हिन्दी साहित्य – कविता ☆ अभिव्यक्ति # -९८ – कृष्ण खेलें होली, राधा के संग… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता ‘कृष्ण खेलें होली, राधा के संग।)

☆ अभिव्यक्ति # ९८ ☆ कृष्ण खेलें होली, राधा के संग☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

रंगों में रंग, होली के रंग,

कृष्ण खेलें होली, राधा के संग,

 

रंग गुलाबी, प्रेम भरा है,

लाल रंग विश्वास भरा है,

नीला रंग है, श्याम के जैसा,

रहें सदा संग संग,

कृष्ण खेलें होली, राधा के संग,

 

रंगों की वर्षा, राधा करतीं,

सखियां भी न पीछे हटतीं,

रंग गुलाल की वर्षा होती,

गोकुल की गलियां रंगती,

नर नारी के संग, ,

कृष्ण खेलें होली, राधा के संग,

 

संग नहीं खेलना, मुझको ये रंग,

तेरे ही रंग में, अंग जाए रंग,

राधा खो जाए, श्याम में आकर,

जैसे ज्योति दीपक में जाकर,

आपस में एक रंग,

कृष्ण खेलें होली, राधा के संग.

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/ ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, क्षितिज पुणे एवं हिंदी आंदोलन परिवार का आयोजन – भ’ से भाषा, ‘भ’ से भारत’ ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, क्षितिज पुणे एवं हिंदी आंदोलन परिवार का आयोजनभ’ से भाषा, ‘भ’ से भारत’  

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, क्षितिज पुणे एवं हिंदी आंदोलन परिवार, पुणे के संयुक्त तत्वाधान में शनिवार 7 मार्च को ‘भ’ से भाषा, ‘भ’ से भारत’ कार्यक्रम प्रस्तुत किया गया। इस कार्यक्रम में भारत के विभिन्न राज्यों की विविध भाषाओं की कविताओं और लोकगीतों की वाचन, गायन, नृत्य एवं अभिनय द्वारा प्रस्तुति की गई।

इसके लेखक, निर्देशक, सूत्रधार- संजय भारद्वाज थे। कार्यक्रम का निर्माण क्षितिज इन्फोटेनमेंट ने किया था। रबींद्रनाथ टैगोर विश्वविद्यालय, भोपाल के अंतरराष्ट्रीय हिंदी केंद्र के निदेशक डॉ. जवाहर कर्नावट आयोजन के मुख्य अतिथि थे। उद्घाटन सत्र के अपने वक्तव्य में हिंदी के वैश्विक होने पर प्रसन्नता व्यक्त करते हुए कहा कि हमें राष्ट्रीय स्तर पर इसके लिए और अधिक काम करना होगा। आपने भाषाई स्वाभिमान को सदैव जगाए रखने पर भी बल दिया। कार्यक्रम का आरंभ संजय भारद्वाज की कविता और उदीयमान नृत्यांगना प्राची पुजारी के कथक की जुगलबंदी से हुई। तत्पश्चात विभिन्न भारतीय भाषाओं की कविताओं एवं उनके भावानुवाद, विभिन्न ललित कलाओं द्वारा मंच पर आते गए। प्रमुख रचनाकारों, वाचकों एवं कलाकारों में सुधा भारद्वाज, वीनु जमुआर, ऋता सिंह, विनीता सिन्हा, गौरी कुलकर्णी, अनिल अब्रोल, सतीश कुमार, आशीष त्रिपाठी, अपर्णा कडसकर, डॉ. ज्योति कृष्ण, कंचन त्रिपाठी, गौतमी चतुर्वेदी पांडेय, कंचन त्रिपाठी, ऊर्जा वाईकर, पूर्णिमा पांडेय, शशिकला गुंडलूपेट, अपूर्व शर्मा, प्राची पुजारी, अंगिता कुमार, अनुपम पांडेय, रितेश बुरूड आदि सम्मिलित थे। विशेष बात यह रही कि कविता या गीत प्रस्तुत करने वाले हर रचनाकार ने भारत के किसी राज्य विशेष का परिधान धारण किया था। कार्यक्रम में हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली, कन्नड़, पंजाबी, खोरठा, असमिया, बुंदेलखंडी, सधुक्कड़ी आदि भाषाओं की रचनाओं का पाठ हुआ। रंगमंचीय शैली में प्रस्तुत इस कार्यक्रम ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। कार्यक्रम में बड़ी संख्या में साहित्य तथा कलाप्रेमी उपस्थित थे। प्रमुख उपस्थितों में डॉ. केशव प्रथमवीर, डॉ. राजेंद्र श्रीवास्तव, श्री हेमंत बावनकर, डॉ. विपिन पवार, डॉ. रमेश गुप्त, डॉ. कांतिदेवी लोधी, डॉ. रजनी रणपिसे एवं अन्य अनेक प्रतिष्ठित हस्ताक्षर सम्मिलित थे।

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ साद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

ओळखीची साद येता साथ तू ही देत जा

माणसा माणूस आता माणसांचा होत जा

*

भाट राजानें सारे ओसरीला बांधले

तू नको जाऊस तेथे दूर थोडा जात जा

*

लाभले स्वातंत्र्य आहे ते जरासे भोग ना

मौन तू पाळू नको रे गीत साधे गात जा

*

सातबारा नोंदलेला तोच आहे आपला

वतन आहे मालकीचे ते तुझे तू घेत जा

*

फसवणारे लोक जमले खूप झाले भामटे

आत्मरंगी रंगुनीया वेगळा तू -हात जा

*

गरजवंतांच्या पुढे जा पुरव त्यांच्या मागण्या

मागणारा भेटला की देत हाती हात जा

*

देह पुरता पोसण्याला अन्न पाणी घ्यायचे

लागते जगण्यास जितके तेवढे तू खात जा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी

(८ मार्च —- ‌महिला दिनानिमित्त, परदेशी असून भारतासाठी कार्य करणाऱ्या महिलांची ओळख –)

(साभार – यूट्यूब चैनल >> IMC Business Official)

जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कर्मभूमी आपण निवडू शकतो आणि आपल्या कर्माचा ठसा तिथे उमटवूं शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोलकर.

सावित्रीबाई म्हणजे एखाद्या मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटते. पण त्यांचे मूळचे नाव ‘इव्हा युओन लिंडा’. असे होते. जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंड मध्ये झाला. आई रशियन व वडील हंगेरीचे होते. आई लहानपणीच वारली. वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथपालही होते. त्यामुळे इव्हाना लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून भारत व भारताचा इतिहास कळला. भारताविषयी ओढ निर्माण झाली.

मेजर विक्रम खानोलकर हे भारतीय लष्कर अधिकारी मुळचे महाराष्ट्रातील सावंतवाडीचे रहिवासी होते. रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅंडहस्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. तेव्हा ते स्विझर्लंडला गेले असताना त्यांची व इव्हा यांची भेट झाली. १६ वर्षाची इव्हा २७ वर्षांच्या भारतीय तरुणांच्या प्रेमात पडली. आई-वडिलांचा विरोध पत्करून १९३२साली, आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही मुलगी, भारतात आली. त्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या. २९ वर्षांच्या मेजर विक्रम यांचे बरोबर त्यांनी लग्न केले. हिंदू धर्म स्वीकारला. इव्हाच्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.

त्या पूर्णपणे बदलल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला. साडी, कुंकू, साध्या चपला, शाकाहारी जेवण यांचा स्वीकार केला. भारतीय भाषा, वेद, उपनिषदे, संस्कृत काव्य यांचा अभ्यास सुरू केला. पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या. चित्रकला, संगीत व नृत्याची आवड होती. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी उस्ताद पंडित उदयशंकर यांची शिष्या झाल्या. हे सर्व करून ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. ती खूप गाजली. हिंदी, मराठी, संस्कृत बोलू शकत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यात त्या समरसून गेल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. देशाच्या शुरानी बलिदान केलं. तेव्हा युद्धात प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ नवीन पदकांची रचना करण्याचे काम मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे आले. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची निवड केली. सावित्रीबाईंनी हे आव्हान स्वीकारले. भारतीय संस्कृती आणि वेद पुराणांच्या अभ्यासाचा उपयोग केला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पदकांची रचना मे. ज. अटल यांच्याकडे त्यांनी पाठवली. सर्वाना ती पसंत पडली. हे बनवत असताना इंद्राचे शस्त्र वज्राची प्रेरणा मिळाली. महर्षी दधिचीनी वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनविता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थी पासून बनवलेले वज्र हे समर्पणाचे प्रतीक. म्हणून परमवीर चक्राच्या मध्यभागी भारताची राजमुद्रा आणि त्या भोवती इंद्राच्या वज्राची चार चिन्हे कोरलेली आहेत. हे गोलाकार चिन्ह ३. ५ सेंटीमीटर व्यासाचे कास्य धातूचे आहे. दुसऱ्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये परमवीर चक्र असे कोरले आहे. या दोन शब्दांच्या मध्ये कमळ आहे. सैनिकाची शक्ती आणि बलिदान राष्ट्राचे रक्षण कसे करेल याचं ते चिन्ह म्हणजे प्रतीक. त्याग आणि शक्तीचे हे प्रतीक, यातून युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचा धागा मजबूत केला.

पहिलं परमवीर चक्र पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे मेजर शर्मा सावित्रीबाई खानोलकर यांची कन्या कुमुदिनी हिचे दिर होते. परमवीर चक्रा प्रमाणेच अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा प्रमुख चक्रांची रचना सावित्रीबाईंनी केली. ही देशाला त्यांनी दिलेली देणगी. त्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.

१९२९ मध्ये किंग्स कमिशन मध्ये जॉईन झालेल्या खानवीलकरानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. पाच ऑगस्ट १९४९ रोजी दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी नंतर १९५२ मध्ये कलकत्ता पायदळ तुकडीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ते कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जात. पत्नीसह ट्रेन ने कलकत्त्याला परतत असताना २९ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर मेजर जनरल पदावर त्यांना बढती देण्यात आली. त्याना दोन मुली व एक मुलगा होता.

विक्रम खानवीलकरांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठी त्यांनी भरपूर काम केले. १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. अशी ही निसर्गाची आवड असणारी, स्वित्झर्लंडची कन्या पूर्ण भारतीय होऊन राहिली. आपल्या कार्याने अजरामर झाली.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

परवा रस्त्याने जाताना एक सुंदर सजावट दिसली. बाहेर ओळीने कंदील लावलेले होते. ते बघून मी एकदम बालपणात पोहोचले. माझे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या गावात वीज नव्हती. त्यामुळे हे कंदीलच सर्वत्र उजेड करायचे. अगदी रस्त्याने जाताना सुद्धा रस्ता दिसण्यासाठी हातात कंदील असायचा. कारण बंदिस्त काच असल्याने त्याला वाऱ्यापासून संरक्षण मिळायचे. आणि उजेड पडायचा. घरात तर प्रत्येक खोलीत असा कंदील असायचा. आणि तो भिंतीवर खुंटीला अडकवला की सगळ्या घरात उजेड पडायचा. ज्याला अंगणात जायचे असेल त्याने तो वरच्या कडीला धरून आपल्या सोबत घेऊन जायचा. आणि आपल्या पुरता अंधार गायब व्हायचा. मला तर खूप मज्जा वाटायची. तो उजेडाचा गोल आपल्या बरोबर प्रवास करायचा. आणि लांबून येणाऱ्याला माणूस दिसायचाच नाही. फक्त उजेड आपल्या दिशेने येताना दिसायचा.

हा कंदील घेताना घरातून बजावून सांगितले जायचे, “प्रभाकर कंदीलच घ्या”. काच नीट बघून घ्या. काच ओगले यांची असेल तोच घ्या. त्यातही दोन, तीन रंग मिळायचे. हा कंदील मिळायचे पुण्यात दत्ताच्या देवळा जवळ दुकान होते. तेथूनच आणा असेही सांगितले जायचे. घरात कंदील आला की मोठेच कौतुक वाटायचे. त्याला हळदी कुंकू लावले जायचे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले जायचे. दुपार नंतर तो कंदील घेऊन त्यात चपटी वात घातली जायची. आणि रॉकेल भरायचे. त्याच्या काचेच्या खालची किल्ली वर खाली करुन ती वात रॉकेल मध्ये भिजली आहे का बघितले जायचे. मग त्यावर काच चढवली जायची.

आणि कडेचा स्टॅन्ड (आम्ही त्याला घोडा म्हणत होतो) वर खाली करुन मगच ही कंदील उजळण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची.

दुसऱ्या दिवसा पासून संध्याकाळी कंदीलची काच साफ करणे हे जोखमीचे पण आवडते काम रोज करावे लागे. आणि ती काच चमकवण्या साठी आमच्या लहान मुलांची स्पर्धा लागायची. त्या साठी विविध प्रयोग चालायचे. नुसत्या मऊ कपड्याने काच पुसणे. चुलीतली राख चाळून त्याने काच घासणे. मऊ कापडाने पुसणे. पाणी व साबण याने साफ करणे. पण त्यात हातातून निसटून पडून फुटण्याचा धोका असे. अशा काचा चकचकित केल्या की आम्ही शेजारी ठेवून कोणाची काच जास्त स्वच्छ झाली याचे निरीक्षण करत असू. विशेष म्हणजे तो उजळलेला कंदील चुकून पडला तरी आग लागत नसे.

याच्या उजेडात घरातली कामे व्हायचीच पण आमचे भविष्य पण उजळत होते. हा कंदील मध्ये ठेवून त्याच्या भोवती मी व माझ्या मैत्रिणी अभ्यास करत होतो. कारण दिवसभर शाळा आणि रात्री अभ्यास करावा लागायचा.

त्या कंदीलाचा वरचा भाग गरम व्हायचा. आणि त्याच्या उष्णतेने माझे माथ्यावरचे केस कायम जळायचे. पण बुद्धी मात्र उजळायची आणि अभ्यासाचा उजेड डोक्यात पडायचा.

मी असा कंदील खूप वर्षे जपून ठेवला होता. आणि लाईट गेल्यावर मेणबत्ती ऐवजी त्याचा वापर करत होते. तो बघून शेजाऱ्यांना खूप आश्चर्य वाटायचे. आणि मुलाला आकर्षण वाटायचे.

नंतर सगळीकडे विजेचे खांब उभे राहिले. घरात बल्बचा उजेड पडला आणि अत्यावश्यक कंदील माळ्यावर रवाना झाला. पण त्याच्या आठवणी मात्र अजून मनात आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर

नमस्कार!! “मी आनंदी”

कोणी सेलिब्रिटी नाही.

तुमच्यासारखीच सामान्य माणूस.

आजचा दिवस एकदम खास,

माझा वाढदिवस,

सकाळी छान आवरलं.

रात्री आठवणीनं आणलेला केक स्वतःला भरवताना विचारचक्र सुरु झालं.

“आनंदीबाई, आतापवतो तब्येतीनं छान साथ दिलीय. डायबेटीस, बीपी हे पाहुणे अजून तरी लांबच आहेत. आज त्रेचाळीस पूर्ण, लवकरच पन्नास मग साठ 

बाप रे, इतकं आयुष्य नको.

हातीपायी धड आहे तेव्हाच कारभार उरकलेला बरा. त्यातही झोपेतच झालं तर सोन्याहून पिवळं. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही. पुढेही नको. पुन्हा एकदा हॅपी बड्डे टु मी. ”आरशात पाहत स्वतःला भरभरून शुभेच्छा दिल्या.

खूप वर्षापूर्वी आई-वडील गेले.

तेव्हापासून एकटीच.

भाऊ-बहीण नाही.

जबाबदारी नको म्हणून नातेवाईकांनी अंतर राखलं.

ओळखी खूप आहेत परंतु मित्र-मैत्रिणी नाहीत.

लग्नाचा योग नव्हता.

एकदोन अनुभवानंतर त्या वाटेला परत गेले नाही.

असो.. जाऊ दे.

निदान आजतरी हे रडगाणं नको.

माझं जग फार छोटं.

राहती खोली आणि छोटी टपरी,

दोन्ही आई-वडिलांकडून मिळालेलं.

टपरी म्हणजे माझा जीव की प्राण…

कमाईचे एकमेव साधन.

सकाळी नऊ ते रात्री नऊ तिथचं.

२० वर्षे एकच रुटीन.

एकटेपणाची इतकी सवय झाली की आता सोबतीची भीती वाटते.

तशी मी एककल्ली, फटकळ, तापट स्वभावाची.

कोणाचाही मुलाहिजा न राखता बोलणारी,

खडूस, भांडखोर, फाटक्या तोंडाची म्हणून कुप्रसिद्ध..

म्हणूनच सगळे चार हात अंतर राखून.

खरं सांगायचं तर मी अशी नाहीये पण एकट्या बाईला जगात टिकायचं असेल तर 

काहीतरी मुखवटा घालावाच लागतो.

मी तेच केलं.

रोजच्याप्रमाणे दुकानात बसले होते.

वाढदिवसामुळे मन प्रसन्न अन छान मूड होता.

समोर दहा-बारा वर्षाची मुलं क्रिकेट खेळत होती.

दुकानाजवळच एकजण फिल्डिंग करत होता.

सहज मनात आलं. त्याला बोलावलं अन चॉकलेट दिलं.

अनपेक्षितपणे मिळालेल्या गिफ्टमुळे खुष झालेला पोरगा मनापासून हसला.

त्याचा खुललेला चेहरा पाहून मलाही मस्त वाटलं.

*आपल्यामुळं आनंदी झालेला चेहरा पाहणं यापेक्षा जगात सुंदर काहीही नाही. *

काही वेळानं लक्ष गेलं तेव्हा खेळ थांबलेला अन सगळे दुकानाकडे पाहत होते.

काय झालं असेल याची कल्पना आली.

सर्वांना बोलवून चॉकलेट दिलं. मुलं एकदम खुष.

‘बड्डे!!’एका पिटुकल्यानं विचारलं.

“हो, म्हणूनच चॉकलेट दिलं”

प्रत्येकानं शेकहँड करत ‘हॅप्पी बड्डे’ केलं.

फार फार भारी वाटलं. मुलं खेळायला गेली.

काही वेळानं घोळका परत आला.

“काय झालं. आता काही मिळणार नाही. ”मी विनाकारण डाफरले.

मुलं एकमेकांकडे टकमका बघायला लागली.

एकानं कुठून तरी तोडून आणलेलं पिवळं फुल पुढं केलं.

“माझ्यासाठी!!”मी हरखून विचारलं.

तेव्हा माना डोलावत सगळे म्हणाले “बड्डे गिफ्ट”

त्यावेळेस जे वाटलं ते सांगता येणार नाही.

खूप भरून आलं. मान फिरवून ओढणीनं डोळे पुसले.

प्रत्येकाला बिस्किट पुडा दिला. सगळे डबल खुष.

पुन्हा एकदा शेकहँड करत “हॅपी बड्डे”केलं अन खेळायला गेले.

मी मात्र बराच वेळ त्या फुलाकडे पाहत होते.

वाढदिवसाला मिळालेलं माझं पहिलंवहिलं गिफ्ट.

मुलांचं खूप कौतुक वाटलं. त्यांच्यामुळे माझा वाढदिवस स्पेशल झाला.

खूप सारं समाधान अन आनंद मिळाला.

मी आज फक्त नावापुरती नाही तर खरोखर *“आनंदी”* होते

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

दाखले नकाच मागू तुम्ही…

ती आहेच स्वयंसिद्धा.

पण, प्रेमात आकंठ बुडालेली असते ना…

तेव्हा स्वतः ला विसरूनच जाते जशी

आपणहूनच बांधून घेते, बंधनात स्वतः ला,

घालून घेते शृंखला पायी…

आपणहूनच अडकवून घेते प्रेमाच्या धाग्यात स्वतः ला…

स्वतः च, स्वतः शी केलेल्या संकल्पासारखी.

तुझ्या प्रेम अंबरात आपल्या इच्छा अगदी सफाईने टाचून ठेवते.

असीम अशी शक्ती दडपून ठेवते

वात्सल्याच्या उतरंडी खाली.

ऐक ना…

पण तू नको हं नजरेआड करूस

तिचं हे स्व समर्पण! 

घालायचंच असेल तर घाल बंधन…

पण… शब्दांत हवं तेवढं, हवं तेव्हा… व्यक्त होण्याचं.

स्वाभिमानाचं आभूषण दे तिला, ल्यायला तिच्या मनावर.

बांधून ठेव तिला तुझ्या प्रेमाच्या रेशमस्पर्शी बेडीत.

तिचा स्व कर की स्वतंत्र… होऊ दे तिला मोकळी.

मग बघ… उत्साहाची कर्णफुले घालून…

सावरीच्या कापसासारखी हलकी होऊन,

आनंद लहरींवर कशी तरंगेल, हर्षोल्लासाने नाचेल.

तुझ्या कितीतरी अशा गोष्टी…

ज्या तिच्या कल्पनेतल्या ; पण तू कधीच न केलेल्या अशा कितीतरी गोष्टीतही

सप्तसुरांचं मधुर संगीत ऐकल्याच्या काल्पनिक आनंदात थिरकलीयं ती…

पण आता मात्र तू एखादं खरंखुरं मधुर गीत बनून येशील… तरच ना सगळं जुळून येईल मनाजोगतं…

येशील कां रे?? … येशील ना???

(‘स्वयंसिद्धा स्त्री’ या निधी सक्सेना यांच्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद…)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

“तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य?? ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??

स्वामी सामर्थ्यावर विश्वास नाही काय?

समाज जीवनास संतांचा मोठा आधार वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ म्हणतात तेंव्हा भक्तास आपण सामर्थ्यशाली आहोत अशी भावना निर्माण होते आणि त्या आत्मविश्वासाने तो संसारातील समस्यांना सामोरा जातो.

स्वतः नामस्मरण करणं आणि तसं इतरांना करायला उद्युक्त करणं ही गोष्ट पुण्यप्रद आहे, हे खरेच आहे. पण… श्री स्वामी समर्थ असं facebook post वरील comment section मध्ये type कर… म्हणजे तुझ्या समस्या दूर होतील, तुला अमुक इतक्या तासांत, दिवसांत धनलाभ होईल असं सांगणं हे कितपत योग्य आहे?

 Comment मध्ये type केल्याने नामस्मरण होत असेलही पण धनलाभ मात्र page निर्मात्यास होत असावा! कारण अशी कित्येक pages दिसू लागली आहेत. येनकेन प्रकारे लोकांना comments करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जाहिरातीमध्ये लोकांच्या मनातील विविध भावनांना हात घातला जातो. त्यात भीती, आमिष, स्वामित्व, अभिमान इत्यादी भावनांना आवाहन करून वस्तू खपवली जाते… उदाहरणार्थ हम… वाले हैं! सारखी जाहिरात! असो.

लिहा comment मध्ये स्वामी समर्थ इत्यादी इत्यादी मार्गाने स्वामींशी संबंधित संस्थांना पैसे मिळत असतील तर ते एकवेळ ठीक आहे. पण अधिकृत संस्था हा मार्ग अवलंबत असतील, असं वाटत नाही!

यातील काही pages वाल्यांचा हेतू निव्वळ स्वामी नामाचा प्रसार करणे असा शुद्ध असूही शकतो आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे!

पंढरपूर मधील एका प्रसिद्ध मठात रामनाम लिहिलेले कागद जमा करून घेतले जात. काही लोक घरी वहीत नाम लिहित असतात. देवाचे, संतांचे नाव मुखातून उच्चारले जाणे महत्वाचे आहे. मनातल्या मनात नामस्मरण सुद्धा – – 

संतोषी मातेची पत्रे पाठवा, बालाजी आणि अनेक स्थानिक देवतांच्या नागांची कथा असलेली hand bills छापून वितरीत करणे इत्यादी प्रकार अजूनही प्रौढ लोकांच्या लक्षात असतील.

स्वामी अशक्य ते शक्य करतात असा विश्वास असल्यास भक्तांना कुठेही ऑनलाईन जाण्याची गरज पडणार नाही… त्यापेक्षा स्वामींच्या मंदिरात त्यांच्या दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहून नामस्मरण करीत दर्शनाची प्रतीक्षा करणे केंव्हाही श्रेयस्कर आहे, असे वाटते. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.) 

इथून पुढे – – 

मूल्य निर्मिती- संपत्ती फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही. उद्योग, नाविन्य आणि गुंतवणुकीतून नवीन संपत्ती निर्माण होते, ज्यामुळे सर्वांचे जीवनमान सुधारू शकते. स्त्रियांचा स्वयंरोजगार म्हणजेच तिला स्वयंसिद्धा बनवण्याचा प्रयत्न वर निर्देशित तात्पुरत्या योजनांपेक्षा कित्येक पटीने महिलांचे कल्याण साधणारा आहे. म्हणजेच कुणाची भूक भागवण्यासाठी त्या व्यक्तीला एका वक्तासाठी मास्यांचे कालवण न देता त्या व्यक्तीला मासे पकडण्याकरता प्रवृत्त करा वे ही खरी व्यावहारिक दानशूर वृत्ती.

मानसिकता- श्रीमंत लोक संधी शोधतात, तर गरीब लोक केवळ कमावण्याचे साधन शोधतात. स्त्रीची सकारात्मक मानसिकता आणि आर्थिक साक्षरता तिला आपसूकच स्वःत्व शोधायला मदत करील.

शिक्षण आणि कौशल्य- महिलांना असे भाकड भत्ते देऊन परावलंबी आणि लाचार बनवण्यापेक्षा योग्य ते शिक्षण, कौशल्य प्रदान करणे आणि तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वार्थाने मदत करून स्वावलंबी बनवणे ही कायमस्वरूपी भाऊबीज देणेच योग्य नाही कां?

संधींची समानता- श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचा वापर करून अधिक गुंतवणूक करतात, ज्यामुळे संपत्ती वाढते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांना सारखी संधी दिल्यास, संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. इथे पैशांचे डोंगर उभारणे हा उद्देश नसून स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे हाच उद्देश आहे. एक उद्यमी स्त्री अनेक स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवू शकते.

 थोडक्यात, संपत्ती वर्धमान करणे ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण समाजाच्या खऱ्याखुऱ्या प्रगतीचे लक्षण आहे, कारण अमक्याच्या खिशातून निधी घेत (तो आपणच देतोय असे भासवत) तमक्याला कांही क्षणांकरता आभासी श्रीमंत बनवण्याची कला मते उकळण्यापलीकडे कांहीही साध्य न करता केवळ समस्या हस्तांतरित करण्याचे उथळ साधन आहे.

एकत्रितपणे, जमेल तसे आंगिक, कार्यिक आणि सामाजिक ‘दान’ देणे म्हणजे लिंग समानता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे आणि नागरिक गटाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणा निश्चितच अपुऱ्या आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर गरीब मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेणे, याला आपण खारीचा वाटा म्हणू या. पण दात्यांची संख्या असंख्य असेल तर हा स्त्री विकासाचा सेतू बांधणे शक्य आहे. मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या अवाढव्य लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला होता. ते म्हणत, “भारताची लोकसंख्या ही केवळ समस्या नसून ती एक शक्ती आणि संपत्ती देखील आहे. ” म्हणूनच आपल्या दात्यांचे संख्याबळ हीच आपली ताकद आहे. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. आमच्या संकुलात ‘गूंज’ या संस्थेचे कार्यकर्ते वापरण्याजोगे जुने कपडे, भांडी, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी सामान नेण्याकरिता ट्रक घेऊन येतात. दिवाळीच्या आधी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि ट्रक काठोकाठ भरतो. गरजू व्यक्तींना या सामानाचे यथायोग्य वाटप केल्या जाते. हा अगदी लहानसा वाटणारा उपक्रम मुंबईतील कित्येक संकुलात राबवल्या जातो तेव्हा हा ज्ञानयज्ञ अतिव्यापक होतो.

रूढीवादी कल्पनांना छेद देत मुलीला मुलाइतकाच सकस आहार देणे, घरकामाची विभागणी करतांना किंवा आर्थिक पाठिंबा देतांना मुलांमध्ये लिंगभेद न करणे, मुलीचे लग्न ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच योग्य वयात करून देणे, या सारख्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबापासून सुरु होतात. मुलगी सासरी गेल्यावर तिला योग्य ती वागणूक मिळाली नाही, हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी तिचा छळ होत असल्यास तिच्या माहेरच्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यामुळे कित्येक हुंडाबळी टाळल्या जाऊ शकतील. आपल्या शेजारी किंवा जवळपासच्या कुटुंबात असे होत असेल तर “मला काय त्याचे? ” असा उपरा सवाल न करता समाजातील एक घटक या नात्याने या अन्यायाला वाचा फोडणे आपले कर्तव्य आहे.

एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. स्त्रियांची कार्यक्षेत्रे मर्यादित ठेवण्यात पारंपारिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे. मोजकी क्षेत्रे म्हणजे कार्यालयांतील किंवा हॉटेलातील रिसेप्शनिस्ट, दवाखान्यातील परिचारिका, विमानातील हवाईसुंदरी इत्यादी! मात्र आता ‘हे स्त्रियांचे, ते पुरुषांचे’ असा लिंगभेद नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा कांही क्षेत्रांत स्त्रियांची अफाट गर्दी तर कांही क्षेत्रात पुरुषमंडळींची वानवा अशी परिस्थिती उद्भवू शकते. स्त्रीची कार्यक्षमता लक्षात घेता असा कुठलाच प्रांत नाही ज्यात ती आपला ठसा उमटवू शकत नाही, हे मर्यादित संख्येत कां होईना स्त्रियांनी दाखवून दिलेले आहे. यासाठी मुलींना मळलेल्या वाटा सोडून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागेल. इथे ‘स्टेम’ (STEM- Science, Technology, Engineering, Maths) ही संकल्पना स्त्रियांना अफाट कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देऊ शकते. ‘स्टेम’ मुख्यत्वेकरून अमेरिकेत २००० सालापासून अस्तित्वात आली, आपल्या देशात २०२० च्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या अंतर्गत या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विषयी थोडक्यात सांगते.

या संकल्पनेचे निम्नलिखित घटक आहेत. कंसात संबंधित व्यवसायाची मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत.

  • विज्ञान आणि आरोग्यसेवा: नैसर्गिक जग समजून घेणे – (डेटा सायंटिस्ट, अनुवांशिक संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक.
  • तंत्रज्ञान: डिजिटल साधने आणि प्रणालींचा वापर- (सॉफ्टवेअर डेव्हलपर, एआय/मशीन लर्निंग इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक)
  • अभियांत्रिकी: डिझाइनिंग, बांधकाम आणि संबंधित समस्या सोडवणे- (एरोस्पेस, बायोमेडिकल, सिव्हिल आणि रोबोटिक्स अभियंता)
  • गणित आणि वित्त: डेटाचे विश्लेषण, संगणन आणि मॉडेलिंग- (अ‍ॅक्च्युअरी {विमा उतरवणा-या कंपनीकडे असलेला संख्याशास्त्रज्ञ}, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आर्थिक विश्लेषक) 

कांही तज्ज्ञ मंडळी यांच्यासोबत कलाक्षेत्र देखील जोडून या संकल्पनेस STEAM (‘स्टीम’) असे संबोधतात. त्यात A म्हणजे आर्ट अर्थात अतिभव्य असे कलाक्षेत्र देखील समाविष्ट केले जाते. कलेचे प्रांगण अतिशय विस्तृत असून त्यात प्रामुख्याने सर्जनशीलतेस भरपूर वाव आहे. एआयच्या जगात या अभिनव सृजनाचे महत्व आपण सर्व जाणतो. किंबहुना अत्युच्य पातळीवरील सर्जन हेच मानवाचे मूल्याधारित अस्त्र आहे असे दिसते. म्हणून मला स्टेम ऐवजी स्टीम ही संकल्पना अधिक भावली. या अभिनव शैक्षणिक धोरणाचे महत्व जर समजून घ्यायचे असेल तर वर निर्देशित प्रमुख शाखांचे एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मंडळी, या योजनेतील आदर्शांनुसार अगदी केजीपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संकल्पनेची व्याप्ती असायला हवी आणि त्यात प्रत्येक बालक आणि बालिकेला शिक्षणाचा समसमान अधिकार असावा. हा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिके, समस्या निवारण आणि गंभीर विचार क्षमतेवर भर देतो. व्यावहारिक ज्ञान मिळवून देणारे हे शिक्षण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध करून देईल अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायात लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर मूल्यमापन होऊन स्त्रियांना आपसूकच प्रवेश घेता येईल.

नवीन कल्पनांवर काम आणि प्रयोग करण्याची संधी देणाऱ्या या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनवणे हा आहे. जेव्हा आपण कांही देतो, तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. स्त्री सक्षमीकरणाने निव्वळ तिचाच नव्हे तर सर्वांगाने राष्ट्राचा फायदा होणार आहे. “गिव्ह टू गेन” चा खरा आश्वासक संदेश हाच आहे. शिक्षित स्त्री ही एक सशक्त कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. यात चूल आणि मूलच्या पल्याड जाऊन ती जेथे पाऊल ठेवेल ते तिचे कार्यक्षेत्र असायला हवे. नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तिची ऊर्जा कार्यान्वित व्हायला हवी. आधुनिक काळात विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढवणे आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे लैंगिक समानता आणि शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपण आधीच स्वतःमध्ये बाळगतो. “ 

 जे के रोलिंग

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मंडळी, हुताशनी पौर्णिमा. म्हणजेच होळी. परदेशात राहत असल्यापासून माझ्यासाठी या दिवसाचं महत्व फक्त पुरणपोळी खाण्याचा दिवस इतकंच आहे. कारण इथे काही मला होलिका दहन साजरे करता येत नाही आणि फारसे भारतीय नसल्याने रंगपंचमी सुद्धा साजरी होत नाही.

तर आज मी निगुतीने पुरण शिजवून साग्रसंगीत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी एका पोलिश मैत्रिणीला भेटायला जायचे होते. जाताना तिच्यासाठी म्हणून तीन – चार पुरणपोळ्या डब्यात घालून नेल्या. तिने पहिला घास खाताच मस्त म्हणून दाद दिली. मग कशापासून बनवल्या, कशा बनवल्या, आणि मग शेवटचा प्रश्न का बनवल्या? आज काय विशेष असे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. तिला होळी(हिंदीमधली रंगांची “होली”) याबद्दल जुजबी माहिती होती. पण मग आपली होळी, होलिका दहन, रंगपंचमी या गोष्टी तिला सांगत असतानाच ती मला म्हणाली, तू माझी मस्करी तर करीत नाहीस. मी म्हणाले, नाही गं, असं का वाटलं पण तुला? तर तिने जे काही सांगितलं ते माझ्यासाठी पण अचंबित करणारं होतं. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर.

आपण आपल्या भारत देशात होळी, होलिका दहन किंवा रंगपंचमी म्हणून ज्या काही प्रथा साजऱ्या करतो त्या करणारा आपण भारत एकमेव देश नसून अनेक युरोपियन देशांमध्ये थोड्या फार फरकाने तशाच प्रथा साजऱ्या केल्या जातात. आपण जसे थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की होळी पेटवतो तसेच हे देश त्यांच्या त्यांच्या हवामानानुसार थंडी संपून वसंताची चाहूल लागताच त्यांच्या त्यांच्या होळ्या पेटवून या प्रथा साजऱ्या करतात.

पोलंड मध्ये वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ मार्च रोजी त्यांच्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. ज्याला “तोपीयेन्ने माझान्ने” म्हणजेच “माझान्ना ला बुडवणे” असे म्हणतात. माझान्ना ही मृत्यू आणि हिवाळ्याची स्लाव्हिक देवी असून, तिचे प्रतिनिधित्व करणारा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्यापासून एक पुतळा बनवला जातो. त्याला स्त्रीचा वेश परिधान केला जातो, त्याची गावातून अंत्ययात्रा काढली जाते. नंतर सर्वजण मिळून त्यास पेटवून देतात आणि तो नदी, तलाव किंवा अन्य पाणवठ्यावर फेकून देतात. पोलिश लोकांच्या श्रद्धेनुसार हा विधी मृत्यूवरील विजय, हिवाळ्यातील काळोख्या दिवसांचा शेवट आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे.

त्या नंतर काहीच दिवसात पोलंडमधील प्रमुख सण इस्टर येतो. ईस्टरच्या पवित्र सोमवारी पोलंडमध्ये “श्मीगुस डिंग्युस” नावाची प्रथा साजरी केली जाते जी आपल्या रंगपंचमीची आठवण करून देते. मात्र यात रंग न वापरता फक्त पाणी उडवून एकमेकांना भिजवले जाते. ईस्टरच्या काही दिवस आधी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जात असल्याने, अश्या पद्धतीने पोलिश लोक हास्य आणि आनंदाच्या शिडकाव्याने (आणि भरपूर पाण्याने) वसंत ऋतूचे स्वागत करतात.

हे सगळं मैत्रिणीकडून ऐकल्यानंतर मी इतरही युरोपियन देशांमध्ये अशा काही परंपरा आहेत का याचा अभ्यास केला आणि मी थक्क झाले. त्यापैकी काही देशातील पद्धतींबद्दल मी तुम्हाला सांगते.

चेक रिपब्लिक: 

चेक रिपब्लिकमध्ये ३० एप्रिल रोजी ही होळीसदृश प्रथा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या प्रथेचा मुख्य उद्देश हा वसंताचे स्वागत आणि हिवाळ्यातील चेटकीणी आणि अंधारातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावणे हा आहे. चेक लोकांचं असं मानणं आहे की हिवाळा ऋतू हा चेटकिणींना (आणि इतर दुष्ट आत्म्यांना) शक्ती देतो आणि वसंत ऋतू सुरू होताच या चेटकीणी अस्वस्थ होतात आणि मग इतर दुष्ट आत्म्यांसोबत त्या मोठ्या पार्ट्या करतात ज्या थांबवाव्या लागतात.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की चेटकिणींची पार्टी थांबवायची कशी?

तर चेक लोक मोठ्या उद्यानात अथवा मोकळ्या मैदानात भल्यामोठ्या शेकोट्या पेटवतात आणि काड्या व पेंढ्यापासून बनवलेल्या एका चेटकीणीचा पुतळा त्या शेकोटीच्या टोकावर ठेवला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून जाळला जातो.

आणि चेटकिणींना उष्णता आणि आगीचा तिटकारा असल्यामुळे त्या पुढील हिवाळ्यापर्यंत काढता पाय घेतात.

तसेच चेक लोक देखील पोलंडप्रमाणेच इस्टरच्या सोमवारी पाण्याची प्रथा साजरी करतात. मात्र येथे फक्त पुरुष त्यांच्या बायको अथवा प्रेयसीवर खेळकरपणे पाणी उडवतात. आणि त्यांना पाम झाडाच्या फांदीने हळुवार प्रतिकात्मक फटके मारतात. जे प्रजनन क्षमता, आरोग्य आणि तारुण्याचे प्रतीक आहे. ही परंपरा येत्या वर्षासाठी महिलांना सुंदर आणि निरोगी ठेवते असे मानले जाते.

जर्मनी: 

जर्मनीतील होळी ज्याला “वालपुरगिसनाख्त” असे म्हणतात, दरवर्षी ३० एप्रिलच्या रात्री सुरू होऊन १ मे रोजी संपणारा उत्सव आहे.

वालपुरगिस नाईट ही आठव्या शतकातील संत वालपुरगा हिच्यामुळे ओळखली जाते. ही संत वालपुरगाबाई ख्रिश्चन धर्माचा प्रसार, तसेच जादूटोण्याला दूर ठेवण्यात आणि विविध आजार बरे करण्याच्या तिच्या कथित गुणांसाठी ओळखली जाते. तिच्या निधनानंतर, जादूटोण्याला लांब ठेवण्यासाठी लोक तिची प्रार्थना करीत असत.

पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की चेटकिणी आणि सैतान दरवर्षी ब्रोकेन पर्वतररांगातील हार्ज पर्वतांमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतार्थ एकत्र येतात. तेथे ते नृत्य करतात आणि ख्रिश्चनांना हानी पोहोचवण्यासाठी कट रचतात.

म्हणून मग लोक डोंगराच्या कडेला मोठाली शेकोटी पेटवत आणि त्यात वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या चेटकिणी सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या फेकून देत. आणि चेटकिणींना घाबरवण्यासाठी मोठमोठाली भांडी वाजवून, कर्कश्श आवाजात गाणी म्हणून किंवा बोंब ठोकून शक्य तितका मोठा आवाज काढीत असत.

आजही ही वालपुर्गीस नाईट जर्मनीमध्ये हिवाळ्यातील दुष्ट अंधाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी, मुख्यत्वे डोंगराळ प्रदेशात साजरी केली जाते.

स्लोवाकिया, हंगेरी: 

या देशातही जर्मनीप्रमाणेच ३० एप्रिल रोजी ही वालपुर्गीस नाईट साजरी केली जाते.

तसेच ईस्टरच्या पवित्र सोमवारी चेक रिपब्लिक सारखीच पाणीपंचमी खेळली जाते ज्यास “ओब्लिएवाचका” असे म्हटले जाते. मात्र यात शक्यतो बिनलग्नाच्या तरुण मुलींना तरुणांकडून थंडगार पाण्याने चिंब भिजवले जाते. असे करणे त्या मुलींसाठी चांगले आरोग्य, प्रजननशक्ती, आणि सौंदर्य घेऊन येते असे स्लोवाकियन लोक मानतात. आपल्याकडे देखील होळी अथवा रंगपंचमीला वृंदावनात गोप गोपिकांवर रंग उधळीत असत, नाही का?

स्कॅन्डिनेव्हिया:

कालांतराने जर्मनीमधून ही वालपुर्गीस नाईट ची प्रथा स्कॅन्डेनेव्हियन देशांमध्येही आली आणि आज या देशांतही मोठ्या प्रमाणावर ३० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्वीडिश लोक एकत्र येऊन हिवाळ्यात वाळून पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि वाळके गवत एकमेकांवर रचून खूप मोठ्या शेकोट्या पेटवतात, रात्रभर गाणी म्हणतात, शेकोटीत सॉसेजेस भाजून खातात आणि हिवाळ्यातील दुष्ट शक्तींना हाकलून लाऊन, वसंताचे जोरदार स्वागत करतात.

त्याचबरोबर २३ जून रोजी संध्याकाळी “संकथानसाफ्टेन” नावाचा एक होळीसारखाच सण नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड मध्ये साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण, मोठ्या मोठ्या शेकोट्या पेटवल्या जातात. येथे अशी शेकोटी पेटवण्याची प्रथा पूर्व-ख्रिश्चन काळापासून आहे, जेव्हा लोक उन्हाळ्यातील दीर्घकाळ राहणाऱ्या सूर्याचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा साजरी करीत असत. सूर्य म्हणजे जीवन, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या शक्तीचे प्रतीक. तेव्हा अग्नीला प्रतीकात्मक आणि जादुई महत्त्व होते. अग्नी हा वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी, पिकांची भरभराट आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. स्कॅन्डेनेव्हियन लोकांचे असे म्हणणे होते की या विशिष्ट रात्री, चेटकिणी सक्रिय होतात आणि सैतानाला भेटण्यासाठी आणि वाईट कृत्य करण्यासाठी एकत्र येतात. शेकोटी पेटवणे हे या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचा उपाय होता.

ग्रीस: 

ग्रीसमध्ये देखील वसंतादरम्यान ग्रीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याला “बर्निंग ज्यूडा” असे नाव आहे. ज्युडा म्हणजेच यहूदी.

तर ही यहूदाला जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून ग्रीसमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. ग्रीक लोकांच्या मानण्यानुसार यहूदा हा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला आणि त्याला क्रूसावर चढवले. ग्रीक इतिहासात, यहूदा विश्वासघात दर्शवितो आणि त्याचा पुतळा जाळण्याची प्रथा त्याच्या कृत्यांसाठी त्याला प्रतीकात्मक शिक्षा देण्याचा एक मार्ग आहे. आपण रावणदहन करतो साधारण काहीसं तसंच.

ईस्टरच्या पवित्र शनिवारी संध्याकाळी, गावातील रस्त्यांवरून एक मिरवणूक निघते, ज्यामध्ये यहूदाचा पुतळा घोड्यावरून नेण्यात येतो. नंतर हा पुतळा खांबावर टांगला जातो आणि त्याला आग लावली जाते. या मिरवणुकीदरम्यान लोक कर्कश्श आवाज काढतात. कधीकधी न आवडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाने बोंब सुद्धा ठोकतात. पुतळा जाळताच, फटाक्यांची आतषबाजी होते आणि लोक टाळ्यांच्या गजरात जल्लोष करतात. ही प्रथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याचा एक मार्ग आहे.

इटली:

इटालियन लोक मात्र त्यांची होळी एकदम स्टायलिश पद्धतीने साजरी करतात. विशेषतः इटलीमधील फ्लॉरेन्समध्ये हा उत्सव अगदी नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी इस्टरच्या पवित्र रविवारी अख्खे फ्लॉरेन्स शहर “स्कॉपियो डेल कॅरो”(“कार्टचा स्फोट”) नावाचा होळी सारखाच सण साजरा करण्यासाठी एकत्र जमते. या चमकदार देखाव्यामध्ये फटाक्यांनी भरलेली 30 फूट उंच अशी प्राचीन बैलगाडी असते.

ईस्टर प्रार्थने दरम्यान, कॅथेड्रलच्या आतून एक यांत्रिक कबुतर (ज्याला ‘कोलंबिना’ म्हणतात) बाहेरील बैलगाडीकडे तारेद्वारे सोडले जाते. हे कबुतर रॉकेट्सने भरलेले असते, आणि इटालियन लोक असे मानतात की ते पवित्र अग्नी घेऊन जाते. जेव्हा हे कबुतर गाडीवर आदळते तेव्हा गाडीत भरलेले फटाके जोरात फुटतात, ज्यामुळे एक नेत्रदीपक आतषबाजीचे प्रदर्शन होते.

इटालियन लोकांची अशीही श्रद्धा आहे की जर कबुतर यशस्वीरित्या गाडीवर आदळले आणि व्यवस्थित स्फोट होऊन आतिषबाजी झाली तर तो अतिशय शुभसंकेत मानला जातो, जो चांगले पीक, शांती आणि भरभराट घेऊन येतो.

स्वित्झर्लंड: 

येथील होळीसमान प्रथा थोडी मजेदार असते. त्याला “झेक्सएहलाऊतेन” असे नाव आहे. तो एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये कापूस आणि लोकरीपासून एक मोठा बूग नावाचा स्नोमॅन बनवला जातो. आणि मोठ्या शेकोटीच्या टोकावर उभा करून तो बरोब्बर संध्याकाळी ६ च्या ठोक्याला जाळून टाकला जातो. हा स्नोमॅन हिवाळा आणि थंडीचे प्रतीक मानला जातो. आग लागल्यानंतर जितका लवकर हा स्नोमॅन पेट घेईल तितका उन्हाळा ऊबदार आणि सुखकर होईल असे मानतात. आणि हळू पेट घेणारा स्नोमॅन पावसाळी आणि गारठा असणारच उन्हाळा सूचित करतो.

आता बरोबर ६ च का? तर एरवी तिथे कामगार दररोज ५ वाजेपर्यंत काम करतात, पण एकदा डे लाईट सेव्हिंग सुरू झालं की ते रोज ६ वाजेपर्यंत काम करू लागतात.

तर मंडळी, आहे की नाही नवल? मला तर हे सगळं वाचून कुठेतरी प्रत्येक धर्मातील पाळेमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत याचा पक्का विश्वास वाटतो. आपली होलिका राक्षसी असो, पोलंडची मार्झन्ना असो, हिवाळी चेटकीणी असोत, ज्युडा असो किंवा मग हिवाळ्याचे प्रतीक बूग स्नोमॅन असो, सगळ्यांचा उद्देश एकच, अंधाऱ्या कडाक्याच्या दिवसांवर मात करून, नवीन प्रकाशमय ऋतूची चाहूल माणसाला पुन्हा एकदा आयुष्य पूर्ण उत्साहाने जगण्यासाठी सज्ज करते, सकारात्मक ऊर्जा देते आणि पुन्हा एकदा निसर्ग नितांतसुंदर असण्याची प्रचिती आणते. हो की नाही?

तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या देशातील निराळी होळी माहित असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का.

लेखिका : अवनी दाते – पोलंडकर

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares