मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही स्मरुन गेले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ काही स्मरुन गेले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कांही स्मरुन गेले

कांही विसरुन गेले.

भरुन मेघ आले

ओसरुन तेही गेले.

शिलकीचे कांही पाणी

साचून ओघळ झाले.

पुलाखालून एरवी उरले

सर्वस्व वाहून गेले.

शैशवात सोडली जी

सैरभैर झाली नावं.

हरवून आता गेले

स्मरणातले रम्य गाव.

नकोस साकव बांधू

ऐलपैल सांधणारा.

संयमित समजुतीचा

सांभाळीन मी किनारा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कविता माझ्या नि तुझ्या… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ कविता माझ्या नि तुझ्या ☆ संगीता कुलकर्णी ☆

कविता म्हणजे भावनांच्या आकाशात उमटलेला शब्दांचा चंद्र…

ती कधी मनाच्या वेदनांना स्पर्श करते तर कधी आनंदाच्या क्षणांना सुंदर रंग देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हे केवळ शीर्षक नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक हळवा प्रवास आहे.

कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते ती मनाच्या भावनांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती असते.. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे बोलून व्यक्त करता येत नाहीत तेव्हा कविता आपल्या भावना अलगद शब्दांत उतरवते. “कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन मनांमधील नात्याची भावनांची आणि आठवणींची एक सुंदर सांगड होय.

तुझ्या कवितेत प्रेमाची कोवळी चाहूल असते… तुझ्या प्रत्येक ओळीत स्वप्नांचे मोर नाचत असतात… तुझे शब्द जसे मंद वाऱ्याच्या झुळुकीसारखे मनाला स्पर्शून जातात तसेच माझ्या कवितेत आयुष्याच्या अनुभवांचे गहिरे रंग असतात. माझ्या शब्दांत कधी संघर्षाची कहाणी असते तर कधी आठवणींच्या पावसात भिजलेले क्षण… या दोन्ही कविता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या जीवनाचे सुंदर गीत बनून जातात… तसेच

तुझ्या कवितेत प्रेमाचा गोडवा असतो तर माझ्या कवितेत आयुष्याचे अनुभव. तुझ्या ओळींमध्ये स्वप्नांची रंगीत दुनिया असते तर माझ्या शब्दांत वास्तवाची जाणीव… पण या दोन्ही कविता एकत्र येतात तेव्हा त्या जीवनाचा अर्थ अधिक सुंदर करून जातात.

कविता ही माणसाच्या मनाचा आरसा असते. मनात दडलेले भाव न सांगितलेली दुःखे, अपूर्ण स्वप्ने आणि निरागस आनंद हे सर्व कविता सहज व्यक्त करते. कधी एखादी कविता डोळ्यांत अश्रू आणते तर कधी तीच कविता जगण्याची नवी प्रेरणा देते म्हणूनच कविता ही केवळ साहित्य नसून ती आत्म्याची भाषा आहे.

कविता माणसाला संवेदनशील बनवते. आनंद, दुःख, विरह, मैत्री, निसर्ग, प्रेम अशा अनेक भावनांना कविता सहज व्यक्त करते… म्हणूनच कविता ही प्रत्येकाच्या जीवनातील एक जिवलग मैत्रीण आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात कविता माणसाला थोडा वेळ स्वतःकडे पाहायला शिकवते. ती मनाला शांतता देते आणि विचारांना नवी दिशा देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हा केवळ शब्दांचा प्रवास नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक सुंदर पूल आहे..

तुझ्या आणि माझ्या कवितेत फरक असला तरी त्यांचा उद्देश एकच असतो मनाला स्पर्श करणे. तुझ्या ओळींमध्ये चांदण्यांची कोमलता आहे तर माझ्या शब्दांत सूर्यकिरणांची ताकद…

तुझी कविता स्वप्न दाखवते आणि माझी कविता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडते. या दोन भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून जीवनाचा खरा अर्थ उमलतो.

आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या जीवनात कविता माणसाला स्वतःशी बोलायला शिकवते. ती मनाला शांतता देते.. विचारांना दिशा देते आणि भावनांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. कविता माणसाला अधिक संवेदनशील, अधिक जिवंत बनवते… कविता ही मनाची भाषा आहे… ती जितकी तुझी आहे तितकीच माझीही… कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी कविता असते जी त्याच्या मनात कायम जिवंत राहते.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,

कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन हृदयांची अव्यक्त कहाणी…

एक शब्द तुझा, एक भावना माझी,

आणि त्यातून जन्म घेणारे एक सुंदर विश्व..

हीच खरी कविता…

 

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक सकाळ… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक सकाळ… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

एक सुंदर सकाळ अशी वेगवेगळ्या

पक्ष्यांच्या निनादाने भरलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी गारठ्याची

शाल तिने पांघरलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी झाडांच्या

डोलण्याने जणू हसलेली,

 

एक सुंदर सकाळ अशी हसत हसत

मुलांना शाळेत घेऊन निघालेली,

 

एक सुंदर सकाळ अशी अप्रतिम

क्षणांचा प्रत्यय देणारी,

त्यांची आणि आपली भेट घडवून आणणारी.

 

एक सुंदर सकाळ अशी…

© अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रहाट… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रहाट… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(“रहाट” प्रामुख्याने ग्रामीण जीवन, श्रम, आणि निसर्गाशी असलेलं नातं दर्शवते. “रहाट” म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरलं जाणारं पारंपरिक साधन)

रहाट फिरतो अखंड

घेऊन श्रमांचा छंद

पाण्याच्या प्रत्येक थेंबात

दडले कष्टांचे गंध

 

विहिरीच्या काठावरती

जीवन गाते गाणं

रहाटाच्या तालावरती

चालते जगणं

 

दिवस-रात्र न थांबता

फिरत राहतो तो

शेतकऱ्याच्या आशांना

पाणी देतो तो

 

कष्टांची ही गाथा

निसर्गाशी नातं

रहाट सांगतो आपुलं

जगण्याचं सत्य

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे

अमेरिका – इस्राईल – इराण यांच्यामध्ये सुरु झालेल्या आणि जगभर खळबळ आणि अशांतता माजविणाऱ्या तीव्र संघर्षाचे खेदजनक आणि वेदनादायक पडसाद जगभर वेगवेगळ्या प्रकारे उमटले .. उमटत आहेत.. उमटत राहणार आहेत.  या युद्धातला सर्वात जास्त उद्विग्न करणारा हाहा:कार म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नराधमांकडून केली गेलेली अत्यंत हीन कारवाई ….. दक्षिण इराणमधल्या ‘मिनाब’ मध्ये मुलींच्या प्राथमिक शाळेवर केला गेलेला मिसाईल हल्ला. या हल्ल्यात शंभराहूनही जास्त व्यक्ती मारल्या गेल्या …. ज्यात बहुतांश व्यक्ती म्हणजे या शाळेतल्या लहान लहान मुली होत्या .. ‘ व्यक्ती’ म्हणून अजून पुरेशा उमललेल्याही नाहीत अशा मुग्ध कळ्या ..

…. ज्यांची मने दगडाचीच आहेत त्या निर्घृणांना या घटनेमुळे दु:खच काय .. साधा खेदही वाटला नसेल. पण अतिशय संवेदनशील मन असणारे हिंदी कवी श्री. हेमंत बावनकर यांच्या मनात या प्रसंगामुळे माजलेली खळबळ आणि उद्विग्नता मात्र शब्दरूप घेऊन व्यक्त झाली आणि  ‘क्या फर्क पड़ता है?’ या अगदी चपखल शीर्षकाची त्यांची मुक्तछंदातली कविता कागदावर उतरली. त्यांनी अनुभवलेला सृजनाचा हा अतिशय हळवा क्षण या कवितेतून थेट हृदयाला भिडला आणि या काव्याचा स्वैर अनुवाद केल्यावाचून रहावलेच नाही ….. 

काय फरक पडतो ?  ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे

अजिबात आवाज नको हं ..

शांतता  .. एकदम शांतता  ..

इथे गाढ झोपल्यात लहान लहान मुली .. शंभराहून जास्त ..

हो खरंच .. शंभराहून जास्त

शिकायला चाललेल्या ..

चालल्या तर होत्या .. पण परत येऊ शकल्याच नाहीत ..

झोपवून टाकलं गेलं त्यांना .. त्या लहान लहान कबरींमध्ये ..

एका भयानक दफनभूमीमध्ये ..

– – पण .. पण यामुळे जगातल्या बाकीच्या तशाच लहान लहान मुलींना ..

त्यांच्या नातेवाईकांना .. आणि .. आणि ..

माणूस म्हणण्याच्या लायकीच्याच नसलेल्या माणसांना ..

काय फरक पडतो ???

..

त्या निष्पाप लहान मुलींना तर हेही माहिती नव्हतं की ..

देश म्हणजे नक्की काय असतं ?

देशाची सीमा काय असते ? ..

धर्म .. पंथ म्हणजे तरी काय ?

वंश म्हणजे नेमकं काय असतं ? .. यातलं काही काही माहिती नव्हतं ..

मित्र देश आणि शत्रू देश म्हणजे नेमके कोण ?

.. आणि ते कसं ठरवतात

.. हे कुठे ठाऊक होतं ?

.. .. त्यांना तर एवढंच समजत होतं की ..

सूर्य एकच असतो ..

चंद्रही एकच असतो ..

आणि ही जमीन सगळ्यांचीच असते.

त्यांचं सगळं विश्व घरापासून सुरू होतं आणि शाळेपर्यंत संपतं सुद्धा..

खायचं-प्यायचं, अभ्यास करायचा आणि आई-वडलांच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं .. बस् .. .. 

– – पण ज्याने कुणी त्यांच्या शाळेला लक्ष्य करून मिसाईल टाकलं ..

.. .. त्यांना या निरागस वास्तवामुळे काय फरक पडतो ???

 

आपल्याला तर आता सवयच झालीये ..

टि.व्ही. वर लढाया बघायची ..

व्हिडिओ गेम्स बघतो तितक्याच सहजपणे बघायची …

विनाशाच्या या खेळात आता आम्हाला दिसतच नाहीत ..

.. .. पार विध्वंस होत असलेल्या शाळा आणि रुग्णालयं ..

.. शहरं .. तिथल्या दिमाखदार इमारती ..

.. विध्वंस झालेल्या शहरांखाली दडलेली

.. गुदमरणारी शांत- स्वस्थ आयुष्यं …

.. उध्वस्त झालेल्या सुंदर बागा .. .. आता ..

.. आता लहान मुलं , स्त्री-पुरुष ,वृद्ध माणसं

.. सगळेच कसं का जगेनात नाहीतर मरेनात …

.. .. कुणाला काय फरक पडतो ???

 

शिकण्यासारखं तर खूप काही होतं आपल्याला …

पण काय शिकलो आपण …

– – शासक निरंकुश सत्ताधारी झाले त्यापासून ?

– – नागासाकीत अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्यापासून ?

– – छळछावण्यांकडून ? गॅस चेम्बर्सकडून ? थेट मृत्यूच्या जबड्यात टाकणाऱ्या त्या विनाशक गॅसकडून ?

– – आतंकवादाच्या भयानक सावटाकडून ..

– – जहाल विषारी असणाऱ्या धर्मान्धतेकडून ..

– – सततची युद्ध आणि प्रचंड नरसंहाराकडून … ???

 

.. .. .. आणि आता हताश झालेल्या त्या शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेचीच जरी हिंसा झाली

.. शान्तिदूत जन्माला येण्याची शक्यताच जरी मावळली .. तरी ..

.. तरी कुणाला काय फरक पडतो ???

.. ..

 

.. भविष्यातही शांतता – सुरक्षितता कदाचित अशीच गाढ झोपलेली असेल .. मृतवत् ..

.. बहुसंख्य जनता उदासीन तरी असेल नाहीतर चक्क बेपर्वा ..

.. आणि शासक .. .. भरकटलेले.. बुद्धिभ्रष्ट ..

– – खरं तर हीच अगदी योग्य वेळ आहे

– – शायर हबीब जालिब यांच्या त्या शब्दांची आठवण करून देण्याची.. .. 

 

.. तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था

   उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था..

 

– – पण .. .. पण त्यांना त्याचा अर्थ समजावून देणं अशक्य आहे .. कारण ..

.. कारण त्यांना कशानेच कुठे काय फरक पडतोय ???

 

.. .. ..

 तरीही – –

 

तरीही आशेची ज्योत अजून विझली नाहीये ..

वसुधैव कुटुंबकम्

.. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे

.. ..  असं अथर्ववेदात उगीच म्हटलेलं नाहीये ..

.. म्हणूनच माझ्या शब्दांना अडवणारी कोणतीच सीमा नाही ..

कुणीही जगभरात कुठेही गेलं तरी .. .. .. ..

.. …. माणुसकीचा संदेश घेऊन जाऊ देत …. 

.. …. शांततेचा संदेश घेऊन जाऊ देत …. 

 

.. .. .. .. आता मात्र असं म्हणू नका की

.. त्याने काय फरक पडणार आहे ???

शांती आणि माणुसकी या भावना नेमकेपणाने पोहोचण्याने फरक तर पडणारच …. 

.. .. .. नक्कीच खूप मोठा फरक पडणार .. .. .. 

 

मूळ हिंदी कविता : क्या फर्क पडता है ? ‘

कवी : * श्री. हेमंत बावनकर, पुणे *

स्वैर अनुवाद : मंजुषा मुळे

—– 

श्री. बावनकर यांची मूळ हिंदी कविता :  

 हेमन्त बावनकर 

क्या फर्क पड़ता है?

 

श्श्श्श…श्श्श

शान्त… शान्त

यहाँ सोती हैं

सौ से ज्यादा छोटी छोटी लड़कियाँ

जो पढ़ने के लिए निकली थीं.

पढ़ने तो गईं…

लेकिन, वापिस लौट न सकीं

और

सुला दी गई

उन छोटी छोटी कब्रों में

एक भयावह कब्रगाह में…

इससे,

दुनिया की बाकी छोटी छोटी लड़कियों को

उनके रिश्तेदारों को

और

इंसान न कहलाने लायक इंसानों को…

क्या फर्क पड़ता है?

 

वे मासूम लड़कियाँ

तो जानती भी नहीं थी कि…

देश क्या होता है?

सरहद क्या होती है?

मजहब क्या होता है?

नस्ल क्या होती है?

दोस्त देश क्या होता है?

और

दुश्मन देश क्या होता है?

वे तो समझती थी कि

सूरज एक होता है

चाँद एक होता है

और

यह जमीं सभी की होती है.

उनकी सारी दुनिया तो

घर से शुरू होकर

स्कूल तक ख़त्म हो जाती थी.

खा पीकर, पढ़ लिख कर

माँ-बाप की आगोश में खो जाती थी.

फिर,

जिस किसी ने निशाना बनाकर

उनके स्कूल पर मिसाइल दागी थी, उसे

क्या फर्क पड़ता है?

 

हम आदी हो चुके हैं

लड़ाइयों को टी वी पर देखने के

विडियो गेम्स की मानिंद…

तबाही के इस खेल में

अब हमें दिखाई नहीं देते

खँडहर बनते स्कूल और अस्पताल

शहर और इमारतें

शहरों-खंडहरों में दब रही

ऐशो आराम पुरसुकून आलीशान जिंदगी.

तबाह होते

खूबसूरत बाग़ बगीचे. 

अब… बच्चे, मर्द-औरतें और बुजुर्ग

कैसे भी जियें या मरें,

क्या फर्क पड़ता है?

 

हमें सीखने के लिए तो बहुत कुछ था

फिर क्या सीखा हमने ?

हुक्मरानों के तानाशाह होने से…

नागासाकी के परमाणु विस्फोट से…

यातना शिविरों से…

गैस चेम्बरों से…

गैस त्रासदी से…

आतंक के साए से…

धर्मान्धता के जहर से…

कोविड की महामारी से…

लड़ाइयों और नरसंहारों से…

अब, अमन के नाउम्मीद उन्मादियों को

क्या फर्क पड़ता है?

 

मुस्तक़बिल का अमन-याफ़्ता

शायद कहीं सो रहा है…   

ज्यादातर अवाम बे-रुख़ हो गई है

और हुक्मरान पगला गए हैं…

उन्हें बकौल शायर हबीब जालिब

याद दिलाना लाजमी है कि-

तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था

उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था

समझाना नामुमकिन है, उनको

क्या फर्क पड़ता है?

 

उम्मीद की लौ 

बुझी नहीं है…

अथर्ववेद में ऐसे ही नहीं कहा गया है.

वसुधैव कुटुम्बकम

पूरी दुनिया एक परिवार है

इसलिए

मेरे अल्फाज

सरहदों के बगैर अल्फाज हैं

जो जहाँ कहीं तक पहुंचे

इंसानियत का पैग़ाम लेकर पहुंचे  

अमन का पैग़ाम लेकर पहुंचे

अब ये मत कहना कि- इससे

क्या फर्क पड़ता है?

फर्क तो पड़ता है,

अमन और इंसानियत के पैगाम से…

फर्क तो पड़ता है…

फर्क तो जरुर पड़ता है ! 

 कवी : * हेमन्त बावनकर, पुणे*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एशो हे बॉयशाख…  – लेखक : श्री कौस्तुभ आजगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ एशो हे बॉयशाख…  – लेखक : श्री कौस्तुभ आजगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

हल्लीच झालेल्या बंगाली नववर्षाच्या निमित्ताने हे गाणं परत आठवणीत आलं – _एशो हे बॉयशाख, एशो एशो_.

एशो, एशो, एशो हे बॉयशाख

(ये वैशाखा)

तापोशोनिश्वासोबाये मूमुर्शुरे दाओ उराये,  

बॉत्सॉरेर आबॉर्जोना दूर होये जाक जाक जाक

(हे वैशाखा, जीर्ण झालेलं सारं काही तुझ्या तापस निःश्वासाने उडवून दे. जुन्या वर्षाचा सारा कचराही (त्या बरोबर) दूर होऊ दे.)

जाक पुरातन स्मृती, जाक भूले जावा गीती

जाक अश्रुबाष्पो सुदूरे मिलाक

(जुन्या अडगळसदृश आठवणी जाऊ देत,

जुनी, ओझं झालेल्या भावनांची गाणीही जाऊ देत,

अश्रूंची वाफ होऊन ती दूर जाऊ दे)

मुछे जाक ग्लानी, घुचे जाक जोरा

ओग्निस्नाने शुचि होक धॉरा 

रॉशेरॉ आबेशॉराशी शुष्को कोरी दाओ आशि

(ग्लानी, मरगळ जाऊ दे,

जरा/वार्धक्य/थकवा अदृश्य होऊ दे

अग्निस्नानाने धरा पावन होऊ दे)

आनो आनो आनो ताबो प्रालयेरो शांख

मायार कुज्जटि-जाल जाक दूरे जाक जाक जाक

(आण तुझा प्रलयसूचक शंख,

मायेच्या धुक्याचा हा पडदा दूर कर)

– – – वैशाखाचं स्वागत करणारं गीत. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं.

मराठी वाचकाला वैशाखवणव्यापासून ते मर्ढेकरांच्या “जगास तोवर वैशाखाच्या मृगाविनाही मृगजळ चढते” या ओळीपर्यंतचा वैशाख परिचयाचा आहे. दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’मधला सूर्याच्या आगीत भाजून निघालेला, पण अंगावर नाद-रूप-सुगंधाची सौंदर्यचिन्हं धारण केलेला वैशाख आपण अनुभवलाय.

… याच वैशाखाचं रवींद्रनाथ स्वागत करतात ते नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणून.

त्यामुळे वैशाखाच्या ऊष्ण निःश्वासाबरोबर जुनं सारं मरणालागुनी जाऊ दे, जुन्या वर्षाचा सारा कचरा निघून जाऊ दे अशा ओळी येतात. आता नव्या वर्षाची नवी गाणी गायची आहेत, म्हणून जुन्या आणि ओझं झालेल्या आठवणी, दुःखं, जुनी झालेली गीतं सोडायची आहेत.

जाक अश्रुबाष्प सुदूरे मिलाक

(उष्णतेमुळे) अश्रूंची (दुःखाची) वाफ होऊन ते दूर जाऊ दे.

ग्लानी, नैराश्य, हतबलता सारं मागे जाऊ दे.

आणि पुढच्या कडव्यात ही ओळ येते.

अग्निस्नाने शुचि होक धरा!

… वैशाखाच्या या सृष्टी भाजून काढणाऱ्या उष्णतेला रवींद्रनाथ अग्निस्नान म्हणतात आणि म्हणून, वैशाखाच्या या पावकस्वरूपी अग्निस्नानाने ही धरा, हे जग पावन होऊ दे, ही प्रार्थना.

किती सुंदर कल्पना. सारं जुनं जाळून नव्या सर्जनासाठी सृष्टी नव्याने उभी करणारा वैशाख.

… फार वेगळा आणि अतिशय सुंदर असा वैशाखाचा अनुभव मला हे गीत देऊन गेलं.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : कौस्तुभ आजगांवकर

(रवींद्रनाथ – वैशाख)

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लावण्यखणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ लावण्यखणी सुश्री नीलांबरी शिर्के 

कर्णभुषणे

किती देखणी

झाडच वाटे

लावण्यखणी

*

सजते सौंदर्य

याहून दुसरे

पाहिले का

असेल कोणी!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पहावा.. बहावा — विषय एकच.. चित्रे तीन.. काव्ये तीन १. सुवर्णधुंद  — विभावरी कुलकर्णी २. लावण्यशोभा — डॉ. ज्योती गोडबोले  ३. बहावा फुलला — डॉ. मधुवंती कुलकर्णी  ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पहावा.. बहावा — विषय एकच.. चित्रे तीन.. काव्ये तीन १. सुवर्णधुंद  — विभावरी कुलकर्णी २. लावण्यशोभा — डॉ. ज्योती गोडबोले  ३. बहावा फुलला — डॉ. मधुवंती कुलकर्णी 

विभावरी कुलकर्णी

(१ )

☆ सुवर्णधुंद

रात्रीच्या गर्द अंधारात,

नक्षत्रांचे लेणे ल्याला,

अमलतास हा सुवर्णतेजाने,

बघा कसा न्हाऊन निघाला…

*

काळ्याभोर नभाच्या खाली,

पिवळ्याधमक फुलांचे झुंबर,

गच्च दाटला पिवळा रंग हा,

जणू धरतीवर उतरले अंबर…

*

कोवळी मोहक सुवर्ण वर्षा,

मनास देई अनोखी साद,

स्तब्ध शांत या निशेमध्ये,

जागृत झाला हा उन्माद…

*

पानगळीच्या शुष्क फांदीवर,

फुलांचे हे वैभव ल्यावे,

माणसानेही आयुष्यात असेच,

कष्टातून ‘सुवर्ण’ होऊन फुलावे…

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

☆☆☆☆

डॉ. ज्योती गोडबोले 

(२)

लावण्यशोभा… 

पिवळा जर्द तरु असा बहरला, सौंदर्य त्याचे पहा

गालिचा जणु अंथरून बघतो, लावण्यशोभा अहा…

*

भंडारा उधळीत येई जणु तो, मल्हारि भेटी जसा

सृष्टीला बहु हर्ष होई करुनि, शृंगार सारा असा…

*
टपटप वर्षत ही फुले चिमुकली, बहरून येतो जरी

अल्पायुष्य मिळे तया तरिही तो, चिंता कधी ना करी…

© डॉ. ज्योती गोडबोले

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

(३)

बहावा फुलला

ग्रीष्माचा तो चटका पाहून

असह्य झाली अवघी धरती 

थेंब टपोरे येतिल कधी ते

वाटे आशा उगाच झुरती 

*

थोडी हिरवळ पाहून नेत्री 

तरंग उठती अवघ्या गात्री 

गार सावल्या शोधत आल्या

तरूतळी पण उदास धात्री

*

एके दिवशी उजाडताना 

पक्षी करती किलबिलाट मग

उघडताच लोचने पृथेने

दिसते सुंदर पीतवर्ण जग

*

कोण उमलले आकाशी या

तरूही गाती आनंदाने

घुंगुर काठी वाजत कैसी

वाऱ्याची का शीळ खुशीने

*

अचंबित ती होता ऐसी

सुगंध वहातो फुलाफुलांतुनि

फुलत “बहावा “सांगत येई

 पाऊस नाचे मृद्गंधांतुनि

(असं म्हणतात की बहावे फुलले की महिन्याभरात पाऊसकाळ येतो.)

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस्सा संसार सुखाचा बाई.. + संपादकीय निवेदन – राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

साहित्य संवेदना प्रस्तुत ‘कवितेचे पान’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत कवयित्री राधिका भांडारकर यांची अस्सा संसार सुखाचा बाई ही कविता सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे.

राधिका भांडारकर या आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

आपली लेखणी अशीच साहित्याचे अर्थपूर्ण विश्व समृद्ध करत राहो, हीच सदिच्छा व शुभेच्छा ❄️❄️

💐 हार्दिक अभिनंदन! 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त काव्य

? कवितेचा उत्सव ?

☆ अस्सा संसार सुखाचा बाई… ☆ सौ. राधिका भांडारकर

माझा डाव मजेत मी खेळेन

पिसून आलेले पत्ते नीट लावेन…

 

कशाला ढुंकावे शेजरच्या डावात

असेनाका तिथे एक्क्यांची खैरात..

 

दोघांनी पाळावे हेच सूत्र जीवनी

नाते प्रेमाचे जपावे असे मनोमनी..

 

तुझे माझे कोण्या कारणे करावे

तुझ्यात माझ्यात अहं भेद नसावे…

 

होतील ही मतभेद नि भांडणे

मनी असू द्यावे सुखाचे नांदणे..

 

बंधने कधी नसावीत लादलेली

असावीत ती स्वानंदे पेललेली..

 

स्वातंत्र्य अभिव्यक्ती सदा जपावी

सुखाची हीच गुरुकिल्ली मानावी..

 

‘मीच का?’ प्रश्न दोघात न यावा

संसार दोघांचा सावरून घ्यावा..

 

एकमेकांचा सन्मान हाच महत्त्वाचा

विरोधातही आदर व्हावा विचारांचा..

 

नाते इतके लवचिक असावे

प्रेमातले काटेही कधी न बोचावे…

 

नाही जिथे संशय उथळ आततायी

असा संसार होईल सुखाचा बाई..

©  राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३९ – – 

जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |

जयाचेनि योगे समाधान बाणे|

तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३९|

अर्थ : ज्या परमेश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या जवळ गेल्याने आपल्याला अक्षय समाधान लाभते, अशा परमेश्वराला आपल्या मनातील सर्व प्रकारची चंचलता अर्पण करावी. मनाने त्याचेच होऊन राहावे.

विवेचन : माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठी धावत असतो परंतु एवढी धावपळ करूनही आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याला ते गवसत नाही. आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी देखील समाधानाचा शोध घेतला अखेरीस त्यांना ते भगवंताच्या ठिकाणीच आहे असे आढळून आले. त्याचेच वर्णन आपले वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की जयाचेनि योगे समाधान बाणे. त्याचा योग म्हणजे संबंध आला की अंगी समाधान बाणते म्हणजे त्याची प्रचिती येते.

संत तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ” हे आपल्याला कळते पण वळत नाही आणि आपला सुखाचा आणि समाधानाचा शोध सुरूच राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपली सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदलत जाते. मला नोकरी लागली म्हणजे मी सुखी होईल, माझ्या पगारात वाढ झाली म्हणजे मी सुखी होईल, माझ्याकडे आज चार चाकी आहे, उद्या त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारचे वाहन आले म्हणजे मला समाधान लाभेल. आणखी जमीन, आणखी घरे, बंगले यासारख्या गोष्टी माणूस मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. परंतु त्याची हाव संपत नाही. कुठे थांबायचे हे त्याला कळत नाही.

एका शेतकऱ्याची गोष्ट फार सुंदर आहे. तो आपल्या शेताच्या बांधावर आरामात झोपला होता. त्याची एका मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन होती. शहरातून आलेला एक कारखानदार ती जमीन विकत घेऊन तिथे कारखाना काढण्याच्या तयारीत होता. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तू मला ही जमीन दिलीस तर मी तुला भरपूर पैसे देईन. तू श्रीमंत होशील. ” शेतकऱ्यांनी विचारले, ” भरपूर पैसे मिळाल्यावर आणि श्रीमंत झाल्यावर काय होईल ?” जमीनदार म्हणाला, ” वेडा आहेस का ?अरे तू अत्यंत समाधानात राहशील. ” शेतकरी म्हणायला, ” मग त्यासाठी जमीन विकायची काय गरज आहे ? मी आत्ता देखील समाधानीच आहे. ” एका सामान्य शेतकऱ्याला जी गोष्ट कळली ती आपल्याला कळत नाही.

परमेश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे आपले मन ! आपले मन अतिशय चंचल आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर एका गाण्यात म्हटले आहे, ” माझिया मना जरा जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना !” म्हणून समर्थ म्हणतात की आपले हे चांचल्य म्हणजे चंचलता भगवंताला अर्पण करून आपली चित्त त्याच्याकडे केंद्रित करावे. त्याचे ध्यान लागावे.

गीतेत भगवंत म्हणतात ” सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ” सर्वधर्म म्हणजे आपली सुखदुःखे, कर्म, वासना आदी सगळे भगवंताला अर्पण करून त्याला शरण जावे. तो आनंदनिधान आहे. अक्षय सुख आणि समाधान त्याच्याच ठायी आहे.

स्वसंवाद :: 

१) मी ज्या सुखाच्या शोधात धावत आहे, ते खरोखरच मला समाधान देणारे आहे का? की ही केवळ अंतहीन धावपळ आहे?

२) माझ्या मनातील चंचलता, अपेक्षा आणि असंतोष मी कधी परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे का?

३) “समाधान” ही बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मनात आहे हे मला खरेच पटले आहे का? (क्रमशः)

– – – – 

श्लोक क्र. ४० – – 

मना पाविजे सर्वही सुख जेथे ।

अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ।

विवेके कुडी कल्पना पालटीजे ।

मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।४०।

अर्थ :  समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, सर्व सुखे जिथे प्राप्त होतात अशा त्या परमेश्वराकडे अतीव अशा आदराने आपले लक्ष केंद्रित कर. योग्य अयोग्यतेचा विचार करून वाईट विचारांचा/कल्पनांचा त्याग कर आणि राघवाच्या ठिकाणी आपले मन असू दे.

विवेचन : आधीच्या श्लोकात आपण पाहिले की सुखाची आणि समाधानाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश तर कोणाला कीर्ती तर कोणाला आणखी काही… माणूस क्षणिक मोहाला बळी पडतो आणि त्या सुखाच्या मागे धावतो परंतु अंतिमतः सुखाऐवजी दुःखच पदरात पडते. क्षणकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण फार मोठी किंमत मोजून दुःख पदरात घेतो.

काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांनी मन दूषित होते. असे मन आणखी वाईट विचारांना जन्म देते. माणसाची दिवसेंदिवस अधोगती होत जाते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसेच नाना प्रकारच्या विकारांनी दूषित झालेल्या मनात भगवंताचे प्रतिबिंब पडणे शक्य नसते. म्हणूनच अशा वाईट विचारांचा विवेकपूर्वक त्याग करणे आवश्यक असते. कुडी कल्पना म्हणजे वाईट विचार. ज्या गोष्टी किंवा जे विचार भगवंतापासन दूर नेतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुडी कल्पना असे म्हणता येईल. म्हणून तर “सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो” हे समर्थांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले आहे.

एखाद्या विद्वत् सभेत जर विद्वानांना एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारले तर प्रत्येकाची वेगवेगळी मते येतील. तात्पर्य त्यांच्यामध्ये एकाच विषयावर एकवाक्यता नसते. पण जर सर्व खऱ्या संतांचा (भोंदू बाबा नव्हे) मेळा भरला आणि त्यांना जर अंतिम सुख आणि समाधान कशात आहे हे विचारले तर त्या विषयावर त्यांचे एकमत होईल, एकवाक्यता असेल आणि एका सुरात “भगवंत” असेच उत्तर त्यांच्याकडून येईल.

संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात नव्हे ईश्वर स्वरूपच असतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. त्यांना लोकांच्या कल्याणाची तळमळ असते. जर अशा सर्व संतांचे अंतिम समाधान हे भगवंताच्या ठायी आहे असे एकमत असेल तर आपण ते का स्वीकारू नये ? 

क्षणिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा मग संत सांगतात तो मार्ग का स्वीकारू नये ? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे.. असे संत चोखामेळा आपल्याला सांगतात. तर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या… असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संतांचे हे सांगणे आपण लक्षात घ्यायचे नाही का? थोडा विचार केला म्हणजेच विवेकाने वागायचं ठरवलं तर ही गोष्ट आपल्याला पटेल. म्हणून संतांचे सांगणे शिरोधार्य मानून आपण विवेकाने वाईट विचारांचा त्याग करावा आणि राघवाकडे आपले मन लावावे.

स्वसंवाद :: 

१) माझे मन गढूळ आहे की स्वच्छ – आज माझ्या मनात कोणते विचार जास्त असतात, चांगले की वाईट ?

२) विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे – मी माझ्या जीवनात कोणाचे मार्गदर्शन घेतो, बुद्धीचे की श्रद्धेचे ?

३) “विवेके कुडी कल्पना पालटीजे” – आज मी कोणत्या एका वाईट विचाराचा किंवा सवयीचा विवेकाने त्याग करण्यास तयार आहे ?

४) संत चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम सर्वांनी एकमताने भगवंत हेच अंतिम सुख सांगितले – हे माझ्या मनाने खरोखर स्वीकारले आहे का ?

– क्रमशः श्लोक ३९ आणि ४०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares