मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ भेट… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आषाढ भेट... ☆ श्रीशैल चौगुले ☆

मज न आले सावरता

ते आभाळ जीने पेलले

नवल म्हणावे कि कृपा

संकट काव्याने झेलले.

हसू ढगांचे खुणावती

नि उगी शब्द आठवणी

आषाढाचा पाऊस चिंब

नि भिजे काव्य क्षणोक्षणी.

 *

तृण फुलावे भाव हृदयी

तृप्त धरेत ओळ ओहोळ

पक्षी-मानव सुख संतुष्टी

पेर उगी रचनेला बळ.

 *

असे गीत व्याकुळ विरही

मोरपिसारे नृत्य पालवी

वारा संगीत तुला साद ती

प्रीतभंग लेखणीत कवी.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष..

पंचतत्त्वात विलीन झाला आणि…

चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं,

अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

 

चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत

सोडायची जबाबदारी माझी आहे.

आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात,

आता जरा उसंत घ्यावी.

चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

 

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

 

नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता,

अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात.

श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं,

सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला..

इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल,

आणि खाली मूर्ती आणि टाक होतील माझ्या.

मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे.

 

भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही.

या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.

 

राजे पुन्हा हसले,

देवा, माझी वही नीट तपासलीत ना,

तुरी द्यायची कला अवगत आहे मला.

 

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला

आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला.

जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन,

राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

 

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे.

राजकारणात जाईल, सुराज्य देईल.

नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल,

असंच मूल हवंय मला. दुसरं घर बघ.

 

गर्भवती २

देवी, हे मूल देतोय तुला.संस्कारी आहे,

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल.

नको देवा.आपण भलं आणि आपलं घर भलं,असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ३

देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे,

रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही,

प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल.

नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला,

असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ४,५,६…..

देवींनो, होऊ घातल्या मातांनो,

इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय,

स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय,

सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी,

स्वतःच निर्मिलेल्या राज्यात,

पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय..

कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात

सामावून घ्या हा सूर्य.

 

देवा, कितीदा सांगावं तुला,

जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं,

निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता.

अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे

लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला.

हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक.

आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ.

 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताएत मला.

एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी,

मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्तीही विसावल्यात देव्हा-यात.

पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या, न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. 

तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला.

 

देवा, असा हताश झालो असतो तर,

चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती,

कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो,

सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो,

अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती,

दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता,

स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती,

आणि..

माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं.

एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन.

तोपर्यंत…?

तोपर्यंत,

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार..!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संस्कारांचे बीज ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संस्कारांचे बीज ? श्री आशिष  बिवलकर ☆

सुखावला आज | सखा पांडुरंग |

चिमुकल्यांसंग | पालखीत ||१||

*

निर्मळ ह्रदय | मुखावर भाव |

भक्ती गाठे ठाव | अंतरीचा ||२||

*

संस्कारांचे बीज | ओली मऊ माती |

बालकांच्या हाती | धर्मध्वज ||३||

*

सनातन धर्म | पताका भगवी |

हीच पिढी भावी | वाढवाया ||४||

*

आषाढ महिना | एकादशी दिंडी |

पिंडी ते ब्रम्हांडी | हेच सत्य ||५||

*

अवतरलीय | गावात पंढरी |

रामकृष्ण हरी | नामघोष ||६||

*

सावळा विठ्ठल | भक्तीचा भुकेला |

धावतो हाकेला | श्रद्धा मनी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आम्ही सुंदरी… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आम्ही सुंदरी... ? शालिनी जोशी 

नऊ पाकळ्यांचे पदर उमलले

 खरे सौंदर्य पूर्णत्वाने प्रकटले 

*

 सुगंधाची मुक्त उधळण झाली 

 फुललेली ती स्वरूपाला भाळली

*

नाजूक कोमल दोघी कलिका 

जणूं अल्लड सानुल्या बालिका

*

फुलाला पाहती स्तब्ध होऊन

भावी रूप आपले फुलात पाहून 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंधार वाचणारे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

अंधार वाचणारे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

स्वातंत्र्य हरवलेले नाहीत शोधणारे

आता पुन्हा गुलामी आलेत मागणारे

 *

विपरीत चाल खोटी योजून खेळणारे

करतात सर्व धंदे हैदोस घालणारे

 *

प्रेमातली चलाखी कळणे कठीण आहे

सगळेच आंधळे ते असतात गुंतणारे

 *

आदर्श आज कोठे शोधून सापडेना

झालेत थोर नेते भोंदूस भाळणारे

 *

बदलून काळ गेला म्हणतात आज सारे

सत्तांध तेच झाले खैरात लाटणारे

 *

करतोय काय आम्ही आम्हास ही कळेन

झालोत दास वेडे लाचार वागणारे

 *

झालोय आज आम्ही मारेकरी स्वतःचे

डोळे मिटून काळा अंधार वाचणारे

गरजे नुसार प्रेमी करतात प्रेम थोडे

चवचाल लोक इथले आनंद वेचणारे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

आयुष्य उत्फुल्ल पणे, आनंदाने जगणे ही एक कला आहे. त्यासाठी अंतरीच्या भाव भावना जागृत असणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीकडे, आजूबाजूच्या परिसराकडे जाणीव पूर्वक पाहणे हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. असे करताना निसर्गाशी एकरूप न होणारे मन अतिशय विरळाच.. त्यातून ते जर कवी मन असेल तर भावनांची प्रतिबिंबे त्यात शब्द बध्द करणे हे ओघानेच आले. कधी आनंद देणारा तर कधी दुःख देणारा अनुभव कवितेत शब्दांकित होतो. असाच अनुभव व्यक्त करणारी “धुंद वाऱ्या” ही डॉ निशिकांत श्रोत्री सरांची कविता मनाला भुरळ घालते.

वाऱ्यावर वाऱ्यासवे विहरताना मन वाऱ्याप्रमाणे तरल झालेले असते. त्यात हा वारा धुंद करणारा असेल तर प्रीतीचे विचार मनामध्ये येणे साहजिक आहे. आणि मग ते काव्य रुपात प्रकट होताना डॉ श्रोत्री सरांसारख्या प्रतिभावंत कवीला प्रतिभेचे वेगळेच धुमारे गवसललेले दिसतात.

☆ धुंद वाऱ्या… ☆ कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

*

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

*

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

*

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

*

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

*

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

*

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

धुंद वाऱ्या हे शीर्षक कवीची वाऱ्याशी असलेली सलगी जाणवून देते. त्या वाऱ्याने कवी मनाला आगळी धुंदी प्राप्त झालेली आहे हे समजते. तसेच हा वारा स्वतः ही धुंद झालेला आहे हे लक्षात येते.

धुंद वाऱ्यामुळे धुंद होणारे कवी मन खुलून आले नाही तरच नवल!! अशा वातावरणात अपुले मन, त्यात जपलेल्या गूजाला/गुपिताला प्रकर्षाने उधाण येते. पण त्याच वेळी ते गूज दडविण्यास मन आतुर असते. ते कुणाला ही कळू नये अशी मनाची भावावस्था असते. अगदी हीच भावना सखोलपणे, सहजपणे कवी डॉ निशिकांत श्रोत्री यांनी या कवितेत व्यक्त केली आहे.

या कवितेत व्यक्त केलेल्या भावना स्री च्या आहेत हे कळते. भिन्नलिंगी काव्य रचताना कवी डॉ निशिकांत श्रोत्री स्त्री भावनांशी एकरुप होऊन तशा तऱ्हेने व्यक्त झाले आहेत. हे आवर्जून उल्लेख करण्यासारखे व तितकेच कौतुकास्पद ही !!

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

एखाद्या सख्याशी, मित्राशी बोलावे तसा संवाद वाऱ्याशी घडतो आहे. या धुंद करणाऱ्या वाऱ्याला ती विनंती करते की तू इथेच थांब. दूर कुठेही जाऊ नकोस. या धुंद वाऱ्यामुळे मनाला लाभलेली धुंदी तिला विसरायची नाहीये. कदाचित तिच्या मनातल्या गुपितामुळे ही वारा धुंद झाला असावा असे वाटत असावे.
लहरत, विहरत जाणाऱ्या वाऱ्यासवे मनातले गूज सर्व दूर पसरु नये अशी तिची इच्छा आहे. अतिशय सहजपणे सुलभ भाषेतून केलेले हे आर्जव आर्त भासते. व त्यातला खरेपणा अधोरेखित होवून तिची प्रांजळ भावना मनाला मोहविते. बोजड शब्दांना जाणीव पूर्वक दूर ठेवल्याने काव्य मनाला भावते. यथार्थ शब्दांनी गेयता लाभली आहे. वाऱ्याला थांबवताना लाभलेल्या धुंदीने ही थांबावे असा संकेत, संदेश जाणवतो.

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

ती वाऱ्याला म्हणते की तिच्या स्वतःच्या मनात जपलेले प्रीतीचे गूज मात्र उगाचच दूरवर पसरू नको. प्रीत भावनेच्या जाणीवेने लज्जेने गालांवर आलेली लाल गुलाबी लाली नभास देवू नको. यातला गर्भितार्थ फार सुंदर. तो अतिशय सूचकपणे मांडला आहे.. लाजरी शब्दावरील श्लेष मोहक.. अर्थाला अर्थ देणारा.. लाजरी ती स्वतः व लज्जा..
स्वप्नवत वाटणारी भावना तशीच शिल्लक राहू दे. रात्र सरु नये. व प्रातः काळी नभास उषेची लाली लाभू नये. ती तिच्या गालांवर तशीच राहावी असा अर्थ. रात्रीस जागणारी ही प्रेम भावना रात्रीच्या कुशीत तशीच निरंतर राहू दे.

माझ्या मनात दाटून आलेल्या प्रीत भावना माझ्या पुरत्या मर्यादित राहोत. त्या तू साऱ्या जगाला सांगू नको असे आर्जव करुन पुन्हा एकदा ती वाऱ्याला तिचे ते गुपित गुप्त ठेवण्याविषयी सांगत आहे. नको या नकारात्मक क्रियापदाचा वापर कवी मनाची प्रगल्भता दर्शवितो.. त्यातून गूज इतरांना कळू नये यासाठीची धडपड प्रकर्षाने जाणवते.. दाटले या शब्दाची योजना ही लक्ष व लक्ष्यवेधी.. साधारणपणे दाटले हा शब्द नकारात्मक विचार, भावना सूचित करतात. पण इथे प्रीतीची भावना दाटून आली असे म्हणताना प्रेम भावनेची सखोलता कळते. भावनेची व्यापकता व संपृक्तता जाणवते..

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

वाऱ्याला आहे तिथेच थांबण्याची आजर्वी विनंती ती अजूनही करतेच आहे.

पुढे ती म्हणते की माझ्या मनातले हे प्रीतीचे भाव जर तू वाऱ्यावरी वाहून नेले तर हे भाव, माझी ही प्रेम भावना मी माझ्या मुखाने माझ्या सखयाला कशी सांगणार? आणि ते तर मलाच त्याला सांगायचे आहे. तू विनाकारण लुडबूड करू नकोस अशी विनवणी करत थोडेसे दटावणी वजा सूचित करते.

ती पुढे वाऱ्याला जाणीव करून देते जर तिचे बोल त्याने (वाऱ्याने) व्यक्त केले तर ते बोल बोल ना राहता त्या बोलांची मधुर शीळ होईल व अशा वातावरणात ती तरी अबोल कशी राहू शकेल? तिची भावना व्यक्त न करता ती मूक कशी राहील? तिलाही काही बोलावे लागेल. बोलण्याने तिची ही स्वप्नवत धुंदी नाहीशी होईल याचे भय तिला वाटते.. पण मग अशी भावनेने वेडी झालेली व अश्या स्वप्नगंधात बुडालेली/डुबलेली छेड वाऱ्याने काढूच नये अशी विनंती ती करते.

व पुन्हा एकदा तिचे गूज त्याने पसरवू नये अशी आंतरीक भाक/ आण त्याला देते.

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

या भाक देण्यापलीकडे जाऊन ती त्याला विनंती करते की या धुंद वाऱ्याने तिचे अंतर /हृदय दाटून यावे. अर्थात ही धुंद करणारी बेधुंद धुंदी तिच्या अंतःकरणात दाटून राहावी. वाऱ्याने स्वतःचे अस्तित्व विसरून जावे व तिच्या अंतरंगात विरून तिचे स्वप्न म्हणून सतत तिच्या डोळ्यांत/ हृदयात स्थान मांडून राहावे. अशा प्रकारे वागण्याची आण ती वाऱ्याला देत आहे. आणि विनवते आहे की ही तिची प्रीतीची आण त्याने त्याच्या हृदयातून त्याच्या अंतरातून मोडू नये. त्याने ही तिला तसाच प्रतिसाद द्यावा.
आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको या ओळीतील श्लेष कवीच्या साहित्यिक जाणीवांकडे निर्देश करणारा.. वाऱ्याने प्रीतीची आण त्याच्या अंतरातून तसेच तिच्या अंतरातली प्रीती ची आण मोडू नये असा अर्थ!!

या कवितेत धुंद वारा हा तिचा प्रियकरच असावा.. या वाऱ्याला चेतनागुणोत्तिचे रूप देऊन तसेच वाऱ्याचे रूपक योजून या कवितेच्या अर्थाला आगळा वेगळा आयाम दिला आहे..

सोपी परंतु तरीही कवितेतील भावनेला, आशयाला न्याय देणारी चपखल शब्दयोजना साधली आहे. त्याच वेळी माझ्या मनी, माझे मी मुके असे योजलेले अनुप्रास व त्या व्यतिरिक्त रुपक, श्लेष, चेतना गुणोक्ती, यमक इ. साहित्यिक अलंकारांनी ही कविता एक उत्तम भावगीत ठरते..
या कवितेला श्री विलास आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. व माधुरी सुतावणे यांनी नावाप्रमाणेच मधुर आवाजात गायले आहे.. हे गीत ऐकून रसिकजन मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही..

धुंद वाऱ्यासवे पसरु नये अशी कामना करणारी कवितेतील धुंदी वाचकांच्या मनात घर करून राहते हे नक्की..

© नीलिमा खरे

६-५-२०२४

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विवश ☆ मुग्धा कानिटकर ☆

मुग्धा कानिटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विवश ☆ मुग्धा कानिटकर ☆

इंधन अन्न पाण्याची टंचाई

वाढत राहते रोज महागाई

*

संसार चालवावा कसा तरी

सुख राही मग स्वप्नच उरी

*

इंटरनेटवरचे आहे जग आभासी

सुखदुःख सांगावे तरी कोणासी

*

असाकसा ‌नियतीच मांडते छळ

कुठवर सोसवेल युद्धाची झळ

*

निर्लज्ज संधीसाधूंची मजाच मजा

सामान्य मात्र भोगती भलतीच सजा

*

नाडली जाते गरजवंत जनतेला

कसा मार्ग सुचेना विचारवंताला

*

स्वार्थ बसला सर्वत्र ठाण मांडून

चालणार कसं पण निराश होऊन

 *

माणुसकीची न सोडता कास

 जाऊ सामोरे जीवन संघर्षास

*

राहू एकमेकां सोबत न खचता

काढू मार्ग दैवाला दोष न देता..

© मुग्धा कानिटकर

विश्रामबाग, सांगली – मो. 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग मेघ…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग मेघ…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

काही दिवसांपूर्वी मी माझी ” मल्हार महुडे ” ही कविता रसग्रहणासाठी आपल्याला पाठवली होती.

त्या कवितेतील पाऊस धिंगाणा घालत येणारा आषाढातला पाऊस होता. त्यातले मेघ ” झिंगल्यापरी डोंगर माथ्यावर धडका मारणारे, मत्त गजांसारिखे होते. ”

आताचा हा पाऊस रिमझिमणारा, हळवा आहे. त्याची संतत धार चालू आहे. अशा वेळी एखाद्या विरही नववधूच्या मनाची काय अवस्था असेल बरे!माझ्या या ” मेघ” कवितेतूनच समजून घ्या ना!

मेघ  दिवाकर बुरसे 

सय येई पाहुन मेघ नवा

घननीळ सावळा सवे हवा।। ध्रु।।

 *

प्रजक्त बहरले चोहिकडे

तरुतळी केशरी सडे सडे

शंकासुर डुलतो बघ भगवा

घननीळ सावळा सवे हवा ।।१।।

 *

वेलीवर डुलती कळ्या, फुले

डोहात निळ्या डुलती कमळे

उधळतो गंध हिरवा मरवा

घननीळ सावळा सवे हवा ।।२।।

 *

या निळ्या घनातुनि नीर गळे

झेलती परांवर त्या बगळे

जाहला चिंब बघ विहगथवा

घननीळ सावळा सवे हवा।।३।।

 *

कानावर येई सूर निळा

ऐकून दाटतो उगा गळा

वा-यास गवसला छंद नवा

घननीळ सावळा सवे हवा ।।४।।

 *

घन निळासावळा गगनखुळा

जणु गालावरला तीळ निळा!

तो चुंबाया साजण हळवा

घननीळ सावळा सवे हवा ।।५।।

 *

ही कुंद हवा करि धुंद जिवा

हा अनुभव अगदी नवा नवा

वाटतो तरीही हवा हवा!

घननीळ सावळा सवे हवा ।।६।।

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ संकलक / प्रस्तुती : डॉ. धनंजय देशपांडे

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं सोपं नसत हो sssss 

 

सोपं नसतं हो 

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं !

कारण तिला पसंत नसते 

जी हुजुरी”

झुकत नसते ती कधी जोवर नात्यांमध्ये प्रेमाची भावना असत नाही

तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं

कारण ती शिकलेलीच नसते 

नकली धाग्यात नाती गुंफणे!!

तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या

पाकात बुडवून

आपले म्हणणे मान्य

करवून घेणे!!

तिला तर ठाऊक असते बेधडक

खरे बोलत जाणे!!

फालतू चर्चेत पडणे,

तिच्या स्वभावात बसत नाही

मात्र तिला ठाऊक असते 

तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते

ती वेळोवेळी दागदागिने, कपडेलत्ते 

यांची मागणी नाही करत

ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने

सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती

निरागस स्मितहास्याने

तुमच्या चुकांविषयी ती तुम्हांला

अवश्य बोलणार!! 

पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार

तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत

तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील माहित असत!! 

कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे तिला जमत नाही 

पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,

झुकते जरुर 

पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे

आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व

उधळून देऊ शकते!!

धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच 

अशा स्त्रीवर प्रेम करावे!!

कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,

आणि पुरुषी अहंकाराने,

जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही

कुठल्याही प्रेमाखातर…!

कवयित्री डोमिनैर (पोलंड)

मराठी अनुवाद : भरत यादव 

संकलन : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८५ – – – 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । 

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।।८५।।

अर्थ : योगेश्वरांचे विश्रांतीस्थान असलेले रामनाम जपा. प्रत्यक्ष गौरीहर म्हणजे शंकर देखील नित्यनेमाने आपला ठरलेला रामनामाचा जप पूर्ण करतात. या नामजपाने भगवान शंकरांना देखील शांती मिळते. असा हा श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील.

विवेचन : रामनामाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात की रामनाम हे योग्यांचा विश्राम म्हणजे विश्रांती आहे. इथे समर्थांनी त्यासाठी ‘ योगेश्वर ‘ शब्द वापरला आहे. या शब्दाचे तीन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे तो म्हणजे योगेश्वर भगवान शंकर. आपण श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतो. पांडुरंगशास्त्री आठवले तर आपल्या स्वाध्यायात श्रीकृष्णाला ‘ योगेश्वर भगवानच ‘ म्हणतात. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ म्हणजे जे योगी साधक आहेत, तप करणारे आहेत ते. तेव्हा यातील कोणत्याही अर्थाने योगेश्वर शब्द घेतला तरी सर्व श्रेष्ठ पुरुष शेवटी रामनामाचाच आश्रय घेतात. रामनाम हे त्यांचे विश्रांतीस्थान आहे हेच यातून स्पष्ट होते.

श्रीकृष्ण देखील रामनामाचा जप करत असत असा पुराणात उल्लेख आहे. कलियुगात रामनाम हेच तारक आहे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघेही विष्णूचेच अवतार. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग म्हणून श्रीकृष्णांनी रामनाम घेण्याचा उपदेश केला आहे. राम, कृष्ण आणि शंकर यांच्यातही भेद नाही. जसे भगवान शंकर रामनामाचा जप करीत असतात तसेच श्रीराम देखील भगवान शंकराचे पूजन करीत असतात. शंकराचार्यांनी याच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. परमेश्वर एकच आहे. आपण त्याचे जे कोणते नाम घेऊ, त्यावर आपली दृढ श्रद्धा हवी.

भगवान शंकरांसारखा योगिराणा देखील नित्यनेमाने श्रीरामांचे नामस्मरण करतो. आपल्या नामस्मरणाचा जो नेम आहे, त्यात खंड पडू देत नाही. तपस्वी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांचा दाह रामनामानेच शांत झाला. रामनाम हेच त्यांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. तिथेच ते रमतात. आपणही या रामनामाचे नित्यनेमाने स्मरण करावे. रामनामाची जीवाला सवय असली तरच अंतकाळी आपल्या मुखात रामनाम येईल. रामनामामुळे आपली ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. विकारांमुळे आपली ऊर्जा अधोगामी होते. आयुष्यात जाणीवपूर्वक जर नियमितपणे रामनाम घेतले तर अंतकाळी देखील मुखातून तेच बाहेर पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” रामनाम ही अंतकाळी आपल्या मुखातून बाहेर पडणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे. ” असे नाम आपल्या मुखात अंतकाळी आले तर श्रीराम आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे श्रेष्ठ योगेश्वरांचे ‘रामनाम’ हे विश्रांतीस्थान आहे, तसे माझे मन संसाराच्या धावपळीतून थकल्यावर रामनामात विसावा शोधते का? 

२. वेगवेगळ्या देवांमध्ये किंवा पंथांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझे चित्त कलुषित करतो आहे, की सर्वांभूति एकच तत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो? 

३. माझ्या दैनंदिन जीवनातील विकारांमुळे माझी ऊर्जा ‘अधोगामी’ (खाली) जात आहे की नामस्मरणामुळे ती ‘ऊर्ध्वगामी’ (सकारात्मकतेकडे) प्रवास करत आहे? 

४. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “रामनाम ही अंतकाळी मुखातून निघणारी शेवटची गोष्ट असावी” यासाठी मी आजपासूनच नामस्मरणाचा ‘नित्यनेम’ आणि त्याची गोडी मनाला लावली आहे का?

== == == == == == == 

श्लोक क्र. ८६ – – – 

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेऊनि राहे ।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।।८६।।

अर्थ : विश्राम म्हणजे विश्रांती कुठे आहे तर ज्याच्या मुखात रामनाम आहे तेथेच ! ज्याच्या मुखी रामनाम आहे असा मनुष्य अखंड आनंदाचे सेवन करीत असतो. रामनामाशिवाय अन्य काही करणे म्हणजे व्यर्थ शिणवणे आणि संदेह उत्पन्न करणारे आहे. नाम हेच निजधाम असून ते सर्व शोक हरण करणारे आहे.

(सदानंद – अखंडित आनंद, सीण – शीण/कष्ट/ताप, संदेहकारी – संशय निर्माण करणारा, शोकोपहारी – शोक/दुःख हरण करणारा)

विवेचन :  रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखी हे रामनाम आहे त्याला त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद या गोष्टी प्राप्त होतात. विश्राम म्हणजे विश्रांती. विश्राम शब्दातही ‘ राम ‘ आहे. आपण आनंद मिळावा म्हणून किंवा विश्रांती मिळावी म्हणून आयुष्यभर केवढी खटपट करत असतो ! घर, पत्नी, मुलेबाळे ही सर्व आनंदाची ठिकाणे आहेत असे आम्ही सांसारिक मानतो. तिथेच विश्रांती मिळते असे समजतो. विश्रांतीसाठी काही लोक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहतात. व्यावहारिक दृष्ट्या हे सर्व बरोबरच आहे. परंतु ज्याला अध्यात्मसाधना करायची आहे, अशा व्यक्तीने अंतर्मुख होऊन या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर.

कोणत्याही प्रापंचिक माणसाचा संसाराचा अनुभव संपूर्णपणे सुखद आहे असे होत नाही. तो तिथे सुख शोधू पाहतो पण क्षणिक सुखाचे काही क्षण सोडले तर त्याला दुःख आणि विषादाचीच प्राप्ती होते. मात्र ज्याच्या मुखात रामनाम आहे किंवा भगवंताचे नाम आहे असा माणूस कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विचलित होत नाही. त्याचा आनंद सुखाने वाढत नाही किंवा दुःखाने कमी होत नाही. म्हणून तर भगवंताच्या नामात असलेले संत एका अनोख्या मस्तीत राहताना आपल्याला आढळतात. त्यांच्या मुखावर तेज असते, ते अंतर्यामी असणाऱ्या आनंदामुळे विलसत असते. हा आनंद अखंडित असतो. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ अशी संतांची अवस्था असते ती याचमुळे.

प्रापंचिक माणूस कधी कधी केवळ नामाने मला भगवंताची प्राप्ती खरंच होईल का अशी शंका घेतो. हा संशय वाढत गेला की नामस्मरणावरील त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. तो पुन्हा विषयविकारात अडकतो. तिथे आनंद शोधू लागतो. पण त्याची ही खटपट व्यर्थ शिणवणारी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

” नामपरते तत्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशील झणी । 

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनि श्रीहरी जपे सदा ।।”

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” नामातच भगवंताचा वास आहे. ” म्हणून नाम हेच निजधाम आहे. आपल्याला स्वस्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाम हेच साधन आहे. परमेश्वर वेदांनाही अगम्य आहे म्हणजे वेदही त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तो आपल्या कल्पनेपलिकडे आहे. पण नामात त्याचा वास आहे. म्हणून आपण नाम घ्यावे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. अखंड नामस्मरण करीत राहिल्याने एक वेळ अशी येते की आपले नाम परा वाणीपर्यंत पोहोचते. नामस्मरण अखंड सुरु राहते. देहाला सुखदुःखे जाणवत नाहीत. माणूस त्याच्यापलीकडे जातो. तो अखंड आनंदाचे सेवन करतो.

स्वसंवाद :: 

१. मी ज्या घर, कुटुंब किंवा निसर्गरम्य ठिकाणी ‘विश्रांती’ शोधत आहे, ती मला कायमची शांतता देऊ शकते का ?

२. “केवळ नामाने भगवंत मिळेल का?” अशा ‘संदेहकारी’ (संशयी) विचारांमुळे मी माझे नामस्मरण अर्धवट सोडून पुन्हा संसाराच्या चक्रात तर अडकत नाहीये ना ? 

३. माउलींनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, “वाया आणिक पंथा जाशील झणी” हे ठाऊक असूनही माझे मन इतर निरर्थक मार्गांवर का भटकत असते ? 

४. माझे नामस्मरण केवळ वरवरच्या ‘वैखरी’ वाणीत सुरू आहे, की ते माझ्या अंतर्मनाचा ठाव घेऊन ‘परा’ वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील आहे?

– क्रमशः श्लोक श्लोक ८५  आणि ८६ 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares