नाद ऐकू येतोय असा भास व्हायचा. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय, त्यामुळे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जाणं काही शक्य नसायचं. पण पंढरपूरचं ते अथांग पावित्र्य, तो विठ्ठलमय आनंद दरवर्षी आमच्या घराच्या अगदी लहानशा स्वयंपाकघरात आणि देवघरात अलगद उतरून यायचा.

आमच्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक उपवास नव्हता, तो तर आनंदाचा एक कौटुंबिक ‘चंगल’ असायचा. त्या एका दिवसात आईच्या हाताची चव, आजीच्या शब्दांतली निस्सीम भक्ती आणि संपूर्ण घरभर पसरलेला विठोबाचा अदृश्य पण जाणवणारा वास… हे सगळं असं काही एकवटायचं, की घरचंच पंढरपूर व्हायचं.

“उद्या कोण कोण उपवास करणार रे? “

एकादशीच्या आदल्या संध्याकाळी स्वयंपाकघरातून आईचा हा नेहमीचा प्रश्न यायचा. आणि आम्ही सर्व भावंडं खेळता खेळता, अभ्यासाच्या वह्या मिटता मिटता एका सुरात ओरडायचो— “मी! “, “मी करणार! “, “मी पण! “

कोणीही नाही म्हणायचा प्रश्नच नसायचा. कारण आमच्या बालमनाला माहीत होतं, उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा काहीतरी सोडून देणं नव्हतं; तर उपवास म्हणजे वर्षातून एकदा मिळणारे काहीतरी अत्यंत स्वादिष्ट, खमंग आणि जिभेवर रेंगाळणारे पदार्थ खाण्याची हक्काची पर्वणी!

त्यानंतर स्वयंपाकघरात आई आणि आजीची एक सुरेल, लयबद्ध जुगलबंदी सुरू व्हायची. एकादशीच्या मेजवानीची यादी ठरवली जायची. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ, राजगिरा, लाल माती लागलेले रताळे, बटाटे, सैंधव मीठ… आई एकेक नाव घ्यायची आणि आजी तिच्या अनुभवाच्या पोतडीतून त्यात भर घालायची. यादी लांबत जायची, पण दोघींच्याही चेहऱ्यावर थकव्याचा एकही ओरखडा नसायचा. उलट एक वेगळाच उत्साह दिसायचा.

तेव्हा आजच्यासारखे मिक्सर किंवा फूड प्रोसेसर नव्हते. त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्यांची टरफलं काढणं आणि ते हाताने फिरवायच्या लोखंडी मशीनमध्ये बारीक करणं हे एक मोठं काम असायचं. आई शेगडीवर शेंगदाणे भाजायला लागली, की संपूर्ण घरात त्याचा खमंग वास सुटायचा. आमचं मुख्य काम काय? तर आईची नजर चुकवून त्या गरम-गरम, खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांची मूठभर चोरी करायची आणि तोंडात टाकायची! आईला सगळं समजायचं, ती तिरप्या नजरेने बघून गोड हसायची, पण कधी रागवायची नाही.

कोपऱ्यात ठेवलेल्या पितळेच्या कढईत साजूक तूप वितळत असायचं. आईने तूप कढवून बरणी काठोकाठ भरून ठेवलेली असायची. रात्री झोपण्यापूर्वी आई एका मोठ्या पातेल्यात साबुदाणा भिजत घालायची. कितीही कामं असली, तरी साबुदाणा भिजवायला ती कधीच विसरली नाही. आम्हाला वाटायचं ती आमच्यासाठी हे करतेय, पण खरं तर ती तिच्या त्या सावळ्या “विठोबासाठी” करत असायची.

एकादशीची सकाळ उजाडायची तीच मुळी एका वेगळ्या चैतन्याने. घरात रेडिओवर भीमसेन जोशी किंवा प्रल्हाद शिंदे यांचे अभंग वाजत असायचे. स्वयंपाकघर आणि देवघर यांची विभागणी करणारी एक विटांची भिंत होती, पण मनातील ती सीमारेषा केव्हाच मिटून गेलेली असायची.

एकिकडे देवघरात आजीने अंघोळ करून, सुती साडी नेसून पूजेची तयारी सुरू केलेली असायची. ताजी फुलं, सुवासिक उदबत्ती, कापूर, चंदनाचा गंध आणि बेलपान विठ्ठलाच्या फोटोसमोर वाहिली जायची. आजी डोळे मिटून, अगदी संथ आणि तृप्त स्वरात “पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… ” अशी साद घालायची.

ठीक त्याच वेळी, भिंतीच्या पलीकडे स्वयंपाकघरात आईच्या हातातून लोखंडी कढईत जिरे आणि हिरव्या मिरचीची तडतडणारी खमंग फोडणी पडायची! तो फोडणीचा पहिला तवंग आणि त्याचा तिखट-गोड सुवास जेव्हा घरभर पसरायचा, तेव्हा वाटायचं की भक्तीचा पहिला नैवेद्य विठ्ठलाला पोहोचला आहे.

सकाळचा बेत ठरलेला असायचा— मऊसुत, मोकळी-सळसळीत झालेली दाण्याचे कूट लावलेली साबुदाणा खिचडी, सोबत यायची आंबट-तिखट हिरवी चटणी, आणि तोंडाची चव वाढवणारा शिंगाड्याचा मऊ शिजलेला शिरा. त्या शिऱ्यामध्ये वाहणारं साजूक तूप आणि आईच्या मायेचा सुवास दोन्ही इतके एकजीव झालेले असायचे, की पहला घास तोंडात टाकताच स्वर्गीय सुखाचा अनुभव यायचा.

सकाळची नहारी झाली की दुपारी पुन्हा स्वयंपाकघराची चाकं फिरू लागायची. दुपारचा बेत म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरल्यासारखा असायचा. मऊ शिजलेली भगर, त्यावर ओतण्यासाठी चिंच, गूळ आणि शेंगदाण्याचा रस्सा घालून उकळलेली आंबट-गोड आमटी. सोबतीला लालसर रताळ्याच्या साखरेत घोळवलेल्या मऊ फोडी, घरचं उपवासाचे लिंबाचे लोणचं आणि उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले साबुदाणा-बटाट्याचे पापड.

त्या काळात बाजारातून रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. कोणतीही वस्तू विकतची नसायची; जे काही ताटात यायचं ते आईने स्वतःच्या हाताने, घामाच्या थेंबांनी आणि प्रेमाने तयार केलेलं असायचं. आणि जे घरचं असतं, तेच खऱ्या अर्थाने देवाचं असतं, हा आजीचा नियम होता.

दुपारच्या जेवणाची पंगत बसायची. आम्ही मुलं पोटभर जेवायचो. दिवसभरात घरच्या वातावरणात एक शांत, सात्विक भक्ती न्हाऊन निघालेली दिसायची. जेवणं आटोपल्यावर, सगळी भांडी घासून आई जेव्हा स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर थकून बसायची, तेव्हा तिच्या कपाळावर घामाचे थेंब असायचे. ती आजीकडे किंवा आमच्याकडे पाहून हळूच विचारायची— “जेवण कसं झालं? आपला विठोबा खूश झाला असेल ना गं आज? “

तिचा तो निष्पाप, भाविक चेहरा पाहून मला आतून सांगावसं वाटायचं— “आई, विठ्ठलाचं माहित नाही, पण तुझं हे अथांग कष्ट आणि प्रेम पाहून साक्षात विठोबा देवघरातून बाहेर येऊन तुझ्यासमोर हात जोडून उभा राहिला असेल गं! “

संध्याकाल झाली की दिवेलागणीची वेळ व्हायची. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा लावला जायचा. त्या काळात आमच्याकडे टीव्ही नव्हता, हातात स्क्रीन बिलगलेले मोबाईल नव्हते. पण तरीही घरात अजिबात कंटाळा नसायचा. कारण विठोबा आणि रुक्मिणीचं अस्तित्व घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक नात्यात जाणवत होतं.

आजी संध्याकाळी तिचा उपवास सोडताना किंवा रात्रीच्या वेळी फक्त एकच ठराविक जिन्नस घ्यायची— राजगिऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र लाह्या, एक केळ किंवा सफरचंद आणि वाटीभर दूध. ती नेहमी एक मोलाची गोष्ट सांगायची, “बाळांनो, आपल्या या धावपळीच्या, चपळ आयुष्यात थोडा संयम, थोडी शांतता हवीच. विठ्ठलाला अवाजवी नैवेद्य नको असतो, त्याला मनाचा साधेपणा हवा असतो. “

पण आई रात्री पुन्हा स्वयंपाकघरात हजर व्हायची. रात्रीच्या वेळी आम्हा मुलांसाठी ती उपवासाची खमंग थालीपीठे भाजायला घ्यायची. शेगडीच्या उष्णतेने तिचा चेहरा लाल बुंद व्हायचा. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत, उजव्या हाताने थालीपीठावर तूप सोडणं तिचं थांबायचं नाही.

आम्हा सगळ्यांना पाटावर बसवून ते गरमागरम, खरपूस भाजलेलं थालीपीठ, त्यावर घरात साठवलेल्या दुधाच्या सायीचं काढलेलं पांढरंशुभ्र लोणी आणि बाजूला आंबट-तिखट लोणचं… बास! त्या जेवणात जे समाधान असायचं, ते जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलच्या पक्वान्नात नसेल. ते समाधान फक्त चवीमुळे नव्हतं, तर त्या चवीमागे असलेल्या आईच्या अखंड, निरपेक्ष श्रमांमुळे होतं.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला आमचा उपवास सुटायचा, आम्ही पुन्हा नेहमीच्या जेवणावर यायचो. आमची एकादशी संपायची, पण मला वाटतं आईची एकादशी कधीच संपायची नाही. तिचा विठोबा फक्त भिंतीवरच्या चौकटीतल्या फोटोत नसायचा; तो तिच्या प्रत्येक हालचालीत, मुलांसाठी केलेल्या प्रत्येक कामात, आणि तिच्या सोशिकतेत असायचा. आई म्हणजे माझ्या घराची साक्षात रुक्माई, तिच्या हातात असतो विठोबाचा पवित्र नैवेद्य, तिच्या काळजात असतो अखंड भक्तीचा गाभा, आणि तिच्याच पायाशी असतो माझा पंढरपूरचा राया!

आता खूप वर्षं उलटून गेली. काळाचं चाक वेगाने फिरलं. घरात आधुनिकता आली. हाताने शेंगदाणे कुटायची गरज उरली नाही, कारण मिक्सर आले. रेशनच्या दुकानाची किंवा साहित्याची चिंता नाही, सुपरमार्केट्स आली. उपवासाचे पदार्थ बनवायचे कष्ट नको म्हणून बाजारात विकतचे पापड, रेडीमेड थालीपीठ भाजणी आणि थेट घरपोच मिळणारे डबे आले. सगळं काही अगदी सोपं, सुटसुटीत आणि वेळेची बचत करणारं झालं.

पण… पण त्या आषाढी एकादशीचा तो जुना, मनाला तृप्त करणारा स्वाद मात्र पुन्हा कधीच नाही आला. त्या पदार्थांमध्ये सगळं काही योग्य प्रमाणात असतं, पण आईच्या हाताची ती जादू आणि आजीच्या प्रार्थनेची ती उब त्यात नसते.

म्हणूनच, आजही जेव्हा आषाढी एकादशी जवळ येते, मी भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडते आणि मेरे स्वयंपाकघरात आईसारखीच खंबीरपणे उभी राहते. माझ्या मुलांना जवळ बोलावून त्याच मायेने विचारते— “उद्या कोण उपवास करणार रे? ” ते मुलं आपापल्या मोबाईलवरून मान वर करत नाहीत, कदाचित त्यांना त्याचं महत्त्व नसेल, पण तरीही मी न हार मानता आईसारखीच तयारी करायला घेते. मी आज आईची जागा घेतली आहे खरी, संसार सांभाळतेय, पण तिच्यासारखं विशाल, निखळ प्रेम आणि ती भक्ती मी कुठून आणू? हा प्रश्न मला नेहमी सतावतो.

कधी कधी डोळे मिटले की असं वाटतं, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाखो वारकऱ्यांची माऊली उभी आहे, विठोबा कटेवर हात ठेवून रांगेत उभ्या असलेल्या भक्तांची वाट पाहतोय… पण मी त्या रांगेत नसून, खूप दूर एका कोपऱ्यात, माझ्या आईच्या आठवणींच्या पंक्तीच्या शेवटी बसलेली आहे, तिच्या आठवणीत पूर्णपणे न्हाऊन निघालेली आहे.

तृप्ती देव

तेव्हा मला मनोमन जाणवतं की, माझा विठोबा फक्त दगडी मंदिरात किंवा गर्दीत नाही; तर तो माझ्या आईच्या कष्ट उपसणाऱ्या हातांमध्ये, तिने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र लाह्या आणि लोण्यामध्ये, आणि उपवासाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या शांत, तृप्त हसण्यामध्येच विसावलेला आहे. “जिथे भाव, तिथे देव. ” आषाढी एकादशी साजरी करणं म्हणजे केवळ उपवास करणं किंवा कष्टाची वारी करून पंढरपूर गाठणं नव्हे— तर आपल्याच घरात वर्षानुवर्षे आपल्यासाठी झटणाऱ्या विठोबाला आणि रुक्मिणीला ओळखणं होय. त्या माऊली म्हणजेच आपली “आई” आणि “आजी”— ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचं, प्रेमाचं हे चैतन्य जपलं, आणि आपल्या मनामनात भक्तीची आषाढी कायमची रुजवली.

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

मो ९१६५९८४३२२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares