मराठी साहित्य – विविधा ☆ “’मन:’ सामर्थ्य म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “’मन:’ सामर्थ्य म्हणजे काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

‘मन’ या शब्दाचा किती विविध प्रकारे अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करता येतो त्याची ही झलक…

‘मन’ हे भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि भावविश्वाचा एक अतिशय गहन आणि महत्त्वाचा भाग आहे. मानवी जीवनाचे सर्व निर्णय, भावना, वर्तन, आणि भविष्य ‘मना’ च्या प्रभावाखाली असतात. ‘मन’ हा शब्द फक्त एक मानसिक अंग नाही, तर तो एका व्यक्तीच्या सर्व क्रियाकलापांचे केंद्र असतो. म्हणजे असे की, ‘मना’ ची शांती हा जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा ठेवा आहे. जो माणूस आपल्या ‘मना’ ला शांत ठेवतो, तो बाह्य वादळांचा प्रभाव झेलण्यास सक्षम होतो. आजच्या तणावपूर्ण जीवनात, ‘मना’ ची शांती राखणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मना’ ची उर्जा अपार असते, ती आपल्या इच्छाशक्तीला दिशा देते. जर ‘मन’ जिंकले, तर कोणतीही कठीण कामे सहज पार केली जाऊ शकतात. वाचन, कला, विज्ञान आणि जीवनातील अन्य क्षेत्रात ‘मना’ चे उद्दीपन विविध कार्यांच्या उन्नतीसाठी प्रेरक ठरते. ‘मना’ च्या सीमांमध्ये खूप मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात. अनेक वेळा, आपल्या ‘मना’ च्या सीमांमध्ये आपल्या अव्यक्त इच्छा, भावना आणि अमीट स्वप्ने दडलेली असतात. ‘मना’ चा गोंधळ होणे हा सर्वसामान्य अनुभव आहे. संकट, चिंता आणि अनिश्चितता यामुळे ‘मना’ चा गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार सुचावे म्हणून आपल्याला शांत ‘मना’ ची आवश्यकता असते. गोंधळलेल्या ‘मना’ मुळे आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही आणि त्यामुळे कधी कधी निर्णय घेताना अडचणी येतात. ‘मना’ तील विचार हे व्यक्तीच्या आंतरिक जगाचा आरसा असतात. विचार हे आपल्या ‘मना’ ची मानसिक स्थिती, भावना आणि वृत्तीचे प्रतिबिंब असतात. आपल्या ‘मना’ तील विचार आपल्या क्रियांचे कारण ठरतात, आणि त्याचप्रमाणे आपले भविष्य घडवतात. सकारात्मक विचार ‘मना’ ला प्रोत्साहित करतात, तर नकारात्मक विचार ‘मना’ त अस्वस्थता निर्माण करतात. ‘मना’ तील संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत जीवनात ज्या काही अडचणी आलेल्या असतात, त्या सर्वांचा सामना ‘मना’ च्या आंतरिक संघर्षातूनच केला जातो. कधी कधी ‘मना’ ने निर्णय घेणे किंवा स्वीकार करणे कठीण होते, कारण ‘मन’ एकाचवेळी अनेक गोष्टींच्या व्यवधानात अडकलेले असते. पण एकदा का आपण त्या समस्येतून मुक्त झालो तर ‘मना’ ला प्रचंड समाधान मिळते. ‘मना’ चे समाधान हे जीवनाच्या शाश्वत सुखाची किल्ली आहे. कोणत्याही बाह्य वस्तू वा परिस्थितीमुळे समाधान मिळाल्यानंतरही ‘मना’ चे समाधान होणे महत्वाचे असते. जेव्हा आपले ‘मन’ आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेले असते, तेव्हा जीवन देखील समृद्ध आणि पूर्णत: समाधानकारक वाटते. ‘मना’ च्या दृष्टीने समृद्ध जगणं म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत जगणं होय. ज्या प्रमाणे दृष्टी आपल्याला बाह्य जग दाखवते, त्याचप्रमाणे ‘मन’ आपल्याला आपल्या अंतर्गत जगाचे ज्ञान देते. ‘मना’ च्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीमागे एक गहिरा अर्थ आणि अनुभव लपलेला असतो. म्हणून ‘मना’ च्या शक्तीवर विश्वास ठेवा. कारण ‘मना’ च्या शक्तीला कोणतीही सीमा नाही. जेव्हा आपला विश्वास असतो की, आपले ‘मन’ सक्षम आहे, तेव्हा आपली ‘मन:’ शक्ती वर्धित होते. आपल्या ‘मना’ च्या या कार्यक्षमतेमुळे आपण अशक्यप्राय कामेही पूर्ण करू शकतो. त्यासाठी ‘मना’ चे परिष्करण करणे ही जीवनात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या ‘मना’ चे परिष्करण करतो, म्हणजे आपल्या ‘मना’ ला शुद्ध करतो आणि परखड परीक्षण करतो, तेव्हा आपल्यामध्ये अधिक विचारशीलता, अधिक स्पष्टता आणि अधिक समज येते. असे परिष्कृत ‘मन’ जीवनाच्या प्रत्येक पैलूला सुसंगतपणे सामोरे जाऊ शकते. एवंच ‘मन’ एका संपूर्ण मानसिक आणि भावनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, हे कधीही विसरू नये. ‘मना’ वर नियंत्रण ठेवणे म्हणजे जीवनाला एक नवा आयाम देणे, आकार देणे आहे, आणि या प्रक्रियेतच आपल्या प्रगतीची वाट दडलेली आहे. म्हणूनच म्हणतात, ‘मन’ चांगा तो कठौती में गंगा! थोडक्यात काय तर, ज्याने ‘मन:’ सामर्थ्य ओळखले त्याने जग जिंकले. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत मुक्ताबाई व ज्ञानबोध ग्रंथ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

🌸 विविधा 🌸

संत मुक्ताबाई व ज्ञानबोध ग्रंथ… ☆ सुश्री शोभना आगाशे

(दि. २२ मे हा दिवस संत मुक्ताबाई यांचा पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्त लेख)

संत मुक्ताबाई म्हटलं की ताटीचे अभंग आठवतात. याव्यतिरिक्त ही त्यांचे कांही अभंग प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या अध्यात्मिक उंचीची कल्पना देणारा त्यांचा ‘ज्ञानबोध’ ग्रंथ फारच कमी लोकांना ठाऊक आहे. हा ग्रंथ सहजासहजी कुठे उपलब्ध नाही, हे याचं एक कारण असू शकते. या ग्रंथात संत निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील संवाद अभंग रूपात येतो. हा ग्रंथ ‘नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय’ प्रकाशनाने १९७६ साली प्रथम प्रकाशित केला. याचे मूळ हस्तलिखित देखिल येथे उपलब्ध आहे. या ग्रंथाची निर्मिती संत ज्ञानेश्वर, सोपानदेव व चांगदेव यांच्या समाधीनंतर झाली असावी. या ग्रंथनिर्मिती नंतर कांही दिवसातच मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्या.

या ग्रंथाचे तीन विभाग करता येतील. पहिल्या भागात १२६ अभंगांतून निवृत्तीनाथांनी मुक्ता बाईंना बोलत्या करण्यासाठी केलेल्या विनवण्या आहेत व विचारलेले प्रश्न आहेत.

दुसऱ्या भागात या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५६ अभंगांतून दिलेली उत्तरे आहेत. ही प्रश्नोत्तरे संत नामदेव व इतर शिष्य गणांच्या उपस्थितीत झालेली आहेत.

तर तिसऱ्या भागात निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील खाजगी संवाद आहे. एका अभंगातून निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारावा तर पुढच्या अभंगातून मुक्ताबाईंनी त्याला उत्तर द्यावे. असे २१ अभंग आहेत.

प्रत्यक्ष गोरक्षनाथांची भेट झाल्यापासून मुक्ताबाई आत्ममग्न स्थितीत असल्यामुळे अबोल झाल्या होत्या. म्हणून निवृत्तीनाथांनी वारंवार विनवण्या करून त्यांना बोलते केले आहे. कारण अध्यात्मिक दृष्ट्या मुक्ताबाई आपल्या पेक्षाही प्रगत आहेत याची निवृत्तीनाथांना खात्री पटली होती. एक गुरू आपल्या शिष्याची महती जाणून, त्याच्या चरणी कसा लीन होतो याचे हृद्य दर्शन पहिल्या भागात होते.

संत निवृत्तीनाथ येथे मुक्ताबाईंकडे आपली लहान बहीण किंवा आपली शिष्या म्हणून पहात नाहीत तर साक्षात् आदिमाया म्हणून बघतात.

प्रत्यक्ष आदिमायेने स्वमुखाने ब्रम्ह आणि माया यांच्या स्वरूपाची चिकित्सा करावी असा विलक्षण योग येथे जुळून आला आहे.

गोरक्षनाथांकडून प्राप्त ज्ञाना बद्दल मुक्ताबाईंनी बोलावं व आपल्याला मार्गदर्शन करावे अशी निवृत्तीनाथांची इच्छा आहे. म्हणून इथे गुरू शिष्याची तीच जोडी, परंतु गुरू व शिष्य यांच्या स्थानांची अदलाबदल झालेली दिसते. आणि स्वतःच्या सद्गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणारी, त्यांनासुद्धा अधिकारवाणीने चार शब्द सांगू पाहणारी मुक्ताबाई येथे आपल्याला भेटते.

(संदर्भ:- ‘कडकडून वीज निघाली ठायी चे ठायी’ संत मुक्ताबाई – व्यक्ती आणि वाङ्मय – डाॅ. केतकी मोडक – द्वितीय आवृत्ती).

संत मुक्ताबाईंचा जीवनपट, त्यांच्या या अलौकिक पण सामान्य साधकापर्यंत न पोहोचलेल्या ‘ज्ञानबोध’ ग्रंथाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या खाली उद्धृत केलेल्या मुक्ता बाईंच्या चरित्रात्मक कवितेत या ग्रंथाचा उल्लेख खास करून केला आहे.

☆ संत मुक्ताबाई ☆

*

आदिमाया अवतरली जगती

अश्विन शुद्ध प्रतिपदेसि

*

बोल बोबडे बोलत असता

अंतरली ती मायपित्यासि

*

बालपणाला त्वरे लंघुनि

माता बनली वडील बंधुंसि

*

दिधली दीक्षा निवृत्तीनाथे

गुरूभगिनी हो ज्ञानयासि

*

प्रवास अवघड अध्यात्माचा

शंका ती पुसते ज्ञानेशासि

*

अनुभवा येता समाधी निर्गुण

शून्याकार पाही जगतासि

*

आत्ममग्न ती राही एकली

अनुभवी सदा तुर्यावस्थेसि

*

पोकळ पंडिती शाब्दिक शस्त्रे,

जंव जखमी करिती ज्ञानोबांसि

*

आत्ममग्न ते होऊन चिंतित

मिटुनि घेती ज्ञान कवाडांसि

*

रुष्ट ज्ञानेशा, ती करि उपदेशा

रचुनि ताटीच्या अभंगांसि

*

कार्यप्रवण होती तंव ज्ञानेश्वर

रचती भावार्थ – दीपिकेसि

*

पैठण क्षेत्री भिंत चालविती

चांगदेव येता भेटीसि

*

पत्र पाहुनि कोरे त्यांचे

धाडिती त्यां पासष्टीसि

*

अर्थ न उमगे परंतु त्यांसि

येती शरण मग ज्ञानोबांसि

*

मुक्ताईचे शिष्यत्व पत्करी चांगा,

निजबोध प्राप्त मग होई त्यांसि

*

परमभक्त परि, अहंकारी नामदेव

गुरूविण ना मोक्ष, सांगे ती त्यासि

*

तीर्थाटना जाती बंधु नि संत, परि

मागे राहुनि उपदेशी ती शिष्यांसि

*

आळंदीस घेती ज्ञानेश समाधी

सोपान समाधिस्थ सासवडासि

*

उदास, अलिप्त होई मुक्ताबाई

त्यागुनि देई ती अन्नपाण्यासि

*

स्वरूपी निमग्न, अंगिकारी मौन

विनवी निवृत्ती उपदेशासि

*

अदलाबदली गुरू नि शिष्याची

निर्मि ‘ज्ञानबोध’ ग्रंथासि

*

तापी तीरी करिता भजन कीर्तन

ऐकिती सारे अगम्य घंटानादासि

*

पंचमहाभूते बेभान होऊनि

भेटती तेथे आदिमायेसि

*

मेघांची दाटी, विजेचा कल्लोळ

तुफान वारा, उडवी धुरळ्यासि

*

गगन धरा जणु होती एकरूप

पाऊस करी तांडवनृत्यासि

*

मुक्ताबाई गुप्त होताच

अवचित पसरे सर्वत्र शांतीसी

*

स्वरूपाकार मुक्ताई होता

मुखावर निवृत्तीच्या पसरे उदासी

(मुक्ताबाईंना भेटण्यास आलेली पंचमहाभूते 👉 मेघांची दाटी = आकाश, विजेचा कल्लोळ = तेज, तुफान वारा = वायु, उडवी धुरळ्यासि = पृथ्वी, पाऊस करी तांडव = आप)

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोज बदलतं स्टेटस… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆

सौ. वृषाली सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ रोज बदलतं स्टेटस… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे 

19.04. 2024 पासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला. सुजाण नागरिक मतदान करायला तर गेलेच आणि नंतर त्यांनी आपल्या मतदानाचा पुरावा त्यांनी व्हॉट्‌स ॲप किंवा इतर सोशल मीडियाच्या स्टेटसवर सादर केला. कुणी मतदान केंद्रावर तयार केलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर, कुणी मतदान केंद्राच्या आवारात वा प्रवेश द्वारात, कुणी घरी परत येण्यापूर्वी गाडीवर बसून तर काहींनी घरासमोर फोटो काढून ते स्टेटसवर टाकले. हा सगळा प्रकार पाहून मला प्रश्न पडला की खरंच असे आपल्या वैयक्तिक गोष्टींचे फोटो स्टेटसवर टाकणं इतकं आवश्यक आहे? समजा ‘मी मतदान केलं’ हे कुणालाही कळलं नाही तर मी ते केलं नाही असं होतं का? नाही ना! !

आजकाल अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही स्टेटसवर ठेवल्या जातात. कुठे जेवायला गेले तर आधी तिथे फोटो काढणार आणि स्टेटसला टाकणार. तीच कथा जेवण आल्यावरची. समोर आलेलं गरमागरम सुग्रास जेवण जेवायचं सोडून ते वाढलेल्या ताटाचे फोटो आधी स्टेटसला जावे लागतात. त्यामुळे बहुतेक त्या पदार्थांची चव वाढत असणार. काही लोक तर जेवत असतानाचेही फोटो टाकतात. काय उपयोग याचा? कारण हे स्टेटस बघणारे जे लोक असतात ना तेही हे सगळं करत असतातच ना! मग त्यांना या फोटोंचं काय कौतुक?

यात आणखीही एक मजेदार प्रकार असतो. ग्रुपमधल्या एखाद्याचा वाढदिवस असतो. मग तो स्वतःचा वाढदिवस कसा साजरा केला याचे फोटो स्वतःच्या स्टेटसवर ठेवतो. इथपर्यंत सगळं ठीकच आहे. पण मग ग्रुपमधील कुणीतरी त्या स्टेटसचा स्क्रीन शॉट काढून तो आपल्या स्टेटसवर ठेवतं. काय सुचवायचं असतं नक्की त्याला? की बाबा रे बघ, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की माझ्याही स्टेटसला तुझेच फोटो आहेत असं? अर्थात जे तो वाढदिवस विसरले आहेत त्यांना त्याची आठवण यावी हाही एक छुपा उद्देश त्यामागे असावा. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा वैयक्तिक संदेश पाठवूनही देता येतात. सरळ कॉल करून बोलणे तर फारच छान. पण नाही, जोपर्यंत मी काय केलं हे लोकांना कळत नाही तोपर्यंत जगण्याचा काय उपयोग?

तरी एक वेळ अशा आनंदाचं ठीक आहे, पण आपण जे सामाजिक कार्य करतो त्याची जाहिरात का स्टेटसवर केली जाते? आपण झाडं लावणार असू तर लगेच त्या रोपाबरोबरचा एक फोटो स्टेटसला. रक्तदान केलं तर लगेच हाताला सुई पोचलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या पलंगावर पडून असतानाचा फोटो स्टेटसला. कुठल्या तरी संस्थेला अगदी छोटीशी देणगी दिली तरी तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबरचा फोटो स्टेटसला येणं हे जास्त महत्वाचं असतं. तीच कथा अन्नदानाची. भुकेलेल्या लोकांना खायला घालण्यापेक्षा जास्त महत्त्व त्यांच्या घोळक्यासमोर उभं राहून घेतलेल्या सेल्फीला आणि ती स्टेटसवर येण्याला ही सध्याची अवस्था आहे. खरं तर आपल्या संस्कृतीत गुप्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. मग आता याचाही गाजावाजा करणं का आवश्यक झालं आहे? ‘मी दान करतो, अगदी याचक मागेल ते त्याला देतो’ अशी दवंडी न पिटताही कर्ण अजूनही दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेच ना! !

आजकाल बहुतेक सर्वच लोक स्वतःच्या आयुष्यातील अगदी खाजगी बाबीही ह्या स्टेटसवरच्या फोटोंमुळे चव्हाट्यावर आणत असतात. मग ते मित्र-मैत्रिणींबरोबरचं भांडण असो वा घरातल्या लोकांशी झालेले मतभेद. मुलाचा वाढदिवस असेल तर त्याच्या खरेदीसाठी गेल्यावर तिथला फोटो, त्याची तयारी झाल्यावर त्याच्यासकट सजलेल्या घराचे आतून, बाहेरून फोटो, नवीन घेतलेल्या सगळ्या वस्तू – अगदी कपडे, दागिने, फर्निचर, कार इत्यादी – हे सगळं स्टेटसला जावंच लागतं. घरातले सगळे चित्रपट बघायला, जेवायला किंवा प्रवासाला गेले तर वारंवार ‘स्टेटस अपडेट’ करून त्याचा सतत गाजावाजा केला जातो. पण यातून आपण आपलं घरदार, जीवाभावाची माणसं, वैयक्तिक आयुष्य असुरक्षित करत असतो हे या सगळ्यांना कसं समजत नाही? प्रत्यक्ष भेटायला जायला तर सोडाच, पण आजकाल फोनवरही थोड्या वेळ बोलायलाही ज्यांना वेळ नसतो ते स्टेटसवर मात्र तासचे तास घालवताना दिसतात.

यावर आधारित एक गोष्ट मी काही वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिली होती. साधारणतः ५५ ते ६० च्या दरम्यान वय असलेलं एक जोडपं घरी बसून अशा तरुण जोडप्यांचं स्टेटस रोज बघतात ज्यांना तान्ही ते ९-१० वर्षांपर्यंतची मुलं आहेत. मग त्या मुलांच्या वाढदिवसाच्या म्हणा किंवा इतर काही निमित्ताने म्हणा ते कुटुंब ज्या दिवशी गर्दीच्या ठिकाणी जाणार असेल जसं की खरेदीसाठी बाजारात, मॉलमध्ये किड्स् झोनला खेळायला, किंवा एखाद्या यात्रेत वा प्रदर्शनात इत्यादी, तिथे आपल्या तरुण साथिदारांना पाठवून त्या लहान मुलांना पळवून आणतात आणि त्यांची विक्री करतात. त्या जोडप्याच्या वयामुळे ते बरेच दिवस पोलिसांच्या नजरेत येत नाहीत, कारण ते सोशल मीडियावरच्या स्टेटसचा असा काही वापर करत असतील आणि तेही त्यांच्या वयात हा संशय कुणालाही येत नाही. पण ती गोष्ट असल्याने यथावकाश पोलिस त्या दोघांसह त्यांच्या पूर्ण टोळीलाही पकडतात आणि तो मुलांचा व्यापार थांबवतात. पण हे वास्तव आहे का? आणि असेल तरीही तोपर्यंत विकल्या गेलेल्या त्या छोट्या मुलांचं नक्की काय झालं, त्यातली किती सापडली, किती घरी परतली, किती जणांना घरच्यांनी परत स्वीकारलं (मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न फारच विदारक स्वरूपाचा असतो), ज्यांना काहीच आठवलं नसेल त्यांचं काय झालं असे अनेक प्रश्न मला अजूनही सतावतात.

म्हणून असं वाटतं की आपल्याला होणारा आनंद किंवा दुःख अथवा आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या सोशल मीडियावरच्या स्टेटसला सतत टाकून जगासमोर आणू नयेत. कारण ते स्टेटस पाहणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल, आपलं भलं चिंतीत असेल असं नाही. जे लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत ते तुमचा गैरफायदाही उठवू शकतात. तेव्हा स्टेटसवर काहीही टाकण्यापूर्वी आपलं घर, संसार, आपली माणसं यांचा विचार नक्कीच करा.

©  सौ. वृषाली सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिसाब बराबर… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ हिसाब बराबर… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

टी. व्ही. वर अर्थमंत्री निर्मला सीतारामन–अतिशय आत्मविश्वासाने सादर करत असलेले बजेट मी दरवर्षीप्रमाणे ऊत्सुकतेने पहात होते. नोकरदार वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आयकर–त्यातील बदल. तसे तर नोकरीवर असतांना या वर्षी तरी काही कर कमी होईल का?

का जास्तच वाढेल? कोणत्या वस्तु स्वस्त होतील, कोणत्या महाग?

किती गुंतवणुक करावी लागेल म्हणुन माझाही तो जिव्हाळ्याचाच मुद्दा असायचा. कारण गुंतवणुकीचे, नविन खरेदीच्या खर्चाचे गणित त्यानुसार जमवावे लागे.. पण आता कापु देत किती कर कापतात ते., आता कशाला त्या गुंतवणुकीच्या भानगडीत पडायचे,. खर्चही तसा कमीच होतो. मुख्य औषधाचाच., म्हणुन मी दुर्लक्ष करत होते.

वयाचा विशिष्ठ टप्पा ओलांडला की आर्थिक बाबतीतले स्वारस्य कमी होणे स्वाभाविक आहे म्हणा. पण आता वेध लागतात ते दुसर्‍याच हिशोबाचे. अहो, कुठल्या म्हणुन काय विचारता? लक्षात नाही आले का? बरं तर “जरा ईस्कटुन” (टी. वी. वरील ग्रामीण सिरियलचा प्रभाव) सांगते.

आता हिशोब बघायचा तो आयुष्याच्या जमाखर्चाचा.

आपुलकी, प्रेम–द्वेषमत्सर,

कौतुक–टीकाटिप्पणी,

जोडलेली नाती—तुटलेली नाती, एकमेकांची ऊणीदेणी,

अपेक्षापुर्ती—निराशा, स्पर्धा -यशापयश,

आणि अशा अनेक गोष्टी. पण सर्वांची गोळाबेरीज —आपल्या भाषेत म्हणजे

सुख आणि दुःख

सुखाची मिळकत -जमा खाते

आणि दुःखाचे खर्च खाते.

आणि त्या दोन्हीतील तफावत —म्हणजेच नफातोटा. आणि ते समजल्याशिवाय * हिसाब बराबर–आहे का नाही हे कसे समजणार?

 झाले, माझ्या डोक्यात एखादा विषय एकदा शिरला की तो पुर्ण केल्याशिवाय जीवाला स्वस्थता म्हणुन नसते.

सामान्य भाषेत केल्या कर्माचे फळ सुखदुःखाच्या रुपात प्राप्त होत असते.

मग काय, केल्या कर्मांची रोजकीर्द त्यानुसार ऊघडलेली वेगवेगळी खाती (accounts),

जमाखर्च पत्रक, नफातोटा पत्रक, आणि ताळेबंद —मनाच्या संगणकावर साठवलेल्या सर्व फाईल्स ओपन केल्या. आणि नोंदीचे ऑडिट सुरु केले. अकौंटसीत नेहमी टॉपला असणारी मी.

 पण हा हिशोब तपासताना मात्र गोंधळल्यासारखे झाले.

कारण केल्या कर्माला आणि त्यामुळे मिळालेल्या फळाला सुखाच्या खात्यात जमा धरावे की दुःख म्हणून खर्ची टाकावे, हे ठरवतांना मनाची द्विधा स्थिती. हा निर्णय वाटला तेवढा सोपानव्हता. “कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेशु कदाचन””हे अगदी पाठ असले तरी सामान्य प्रापंचिक लोक ते सोईस्कर रितीने विसरतात. म्हणुनच ते सामान्य असतात. मी ही तशीच एक सामान्य.

 रोजकिर्दीतले मधलेच एक पान ऊघडले. दिवसभराच्या नोंदी अगदी सकाळपासून व्यवस्थित होत्या.

 सकाळी सकाळीच अंथरुणात डोळे ऊघडले, आणि डोळे चुरचुरु लागले, कारण रात्री गोळी घेऊनही झोपच नाही,. रात्रभर बेजार करणारा खोकला, मधुनच ऊजवा गुडघा दुखणे, तर मधुनच डाव्या पायात क्रॅम्प. , तर मधुनच पाठीत कळ

तोंडाला कोरड, -‘-येणार येणार वाटते हार्ट ॲटॅक’ म्हणुन रात्रभर बेचैनी. —म्हणजे दुःखच ना? छान मऊ गादी असलेल्या बेडकडे “काय तुझा ऊपयोग? “म्हणत जरा रागाने बघितले.

 पण ऊठुन बसल्यावर ना कुणाची मदत, ना काठीचा, वॉकरचाआधार, तरीही छान चालायला आले हे काय कमी सुख आहे का? –म्हणुन माझी माझ्याशीच खुदकन हसले.

बेसिन समोरच्या आरशात दिसणारा आपलाच सुरकुतलेला चेहरा, डोक्यावरचे विरळ पांढरे केस, —झाले आता म्हातारी, –दुःखाच्या खात्यात परत एक नोंद झाली.

पण सुनेने टेबलवर ठेवलेला भरपुर दुधाचा, माफक गोड मस्त चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतांना

‘अरे वा, आपल्याला डायबेटिस नाही, हे किती छान’ म्हणुन मनात सुखाच्या खात्यावर जमेची मोठ्या खुशीत केली.

नाष्ट्याच्या वेळी, तर सर्वांच्या कुरकुरीत डोश्याकडे पहातांना आपल्या दातांच्या खिडक्यांनी, ‘तु नाही खाऊ शकणार ” ही दुःखाची नोंद झालीच. पण लोणी घातलेला मऊ लुसलुशीत ऊत्तप्पा, आणि तो खायला मिळतो, पचतो, मन तृप्त करतो-मुख्य म्हणजे घरातले आपल्या तब्येतीची काळजी घेऊन, आठवणीने आयते -करुन देतात. हे किती सुखदायक.

“आई, रात्री झोप लागली का?” -मुलगा.

“आई छान नाटक लागले आहे, मी बुकिंग केले, आज जाऊया”- सुन

“आई, किती दिवसात माझ्याकडे आली नाहीस, ये ईकडे. मी गाडी पाठवते. ८, १० दिवस जरा बदल होईल, ईथेच कुठेतरी जाऊ फिरायला”-मुलीचे फोनवर बोलणे.

 “औषधे संपत आली की सांगा आणून देतो” मुलीकडे गेल्यावर जावयाचे विचारणे.

असे अनुभव म्हणजे सुखच-सुख. जमेच्या नोंदी.

रोजच घडत असलेल्या सर्व प्रसंगांची नोंद रोजकिर्दीत होतच असते.

तसेच प्रासंगिक कर्मांच्या, –प्रसंगाच्या – नोंदीही सुखदुःखाच्या जमाखर्च पत्रकात नोंद केल्या जातात.

डोळे, कान, हात पाय, पोट, –सगळेच अवयव अधूनमधून असहकार पुकारुन संपावर जातात यामुळे चिडचिड होते, दुःख होते. हसायला काय झाले?

अहो, घरात आमरस -पुरी, भजी याचा मस्त सुगंध दरवळत असतो आणि पोट अचानक संपावर गेले तर दुःख होणारच ना? शिवाय कॅसर तर नसेल? का कसले ऑपरेशन करावे लागेल? काहीतरी भयंकर दुखणे तर नाही? –ही मनाला त्रिकाळ भेडसावणारी घोर चिंता, म्हणजे काय दुःख असते ते सांगून समजणार नाही. अनुभवावे लागते.

 पण, थोड्याफार गोळ्या औषधाने २, ४ दिवसात अवयव कामावर हजर झाले की, “चला, फारशा टेस्ट कराव्या लागल्या नाहीत “, किंवा केल्यातरी रिपोर्ट नॉर्मल आले -याचा आनंद, सुख म्हणजे जमेत लक्षणीय भर.

आणखी एक दुःख बरेच दिवस माझ्या मनात खदखदत होते. ते शिक्षणाबाबत. मेडिकल करायची मला लहानपणापासुन मनापासुन ईच्छा. ११वीला डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. पण, अनेक अडचणींमुळे ऐनवेळी ते शक्य झाले नाही तेंव्हा तर अर्धवट वयामुळे —आता आपले काही खरे नाही, आयुष्य वाया गेले, आता जगण्यात तरी काय अर्थ? –म्हणुन झालेले दुःख— मोठा तोटा म्हणुन नोंद केला. पण नंतर कॉमर्सला जाऊनही नेहमी

नंबरात येऊन M. Phil. करुन प्राचार्यपदापर्यंत पोहचले, विद्यापीठात सर्व समित्यांवर, अगदी सिनेटपर्यंत काम केले, M. B. Aच्या, ३०, ३२विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टरिपोर्टची गाईड म्हणुन काम केले हे सर्व सुखाची जमा वाढवणारे होते.

प्रपंचातील सुखदुःखांच्या नोंदी तर न संपणाऱ्या असतात,. माझाही तसाच अनुभव. सुरवातीला थोडी आर्थिक ओढाताण, मोठ्या कुटुंबामध्ये कुणाचे आजारपण, मृत्यु, अपघात, मनात असुन मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाता आले नाही, जुन्या फ्लॅटची किंमत कमीच मिळाली, मुले लांब गेली, आजारपण, करोनाची साथ -राजकीय, सामाजिक असुरक्षिता यामुळे ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ तोंड द्यावे लागले. युध्द म्हटले की हारजीत आलीच. आणि अपयशामुळे येणारे दुःख तर सततच भोगावे लागले.

पण मुले अभ्यासात छान, त्यांची सहजपणे झालेली शिक्षणे, नोकरी, लग्ने, नाती यांचे यश, याचे सुख तर कशातच मोजता येत नाही पण जमेत भर पडली.

तरुण वयात नसेना पण निवृत्त झाल्यावर खुप फिरायला मिळाले, अगदी देशविदेशही.

लेखनाचा छंद जोपासता आला, -४, ५ पुस्तके छापली, रेडिओवर भाषणे, अध्यात्मिक अभ्यास यातून मिळालेले आत्मिक समाधानाचे भौतिक सुखासारखे मोजमाप करता येणार नाही.

 जिवलग जोडीदाराने जरा लवकरच साथ सोडली हे कधीही विसरता न येणारे दुःख मात्र खर्च खात्यात कायमचे ठाण मांडून आहे कारण कोणतीही, कितीही मोठी जमेची नोंद झाली तरी त्याची भरपाई होऊच शकत नाही.  अर्थात, मुलगा, सुन, मुलगी जावई, नाती आप्तेष्ट यांच्यामुळे दिलासा मिळतो ते सुखाची जमा आहे.

 मित्रमैत्रिणी हा तर माझा विक पॉइंट. या ना त्या कारणाने जिवाभावाच्या काही मैत्रिणी नकळत दुरावल्या. लांब गेल्या. काहींनी अकालीच आपला खेळ आवरला. माझे फार मोठे नुकसान झाले असे नाही. पण मनात खेद मात्र आहे, रहाणारच. आणि त्याचेच दुःखही वाटते. अनेक दशके कोल्हापुरला राहिलेली मी निमित्ताने पुण्याला आले. नवख्या ठिकाणी या वयातही पण मैत्रिणींचे वेड कमी झाले नाही. आता विसंवादाची भिती नसल्याने, व एकटेपणामुळे हे वेड अधिकच वाढले. अनेक नवनव्या मैत्रिणी जोडल्या, नशिबानेच मिळाल्या. आपल्या समुहावरील मैत्रिणींचा सिंहाचा वाटा. माझ्या आधीच्या मैत्रिणींच्या पुंजीत पडलेली ही फार मोठी भर.

ज्याच्यावर चक्रवाढ दराने मिळणारे व्याज म्हणजे सुखात नित्य होणारी वाढच.

 हिशोबपत्रकांवर नुसती नजर फिरवली तरी सुखदुःखाच्या कितीतरी नोंदी लक्षात आल्या. काटेकोरपणे ऑडिट करायचे ठरवले तर ऊरलेले आयुष्यही त्यातच सरुन जाईल. मग ताळेबंद केंव्हा मांडणार? आणि श्री शिल्लक किती ते केंव्हा पहाणार?

 आता त्याची गरजही वाटत नाही. कारण झाल्या हिशोबावरुन एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आली. परमेश्वर हा तज्ञ हिशोबतपासनीस आहे.

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार, कर्मानुसार देत असतो आणि घेत असतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा हिशोब तो त्याच क्षणी पुर्ण करतो. फक्त आपणच अज्ञ असल्याने आपल्याला ते समजत नाही. कारण त्याचे महत्वाचे सुत्र म्हणा तत्व म्हणा असते ते म्हणजे — —

हिसाब बराबर

त्यातुन माझ्यासारखीला मनातुन वाटते, “नाही, परमेश्वराने आपल्याला आपल्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच दिले. आता तो हिशोब पुढच्या जन्मी पुर्ण करणार.”

पण, माझ्यामते हिशोबाची ही खाती पुढच्या जन्मापर्यंत पुढे पुढे कशाला कॅरी फॉरवर्ड करायची? त्यापेक्षाआयकर भरुन मोकळे व्हावे. आणि भगवंताला आवडणारा कर म्हणजे “भगवंतावर श्रध्दा, भक्ति. आणि तीच मनात ठेवुन भगवंत नामाचा जप.”

हा कर जर नित्यनेमाने भरत गेलो तर आपोआप या जन्मीचा याच जन्मी होईल– हिसाब बराबर!

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाळवण!… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ वाळवण!… ☆ सुश्री वैशाली पंडित 

कडकपणाची सीमा पार करून जाणारं कर्मकठोर ऊन्ह!

त्याला सर्वांगाने झेलणारी, त्याचा दाह झेपववता झेपवता स्वतःच तप्त फुत्कार टाकणारी गच्ची…

हे बघितल्यावर ‘ती’ जातीची गृहिणी स्वस्थ बसणंच शक्य नसतं.

पंचमहाभूतांना मदतीला घेऊन तर अन्नपूर्णेची आराधना करायची असते तिला. त्यातलं ‘तेज’ आता तिच्यासमोर ज्वाळा ढाळत असतं.

मग काय?

 डाळी, धान्य बाहेर येतात.

कोणाला भिजवलं जातं, कोणाला शिजवलं जातं. कोणाला वाटलं जातं, कोणाला घाटलं जातं, कोणाला लाटलं जातं…!

 नाना चवींनी नटवलं जातं. मिरची, जिरे, मिरे, हिंग, मीठ यांचे स्वाद दरवळतात. जिभा आत्ताच खवळतात.

 कारल्यासारखी कडू जहर भाजीही आता मीठमाखल्या चकत्या होऊन ऊन्हाच्या कडकडीत अंघोळीला बसते.

मोठ्या आकाराचे बटाटे दादागिरी करत खसाखस किसून घेतात स्वतःला. त्यातले काही पातळ काच-या करून लाड पुरवून घेतात.

ऊन्हात जुन्या सुती साड्यांचा मोरपिसारा मांडला जातो.

 पापड, सांडगे, कुरड्या, खारोड्या, सालपापड्या, कीस…. वाळवणाच्या पदार्थांची एकच धूम उडते.

नुसतं वाळत घातलं म्हणजे झालं नाही. ऐन ऊन्हाच्या कारात ते उलट्याचं सुलटं करून घ्यावं लागतं. त्यांच्यावरून हात फिरवावा लागतो. तो हात मात्र संसारात मुरलेल्या ‘ ती ‘ चाच असावा लागतो. पापडाचा चेहरा बिघडता नये की पापडीचा नूर मोडता नये.

 टपलेलेच असतात कावळे, चिमण्या चोची मारायला. केल्या कामावर नाचायला.

ती आता वाळवण राखते.

तिच्या मनासारखी खडखडीत वाळली की, सावलीत आणते.

गार झाल्यावर डब्यात भरते. ती टिकवायचीत वर्षभर म्हणून जीवापाड जपते त्यांना.

आणि मग…

 वाळवणाच्या तळणीने सजलेलं जेवणाचं ताट पाहून ‘ ती’ सुगरण समाधानाने हसते. मुसळधार पावसाळी वातावरणासाठी, कडाड उन्हात तिने बेगमी केलेली असते.

‘ती ‘ हे कुठून शिकली?

 ‘ती’ च्याआधी ‘नि’ आणि ‘य ‘ ही अक्षरे लावणारी सुगरण तरी दुसरं काय करते?

प्रत्येकाचा उन्हाळा तिला ठाऊक असतो.

प्रत्येकाचा पावसाळा तिला विचारून येतो.

प्रत्येकाच्या आयुष्याचं ती असं वाळवण घालते. अनुभवांच्या नेसत्या साडीवर.

कोणाला अश्रूत भिजत घालते,

 कोणाला संघर्षात शिजत ठेवते,

कोणाला तणावाखाली बारीक वाटून घेते,

कोणाला जन्मभर पुरेल इतकी प्रश्नपत्रिका देऊन लाटून ठेवते.

कोणाचे सांडगे तोडते पेरांनी,

कोणाला पसरवते अशांतीच्या पळीनी.

कोणाला जास्त लागतं मीठ

कोण वाळतं गपगुमान नीट

सगळं माहीत असतं अचूक तिला. माणूस नावाचं वाळवण घालते ती बेगमीला.

मधूनमधून वाळवणावर काळजीवाहू हातही फिरवते.

 झडप घालणा-या हाव-या पिशा पाखरांपासून वाचवते.

उन्हाच्या झोतावर दुपार तिपार बघून वाळवण दहा ठिकाणी नाचवते.

तर!

 सावली आली तर वातड होईल ना! !

म्हटलं ना, ऋतु तिलाच कळतो फक्त प्रत्येकासाठीचा.

माणूस टिकवते ती तिच्या साठ्याचा.

कळतं का माणसाला आपलं वाळवण झालेलं?

कडाड ऊन्हात भाजून निघालेलं?

अनुभवांनी उलटंपालटं केलेलं…?

पण

शेवटी मनातली सगळी किल्मिष ओल वाळून खडखडीत झालेलं?

आपलंच वाळवण आपल्यालाच अडीअडचणीत साथ देणारं?

कोणी मग उकळत्या तेलात सोडा की चिमट्यात धरून निखा-यावर भाजा.

चहू बाजुंनी आहे त्या पेक्षा टक्क फुलूनच येणार.

कधी कळतं माणसाला हे?

 कोण जाणे.

ऊन्ह पाहिलं की, पावसाळ्यासाठीची बेगमी करायची धांदल उडतेच शेवटी.

‘ती’ असो

वा

नि य ‘ती’!!

केवढा महान गुरू हा!

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ मे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते प्रसंग माझ्या मनात ताजे आहेत!)

ताई गेली ते विरहाच्या दुःखाबरोबरच गजानन महाराजांच्या सांत्वन करणाऱ्या आशीर्वादांचं अमूल्य दान आम्हा सर्वांच्या असं स्वाधीन करून! पण तरीही त्या क्षणापासून माझ्या मनाला मात्र एक रूखरूख लागून राहिली होती. काही केल्या तो सल कमी होत नव्हता. होय. अज्ञान आणि अहंकारापोटी माझ्या हातून गजानन महाराजांचा अक्षम्य अनादर झाल्याची ती बोच होती. ताई गेल्याच्या हतबल करणाऱ्या दु:खाच्या पार्श्वभूमीवर तर ती मला अधिकच बोचरी वाटत होती!

“कोण गं हे गजानन महाराज?” असं मी ताईला विचारलं होतं ती गोष्ट ताई आजारी पडण्यापूर्वीच्या कितीतरी वर्षं आधीची. त्यामुळे एरवी त्याचा ताईच्या आजारपणाशी आणि जाण्याशी तसा अर्थाअर्थी कांही संबंध जोडावा असं वाटलंही नसतं. पण गजानन महाराजांवरील अतूट श्रध्देपोटी, ताईनं स्वतःचा काडीमात्रही स्वार्थ नसलेलं असं पोटतिडकीनं त्यांच्याकडे कांहीतरी मागणं, केवळ आपल्या पश्चात आपल्या आजारपणामुळे नवऱ्याला सगळं कांही हरवून गेलेल्या निष्कांचन अवस्थेत परावलंबी आयुष्य जगण्याची वेळ येणाराय या कल्पनेने असहाय्य अशा मनोवस्थेत मनाला त्रास देत राहिलेली स्वत:ची ही कैफियत तिने बिनतोडपणे महाराजांपुढं मांडणं, आणि मुख्य म्हणजे त्याबदल्यात स्वतःचे भोग आणि असह्य वेदना आतल्याआत सहन करण्याची तयारी तिने दाखवणं आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीही तिला जे हवं ते असं राजमार्गानं तत्काळ देणं हे सगळंच मला हलवून जागं करणारंच ठरलं होतं. ताईला ‘कोण गं हे गजानन महाराज?’ असं मी विचारणं हे कुतुहलापोटी नव्हतं यांची बोचरी जाणीव मला ताई गेल्यानंतरच्या त्या अस्वस्थ मन:स्थितीतच झाली आणि सतत टोचतही राहिली. माझं विचारणं कुतूहलापोटी नव्हतंच. ताई माझ्याकडे दुर्लक्ष करून खूप वेळ ती पोथी वाचत बसली होती या रागापोटी आणि शिवाय ‘पूर्वापार आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा मार्ग सोडून ही अशी पोथी तिने कां वाचावी?’ या नकारात्मक विचारामुळे नकळत मनात उभारलेल्या अहंकारापोटीच मी तिला उपहासाने ‘ कोण गं हे गजानन महाराज?’ हा उर्मट प्रश्न विचारलेला होता. हेच जर केवळ अज्ञानापोटी, कांही नवीन जाणून घ्यायच्या उद्देशाने मी विचारलं असतं तर ताईने तेव्हाच मला खूप छान समजावून सांगितलं असतं. पण तो आनंद माझ्या नशिबात नव्हता हेच खरं. माझ्या विचारण्याचा रोख तिच्या लक्षात आला तेव्हा ती कांहीशा नाराजीनेच माझ्याकडे पाहून फक्त एकच वाक्य बोलली होती. ‘तू स्वतःच ही पोथी वाच एकदा, म्हणजे तुला समजेल हे गजानन महाराज कोण ते. ‘ ती म्हणाली होती !

ताई गेली आणि हा सगळा भूतकाळ आठवून मी स्वत:लाच कोसत राहिलो. माझ्या मनातला तो अहंकाराचा कणभर काटा मी अलगद उपटून फेकून दिला, तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अगदी ‘ती पोथी खरंच एकदा तरी वाचायलाच हवी’ असं मला उत्कटतेने वाटलं तरी त्यानंतरही माझं मन स्वस्थ नव्हतंच. ‘आपण स्वत: शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं, स्वत:ची चूक कबूल करून त्यांची क्षमा मागायची ‘, असं तीव्रतेने मनात आलं खरं पण ते तातडीने अंमलात आणणं जमणार नव्हतंच. कारण ताईच्या आजारपणात सलग बरेच दिवस मी रजेवर होतो. आता याक्षणी कर्तव्याला प्राधान्य देऊन लगोलग ऑफीस-ड्युटीवर हजर होणंच गरजेचं होतं. अर्थात मी हाच निर्णय अंमलात आणला खरा पण तो मात्र मनोमन गजानन महाराजांना साक्षी ठेवूनच. त्या रात्री मी देवापुढे बसून डोळे मिटले. हात जोडून महाराजांना प्रार्थना केली. मी तोवर कधी त्यांचा फोटोही पाहिलेला नव्हता. त्यामुळे मिटल्या नजरेसमोर महाराजांचं मूर्तरूपही नव्हतंच. त्यांच्या नावाच्या रूपातलं अमूर्त रूप होतं ते फक्त माझ्या अस्वस्थ अंत:करणात!

‘मला शेगावला येऊन आपलं दर्शन घ्यायचंय. अनवधानानं कां होईना माझ्या हातून घडलेल्या आपल्या अनादराबद्दल मला तिथं येऊन मनःपूर्वक आपली क्षमा मागायचीय. माझ्या हातून अल्पशी कां होईना आपली सेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. आपला आशीर्वाद असू दे. ‘

मी मनोमन अशी प्रार्थना केली तेव्हा कुठे मनातली रूखरूख थोडी कमी झाली.

त्या क्षणी मला हे माहितही नव्हतं की अचानक एखादं अस्मानी संकट यावं तशा अनेक अनपेक्षित घटना माझ्या सरळरेषेतल्या सुरळीत अशा बॅंकेतल्या नोकरीमधल्या तोवरच्या माझ्या दिनक्रमात अनेक अडथळे निर्माण करणार आहेत! आश्चर्य म्हणजे याचा प्रत्यय मला रजा संपून ऑफिसमधे जॉईन होताच लगेचच आला!

तेव्हा मी ऑडिट डिपार्टमेंटला होतो. ताईचं

दिवस-कार्य संपवून मी कामावर रुजू झालो त्याच दिवशी अहमदनगर ब्रॅंचमधे माझी ट्रान्सफर झाल्याचं आदेश-पत्र माझ्या हातात पडलं! तोवर सुरळीत चालू असलेल्या माझ्या रुटीनचा विचार केला तर त्याला अचानक मिळालेलं हे वळण माझ्यासाठी अनपेक्षित आणि कांहीसं अडचणीचंच ठरणारं होतं. अर्थात ऑडिट डिपार्टमेंटमधला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ उलटून गेलेला असल्याने तिथून बदली होणार होतीच पण ती इतक्या तातडीने आणि तेही अहमदनगरला होणं हे माझ्यासाठी फारच गैरसोयीचं ठरणार होतं. अर्थात रूटीनचाच हा एक अपरिहार्य भाग म्हणून ते स्विकारणंच आवश्यक होतं!

मी नगरला लगेचच जॉईन झालो आणि पहिल्याच दिवसापासून तिथे साचून राहिलेल्या पेंडिंग कामांच्या व्यापात गुंतून गेलो. पहिले मॅनेजर मी येण्यापूर्वी पंधरा दिवस आधीच अकौंटंटकडे चार्ज देऊन रिलिव्ह झालेले होते. त्यामुळे ब्रॅंचचं संपूर्ण काम विस्कळीत होऊन गेलेलं होतं. ते पंधरा दिवस श्वास घ्यायलाही फुरसत न मिळालेल्या अकौंटंटने मला पहाताच सुटकेच्या निश्वास सोडला आणि त्याच क्षणापासून माझी मात्र घुसमट सुरू झाली!

ताई गेल्याचं दु:ख मनात कोंडून तिथल्या नवीन चक्रांत अक्षरशः भिरभिरत राहिलो. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसायलाच दोन तीन आठवडे उलटून जावे लागले. तोवर बाहेरचं जेवण, रात्रीची जागरणं, दिवसभरातली बँकेतल्या कामाची गडबड यातून घरगुती जेवणाची सोय बघायला थोडीही उसंत मिळाली नाही. नंतर तिथल्याच आमच्या एका स्टाफच्या ओळखीने घरगुती जेवणाचे डबे देणाऱ्या एका गरजू कुटुंबात माझी दोन्ही वेळच्या ताज्या जेवणाची अखेर सोय झाली. ही माझ्यासाठी एक सुखद घटनाच होती. त्या रात्री मी अंथरूणाला पाठ टेकली तो खूप दिवसांनंतर मला लाभलेला एक शांत, निवांत क्षण होता! त्या क्षणी ‘ शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागण्याचा ‘ बरेच दिवस मनाच्या तळांत पडून राहिलेला विचार झेपावत वर आला. या विचाराचा स्पर्श झाला आणि कांहीतरी राहून गेल्याची रूखरूख मन अस्वस्थ करू लागली. अर्थात माझी इच्छा कितीही तीव्र असली, तरी माझी दैनंदिन कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांनाच प्राधान्य देणं सध्या आवश्यक आहे हे मीच मला समजावलं. ‘याबाबतीत जे करायचं ते महाराजच करून घेतील’ हा विश्वासच मनातला अंधार नाहीसा करणारा ठरला.

माझी जिथे घरगुती जेवणाची झालेली होती ते घर आणि त्या घराशी माझे जुळलेले भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्याक्षणी तरी मला कल्पना नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “विज्ञान आणि तत्त्वज्ञान…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विज्ञान आणि तत्त्वज्ञान…☆ श्री जगदीश काबरे ☆

विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे नाते परस्परावलंबी आहे, पण विज्ञान हे तत्त्वज्ञान होऊ शकते का? हा प्रश्न खोलात जाऊन विचार करण्यासारखा आहे. कारण विज्ञान आणि तत्त्वज्ञानात सूक्ष्म फरक आहे. तो असा…

1) विज्ञान अनुभवाधारित आहे; ते निरीक्षण, प्रयोग आणि पडताळणी आणि कारणमिमांसेवर आधारलेले असते.

… तर तत्त्वज्ञान तर्कशक्ती आणि संकल्पनात्मक विश्लेषणावर अवलंबून असते.

2) विज्ञान निसर्गाच्या नियमांना उलगडण्याचा प्रयत्न करते. (उदाहरणार्थ, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र).

… तर तत्त्वज्ञान सत्य, अस्तित्व, नैतिकता आणि ज्ञानाच्या मर्यादा तपासते. (उदाहरणार्थ, तत्वज्ञानातील ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, अस्तित्ववाद).

3) विज्ञानात गृहीतकाची सिद्धता आणि गृहीतकाला खोडून काढण्याची प्रक्रिया असते.

… तर तत्त्वज्ञानात विचारप्रणाली आणि संकल्पनांच्या वैधतेची चर्चा होते.

4) विज्ञान नवीन अनुभवसिद्ध ज्ञान निर्माण करते.

…. तर तत्त्वज्ञान हे कल्पनांचे विश्लेषण करते.

5) विज्ञानाचा पाया तत्त्वज्ञान असते. कारण विज्ञानातील मूलभूत प्रश्न तत्त्वज्ञानानेच निर्माण केले आहेत. वैज्ञानिक संशोधनाची दिशा तत्त्वज्ञानाच्या विचारांवर आधारित असते. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यांतील काही संकल्पना (जसे की सापेक्षता, क्वांटम यांत्रिकीतील बहुविश्व सिद्धांत) या तत्त्वज्ञानाच्या मर्यादेत येतात.

6) विज्ञानाच्या यशस्वीतेचा आधार प्रायोगिक तपासणीवर आहे, जो तत्त्वज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळा आहे. कारण विज्ञानाच्या प्रक्रियेत “तत्त्वज्ञानासारखा शुद्ध तर्क आणि अनुमान” पुरेसा नसतो; त्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग महत्त्वाचे असतात.

म्हणून विज्ञान हे स्वतः तत्त्वज्ञान नसले तरी त्याचे मूळ तत्त्वज्ञानात आहे आणि तत्त्वज्ञानाशिवाय विज्ञानाचा विकास शक्य नाही. त्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे स्वतंत्र असले तरी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पाहिले -. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे

नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.) – आता इथून पुढे — 

मुंबई हे रोजी रोटी देणारं शहर. त्यामुळे जो उठतो, तो काम मिळवण्यासाठी मुंबईकडे धाव घेतो. त्यामुळे तिथे लोकांची गर्दीच गर्दी. लोकसंख्या वाढली, म्हणून जमीन काही वाढत नाही. मग समुद्र हटवून, तिथल्या दलदलीचा निचरा करून जमीन तयार केली जाते. त्यात या तयार केलेल्या जमिनीवर बंगले, इमारती, बागा, तळी वगैरे तयार केली जातात. लोकांची राहायची सोय होते. उदाहरण द्यायचं झालं, तर अंधेरीच्या पश्चिमेस`स्वामी समर्थ नगराचे देता येईल. या भागाचं व्यवहारात परिचित असलेलं नाव म्हणजे लोखंडवाला कॉम्पेक्स. सुरुवातीला दलदल आणि खारफुटी जंगल असलेला भाग नंतर विकसित केला गेला. या भागात राहणार्‍या लोकांना आपण पॉश एरियात राहतो, याचा अभिमान आहे, पण हा एरिया पॉश होत असताना, दलदल नष्ट केली गेली. त्या प्रदेशातील कांदळी किंवा खारफुटीची जंगल नष्ट झाली. तिथलं शैवाल नष्ट झालं. खारफुटीच्या जंगलात भरपूर जीव जगतात. तिथे अंडी घालण्यासाठी मासे तसेच इतरही अनेक जलचर येत असतात. या खारफुटीच्या जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड झालेली आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे खारफुटीवर विपरित परिणाम होत असतो. समुद्राच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रवाळांच्या वसाहती (कोरल्स) नष्ट होणे. या वसाहती असख्य जिवांना आसरा देतात. अन्न पुरवतात. पण त्या अतिशय संवेदनाशील असल्याने प्रदूषण वाढले, की त्या नष्ट होतात. या वसाहतींमध्ये जगातील सर्वाधिक जैव विविधता बघायला मिळते. त्या नष्ट होणे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. म्हणून इकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.

खारफुटी जंगलाचं आणखीही एका दृष्टीने महत्व आहे. त्यामुळे वादळ आणि मोठ्या सागरी लाटांची तीव्रता कमी होते. हे जंगल सागरी लाटा आणि वारे यांच्यामुळे होणारी किनार्‍याची धूप कमी करण्यास मदत करते. जमिनीवरून समुद्रात काही प्रदूषके मिसळत असतात. त्यातील गाळ आणि जड धातू खारफुटी जंगलांमुळे गाळले जातात आणि त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते. किनार्‍यावरील प्रवाळांच्या अस्तित्वाकरताही कांदळ वनांची नितांत आवश्यकता आहे.

मुंबईत आणि ठाणे, बेलापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ इ. अनेक ठिकाणी आपल्याला खारफुटीची जंगलं नाहीशी करून त्या त्या भागाचा विकास करताना पर्यावरणाचा र्‍हास झालेला दिसेल. या भागात खूपच कारखाने आहेत. सागराजवळ कारखाना उभा राहतो. त्यातून गरम पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे तिथल्या पाण्याच्या नैसर्गिक तापमानात बदल होतो. यामुळे शैवाल कमी होते. त्यामुळे पूर्वीचे मासे, झिंगे, खेकडे स्थलांतर करतात. कारखान्यात तयार होणारे प्रदूषित घटक, प्रदूषित पाणी अखेर समुद्रात (जिथे समुद्र नसेल, तिथे नदीत) सोडले जाते. यामुळेही समुद्राचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे जलजीवांची मोठ्या प्रमाणावरहानी झाली आहे. अजूनही होते आहे. समुद्रातील कचराकुंडीमुळे आणि तिथले पाणी प्रदूषित झाल्यामुळे त्या भागातील कासवं, मासे मृत झालेली आणि भरतीच्या पाण्याबरोबर किनारपट्टीवर येऊन पडलेली आपण सातत्याने वर्तमानपत्रातून वाचतो. टी. व्ही. वरही बघतो.

साधारण ७०च्या सुमाराला मला वरळीला १५-२० दिवस राहावे लागले. वरळीचा समुद्र किनारा खडकाळ. किनार्‍यावरून खडकावर जाऊन बसायचं. समोरचा मोकळा, निळाईचा समुद्र. दूरवर बोटी. समुद्रावरून येणारा गार वारा. मन प्रसन्न व्हायच़ पुढे दहा एक वर्षानंतर आणि नंतरही थोड्या थोड्या अंतराने जेव्हा जेव्हा तिथे गेले, तेव्हा तेव्हा पाण्याची निळाई काळिम्यात बदलत चाललेली जाणवली. त्यात कचरा वाढत चालल्याचं जाणवलं. वार्‍याबरोबर दुर्गंधही येऊ लागला. पाण्यात पाय बुडवणं, हात घालणं, या गोष्टी नकोशाच वाटू लागल्या.

वरळीला आता संरक्षक भिंत बांधलेली आहे. पण त्यावर बसलं, तर आधी दिसतो कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या. मोठेमोठे प्लॅस्टिक आणि कापड-किंतानांचे तुकडे, बाटल्या, अनेक प्रकारचं भंगार आणि असंच घाण-साण. या कचराकुंडीचं आधी दर्शन घ्यायचं आणि नंतर मान उचलून समुद्राकडे पाह्यचं. ही स्थिती काही केवळ वरळीच्या समुद्राचीच नाही, मुंबईतील अनेक समुद्र किनारे असे प्रदूषित आहेत. मुंबई, ठाणे कोणत्याही समुद्रावर गेलं, तर अलिकडे सगळीकडे समुद्राच्या स्वच्छ निळ्या पाण्याऐवजी काळे पडलेले व त्यात कचरा साठलेले पाणी दिसते. त्याचा घाण वासही येतो. पाण्याला हातही लावावासा वाटत नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईसारख्या महानगरीत निर्माण होणारे सांडपाणी व मैलापाणी. या पाण्यापैकी काही पाण्यावर प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाते, पण बाकीचे बरेचसे पाणी तसेच समुद्राला मिळते.

डॉ. प्रकाश जोशी यांचं रमणीय सागर किनारे हे पुस्तक २०११साली प्रकाशित झालं. त्याच्या आधी दोन-तीन वर्षाचं त्यांचं निरीक्षण. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `लोकसंख्या वाढ, पर्यटक वाढ, सांडपाणी, रासायनिक कारखाने, खाणकाम, वाळू उत्खनन, नवी बंदरं अशा बाबी म्हणजे एकूणच`विकास प्रक्रिया, भारतीय सागर किनार्‍यांच्या पर्यावरण विनाशास कारणीभूत ठरल्या. सागरातील जीवसृष्टी मुख्यत: सूक्ष्म अशा प्लँट तसंच शैवाल जातीच्या वनस्पतींवर अवलंबून असते. रासायनिक प्रदूषणामुळे या वनस्पतींना पोषक अशा सोडियम, पोटॅशियम, कॅलशियम, हायड्रोकार्बन्स, हरित द्रव्य आदि घटकांचं संतुलन बिघडतं. ’

आपल्या कोकण आणि गुजराथच्या किनारपट्ट्या रासायनिक प्रदूषणाच्या बळी ठरल्या आहेत. खाणकाम आणि पर्यटनाच्या अतिरेकापुढे गोव्यानं पर्यावरणाची पर्वा केली नाही. नव्या बंदरांच्या हव्यासापायी गुजरातनं आपल्या किनार्‍यांचं स्वास्थ्य बिघडवलं. पूर्व किनार्‍याच्या काही भागाला डेझर्टेशनचा धोका आहे. पूर्व किनार्‍याला रासायनिक प्रदूषणाची फारशी बाधा पोचलेली नाही. आंध्र प्रदेशातील नेल्लोर तथा तामिळनाडूच्या तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या किनारी भागात, किनार्‍याकाठी कृत्रीम तळी बनवून त्यात कोळंबीची पैदास केली जायची. त्यामुळे अनेक खेड्यातील विहिरी, नाले इ. जलस्त्रोत दूषित झाले. खारट झाले. अनेक खेड्यांचं टँकर्सच्या पाण्यावरचं अवलंबित्व वाढलं. अशा अनेक गोष्टी केवळ एका बदलामुळे घडू लागतात. यामुळेच पर्यावरणातील विविध घटकांचे संबंध फार महत्वाचे असतात. आपण आपल्या फायद्यासाठी बर्‍याचदा पर्यावरणातील एखाद्या घटकाची हानी करतो, पण त्यावेळी पर्यावरणातील इतर घटकांची आपल्या नकळत हानी होत असते.

या सार्‍या विवेचनाचा अर्थ विकासच नको. आपण गुहामानवाच्या काळातलं जीवन जगायला हवं, असा मुळीच नाही. विकास करताना पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, हे बघायला हवं, एवढाच याचा अर्थ आहे. पर्यावरणातील एखाद्या घटकाची आपण हानी करतो, याची आपल्याला जाणीव असते, पण त्याचवेळी अजाणतेपणे इतर अनेक घटकांची हानी होते, याची आपल्याला कल्पना नसते. जमीन विकासासाठी खारफुटीचं जंगल तोडताना, त्यातील कांदळीसारख्या वनस्पती, लहान झाडं-झुडुपं नाहिशी होणार, हे माहीत असतं, पण त्याचबरोबर त्याच्या आश्रयाने राहणारी कासवं, झिंगे, बेडूक, खेकडे, पक्षी, त्याच्यापुढे असलेलं शैवाल, त्याच्यावर जगणारे बारीक-सारीक सूक्ष्म जीव, त्या जीवांवर जगणारे कीडे-मकोडे या सगळ्या जीवसृष्टीचीही हानी होते, हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची प्रजनन स्थानं नाहिशी होतात. खोल पाण्यातले अनेक प्रकारचे मोठे मासे अंडी घालण्यासाठी इथे येतात. पिले लहान असेपर्यंत किनारपट्टी लगत वावरतात आणि मोठी झाली, की खोल समुद्रात जातात. खारफुटीचे जंगल तुटले, की माशांच्या अंड्यांचे आश्रय स्थान नाहिसे होते. ते अंडी घालायला येत नाहीत. मग किनारपट्टीवरील लहान मासेही कमी होतात. एवढे सगळे परिणाम समुद्र किनार्‍याकाठचे खारफुटीचे जंगल तोडल्याने होतात.

आता प्रश्न असा, की या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तरी आपण सामान्य माणसे काय करू शकणार? एखाद्या योजनेत पर्यावरणाचा मोठ्या प्रमणावर र्‍हास होतोय, असं दिसलं, तर आपण एकत्रितपणे आवाज उठवू शकतो. तामीळनाडूमध्ये तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या समुद्रकाठच्या गावातून कृत्रीम तळी तयार करून कोलंबीची शेती केली जायची. त्यामुळे गावातील विहिरी, ओढे, यांचं पाणी खारट झालं. जमिनीत मीठ फुटलं. एके ठिकाणचं सगळं गावच्या गाव उठून दुसर्‍या जागी स्थलांतरित झालं. तिथे लोकांनी आवाज उठवला आणि कोलंबीची कृत्रीम शेती बंद पाडली. अशाच प्रकारे गोव्यातील खाणकामाविरुद्ध आवाज उठवला गेला आणि गोव्यातील खाणकाम आता बंद करण्यात आले आहे.

सध्या मुंबईमध्येही खारफुटीवर होणारे अतिक्रमण लक्षात घेता, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे, की मुंबईच्या खाड्या, अभयारण्याची जागा म्हणून घोषित करावी. मुंबई पुरापासून वाचवण्यासाठी, भरतीचे पाणी मुंबईवर आघात करू नये, म्हणून खारफुटीची गरज आहे. खाड्यांना अभयारण्याचा दर्जा मिळाला, तर येथील खारफुटीचे रक्षण होईल, कारण तसा दर्जा प्राप्त झाला, तर कठोर नियमांचे पालन होईल. पाणथळ जागेत होणार्‍या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवता येईल. सध्या त्या संबंधी काही नियम असले, तरी त्यात शैथिल्य आले आहे. त्यामुळे पर्यावणात ढवळा-ढवळ होते आहे. अभयारण्य म्हणून तो भाग जाहीर केल्यास, नियमांचे काटेकोर पालन करणे भाग पडेल. न केल्यास मोठ्या प्रमाणात दंड, शिक्षा होऊ शकेल. मुंबईभोवती पसरलेल्या खारफुटीचे रक्षण होणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी १४ फेब्रुवारी २०१८ला निवेदन केलं, की येत्या काळात खारफुटी क्षेत्रावर पाहरा ठेवण्यासाठी १०८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाईल.

सरकारी प्रयत्न आणि त्याला लोकांच्या इच्छाशक्तीची साथ यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल.

– समाप्त –

(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे) 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

पाण्याची मला अगदी लहानपणापासून ओढ आहे. तळ्याचे ध्यानमग्न पाणी, ओढा-नद्यांचं वाहतं पाणी, समुद्राचं हेलकावे घेणारं सर्वदूर पसरलेलं पाणी, ही पाण्याची सगळीच रूपं मला मोहवतात. त्यातही संध्याकाळच्या वेळी सागर किनार्‍यावर केलेली भटकंती, म्हणजे `आनंदाचे डोही आनंद तरंग’.

माझं नित्याचं वास्तव्य समुद्रापासून दूर, मात्र नदीचा सहवास सासरी-माहेरी दोन्हीकडे. लहानपणी मामांकडे दादरला गेलं, की ३-४ वेळा तरी दादर चौपाटीवर फिरायला जाणं होई. प्रथम पाण्यात पाय बुडवून उभं राह्यचं. पायाखालून हळू हळू वाळू सरकत जायची. वाळूबरोबर मीदेखील आत सरकत जायची. पाण्यात, पाय असे मनसोक्त संतोषले, की वाळूवर बसायचं. त्यात पाय खुपसून त्यावर वाळूचा डोंगर रचायचा. पाय काढून त्यालाच किल्ला म्हणायचं.

.. मग समोर क्षितिजापर्यंत पसरलेला सागराचा विस्तार बघायचा. तेजोनिधी आता हळूहळू क्षितिजाकडे सरकू लागलेला असायचा. दूरवरच्या लाटांवर त्याची सोनेरी किरणे झिळमिळू लागलेली असायची. हा तेजोनिधी पिवळा, केशरी, नारिंगी, लाल, असे रंग पालटत लाल होऊन पाण्यात बुडी मारायचा. मग भेळ-पुरी, पाणी-पुरी असं काही चटक मटक खाऊन घरी परतायचं.

.. कागद वगैरे टाकायला तेव्हा वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराच्या `मला खाऊ घाला’, असं म्हणणार्‍या कचरापेट्या अस्तित्वात आल्या नव्हत्या आणि तेव्हा सागर किनार्‍यावर इतका कचराही नव्हता. प्लॅस्टिकचा कचरा आजिबात नव्हता आणि पर्यावरणाविषयी जागरुकता तर तेव्हा मुळीच नव्हती. ही सुमारे साठ – पासष्ठ वर्षापूर्वीची हकिकत सांगते आहे मी! दिवस पालटले. अलिकडे सूर्यास्त समुद्राच्या पाण्यात नाही, स्काय स्कॅपर इमारतींच्या मागे होतो. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाची चर्चा होऊ लागली आहे. लोकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती होऊ लागलेली आहे. भेळेच्या वगैरे गाड्या बर्‍याच दूर उभ्या करण्याची सक्ती आहे. किनारे प्रदूषित होऊ नयेत, म्हणून प्रयत्न होऊ लागले आहेत, पण यापूर्वी झालेली हानी अपरिमित आहे.

गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आणि माझी मामे बहीण लता काळे व प्रा. गोविंद काळे गोव्याला वास्तव्यास गेले. मीही तिथले समुद्रकिनारे बघण्याच्या ओढीने गोव्याला गेले. त्यावेळी कोलवा, कलंगुट, मीरामार हे समुद्र किनारे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते. किनार्‍यावर समुद्राचे दर्शन घेणारे आम्ही तेव्हा तुरळकच लोक होतो. अजून तिथे भेळ-पुरीच्या गाड्या लागल्या नव्हत्या की आस-पास खाद्य विक्रीची छोटी मोठी दुकाने, गाळे थाटलेले नव्हते.

८० साली काणकोण येथील पाळोळ्याच्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो, तेव्हा तर तिथल्या निसर्गाने आलिबाबाच्या गुहेतील वैभवाप्रमाणे आपलं वैभव आमच्यासाठी खुलं करून ठेवलं होतं. अगदी अनाघ्रात सागर किनारा. पावला-पावलावर लावण्याची वेगळी कळा. वेगळं दृश्य. किनार्‍याच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीवर चढलं, की सागर किनार्‍याची चंद्रकोर दृष्टीस पडायची. भरतीच्या वेळी चोहो बाजूंनी पाणी त्या टेकडीला गळामिठी घालतं. प्रत्येक कोना-कोनातून तिथे वेगळीच रम्यता दिसायची. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेले, कासवाच्या पाठीसारखे दिसणारे जमिनीचे तुकडे, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. पुढे केव्हा तरी डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकात पाळोळ्याचं वर्णन वाचलं, आणि पुन्हा एकदा पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला.

मध्यंतरी प्रा. कोमरपंतांशी फोनवर बोलणं झालं. पाळोळ्याच्या सी-बीचवर फिरल्याची आठवण बोलता बोलता ओघा-ओघाने निघालीच. तशी प्रा. कोमरपंत विषण्ण होऊन म्हणाले, `ते रूपवैभव आता उरलं नाही. गोव्यातील पर्यटन विकासामुळे गोवा संपन्न होऊ लागला खरा, पण हा विकास होता होता, इथले समुद्र किनारे, इथलं पर्यावरण यांची अपरिमित हानी होत चाललीय, इकडे मात्र दुर्लक्ष झालं. ‘ माझ्या डोळ्यापुढे बहुतेक सगळ्याच समुद्रकिनार्‍यांवर टाकलेले भेळेचे वा अन्य खाद्य पदार्थांचे कागद, बिसलरीच्या आणि हो दारूच्याही रिकाम्या बाटल्या, कॅन आणि विविध प्रकारचा कचरा डोळ्यापुढे आला आणि वाटलं, लावण्यमयी देहावर कोडाचे विद्रूप चट्टे पडलेत.

त्यांच्याशी बोलता बोलता डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकाची पुन्हा आठवण झाली. डॉ. प्रकाश जोशी भूगोलाचे अभ्यासक. पायी भटकंती करून त्यांनी भारतातले सगळे किनारे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. अनुभवले होते. पाकिस्तानच्या सीमेला लागून कच्छच्या लखपत ते बांगला देशच्या सीमेला लागून असलेल्या सुंदरबनापर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. आपल्या अनुभवावर आधारित, `रमणीय सागर किनारे’ हे पुस्तकही त्यांनी लिहीलं आहे.

समुद्र किनारे म्हणजे काही पुळणीचे, वाळू-रेतीचेच समुद्र किनारे नव्हेत. दलदलीचे किनारेही असतात, तसेच एखाद्या योग्यासारखे धीर-गंभीर खडकाळ किनारेही असतात. प्रत्येक ठिकाणचं पार्यावरण वेगवेगळं असतं. डॉ. प्रकाश जोशी म्हणतात, `पुळणीच्या समुद्र किनार्‍यावरील सजीवांची जीवनशैली वेगळी, तसेच खडकाळ किनार्‍यावरच्या आणि दलदलीच्या समुद्रकाठी असणार्‍या सजीवांची जीवनशैली वेगळी. पुळणीवर कोरडी वाळू बाजूला सारत, समुद्रजंत जिमिनीत शिरतात. खेकडे स्वत:ला पुळणीत गाडून घेतात, पण त्याचवेळी आपल्या श्वासनलिकेची अँटेना बनवून हवेतला प्राणवायू शोषून घेतात. शरीरावरील चमच्यासारख्या काट्यांनी समुद्रकंटक जमीन खणतात. या सगळ्यामुळे पुळण जिवंत वाटते.

खडकाळ किनार्‍यावरील जीवसृष्टीचं स्वरूप वेगळं. खडकातील खोबणी आणि भेगांच्या आश्रयाला मृदु शरिरी, कठीण कवची जल सजीव असतात. खडकावरील शेवाळं, खेकडे, समुद्रपंखे, समुद्रतारे आदि सजीवांचं वास्तव्य स्थान. ओहोटीच्या कोरड्या काळात शेवाळाकडून त्यांना आर्द्रता, ओलावा मिळतो. समुदकंटक, स्पंज, सीनट इ. जलजीव इथे ठिय्या मारून असतात. भरती ओसरताना, ओहोटीच्या प्रारंभी शीलाकळी हा कंकण प्राणी आर्द्रता शोषून घेत असतो. त्यावेळी लक्षावधी बुडबुडे फुटत असतात. त्याचा आवाज अस्पष्टशा कुजबुजीसारखा येतो. लाडघरच्या (जि. रत्नागिरी) किनार्‍यावर संध्याकाळी असा आवाज ऐकू येतो. प्रवाळही खडक चिकटे. समुद्रफूल हा तर महान चिकट्या. खडकाच्या खडबडित खोबणीत तो आपला मांसल भाग असा काही गच्च धरून ठेवतो, की त्याला त्या खडकापासून अलग करणं जवळ जवळ अशक्य. कोकण, मुंबई या ठिकाणी पुळणी, खडकाळ, दलदल असे तिन्ही प्रकारचे किनारे आहेत.

निरंजन घाटे लिहितात, `उथळ सागरात आपल्याला शेवाळे, खेकडे, छोटे मासे, कासवं आढळतील, तर भरती-ओहोटीच्या पुळणींवर खेकड्यांचे प्रमाण जास्त असेल. तिथली रेती खूप बारीक असेल. वाळूच्या दांड्यावर नि स्थिरावलेल्या वालुकापट्ट्यावर मर्यादावेल असेल, तिच्या आश्रयाने टिटवीचं घर असेल. दलदलीच्या प्रदेशातील परिस्थिती आणखी वेगळी असेल. तिथं कांदळीचं किंवा खारफुटीचं जंगल असेल. त्याच्या आश्रयाने अनेक कीटक, बेडूक, पक्षी वावरतात. राहतात. प्रजनन करतात. ‘

प्रत्येक प्रकारच्या समुद्रकिनार्‍याचं पर्यावरण वेगळं असतं, असं म्हणताना पर्यावरण म्हणजे नेमकं काय? आणि अलिकडे प्रदूषणामुळे किंवा अन्य कारणांनीही पर्यावरणाचा र्‍हास होतोय, असं म्हंटलं जातं, म्हणजे नेमकं काय होतय, हे समजून घ्यायला हवं.

अभिजित घोरपडे म्हणतात, `पर्यावरण म्हणजे आपला परिसर व पृथ्वीवरचे सर्व काही सजीव प्राणी आणि निर्जीव गोष्टीसुद्धा. याचं कारण प्रत्येक सजीव, सर्व वस्तू, पदार्थ, अगदी दगड-गोटेसुद्धा, यांचा निसर्गात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग असतो. ‘

निरंजन घाटे लिहितात, ` ‘पर्यावरण म्हणजे एखाद्या किंवा विचाराधीन सजीवाच्या दृष्टीने सुयोग्य जीवनावश्यक परिस्थिती. ही सजीवानुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुरूप बदलत असते. ‘ पर्यावरणाचा विचार स्वत:पासून करायला हवा, असं निरंजन घाटे यांना वाटतं. कारण आपणही पर्यावरणाचा एक घटक असतो. भूमी, म्हणजे आपल्या पायाखालची जमीन. जल – जमिनीवरचं दृश्य जल, समुद्रासाखा अफाट जलविस्तार आणि हो, भूजलसुद्धा आणि खडकही, पर्यावरणचा भाग आहेत. त्या त्या ठिकाणची जमीन, पाणी, हवा, वनस्पती यावर तिथली प्राणीसृष्टी अवलंबून असते. हे सारे घटक परस्परावलंबी आहेत.

पर्यावरण म्हणजे काय? हे नुसतं समजून घेणं पुरेसं नाही. हल्ली पर्यावरणाच्या संदर्भात विशेष चर्चा होऊ लागलीय, कारण माणसाच्या विकास प्रक्रियेने पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.

– क्रमश: भाग १ 

(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे) 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ब्लड रिपोर्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ब्लड रिपोर्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

…….

सकाळी चहा पिण्याआधी, आणि जेवणानंतर साधारण दिड तासाने, अशा दोन्ही वेळेस सुई टोचून घेत दिलेल्या रक्ताचे रिपोर्ट आता हातात पडले होते.

शाळेत असतांना वार्षिक परिक्षेचा निकाल मिळण्याआधी जेवढी उत्सुकता असायची तेवढीच आजही ब्लड रिपोर्ट साठी होती.

फक्त शाळेत भाषा, गणीत, सामाजिक शास्त्र, विज्ञान असे विषय आणि त्यापुढे कमीतकमी आवश्यक असणारे, आणि मिळवलेले गुण असे आकडे असायचे. तर इथे CBC, Liquid Profile

Liver function test, Thyroid profile

Urine-R/M

Blood sugar- Fasting&PP

HbA1c अशी नांव असणाऱ्या विषयांपुढे रक्तात आवश्यक असणारे आणि सापडलेले गुण यांची आकडेवारी होती.

शाळेत काही ठिकाणी अर्धा अर्धा गुण देऊन अपूर्णांकात आमची (पूर्ण नसलेली) बौद्धिक क्षमता दाखवणारे शिक्षक होते. तर रिपोर्ट मध्ये सुद्धा असेच अपूर्णांकात आकडे देत आमच्या शरीराची क्षमता दाखवली होती.

शाळेतल्या विषयात बरेच कष्ट (ज्याला सोप्या भाषेत अभ्यास म्हणतात.) करून जेमतेम गुण मिळवण्यापर्यंत मजल मारली जात होती. पण या ब्लड रिपोर्टमधल्या काही विषयांचे आकडे मर्यादित ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार होते. म्हणजे शाळेत आकडे वाढवण्यासाठी कष्ट. तर रिपोर्ट मधले काही आकडे कमी करण्यासाठी प्रयत्न.

माझ्या अर्धांगिनीने सगळा रिपोर्ट पाहिला असला तरी तिचा फोकस मात्र फक्त शुगर या एका गोड असणाऱ्या आणि या वयात जाणवणाऱ्या गोष्टीवर जास्त होता.

आणि ती हळूच म्हणाली… रिपोर्ट तुमचाच आहे नां…

मी म्हटलं हो… पण का विचारतेस असं…

नाही, शुगर थोडीशी प्रमाणाबाहेर आहे म्हणून. आणि त्या बद्दलच मला शंका वाटली… म्हणजे बाकी काही वाढणं शक्य असेल… पण शुगर…

बोलतांना जराही गोडवा नसणाऱ्या तुमच्या रक्तात इतकी शुगर आलीच कुठून. हाच विचार मनात येतोय. बरं गोड बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या गोडव्याने रक्तातली शुगर कमी होईल का?… किंवा ज्याच्या रक्तातच इतकी शुगर आहे, त्यांच बोलणं गोड का नाही?… असाही विचार आला.

इतक्या वर्षात तुम्हाला मी पूर्ण ओळखते. यांनी फक्त रक्ताच्या काही थेंबांचा अभ्यास करून सांगीतलेला गोडवा मला कधीच दिसला, किंवा जाणवला का नाही?… असे वेगवेगळे विचार फक्त कागदावर दाखवलेल्या तुमच्या गोडव्यामुळे मनात आले… रक्तातला गोडवा वागण्यात का दिसत नाही. संक्रांतीला सुद्धा सगळे तिळगुळ घ्या गोड बोला, असं म्हणतात. पण तुम्हाला हातावर तिळगुळ ठेवल्यावर तोंडाने फक्त गोड बोला. इतकच म्हणतात.

इतकं बोलल्यावर ती खरंच अर्धांगिनी आहे याची खात्री झाली. आता कंट्रोल करायच्या गोष्टींवरून मला ट्रोल केल जात होतं.

पराभूत उमेदवारांना जसं वाढलेले मतदार, ठराविक वेळी वाढलेलं मतदान, याचबरोबर यंत्रांत काही घोळ आहे का? … कारण समोरच्याला इतकी मतं मिळतातच कशी?… अशी शंका येते. तशीच काहीशी शंका तिला माझ्या शुगर बद्दल आहे. गोडवा नसताना शुगर वाढतेच कशी?…

शाळेच्या रिपोर्ट मध्ये सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून पुढच्या वर्गात ढकलला आहे. परिश्रम घ्या. असा शेरा असायचा. तर या रिपोर्ट वरुन गोळाबेरीज करून पुढलं वर्ष चांगलं जाण्यासाठी परिश्रम घ्या. उगाचच चालढकल करु नका. हेच सांगतील. शाळेत ढकलल्यामुळे पुढल्या वर्गात जात होतो. तर आता पुढल्या वर्षात जायचं असेल तर चालढकल चालणार नाही असंच सांगतील.

रिपोर्ट मधल्या पुढच्या काही विषयांकडे बारीक नजर जाण्याआधीच मी शांतपणे तो रिपोर्ट घडी करून पाकिटात टाकला. आणि आलोच डाॅक्टरांना भेटून. असं सांगत बाहेर पडलो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares