मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

आईच्या काही पुढच्या टेस्ट करून घेण्याकरता टेस्ट सेंटरमध्ये गेले होते. व्हीलचेयरमध्ये बसून आई आत गेली मी बाहेर वेटिंगरूम मध्ये बसले. बराच वेळ लागणार होता. ‘देव करो अन् सगळं ठीक निघो’, मनाशी म्हणत मी एकदा वर आकाशाकडे/देवाकडे बघत शांत बसून राहिले. एकेकाळी आपले आजार, दुखणी काढलेल्या आईला, हॉस्पिटलचा गाऊन घालून देऊन “जा, आत. सगळं नीट होईल” सांगताना फार विचित्र वाटतं. हे रोल रिव्हर्सल मान्य व्हायला हवं, हे माहीत असतं; पण थोडा वेळ लागायचा तो लागतोच.

सहज लक्ष शेजारी बसलेल्या एका मुलीकडे गेलं. छान चुडीदार ड्रेस, गळ्यात छोटं मंगळसूत्र, हातात मोबाईल आडवा धरलेला आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होती. फार टेन्शन मध्ये दिसत होती. आजूबाजूला काय सुरू आहे याकडे अजिबात लक्ष नव्हतं. फक्त मोबाईल आणि ती. तिच्या पुटपुटण्याचा स्पीड इतका जोरात होता की हातात धरलेल्या मोबाईलसकट ती थोडं मागेपुढे होत होती. मग लक्षात आलं, देवाचं काहीतरी स्तोत्र वगैरे म्हणत असणार. म्हणता म्हणता मधेच डोळे बंद करून मोबाईल डोक्याला लावून नमस्कार करत होती. हॉस्पिटल, टेस्ट, सर्जरी ही नावं जरी घेतली तरी भीती वाटायची ती वाटून जातेच. मनात विचार आला, हिचं नक्की कोण आत गेलं असेल? आई, वडील, सासू, सासरे, भाऊ, बहीण की नवरा? का ही एवढ्या टेन्शनमध्ये असेल? ज्या कोणाची उपासना करत होती, त्यावर तिची नितांत श्रद्धा असणार. एक क्षणही न थांबता तिचा जप सुरू होता. माझ्या मनाला मग एक खेळच मिळाला. नक्की तिची आई आत असणार. ज्या मनोभावे ती जप करते आहे त्यावरून आईच असेल असं वाटतं. जगात अपवादानेच एखाद्याला आपली आई नकोशी असते. पण मग वडीलही असू शकतील. बापलेकीतलं प्रेम वेगळं असतं. नवरा असेल तर? इतक्या तरुणपणी काय झालं असेल त्याला? काही गंभीर निघालं तर ही काय करणार? माझ्या मनाचा चाळा संपेना. एवढ्यात एक तरुण तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, वीस मिनिटं तरी लागतील. तरुणीने पटकन त्याच्या डोक्याला मोबाईल लावला आणि जप सुरू ठेवला. आता माझी उत्सुकता शिगेला पोचली. नक्की आत आहे तरी कोण? नवरा शांत बसून होता, तरुणीचा एक क्षणही न गमावता जप सुरू होता. आता तर तिला सभोवती काय सुरू आहे ह्याचीही फिकीर नव्हती. ती आणि तिचा जप. मी स्वतः श्रद्धाळू असले तरी अशी टोकाची आस्तिक नाही. मी तिच्या जागी असते तर कदाचित हे काही केले नसते याची जाणीव मला आहे पण म्हणून ती जे करते आहे त्याची चेष्टा किंवा अवहेलना करायचाही मला काही अधिकार नाही हे ही मला माहीत आहे. ज्याला ज्यातून positive energy मिळते त्याने ते करावं.

बघता बघता वीस मिनिटं झाली. आई अजूनही आतच होती. तेवढ्यात टेस्ट सेंटरच दार उघडलं आणि एक छोटीशी गोड मुलगी दोन वेण्या उडवत आत आली. छान फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली आणि टपोरे डोळे असलेली! तिला पाहून जप करणारी मुलगी ताडकन उठून उभी राहिली. मुलगी पळतपळत तिच्याकडे गेली आणि पुढचे दोन दात पडलेले बोळकं पसरून “आई, झालीsss टेस्ट! डॉक्टर काका म्हणाले, मी एकदम स्ट्राँग गर्ल आहे!” आईबाबा दोघांनीही तिला जवळ घेत चौकशी सुरु केली.

अरेच्चा! ही शक्यता तर मी गृहितच धरली नव्हती. लहान मुलांना काही गंभीर होत असेल हा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. जप करणाऱ्या मुलीच्या बाबतीत मी सगळ्या शक्यता मनात आणल्या पण प्रत्यक्ष तिची छोटी लेकच टेस्ट करण्याकरता आत गेली असेल हा विचार देखील मनाला शिवला नाही. Mothers can never think ill about any child in the world. जपवाल्या मुलीने श्रद्धेने परत मोबाईल डोक्याला लावला आणि लेकीला मांडीवर घेऊन बसली.

आपल्या भोवती रोज कितीतरी वाईट गोष्टी घडत असतात पण जगात जोवर आई नावाची जमात आहे तोवर positive energy चा स्त्रोत कायम सुरू राहील. कधीकधी वाटतं हे जग सुरू रहाण्याकरता फक्त आणि फक्त आई नावाची बाई कारणीभूत असते.

त्या छोटीला पटकन बरं वाटू देत अशी प्रार्थना करत मी माझ्या आईचे उत्तम रिपोर्ट हातात घेऊन, तिची आई बनत तिला आधार देत टेस्ट सेंटरमधून बाहेर पडले.

लेखिका : गौरी ब्रह्मे

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाळीस वर्षांपूर्वी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चाळीस वर्षांपूर्वी– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे. आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात.

चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.

चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे, यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.

चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.

चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसे नाहीत.

याला प्रगती म्हणावी का अधोगती…?

 _कुठे आणि कसे पोहोचलो आपण…?

शोधा म्हणजे सापडेल.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी वदनी कवळआणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो llll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो llll

 *

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो llll

 *

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ll

 *

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो llll

 *

बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो llll

 *

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो llll

 *

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो llll

 *

सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो llll

 *

इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,

आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

 *

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले,

फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ll११ll

 *

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली,

अन स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

 *

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो,

पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

 *

फॉरवर्ड झालो, फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना,

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणून बुजून) विसरलो…

*

कवी : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “डॉ. आनंद नाडकर्णी गेले?” – लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “डॉ. आनंद नाडकर्णी गेले?” – लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ शोभा जोशी

बाप रे… ज्यांना आपल्या नावाचा अर्थ परफेक्ट लागू होतो असा “आनंदी” चेहरा लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व!

परिचय नसतानाही काही माणसं “आपली” वाटून जातात त्यांपैकी हे एक प्रसन्न, हसरं व्यक्तिमत्त्व. जी मराठी माणसं समाजात असल्याचा अभिमान बाळगावा त्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! मला ज्याम आवडायचा हा माणूस. सावकाश नेमके शब्द वापरत समोरच्याला समजावणं भारीच!

मागे एका ‘वेध’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘स्व’ कसं घडतो ते किती छान सांगितलं होतं – “नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस” – या चार गोष्टींनी ‘स्व’बनतो!

थोडक्यात- ‘नेचर’ म्हणजे आपण आपल्या पूर्वसुरींचं गुणसूत्रांतून काय घेऊन येतो, ‘नर्चर’ म्हणजे आपल्यावर होणारे संस्कार, ‘कल्चर’ म्हणजे अर्थातच आजूबाजूचं वातावरण किंवा संस्कृती आणि याबरोबरच आपली अशी जी एक खासियत असते ती म्हणजे आपलं ‘युनिकनेस’!”

आईशप्पथ! किती मस्त बोलून गेलेत डॉक्टर!

आणि डॉक्टरांचं लेखन? ते तर प्रेमात पाडणारंच्च! त्यांचं पहिलं पुस्तक मी वाचलं त्यालाही पस्तीसेक वर्षं होत आली. आणि त्यावेळी त्याला कारणीभूत ठरली होती माझी मैत्रिण शमा! खळखळून हसणाऱ्या शमाशी पहिल्याच भेटीत मैत्र जुळलं! आवडीनिवडी सारख्या असल्यामुळे आमच्या अखंड गप्पा रंगायच्या आणि त्यातच एकदा शमाने सरप्राईझ दिलं. “मैत्रिणीचं नातं” या शीर्षकाचा अफलातून लेख लिहिलेले तीनचार फूलस्केप्स माझ्या हातात ठेवले. मी चाट! आधीच शमाचं सुंदर अक्षर आणि त्यात तो अफलातून लेख! तो वाचला आणि डाॕ. आनंद नाडकर्णींच्या प्रेमातच पडलो. लगोलग जाऊन तो लेख असलेलं डाॕक्टर नाडकर्णींंचं “गद्धेपंचविशी” विकत आणलं. झाली बरीच वर्षं.

आता डॉक्टरांच्या स्मृतींना नमन करत आज परत एकदा “गद्धेपंचविशी”कडे वळेन…

“गद्धेपंचविशी” – मिश्कील, चुरचुरीत, टवटवीत लेखांचं हे पुस्तक!

डॉक्टर आनंद नाडकर्णींना का कुणास ठाऊक ‘आनंदबाबू’च म्हणावंसं वाटतंय. पण शून्य ओळख असल्यामुळे उगाच सलगी नको नै का! तर, डाॕक्टरांनी आपल्या पत्नीला पुस्तक अर्पण करताना पाब्लो नेरुदाच्या एका कवितेतल्या ओळीं दिल्यात आधी त्याच्यातच अडकलोय मी काही क्षण-

” I want to do with you

what spring does —

— to the cherry trees!.. “ 

आह्ह!. दोन ओळींतच किती गहिरी भावना! अर्पणपत्रिका वाचूनच खूष होत मी पुढचं पान उलटतो तर “दुसऱ्या आवर्तनाच्या निमित्ताने” हे मनोगत समोर येतं. त्याच्या शेवटाकडची ही वाक्यं अगदीच्च पटणारी –

“… आता पन्नाशीच्या आतबाहेर असणारे ‘पहिले’ वाचक हे पुस्तक ‘नव्याने’ जवळ घेतील आणि ‘नव्या’ पिढीचे वाचक पहिल्या वाचनासाठी या पुस्तकाला आपलं मानतील अशी आशा व्यक्त करुन, नव्या कपड्यातल्या पण ओळखीच्या दोस्ताला तुमच्या हाती सोपवतो… “

अगदीच डॉक्टर ! तुमचा विश्वास सार्थ आणि यथार्थ ठरवत मी घेतलंच आहे या दोस्ताला जवळ पुन्हा एकवार!

अवघ्या १२४ पानांचं, २१ लेखांचं हे छोटेखानी पुस्तक! पण त्यातनं ताजेपणा.. धमाल.. मिश्किलता… जोष… तारुण्यातला उत्साह जाणवतो. मन प्रसन्न होतं!

८०च्या दशकातले गद्धेपंचविशीतले तरुण जे उद्योग करायचे ते सगळं आलंय यातल्या लेखांमधे! त्याकाळात व्हिसीआर असायचे आणि मग प्रोजेक्टर आणून खोलीतच पडदा लावून पन्नासेक तरुण मित्रांनी धडधडत्या छातीने आणि कमालीच्या औत्सुक्यानं “ब्ल्यू फिल्म्स BF/ ब्ल्यू प्रिंट BP” बघण्याचा प्रसंग आणि बघितल्यावर मनांत उठणारे भावनिक कल्लोळ धमाल शब्दांत मांडलेत डाक्टरांनी!

डाक्टरांचे अनेक पैलू आहेत. डाक्टरकी, कौन्सेलींग करत असताना त्यांनी आपल्यातला नाटककारही छान जपला होता. “आम्ही जगतो बेफाम”, “जन्मरहस्य”, ” रंग माझा वेगळा” सारखी लोकप्रिय नाटकं लिहिणारे नाटककार, कालेजकाळात नाटकं करण्यासाठी काय काय उचापती करायचे ते “इनर्शिया आणि किडा” लेखात समजतं. नाटकातल्या साउंडसाठी जीव धोक्यात घालून मित्रांबरोबर लोकलच्या रुळांवरुन धडधडत जाणाऱ्या लोकलचा आवाज टेप करणं असो, नाटकातल्या अँन्टिएअरक्राफ्ट गनसाठी भंगारातला एअरकंडिशनर मिळवणं असो, एका एकांकिकेच्या प्रत्येक प्रयोगासाठी बांबूच्या कुंपणाच्या नेपथ्यासाठी दरवेळी ताज्या वेली आणणं किंवा प्रयोगाआधी तीनतास कुष्ठरोग्यांसाठीचा मेकअप असो. असे अनेक किडे त्यांनी या लेखात जिवंत केलेत.

मेडिकल कालेजमधला संप, प्रसिद्ध डाक्टरना घेराव.. ती सगळी तयारी… गंमत… अस्वस्थता… पूर्ती.. हे सगळं “आपरेशन ब्लिट्झक्रिग” लेखात आलंय. त्यातलं सुरूवातीचं वाक्य माझ्या डोक्यात घुसलंच एकदम -“हरण्याची खात्री असताना लढाई लढायला जिगर लागते.. ”

मित्राच्या लग्नासाठी त्याच्या प्रेयसीच्या वडिलांशी बोलून केलेल्या यशस्वी मध्यस्थीवर “माझी मध्यस्थी” हा लेख आणि आयुष्यात मुलीकडून नकार पचवायचा आलेली वेळ किंवा त्यांनाच समोरचीला नकार देताना मनात उभे राहिलेले अनेक विचार.. प्रश्न “नकार” या लेखात समोर येतात.  

आणि मग समोर येतो तो “मैत्रिणीचं नातं” हा लेख!माझ्या मनात कायमचा घर करुन बसलेला! अवघ्या तीन-चार पानांचा लेख पण ज्या तरल, संवेदनशीलतेनं लिहिलाय डाक्टरांनी की क्या केहने! त्यातली काही वाक्यं इथे द्यायचा मोह होतोय –

“मैत्रिणीच्या नात्याची गंमत कळायला तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागतं. मैत्रीण याचा अर्थ “पोरी फिरवणं” असा घेतला तर मात्र सगळंच संपतं. मुलींवर “इंप” मारणं असा घेतला तर त्यातली सारी नजाकतच जाते. सगळीच नाती उत्क्रांत होत जाण्याची एक प्रक्रिया असते. त्या उत्फुल्ल प्रक्रियेचा एक भाग बनून जेव्हा येतं ना हे नातं, तेव्हा त्यात मजा असतो. हा मजा आस्वादायचा असेल तर एक मात्र करावं, या नात्याला चौकटीत बसवू नये. “मानलेली बहीण” वगैरे बनवू नये. मैत्रिणीच्या नात्यामधल्या सेक्शुअलिटीच्या किनारीने आपण का धास्तावतो नेहेमी? अशी किनार या नात्याला असणारच की! मला वाटतं, या धास्तीचं एक कारण असं असावं की सेक्शुअलिटीची म्हणजे लैंगिकतेची किनार असलेल्या प्रत्येक नात्याचा परिपाक ‘समागमातच’ व्हायला पाहिजे अशी आपली रुढ समजूत. लैंगिकता आणि तिचे पदर “समागमापुरते” नसतात. लैंगिकतेच्या तरल किनारींना सामोरं जाण्यासाठीसुद्धा दिलखुलासपणा लागतो.. दोन्ही बाजूंनी.. !” 

“… स्पर्शाला आपण घाबरतो. कारण प्रत्येक स्पर्श जणू शरीरसंबंधांचं आमंत्रण. त्यामुळे स्पर्श आपणहून चोरटा आणि भित्रा बनतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तिंमध्ये मैत्रीचा जवळिकीचा स्पर्श असू शकत नाही हे प्रमेय कोणी सिद्ध केलं आहे?.. “

“… संधिकालच्या धूसरतेचं कुणी गणिती समीकरण मांडू नये, तसं मैत्रिणीच्या नात्यालासुद्धा नेहेमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत. नेहेमीच्या मोजपट्ट्या जर लटक्या ठरवायच्या असतील तर मात्र या नात्यासारखं दुसरं नातं नाही.. “

व्वाह्… काय सुरेख लिहिलाय हा लेख तुम्ही डाक्टर!

त्यापुढचा “रिलेटिव्हिटी माझी आणि आईनस्टाइनची” हा लेखही भावणारा! आपल्याला “nice किंवा छान” वाटणारं समोरच्याला वाटेलच असं नाही. ते सापेक्षच वगैरे सांगणारा लेख! डाक्टर लिहितात, ” मला जी ‘छान’ वाटेल ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही. कदाचित ‘छान’ शब्दामधे फक्त सौंदर्यच अभिप्रेत नसतं म्हणून. जेव्हा सौंदर्य नात्याच्या जाणिवेतून, साथ-संगत शोधण्याच्या उर्मीतून आणि संवादाच्या ओढीतून पाहिलं जातं, तेव्हा त्याचं स्वरुप बदलतं. आता “छान वाटणं” म्हणजे “प्रेम” का? मला वाटतं, प्रेम जमण्याच्या वाटेवरचा पहिला मैलाचा दगड म्हणजे “छान वाटणं”.. प्रेम नावाचा प्रोसेस असतो. त्याला हिरवा कंदील मिळतो तो ‘छान’ वाटण्याचा… प्रेम वगैरे जमो न जमो, तो “छान वाटण्याचा” अनुभव अतिशय जपून ठेवावा असा असतो… “

“मुलगी: एक पाहणे” मधे डाक्टरांनी “ट्रिंग ट्रिंग” होण्याच्या अनुभवाविषयी लिहिलंय. तो मजेदार आहे. “ट्रिंग ट्रिंग” झालं की प्रेम जमतंच असं नाही. पण प्रेम जमायचं असेल तर “ट्रिंग ट्रिंग” व्हावंच लागतं.. ” वगैरे.

आणि असेच सारे. सगळे मिळून २१ छोटे छोटे भावणारे लेख!

डाक्टरांचं हसरं, खेळकर व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या बुद्धिमान प्रतिक्रियांमधून उलगडणारं. त्यांच्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि उमद्या लेखणीतनं उतरलेलं हे पुस्तक सदैव टवटवीत राहणारं आणि गद्धेपंचविशीतल्याच नव्हे तर कोणत्याही वयातल्या कुणालाही आपलंसं वाटणारं!

डॉक्टरांना आदरपूर्वक नमन!

 लेखक : श्री प्रसन्न पेठे

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माहेरपण…! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेरपण…! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

(अनादी काळापासून पृथ्वीवर वास करत असलेल्या ‘आई ‘नावाच्या दैवताला ही कविता समर्पित !)

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा ll

 *

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा ll

 *

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात ll

 *

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या ।।

 *

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून ।

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून ll

 *

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ l

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 *

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून l

मायापती  देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून ll

 *

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत ll

 *

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट l

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट ।।

 *

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ ll

 *

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई l

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही ll

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुदतीची ठेव” कवयित्री:नीलम माणगावे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुदतीची ठेव” कवयित्री:नीलम माणगावे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

मुदतीची ठेव

सांभाळावी

आणि ज्याची त्याला

सुखरूप

परत करावी

एवढंच तुझ्या गर्भागारातलं

आणि तुझ्या घरा-दारातलं

माझं स्थान!

 

कुठलाही धक्का

लागू नये या जाणीवेनं

तू,

डोळ्यात तेल घालून

सांभाळलंस

वाढवलंस

ठाकून ठोकून

बाईपणाच्या साच्यात

गच्च बसवून

ज्याची ठेव त्याला

परत केलीस

नि सुटकेचा श्वास

सोडलास

पण…

ठेव घेणाऱ्याच्या

पात्रतेसंबंधीची तुझी काळजी

तुला अस्वस्थ करायची

 

यदाकदाचित

लेक परत आलीच तर,

पुन्हा गर्भात

सुरक्षित ठेवण्याची सोय

नसल्याच्या जाणीवेनं

स्वतःच

असुरक्षित व्हायचीस

 

आणि मग…

ठेवीदारापेक्षा

ठेवीनेच आपले पाय

बळकट करावेत म्हणून

मिळेल तेव्हा

मिळतील तशा

प्रतिकारशक्तीच्या

लसी

टोचत राहायचीस

त्यामुळेच

मी उभी आहे

पाय रोवून!

* * * *

कवयित्री:नीलम माणगावे

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ छान मैत्रीण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छान मैत्रीण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

फक्त एक छान मैत्रीण हवी.

 

पन्नाशी, साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरीसकट बोल्डसुद्धा असते

 

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती

सहज adjust करते.

मुलांबरोबर लहान होते,

मुलीचीही मैत्रीण होते.

 

संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.

 

पन्नाशी, साठ्ठीची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही वावगं ठरणार नाही.

 

बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.

 

साडी आणि सासू आता discussion उरले नाही.

 

विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.

 

अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.

डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.

 

जगायचंच राहून गेलेलं ती आता जगत असते.

पन्नाशी, साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

 

देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं

 

देवाने हसून म्हटलं “मागा, काय जे मनात साठलं. “

 

“देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे “

 

“एक मिनिट, एक मिनिट… विचारलेच आहेस म्हणून मागतेय.

 

एक छानशी मैत्रीण दे.

हवे तर अजून एखादे फूल घे.

 

दिसायला छान नसली तरी चालेल.

पण बोलायला छान असायला हवी.

 

डोळे सुंदर नसले तरी चालेल,

पण नजरेतून बोलणारी हवी,

 

केस लांब नसले तरी चालेल,

पण सोबत लांब चालणारी हवी

 

माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,

फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.

 

यातलेही काही कमी असेल तरी चालेल,

फक्त एक छान मैत्रीण हवी.

 

.. मैत्रीण..

 

किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,

कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.

ती मैत्रीण नसते, तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.

 

पन्नाशी, साठीच्या स्त्रियाचे अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशीनंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,

मैत्रिणीबद्दल खूपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.

मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.

  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भिंती पलीकडचं नातं… लेखिका: जयश्री गोखले ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भिंती पलीकडचं नातं… लेखिका: जयश्री गोखले ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

आमच्या लहानपणी भिंती फक्त घरांना विभागायच्या…

मनांना नाही…

या भिंतीवर टेकून कितीतरी गप्पा रंगायच्या…

 “आज काय भाजी केली?” पासून

 “मन खूप अस्वस्थ आहे गं…” पर्यंत…

एका घरात चूल पेटली की वास दुसऱ्या घरात जायचाच…

 एका घरात दुःख आलं की डोळे शेजाऱ्यांचेही पाणावायचे…

 आणि आनंद आला की सगळा वाडा हसायचा…

त्या काळी दारं बंद नव्हती…

 मनं उघडी होती…

आमच्या वाड्यात तर संध्याकाळ झाली की सगळ्या बायका अंगणात किंवा अशाच एखाद्या भिंतीवर टेकून उभ्या राहायच्या…

 कोणाच्या हातात निवडायची भाजी…

 कोणाच्या हातात विणकाम…

 तर कोणाच्या मांडीवर छोटं बाळ…

गप्पा रंगायच्या…

 हसणं यायचं…

 कधी एखादीच्या डोळ्यात पाणीही यायचं…

 पण ती एकटी कधीच नसायची…

“काळजी करू नको गं… सगळं ठीक होईल…”

 हे वाक्य त्या काळी औषधासारखं होतं…

एखाद्या घरात पाहुणे आले की भांडी शेजारातून यायची…

 सण आला की फराळ एका घरात बनून चार घरांत वाटला जायचा…

 आणि एखादी बाई आजारी पडली की तिच्या मुलांना दुसऱ्या घरात जेवायला बसवलं जायचं…

रक्ताची नाती नसली तरी माणुसकीची नाती खूप घट्ट होती…

आज आठवतं…

 आई कधी कधी शेजारच्या काकूशी भिंतीवरून तासन् तास बोलायची…

 विषय काही विशेष नसायचा…

 पण मन हलकं व्हायचं…

त्या काळी ‘मेंटल हेल्थ’ हा शब्द माहिती नव्हता…

 पण माणसं एकमेकांना ऐकून घ्यायची…

 म्हणून कदाचित मनं इतकी तुटत नव्हती…

आता सगळं बदललं…

मोठमोठे फ्लॅट आले…

 दरवाजांवर डिजिटल लॉक आले…

 पण माणसांच्या मनांवरही कुलूप पडलं…

आज शेजारी कोण राहतं हे माहिती नसतं…

 आणि माहिती असलं तरी संवाद फक्त

 “पार्सल आलंय…”

 किंवा

 “गाडी बाजूला घ्या…”

 इथपर्यंतच राहतो…

पूर्वी घरं छोटी होती…

 पण मनं मोठी होती…

आता घरं मोठी झाली…

 पण माणूस आतून एकटा होत चाललाय…

मोबाईलमध्ये हजारो contacts आहेत…

 सोशल मीडियावर शेकडो लोक जोडलेले आहेत…

 पण मनापासून विचारणारं —

 “काय गं… ठीक आहेस ना?”

 हे विचारणारं माणूस मात्र कमी झालंय…

 

 किती साधं आणि सुंदर होतं ना ते जगणं…

ना मोबाईल…

 ना स्टेटस…

 ना ‘ऑनलाईन’ असण्याची धडपड…

पण तरीही माणसं एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित होती…

 खऱ्या अर्थाने…

कधी कधी खरंच वाटतं…

 पुन्हा एकदा असं जुनं जगणं मिळावं…

 एखादं छोटंसं घर असावं…

 बाहेर अंगण असावं…

 आणि मध्ये अशीच एक भिंत…

जिथे आपण मन मोकळं करावं…

 हसावं…

 रडावं…

 आठवणी सांगाव्यात…

आणि समोरून कोणीतरी फक्त प्रेमाने विचारावं —

 “काय गं… ठीक आहेस ना?”

 ☆ ☆ ☆ ☆

लेखिका: जयश्री गोखले

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुट्ट्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सुट्ट्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे, जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.

त्यांनी लिहिले आहे –

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.

– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका, असे सांगा.

– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.

– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.

– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.

– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.

– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.

– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.

– त्यांच्यासाठी काही लोकगीते वाजवा.

– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.

– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफ आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.

– तुमच्या मुलांच्या डोळ्यांत पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.

पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत, ज्यामुळे आपण स्वतः आनंदी आहोत..

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वापरलेलं…” – लेखिका : सोनाली कुलकर्णी ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वापरलेलं…” – लेखिका : सोनाली कुलकर्णी ☆ शोभा जोशी

पाचवी ते दहावीपर्यंत मी आमच्या कॉलनीतल्या एक वर्ष पुढे असलेल्या – अनिरुद्ध परांजपेची पुस्तकं वापरली. या कारणासाठी तरी मला त्याच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळावेत, असं मला वाटायचं.

मध्ये एकदा माझी एक छोटी मैत्रीण पावसात भिजली. माझं घर जवळच होतं म्हणून माझ्याकडे आली. ‘‘ओले कपडे बदल आधी’’- असं म्हटल्यावर माझ्या कपड्याच्या कपाटात खुडबुड करत बराच वेळ रमली. मग एक टॉप कप्प्यातून ओढत आरशात स्वत:ला हसून वगैरे न्याहाळत म्हणाली, ‘‘हा घालून जाऊ?’’ मी म्हटलं, ‘‘हो हो अवश्य. आणि परत आणून देण्याच्या फंदात पडू नकोस. मला जरा लहान होतो तो आता. ’’ त्याच भरात मी कपाटातून अजून चार-पाच गोष्टी काढल्या आणि जाताना तिच्याकडे सुपूर्द करत म्हणाले, ‘‘बघ ही जीन्स आणि बाकीचे टॉप पण येतील तुला कदाचित. ’’ माझी कॉलेज गोइंग मैत्रीण खूशच झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. ‘‘अगं, काय मस्त कपडे आहेत सगळे. छोटीचे किती लाड करतेस!’’ माझ्यापण तोंडावर मोठ्ठं हसू पसरलं.

किती साधी गोष्ट आहे ही. कुणीच गैरसमज करून घेतला नव्हता. क्वचित कधी छोटीला ते कपडे घालताना माझी आठवण आली असेल बास.

ह्याच्या विरुद्ध मध्ये जे ऐकायला मिळालं, ते इतकं विचित्र होतं. आमच्या एका फॅमिली फ्रेंड कुटुंबाकडे गेले होते. काकूंना माझं बाळ बघायचं होतं. बरं नसल्यामुळे त्यांना हिंडता फिरता येत नाही आता. त्यांच्या सुनेनी पाठवलेला एक सुंदर अंगरखा कावेरीला घालून घेऊन गेले होते. काकूंना म्हटलं, ‘‘हे बघा.. आठवतंय का तुम्हाला? तुमच्या नातीचा फ्रॉक आहे हा. ’’ ते लक्षात आल्यावर काकूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. उदास उदास होत त्या म्हणाल्या, ‘‘सूनबाईंना सांगू नकोस हं. तिच्या नकळत दिल्या होत्या या सगळ्या गोष्टी मी तुला. तिनी फेकून देण्यासाठी काढल्या होत्या बाजूला. किती विचित्र झालीए तुमची पिढी. प्रत्येक गोष्टीत तुमचे आक्षेप, शंका, प्रश्नांची सरबत्ती. आम्ही कितीतरी गोष्टी ऐकलेल्या, पाहिलेल्या, चालत आलेल्या- म्हणून करत आलो. त्यामागच्या भावनांची गोडी जगताना कळत गेली. पण तुम्हाला आधी सगळ्याची कारणमीमांसा करायची असते आणि आमचं म्हणणं उडवून लावायचं असतं. ’’

गप्पांच्या ओघात कळत गेलं. त्यांच्या कुणा नातेवाईकांकडून आलेलं बाळलेणं पाहिल्यावर काकूंच्या सुनेचा पारा चढला होता. ती काकूंना घालून पाडून बोलली. ‘‘कुणाची तरी वापरलेली झबली आणि दुपटी. मी नाही माझ्या बाळाच्या अंगाला लागू देणार. इट्स सो अनहायजिनिक. आम्हाला नाही भिकेचे डोहाळे लागले. आम्ही स्वत: खूप कष्ट करून भरपूर पैसे कमावतो. जगातली कुठलीही महागातली महाग गोष्ट आम्ही आमच्या बाळाला घेऊ शकतो. हे सेकण्ड हॅण्ड गिफ्ट तुम्ही त्या नातेवाईकांना परत करा. ’’ हे ऐकल्यावर काकू अवाक झाल्या होत्या म्हणे. मुद्दा तुमच्याकडे किती पैसे आहेत हा नाहीच्चे मुळी. एका बाळानी वापरलेल्या गोष्टी दुसऱ्या बाळाकडे मऊ होऊन जातात. बाळाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा घेऊन जातात. अगदी इम्युनिटीसुद्धा वाढवतात. शेअरिंग, देवाणघेवाण, एका आईनी दुसरीला दिलेला धीर, उमेद, नव्या आईच्या कष्टांसाठी, नवलाईसाठी वाटणारी सहानुभूती – अशा शब्दात न मांडलेल्या कितीतरी गोष्टी- प्रेम आणि दिलासा व्यक्त करतात.

खरंच अलीकडे लोकांकडे पैसे जास्त की वेळ कमी झालाय कळत नाही. पण हो, सुबत्ता खूप आलीए आणि पेशन्स कमी झालाय एवढं मात्र नक्की. दुसऱ्याचं काऽऽही नको असतं लोकांना. पूर्वी लहान होतोय म्हणून कुणी ड्रेस वगैरे दिला तर किती अप्रूप वाटायचं. आत्याकडे राहायला गेल्यावर गंमत म्हणून तिच्या जुन्या चपला घालून बसण्याचा आनंद वेगळाच असायचा. कित्ती वेळा मोठय़ा बहिणी / वहिन्यांच्या कपड्यांना धावदोऱ्यांनी टीप घालून लहान करून घालायचो आम्ही. माझ्या अरंगेत्रमला वृषाली वहिनीची लग्नातली चिंतामणी रंगाची साडी नेसले होते मी. हाफसारी करून. माझ्या दूरदर्शनवरच्या आणि एकूण आयुष्यातल्याही पहिल्या शूटिंगला प्रिया वहिनीची हिरवी साडी आणि टीप घातलेलं ब्लाऊज! अजूनही कधी तो सतारवादनाचा कार्यक्रम लागला आणि

माझं निवेदन सुरू झालं की, प्रिया वहिनीची आठवण येते. आईच्या कितीतरी ब्लाऊजना तर टिपा घालून काढून भोकं पाडली होती मी चक्क. नाटक, एकांकिका, कविता वाचन- प्रत्येक कार्यक्रमाला हक्काची वॉर्डरोब कर्टसी म्हणजे आईच! बाकी फोटोशूट इ. कार्यक्रमांना मोठय़ा बहिणींचे कपडे चाचरत मागण्यात आणि मिळाल्यावर हरखून जाण्यात काय मजा होती!माझी आई आणि सिंधूमावशी वर्षांतून एकदा भेटल्या की, एखाद् वेळी साड्या एक्स्चेंज करायच्या. वापरण्यात ताजेपणा यायचा. आणि आठवणीनी मूड आनंदी व्हायचा. माझ्या आईच्या वडिलांनी- आईच्या पहिल्या बाळंतपणात- संदीपसाठी म्हणून करून घेतलेल्या पाळण्यात पुढे शंभर-सव्वाशे तरी बाळं झोपली, त्यांच्या आयांनी हलका झोका घालत अंगाई म्हटली. त्यांना पाळणा पोचवण्यासाठी, त्यासोबत काहीतरी खाऊ देण्यासाठी आईनी केलेली लगबग किंवा बाबांनी पाळणा स्कूटरला सुतळीनी बांधून बाळाच्या घरी तो नीट पोचवण्यासाठी केलेली धडपड आठवली तरी मला हेलावून जायला होतं. किती गोड संदर्भ जुडत जातात एखाद्या वस्तूला.

हल्ली सगळेजण अळूच्या पानांसारखे निर्लेप व्हायचा प्रयत्न करतायत. निरुपद्रवी असण्यासाठी स्वत:ला मिटून घेतायत. नकोच ती कटकट कुणाकडून काही घेण्याची- आणि मग आठवणीनं परत करण्याची- या नादात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या- ‘आनंदाचं, चांगलं ते’ वृद्धिंगत करण्याच्या साखळीला खंड पडत चाललाय. प्रत्येकानं बाजारात मिळत असलेल्या सगळ्या गोष्टी घ्यायचं ठरवलं- तर मग काय. चंगळवाद पोसणारे मार्केटिंगवाले अजून अजून यशस्वी होत राहतील. आपल्यालाही मग घरातल्या भारंभार वस्तूंप्रमाणे प्रदर्शनात मांडल्यासारखं जगायची सवय होईल. छे! झटकून टाकू या हा अवघडलेपणा. एखादी गोष्ट स्वीकारण्याची ग्रेस शिकू या. एखाद्याचा आनंद द्विगुणित करणं फुकट साध्य होतं. त्याला पैसे नाही लागत. ते करू या- आणि मग कुणाकडे किती पैसे आहेत, त्या पैशात आपण काय काय खरेदी करू शकतो याच्या बाता मारू या!

लेखिका: सोनाली कुलकर्णी

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares