मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- १ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- १ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ 

भूपाळी आणि ढोल दमामे गर्जती होते काकड आरती

नमस्कार. बघता बघता देवीचे नवरात्र संपले आहे. विजयादशमी झाली. उद्या कोजागिरी पौर्णिमा! या दिवशी गेले महिनाभर बसणारी भुलाबाई. या उत्सवाची सुद्धा सांगता होईल. परंतु हिंदू समाजाच्या चालीरीती अशा आहेत की, वर्षभर काही ना काही सण, उत्सव, परंपरा, कुलाचार हे सुरूच राहतात. महत्वाचं म्हणजे त्या प्रत्येक उत्सवात काव्य हे असतंच. त्याचप्रमाणे कोजागिरीपासून तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आकाश दिवा किंवा पाताळ दिवा लावण्याची सुद्धा आपल्याकडे परंपरा आहे. कारण याच मधल्या काळात दिवाळीचा सणही येत असतो.

या काळात स्त्रिया पहाटे उठून तुळशी समोर रांगोळीच्या द्वारे कार्तिक मास काढतात. यात राधाकृष्ण, तुळशीवृंदावन, चंद्र – सूर्य – शंख – चक्र – आवळीचं झाड – ३३ गोपद्म अशा अनेक आकृती असतात. लग्न होऊन सासरी आलेल्या छोट्या मुलींना या संस्कारांव्दारे चित्रकलेचं, वनस्पतीशास्त्राचं, अवकाशाचं शिक्षण परंपरेतून दिलं जायचं असं इथे म्हणता येतं.

याच काळातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे काकड आरती आणि त्यासाठी म्हटली जाणारी भूपाळी. अनेक मंदिरांमध्ये वर्षभर रोज भुपाळ्या म्हटल्या जातात आणि त्यानंतर आरती केली जाते. परंतु सर्वसामान्यपणे अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्तिक मास साजरा केला जातो. यात पहाटे उठून भूपाळीचा उत्सव साजरा होतो. अनेक भूपाळ्या म्हटल्या जातात. भूपाळी म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी गायला जाणाऱ्या पारंपरिक गीतांचा एक प्रकार आहे. मुळात ही सुद्धा एक कविता आहे. ही गीते शक्यतो भूप रागात बांधलेली असतात. जो सृष्टी निर्माण कर्ता, त्याची स्तुती करण्याच्या उद्देशाने म्हटल्या जातात. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. रात्रीचा अंतिम प्रहर किंवा दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याच्या, भूप रागातील पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून त्याला जागे केले जाते, तीच ही भूपाळी. होनाची बाळा यांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी सर्व परिचित आहेच.

हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे यातील देवदेवतांना रोजच भूपाळी द्वारे जागविले जाते.

या भूपाळ्या अनेक संतांनी रचलेल्या आहेत.

त्यातली प्रथम श्री गणपतीची भूपाळी पाहूया!

*

उठा उठा सकळीक /वाचे स्मरावा गजमुख

रिद्धी सिद्धीचा नायक / सुखदायक भक्तासी

*

अंगी शेंदुराची उटी /माथा शोभतसे किरीटी

केशर कस्तुरी लल्लाटी / हार कंठी साजिरा

*

कासे पितांबराची धटी /हाती मोदकाची वाटी

रामानंद स्मरता कंठी / तो संकटी पावतो

*

भूपाळी ही सहसा चार चरणांची असते. याच्या प्रथम तिन्ही चरणात यमक साधलं जातं. शेवटची चौथी ओळ वेगळी असते. यात अक्षरे किंवा मात्रांचे बंधन नसते. मात्र मिळती जुळती अक्षरेच इथे घेतली जातात. शेवटच्या कडव्यात रचयिता जो कुणी असेल त्याचे नाव असते.

आज आपण काही भुपाळ्या बघणार आहोत. सृष्टी निर्माता, पालनकर्ता, आणि श्री शंकर या सर्वांसोबतच, आपली जी श्रध्दास्थाने आहेत, त्यांच्याही भुपाळ्या म्हटल्या जातात. त्यात तुळशी, गंगा, गाय, हेही विषय असतात. शिवाय संतांसाठीही अनेक भुपाळ्या रचलेल्या आढळतात.

श्रीरामाची भूपाळी

*

उठोनिया प्रातःकाळी / जपा रामनामावली

स्वये ध्यातो चंद्रमौळी / शैलबाळीसमवेत

*

राम योग्यांचे मंडणा राम भक्तांचे भूषण

राम धर्माचे रक्षण / संरक्षण दासांचे

*

रामे त्राटिका मारिली /रामे जानकी पर्णिली

रामे शिळा उद्धरिली /गणिका केली ती मुक्त

*

रामे पाषाण तारिले / रामे दैत्य संहारीले

रामे बंदी सोडविले / मुक्त केले सुरवर

*

रामे रक्षिले भक्ताची /रामे सोडविले देवासी

रामदासाचे मानसी / रामदासी आनंद ॥

या शिवाय

राम सर्वांगी सावळा / देह अलंकार पिवळा

नाना रत्नांचिया कळा / अलंकार शोभती ॥

ही सुद्धा श्रीरामांची भूपाळी प्रसिद्ध आहे.

*

एक गंगेची भूपाळी आपण बघूया!

उठोनिय प्रातःकाळी / वदनी-वदा चंद्रमौळी

श्री बिंदू माधवा जवळी / स्नान करा गंगेचे /स्नान करा गोदेचे ॥

*

स्नानदान जया अंतरी / घडेल भागीरथीच्या तिरी

कृपा करील त्यावरी / ऐसे महात्म्य गंगेचे

*

भागीरथीचे स्नान करा /हृदयी स्मरा गंगाधरा

चुकेल चौऱ्यांशी चा फेरा / ऐसे महात्म्य गंगेचे ॥

*

गंगा आहे स्वर्गावरती / पाताळी ते भोगावती

मृत्यूलोकी हे विख्याती ‘ ऐसे महात्म्य गंगेचे ॥

*

कृष्णा वेणा तुंगभद्रा / शरयू कालिंदी नर्मदा

भीमा भामा मुख्य गोदा /स्नान करा गंगेचे ॥

*

याशिवाय श्रीधराची / दशावताराची / पंढरीची / शंकराची अशा अनेक भूपाळ्या आहेत.

भूपाळ्या संपल्या की, ढोल दमामे गर्जती / होते काकडआरती

कार्तिक महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यातच पहाटेच्या वेळी अनेक मंदिरातून होणाऱ्या काकड आरतीच्या निनादाने सर्व आसमंत निनादून जातो मृदुंगाच्या आवाजाने व भक्तगणांच्या आरत्या आळवणीच्या स्वरांनी वातावरण भक्तीमय होऊन जाते. यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते. प्रजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाक्रूर तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामींनी जन्म घेतला. या कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला आणि तोही कार्तिक महिन्यात त्यांच्या नावावरूनच या महिन्याला कार्तिक हे नाव पडले आहे. या महापराक्रमी पुत्राचे स्मरण म्हणून काकड आरती केली जाते, असेही काही ठिकाणी म्हणतात.

काकड आरती ही हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी देवाला जागृत करण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक प्रथा आहे. काकडा उजळून ही आरती केली जाते. अनेक मंदिरांमध्ये विशेषता कार्तिक महिन्यात ही आरती होते आणि ती नित्यनेमाने होते जागे करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे ही दिवसाची पहिली आरती मानली जाते. वारकरी संप्रदायात काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. काकड आरती वैयक्तिक तसेच सामुदायिक परंपरा आहे. दररोज किंवा विशिष्ट काळात म्हणजे कार्तिक महिन्यात ही पाळली जाते. कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे काकड आरती करण्याची प्रथा आहे. या आरतीपूर्वी विविध भजने /स्तोत्रे आणि भुपाळ्या म्हटल्या जातात. संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ इत्यादी संतांनी काकड आरती रचलेल्या आहेत.

काकड आरतीला जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्या करतात. सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते. मनात भक्तीरसाची निर्मिती होते. पापक्षालन होते. नंतर घरातील तुळशी वृंदावनाजवळ येऊन तुळशीची पूजा केली जाते.

उठा उठा साधुसंत /साधा अपुलाले हित

वाया जाईल हा नरदेह /मग कैसा भगवंत

उठोनिया वेगेसी चला जाऊ राऊळाशी /

तुळशी घालूनिया ओटा / विघ्ने पळतील बारा वाटा

तुळशी लावूनिया दिवा /उजेड पडेल सर्व देवा

तुळशी सारूनिया पाणी / होईल पातकांची धुनी

तुळशी लावूनिया गंध /उभा पाठीशी गोविंद

तुळशी लावूनिया कुंकू /उभी पाठीमागे सखू “

या पदानंतर भक्तगण टाळ मृदंगाच्या निनादात कृष्णाचा गजर करतात. हा गजर संपला की गावातून प्रभात फेरी काढली जाते. या योगे असं म्हणतात की वातावरणात भक्तीरस भरून राहतो.

काही ठिकाणी गावातून प्रभात फेरी काढून एक प्रकारची जनजागृती होते. तर काही ठिकाणी भक्तजन मंदिरात एकत्र होतात. सुरुवातीला भजने, भुपाळ्या म्हणतात. एक विठ्ठलाची भूपाळी –

उठोनिया पहाटे / विठ्ठल पहा उभा विटे

चरण तयाचे गोमटे /अमृत दृष्टी अवलोका ॥

जागे करा रुक्मिणीवरा / देव आहे निदसुरा

वेगे लिंबलोण करा / दृष्ट होईल तयासी ॥

पुढे वाजंत्री वाजती /ढोल दमामे गर्जती

होते काकड आरती / पांडुरंगा चरणी ॥

सिंह नाद शंखभेरी / गजर होत महाद्वारी

केशवराज विटेवरी / नामा चरण वंदितो ॥

आशा प्रकारे अनेक भूपाळया झाल्या नंतर आरतीला सुरुवात होते. जे मंदिर असेल त्याप्रमाणे अनेक आरत्या तिथे म्हटल्या जातात आणि नंतर काकड आरती केली जाते. आता हा काकडा कसा असतो तर शक्यतो पांढऱ्या, स्वच्छ नवीन वस्त्र घेऊन त्याच्या पट्ट्या काढून पीळ दिला जातो आणि नंतर एक ठराविक लांबीचा / कुठे बोटभर, कुठे वीतभर अशा काकडा तयार केला जातो. तो शुद्ध तुपात भिजवला जातो. प्रत्येकाच्या हातात निरंजन असेल असंच नाही. तर सगळे भक्त हा काकडा घेऊन उभे होतात. काकडा उजळतात आणि आरती सुरू होते हातात काकडा सुद्धा एका ठराविक पद्धतीने धरावा लागतो की, ज्यामुळे हातावर तूप सांडणार नाही. चटका लागणार नाही. काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.

क्रमशः…

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतरही माझ्या मनात तक्रारदार सहस्त्रबुध्दे ठाण मांडून बसले होते. तोपर्यंत कधीच न पाहिलेल्या त्या माणसाने त्याच्याही नकळत माझ्या मनात एक प्रकारची बेचैनी निर्माण करून ठेवली होती. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच.)

त्या अस्वस्थतेत मनात रूतून बसलेला एकच विचार मला बोचत राहिला होता. उद्या नेमकं काय होईल? ते माझ्याशी मोकळेपणाने बोलतील कीं प्रभूदेसाईंसारखंच मलाही घरात न घेता बाहेरच्या बाहेर हाकलून लावतील?

हीच अस्वस्थता मनात घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली. एकदा. दोनदा. कांही क्षण बोचऱ्या शांततेत गेले आणि यथावकाश दार उघडलं गेलं.

“काय हवंय..? “

अर्धवट उघडलेल्या दारात एक मुलगी उभी होती. उदास चेहरा. गोंधळलेली प्रश्नार्थक नजर.

“सहस्त्रबुद्धे आजोबा आहेत ना? मला भेटायचं होतं. “

“आपण..? “

“मी.. लिमये. अरविंद लिमये. एक महत्त्वाचं काम होतं. “

” बाबा आहेत,.. पण नुकतीच पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत.

आजचा अध्याय मोठा आहे,.. थोडा वेळ लागेल. आणि नंतर त्यांना लगेच बाहेर जायचंय. “

मला काय बोलावं सुचेना.

” मी फार वेळ घेणार नाहीय. निदान त्यांची ओळख तरी होईल. ते म्हणाले तर मग मी उद्या येईन. त्यांचं आवरेपर्यंत थांबू कां मी? “

ती क्षणभर विचारात पडली. मग “या. ” म्हणून आत वळली. भिंतीजवळच्या खुर्च्यांकडे निर्देश करीत ‘बसा’ म्हणाली. आत जाऊन लगबगीनं पाण्याचं तांब्याभांडं आणून ठेवलंन् न् आत निघून गेली.

सहस्त्रबुद्धे पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत हे त्यांच्या मुलीकडून ऐकल्यानंतर काल मनात येऊन गेलेलेच विचार मला आठवले…

‘उद्या काय होणार आहे मला माहित नाही. त्यांना स्वतः जाऊन भेटणं एवढंच माझ्या हातात आहे. यश येणार की अपयश हे आता सहस्त्रबुद्धेंच्या नव्हे तर फक्त ‘त्या’च्याच हातात आहे…. ‘ माझ्या अस्वस्थ मनाला तेव्हा स्पर्शून गेलेल्या ‘त्या’च्या विचाराचा धागा माझ्या मनात नकळत सहस्त्रबुद्धे आजोबांच्या ‘गुरूचरित्र’ वाचनाशी जोडला गेला आणि मनावरचं जड झालेलं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसं मला एकदम हलकं वाटलं. समोरच्या तांब्यातलं घोटभर पाणी पिता पिताच नजर नकळत सभोवतालचा अंदाज घेत राहिली. रंग उडालेल्या

भिंतीवरचं जुनंपुराणं घड्याळ, एक लोखंडी कॉट, जुनं लोखंडी कपाट आणि भिंतीलगतच्या फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या..! नजरेनं क्षणार्धात टिपलेल्या या साधेपणात एक प्रकारचं औदासिन्यही भरून राहिलेलं होतं!

“हं.. बोला… ”

मी भानावर आलो. दचकून वर पाहिलं आणि एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा उठून उभा राहिलो.

“सर, नमस्कार.. “

“नमस्कार,.. बसा” ते हसतमुखाने म्हणाले. सहस्त्रबुद्धे आजोबाच ना हे किं…? मलाच प्रश्न पडला. या माणसाचं हसतमुख, सौम्य रूप प्रभुदेसाईनी वर्णन केलेल्या संतापी, तर्कटी, हेकेखोर अशा विक्षिप्त वृध्द माणसाच्या प्रतिमेला परस्पर छेद देणारंच होतं.

” एस्. एस्. सहस्त्रबुद्धे आपणच ना..? ” स्वतःचीच खात्री करून घ्यावी तशा सहजस्वरांत मी विचारलं.

“हो.. आपण? “

” मी… मी ए. जी. लिमये. चीफ मॅनेजर म्हणून युनियन बॅंकेच्या इथल्या झोनल आॅफिसमधे मी नुकताच चार्ज घेतलाय आणि… “

बॅंकेचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य क्षणार्धात विरून गेलं. चेहरा आक्रसला.

” काम काय आहे ते बोला… ” त्यांनी फर्मावलं.

” तुम्ही एका ब्रॅंचमॅनेजर विरूध्द केलेल्या तक्रारीबाबतची फाईल माझ्या वाचनात आली आणि म्हणून… “

” म्हणून वाट वाकडी करून आज इथं आलात? ” ते कडाडले. ” दूधखुळा समजलात कां मला..? आजपर्यंत दर आठवड्याला एकेक पोस्टकार्ड खरडून दरवर्षी ५२ या हिशोबाने गेल्या ३ वर्षात १५६ स्मरणपत्रं पाठवल्यानंतर आज जागी झाली कां तुमची बॅंक..? “

“नाही तसं नाही.. पण.. “

“पण-परंतुच्या गप्पा मला सांगू नका. तुमच्या बँकेचं नाव सहज जरी कानावर पडलं तरी तुमच्या त्या निर्लज्ज ब्रॅंचमॅनेजरचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते. या तुम्ही. ती फाईल व्यवस्थित वाचलीयत ना तुम्ही? मग त्या बेजबाबदार माणसाविरूध्द आधी कारवाई करा. यामधे ब्रह्मदेव उतरून आला तरी तडजोड होणे शक्य नाहीss. या तुम्ही. ” ते ताडकन् उठले…

सगळं हातून निसटून जाण्यापूर्वी ते घट्ट धरून ठेवणं आवश्यक होतं पण….

” सर.. मला जे सांगायचंय ते निदान ऐकून तरी घ्या ना प्लीज… “

” मला फाफटपसारा नकोsय. बोलाs.. काय सांगायचंय..?

“तुम्ही म्हणालात तशी ती फाईल वाचलीय मी. तुम्ही लिहिलेली स्मरणपत्रंही पाहिलीत. त्यासंबंधीच तुमच्याशी मोकळेपणानं बोलायचं होतं सर. म्हणून… “

” खरा गुन्हेगार तुमच्या बॅंकेच्याच आडोशाला लपलाय ना? कीं पळून गेलाय? माझ्याशी बोलण्याऐवजी त्याच्याशी बोला नाs.. खडसावून विचारा त्यालाss.. “

” मी बोललोय सर त्यांच्याशी ” मी शांतपणे म्हणालो. “पण कोणत्याही प्रश्नाला दोन बाजू असतात ना सर? तुमची बाजू न ऐकताच, ती समजून न घेताच, कोणत्याही निष्कर्षाप्रत येणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी आलोय. यात माझा कोणताही स्वार्थ नाहीय. माझ्यावरची जबाबदारी स्वत:शी प्रामाणिक राहून मला पूर्ण करायचीय. हे करताना तुमच्यावर नकळत अन्याय होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. म्हणून फक्त तुमची बाजू जाणून घ्यायला मी आलोय. मला सहकार्य करायचं कीं नाही हे तुम्ही ठरवायचंय.

तेही एक उपचार म्हणून आजच्याआज ठरवावं असा माझा आग्रह नाहीय. तुम्ही शांतपणे विचार करा, मग सांगा.

तुमचा गुरूचरित्र सप्ताह सुरू आहे ना? त्याची आधी सांगता होऊ दे. त्यात व्यत्यय नको. हवंतर त्यानंतरच्या तुम्ही सांगाल त्या दिवशी मी पुन्हा येईन. “

ते विचारात पडल्याचे पाहून मी घुटमळलो.

“सप्ताह असं नाही. माझं रोज एक अध्याय असं नित्यवाचनच असतं. आज मला बाहेर जायचंय एका कामासाठी. तुम्हाला शक्य असेल तर असंच उद्या सकाळी आलात तरी चालेल… ” ते शांतपणे म्हणाले.

” पण त्या माणसावर कारवाई होण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाहीs.. हे लक्षात ठेवा. “

“मी समजू शकतो सर. येतो मी. “

त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. यातून पुढे काय निष्पन्न होणाराय मला माहित नव्हतं. पण आज माझ्यासाठी निदान सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडीतरी किलकिली झाली होती आणि त्या दाराआड ‘तो’ साक्षीरूपाने उभा असणार आहे हा एक शुभसंकेतच होता माझ्यासाठी. म्हणूनच तिथून बाहेर पडताना फार कांही न मिळताही बरंच काही गवसल्याचं समाधान मनात भरून राहिलं होतं..!!  

(क्रमशः दर गुरुवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चिडणं किंवा चिडचिड…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “चिडणं किंवा चिडचिड…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

माणूूस चिडतो का? …… तर हो….. असच उत्तर येइल. कारण काय? ….. तर प्रत्येकवेळी कारण वेगळं असू शकेल. खरंतर चिडायला कोणतही कारण लागत नाही असं म्हणण्यापेक्षा कोणतही कारण चालतं. त्याला काही नियम अटी नाहीत. जागं असतानाची कोणतीही वेळ चालते. तारीख, वार, महिना, साल कोणताही चालतो. मुहूर्त बघावा लागत नाही.

उलट कोणी चिडलंतर……. हं…. झालं…. सापडला वाटतं मुहूर्त…… असं दबक्या आवाजातलं स्पष्ट बोलणं ऐकू येतं.

चिडणं ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. असं चिडणं कधी आणि कितीवेळ टिकतं हे सांगतायेत नाही. मीसुुध्दा चिडतो. मात्र काहीजण खूप कमीवेळा चिडतांना मी पाहिलं आहे. आणि त्यांचा चिडायचा काळ सुध्दा कमी असतो. अशा न चिडणार्या किंवा कमी आणि कमीवेळ चिडणा-यांच मला कौतुक वाटतं. पण चिडायला पाहिजे तिथेही न चिडणा-यांची मला चिड येते.

मी का चिडतो….. याची कारणं बघायला सुरुवात केली….. आणि लक्षात आलं की अरे……. यातली काही कारणं तर किरकोळ आणि शुल्लक आहेत. आणि या कारणांसाठी मी नक्की चिडतो कोणावर….. स्वतःवर की दुसर्‍यावर…..

मी का चिडतो…….

माझं ऐकल नाहीतर.

मला कारण नसतांना कोणाचं ऐकाव लागल तर.

मला एखादी गोष्ट जमली नाही तर.

मला ते वेळेत जमलं नाही तर.

माझ्या अगोदर दुसर्‍याला जमल तर.

दिलेली वेळ पाळली नाही तर. इ…….

यातही माझं ऐकलं नाही तर….. यात मी सांगतोय ते बरोबर का चूक याचा विचार काहीवेळा नसतो.

या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत. पण इथे मी जमेल त्या मार्गाने ती चिड व्यक्त करतो.

चिडण्याचे प्रकार असु शकतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा प्रकारे ते सांगता येतील. चिडण्याला नातं असण्याची किंवा नसण्याची गरज नाही. उलट नातं नसेल तर चिडण्यात मोकळेपणा येतो.

वैयक्तिक चिडण्यात झालेल्या गोष्टीत चुक आपलीच आहे हे आपण कळत नकळत मान्य केलेलं असत. त्याच खापर फोडायला आपल्याला कोणीच सापडत नाही. कदाचित दोष द्यायलापण कोणी सापडत नाही म्हणून आपण गप्प बसतो.

कौटुंबिक चिडण्यात कुटूंबातच आपण कोणावरतरी किंवा कुणीतरी आपल्यावर चिडल्याच लक्षात येतं. आणि हे व्यक्त केलं जातं. हे व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. यात मोठ्याने बोलणं, आदळआपट करणं, किंवा काहिच न बोलता तोंड फुगवून गप्प बसणं. नाहीतर सहकार्य नाकारणं, किंवा ते न करणं. थोडक्यात कौटुंबिक चिडणं हे जहाल, मवाळ, असहकार, किंवा सविनय कायदेभंग या प्रकारच्या वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त करता येतं.

या शिवाय संसर्गजन्य चिडणं असत. यात जो संपर्कात येईल त्याला याची लागण होते. म्हणजे एकावर कोणी चिडलतर दुसर्‍यावर चिडून त्या चिडण्याची परतफेड करायची. आणि त्याची परतफेड दुसरा तिसऱ्याच माणसावर करतो. फक्त ते व्यक्त झालं पाहिजे. या प्रकाराला वडाच तेल वांग्यावर असही म्हणतात.

सामाजिक चिडण्याला काही ठराविक व सततची कारणं असू शकतील. शिस्तबद्ध असणारी बेशिस्त वाहतूक, खडतर रस्ते, भ्रष्टाचार, गुंडगीरी, शैक्षणिक क्षेत्रात घातलेला गोंधळ, क्षमता नसतांना दिलेली जबाबदारी. या विरोधात होणारी चिडचिड काहीवेळा व्यापक, संघटित असते. तर काहीवेळा तो शक्ती प्रदर्शनाचा भाग वाटतो. लग्नाच्या वरातीत कसं काही वरातीत सामील झालेले असतात. काही गंमत म्हणून पाहायला येतात. तर काही समोर दिसतयं म्हणून पाहतात. पण गर्दी असते. असं हे गर्दी खेचणार चिडणं आहे.

अशा गर्दीत समर्थक आणि विरोधक असू शकतात. आणि मग विरोधक विरोधात आहे हे दाखवण्यासाठी चिडतात.

मोर्चा काढणं, फलक रंगवण, घोषणा देणं अशा वेगवेगळ्या मार्गाने ते दाखवलं जातं.

काहीवळा चीडणं निरर्थक असतं, काहीवेळा त्याला अर्थ असतो. तर काहीवेळा अर्थ हेच कारण असतं.

चिडणा-या व्यक्तीला मुद्दाम चिडवणारे किंवा चिडायला लावणारेही असतात. पण मित्रांमधे, नात्यात असं चिडणं आणि चिडवणं बर्‍याचदा खेळीमेळीत घेतलं जातं. आणि हे कुठे थांबवायचं हे लक्षात येतं. ते तसं खेळीमेळीने घेतलं तर त्या चिडवण्यात आणि चिडण्यात एक मजा जाणवते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतील दिवाळी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ आठवणीतील दिवाळी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आली माझ्या घरी ही दिवाळी

सप्तरंगात न्हाऊन आली

आली माझ्या घरी ही दिवाळी 

सकाळी सकाळी रेडिओ वर गाणं चालू होतं आणि स्वयंपाकघरात काम करताना नकळत मी ही गायिकेबरोबर ते गुणगुणत होते… काम करताना एकीकडे रेडिओ ऐकायची सवयच आहे मला आणि मग सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर मी गुणगुणत असते त्या दिवशीही तेच झालं… सकाळी रेडिओ मधून माझ्या घरी आलेली दिवाळी मग दिवसभर माझ्या ओठांवर रेंगाळत राहिली आणि मला माझ्या बालपणात घेऊन गेली… दिवाळी हा प्रकाशाचा, मांगल्याचा आणि उत्साह द्विगुणित करणारा सण… दर वर्षी येणारी दिवाळी प्रत्येकासाठी काही वैशिष्ट्य घेऊन येते. वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली दिवाळी प्रत्येक माणसाच्या चिरकाल स्मरणात राहते असं असलं तरी कायम आठवत राहते ती बालपणीची दिवाळी.. ही बालपणीची दिवाळी मनाच्या कोपऱ्यातून हळूच बाहेर येते व एकेक आठवण मनाला आनंद देऊन जाते… नवरात्रोत्सव संपत आला की मला दोन गोष्टींचे वेध लागायचे एक गोष्ट ती म्हणजे परीक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा दिवाळी अंकात काय नवीन वाचायला मिळणार याची उत्सुकता तर असायची…

दिवाळीच्या दिवसांत मी एका वेगळ्याच झोन मध्ये असते. वर्षातला हा माझा सगळ्यात आवडता सण. रंग, प्रकाश यांची झिलईदार सरमिसळ असलेला.. कुठलेही अवडंबर नाही, नको त्या भावना, अस्मितांना चुचकारणं नाही, पूजा असेलच तर ती वातावरणातल्या सौंदर्याची, सौहार्दाची.. फराळाचा तिखट गोड वास, चकलीच्या भाजणीचा, बेसन खमंग भाजल्याचा, चिरोट्याच्या पाकाचा, चिवड्याच्या फोडणीचा, सगळ्या संवेदनांना जागं करणारा हा माहौल, अभ्यंगस्नानाचं गरम पाणी, सुगंधी तेल, उटणी..! माझी सर्वांत पहिली आठवण

म्हणजे सुखद थंडगार हवेची… त्या वातावरणातला प्रसन्नपणा अनुभवणं हा माझ्यासाठी दिवाळीतला पहिला भाग… वेगवेगळया ऋतूंमध्ये निसर्ग आपले सगळे सुंदर कलागुण बाहेर आणतो तसं माणूसही आणतोय असं चित्रं मला सगळीकडे दिसतं… दिसायचं उदा. रांगोळीसारखी कला…. चिमटीनं बारीक बारीक ठिपके काढून नाजूक रेषांची रांगोळी काढायची याचा एक आनंद होता… दिवाळीमध्ये प्राण्यांपासून, नात्यांपासून, निसर्गापासून सगळ्यांचीच बूज राखणारा एकेक दिवस आहे… सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा हा सण खूप मौलिक होता परंतु आता मात्रं तो छापील झालाय असं मला वाटतं… आम्ही, मावशी, आत्या, काका सगळ्यांची कुटुंब एकत्र.. खूप माणसं… खूप गप्पा… आल्याचा चहा… खूप हसू… खूप आठवणी.. मधली वर्ष अक्षरशः भुर्रकन म्हणतो तशी उडून गेली. यंदाच्या दिवाळीला काका नाही…! तोही निघून गेलाय खूप लांबच्या प्रवासाला…! दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे दिवाळी अंक.. भाऊबीज मिळाली की ती मी जिवापाड जपून ठेवायची आणि रुपये गोळा झाले की दिवाळी अंक विकत घ्यायची आणि वाचनाचा आनंद घ्यायची.. ही माझ्या मनातली दिवाळीची आणखी एक आठवण आहे… माझ्यासाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे खूप वाचन.. नवी नवी पुस्तके आणून वाचायची.. अगदी श्यामची आई, गोट्या, चिंगीपासून ते मृत्युंजय, श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती पर्यंत अशी अनेक पुस्तके.. चक्क माझ्या घरी मी पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. माझ्या आठवणीतून ती माझी लायब्ररी कधीच पुसली गेली नाही..!

दिवाळीची सगळी चव, गंमत, आनंद हा त्या पानापानात आहे

माझ्या आठवणीतली दिवाळी ही अशी आहे… आठवणीतील प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशीच खास बनून गेली आहे..!

 ©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अनंत दीपांमध्ये प्रकाशमान…तेजस्वी दीप!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ “अनंत दीपांमध्ये प्रकाशमान…तेजस्वी दीप!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भगवान श्रीकृष्ण यांच्या तेजाचे वर्णन करताना संतांची कल्पनाशक्ती अनंत ब्रम्हांड ओलांडून जाण्याचा प्रयत्न करते. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात…देवा….तुझी प्रभा आहे ना…तुझा जो प्रकाश आहे ना…तुझे जे तेज आहे ना….ते एकीकडे आणि अनंत दीप प्रज्वलीत केल्यावर होईल तो प्रकाश, तो उजेड एकाबाजूला! तुझ्या याच तेजाने दहाच्या दहा दिशा उजळून निघतात आणि पृथ्वीच्या डोईवर आच्छादलेल्या या गगनाला शोभा येते…ते शोभून दिसते!

तूच निर्माण केलेली हालचाल करू शकणारी चर आणि एका जागी स्थिर असणारी अचर अशी सृष्टी. आम्रवृक्ष स्वत: आनंदी कधी होतो…त्याच्या सर्वांगावर मोहर अवतरला की. हा मोहर एक सांगावा असतो पुढे पोटी येणा-या आम्रफलांचा. आंब्याचे अस्तित्व पुढे चालवणारा मोहर….चिरंतन आयुष्याची खूण. तद्वत ही सारी सृष्टी पुढे प्राप्त होऊ पाहणा-या सुखाच्या कल्पनेने अगदी मोहरून गेली आहे! हे श्रीकृष्णा…तू सभागिया आहेस…अवर्णनीय सुंदरतेची,भाग्यची परमावधी आहेस..सभागिया इथे आमच्या मध्ये असलेला आहेस…भक्तांच्या या मेळ्यात मध्यभागी विराजमान आहेस… तुला आरती ओवाळत असताना चराचर मोहरून जाते. रत्नमुख्य असलेला हीरक अधिक शोभून दिसावा यासाठी तो एखाद्या अलंकारामध्ये स्थापित केला जातो…बसवला…जडवला जातो. त्याप्रमाणे प्रभेच्या कोंदणात तुझे तेज जडवले आहे..त्यात प्रभा आणि तेज एकमेकांत एकरूप होऊन गेले आहे….त्यामुळे तुझे श्रीमुख प्रत्येक ओवाळताना प्रत्येक वेळी नवा आनंद गवसत जातो…प्राप्त होत जातो! आमच्या हातातील काकड्याच्या ज्योतीचा प्रकाश देवा..तुमच्या डोळ्यांत प्रकाशाताना मला दिसला….तेथून तो प्रकाश फिरून माझ्या डोळ्यांत प्रवेश करता झाला….आणि अचानक आलेल्या या प्रकाशाच्या परावर्तनाने या एकनाथाचे..गुरुदेव जनार्दन यांच्या शिष्याचे डोळे दिपून गेले आहेत… 

सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा। उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा।।1।।

काकड आरती माझ्या कृष्णा सभागिया। चराचर मोहरले तुझी मूर्ती पहावया।।धृ।।

कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक। नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ।।3।।

आरती करिता तेज प्रकाशले नयनी। तेणे तेजे मिनला एकाएकी जनार्दनी।।4।।

(मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी।ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर। ज्ञानोबाराय म्हणतात…मनाच्या दिव्यावर आलेली काजळी निघाली की दीप अधिकच तेजाने प्रकाशतो…जणू ही कधीही न संपणारी दीपावलीच. दिवाळी आणि काकड आरती एक सुरेख पर्वणी असते ही काजळी काढून टाकण्यासाठी. म्हणून ही लेखमाला.

सहस्र ही संख्या केवळ एक हजार असा एकच अर्थ ध्वनित करीत नाही….सहस्र म्हणजे एका अर्थाने अनंत! आणि सहस्र…सहस..र…र च्या पोटात स!सहस्त्र नव्हे! असो. वारकरी संतांचे श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीश…पांडुरंग…श्री विठ्ठल. संत देवाचे वर्णन करताना जे अलौकिक शब्द वापरतात…त्या सर्वच शब्दांचा अर्थ माझ्यासारख्या सामान्य वाचकास उमगणे केवळ अशक्य. पण म्हणून आपण अर्थाचा उलगडा करून घेण्याच्या यत्नापासून दूर राहू नये….नित्य नवा आनंद…तसा नित्य नवा अर्थ समजत जातो. काकड आरतीमधील या सर्वांगसुंदर अभंगाचा मला वाटला,समजला तो अर्थ मी मांडला आहे. आपण सूज्ञ,अभ्यासक आहात..अयोग्याकडे दुर्लक्ष करालच याची खात्री आहे. रामकृष्णहरी! संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०. केवळ नाम स्मरणाचे स्मरण करून देण्यासाठी प्रकाशित. माहिती,शब्दार्थ,छायाचित्र साभार.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वैदिकांची महालक्ष्मी’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वैदिकांची महालक्ष्मी’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

वैदिक साहित्यामध्ये श्री, लक्ष्मी, आणि संपत्ती यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि बहुआयामी आहे. ह्या संकल्पना केवळ भौतिक समृद्धीपुरत्या मर्यादित नसून, त्या अध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांनाही स्पर्श करतात.

१ ) “श्री” – वैदिक संकल्पना

“श्री” हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आलेला आहे. तो फक्त ऐहिक (भौतिक) संपत्तीचा द्योतक नाही, तर कल्याण, सौंदर्य, सामर्थ्य, प्रतिष्ठा, तेज, दैवी गुण यांचाही समावेश करतो.

“श्रीसूक्त” (ऋग्वेदावर आधारित) हे सर्वात प्रसिद्ध स्तोत्र आहे ज्यामध्ये “श्री” म्हणजेच लक्ष्मीचे स्तवन केलेले आहे.

वैदिक संकल्पनेत “श्री” म्हणजे एक दैवी शक्ती जी जीवनात संपन्नता आणि संतुलन निर्माण करते.

२) “लक्ष्मी” – संपत्तीची देवी

वैदिक काळात लक्ष्मीचा स्पष्ट उल्लेख तुलनेत थोडा उशिरा, पण “श्री” आणि “लक्ष्मी” ह्या दोघींना समान दैवी शक्ती म्हणून ओळखले जाते.

लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी म्हणून वैदिकोत्तर पुराणांमध्ये स्पष्टपणे दर्शवले जाते. परंतु तिची मूळ संकल्पना “श्री” ह्या वैदिक संकल्पनेतूनच विकसित झाली आहे.

लक्ष्मी ही फक्त धन, अन्न, सुवर्ण यांचीच नाही, तर धार्मिकता (धर्म), यश (जय), कीर्ती (कीर्ति), संतती (संतान) यांचीही अधिष्ठात्री देवी आहे.

३)”संपत्ती” – व्यापक अर्थ

वैदिक दृष्टिकोनातून संपत्ती ही केवळ भौतिक (मौल्यवान वस्तू, धन) न मानता, ती सात्विक गुण, विद्या, धर्म, सत्य, संयम, बल यांचा संच मानला गेला आहे.

“संपत्” म्हणजे “जे प्राप्त केले गेले आहे”, पण वैदिक दृष्टीने योग्य मार्गाने प्राप्त केलेली गोष्ट हीच खरी संपत्ती मानली गेली आहे.

“असत्य मार्गे मिळवलेली संपत्ती ही विनाशाकडे घेऊन जाते” असा वैदिक संदेश आहे (उदा. ईशावास्य उपनिषदातील – “तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्”).

४) धन व धर्म यामधील संतुलन

वैदिक ग्रंथांत धनसंपत्तीचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे, पण त्यात धर्म, त्याग, संयम, आणि कर्तव्य ह्या तत्त्वांचे पालन अत्यावश्यक मानले गेले आहे.

“धनं मे रुचिरं भवतु” – अशी प्रार्थना आहे, म्हणजेच धन हे योग्य मार्गाने, रुचिर (नैतिक) स्वरूपात मिळो.

५) श्री व लक्ष्मी यांचे प्रकार

श्रीसूक्तात लक्ष्मीचे विविध प्रकार सांगितले आहेत:

आद्य लक्ष्मी – मूल शक्ती

धन लक्ष्मी – आर्थिक संपन्नता

धान्य लक्ष्मी – अन्नधान्य

विद्या लक्ष्मी – ज्ञान

धैर्य लक्ष्मी – मानसिक शक्ती

संतान लक्ष्मी – कुटुंबसंपन्नता

गज लक्ष्मी – ऐश्वर्य

विजय लक्ष्मी – यश

थोडक्यात, वैदिक संकल्पनेत “श्री”, “लक्ष्मी” आणि “संपत्ती” ह्या संज्ञा फक्त भौतिक संपत्तीपुरत्या मर्यादित नाहीत. त्या संपूर्ण जीवनशैली, नैतिक मूल्ये, अध्यात्म, आणि सामाजिक उत्तरदायित्वाशी निगडित आहेत. संपत्ती ही धर्माशी जोडलेली आहे, आणि लक्ष्मी ही त्या धर्माधारित संपन्नतेची मूर्ती मानली गेली आहे.

🪷

ॐ महालक्ष्मैच विद्महे विष्णुपत्नैच धिमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।

🪷

लक्ष्मीपूजनच्या अनेकानेक शुभेच्छा!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सध्या आपण दीपावली साजरी करतो आहोत. वर्षभरातून एकदा येणारा हा प्रकाशाचा उत्सव! घराघरात आणि घराबाहेरही दीप प्रज्वलित झाले आहेत. या मंगलमय प्रकाशात घरातील आणि घराबाहेरील वातावरण उजळून निघाले आहे. दिवाळीत नवीन खरेदी,  फटाके,  फराळाचे विविध पदार्थ तर आपण करतोच पण यापेक्षाही थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून दिवाळीकडे पाहता येईल का? तो म्हणजे ज्ञानियांची दिवाळी. दिवाळी हा अंतरीच्या प्रकाशाचा उत्सव देखील उत्सव व्हावा. ही दिवाळी केवळ चार दिवसांची नव्हे तर वर्षभर चालणारी असेल. यातून फक्त घरे आणि घराबाहेरील वातावरणच नव्हे तर मने देखील उजळून निघतील. अशी ही ज्ञानियांची दिवाळी.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,  

“मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेकदीप उजळी॥ तैं योगियां पाहे दिवाळी॥”

याचा अर्थ असा की,  अज्ञानाच्या अंधाराला विवेकबुद्धीच्या प्रकाशाने दूर करणे हीच खरी दिवाळी. आपल्या उपनिषदांचा आपल्याला संदेश आहे तो म्हणजे ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ‘. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य! हा मंत्र केवळ धार्मिक आहे असे समजण्याचे कारण नाही. तो आपल्याला ज्ञानयात्रेची दिशा दाखवतो.

दिवाळी आली की आपल्या घराघरांत दिव्यांची रोषणाई होते,  फराळाचा गंध वातावरणात भरून राहिलेला असतो आणि फटाक्यांच्या झगमगाटात वातावरण उजळून निघते. आनंदाच्या,  गडबडीच्या आणि आवाजाच्या या सगळ्या बाह्य प्रकाशात सगळे मग्न असताना काहीजण मात्र शांतपणे,  विचारांच्या गाभाऱ्यात बसून,  एका वेगळ्या दिवाळीचा उत्सव साजरा करतात आणि तो असतो— ज्ञानियांची दिवाळी.

आपण सामान्य माणसे अंधार दूर करण्यासाठी तेलाची पणती लावतो. ज्ञानियांच्या हृदयात मात्र तेवत असतो ‘ ज्ञानाचा दीप ‘. हा ज्ञानदीप अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून विवेक बुद्धीच्या प्रकाशाने आपले अंतरंग उजळतो. दिवाळीचे दिवस त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा जरा वेगळे असतात. त्यांच्यासाठी ‘धनत्रयोदशी’ म्हणजे सोने-चांदी नव्हे,  तर उत्तम विचार देणाऱ्या नवीन ग्रंथांची खरेदी. तेच त्यांच्या दृष्टीने मौल्यवान धन असते. ते करतात नव्या विचारांचे संकलन आणि आत्मशुद्धीची तयारी.

ज्याच्या घरात ग्रंथांचा सुवास आहे,  त्याला बाहेरील रोषणाईची गरज नसते. त्याचे अंतरंग नेहमी प्रकाशमान असते. त्याच्यासाठी प्रत्येक चांगला विचार हा मौल्यवान हिरा असतो,  जो मनाच्या तिजोरीत जपून ठेवला जातो. अशा विचारांनी त्याची तिजोरी भरत जाते. बाहेर फुटणाऱ्या फटाक्यांच्या आवाजापेक्षा तो अंतरातील आवाज ऐकत असतो. सकारात्मक विचारांची बीजे रुजवून अंधश्रद्धा,  कुविचार,  त्याज्य रूढी आणि परंपरा यांच्यावर तो आघात करत असतो. ज्ञानियांची दिवाळी गोंगाटात नव्हे,  तर संवादात साजरी होते. दिवाळीला मित्र एकत्र येतात. फराळही करतात पण त्याचबरोबर ते करतात नवीन विचारांचा स्वीकार,  एखाद्या पुस्तकावर चर्चा,  ते शोधतात जीवनाची दिशा दाखवणाऱ्या एखाद्या कवितेचा अर्थ. समाजातील प्रश्न त्यांना भेडसावत असतात,  त्यावरही ते चर्चा करतात. चर्चा करून ते थांबत नाहीत. ते एखाद्या वृद्धाश्रमात जातात. तेथील वृद्धांसाठी होतात मदतीचा हात,  अनाथालयातील मुलांसाठी घेऊन जातात गोडधोड फराळाचे जिन्नस,  कुठेतरी आदिवासी पाड्यावर भगिनींना नवीन साड्या,  कपड्यांचे वाटप करतात. पावसाने सर्वस्व हिरावून घेतलेल्या शेतकऱ्याच्या उदास चेहऱ्यावर त्यांचे धीराचे शब्द जादू करतात. जमेल तेवढी मदत करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अशा ज्ञानियांची दिवाळी शतपटीने उजळून निघते.

ज्ञानियांसाठी नरक चतुर्दशी म्हणजे अंतरात दडून बसलेल्या राक्षसांचा वध. कोणते असतात हे राक्षस? तर ते असतात अहंकाराचे,  असहिष्णूतेचे,  वाईट विचारांचे,  अज्ञानरूपी अंध:काराचे! ज्ञानी लोक या सगळ्या गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करून अनोखी नरक चतुर्दशी साजरी करतात. ते अभ्यंग स्नान करतात ते आत्मपरीक्षणाच्या पाण्यात आणि वापरतात सुगंधी उटणे वापरतात सद्विचारांचे. अशा लोकांच्या विचारांचा सुगंध आसमंतात पसरला की तो वातावरण शुद्ध करतो. त्यांची दिवाळी ही जगण्याचा उत्सव होते.

ज्ञानियांना माहित असते की लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे,  तर बुद्धीची आणि सद्विचारांची समृद्धी. तीच असते खरी लक्ष्मी. ते जाणतात की सोनेनाणे,  पैसा यासारखी क्षणभंगुर संपत्ती चोरली जाऊ शकते,  पण ज्ञानाचा प्रकाश कधी विझत नाही. ही संपत्ती जेवढी वाटली तेवढी वाढत असते. म्हणून ते जमेल तेवढे या संपत्तीचे वाटप करत असतात.

आजचे युग तंत्रज्ञानाचे. आपण वावरतो डिजिटल युगात. हातात असतो मोबाईल आणि मनात मात्र असतो गोंधळ. बाहेरील स्क्रीन उजळतात,  पण आतील अंधार मात्र वाढत जातो. अशा वेळी ज्ञानियांची दिवाळीच आपल्याला दिशा देते. तमसो मा ज्योतिर्गमय! त्यांचे विचार,  त्यांचे वागणे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करते. संपूर्ण मानवजातीलाच अशी माणसे दिशा दाखवतात.

आजच्या या डिजिटल युगातही काही तरुण असे आहेत की जे स्क्रीनमध्ये अडकून पडत नाहीत. त्यांची पावले वळतात वाचनालयाकडे. अशा ठिकाणी ते दिवाळीचा ‘ज्ञानोत्सव’ साजरा करतात. पुस्तक वाटप,  ग्रंथप्रदर्शन,  संवाद सत्रं यांचं आयोजन करतात. काही ध्येयवादी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांच्या जीवनात सदविचारांचा प्रकाश आणतात आणि त्यांचे जीवन उजळवतात.

हीच असते ज्ञानियांची दिवाळी. खरी ‘ज्ञानदीपावली’. कारण जेव्हा एक मन सद्विचारांनी उजळते,  तेव्हा समाजात हजारो दिवे प्रकाशमान होतात. अंतरीच्या प्रकाशाची ज्योत पेटते. अंतरीचा प्रकाश असतो शाश्वत. म्हणूनच,  यंदा घरातील पणत्यांबरोबर मनातले दिवेही पेटवा. घर सजवा पण मनही प्रकाशाने उजळू द्या. उपनिषदांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करू या. ‘ तमसो मा ज्योतिर्गमय!’

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतरही माझ्या मनात तक्रारदार सहस्त्रबुध्दे ठाण मांडून बसले होते. तोपर्यंत कधीच न पाहिलेल्या त्या माणसाने त्याच्याही नकळत माझ्या मनात एक प्रकारची बेचैनी निर्माण करून ठेवली होती. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच.)

त्या अस्वस्थतेत मनात रूतून बसलेला एकच विचार मला बोचत राहिला होता. उद्या नेमकं काय होईल? ते माझ्याशी मोकळेपणाने बोलतील कीं प्रभूदेसाईंसारखंच मलाही घरात न घेता बाहेरच्या बाहेर हाकलून लावतील?

हीच अस्वस्थता मनात घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली. एकदा. दोनदा. कांही क्षण बोचऱ्या शांततेत गेले आणि यथावकाश दार उघडलं गेलं.

” काय हवंय..? “

अर्धवट उघडलेल्या दारात एक मुलगी उभी होती. उदास चेहरा. गोंधळलेली प्रश्नार्थक नजर.

“सहस्त्रबुद्धे आजोबा आहेत ना? मला भेटायचं होतं. “

“आपण..? “

“मी.. लिमये. अरविंद लिमये. एक महत्त्वाचं काम होतं. “

” बाबा आहेत,.. पण नुकतीच पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत.

आजचा अध्याय मोठा आहे,.. थोडा वेळ लागेल. आणि नंतर त्यांना लगेच बाहेर जायचंय. “

मला काय बोलावं सुचेना.

” मी फार वेळ घेणार नाहीय. निदान त्यांची ओळख तरी होईल. ते म्हणाले तर मग मी उद्या येईन. त्यांचं आवरेपर्यंत थांबू कां मी? “

ती क्षणभर विचारात पडली. मग “या. ” म्हणून आत वळली. भिंतीजवळच्या खुर्च्यांकडे निर्देश करीत ‘बसा’ म्हणाली. आत जाऊन लगबगीनं पाण्याचं तांब्याभांडं आणून ठेवलंन् न् आत निघून गेली.

सहस्त्रबुद्धे पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत हे त्यांच्या मुलीकडून ऐकल्यानंतर काल मनात येऊन गेलेलेच विचार मला आठवले…

‘उद्या काय होणार आहे मला माहित नाही. त्यांना स्वतः जाऊन भेटणं एवढंच माझ्या हातात आहे. यश येणार की अपयश हे आता सहस्त्रबुद्धेंच्या नव्हे तर फक्त ‘त्या’च्याच हातात आहे…. ‘ माझ्या अस्वस्थ मनाला तेव्हा स्पर्शून गेलेल्या ‘त्या’च्या विचाराचा धागा माझ्या मनात नकळत सहस्त्रबुद्धे आजोबांच्या ‘गुरूचरित्र’ वाचनाशी जोडला गेला आणि मनावरचं जड झालेलं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसं मला एकदम हलकं वाटलं. समोरच्या तांब्यातलं घोटभर पाणी पिता पिताच नजर नकळत सभोवतालचा अंदाज घेत राहिली. रंग उडालेल्या

भिंतीवरचं जुनंपुराणं घड्याळ, एक लोखंडी कॉट, जुनं लोखंडी कपाट आणि भिंतीलगतच्या फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या..! नजरेनं क्षणार्धात टिपलेल्या या साधेपणात एक प्रकारचं औदासिन्यही भरून राहिलेलं होतं!

” हं.. बोला… ”

मी भानावर आलो. दचकून वर पाहिलं आणि एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा उठून उभा राहिलो.

” सर, नमस्कार.. “

“नमस्कार,.. बसा” ते हसतमुखाने म्हणाले. सहस्त्रबुद्धे आजोबाच ना हे किं…? मलाच प्रश्न पडला. या माणसाचं हसतमुख, सौम्य रूप प्रभुदेसाईनी वर्णन केलेल्या संतापी, तर्कटी, हेकेखोर अशा विक्षिप्त वृध्द माणसाच्या प्रतिमेला परस्पर छेद देणारंच होतं.

” एस्. एस्. सहस्त्रबुद्धे आपणच ना..? ” स्वतःचीच खात्री करून घ्यावी तशा सहजस्वरांत मी विचारलं.

“हो.. आपण? “

” मी… मी ए. जी. लिमये. चीफ मॅनेजर म्हणून युनियन बॅंकेच्या इथल्या झोनल आॅफिसमधे मी नुकताच चार्ज घेतलाय आणि… “

बॅंकेचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य क्षणार्धात विरून गेलं. चेहरा आक्रसला.

” काम काय आहे ते बोला… ” त्यांनी फर्मावलं.

” तुम्ही एका ब्रॅंचमॅनेजर विरूध्द केलेल्या तक्रारीबाबतची फाईल माझ्या वाचनात आली आणि म्हणून… “

” म्हणून वाट वाकडी करून आज इथं आलात? ” ते कडाडले. ” दूधखुळा समजलात कां मला..? आजपर्यंत दर आठवड्याला एकेक पोस्टकार्ड खरडून दरवर्षी ५२ या हिशोबाने गेल्या ३ वर्षात १५६ स्मरणपत्रं पाठवल्यानंतर आज जागी झाली कां तुमची बॅंक..? “

“नाही तसं नाही.. पण.. “

“पण-परंतुच्या गप्पा मला सांगू नका. तुमच्या बँकेचं नाव सहज जरी कानावर पडलं तरी तुमच्या त्या निर्लज्ज ब्रॅंचमॅनेजरचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते. या तुम्ही. ती फाईल व्यवस्थित वाचलीयत ना तुम्ही? मग त्या बेजबाबदार माणसाविरूध्द आधी कारवाई करा. यामधे ब्रह्मदेव उतरून आला तरी तडजोड होणे शक्य नाहीss. या तुम्ही. ” ते ताडकन् उठले…

सगळं हातून निसटून जाण्यापूर्वी ते घट्ट धरून ठेवणं आवश्यक होतं पण….

” सर.. मला जे सांगायचंय ते निदान ऐकून तरी घ्या ना प्लीज… “

” मला फाफटपसारा नकोsय. बोलाs.. काय सांगायचंय..?

“तुम्ही म्हणालात तशी ती फाईल वाचलीय मी. तुम्ही लिहिलेली स्मरणपत्रंही पाहिलीत. त्यासंबंधीच तुमच्याशी मोकळेपणानं बोलायचं होतं सर. म्हणून… “

” खरा गुन्हेगार तुमच्या बॅंकेच्याच आडोशाला लपलाय ना? कीं पळून गेलाय? माझ्याशी बोलण्याऐवजी त्याच्याशी बोला नाs.. खडसावून विचारा त्यालाss.. “

” मी बोललोय सर त्यांच्याशी ” मी शांतपणे म्हणालो. “पण कोणत्याही प्रश्नाला दोन बाजू असतात ना सर? तुमची बाजू न ऐकताच, ती समजून न घेताच, कोणत्याही निष्कर्षाप्रत येणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी आलोय. यात माझा कोणताही स्वार्थ नाहीय. माझ्यावरची जबाबदारी स्वत:शी प्रामाणिक राहून मला पूर्ण करायचीय. हे करताना तुमच्यावर नकळत अन्याय होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. म्हणून फक्त तुमची बाजू जाणून घ्यायला मी आलोय. मला सहकार्य करायचं कीं नाही हे तुम्ही ठरवायचंय.

तेही एक उपचार म्हणून आजच्याआज ठरवावं असा माझा आग्रह नाहीय. तुम्ही शांतपणे विचार करा, मग सांगा.

तुमचा गुरूचरित्र सप्ताह सुरू आहे ना? त्याची आधी सांगता होऊ दे. त्यात व्यत्यय नको. हवंतर त्यानंतरच्या तुम्ही सांगाल त्या दिवशी मी पुन्हा येईन. “

ते विचारात पडल्याचे पाहून मी घुटमळलो.

“सप्ताह असं नाही. माझं रोज एक अध्याय असं नित्यवाचनच असतं. आज मला बाहेर जायचंय एका कामासाठी. तुम्हाला शक्य असेल तर असंच उद्या सकाळी आलात तरी चालेल… ” ते शांतपणे म्हणाले.

” पण त्या माणसावर कारवाई होण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाहीs.. हे लक्षात ठेवा. “

“मी समजू शकतो सर. येतो मी. “

त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. यातून पुढे काय निष्पन्न होणाराय मला माहित नव्हतं. पण आज माझ्यासाठी निदान सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडीतरी किलकिली झाली होती आणि त्या दाराआड ‘तो’ साक्षीरूपाने उभा असणार आहे हा एक शुभसंकेतच होता माझ्यासाठी. म्हणूनच तिथून बाहेर पडताना फार कांही न मिळताही बरंच काही गवसल्याचं समाधान मनात भरून राहिलं होतं..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संतांची दिवाळी…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ संतांची दिवाळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की, संतांचा दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांची दिवाळी पाच-सहा दिवसापूर्वी मर्यादित नाही. जीवनात कायमची दिवाळी कशी राहील ते संताने पाहिलं व तसं मार्गदर्शन आपल्या ग्रंथातून केलं. संतांची दिवाळी ही ज्ञानप्रकाश देणारी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुष्ट प्रवृत्ती जागृत करणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात,

मी अविवेकाची काजळी l फेडूनि विवेक दीप उजळी l

तरी योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ज्ञा.४/५४

यातून ते आपल्या अवताराचा हेतूच स्पष्ट करतात. भगवंतांनी तीन सांगितले हा चौथा. माणसाच्या जीवनात अविवेक हेच दुःखाचे मूळ आहे. काजळी दीपाच्या प्रकाशाला झाकून टाकते. तसाच अविवेक माणसाच्या सद्बुध्दीला झाकून टाकतो. तोच दूर झाला तर सद्विचाराची वाट दिसेल. अविवेक म्हणजे कामक्रोधादि षड्रिपु. ते दूर झाले की आत्मानात्म विवेकाचा दीप प्रकाशेल.अनात्म, त्याज्य गोष्टीचा त्याग आणि मग राहील ते एकमेव ब्रह्म. ते मी आहे हा विवेक आणि त्या ब्रह्मासारखे सच्चिदानंद आपले रूप ही खात्री म्हणजे अखंड आनंद. अशी अवस्था योग्यांना प्राप्त होते तशी सर्वांनाच होऊदे अशी ज्ञानेश्वरांची इच्छा.

जैशी पूर्वदिशेच्या राउळी l उदयाची सूर्ये दिवाळी l

की येरा हि दिशा तियेचि काळी l काळीमा नाही ll ज्ञा.५/८६

ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रुपी दिवाळी आली असता दुसऱ्या दिशेतील अंध:कार ही दूर होतो . तशीच

तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची l दिवाळी करी ll ज्ञा.१५/१२

तसेच ज्ञानेश्वरानी आपल्या रसाळ व आल्हाददायक  वाणीने सांगितलेले ज्ञान सगळ्या श्रोत्यांना ज्ञानी करून टाकते. ‘ज्ञानेश्वरांच्या वाणीतून जो ज्ञानाचा प्रकाश पडेल तो इतका व्यापक असेल की जो कोणी ते शब्द ऐकेल तो ज्ञानप्रकाशाने न्हावून निघेल. त्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायला येईल.’ अज्ञान गेले त्रैलोक्य  ऐक्याने प्रकाशित होते. हीच जीवब्रह्म ऐक्याची  स्थिती व ब्रह्मानंद आणि महासुखाची दिवाळी हाच मोक्ष.

तैसे होय तिये मेळी l मग सामरस्याच्या राउळी l

महासुखाची दिवाळी l जगेसि दिसे ll ज्ञा.६/८९

अशाप्रकारे ज्ञानेश्वरांना ज्ञानाची दिवाळी म्हणजे निरंतर महासुख देते ती अभिप्रेत आहे. ज्ञान, विवेक आणि सामरस्य अवस्था अशा तत्वातून ती साजरी केली आहे. म्हणून ती महासुखाची ठरली.

ज्ञानाचा दिवा अंतर्बाह्य उजळून टाकतो. सर्वच संताना अशी दिवाळी अपेक्षित होती म्हणून संत तुकाराम म्हणतात,

साधु संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा l

संत निवृत्तीनाथ म्हणतात, नित्यता दिवाळी l नाही तेथे द्वैत l

संत नामदेव म्हणतात, विठोबाचे राज्य l आम्हा नित्य दिवाळी l

संत सेना महाराज म्हणतात,

देखता संतचरण lआजी दिवाळी दसरा l

संत सखु म्हणते,

आनंदाची दिपवाळी l घरी बोलवा वनमाळी l

घालीते मी रांगोळी l गोविंद गोविंद l

अशा प्रकारे सर्व संतानी देवाच्या सान्निध्यात आनंदाची दिवाळी भोगली.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दाचे सामर्थ्य…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ शब्दाचे सामर्थ्य… ☆ सौ शालिनी जोशी ☆

संत तुकारामांचे शब्द —-

संत तुकाराम म्हणतात,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू l

आमच्या घरी शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि शब्दरूपी शस्त्र आम्ही जतन केले आहे. शब्दच कसे रत्न आणि शस्त्र असे विरुद्ध होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

लौकिक दृष्टीने घरदार, पैसा- अडका, सोनं -नाणं, जमीन- जुमला हे धन ठरतं. त्याचा उपयोग भोगासाठी, चरितार्थासाठी, दानधर्मासाठी केला जातो. तुकाराम अशाच एका सुखवस्तु घरात जन्मले. पण कुटुंबातील लोकांचे मृत्यू, धंद्यातील उतरण आणि दुष्काळ यामुळे हालाखिची परिस्थिती निर्माण झाली. तुकारामांचे प्रपंचातील लक्ष कमी झाले. ते ईश्वर चिंतनात राहू लागले. निर्धन तुकारामांच्या मुखातून शब्दरूपी धन ओसंडून वाहू लागले. जे लौकिक संपत्तीने साधलं नसतं ते त्यांच्या अभंगवाणीने साध्य झाले.

त्या शब्दांनाच रत्नाचे तेज आणि शस्त्राची धार प्राप्त झाली. परमेश्वर भेटला तरी जनसमुदायाचा विसर त्यांना पडला नाही. धर्माचे पालन आणि पाषाण खंडन यासाठी आपला अवतार असल्याचे त्यांनी ओळखले. आपले शब्दरूपी धन त्यांनी मुक्तपणे उधळले आणि क्रांती केली. सदाचारी आणि दांभिक प्रवृत्तीच्या लोकांचे समाजात मिश्रण असते. तुकारामांना सर्वांचाच कळवळा. ‘ बुडते हे जन न देखवे डोळा’ असा त्यांचा स्वभाव होता. सज्जनांसाठी त्यांचे शब्द मेणाहून मऊ तर दुर्जनांसाठी वज्राहून कठोर झाले.

बेभान, पाखंडी, ढोंगी समाजाला वठणीवर आणण्यासाठी, ‘तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणं फिरे l’ अशा थाटात ते सुधारणा कार्याला तत्पर झाले. ‘ नाठाळाचे हाती देऊ काठी ‘असे त्यांचे शब्द शस्त्रासारखे ठरले. लोकांना आपली चूक कळली. लोकांची मने त्यांनी जिंकली. लोकांना नामस्मरणाचा सुलभ, सोपा मार्ग दाखवला. ‘ पुण्य पर उपकारl पाप ते परपीडा l’ अशी पाप- पुण्याची सोपी व्याख्या लोकांसमोर ठेवली. स्वतः संसारातून दूर झाले पण लोकांचा संसार उन्नत व्हावा म्हणून शब्दातून त्यांनी मार्ग दाखवला. विपन्नावस्थेतही परमार्थ करता येतो हे दाखवून दिलं.

आजच्या धकाधकीच्या व अशांततेच्या काळातही माणसाला सावरणारी व समाधान देणारी ही तुकोबांची वाणी. रत्नाला नाश नाही तसेच त्यांचे अभंग अभंग राहिले. पुढेही राहतील. रत्न चमकदार असते आपल्या तेजाने परिसर उजळून टाकते. असेच शब्द समाजाच्या उन्नतीला कारण होतात, तेव्हा रत्न होतात व समाजातील अपप्रवृत्ती विरोधात लढण्याची प्रेरणा देतात तेव्हा शस्त्र होतात. हेच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जहाल लेखणी द्वारे साधले. असे हे शब्दाचे सामर्थ्य.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares