मराठी साहित्य – विविधा ☆ रंगोत्सव…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ रंगोत्सव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

रंग म्हटलं की समोर येते शाळेतली रंगपेटी किंवा रांगोळीतले रंग. आदिमानवाने रंगांची सुरुवात निरनिराळ्या रंगाच्या मातीतून, पानांच्या व फुलांच्या रसातून केली. पण हळूहळू रंगांची व्याप्ती वाढू लागली. माणसाच्या भावभावनांची व विचारांची रंगाचे नाते जोडले गेले. उदाहरणार्थ पांढरा रंग शुद्धता व शांतीचा, केशरी रंग त्याग व समर्पणाचा, पिवळा रंग आनंद व उत्साहाचा, निळा रंग व्यापकतेचा व गुढतेचा, तर काळा रंग सर्वसमावेशक पण नकारात्मकता, लाल रंग प्रेमाचा व सौंदर्याचा, गुलाबी म्हणजे निरागसता, कोमलता आणि हिरवा रंग शांती व समृद्धी. याच बरोबर कपडे, घरे आणि इतर कोणत्याही वस्तूंत सुद्धा वेगवेगळ्या रंगछटा असतात आणि त्या अर्थपूर्ण असतात. एवढेच नव्हे तर कलर थेरपीचा उपयोग मानसिक आजार दूर करण्यासाठीही केला जातो. अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रंगाचा वापर प्रभावी ठरतो. रंग नसता तर जीवन निरस झाले असते.

असे होऊ नये म्हणून निसर्गानेच रंगोत्सवाची योजना केली. विविध रंगांची पाने, फुले, झाडे, फळे, प्राणी, पक्षी, इंद्रधनुष्य, आकाश, ढग निर्माण करून जीवनात रंग भरला. आकाश एकच ज्याला स्वतःचा रंग नाही पण २४ तास तिथे रंगोत्सव सुरू असतो. क्षणाक्षणाला रंग बदलत असतात. प्रभातीची केशरी, पिवळी, लालसर छटा तर दुपारी फिकट निळरस आकाश. संध्याकाळीची मावळतीची वेगळीच शान. रात्री अंधार असला तरी चमकदार चांदण्याने तो काळसर रंगही चमकतो. या आकाशाचे प्रतिबिंब सागरात पडते. त्यामुळे रंगहीन पाणीही विविध रंग धारण करते. त्या सागरातही रंगीत प्राणी सृष्टी व चमकदार मासे असतात. शिवाय ऋतूप्रमाणे झाडे, फुले यांचे रंगही बदलत असतात. कधी हिरवाई, कधी कोवळी पोपटी पालवी आणि त्यावर हिंडणारी तशीच रंगीत फुलपाखरे, पक्षी, कीटक असे हे चैतन्यमय, रंगमय, उत्साहमय जग. ते निर्माण करणारा सृष्टीकर्ता परमात्मा त्याचे नावही श्रीरंग. येथे सोयराबाईंचा अभंग आठवतो,

‘अवघा रंग एकचि झाला रंगी रंगला श्रीरंग ‘पण ही बहुरंगी सृष्टी निर्माण करणारा तो श्रीरंग त्याचा रंग वेगळाच. त्याच्या ठिकाणी रंगांचा भेद नाही. तो एकमेक भक्तिरंगातच रंगणारा म्हणून श्रीरंग.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी अकोला ब्रॅंचचा चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या सगळ्या उलाढालींमधे मला श्वास घ्यायलाही फुरसत मिळालेली नव्हती. क्रिमिनल लाॅयरना भेटून आल्यानंतरच्या त्या रात्री कांही वेळ कां होईना मला प्रथमच बऱ्यापैकी झोप लागली होती. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणार आहे याची कल्पनाही नव्हती.)

मी अकोल्याला जॉईन झालो ती जानेवारी २००० ची नुकतीच झालेली सुरूवात होती. त्या अनपेक्षित बदलीमुळे ही नवीन वर्षाची सुरुवात फारशी उत्साहवर्धक वाटली नव्हती एवढे खरे. आज पंचवीस वर्षांनंतर ते सगळे दिवस पुन्हा आठवताना त्या अनुभवाने मला समृध्द करून गेलेले कितीतरी प्रसंग आपण अजूनही विसरलेलो नाही हे नव्याने जाणवतेय. या प्रसंगांमधला एकेक क्षण मला हादरवणारा, माझी कसोटी पहाणारा जसा होता, तसाच या ना त्या रूपातल्या ‘त्या’च्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणाराही होता!

अतिशय कडक, जीवघेण्या अशा उन्हाळ्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यांत तिथे प्रथमच घेत होतो. पहिल्याच दिवशी पहाटे शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी शेगाव एसटी स्टँडवर येऊन पोचेपर्यंतचे ते दोन अडीच तास काय ते बऱ्यापैकी सुसह्य वाटले होते. पण परतीच्या बसमधे चढण्यापूर्वीच सकाळचे सातही वाजलेले नसताना ऊन तापू लागलंय हे जाणवले. अकोल्यापर्यंतचा तो फारतर तासाचा प्रवास पण कणभर वाऱ्याचाही शिरकाव न होऊ देणारं तीव्रता हळूहळू वाढू लागलेलं ते ऊन, स्वतः चटके सोसत माझ्या डोईवर गरम सावली धरणारं त्या एस टी चं आमच्यासाठी ऊन अडवून उभं राहिलेलं ते छत, प्रवासात खिडकीबाहेर बघणंही नको असं वाटणारं बाहेरचं तापू लागलेलं वातावरण, स्वतःची गारवा देणारी हिरवाई असोशीने घट्ट धरून ठेवायची धडपड करणारी केविलवाणी पळती झाडं… हे सगळंच माझी उसनी उमेद कोळपून जायला पुरेसं ठरत होतं. अकोला स्टॅंडवर बसमधून उतरलो तेव्हा सकाळचे आठच वाजून गेले होते तरीही मी घामाने चिंब भिजलो होतो आणि बाहेर ऊन अधिकच तापू लागलेलं होतं! तो जानेवारी महिना होता तरी ही अवस्था. खूप वर्षांपूर्वीच्या महाबळेश्वरला मी अनुभवलेल्या तेव्हा नकोशा वाटणाऱ्या धुवांधार पावसाच्या आठवणी त्याक्षणी मात्र मला हरवलेल्या जिवाभावाच्या मित्रा सारख्या वाटू लागल्या. शेगावला दर्शन घेऊन योग्य वेळेत परत आल्याचं समाधानही या सगळ्या मनोवस्थेत कांहीसं मलूल होऊन गेलं होतं!

बसमधून उतरताच बऱ्यापैकी तापत चाललेलं ऊन पाहून हाकेच्या अंतरावरच्या लॉजवर जाण्यासाठीही मी रिक्षाला हात केला. रिसेप्शन वरून किल्ली घेऊन रूमचं दार उघडलं. समोरच्या भिंतीवरच्या चित्रातल्या गजानन महाराजांच्या चेहऱ्यावरच्या स्मितरेषेने आणि माझ्याकडे एकटक पहाणाऱ्या त्यांच्या गूढ नजरेने माझं स्वागत केलं तेव्हा मनातलं कडक ऊन क्षणभर मळभ यावं तसं विरून गेलं. त्यांच्या नजरेचा तो स्पर्श दिलासा देणारा होता आणि माझ्या कसोटीची आत्ता कुठं सुरुवात झालीय याची जाणीव करून देणाराही!

आधी सांगितल्याप्रमाणे पहिले पंधरा दिवस अतिशय घाईगर्दीत उलटून गेले होते. वाढत जाणारा उन्हाळा अर्थात सुसह्य नव्हताच पण हार मानूनही चालणार नव्हतं. पहिल्या दिवशी ब्रॅंचमधे गेल्याबरोबर परस्परांचा परिचय वगैरे सगळं पार पडलं. ब्रॅंचचं रुटीन सुरू झालं. सकाळी हेवी ब्रेकफास्ट करून आल्यामुळे लंचटाईममधे बाहेर जाऊन जेवून यायचं ठरवलं होतंच. मी ड्रॉवरमधली कॅप काढली आणि अकाऊंटटला मी जाऊन येतो असं सांगितलं. त्याने मला थांबवलं.

“आत्ता.. इतक्या उन्हात?” त्याने आश्चर्याने विचारले.

“हो. इथून जवळ चांगलं हॉटेल आहे का एखादं? म्हणजे जेवण चांगलं मिळेल असं…? “

” आहेत पण नुसती कॅप घालून कसे जाणार? इथं नेहमी मोठा रूमाल डोक्याला बांधूनच जावं लागतं. नको सर. आम्ही सगळ्यांनी डबे आणलेत. आपण शेअर करूया. “

मला संकोचल्यासारखंच झालं. “नाही.. नाही.. नको. तुमचं चालू दे. मी आलोच. ” मी म्हंटलं.

” सर. नको. एका माझं. आम्ही इथे रहाणारे असूनही हे चार महिने अशा उन्हात अगदी नाईलाज असल्याशिवाय कुणीच बाहेर पडत नाही. तुम्हाला सवय नाहीय. तुम्हाला ते अजिबात सहन होणार नाही. प्लीज रिस्क घेऊ नका. आणि संकोचही करू नका. या. “

ते आग्रहाने म्हणाले. त्यात काळजी होती. आपुलकीचा ओलावा होता. आत्तापर्यंतच्या रखरखीत वातावरणात अचानक आलेली ती एक गार वाऱ्याची झुळूकच वाटली मला.

त्यादिवशी सगळ्यांच्या बरोबर बसून घासभर खाताना त्या सर्वांच्या डब्यातल्या जळजळीत तिखट भाज्या घशाखाली उतरवतानाही मनाला स्पर्शून गेलेला दिलासा मन शांतवणारा होता. या प्रतिकूल परिस्थितीत माझी

मूळं इथं रूजायला तोच दिलासा पुढे पाण्याचा शिडकावा करणारा ठरला होता हे नक्कीच. त्याच दिवशी घडलेली आवर्जून दाद द्यावी अशी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांनीच शिपायाला सांगून माझ्यासाठी ब्रॅंचमधून बाहेर पडायच्या आधी दोन कॉटनचे मोठे रुमाल आवर्जून मागवून घेतले होते. ते मला देऊन त्यांनी तिथं उन्हाळा संपेपर्यंत मी स्वतः काय काय काळजी घेणे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले. तो रुमाल टाळूवर घडी ठेवून दोन्ही कान व्यवस्थित झाकले जातील अशी काळजी घेऊन न सुटेल असा कसा बांधायचा हे प्रात्यक्षिक करून मला शिकवलं होतं. माझी नेहमीची कॅप घालायची ती रुमाल बांधलेल्या डोक्यावर हेही गंमतीने हसत मला सांगितलं होतं. या गोष्टी लहान लहान वाटत असल्या तरी माझ्यासाठी त्या खूप मोठा आधार, निश्चिंतता देणाऱ्या होत्या. नवीनच ओळख झालेल्या तिथल्या या सगळ्या स्टाफ मेंबर्सशी माझं असं आपुलकीचं घट्ट नाते निर्माण झालं जे पुढं मी तिथं असेपर्यंत माझी पाठराखण करीत होतं! इथं कितीही संकटं आली तरी त्यातून बाहेर पडायला मदतीचे हातही इथे असणार आहेत हेच तो मला सुचवत असावा असंच वाटत राहिलं. म्हणूनच तर त्या पहिल्याच दिवशी नेमके या आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटमधले माझे सहकारी श्री. देशपांडे आवर्जून मला भेटायला आले होते. माझ्या रहाण्याची सोय करून देण्यासाठी! हे सगळं प्रतिकूल परिस्थितीत ‘त्या’ने माझी पाठराखण करणारंच तर होतं!

जगणं किती क्षणभंगूर असू शकतं याचा या भाजून काढणाऱ्या पेटत्या उन्हानेच मला दिलेला ‘जीवघेणा’ अनुभव आज आठवला तरी चर्र होतं. ती अकोल्यात जाॅईन झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यातलीच ती घटना!

क्रिमिनल लॉयरकडे सोपवलेल्या त्या ११ कर्ज खात्यांखेरीज मी तातडीने लक्ष घालून काळजी घ्यायला हवी अशी मोठ्या रकमांची इतरही अनेक कर्जखाती होती. ती थकबाकीत जाऊ नयेत म्हणून त्या खातेदारांशी सतत संपर्कात राहून नियमित वसुलीची खात्री करून घेत, इतरही त्रुटी निर्माण होणार नाहीत यासाठी दक्ष रहाणे आवश्यक होते. या आठवड्यात व्हिजिट करायलाच हवी अशी पाच सहा खाती होती. त्यातील एकाकडे मी इन्स्पेक्शनला जायचे ठरवले. माझी ती पहिलीच व्हिजीट असल्याने माझ्याबरोबर ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटमधला ऑफिसर येणार होता. अकोला स्टॅन्डजवळच्या एका बसस्टाॅपजवळ मी सकाळी साधारण साडेनऊला यायचे असे ठरले. तो ऑफिसर तिथेच येऊन मला घेऊन जाणार होता. मी पाच मिनिटे आधीच तिथे गेलो. बस-स्टॉप वर गर्दी होती. म्हणून मग शेजारच्याच एका झाडाखाली सावलीत जाऊन उभा राहिलो. त्या झाडाखाली एक थकलेला म्हातारा खेडूत बसलेला होता. दीनवाणा करपून गेलेला चेहरा, विझलेली नजर, आणि त्या नजरेतला केविलवाणा भाव! मी तिथे उभा राहून एक दोन मिनिटेच झाली असतील, तेवढ्यांत झाडावरून धपकन् काहीतरी माझ्यासमोर पडल्याचा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर झाडाच्या पानांच्या सावलीत बसलेला, तहानेने व्याकुळ झालेला एक कावळा झाडावरून खाली मरून पडलेला होता! ते बघूनसुद्धा मला कसंतरीच झालं. थोडं मागं सरकून उभं रहावं म्हणून मी वळून बघितलं तर बाकावर बसलेला तो म्हातारा माणूस माझ्याकडेच बघत होता.

” पावनं, किती वाजलं म्हणायचं..? ” त्याने काकुळतीने विचारलं. मी हातातलं घड्याळ पाहिलं. त्याला वेळ सांगावी म्हणून नजर वर केली न् अंतर्बाह्य हादरलोच. आत्ता एका क्षणापूर्वी माझ्याशी बोललेला तो… त्याची निर्जीव मान त्याच्या खांद्यावर लुळी पडल्यासारखी विसावलेली आणि डोळे तसेच सताड उघडे! दुसऱ्याच क्षणी तो कोलमडल्यासारखा खाली मातीत कोसळला! तेवढ्यांत तिथे आलेल्या ऑफिसरने स्कूटर माझ्याजवळ येत थांबवली. त्या आवाजाने मी दचकून भानावर आलो.

” साहेब, साॅरी.. थोडा उशीर झाला.. चला, बसा. जाऊया. ” तो म्हणाला. तोवर जाणायेणाऱ्या ८-१० माणसांनी त्या म्हाताऱ्यासमोर गर्दी केलेली होती! तिथेच मरून पडलेला तो कावळा मात्र कुणाच्या खिजगणतीतही नव्हता!

उन्हाच्या कडाक्याने बळी घेतलेले ते दोन जीव आणि त्यांच्या अखेरच्या श्वासांचा मूक साक्षीदार असणारा मी..! तो पूर्ण दिवस मृत्यूच्या त्या काळ्या सावल्या मला अस्वस्थ करीत राहिल्या. त्या दोन जीवांसारखाच मीही येईल त्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठीच तर धडपडत होतो! आणि कुणाचंही असो पण ते जगणंही किती क्षणभंगूर असू शकतं याचा ‘जीवघेणा’ अनुभव जणू जिवंत होऊन मला हादरवून सोडत होता! तिथल्या तळपत्या उन्हाने मला दिलेला तो चटका एखाद्या दु:स्वप्नासारखा पुढे कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत, यापुढे उगवणारा इथला प्रत्येक दिवस इथं तग धरून रहाण्यासाठी मला कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचं सूतोवाचच करतोय असंच मला तिथल्या संघर्षकाळांत सतत जाणवत रहायचं!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगीच आपलं सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ उगीच आपलं सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जन्मावं, जगावं, भोगावं आणि कायम स्वरुपी लक्षात ठेवावं असं या धरतीवर खूप काही आहे. फक्त ते शोधण्याची क्षमता आपल्या ठायी असायला हवी. एकदा त्याची ओळख पटली की जीवनातलं नाराजीचं सतत वाजणारं तुणतुणं आपोआप बंद होईल आणि सुश्राव्य मधुर जीवन संगीत आपल्या तना मनाला यरगटून टाकील. मग त्याचा क्षणभराचा विरह सुद्धा आपल्याला सहन होणार नाही. अशी अनेक आकर्षणे अवतीभवती असताना ती विसरून उगीचच चिंताग्रस्त अवस्थेत जगण्यातच स्वारस्य असणारी मंडळी कोणता विचार करतात ते त्यांचं त्यांनाच माहीत.

पण ते जीवनातल्या ख-या आनंदाला पारखे होतात येवढे मात्र खरं जीवनाच इंद्रधनुष्य विविध रंगानी भरून ओसंडून वाहत असतं. त्यांच्या सर्वच रंगात रंगून जाणं आपल्याला अवगत झालं की मग जिकडे तिकडे आनंदी आनंद गडे अशीच जगण्याची अवस्था होऊन जाते.

आयुष्याच्या भविष्याचा सुंदर ठोकताळा मांडण्यासाठी आदर्शाचे पाढे पाठ करत संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या पोथ्या गिरवाव्या लागतात. पण नेमकं हेच विसरलं की मग आयुष्य कोड्यात टाकणारं एक अवघड प्रमेय होऊन बसत.

ते सोडवता सोडवता दमछाक सहन करावी लागते तनाला आणि मनाला सुद्धा.

मानवी प्रपंच म्हणजे एक अजब धुंदीचं रसायन आहे ते डोळे मिटून प्यायच नसतं. सतर्कतेने सावध राहून त्याचा आस्वाद घेतला तरच बेधुंद होण्यातल इंगीत कळतं माणसला.

आजवर मजबूत, करारी बाण्याने कणखरतेने वागणा-या भक्कम ताकतीच्या कर्तृत्वान पुरुषाला फक्त त्याची आवडती स्त्रीच रडवू शकते

याची जाणीव नसणारी व्यक्ती मनाने आरोप करून पुरुषालाच कठोर समजत असेल तर तो दैवदुर्विलास समजायला काय हरकत आहे?

प्रेमाची हीच तर खरी ताकत आहे ती ओळखण तशी साधी बाब नाही. तस समृद्ध जगणं जगून ज्यानं जगणं अनुभवलय त्याला विचारून बघा तो काय म्हणतोय ते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्त्री आणि छत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “स्त्री आणि छत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

परवाच नवीन आणलेली छत्री रात्री माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. मी विचारले काय झालं? तर म्हणाली काही नाही. पुरुषांच्या मनाचा विचार करत होते.

तुमचं कसं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला आपली सोडून इतरांच्याच नाजूक, आणि देखण्या वाटतात‌.

आपलीच असली तरी दोन्ही वेळेवर मदतीला हाताशी हव्या असतात.

त्या जुन्या झाल्या तरी त्यांनी तसं दिसता कामा नये. अशीच तुमची भावना असते. पण तुमच सुटलेलं पोट तुम्हाला चालत.

तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या इच्छेविरुद्ध यांनी तोंड उघडलेल तुम्हाला बऱ्याचदा चालत नाही. तुम्ही लगेच ते बंद करायचा प्रयत्न करता.

गरज असेल तेव्हा तुम्ही एकीला डोक्यावर धरता, तर दुसरीला मात्र डोक्यावर बसली आहे अस सहजपणे बोलता. आणि तिची गरज नसेल तेव्हा फक्त सोबत मिरवण्यासाठी म्हणून वापर करता.

संरक्षण तुम्हाला दोघींकडून सारखच अपेक्षित असतं. पण बऱ्याचदा तुम्ही दोघींबद्दल निष्काळजीपणे वागता.

या तिच्या बोलण्याचा मी काही वेळ विचार केला. आणि म्हटलं, तू म्हणतेस ते अगदीच खोटं नाही. त्यात बरच तथ्य आहे. छत्रीची बाहेर आलेली काडी टोचल्यावर जखम झाली नाही तरी टोचल्याच जाणवतं. तसच आमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला टोच जाणवत असेल यात शंकाच नाही.

पण तू (छत्री) घरात निमुटपणे बसलीस तर मनाला काही वाटत नाही. पण दुसरी (स्त्री) जर गप्प राहिली तर तिच गप्प रहाणसुध्दा मनाला नकळत कुठेतरी खूपत असत. हे तुला माहीत आहे का?

तू जशी थोडी नादुरुस्त झाल्यावर आपले तोंड सहजपणे उघडायला तयार नसतेस तसेच स्त्री आपले दुःख सहजपणे तोंड उघडून सांगत नाही. हे देखील सत्यच आहे. दोघींच्या तोंड न उघडण्याच्या प्रकारात फार फरक आहे.

तू (छत्री) जशी उन्हाचा कडाका आणि पावसाचा तडाखा सहन करतेस आणि तशीच राहतेस, तशीच स्त्री देखील मानापमानाचे चटके सहन करते. आणि स्वयंपाक घरात घामाने चिंब झाली तरी जेवण सुग्रास करण्याचा हट्ट धरते पण चेहऱ्यावर दाखवत नाही. “स्वयंपाक छान झाला आहे” या एका वाक्यात तिचा थकवा जातो. खरंच हे कौतुकास्पद आहे.

यावर छत्री परत म्हणाली, माझ्या शिवाय इतर वस्तूंबाबत देखील तुमचे विचार तसेच असतात. जसे स्त्री आणि गाडी. या बाबतीत सुध्दा तुमची मतं सारखीच असतात.

गाडीत पेट्रोल भरण्याच्या टाकीजवळ थेंब थेंब पेट्रोल भोवती घाण साचते. ते तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही ते स्वच्छ करायचा प्रयत्न करता. कारण इतरवेळी ते सीटखाली किंवा झाकणाखाली झाकले जातं.

मला सुध्दा पावसातून आल्यावर उघडी ठेवून कोरडी करतात. पण सातत्याने तुम्ही स्त्री च्या मनाला मनापासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करता का?…

तुम्हाला जशी माझी घडी व्यवस्थित असावी असे सतत वाटते, तशीच स्त्री आपल्या घराची घडी कायम चांगली रहावी या प्रयत्नात आपले मन बऱ्याचदा उघडतच नाही. त्याचीही घडी उलगडून परत नीट घालण्याचा प्रयत्न करा… जमेल ते.

… तुझं म्हणण खर आहे. आम्हाला तुमचं सतत जवळ असणं अपेक्षित असतं. पण बऱ्याचदा आम्ही तुम्हाला उपेक्षितच ठेवतो. असे मी म्हणालो… 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यश कसे टिकवायचे? ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ यश कसे टिकवायचे? ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी झटत असतो. त्याचे अविरत कष्ट, त्याची हुषारी, नवनिर्मितीची प्रतिभा आणि नवीन शिकत राहण्याची जिज्ञासा या गुणांमुळे तो यशाच्या पाय-रा चढत जातो.

पण यश मिळाल्यावर ते टिकवायचे कसे?

यश मिळाले की त्याची धुंदी चढते.त्यातून अहंकार पोसला जातो. अहंकारातून उर्मटपणा येतो.दुसराला कमी लेखण्याची वृत्ती वाढते. मग जवळची माणसे जी तुमच्या यशात भागीदार होती, ती दुरावतात.

कितीतरी अभिनय सम्राट, सिनेसृष्टीतील यशस्वी तारे यांची उदाहरणे आहेतच.

यश आले की लोकांकडून अपेक्षा वाढतात. आणखी उंच जाण्याचा ताण वाढतो. वेगाने पुढे जाण्यासाठी कधी कधी स्वतःची मूल्ये बाजूला सारून अनैतिकता येते. कधी कधी हा ताण इतका असह्य होतो की आत्महत्येला प्रवृत्त होतो. मोठे बिल्डर्स, सिने प्रोड्यूसर्स कंपनीचे डायरेक्टर्स या ताणाला बळी पडतात.

कधी कधी यशामधे तुमचे भाग्य, तुम्हाला मिळालेल्या संधी यांचाही वाटा असू शकतो.परंतु आपण समजतो की माझ्यातील गुणांमुळेच व माझ्यातील असामान्य हुषारी मुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे.

कितीतरी नवरे त्यांच्या पत्नीलाही क्रेडिट द्यायला तयार नसतात, जी पत्नी त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ईश्वर तर पाठीशी असतोच. मनात नेहमी कृतज्ञता असावी म्हणजे अहम् पोसत नाही.

आणखी आणखी पुढे जाण्यात कधी कधी धोका आहे का याचा विचार करायला हवा.

कधी थोडे थांबून पुन्हा पहिल्यापासून विचार करावा.

उदा. एखादी कंपनी, इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठे भांडवल उभे करावे लागते. त्यासाठी लोन घ्यावे लागते. परंतु टेक्नाॅलाॅजी इतक्या झपाट्याने बदलते.

उदा. नोकियासारखी मोठी कंपनी, त्यांनी फोनचे प्राॅडक्शन वाढविण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली. आणि इंटेल कंपनीने मायक्रोप्रोसेसर आणल्यावर नोकियाच्या मोबाइल फोनची मागणी कमी झाली. शेवटी कंपनी बंद पडली.

 म्युझिक क्षेत्रात आधी कॅसेटस होत्या, मग सी.डी. ज आल्या, आता पेनड्राइव.

आता काळा पांढरा टी.व्ही कोण घेणार? सर्वांना स्मार्ट टी.व्ही. हवा.

झेराॅक्स मशीनमधे किती बदल झाले.

त्यामुळे भांडवल घालताना पुढचा विचार हवा.

शिवाय कर्ज घेताना डेट/इक्वीटी रेशिओ तपासायला हवा.

कंपनी कितीही मोठी झाली तरी त्या कंपनीच्या कोअर व्हॅल्यूज, कंपनीची मूल्ये यांना धक्का पोचता कामा नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योग समूह.

मर्क या औषधांच्या कंपनीचा मोटो होता, “आम्ही हे कधीही विसरणार नाही की औषधे ही लोकांसाठी असतात. नफा कमावण्यासाठी नाही. नफा आपोआप पाठी येईल. “

परंतु कंपनी जसजशी मोठी होत गेली, त्यांची ही फिलाॅसाॅफी डायल्यूट होत गेली.आणि कंपनीचा करिष्मा कमी झाला.

कधीकधी अनेक अडचणी येतात. यशाचा मार्ग काट्यातूनच जातो. अशावेळी कुठलाही निर्णय घेताना शांतपणे घ्यावा. पॅनिक होऊन जर निर्णय घेतला तर तो चुकीचा असू शकतो. आपणच आपल्या पायावर धोंडा मारू नये.

शेवटी पडत पडतच शिकायचे आहे.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिसॉर्टमधील विवाह.. एक सामाजिक आजार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

☆ “रिसॉर्टमधील विवाह.. एक सामाजिक आजार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

☆

आता मंगल कार्यालयाचा वापर लग्न समारंभासाठी होत नाही, ही सर्व ठिकाणं आता निकामी झाली आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातल्या मंगल कार्यालयात लग्न होणं सामान्य होतं, पण तो काळही आता संपत आला आहे. आता शहरापासून दूर महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ होऊ लागले आहेत. लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच हे रिसॉर्ट बुक केली जातात आणि संपूर्ण कुटुंब तिथे स्थलांतर करतं. पाहुणे थेट तिथेच पोहोचतात आणि तिथूनच निरोप घेतात. इतक्या लांबच्या समारंभाला स्वतःचे चारचाकी वाहन असलेलेच पोहोचू शकतात.

आणि खरी गोष्ट म्हणजे आमंत्रण देणाऱ्यालाही हेच हवं असतं की, केवळ कारधारक आणि “स्टेटसवाले” पाहुणेच येवोत. आता २-३ प्रकारची आमंत्रणं दिली जातात:

फक्त महिलांसाठी संगीत कार्यक्रमासाठी

फक्त रिसेप्शनसाठी

फक्त कॉकटेल पार्टीसाठी

आणि काही VIP लोकांना सर्व कार्यक्रमांसाठी.

या प्रकारच्या निमंत्रणात आपलेपणाची भावना राहिलीच नाही, केवळ उपयोगी लोकांनाच बोलावलं जातं.

महिला संगीतासाठी संपूर्ण कुटुंबाला डान्स शिकवण्यासाठी महागडे कोरिओग्राफर १०-१५ दिवस ट्रेनिंग देतात. मेहंदी लावण्यासाठी कलाकार बोलवले जातात, हळदीसाठी सुद्धा एक्सपर्ट नेमले जातात.

मेहंदीच्या कार्यक्रमात सगळ्यांना हिरव्या रंगाचे कपडे घालणे अनिवार्य केले जाते. जो न घालेल त्याला कमी समजले जाते. म्हणजेच कमी दर्जाचा मानला जातो. ब्युटी पार्लर २-३ दिवसांसाठी बुक केले जातात.

यानंतर हळदीचा कार्यक्रम होतो. इथे सगळ्यांनी पिवळा कुर्ता-पायजमा घालणे गरजेचे असते. जो हे न पाळेल त्याला देखील कमी समजलं जातं.

प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या खोलीत राहतं, त्यामुळे भेटणारे नातलग एकमेकांना भेटत नाहीत. सगळे श्रीमंत झाले आहेत, पैसेवाल्या जगात आपुलकी हरवून गेली आहे. आता समारंभातही मोबाइलवरून बोलविल्यावरच लोक बाहेर येतात. प्रत्येकाला वाटतं की मी दुसऱ्यापेक्षा श्रीमंत आहे.

लग्नाच्या स्वागतद्वारावर नवदांपत्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील आलिंगनाचे फोटो लावलेले असतात, जे आपल्या संस्कृतीला झटका देणारे असतात. आता नववधूच्या नावापुढे ‘सौ. ’ किंवा वराच्या नावासमोर ‘चि. ’ असा उल्लेख होत नाही. सर्व इंग्रजीमध्ये असतं.

एंट्री गेटजवळ मोठ्या स्क्रीनवर त्यांच्या फिल्मी शैलीतील प्री-वेडिंग व्हिडिओ दाखवले जातात. कार्यक्रम आशीर्वादासारखा वाटतच नाही. स्टेजवर नवदांपत्य आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर थिरकत असतं, आपल्याच संस्कारांचे प्रदर्शन करत.

स्टेजजवळ स्क्रीनवर प्री-वेडिंग शूट दाखवलं जातं, ज्यात त्यांची आधीच भेट झालेली असते आणि मुलगी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून चट्टानांवर, बागांमध्ये, कुंभारवाड्यांमध्ये, स्मशानात किंवा कृत्रिम फुलांमध्ये पोझ करताना दिसते.

यानंतर रिसेप्शन सुरू होतं, स्टेजवर वरमाला होते. पूर्वी वर-वधूचे कुटुंबीय मिळून हसतखेळत वरमाला घालायचे. आता स्टेजवर धूर सोडला जातो, सगळ्यांना दूर हटवलं जातं आणि दांपत्य स्लो-मोशनमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये वरमाला घालतात. त्यात लेझर शो आणि फटाकेही असतात.

यानंतर वरात निघते. बऱ्याच घरांतील सुसंस्कृत मुली ५० हजार रुपये खर्च करून ढोल-ताशावर नाचतात.

आपली संस्कृती बिघडवण्याचे काम हे अतिसंपन्न वर्ग करत आहेत.

माझं सर्व मध्यमवर्गीय समाज बांधवांना आवाहन आहे की, आपले पैसे आहेत, आनंद साजरा करा, पण इतरांची नक्कल करू नका.

कर्ज काढून आपला आणि आपल्या कुटुंबाचा सन्मान गमावू नका. आपल्या क्षमतेनुसार खर्च करा. चार-पाच तासांच्या रिसेप्शनसाठी आयुष्यभराची कमाई खर्च होते आणि जेवढंच करू, लोक फक्त रिसेप्शन हॉलपर्यंतच तुमचं कौतुक करतील आणि भेट पाकीट देऊन निघून जातील.

माझं तरुण पिढीकडेही आवाहन आहे की, आपल्या कुटुंबाला त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक खर्च करण्यास भाग पाडू नका. तुमचं लग्न हे तुमच्या आईवडिलांच्या त्यागाचे फलित आहे, आणि त्याचं मोल तुम्हाला फक्त स्वतः आई-वडील झाल्यावर कळेल.

हा दिखाव्याचा आजार फक्त उच्चवर्गापुरताच मर्यादित ठेवा. आपलं वैवाहिक आयुष्य अभिमानाने, आत्मसन्मानाने सुरू करा आणि स्वतःला आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी योग्य सिद्ध करा.

५० लाख ते १ कोटी रुपयांच्या लग्नात वर-वधूच्या अंगावर किती दागिने असतात, पण उगाचच त्या पैशांचं दहापट खर्च केलं जातं, केवळ दिखाव्यासाठी.

कृपया समाजातील प्रत्येक व्यक्ती यावर गंभीर चिंतन करावं आणि भविष्यात या आजारातून मुक्त होण्यासाठी योग्य पावलं उचलावीत.

☆

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सामाजिक संस्थेविषयी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सामाजिक संस्थेविषयी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामाला तग धरू शकू. सुधारणेची गरज असते सुधारकाला, स्वतःला ज्या लोकांपासून तो सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव आपल्याला पावलोपावली येतात.

धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी अहमदनगरहून निघताना ” नव्या जागी जाल तेव्हा आधी शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल ” असं काकू म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराज ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं!)

‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय एखादा चमत्कार घडावा तसा अकोला येथील माझ्या अल्प वास्तव्यात मला येणार आहे याची मात्र मला कल्पना नव्हती.

अकोला ब्रॅंचचे माझ्याशी ऋणानुबंध होते जेमतेम सहा महिन्यांचेच. पण माझ्यासाठी हा तोवरच्या प्रदीर्घ बँकिंग करिअरमधला अक्षरशः तारेवरची कसरत वाटावा असाच काळ होता. त्यातला प्रत्येक दिवस माझी कसोटी पहाणारा, अकोल्यातल्या भाजून काढणाऱ्या कडक उन्हासारखे असह्य चटके देणारा, रेंगाळत, माझी गंमत बघत हळूहळू पुढे सरकणारा असाच होता!

मी अहमदनगरहून रिलीव्ह झाल्यानंतर रातोरात अकोल्यासाठी प्रवास सुरू केला होता तो फक्त रोजच्या लागणाऱ्या सामानाची एक मोठी सुटकेस बरोबर घेऊन. बदली झाल्यानंतरच्या नव्या गावी पहिले आठ दिवस आमची सर्व व्यवस्था लाॅजमधे बँकेमार्फतच होत असल्याने तिथे गेल्यानंतर रहाणं, जेवणखाण, चहापाणी हा तातडीचा प्रश्न नव्हता हे खरं, पण पहिल्याच दिवशी ब्रॅंचमधे गेल्यानंतर समजलं कीं तिथे ब्रॅंच मॅनेजर्ससाठी क्वार्टर्सची सुविधा उपलब्ध नाहीय. सुदैवाने ऑडिट डिपार्टमेंटमधे माझ्याबरोबर कांही काळ काम केलेले श्री. देशपांडे पहिल्याच दिवशी मी ब्रॅंचमधून बाहेर पडताना तिथे आले. ते मूळचे अकोल्याचेच आणि मी आजच तिथे रूजू झालोय हे समजल्यामुळे ते मुद्दाम मला भेटायला आलेले होते. त्यांचा अकोल्यातील स्वत:चा फ्लॅट रिकामाच होता. एरवी त्यांनी तो पुढे व्याप नकोत म्हणून कुणालाच भाड्याने दिलेला नव्हता.

” सर, तुम्ही जागेची काळजी करू नका. तुम्ही इथे असेपर्यंत हा फ्लॅट तुमचा. ” ते म्हणाले आणि जागेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटला. त्या परिस्थितीत मला हा एक शुभशकूनच वाटला होता.

तेव्हाच्या मन:स्थितीत पहिल्याच दिवशी घडलेली ही घटना पुढे येणाऱ्या प्रत्येक पावलावरील प्रतिकूल परिस्थितीला हिंमतीने तोंड देण्यासाठी उमेद देणारी ठरली एवढे खरे. दुसरी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे ब्रॅंचमधला स्टाफ! त्या सर्वांच्या आपुलकीच्या सहकार्यामुळेच मी थोडाफार का होईना बऱ्यापैकी स्थिरस्थावर होण्याची आशा बाळगून होतो.

इतक्या तातडीने माझी अकोल्याला बदली होण्यामागचे कारण सर्वस्वी नकारात्मक होते. आणि तेच माझ्यापुढचं मोठं आव्हान ठरणार होतं. प्रतिकूल हवामान, घरापासूनचं अतिशय दूर आणि तुलनेने बरचसं रूक्ष असं इथलं वातावरण अधिकच असह्य वाटावं इतकी नकारात्मकता माझ्या या बदलीमागच्या कारणामधे ठासून भरलेली होती. ते कारण तसं पाहिलं तर जगावेगळं नव्हतं. अशा घटना तुरळकपणे कां होईना प्रत्येक बँकेत घडत असतातच असंही म्हणता येईल. पण माझ्या दृष्टीने ते समर्थनीय ठरणारं नव्हतं. तो माझ्यासाठी पूर्वी कधीच न अनुभवलेला असा एक कटू अनुभव होता! शेवटी भलीबुरी माणसं सगळीकडे असणारंच. पण माझा हा अनुभव म्हणजे अशा माणसांमुळे एरवी सुरळीत सुरू असणाऱ्या व्यवस्थेवर केवढा प्रचंड ताण येऊ शकतो याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझी इथं तात्काळ बदली होण्यामागचं कारणही तसंच गंभीर आणि अचानकच निर्माण झालेलं होतं. अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोला ब्रँचमधील मॅनेजरची लगोलग गच्छंती झालेली होती आणि तिथले पुढचे व्याप निस्तरण्यासाठी माझं तिथं हे पोस्टींग! माझी कसोटी पहाणारं आव्हान होतं ते. त्या कसोटीला उतरणं म्हणजे नेमकं काय काय होतं हे इतक्या वर्षानंतर आज आठवतानाही माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहातो!

बँकेच्या कर्ज योजनांमधील मंजूरी आणि वितरणामधे आधीच्या मॅनेजरने दाखवलेली अनावश्यक तत्परता, राहून गेलेल्या त्रुटी आणि त्यामुळे होऊ शकणारे बँकेचे आर्थिक नुकसान हे अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमधले मुख्य आक्षेप. युद्धपातळीवर दखल घ्यायला हवी अशी ती अकरा कर्जखाती होती ज्यामुळे बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान व्हायची शक्यता होती. होऊ शकणाऱ्या या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कुणाची हे ठरवण्याचं काम वरिष्ठ पातळीवर आधीच सुरू झालेलं होते. कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाईसह सर्व प्रयत्न तातडीने सुरू करणे ही नवीन मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी होती. पण हे काम सहजसोपे नव्हते. ब्रॅंच मॅनेजर म्हणून असणाऱ्या इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता हे करणे ही तारेवरची कसरत लगेचच सुरू झाली. रोजचं ब्रॅंचरूटीन आणि दैनंदिन कामांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना या कर्जखात्यांची माझ्या डोक्यावरची टांगती तलवार मला क्षणाचीही उसंत मिळू देत नसे.

त्या सर्व कर्ज फाईल्स बारकाईने अभ्यासण्यासाठी सुरुवातीच्या तीन-चार रात्री मी अक्षरशः जागून काढलेल्या होत्या. सर्व कर्जदारांना दिलेल्या नोटिसा त्यांनी न स्वीकारल्याने परत आलेल्या होत्या, त्यांचे व्यवसाय अस्तित्वात नव्हते, किंबहुना कर्ज वितरणानंतर अल्पकाळातच निर्माण झालेली ही परिस्थिती कर्जरकमेचा जाणीवपूर्वक केलेला दुरूपयोग अधोरेखित करणारीच होती. अशा परिस्थितीत बँकेचे आर्थिक नुकसान टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा सर्व खातेदारांविरुद्ध क्रिमिनल केसेस दाखल करणे हाच होता. आणि वरिष्ठ कार्यालयाने तोच अंमलात आणायचे ठरवले होते. पण माझ्यासाठी ते प्रोसेस योग्यपध्दतीने पूर्ण करणे वाटते तेवढे सोपे नाहीये हे सुरूवातीपासूनच मला पदोपदी जाणवत राहिले. नागपूर आणि पुणे येथील दोन्ही वरिष्ठ कार्यालयांनी युद्ध पातळीवर याचा पाठपुरावा सुरू करून अक्षरशः माझी झोप उडवली होती!

सर्व पातळ्यांवर सुरू असलेले माझे अथक प्रयत्न म्हणजे खरंतर न जिंकता येणारी लढाई लढण्यासारखं होतं, पण मी ती अखेरच्या क्षणापर्यंत लढायची हे मनोमन ठरवून टाकलं. कागदी घोडे नाचवत स्वत:ची कातडी बजावण्यात समाधान मानणं मलाच पटणारं नव्हतं. ही बॅंक आपली अन्नदात्री आहे आणि तिचं नुकसान हे माझंही नुकसान असणार आहे हीच भावना मनात असल्याने क्षणाचीही उसंत न घेणे हाच माझा मनोमन केलेला ठाम निर्धार होता! तोपर्यंत तिथे अशी घटना पूर्वी कधी घडलेली नसल्याने अॅप्रूव्ह्ड अॅडव्होकेट पॅनलवर एकही क्रिमिनल लॉयर नव्हता. आमच्या इतर कोर्ट केसेसच्या संदर्भात माझ्याकडे येणाऱ्या बॅंकेच्या वकिलांशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यामधे अनुभवी असे दोनच क्रिमिनल लाॅयर्स होते. त्यातही जे सीनियर आणि नावाजलेले होते त्यांचंच नाव बँकेच्या वकिलांनी आवर्जून सुचवलेलं होतं. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटणं, सगळा प्रॉब्लेम समजावून सांगणं, आणि त्यांचा बायोडेटा घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळवणं या वेळखाऊ औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच पुढचं सगळं किचकट प्रोसेस आधीच सुरू करण्याची मी वकिलांना केलेली विनंती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच मान्य केली हा त्या मन:स्थितीत मला फार मोठा दिलासा वाटला होता!

मी चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या उलाढाली! या पंधरा दिवसात या सगळ्या घटनांमागच्या, माझ्या लाडक्या ताईच्या चटका लावून गेलेल्या दु:खद मृत्यूपासून मी अकोल्याला बदली होऊन इथे येईपर्यंतच्या काळातल्या सगळ्याच घटनांचा या कामाच्या व्यापात मला नकळत विसरच पडला होता. त्यादिवशी रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि ते सगळेच प्रसंग मला नव्याने आठवले. मनातला दृष्टीआडचा ‘तो’ प्रसन्न नजरेने माझ्याकडेच पहात होता. ती नजर दिलासा देणारी, मनाला अनामिक अशी स्वस्थता देणारी होती. मी समाधानाने डोळे मिटले. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणाराय याची कल्पनाच नव्हती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि मी : लेखांक ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ सावरकर आणि मी : लेखांक ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(सावरकरांच्या बाबत यापूर्वी मी दोन लेख लिहिले आहेत. त्याच मालिकेतील हा तिसरा लेख.)

‘सावरकर समजून घेताना’

खरं म्हणजे सावरकरांचे चरित्र म्हणजे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक(?). त्यातील अंदमानातील तुरुंगवास संपेपर्यंतच(?). कारण अनेकांनी तेवढंच वाचलंय. सावरकरांच्या चरित्राला अंदमानातल्या सुटकेचे कुंपण घालून तेवढ्यावरच त्यांचा उदो उदो करणाऱेच जास्त.   त्यानंतर त्यांनी हिंदू समाजातील अनेक दुष्प्रथांवर प्रचंड कोरडे ओढणाऱ्या समाजकार्याबद्दल किती जणांनी सविस्तर जाणून घेतलंय?   सावरकर ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेमुळे आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामधील उपेक्षित जीवनामुळे  काहीच करू शकले नाहीत (?) अशा प्रकारचा एक मतप्रवाह असणारेच अनेक.  सावरकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रभावी विचारसरणी ही समजून घेताना, आपले वाचन अथवा ज्ञान ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकापुरते (आणि आता सावरकर सिनेमा पुरते) मर्यादित असता कामा नये असे माझे मत आहे.  सावरकरांना टोकाचे हिंदुत्ववादी बनवून त्यांचा हिंदुत्ववाद समजूनही न घेता त्यांना ईश्वरवादी समजणाऱ्या माणसांची संख्याच जास्त आहे असे मला वाटते.

परमेश्वराच्या अस्तित्वाला नाकारा. भजन पूजन करू नका. देवळे बांधू नका. धार्मिक विधी करू नका. धार्मिक परंपरा धरू नका, रूढी या माणसाला नष्टचर्याकडे नेणाऱ्या आहेत. कोणतीही प्रथा काल सुसंगत आणि कालमान परिस्थितीनुसार  बदलता आली पाहिजे. श्रुती आणि स्मृती संपूर्णपणे नाकारणारा आणि त्यांच्या विरोधात प्रचंड लेखन करणारा.  जातीयवाद आणि अस्पृश्यता यांच्याबाबत समाजाशी प्रचंड संघर्ष करणारा. दारू अथवा मांसाहार या गोष्टी चुकीच्या आहेत असे न मानणारा, अर्थात व्यसनाधीन होऊ नका हेही सांगणारा. असा एक जबरदस्त आधुनिक विचारांचा नास्तिक माणूस. याला परंपरावादी लोक हिंदू म्हणून तरी स्वीकारणार आहेत काय हाच मुळातला प्रश्न आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदूहृदयसम्राट अशी बिरुदावली ज्यांना अर्पण केली आहे त्या सावरकरांना सर्व बाजूंनी समजून घ्यायचे असेल तर, त्यांच्या या विचारांना सुद्धा हिंदुत्वाचे विचार म्हणून स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारणार आहात काय ? खरे तर त्यांना राष्ट्रनिष्ठसम्राट असे म्हणणे हेच जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी  प्रचंड मोठे समाजकार्य केले आहे. 

पु ल देशपांडे यांनी एक छान वाक्य त्यांच्याबद्दलच्या व्याख्यानात सांगितलं आहे की ‘सावरकरांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले ते हे की, त्यांनी मला नास्तिक बनवलं’  ह्या विचारांशी किती जण सहमत होतील मला शंका आहे.

त्यांचा मुळात राग किंवा वाद हा वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार करणारे आणि वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार सहन करणारे यांच्यातला वाद होता. मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी फक्त एखादी व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करावा असे सांगितलेच नाही. ज्यांच्या निष्ठा इथल्या भूमीशी प्रामाणिक आहेत ते मुस्लिम असले तरी, त्यांना मी हिंदूच म्हणेन असे ते म्हणत. त्यांचा मुळात आक्षेप मुस्लिम समाजाच्या निष्ठा जर आपल्या देशाबाहेरील कुठल्यातरी दुसऱ्या देशात वा देशाशी जोडल्या गेल्या असतील तर ते राष्ट्रनिष्ठ होऊ शकत नाहीत. अशा राष्ट्रविरोधी विचारांच्या व्यक्तींना विरोध करा. वर्षानुवर्षे ज्यांनी एतद्देशियांवर अन्याय आणि अत्याचार केले त्यांचे समर्थन करणार असाल तर तुम्ही राष्ट्रनिष्ठ नाही.  मग तुम्ही हिंदू असला आणि अस्पृश्यांवर अत्याचार केले असतील आणि त्याचे समर्थक असाल तरीही तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. एवढे त्यांचे हिंदुत्व वेगळ्या टोकाचे होते.  हे किती जणांना पटणार किंवा पचणार आहे हाच मुळातला प्रश्न आहे.  या देशात ब्रिटिशांचे राज्य नसते तर ते कांही हिंदूंच्या विरोधात सुद्धा लढले असते. सावरकरांच्या मते राष्ट्रवाद हाच हिंदुत्ववाद. परंतु त्यांच्याच काही समर्थकांनी हे वाक्य उलटे करून हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद असे बनवले.

अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करत होता हिंदूंची देवळे नष्ट करीत होता त्या जागी मशिदी बांधीत होता हजारो हिंदूंना बाटवून धर्मांतरित करीत होता त्यावेळी तुमचा विठोबा ज्ञानेश्वरांची भिंत चालवत होता? हे वाक्य किती जणांना पचणार आहे?

एके दिवशी सेनान्हाव्याला बादशहाकडे जायला उशीर झाला. तेव्हा विठोबाने सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची दाढी केली या घटनेचा उपहास करताना ते म्हणतात ‘ विठोबाने त्याच वेळेला, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या बादशहाची मान का छाटून टाकली नाही? गुलामांचा देवही गुलामच.’

अशा तऱ्हेने कपोल कल्पित संतांच्या कथांवर त्यांनी प्रखर विचारांचे आसूड ओढले. या कथांमधून किंवा या विचारांमधून लोकांची अन्याया विरोधी लढण्याची अस्मिताच नष्ट करून टाकली.  गुलामगिरी पुढे समाज नतमस्तक होऊ लागला. समाज नेभळट बनला. स्वातंत्र्याची उर्मी समाजात निर्माण करण्यासाठी त्यानंतर खूप त्रास झाला. असे त्यांचे स्पष्ट मत होते.

‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ हे निबंध किंवा  एकूणच सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे दोनही भाग तसेच ‘क्ष किरणे’ वगैरे पुस्तके. हे वाचण्याची तसदी किती जणांनी घेतली असेल? ‘क्ष किरणे’ मध्ये श्रुती आणि स्मृतिंवर त्यांनी केलेली भाष्ये

ही मुळातच आपल्या मनातील धार्मिक परंपरांना उलटेपालटे करणारी आहेत.  ‘गाय केवळ उपयुक्त पशू माता नव्हे,  देवता तर नव्हेच नव्हे’ हे त्यांच्या एका निबंधाचे शीर्षक आहे हे किती जण जाणतात आणि ते पटवून घेऊ शकतात?

परंपरावादी तथाकथित हिंदुत्ववादी  व्यक्तींना न पटणारी, न पचणारी, न आवडणारी किंवा कानावरही पडायला नको वाटणारी अशी वाक्ये ठासून भरलेले सावरकरांचे वाङ्मय वाचताना अशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे काय होईल?

स्वतःच्या सामाजिक विचारांशी सुसंगत अशा व्यक्ती त्यांना मोठ्या प्रमाणात जमवता न आल्यामुळे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदूमहासभेला त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली असावी असे आज मला वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागले. कारण त्यांची काँग्रेसने केलेली उपेक्षा हे खरे असले तरी, त्या बरोबरच त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी पटवून न घेता आल्यामुळे तथाकथित हिंदूंनी सुद्धा त्यांची केलेली उपेक्षाही जास्त कारणीभूत आहे. सावरकरांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांनी सावरकरांचे हे विचार तसेच, ते विचार ज्यामध्ये आहेत ते वाङ्मय समाजात पसरूच दिले नाही. त्यांची खरी ओळख समाजाला होणे हे टाळण्यात हिंदुत्ववादी परंतु मनातून सावरकर विरोधी विचारांच्या तथाकथित विचारवंतांनी सावरकरांचे हे विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे टाळले.

त्याचप्रमाणे भाषाप्रेमी, साहित्यनिष्ठ आणि काव्यानंदात वेदना विसरणारे. आपली प्रखर विचारसरणी साहित्यिक आणि कलात्मक स्वरूपात समाजासमोर मांडू शकणारे. मराठीभाषाहृदयसम्राट सावरकर समजून घेणे हा सुद्धा खूप मोठा वैचारिक व्यायाम आहे.

सावरकरांमधील या साहित्यिक पैलूं बाबत सुद्धा फार कमी लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे अर्थात त्याबाबत पुन्हा कधीतरी. झाला एवढा वैचारिक व्यायाम वाचकांना खूप झाला असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि मी : लेखांक २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ सावरकर आणि मी : लेखांक २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आणि पराभव (?)

केशवसुतांनी त्यांच्या तुतारी या कवितेतून “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जुन्यातून हो निष्पत्ती नवी” जुन्या परंपरा मोडीत काढा आणि त्या जुन्या परंपरेतलं तत्व लक्षात घेऊन नव्या परंपरा निर्माण करा असा संदेश दिला होता. तत्त्व महत्त्वाचं की परंपरा? समाजजीवन महत्त्वाचं की परंपरा? : माणूस महत्त्वाचा की परंपरा? या सगळ्या परंपरा मानवासाठी आणि पर्यायाने समाज जीवनासाठी योग्य अशा असल्या पाहिजेत. अनेक परंपरा कालमान परिस्थितीनुरूप बदलल्या पाहिजेत हा संदेश सतत समाजसुधारक देत आले आहेत. अगदी कालच (हा लेख सावरकरांच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी लिहिलेला आहे) सावरकरांचा उदो उदो खूप झाला. सावरकरांनी तर समाजसुधारणांचे कितीतरी पैलू समाजासमोर ठेवले होते. परंतु सावरकरांची मार्सेलिस बंदरातील उडी आणि अंदमानातील हाल-अपेष्टा यापुढे सावरकरांच्या जीवनाचा आणि कार्याचा कुणी विचारच करत नाही. उलट अंदमानातून पुढे सुटून आल्यानंतर, रत्नागिरी मधील त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य. पण ते कुणाला पटणार नाही वा पचणारही नाही. हिंदू समाजाला तर ते कधीच झेपणार नाही. सावरकरांनीच निर्माण केलेली हिंदुमहासभा, पण त्या हिंदूमहासभेच्या अनुयायांना सुद्धा सावरकर झेपले नाहीत. त्यांचेही कार्य हे सावरकरांच्या तत्वज्ञानाच्या विरोधातच चालू झालं हे सावरकरांचे दुर्दैव आहे. परंतु असं दुर्दैव अनेक समाजसुधारकांच्या वाट्याला येतं. त्यांच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्यांची मूर्ती गाभार्‍यात ठेवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे, यातच धन्यता मानणारा समाज हे या सर्व समाजसुधारकांचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव महात्मा गांधी यांच्या वाट्याला सुद्धा आलं. त्यांनाही ते चुकलं नाही.

दोन शब्दात दोन संस्कृती या सावरकरांच्या निबंधात त्यांनी ‘श्रृती-स्मृती पुराणोक्त’ आणि ‘अपटूडेट’ या दोन शब्दांचा दोन संस्कृतींशी संबंध जोडला आहे. आपली श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही संस्कृती सोडून देऊन’ आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार करून अपटुडेट व्हा. आपले ज्ञान काळाशी सुसंगत व आजच्या तारखेपर्यंत ताजेतवाने ठेवण्यावर भर दिला आहे. आज या कम्प्युटरच्या युगात त्याची किती गरज आहे हे आजची पिढी जाणते. एका एका महिन्यात तुमचं ज्ञान हे भूतकाळ होऊन जातं. अशी परिस्थिती आज अनेक क्षेत्रात आहे. त्यामुळे स्वतःचे ज्ञान जो कालानुरूप सतत ताजंतवानं ठेवतो त्याचीच प्रगती होईल. हे आजचं वास्तव सावरकरांनी किती वर्षांपूर्वी सांगून ठेवलं होतं.

आपल्या राष्ट्राचा इतिहास, त्या इतिहासापासून घेतलेला बोध आणि त्या बोधापासून भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात टाकलेली पावलं यातून राष्ट्र घडत असतं असे सावरकर मानत.

त्यातूनच सावरकरांनी राष्ट्र उभारणीसाठी जी तत्वं सांगितली त्या तत्त्वांशी अनेक राजकीय लोकांनी संघर्ष केला. सावरकरांचा प्रमुख संघर्ष हा मोहनदास करमचंद गांधी (त्यावेळी ते महात्मा नव्हते) यांच्याशी झाला. अहिंसा आणि सहिष्णुता यांच्या निरुपयोगीपणामुळे आपल्या अखंड भारताचे लचके तुटत गेले. आता अजूनही अहिंसा आणि सहिष्णुता यांचा पुरस्कार करत राहिलो तर अजूनही भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. सावरकरांचे हे म्हणणे भारताच्या फाळणीने खरे ठरवले.

माझ्या मते महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही आपापल्या विचारसरणीमध्ये बरोबर असू शकत होते. सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याविषयी स्फुल्लिंग जागृत केले. तरुणांना स्वातंत्र्यलढा उभारण्यासाठी उद्युक्त केले.

उलट पक्षी महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली. रोजच्या जीवनात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला स्वातंत्र्याचे फारसे कौतुक नव्हतेच. कारण तो सामान्य माणूस कधीच स्वतंत्र नव्हता. त्याच्या मनात स्वातंत्र्याविषयी आपुलकी निर्माण करणे त्याला स्वातंत्र्यलढ्याचा सैनिक बनवणे हे अत्यंत अवघड काम होते. महात्मा गांधींना त्या कामात यश मिळाले.

स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यासाठी एखाद्या माणसाला उद्युक्त करणे हे त्याहून अवघडच काम होते. माणसाला स्वतःचे जीवन, स्वतःचे प्राण सर्वात महत्त्वाचे वाटतात. परंतु त्याचा सुद्धा त्याग करण्यास माणूस जेव्हा तयार होतो तेव्हा, तो एका खूप प्रभावी विचारांनी भारून गेल्याशिवाय नाही. हे विचारांचं भारलेपण सावरकरांनी तरुणांच्या मनात निर्माण केलं. ते तरुणांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट तरुणांच्या समोर ठेवला. १८५७ चे स्वातंत्र्य समर पासून ते माझी जन्मठेप पर्यंत त्यांच्या जीवनातील क्षण आणि क्षण आणि प्रत्येक कृती ही तरुणांना स्वातंत्र्यासाठी जागवणारी होती.

अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही याबाबत सावरकरांचे मत ठाम होते. अनेक काँग्रेस नेत्यांचे असेच मत होते. परंतु गांधींच्या प्रभावापुढे स्वतःचे मत त्यांना मांडता येणे शक्य होत नव्हते. सुभाषबाबूंनी काँग्रेस आणि पर्यायाने देश सोडण्याचा निर्णय घेतला. वल्लभ भाई पटेल यांनी पक्षात राहूनच थोडाफार वैचारिक संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, डॉ. हेडगेवार अशा अनेक व्यक्तींनी परंतु मुख्यतः पंजाब, बंगाल व महाराष्ट्र येथील अनेक नेत्यांनी विशेषतः तरुणांनी महात्मा गांधींच्या विरोधात काँग्रेसचा त्याग केला. सावरकर हे त्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाला त्याकाळी ब्रिटिशांनीही खतपाणी घातले. कारण त्यांना हिंसक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीचा उद्रेक झेपणारा नव्हता.

सावरकरांच्या अंदमानातील दहा-बारा वर्षाच्या तुरुंगवासामुळे आणि त्यानंतरही काही विशिष्ट अटींवरच त्यांची सुटका झाल्यामुळे त्यांना नंतरच्या काळात राजकीय चळवळीवर प्रभाव ठेवता आला नाही. सावरकर अंदमानातून सुटून येईपर्यंत महात्मा गांधींचे नेतृत्व ब्रिटिशांनी खतपाणी घालून खूप मोठे बनवले. अर्थात महात्मा गांधींची समाजाभिमुखता आणि त्यांचे आंदोलनाचे विविध प्रयोग समाजमनाशी जोडणारे असल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढणे सहाजिक होतेच.

बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली त्याला महात्मा गांधींनी स्पष्टपणे व प्रखर विरोध कधीच केला नाही. त्यामुळे अनेक नेते महात्मा गांधींवर नाराज होते. सुरुवातीच्या काळात गांधींनी फाळणीला नकार दिला असला तरी अंतिमतः त्यांनी त्यास मंजुरी दिली. यासाठी ब्रिटिशांनी जे काही राजकारणाचे खेळ केले ते यशस्वी ठरले. हे सर्व रत्नागिरीत राहून सावरकर पहात होते. खाजगीत ते त्यांच्या सहकाऱ्यांशी नाराजीने बोलले ही असतील. परंतु त्यात ते प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नव्हते. स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांनी त्यावर अनेक टीकात्मक आणि प्रखर विरोधी लेखन केले. परंतु फाळणी होऊन गेली होती. जे काही वाईट घडणे शक्य होते ते सर्व घडून गेले होते. त्यांना निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना गांधी हत्येच्या खटल्यात गुंतवून त्यांचा समाज मानसावरील प्रभाव कमी करण्याची यशस्वी खेळी केली.

परंतु एकंदरीतच सावरकर राजकारणामध्ये निष्प्रभ ठरले असले तरी सामाजिक चळवळीमधील त्यांचे योगदान खूपच वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या अनुयायांना व समर्थकांना सुद्धा सामाजिक सुधारणांमधील त्यांचे प्रखर विचार आणि तथाकथित हिंदू सवर्णांच्या विरोधात केलेले लिखाण आणि आंदोलन हे झेपण्यासारखे नव्हते. त्यामुळे हे सर्व समाजकार्य आणि प्रखर लेखन समाजापुढे हिरीरीने मांडून प्रबोधनात्मक कार्य करण्याचा आणि त्यांचे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा त्यांच्या अनुयायांनी सुद्धा कधी प्रयत्न केला नाही.

शेवटी आपला समाज सुद्धा समाजसुधारकांची तत्वे विसरून तस्वीर किंवा मूर्ती किंवा पुतळ्यात किंवा अगदी देवळात सुद्धा बसवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे आणि तत्त्वांचा विसर पाडणे यामध्ये वाकबगार आहे. प्रश्न प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारसरणीपर्यंत येऊन पोहोचतो.

महापुरुषांची तत्वं लक्षात घेणार का त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणार हे आपण ठरवायचं आहे. नाहीतर आजची पिढी ही त्या माणसांना विसरून जाईल त्या तत्वांना विसरून जाईल आणि मग सावरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याच संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण आपल्याला व्हायचं आहे काय? हे ज्यानं त्यानं ठरवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं.

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares