मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी  ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी 

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ. विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला.

‘ तुम्हाला पु. ल. देशपांडेसाहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून, ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ‘ हो लगेच निघतो, ‘

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं’चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘ राहू द्या हो. माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं’बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली.

त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी मी केस कापावयास जात असे, तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार, यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘रुपाली’मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा. भाई जरा नाश्ता करतो आहे’, असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार, याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘चंद्रकांत, यांचे केस बारीक करून टाका, ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही, असे पाहून

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलीकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी’ का म्हणतात, याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे, त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत, ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका, ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘

त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशु ख्रिस्त वगैरे आहे की काय? ‘

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘एक आनंदाचं देणं’.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती:सौ. नीता गडकरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ह्यावर्षी ठरवलं

फराळाची बाहेर ऑर्डरच देऊ

नको ते गुढग्यांचे कुरकुरणे

नको खांद्याचे दुखणे

आणि नकोच ते घामाने निथाळणे

ह्या दिवाळीला अगदी फ्रेश राहू

स्वतःकडे जरा लक्ष देऊ.

*

तेवढ्यात मुलाने काढले फर्मान

आई चिवडा सोडून सगळं बाहेरून आण

म्हटलं, पटकन चिवडा करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नातू लाडाने म्हणाला

ए आजी, तुझे बेसन लाडू वर्ल्डमधे बेस्ट

कशी सांगू त्याला अरे माझी दुखतेय वेस्ट

म्हटलं ठीक आहे. लाडू तेवढे करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नात जवळ आली

तुझीच शंकरपाळी आवडतात, म्हणाली

शंकरपाळ्यांची तयारी केली सुरू

दुधावरच्या सायीला कसं नाराज करू

मनात म्हटलं बाकी सगळं मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात सूनबाई म्हणाली

आई लक्ष्मीपूजनाला करंजीची

तुम्हीच तर सवय लावली

मग काय लागले करंजीच्या तयारीला

घरच्या लक्ष्मीला नाराज करणे परवडेल का मला?

*

शेवटी सगळा फराळ करून झाला

सूनबाईनेही मला खूश करण्याचा चंग बांधला

माझ्यासाठी बॉडी मसाज बूक केला

आणि बघता बघता माझा थकवा दूर पळाला

*

पण खरं सांगू का तुम्हाला

फराळाचे भरलेले डबे बघून मीही झाले तृप्त

आता तुम्हीच सांगा मला

आईला होता येईल का हो कधी अलिप्त?

कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

चला विरक्ती आली,

दागिन्याची आसक्ती संपली…

या बाह्य सौन्दर्यापासून आता,

मुक्ती हवीशी वाटू लागली!

 

पण सुंदर दिसण्याचा विचार

डोक्यातून काही जाईना…

आणि दागिन्याची हौस मनाला,

स्वस्थ बसू देईना!

 

मग मी रामाकडे घेतली धाव,

म्हणाले, तूच यातून मला सोडव…

रामा तूच माझा सोनार हो…. आणि

माझे दैवी दागिने घडव!

 

चेहर्‍यासाठी माझ्या घडव

सुहास्याचा दागिना.

मुखावर माझ्या कधी

 न उमटो मनातली विवंचना!

 

कानासाठी माझ्या घडव,

तू असे सुंदर झुबे…

माघारीही माझ्याबद्दल

चांगलंच ऐकू येऊ दे

 

गळ्याभोवती माझ्या

असूदेत सतत

आप्तजनांचे हात

काय करायचेत आता मला,

चंद्रहार आणि पोहेहार?

 

पाटल्या बांगड्या यांनी आजवर,

शोभा वाढवली हाताची…

आता वेळ आलीय,

हात दानाने मोकळे करण्याची!

 

वेळोवेळी सजली माझी

मेखला, कंबरपट्टा यांनी कंबर…

आता तिची खरी शोभा,

ती ताठ आहे तोवर!

 

जोडवी अशी जड घडव,

की पाय जमिनीवरच राहतील…

आता सांग, हे रामा,

हे सारे दागिने केव्हा देशील?

 

दैवी दागिन्याची माझी मागणी,

रामचंद्र सोनारानं नोंदवून घेतली…

“जरा वेळ लागेल” असं म्हणत,

स्वत:ची भूमिका स्पष्ट केली

 

हसतच वदला रामराया…

“अहो, हे दागिने तयार नसतात,

कारण त्यांना तेवढी मागणी नसते..

पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,

घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,

एवढीच माफक अपेक्षा असते!

 

घडणावळीची काळजी नको,

कारण आम्ही ती घेतच नाही..

रामनाम चालू ठेव

दागिने लवकरच घरपोच होतील.

 

असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…

खरेतर हाच माझा छंद..

त्यासाठीच मी येथे उभा आहे…

तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पाहत…

 

कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे

 भक्तांना भयमुक्त करणे..

हेच तर माझे कर्तव्य….

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वच्छंद जगण्यासाठी वयाची मर्यादा नसते… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

स्वच्छंद जगण्यासाठी वयाची मर्यादा नसते… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते,

साठीत काय आणि सत्तरीत काय? माणसाने माणसासारखेच जगायचं असते.

स्वछंद जगण्यासाठी, वयाची मर्यादा नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ध्रु ||

*

मॅच्युरिटीच्या नावाखाली आपण करतो मिश्किल स्वभावाचा त्याग,

आतल्या आत झुरत राहते, ह्या विरहाची आग

केवळ लोकलज्जेखातर मनातली इच्छा मारायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || १ ||

*

मनसोक्त हसणारा तू,

आज फक्त गालातल्या गालातच हसतोस,

सुरांच्या मैफिलीत बसणारा तू

आज फक्त घरातच गुणगुणत बसतोस,

मनात वळवळणाऱ्या किड्यांची वळवळ

कोणाकरिता थांबवायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || २ ||

*

परफेक्षनिस्ट होण्याच्या हव्यासापायी

आपण फारच व्यस्त असतो,

छोट्या-छोट्या सुखांकडेही दुर्लक्ष करून बसतो,

चुका न होण्याची खात्री कुठल्याच वयात नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ३ ||

*

दादा, मामा, बाबा, आबा, असा चढत्या नात्यांचा आलेख

चाळिशीत हे शोभते का? साठीत असे वागावे का?

होतो अशा वाक्यांचा उल्लेख

वयाच्या आणि नात्यांच्या बंधनात फार अडकायचे नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ४ ||

*

व्यावहारिक जीवनाच्या साचेबद्ध चौकटीतच आपण फसतो,

दुसऱ्याच्या चष्म्यातून बघता-बघता, आपण आपलीच दृष्टी हरवून बसतो,

आपल्या जगण्याची दिशा दुसऱ्याच्या सांगण्यावरून ठरवायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ५ ||

*

एकदा अनुभवा तरी हे जग चौकटीच्या बाहेरून,

बिनधास्त जगा सर्व बंधन मर्यादा झुगारून,

मानवी देह मिळण्याची खात्री प्रत्येक जन्मात नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ६ ||

कवी: अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कदर…” – लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कदर…” – लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले. अरुण म्हणाला, ” किशोर, परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत. मुलं सासुरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात.. ”

”हो.. पण मध्येच कुठं निघाला आहात?  ” किशोरनं विचारलं.

”अरे, जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे. तापोळा, भिलार, महाबळेश्वर. चार पाच दिवस नाही आता” अरुण म्हणाला.

”मध्येच कसं काय ठरवलं?  तुमची प्राॅपर्टीची कामं झाली की नाही?  बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना!” किशोर म्हणाला. ‌त्याचा सूर ओळखून अरुण हसला. बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा…अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला.

”अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं. फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होतं असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर. सगळी क्रियाकर्मं… घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा! आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं.. मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे?  ”अरुण म्हणाला.

किशोर घरी आला. अनुराधानं अंथरुणं घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडं एकदा पाहिले नि ती पुन्हा मोबाईलमध्ये वाचण्यात बुडून गेली. आताशी अनुराधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय विसंवादसुध्दा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सारं. आपणच तिला हाडतुड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची. काहीतरी सांगायची. पण आताशी ती हे सारं टाळते, असं वाटतं.

”अनु…. ” त्यानं हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला केला.

”हं…बोला. ” त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा.

”आत्ता बाहेर अरुण भाटिया भेटला होता. शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत. चार पाच दिवस. जरा लक्ष ठेव, घराकडं म्हणत होता”

“बरं, ” असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला.

”का जाणार आहेत, विचारलं नाहीस?  ”

”मला माहीत आहे.. शर्मिलानं सांगितलं आहे मला. बाबांच्या आजारपणात, ते गेल्यावर तिला झालेल्या दमणुकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत. ” अनुराधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाकी वाटू लागलं.

गेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला. कशी रसरशीत होती!सगळं हौसेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं. आई इतकी रडली होती.. अनु मी फार त्रास दिला तुला, पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं. सतत तिला आईच्या उशा पायथ्याशी थांबावं लागायचं. अनुराधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधांच्या वेळा, जेवणातलं पथ्यपाणी, येणारी जाणारी माणसं.. त्यांचं अगत्य.. काही काही कमी केलं नाही तिनं. चार दिवस ताई माहेरी आली नि मग थोडी उसंत मिळाली तिला.

ताईला तिची कुचंबणा समजत होती. सतत आईच्या भोवती रहाताना आपलं बायको म्हणून किशोरकडं दुर्लक्ष होतं आहे, असं तिचं वाटणं.. मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा. ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला.

”वहिनी, तू आराम कर थोडा. दादा सोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासा विरंगुळा होईल तुला. ‌किती करावं लागतं तुला! खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ. ” असं तिनं सांगितलं.

बिचारी अनुराधा…! त्यादिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हाॅटस्अपवर मेसेज केला, ”आपण कुठंतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ. ”

किशोरला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं! लग्नाला वीस वर्षं झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणतेय. त्यानं उत्तर द्यायचीसुध्दा तसदी घेतली नाही. अनुराधा खूप वेळ उत्तराची वाट पहात होती. किशोरनं लक्षही नाही दिलं.

दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला, ” कशाला मला व्हाॅटस्अपवर मेसेज करतेस गं?  इकडं जाऊया नि तिकडं जाऊया.. ”

अनुराधा इतकी वरमली! त्यांच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती.. मग तिनं ओठ घट्ट मिटले. दोन महिन्यांत आई गेली. किती ताण आला होता अनुराधावर!आईचे दिवसकार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली. किशोर तिच्या फोनची वाट पहात होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती ऑनलाईन दिसायची, पण मेसेज बाॅक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. अनुराधा बोलली, पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली, पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं

आज अरुण भेटला नि हे सारं किशोरला आठवलं. ‌आपण अनुराधावर अन्याय केला काय?  त्यादिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं?  आणि तिच्या मेसेजेस बद्दल पट्कन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं.. तिला लग्न करुन आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काहीही मागायचं नाही.. आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का?  

एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही.. हे मनाची समजूत काढायला ठीक वाटतं; पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या. त्याची कदर करा. नाती जपा, ती कौटुंबिक असोत, मित्र मैत्रिणींसोबत असोत, सहकाऱ्यांसमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत. कदर करा. वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायलाही वेळ देत नाही नि नंतर त्याला अर्थ रहात नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो;कारण त्यांची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो, तो फार भयंकर होतो… वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात…ती फुंकर घालायला उशीर करु नका!

लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी

प्रस्तुती:सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

संवाद कुठे हरवले?

इकडे तिकडे शोधून पाहिले

नाही कुठे सापडले

अरेच्चा !

हे तर मोबाईलमध्ये जाऊन बसले.

*

बोटांना काम मिळाले

तोंडाचे काम कमी झाले

शब्द मुके झाले

मोबाईलमध्ये लपून बसले

 *

हाय’ करायला मोबाईल

बाय’ करायला मोबाईल

GM करायला मोबाईल

GN करायला मोबाईल

*

शुभेच्छांसाठी मोबाईल

भावपूर्ण श्रद्धांजली’ साठीही मोबाईल

खरेदीसाठी मोबाईल

विक्रीसाठी मोबाईल

नाटक, सिनेमांची तिकिटं मोबाईलवर

बस, ट्रेन, विमानाची तिकिटं मोबाईलवर

शाळा, कॉलेजची फी मोबाईलवर

डॉक्टरांची फी मोबाईलवर

*

वेळंच नाही येत आता दुस-यांशी बोलण्याची

बोलता बोलता चेह-यावरचे भाव टिपण्याची

वेगवेगळ्या ‘इमोजी’ धावून येतात मदतीला

दुधाची तहान ताकावर भागवायला

*

आता शब्द कानांना सुखावत नाहीत

आता शब्द ओठांवर येत नाहीत

आता शब्द कोणी जपून ठेवत नाही

आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही

*

मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही

प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही

आभासी जगातले संवादही आभासी

अशा संवादांचा आनंद नाही मनासी

*

या आभासी संवादांना मूर्त रूप कधी मिळेल का?

नक्की सांगा माणूस खरंच ह्रुदयापासुन संवाद साधेल का ?

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई, अजून तू मला हवी आहेस! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई, अजून तू मला हवी आहेस!” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आई,

ठाऊक आहे का तुला?

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड

तुझी चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छवास निरखताना,

किती धडधडते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

काही झालेलं नाही रे मला,

तू झोप… होईन मी बरी! ’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

आजही ह्या वयात

खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मला माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…

आठवते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर,

पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

दोस्तांबरोबर रंगवलेली

बाटलीभर मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते

रात्रदिव्याच्या मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

*

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून,

तेव्हा तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी? ’

असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा

तुझा सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज दरवेळी,

हे ठाऊक आहे तुला?

*

एखाद्या संध्याकाळी

“येताना पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!”

असे त्राग्याने म्हणतेस,

तेव्हा उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही!

 

आई…

अजून तू मला हवी आहेस.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही…  – लेखक : वैद्य सुविनय वि. दामले ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही…  – लेखक : वैद्य सुविनय वि. दामले ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.’

हे वाक्य प्रत्येकानं लक्षात ठेवायलाच हवं.

आणखी असंच एक वाक्य आहे, ‘हेही दिवस जातील.’

खूप मोठा अर्थ भरला आहे या वाक्यांमागे.

प्रसंग एक

दवाखान्यात एक माऊली आली. म्हणाली,

“गणेशजी येताहेत, पाळी पुढे जाण्यासाठी काही तरी उपाय सांगा. या वर्षी वरसल आमची आहे. घरात करणारं आणखी कुणीच नाही. कसं होणार सगळं ? त्यात श्री सत्यनारायण महापूजा देखील ठरवली आहे. आणि यांची कामं काही संपत नाहीत.मलाच  सगळं बघायचंय.”

 तिला हे वाक्य ऐकवलं,

“इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.” तिने एकदम चापकन माझ्याकडे बघितलं, म्हणाली,” अहो,पण कसं शक्य आहे? नैवेद्य कोण करणार ? साफसफाई, आवराआवर मीच करणार.”

म्हटलं,”एक वर्ष बाजूला शांतपणे बसून बघ. कसं होतं साळसूदपणाने ते.. सगळं अगदी साग्रसंगीत होणार नाही, पंचपक्वान्न होणार नाहीत, पण निदान वरणभात आणि गुळखोबर्‍याचा नैवेद्य तरी गणेशजींना मिळेल की नाही ? तेवढं नवरा करू शकेल; नव्हे त्याला करता यायलाच हवं. नाहीतर एवढ्या वर्षात काय शिकला ?”

म्हणाली,” तेही खरंच, कधीतरी करता यायलाच हवं. उद्या कुणाचा काय भरोसा ? आज आहे तर उद्या नसूसुद्धा… म्हणूनच एक वाक्य कायमचं लक्षात ठेवावं,

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.

प्रसंग दोन –

“मला लवकर ठीक करा, डाॅक्टर. कॅश काऊंटरची जबाबदारी माझ्यावरच असते. माझ्याशिवाय कुणाला काही माहिती नाही. जरा स्ट्राँग औषध द्या.”

त्यांना म्हटलं,

‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.

म्हटलं, तुला औषध लागूच पडलं नाही आणि उद्या तू बॅंकेत गेला नाहीस तर काय होईल?”

थोडा वेळ विचार करून म्हणाला,” कॅश काऊंटरवर दुसरा कुणीतरी क्लार्क येईल. काम थोडं सावकाश होईल, पण अडणार नाही…. बॅंक सुरूच राहील.”

“म्हणूनच म्हणतोय,

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.”

“खरं आहे” म्हणाला.

प्रसंग तीन –

“डाॅक्टर, आम्हाला मूल होत नाही.खूप प्रयत्न केले पण यश येत नाही.”

म्हटलं, “मूल कशाला हवंय ? काय फरक पडणार आहे त्याने ?”

“असं कसं म्हणता डाॅक्टर, एखादं मूल तर हवंच ना. पुढील पिढी निर्माण करायला हवीच.” ती म्हणाली.

मी विचारलं,

“आणि तुम्हाला मूल नाही म्हणून जगावर काय मोठ्ठासा फरक पडणार आहे ?”

“असाच विचार जर राजमाता जिजाबाईनी केला असता तर ?” तिचा प्रतिप्रश्न.

“त्यासाठी आधी तुला जिजामाता व्हायची तयारी ठेव.”

” आणि ज्यांना मुलं आहेत, ती कुठे समाधानाने जगत आहेत ?”

यावर ती दोघंही निरूत्तर.

म्हटलं,

” जेव्हा ईश्वर एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तिला सामोरं जायचं आणि स्वीकारायचं एवढंच आपल्या हाती असतं,

बाकी इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.

प्रसंग चार –

दवाखान्यातील स्टाफ म्हणाली, “मला एक दिवसाची रजा पाहिजे.”

“का, कशासाठी, कोणासाठी असल्या प्रश्नात मी स्वतः कधी गुंतून रहात नाही, कारण मला माहीत आहे, इथे कुणाचं कुणावाचून अडत नाही.”

रजा लगेच मान्य करून मी मोकळा होतो. दवाखानाही त्यादिवशी सुरळीत पार पडतो.

प्रसंग पाच –

दवाखान्यातील एका स्टाफला अचानक  कामावरून कमी करावं लागणार. अशी धर्मबाह्य कृती तिने केल्यावर जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, तिचे दवाखान्यासाठी झोकून देऊन काम करणं आठवलं.आपलं म्हणून काम करण्याची वृत्ती आठवली.तिचा सेवाभाव, तळमळ, संतुष्टपणा, डॅशिंग व्यक्तिमत्त्व या सर्वापेक्षा जेव्हा तिचा एक दोष ठळकपणे दिसू लागला, तेव्हा माझेच वाक्य मला आठवलं,

“इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.”

लगेचच तिला कामावरून कमी केलं. तिच्या जागी अन्य दुसरी एक मुलगी मिळाली देखील.

प्रसंग सहा –

आमच्यातल्या एकाच्या लग्नाचं निमंत्रण मला जाणीवपूर्वक दिलं गेलं नव्हतं. मनाला फार झोंबलं. रागही आला.मनाला समजावलं,’ तुझ्या न जाण्यानं कुणाचं काही अडत नाहीये. लग्नाला तू गेला नाहीस, म्हणून लग्न लागणं थांबणार नाहीये. विनाकारण वाद वाढवून, तू उगाच स्वतःला नको तेवढं मोठं करवून घेतोयस.. तू नसलास तरी कुणाचं काऽऽही अडणार नाहीये.’पटलं… आणि विचारांची गाडी पुढे निघाली

प्रसंग सात –

चार पुरूषार्थावर आधारीत समाजरचना होती. मोक्षप्राप्तीसाठी जगायचं होतं.

आमच्या घरातील आजोबा, आज्जींची एक अख्खी पिढी स्वर्गस्थ होताना मी पाहिली आहे. त्यानी पुढील पिढीला दिलेले संस्कार, शिकवण घेऊन एक पिढी तयार झाली. कोणत्याही संस्कार वर्ग वा गर्भ संस्कार वर्गात न जाता घडलेली वडिलांची पिढीदेखील खूप उत्तम होती. आर्थिक दृष्ट्या चणचण असतानाही बारा चौदा बहिणभावंडे छान एकत्र नांदत होती. आयोडीनयुक्त नमक न खातादेखील बुद्धिमान होती. वारसा पुढे देण्याचे काम गुरूजींकरवी सुरू होते.

त्याहीनंतरची आमची पिढी तीन चार संख्येवर येऊन थांबली. आर्थिक सुबत्ता होती. पण एकमेकांना द्यायचा वेळ कमी होत गेला. नंतरची पिढी एक किंवा दोन बस्स पर्यंत घसरली. मार्कांचे परसेंटेज मात्र खूपच वाढले. गुरुजीचे रूपांतर सर आणि मॅडममध्ये झाले.  आईवडिलांचे एकत्रित मार्क मुलाला मिळू लागले. पण तोंडदेखलेपणा सुरू झाला. याच पिढीने मोबाईलचे वेड लावले. नातेसंबंध ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन जुळू लागले. आईवडिलांच्या इच्छेविरूद्ध शिक्षण आणि विवाह होऊ लागले. ग्लोबलायझेशन क्रांतीमुळे जग खूप जवळ आले; पण माणसे एकमेकांपासून मनाने लांब होत गेली. सर आणि मॅडमची जागा टीचरनी घेतली. संस्कार वर्ग आणि गर्भसंस्कार वर्ग सुरू झाले.

एवढे सगळे होऊनही जग पुढे जातच रहातं. कुणाचं कुणावाचून फार अडलेलं नसतं.  आपला खास व्यवसाय, कुटुंब काबीला आणि आपलं स्वतंत्र विश्व भिन्न जाती धर्मातही निर्माण होतं.

हे असंच चालायचं…

तसं बघायला गेलो तर

आपल्याकडील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ एकमेकांवर अवलंबून होते. पण काळाच्या ओघात हे सिलॅबसमधूनच गायब झाले.

प्रसंग आठ-

गणेशोत्सव काळात दोन्ही- तिन्ही दिवस दवाखाना सुरू ठेवावा का, असा विचार मनात आला, पण लगेचच विचार बदलला, याच काळात अनेक चाकरमानी कोकणवासीय कोकणात येणार तेव्हा ते माझ्या दवाखान्यात येऊन पुढील औषधोपचार माझ्याकडून ठरवून घेऊ शकतील, म्हणून दवाखाना बंद नको.

पण लगेचच दुसरा विचार आला, की मी माझ्या कुटुंबीयांसाठी माझा वेळ कधी देणार ? तो या निमित्ताने देता येईल, चार नवीन जुने चेहेरे दिसतील,  सुखदुःखाच्या गोष्टी करता येतील, अनेक भाऊबंध गोळा होतील, पारंपारिक भजनं, आरत्या, उसळीचा दरवळ, मोदकांच्या पंगती, चढ्या आणि खड्या आवाजात देवे म्हणणं, सगळ्याचा आनंद घेता येईल.

घरचे मोदक वळायला आणि इतर आवराआवर करायला दुसर्‍या तिसर्‍या पिढीतील माणसं येतच होती.

आणि दवाखाना बंद ठेवून, सणाच्या निमित्ताने घरच्या व्यक्तींसमवेत मिळून मिसळून रहावं हा विचार पण तसा चूक नव्हता. तसं बघितलं तर मी दवाखान्यात नसलो म्हणूनही माझे सगळे रुग्ण काही लगेच देवाघरी जाणार नाहीत, कारण इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.मी मदतीला नसलो तर गावातील, तालुक्यातील, जिल्ह्य़ातील अन्य वैद्य मंडळी आहेतच की…

मोदक करायला मी नसलो तरी मोदक करून होणारच. भजनाचा फेरही होणार, एकमागून एक पंगतीही उठणार..

जरा अहंकार सोडून बघा, किती मजा आहे, एकत्र रहाण्यात, जगण्यात !

आनंदी आनंद गडे

जिकडे तिकडे चोहीकडे

जगात भरला, दिशात उरला

मोद विहरतो चहुकडे.

जग म्हणतं, तू नाही आलास तरी चालेल, इथे कुणाचं कुणावाचून अडत नसतं. आमचा आनंद आम्ही घेणारच. 

जन पळभर म्हणतील हाय हाय

मी जाता राहील कार्य काय ?

जन पळभर म्हणतील हाय हाय…

इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.

जगाचं रहाट गाडगं तसंच पुढे सरकत असतं.

‘हेही दिवस जातील’असं म्हणत पुढे जात रहायचं असतं.

 

लेखक:वैद्य सुविनय वि. दामले

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

काल जे सोनं होतं

ते आज कचरा झालं

दसरा संपला अन्

महत्त्व त्याचं विरून गेलं||१||

 

अरेच्चा! कालच तर सोनं म्हणून

 देवाचरणी वाहिलं होतं,

सोनं घ्या, सोन्यासारखं रहा

एकमेकांस म्हटलं होतं||२||

 

कळलंच नाही मला,

असं काय झालं,

 हे कालच सोनं

आज कचरा कसं झालं? ||३||

 

आपट्यांच्या पानापानांसारखं

आपणही असतो

कोणाच्या तरी गरजेच्या वेळी

आपण त्याचं सोनं होतो,

त्याची गरज संपली की मात्र

आपणही बाहेर काढले जातो,

दसऱ्याच्या सोन्यासारखं

आपणही कचरा होतो||४||

 

कचरा झालाय आज म्हणून,

आपट्याच्या झाडानं हार मानली नाही,

पुढच्या वर्षी परत दसरा येणार आहे,

म्हणून पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही ||५||

 

मग आपण तर माणसं आहोत,

कोणी कचरा समजलं म्हणून खचून जायचं नसतं,

कोणाची तरी मदत करून

परत सोनं व्हायचं असतं,

आपण बावनकशी सोनंच आहोत,

 हे कदापि विसरायचं नसतं ||६||

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई गेली आणि माहेर संपले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई गेली आणि माहेर संपले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आई जोपर्यंत असते, तोपर्यंत कौतुक असते. आराम असतो. एक प्रकारचा निवांतपणा असतो. तिच्यावर आपले मूल सोपवून बहिणींबरोबर, मैत्रिणींबरोबर गप्पांचे फड रंगतात, भटकणे सुरु होते.

एक स्वातंत्र्य असतेच असते.

ते कुठेतरी हरवले हे मात्र खरे… आई गेली आणि त्या दिवशी हे माहेर संपले.

सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई….

तुपाची-लोणच्याची-आवडत्या गुळांब्याची बरणी भरून बाजूला काढून ठेवणारी आई….

सकाळी उशीरा पर्यंत हाका न मारणारी आई….

‘झोपा गं आता. खुसूखुसू करत बसू नका, ‘असे सांगणारी आणि अलगदपणे आपल्यामध्ये सामील होणारी आपली आई.

दुपारच्या सुखदुःखाच्या गप्पा. त्यात सुद्धा संसाराचे महत्त्व समजावून सांगणारी आई. तडजोडी करूनचं संसार करावा लागतो. तरच तो आनंदाने होतो, नाहीतर नाते तुटते. ते आपल्याला टिकवायचे आहे, तोडायचे नाही असे सांगणारी आई.

संसारात मन शांत ठेवावे.

भांडण तंटा झाला तर विसरून जावा.

नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावेत आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणूस बदलतो हे शिकवणारी आई.

दुपारी जेवण झाले की आडवे होऊन सांगणारी आई. मुलाला वाढवताना कसे वाढवावे हे शिकवणारी आई.

दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. तिची कितीतरी रूपे आहेत.

त्यानंतर हळू-हळू संसारात रमायला सुरुवात झाली आणि

‘माहेर’ ही जाणीव कमी होत गेली.

कदाचित स्वीकारले असेल मनाने.

‘ती’ गेली…. आणि‌ तिच्या बरोबर इतकी वर्ष असणारी मावशी, मामा, भाऊ ही माहेरची म्हणून आपली असणारी नातीही गेली. पुसली गेली आपल्या आयुष्यातून.

जिच्यामुळे ती जोडलेली होती तिच्या जाण्याने ती नाती पण कुठेतरी हरवली आणि मागे राहिले एकटेपण..

जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षाने जाणवायचे.

आजूबाजूच्या मैत्रिणी, मुलीबाळी

माहेरी जाताना बघून आत कुठेतरी तुटायचे, वाईट वाटायचे. आपल्याला असे ठिकाण राहिले नाही, म्हणून वाईट वाटायचे.

पण हळूहळू माणूस सगळ्या गोष्टी स्वीकारतो. मुले मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते. आता मे महिन्यात जाणवणारा एकटेपणा, माहेर नसल्याचे दुःख कमी झाले आहे. तरी सुद्धा कुठे तरी आत त्याचा सल आहेच.

लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी, पण प्रत्येकीला एक हक्काचे माहेर मात्र असावं, असे मला कायमचं वाटत आले आहे.

तो जिव्हाळा, आपलेपणा, कौतुक, डोळयांतलं प्रेम, आराम, ती ऊब, काळजी, कुठेतरी हवीहवीशी वाटत असते. उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा आनंद हरवलाय एवढे मात्र खरे. ‘मामाच्या गावाला जाऊया’, ही संकल्पना हळूहळू लुप्त होऊ लागलीय.

माहेरी गेले होते गं महिनाभर…

हे कुणाला तरी आनंदाने सांगायचे राहूनच गेले आहे. कित्येक वर्षात.

आई वडील आहेत, तोवर त्यांना जपा, एकन्एक दिवस सगळयांनाच जायचे आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares