मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जर्मनीमधल्या कार्लशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “जर्मनीमधल्या कार्लशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी लिहिलेल्या “म्हैस” या पुस्तकाची जाहिरातबाजी करताना छान गमती जमती होत आहेत. फेसबुक वर, वॉट्सअपच्या निरनिराळ्या ग्रुपवर कळवल्यामुळे ॲमेझॉन कडून पुस्तक घेतल्याचे बऱ्याच जणांचे फोन/मेसेज आले. अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये पण तिथल्या  ॲमेझॉन कडून लोकांना म्हैस पुस्तक मिळाल्याचे समजले. विचार केला जर्मनी मध्ये कोणी ओळखीचे आहे का ते बघावं, म्हणजे  त्यांना पण पुस्तकाबद्दल सांगता येईल, आणि जर्मनीत थोडी पब्लिसिटी होईल. पण पटकन डोळ्यासमोर ओळखीचं असं कोणीच येईना ज्यांना पुस्तकाबद्दल सांगता येईल..

आणि एकदम स्ट्राईक झाले की मागे टूरवर गेलो होतो, तेव्हा तिथल्या कार्ल यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्याशी व्हाट्सअप वर अधून मधून संभाषण पण असते. विचार केला की यांना फोन लावावा आणि विचारावं की कोणी मराठी फॅमिली ओळखीचे आहेत का?

एक दिवस दुपारी ४ च्या सुमारास व्हाट्सअप वर फोन लावला. म्हणजे तिकडे दुपारचे साडेबारा वाजले असणार.

लगेच फोन लागला.

(कार्ल यांचं आणि माझं बोलणं इंग्रजीमधे झालं. खाली अनुवाद देत आहे)

कार्ल: शुभ दुपार, बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकून मस्तच वाटतंय. काय नवीन

मी: कार्ल, माझं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे.

कार्ल: बढिया, अभिनंदन. पुस्तकाचं नाव काय आहे?

मी: पुस्तकाचं नाव म्हैस आहे

कार्ल: काय नाव आहे?  मला नाव जरा विचित्र वाटते आहे

मी: म्हैस म्हणजे बफेल्लो

कार्ल: नाव एकदम वेगळेच आहे. म्हशीवर तुम्ही पूर्ण पुस्तक कसे लिहू शकता. मी फार फार तर ५ – ६ ओळी लिहू शकेन

मी: पूर्ण पुस्तक म्हशींबद्दल नाही आहे. फक्त पहिला लेख म्हैस असा आहे. आणि ट्रॅफिक चा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशींची मदत घेणे यावर तो लेख आहे.

कार्लला जरा हे बंपरच गेले. तीन-चार वेळा त्याचे व्हॉट व्हॉट असे विचारून झाले. मी त्यांना सांगितले ट्रॅफिकचा रस्ता ओलांडताना लोकांना वाहनांची भीती वाटते. बाजूला म्हैस असली की रस्ता न घाबरता ओलांडता येतो आणि यावरच पहिला लेख आहे.

त्याला याचा काहीच अर्थ लागत नव्हता. कारण तिकडे त्यांनी आपल्या इथल्या सारख्या रस्त्यावर म्हशी कधीच बघितल्या नसणार. आणि रस्ता क्रॉस करताना कोणाला तिथे भीती पण वाटत नसणार.

कार्ल: इथे पादचारी मंडळींकरता रास्ता क्रॉस करण्याकरता लाल – हिरवे दिवे असतात. दिवा लाल असेल तर लोक थांबतात. आणि हिरवा झाला, की चुकून एखादी गाडी अंगावर येईल का, वगैरे अशी भीती न बाळगता रस्ता क्रॉस करतात. काही क्रॉसिंगवर लाईट नसतात. अशा ठिकाणी ट्रॅफिक मध्ये थोडी गॅप पडण्याची चालणारे वाट बघतात आणि रस्ता क्रॉस करतात. काठी घेऊन चालणारी मंडळी/व्हील चेअर वरची मंडळी कुठलाही रस्ता न घाबरता क्रॉस करू शकतात. सगळेच वाहन चालक चालणाऱ्यांकडे नेहेमीच आदरपूर्वक बघतात. आणि रस्त्यावर चालणाऱ्यांचा पहिला मान असतो असे मानतात. आता म्हैस रस्ता क्रॉस करायला काय आणि कशी मदत करते हे मला जरा डोक्यावरून जाते आहे.

मी: रस्ता क्रॉस करतांना म्हैस बरोबर असली कि आम्हाला सुरक्षित कसे वाटते हे एक्सप्लेन करणे जरा कठीण आहे..

कार्ल: माझं खरं मत सांगू का – एखाद्या म्हशीला जर रस्ता क्रॉस करायचा असेल, तर तिनी चालणाऱ्यांची मदत घ्यावी. कारण म्हशींना लाल – हिरव्या दिव्याचा अर्थ समजणे कठीण आहे.

मी (मनात): ह्याला सांगण्यात काही पॉईंट नाही की इथे गाड्या चालवणाऱ्या बहुतांशी लोकांना ट्रॅफिक कंट्रोल करता लावलेल्या लाल हिरव्या दिव्यांशी काहीही देणे घेणे नसते. त्यांना अगदी झेब्रा क्रॉसिंगशी पण काही देणे घेणे नसते/स्पीड ब्रेकरशी देणे घेणे नसते/आणि चालणाऱ्यांशी तर नसतेच नसते. आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आहेत, त्यामुळे अशा देणे घेणे नसणाऱ्यांच्या यादीमध्ये पूर्वी फक्त पुरुषच असायचे, आणि आता स्त्रिया पण त्यांच्याबरोबरीने असतात. सगळेच स्वतःच्या घाईमध्ये असतात आणि मन मानेल तसे वेगाने जात असतात. बरेच जण गाडी चालवतांना मोबाईलवर असतात, त्यामुळे तसेही त्यांचे स्पीड लिमिट चे बोर्ड, नो एन्ट्री बोर्ड, लाल हिरवे दिवे इकडे लक्ष नसतेच.

रस्त्यावर लावलेले ट्रॅफिकचे दिवे त्यांना जोडलेल्या टायमर प्रमाणे लाल हिरवे होत असतात. त्यांना पण ट्रॅफिकशी काही देणे घेणे नसते.

त्यामुळे रस्त्यावर सगळ्यात बिचारा प्राणी कोण असेल, तर तो म्हणजे चालणारा माणूस किंवा स्त्री किंवा मुलं, आणि कुत्री आणि मांजरी काही प्रमाणात.

आणि ट्रॅफिकला न घाबरणारे कोणी असेल, तर ते म्हणजे म्हैस, गाय, बैल, मेंढ्यांचे कळप.

मी (थोडा विषय बदलून): कार्ल, मला आठवतंय की तुमचा काही कामाकरता पुढच्या महिन्यामध्ये इथे येण्याचा प्लॅन आहे. त्यावेळेस आपण म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करू. म्हणजे तुम्हाला तो फील येईल.

आणखीन एक विचारायचं म्हणजे, तुमचे मराठी बोलणारे काही मित्र आहेत का? किंवा ऑफिस मध्ये कुणी मराठी सहकारी आहेत का?

कार्ल: आहेत आहेत. बरेच आहेत, त्यांच्याशी फोन वर म्हैस पुस्तकाबद्दल बोलायचे आहे का?

मी: नाही. मी तुम्हाला म्हैस पुस्तकाची जर्मनी मधल्या अमेझॉन ची लिंक पाठवतो. ती त्यांना फॉरवर्ड करा. त्यांना म्हैस पुस्तक तिथे मागवता येईल. आणि पुस्तक वाचल्यानंतर ते तुम्हाला म्हैस ही स्टोरी समजावून सांगतील. आणि तुम्ही इथे याल तेव्हा आपण म्हशींबरोबर रस्ता क्रॉस करू म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांचे  समाधान होईल.

थोड्या  इतर गप्पा झाल्या आणि फोन बंद झाला.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… किंकर्तव्यमूढता – भाग – ५८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… किंकर्तव्यमूढता – भाग – ५८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

किंकर्तव्यमूढता

Now or Never  अशा एका गोंधळलेल्या निर्णय स्थानकावर मी अडकले होते.  काय करावे कळत नव्हतं. बँक ऑफ इंडियाची खानदेशात ब्रांच नसल्यामुळे आणि भविष्यात कधीतरी होईल या आशेवर विसंबून न राहता आल्यामुळे  मी तिथल्या नोकरीचा  राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी वगैरेत काही काळ गेला होता. तरीही संसार, मुलं -बाळं या व्यतिरिक्त काहीही न करता आयुष्याचा प्रवास चालू ठेवावा असे काही मला वाटत नव्हते.सर्वसामान्य धारेतल्या आयुष्यात मी रमू  शकत नव्हते हे निर्विवाद!

खरं म्हणजे याही दरम्यान मी नोकरीसाठी काही ठिकाणी सहज म्हणून अर्ज पाठवले होते आणि अचानक एक दिवस मला देना बँकेच्या मुलाखतीचं आमंत्रण पत्र आलं.  ते पाहून मी जितकी आनंदले होते तितकीच चिंतातुरही झाले होते. यावेळी समोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. ज्योतिका अवघी सहा महिन्यांची होती. विलासच्या व्यवसायाचा जम चांगल्या रीतीने बसत चालला होता. आम्हा दोघां व्यतिरिक्त तिसरं जबाबदार असं कोणी आमच्या घरात नव्हतं. ज्योतिकाच्या संगोपनाचा फार मोठा प्रश्न माझ्या नोकरीने उद्भवणार होता. आई म्हणून माझी पहिली जबाबदारी ज्योतिकाच होती पण इतकी सहजपणे आलेली संधी आयुष्यात पुढे मिळेलच याबद्दल नक्की कसे सांगावे? अत्यंत द्विधा मनस्थितीत होते मी.  त्यावेळी लहान मुलांसाठी आजच्यासारखी डे केअर सेंटर्सही नव्हती. शिवाय लहान मुलांना डे केअर मध्ये ठेवून नोकरीवर जाण्याची तेव्हा पद्धतही नव्हती. ज्यांच्या घरात आजी-आजोबा आहेत किंवा एकत्र कुटुंबामधल्या स्त्रीला हे काहीसं शक्य होत होतं.आमचं कुटुंब मोठं होतं पण कायमस्वरूपी आमच्या सोबत राहणे त्यापैकी कुणालाच शक्य नव्हते फार तर अडीअडचणीच्या वेळेस मदतीला येण्यासाठी सारेच तयार होते. एक दिलासा मात्र होता मी पुन्हा जॉब स्वीकारण्याचा विचार करत असताना मला कोणीही विरोध मात्र केला नाही किंवा माझ्या विचाराला जरी पुष्टी दिली नाही तरी मी “हे करणे किती अयोग्य आणि अनावश्यक आहे” असेही म्हणून कोणी माझं मनोधैर्य खच्ची केलं नाही.

मी देना  बँकेच्या मुलाखतीला जायचे ठरवले होते पण जर नोकरी मिळालीच तर ती स्वीकारायची की नाही याबद्दल अजूनही मनात प्रचंड गोंधळ होता. ते काही दिवस अत्यंत विचित्र मानसिकतेत गेले. त्यातील एक विचार पक्का होता की पोस्टिंग जर जळगावला मिळाले तरच नोकरी स्वीकारायची.  माझ्या लहानग्या निरागस मुलीला जिला माझ्या सहवासाची अत्यंत गरज असताना तिला सोडून घराबाहेर काही काळासाठी पडणे मला नक्की जमेल का याविषयी मी मनातून खूप साशंक आणि धास्तावलेली होते त्यावेळी मला लग्नाआधीच्या माझ्या “नऊ आठ” च्या गाडीतील विवाहित मैत्रिणींची ही आठवण झाली. जॉब दहा ते पाच असला तरी घरून निघण्यापासून ते घरी परतेपर्यंतचा काळ १२ ते १४ तासांचा सहज होत होता म्हणजे जवळजवळ संपूर्ण दिवसच. त्यावेळी त्या माझ्या सख्यांच्या मनातली घालमेल जाणवली नव्हती पण आज जेव्हा मी त्यांच्याच ठिकाणी मला पाहत होते तेव्हा मात्र मी पार भांबावून गेले होते पण त्यातही मला एक आशेचा किरण असा दिसत होता की जळगावात नोकरी करण्यात माझ्या दिवसांच्या कितीतरी तासांची बचत नक्कीच होणार होती. नुसता वेळच नव्हे तर श्रम आणि त्यातून येणारा थकवाही त्या माझ्या ठाणे टु व्हीटी (सीएसटी) रोजचा प्रवास करणाऱ्या सख्यांपेक्षा नक्कीच कमी असणार होता.  विचार करून मेंदूचा नुसता भुगा झाला होता. स्त्रियांसाठी वेगळ्या वाटेवर जाणं हे नेहमीच किती कठीण होतं याची झलक जणू मी अनुभवत होते. विलास मात्र माझ्याबरोबर सतत होता. ही फार मोठी जमेची बाजू होती.

मुलाखतीच्या दिवशी तो माझ्याबरोबर आला होता. विलास आणि ज्योतिका ठाण्याला आईकडेच थांबले. मी मुंबईला बॅलार्ड पीअर्सच्या देना बँकेच्या हेड ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी वेळेवर गेले. मुलाखत अगदीच अनौपचारिक होती. माझा पाच वर्षांचा बँकेतल्या नोकरीचा अनुभव हीच माझी मोठी गुणवत्ता ठरली होती. काही अगदी जुजबी प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांनी,” तुम्हाला कुठे पोस्टिंग हवे?” विचारलं.  मी अर्थातच त्यांना “जळगाव.” असेच सांगितले. मग शुभेच्छा, धन्यवाद वगैरे औपचारिकतेचे आदान- प्रदान झाले आणि मुलाखत संपवून मी ठाण्याला संध्याकाळी परत आले. कधी एकदा ज्योतिकाला पाहते,तिला कडेवर घेते असं झालं होतं मला!  वास्तविक ठाण्याला तर ज्योतिका जवळ विलास, माझी आई, जीजी, बहिणी  सगळ्याच होत्या. काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं पण आपल्या मुलापासूनचा वियोगाचा काळ किती धाकधुकीचा असू शकतो याचीही झलक मी अनुभवली.

मला नोकरी करायचीच होती ती माझ्या स्वतःसाठी. त्याबरोबर इतर अनेक “स्व”ही होते स्वसुरक्षा, स्वबल, स्वतंत्र वर्तुळ, स्वावलंबन आणि त्याचबरोबर लग्नानंतर बदललेल्या परिस्थितीत मी हे सारं कसं काय करू शकेन, किंबहुना करू शकेन की नाही हे सारे प्रश्न मनाला शस्त्रधारी वेढा घालून उभे होते. “मी बरोबर” की “मी चूक” हेही मला ठरवता येत नव्हते.  त्याचवेळी ब्रुक बाॅन्ड कॉलनीतील माझी सखी पूनम माझ्यासाठी खूप आदर्शवत ठरली. “मानुधने” यांचं मारवाडी कुटुंब हे जळगाव पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एरंडोल गावचं. तिथे त्यांचं एकत्र मोठं कुटुंब होतं. पूनम आणि तिचे पती शरद मानुधने हे व्यवसायासाठी जळगावला राहत होते. माझ्यात आणि तिच्यात हे एक समान सूत्र होतं.  पूनम जळगावच्या “एम.जे” कॉलेजमध्ये झूलॉजी ची प्रोफेसर म्हणून नियुक्त होती. आम्ही दोघी एकाच वयाच्या. घर संसार, विस्तारित कुटुंबातील विविध नाती प्रेमाने आणि कर्तव्य बुद्धीने जीवापाड जपत प्राध्यापकीय जबाबदार पदही तितक्याच सक्षमतेने निभावणारी,संसारी आणि करीअरवाली अशी दुहेरी   कणखर स्त्री मी पूनम मध्ये सदैव पाहिली आणि आपणही का नाही “घर आणि संसार” या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळू शकणार? एक आतून आलेला आवाज मी ऐकला. “ही कसरत यशस्वी रीतीने पार करायचीच.”

काही दिवसांनी देना बँकेतून मला रितसर नेमणूक पत्र आले.  नवी पेठ जळगाव या शाखेत माझी नियुक्ती झाली होती आणि पंधरा दिवसाच्या आत मला स्वीकारपत्र  पाठवून नोकरीवर हजर व्हायचे होते.

३१ जानेवारी १९७६  रोजी देना बँक, नवी पेठ जळगाव इथे माझ्या आयुष्याचा आणखी एक अनोळखी टप्पा सुरू झाला पण या प्रवासात मी एकटी नव्हते.विलासचे संपूर्ण आश्वासक सहकार्य मला मिळत होतं आणि आई आबांसोबत(माझे सासु-सासरे) माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासाठी केव्हाही कुठेही हजर असणार होतं. जणू काही “भिऊ नको आम्ही आहोत पाठीशी “हा दिलासा खूप महत्वाचा असतो. नोकरी करणारी एक संसारी स्त्री म्हणून माझ्यासाठी या नक्कीच जमेच्या बाजू होत्या.

– क्रमशः भाग ५९

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगणे सुंदर करा – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जगणे सुंदर करा– –” ☆ सुश्री शीला पतकी 

जीवनाला आपण अर्थ द्यायचा असतो पु ल देशपांडेनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात हे लिहिले आहे निराश होऊन चालणार नाही जीवनाला आपण अर्थ द्यायचा असतो…जीवन आणि जगणे फरक आहे जगावं कसं ते आपण ठरवायचं आणि आपलं जीवन कसं असणार आहे ते परमेश्वर ठरवतो.आपल्या वाट्याला आलेलं जगणं आपण किती सुंदर करू शकतो याचा नेहमी विचार करावा हे सांगताना पुलंनी एक इतक सुंदर उदाहरण दिलेलं आहे….

पुष्प किंवा फुल म्हणजे काय तर स्त्रीकेसर आणि पुंकेसर आणि काही मुलायम पाकळ्या यांचा एक सुंदर पुंजका…. पण आपण त्याला अर्थ दिला… आपण त्याला पुष्प हे नाव दिल… फुल हे नाव दिलं आणि त्याच्याही जगण्याला अर्थ दिला..

प्रेयसीला दिलं की प्रेम प्रगट होतं… देवाला वाहिले की भक्ती प्रकट होते… कोटा ला लावले की रसिकता दिसते… आईच्या अंबाड्यात खोचलं की माया दिसते प्रेम दिसतं….!एका फुलाला आपण किती अर्थ दिले… तसेच जगण्यालाही द्यायचे जगण्याचे सार्थक करायचे…..!

अनेक महान लोकांनी आपल्या जगण्याला असेच अर्थ दिले आहेत बाबा आमटे यांनी महारोग्यांची सेवा करून आपल्या आणि त्यांच्या जीवनाला एक अर्थ दिला एक मोठं काम उभं केलं… सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना जवळ केलं अनाथांची माय झाल्या त्या आणि त्यांच्या आणि त्या मुलांच्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला…. अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी वेगळं काम उभं करून आपल्या जगण्याला अर्थ दिला…..ही खूप मोठी उदाहरण झाली…हे आदर्श आहेत….पण छोट्या छोट्या माणसांनी सुद्धा आपलं जगणं सुंदर केलं आहे ते आपल्या छोट्या छोट्या कामानी आपल्या निराशा झालेल्या जगण्याला काहींनी अशा वेगळ्या कामाने खूप चांगले अर्थ दिले आहेत….!

मालतीबाईंच्या नव्या सुनबाई आल्या घराच्या बाजूला थोडं अंगण होतं पण निरोपयोगी वस्तू टाकण्या पलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही सासू-सासरे सदैव घरात बसलेले आणि मग तक्रारीचे सूर लागलेले आनंद घेणं नाही आणि आनंद देणंही नाही…. सुनेने हळूहळू ती अंगणाची बाजू स्वच्छ केली.. कुजलेल्या कचऱ्याने पाल्या पाचोळ्याने ती जमीन सुपीक झालीच होती तिने काही छान झाडे लावली काही फुलांच्या वेली लावल्या.. घोसावळ्याचा वेल लावला…. भोपळ्याचा वेल लावला…खालच्या बाजूला भाजीपाला त्यांचे बी बियाणे टोचले… थोड्याशा पावसाने जमिनीतले सारे उगवून आले…वेल खिडकीवर चढले….काहीना मांडव घातले….सासू-सासरे कामात मदत करू लागले.. वेलींना फुल लागली भाज्या फुल यानी अंगणाची शोभाच वाढली…. सासुबाई फुल गोळा करून तिथल्याच कट्ट्यावर बसून हार करीत असत सासरे बुवा त्या कामात मदत करीत…घरात लक्ष घालणं कमी झालं तिथेच त्यांचा चहा पण व्हायचा आणि त्यांना वेगळा आनंद मिळायचा. हळूहळू त्या दोघांनी या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली घरचा भाजीपाला फुलं यांनी परड्या गच्च भरू लागल्या. शेजारपाजारी चार भाज्या जायच्या त्यांच्या जगण्याला अर्थ आला घरात विनाकारण किटकिट करत बसणारे सासू-सासरे आता पूर्णपणे बागेत रमले होते त्याना जगण्याचा सूर गवसला होता.

शालिनी काकूचे मिस्टर वारले एक मुलगी लग्न झालेली…. जावई म्हणाले चला सासुबाई…. पण बाई म्हणाल्या,”नको माझं घर मला बर आहे “…..1000 स्क्वेअर फुट जागेवरच  टुमदार  घर होते त्यांच्या आसपास एकेकटे राहणारी मुलं होती नोकरी करणारी शिकणारी…!शेजारी राहत असलेल्या मानसीने सांगितलं काकू तुम्ही सुगरण आहात कॉलनीत राहणाऱ्या मुलांना नाष्टाकरून द्याल का? त्यांनी  विचार केला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होतोय त्या मुलाना चांगलं खायला मिळेल… सकाळी रोज 25 /30 डिश नाश्ता होऊ लागला त्याची तयारी करणं सामान आणणं यामध्ये काकूंचा वेळ सुंदर चालला पैसे मिळायला लागले आपण काहीतरी छान करू शकतो याची जाणीव झाली  काकूंच्या हाताला चव होतीच लोकांचे पोरं इथे राहतात म्हणून मायेने  करायच्या मुल ही खुश होतीकाकूंची सकाळ सुंदर झाली माणसांची वरदळी वाढली पोरं अधून मधून काकूंना भेटायला येत असत संवाद वाढला ओळखी वाढल्या मुलांचे पालक आले की आवर्जून त्यांना भेटून जात… आत्मविश्वास वाढला… एकटे पण संपलं जीवनाला अर्थ आला… तो त्याने स्वतःच्या स्वतःच त्याला दिला!

याबाबत दोन पंख्याचा संवाद मला आठवला दोन पंखे एकमेकांना भेटले एक हिमाचल प्रदेशातला होता तो बंद पडला होता आणि दुसरा सोलापुरी सोलापुरी ने विचारले,” अरे तू बंद का पडलास?” तो म्हणाला,” अरे तिथे इतकी थंडी आहे, लागत नाही गरज नाही माझी आणि मला कोणी वापरत नाही”… सोलापुरी म्हणाला “माझं तसं नाही बाबा मी 24 तास चालतो कारण इथे सतत उन्हाळाच असतो माझे मालकाने फक्त तेल पाणी करायला येथे  आणले आहे.गड्या तू काहीच काम न केल्यामुळे बंद पडलास आणि मी सतत काम करतोय म्हणून मी चालू आहे लक्षात ठेव* थांबला तो संपला *कामात रहा रे म्हणजे आपोआप चालत राहशील”. मला त्या पंख्यांचा संवाद आवडला खरंच थांबला तो संपला सोलापुरी पंखा जास्त चालतो हेच खरे….गमतीचा भाग सोडा पण आपल्या आयुष्याला आपणच अर्थ आणायचा आहे आणि जगणे सुंदर करायचे जीवन देणारा तो आहे पण जगणे कसं हे ठरवणारे आपण आहोत हे लक्षात ठेवा… मग काय करा आजपासून एखादी नवीन सुरुवात जगायला बळ देणारी जगणं सुंदर करणारी…!

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझा शिक्षणप्रवास…” ☆ श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

??

☆ माझा शिक्षणप्रवास… ☆ श्री मेघःशाम सोनवणे

आमच्या काळात शाळा सुरू व्हायची तीच पहिल्या इयत्तेपासून. प्राथमिक शाळा म्हणायचे त्याला. पहिली ते चौथी शुद्ध मराठी माध्यम (मेडियम). मराठीचा पाया, गणिताचे पाढे पक्के व्हायचे ते येथेच. ‘ए बी सी डी’ ची ओळख पाचवी नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक (हायस्कूल) शाळेत गेल्यावरच व्हायची. तोपर्यंत मातृभाषा मराठी बऱ्यापैकी अंगवळणी पडलेली असायची व इंग्रजी आणि हिंदी फक्त एका विषयापर्यंत मर्यादित होती, ती ही इतर व्यवहारीक भाषा विद्यार्थ्यांना माहित व्हावी यासाठी. बाकी गणित, इतिहास, भुगोल, समाजशास्त्र, सर्व मराठी, मातृभाषेत असल्याने लवकर उमजत असे व पाया ही पक्का होत असे. यात शिक्षकांचा मोठा वाटा होता. शिकवण्यांचा सुकाळ ही तेव्हा आलेला नव्हता.

नंतर बालवाड्या आल्या. नंतर ज्युनिअर के जी, सिनियर के जी, आणि आता तर प्री नर्सरी, अंगणवाड्या… काही येत नसलं तरी कोट (ब्लेझर), टाय घालून शाळेच्या पिवळ्या रंगाच्या गाडीतून किंवा पालकांच्या गाडीतून रुबाबात शाळेत जाणारी मुलं भावी स्पर्धेत स्पर्धक होणार आहेत हे पाहून वाईट वाटतं. त्यांच्या फी भरण्यासाठी बहुतांश पालकांचं कंबरडं मोडतं.

आम्हाला तर पहिली दूसरी पर्यंत नाक ही पूसता येत नव्हतं. कोपरापासून मनगटापर्यंत (हे अवयव मोठं झाल्यावर समजले) नाकातून पाझरलेला द्रव वाळून कोरडा झालेला असायचा आणि त्याचे कुणाला वावगं ही वाटतं नसे. बहुतेकांच्या फाटक्या चड्डी (खाकी पॅन्ट) ला ठिगळंच असायचं, ते ही गोधडी शिवायच्या दोऱ्याने शिवलेले, त्यामुळे लांबूनच उठून दिसणारं, पण तरीही फाटकी चड्डी घातली नाही याचं समाधान असायचं.

आठवडाभर तोच पांढरा शर्ट आणि तीच खाकी पॅन्ट. फक्त रविवारीच ते धुतले जायचे. वर्षभर एकच जोडी. कधीकधी पुढच्या वर्षीही चालून जाईल म्हणून वाढत्या अंगाची (मापापेक्षा मोठी) घेतलेली. आता ढगळ वाटत असली तरी नवी असल्याचा आनंद आकाश ठेंगणे करून जायचा.

पायतान (चप्पल) हा प्रकार उभ्या गावातल्या मुलांना माहीतच नसायचा. कितीही लांब शाळा असू देत, पायपीट ही एकमेकांच्या साथीनं सहज शक्य व्हायची. शाळेची पुस्तकं म्हणजे घरातल्या आपल्यापेक्षा मोठ्या भाऊ किंवा बहिणीची वापरलेलीच आणि घरात तसं कुणी नसेल तर शाळेचं वर्ष संपण्याआधीच आपल्या पुढच्या वर्गातील मुलांच्या घरच्यांना सांगून निम्म्या किंमतीत ती पुस्तकं विकत व त्यातही घासाघीस करून घेतली जायची. तेव्हा आल्यासारखा सारखा सारखा अभ्यासक्रम (सिलॅबस) बदलायचा नाही त्यामुळे ही पुस्तके वर्षोनुवर्षे चालून जायची. यंदाच्या वह्यांतील उरलेली कोरी पानं काढून ती घरीच एकत्र शिवून नव्या वह्या तयार करून त्या वापरल्या जायच्या. कसणी असलेल्या पिशवीत वह्या पुस्तकं कोंबली की सूबाल्या करत पळत जातांना वाटेत काटे, दगड रुतायची केव्हा ते समजायचंही नाही.

अकरावी उच्च माध्यमिक ला कालीजात (काॅलेज) गेल्यावर पहिलं पायतान (चप्पल) घालायला मिळाली ती स्लिपर. काॅलेज ला गणवेश नसल्याने कुठलाही रंगाचे कपडे परिधान करू शकत होतो. माझे काका एस टी मध्ये वाहतूक नियंत्रक (कंट्रोलर) होते. त्यांना गणवेशासाठी खाकी कापड मिळायचे. ते शिल्लक रहात होते. त्याचे दोन शर्ट दोन पॅन्ट शिवून ते वर्षभर वापरले.

काॅलेज साठी मामाच्या गावाला राहून तेथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात काॅलेज ला प्रवेश घेतला. घरच्यांच्या सांगण्यावरून विज्ञान (सायन्स) शाखेत प्रवेश घेतला पण मोठे नामांकित काॅलेज असल्याने तेथे मराठी विषय सोडून सर्व विषय हायफाय इंग्रजी मध्ये शिकवले जात असत. आधीचं शिक्षण ग्रामीण भागात मराठी माध्यमातून झाल्याने हे इंग्रजी डोक्यावरून जात होते.

वर्षाच्या शेवटी परिक्षा काळात फक्त पंधरा दिवस काॅलेज राहिले होते व पंधरा दिवसांसाठी एस टी चा मासीक पास मिळत नव्हता म्हणून शेवटचे पंधरा दिवस दररोज पंधरा किलोमीटर सायकलवर येणे व जाणे केले.

परिक्षा संपली व परिक्षेचा आणि माझाही निकाल लागला. तीन विषय काठावर त्यात दोन विषयांना गुण वाढवून देण्यात येऊन (ग्रेस मार्क) पास झालो. येथे आपली डाळ काही शिजणार नाही हे लक्षात आल्याने बारावी ला गावच्या काॅलेजात प्रवेश घेतला पण नुकतीच घराची वाटणी झाल्याने घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणात वेळ घालवण्यापेक्षा एखादी नोकरी शोधावी असा विचार केला.

शिक्षण फक्त अकरावी असल्याने सैन्यात जावे असा विचार केला व बारावी मध्येच सोडून सैन्य भरतीसाठी परिक्षा दिल्या आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या सतराव्या वर्षी हवाई दल (एअर फोर्स) मध्ये भरती झालो. त्यानंतर बाहेरून बारावी ची परिक्षा दिली व उत्तीर्ण होऊन पदवी साठी कला (आर्टस्) शाखेत प्रवेश घेतला.

त्यावेळी सहामाही (सेमिस्टर) पद्धत होती व दर सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परिक्षेला यावे लागत असे. कला शाखेत वेगवेगळे विषय असल्याने प्रत्येक पेपरमध्ये खूप गॅप असायची. तेवढी सुट्टी मिळत नसे त्यामुळे काही विषय बाकी रहात असत. त्या विषयांचे पेपर पुढच्या सेमिस्टर सोबत देता येत असत. तेव्हाही काही विषय शिल्लक रहात. असे करत शेवटच्या सेमिस्टर ला पंधरा विषयांचे पेपर मला द्यावे लागले. त्यासाठी सकाळी आठ ते दहा पहिल्या वर्षाचे, बारा ते दोन दूसऱ्या व तीन ते पाच तिसऱ्या वर्षाचे पेपर असत. असे सुट्टीवर असूनही दिवसभर काॅलेज वरच रहावे लागायचे. अशा त-हेने एकदाची पदवी पदरात पडली.

यापुढे आताच्या शिक्षणाविषयी काय लिहावे. आताच्या पहिलीच्या पहिल्या वर्षाच्या इतकी फी ही न लागता आमचं पहिली ते पदवी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण पार पडलं आणि आमचं कुठंही घोडं अडलं नाही, मग आताच शिक्षणाचा एवढा बाऊ का केला जातो. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ते लवकर आत्मसात होते पण इंग्रजी भाषेला अवाजवी महत्त्व दिले गेल्याने सर्व गोंधळ झाला आहे. त्यात व्यावसायिक स्वरुपाच्या खाजगी शाळांचे पेव सुटल्याने परिस्थिती अजूनच अवघड झाली आहे.

हे स्पर्धेचे युग आहे हे मान्य आहे पण स्पर्धा ही स्वस्थ असावी, जीवघेणी नसावी. आणि यशस्वी होण्यासाठी भरपूर शिक्षणच पदरी असलं पाहिजे असे नाही, हे बऱ्याच उदाहरणांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले गेले तर त्यात पारंगत होऊन हमखास यश मिळू शकते.

या विषयावर लिहिण्यासारखे भरपूर आहे व बहुतेकांना याविषयी माहीत ही आहे त्यामुळे जास्त ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत न पडता लेखणीला विराम देतो व सर्वांना सुयश प्राप्त होवो ही सदिच्छा व्यक्त करतो.

©  श्री मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गाठोड्यातली भांडी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गाठोड्यातली भांडी” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गौरी गणपतीच्या सणासाठी जास्तीची भांडी काढली होती. तेव्हा वरच्या कप्प्यातलं एक गाठोडं आनंदला सांगितलं,

” खाली दे”

तो  हसतच म्हणाला,

“आई तुझ्या आठवणींचं गाठोडं का?”

“हो रे..तेच… खूप दिवसात बघितलं नाही..”

त्या गाठोड्यात मला मिळालेली अनेक भांडी मी ठेवलेली आहेत. अगदी लहान वाटीपासून ते मोठ्या पाटीपर्यंत… गंमत म्हणून सगळी भांडी काढून बसले.

एका कुंड्यावर नाव  लिहिलेले दिसले. म्हणून नीट वाचायला लागले. तर त्यावर लिहिले होते…

चि. सौ. का.  मंदाकिनीच्या लग्नाप्रित्यर्थ श्री. देशमुख यांच्याकडून सप्रेम भेट….

गंमत अशी की ही मंदाकिनी कोण हेच मला आठवेना…. विचार करत होते…जिच्या लग्नाला मी गेले असणार.. जेवले असणार… मग कोण ही मंदाकिनी…खूप वेळा नंतर एकदम आठवले माझ्या मावस भावाच्या बायकोच्या बहिणीची मुलगी….तिच्या लग्नात मिळालेला हा कुंडा नाही का?

अशी कशी मी विसरले?नंतर ते मे महिन्यातल लग्न, जिलेबी चे जेवण आठवलं..

एकापाठोपाठ एक भांड्यांवरची नावे वाचायला लागले. कोणाकोणाच्या कार्याला मी गेले होते. आणि काय काय घेऊन आले होते.

पूर्वी काही कार्य असलं की घरातल्या मोठ्या बाईला साडी नेसवली जायची. सुनांना काही ना काही वस्तू म्हणजे बहुतेक वेळेस स्टीलची भांडी दिली जायची.  एक  एक भांड्यांचा जमाना असतो…

काही वर्षे अशी होती की कुठेही कार्याला गेले की कुंडाच मिळायचा. मोठा किंवा लहान.. कुंड्यांचे खूप प्रकार घरात लागायचे.म्हणून वापरायला काढले जायचे. जादाचे गाठोड्यात ठेवले होते.

काही दिवसांनी कॉपर बॉटमची फॅशन आली.त्याचे वेगळ्या आकाराचे कुंडे,छोट्या बादल्या,कढया आल्या..

नंतर झाकणाचे कुंडे.. ही कुंड्यांची फॅशन खूप दिवस टिकली.

चायना प्लेट बाजारात आल्या. काही लहान काही मोठ्या अशा प्लेट माझ्याकडे जमा झाल्या.

दोन कप्पे असलेल्या इडली सांबर प्लेट त्या पण  होत्या.

पावभाजी हा प्रकार फेमस झाल्यानंतर तीन कप्प्यांच्या प्लेट आल्या. त्याही गाठोड्यात आहेत.

लहान मुलांना जेवायला उपयोगी होईल असा चार कप्प्यांच्या जेवायच्या लहान ताटल्या.. त्या दोन-चार मिळालेल्या आहेत.

गंमत अशी की त्या डिशमध्ये ते ते पदार्थ कधी खाल्ले गेले नाहीत. त्या प्लेट गाठोड्यातच राहिल्या.

घरातले अनेक छोटे मोठे डबे मला कुणी ना कोणी दिलेले आहेत. डबे देताना प्रत्येक जण म्हणायचे,

” डबे काय ग.. किती असतील तेवढे लागतातच..”मग मी पण,

“हो हो..खरचं” अस म्हणायची.

ते कोणी दिले आहेत हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मनातल्या मनात मावशीचा,आक्काचा,ऊषाचा, ताईंचा..अशी त्या डब्यांना माझी नांवे आहेत.

मला एक चौकोनी डबा मिळाला. तो एकटाच कसा ठेवायचा? मग त्याच्या जोडीला मी अजून दोन डबे घेतले.

गाठोड्यात एका पिशवीत मी लहान लहान भांडी भरून ठेवली होती. छोटी उलथणी, झाऱ्या, वाट्या, निरांजन,छोट्या प्लेट,हे मला सगळे संक्रांतीला मिळालेले होते.त्यातील छोटी भातवाढी देताना अंजु म्हणाली होती की..

“या भातवाढीने इडली स्टॅन्ड मधून ईडली चटकन निघते.”

त्यानंतर मी शंभर वेळा इडली केली. पण एकदाही त्याचा उपयोग केला नव्हता.  त्या भातवाढी वरून  अंजूची आठवण आली. आज तिला  फोन करायचा  ठरवले.

लग्न होऊन आल्यानंतर खाली बसून स्वयंपाक करत होते. तेव्हा हाताशी नळ नव्हता.

स्वयंपाक करताना लागणारं पाणी ठेवण्यासाठी आईने दिलेली स्टीलची छोटी बादली माझ्याकडे अजून आहे…

राहू दे…अशा गोष्टी समोर बघून पण  आनंद होतो. तिच्याकडे बघितलं तरी आई आठवते….

हे स्टेट बँकेत नोकरी करत होते. बदलीमुळे अनेक गावे हिंडलो. गावोगावी घेतलेल्या भांड्यांची आठवण आहे.  उदगीरला असताना माझ्याकडे कामाला असलेल्या  सुभद्रा मावशींनी आनंदला दिलेला मोठा ग्लास घरी आहे. आज त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले..त्यांचे ते अकृत्रिम प्रेम आठवले.

घरी दोन कप्प्यांचा, कडी असलेला शाळेत न्यायचा आनंदचा  स्टीलचा ऊभा डबा होता. एकदा माझी मैत्रीण   सुधा आली होती. तेव्हा डबा  समोर होता.तो बघितल्यावर ती  म्हणाली,

” तुझ्याकडे हा डबा आहे?

” खूप वर्ष झाले..जुना आहे तो.”

ती म्हणाली,

” या डब्याची तुला आठवण सांगते. आमच्या वर्गात उषा वर्तक नावाची  श्रीमंत मुलगी होती. तिच्या एकटीकडे असा डबा होता. भाजी वरच्या डब्यात आणि खाली पोळी. आमचा छोटा डबा असायचा. खाली भाजी आणि त्यावर आई पोळी घडी करून ठेवायची. पोळीला भाजी लागायची.

” हो तेव्हा आपल्या सगळ्यांकडे तसाच छोटा डबा असायचा..”

” उषासारखा डबा आपल्याला असावा असे मला वाटायचे पण  वडिलांची परिस्थिती नव्हती ग.. तसे गरीबच होतो आणि त्यात आम्ही चौघं भावंड…”एवढे म्हणेपर्यंत तिचे डोळे भरून आले होते…

थोडा वेळ थांबून ती म्हणाली,

” आपले वडील जे घेऊ शकणार नाहीत तर ते मागायचं नाही.हा समंजसपणाचा शहाणपणा उपजतच आपल्यात होता.त्यामुळे आपण  कधी हट्ट केला नाही.”

“हो हे अगदी खरं…. आणि आहे त्यात आपण समाधानी होतो.”

आम्ही दोघी जुन्या गप्पात रंगून गेलो…

जाताना तो डबा तिच्या हातात  दिला.म्हटलं,

” हा घेऊन जा तु “

” अग खरचं…तु देतेस तर नेते… नाही म्हणत नाही..”

तिला खूप आनंद झाला होता…. तिने तो हळूच हातात घेतला..  डबा उघडला आतला कप्पा बघितला..  कडी हातात धरून ती तो डबा जाताना घेऊन गेली….. लहानपणी मनात असलेली गोष्ट आज अचानक तिच्या हातात आली होती….. तेवढ्याने तिचा जीव सुखावला होता… बरीच वर्षे ऊलटली तरी मनात अशा हळव्या आठवणी असतातच…

गाठोडं समोर ठेवून मी आठवणीत रंगले होते….

यातल्या भांड्यांचा वापरण्यासाठी उपयोग होऊ दे किंवा नको..

पण संसारातील ही भांडी आठवणींचा आनंद देतात हे मात्र नक्की…

माणसे दूर असतात.एकमेकांना वरचेवर भेटतही नाहीत.. पण मनात त्यांची आठवण असते. भांड्यांमुळे त्या त्या लोकांच्या आठवणींच्या खेळात मी आज चांगलीच रंगले होते.

लहानपणी भातुकलीची भांडी घेऊन खेळत होते तशी….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका पथिकाचे मनोगत… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ एका पथिकाचे मनोगत… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

सध्या ५१ वे वर्ष सुरू आहे. थोडक्यात वयाची पन्नाशी उलटली….., अर्धे आयुष्य जगून घेतले…..

मागे वळून पाहताना, अनेक गोष्टी आठवल्या, जाणवल्या…..!

काही घटना आयुष्यात तात्पुरते दुःख देऊन गेल्या, तर काही सुख देऊन गेल्या….

गेल्या हे मात्र खरे….

घटना घडतांना मात्र त्या निघून जाणारं आहेत असे वाटले नव्हते….

त्यामुळे त्याचे त्यावेळी उचित असे सुखदुःख वाटले…

उपजत अंगी असलेले मानसिक धैर्य, घरातील संस्कार आणि आशावादी दृष्टिकोन यांमुळे आयुष्यात फार कमी वेळा निराश झालो…

यात माझे मोठेपण आहे असे मात्र अजिबात नाही….गोष्टी घडत  असतात, तशा त्या घडत गेल्या असे म्हणता येईल….

थोडी समज आल्यावर त्या घटनांचा मी साक्षीदार होऊ लागलो….

– – आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार होणे खुप फायद्याचे ठरते असे लक्षात आल्यावर त्याचा उपयोग मी करू लागलो आणि वाढत्या वयासोबत मी अधिकाधिक निश्चिंत होत गेलो…..

खऱ्या साक्षीदाराला शिक्षा होत नसल्याने मी स्वतः ला कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले नाही….

त्यामुळे जीवनाकडे तटस्थपणे पाहता आले, जीवन आनंदाने जगता आले, खरे सांगायचे तर आनंदाने जगायला शिकत आहे…..

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेक माणसे भेटली…

अनेक प्रकारची भेटली, प्रत्येकाने विविध मार्गाने आणि संदर्भाने मला समृद्ध केले…

जे  मला सज्जन वाटले त्यांनी कसे वागावे हे शिकविले आणि जे मला दुर्जन वाटले त्यांनी कसे वागू नये हे शिकविले……

त्यातील माझ्या अल्पमती ला जे झेपले त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न मी करीत आलो आहे…

बालपणी संघाच्या शाखेत गेल्यामुळे माझ्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लागली आणि पुढे श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या सान्निध्यात आल्याने जीवनामध्ये तटस्थपणे पाहण्याच्या माझ्या स्वभावाला अधिक चांगले वळणं लागले…

कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, फळाची अपेक्षा आपण करू नये हे मला गोंदवल्यात जाऊन मला समजले…

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जशी नवनवीन माणसे मला भेटली तशी काही जवळची माणसे मला सोडून गेली…

माणसे सोडून जातात, काही देहाने पुन्हा भेटत नाही, तर काही मनाने दूर जातात….

ती जेव्हा जातात, तेव्हा दुःख होत, पण कालांतराने विधात्या ची इच्छा उचित होती हेच लक्षात येत, मग आपण त्यात फार गुंतून रहात नाही…

गुंता तसाही वाईटच….

मग तो

केसांचा….

नात्यांचा….

अथवा

भावनांचा….

आधीच्या विविध अनुभवांनी मी कधी कोणत्या गुंत्यात अडकलो नाही…

प्रेम जगावर केलं, पण कशातच गुंतलो नाही…. त्यामुळे अनेकांवर सारखे प्रेम करू शकलो…

आज पन्नास ओलांडले असले तरी मी स्वतःला तरुणच समजतो आणि तसेच जगतो….

आता कुठे पन्नाशी आली आहे.. अजून ७० वर्षे जगण्याची इच्छा आहे….

…. साठ वर्षे प्रपंचा साठी आणि बाकीची समाजासाठी…

पुढील साठ वर्षात स्वतःसाठी, वैयक्तिक लाभासाठी कोणतीही गोष्ट करायची नाही असा निश्चय आहे…..

जीवन आनंददायी आहे, ते आनंदाने स्वीकारले पाहिजे, म्हणजे मग ते आनंदाने जगता येते…..

आधी लिहिलेलं एक वाक्य पुन्हा

आपण जीवन आनंदाने जगायला सुरुवात करु, त्यासाठी जिवनात घडणारी प्रत्येक गोष्ट दिलदार वृत्तीने स्वीकारू म्हणजे प्रत्येक जीवनात घडणाऱ्या गोष्टीला प्रतिक्रिया न देता  आपल्याला प्रतिसाद देता येईल… 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ “मला भावलेलं इंग्लंड…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

मागच्या वर्षी मी आणि बायको, संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा पावसाळा हा ऋतु इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोलपंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर आपण जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदर करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रूप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन सुरु होतं, परतण्याचे…

 श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कादंबरी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ कादंबरी…  ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

काही काही साहित्य प्रकारांशी आपली एक वेगळीच नाळ जुळलेली असते. आता कादंबरी या साहित्यप्रकारचं नाव काढलं रे काढलं की मला आठवतात नववी दहावीतल्या मे महिन्यातल्या सुट्टीचे दिवस. मोठी सुट्टी आणि अभ्यासाव्यतिरिक्त फार काही करता येण्याचं ते वर्ष नसल्यामुळे थोड्याशा रिकाम्या वेळात काय करायचं तर पुस्तक वाचायचं. कारण टीव्ही तर आमच्याकडे मी अकरावीत जाईपर्यंत नव्हताच, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता.  मग आम्ही दिवसा अभ्यास करून दुपारनंतरच्या वेळात मात्र पूर्णपणे पुस्तक वाचण्यात घालवायचो. आजही मला त्या आठवणी खूप आनंद देतात. साधारणतः साडेचार-पाचच्या सुमारास सगळं आटपून, कार्ड पुस्तक असं सगळं घेऊन आम्ही आमच्या जवळ असलेल्या पॉप्युलर लायब्ररीमध्ये जायचो.

आजही मला ती लायब्ररी जशीच्या तशी स्पष्ट आठवते. याचं कारण म्हणजे अनेक प्रकारच्या कादंबऱ्या, कथा आणि इतर पुस्तकही पहिल्यांदा माझ्या वाचनात आली ती त्या लायब्ररीमुळे. ती लायब्ररी चालवायचा एक कॉमर्सचा कॉलेजमधला मुलगा. एका छानशा दुकानवजा जागेत त्यांनी आपली लायब्ररी नीट मांडली होती. त्या दादाचं नाव आता आठवत नाही परंतु खरंच वाचनाची अतिशय आवड असलेला आणि सभ्य म्हणावा असाच तो मुलगा होता. आम्ही लहानपणापासून त्याच्याकडे जात असायचो. पण कधीही वागण्या-बोलण्यात खोट जाणवली नाही. व्यवस्थित पुस्तक मांडून द्यायचा. नवीन पुस्तकं कुठली आली ते सांगायचा. हे वाचा, हे वाचू नका असा सल्लाही द्यायचा. आणि आम्ही सगळी लहान मुलं ते ऐकायचो. अगदी मोठी माणसंही त्याला विचारायचे की काय रे ही कादंबरी कशी आहे? हे पुस्तक कसंय? कारण त्या मुलाला वाचनाची फार आवड होती. त्यामुळे बहुतांश पुस्तक त्यांनी वाचलेली असायची. त्याकाळी आम्हाला त्याचे याबाबतीत भयंकर कौतुक वाटायचं. दादाची सगळी पुस्तकं वाचून झालेली असतात. मोठं झाल्यावर त्या दादासारखं आपणसुद्धा भरपूर पुस्तक वाचायचं असं आमच्या मनात यायचं.

तर तो दादासुद्धा प्रयोगशील होता. उत्साही होता. एखादा नवीन कथासंग्रह, कादंबरी व कुठलेही पुस्तक येणार असेल तर तो आपल्या साध्या पुठ्ठ्यावरती स्केचपेनने मोठ्या पण सुवाच्च्य अक्षरात त्याची आगाऊ सूचना लिहायचा. आणि ती लिहितानासुद्धा त्याची क्रिएटिव्हिटी झळकत होती. अर्थात तेव्हा आम्हाला क्रिएटिव्हिटी वगैरे काही कळत नव्हतं. परंतु तो काहीतरी गमतीशीर पद्धतीने लिहितो याची नोंद मात्र घेतली जायची.

उदाहरणार्थ सुहास शिरवाळकर हे त्याकाळी अनेक तरुणांचे दिल की धडकन म्हणावे असे आवडते लेखक होते. तर हा त्यांची पुस्तकं येणार असेल तर सु.शि. उद्या चार नंतर असं पुठ्ठ्यावर लिहून टाकायचा. याचा अर्थ सुहास शिरवळकर यांचं नवीन पुस्तक उद्या चार नंतर वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. मग सगळेजण नंबर प्रमाणे आपला क्लेम लावून ठेवायचे. त्या काळामध्ये नवीन पुस्तकाची जी क्रेझ होती जी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली तशी आज कुठेही पाहायला मिळणार नाही. लोक अक्षरशः चार वाजता त्याची लायब्ररी उघडण्याची वेळ होण्याआधीच जाऊन रांगेत उभे राहायचे. आणि आपण पहिला क्लेम लावला असेल तर ते नवकोरं पुस्तक हातात घेऊन त्याचा वास घ्यायचे. आणि मग घेऊन जायचे. त्यावेळेला तो अगदी नेहमीप्रमाणे सगळ्या सूचना न कंटाळता पुन्हा रिपीट करायचा. काका नवी प्रत आहे. त्याला तेला-तुपाचे, चहा-पाण्याचे कसलेही डाग नकोत. जशी कॉपी स्वच्छ कोरी नेत आहात तशीच कोरी आणून द्या. नाहीतर दंड पडेल. आणि मग समोरचा माणूसही उत्साहाने हो हो नक्कीच असं म्हणून ती प्रत व्यवस्थित सांभाळून घेऊन जायचा. आणि सांभाळून आणूनही द्यायचा. क्लेम वरून कितीतरी वेळा भांडणंसुद्धा व्हायची की एकाच दिवशी दोघेजण क्लेम लावायचे. मग त्यावेळेला तो निर्णय घ्यायचा की ज्यांनी क्लेम आधी लावलाय त्याची वेळ बघायचा. त्या लायब्ररी कार्डवर वेळपण लिहिलेली असायची. आणि मग ज्याची आधीची वेळ आहे त्याला अर्थात दिलं जायचं. वाचनावरून आवडत्या लेखकाच्या पुस्तकावरून पुष्कळ वाद निर्माण व्हायचे. पण तो कायम हसतमुखाने काका, काकू ताई, माई, दादा असं प्रेमाने बोलून सगळ्यांचं समाधान करायचा. बहुतेक जण त्याच्या बोलण्यावरच खुश असायचे.

माझी वाचण्याची आवड लक्षात घेऊन तो मला सांगायचा की हे वाच, ते वाच आणि मी आईला विचारून ते वाचायचे. कारण आपण काय वाचतोय हे घरी कळणं आवश्यकच होतं, तसा दंडक होता. त्यावेळेस मी पुष्कळ कादंबऱ्या वाचल्या पण अर्थात त्या सगळ्या आपल्या नेहमीच्या पठडीतल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या होत्या. ऐतिहासिक व्यतिरिक्त पहिल्यांदाच काहीतरी वेगळं वाचण्याचा योग आला तो सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीमुळेच. म्हणजे मला एक वेगळीच कादंबरी हवी होती मला आता नक्की कोणाची हवी होती ती आठवत नाहीये. पण ती आली नव्हती अजून वाचायची राहिली होती म्हणून त्यांनी पुन्हा तीच कादंबरी परत नेली होती. मग आता माझं आधीचं वाचून झालं होतं काय वाचावं? तेव्हा दादा मला म्हणाला की सु.शिं.ची वाच ना. बघ आता जस्ट येऊन गेली आहे आणि लकीली यावेळेस कोणाचा क्लेम नाहीये तर वाचून बघ कसं वाटतंय. मी पुस्तक हातात घेतलं पण ऐतिहासिक आणि थोडसं काहीतरी प्रेरणादायक असं वाचण्याची सवय असणाऱ्याला एकदम सुहास शिरवळकर हातात घेऊन वाचावं असं कसं वाटेल? तरी पण उत्सुकता मात्र होती की इतके सगळेजण त्यांच्याबद्दल बोलतात तर एकदा वाचायला हरकत नाही आणि मग मी ती घेतली. तेव्हा सुहास शिरवळकर कळण्याचं तितकं वय नव्हतं पण तरीसुद्धा ती घेतली. कारण त्यावेळेस त्याची इतकी चर्चा असायची म्हणजे अगदी असे संवाद घडायचे, “काय तू सुशिंचं हे वाचलं नाहीस?? व्यर्थ आहे तुझं जीवन गड्या!” त्यामुळे आपणसुद्धा एकदा वाचलं पाहिजे असं वाटून मी लागोपाठ दोन कादंबऱ्या वाचल्या.‌ त्यातली पहिली अर्थातच बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध ‘ दुनियादारी ‘  आणि दुसरी होती ‘ हृदयस्पर्श..’.

…. जेव्हा मी या कादंबऱ्या वाचायला घेतल्या त्या वेळेला कादंबरी लेखनामध्ये काय प्रचंड ताकद असू शकते आणि लोक सु.शि. सु.शि म्हणून का वेडं होतात हे मला पहिल्यांदा कळलं.  त्या कादंबरी नंतर मी सुहास शिरवळकर यांची फॅन झाले. मात्र वाचन झालं नाही कारण नंतर दहावी मग परीक्षा आणि मग पुढे कॉलेज त्यानंतर तर वेगळ्याच प्रकारचे लेखन वाचायला लागले. वैचारिक आणि अभ्यासाच्या दृष्टीने संदर्भ देणाऱ्या लेखनावर माझा भर होता. परंतु त्या कादंबरीने आजही माझ्या मनात एक घर केलेलं आहे. निवांतपणे सुट्टीत बसून दोन दिवसात कादंबरीचा फडशा पाडून झाला होता. त्यावेळेला फक्त वाचण्याची आवड होती. लेखन फारसं आवडत नव्हतं, त्यामुळे तिच्याबद्दल फार काही लिहिलं गेलं नाही. मात्र तिच्या मधल्या ज्या शेरोशायरी होत्या त्या मी एका वहीमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्यामुळे नंतर कितीतरी दिवस ते पुस्तक  परत केल्यावर त्या ओळींवरनं मी हात फिरवायचे. फार सुंदर कादंबरी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असेल.

त्यानंतर पुष्कळ वाचन घडत गेलं व मध्ये अनेक वर्ष वाचनाचा संपर्क पूर्णपणे तुटला. म्हणजे अगदी शून्यच होता. आणि आता पुन्हा सुरू झाला. पण आजही कादंबरी म्हणलं की मला सर्वात प्रथम “हृदयस्पर्शी “आठवते …. का कोण जाणे…

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंधेराची खोली… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ अंधेराची खोली… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

सतत रिमझिमणारा पाऊस नि काळंभोर आभाळ..चराचराला अंधारून टाकणारं..

त्यातलाच थोडा अंधार मनातही शिरतो नि वर्तमानातून थेट  भूतकाळात नेतो…

.. पंधरा-वीस कुटुंबियांना सामावणारं आमचं भलंमोठ्ठं घर..किंवा वाडा..जुन्या पद्धतीचा..

अंगण,ओसरी,सोपा,माजघर,स्वयंपाकघर,पडवी.. माडी..

माडीतल्या अनेक खोल्या…

.. दिंडी दरवाजाला पोटाशी धरत आगतांच्या स्वागताला सज्ज असलेलं भलं थोरलं प्रवेशद्वार…

प्रशस्त अंगण..

.. सारा भोवताल देखणा नि सुगंधित करणारी अंगणातली  सोनचाफा,तगर,पेरू सारखी वृक्षवल्ली..

.. स्वत: कुरकुरत… बसलेल्याला मात्रं  झुलवत स्वप्नांच्या राज्यात नेणारा  शिसवीचा लालसर काळा.. राजेशाही झोपाळा…

.. समईच्या मंद प्रकाशात दिव्यत्त्वाचं दर्शन घडवणारं सुरेखसं देवघर…

असे कितीतरी अलंकार अंगावर मिरवणारं आमचं घर…

पण  तरीही मला मात्रं आकर्षण वाटायचं ते.. “अंधेराच्या खोली ” चं…!!

माजघराला लागून  घराच्या उत्तरेच्या टोकाला असलेली ही  खोली…

तसं पाहिलं तर घरात असणारी तरीही सा-या  घरापासून  वेगळी…

” रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा “

अशी….

फारतर बारा  बाय तेरा फुटाची ही  काळोखी  खोली….

इथे  प्रकाश यायचाच नाही म्हणून हिला  असं  नाव पडलं होतं की  तिनं असच असावं म्हणून मुद्दाम हिला असच बांधलं गेलं.. ते माहीत नाही..

पण  जसं मला कळायला लागलं तशी ही  “अंधेराची खोली ” च..!!

या खोलीवर नेहमी मोठसं कुलूप मिरवत असायचं..

इथे सहजी कुणाला प्रवेश नसे..

” शशी, साखर काढ गं जरा अंधेराच्या खोलीतून..”..थोरल्या काकुच्या सांगण्यावरून आई अंधेराच्या खोलीत जायची नि तिच्यामागून मीही…

…… खोलीत शिरताना  पोटात गोळा यायचा..

याचं कारण आईची लाडकी ” हट्टी पुंडुची गोष्ट “…

आम्हा भावंडापैकी कुणी हट्ट केला की ही गोष्ट ठरलेली..

– – पुंडु नावाचा हट्टी मुलगा एकदा त्याच्या वाढदिवसादिवशी  हट्ट करतो.म्हणून त्याचे बाबा त्याला ” अंधेराच्या खोलीत” ठेवतात. त्या खोलीत विंचू,झुरळ असे प्राणी असतात.. त्यातला एक विंचू त्याला चावतो…

पुढची गोष्ट आम्ही आईला बिलगून ऐकायचो..

या गोष्टीनं  हट्ट  करायचा नाही हे आमच्या बालमनावर जितकं बिंबवलं त्यापेक्षा अंधाराची खोली भयानक असते,हे काळजात जास्त रुतून बसलं.

– – म्हणूनच एका बाजुला या बंद खोलीची उत्सुकता नि दुसरीकडे भीती वाटायची..

आईचा पदर धरून या खोलीत शिरलं की भस्सकन  थंडावा नि मिट्ट काळोख अंगावर यायचा..

एखादा उंदीर नाहीतर पाल पत्र्यांच्या डब्यातून वाट काढत खडखडत पळत जायची.

नि मी अजुनच आईला बिलगायची..

आईनं लावलेल्या मंदशा दिव्यानं खोलीचं अंतरंग उजळायचं..

भिंतीशी टेकून असलेलं भलंमोठं शेल्फ..त्यात ओळीनं लावलेले मोठमोठे डबे..पिपं,बरण्या..रोज न लागणारी जास्तीची भांडी…

वाणसामान,तेल,लोणची,वाळवणं..कांदे,बटाटे…समस्त संसार अवतरलेला..

शेजारी मोठ्ठं लोखंडी कपाट..

यात पलंगपोस,चादरी नि दागिने-पैशाचा मुद्देमाल असावा..

त्या कपाटाला लागून गाद्या नि उशांचा ढीग..

समोरच्या भिंतीशेजारी एक लोखंडी खाट…

भिंतीवर अनेक खुंट्या नि कोनाडे…

नि  एकुलती एक खिडकी..फक्त हवेला आत सोडणारी नि  प्रकाशाला अडवणारी..

आईचं साखर काढणं आणि माझं खोली डोळ्यात साठवणं एकाच वेळी संपायचं नि आमची दुक्कल खोलीबाहेर पडायची..

दिवसभर मला  उगीचच ” ऍडव्हेंचर ” केल्यासारखं  वाटत रहायचं..

…. अशी ही अंधेराची खोली…

या अंधेराच्या खोलीनं तिन्ही जावांना त्यांच्या मासिकधर्मात दरमहिन्याला त्यांचं माहेरपण केलं.

खोलीत येणारी आयती  चहा-कॉफी,जेवणाचं ताट..दुपारच्या वेळेत रंगलेल्या तिन्ही जावांच्या गप्पा, हास्यविनोद,सुख-दु:खांची देवाण-घेवाण या खोलीनं  अनुभवली..

तीन दिवस का होईना शरीराबरोबरच मनालाही आराम देण्याचं काम या अंधाराने केलं..

बाबा-काकांची कुटुंबाविषयी-धंद्याविषयीची महत्त्वाची बोलणी  याच खोलीनं ऐकली..

बायकामुलांना  कोणत्याही चिंतेची,काळजीची  झळ लागू नये म्हणून…!!

उन्हाळ्याच्या दोन महिन्यात गावठी,पायरी,हापूसच्या करंड्यांनी,पेट्यांनी इथच ठाण मांडलं नि  हिला  आंब्याच्या वासानं भणाणून सोडलं.

लग्न-कार्यात  हीच अंधेराची खोली लग्नाच्या तयारीनं,फराळाच्या लाडु-चिवड्यानं भरून गेली..

पाहुण्या म्हणून आलेल्या सुना-लेकींनी इथंच हसत-खिदळत  अंधाराच्या मदतीनं साड्या नेसल्या..

लग्नात आलेल्या आहेराच्या वस्तुही इथंच विसावल्या..

नि आम्ही भावंडे त्या वस्तू फोडून त्यावर कॉमेंट करत इथेच पोट धरून हसलो..तेंव्हा नेहमी गंभीर असणारी ही अंधेराची खोली आमच्याबरोबर  पोर बनून खिदळली..

आम्हा पोरांचे लपंडाव इथे रंगले..या खोलीनं तिच्या आधाराला गेलेल्याला कधी कुणाच्या नजरेस पडू दिलं नाही..

परीक्षेत कमी मार्क पडल्यावर किंवा एखादी स्पर्धा हरल्यावर  काळोखभरल्या  मनानं आम्ही भावंडे  हिच्याच आस-याला गेलो..

तिनं आमच्या दु:खाला मनसोक्त  वाहू दिलं..

अस्वस्थ  मनाला शांतवलं..

नि

गमावलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख देत  जगाच्या उजेडात  मायेनं पाठवणी केली..

आमच्या थोरल्या बहीणीनं म्हणजे आक्कानं तिच्या पहिल्या लेकराला जन्म दिला..

नि हॉस्पिटलमधून त्या माय-लेकरांची रवानगी थेट या अंधेराच्या खोलीत झाली.

बाज, पाळणा, शेक-शेगडी,वेखंड,गुटी,बाळाची पावडर,धूप या  बाललेण्यांनी  कधी नव्हे ती  अंधेराची खोली  गंधधुंद होऊन गेली..

नऊ महिने गर्भ पोकळीत विसावलेल्या त्या  बालजिवाला अंधेराची खोली काही वेगळी वाटली नसावी.म्हणूनच तो चिमुकला जीव न रडता शांतपणानं झोपून रहायचा..जणू भोवतालच्या काळोखाला  अफाट विश्वाची पोकळी समजून…!!

आणि  अंकुराला जन्म देऊन थकलेली त्याची माऊलीही आपल्या चिमुकल्याच्या भविष्याची स्वप्ने पहात त्या खोलीत निश्चिंतपणे विसावलेली असायची!

आयुष्याचा नुकताच श्रीगणेशा केलेला तो इवलासा जीव,त्याच्या बाललीला, पिल्लाला छातीशी धरून त्याला आयुष्यभराचा अमृताचा ठेवा  पाजणारी त्याची जन्मदात्री..

आणि या सोहळ्याला कुणाची नजर लागू नये म्हणून..काळोखाचा पहारा देत असलेली ती अंधेराची खोली…!!

काळाबरोबर  दिवस बदलले..

एका घराची तीन घरे झाली..

आमचं ते घरही वयोवृद्ध झालं..

त्याला  तिथच सोडून सारी पाखरं उडून गेली..

प्रत्येकानं आपलं नवीन घरटं बांधलं..नवीनसं..सुंदरसं..!!

जुनं घरटं आहे तिथंच आहे..

कुणीतरी येण्याची वाट पहात..

जुन्या आठवणी काढत..

अंधेराची खोली अजूनच म्हातारी झालीय..

तिच्या उरातला काळोख तिला सोसेनासा झाला की ती गतस्मृतीत रमते..

तिच्या कुशीत लपलेल्या आम्हा पोरांना आठवते..

आमच्या आया-काकवांच्या गप्पा,सासुबाईं-नणंदबाईंच्या कागाळ्या आठवून खुदकन् हसते.

बाबा-काकांच्या  गंभीर चर्चांच्या स्मृतीने स्वत:ही गंभीर होते..

नि  आक्काच्या लेकराचं रडणं स्मरून तिलाही पान्हा फुटतो..

…… आमच्या कुटुंबाची कितीतरी चांगली,वाईट,हळवी,गुलाबी गुपितं उराशी जपत ती आजही उभी आहे!

.. संधीकाळाचा  जिवाला घोर लावणारा क्षण असतो  किंवा  उदास सूर छेडणारा एखादा पावसाळ्यातला दिवस असतो..

.. नव-याबरोबर भांडण झालेलं असतं..

.. नाहीतर पराभवाच्या सावटानं मनाला पोखरलेलं असतं…

– – अशा हळव्या क्षणी ती अंधेराची खोली डोळ्यासमोर येते.. मनावर फुंकर घालते  नि वाटतं…

– – – घर कसंही असो..

नवीन..जुनं – लहान- मोठ्ठं – स्वस्त-महाग – साधसं नाहीतर अलिशान

.. पण प्रत्येक घरात एक अंधाराची खोली हवीच…

…. जगाच्या  फसव्या झगमगाटाचा कंटाळा आला  की कवेत घेणारी…

…. उदासीनतेच्या क्षणी आसरा देऊन अश्रूंना मोकळेपणाने वाहू देणारी..

…. घरात राहूनही  एकटेपणा बहाल करणारी..

…. काळीज आक्रसलं की तिचा  नि काळजातल्या  काळोखाचा संगम घडवून विश्वात्मक करणारी..

…. नि  काळजातला अंधार  स्वत:कडे खेचून बाहेर पडताना लख्ख प्रकाशाचे,आत्मज्ञानाचे नि  आत्मविश्वासाचे  दान देणारी… ज्ञानेश्वरांच्या  झोपडीसारखी..

आणि……

…. सा-या जगाने अपमानित केल्यावरही  स्वत:च्या मिठीत घेऊन  अंधारातसुद्धा  शतसूर्यांच्या लखलखीत  प्रकाशाने उजळून टाकून  अख्ख्या  विश्वाच्या कल्याणाच्या मागणीला…

पसायदानाला……

मुखातून  जन्माला घालणारी…

…… एक  अंधेराची  खोली..

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोगाची एक भावुक सत्यकथा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विलक्षण योगायोगाची एक भावुक सत्यकथा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. मराठवाडय़ातील लातूर या गावात!! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!!

त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले.

आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच!!!

त्या काळात त्यांनी जे मन लावून शिकवले, ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते, तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच!!

तर एके दिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी  मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते, आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे.

त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!!

कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

आणि ही ती कविता – –

चंदनाच्या विठोबाची

माय गावा गेली

पंढरी या ओसरीची

आज ओस झाली

कोनाड्यात उमडून

पडे घरकुल

आज सत्य कळो येई

दाटीमुटीतील

काही दिसे भरलेले

रित्या बोळक्यात

गवसले आजवर

जे न रांजणात

~ बी. रघुनाथ

© डॉ. धनंजय देशपांडे, (dd) लातूर  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares