मराठी साहित्य – विविधा ☆ ‘सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन’ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तेरा आणि चौदा ऑगस्ट हे (२०२४) दोन दिवस अत्यंत संस्मरणीय असे ठरले. सांगलीला काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. या दोन दिवसात सहकुटुंब देवदर्शनाचा लाभ घेता आला आणि खरोखरोच खूप प्रसन्न वाटले. या दोन दिवसात सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिर, नरसोबा वाडी, जयसिंगपूर येथील सिद्धिविनायकाचे मंदिर आणि चाफळ येथील श्री राम मंदिर यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. पण आज मी प्रामुख्याने बोलणार आहे ते जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल.

जयसिंगपूर येथील माझे मित्र श्री मदन बुरांडे मला अनेक दिवसांपासून घरी या म्हणून बोलावत होते. १४ ऑगस्टला तो योग अचानक आला. सांगलीपासून अवघ्या ११ किमी वर जयसिंगपूर आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजे जयसिंग यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे गाव आहे. कोल्हापूरपासून जयसिंगपूर अवघ्या ३८ किमी अंतरावर आहे. शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते. हे शहर तंबाखू, गूळ, मिरची आदींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. दूध, दुधाचे पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात. फळे, भाजीपाला यांचीही चांगली आवक आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर राज्याशी आणि देशाशी एस टी आणि रेल्वे सेवेने जोडले गेले आहे. विविध प्रकारचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शैक्षणिक संस्था या शहरात आहेत.

मदनजी यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला होता. मी, सौ. श्रद्धा आणि माझी कन्या चि. सौ सारिका असे आम्ही तिघेजण सकाळी लवकरच जयसिंगपूरला पोहोचलो. श्री मदनजी आणि सौ वहिनी आमची वाटच पाहत होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघांनी आमचे मनापासून स्वागत आणि उत्तम असे आदरातिथ्य केले. नंतर श्री मदनजी म्हणाले ‘ इथून जवळच सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही ते पाहिल्याशिवाय जाऊ नका. ‘ त्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्यासोबत ते स्वतः मंदिर दाखवण्यासाठी आले. त्यांच्या घरापासून साधारण एक दीड किमी अंतरावर मौजे आगर, जयसिंगपूर येथे हे मंदिर आहे.

दुरूनच हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. सिद्धिविनायक ट्रस्टने या मंदिराची निर्मिती केली आहे. दुरून ऑक्टोपसच्या आकाराचे दिसणारे पण कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेलं हे मंदिर खरोखरच आगळंवेगळं आहे. अशा प्रकारचं मंदिर महाराष्ट्रात तरी माझ्या पाहण्यात नाही. या मंदिराच्या बांधणीतील कल्पकता आणि बांधकामातील कौशल्य अप्रतिम आहे. आज कोणतीही वास्तू बांधताना साधारणपणे लोखंड आणि सिमेंट यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याशिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होत नाही. पण हे मंदिर मात्र सिमेंट आणि स्टील यांच्या वापरापासून मुक्त आहे. दगड, विटा आणि चुना या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आहे. पण हे मंदिर एवढे सुंदर, कलात्मक आणि भक्कम आहे की त्याच्या बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा वापर केलेला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या मंदिराच्या निर्मितीत वापरली गेलेली वीट आपण वापरतो तशा सर्वसाधारण प्रकारची नाही. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून ही मशीन कट वीट खास बनवून घेण्यात आली आहे. या विटेच्या वापरामुळे तसेच विशिष्ट प्रकारचा चुना आणि दगड यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर किमान पाचशे वर्षे टिकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

मंदिराच्या भोवताली रमणीय बाग आणि लॉन आहे. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी मंदिरावर रोषणाई केली जाते, त्यावेळी तर मंदिर फारच नयनरम्य दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सजवलेल्या एका भव्य अशा गजराजाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्या हातात मोदक आहे. आपल्या मनातील इच्छा या मूषकाच्या उजव्या कानात सांगायची. ती इच्छा पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही पूजाविधीची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेशिवाय होत नाही. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी असून विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्व दिशा मोकळ्या होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो असे आपण मानतो. या आपल्या श्रद्धेला अनुसरूनच या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात अष्ट दिशांना प्रत्येकी एक अशा अष्टविनायकांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर कमानी आहेत. त्या कमानींमध्ये असलेल्या आठ स्तंभांवर अष्टविनायक विराजमान झाले आहेत. या कमानी अत्यंत देखण्या आहेत. बाहेरच्या बाजूने लांबून या कमानींकडे पाहिले तर हत्तीच्या सोंडेचा भास होतो. मंदिराला प्रदक्षिणा करताना अनायासेच आपलं अष्टविनायकांचंही दर्शन पूर्ण होतं.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अष्टविनायकाच्या मूर्तीपुढे बाहेरच्या बाजूस हातात मोदक घेतलेला मूषक आहेच.

जेवढे मंदिराचे बाह्य स्वरूप देखणे आहे, तेवढेच अंतरंग देखील! मंदिराच्या २१ पायऱ्या चढून आपण आत गेलो की दृष्टीस पडते ती श्रींची एक अतिशय सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती. ही मूर्ती पाहताच शांत, प्रसन्न वाटते. कमलदलात स्थानापन्न झालेली सुमारे ३० इंच उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती पाहताच आपण नतमस्तक होतो आणि हात आपोआप जोडले जातात. ही श्रींची मूर्ती पृथ्वीवर स्थानापन्न असून वरच्या बाजूला आकाशाचे प्रतीक म्हणून निळा रंग देण्यात आला आहे. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवघ्या विश्वात ईश्वर व्याप्त आहे हेच जणू ही रचना आणि रंगसंगती सूचित करते. त्याचप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि मोक्ष या संकल्पना देखील त्यातून सूचित होतात. मूर्तीच्या पाठीमागे १०८ टोकांची प्रभावळ सोनेरी रंगात असून त्यातील मधल्या बाजूस श्रीगणेशाचा आवडता लाल रंग देण्यात आला आहे. २८ डिसेंबर २०१२ या दिवसाच्या शुभमुहूर्तावर संत प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य श्री किशोरजी व्यास) यांच्या शुभहस्ते श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात. प्रवेशद्वारावर असलेली भव्य दगडी कमान जणू त्या सूर्यकिरणांचे स्वागत करण्यासाठीच उभी आहे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश पुराणातील आणि श्री गणेशाच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत.

या मंदिराचा आणखी एक विशेष असा आहे की नऊ या अंकाशी या मंदिराचे विलक्षण साधर्म्य आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली. ज्या दिवशी हे काम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस होता २८/१२/२०१२. या तारखेतील सर्व अंकांची बेरीज केली असता ती सुद्धा नऊ येते हा विलक्षण योगायोग आहे. मंदिरातील मूर्तीचे वजन १०८ किलो आहे. मूर्तीभोवती १०८ टोकांची प्रभावळ आहे. मंदिरातील घंटेचे वजन १०८ किलो आहे. १०८ या संख्येतील अंकांची बेरीज ९ येते. श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे मिळून नऊ श्रींच्या मूर्तींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मूषकही नऊच आहेत.

नऊ या अंकाचं एवढं विलक्षण महत्व काय असावं असं वाटून मी त्यासंबंधीची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मोठी मनोरंजक माहिती हाती आली. जशी रेडिओ लहरींची (तरंगांची) फ्रिक्वेन्सी असते, जिला आपण ‘ हर्ट्झ ‘ या एककात मोजतो, तशीच प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी असते असे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेनुसार चार उच्च कंपन तरंग आणि चार निम्न कंपन तरंग असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्वशक्तीचेही स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात आणि नऊ हा अंक विश्वशक्तीचा विशिष्ट कंपन तरंग अंक आहे असे मानले जाते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्वशक्तीच्या संपर्कात येणे आवश्यक असते. हे जेव्हा घडते, तेव्हा विश्वशक्ती त्याच्या जीवनात यायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.

विश्वातील प्रत्येक आकार नऊने बनलेला आहे. चक्र किंवा वर्तुळ ३६० अंशांचे असते. यातील अंकांची बेरीज ९ येते. तसेच एक तास म्हणजे ३६०० सेकंद. चौरस किंवा आयताकृतीतील कोनांची बेरीज ३६० येते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० असते. पंचकोनातील एकूण कोनांची बेरीज ५४० येते. षटकोनांच्या कोनांची बेरीज ७२० येते. यातील कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज केली असता ती नऊ येते. आईच्या पोटात नऊ महिने राहिल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे नवग्रह, नवरत्ने, नवरात्री या सगळ्या गोष्टीत नऊचे महत्व आहे. यावरून हा निष्कर्ष काढता येतो की हे मंदिर नऊ या अंकाने वेगवेगळ्या प्रकारे विश्वशक्तीशी जोडले गेले आहे. आपणही या मंदिरात या विश्वशक्तीशी जोडले जातो. श्री गणेश ही बुद्धीची, विद्येची देवता आहेच. तो विघ्नहर्ताही आहे. अशा या सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन आम्हाला घेता आले याचा आनंद झाला. नरसोबा वाडी किंवा कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ असल्याने भाविकांनी एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्यावी.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

 (अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.)

हे बदलायचे असेल तर, स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी देतांना वा घरातील कामे सांगण्यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस? ‘ अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

पण स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ठ्यच जणू. असे पुरुष नेहमीच म्हणत असतात की, ’आमच्या घरात आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे बरं का! ’ नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल. आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. मुळात ही संकल्पनाच स्त्री-पुरुष समानतेला सुरुंग लावणारी आहे. म्हणून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री-पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

पण आजपर्यंत स्त्रीमध्ये लख्खपणे दुय्यमत्वाची जाणीव रुजवण्यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीने तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक संस्कार लहानपणापासून असे केले आहेत की, त्यात परावलंबीत्वाची भावना, असहाय्यतेची भावना वाटूच नये. शारीरिक सौंदर्य, कपड्याचे महत्त्व यातच त्या गुंतून राहाव्यात आणि शारीरिक क्षमतेकडे, तिच्या बौद्धिक विकासाकडे जाणूनबुजून तिला दुर्लक्ष करण्यास भाग पाडावे. तसेच तिला फक्त लैंगिक देहधर्मात जखडून ठेवावे. अशाप्रकारे संस्कृती नामक सोन्याच्या पिंजऱ्यात स्त्रीला जखडून ठेवले आहे. त्यामुळे स्त्री अबला नसूनही तिला अबला बनवले गेले आहे. पुरुषांमध्ये रुजवले जाणारे स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे गुण स्त्रीमध्ये संस्काराच्या रूपाने कधी रुजवले जात नाहीत. त्या उलट प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे. मातृत्वाची ओढ तर अनिवार्यच आहे. त्यामुळे तिने घरकाम, स्वयंपाक, आलेगेले, नातेवाईक, सासू-सासरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीदेव यांची सेवा, त्याग, प्रेम या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत, असे संस्कार केले जातात.

स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना, शारीरिक, मानसिक क्षमतांना चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरामध्ये पुरुषी वृत्तीने दरी निर्माण केली आहे, हे लक्षात घेऊन २१ व्या शतकातील शिक्षित तरुणींनो, आता तरी पुरुषी मानसिकतेचा हा कावा लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तुम्ही जिद्दीने उभ्या राहाल काय? लग्न, परावलंबन, मातृत्व, मुलांचे संगोपन, स्वयंपाकपाणी आणि घरकाम या स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत, हे कधीतरी तुमच्या लक्षात येईल काय? ही कामे फक्त स्त्रियांचीच आहेत असे कोणी ठरवले, हा प्रश्न तुमच्या मनात का येत नाही? तेव्हा स्वतःमधील आंतरिक शक्ती ओळखून आपल्या मुलांमध्ये, स्त्री ही एक व्यक्ती आहे, तिलाही पुरुषासारखे मन असते, तीही पुरुषाएवढीच हरप्रकारे सक्षम आहे, असा स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार रुजवून भावी पिढीतील पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना बदलण्यास भाग पाडाल काय? तसे झाले तर पुरुषही लग्न हा मालकी हक्काचा संस्कार नसून सहजीवनाचा सत्कार आहे हे लक्षात घेऊ लागतील.

 – समाप्त –

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

१) अमोल आणि मृणाल, दोघंही शिक्षित, शहरी मध्यमवर्गातले. दोघंही कॉर्पोरेट नोकरीत असून चांगल्या पगाराच्या बळावर त्यांनी स्वतंत्र घर घेतलं. लग्नाच्या सुरुवातीला दोघंही समानतेची भाषा बोलणारे, फसव्या पद्धतीने ‘लिबरल’ भासणारे. पण काही वर्षांत मृणालला जाणवायला लागलं की अमोलच्या या आधुनिकतेच्या कवचाखाली पारंपरिक पुरुषी वर्चस्व लपलेलं आहे. घरातील छोट्या निर्णयांपासून मोठ्या गुंतवणुकीपर्यंत, अमोल आपली मर्जी लादायचा. मृणालचं मत विचारात घेतल्याचा आभास असायचा, पण शेवटचा निर्णय ‘अमोलचा’च असायचा.

कधी कधी मृणालला वाटायचं की अमोलला स्त्री सक्षमीकरणावरच संशय आहे. जेव्हा ती प्रमोशन मिळवून त्याच्याहून अधिक पगार घेऊ लागली, तेव्हा अमोल काही बोलला नाही—पण त्याचं शांत राहणंही एक प्रकारचं अबोल बंड होतं. त्याचा आत्मविश्वास गडगडायला लागला होता. तिच्याशी त्याचा संवाद कमी होत गेला. ही दुरी केवळ मनाची नव्हती, तर शरीराचीही झाली होती. अमोलला स्वतःच्या आतली कोंडी जाणवायची, पण त्याला शब्द सापडायचे नाहीत. ऑफिसमध्ये बॉसकडून पडणाऱ्या ओरड्यानंतरही तो घरी येऊन ‘सर्व काही ठीक आहे’ असा चेहरा ठेवायचा. रडणं त्याला लाजिरवाणं वाटायचं. ‘पुरुष रडत नाहीत’ हेच त्याचं ब्रीद होतं. आणि त्याच ब्रीदामुळे तो हळूहळू मृणालपासून तुटत गेला. मृणाल अनेकदा संवाद साधायचा प्रयत्न करायची. तिला केवळ ‘सहवास’ नको होता, तर ‘सहजीवन’ हवं होतं. पण अमोलच्या पुरुषत्वाने तिच्या आवाजाला स्पेस दिलीच नाही. एक दिवस तिने थेट सांगितलं, “तुझा पुरुषी माज मला बोचतोय. तुझं अबोलपण हा माझ्यावर मूक अन्याय करतोय. ” त्या रात्रीनंतर अमोल पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करू लागला. त्याने मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतली. त्याला समजलं की त्याचं पुरुषपण त्याच्यासाठीही तुरुंग ठरलं आहे. त्यानं संवाद साधायला शिकायचं ठरवलं. आता दोघंही एकत्र जोडीनं ‘सहजीवन’ या कल्पनेचा नव्यानं अर्थ शोधू लागले आहेत.

२) धोंडू हा विदर्भातला एक शेतकरी. त्याचं शिक्षण जेमतेम, पण समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तो बायकोला कायम ‘दुसऱ्या क्रमांकाची माणूस’ मानतो. सौदामिनी ही सुशिक्षित, पण सासरी आल्यावर तिचं शिक्षण ‘घर सांभाळण्यापुरतं’ मर्यादित झालं. धोंडू कधीच तिच्या मताला किंमत देत नाही. तिने बँकेत नोकरी करावी, घराला हातभार लावावा हे तिचं स्वप्न आहे. पण धोंडूचं उत्तर एकच — “बाई माणूस बाहेर नको. ” ही पुरुषी वृत्ती धोंडूला ‘पुरुष’पणाचं आभास देत राहते. परिणामी तो भावनिकदृष्ट्या कोरडा, एकटा होतो. त्याच्या या वृत्तीमुळे सौदामिनीने घरातच संवादाचं दार बंद केल्यावर त्याला समजतं की, ‘पुरुष’ असणं म्हणजे माणूसपण गमावणं आहे. तिच्या दूर जाण्याने तो स्वतःला प्रश्न विचारतो, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. त्यांच्या जीवनात संवाद, समानतेची वाट सापडत नाही, आणि ते केवळ नावापुरतं नातं उरतं.

३) रोहन आणि नेहा, दोघंही अमेरिकेहून परतलेले, मुंबईत स्थायिक. दोघांचं शिक्षण, राहणीमान आणि विचार प्रदेशात राहिल्यामुळे आधुनिक झाले होते असं म्हणणं धाडसाचंच ठरलं असतं. कारण रोहनच्या वागण्यात अजूनही सूक्ष्म पुरुषसत्ताक वर्तन शिल्लक राहिलं होतं. जेव्हा नेहा तिच्या संशोधनात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवते, तेव्हा रोहन हसून तिचं कौतुक करतो. पण आतून मात्र पुरुषी अहंकाराला ठेच बसल्यामुळे तो अस्वस्थ होतो. तिच्या सन्मानप्राप्त लेखावर ‘बायकोची उपलब्धी’ म्हणून इंस्टाग्राम पोस्ट करतो, पण घरी “माझ्या नोकरीला तुझ्या पेक्षा महत्त्वाचं समज” असं वारंवार बजावतो. नेहाचं बोलणं तो मधेच तोडतो, तिच्या वेळेचा आदर करत नाही, आणि स्वतःला घरात निर्णयकर्ता मानतो. ‘इक्वल पार्टनर’ ही भाषा केवळ फेसबुकपुरती राहते. नातं शारीरिकदृष्ट्या जवळ पण मानसिकदृष्ट्या दूर होतं. हळूहळू नेहा थकते. तिचं मन तोडणाऱ्या पुरुषी वागणुकीला ती ‘मेक्सिकोमध्ये झालेल्या एका चर्चेत’ आवाज फोडते. ती रोहनला थेट विचारते, “तू माझा नवरा आहेस की बॉस? ” हा प्रश्न त्याच्या पुरुषत्वाला हादरा देतो. यथावकाश दोघं थेरपी घेतात. यातून रोहनच्या मनात असलेली पुरुषपणाची झाकलेली पितृसत्ता उघड होते. मग तो मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन घेत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो. हा सकारात्मक बदल नेहाला सुखावतो.

४) अर्जुन आणि समीर हे समलैंगिक जोडपं असतं, पण त्यातही एकात‘पुरुषी’ होण्याची स्पर्धा आहे. अर्जुन अधिक मर्दानी दिसणारा, व्यायाम करणारा, आर्थिकदृष्ट्या वरचढ. त्याला वाटतं, तोच निर्णय घेणारा असावा. तो समीरला अनेकदा ‘थोडं मॅनली हो’ म्हणतो, त्याच्या भावनिक गरजा उडवून लावतो. त्याच्या मते ‘बायल्यासारखा काय वागतोस’ हे म्हणणं सामान्य आहे. हे बघून समीर अनेकदा गप्प बसतो. पण त्याच्या अस्वस्थतेने नातं कमकुवत होतं. LGBTQ+ समुदायामध्येही पितृसत्ताकतेचं पुनरुत्पादन पुरुषपणाच्या द्वारे होत आहे, हे यातून स्पष्ट होतं. एका गटात समानतेसाठी लढताना, त्या गटातही वर्चस्ववादी पुरुषत्व पुन्हा उगवतं. सहजीवनात हळूहळू समीरचं मन अर्जुनपासून दुरावतं. मग अर्जुनला उमगतं की त्याचं ‘अल्फा’पण केवळ भौतिक आहे, प्रेममधील माणुसकी त्याने हरवली आहे.

५) विठोबा, ७२ वर्षांचा. पत्नी काही वर्षांपूर्वी गेली. मुलगा परदेशात. गावाकडे राहतो. आयुष्यभर त्याने ‘पुरुष म्हणलं की कठोर असावं’ हेच घोकलं. बायकोचं बोलणं कधी ऐकलं नाही. ती मन दुखावून शांत बसायची. तो ‘बायकांचं काही असं नसतं’ असं म्हणायचा. आता एकटेपणात त्याला आठवतं की, बायकोने कधीतरी सांगितलं होतं की, ’तुझं मन मला कधीच उघडलं नाही. ” तो दिवसेंदिवस अधिक शांत आणि अधिक एकलकोंडा होत जातो. गावातील किशोरवयीन पोरांमध्ये एखादा हळवा संवाद ऐकला की, त्याचे डोळे पाणावतात. आता त्याला जाणवतं की सहजीवन म्हणजे केवळ संगत नव्हे, तर संगतीत आपलं मन उघडणंही असतं. पण हे उमगायला त्याला सत्तर वर्षं लागली.

मित्रांनो, वरील सर्व उदाहरणं भिन्न सामाजिक गटांतील असली तरी त्यातील पुरुषी वृत्तीमुळे एकाच मातीतील आहेत… पितृसत्ताक शिकवण, भावनिक अभाव, संवादाचा आळस आणि वर्चस्वाची सवय. हीच वृत्ती सहजीवनाला हळूहळू पोखरत नेते. संवादाऐवजी आदेश, सामायिकतेऐवजी मालकी, सहजीवनाऐवजी सत्ता या गोष्टी जेव्हा नात्यात शिरतात तेव्हा प्रेम दमते, जिव्हाळा तुटतो, आणि माणसं हरवतात. सहजीवन टिकवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने ‘पुरुष’ होण्याच्या संकल्पनेवर नव्याने विचार करायला हवा. फक्त पायघोळ, हुकमी बोलणं, वा आर्थिक जबाबदारीनं पुरुष होणं पुरेसं नाही; तर आपल्या जोडीदाराच्या आत्म्याशी नातं जोडणं, तिच्या समोर हळव्या क्षणातही उभं राहणं हे खरे पुरुषपण ठरावे लागेल. वरील उदाहरणातून दिसून येतं की पुरुषी वृत्तीने पुरुषालाही तणावाच्या गर्तेत ढकललं आहे. समाजाने पुरुषपणाची चौकट एवढी अरुंद करून ठेवली आहे की, त्यात माणूस मावत नाही आणि स्त्रीला तर त्यात श्वास घेणं अशक्य होतं. सहजीवन यशस्वी होण्यासाठी केवळ प्रेम, जबाबदारी आणि सोबती पुरेसे नसतात, तर समतेची जाणीव, भावनिक परिपक्वता, आणि संवादाची क्षमता लागते. पुरुषाने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं, तर सहजीवनचं वळण अधिक सुसह्य आणि सहानुभूतीशील होण्यासाठी त्याला त्याची पुरुषी मानसिकता सोडून स्त्रीकडे आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून पहायची गरज आहे.

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत त्यामुळे आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित होत काळानुरूप जगण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारून देण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. बलात्कारासारखी एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते. कारण अजूनही भारतीय पुरुषाच्या मानसिकतेत मनुस्मृतीतील… स्त्री ही व्यभिचारी असते, स्त्रीला स्वातंत्र्य देणे धोक्याचे असते, स्त्री ही पुरुषाला मोहात पाडणारी असते, अशी स्त्रीला कमी लेखणारी वचने आणि गुरुचरित्रात पतीला उलट उत्तर देणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होते, परपुरुषाकडे तिची नजर जरी गेली तर ती पुढच्या जन्मी डुक्करीण होते, स्त्रीचे जर घराबाहेर लक्ष गेले तर ती पुढच्या जन्मी घुबड होते, अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.

क्रमशः…

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

 परमेश्वराची भक्ती करताना प्रथम आवश्यक गोष्ट कोणती असेल तर मनाची शांतता. चित्त शांत असल्याशिवाय परमेश्वराच्या चरणाशी ते लीन होणे कदापि शक्य नाही असे तुकाराम महाराज साधकांना त्यांच्या अभंगांतून वारंवार सांगतात.

 शांती परते नाही सुख। येर अवघेची दुःख।।

 म्हणून शांती धरा। उतराल पैलतीरा।।

 खवळलीया काम क्रोधी। अंगी भरती आधी व्याधी।।

 तुका म्हणे त्रिविध ताप। मग जाती आपोआप।।

चित्ताची शांती ही फार मोठी सिद्धी आहे असे तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे. सर्व सुखे तेथेच आहेत, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून शांती धराल तरच संसार सागर पार कराल असे ते साधकांना सांगतात. एकदा का देहात, मनात, शांती स्थिर झाली की त्रिविध ताप (अध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक) या देहातून निघून जातील.

भक्त आणि परमेश्वर या दोघांचे नाते निव्वळ प्रेमाचे असते. त्यावेळी भक्ताचे कुळ किंवा त्यातील दोषांकडे देव कधीच पाहत नाही. देव आणि भक्त यांच्यातील प्रेम भाव महाराज सामान्य जनांना उदाहरणे देऊन सांगतात.

 गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी।

 कोठे चराचरी त्याग केला त्याग केला।।

 गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ।

 मिळाल्या वोहोळ गंगा ओघ।।

 कागाचिया विष्ठे जन्म पिंपळासी।

 पांडव कुळासी पाहता दोष।।

 शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास।।

 यांच्या नामे नाश पातकांसी।।

 गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर।।

 पहा पहा विचार पिंगळेचा

 वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद।।

 यांचे पर्व शुद्ध काय आहे।।

 न व्हावी ती करमे झाली नरनारी।।

 अनुतापे हरी स्मरता मुक्त।।

 शुद्ध अशुद्धतेबद्दल किती गैरसमज आहेत ते निदर्शनास आणून देताना तुकाराम महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये आठ वर्षांची मुलगी लग्नाला योग्य असते. पण त्या मर्यादेपर्यंत तिला दोन वर्षे गंधर्व, दोन वर्षे अग्नी, दोन वर्षे सूर्य व दोन वर्षे चंद्र भोगतो. अशी आठ वर्षे झाल्यावर तिची लग्नाची तयारी होते. त्यावेळी तिने आधी चार देवांशी व्यभिचार केला आहे, म्हणून तिला वरणाऱ्याने त्यागले काय?

 गाय आपल्या तोंडाने विष्ठा खाते, गंगेला मिळण्यापूर्वी ओढे मलीन असतात, वड आणि पिंपळ कावळ्याच्या विष्ठेतून रुजतात, पांडवांचे कुळ पाहिले तर ते पाच देवांपासून जन्मले आणि त्या पाचांची एकच पत्नी होती. विश्वामित्र मेनकेच्या व्यभिचारातून शकुंतले चा जन्म झाला. शृंगऋषी हरिणीपासून व व्यास ऋषी कोळणी पासून जन्मले. असे जरी असले तरी एका हरीच्या नामाने सर्व पातकांचा नाश होतो. या स्त्री-पुरुषांना जरी कुलदोष चिकटलेले असले तरी त्यांनी अनुतापाने हरीचे स्मरण केले म्हणून ते शुद्ध मानले गेले. यांचे पूर्वकूळ देव सुद्धा मनात आणित नाहीत.

 क्रमशः… २  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- नाईक सरांची अचानक झालेली ही भेट वर वर पहाता योगायोगाने घडलेल्या एखाद्या घटनेसारखी वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. ती भेट लवकरच मला अमूल्य असं कांही देण्यासाठी एक निमित्त ठरणार होती हे मला तेव्हा माहित नव्हतं एवढंच!)

सरांशी झालेल्या भेटीच्या वेळी एखाद्या विकएण्डला मी देशपांडेंकडे जायचं असं ठरलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी बऱ्यापैकी वेळ होता म्हणून मी राजू/नितीनना फोन केला आणि आज तुम्हाला सोयीचे असेल तर माझा दुपारनंतर येऊन जायचा विचार आहे एरवी पुन्हा कधीतरी असं सांगितलं.

” जरूर या. आज आम्ही घरीच आहोत. ” राजू अगत्याने म्हणाली, ” हो आणि येताना तुमच्या कथांची कात्रणं जमलं तर घेऊन या. ” असंही सांगितलंन.

” कथांची कात्रणं? कां गं? कशासाठी? “मी न समजून विचारलं. ”

“परवा तुम्ही इथून गेल्यानंतर नानांनी आमच्या ‘चिरानी प्रकाशन’ तर्फे तुमचा कथासंग्रह प्रकाशित करा असं आवर्जून सुचवलं होतं. आज अनायसे येताच आहात तर त्या कथांची कात्रणंही घेऊन या. ” राजू म्हणाली.

मला हे अनपेक्षित होतं.

पण मला ते सहजासहजी स्विकारावंसं वाटेना. मुख्य म्हणजे मी आजवर केलेलं कथालेखन स्वान्तसुखायच तर होतं. केवळ एखादा अनुभव मनाला भिडला किंवा चांगला कथा विषय सुचला की लगेच लिहायला वेळ मिळायचाच नाही आणि वेळ मिळेल तेव्हा निवांत लिहू म्हंटलं तरी ते बऱ्याचदा जमायचंही नाही. मग लेखनाला थोडीफार तरी नियमितता यावी या विचाराने मी चांगल्या चांगल्या मासिकांच्या कथालेखन स्पर्धांना कथा लिहून पाठवायचं ठरवलं. त्यानिमित्ताने लेखन सराव रहावा एवढाच उद्देश होता. अनेक कथांना स्पर्धा पुरस्कार मिळत गेले, कथा आवडल्याची वाचक पत्रे येऊ लागली हाच आनंद माझ्यासाठी पुरेसा होता. त्यामुळे कथा साठत जातील तसे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत असं मला कधीच वाटलं नव्हतं. बॅंकेच्या कामाचे व्याप आणि जबाबदाऱ्याच एवढ्या होत्या कीं मनात नेहमी त्याचेच विचार गर्दी करायचे. त्यामुळे कथा लिहून झाली कीं मनाचा तो कप्पा लगेच आपोआपच बंद व्हायचा!

पण योगायोगच असा की कांही वर्षांपूर्वी नाईक सरांनीच पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती महामंडळाच्या अनुदान योजनेतून माझा ‘जगावेगळी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध होईपर्यंत सातत्याने आग्रह, मार्गदर्शन आणि प्रयत्न करीत मला प्रोत्साहित केलं होतं. आणि आता या दुसऱ्या संग्रहाचं नियोजनही त्यांच्याच पुढाकाराने सुरू होणार होतं!!

सरांचा माझ्यावर लोभ होता हे खरंच, पण यावेळी सरांचा हा प्रस्ताव मला सहजासहजी स्वीकारता येईना. त्यादिवशी मी जाताना कथांची फाईल घेऊन गेलो पण ती देताना अतिशय मोकळेपणानं मी त्या दोघांनाही हेच सांगितलं होतं.

“सरांच्या मनात माझ्या बद्दल असलेल्या सद्भावनांमुळेच तुम्हाला त्यांनी हे सुचवलेलं असणार नक्कीच. म्हणूनच मला मनापासून एक सांगावसं वाटतं. तुम्ही दोघेही लेखक आहात, साहित्यप्रेमी आहात, आणि रसिक वाचकही! तुम्ही दोघांनीही या कथा वाचून कथासंग्रह प्रकाशित करायच्या दृष्टीने तुम्हाला त्या आवडतायत कां योग्य वाटतात कां ते पहा. मगच पुढे काय करायचं ते आपण ठरवूया. सर म्हणाले म्हणून घाई गडबडीने कांही नको करायला. ” ते दोघेही हसून ‘बरं’ म्हणाले. त्यांच्या हसण्याचा अर्थ मला पुढे त्यांच्याकडून कथांचं डीटीपी सुरू झाल्याचं कळलं तेव्हाच समजला. प्रूफ रिडिंग मी स्वतः करायची तयारी दाखवली तेव्हाही राजू हसून ‘चालेल’ म्हणाली. डीटीपी तिने स्वत:च केलेलं होतं. प्रूफरिडींग मी दर शनिवार-रविवार त्यांच्याकडे जाऊन पूर्ण केलं खरं पण विशेष कौतुक म्हणजे किरकोळ अपवाद वगळता त्यात कांहीच चुका नव्हत्या. तो कथासंग्रह प्रकाशित होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर असं अतिशय मनापासून आणि हसतमुखाने दिलेलं राजू आणि नितीन यांचं योगदान खरोखरच कौतुकास्पद होतं! त्या दोघांची ही कामाची पद्धत आणि त्यांचं साहित्यप्रेम माझ्या दृष्टीने आदर्श म्हणावं असंच होतं!

त्या कथासंग्रहाला प्रस्तावना कुणाची घ्यायची असा विषय निघाला तेव्हा मी अतिशय मनापासून भ. रा. नाईक सरांचंच नाव घेतलं होतं. पण तरीही त्या दोघांनी ‘साप्ताहिक सकाळ’ चे त्यावेळचे संपादक श्री. ‘सदा डुम्बरे’ यांचं नाव सुचवलं!

“या संग्रहातील बऱ्याच कथा ‘साप्ताहिक सकाळ’ कथा स्पर्धेतील विजेत्या कथा आहेत. त्यामुळे आधी ‘सदा डुम्बरे’ सरांनाच विचारूया ” राजू म्हणाली होती.

ते योग्यही होतं. पण त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणं, त्यांनी संमती देणं, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून प्रस्तावित संग्रहातील सर्व कथा त्यांनी वाचणं आणि प्रस्तावना लिहून देणं हे सगळंच मला अशक्यप्रायच वाटू लागलं!

” मी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेईन. ते काय म्हणतात ही पुढची गोष्ट. प्रयत्न तरी करू. ” राजू म्हणाली. आणि पुढे आठवड्याभरातच “मी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला मनोदय सांगितला. त्यांनी लगेच होकारही दिलाय. मी कथांची फाईल घेऊनच गेले होते. ती त्यांना वाचायला देऊन आलेय. सदा डुम्बरेसर तुम्हाला ओळखतात म्हणाले. ” असंही तिने सांगितलं.

सदा डुम्बरे सर मला ओळखतायत हे समजलं तेव्हा कथास्पर्धांमधील माझ्या कथांमुळे ते फक्त नावानेच ओळखत असणार असंच मला वाटलं पण ते तेवढंच नव्हतं! जेव्हा त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आवर्जून ‘धन्यवाद’ द्यायला त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी माझ्या संदर्भातल्या एका प्रसंगाची खूप जुनी अशी एक आठवण आवर्जून मला करून दिली, तेव्हा मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो! एखाद्याबद्दलची कृतज्ञता योग्य वेळी मनापासून बोलून दाखवण्यातला त्यांचा मोठेपणा खरंच अपवादात्मक असाच. त्यांनी मला आठवण करून दिलेली माझ्या संदर्भातली ती घटना माझ्या दृष्टीने तशी एक साधीच घटना होती. पण तरीही ती त्यांनी इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरसुद्धा माझ्या नावासकट लक्षात ठेवावी हे आश्चर्य वाटावं असंच होतं!

लिहिण्याच्या ओघात त्या घटनेचा संदर्भ आलाच आहे तर ती घटनाही आवर्जून सांगणं मला अगत्याचं वाटतं. कारण ती घटनाच आज डुम्बरे सरांचं मोठेपण अधोरेखित करायला निमित्त ठरलेली आहे! मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही तेव्हापासून सहा सात वर्षे आधीची घटना. मी कथालेखन स्पर्धेसाठी ‘साप्ताहिक सकाळ’ साठी पाठवलेली एक कथा वेळेत पोहोचू शकली नव्हती त्यामुळे स्पर्धेसाठी तिचा विचार झालेला नव्हता. पुढच्या वर्षी तीच कथा मी ‘साप्ताहिक सकाळ कथालेखन स्पर्धे’साठी पुन्हा पाठवली. सुदैवाने त्याच कथेला त्यावर्षी पहिल्या नंबरचा पुरस्कारही जाहीर झाला. तसे त्यांचे पत्रही मला मिळाले. तरीही त्या कथास्पर्धेचा सविस्तर निकाल पहाता यावा म्हणून मी एका पेपरस्टॉल वरून नुकताच प्रकाशित झालेला ‘साप्ताहिक सकाळ’ चा अंक आवर्जून विकत घेतला. आणि तो सहज चाळू लागलो तेव्हा मला धक्काच बसला. कारण त्या अंकात गेल्यावर्षी मी स्पर्धेसाठी पाठवलेली हीच कथा तेव्हा स्पर्धेत समाविष्ट न झाल्याने प्रसिद्धीसाठी मात्र स्वीकारलेली असावी, म्हणूनच ती या आठवड्याच्या अंकात आज प्रसिद्ध झाली होती! पुढच्याच आठवड्यात प्रसिद्ध होऊ घातलेल्या कथा-विशेषांकात यावर्षीची पारितोषिक प्राप्त सर्वोत्तम कथा म्हणूनही हीच कथा अनवधानाने पुन्हा प्रकाशित होणार होती! ते आक्षेपार्ह तर ठरणार होतंच आणि ‘साप्ताहिक सकाळ’च्या प्रतिमेला तडा जायला निमित्तही! अर्थातच डुंबरे सरांची चूक नसूनही मुख्य संपादक म्हणून याची झळ डुंबरे सरांनाही बसणार होतीच. मी त्या अंकातील स़पादक म्हणून दिलेला त्यांचा फोन नंबर पाहून लगेच त्या नंबरवर फोन केला. फोनवर सुदैवाने संपादक सदा डुम्बरे सरच होते. मी त्यांना नेमकी वस्तुस्थिती सविस्तर सांगताच ते अवाक् झाले.

“तुम्ही आज आवर्जून हे सांगितलंत खूप बरं झालं. मी तातडीने यात लक्ष घालतो. ” ते म्हणाले होते.

अर्थातच गुणवत्तेनुसार तयार केलेल्या पारितोषक प्राप्त कथांच्या यादीतल्या माझ्या कथेऐवजी दुसऱ्या कथेला ती संधी मिळणं अपेक्षितच होतं. मुख्य म्हणजे नकळत घडलेली चूक योग्य वेळी दुरुस्त होणंही तितकंच आवश्यकही होतं.

अर्थात हे सगळं याच क्रमाने त्या त्या वेळी घडत गेलं म्हणूनच केवळ फार मोठं अरिष्ट टळलं याचं मला समाधान होतं. प्रत्येक माणसांप्रमाणेच प्रत्येक कथाही आपापलं प्राक्तन घेऊनच जन्माला येत असते याचं एक लेखक म्हणून मला आलेलं ते प्रत्यंतरच होतं!

तीच कथा आता प्रकाशित होऊ घातलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहात समाविष्ट असणे आणि ती पुन्हा या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्यापूर्वी ‘सदा डुम्बरे’ सरांच्याच समोर जाणे हा सुध्दा एक अनोखा योगायोगच होता!

खूप वर्षांपूर्वी घडलेलं हे सगळं मी विसरूनही गेलो होतो. पण या पार्श्वभूमीवर मी डुंबरेसरांना धन्यवाद द्यायला जेव्हा फोन केला तेव्हा माझ्याशी बोलताना त्यांनी याच घटनेची मला आठवण करून दिली आणि आपल्या हातून घडून गेलेली एखादी सकारात्मक गोष्ट सुध्दा नकळत दुसऱ्यासाठी प्रदीर्घकाळ स्मरणीय कशी ठरू शकते याचा सुखद अनुभव मला आला! एरवीही त्यांनी प्रस्तावना लिहायला नकार नसताही दिला पण माझं नाव नजरेसमोर आलेल्या क्षणी त्यांच्या मनात खोलवर रूजलेल्या त्या प्रसंगाच्या माझ्या संदर्भातल्या आठवणीचं त्यांना नेमकं स्मरण होणं आणि त्यांनी त्याचा मोकळेपणाने आवर्जून उल्लेख करणं हा त्यांचा चांगुलपणाच म्हणायला हवा!

नाईक सरांचं फक्त एकदोन दिवसांच्या सवडीनं पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांचं मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक न् जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलीकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरू केलेली असणं, सरांच्या मनातील माझ्याबद्दल असलेल्या लोभामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह त्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं मनापासून वाटणं, आणि त्यांच्या इच्छेला त्यांच्या लेक जावयानेही अगदी मनापासून प्रतिसाद देणं या एका महिन्याभरातच घडून गेलेल्या सगळ्या अनपेक्षित घटनांचे इतरही अनेक धागेदोरे या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाशीही आश्चर्यकारकरित्या जोडले जाणार होते आणि ‘त्या’च्या कृपालोभाची अशा अनेक धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली वीण माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार होती हे मात्र माझ्या गावीही नव्हतं!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शून्य… शून्य… शून्य…” भाग – २ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – २ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कालच्या लिखाणात शून्यामुळे आयुष्यात काय बदल जाणवले ते सांगितलं. पण विचार सुरुच होते. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी हे काम केल नसत तरी कोणीतरी ते केलच असत. कस ते सांगता येत नाही. पण केलच नसतं तर…

आपल्या दिवसभरातल्या अनेक गोष्टी कशा झाल्या असत्या… आज वाचता न येणाऱ्या संख्या आम्ही शब्दांच्या सहाय्याने लीहू शकतो त्या संख्यांच काय झालं असतं. कारण शब्दात लिहिण्यासाठी सुध्दा ती आकड्यातली संख्या वाचतातर यायला हवी. यासाठी संदर्भच हवा असेल तर महापालिकेपासून देशाच्या आर्थिक नियोजनाचे आकडे पहा. केवळ मुंबई महापालिकेच बजेट जवळपास चौर्याहत्तर हजार कोटी आहे. इतके हजार कोटी आकड्यात कसे लिहीणार. आणि वाचणार केव्हा. पण शून्यामुुळेेच हे आकडे अस्तित्वात आले. लिहीले आणि वाचलेही गेले.

हे खूप मोठं उदाहरण झालं. पण शून्य नसत तर आमचा आजचा पगार कीती सांगितला असता? … आमची प्रगती पैशाकडून रुपयांकडे झाली असती का… शून्यामुुळेेच आकडे ०९ नंतर १० नंतर १०० असे वाढले आणि वाढतच राहिले.

शंभर आकडा आला, आणि सुरु झाली टक्केवारी. शून्य आणि तो वापरायचे नियम शोधले नसते तर आज गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी काय शिकवलं असतं… हा प्रश्न अंक असणाऱ्या सगळ्याच विषयाबाबतीत आला असता.

आज गाडीत पेट्रोल भरतांना सुध्दा तो म्हणतो, हं झिरो म्हणजेच शून्य बघा. शून्य नसता तर आम्ही काय पाहिलं असतं. सुुरुवात कुठून केली असती. वेळेचे सेकंद, मिनीटं, तास कसे मोजले असते. गाडीचा वेग कसा सांगितला असता. महिना किती दिवसांचा असता. वर्ष कसं मोजलं असतं. थर्मामिटरने ताप कसा मोजला असता.

एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर म्हणतो शंभरवेळा, किंवा हजारदा सांगून झालयं. तेव्हा काय म्हंटलं असतं. शंभरला शेकडा, शत, शतक असे पर्यायी शब्द मिळाले असते का… “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ” “शत जन्म शोधिताना” “सौ साल पहले… ” “तुम जिओ हजारो साल” गाण्यात अशा ओळी आल्या असत्या का… सोनं शंभर नंबरी झालं असतं का… कौरव कीती होते, याच ऊत्तर काय दिल असतं.

जपमाळ एकशेआठ मण्यांची कशी झाली असती. आमची संस्कृती इतकी जूनी आहे तर मग रौप्य, सुवर्ण, हिरक, अमृत, शतकोत्तर महोत्सव कसा मोजला किंवा सांगितला आणि साजरा केला असता.

त्यामुळे शून्याचा शोध लावल्यामुळे काही गोष्टी थोड्या त्रासदायक वाटत असतील. पण त्यामुळेच अनेक गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. व्यवहार सहज आणि सोपे झाले आहेत.

आज गणितज्ञांंसह अनेकांनी प्रगती केली असेल. पण खरोखरच शूून्यातूून कोणी निर्मिती करून क्रांती घडवली असेल तर ती शून्याचा शोध लावणारा आणि त्याचे नियम तयार करणारा यांनीच. आणि याचं श्रेय जातं ते त्या दोन महान भारतीयांनाच. या भारतीयांनी शून्य आणि त्याचे नियम शोधले नसते, तर किती तरी काळ…

आम्ही शून्यातच अडकून राहिलो असतो.

क्रमशः – भाग २ 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शून्य… शून्य… शून्य…” भाग – १ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – १ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आर्यभट्ट यांनी साधारण इ. स. ४५६ च्या आसपास शून्याचा ऊल्लेख केला. तर ब्रह्मगुप्त यांनी शून्याचे नियम निश्चित केले असं म्हणतात. सृष्टीची निर्मिती त्याच्याही आधी म्हणजे सुमारे १३ ते १४ अब्ज वर्षापूर्वी झाली असं म्हणतात. पण तरीही आपण सृष्टीची निर्मिती शून्यातून झाली असं म्हणतो.

 मला याच्या इतिहासात जायचं नाही. पण शून्यामुुळेेच माझ्या आयुष्यात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.

 शून्यातून सुरुवात करून बर्‍याच जणांनी ऊत्तुंग यश मिळवल्याचं आपण ऐकतो. मी ऊत्तुंग यश मिळवलं नसलं तरी, मला समजायला लागल्यापासून माझी सुरुवात सुध्दा शून्यापासून झाली आहे. अगदी २५ गुणांच्या परिक्षेत सुध्दा मला मिळालेले गुण अगदी ७, ८, ९ असे कितीही असले तरी ते लिहितांना मात्र ०७, ०८, ०९ याच पध्दतीने लिहिले गेले. म्हणजे आधी शून्यच लिहिला गेला. अशा रीतीने माझी सुरुवात शून्यापासून झाली. आणि नंतर त्याची सोबत कायम आहे.

 अशा परिक्षेत परिक्षा २५ गुणांची, म्हणजे दोन अंकी होती. मिळालेले गुण ७, ८, ९ असेच एक अंकिच होते. फक्त ते ०७, ०८, ०९ असे लिहिल्यामुळे मला पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीतरी दोन अंकाच्या परीक्षेत मला दोनअंकी गुण मिळाले आहेत असा (गैर)समज मी करून घेत होतो. आणि तसा (गैर)समज मी अजूनही काही बाबतीत बाळगून आहे.

 एक पदवी मिळवायला बरीच वर्ष जावी लागतात. शून्यातून सुरुवात करून यश मिळवणार्‍यांंनी सुध्दा काहीकाळ संघर्ष केला असेल. पण अक्कलशून्य, व्यवहारशून्य, विवेकशून्य, भावनाशून्य अशा शून्य असणाऱ्या बर्‍याच पदव्या मला विनासायास मिळाल्या. या पदव्या मिळवण्यासाठी माझे परिश्रम शून्य होते. आणि अशा पदव्या मला अल्पकाळात बर्‍याचदा मिळतात.

 चांगल्या गोष्टींंच्या बाबतीत ती कुठे थांबवायची याला ऊत्तर नसलं तरी सुरुवात करावी लागते ती शून्यापासून.

 मोबाईल फोनचं कार्ड घेतांनासुध्दा त्याने अगोदर दोन नंबर सांगितले. पण त्या नंबरमध्ये शून्य कुठेच नव्हता. मग काय मी ते कार्ड घेतलच नाही. आणि मग नंबरमधे शून्य असणारं कार्ड घेतलं. हा प्रवास इथेच थांबला नाही. परत प्रश्न आला तो रिंगटोनचा.

 सुरुवातीला एक संगीत वाजणारी रिंगटोन होती. मी ती बदलली. आणि अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा या गाण्याची ओळ रिंगटोन म्हणून ठेवली. गाण्याच्या या ओळीत अर्थशून्य याचा अर्थ वेगळा असेल. पण मला अर्थ म्हणजे पैसा, आणि या पैशातून निर्माण होणारा कलह यात शून्य रस आहे. म्हणूनसुद्धा रिंगटोन मधेही मी शून्याची साथ सोडली नाही.

 वेगवेगळ्या महत्वाच्या सामन्यांची आपली काही चिन्ह असतात. मला ऑलिंपिक सामन्याचे चिन्ह आवडते. कारण त्यात एक दोन नाही, तर चक्क पाच मोठीमोठी शून्य आहेत व ती एकमेकांत अडकली आहेत.

 मला फक्त मारोतीस्तोत्र पाठ आहे. बाकीची स्तोत्र पाठ करण्याकडे मी पाठ फिरवली आहे. मारोतीस्तोत्र पाठ होण्याच कारण परत शून्य हेच आहे. त्यात वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा अशी ओळ आहे.

 देवाची पुजा करतांना सुध्दा मी मारोतीस्तोत्र म्हणून झालं कि शांतपणे बसून राहिलेली पुजा संपवतो. पण घरच्यांना वाटतं मनापासून पुजा सुरु आहे. कसा बसलाय पहा शून्यात नजर लावून. आता मी शांत का बसलोय काय सांगणार त्यांना, दुसरं काही येत नाही… पण त्यांना माझी नजर शून्यात दिसते.

 आपले रुपये सुध्दा पहा. १०, २०, ५०, १००, २०० असेच आहेत. हे असेच ठेवायला काही व्यवहारिक कारण असेल. पण शून्य आहेच.

 मी काही गोष्टी शून्य टक्के व्याज आकारणार्या कंपन्यांकडून घेतल्या आहेत.

 दूरदर्शनवर दाखवल्या जाणार्‍या मालिकेत आवडलेली मालिका म्हणजे पोलीसांनी गुन्हेगारांचा घेतलेला शोध. कारण या मालिकेच शिर्षक होत. एक शून्य शून्य…

 शून्य प्रहर हा भारतीय संंसदेेच्या कामाचा एक भाग आहे. भारतीय संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास आणि कामकाजाचा तास यामधील वेळेचा काळ म्हणजे शून्य प्रहर. आता संसदेत सुध्दा एखादा प्रहर शून्य प्रहर म्हणून मान्य असेल तर मला शून्याला मान द्यावाच लागेल.

“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” हे गाणं माझ्याच बाबतीत मी म्हंटल तर, “शून्या शून्या मैफिलीत माझ्या” असंच म्हणेल. कारण माझ्या आयुष्याच्या मैफिलीत असलेली शून्याची साथ…

क्रमशः – भाग १ 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ग्रेटनेस नेमका कशात आहे?” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी ☆

सौ. स्नेहा देशपांडे पतकी

🌸 विविधा  🌸

☆ “ग्रेटनेस नेमका कशात आहे?” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी ☆

उच्चशिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकऱ्या करणे ग्रेटच आहेत वाद नाही. ती तारेवरची कसरत,… वगैरे सगळे मान्य. पण उच्चशिक्षण घेऊनही बाय चॉइस गृहिणी होणे हेही तितकंच ग्रेट आहे की. पण हा ग्रेटनेस समाजमान्य नाही. एवढे शिकून घरातच बसलीय किंवा माझी नोकरी होती म्हणून 1 bhk मधून 2, bhk मधे तरी आलात, किंवा याउलट यापेक्षा नोकरी केली असती तर बरे झाले असते मी 24 तास घरात आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही माझी,… ही वाक्य सहज ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडायचे आणि पैसा मिळवायचा हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय का असावे.

 खरे तर गृहिणी हा 24 hrs job by itself असतो. 24tas विनामूल्य सेवा. नोकरी आणि सेवा यांमध्ये फरक आहेच. नोकरी ही पैसे मिळवण्यासाठी असते. सेवा कोणत्याही अपेक्षेने केली जात नाही.

 माझ्या मुलाला मॅगी खायला लागत नाही, त्याला डे केअर मधे ठेवायला लागत नाही, PTA meeting attend करणे एकमेकांवर ढकलावे लागत नाही, आल्या गेल्याला घराला कुलूप बघून परत जावे लागत नाही, यातही greatness आहेच की.

मला माझ्या स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचे काय वाटते की माझ्यामुळे घरातल्याना हवे तेव्हा येणाजण्याचे स्वातंत्र्य मिळते. तरीही त्यांना काय, कुठे, कधी, कसे विचारले की बंधन वाटते ही एक गमतीशीर बाबच आहे.

 कदाचित नवऱ्याचा EMI शेअर करत नसेन पण म्हणूनच तो आईवडील, मुले, घर हे माझ्यावर सोपवून बिनधास्त कामावर जातो.

मग women empowerment वाले म्हणतील हे बायकानीच का करायचे, घरची जबाबदारी त्यांनीही घ्यावी.

घ्यावी ना, जरूर घ्यावी. पण दोघांनीही ते बाय चॉइस करावे. आणि बाय चॉइस असेल तर ते आनंदाने करावे. आपल्या त्या आनंदासाठी कुणीतरी राबत असते. कधी नवरा, कधी आई, कधी सासू, तर कधी पैसे देऊन ठेवलेली कामवाली. त्यासाठी आपण किती कृतज्ञ असतो.

 आपले घर आपण स्वतः नीटनेटके ठेवणे, स्वच्छता करणे, उत्तम स्वयंपाक करणे, अंगणातली बाग ताजीतवानी ठेवणे, सण वार, देवधर्म, अगदी कपड्यांच्या छान एकसारख्या घड्या घालणं

यातसुद्धा आनंद असतो. घरी बसणाऱ्यांना नोकरी करणारे ग्रेट तर नोकरी करणाऱ्यांना घरी बसणारे नशीबवान वाटतात. नोकरदार स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य, आदर कमावलेले असले तरी गृहिणींनी आनंदाचे क्षण कमावलेले असतात. उदा. आपले मूल मोठे होताना पाहणे, मोकळा वेळ, एडस्टमेंट शिवाय सण समारंभ..

दोन्हीत श्रेष्ठ कनिष्ठ असे काहीच नाही. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट आपण स्वतः निवडली असेल तर त्यातला आनंद टिकवणे ही आपली जबाबदारी असते. खरा ग्रेटनेस त्यात आहे.

© सौ. स्नेहा देशपांडे पतकी

कोल्हापूर

मो. 9823390516

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ये रे पत्रा… ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ये रे पत्रा… ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

परवा एकदा कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं काम असलं, तरी ते वेळखाऊ आणि जिकीरीचं काम असल्याने नेहमी पुढे पुढेच ढकललं जातं. त्या दिवशी मात्र मी नेटाने बसलेच. कपाट आवरून झालं आणि मी माझी आवडती गोष्ट पुढ्यात घेऊन बसले. ती म्हणजे माझा पत्रांचा बॉक्स. माझी शाळेपासूनची पत्रे मी त्यात जपून ठेवली आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हणून मी कपाट आवरते, तेव्हा तेव्हा मी ती काढून, वेळ असेल तशी वाचत बसते. त्या दिवशी बॉक्स पुढे घेऊन मी फतकल मारून बसलेच.

सर्वात वरचं पत्र होतं सखा कलालांचं. या पत्राचं मला विशेष अप्रूप होतं, ते अशासाठी की अलिकडे अशी पत्रेच येईनाशी झालीत. सध्या टपाल येतं, ते फक्त वर्गणी संपली, किंवा मिळाली, किंवा मग कार्यक्रमाचं निमंत्रण, मिटींगची सूचना यासारखी. हे पत्र तसं नव्हतं. खूप दिवसांनी माझी कथा आवडल्याचं खुषीपत्र होतं ते. ‘समकालीन भारतीय साहित्यामध्ये माझ्या आलेल्या कथेचा हिन्दी अनुवाद वाचून त्यांनी लिहीलं होतं, युनिफॉर्म कथा वाचली. आवडली. मराठी लेखिकेची कथा हिन्दी भाषेत वाचण्याचा आनंद काही औरच असतो. ’ पुढे त्यांनी आवर्जून लिहीलं होतं, ‘तुमच्या नावलौकिकाची कथा अशीच सर्वदूर विस्तारत जावो. ’ असं पत्र कुणाचंही असतं, तरी आनंदच झाला असता, पण सखा कलाल म्हणजे नावाजलेले ग्रामीण कथाकार. त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी माणसाकडून मिळालेली दाद मोलाची वाटली.

हे कौतुक – पत्र घरच्यांना दाखवलं. त्यांच्याबरोबर पुन्हा वाचलं. मैत्रिणींना दाखवलं. तितक्या तितक्या वेळा त्या पत्रवाचनातून आनंद होत गेला. या पत्रामुळे मला झालेल्या आनंदात घरच्यांना, मैत्रिणींना सहभागी करून घेता आलं. फोनचं तसं नाही. बोलणार्‍याशी प्रत्यक्ष संवाद होतो, हे खरे. पण तो आपल्यापुरता असतो. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही आणि पत्रवाचनासारखा पुन:प्रत्ययाचा आनंदही घेता येत नाही.

अलीकडच्या गतिमान युगात पत्रलेखनाला खूप ओहोटी लागली आहे. घराघरातून दूरध्वनीची यंत्रे बसली. आणि दूरवरून विनाविलंब संबंधितांशी संपर्क साधता येऊ लागला. ते माध्यम सोयीचं वाटलं. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा प्रसारही झाला. आज-काल कथा, कविता, लेख आवडल्याची खुशी पत्रे नाही. खुशी फोन येतात.

मला अगदी लहानपणापासून पत्रलेखनची आवड आहे. त्याला आलेली उत्तरे मी जपून ठेवली आहेत. अगदी शाळेत असल्यापासूनची… ती पत्रे पुन्हा पुन्हा काढून वाचण्याचा मला छंदच आहे.

माझे कथा-लेख ८०-८२पासून छापून येऊ लागले. त्या काळात दूरदर्शन आणि दूरध्वनी घराघरात फारसा बोकाळला नव्हता. अर्थात मनोरंजन आणि माहितीसाठी वाचनावरच भिस्त असायची. त्यावेळी लोक, कथा-लेख वाचत आणि जे आवडेल, ते लेखकाला खुशीपत्र पाठवून कळवत. मला माझ्या लेखनाबद्दल अनेक खुशीपत्रे आलेली आहेत आणि अजूनही ती माझ्याजवळ आहेत. त्यात सर्वात देखणं पत्र आहे व. पु. काळे यांचं. दोनच ओळींचं पत्र. पण मांडणी इतकी सुरेख की पत्र म्हणजे एक रेखाचित्र वाटावं.

औपचारिक खुषीपत्रे सोडली, तर इतर जी नातेवाईक, स्नेहीमंडळींची पत्रे असतात, ती वाचताना, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात. त्यामुळेच अलीकडे पत्रलेखन कमी होत चाललय, नव्हे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे मन विषण्ण होतं. त्या दिवशी सखा कलालांचं असं अचानक आलेलं पत्र वाचलं आणि वळवाच्या पावसासारखं मन शांतवून, सुगंधित करून गेलं. मनात पुन्हा पुन्हा येत राहीलं,

‘ये रे पत्रा.. ये रे पत्रा… ’

 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मूल्य आणि किंमत यात फरक आहे का? ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ मूल्य आणि किंमत यात फरक आहे का? ☆ श्री हेमंत तांबे ☆

मूल्य आणि किंमत यात फरक आहे काय? – तर, हो आहे!

मूल्य म्हणजे किंमत नव्हे, तर जे नैतिकतेशी जोडलं गेलं आहे ते मूल्य. ते सभ्यतेशी पावित्र्याशी जोडलं गेलं आहे आणि जी आर्थिक खर्चाशी निगडित आहे ती किंमत. उदाहरणार्थ — मूल्य व्यवस्था, नैतिक मूल्ये, मूल्याधिष्ठित समाज वगैरे वगैरे. मूल्ल्ये विकत घेता येत नाहीत, तर ती रक्तात म्हणून आचारातच असावी लागतात. मूल्य नागरीकत्वाशी जोडलं गेलं आहे, तर किंमत जाहिरातीशी जोडली गेली आहे. कसं ते पाहूया.

आपण मूल्य म्हणजे किंमत समजू लागलो आणि विचार प्रक्रिया बदलली. विचार बदलले की, आचारात बदल होतो. किंमत दर्जावर आधारित असावी. जेव्हा किंमत जाहिरातीवर ठरवली जाऊ लागली, तेव्हा दिखाऊपणा महत्वाचा झाला. जेव्हा दिखाऊपणा महत्वाचा होतो तेव्हा आदर्श बदलतात. “उस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलीया रंगा? ” असं चोखामेळा म्हणतो व योग्य काय आहे ते सांगायला लागतो!

आनंदी असणे ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे. आनंद आतून तयार होतो, तो Absolute असतो. त्याखालची उतरंड अशी आहे. – आनंदाच्या खालची पातळी सुख आहे तर, त्याखाली समाधान ही अवस्था आहे. समाधाना खाली तृप्ती असते आणि तृप्तीच्या खाली गरज असते. गरजा वाढत जातात तेव्हा विवेक कमी होत जातो. गरजेचं रुपांतर मजेत झालं की, विवेक संपून ऐष सुरू होते. ऐष आणि हाव यांच्या सिमारेषा धुसर असतात. हाव अमर्याद असते, ती विधी विधान पायदळी तुडवून अनैतिक अनैसर्गिक कृत्ये करवून घेते!

आपण सध्या हाव या रकान्यात उभे आहोत. याचे परिणाम पाहा. आपल्या आईवडिलांकडे स्वतःचं घर, शेत जमीन, गरजेला चार पैसे व काही सोनं होतं. ते स्वतंत्र होते, समाधानी होते!

आपण मोटारसायकल ते आयफोन ते कार ते घर कर्जावर घेऊ लागलो, कारण आपण जाहिरातीला बळी पडलो. जाहिरातीनं आपलं स्वातंत्र्य नष्ट झालं आणि आपण बेगडी उच्च दर्जाचे गुलाम झालो. आता आपण आर्थिक व्यवस्थापनाचे धडे, आर्थिक सल्लागारां कडून घेऊ लागलो. यासाठी आपण त्यांना सल्ला किंमत देऊ लागलो. थोडक्यात आपण पैसे देऊन आर्थिक जाळ्यात गुंतत गेलो, परिणामी गुलामगिरी आपला स्थायिभाव झाला!

आता मालमत्ता ही आर्थिक जबाबदारी झाली किंवा आर्थिक दायित्व वाढलं. जेव्हा क्षमतेपेक्षा दायित्व वाढतं, तेव्हा गुलामीच्या बेड्या मजबूत होत जातात. आजची आपली तरूण पिढी या गुलामीच्या बेड्या ठोकून घेण्यात फारच आघाडीवर आहे. याचं मुख्य कारण संदर्भ बदलत गेले. गेल्या दिड हजार वर्षांत श्रम व शेती यांची किंमत कमी होत होत, श्रमाला शिक्षेची किंमत दिली गेली आणि शेती हा जगण्याचा निकृष्ट मार्ग झाला. बरं, हे कुणाकडून निश्चित झालं? तर, “अन्न हे पूर्ण ब्रह्म” आहे असं सांगणाऱ्या विद्वान महाभागां कडून. विद्वान महाभाग कोण? तर, जो श्रम न करता ऐषोआरामाचं जगणं जगतो व तसं जगण्याचे सल्ले पैसे घेऊन देतो तो. खरं म्हणजे विद्वान या शब्दाचा अर्थ असा नाही, पण संदर्भ बदलले की अर्थ बदलतात. हल्ली विद्वान हा शब्द उपरोधानं वापरायला लागल्या पासून तो एवढा स्वस्त व गुळगुळीत झाला की मुर्ख लोक चक्क स्वतःला विद्वान समजू लागले!

विद्वान खरं म्हणजे बुद्धीमान नसून हुशार असू शकतो. पण बव्हंशी हुशारी स्वार्थाकडे जाते, तर बुद्धत्व सभ्यतेकडे जातं. जेव्हा श्रम व बुद्धी यांची फारकत होते, तेव्हा प्रगती ते अधोगती असा प्रवास सुरू झालेला असतो. आपल्या संस्कृतीत असं मानलं जात होतं की, राजात विष्णूचा अंश असतो. हे फक्त मानणं नव्हतं, तर आपल्या अनेक राजांचं चारित्र्य तसं होतं. श्रीरामाला तर आपण विष्णूचा अवतार म्हणतो, म्हणून रामराज्य अजरामर झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सैन्याला व सेनापतीला सक्त ताकीद दिली होती की, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही, कारण शेतकरी श्रम करून जगतो म्हणून, त्याचं जगणं जास्त नैतिकतेशी जोडलेलं असतं!

राजवटी गेल्या आणि सरंजामशाह्या आल्या. सरंजामशाह्या गेल्या आणि चक्क पारतंत्र्य आलं. पारतंत्र्य जाऊन कल्याणकारी लोकशाही कागदावर आली. प्रत्यक्षात तिचं रुपांतर घराणेशाहीत झालं. कागदी कल्याणकारी लोकशाहीत आश्वासनांचा पाऊस पडला आणि स्वार्थी घराणेशाहीचे आपण गुलाम झालो. विवेक तर आपल्यातून हजार वर्षांपूर्वीच गायब झाला होता. जेव्हा स्वार्थाच्या परमोच्च शिखरावर सर्व समाजच पोचतो, तेव्हा त्या समाजाचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक म्हणून काम करतील काय? विवेक हरवलेला समाज मग अशा सरंजामी वृत्तीच्या लोकांचा गुलाम होतो आणि लोकसेवकांच्या टोळ्या तयार होतात. टोळ्यांच्या जाहिराती सुरूच असतात. टोळी प्रमुखाची जाहिरात जेवढी आकर्षक, तेवढे विवेक हीन स्वार्थांध गुलाम आता त्याचे निष्ठावंत म्हणून पुढे येतात आणि समाज अधःपतनाच्या आणखी खालच्या पायरीवर जातो!

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चार पायांवर धावणारा माणूस जेव्हा दोन पायांवर चालायला लागला, तेव्हा ओघानंच तो दूरचं पाहू लागला. (चिंपांझी आणि माणूस काडीमात्र संबंध नाही. डार्विनची थिअरी या बाबतीत पूर्णपणं चुकीची आहे. या विषयावर मी आधी लिहीलं आहे. आणि ते कुणीही खोडून काढलेलं नाही.) जेव्हा तो दूरचं पाहू लागला, तेव्हा त्याला संकटाची चाहूल आधी येऊ लागली. सोबतच आता त्याचे हात मोकळे झाले होते. दूरदृष्टी, वैचारिक क्षमता आणि मोकळ्या हातांनी त्याला निर्मीतीकडे आणलं. अन्नाच्या शोधात भटकंती सोडून, तो हाती नागर धरून शेती करू लागला. नागराचा शोध हा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील महत्वाचा टप्पा. ज्याच्या हाती नागर तो नागरिक, तो सभ्य समाजाचा प्रतिनिधी!

काळ बदलला तशी माणसं बदलली, माणसं बदलली तसे संदर्भ बदलले. संदर्भ बदलले तसे शब्दांचे अर्थ बदलले. बदललेल्या शब्दांचे अर्थ जाहिरातीतून मनावर बिंबवले गेले. आता सर्व नालायक, स्वार्थी चोर, डाकू, लुटेरे, लफंगे, फुकटे, भ्रष्टाचारी – माननीय, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, प्रात:स्मरणीय झाले. चार पुस्तकं वाचलेले म्हणून शिक्षीत – चक्क सुशिक्षित विचारवंत बुद्धीजीवी झाले!

विवेकाची वानवा आणि जाहिरातीच्या माऱ्यानं आपल्याला सन्मार्गावरून वाममार्गावर केव्हा आणलं कळलंच नाही. दुर्जनांच्या सत्काराची चढाओढ सुरू झाली आणि त्यातील आर्थिक उलाढालीनं नेत्रदीपक यश मिळवलं. हे सर्व आपल्याला मूल्य आणि किंमत यातील फरक न कळल्यानं घडलं!

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares