खिशातून ५०रुपयांची एक नोट जरी पडली तरी कावराबावरा अन् बेचैन होणारा माणूस आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी, त्याच्यात परिवर्तन येत नाही, बिनधास्तच वागतो! काय दुर्दैव आहे!
स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही!
माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत!
तर चला, उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया!
पासबुक आणि श्वास बुक. दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.
म्हणून
`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.
आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?
जीवनाचे सार:
जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.
रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.
रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही.
ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.
बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.
ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.
मित्रांनो, जीवन सुंदर आहेच, फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत, तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : प्रफुल्ला शेणॉय
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ प्रस्थान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
☆
माझ्या घरासमोर एका बंगल्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. सिमेंट, लाकडं, विटा येऊन पडत होत्या. एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात दोन महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक हडकुळे ३ वर्षाचे पोर ओढल्यागत चालत होते. आल्या आल्या बाईने बंगल्याच्या आवारात दोन लाकडी खांबांना जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. शेजारी बंगल्याचे बांधकाम वेगाने सुरू झाले. ती दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.
जाता येता मी त्या परिवाराशी बोलत असे. कधी चॉकलेट-बिस्किटे, नाश्ता देत असे. सिमेंट रेती विटांचे काम सुरू होते. बघता-बघता बंगला उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही ऊन्हातान्हात दगड-वाळूत खेळू लागले. पुढे पावसाळा सुरू झाला, तशी तिची रवानगी बंगल्यातल्या अर्धवट बांधलेल्या खोलीत झाली. मी तिला, तिच्या नव-याला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा कंत्राटदार दोन-चार दिवसांत कधीतरी यायचा. मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी उगवायचा. एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे. सगळ्यांची अस्सल मातीशी बांधिलकी. मुलं दगडामातीत ऊन- थंडी- पाऊस झेलत खेळायची. पण कधी आजारी पडली नाहीत.
आमच्या बोलण्यात माणूस गप्प असायचा. ती मात्र मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची. हळुहळू बंगला पूर्ण झाला. मग प्लास्टर. लवकरच बंगल्याला आतबाहेर सुंदर रंग दिला गेला. बंगला छान सजू लागला.
एक दिवस मी सहज खिडकीबाहेर पाहत होतो. त्या घरासमोर ट्रक आला. त्यात कुदळ, फावडे, टोपल्या असे सामान होते. ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या मुलाला ट्रकमध्ये उभे केले, तीही नव-यासह ट्रकमध्ये चढली. ट्रक निघाला! जेव्हा तो ट्रक आमच्या घराजवळून जाऊ लागला तेव्हा मी धावतच जाऊन तो थांबवला. तिच्या डोळ्यात पाणी होते. ट्रकच्या आवाजात ऐकू येणार नाही, असं वाटून ती ओरडून म्हणाली, ‘दादा, आमचा मुक्काम संपला. येते जी मी! ‘ मला तो धक्का होता. मी ओरडूनच विचारले, ‘का हो, असे अचानक चाललात? ‘ तिचे हसून उत्तर आले, ‘मालकाचा निरोप आलाय. नव्या साईटीवर काम सुरू होणार आहे. आता तिथे बघायला नको का? ‘ तिने मायेने हात हलवला. आणि ट्रक दिसेनासा झाला.
मी सुन्न होऊन बघतच राहिलो…
एखाद्या सुगरण पक्षिणीने गवताची एकेक काडी गोळा करून खोपा विणावा, तसे तिने जीव ओतून घर बनविले. तिला कधी आपलेही घर असावे असे वाटत नसेल का? कसे यांचे जीवन? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमले उभारायचे. ऊन्हा-तान्हात पोरं वाढवायची. घर पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे! जवळजवळ वर्षभर ती बाई ज्या घरात राहिली, तिचा संसार फुलला, जे घर तिने इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ती चालली होती. कसला मोह नाही, लोभ नाही, तक्रार नाही. आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला.
मनात विचार आला…
जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का?
तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का?
जे मिळविले, निगुतीने सजविले, ते तसेच सोडून जावे लागणार नाही का?
त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही दुसऱ्या साईटवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते? अगदी एक क्षण, एक श्वासतरी जास्त मिळतो का कुणाला?
सर्वांना जावेच लागते की! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का?
एकदा अवश्य विचार करून पहावा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अवयवांची गंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
०१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.
०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.
०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.
०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता.
०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.
०७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात. तो अधिकार मला का नाही? “त्यावर पाय हसून म्हणाले, “त्यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही. “
०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!
०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.
१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? ” त्यावर हारातील फुले म्हणाली, ” त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. “
११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लावतो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆
☆
भाऊ-बहिणी म्हणजे केवळ नातं नसतं…
त्या आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खी भावंडं नाहीत तर चुलत, मावस, मामे, आत्ते सर्व भावंडांसाठी हे खरं आहे.
आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ… अशी पुसटशीसुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही.
मोठे होत गेलो तसे आयुष्याला पंख फुटले…
स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले, आपापल्या संसारात रमलो, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्षं सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ-बहिणींच्या भेटी ‘कधीतरी’ या शब्दात अडकून राहिल्या.
आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात…
आमचे आई-वडील हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले.
ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं.
नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो… हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत, आणि आजूबाजूची नाती एकेक करत कमी होत चालली आहेत आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते.
मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं… जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली, तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू…
असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.
होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेलं असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान-सन्मान, यश सगळं मागे पडतं.
जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल, गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहिणीच सर्वात जवळचे लोक असतात.
मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात… मुलं मोठी होतात… तीही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा हाताला हात हवा असतो, तेव्हा खर्या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ —
तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहीण-भाऊ…
आपण कितीही म्हातारे झालो, तरी सर्व भाऊ-बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.
त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही.
त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच, वृद्धापकाळ येण्याआधीच…
कृपया, आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या, नाती जपा! कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात.
भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही… भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असले पाहिजे.
अशी कोणतीही गाठ नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही.
अशी कोणतीही ढाल नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही.
भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत, कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये.
थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडं अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणीचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील… कारण या जगात, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत.
शेवटचा प्रश्न…
एकुलते एक मुलं lucky की lonely?
आपल्या सोयीसाठी आजची पिढी स्वातंत्र्य, करिअर, आर्थिक सुरक्षितता, आरामदायी जीवन यांचा विचार करते…
परंतु भविष्यातील माणसं जगात येऊ न देणं… हे खरंच योग्य आहे का…?
समाज हळूहळू एकाकी, स्वार्थी आणि नात्यांपासून दूर जात तर नाही ना?
मुलं म्हणजे आपल्या जीवनाचा पुढचा अध्याय.
पण कधी शांतपणे आपण स्वतःला विचारतो का?
आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचा हिशोब आपण भरू शकणार आहोत का?
आपण मागे काय सोडून जाणार आहोत?
आपण ज्या Western world ची आंधळी नक्कल करतो, तोच पश्चिमेकडचा समाज आज पुन्हा ४–५ मुलांना जन्म देण्याकडे वळतोय.
कारण त्यांनी अनुभवलेय –
मोठी घरे, प्रचंड पैसा, प्रगत सुविधा असूनही त्यांच्या मुलांचं आयुष्य एकाकी, नैराश्यग्रस्त आणि संस्कृतिहीन होत चाललं आहे.
ते आता म्हणतात —
“We lost families in the race for freedom. ”
आपण इथे आहोत, कारण कुणीतरी आपल्याला जन्म देण्याचं धाडस केलं.
हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी दुष्काळ, रोगराई, युद्ध, गरीबी, अपमान, कष्ट अशा कितीतरी संकटांना तोंड देऊन आपल्याला जगवले.
आज काही जोडपी जाणीवपूर्वक “मुलंच नको” असा निर्णय घेत आहेत.
पण हा निर्णय फक्त त्या दोन व्यक्तींचा नसतो…
तो परिणाम करतो सर्व समाजावर, आपल्या गौरवशाली संस्कृतीवर आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांवर…
कृपया आजच्या आपल्या संस्कृतीच्या शिलेदारांनी शांत मनाने सारासार विचार जरूर करावा…
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆
चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. या तारखेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी ‘चैत्रांगण’ काढली जाते.
गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धन संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही सारी काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान! . योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान.
शिव-पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, “ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट. “
पार्वती म्हणाली, “अहो हे सुंदर विश्व? “
शिव म्हणाले, “साफ खोटं, आभासी आहे हे. “
“विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती?
तेही असत्य?
बरं. मग आपण खातो ते अन्न तरी? “
“तेही खोटं, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्मतत्त्व सत्य! “
झालं …. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली, “बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं. बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते. “
गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्त्विक सौंदर्य विरले, आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्यसुद्धा अकस्मात संपले.
शिवांना वाटले, हरकत नाही. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशुपक्षी, सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले.
महादेव म्हणाले, “थांबा. तुम्हाला जरा ज्ञान देतो. ” पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म? कसलं ज्ञान?
“आधी अन्न द्या. मग पुढचं बोला. “
पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं, ” संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे. तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.
“ओम भवति भिक्षां देही|”
आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, ” महादेवा, भिक्षेत काय देऊ? ज्ञान की वैराग्य?
महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे, मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र, वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जिवाला अन्न देऊन तृप्त करते आहे.
प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, “ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे!
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।”
पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होताच जगातले सगळे जीवदेखील तृप्त झाले.
त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, ” तू सदाशिवालासुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. “साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.
ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवरदेखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती. परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते? ” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.
या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.
स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।
दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥
पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.
शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।
लेखक: श्री विनय मधुकर जोशी
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “श्री एकनाथ महाराजांचे एक भारुड” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
श्री एकनाथ महाराजांचे एक भारूड – निरुपणासह:
चिंचेच्या पानावर देऊळ रचिले,
आधी कळसू मग पाया रे ।
देव पुजू गेले तव देऊळ उडाले,
खेळिया सद्गुरुराया रे ।
पाषाणाची सांगड मृगजळ डोही,
वांझेचा पुत्र पोहला रे ।
दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली,
मुखाविण पाणी प्याली रे ।
आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले,
पांगळ्याने पाठलाग केला रे ।
एकाजनार्दनी एकपणे विनवी,
हरिच्या नामे तरलो रे ।।
अर्थ:
चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे आईचे उदर. त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह, त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजेच चिंचेच्या पानावर होते असे एकनाथ महाराज सांगतात.
पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरुला शरण जाऊन देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, सद्गुरुला शरण जावे.
दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार, खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो. या संसाररूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकाररुपी वांझेचा पोर पोहून जातो. म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांझेचा पोर म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांझेचा पोर असे म्हटले आहे आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे असे आपल्याला भासते.
पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात, दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविण पाणी प्याली रे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.
आंधळ्याने पाहिले. आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस, दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो म्हणजे ज्ञानही डोळस बनते जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.
याबाबतीत पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बहिऱ्याने ऐकिले. याचाच अर्थ बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून, गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला, तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते. पांगळ्याने पाठलाग केला रे. इथे पांगळे आहे ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही. पण तरीही ते आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने, कुठेही, केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की, जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे, किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे. अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचित्ताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या.
।। श्री राम जय राम जय जय राम।।
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची ‘एसटी बस’ सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते, ‘माधवराव’. गेली तीस वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते.
पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी ‘काळभैरव वळण’ नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर ‘दोन मिनिटांसाठी’ थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे, आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे.
एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हायरल’ व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती.
जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनच्या रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली.
“बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, ” असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला.
व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलावून त्यांच्यावर ‘कामात हलगर्जीपणा’ केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित (Suspend) केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही, ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या ‘व्हायरल’ ताकदीचा भयंकर अहंकार आला होता.
या घटनेला दोन महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री दोन वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता.
पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच ‘काळभैरव वळणावर’ रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल, अंधाऱ्या दरीत कोसळली.
गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे अडीच वाजले होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. “आपण आता मरणार, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही, ” या भीतीने रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता.
तेवढ्यात… त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एका बॅटरीचा (Torch) प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत, चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरत होते.
तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून, दगडांमधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते.
“नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री ‘माधवरावां’नी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं, तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, ” इन्स्पेक्टर म्हणाले.
‘माधवराव? ‘ हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, “मा… माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री अडीच वाजता त्या दरीजवळ काय करत होते? “
इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले, ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली.
“तुला माहितीये, ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? पंधरा वर्षांपूर्वी, माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्याच काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग सहा तास त्या दरीत जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते… पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती… की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल, तेव्हा ते दोन मिनिटे थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरु नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते रोहन… ते त्या दरीचा पहारा देत होते! “
रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना.
“तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस. त्यांची एसटीची ड्युटी गेली… पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या दोन महिन्यांत ते म्हातारे रोज रात्री पावसात, स्वतःच्या गावातून पाच किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत.”
रोहनच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला.
ज्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका ‘व्हायरल’ व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती… त्या देवासमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून, नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता, आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते! खोट्या प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राख झाला होता. रोहन वेड्यासारखा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्शी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालयाएवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की, तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला.
आपल्याला जे सत्य ‘स्क्रीनवर’ दिसते, ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात ‘व्हायरल’ होण्यापेक्षा ‘माणूस’ होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते, तेव्हा पश्चात्ताप करायला शब्दही अपुरे पडतात.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈