साहित्यिक परिचय – साधारण इयत्ता १० वी पासून कविता लेखनाला सुरुवात झाली. कवितेच्या जगात जास्त रमलो. ललितलेखन, कथालेखन, चिंतनात्मक लेखन याचीही मुशाफिरी केली परंतु आतून ओढा नेहमी कवितेकडे, गीतरचनेकडे राहिला आहे. वृत्तबद्ध, छंदोबद्ध रचनांचा अभ्यास केल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली. मुक्तछंद लिहिताना पण लयीत लिहिण्याची आवड कायम राहिली. कवितेत यमक अलंकार फार आवडता आहे. कवितेचे विषय निसर्ग, वैचारिक, चिंतनात्मक, प्रसंग चित्रणात्मक अशा प्रांतात वावरणारे जास्त आहेत. ग दि माडगूळकर, बा भ बोरकर, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, मंगेश पाडगावकर हे अत्यंत आवडते कवी आहेत. संत वाङमय, अभंग यांची आवड आहे. कवींच्या, संताच्या रचनांचा व्यासंग आणि अभ्यास करणे आवडते. विविध काव्यसंमेलने आणि काव्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ।।५।।
☆
☆ सूर्य स्तोत्र ☆ भावानुवाद : डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆
☆
प्रभाते स्मरितो श्रेष्ठ सविता रूप मी
ब्रह्माण्ड केंद्रवासी यज्ञकर्ता देहस्वामी ।
समप्रकाशी किरणे उत्पत्तीमूल अहंकार विना
ब्रह्मासमान पद्मशुद्ध सदैव चिंतनीय मना ॥१॥
*
सकलांचा तारणहार सुंदरदेही मनप्रसन्न
ब्रह्मेंद्रादी देवता अर्चिती त्या प्रभाते नमन
त्रिगुणीपूर्ण वर्षाकारक संरक्षक नियंत्रक
सकलांचा पालनकर्ता त्रैलोक्याचा पालक ॥२॥
*
प्रभाते भजितो सवितृदेव अनंत शक्तीचा
पापानाशक रोगहारक निवारक शत्रुभयाचा
मूर्तिमान कालस्वरूपी चक्षु समस्त लोकांचा
नमन आदिदेवासी हटवी पाश जसा गोकंठाचा ॥३॥
*
ॐ देवतांस्तव उधळित उदय प्रकाशाचा
मित्राचा नेत्र स्वामी वरुणाचा अग्नीचा
धारयितो पृथ्वी अंतरिक्ष तथा भास्कराला
आत्मा हा विश्वाचा श्रवण करितो विश्वाला ॥४॥
*
उषादेवी संगे प्रकाशमान सूर्य देदिप्यमान
अंत समयी नारीस देउन साथ करी रक्षण
प्रतिक्षा करिती जेथ मनुज पूजिती देवतांसी
शुभ कल्याण तेथ होई शुभ कल्याणासी ॥५॥
☆
॥ इति श्री महर्षि मयासूर रचित निशिकान्त भावानुवादित श्री सूर्यस्तोत्र संपूर्ण ॥
☆
जरी हे स्तोत्र सूर्य स्तोत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हे स्तवन सूर्यमालेतील सूर्याचे नसून ते विश्वकेंद्री सवितृ देवाचे म्हणजेच विश्वात्म्याचे आहे. विशेषतः हे पहिला व चौथ्या श्लोकांमधून स्पष्ट होते.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १०१ – –
जया नावडे नाम त्या येम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।
म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।।१०१।।
अर्थ :ज्या व्यक्तीला भगवंताचे नाम आवडत नाही अशा व्यक्तीला यम त्रास देतो. नामाबद्दल शंका आणि नाना प्रकारचे तर्क कुतर्क ज्याच्या मनात येतात अशा व्यक्तीला तिरस्करणीय नरक प्राप्त होतो. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या स्वभावातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात.
विवेचन – एखादी गोष्ट कर असे वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला तसे न करण्याचे काय परिणाम होतील असे आपण समजावून सांगतो. विशेषतः लहान मुलांना एखाद्या गोष्टीतले धोके आपण समजावून सांगतो आणि मग तरी त्यांनी ती करावी अशी अपेक्षा करतो. तसेच समर्थ इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्व समजावून सांगताना करत आहेत. वारंवार सांगूनही आपण जर नामस्मरण केले नाही तर अंतकाळी आपल्याला यम त्रास देतील, आपल्या मनात नामाबद्दल नको त्या कल्पना आणून जर आपण नाम घेतले नाही, तर लोकांमध्ये आपली छी थू होऊन आपल्या वाट्याला नरक ठरलेलाच आहे. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे.
आपल्या धर्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या जीवनासाठी स्वर्ग आणि नरक अशा कल्पना आहेत. पुण्यवान माणसाला स्वर्गप्राप्ती होते आणि पापी मनुष्य नरकात जातो अशी साधारण त्यातील कल्पना आहे. ज्याने पाप केले असेल, भगवंताचे नाम घेतले नसेल अशा व्यक्तीला यमदूत त्रास देतात. नाम न घेणाऱ्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असे समर्थ सांगतात. समर्थांच्या काळात अशा कल्पनांवर लोकांचा जास्त विश्वास होता म्हणून समर्थांनी त्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळातील लोक स्वर्ग, नरक, यम इ. कल्पनांवर विश्वास ठेवणारे नाहीत. म्हणूनच या गोष्टींचा अर्थ आपण वेगळ्या प्रकाराने घ्यायला हवा.
आज जरी बरेचसे लोक स्वर्ग, नरक, यम इ. गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी बरेचसे लोक हे मानतात की आपल्या बऱ्यावाईट वागण्याची फळं आपल्याला या ठिकाणीच भोगावी लागतात. सर्व संतांनी एकमुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. संतांचे वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असते. ते जे बोलतात, त्यामागे स्वानुभवाचे सामर्थ्य असते. गोंदवलेकर महाराज आपल्याला जेव्हा रामनाम घ्यायला सांगतात, तेव्हा त्या नामाची महती त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. ‘ आधी केले मग सांगितले ‘ असा हा रोकडा व्यवहार असतो. म्हणून निदान संतांच्या सांगण्यावर तरी आपण विश्वास ठेवून नाम घ्यायला हवे.
नाम घेण्याची ही सवय जर लावून घेतली नाही तर अंतकाळी देखील सवयीनुसार नाम न येता दुसऱ्याच गोष्टीत जीव अडकेल. प्राण जाताना त्यामुळे जीवाला वेदना होतील. ऐहिक गोष्टीतच जीव अडकेल. पुन्हा मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. हाच यमदूतांनी दिलेला त्रास आहे असे आपण मानायला हरकत नाही. संतांनी एवढया कळकळीने सांगूनही जर नामाबद्दल विश्वास नसेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल भलतेच विचार मनात येत असतील, तर मन नामाकडे वळणारच नाही. अशा वेळी माणूस मग दुसऱ्या आकर्षणात अडकतो. कसले नाम, कसला स्वर्ग आणि नरक? मरणानंतर जे काही होईल ते कोणी पाहिले आहे? तेव्हा मौजमजा करून या जीवनाचा उपभोग घेऊ असा विचार करून माणूस नको त्या गोष्टीत अडकतो. नको त्या गोष्टी करण्यात वाहवत जातो. मग समाजात अशा व्यक्तीची छी थू होते. त्याची प्रतिष्ठा राहत नाही. लोकांच्या दृष्टीने अशी व्यक्ती तिरस्करणीय बनते. असे जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे.
तेव्हा मनात कोणतीही शंका न ठेवता भगवंताचे नाम घ्यावे. अति आदराने ते नाम घेत जावे. भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असे आहे की जो कोणी ते नाम घेईल त्याचे दोष हळूहळू कमी होत जातात. जे गुण भगवंताला प्रिय आहेत, असे गुण व्यक्तीच्या स्वभावात वास करतात. त्याच्या हातून अनुचित गोष्टी घडत नाहीत. व्यक्ती अंतिमतः सुखी आणि समाधानी असते.
स्वसंवाद
१. मरणानंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षा, मी आजच्या माझ्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे माझे चालू आयुष्यच ‘नरकप्राय’ करून घेत नाहीये ना?
२. संतांनी स्वानुभवातून सांगितलेल्या नामस्मरणाच्या ‘रोकड्या व्यवहारावर’ विश्वास ठेवण्याऐवजी, माझे मन अजूनही ‘तर्क-कुतर्कात’ आणि संशयात वेळ वाया घालवत आहे का?
३. “अंतकाळी सवयीनुसार नाम मुखात यावे” यासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेण्यास किती प्राधान्य देतो?
४. नाम घेतल्याने जर स्वभावातील दोष ‘स्वभावे’ (सहजच) गळून पडणार असतील, तर मी माझ्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग करून नामस्मरणाचा आश्रय का घेत नाही?
=====
श्लोक क्र. १०२ – –
अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागी संतोषवावे ।
देहे कारणी सर्व लावीत जावे ।
सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।।
अर्थ :आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी.
(लीनता – नम्रता, सर्वभावे – अगदी मनापासून, कारणी – चांगल्या गोष्टींसाठी)
विवेचन – भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तशीच नम्रता देखील आतून यावी. ती स्वभावाचाच एक भाग असावी असे समर्थांना सांगायचे आहे. हल्ली कार्पोरेट जगतात आपले काम साधून घेण्यासाठी लोक कृत्रिम नम्रतेचा आश्रय घेतात. निवडणुका जवळ आल्या म्हणजे मते मागण्यासाठी नेते मंडळी अति नम्र होतात. पण ही खरी नम्रता नसून तो काही काळापुरता धारण केलेला एक मुखवटा असतो.
अहंकारी व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. नम्रतेने वागणाऱ्या व्यक्ती समोरच्याचे मन सहज जिंकून घेतात. फळांनी लगडलेले झाड वाकलेले असते. ज्याला साधक व्हायचे त्याने तर नम्र असलेच पाहिजे. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय भगवंताला किंवा गुरूंना दिले पाहिजे. दोष असतील तर ते आपले अशी भावना हवी. कर्तेपण भगवंताकडे देतो तो खरा साधक. अशा प्रकारची नम्रता किंवा लीनता अंगी बाणली की सत्पुरुषांना संतोष होतो. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती त्यांना आवडत नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनी आपल्या हातून जे काही कार्य घडले त्याचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.
आपला हा नरदेह सर्व चांगल्या कारणांसाठी झिजला पाहिजे. केवळ देहाचे भरणपोषण केले तर आपल्यात आणि पशूत फरक काय? समाजात अनेक चांगली कार्ये होत असतात. अशा कामांना पैशाने नाही तरी शरीराच्या माध्यमातून श्रम करून हातभार लावला पाहिजे. शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मठात अनेक भक्त स्वेच्छेने सेवा देत असतात. अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यातून भगवंताची सेवा तर घडतेच पण देह भगवंताच्या कारणाने झिजतो. माणसाला जो देहाभिमान असतो, तो नष्ट व्हायला मदत होते. देहबुद्धी कमी होत जाते.
सर्व संतांनी सगुण भक्ती केली आहे. परमेश्वराच्या सेवेत आपला देह झिजवला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पांडुरंगाची सगुण भक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेची सेवा करीत. मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. परमार्थात प्रगती करायची असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘ सगुणी अति आदरेसी भजावे ‘ सगुणात प्रेम निर्माण झाले नाही तर ते निर्गुणात कसे येणार?
स्वसंवाद
१. माझ्या रोजच्या वागण्या-बोलण्यात असणारी नम्रता ही केवळ माझे ‘काम साधून घेण्यासाठी’ घातलेला मुखवटा आहे, की ती माझ्या अंतःकरणातून आलेली खरी ‘लीनता’ आहे?
२. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे, माझ्या आयुष्यातील यशाचे श्रेय मी देवाच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करतो, की ‘मी केले’ या अहंकाराचा फुगा फुगवत बसतो?
३. भगवंताने दिलेला हा सुंदर नरदेह मी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी आणि देहभरणासाठी वापरतो आहे, की कधी सामाजिक व सत्कार्यात ‘श्रमदान’ करून तो कारणी लावतो?
४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या आराध्य दैवताची भक्ती केवळ ‘वरवरची’ करतो, की मनात अथांग आदर आणि प्रेम बाळगून सगुण स्वरूपात त्या परमेश्वराला शोधतो?
गाडगीळ मॅनेजमेंट, सांगली आयोजित मराठी काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या काव्य रचनेस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. ई अभिव्यक्ती मराठी तर्फे श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🖊️
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९९ – –
जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।
तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।।९९।।
अर्थ : वाराणसी अर्थात काशीक्षेत्र पुण्याने परिपूर्ण असल्याने खरोखरच जगात धन्य आहे. तिथे गेल्यानंतर तेथील पुण्यप्रभावामुळे आपल्यासह आपल्या पूर्वजांना गती मिळते. मुखाने सदैव श्रीरामांचे नाम घ्यावे असा उपदेश भगवान शंकर तिथे आपल्या कानात करतात.
(पुण्यरासी – पुण्याने परिपूर्ण/भरलेले, गती – मृत्यूनंतर सद्गती अथवा मुक्ती मिळणे)
विवेचन : या श्लोकात रामनामाचे महत्व स्पष्ट करताना समर्थांनी काशीक्षेत्राचे उदाहरण दिले आहे. आपल्याकडे काशीक्षेत्र सर्व तीर्थांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. त्यावरून ‘ काशीस जावे नित्य वदावे ‘ अशी म्हण आपल्याकडे पडली आहे. म्हणजे प्रत्यक्ष काशीला जायला जमले नाही तरी मला काशीला जायचे आहे असे नेहमी म्हणत राहावे. यावरून काशीक्षेत्राचे महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे भाविकांमध्ये अशी समजूत आहे की काशीला गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पूर्वजांना देखील उत्तम गती मिळते. म्हणून ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपण आयुष्यात एकदा तरी काशीला जावे अशी इच्छा असते. पूर्वीच्या काळी तर वृद्ध माणसे काशीला जात असताना तिकडेच देह ठेवला तर मुक्ती मिळाली असे समजत असत. तशी इच्छा मनात धरून बरीचशी मंडळी काशीला जात असत. आजही बऱ्याच भाविकांची तशी श्रद्धा आहे.
वरील श्लोकात दुसऱ्या ओळीत आलेला ‘ जाता ‘ हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. पहिला अर्थ म्हणजे काशीला गेल्यानंतर असा घेता येतो तर दुसरा अर्थ काशीला देह ठेवल्यानंतर असा घेता येतो. कोणताही अर्थ घेतला तरी काशी क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे हे लक्षात येते. काशीला भगवान शंकरांचे मंदिर ‘ काशी विश्वनाथ ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. देवाधिदेव महादेवाचे हे स्थान द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे मानले जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवान शंकर स्वतः ‘ मुखाने सतत रामनाम घ्या ‘ ही आपल्या हिताची गोष्ट तेथे कानात सांगतात असे म्हटले जाते.
थोडक्यात म्हणजे समर्थांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकरांचे उदाहरण देऊन रामनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. ज्या काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते असे आपण मानतो, ते भगवान शंकर स्वतः रामनाम घेतात आणि आपल्यालाही रामनाम घेण्याचा उपदेश करतात. तुम्ही काशीला जा किंवा जाऊ नका. पण मुखाने सतत रामनाम घ्या. तेच तुमच्या हिताचे आहे ही गोष्ट समर्थांनी इथे आपल्या मनावर ठसवली आहे. सातत्याने आपण रामनाम घेत गेलो तर आपला देह, आपले मन पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ होईल. तेच काशीक्षेत्र होईल.
स्वसंवाद
१. भौतिकदृष्ट्या ‘काशीला’ जाण्याची ओढ असण्यासोबतच, मी माझ्या अंतःकरणात रामनामाची ‘पुण्यरासी’ (काशी क्षेत्र) निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का?
२. जीवाला उत्तम गती प्राप्त होणे म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे सुख नसून, चालू आयुष्यात रामनामाच्या अनुसंधानात राहून जन्माचे सार्थक करणे आहे, हे मला पटते आहे का?
३. “काशी विश्वनाथ स्वतः प्रत्येक जीवाच्या कानात रामनामाचा उपदेश करतात, ” हे ऐकल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात रामनाम आदराने घेण्याची माझी वृत्ती अधिक दृढ झाली आहे का?
४. ‘पूर्वजांना गती मिळणे’ आणि स्वतःचा उद्धार करणे यासाठी विनामूल्य आणि अत्यंत सोपे असणारे रामनाम घेण्यासाठी मी रोज किती वेळ शांत चित्ताने देतो?
=====
श्लोक क्र. १०० – –
यथासांग रे कर्म ते हि घडेना ।
घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना ।
दया पाहता सर्वभूती असेना ।
फुकाचे मुखी नाम ते हि वसेना ।।१००।।
अर्थ :पुण्य प्राप्तीसाठी आपण जे कर्म करतो, ते यथासांग घडत नाही. जे काही कर्म आपण त्यासाठी करतो, त्यात काहीतरी उणीव राहिली तरी पुण्य पदरी पडत नाही. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयेचा भावही उपजत नाही. हे सगळे समजण्यासारखे असले तरी फुकटचे असलेले भगवंताचे नाम देखील मुखात येत नाही.
विवेचन : समर्थांनी लिहिलेला हा शंभरावा श्लोक विशेष आहे. मानवी प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. माणूस सगळेच साध्य करण्याच्या मागे लागतो. संसार करता करता पुण्यप्राप्ती व्हावी काही धर्मकार्य करतो. परंतु धार्मिक कार्य करताना त्यात बऱ्याच वेळा काहीतरी उणीव राहून जाण्याची शक्यता असते. ते यथासांग, यथाविधी पार पडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातून आपल्या गाठी काही पुण्याचा संचय होईल अशी अपेक्षा करणाऱ्या यजमानाच्या पदरी फारसे काही पडत नाही. त्यातच अलीकडच्या काळात धार्मिक कार्ये विधिवत करण्यापेक्षा त्यात ते जास्त देखणे आणि भव्य कसे होईल याकडे लक्ष असते. त्यातून अमाप खर्च केला जातो. आलेली पाहुणे मंडळी, त्यांचे आहेर इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागते. ही कोणाला अतिशयोक्ती वाटली तरी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत यजमानांचे लक्ष धार्मिक कार्यात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त अशी अवस्था होते.
सर्वाभूती ईश्वर असे आपण मानतो. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानेश्वर माउली ‘ जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत ‘असे म्हणतात. असे केले तरी त्या त्या रूपातील असणाऱ्या ईश्वराचीच पूजा आपल्या हातून घडते. सगळ्या संतांची चरित्रे या दृष्टीने आदर्श आहेत. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला. ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे नुसते सांगितले नाही तर रेड्याच्या मुखी वेद वदवून ते सिद्ध केले. पण आपण सामान्य माणसे. आपल्याकडून ‘ सर्वभूती दया ‘ हे तत्व देखील नीट पाळले जात नाही. प्राणिमात्रांचे तर सोडून द्या पण घरातील नोकर, मोलकरीण यांच्याशी तरी आपण समभावाने वागतो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
समर्थ म्हणतात, इथपर्यंतही ठीक आहे. समजण्यासारखे आहे. पण हे मना, अरे रामनाम किंवा भगवंताचे नाम घेण्यासाठी तर काही खर्च करावा लागत नाही ना? त्यासाठी कोणतेही धार्मिक विधी किंवा खर्च करावा लागत नाही. त्यात काही न्यून किंवा उणीव राहील अशी शक्यता देखील नाही. असे असूनही हे जीवा तू फुकटचे असे भगवंताचे नाम का घेत नाही? संत सोयराबाई म्हणतात, ‘ सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ‘ हेच आपणही करायला हवे.
स्वसंवाद ::
१. माझ्या हातून होणारी धार्मिक कृत्ये ही केवळ बाह्य प्रदर्शनासाठी होतात की त्यात अंतःकरणाची खरी शुद्धता आणि विधीवरील निष्ठा असते?
२. ज्ञानेश्वर माऊलींच्या “जे जे भेटे भूत” या वचनाचा आदर मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी आदराने वागून करतो का?
३. धार्मिक विधीत काहीतरी उणीव राहून जाण्याची भीती असते; पण ज्या नामात कोणतीही उणीव राहण्याची शक्यता नाही, ते विनामूल्य असणारे रामनाम मी आवडीने घेतो का?