मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्ग-फूल… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ स्वर्ग-फूल नीलांबरी शिर्के 

रात्रीच उघडते दार

गंधास येतसे बहर

किती हा बाई !!

*

ब्रम्हाच घडवी जणू

गंध अणू रेणू

तयाचा बाई !!

*

भवताल स्वर्ग होतसे

फुल हे वेगळे कसे

भासते बाई !!

*

भोवती स्वर्ग भासतो

परागी ब्रम्हा वसतो

वाटते बाई !!

*

दिसता हे स्वर्ग-फूल

पाहता पडते भूल

हात जोडले जाई !!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आनंद वारी… ☆ शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – आनंद वारी ? शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

पाऊले चालली 

पालखी संगती

ज्ञानोबा माऊली 

मुखे नाम घेती

*

आनंदाचा कंद

हरी नाम छंद

सारे वारकरी 

नाचले ही धुंद..

*

असूनी संसारी

केले पुण्य भारी

म्हणूनी घडली

आनंदाची वारी..

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हा किती बरसे घन… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ हा किती बरसे घन... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

रान ओले पान ओले ओलावले माझे मन

हा किती बरसे घन

पावसाच्या या ऋतूला पंख फुटले पोपटी

तापलेल्या या धरेला प्रेम हस्ते थोपटी

मांडलेला हा पसारा घेई अवघा व्यापून

हा किती बरसे घन

 *

चित्र हे नयनांपुढे आज रंगांनी खुले

आसमंतातील गंधाने पहा हे मन भूले

श्याम रंगी मेघ बरसे चुंबूनी माझे मन

हा किती बरसे घन

 *

जीवनाचा स्पर्श होता जीवनाचा अर्थ उमगे

अंकुराचे रोप होता एक आशा पालवे

काल नव्हते चैतन्य जे ते आज आले कोठून

हा किती बरसे घन

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८३ – – – 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरे गूण गातो ।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।

अर्थ : मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे.

(ध्यातो – ध्यान करतो, उमा – पार्वती) 

विवेचन :  या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे.

भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे?

आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात, ” कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय? ” जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते?

स्वसंवाद ::

१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का?

२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे ‘रामनाम’ घ्यावे असे मला वाटते का?

३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या ‘ज्ञानाचा तिसरा डोळा’ (विवेक) उघडून तिला भस्म करतो का?

– – – – 

श्लोक क्र. ८४ – – – 

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।।८४।।

अर्थ :  प्रत्यक्ष विठ्ठलाने देवराणा म्हणजे श्रीशंकराला डोक्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराच्या हृदयात मात्र रामनामाचा ध्यास आहे हे आपल्याला माहिती नाही का? मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या महान तपस्वी अशा भगवान शंकराचा दाह रामनामाने शांत झाला. आपल्या अंतकाळी रामनामच आपल्याला सोडवणार आहे.

(विठोने – विठ्ठलाने, देवराणा – देवांचा राजा /महादेव, नेणा – जाणत नाही, तापसी – तपश्चर्या करणारा, चंद्रमौळी शिरावर चंद्र धारण करणारा (शंकर), निवाला – शांत झाला)

विवेचन : रामनामाचे महत्व पुन्हा स्पष्ट करणारा हा सुंदर श्लोक आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे सर्व संत, वारकरी यांचे दैवत. पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो. असा हा भक्तांचा लाडका असणारा पांडुरंग स्वतःच्या मस्तकावर श्रीशंकराला धारण करतो. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवाच्या पिंडीचा आकार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पांडुरंग स्वतःच श्रीशंकराचे गुणगान करतो. या अर्थाने देखील तो शंकराला डोक्यावर घेतो असे म्हणता येईल. कारण एखाद्याचे गुणगान करणे म्हणजे त्याला मस्तकी बसवणे. तेच पांडुरंगाने केले आहे. पण समर्थ पुढे म्हणतात की ज्या विठ्ठलाने श्रीशंकराला आपल्या शिरावर घेतले आहे, त्या भगवान शंकरांच्या हृदयात देखील रामानामाचा ध्यास आहे. या ठिकाणी श्रीरामाचे आणि रामनामाचे महत्व फारच सुंदररित्या आपल्याला पटवून दिले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थ रामनामाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी वारंवार श्रीशंकराचे उदाहरण का देत आहेत याचाही विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आणि वैराग्य आहे, तेच जर नामाचा आश्रय घेत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा अहंकार गळून पडायला हवा, हाच समर्थांचा यामागील हेतू असावा.

श्रीशंकरांना रामनामाचा ध्यास लागलेला आहे. रामनाम म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. अशा पद्धतीचा ध्यास आपल्यालाही लागावा अशीच समर्थांची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महान तपसामर्थ्य अंगी असणारे भगवान शंकर जेव्हा सातत्याने रामनाम जपतात, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! या श्लोकात भगवान शंकरांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात, “स्वये निवाला तापसी चंद्रमौळी. ” इथे निवाला शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे रामनामामुळे त्यांच्या जीवाला शांती लाभली. दुसरा अर्थ आपल्याला परिचित आहे. तो म्हणजे भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल (विष) प्राशन केले तेव्हा त्यांच्या कंठाचा जो दाह होऊ लागला, तो कशानेही शमेना. त्यांनी मस्तकी गंगा धारण केली, गळ्याभोवती शीतल नाग धारण केला, शीतल असणारा चंद्र मस्तकी धारण केला. परंतु त्यांचा दाह केवळ रामनामानेच शांत झाला. या अर्थानेही ‘ निवाला ‘ हा शब्द वापरला आहे.

श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यांना नेहमी तो समोर दिसत असतो. म्हणून ते कधीही ‘ तो राम ‘ म्हणत नाही. तर ‘ हा राम ‘ असे म्हणतात. एवढी त्यांची रामाशी एकरूपता आहे. पांडुरंगाने ज्यांना मस्तकी धारण केले आहे असे श्रीशंकर सुद्धा रामानामाचा ध्यास घेतात, तेव्हा असे पावन, पवित्र असे रामनाम आपली देखील अंतकाळी या भवसागरातून सुटका करील असे समर्थांना सांगायचे आहे.

स्वसंवाद :: 

१. पंढरीचा विठ्ठल आणि कैलासीचा राणा शिव यांच्यात जर कोणतेही द्वैत नाही, तर मी मात्र जाती-पाती, पंथ किंवा संप्रदायांच्या खोट्या भेदांमध्ये का अडकून पडलो आहे?

२. संसारातील वेगवेगळ्या संकटांमुळे किंवा वासनांमुळे जेव्हा माझ्या मनाचा ‘दाह’ होतो, तेव्हा मी तो शांत करण्यासाठी बाह्य गोष्टींकडे धावतो, की भगवान शंकरांप्रमाणे रामनामाचा आश्रय घेतो?

३. समर्थांना प्रभू श्रीराम जसे ‘हा राम’ म्हणून अगदी जवळ (अंतर्यामी) भासतात, तशी आत्मीयता आणि ओढ मला कधी नाम घेताना जाणवते का?

४. “अंतकाळी हाच राम आपल्याला सोडवणार आहे” हे अंतिम सत्य ठाऊक असूनही, मी माझा आजचा अमूल्य वेळ केवळ नश्वर गोष्टींची चिंता करण्यातच घालवत आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८३ आणि ८४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०३ – नातं मैत्रीचं…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०३ – विजय साहित्य ?

☆ नातं मैत्रीचं…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्द पडतात फिके

मैत्री काळजाची सर

तिच्या वर्णनात जाई

भरूनीया  प्रेम घर…! १

*

भेट असो रोज तरी

नाही भागत तहान

नातं मैत्रीचे देतसे

सुख दुःख वरदान…! २

*

मैत्री कर्तृत्वाचा झरा

मैत्री राग लोभ मोह

काळजात दडलेला

मैत्री भावनांचा डोह…! ३

*

मैत्री  मंदिराचा पाया

“मैत्र”  प्रासादिक नाते

असो नर किंवा नारी

दळी गुणदोष जाते…! ४

*

मान अपमाना नसे

मनी तिळमात्र जागा

नातं मैत्रीचे आगळे

एक स्नेहांकित धागा…! ५

*

अर्धा कप चहासाठी

मैत्री भांडणाचा पूर

दिठी आणि मिठीतून

लावी जीवा हुर हुर..! ६

*

मनातलं बोलताना

जपे गुपितांचा ठेवा

“मैत्री”  शब्दातीत नाते

नाही ईर्षा नाही हेवा…! ७

*

“मित्र”  आधाराचा हात

“मैत्री”  आयुष्याचे रूप

बंधनांच्या पलीकडे

जळे जीवनाचा धूप…! ८

*

हवी मैत्री पदोपदी

आयुष्याच्या प्रवासात

कधी “ओवी”  कधी “शिवी”

अंतरीच्या आरश्यात…! ९

*

मैत्री कधी मोबाईल

कधी फेसबुक नोट

नातं मैत्रीचं लाघवी

नको अंतरात खोट…! १०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मृद्गंध…☆ ज्योत्स्ना तानवडे☆

ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ मृद्गंध ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सागर घनदाट मेघांचा उचंबळतो अंबरी

अतीव इच्छा त्यातुनी याव्या सरी वरती सरी ||

*

काळ्या करड्या फिकट पारव्या मेघांच्या या लाटा

 झाडांमधुनी जणू शोधतो वारा चोर वाटा ||

*

भिरभिर वारा पानांमधुनी छेडीतसे धून

क्षणात येते मळभ वेढुनी गायब होते ऊन ||

*

ऊन काहिली सोसेना तगमग हो जीवाची

तहानलेली सृष्टी पाहे वाटुली पावसाची ||

*

वृक्ष डोलती सळसळ पाने वारा धावत आला

सोबत घेऊनी मृद्गंधा सांगावा देता झाला ||

*

अंगे भिजली मने मोहरली थेंब आले आले

जलधारांनी सचैल सारे चिंब चिंब मन झाले ||

*

मृद्गंधाने धुंदी येई जलधारांनी तृप्ती

विश्व व्यापुनी अभंग राहे नभ मातीची संतृप्ती ||

*

(संतृप्ती म्हणजे संपूर्ण समाधान)

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा घनगर्द ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी  ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

 

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा घनगर्द प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

पाऊस असा घनगर्द बरसतो

 रातही काजळकाळी

का गीत असे ओठात माझीया

 असल्या भलत्या वेळी?

 

ते रुप पाहण्या नयने आसावली

मनमयूर नाचे वेडावून गोकुळी

मधुसूर बासरी करते मोहक खेळी

मन गंध-धुंद, कानात गुंजती,

 आज सख्याच्या ओळी…

 

घनव्याकूळ भेटी घडल्या कातरवेळी

अन तरंग उठती श्यामल यमुनाजळी

गारुड करीतसे अजुनी तो वनमाळी

का नीज नसे डोळ्यात?

 जाळते रात, अशी काजळी…

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समर्पण

पांडुरंगाची निर्व्याज भक्ती करता करता तुकाराम महाराजांच्या तनामनात विठु माऊली विषयी समर्पित भावना निर्माण झाली आहे. त्यासंबंधी काही अभंगांचे आपण येथे विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांना सर्व जग विष्णुमय वाटते आणि साधकांनाही ते हेच सांगतात.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म/

भेदाभेद भ्रम अमंगळ//

 आईकाजी तुम्ही भक्त भागवत/

 कराल ते हित सत्य करा//

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर/

वर्म सर्वेश्वर पूजनाचे//

तुका म्हणे एका देहाचे अवयव/

सुखदुःख जीव भोग पावे//

ते असे मानतात की, सर्व जग, त्यातील सजीव प्राणी आणि निर्जीव जड वस्तू हे सगळेच विष्णुमय आहे असे जाणावे. एखाद्या दगडाला शेंदूर फासल्याने त्याला देवत्व येते ना? हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, वाद

-विवाद म्हणजे भ्रम आहे. भागवत भक्त म्हणजेच भगवंताचे निस्सीम भक्त! तुम्ही हे ऐका आणि स्वहित करून घ्या असे संत तुकाराम कळकळीने सांगत आहेत. कारण ते स्वतः या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये, त्यातच सर्वेश्वराचे पूजन आहे. पुढे महाराज सांगत आहेत की, सर्व जीव हे एकाच देहाचे अवयव आहेत, त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगावी लागतात. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर पर्यायाने एका भगवंताचाच त्रास समजावा. भागवतात केलेला विश्वात्मकाचा उपदेश याहून वेगळा नाही. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती स्वतःला वाहून घेण्याची ही कृती आहे.

या अभंगात महाराज स्वतःची मनोवस्था अधिक स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात,

नींदी कोणी मारी/ वंदी कोणी पूजा करी//

मज हेही नाही तेही नाही/

वेगळा दोहीपासून//

देह भोग भोगे घडे/ जे जे जोडे ते ते बरे//

अवघे पावे नारायणी/ जनार्दनी तुकयाचे//

तुकाराम महाराजांची कोणी निंदानालस्ती करोत, किंवा कोणी त्यांना मारोत, (शब्दांचा मार)

कोणी त्यांना वंदोत नाही तर त्यांची पूजा करोत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही. त्यांना त्याचे सुखही नाही किंवा दुःखही नाही. सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग दैववशात केवळ देहाला भोगावे लागतात. संत तुकारामांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे जे काही बरे वाईट भोग आहेत ते एका जनार्दनाकडे, नारायणाकडे जातात. नारायणापाशी तुकाराम महाराजांच्या समर्पणाची ही अवस्था आहे.

सकळ चिंतामणी शरीर/

जरी जाय अहंकार समूळ आशा//

निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी/

निर्मळ स्फटिक जसा//

मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/

येती तया पासी अवघे जन//

तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/

मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

हरीच्या गुणे गर्जताती सदा/

आनंद तया मानसी//

तन मन धन दिले पुरुषोत्तमा/

आशा नाही कवणाची//

तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा/

काय महिमा वर्णू त्याची//

या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत. ज्याचा सर्व अहंकार विनाश पावला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी ज्याच्यामध्ये जराही उरली नाही, तो स्फटिका समान निर्मळ आहे. त्याचे सर्व शरीर जणू चिंतामणी आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशीला जाण्याची त्याला आवश्यकता नाही. उलट सर्व तीर्थ अशा पुरुषा पाशी येतात. कारण सर्व तीर्थाना पावन करणारा तो स्वतःच एक तीर्थस्थान झाला आहे. त्याच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला जपमाळ ओढायची काही आवश्यकता नाही. तो स्वतः सर्व भूषण मंडित आहे. जो सतत हरीचे गुणगान करीत नामघोष करतो तो निरंतर आनंदातच असतो. ज्याने आपले तन, मन, धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे, तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज हे स्वतः अशाच पुरुषांपैकी एक आहेत, म्हणून तर आपण त्यांना संत तुकाराम असे ओळखतो.

तुकाराम महाराजांना सर्वत्र एक पांडुरंग दिसत आहे. ते म्हणतात—-

दाता नारायण/ स्वयेभोगीता आपण//

आता काय उरले वाचे/ पुढे शब्द बोलायचे//

देखती जे डोळे/ रूप आपुलते खेळे//

तुका म्हणे नाद/ झाला अवघा गोविंद//

सर्व प्राण्यांना सर्वकाही देणारा दाता दुसरा तिसरा कोणी नसून नारायणाच आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच आहे. याचाच अर्थ असा की तुकाराम स्वतः नारायणमय झाले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग ते म्हणजे नारायण घेत आहे. अशा परिस्थितीत मी मिळवले, मी भोगले असे म्हणायला जागाच उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्यांना नारायणाचेच रूप दिसते. (या ठिकाणी भक्त प्रल्हादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.)

नर आणि नारायण यामध्ये भेद असा राहिलेलाच नाही. जेवढा शुद्ध नाद आहे, तेवढा गोविंद झाला आहे.

म्हणून खेळ मांडीयेला ऐसा/

नाही कोणी दिशा वर्जीयली//

माझिया गोते हे वसले सकळ/

न देखी जे मूळ विटाळाचे//

करुनी ओळखी दिली एकसरे/

न देखो दुसरे विषमासी//

तुका म्हणे नाही काळापाशी गोवा/

स्थितीमति देवावाचुनिया//

वरील अभंगात तुकाराम पुन्हा एकदा स्वतःच्या स्थितीविषयी बोलतात. ते म्हणतात, ” मी असा खेळ आरंभला आहे की त्यामध्ये कोणतीही दिशा वगळली नाही. सर्व दिशा शुभ आहेत. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे. त्याने सर्व जग व्यापले आहे, त्यामुळे विठ्ठलाचे मूळ जो भेदभाव तो माझ्या ठिकाणी उरलाच नाही. सर्वत्र पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्याने स्वतःच्या स्वरूपाची मला ओळख करून दिल्यामुळे मी त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहू शकत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही की गुंतलेले नाही. मी कालातीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. “

तुकाराम महाराजांचा देहाभिमान संपूर्ण तया गळून पडला आहे, परब्रम्हाशी ते एकरूप झाले आहेत.

या संदर्भात आणखी काही अभंगांचा परामर्श आपण पुढील लेखात नक्की घेऊ.

क्रमशः… ३१ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्त्री हट्ट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्त्री हट्ट! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

हट्ट कसा करायचा ते 

बायकांनाच कळतं,

पक्षी काय मानव काय

यात त्यांचंच फावतं!

*

पंख पसरला उन्हात

थंड ठेवण्या डोके प्रियेचे,

रग लागली पंखाला

सांगू कसं आता वाचे?

*

जरी धरे छत्र प्रियेवरी 

राग पहा नयनातला,

समस्त नवऱ्यांना कळावा

भाव त्याच्या मनातला!

भाव त्याच्या मनातला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सृजनानंद – ☆ डॉ. स्वाती पाटील ☆

डॉ. स्वाती पाटील

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – सृजनानंद  ? ☆ डॉ. स्वाती पाटील 

ओढ म्हणू की आनंदाची शिरशिरी

अंगातून वाहते तरंगाची थरथरी

हसले उन्हात चांदणे या वनांमध्ये

लेऊन रंगांची रंगबिरंगी मखमल सुंदरी

*

थुई थुई नाचतो झुकतो थोडा पुढे

कळेना राणी मज शोधू तुला मी कुठे

ओढ दाटली मिलनाची तुझ्या ग सखे

बरसतो मनी मल्हार का कोडे अता सुटे

*

हा संभार नाही केवळ मिलनाचा गडे

निळे निळे लक्ष डोळे तुझ्या वाटेकडे

येशील कधी पाहतो वाट आसमंत हा

मागेन आता हे सृजन सडे मी नभाकडे

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares