मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे केवळ भारतात (प. बंगाल, चेन्नई, हैदराबाद, मैसूर, अर्नाकुलम, लखनौ) व बांगलादेशातच नव्हे तर आशिया, युरोप, रशिया खंडातील अनेक देशात स्थापित करण्यात आले आहेत. उदाहरणादाखल कांही नावे बघू.

  1. गॉर्डन स्क्वेअर, लंडन, यू के
  2. फ्रेंडशिप पार्क, मॉस्को, रशिया
  3. कॅथलिक युनिव्हर्सिटी, ल्युवेन, बेल्जियम
  4. बॅलटनफर्ड, हंगेरी
  5. लोझान युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड
  6. भारतीय दूतावास, बीजिंग, चीन
  7. सोल, द. कोरिया
  8. बोरोबदूर, माजेलिंग, योग्यकार्टा, जावा, इंडोनेशिया
  9. तुर्कमेनिस्तान
  10. डब्लिन, आयर्लंड
  11. स्लिगो, आयर्लंड
  12. मक्वारी विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया
  13. कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया

—– 

☆ गीत : २८ ☆

OBSTINATE are the trammels, but my heart aches when I try to break them.

Freedom is all I want, but to hope for it I feel ashamed. I am certain that priceless wealth is in thee, and that thou art my best friend, but I have not the heart to sweep away the tinsel that fills my room.

The shroud that covers me is a shroud of dust and death; I hate it, yet hug it in love. My debts are large, my failures great, my shame secret and heavy; yet when I come to ask for my good, I quake in fear lest my prayer be granted.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत २८ ☆

*

बंधनांस झुगारता

वेदनेचा दाह उरी

मुक्तता हवी जरी 

न दिसे ती दूरवरी॥

*
अमूल्य धनदौलत तू

तूच प्राणसखा हरी

सभोवती झगमगाट

त्यागण्या न धीर परी॥

*
लौकिका कवटाळून

बसलो जरी नावडे

अप्रिय जे तेच प्रिय 

कल्पना ही आवडे॥

*

अपयशी पदोपदी

ऋणाईत असे जरी

पापांचे मम ओझे

भासतसे जड भारी॥

*

या सर्वांतून सुटका हो

जरी तुझी कृपा मिळो

प्रार्थित मी, परी मनी

वांछित ती नच मिळो॥

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत २९ ☆

HE whom I enclose with my name is weeping in this dungeon. I am ever busy building this wall all around; and as this wall goes up into the sky day by day I lose sight of my true being in its dark shadow.

I take pride in this great wall, and I plaster it with dust and sand lest a least hole should 

be left in this name; and for all the care I take I lose sight of my true being.

—–

मराठी भावानुवाद : गीत २९

*

माझ्या नावात जो अध्याहृत आहे

तो या कैदखान्यात रडतो आहे

मी त्या भोवती उंच भिंती बांधतो आहे

जसजशा या भिंती आकाशात घुसत आहेत

तो माझ्या नजरेपासून हटत आहे

मला या भिंतींचा अभिमान आहे 

मी त्यांना काळजीपूर्वक गिलावा करतो आहे

जेणेकरून त्याची खूणही राहणार नाही

हुश्श, आता त्या भिंतीच्या आतला तो…

माझा सद्सद्विवेक, माझ्या दृष्टिपथातही नसेल!!

 

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३० ☆

I CAME out alone on my way to my tryst. But who is this that follows me in the silent dark?

I move aside to avoid his presence but I escape him not.

He makes the dust rise from the earth with his swagger; he adds his loud voice to every word that I utter.

He is my own little self, my lord, he knows no shame; but I am ashamed to come to thy door in his company.

—-

☆ मराठी भावानुवाद : गीत ३० ☆

*

तव भेटीस्तव आतुर झालो

संकेत स्थळी जाऊ लागलो॥

*

एकटाच मी जातो पुढती

सखे सोयरे मागे पडती॥

*

सतत परंतु कुणी मागे येई

त्यातून सुटका माझी न होई॥

*

तोऱ्यातच तो धुरळा उडवी

माझ्या शब्दा तीव्र बनवी॥

*

कळले मजला हे प्रभुराया

क्षमा करी मज पडतो पाया॥

*

माझ्यामधला अहंहे घडवी

लाज शरम ना त्याला अडवी॥

*

त्याच्या सोबत तुझिया दारी

येऊ न शकतो तव दरबारी॥

*

येईन तेंव्हा, देईन सोडूनि

अहंकार मम जेंव्हा त्यागुनि॥

*

– क्रमशः भाग १०.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणिक व्यथा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गणिक व्यथा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

युगा-युगाची रे मी गणिका

कधी होईन मी कान्होपात्रा

सांग युगाच्या रे पांडुरंगा

कधी संपेल ही भोगयात्रा.

*

का ही काया केवळ भवाची

तुझ्या दयेला अपात्र मित्रा

भक्ताचा तू सखा जीवलग

कधी बदलशी नारी चित्रा.

*

का मी लालसा दासी अभागी

मी न जानकी सावित्री गोत्रा

छळ देहाचा सुख क्षण नरा

साक्षात दर्शन दे या नेत्रा.

*

रे बा कृष्णा-विष्णू तू विठ्ठला

संहार कलि भार नक्षत्रा

युगा-युगाची रे मी गणिका

कधी होईन मी कान्होपात्रा

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लागे हुरहुर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? लागे हुरहुर… ? श्री आशिष  बिवलकर ☆

कामाचा माणूस | गेला दूर दूर |

लागे हुरहुर | महाराष्ट्रा ||१||

*

शेवट पर्यंत | सोबत फाईल |

मृत्यूला स्माईल | व्यस्तपणे ||२||

*
यमराज घाले | वाटेमध्ये रेडा |

नेला कामवेडा | मर्द ऐसा ||३||

*

दादा माणसाची | एक्सिट अकाली |

काळजा रुतली | खोलवर ||४||

*

काळाने पडदा | अवेळी ओढला |

सामान्य रडला | निरोपाला ||५||

*

मंत्रालय सुनं | सुन्न बारामती |

अवघड किती | पचवाया ||६||

*

अनंताचा पुत्र | गेला अनंतास |

न बसे विश्वास | आम्हां जना ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निलांबरातील मस्त चांदणे

गस्त घालते माझ्या भवती

साद घालती मिळून सारी

मनात रुजली सतेज नाती

 *

खुळ्या पावसा किती धावशी

भिरभिरणाऱ्या वा-यासंगे

स्वप्ना मधले स्पर्श सुखाचे

अजून सगळे आहेत जागे

 *

भल्या पहाटे निवांत वेळी

मंद झुळूक वाऱ्याची येते

आठवणींच्या कुरणा मधुनी

मला फिराया सोबत नेते

 *

प्रकाशदाता सूर्य उगवतो

अंधाराला विरळ कराया

किरण उबीचे झेलत जाता

पुलकित होते माझी काया

 *

चैतन्याचा साज लेवुनी

चराचराला हात जोडते

ध्यानमग्न मग होता होता

स्वर्ग सुखाला कवेत घेते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आई…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आई” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

ती होती तेव्हा नव्हता आठव रोजच किंवा कधीतरी

ती नाही आता म्हणूनही ना दु:ख रोज वा कधीतरी

*

मी नाही ऐकत शब्द कुठेही मनी दाटते श्रवण भावना

ती शब्दांच्या पलिकडून मजसी बोलत असते कधीतरी.

*

ती रुंजी घाले मनात अवचित व्यापुन टाकित भाव भावना

ती नाही याची जाणीव व्यापुन खिन्न होतसे कधीतरी

*

ती रागे भरते, चिडते, कुढते मज जाणिव देती सर्व भावना

मी देह हरवतो रडतो चिडतो भांडत बसतो कधीतरी

*

ती आहे ऐसे अजुन वाटण्याइतुकी मजला पुरे भावना

मी प्रेम जगावर करतो निर्जीवावरीही कधीतरी

*

दुःखीकष्टी त्रयस्थ कोणी त्याचेसाठी तीच तगमगे

मी आता गुंतुन बसतो त्या त्रयस्थांमधे कधीतरी

*

ती अशीच करतसे नेहमी नेहमी कुठेही गुंतुन बैसे

मी तिच्यात गुंतत असतो सावरतो मग मी कधीतरी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बंधन ? की वरदान ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बंधन ? की वरदान ? ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

रोप फुलाचे 

जेंव्हा लावले

चालीरितीचे

बंधन आले !

*

फूल लागता

भ्रमर येतील

भिंतीचे बंधन

उभे राहीले !

*

बंधनात ते

वाढू लागता

कळ्था फुलांचे

घोस जन्मले !

*

त्याच क्षणाला

हिरव्या तरूला

तरूपणाचे 

वरदान लाभले !

*

तारुण्यसुलभ

भावनाच ती

ओलांडती मग

बंधन आपुले !

*

बंधन भिंतीवर

घोस फुलांचे

बंधनासही

सजवीत गेले !

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देऊन तर पहा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देऊन तर पहा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

भविष्याचे चित्र रंगवा,

मात्र

वर्तमानात जगताना भूतकाळ विसरून जा,

आणि भविष्य उज्वल करण्याच्या नादात,

स्वतःला मात्र विसरून जाऊ नका.

कायम

मागत राहण्यापेक्षा कधीतरी

देऊन तर पहा…

 

मागण्याच्या लाचारी पेक्षा, दातृत्वाने मिळणारा आत्मानंद तर पहा…

 

जीवनातल्या आघाड्यावर हरल्यावर,

एकटं पश्चात्तापात जळण्यापेक्षा, मित्रांच्या खांद्यावर आपलं डोकं

ठेवून तर पहा…

 

मित्राच्या मायेच्या स्पर्शाने, मनातले वादळ कसे शांत होते ते तर पहा…

 

आपल्याला काय हवय?

पेक्षा कोणाला आपली गरज आहे का? हे तर पहा… विष्णूला तुळस प्रिय,

शिवाला बेलप्रिय आपल्याजवळ जे आहे ते देण्यापेक्षा त्याला काय हवे ते देण्यातच खरा आनंद आहे

देऊन तर पहा…

 

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८० – विदेशी मेवा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८० – विजय साहित्य ?

☆ विदेशी मेवा…!

आरोग्य दायी, फळ किवीचे

पहा खाऊनी, विदेशी मेवा

आंबट गोडी, स्वाद अनोखा

व्हिटॅमिनचा, पौष्टिक ठेवा..!

*

जाड सालीचे, तपकिरी‌ हे

पेशी पांढऱ्या, वाढविणारे

शक्ती वाढवी, पचन सुधारी

बद्ध कोष्ठता, घालवणारे…!

*

रक्त वाहिन्या, होती सक्षम

भिती घालवी, मधुमेहाची,

त्वचा निरोगी, किवी ठेवते

कमी कॅलरी, किवी फळाची..!

*

झोप चांगली, लागे सकला

फोड किवीची, पहा खाऊनी

हाडास देई, हे मजबूती

स्वाद किवीचा, पहा चाखूनी..!

*

चिनी देशाची, ही गूजबेरी

चिक्कू सारखे, जरी वाटले

काप करूनी, किंवा सोलून

फळ किवीचे, मनी दाटले…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आता असे वाटते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आता असे वाटते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

प्रेम केले की इबादत

विश्व सारे हरवून बसलो.

बरबाद झालो खेळात या

प्रलोभनाला पूर्ण फसलो.

शायरी केली बदनाम झालो

जिंदगी उद्वस्त झाली.

भान आले जाग आली

नशाच सारी उतरुन गेली.

आता असे वाटते तरीही

पुनःपुन्हा जन्मास यावे.

प्रमाद ते पुन्हा करावे

परतून गुन्हेगार व्हावे.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सगुण भक्ती

परमेश्वर चराचरात व्याप्त असून तो निर्गुण निराकार आहे असे म्हटले जाते, परंतु सर्वसामान्य माणसाला परमेश्वराच्या रूपात काहीतरी वस्तूची आवश्यकता असते. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे वेड लागलेला एक सर्वसामान्य प्रापंचिक माणूस. त्यामुळे त्यांची भक्ती सगुण भक्ती होती. त्यांचे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारे कितीतरी अभंग आपल्याला त्यांच्या गाथेत वाचावयास मिळतात.

सुंदरते ध्यान/ उभे विटेवरी/

 कर कटावरी/ ठेवोनिया//

 तुळशीहार गळा/ कासे पितांबर/

 आवडे निरंतर /हेचि ध्यान//

 मकर कुंडले /तळपती श्रवणी/

 कंठी कौस्तुभ मणी/ विराजित//

 तुका म्हणे माझे/ हेचि सर्व सुख/

 पाहिन श्रीमुख/आवडीने//

 या ओळी वाचल्या की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विठोबाचे एक काल्पनिक रूप उभे राहते व आपोआपच हात जोडले जातात.

 सदा माझे डोळा/ जडो तुझी मूर्ती/

 रखुमाईच्या पती सोयरिया//

 गोड तुझे रूप/गोड तुझे नाम/

 देई मज प्रेम/ सर्वकाळ//

 विठू माऊलीये /हाचि वर देई/

 संचरोनी राही/ हृदयामाजि//

 तुका म्हणे काही/ न मागे आणिक/

 तुझे पायी सुख/सर्व आहे//

मनाची अशी अवस्था केवळ तुकारामांचीच नव्हे तर सर्व भक्तांची होते.

वेगवेगळ्या शब्दात महाराज विठ्ठलाचे वर्णन करतात.

 राजस सुकुमार /मदनाचा पुतळा/

 रवी शशीकळा/लोपलिया//

 कस्तुरी मळवट /चंदनाची उटी//

 रुळे माळकंठी/ वैजयंती/

 मुगुट कुंडले /श्रीमुख शोभले/

 सुखाचे ओतीले/ सकळही//

 कासे सोनसळा/ पांघरे पाटोळा/

 घननिळ सावळा/ बाईयानो//

 कर कटावरी / तुळशीच्या माळा/

 ऐसे रूप डोळा/ दावी हरी//

 *गरुड पारावरी/ उभा राहिलासी/७

 आठवी मानसी/ तेची रूप//

 झुरोनी पांझरा/ होऊ पाहे आता/

 येई पंढरीनाथा /भेटावया//

 तुका म्हणे माझी/ पुरवावी आस/

 विनंती उदास/ करू नये//

विठोबाची अशी मूर्ती तुकाराम महाराजांच्या कल्पनेत आहे आणि ते रूप पाहण्यासाठी ते अतिशय उतावीळ झाले आहेत. ते गोपींच्या भूमिकेतून आपल्याबरोबरच्या गोपींना (भक्तांना) श्रीकृष्णाच्या(विठ्ठलाच्या) रूपाचे वर्णन करतात. येथे मूळ गोपी म्हणजे त्यांचे मन

आणि सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक या वर्णनात आहे.

संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे कनवाळू रूप वर्णन केले आहे. जो खरा भक्त परमेश्वराची सेवा करतो, त्या भक्ताचा परमेश्वर कायम ऋणी असतो, भक्ताचे ऋण परमेश्वर सदा फेडतोच. कसे ते या खालील अभंगातून पहा.

भक्तऋणी देव/ बोलती पुराणे/

 निर्धार वचने/ साच करी//

 मागे काय जाणो/आईकिली वार्ता/

 कबीरासाते जाता/घड्या वाटी//

 माघारीया धन/ आणिले घरासी/

 मेघे केला त्यासी/ त्याग तेणे//

 नामदेवाचीया /घरासी आणिले/

 तेणे लुटीयेले/ द्विजा हाती//

 प्रत्यक्षासी काय /द्यावे हे प्रमाण/

 एकोबाचे ऋण /फेडियेले//

 बीज दळूनिया/ केली आराधना/

 लागे नारायणा/ परणे ते//

कबीराने जेव्हा ब्राह्मणाच्या रूपात वस्त्रासाठी भीक मागत असलेल्या माणसाला(देव) अर्धे वस्त्र दिले, तेव्हा देवाने कबीराच्या घरी जाऊन ऋण फेडले. नामदेवाने जेव्हा त्याच्या जवळची कापडे उघड्या दगडांवर पांघरली, तेव्हा त्याची किंमत देवाने त्याच्या घरी आणून दिली. एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले.

या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर निर्गुण, अव्यक्त असला तरी हातात चक्र, गदा घेऊन तो भक्तांना स्वतःच्या हृदयाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो.

 अव्यक्त ते आकारले/ रूपा आले गुणवंत/

 तुका म्हणे पुरवी इच्छा/ जया तैसा विठ्ठल//

सगुणाची पूजा म्हणजे, सगुण रूप हे माध्यम आहे. त्या माध्यमाद्वारे भक्त परमेश्वराची पूजा, सेवा करू शकतो.

गाथेतील हा अभंग पहा.

 केला मातीचा पशुपती/

 परी मातीसी काय महती? //

 शिवपुजा सिवासी पावे/

 माती मातीमाजि सामावे//

 तैसे पूजिती आम्हासी संत/

 पूजा घेतो भगवंत//

 केला पाषाणाचा विष्णू/

 परि पाषाण नव्हे विष्णू//

 विष्णु पूजा विष्णूसी अर्पे/

 पाषाण राहे पाषाण रूपे//

 केली काशाची जगदंबा/

 परी कासे नवे अंबा//

 पूजा अंबेची अंबेला घेणे/

 कासे राहे कासेपणे//

तुकाराम संत आहेत. शास्त्र पंडित नव्हेत. म्हणून ते सगुण पूजा मानतात. ते प्रश्न विचारतात की जर अवघे विश्व ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमेतही ब्रह्म असायलाच हवे. प्रतिमाही देवच आहे. ब्रह्मा वाचून रिक्त असे काहीच नाही, मग दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीत ब्रह्म कसे नसेल.

ते असेही म्हणतात की त्यांना परमेश्वराची खूप स्तुती करायची आहे, परंतु स्तुती करण्यास त्यांची वाणी कमी पडते. कारण परमेश्वराच्या स्वरूपाच्या एकेका केसावर  हजारो ब्रम्हांडाची घडामोड होत आहे.

 स्तुती करू तरी/ नवे ची या वेदा/

 तेथे माझा धंदा /कोणीकडे//

 परी हे वैखरी /गोडाली सुखे/

 रसना रसमुखे/ इच्छितसे//

परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे. त्याची अनंत रुपे आहेत परंतु ज्याचा जसा भाव असेल तसे त्याच्या इच्छेनुरूप भगवंत सगुण रूप धारण करतो.

 तुज वर्णी ऐसा तुजविण नाही/

 दुजा कोणी तीही त्रिभुवनी//

 सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा/

 चिरल्या धडा जिंव्हा त्याच्या//

 अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा/

 निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा//

 रूप नाम घेसी आपल्या स्वइच्छा/*

 होसी भाव तैसा त्या कारणे//

 तुका म्हणे जरी दावीसी आपणा/

 तरीच नारायणा कळो येसी//

 तुकाराम महाराजांच्या परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीतून पांडुरंगाचे सगुण रूप त्यांच्यासमोर… साकार झाले आहे.

 क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares