(मारुती चितमपल्ली यांच्या ‘पक्षी जाय दिगंतरा ‘ या कथेवर आधारित)
निळा विशाल सागर. बाजूला एक कडा आणि त्याच्या शेजारी एक डोंगर. कड्याला एक कपार. एक छोटेसे पिल्लू त्या कपारीत येरझाऱ्या करीत होते. बरोबर कोणीच नाही. खायला काही नाही. रोज मासे आणून प्रेमाने भरवणारी आई, प्रेमाने पाठीवरून चोच फिरवणारे वडील, मजेत खेळणारी तीन भावंडे सर्व कालच त्याला सगळे सोडून गेले.
… समोर डोंगरावर ती सगळी विहरताना दिसत होती. पण पिल्लू तिथे पोहोचू शकत नव्हतं. कडेला येऊन समुद्राकडे लक्ष दिले की त्याच्या पोटात गोळा येई. पाय लटपटू लागत. समोर मासा तोंडात घेतलेली आई दिसे. ती प्रेमाने आपल्याला पहाते आहे. हे कळे पण–
काल जाताना सर्वांनी त्याला बरोबर येण्याचा खूप आग्रह केला. पण भीतीने देह हवेत सोडून देण्याचा धीर पिल्लूला झाला नाही. वडील शेवटी रागावते, असे केलेस तर उपाशी मरशील. बहीणही ओढत होती. शेवटी नाईलाजाने सर्व सोडून गेले. तो पिल्लू विचार करून थकला. भूक भागवण्यासाठी घरट्यातील अंड्याची टरफले चाटण्याचा प्रयत्न केला. जणूं स्वतः स्वतःला खाल्ले. शेवटी निराशेने बाहेर बघू लागला.
वडील हवेत गिरक्या घेत होते. तीनही भावंडे खालीवर करीत होती. कधी पाण्याकडे झेपावत होती. इतक्यात आई तोंडात मासा घेऊन त्याच्याकडे येताना दिसली. खूप आनंदाने तो चोच उघडूनच बसला. पण आई जवळ आली नाही. लांबूनच खाली वर उडत मासा दाखवत होती. कधी मासा तोंडात जातो असे त्याला झाले होते. आईचा त्याला राग आला. त्या भरात त्याने डोळे मिटले, तो पुढे सरकला. आणि काय झाले त्याचे त्यालाच कळले नाही. खूप हलके हलके वाटत होते. त्याचे पंख उघडले होते आणि तो वरवर जात होता. नकळत तो खाली झेपावला. समुद्राच्या पाण्यातल्या माशांकडे लक्ष वेधले. पाण्याचा पायाला स्पर्श झाला. पण तो पाण्यात खाली गेला नाही. अलगत त्याने माशाला चोचीत धरले. वरवर जाऊ लागला. उडण्याची कला त्याला साधली.
सर्वांना आनंद झाला. भावंड आजूबाजूला, वडील वरती, आई खालती. सर्व कुटुंबाने सुखाने हवेत रिंगण घेतलं. पिल्लूचा पराक्रम सर्व साजरा करत होते. आईच्या नजरेत वेगळच समाधान होतं. पिल्लू स्वावलंबी झालं. वडिलांना कृतार्थ वाटलं. जगाच्या पसाऱ्यात वावरण्यास ते लायक झालं. आनंदाने वर निळ्या आकाशात, खाली निळ्या सागरात विहरू लागलं. आई-वडिलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. भित्र्या मुलाला पंख फुटले. अनंत आकाश त्याचं घर झालं.
अशी ही छोट्या समुद्रपक्षाची कथा. मुलासाठी आई-वडील काहीही करायला तयार असतात. त्यांचे हित हाच हेतू असतो. जगात त्याला ताठ मानेने स्वकर्तुत्वावर जगता यावे हीच इच्छा असते. त्यासाठी रागालोभाचे मार्ग आचरावे लागतात.
☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग २ मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
(आणि सोबतच त्यांनी एक डायरी उघडली ज्यात बैंकेचे काही मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉजिट) (FD) च्या पावत्या आणि पोस्टाचे सेविंग्स सर्टिफिकेट्स ठेवलेले होते. माजघरात शांतता पसरली. रोहित आणि मोहित चे डोळे विस्फारले गेले.) इथून पुढे – –
“हे… हे सर्व काय आहे, सुमित्रा? ” मिस्टर खन्ना अडखळत बोलले.
सुमित्रा देवी सोफ्यावर बसत म्हणाल्या, “हे ते ‘जेवण बनवणं’ आहे जे मला येतं. ही ती ‘किटी पार्टी’ ची बचत आहे ज्याची तुम्ही लोकं चेष्टा करत होते. हा त्या भाजीपाल्याचा हिशोब आहे ज्याला तुम्ही लोक साधारण समजत होते. “
त्यांनी एक-एक करून वस्तू मोजायला सुरू केलं.
“रोहित आठवतं, जेव्हा दहा वर्षांपूर्वी तुमच्या कारखान्यात आग लागली होती आणि पप्पांना पैश्यांची गरज होती, परंतू त्यांनी मला सांगीतलं नव्हतं? तेव्हा मीच माझ्या माहेरून मिळालेला खानदानी हार विकून पैशांची व्यवस्था केली होती, विम्याचे पैसे आल्यावर पप्पांनी ते मला दिलेत पण मी ते पैसे माझ्यासाठी कधीच वापरले नाहीत. त्यांची मी पोस्ट ऑफिस च्या योजनेत गुंतवणुक केली होती. आज ती रकम पंधरा लाख झाली आहे. “
त्यांनी सोन्याची नाणी उचलली.
“मोहित, जेव्हा तू लहान होतास आणि आजारी पडला होतास, डॉक्टर ने ऑपरेशन साठी पैसे मागीतले होते. तुझ्या पप्पांकडे रक्कम नव्हती. मी घरातील जुनी तांबा आणि पितळेची भांडी विकून, आणि आपल्या साड्यांमधून पैसे वाचवून ही छोटी-छोटी नाणी विकत घेतली होती. दर वर्षी दिवाळी साठी जेव्हा तुम्ही लोकं फटाके वाजवत होते, मी सोन्याचं एक नाणं विकत घेऊन या पेटीत ठेवत असे. आज सोन्याचा भाव आकाशाला भिडला आहे. ही नाणी कमीत कमी वीस लाखांची आहेत “
मग त्यांनी ते वजनदार कंगन दाखवले.
“आणि हे कंगन… हे माझ्या सासूबाई, तुमच्या आजींनी मला दिले होते. त्यांनी म्हटलं होतं, ‘सुमित्रा, स्री हा घराचा पाया असते. जेव्हा भिंती हलू लागतात, तेव्हा पायाच घराला वाचवतो’ मी आजपर्यंत हे कंगन घातले नाहीत, कारण आज हे कामात येऊ शकावेत. यांचं वजन पंधरा तोळे आहे. आजच्या हिशोबात यांची किंमत पण भरपूर असेल. “
सुमित्रा देवींनी एक वही पुढे केली.
“आणि हे बघा, मागील तीस वर्षांत, तुमच्या पप्पांनी मला घर खर्चासाठी जे पैसे दिले होते, त्यांतील मी प्रत्येक महिन्यात थोडे थोडे वाचवले होते, कधी भाजीवाल्याशी घासाघीस करून, कधी माझी औषधं घेणं टाळून, कधी नवी साड़ी खरेदी न करून. मी त्या पैशांना ‘महिला बचत गटात’ टाकले होते. तेथून मला व्याजासह जवळपास दहा लाख रुपये मिळतील. “
माजघरात सुई पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता पसरली होती. रोहित ची मान लज्जेने खाली झुकली होती. मोहित आपल्या आईच्या नजरेला नजर देवू शकत नव्हता. मिस्टर खन्नांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते.
“सर्व मिळून… ” सुमित्रा देवी हिशोब लावत म्हणाल्या, “ही जवळपास साठ लाख रुपयांची व्यवस्था आहे. पन्नास लाख बँकेला द्या, आणि बाकीच्या दहा लाखांचा कारखान्यासाठी कच्चा माल मागवून घ्या. घर विकायची गरज नाही. “
रोहित ने थरथरत्या हातांनी वही उचलली. त्यात एक एक पैशाचा हिशोब लिहिलेला होता – ‘दूधाचे पैसे वाचवले’, ‘जूनी रद्दी विकली’, ‘लोणचं बनवून विकलं. ‘
त्याला आठवलं की तो आईला सतत ‘कंजूस’ म्हणत असे. त्याला आठवलं की कसं तो आईच्या जून्या कपडे वापरण्याची टर उडवायचा. आज त्याच ‘कंजूसपणा’ने त्यांची अब्रु, त्यांचं घर आणि त्यांचं भविष्य वाचवलं होतं.
रोहित ने पळत जाऊन सुमित्रा देवींच्या पायावर लोळण घेऊन हमसून हमसून रडू लागला. “आई… मला माफ कर. मी आंधळा झालो होतो. मी तुला अशिक्षित समजत होतो, पण तू तर ते अर्थशास्त्र (Economics) शिकलेली आहेस जे जगातील कोणत्याच विद्यापीठात शिकवले जात नाही. मी तुझा गुन्हेगार आहे आई. “
सुमित्रा देवींनी रोहितला खांद्याला धरून उठवून आलिंगन दिले. “वेड्या, आई ची माफी नाही मागू, आणि बाळा, स्री कधी रिकामी नाही बसत. जेव्हा ती स्वयंपाकघरात पोळ्या लाटते, त्यासोबत आपल्या परिवाराचं भविष्य पण लाटत असते. जेव्हा ती दाळ ला फोडणी देते, तर त्यात सुरक्षा आणि बचतीची फोडणी पण लावत असते. फक्त आम्हाला श्रेय (क्रेडिट) घेता येत नाही, याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही येतच नाही. “
मिस्टर खन्नांनी पुढे येऊन सुमित्रा चे हात हातात घेतले, “सुमित्रा, आज तू सिद्ध करून दाखवलेस की या घराचा खरा प्रमुख मी नाही तू आहेस. मला तर फक्त पैसे कमावणे माहीत होते, त्याला सांभाळणे व वाढवणे तर तू शिकवलेस. आज हे छत आमच्या डोक्यावर शाबूत आहे ते फक्त तुझ्यामुळे. “
मोहित पण आई ला मिठी मारत म्हणाला, “आई, तू तर घराची अर्थ मंत्री (Finance Minister) निघालीस. आम्ही तर उगीच एमबीए ची पदवी घेऊन फिरत आहोत. “
त्या दिवशी घर विकलं गेलं नाही. बँकेचं कर्ज फेडलं गेलं. कारखान्यात पुन्हा काम सुरू झालं. परंतू त्या दिवशी सगळ्यात मोठा बदल जो झाला, तो हा होता की आता सुमित्रा देवी फक्त ‘स्वयंपाकघरा’ पर्यंत मर्यादित नव्हत्या. आता व्यवसायाच्या प्रत्येक बैठकी मध्ये, प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचं मत विचारात घेतलं जात होतं.
रोहित ने आपल्या कारखान्यातील नवीन उत्पादनाचं नाव ‘सुमित्रा’ ठेवलं.
सायंकाळी जेव्हा ते सर्व चहा पीत होते, रोहित ने हसत म्हटले, “आई, आता तरी ऐक, तुला फक्त स्वयंपाक करण्यापेक्षा इतरही बरंच काही येतं.”
सुमित्रा देवी हसल्या, “हो, मला बुडणारं जहाज किनाऱ्यावर लावता येतं.”
ही कहाणी त्या सर्व आईंना व गृहिणींना समर्पित आहे ज्यांना समाज हमेशा ‘फक्त गृहिणी’ म्हणत कमी लेखत असतो. त्या घराच्या चार भिंतींमध्ये राहून ही ते करून जातात जे मोठेमोठे धुरंधर नाही करु शकत. त्यांची हळूवार बचत आणि त्याग हीच कुटुंबाची खरी मिळकत आहे.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा लेखिका : पूजा मिश्रा
मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे
नाशिक.
मो 9325927222
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग १ मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
ढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती. घर विकण्याचे नक्की झाले होते. दलाल येणार होता. रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते. सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती. त्यांना माहित होतं की हे घर म्हणजे त्यांचा आत्मा आहे.
सायंकाळ च्या चहाची वेळ होती. माजघरात सोफ्यावर बसलेले मिस्टर खन्ना आणि त्यांची दोन्ही मुलं – रोहित आणि मोहित – चिंताग्रस्त होते. घरातील वातावरण तनावग्रस्त होते. खन्ना टेक्सटाइल्स, जे कधी शहराचा अभिमान म्हणून ओळखले जात होते, आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. मागील सहा महिन्यांपासून बाजारातील मंदी आणि एक मोठी ऑर्डर रद्द झाल्याने परिस्थिती अजून खराब झाली होती. बँकेची नोटिस आलेली होती – जर पुढच्या पंधरा दिवसांत पन्नास लाख रुपये जमा नाही केले, तर त्यांचे वडिलोपार्जित घर आणि कारखाना, दोघांचा लिलाव केला जाईल.
स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. 55 वर्षांच्या सुमित्रा देवी, मिस्टर खन्नांच्या पत्नी, नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होत्या. त्या अधूनमधून माजघराकडे बघत होत्या, परंतु तेथे सुरू असलेल्या गंभीर विचारविनीमयात दखल देण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती.
“पप्पा, आता दूसरा काही रस्ता दिसत नाही. आपल्याला हे घर विकावेच लागेल, ” रोहित डोकं गच्च धरत म्हणाला. त्याने एमबीए करून आता व्यवसाय सांभाळत होता, पण आज त्याच्या सर्व पदव्या त्याला फोल वाटत होत्या.
मोहित, जो अजून कॉलेज मध्ये शिकत होता आणि व्यवसायात ही हातभार लावत होता, त्यानेही भावाचीच री ओढली. “दादा बरोबर बोलत आहे. कारखाना वाचवण्यासाठी घर तर विकावेच लागेल. आणि असंही, आता एवढ्या मोठ्या बंगल्याचं आपण करणार तरी काय? एखाद्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये रहायला जाऊ “
मिस्टर खन्ना यांच्या डोळ्यात अश्रू होते. हे घर त्यांच्या वडिलांची आठवण होती. “रोहित, बाजारातून काही उसने पैसे मिळू शकत नाहीत का? किंवा कुणी गुंतवणुकदार?”
“पप्पा, मार्केट मध्ये आधीच बातमी पसरली आहे की आपण धंद्यात बुडत आहोत. कोणी पैसा लावण्यास ईच्छुक नाही. आणि नातेवाईक? त्यांनी तर फोन उचलणंही बंद केलं आहे, ” रोहित वैतागून म्हणाला.
तेव्हड्यात सुमित्रा देवी ट्रे मध्ये चहा आणि नाश्ता घेऊन तेथे आल्या. टेबलावर कप ठेवत त्यांनी हळू आवाजात विचारले, “अहो काय झालंय? तुम्ही लोकं एवढे चिंतित का दिसतात? बँक वाले पुन्हा आले होते का? “
रोहित ने चिडून आपल्या आई कडे बघितलं. “आई, कृपया! तू चहा ठेव आणि स्वयंपाकघरात जा. या बिजनेस च्या गोष्टी आहेत, तुला नाही समजणार. तूला फक्त घरातील किराणा आणि भाजीपाल्याचा हिशोब समजतो, हा करोड़ोंचा विषय आहे. “
सुमित्रा देवींचा हात क्षणभर थरथरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. ही काही पहिली वेळ नव्हती की त्यांना ‘फक्त गृहिणी’ असल्याची जाणिव करून दिली गेली होती. “बाळा, मी फक्त विचारत होती. जर माझी काही मदत… “
“मदत? ” मोहित चेष्टेत हसत म्हणाला, “आई, तू काय मदत करशील? तुझ्या किटी पार्टी च्या मैत्रिणींना पैसे मागशील? की पप्पांची जुनी स्वेटरं उधडून विकशील? बघ, आम्ही आधीच खूप तनावात आहोत. तू फक्त जेवण बनव. तेवढंच येतं तुला. “
मिस्टर खन्नांनी पण मुलांना टोकलं नाही. बहुतेक त्यांनाही असंच वाटत असावं की सुमित्रा, ज्या दहावी पास होत्या आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त चुल आणि मुल सांभाळण्यातच धन्यता मानली होती, त्या या आर्थिक संकटात काय मदत करू शकणार?
सुमित्रा देवी तेथून शांतपणे निघून गेल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हते परंतू हृदयात एक विचित्र बोच होती. त्यांना याचं दुःख नव्हतं की मुलं त्यांचा अवमान करीत होते, परंतू याचं होतं की आपल्या आई ला ते इतकं नगण्य समजत होते.
पुढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती. घर विकण्याचे नक्की झाले होते. दलाल येणार होता. रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते. सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती. त्यांना माहित होतं की हे घर त्यांचा आत्मा आहे.
तिसर्या दिवशी सकाळी, जेव्हा रोहित दलाल ला फोन करणारच होता की, सुमित्रा देवींनी त्याला थांबवलं. “रोहित, एक मिनिट थांब. मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचं आहे. “
रोहित ने घड्याळात पाहीलं, “आई, आता नाही, दलाल इतक्यात येईलच. घराचा व्यवहार करायचा आहे. “
“घर विकलं जाणार नाही, ” सुमित्रा देवींच्या आवाजात एक अशी दृढ़ता होती जी आधि कधी कुणी ऐकली नव्हती.
मिस्टर खन्ना, रोहित और मोहित- तिघं चमकून त्यांचेकडे बघू लागले.
“घर विकलं जाणार नाही म्हणजे? आई, तू भावनिक होत आहेस, जरा व्यावहारिक विचार कर. पन्नास लाख रुपये आकाशातून टपकनार नाहीत, ” रोहित चढ्या आवाजात बोलला.
सुमित्रा देवी काहीच बोलल्या नाहीत. त्या आपल्या खोलीत गेल्या आणि तेथून एक जूनी, लोखंडाची गंजलेली पेटी ओढत घेऊन आल्या. ही तीच पेटी होती जिला मोहित नेहमी भंगारात फेकण्याविषयी बोलत असे.
त्यांनी आपल्या साडीच्या पदरात बांधलेल्या चावीने त्या पेटीचं कुलूप उघडलं. आत जुणे कपडे घड्या करून ठेवलेले होते. सुमित्रा देवींनी कपडे बाजूला केले आणि खालून एक मखमली कपड्याचं बोचकं आणि काही जुन्या वह्या काढल्या.
त्यांनी ते बोचकं सोफ्यावर रिकामं केलं. छन-छन आवाज करत काही सोन्याची नाणी, जुन्या घडणीचे जाड कंगन, आणि काही महागडे रत्न सोफ्यावर पसरले. आणि सोबतच त्यांनी एक डायरी उघडली ज्यात बैंकेचे काही मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉजिट) (FD) च्या पावत्या आणि पोस्टाचे सेविंग्स सर्टिफिकेट्स ठेवलेले होते.
माजघरात शांतता पसरली. रोहित आणि मोहित चे डोळे विस्फारले गेले.
– क्रमशः भाग पहिला
मूळ हिंदी कथा लेखिका : पूजा मिश्रा
मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे
नाशिक.
मो 9325927222
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तुटकी पेन्सिल – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
डॉ. हंसा दीप
(पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.)
इथून पुढे – –
माझा रक्तदाब मोजला गेला, तर तो १६० च्या वर होता. काल रात्रीपासूनच माझ्या हृदयाची धडधड मर्यादा ओलांडून सैरभैर झाली होती. घराचा विचार मनांत येताच आधीच माझे काळीज दुःखातिरेकाने काळवंडले होते. अशातच त्यात माझ्या मनांत असंबद्ध विचार डोकावू लागले, “माझ्या अंशूच्या आयुष्यात दुसरी कुणी आली तर? नाही… तो तर माझा एकाधिकार आहे. ” जर एखाद्या मरणासन्न महिलेला दुसऱ्या स्त्रीचा असा जोरदार झटका लागला तर तिचा रक्तदाब कसा वाढणार नाही? एकामागून एक असे झटके बसत होते की काय सांगू अन कसं सांगू!
आराम-कक्षात थोडा वेळ राहिल्यानंतर, आता माझ्या समोर एक नवीन चेहरा होता, त्यासोबतच एक नवीन खोली होती. मला एका विशालकाय इमेजिंग मशीनमध्ये झोपवण्यात आले होते. मशीन सुरु झाली, अधूनमधून कामाला लागत तिने नियत वेळी प्रत्येक कोनातून आतील शिरांच्या अगणित प्रतिमा घेतल्या. मी त्या मशीनच्या बोगद्यात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे होते. मशीन माझ्या अंगप्रत्यंगावरून फिरत राहिली. डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, सर्वत्र, फोटोच फोटो घेतल्या जात होते. प्रत्येक वेळी ते अजस्त्र यंत्र माझ्याजवळ येताच माझी भीतीने गाळण उडायची. असे वाटत होते की जणू बदामाचा शिरा, गुलाबजाम आणि जिलेबीसारख्या चविष्ट मिष्टान्नांचेच फोटो काढल्या जात आहेत.
इकडून तिकडून धावत आणि चालत हकनाक फेऱ्या मारल्यावर परतलेला एकच विचार माझ्या मनात येत होता, “कुठलेही लक्षण नसतानाही, मी इतकी आजारी कशी काय असू शकते?” आशंकेच्या निव्वळ कल्पनेनेच सशासारख्या बावरलेल्या मनाला अंशूचा अदृश्य आवाज ऐकू यायला लागला, “आता भोग आपल्या कर्माची फळे!”
ते अवाढव्य यंत्र आता वर्तुळाकार फिरत होते, माझ्या शरीरातील असल्या-नसल्या प्रत्येक लहान-मोठ्या आतड्याचा आणि रक्ताच्या एक-एक थेंबाचा हिशोब करत होते. मी त्याच्या कार्यशैलीने भलतीच प्रभावित झाले होते. कुणास ठाऊक कोण्या डोकेबाज माणसाने ती निर्माण केली होती. लोकांचा मेंदू किती कुशाग्रतेने चालतो! वैद्यकीय शास्त्रातील कित्येक चमत्कार मानवाच्या अनवट कल्पनाशक्तीतून अवतरले आहेत. शेवटी हा टप्पाही मी यशस्वीरित्या पूर्ण केला.
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर माझी बहुप्रतिक्षित ट्रेडमिल वर धावण्याची चाचणी झाली. घरी मला असंख्य वेळा समजावण्यात आले होते की जर मी धावू शकत नसेन तर तिथल्या लोकांना लगेच सांगावे. तिथे हजर असलेल्या तंत्रज्ञांनी त्याचीच पुनरावृत्ती केली, ती ही अनेक वेळा! माझा रक्तदाब मोजण्यात आला. आता तर तो १७० पर्यंत पोहोचला होता. माझ्या दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा आवळलेला होता. त्यात भर घालीत छातीवर तारांना जोडलेले अनेक चिकट पॅचेस लावल्या गेले.
धावण्याचे यंत्र सुरू झाले. ट्रेडमिलवर धावत असताना, मी कधी शिकवता-शिकवता माझ्या वर्गात चकरा मारीत होते, तर कधी युवी या माझ्या नातवासोबत विडिओ गेममधील माझ्या पात्राला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत होते. ट्रेड मिलच्या मार्गिकेवर चालतांना या सर्व आनंददायक क्षणांची मी प्रत्यक्षात गळा भेट घेत होते. हे सर्व आनंदाचे क्षण माझ्या मार्गावर येत राहिले.
“तुम्ही बऱ्या आहात कां?”
“हो. “
“मी वेग वाढवत आहे. “
“हो. “
“जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर मला लगेच कळवा. “
“हो. “
“जर तुम्हाला किंचितही छातीत दुखायला लागले तर मला लगेच सांगा. “
“हो, मी ठीक आहे. “
या वळणावर मी अगदी आरामात जणू गुलाबी झोपेच्या तंद्रीत असल्यागत माझ्या जीवनातील सुखद क्षणांच्या आठवणी जागवायला लागले. ते आनंदाचे क्षण स्मरले जेव्हा एका प्रतिष्ठित नियतकालिकाने माझी कथा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कथा म्हणून घोषित केली होती. वाचकांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरु होता. त्या अनावर आनंदाच्या प्रवाहात तेव्हाही माझा रक्तदाब नक्कीच वाढला असावा. आम्ही सर्वजण माझ्या यशाचा क्षण साजरा करण्यासाठी एका हॉटेलात गेलो होतो. त्या रात्रीचा पनीर कोफ्ता इतका चविष्ट होता की त्याच्या चवदार चवीने माझ्या जिभेचा लगेच ताबा घेतला. त्या भावुक क्षणांनी भारलेल्या स्मृतींच्या धुक्यात ट्रेडमिलचा वाढता वेग, छातीचे दुखणे इत्यादी प्रश्न मागच्या मागे कुठे तरी हरवून गेले.
“मी तुम्हाला सर्वोच्च वेगवान बिंदूवर घेऊन जात आहे. कृपया मला सांगा की तुम्ही ठीक आहात की नाही. “
“हो, मी अगदी व्यवस्थित आहे. ” ती देखील माझ्या चेहऱ्यावरील संपूर्ण समाधानाचे भाव पाहून आश्चर्यचकित झाली होती. त्या सुरेख क्षणी, हॉटेलमधील मिष्टान्न माझ्या डोळ्यांसमोर होते आणि मी अत्यानंदाने रबडीत न्हायलेल्या गुलाबजामचा आस्वाद घेत होते.
वेगाने, अति वेगाने… त्याच गतीच्या ओघात मला आणखी एक इंजेक्शन देण्यात आले. मी बेफिकीरपणे आपल्याच जगात हरवून गेले होते, आणि त्याच वेगाने पुढे पुढे धावत राहिले. तेव्हां मी विचार करत होते, “मी आता पडेन, नंतर पडेन. पडण्याआधीच अंशू येऊन मला सावरतील. ” त्यांच्या आश्वस्त करणाऱ्या हातांचा स्पर्श जाणवण्यापूर्वीच, अचानक मशीनची गती कमी झाली आणि त्यासोबत माझे विचारही मंदावले. माझ्या मेंदूत एक प्रश्न उगवला, “एवढ्या धिम्या गतीने चालणाऱ्या मशीनमधून मी कशी काय पडू शकेन?” हळू हळू मशीनचा वेग कमी होऊन ती पूर्णपणे थांबली.
“खाली उतरा! या. ”
“कां, काय झालंय?” मी हतप्रभ होऊन गोंधळलेल्या नजरेने विचारलं.
“आटपली चाचणी!”
मला वाटलं, कदाचित ते मला थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसवतील आणि नंतर पुन्हा धावायला लावतील. माझा रक्तदाब परत एकवार मोजण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो १५५ पर्यंत घसरला होता. अरे देवा! इतक्या झटपट कसा काय कमी झाला? मी पहिल्यांदा मेले नाही, मात्र दुसऱ्यांदा धावता-धावता मी नक्की मरणार! माझ्या समोरची तंत्रज्ञ आपले चार्ट भरत होती. मी धाडस करून विचारले, “किती वेळ विश्रांती घेतल्यावर मला पुन्हा धावायला लावणार आहात?”
“तुमची चाचणी संपली. “
“तुम्हाला काय म्हणायचंय?”
“म्हणजे तुमची परीक्षा चांगल्या तऱ्हेने पार पडली. “
“हो कां?” मी स्तब्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होते.
तितक्यात मागून एक आवाज आला, “तुम्हाला रेडिओ ट्रेसरच्या फोटोजचा आणखी एक सेट द्यावा लागेल. “
त्या यंत्राने संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. तेच वीस मिनिटांचे चक्र फिरले. मात्र या चक्रादरम्यान, मला झोप येऊ लागली होती. कालची रात्र अस्वस्थ अवस्थेत अक्षरशः जागूनच काढली होती. म्हणून आता ही निद्रा! या अनिवार झोपेपायी “तुमच्या जीविताला खूपच धोका आहे, ” या डॉक्टरांच्या शब्दांना जणू कुजबुजण्याची देखील परवानगी नव्हती.
घरी परतल्यानंतरही अंशू काळजीतच असलेले दिसले. येणाऱ्या चाचण्यांच्या रिपोर्टबद्दल त्यांची ही बेचैनी मला जाणवत होती. तीन दिवसांतच फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले. आम्ही अर्धा तास लवकरच पोहोचलो. आता आम्ही तिघेही समोरासमोर होतो: मी, अंशू आणि डॉक्टर.
विखुरलेल्या कागदपत्रांकडे पाहून डॉक्टर स्मित करीत म्हणाले, “तुम्हाला A+ मिळाले आहे, श्रीमती रेमी. “
“डॉक्टर, मी समजले नाही!”
“तुमच्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत. “
मी क्षणभर सुन्नच झाले. पुढच्याच क्षणी मला सत्य उमगले – “पण डॉक्टरसाहेब, मला नेमकं काय झालं होतं? तुम्ही इतक्या चाचण्या केल्या माझ्या!”
डॉक्टर उद्गारले, “तुमच्या कुटुंबाचा इतिहास! तुमचे स्वतःचे टेस्ट रिपोर्ट सामान्य आहेत पण तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयरोगामुळे होत गेलेल्या मृत्यूसह, तुमचे हे अंक वाढतच राहिले. आणि आता तर तुम्ही पासष्ट वर्षांच्या आहात, म्हणून तुम्ही आपसूकच ‘अति धोका’ असलेल्या श्रेणीत येऊन पोचलात. “
“म्हणजे हे जे सगळे रामायण घडले ते कुटुंबाच्या इतिहासामुळे?”
“होय!”
माझ्या कुटुंबातील सदस्य एक एक करून माझ्यासमोर हजर होऊ लागले. त्यांनी स्वतःहून सर्व काही सहन केले होते. त्याची धग त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती. समोर उभे असलेले अंशू माझ्यावर ओढवलेल्या या भीषण अनुभवाने खूपच हादरून गेले होते. आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडताच, बराच वेळ माझा हात घट्ट पकडून ठेवीत ते माझ्या डोळ्यांत खोलवर पाहत राहिले. यावेळी, त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांचे डोके पुन्हा हलले. पण आता ते समाधानाने होते. माझ्या खांद्याला हळुवारपणे स्पर्शाने थोपटीत ते बोलले, “माफ कर मला, मी खूप कांही बोललो तुला! आता पुरे झाले डाएट. चल, तुला जे हवे ते खाऊन घे बरं!”
माझ्या तोंडून निरागस शब्द बाहेर पडले, “मी नऊ दिवसांपासून चहा घेतलेला नाही!” आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते. कदाचित संभावित विरहवेदनेच्या निव्वळ कल्पनेपुढे आम्ही असहाय होत गुढघे टेकले होते.
घरी पोहोचताच मी सर्वात आधी काय केले असेल तर मला केविलवाण्या नजरेने बघणाऱ्या पेंसिलीचे टोक सुबकतेने तीक्ष्ण केले! लगोलग त्याच टोकदार पेंसिलीने दवाखान्यातून नुकत्याच आणलेल्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यावर लिहिले: “कौटुंबिक इतिहास!” या घाटदार अक्षरांचे सौंदर्य अतुलनीय होते, कारण पेंसिलीला नवतीचे धारदार टोक प्राप्त झाले होते!
– समाप्त –
मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.
मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप
अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
☆ तुटकी पेन्सिल – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
डॉ. हंसा दीप
(घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते कां?”)
इथून पुढे – –
आता मात्र माझ्या धैर्याची कमाल मर्यादा संपली होती. “जरा सांगता कां मी कोणती काळजी घेतली नाही?”
“ठीक आहे! सगळ्यांची फोड करून सांगू का बाई? पाव-भाजी कोण चापून खातं चांगलं वरून भरभरून लोणी घालून?”
“मी… पण… ”
अंशूने मला पुढे बोलूच दिले नाही आणि मला थांबवत रागाने बोलताच राहिले, “आणि हो, रव्याचा शिरा, बदामाचा शिरा, झालंच तर मुगाचा शिरा घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? छोले भटूरे, बटाट्याची भाजी व पुऱ्या सारखं सारखं कोण बनवतं? आरोग्याला पोषक असलेल्या सॅलडला ‘गवत-पालापाचोळा’ सारखी शेलकी नांवे ठेवत कोण हात लावत नाही? दिवसातून चार वेळा चहा कोण पीत असतं? आणि ऐका बाईसाहेब! कोणाच्या ताटात सर्वात जास्त जिलेब्या आणि गुलाबजाम असतात?”
अंशूच्या रंगाचा पारा खरोखरच अस्मानाला भिडला होता.
मी अगदी असहाय्यपणे रडायला लागले होते. जणू ते प्रत्येक क्षण भरल्यापोटी मलाच हिशेब मागत होते आणि माझे गणित अगदीच कच्चे असल्याने मी रडवेली होऊन त्या अंकांच्या जुलूमाचे ओझे सहन करीत आसवांच्या प्रत्येक थेंबात माझी असहाय्य स्थिती व्यक्त करत होते. ऐकिवात होते की बायकोचे अश्रू नवऱ्याच्या रागावर पाणी फेरतात. उलट इथे तर त्यांनी जणू आगीत तेल ओतले. त्यामुळे अंशूचा क्रोधाग्नी अजूनच भडकला. “आता असं रडून काय उपयोग आहे? निदान माझ्याबद्दल विचार करून तरी स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस ना. जसं कांही तुला माहित नाही की तू गेल्यानंतर माझे काय होईल! मी जिवंत असूनही मेल्यासारखाच असेन. “
कुणास ठाऊक की हे प्रेम होते, आरडाओरडा होता की राग! जे काय असेल ते, पण माझ्या भावनांचा बांध पार फुटून जाण्यासाठी पुरेसे होते. आतून माझी शकले होत असतांना देखील माझे अंतरिम विचार-तर्क माझ्या बचावाची खिंड लढवीत प्रयत्नांची शिकस्त करीतच होते. “पण कुठे ना कुठे कांही तरी दिसायला हवे होते. मला कुठेही ना वेदना होत आहेत ना कोणती लक्षणे आढळली आहेत!”
“लक्षणे गेली खड्ड्यात. कोविडच्या काळातही लोक लक्षणांशिवाय मरत होते ना. तुला माहिती नाही का?”
आता निराशेने आणि अगतिकतेने कळस गाठला होता. हृदयाच्या आत इतके दिवस साचलेले दुःख वितळून गेले होते व अश्रूंच्या रूपात डोळ्यांतून झरझर पाझरत होते. माझे सगळे आवडते पदार्थ माझ्याभोवती फेर धरून ता-थई-थईच्या तालावर नाचत होते. मरणासन्न मंद प्रकाशाने माझा चेहरा फिकुटला होता. मला कधीही अन्नाची हाव नव्हती, पण या घडीला माझ्यावर लादलेला हा प्रचंड आरोप स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते.
“खाऊ शकते, म्हणून कधीतरी त्या गोष्टी खाते. ” असे शब्द माझे शस्त्र असायचे.
घरी परतल्यावर, अंशूने दोन्ही मुलांना अशा प्रकारे समजावून सांगितलं की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्यासोबत संपूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. असे वाटत होते की जणू डॉक्टरांनी अंशूला माझ्याविषयी अशी कांही माहिती दिली आहे, जी मला ठाऊक नव्हती आणि ती इतक्या टोकाची होती की मी आता या आजारातून वाचू शकणार नाही. माझ्या माघारी तिघेही गुपचूप हेच बोलत असावेत असे मला वाटायला लागले.
मी कांही गोष्टी ऐकल्या, तर कांही ऐकून न ऐकल्यासारख्या केल्या.
“पोरांनो! आईला सांगू नका बरं. त्या आपल्या घरासमोर राहणाऱ्या विसूकाकांची अगदी अशाच अवस्थेत चाचणी केली होती. बिचारे ट्रेडमिलवर जे बेशुद्ध पडले ते कधीच उठले नाहीत. “
“त्यांचं सोडा हो बाबा. इतकं देखील दूर जाण्याची गरज नाही. खुद्द आमच्या मामांना पण असंच झालं ना. आठवतंय? घरी जातांना रस्त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “
याचा एकंदरीत अर्थ असा होता की मी ट्रेडमिलवर पडणार हे निश्चित झाल्यासारखेच होते. जाण्यापूर्वी घर व्यवस्थितपणे लावून जाण्यासाठी माझ्याकडे अद्याप आठ दिवस उरले होते. मात्र सर्वप्रथम मी माझ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या अशा रीतीने पूर्ण केल्या की जेणेकरून, मी गेल्यावर उर्वरित सत्रात माझ्या विभागाला आणि माझ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
मी माझ्या दोन्ही मुलांजवळ माझ्या दागिन्यांच्या पेटीचे सविस्तर वर्णन केले: “सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. माझ्या सवयीप्रमाणे मी घरातल्या कानाकोपऱ्यात लहान सहान दागिने लपवलेले आहेत. पोरी, तुला न बघता वस्तू फेकून देण्याची सवय आहे. तेव्हा आता तरी काहीही फेकण्यापूर्वी ते नीट तपासून पाहत जा. जितके आठवते आहे ते एका ठिकाणी ठेवते आहे. घर आणि गाडी यांच्याविषयी कांही समस्या असेल तर तुमचे पप्पा बघून घेतील. “
या दिवसांत गवत- पालापाचोळा (सॅलड) खातांना, अगतिक अवस्थेत अधूनमधून आसवांचे थेंब टपकायचे, जणू डोळ्यांच्या कोपऱ्यात ते वाटच बघत असायचे की मी केव्हां थोडी तरी उदास होईन आणि त्यांना बाहेर वाहत येणाची संधी मिळेल. रागाच्या भरात मी माझा अतिप्रिय चहा पिणे देखील बंद केले. ही मी स्वतःला दिलेली खूप भयानक अशी अंतिम शिक्षा होती. त्याचा माझ्या मनावर आणि मेंदूवर विघातक परिणाम असा झाला की त्या ठणक्याने माझे डोके फुटायची वेळ आली होती.
दवाखान्यातून सतत फोन येत होते: “ही पाच ते सात तासांची चाचणी आहे. त्याच्या चोवीस तास आधीपासून कॅफिन (चहा-कॉफी) घेणे बंद करा. बारा तास आधीपासून काहीही खायचे नाही. सकाळी उठल्यावर थोडेसे पाणी पिऊन या. सोबत काही नाश्ता नक्की घेऊन या. “
प्रत्येक सूचनेबरहुकूम परिस्थितीचे गांभीर्य वर्धमान होत होते. मी रोगग्रस्त असल्याची भावना माझ्या डोक्यात अधिकाधिक तीव्रतेने रुजत गेली.
आता शेवटचे कार्य उरले होते. ते म्हणजे माझी अमूल्य संपदा सोपवणे. “अंशू, हे सगळे माझ्या रचनांचे बाड आहे. त्यातील बहुतेक रचना प्रकाशित झाल्या आहेत, पण काही प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत. कृपया मी गेल्यावर या कथांचा संग्रह प्रकाशित कराल. ” हे सांगता सांगता माझा कंठ दाटून आला आणि त्यातून आवाज देखील फुटेना. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना सोडून जातांना त्यांच्या शेवटच्या स्पर्शाने कासावीस होऊन आतल्याआत घुसमटत धाय मोकलून रडत असते तसे माझे झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत अंशूने मला आश्वासन दिले, “काळजी करू नकोस, मी तुझे पुस्तक छापून त्याचे प्रकाशन देखील करीन. “
त्या दिवसांत अंशू क्षणभरही माझी साथ सोडत नव्हते. या वागण्याने माझे दिवस भरले आहेत या जाणीवेची पुष्टीच होत होती. मध्यरात्री मी जराशीही हालचाल केली तर ते लगेच विचारायचे, “काय झालं? कांही होतंय कां?”
कहर म्हणजे मधेच रात्री झोप उघडल्यावर मी उठून टॉयलेटकडे जायला निघाल्यावर त्यांचा विचित्र प्रश्न असायचा, “तू टॉयलेटला कां जाते आहेस?”
“टॉयलेटला कोणी कां जात असतं?” या असंबद्ध प्रश्नावर हसावं की रडावं हे कळेनासे होऊनही अंशूवर चिडायची सोय नव्हती. ही नाजूक वेळ वादविवाद करण्याची नव्हती. चाचणीच्या दोन दिवस आधीपासून माझी झोप, माझे जेवण, इत्यादी नित्यक्रमांवर बारकाईने लक्ष दिल्या जात होते. त्या रात्री झोपणे खूपच अवघड झाले होते. मी कित्येक वेळा उठून बघत घड्याळाचे काटे पाहत होते की अजून त्याचा गजर कां होत नाहीय.
शेवटी एकदाची ती काळरात्र सरली आणि मी सर्व आवरत आंघोळ करून तयार झाले.
मी दवाखान्याच्या परिसरात गेल्यावर एका रुग्णाच्या भूमिकेत जात तेथील खुर्चीत स्वतःला अक्षरशः कोंबले. नर्सने माझ्या नांवाचा पुकारा करताच अंशूने मला घट्ट आलिंगन दिले, जणू तो त्यांचा शेवटचा चैतन्याने भरलेला आणि भारलेला स्पर्श होता, ज्याला ते स्वतःच्या अंतरंगात आतवर त्याचा अनुभव समाहित करण्याचा प्रयत्न करीत होते. मला रुग्णांचा गणवेश असलेला एक गाऊन घालण्यास सांगितले गेले. माझ्या छातीवर तारांसह अनेक चिकट पॅचेस जोडले गेले. अंगात गणवेश आणि मास्कने नाकतोंड झाकून लगबगीने यंत्रमानवासारखे सर्वत्र संचार करणारे तेथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, इत्यादी व्यावसायिक तर मला मृत्यूची प्रमाणपत्रे बनवणारे यमदूतच प्रतीत होत होते.
मला एका किओस्कमध्ये बसवण्यात आले आणि सांगण्यात आले, “प्रथम, तुम्हाला आयव्ही इंजेक्शनद्वारे शिरेत (व्हेन) किरणोत्सर्गी रसायनाचे इंजेक्शन टोचण्यात येईल. ठराविक काळानंतर, हे ट्रेसर (माग काढणारे रसायन) तुमच्या शरीरातील शिरांतून मधून कसा प्रवास करते त्याचे एका इमेजिंग मशीनद्वारे अनेक फोटो घेतल्या जातील. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाह मंद झालेल्या आणि हृदयाला इजा पोचलेल्या क्षेत्रांचा नेमका शोध घेण्यास मदत होईल. ”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या नर्सला दहा मिनिटे उलटून गेल्यावर देखील आयव्हीसाठी माझ्या हाताची शीर सापडली नाही. यासाठी तिने माझ्या दोन्ही हातांमध्ये दोन-तीन वेळा जोरात सुई घुसवली. जर हे अन्य वेळी घडले असते तर, मी तिला अशा भेदक नजरेने पाहिले असते की ती पुढील वेळेस रुग्णावर असे अत्याचार करण्यास धजावली नसती. पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.
– क्रमशः भाग दुसरा
मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.
मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप
अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
☆ तुटकी पेन्सिल – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
डॉ. हंसा दीप
गेल्या कित्येक वर्षांपासून, दर दोन वर्षांनी माझी वैद्यकीय तपासणी होत आलेली आहे. दर वेळी, डॉ. क्लार्कच्या क्लिनिकमधील भेटीच्या शेवटी “सर्व काही ठीक आहे, आजवर तुम्ही जे करीत आला आहात तेच करीत राहा” हे त्यांचे नेमके शब्द असत. माझे स्वयंपाकघर, माझे शैक्षणिक वर्ग आणि पेंसिल या त्रिकूटाच्या परिघात माझा दैनंदिन दिनक्रम जसाच्या तसा चालू असे.
आयुष्याचे सर्व टप्पे पार करीत मी अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे वयाचा पासष्टावा आकडा माझ्याकडे टकमक पाहत होता. डॉक्टर सावध झाले होते. आज माझ्या शरीराच्या अंग-प्रत्यंगाची सखोल तपासणी होणार होती. वजन, उंची, हृदयाचे ठोके, नाडी आणि रक्तदाब, या सर्वांची मोजदाद अतिशय बारकाईने लक्षपूर्वक होणार होती. माझ्या दंडाभोवती रक्तदाब मोजणाऱ्या मशीनचा पट्टा घट्ट आवळल्या जात होता, हृदयाची धडधड अनियंत्रित होत होती, जलद होत होती, आणि आता तर आणखीनच वाढली होती. आकड्यांचे गणित सोडवण्यात मग्न असलेले मशीनचे काटे सारखे वर-खाली गिरक्या घेत होते. त्या काट्यांसोबतच, डॉक्टरांच्या डोळ्यांची हालचाल देखील कधी खाली-वर होती होती तर कधी स्थिर होऊन आकड्यांवर नजर टाकीत होती. त्याच प्रक्रियेची अनेकवार पुनरावृत्ती झाल्यानंतर डॉक्टरांनी अंतिम निकाल जाहीर केला, “तुमचा रक्तदाब खूप वाढलेला आहे. “
मी म्हणाले, “अहो डॉक्टर, तुमच्या या दवाखान्याच्या परिसरात प्रवेश करताच माझा रक्तदाब आपोआपच वाढत असतो. तुम्ही हा पट्टा गुंडाळायला सुरुवात केली की तो आणखीनच अधिक वाढतो. “
उत्तरादाखल डॉक्टरांनी केलेलं स्मितहास्य आणि त्यामागे दडलेला गर्भितार्थ मला अजिबातच आवडला नाही. त्यातच माझा नवरा, अंशू डोके हलवीत होता, त्याने तर माझी आतल्याआत चिडचिड व्हायला लागली. काहीही घडले तरी त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याची त्यांची सवय जुनीच आहे. ते असे कांही डोके हलवीत होते, की जणू मी एखादा जघन्य अपराध केलाय. त्यांचे डोळे मला म्हणत होते, “ही तुझीच चूक आहे. तुला स्वतःची अजिबात काळजी घेता येत नाही. “
अंशूच्या अशा प्रतिक्रिया बघितल्या की माझा नेहमीच रागाने पारा चढतो. पण आज या पासष्टच्या आकड्याने मला माझा राग आटोक्यात ठेवावा लागत होता. डॉक्टरांनी पुनश्च एकवार माझ्या कुटुंबाची समग्र माहिती घेतली. मागील नोंदी परत वाचून दाखवल्या.
माझा भारतातला जन्म, पालकांच्या मृत्यूच्या कारणांची खोल मीमांसा, मोठ्या बहीण-भावाच्या अकाली मृत्यूचा उहापोह, व यातच जोडल्या गेलेली नवी कोरी अद्ययावत पुस्ती चिंताजनक होती. ती म्हणजे माझ्या धाकट्या भावाचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या मृत्यूची कारणे लक्षात घेत, डॉक्टरांनी तो मजकूर अधोरेखित केला आणि मला म्हणाले – “श्रीमती रेमी, मी तुम्हाला वेगवेगळ्या आवश्यक चाचण्यांसाठी कागद लिहून देत आहे. या सर्व चाचण्या तुमच्या प्राधान्यक्रमात असायला हव्यात. सर्वप्रथम तुम्ही इकोकार्डियोग्राम (२डी इको चाचणी) करून घ्या. मला त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर हवा आहे. “
डॉक्टर याआधी इतक्या गंभीरपणे कधीच बोलले नव्हते. मी बळीच्या बकऱ्यासारखे डोके झुकवून निर्बुद्धासारखी होकारार्थी मान डोलावली आणि त्यांनी एकामागून एक दिलेले कागद घेत गेले. वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त चाचण्या! याशिवाय, मल-मूत्र तपासणी, मॅमोग्राम (स्तनांची एक्स रे तंत्राने विशेष चाचणी), गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाकरिता तपासणी आणि खास करून इकोकार्डिओग्राफी हे सर्व करायचे होते.
मी माझ्या टेबलावरील कागदांवर पेंसिलने मोठं मोठे वर्तुळ काढत सुटले. मला माझ्या जीवनरेखेचे अंकगणित सोडवून बरेच कांही-बाही लिहायचे होते. निराशेच्या भरांत मी पेंसिल इतकी जोरात दाबली की तिचे तीक्ष्ण टोक क्षणार्धात तुटून खाली पडले. तिचा तो तुटलेला तुकडा मला वाकुल्या दाखवीत चिडवत होता. जणू मी स्वतःला देखील याच प्रकारे खंडप्राय केले होते. आतून मी अक्षरशः कोलमडले होते. माझ्या आयुष्याच्या घड्याळाचे शिस्तीत गोलाकार फिरणारे काटे जणू अकस्मात थांबल्यासारखे वाटत होते मला!
दररोज एका चाचणीची आठवण करून देत असताना, अंशूच्या डोक्यात एकच विचार ठाण मांडून बसला होता. “यावेळी चाचण्यांतून तुझ्या निष्काळजीपणाचा परिणाम नक्कीच दिसेल, बघच तू! ” माझे अहवाल येण्यापूर्वीच अंशूच्या अशा फटकारण्यामुळे माझा राग इतका अनावर होत होता की माझ्या देहातली असली नसली पीडा डोळ्यांतल्या आसवांद्वारे बाहेर येण्याचा मार्ग शोधत होती. रडून स्वतःचे मन हलके करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय कुठे होता? एका पाठोपाठ एक अशा चाचण्यांच्या आक्रमणाला तोंड देणे अंशूच्या तिखट नजरेचा मारा झेलण्यापेक्षा अधिक वेदनादायक निश्चितच नव्हते.
चाचण्यांच्या अहवालाच्या भीतीची सावली माझ्यासोबतच घराच्या कानाकोपऱ्यात ऐसपैस पसरली होती. मी स्वतःला धीर देण्याचा भरपूर प्रयत्न करीत होते, “ही सगळी फक्त वयोमानाप्रमाणे निभावण्यात येणारी एक औपचारिकता आहे. मी मस्त झोपते, माझे खाणे -पिणे यथास्थित सुरु आहे आणि मी खूप खूप काम देखील करते. मला कांहीही होणे शक्य नाही. “
असा विचार करतांना डॉक्टर आणि अंशू, दोघांची नजर मला जणू आरपार छेदून जायची. जसा एखादा विजेता अहंकाराने दर्पोक्ती करतो, तद्वतच अंशूचे शब्द माझ्या कानांवर पडायचे, “एवढा हलगर्जीपणा चांगला नव्हे. एका विशिष्ट वयानंतर आपसूकच येणाऱ्या मर्यादांचे भान ठेवणे अतिशय गरजेचे आहे. ही साधी गोष्ट तुला कधी कळणार? “
मी आपली वरकरणी गप्पच बसायचे. मात्र मनातल्या मनात माझा जबाब असायचा, “मी औषधे घेतल्याने तुम्हाला एकदाची शांती मिळेल आणि या डॉक्टरांनाही! “
असो, एकामागून एक चाचण्यांचे अहवाल येऊ लागले. त्या अहवालांसोबत क्लिनिकमध्ये जाण्यासाठी माझ्या भेटीची वेळ ठरवण्यात आली. याचा सरळ सुस्पष्ट अर्थ असा दिसून येत होता की काहीतरी गंभीर बिघाड असावा. अहवालांचे बरेचसे आकडे लक्षणीयरित्या खालीवर सरकले होते. या चढउतारांवर नजर टाकणारी अंशूची धारदार नजर जणू सांगत होती की माझा एखादा घोर अपराध सिद्ध झालाय. त्यांच्या आग ओकणाऱ्या नजरेची तीक्ष्णता चरम सीमेवर पोहोचली होती. आता खरं सांगायचं तर हेच अंशू गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतः प्रत्येक प्रकारची औषधे घेत आहेत. त्यांना या घटकेला हे विचारणे अगदीच व्यर्थच होते की त्यांनी त्यांच्या तब्येतीची नीट काळजी का घेतली नाही? या पंधरा वर्षांनंतर माझ्यासोबत असे घडणे म्हणजे गुन्हा कसा काय असू शकतो?
क्लिनिकमध्ये डॉ. क्लार्क माझ्या समोर कागदपत्रे पसरून बसले होते आणि माझ्या चाचणी निकालांची आकडेमोड करीत होते. ते कांहीतरी बोलतील या प्रतीक्षेत मी बसले होते. पुन्हा एकवार त्यांनी कुटुंबाच्या इतिहासाची माझ्याकडून पुष्टी करवून घेतली. असे करता करता दुसरीकडे त्यांची मोजणी चालूच होती. अव्याहतपणे त्यांचे गणित सुरुच होते. माझ्या शरीराचे गणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार! हे आठवत असतांनाच माझे हृदय धडधडू लागले. त्याचे ठोके माझ्या कानांपर्यंत ठक-ठक करीत आदळू लागले. अंकगणित, बीजगणित, भूमिती. त्रिकोण, चतुर्भुज, षटकोन अष्टकोन! ही अनाहूत पाहुण्यांसारखी आलेली मंडळी एका मोठ्या वर्तुळात सामावली होती व त्या वर्तुळाच्या घेराबंदीत आपसूकच अडकून पडली होती.
“तुम्हाला बराच जास्त धोका आहे. ” मला असे सांगितल्यावर डॉक्टर अंशूकडे वळून म्हणाले, “मिस्टर अंशू, मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. एक अपवाद वगळता इतर सर्व चाचण्यांचे निकाल सामान्य दिसत आहेत. तुमच्या पत्नीला सध्या उच्च प्रतीचा धोका आहे. आपल्याला लगेच हृदयरोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. उद्या तुम्हाला क्लिनिकमधून फोन येईल. “
मी अवाक होऊन डॉक्टरांकडे पाहत राहिले. क्लिनिकमधून घरी येताना, आम्ही दोघेही गप्पच बसलो होतो. कदाचित पुढील काळात काय होणार, याने भयग्रस्त झाल्यामुळे तसे असावे. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला फोन आला: “तुम्हाला एका आठवड्याच्या आत हृदयरोगतज्ञांना भेटायचे आहे. “
“तुला याचा अर्थ कळतोय ना? ” अंशूच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या या उल्कापाताचे उत्तर मी काय आणि कसे देणार होते? आमच्यातल्या अबोल्यामुळे मी तशीही दुःख सहन करीत होतेच. मी अंशूकडे केविलवाण्या नजरेने बघत राहिले. एक आठवडा गोंधळलेल्या द्विधा मनस्थितीत घालवल्यानंतर, अखेरीस हृदयरोगतज्ञांनी माझ्या हृदयाची सखोल तपासणी केली.
“इथं दुखतंय का? ” “तिथं दुखतंय का? ” त्यांच्या सर्व प्रश्नांना माझे नकारार्थी उत्तर ऐकून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले.
थोडा विचार केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “कुठलीच लक्षणे नसणे हे तर मला अजूनच चिंताजनक वाटते आहे. तुमची केस निश्चितच ‘उच्च-जोखीम’ या श्रेणीत येते. म्हणूनच मी तुम्हाला शक्य तितक्या लवकर न्यूक्लियर स्ट्रेस टेस्टसाठी पाठवणार आहे. “
घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते कां? “
– क्रमशः भाग पहिला
मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.
मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप
अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
मी सौ. तृप्ती श्रीकांत देव, भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे.
मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथा विश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात.
एखादा विषय मनाला भिडला की त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे.
शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.
जीवनरंग
☆ “सत्यवान पौर्णिमा – एक नवीन क्रांतीचा धागा…“ ☆ तृप्ती देव ☆
जून महिन्याची ती प्रसन्न सकाळ होती.
रात्रीच्या पावसाने धरतीने जणू हिरवागार शालू नेसला होता. अंगणात उभा असलेला वड अधिकच टवटवीत दिसत होता. त्याच्या पानांवर रेंगाळलेले दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकत होते. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत ते थेंब अलगद खाली झेपावत होते, जणू निसर्ग स्वतःच आजच्या दिवसाची आरास करत होता.
घरात मात्र एका वेगळ्याच उत्सवाची चाहूल लागली होती.
स्वयंपाकघरातून उकळत्या चहाचा सुगंध दरवळत होता. एका बाजूला फुलांची परडी, हळद-कुंकू, अगरबत्ती, फळं आणि वडाला अर्पण करायचा पवित्र दोरा प्रेमाने सजवलेला होता. सुमन नव्या कोऱ्या साडीत नटली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. वटपौर्णिमा तिच्यासाठी केवळ सण नव्हता; तो आयुष्यभर जपलेल्या नात्याच्या श्रद्धेचा उत्सव होता.
तेवढ्यात पंधरा वर्षांची अन्वी डोळे चोळत बाहेर आली.
“आई, एवढ्या सकाळी काय करतेस गं?”
सुमनने हसत तिच्याकडे पाहिलं.
“आज वटपौर्णिमा आहे ना बाळा. वडाची पूजा करायची आहे.”
अन्वीने आळस देत विचारलं,
“म्हणजे आज पुन्हा उपवास?”
“हो.”
“संपूर्ण दिवस?”
“हो.”
“भूक नाही लागणार?”
सुमन हसली… “लागेल की. पण काही गोष्टी प्रेमासाठी केल्या जातात.”
अन्वी काही क्षण शांत राहिली.
“पण आई, तू हा उपवास नक्की कशासाठी करतेस?”
सुमनने सहज उत्तर दिलं, “तुझ्या बाबांना निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून.”
– – अन्वीने मान डोलावली. पण तिच्या मनात एक छोटासा प्रश्न घर करून बसला.
थोड्याच वेळात बाबा हॉलमध्ये चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसले होते. अन्वी जाऊन त्यांच्या शेजारी बसली.
“बाबा, एक विचारू?”
“विचार.”
“आई तुमच्यासाठी उपवास करते ना?”
“हो.”
“मग तुम्ही आईसाठी काय करता?”
वर्तमानपत्रावरून नजर वर आली.– क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.
“म्हणजे?”
“म्हणजे आई देवाला सांगते की माझ्या बाबांना चांगलं आयुष्य दे. मग तुम्ही आईसाठी देवाला काय सांगता? तुम्ही तिच्यासाठी काय करता?”
अन्वीचा आवाज निरागस होता… ना तक्रार… ना राग… ना वाद.
– फक्त एक प्रश्न.
.. .. पण काही प्रश्न एवढे साधे असतात की ते थेट मनाच्या दारावर येऊन उभे राहतात.
अन्वी शाळेत निघून गेली. पण तिचा प्रश्न बाबांच्या मनात रेंगाळत राहिला.
दुपार झाली. घरात शांतता होती. उपवास असूनही सुमन सगळ्यांचं जेवण वाढत होती. आजीला औषधं देत होती. घर आवरत होती. संध्याकाळच्या पूजेची तयारी करत होती.
.. .. बाबा तिच्याकडे पाहत होते… वर्षानुवर्षे ते हेच पाहत होते.
.. .. पण कदाचित पहिल्यांदाच समजून घेत होते.
त्यांना अचानक जाणवलं—
खरंच…
ती माझ्यासाठी किती काही करते.
आणि मी?
मी तिच्यासाठी काय करतो? ….
सुमन वडाची पूजा करून घरी परतली.
वडाभोवती फेऱ्या मारून, दोरा बांधून आणि मनोभावे प्रार्थना करून ती थोडी दमलेली दिसत होती.
घरात सगळे एकत्र बसले होते.
तेवढ्यात बाबा उठले.
त्यांनी सुमनसमोर एक छोटंसं ताट ठेवलं.
ताटात एक गुलाबाचं फूल होतं.
एक शुभ्र धागा होता.
आणि एक छोटीशी चिठ्ठी.
सुमनने आश्चर्याने विचारलं,
“हे काय आहे?”
बाबांनी तिचा हात आपल्या हातात घेतला.
“आज तू माझ्यासाठी व्रत केलंस. अनेक वर्षांपासून करते आहेस. पण आज आपल्या अन्वीने मला एक प्रश्न विचारला.”तृप्ती देव
घरात शांतता पसरली.
“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करतेस… पण मी तुझ्यासाठी काय करतो? याचा मी कधी विचारच केला नव्हता.” .. .. सुमन निःशब्द झाली.
बाबा पुढे म्हणाले,
“आजपासून मीही एक व्रत करणार आहे.”
अन्वी उत्साहाने म्हणाली,
“म्हणजे बाबांची पण वटपौर्णिमा?”
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
बाबांनी हलकेच मान डोलावली.
“हो… पण थोडी वेगळी.”
.. .. ते म्हणाले,
“आज मी तुझ्या हाताला हा संकल्पधागा बांधतो.”
.. .. त्यांनी सुमनच्या मनगटावर तो शुभ्र धागा बांधला.
“तू माझं आयुष्य वाढावं म्हणून देवाला साकडं घालतेस… पण आज मी एक वचन देतो… तुझ्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन… तुझ्या आरोग्याची काळजी घेईन… तुझ्या आनंदासाठी वेळ काढीन.
तुझं आयुष्य फक्त संसारात विरघळून जाऊ देणार नाही… तुझा सन्मान, तुझं अस्तित्व आणि तुझी स्वप्नं जपणं हेच माझं व्रत असेल.”
सुमनच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
इतक्या वर्षांच्या संसारात तिने अनेक भेटवस्तू पाहिल्या होत्या.
पण तिच्या मनाची, तिच्या कष्टांची आणि तिच्या अस्तित्वाची अशी दखल घेणारी ही पहिलीच भेट होती.
अन्वीने उत्सुकतेने विचारलं,
“बाबा, मग या नवीन व्रताचं नाव काय?”
बाबा हसले.
“सत्यवान पौर्णिमा.”
“का?”
“कारण सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी झुंज दिली होती.
आता प्रत्येक सत्यवानाने आपल्या सावित्रीच्या आनंदासाठी, तिच्या सन्मानासाठी आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांसाठी उभं राहायला हवं.”
.. त्या रात्री घरात कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.
.. कोणतीही जुनी परंपरा मोडली नाही.
.. कोणताही नवा धर्म जन्माला आला नाही.
.. पण एका लहान मुलीच्या निरागस प्रश्नाने एका पुरुषाला खऱ्या अर्थाने सत्यवान बनवलं होतं.
वर्षानुवर्षे वडाच्या झाडाला बांधले जाणारे धागे तसेच होते.
.. पण त्या दिवशी एक नवीन धागा जन्माला आला होता.
.. कृतज्ञतेचा.
.. समानतेचा.
.. आदराचा.
खिडकीबाहेर उभा असलेला वडाचा वृक्ष मंद वाऱ्यावर डोलत होता.
त्याच्या पारंब्या जणू काळाच्या साक्षीदाराप्रमाणे या नव्या विचाराचं स्वागत करत होत्या.
सुमनने हातात बांधलेल्या त्या शुभ्र धाग्याकडे पुन्हा एकदा पाहिलं… वर्षानुवर्षे ती वडाला दोरा बांधत आली होती….. पण आज पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाला सन्मानाचा धागा बांधला होता.
कारण संसार केवळ एका व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही…
तो परस्परांच्या सन्मानावर, विश्वासावर आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेल्या पंखांवर फुलत असतो.
खरी क्रांती परंपरा मोडण्यात नसते…
.. ती परंपरेला नव्या विचारांची पालवी फुटू देण्यात असते.
.. ती जुन्या श्रद्धा नाकारण्यात नसते…
.. तर त्यांना समानतेचा आणि कृतज्ञतेचा नवा अर्थ देण्यात असते.
पिढ्यान् पिढ्या जूनची पौर्णिमा आली की लोक सावित्रीची कथा सांगत आले…
.. यापुढे कदाचित त्या कथेसोबत एक नवीन कथा सांगितली जाईल.
.. .. .. त्या सत्यवानांची… ज्यांनी आपल्या सावित्रीच्या स्वप्नांनाही जगण्याचा अधिकार दिला.
आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नवी सुंदर परंपरा सुरू झाली…
.. .. .. “सत्यवान पौर्णिमा”
.. ज्या दिवशी प्रत्येक सत्यवान आपल्या सावित्रीला एक वचन देतो—
“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना केलीस…
आता मी तुझ्या स्वप्नांसाठी जगण्याचा संकल्प करतो.”
(कथा आवडल्यास नाव न गाळता शेअर करावी ही विनंती.. हे माझे वैयक्तिक विचार आहेत ).
(विकास-अश्विनी अरविंदकडे जेवायला गेले नाहीत, त्यासंदर्भात बोलायला विकास आणि अरविंद संध्याकाळी भेटले. आता पुढे……)
संध्याकाळी विकासने अरविंदला अश्विनीविषयी सगळं सांगितलं – ती अख्खा दिवस टक लावून समोरच्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सकडे बघत बसलेली असते. तिचा राग येतो;पण तिच्या चेहऱ्यावर निरागसता असते वगैरे.
“तू गावी असताना ती कशी वागायची? ”
“खूप आनंदी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे ती. बाबांना फ्रॅक्चर झालं, त्यामुळे आमचं हनिमूनला जाणं कॅन्सल करावं लागलं, तेही समजून घेतलं तिने. ”
“एवढ्या दिवसांत काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या तुझ्या? ”
“नाही रे. ” मग थोडा वेळ विचार करून विकास म्हणाला, “मी तिला म्हटलं, ‘आधीच लग्नात खूप खर्च झालाय, शिवाय घर सजवायचंय, तेव्हा आपण हनिमूनसाठी लांब कुठे नको जाऊया. जवळच माथेरान, महाबळेश्वरला जाऊया. ‘ ती म्हणाली, ‘जवळच्या ठिकाणी जायला हरकत नाही. पण माथेरान, महाबळेश्वर नको. तिथे डोंगर आहेत. ‘ नंतर मुंबईत आल्यावर स्टेशनचा ब्रिज चढताना घाबरली होती. माझा हात घट्ट धरला होता तिने. वर पोचेपर्यंत भिजून चिंब झाला होता तिचा हात. घरी आल्यावरही तिसरा मजला म्हटल्यावर थोडी नाखूष झाली होती. खिडकीतून खाली बघायला सांगितलं, तर टाळाटाळ केली… ”
अरविंदने पुढचं ऐकायचं सोडून कोणालातरी फोन लावला, “किती वाजेपर्यंत आहेस तिथे? … मी लगेचच निघतोय. थांब मी येईपर्यंत. ” एका घोटात कॉफी पिऊन निघालासुद्धा. “बिल प्लीज तूच दे. मला उशीर होईल. “
विकासला त्याचा रागच आला. म्हणजे बिल द्यावं लागलं म्हणून नव्हे. तर आपलं एवढं महत्त्वाचं बोलणं अर्धवटच सोडून…
रात्री अरविंदचा फोन आला – “मघाशी तू सांगत होतास, तेव्हा मला भयगंडाची शंका आली. माझा एक मित्र सायकिऍट्रिस्ट आहे. त्याला मी फोन केला आणि तो क्लिनिकमधून निघण्यापूर्वीच त्याला गाठायचं, म्हणून घाईघाईने गेलो. माझी शंका खरी असावी, असं त्यालाही वाटतंय. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळालीय. ऑफिसला रजा घेऊया. हे जास्त महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी अश्विनीला घेऊन मला दादर स्टेशनवर भेट. ”
त्या रात्री विकासच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ‘असं काही खरंच असू शकेल का? पण एरव्ही तर ती… ‘
अश्विनी तशी नाइलाजानेच घराबाहेर पडली होती. स्टेशनचा ब्रिज चढावा लागू नये, म्हणून विकासने तिला टॅक्सीनेच दादरला नेलं. क्लिनिक सहाव्या मजल्यावर होतं. लिफ्टमध्ये अश्विनीने विकासचा हात घट्ट धरला होता, हे अरविंदच्या नजरेतून सुटलं नाही.
डॉक्टरांनी पहिल्यांदा विकासला आत बोलावलं, “अरविंदने मला जे सांगितलं, त्यावरून मला वाटतं, की तुमच्या पत्नींना ऍक्रोफोबिया असावा. ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीचा भयगंड. माझ्या मते याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं असावं. मी त्यांच्याशी बोलून त्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी अशा गोष्टी सुप्त मनात दडलेल्या असतात. त्या पेशन्टला आठवतही नाहीत. अशा वेळी हिप्नोथेरपीचा वापर करावा लागतो. ”
विकासचा चेहरा आधीच पडला होता. आता तर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
डॉक्टरांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं, “डोण्ट लूज होप, मिस्टर विकास. त्या नक्की बऱ्या होतील. आणि त्यांनी लवकर बरं व्हावं, म्हणूनच मी आजच हिप्नोथेरपीचा प्रयोग करणार आहे. अर्थात आवश्यकता असेल तरच. ”
“तुम्हाला योग्य वाटेल, ते सर्व करा. पण माझ्या अश्विनीला बरं करा, डॉक्टर. ”
डॉक्टरांनी अश्विनीशी बोलायला सुरुवात केली. त्यांचा शांत, आश्वासक सूर कानावर पडताच तिच्यावर आलेलं दडपण नाहीसं झालं. ती अरविंदशी ज्या मोकळेपणाने बोलत असे, त्याच मोकळेपणाने डॉक्टरांशीही बोलू लागली. मग डॉक्टरांनी तिला मुंबईत आल्यावर आई-वडिलांची आठवण येते का वगैरे विचारताच ती गप्पांच्या मूडमध्ये आली. त्यांनी तिला आताच्या, पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. पण ऍक्रोफोबियाचा उगम सापडेल, अशी कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.
मग त्यांनी मधला पडदा ओढला. आता विकासला आणि अरविंदला अश्विनी दिसत नव्हती, पण तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.
डॉक्टरांनी तिला दीर्घ श्वसन करायला सांगितलं. पायापासून डोक्यापर्यंतचा एकेक अवयव – पहिल्यांदा त्याला ताण देऊन मग रिलॅक्स करायला सांगितलं. हळूहळू ती संमोहनावस्थेत गेली.
डॉक्टर तिला म्हणाले, ” तू आता डोंगर चढत आहेस. कसं वाटतंय तुला? ”
“नाही, नाही. मी डोंगरावर जाणार नाही. ”
“का? ”
“… ”
“का नाही जाणार तू डोंगरावर? ”
“का ते मला माहीत नाही, पण मी नाही जाणार. ”
“ठीक आहे. नको जाऊस… हे बघ, अश्विनी. तू आता पाच वर्षांची आहेस. आई-बाबांबरोबर फिरायला चालली आहेस. कुठे जायला आवडेल तुला? ”
“डोंगरावर. मी धावतधावत डोंगर चढणार. आई खूप घाबरते, मी धावायला लागले की. मग मला गंमत वाटते. ” तिचा सूर अगदी लहान मुलासारखा वाटत होता.
” आता तू थोडी मोठी झालीस हं, अश्विनी. समज सात वर्षांची. आता परत जा डोंगरावर. ”
“नाही, नाही, मी नाही जाणार डोंगरावर, “भेदरलेल्या आवाजात अश्विनी म्हणाली.
” का ग? काय झालं? ”
“तिथे तो घाणेरडा माणूस आहे. ”
“हो? काय करतो तो? ”
“तो आणि ती बाई… शी! नीट कपडेपण नाही घातले त्या दोघांनी. मी त्यांना बघितलं, हे कळल्यावर तो धावत आला. त्याच्या तोंडाला एवढी घाण येत होती! मला ओकारी आल्यासारखं वाटलं… आणि त्याची भीतीपण वाटली. त्याने मला उचललं आणि डोंगराच्या टोकाला नेलं. मला उंच धरून विचारलं, ‘खाली टाकून देऊ तुला? ‘ मी… मी.. घाबरले आणि… रडायला लागले. ‘चूप! गप्प बस. तोंडातून आवाज काढायचा नाही. आणि आम्हाला बघितलं, हे कोणाला सांगायचं नाही. विसरून जायचं सगळं. कळलं? विसरून जायचं! सगळं विसरायचं! नाहीतर डोंगरावरून खाली फेकीन. ‘ ” आणि अश्विनी रडायला लागली. एखादी लहान मुलगी रडावी तशी.
डॉक्टरांनी थोडा वेळ तिला रडू दिलं. मग ते म्हणाले, ” तुला माहीत आहे, बाळा, त्या माणसाचं पुढे काय झालं? त्याला ना पोलिसदादाने पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि मार मार मारलं. तो मेला आता. आता तो तुला त्रास द्यायला कधीच येणार नाही. ”
“खsरं ss? ”
“अगदी खरं. तेव्हा आता तुला डोंगरावर जायला काहीच हरकत नाही. जाणार आता डोंगरावर? ”
” तो माणूस नक्की येणार नाही? ”
“अजिबात नाही. मेला तो. मग जाणार तू डोंगरावर? तुला आवडतं ना डोंगरावर फिरायला? ”
“हो! आई-बाबांबरोबर जाणार मी डोंगरावर. “
“आता मोठी हो. आणि नवऱ्याबरोबर जा डोंगरावर. जाणार ना? ”
“हो. “बाहेर विकासाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.
“एक गंमत सांगू, अश्विनी मॅडम? खिडकीकडे जा आणि खाली बघा. ती माणसं, वाहनं कशी दिसतात, ते बघा. ”
“खरंच, किती लहान दिसतात ना! आणि आपण आकाशातच आहोत असं वाटतं. मस्तच! ”
पडदा बाजूला करून विकास आत आला आणि डॉक्टर, अरविंद कोणाचीही पर्वा न करता त्याने अश्विनीला मिठीत घेतलं.
लग्नाची तारीख ठरली, तरी विकास अजूनही काळजीतच होता. अरविंदच्या नजरेतून ते सुटलं नाही. ऑफिस सुटल्यावर अरविंद त्याला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथेही विकास इडली चिवडत बसला होता.
शेवटी अरविंदने विचारलं, “एनी प्रॉब्लेम? सांगावंसं वाटलं, माझ्यावर विश्वास असेल, तर सांग. ”
“आहे रे तुझ्यावर विश्वास. गेल्या दोन वर्षांची आपली मैत्री. पण तू मला सख्ख्या भावासारखाच वाटतोस. मुंबईत आल्यावर तुझाच मोठ्ठा आधार होता मला. ”
“मग बोल ना. असा मनातच घुसमटू नकोस. ”
“खरं सांगू? मी लग्नाचा विचार करायचो, तेव्हा मला वाटायचं, आपलं लव्ह मॅरेज व्हावं. म्हणजे एखाद्या मुलीशी ओळख, मग मैत्री, नंतर प्रेम अशा पायऱ्या चढत गेलं, तर आपलं नातं पक्कं होईल. पण अशी कोणी भेटलीच नाही रे. शेवटी आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न करतोय. तशी चांगली आहे ती. दिसायला, वागायला.. ”
“मग काय प्रॉब्लेम आहे? ”
” मुंबईतली, नोकरी करणारी मिळाली असती, तर आर्थिकदृष्ट्याही बरं झालं असतं. ”
“तुला खरं सांगू? सुनीता नोकरी करते. पण तिचा अर्धा-पाऊण पगार तिच्या नोकरीमुळे होणाऱ्या खर्चातच जातो. शिवाय मुलांकडे दुर्लक्ष होतं, ते वेगळंच. बघावं तेव्हा सुनीता दमलेली, वैतागलेली असते. त्यामुळे बायकोचं नोकरी करणं सुखाचं झालं असतं, हा विचार तू डोक्यातून काढून टाक. तशी ती शिकलीसवरलेली आहे. वाटलं तर ती करेलही नोकरी किंवा ट्युशन्स वगैरे करून…
त्यामुळे या काळज्या सोड आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं बघ. ”
लग्न झालं आणि विकास त्या काळज्या वगैरे सगळं विसरूनच गेला. आई येणार होती बरोबर, बिऱ्हाड लावून द्यायला, पण बाबांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे ही दोघंच मुंबईला आली.
“बाप रे! एवढी उंच बिल्डिंग! इथे राहायचं आपण? “अश्विनीच्या प्रश्नाचं विकासला हसूच आलं.
“आमच्या गावी सगळी बैठी घरं. फार तर फार, वर एखादी माडी आणि गच्ची. पण आमचं घर तर बैठंच. ” अश्विनी स्वगत बोलल्यासारखं बोलली.
“अगं, आपली तर फक्त पाच मजल्यांचीच बिल्डिंग आहे. आता तर कितीतरी उंच बिल्डिंग्ज होताहेत. ”
ती घर बघून खूश झाली.
“अश्विनी, तिसऱ्या मजल्यावरून खालचा रस्ता किती छान दिसतोय बघ. ”
” मग बघते. आधी सामान लावून ठेवते. ”
थोड्या वेळाने विकासाच्या लक्षात आलं, आपल्याला येऊन जेमतेम दीड-दोन तासच झाले असतील, पण घराचं रूपच पालटल्यासारखं वाटत होतं. ब्रह्मचाऱ्याच्या मठीला घरपण आलं होतं. विकास खूश झाला.
“थोडे दिवस जेवणाचा डबा चालूच ठेवूया. ”
“नको. कशाला? आता मी आलेय ना? मी करेन की स्वयंपाक. नाहीतरी तुम्ही ऑफिसला गेल्यावर मला उद्योग काय आहे? आपण आज सामान आणून ठेवूया. ”
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी बरोबरच ब्रेकफास्ट घेतला. जाताना विकास डबा घेऊन गेला.
त्याला निरोप देऊन अश्विनी सोफ्यावर टेकली. तिची नजर खिडकीबाहेर गेली. समोर एका बिल्डिंगचं बांधकाम सुरु होतं. ते मजूर एवढ्या उंचावर काम करत होते! कोणी पडलाबिडला तर…! बाप रे! अश्विनीला घाम फुटला.
तिने खिडकीजवळ जाऊन मजले मोजले. हे म्हणाले होते – खालचा तळमजला, नंतर पहिला, दुसरा… असं मोजायला सुरुवात होते. म्हणजे हा पाचवा मजला होता. नुसता मजला म्हणजे त्याची जमीन बांधली होती. बाजूचा कठडा अजून बांधायचा होता. सगळे मजूर तन्मयतेने काम करत होते. बाप रे! ही माणसं वरून पडली तर..? तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, त्यांच्या कमरेला बेल्ट होता आणि बेल्टला जोडलेल्या दुसऱ्या पट्ट्याचं टोक आत कुठेतरी बांधलेलं होतं. तिचा जीव भांड्यात पडला. नंतर बघितलं, तर बाजूला लावलेली जाळीही दिसली तिला. म्हणजे तसं संरक्षण होतं;पण ती जाळी तुटली तर…? शिवाय एखाद्याने पट्टा नीट बांधला नसेल तर…? किंवा पट्टा तकलादू असेल तर…? हे सगळे कामात एवढे मग्न होते, की एखादा पडला तर ह्यांच्या लक्षातही येणार नाही.
मग ती पापणीसुद्धा न मिटता त्यांच्याकडे लक्ष ठेवून बसली.
घरात सगळं काम पडलं होतं. पण घरातल्या कामापेक्षा या लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा होता. ती तशीच पहारा देत बसून राहिली.
दुपारी त्यांची जेवणाची सुट्टी झाली, तेव्हा ती भानावर आली. भात, आमटी करायच्या भानगडीत न पडता तिने सकाळी केलेली चपाती, भाजी खाल्ली आणि परत ती ड्युटीवर हजर झाली.
संध्याकाळी विकास घरी आला, तेव्हाही ती समोरच्या बिल्डिंगवर देखरेख करत होती.
“काय केलंस अख्खा दिवस? कंटाळा नाही ना आला? ”
पण तिने उत्तरच दिलं नाही.
“अश्विनी, मी तुझ्याशी बोलतोय. ”
“काय म्हणालात? ”
“लक्ष कुठे आहे तुझं? ”
“समोर ती बिल्डिंग बांधताहेत ना, कोणी पडलाबिडला तर, म्हणून लक्ष ठेवून होते. ”
विकासचं लक्ष गेलं, सकाळी ठेवलेला पेपर, चहाचा कप, ताटल्या सगळं तसंच होतं.
“तू सकाळपासून बसली आहेस अशी? ”
“हो. ”
तेवढ्यात त्या मजुरांची ड्युटी संपली आणि त्यांनी खाली उतरायला सुरुवात केली. सगळे खाली उतरल्यावरच अश्विनी जागेवरून उठली.
मग तिने चहा केला.
अख्खा दिवस सावधपणे बसून बसून ती दमलेली दिसत होती.
मग रात्री विकासने बाहेरूनच जेवण मागवलं.
“कशाला बाहेरचं? मी केलं असतं ना काहीतरी, “ती म्हणाली खरी;पण आपल्या अंगात आता अजिबात त्राण नाही, हे तिला जाणवत होतं.
मग हे रोजचंच झालं. विकास घरी यायचा, तेव्हा अश्विनीच्या अंगात त्याच्याशी बोलायचंही त्राण नसायचं. विकास चिडायचा; पण अश्विनीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून त्याला ओरडावंसंही वाटायचं नाही. दिवसभर नीट खात-जेवत नसल्याने, एकाच जागी बसून राहिल्याने, शिवाय मनावरच्या ताणामुळे तिची तब्येतही ढासळत चालली होती.
रविवारी अरविंदच्या घरी या नवपरिणीत जोडप्याला जेवायला बोलावलं होतं.
” मी नाही येऊ शकणार, अहो. तुम्ही एकटेच जा. मला समोर लक्ष ठेवायचं असणार ना! ”
“रविवारी त्यांनाही रजा असते, ” विकासने ठोकून दिलं. तो थोडाच बघायचा, ते कधी काम करताहेत आणि कधी नाही, ते.
“मग मीपण येईन. ”
“आपण सकाळी लवकरच निघूया. ”
“चालेल. ”
पण सकाळी उठायला, तयारी करायला थोडा उशीरच झाला. तोपर्यंत समोरचं काम सुरू झालं.
“आता मी नाही येऊ शकणार. तुम्ही एकटेच जा. ”
शेवटी विकासने अरविंदला कळवलं, अश्विनीची तब्येत बरी नसल्याने येऊ शकत नाही, म्हणून.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये विकास स्वतःहून अरविंदकडे गेला. “सॉरी यार! ‘
“सुनीता अपसेट झाली. ती दोन दिवसांपासून तयारी करत होती. ”
“मला जाणीव आहे त्याची. आज ऑफिस सुटल्यावर कॉफी घ्यायला जाऊया. मला बोलायचं आहे तुझ्याशी. ”