☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७५ – –
समस्तामध्ये सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो तजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।।
अर्थ :परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार (उत्कृष्ट साधन) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर.
विवेचन ::समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ” सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार. ” बा विठ्ठला, तुझे नाम हेच एक सार आहे. म्हणून तर प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्याचा वारंवार जप करीत असतात.
फळे जमिनीतील पाणी, जीवनसत्वे शोषून घेतात. फळातून ते सार आपल्यापर्यंत पोचवतात. नदी पर्वतातील गाळ, कचरा इ. वाहून आणते पण गोड पाणी आपल्यापर्यंत पोचवते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची वाफ होते. मेघ आपल्याला जीवनदायी जलधारांचा वर्षाव करतात. आपले शरीर देखील आपण खाल्लेल्या अन्नातील सार शोषून घेते. असार आहे ते बाहेर टाकते. निसर्गातील सर्वच घटक अशा प्रकारे सार ग्रहणाचे कार्य करीत असताना आपल्याला दिसतील. त्याप्रमाणेच ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याचे नामच सर्व सार आहे. नामातच त्याचा वास आहे. तेच नाम आपणही घ्यावे. पण आपण मात्र असार असलेला हा संसार खरा मानून सारभूत असलेले भगवंताचे नाम घेत नाही.
पण नामाचा महिमा वारंवार सांगूनही काही लोकांना पटत नाही. अशा लोकांना समजावणे अवघड असते. स्वतः शोध घेतल्याशिवाय त्यांची खात्री पटत नाही. त्यांच्या मनात अपार शंका असतात. यांना सांगायला काय जाते? नुसत्या नामामध्ये एवढे सामर्थ्य असणे कसे काय शक्य आहे? नुसते नाम घेऊन काय होणार आहे? कशाला त्यात वेळ घालवायचा? अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की माझे बोलणे तुम्हाला खरे वाटत नसेल तर स्वतः खात्री करून घ्या. विविध ग्रंथ, पुराणे, वेद, उपनिषदे अभ्यास. संतांच्या वचनांचे वाचन करा. हे सगळे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे ग्रंथ, पोथ्या पुराणे एकमुखाने भगवंताच्या नामाचा उद्घोष करीत आहेत. सर्व संतांनी देखील नामाचा महिमा एकमुखाने गायिला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या मनातील व्यर्थ शंकांचा त्याग करा. सर्व संशय टाकून द्या. ‘ संशयात्मा विनश्यति ‘ असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे नाम हेच सर्व सार असल्याची जेव्हा खात्री होईल तेव्हा सगळ्या शंका टाकून देऊन निःशंक मनाने भगवंताचे नाम घ्या. कवी अशोक परांजपे आपल्या एका सुंदर गीतात म्हणतात – –
नाम आहे आदि अंती, नाम सर्व सार ।
आहे बुडत्याला नौका ठेवली जीवनी आधार ।।
या गीताच्या शेवटच्या कडव्यात ते म्हणतात – –
नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
असे आपलेही कर्म नाममय व्हावे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – –
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥
– – म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की प्रभात समयी भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे दिवसभर त्याचे स्मरण राहते.
स्वसंवाद ::
१. निसर्गातील प्रत्येक घटक जर केवळ ‘सार’ ग्रहण करत असेल, तर मी मात्र संसारातील ‘असार’ (क्षणभंगुर) गोष्टींनाच आयुष्यभराचे सत्य मानून त्यात गुंतलो आहे का?
२. भगवंताच्या नामाबद्दल किंवा भक्तीबद्दल माझ्या मनात नकळत काही ‘वाउगा’ (व्यर्थ) संशय किंवा तर्क-वितर्क येत राहतात का?
३. सर्व संतांनी आणि श्रेष्ठ ग्रंथांनी ज्या नामाला ‘जीवनाचा आधार’ म्हटले आहे, त्या नामाचा अनुभव मी स्वतः कधी निःशंक मनाने घेऊन पाहिला आहे का?
४. माझे नित्य कर्म ‘नाममय’ व्हावे यासाठी मी रोजच्या धावपळीत किती जागृत राहतो?
– – – –
श्लोक क्र. ७६ – –
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।।
अर्थ :आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.
(त्याग – विरक्ती, सांग – यथासांग/व्यवस्थितपणे)
विवेचन :प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.
आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्माला व्यवस्थितपणे न्याय देणे आपल्याला जमत नाही. धर्मपालनाच्या बाबतीतही असेच होते. धर्मपालनासाठीच्या विविध गोष्टी, विविध मार्ग ऐकून सामान्य माणूस गोधळतो. मग हे करू की ते करू अशी त्याची अवस्था होते. योगाचा किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करणे त्याला शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सामान्य माणसाची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे होते. लोकांची ही मानसिकता ओळखून त्यांची दिशाभूल करणारे बुवा बाबा त्यांचे उखळ मात्र पांढरे करून घेतात. समर्थांसारखे सद्गुरू लोकांना अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे अचूक कार्य करतात. लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात.
समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस अशा गोंधळलेल्या स्थितीतच होता. तो कर्मकांडात अडकला होता. त्यामुळे ईश्वरप्राप्तीच्या खऱ्या मार्गापासून दूरच चालला होता. अशा वेळी समर्थ, संत तुकाराम आदी संतांनी लोकांना खरा धर्म काय आहे हे समजावून सांगितले. लोकांची परंपरा, अंधश्रद्धा आदींवर प्रहार करून त्यांना खरा ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. त्यासाठी काही पैसा, वेगळा वेळ, शारीरिक श्रम या गोष्टी लागत नाहीत हे सांगितले.
कालमान बदलले आहे. पूर्वीप्रमाणे लोकांना योग, याग, तप करणे जमणार नाही हे ओळखून त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांच्या हाती नामस्मरणाची गुरुकिल्ली दिली. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जेवढया चांगल्या प्रकारे शक्य होईल तसे पालन करा, आपण जे काही धार्मिक विधी करतो, त्यात काही तरी अपूर्णता राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी म्हणतो, ” आवाहनं न जानामी, न जानामी तव अर्चनं… ” असे म्हणून परमेश्वराची क्षमा मागतो आणि काही अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करून घे अशी प्रार्थना करतो. म्हणूनच धर्म, योग, याग या गोष्टी पूर्णपणे जशाच्या तशा पालन करणे जमणार नाही हे समर्थ जाणतात. पण या सगळ्यात एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांचे सांगणे आहे. ती गोष्ट कोणती? तर ते म्हणतात, “म्हणे दास विश्वास नामी धरावा. ” इतर गोष्टी जशा जमतील तशा करा. पण नामावर विश्वास ठेवून नामस्मरणाचा सोपा मार्ग अवलंबा असेच त्यांचे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, ” एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ” तेव्हा सर्व संतांचे सांगणे एकच आहे. परमेश्वराचे नाम भक्तिभावाने घ्या. जणू तो समोर उभा आहे अशी कल्पना नाम घेताना करा. तुकाराम महाराज म्हणतात, “नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी । ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन. ” तेव्हा अशा प्रकारे प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करा.
स्वसंवाद ::
१. विविध ग्रंथांचे मतमतांतर आणि संभ्रम यात अडकून न पडता, मी समर्थांनी सांगितलेल्या ‘नामावरील विश्वासाची’ गुरुकिल्ली स्वीकारायला तयार आहे का?
२. “आवाहनं न जानामी” म्हणताना माझ्या मनात माझ्या अपूर्णतेची जाणीव आणि भगवंताप्रती संपूर्ण शरणागती असते का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मुखात नाम घेताना प्रत्यक्ष ‘जगजेठी’ (परमेश्वर) माझ्या समोर उभा आहे, अशी अनुभूती घेण्याचा मी कधी प्रयत्न करतो का?
४. या १० श्लोकांच्या मालिकेतून मी नेमके काय शिकलो? उद्यापासून माझ्या मनात ‘राम चिंतनाची’ नवी पहाट होईल का?
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
तुकारामांचा युक्तिवाद
दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.
नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//
कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//
कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//
तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//
देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,
” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “
आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.
आता हा दुसरा अभंग पहा.
जेणे तुज जाले रूप आणि नाव/
पतीत हे दैव तुझे आम्ही//
नाही तरी तुज कोण हो पुसते/
निराकारी तेथे एकाएकी//
अंधारे ते दीपा आणियेली शोभा/
माणिकाची प्रभा कोंदणाची//
धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/
सुखी काय चाडा जाणावे त्या//
अमृतासी मोल विषाचिया गुणे /
पितळ तरी सोने उंच नीच//
तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /
तुज देवपण आणियेले//
रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.
या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.
माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.
थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.
हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.
बहु होता भला/ परी या मायेने नासीला//
बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //
नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//
ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//
विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,
पंडित म्हणता थोर सुख/
परी तो पाहता अवघा मूर्ख//
काय करावे घोकिले/
वेदपाठ वाया गेले//
वेदी सांगितले न करी/
समब्रह्म नेणे दुराचारी//
हा वेदींचा अनुभव/
तुका देखे जीव शिव//
एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.
पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//
अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//
रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//
तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//
तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.
संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.