केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील विविध भाषेत गाणी गाऊन अवघ्या भारतीयाच्या मनावर राज्य करणारे दोन गायक म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले! स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले.
मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी वाईट अपमान सहन करावे लागले.
त्यातला एक जीवघेणा प्रसंग आज सांगतो.
*
झालं असं की, एका सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्यासाठी किशोरदा आणि आशा ताईंना बोलावलेलं होतं. गाण्याच्या साउंड रेकॉर्डिगसाठी त्याकाळातले अत्यंत फेमस आणि टॉपचे समजले जाणारे रॉबिन चॅटर्जी होते. आणि हा तो काळ होता जेव्हा किशोरदा आणि आशाताई स्ट्रगल करत होत्या.
त्यात समोर रॉबिन याना पाहून हे दोघेही थोड्या दडपणाखाली आले.
मात्र हिंमत करून दोघांनी माईकसमोर येऊन गायला सुरु केलं.
मुखड्याच्या दोन ओळी गाऊन होत आहेत नाहीत तोवर रॉबिनजी यांनी “स्टॉप” स्टॉप म्हणत रेकॉर्डिंग थांबवलं.
आणि सिनेमाच्या दिग्दर्शक / निर्मात्यांना म्हणाले,
“ये कौन लोग लेके आये गाने के लिये? इन्हे तो कुछ भी नही आता… आवाज अच्छी नही है… गाने की आवाज है कहा इनकी? जाओ जाकर गीता को बुलाओ”
*
वरच्या पट्टीतले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले. आशाताई अन किशोरदावर काय आभाळ कोसळले असेल… कल्पना करवत नाही.
*
शांतपणे ते दोघे तिथून बाहेर पडले. डोळ्यात गच्च गहिवर आणि हृदयात मात्र अपमानच आगडोंब उसळलेला!
तिथून जवळच महालक्ष्मी स्टेशन होते. तिथं जाऊन रिकाम्या बाकड्यावर ते दोघे बसले.
दोघेही सुन्न… थोड्या वेळाने किशोरदा म्हणाले, “भूक लगी है, कुछ देखता हू”
आणि असं म्हणून ते भल्या मध्यरात्री त्या स्टेशनवर असलेल्या एका स्टॉल वर गेले तिथं बटाटेवडे होते तेही शिळे… तेच घेऊन किशोरदा आले. आणि या दोघांनी शांतपणे ते वडे खाताना किशोरदा म्हणाले, “आशा… हमको निकाल दिया”
त्यावर नेहमीच पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या आशाताई म्हणाल्या, “नही… दादा… आप की जो आवाज है उसे कोई रोक नही सकता, “
आणि मग शिळा वडा खाऊन… पाणी पिऊन दोघांनी घरची वाट धरली.
*
यानंतर चार वर्षानंतर या दोघांचे अनेक सिनेमे (गाणी) हिट झाली. दोघांचेही नाव झाले. किशोरदा तर गायक प्लस हिरो असे डबल फेमस झाले.
आणि एका सिनेमाच्या गाण्यासाठी पुन्हा हीच जोडी “त्याच” स्टुडिओत एकत्र आली आणि योगायोग पहा… त्याचेही साउंड रेकॉर्डिस्ट तेच रॉबिनदा होते ज्यांनी याना रिजेक्ट केलं होत.
त्यांना तिथे पाहताच किशोरदा आशाताईंना म्हणाले “आशा… वो देखो व्हिलन बैठा है… वो अगर इधर रेकॉर्डिस्ट है तो मै गाना नही गाऊंगा… “
त्यावर आशाताई दादाला म्हणाल्या, “दादा, ऐसे नही करते… आज हमारा नाम है तो क्या हुआ? किसी के पेट पे पैर नही देते.
किशोरदा म्हणाले, तुम्हे याद है… उसने हमारे साथ क्या किया था?
*आशाताई म्हणाल्या, “याद है… लेकिन अपना वख्त खराब था… आज अपना है तो गुरुर किस बात का? “*
*
आणि अशा रीतीने ते गाणे रेकॉर्ड झाले.
गोष्ट इथं संपलीय!
डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस मोठा का होतो? तर जमलं तर त्याच्या तळपायाकडे पहा… किती भेगाळले असतात अशा लोकांचे पाय… अपमान, उपासमार, अवहेलना… हे सगळे काटे पायात रुतलेले असतात आणि तरी हि मंडळी शांतपणे ते काटे बाजूला ठेवून पुढे चालत असतात. त्या काट्याला भांडत बसत नाहीत की त्याची जिरवण्यासाठी काही करत नाहीत. ते काम नियतीवर सोडावे आपण असं मला वाटत. कारण कर्मा काय अन नियती काय… ज्याचे त्याचे हिशोब चुकते करत असते त्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा? आपण आपल्या कामात राहून आपल्या कामातूनच जगाला उत्तर द्यावे… हेच जास्त बेस्ट! तसे तुम्हालाही जमावे… (कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे “रॉबिन चॅटर्जी” आलेले असतात.) त्यांना वळसा मारून पुढं जावं! येणारा काळ त्यांना बरोबर उत्तर देतो… रिलॅक्स मंडळी!
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६४ आणि ६५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्ति सूत्र –६४
अभिमानदम्भादिकं त्याज्यम् ||६४||
अर्थ : अभिमान म्हणजे गर्व, ढोंग, कपट, यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करावा.
विवेचन: अभिमान हा भल्याभल्या साधकांना पथभ्रष्ट करतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. अभिमान आणि स्वाभिमान हे जोडशब्द आहेत. त्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे. ती नीट समजून घेतली तर मनुष्यात आमूलाग्र बदल घडेल. अभिमान कोणाला नसतो ? , जसा तो श्रीमंताला असतो तसा तो भिकाऱ्याला देखील असतो. समजा एखाद्या भिकाऱ्याला एका घरात भीक मिळाली नाही तर तो लगेच सांगतो, तुमचं शेवटचं घर नाहीए, मी इतरत्रही भीक मागेन. असा अभिमान काय कामाचा ? हिरण्यकश्यपूला मारायला भगवंत नरसिंह अवतारात प्रगट झाले. साक्षात भगवंत समोर असतानाही हिरण्यकश्यपूचे हात नमस्कारासाठी जोडले न जाता ते देवाला मारण्यासाठी शस्त्राकडे गेले. यावरून आपल्याला अभिमान काय ‘चीज’ आहे हे लक्षात येऊ शकते. आपल्या घरात दुधाचे पातेले असते, त्याला आतील बाजूने दुधातील तुपाचा तवंग चिकटलेला असतो. घरातील माताभगिनी त्यात गरम पाणी ओतून ठेवतात म्हणजे तूप पाण्यात विरघळून जाते आणि नंतर ते पातेले घासून स्वच्छ करण्यात येते. इतके करूनही जर ते पातेले नीट घासले गेले नाही आणि त्यात पुन्हा दूध घेतले गेले तर तेही नासतें. मानवी मनाचे असेच आहे. अभिमान मनुष्याच्या मनाला असाच चिकटून असतो. सर्व सद्गुरू मातृहृदयी असतात. ते आपल्या मनाचे पातेले लख्ख व्हावे, आपली देहबुद्धी, आपला अभिमान नष्ट व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. मनुष्याने ह्या नश्वर जगात अलिप्त व्हावे असे त्यांना वाटत असते म्हणून ते अभिमानाचा समूळ नाश करण्याचा प्रेमळ सल्ला साधकाला देतात.
मनुष्याची वाटचाल तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, *”मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणूस, माणूस म्हणून मेला तरी बरा! “* साधक, मुमुक्षु, सिद्ध या तर खूप पुढच्या गोष्टी राहिल्या. श्री महाराज असे का म्हणाले असतील ? यावर चिंतन करताना असे लक्षात आले की दैनंदिन व्यवहार करताना मी दिवसभरात मनुष्य असल्याचे दाखवून देतो, थोडक्यात मी दिवसभर माणसा सारखा वागतो का ? थोडा सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल, मनुष्य अनेक प्राण्यांसारखा वागत असतो. उदा. स्वार्थासाठी तो मांजरीसारखा लोचट होतो, कुत्र्यासारखा तो लोकांवर भुंकत असतो (डाफरतो! ), कधी तो गरीब गाय, वासरू असतो तर कधी गोगलगाय, तर कधीकधी तो गाढवासारखा सुखदुःखांची ओझी वाहत असतो. थोडक्यात दिवसभरात मनुष्य आपल्या कृतीतून स्वतःमधील ‘अनेक’ प्राण्यांची ओळख स्वतःच स्वत:ला आणि जगाला करून देत असतो. दिवसभरात तो फार कमी वेळ ‘मनुष्य’ म्हणून वागत असतो. श्रीदासबोधातील ‘पढतमूर्ख समास’ सुद्धा अशा लोकांसाठीच लिहिला गेला असावा, असे म्हणायला हा उत्तम आधार आहे. श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की ‘मनुष्य ते मनुष्य’ प्रवास होण्यासाठी मनुष्याच्या अंगी अतिलीनता असणे अनिवार्य आहे. अतिलीन होणे म्हणजे ‘मी’ चा पूर्णपणे ऱ्हास होणे. आंब्याचे झाड फळांनी डवरले की नकळत झुकते तशी महान मंडळी कायम अतिलीन असतात. स्वतः ‘सद्गुरू’ असूनही श्री गोंदवलेकर महाराज स्वतःला रामाचा ‘दीनदास’ म्हणायचे. समर्थ तर स्वतःला रामदास म्हणायचे. विश्वमाऊली झालेले श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला *”येऱ्हवी तरी मी मुर्खु”* (ज्ञाने. १. ७६) असे संबोधतात.
शरणागती खूप महत्वाची आणि अत्यावश्यक आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे स्वार्थासाठी लीन (खरेतर हाजीहाजी करणे) आणि भगवंता पुढे लीन होणे यात मूलभूत फरक आहे, तो वाचकांनी नीट समजून घ्यावा. संत जरी असे अतीलीन होऊन वागत असले, सामान्य मनुष्य मात्र तसा नसतो. त्याला जात्याच अहंकार असतो आणि वाढत्या वयागणिक आणि इतर गोष्टींमुळे तो कमी न होता, त्यात सतत वाढ होत असते. म्हणून अहंकार ते लीनता हा प्रवास कठीणच असतो. हा प्रवास करणे म्हणजे मनाला बांध घालणे, मनावर नियंत्रण मिळविणे. मनुष्याकडे व्युत्पत्ती, विद्वता जरूर असावी, पण ती विसरता आली पाहिजे, नव्हे विसरता आलीच पाहिजे. मी म्हणजे कोणी विशेष आहे असे न वाटता आपण जगातील सर्व वस्तुमात्रांसारखेच एक आहोत असे वाटून खऱ्या अर्थाने नम्र होता आले पाहिजे. सद्गुरुंना शरण गेल्याने अंगी लीनता येऊ शकते. साधना करताना आपली सर्व कर्मे जर भगवंतांस किंवा आपल्या सद्गुरूंना अर्पण करता आली तर अंगी लीनता बाणायला अधिक गती येते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लिनतेकडील प्रवास साधकाला जमू लागला याचा अर्थ साधकाची प्रगती योग्य गतीने चालू आहे. समर्थांना अपेक्षित असलेली लीनता ही दिखाऊ, नाटकी नक्कीच नसावी. ती सर्वभावें आणि स्वभावतः असावी. सर्वभावें (कोणत्याही भावात) म्हणजे मनापासून स्वीकारलेली लीनता आणि स्वभावे म्हणणे सहजभावाने कोणताही अभिनिवेश न बाळगता. समर्थ काही दुर्गुणांच्या अति नको असे म्हणतात पण लीनतेच्या बाबतीत मात्र अति हवे असे आग्रहाने सांगतात. लीनतेचे वागणे सर्वांना आवडते.
आज ‘चार’ पुस्तके शिकलेला मनुष्य स्वतःला ‘शहाणा’ समजू लागतो आणि स्वतःच्या (काही कारणांमुळे) कमी शिकलेल्या आईबाबांना अडाणी’ समजतो. इतकेच नव्हे तर हाच मनुष्य स्वार्थासाठी अनेक ठिकाणी लाचारी करताना दिसत असतो. म्हणून समर्थ सांगतात की अतिलीनता ही दिखाऊ असू नये तर ती पोटातून असावी, फक्त ओठातून असू नये. कारण दिखाऊपण फार काळ टिकत नाही. एक वचन आहे, *’आपण सर्वांना सर्वकाळी मूर्ख बनवू शकत नाही’*, काही जणांना काही वेळा मूर्ख बनवू शकतो. एकदा का दिखाऊपणाचा मुखवटा उतरला की मग त्या मनुष्याचे आयुष्य विराण बनते. साधन करता करता मनुष्य आपले सर्व कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा लीनता त्याच्या अंगी मुरू लागते. मनुष्याच्या अंगी खरी लीनता असेल तर ती संत-सज्जनांना आनंद देते.
या सूत्राचे सार एक ओळीत सांगायचे झाल्यास पुढील प्रमाणे सांगता येईल.
जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।
(मनाचे श्लोक 2)
जय जय रघुवीर समर्थ
=============
भक्ति सूत्र –६५
“तदर्पिताखिलाचार: सन् कामक्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणियम् ||६५||”
अर्थ: आपले सर्व आचार, व्यवहार भगवंताला अर्पण करूनही काम, क्रोध, अभिमान इत्यादि विकार उद्भवले तर तेही भगवतांच्या ठिकाणी समर्पित करावे.
विवेचन: आपण सध्या नारद भक्ति सूत्रे अभ्यासत आहोत. पारमार्थिक मार्गाने जाताना चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. तिथे काठावर उत्तीर्ण, गुणाची जोड देऊन उत्तीर्ण, अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा असे तिथे चालत नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषी छोट्याश्या कामनेचे बळी ठरून साधनाभ्रष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. हे सर्व सांगण्याचे कारण असे की जप करायला सुरुवात केली, नाम घ्यायला सुरुवात केली, एखाद्या सत्संगात अमुक एक साधना ऐकली आणि ती करण्यास सुरुवात केली की मनुष्याला आज आता ताबडतोप अनुभूती हवी असते. अहो, जिथे पदवीधर होण्यासाठी आयुष्याची पंधरा वर्षे खर्च करावी लागतात, तिथे भगवतांची प्राप्ती साधना करून होईल असे म्हणणे किती सयुक्तिक आहे याचा प्रत्येक साधकाने विचार करायला हवा.
मनुष्याची वाटचाल सामान्यपणे तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, “मनुष्य म्हणून जन्माला आलेला मनुष्य मनुष्य म्हणून मेला तरी बरा! “
मनुष्याला मनुष्य म्हणून घडण्याच्या मागे अनेक विकार विघ्न आणीत असतात. विकारांचा विचार आपण विस्तृतपणे मागील लेखांत पाहिला आहे. या विकारांवर विजय मिळवणे निव्वळ अवघड आहे. एकतर सध्या विकारांची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत आहे आणि मनुष्याची निश्चयशक्ती मात्र कमकुवत होत आहे, त्यामुळे मनुष्याला खूप कष्ट करण्याची गरज आहे.
यावर एक उपाय नारद महाशय सांगतात, की हे सर्व विकार भगवंताच्या चरणी अर्पण करावेत. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी. प्रत्येक इच्छा देवाला सांगावी, प्राप्ती झाली तर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारावी आणि प्राप्ती झाली नाही तर त्याची इच्छा नाही असे म्हणून ती इच्छा आपल्या मनातून काढून टाकावी. थोडक्यात आपले विकार देवाला अर्पण करावेत. अशी स्थिती अनेक साधकांना अनुभवावी लागते. यातून संतांची देखील सुटका नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,
“काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु. ॥”
☆ “याति कुळ माझे गेले हारपोनी!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
– सौरभ सिंह शेखावत – दीपेंद्र सिंग सेंगर
१७, मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले झालेला हा तरणाबांड अधिकारी जीवनात आणखी काहीतरी मोठं करू इच्छित होता. सैनिक झालोच आहोत तर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग अनुभवणे गरजेचे आहे! म्हणून जिथं हे सर्व अनुभवयला मिळेल ते दल म्हणजे स्पेशल फोर्स! … आणि सुदैवाने तशी संधी लाभली. कर्नल क्लिमेंट सम्यूएल साहेबांनी परवानगी दिली.
नहान, हिमाचल प्रदेश येथे असलेल्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल या प्रशिक्षण केंद्रात सेकंड लेफ्टनंट साहेबांचा आजचा पहिलाच दिवस. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी कितीही मोठे असोत… त्यांचे खरे बॉस म्हणजे मैदानावर प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. अर्थात नॉन कमिशन्ड ऑफिसर्स… जे शिपाई पदावरून प्रगती करीत करीत, अनुभव गाठीला बांधत बांधत इथवर पोहोचलेले असतात आणि अर्थातच वयाने ज्येष्ठ असतात!
सेकंड लेफ्टनंट साहेब राजस्थानी आणि प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. साहेब उस्ताद हवालदार हनुमान राम राजस्थानीच. त्यांनी लेफ्टनंट साहेबांना विचारलं… तुमचं नाव? त्यावर साहेबांनी नाव सांगितलं. लगेच दुसरा प्रश्न आला… ”धर्म, जात? ” खरं तर नावावरून त्या एन. सी. ओ. साहेबांनी लेफ्टनंट साहेबांची जात ओळखली असावी, असं वाटणं साहजिकच होतं… पण तरीही ते विचारत आहेत.. म्हणून साहेबांनी सांगितलं… हिंदू राजपूत!
त्यावर एन. सी. ओ. साहेबांनी म्हटलं… ” ते पाण्याचं डबकं दिसतंय ना.. ते पवित्र पाणी आहे… त्यात एक बुडी मारून पवित्र होऊन या! ” आणि जाताना पळत नाही जायचं… रोलिंग करत म्हणजे जमिनीवर कोलांट्या उड्या मारत जायचं… जा! ”
“कमाल आहे! आल्या आल्या ही शिक्षा? ” साहेबांनी मनातल्या मनात म्हटलं आणि ते त्या डबक्याकडे गेले. काळं, घाण पाणी… त्यात ग्रीस सारखं काहीतरी तरंगते आहे. वास तर भयानक! पण आज्ञा पाळायला तर पाहिजेच… सेकंड. लेफ्टनंट साहेबांनी डुबकी मारली आणि पुन्हा रोलिंग करीत येऊन एन. सी. ओ. साहेबांसमोर सावधान स्थितीत उभे राहिले! एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा जात, धर्म विचारला! … या साहेबांना वाटले की आधीच्या वेळी त्यांना नाव, जात नीटसे ऐकू गेले नसावे… त्यांनी पुन्हा सांगितले… सर, मी राजपूत जातीचा आहे!
यावर एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा एक डुबकी मारून यायला सांगितले… साहेबांनी पुन्हा तसं केलं.. असं दोन, तीन वेळा झाल्यावर मात्र साहेबांनी मानत विचार केला… आणि सभोवार पाहिलं! प्रशिक्षण केंद्राच्या भिंतीवर लिहिलं होतं… ’कमांडो कंट्री सर्व विथ प्राईड’
आता मात्र त्यांनी बरोबर उत्तर दिलं, ”उस्ताद, माझा धर्म स्पेशल फोर्सेस, माझी जात स्पेशल फोर्सेस! ”
यावर उस्ताद गोड हसले आणि म्हणाले, ”मी म्हटलं होतं ना… ते पाणी पवित्र आहे… डुबक्या मारल्या की आपोआप ज्ञान प्राप्त होतं! ”
उस्ताद पुढं म्हणाले, ”तुमचे सैनिक ज्या जातीचे तीच तुमची जात आणि धर्म. तुम्ही भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्स मध्ये नेतृत्व करायला जाणार आहात. तुमच्या अखत्यारीत असलेल्या सैनिकांची जी जात असेल, त्यांच्या ज्या पूजा पद्धती असतील, आहार पद्धती असतील, धार्मिक पध्दती असतील… त्याच तुमच्याही असतील. त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय तुम्हांला त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेता येणारच नाही! ”
एका अनुभवी प्रशिक्षकांनी दिलेली ही शिकवण त्यावेळी सेकंड लेफ्टनंट असलेले सौरभ सिंग शेखावत कधीच विसरले नाहीत! इथे त्यांना आणखी एक शिकवण मिळाली… सोबत्याला कधीही मागे एकटे सोडायचे नाही… भले त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर! सैनिक नेहमी जोडीजोडीने कामगिरी करतात. सहकारी जखमी झाला तर त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी साथीदाराचीच असते.
शेखावत साहेब हे सर्व नेतृत्वगुण शिकत शिकत पुढे जात होते. स्पेशल फोर्सेसमधील प्रशिक्षणादरम्यान त्यांची शस्त्रे कायम सज्ज स्थितीमध्ये असतात… म्हणजे फायर करण्यासाठी तयार असतात!
बरेच दिवस उलटून गेले होते… पण शेखावत साहेबांना प्रत्यक्ष शत्रूवर फायर करण्याची संधी काही मिळत नव्हती… आणि ते तर त्याचसाठी स्पेशल फोर्सेसमध्ये आले होते. त्यांचे प्रोबेशन संपले तरी तसं काही घडेना. एकेदिवशी ते आसाम भागातल्या एका रेल्वे स्टेशनजवळ तैनात असतानाच त्यांना त्यांचे सिनिअर ऑफिसर दीपेंद्रसिंग सेंगर साहेबांचा मेसेज आला… आपली टीम घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या ठिकाणी पोहोचा… मी पुढे निघतो आहे! ”
सेंगर साहेबांना एक पक्की खबर मिळाली होती… ULFA (United Liberation Front of Asom) या सशस्त्र अतिरेकी संघटनेचे आठ-दहा अतिरेकी एका घरात थांबल्याचे आणि लवकरच ते तिथून निसटून जाण्याच्या तयारीत आहेत. सेंगर साहेबांनी ज्या व्यक्तीने ती खबर आणली होती, त्याला ताबडतोब त्यांच्या वाहनात बसवले आणि ते निघाले… जसे होते तसे. म्हणजे त्यावेळी सेंगर साहेब अर्धी विजार, टी-शर्ट आणि पायांत साध्या रबरी स्लीपर्स अशा वेशात होते… पण अतिरेकी पळून जातील म्हणून घाई होती! आणि अतिरेक्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी लष्करी वाहन न घेता एक खाजगी वाहन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी खबरी माणसाला बजावलं होतं… त्या घराच्या आधी चार पाचशे मीटर्सवर गाडी थांबवायला सांग… आम्ही तिथून पुढे पायी जाऊन कारवाई करू! परंतू तो माणूस इतका गडबडून गेलेला होता की… त्याने सेंगर साहेबांना थेट त्या अतिरेक्यांच्या घरासमोरच नेले! घराच्या अंगणात, खुर्च्यांवर दहा-बारा जण छान चहा-नास्ता करीत बसलेले दिसले. आता एक क्षणही गमावून चालणार नव्हते. सेंगर साहेब वाहनातून तसेच खाली उतरले आणि थेट त्या अतिरेक्यांच्या दिशेने निघाले… त्यांचा वेश पाहून त्या अतिरेक्यांना सुरुवातीला अजिबात संशय आला नाही. सेंगर साहेबांनी खांद्यावर लटकवलेली रायफल झटक्यात काढली आणि गोळीबार सुरु केला. पहा-यावर उभ्या असलेल्या अतिरेक्याला उडवले! आता अतिरेकी सावध झाले… त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले! अगदी दोन, तीन मीटर्सवरून गोळीबार झाला. अतिरेकी तिथून पळाले…!
शेखावत साहेब सेंगर साहेबांच्या वाहनापासून पाचशे मीटर्सचे अंतर मुद्दाम ठेवून लष्करी वाहनातून चाललेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि वाहनाचा वेग वाढवला… तो त्यांच्याच दिशेने सात-आठ अतिरेकी पळत येताना दिसले. आधी समजेना हे लोक स्थानिक गावकरी आहेत की कोण ते! शेखावत साहेबांच्या समवेत असलेल्या जवानांची सुद्धा प्रत्यक्ष शत्रूवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ होती… शेखावत साहेबांनी ओरडून या जवानांना सावध केले आणि त्या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा शत्रूवर गोळ्या झाडल्या!
शेखावत साहेब तिथून घटनास्थळी पोहोचले… सेंगर साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या पोटातून एके-४७ रायफलच्या सात-आठ गोळ्या आरपार निघून गेलेल्या होत्या… जवळून गोळीबार झाल्याने तसं झालं होतं. स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांना, अधिका-यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय प्रशिक्षणही दिले जाते. शेखावत साहेबांनी सेंगर साहेबांवर आवश्यक ते उपचार केले… पुढे त्यांना उपचारांसाठी हलवण्याची सर्व व्यवस्था अगदी त्वरेने केली. आधी चार चाकी वाहन, पुढे लष्कराचे हेलीकॉप्टर असा प्रवास सेंगर साहेबांनी प्रचंड वेदना सहन करीत पूर्ण केला. पंधरा तास शस्त्रक्रिया चालली. इंग्लीश भाषेत To “have guts” means to possess courage, bravery, and determination when facing danger, difficulty, or uncertainty. It signifies having the audacity, grit, or willpower to take risks. अर्थात धोका पत्कारण्यासाठी अंगी धमक असणे. यातील guts या शब्दाचा दुसरा अर्थ आहे… आतडे! सेंगर साहेबांना सेनेचे डॉक्टर gut शब्दाचा श्लेष साधत म्हणाले… ”You have lots of guts… so we cut some it! ” कठीण परिस्थितीत सुद्धा विनोद बुद्धी शाबूत ठेवणारे सैनिक आणि डॉक्टर्स भारतीय सैन्यातच आढळतात! सेंगर साहेबांच्या आतड्याचा मोठा भाग कापून काढण्यात आला. आणि हे आतडे नैसर्गिक शरीरधर्म साधण्यासाठी बाहेर काढून पिशव्यांना जोडण्यात आले!
धर्मनिरपेक्ष भारतीय सैन्याला वंदन. आणि ह्या परंपरा जीवाचे मोल देऊन पाळणा-या सैनिक, अधिका-यांना दंडवत. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात… याति कूळ माझे गेले हारपोनि… माजी जात, माझे कूळ मी विसरून गेलो आहे… श्रीरंगावाचून आनु नेणे! अर्थात श्रीरंग श्रीकृष्ण यांच्याशिवाय मला दुसरे काहीही ठाऊक नाही! भारतीय सैनिकांची हीच मनोवृत्ती आहे. त्यामुळेच जातीय, धार्मिक कट्टरतावाद जोपासत भारतावर चालून येणा-या शत्रूला आपले सैनिक भारी पडतात! जय हिंद. जय हिंद की सेना.
☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆
तेलगू रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या
* *
मला एक प्रसंग आठवतो : पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैद्राबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टींची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणे, वाजवणे ह्यांतली होती. तेवढ्यात कुणीतरी मला पेटीवर मराठी नाटकातले एखादे पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे ह्या विचारात पट्ट्यांवर बोटांची चाळवाचाळव सुरू केली. मिश्रपिलूच्या अंगाने एकदोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला, “अय्योय्यो बालगंधर्वाऽऽ! ” एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. एक गोरापान, काळेभोर कुरळे केस असलेला, अंगावर रेशमी झब्बा, पांढरेशुभ्र धोतर नेसलेला देखणा गृहस्थ तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून त्याने चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला, “बाबूजीऽऽ यह बालगंधर्वका गाना आपके उंगलीमें आके बैठा है… सत्य वदे बजाना-” ‘सत्य वदे’ हे माझेही आवडते गाणे. मी वाजवायला सुरुवात केली. ‘अश्रुनीर वाहे डोळां’ अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता. हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते. हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटांतला *श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या. *
– – त्या नंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवत होतो, जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचे तेलगू भाषेतले रूपांतर बालगंधर्वांच्या गायनाच्या ढंगाने, त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवत रघुरामय्या गात होते. कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर ह्या बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती.
पस्तिशी-चाळिशीतला वाटावा असा हा रसरशीत माणूस मला भेटला त्या वेळी सत्तरीत शिरला होता. एक केस पिकला नव्हता. चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती. त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा धरून होता. विषय फक्त बालगंधर्व! बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला. नवव्या दहाव्या वर्षांपासून गायला लागला. एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला. कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याशा गावी नाटकात चांगले काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने “हे गाणे गात जा” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली, ती ‘सत्य वदे’ची. रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “वह यकच प्यालामें सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया, वैसा येक सत्य वदे’की रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया. ” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानात आहे. ह्या रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्व स्पर्धेची पारितोषिके द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी, “हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी” ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीति उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला सार्या सभेने डोळ्यांतून वाहणार्या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व-गायकी त्याच्या रंध्रारंध्रांत भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती, केवळ भक्तिभावाने.
लेखक : श्री. पु. ल. देशपांडे
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
डॉ. अशोक जैन आणि त्यांनी उभारलेली शाळा.
“ फक्त एकच खोली कशाला ? “
“ फक्त एकच खोली कशाला ? “ पूर्ण शाळाच बांध!” – आईच्या एका शब्दाखातर लेकाने उभारली तब्बल सात कोटीची शाळा…
राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील ‘दादाल’ गावातील एका शाळेची सध्या देशभर चर्चा होत आहे. ही शाळा चक्क ‘संसद भवना’ सारखी दिसते! पण या इमारतीपेक्षाही मोठी आहे ती यामागील भावना..
नेमकी गोष्ट काय? या गावातीलच सुपुत्र असलेले डॉ. अशोक जैन हे गेल्या ३१ वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण याच सरकारी शाळेत पूर्ण केले होते. जेव्हा ते गावी आले, तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विनंती केली की, “शक्य असल्यास मुलांसाठी एक खोली बांधून द्या. “
आईचा तो शब्द आणि पालटलेले चित्र: अशोक जैन यांनी ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. तेव्हा आईने दिलेला सल्ला ऐतिहासिक ठरला. आई म्हणाली, “एका खोलीने काय होणार? मुलं खूप आहेत, तू पूर्ण शाळाच बांधून दे! “
आईचा शब्द मानून डॉ. अशोक जैन यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले. संसदेसारखी दिसणारी भव्य आणि आधुनिक इमारत उभारली. शाळेत सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या शाळेत शिकून मोठे झाले, त्याच शाळेला आज त्यांनी एक नवं रूप दिलं आहे.
अशा दानशूर सुपुत्राला आणि संस्कार देणाऱ्या मातेला सलाम!
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीतील १५ ते १६ कवितांची रचना परमेश्वराला पती, प्रियकर किंवा सखा मानून केलेली दिसते. कांही कवितांत हे नातं उघडपणे मांडलेलं आहे तर कांही कवितांत या भावनेला निसटता स्पर्श केल्याचे जाणवते.
परमेश्वर व भक्त जेव्हा परस्परात एकरूप होऊन जातात तेव्हा ती मधुरा भक्ती असते. त्यांच्यातल्या नात्याला पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी असे संबोधले जाऊ लागले. वैदिक काळापासून हिंदू धर्मात तसेच मुस्लिम व ख्रिस्ती धर्मातही अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.
महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार – नवविधा भक्ती, सांगितली आहे.
१- श्रवण भक्ती: म्हणजे देवाच्या कथा, गुण, महात्म्य श्रद्धेने ऐकणे.
२- कीर्तन भक्ती: म्हणजे देवाची स्तुती भजन व गुणगान गाणे.
३- स्मरणभक्ती: परमेश्वराचे चिंतन करणे व त्याची निरंतर आठवण ठेवून नाम जप करणे.
४- पादसेवन भक्ती: यात देवाची किंवा संतांची चरण सेवा करणे.
५- अर्चना भक्ती: पूजेच्या साहित्याने देवाची बाह्य पूजा, आरती करणे.
६- वंदन भक्ती: देवाला नमस्कार करून प्रार्थना करणे.
७- दास्यभक्ती: देवाचा सेवक म्हणून त्याची तन-मनाने सेवा करणे.
८- सख्य भक्ती: देवाशी मैत्री करणे आणि आपले प्रत्येक कर्म त्याच्यासाठीच आहे याची जाणीव ठेवणे.
९- आत्मनिवेदन भक्ती: स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करणे. पूर्ण शरणागती पत्करणे. देहाभिमान नष्ट होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होईल असा प्रयत्न करणे.
आत्मनिवेदनात भगवंतावरील प्रेम, आसक्ती ही सर्वात तीव्र स्वरूपाची आहे. पण ही आसक्ती हे प्रेम मिळवायचे कसे? याचे उत्तर देण्यासाठी ऋषींनी काही अध्यात्मिक वृत्तींची माहिती दिली आहे. अत्युच्च पदापर्यंत जाण्याच्या पायऱ्याच म्हणानात! त्यांनाही भक्ती म्हणतात.
१- शांता भक्ती: यात आनंद- दुःख, यश- अपयश देवाचीच देणगी आहे म्हणून स्वीकारणे. त्यासाठी कोणतीही तक्रार न करणे.
२- सख्य भक्ती: म्हणजे साथीदार व सल्लागार प्रभूच असतो. नेहमी त्याच्या सांगण्यावरूनच भक्ताची कृती होत असते.
३- दास्यभक्ती: स्वतःला देवाचा सेवक मानणे म्हणजेच देवाला आपला स्वामी मानणे.
५- मधुरा भक्ती: भक्त व देव यांच्यात अद्वैत निर्माण होणे. ज्याला नाव नाही, रूप नाही, कोणताही गुणधर्म नाही अशा परमतत्वात विलीन होण्याची तळमळ असणे.
वेद, उपनिषदे इत्यादींमधील वाङ्मयात ईश्वर व भक्त यांच्यामधील प्रेमसंबंधाच्या वर्णनात दांपत्यप्रेमाचे दाखले दिल्याची उदाहरणे आढळत असली, तरी तेथे ही भक्ती स्पष्टपणे मधुरा भक्तीच्या स्वरूपात आढळत नाही. मात्र गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला, या भागवतातील विवेचनामुळे मधुरा भक्तीची ही संकल्पना उदयाला आली, असे मानले जाते. या संकल्पनेनुसार भक्तांना ईश्वर प्रेमाच्या प्रचीतीसाठी गोपींप्रमाणे स्त्रीरूप स्वीकारण्याची आवश्यकता वाटू लागली. यामुळे, या प्रकारात भक्त लिंगविपर्यास मानतात. याउलट, ईश्वराला प्रेयसी व स्वत:ला प्रियकर मानून केल्या जाणाऱ्या सूफी साधू वगैरेंच्या भक्तीत असा लिंगविपर्यास मानण्याची आवश्यकता नसते.
कृष्ण हा जगातील एकमेव पुरूष असून, बाकी सर्व जीवात्मे कृष्णाची निसर्गतःच ओढ असलेल्या स्त्रिया आहेत, असा सिध्दांतही त्यासाठी निर्माण करण्यात आला. याचा परिणाम म्हणून पुरूषभक्तांनीदेखील स्त्रीवेष धारण करून भक्ती करावयास सुरवात केली. विरह, मीलन इत्यादींमध्ये स्त्रियांना ज्या विविध अवस्थांचा अनुभव येतो, त्या अवस्थांचा अनुभव पुरूषभक्तही घेऊ लागले. बंगालमधील चैतन्य गौरांग प्रभूंच्या वैष्णव संप्रदायात काही वेळा या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, की पुरूषभक्ताला तो स्त्री बनल्यामुळे स्त्री प्रमाणे मासिक ऋतुप्राप्ती झाल्याचे मानून त्यानुसार वर्तन करण्याचे प्रकारही आढळू लागले.
मधुरा भक्तीमध्ये असे आगळेपण आढळत असल्यामुळे तिचे मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मधुरा भक्तीला काही जणांनी विकृती मानले, तर यात आश्चर्य नाही. मधुरा भक्तीमध्ये कामभावनेचे उदात्तीकरण होते, की कामभावनेचे रूपांतर होऊन मधुरा भक्ती ही एक वेगळीच अवस्था बनते, यांसारख्या प्रश्नांची मानसशास्त्रीय चर्चा करण्यात आली आहे. पुरूषभक्ताला स्त्रीवेष धारण करावा असे वाटणे ही विकृती आहे, की आणखी काही वेगळी अवस्था आहे, याचेही विवेचन करण्यात आले आहे.
परंतु एक सत्य मान्य केलेच पाहिजे की, पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी या नात्यातील अत्यंतिक उत्कटता, माधुर्य, समर्पण याकडे केवळ भक्तच नाही तर कवीही आकर्षित झाले. तद्वतच टागोरांना देखिल या भावनेचा, मधुरा भक्तीचा आधार काही रचनांसाठी घ्यावासा वाटणे स्वाभाविकच आहे.
—–
☆ गीत: ५२ ☆
THOUGHT I should ask of thee ⎯ but I dared not ⎯ the rose wreath thou hadst on thy neck. Thus I waited for the morning, when thou didst depart, to find a few fragments on the bed. And like a beggar I searched in the dawn only for a stray petal or two.
Ah me, what is it I find? What token left of thy love? It is no flower, no spices, no vase of perfumed water. It is thy mighty sword, flashing as a flame, heavy as a bolt of thunder. The young light of morning comes through the window and spreads itself upon thy bed. The morning bird twitters and asks, “Woman, what hast thou got? ” No, it is no flower, nor spices, nor vase of perfumed water ⎯ it is thy dreadful sword.
I sit and muse in wonder, what gift is this of thine. I can find no place where to hide it. I am ashamed to wear it, frail as I am, and it hurts me when I press it to my bosom. Yet shall I bear in my heart this honour of the burden of pain, this gift of thine.
From now there shall be no fear left for me in this world, and thou shalt be victorious in all my strife. Thou hast left death for my companion and I shall crown him with my life. Thy sword is with me to cut asunder my bonds, and there shall be no fear left for me in the world.
From now I leave off all petty decorations. Lord of my heart, no more shall there be for me waiting and weeping in corners, no more coyness and sweetness of demeanour.
Thou hast given me thy sword for adornment. No more doll’s decorations for me!
BEAUTIFUL is thy wristlet, decked with stars and cunningly wrought in myriad-coloured jewels. But more beautiful to me thy sword with its curve of lightning like the outspread wings of the divine bird of Vishnu, perfectly poised in the angry red light of the sunset.
It quivers like the one last response of life in ecstasy of pain at the final stroke of death;it shines like the pure flame of being burning up earthly sense with one fierce flash.
Beautiful is thy wristlet, decked with starry gems; but thy sword, O lord of thunder, is wrought with uttermost beauty, terrible to behold or to think of.
ASKED nothing from thee; I uttered not my name to thine ear. When thou took’st thy leave I stood silent. I was alone by the well where the shadow of the tree fell aslant, and the women had gone home with their brown earthen pitchers full to the brim. They called me and shouted, “Come with us, the morning is wearing on to noon. ” But I languidly lingered awhile lost in the midst of vague musings.
I heard not thy steps as thou camest. Thine eyes were sad when they fell on me; thy voice was tired as thou spokest low ⎯ “Ah, I am a thirsty traveller. ” I started up from my day-dreams and poured water from my jar on thy joined palms. The leaves rustled overhead; the cuckoo sang from the unseen dark, and perfume of babla flowers came from the bend of the road.
I stood speechless with shame when my name thou didst ask. Indeed, what had I done for thee to keep me in remembrance? But the memory that I could give water to thee to allay thy thirst will cling to my heart and enfold it in sweetness. The morning hour is late, the bird sings in weary notes, neem leaves rustle overhead and I sit and think and think.
“जिथे जीव वाचवण्याची जिद्द असते, तिथे कायद्याचे दरवाजेही माणुसकीसाठी उघडले जातात! ” केरळच्या उल्लिकलमध्ये एका छोट्याशा चिमणीने संपूर्ण प्रशासनाला कसं कामाला लावलं, ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट नक्की वाचा.
८ एप्रिल रोजी मनोज कुमार नावाच्या मिस्त्रीने पाहिलं की, एका बंद कपड्याच्या दुकानात एक चिमणी अडकली आहे. एका छोट्या पाईपमधून ती आत शिरली, पण बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. काचेवर चोच मारून तिचे पंख थकत चालले होते.
दुकान एका मालमत्ता वादामुळे कोर्टाच्या आदेशाने ‘सील’ होतं. दुकान उघडण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. अग्निशमन दल, गाव अधिकारी आणि अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, पण कायद्याचं उल्लंघन कसं करणार?
ऑटो चालक, दुकानदार आणि गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या छोट्या छिद्रातून चिमणीसाठी दाणे आणि पाणी आत सोडलं, जेणेकरून ती जिवंत राहील. ३ दिवस गावचा जीव टांगणीला होता.
जेव्हा प्रकरण गंभीर झालं, तेव्हा गावकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा न्यायाधीश के. टी. निसार अहमद स्वतः त्या दुकानापाशी पोहोचले आणि माणुसकीच्या नात्याने दुकान उघडण्याची विशेष परवानगी दिली!
अखेर ती उडाली… : १० एप्रिल रोजी दुकान उघडलं आणि तीन दिवसांच्या संघर्षांनंतर ती चिमणी मोकळ्या आकाशात झेपावली. गावच्या आनंदाला पारावार उरला नाही!
एका नगण्य वाटणाऱ्या चिमणीसाठी जेव्हा संपूर्ण गाव आणि न्यायव्यवस्था एकत्र येते, तेव्हा समजतं की माणुसकी अजून मेलेली नाही. ही गोष्ट आपल्याला शिकवते की, प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे!
“एका चिमणीचा जीव वाचवण्यासाठी धावून आलेल्या या गावकऱ्यांसाठी आणि संवेदनशील न्यायाधीशांसाठी कमेंटमध्ये एक ‘Heart’ नक्की द्या! माणुसकीच्या या महान कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ”
☆
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!
“नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!
तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!
मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?
हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.
सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!
रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!
वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!
आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”
डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.
आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!
शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”
ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.
आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!
मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”
यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ”
यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”
“साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”
हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!
सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ”
सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.
यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!
इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!
इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ”
घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!
(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)
‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.
म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—
जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.
*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*
भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.
प्राचीन व्याख्या सांगते—
“शासनात् शंसनात् शास्त्रम्”
म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—
“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”
म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.
*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*
कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.
– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—
न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)
यांखेरीज—
वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _
*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*
भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.
शास्त्रांचा पाया उभा आहे—
श्रुति (अध्यात्मिक परंपरा)
युक्ति (तर्कबुद्धी)
अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)
शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.
म्हणूनच शास्त्र हे—
_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _
*शास्त्र आणि विवेकबुद्धी*
शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.
ते शिकवते—
सत्य आणि असत्य यातील भेद.
नित्य आणि अनित्य यातील भेद
आत्मा आणि अनात्म याची ओळख
परंतु—
शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.
म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—
विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता
*शास्त्र आणि साधकाची भूमिका*
नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर
शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.
बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.
*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*
काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.
म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे
नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.
*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*
थोडक्यात—
जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.
शास्त्र हे—
जीवनाला दिशा देते
मनाला स्थैर्य देते
बुद्धीला स्पष्टता देते
*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*
शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆
सगुणाबाई जनार्दनराव पेशवे
समिधाच सख्या या!! …
” मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागत? नावही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!
आता मीच देते ओळख करून…
मी… *सगुणाबाई*! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!
सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!
गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!
पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??
तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?
पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,
दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.
तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??
असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!
पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!
आणि… आणि… पेशवाईतील…
*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली.!