(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक लगभग तेरह दर्जन से अधिक मौलिक पुस्तकें ( बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य ) तथा लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन।लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित बारह दर्जन से अधिक राजकीय प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत।
कोणत्याही गोष्टीसाठी वापरले जाणारे हे शब्द. या दोन शब्दात बराच अर्थ आहे. गोष्ट चांगल्या आणि योग्य पध्दतीने करायची असेल तर त्यासाठी योग्य दिशा असली पाहिजे. आणि ही दिशा योग्य नसेल तर कामाची दशा होते.
योग्य दिशा असेल तर काम पूर्ण होईलच याची खात्री नसली तरी प्रयत्न हे उत्साह वाढवणारे असतात. त्यात समाधान असतं. पण दिशा देणारे किंवा दाखवणारेच चुकीचा मार्ग दाखवत असतील तर त्याची दशा व्हायला वेळ लागला तरी दशा होतेच.
घर, शिक्षण, धर्म, संस्कृती, आरोग्य, आणि समाजकारण हे प्रमुख भाग समजले तर या प्रत्येक भागात योग्य दिशा दाखवणारे असतात. त्यांचा आपला अभ्यास आणि अनुभव असतो. हा अभ्यास आणि अनुभव यातून त्यांनी योग्य आणि चांगली दिशाच दाखवावी हिच भावना असते. बरेच तर त्यांनी दाखवलेल्या दिशेने डोळेझाकून चालतात. कारण यांच्याबद्दल मनात असलेला विश्वास. या सगळ्यांना यथोचित मान आणि सन्मान मिळत असतो. पण हल्ली समाजकारण आणि राजकारण यात व्यवस्थित आणि मुद्दाम गोंधळ घातला जातो अस वाटतं.
सध्या या दिशा दाखवणार्यांमधे काही अपप्रवृत्ती असणाऱ्यांचा शिरकाव झाला आणि अशा काही अपप्रवृत्ती असणाऱ्यांनी या मान, सन्मान मिळणार्या जागांना अपमानित करण्याचा धडाका लावला. हे फक्त शिक्षण याच क्षेत्रात झाल आहे अस नाही. सगळ्याच क्षेत्रात आहे. पण कुठल्याहि क्षेत्रात त्या क्षेत्राच शिक्षण हाच पाया असल्याने सगळ्याच क्षेत्राच्या शिक्षणात झाला आहे.
याला अनेक कारणं असली तरी मिळणारा अमाप पैसा, स्पर्धा, चढाओढ, प्रसिध्दी, वरचढ ठरण्याची भावना आणि मिळणारा किंवा मिळवला जाणारा राजकीय वरदहस्त ही प्रमुख कारणं आहेत.
वैद्यकीय परिक्षा तर खूप मोठी आहे. या अपप्रवृत्तींचा भलामोठा वृक्ष होण्याची मूळं दहावी, बारावीच्या परिक्षेतच रुजतात. या परिक्षांमधे होणारे गैरप्रकार दिसत असले तरी थांबत मात्र नाहीत. कारणं परत वरचीच. निकालाचे आकडे वाढवण्याच्या नादात आता शिक्षणाचाच निकाल लागतोय.
इतिहासात डोकवलं तर देश, राष्ट्र, समाज, संस्कृती यांना सन्मानाने योग्य ती दिशा दाखवण्याच्या वेडाने पछाडलेल्या कितीतरी जणांच्या घराची दशा झालेली आढळते. पण ही दशा त्यांना शत्रु समजणार्यांनी केली होती. एकाच्या बलिदानाने असंख्य सुखी होतील हा उदात्त विचार त्या दिशा देणाऱ्यांंचा होता. आज आपली दिशाच चुकीची असल्याच भान असणारेसुध्दा दिशाहीन वागतात आणि दशा घडवून आणतात. यात अनेक प्रामाणिक प्रयत्न करणारे त्यांच बलिदान देणार आहेत हे त्यांंना कळतं पण वळत नाही.
ही अपप्रवृत्ती म्हणजे तंबूत शिरलेला ऊंट आहे. आणि ऊंटावरुन शेळ्या हाकणारे काही अशा ऊंटांना संरक्षण देतात का? असा प्रश्न पडतो.
☆ महावस्त्राचे पदर – भाग १४ – वडील आणि मुलगी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आई, बाबा, आजी, आजोबा, मामा, मावशी, आत्या, काका, बहीण-भाऊ, पती-पत्नी आणि मागील भागांमध्ये आई-मुलगी व बाप-लेक (पिता-पुत्र) या नात्यांचे समृद्ध पदर अनुभवले. या महावस्त्रातील सर्वात मृदू, रेशमी, पण तितकाच अभेद्य आणि हळवा पदर म्हणजे ‘वडील आणि मुलगी’!
आपल्या या लेखमालेचा मागील भाग ‘पिता-पुत्र’ या नात्यावर होता. तो भाग प्रसिद्ध झाल्यानंतर मला अनेक वाचकांचे आग्रहाचे संदेश आले की वडील आणि मुलगी या नात्यावर आपण अवश्य लिहा. काही भगिनींनी तर फोन करून आवर्जून सांगितले की, आई-मुलगी किंवा वडील-मुलगा या नात्यांपेक्षाही अधिक संवेदनशीलता, अथांग प्रेम आणि मायेचा जिवंत ओलावा हा पिता आणि कन्या या नात्यामध्ये आढळतो.
जेव्हा मुले लहान असतात आणि आई दुर्दैवाने अकाली हे जग सोडून जाते, तेव्हा अनेक सहृदयी वडील आपल्या मुलांसाठी स्वतः आईची जागा घेतात. दुसरे लग्न करणे शक्य असूनही केवळ मुलांच्या भविष्यासाठी ते तसा विचारही करत नाहीत. मुलगी लहान असेल तर तिला ते एका आईच्या मायेने वाढवतात; तिला न्हाऊ-माखू घालण्यापासून ते तिचे लाड पुरवण्यापर्यंत सर्व काही आनंदाने करतात. मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून वाटेल ते कष्ट उपसायला ते तयार असतात. अशा वेळी मुलीने काही मागितले आणि परिस्थितीअभावी ते जर एका बापाला देता आले नाही, तर त्याच्या काळजाला होणाऱ्या मूक वेदना फक्त एका सहृदयी पित्यालाच समजू शकतात!
या ठिकाणी मला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमधील एक हृदयस्पर्शी प्रसंग आठवतो. या प्रसंगाचा उल्लेख मी माझ्या ‘ आनंदयात्री रवींद्रनाथ ‘ या पुस्तकात केला आहे. गुरुदेवांनी स्थापन केलेल्या या निसर्गशाळेत श्रीमंत घरातील विद्यार्थीही शिकत होते आणि अगदी गरीब कुटुंबांतीलही. शाळेतील काही श्रीमंत मुली अंगावर सोन्याचे दागिने घालून येत असत. शांतिनिकेतनमध्ये काम करणाऱ्या एका साध्या शिक्षकांची मुलगीही तिथेच शिकत होती. त्या श्रीमंत मुलींना पाहून तिच्याही मनात आले की आपल्याकडेही असे सोन्याचे दागिने असावेत. तिने वडिलांकडे हट्ट धरला.
शांतिनिकेतनमध्ये त्याकाळी शिक्षकांना फारसे वेतन नव्हते; पण सर्व मंडळी समर्पित भावनेने ज्ञानदान करत होती. मुलीची ही इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही या जाणीवेने त्या वडिलांचे डोळे पाणावले, त्यांना अतीव दुःख झाले. त्यांनी आपले हे दुःख गुरुदेवांसमोर मोकळे केले. गुरुदेवांनी यावर एक नितांत सुंदर युक्ती शोधली! शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य आवारात विविधरंगी रानफुलांची झाडे बहरलेली होती. गुरुदेवांनी त्या सुगंधी फुलांचे कलात्मक दागिने बनवून घेण्यास सांगितले. निसर्गाची ही सुंदर फुले परिधान करून जेव्हा त्या शिक्षकांची मुलगी सजली, तेव्हा तिच्या रूपापुढे सोन्याचे दागिनेही फिके वाटू लागले! तिचा प्रश्न तर मिटलाच; पण पुढे शांतिनिकेतनमधील श्रीमंत मुलीही आपले सोन्याचे दागिने घरी ठेवून मोठ्या आवडीने फुलांचेच दागिने घालू लागल्या. एका पित्याचे दुःख गुरुदेवांनी अशा रीतीने फुलांच्या सुगंधात विरघळवून टाकले होते.
वडील आणि मुलीचे हे नाते जगातील सर्व नात्यांपेक्षा अगदी आगळेवेगळे असते. मुलगा हा वडिलांचा वंश आणि वारसा पुढे नेतो, पण मुलगी वडिलांच्या काळजाचा तुकडा असते! एक वेळ मुलगा वडिलांसमोर व्यक्त होऊन प्रेम दाखवणार नाही, किंवा त्यांच्यात काहीसा पुरुषी संकोच आडवा येईल; पण मुलगी मात्र आपल्या पित्यावर अथांग, निस्वार्थ आणि उघड प्रेम करते. वडिलांसाठी मुलगी ही नेहमीच त्यांची लाडकी ‘राजकन्या’ असते, तर मुलीसाठी तिचे वडील हे जगातील सर्वात विश्वासू आणि सुरक्षित आधारवड असतात.
लहानपणापासूनच मुलगी आणि वडील यांच्यात एक मूक पण घट्ट संवाद असतो. आईच्या रागापासून पाठीशी घालणारे वडील असतात; तर वडील बाहेरून दमून-भागून किंवा रागात आले तरी लेकीच्या एका गोड हसण्याने आणि तिच्या लाघवी बोलांनी तो सर्व शीण आणि राग कुठल्या कुठे विरघळून जातो. वडील जगासाठी बाहेरून कितीही कठोर किंवा पाषाणासारखे भासले, तरी लेकीच्या एका हळव्या हाकेने त्या सह्याद्रीच्या कातळालाही प्रेमाचा पाझर फुटतो!
आजच्या काळात बऱ्याच पालकांना केवळ एकुलती एक मुलगी असते. ते तिलाच आपले सर्वस्व मानून वाढवतात. तिच्या शिक्षणासाठी, यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी वाटेल त्या खस्ता ते आनंदाने खातात.
सांगलीला भाऊ करमरकर नावाचे एक आदर्श शिक्षक होते. त्यांना एक कन्या झाली, जिचे नाव त्यांनी ‘वल्लरी’ ठेवले. दुर्दैवाने ही वल्लरी पुढे सेरेब्रल पाल्सीसारख्या मेंदूच्या दुर्धर पक्षाघाताची शिकार झाली. अशा दिव्यांग मुलीचा सांभाळ करणे हे एका अग्निदिव्यापेक्षा कमी नव्हते. पण भाऊ करमरकर आणि त्यांच्या पत्नीने केवळ वल्लरीकडे पूर्ण लक्ष देता यावे म्हणून दुसरे मूल जन्माला न घालण्याचा अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला!
भाऊ सेवेतून निवृत्त झाले, उतारवयात शरीर थकत गेले; पण मुलीची सेवा मात्र त्यांनी अखेरपर्यंत अखंड आनंदाने केली. आपल्या या विशेष मुलीला कसे वाढवले, कसे शिकवले, तिच्यासाठी काय काय कष्ट उपसले, हे सांगणारे ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे नितांत सुंदर पुस्तक त्यांनी लिहिले. पालकांसाठी दिशादर्शक असणारे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासूने अवश्य वाचावे असेच आहे. भाऊंनी स्वतःच्या वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत या मुलीची काळजी घेतली! वल्लरी पन्नास वर्षांची झाली होती; पण पित्याचे प्रेमळ छत्र हरपताच, काहीच दिवसांत तीही आपल्या लाडक्या पित्याच्या भेटीसाठी या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. आज करमरकर काकू एकट्या आहेत, थकल्या आहेत; पण बाप-लेकीच्या अलौकिक प्रेमाची ही साक्ष अजरामर अशीच आहे.
मुलगी मोठी होते, तिचे लग्न ठरते आणि एक दिवस ती हे घरटे सोडून सासरी निघून जाते. हा प्रसंग कोणत्याही पित्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे अग्निदिव्य असते. आयुष्यभर संकटांत कधीही न डगमगणारा, कठोर शिस्तीत वागणारा खंबीर बाप मुलीच्या पाठवणीच्या वेळी लहान बालकासारखा ओक्साबोक्सी रडतो, तेव्हा या नात्याची अथांग खोली जगासमोर येते. पंडित वसंतराव देशपांड्यांनी गायिलेले ‘दाटून कंठ येतो’ हे गाणे ऐकले की प्रत्येक बापाच्या आणि लेकीच्या डोळ्यांत आजही अश्रू उभे राहतात.
मुलगी सासरी जाते खरी, पण तिचा जीव मात्र माहेरी वडिलांच्या घरातच रेंगाळत असतो. संसारात रमूनही “बाबांचं जेवण वेळेवर झालं का? “, “त्यांनी आजच्या गोळ्या घेतल्या का? “, “त्यांची तब्येत ठीक आहे ना? ” ही विचारपूस करणारा तिचा फोन आल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही. फोनवर वडिलांचा आवाज जरासा जरी खंतावलेला वाटला, तरी सासरी बसलेल्या लेकीचा जीव तळमळतो आणि ‘ वाटेनं माहेराच्या धावत मन जातं. ‘
कधी कधी घरात दुर्दैवाने आई नसते किंवा ती अकाली जग सोडून जाते; अशा वेळी मुलगा कदाचित संसारात हतबल होईल, पण मुलगी मात्र स्वतःच्या दुःखाला आवर घालून वडिलांची ‘आई’ होते! स्वतः सासरी असूनही ती वडिलांचे खाणेपिणे, औषधपाणी आणि घराची सर्व व्यवस्था एका माऊलीच्या मायेने सांभाळते.
याचे सर्वात उत्तुंग आणि प्रेरक ऐतिहासिक उदाहरण म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांची कन्या मणिबेन पटेल! सरदार पटेलांच्या पत्नी झवेरबा यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी सरदार पटेल स्वातंत्र्यलढ्यात आणि देशसेवेच्या महायज्ञात अहोरात्र मग्न होते. अशा काळात त्यांच्या प्रकृतीकडे आणि दैनंदिन गरजांकडे लक्ष देणारे घरात कोणीही नव्हते. अनेकांनी आग्रह करूनही सरदारांनी दुसरे लग्न करण्यास ठाम नकार दिला.
अशा अत्यंत कसोटीच्या प्रसंगी त्यांची कन्या मणिबेन वडिलांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली! वडिलांची सेवा अखंड करता यावी आणि देशकार्यात त्यांना कोणतीही उणीव भासू नये म्हणून मणिबेन यांनी स्वतःच्या संसाराचा त्याग केला, आजीवन अविवाहित राहण्याचा कठोर वसा घेतला. सरदारांचे खाणेपिणे, साधे सुती कपडे धुण्यापासून ते औषधपाणी आणि देशव्यापी दौऱ्यांची व्यवस्था या सर्वांची काळजी मणिबेन यांनी साक्षात आईच्या ममतेने घेतली. कन्या असूनही त्या आपल्या राष्ट्रपुरुषाची माऊली झाल्या! वडील आणि मुलीच्या नात्यातील समर्पणाचे हे जगातील सर्वात वंदनीय रूप आहे.
मुलगी ही अशी स्नेहाची वेल असते, जी सासर आणि माहेर या दोन भिन्न वृक्षांना आपल्या अथांग प्रेमाने घट्ट जोडून ठेवते. संकटाच्या प्रसंगी बापाच्या खांद्याला खांदा लावून मानसिक धीर देणारी आणि उतारवयात वडिलांची काठी बनून त्यांना मायेची ऊब देणारी लेक ही प्रत्येक घराचे भाग्य असते.
नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा ‘वडील-मुलगी’ नावाचा पदर अथांग विश्वास, निस्वार्थ माया आणि त्यागाचा एक सोनेरी काठ आहे. हा पदर जेवढ्या कौतुकाने, अभिमानाने आणि आदराने जपला जाईल, तेवढे प्रत्येक पित्याचे आयुष्य अधिक कृतार्थ आणि समृद्ध होत राहील!
☆ नवरात्र.. बहुतेक घरांमधले चलचित्र ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
(महिलांचा अनुभव)
आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात कांहीच पॉईन्ट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.
आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपरस् ऑलसो’.
आजचा रंग नारंगी (ऑरेंज) होता. नारंगी रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.
मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?
मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?
मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!
मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!
मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले.
कपाटातली दुसरी नारंगी साडी काढली. आज रविवार होता पण ऑफिसला आज सुट्टी नव्हती. ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी नारंगी साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.
सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.
दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी नारंगी ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.
☆ मनाच्या वाड्यात गडबड झाली – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…
कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?
तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…
आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?
तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…
आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?
प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…
एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…
मग दुःखांचे काय?
तीही त्याचीच…
देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…
हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…
तेवढ्यात भारूड सुरू झाले…
मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…
☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. २☆ वीणा कुलकर्णी☆
IT क्षेत्रातील करिअर व घर-कुटुंब सांभाळणारी व्यस्त स्त्री…
हातात लॅपटॉप, डोक्यात डेडलाईन आणि मनात सतत घराची काळजी!
घरातील वृद्धांचे संगोपन आणि मुलांचे पालकत्व निभावण्याची जबाबदारी घरातील स्त्रीचीच, हा जणू अलिखित नियमच आहे. परंपरेने चालत आलेला हा नियम आजही तसाच आहे.
त्याशिवाय ऑफिसमध्येही स्वतःची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता सिद्ध करण्याचे आव्हान या स्त्रीला पेलायचे असते.
२४ तासांच्या दिनक्रमात तिच्या विश्रांतीला दुय्यम स्थान असते. घरात सर्वांत कमी तास झोप घेणारी व्यक्ती बहुधा तीच असते.
ठळकपणे तिचं घवघवीत यश दिसतं, तिची पदकं दिसतात, तिच्या यशाचे तिला मिळणारे फायदेही दिसतात; पण त्यामागची तिची धावपळ, तिचा संघर्ष, तिची व तिच्या मुलांची अनेक तास एकमेकांशिवाय दूर राहण्याची तडजोड मात्र दिसत नाही.
सकाळी ती शाळेचा डबा बनवताना शेफ असते, मुलांना शाळेत सोडताना ड्रायव्हर असते, मुलांना खेळासाठी ग्राउंडवर सोडणे आणणे, होम वर्क करून घेणे, शाळेच्या पालक सभांना जाणे कितीतरी सर्व जबाबदार्या ती आनंदाने स्वीकारत असते. हे सर्व करताना तिलाही थकवा येत असतो पण ती बोलून दाखवत नाही हा तिच्या मनाचा मोठेपणा.
तिला मानसिक आधार हवा असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी,
तिच्या घरासाठी तिच्या मुलांसाठी वेळ देणारी व्यक्ती तिला हवी असते. पण प्रत्यक्षात असं किती वेळा घडतं? नाही घडत तसे कारण
प्रत्येकाच्या कामाच्या धांदलीत शक्य नसते ते.
घर व करिअर करत असताना तिची तारेवरची कसरत होत असते.
अशावेळी
तिच्या करिअरला कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा प्रेमाने पाठिंबा आणि सहकार्याची जोड हवी हे जाणून घेणे इष्ट आहे.
घर ही केवळ तिची एकटीची जबाबदारी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अशा कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजेच आपल्या गोड कन्या, सुना, बहिणी आणि मैत्रिणी. या सगळ्यांना आपण समजून घेऊ या.
त्यांची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देऊ या. त्यांच्या यशात सहभागी होऊ या. त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू या.
☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… उषा मेहता – लेख क्र. ४ ☆ मंजिरी येडूरकर ☆
उषा मेहता
२५ मार्च १९२० साली गुजरात मधील सुरत शहरात उषा मेहता यांचा जन्म झाला. तसे त्यांचे कुटुंब गर्भ श्रीमंत होते. त्यांचे वडील ब्रिटिश राजवटीत जज म्हणून काम करीत होते. त्यांना मिळणारा मानमरातब, घरात नोकर चाकर अशा वातावरणात त्या वाढल्या. पण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची व गांधीजींची भेट झाली. त्यावेळी गांधीजींनी पदयात्रा काढली होती. त्यानंतर म्हणजे आठव्या वर्षी त्यांची पुन्हा गांधीजींशी भेट झाली. त्यावेळी स्वदेशीची चळवळ सुरू होती आणि त्यांच्या विचारांनी त्या प्रचंड प्रभावित झाल्या त्यांनी तेव्हापासूनच खादीचे कपडे वापरण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत!
एवढीशी कोवळी मुलगी गांधीजींबरोबर सायमन कमिशन’ आंदोलनात सहभागी झाली. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले की त्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात भाग घेणार व त्यासाठीच आपले जीवन व्यतीत करणार. त्यामुळे त्यांनी लग्नही केले नाही.
पण वडील इंग्रजांची नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नव्हता. तरीही त्या चोरून पत्रके वाटण्याचे काम करीत होत्या. गांधीजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होत्या. त्यांनी शिक्षणात लक्ष घातले, त्या पदवीपर्यंत शिकल्या आणि पुढे कायद्याचे शिक्षण घेत होत्या पण १९३० साली वडील रिटायर झाले आणि त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. त्यामुळे त्या आता पूर्ण वेळ चळवळींमध्ये भाग घेऊ शकत होत्या. त्यावेळीच त्यांनी काँग्रेसच्या सक्रिय सदस्या म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्याने त्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
तुम्हाला माहीतच असेल भारतात पहिलं रेडिओ स्टेशन २३ जुलै १९२७ ला मुंबई येथे व २६ ऑगस्ट १९२७ ला कलकत्ता येथे सुरू झाले. यालाच आपण आकाशवाणी म्हणतो. त्याआधी काही खाजगी रेडिओ केंद्रांनी सुरुवात केली होती. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. या रेडिओ स्टेशन वरून गांधीजी व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांची भाषणेही प्रसारित होत होती. गांधीजींच्या चळवळींची माहिती, आंदोलनांची माहिती, पण दिली जात होती आणि त्यामुळे आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत होता. ९ ऑगस्ट १९४२ हा आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा होता. पूर्ण भारतभर तिरंगा फडकणार होता. आठ ऑगस्टच्याच रात्री प्रमुख नेत्यांची धरपकड झाली. गांधीजींना अटक झाली आणि सर्व रेडिओ केंद्रे बंद करण्यात आली. ९ ऑगस्टचे आंदोलन पुढच्या क्रांतिकारकांच्या फळीने उचलून धरले आणि पूर्ण केले. परंतु त्यापुढे मात्र रेडिओ केंद्र बंद झाल्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नाही असं होऊ लागलं. स्वराज्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांना काहीच कळेना. मग इंग्लंडला जाऊन रेडिओ ट्रान्समिशन शिकून आलेल्या नरिमन प्रिंटर यांच्यासोबत एक गुप्त बैठक घेतली. शिकागो रेडिओ केंद्राचे मालक नानक मोटवानी यांना रेडिओ स्टेशन चालविण्याचे साहित्य पुरविण्यास सांगितले. आणि २७ ऑगस्ट १९४२ ला गुप्त रेडिओ स्टेशनचे पहिले प्रसारण देशभरात झाले आणि “४२. ३४ मीटर बँड पर एक अंजान जगहसे यह इंडियन नॅशनल काँग्रेस का रेडिओ है” हे पहिले उषा मेहता यांचे शब्द घुमले आणि आता गांधीजींची अटक, मेरठ मधला उठाव, त्यात ३०० सैनिक मारले गेले, अशा सर्व बातम्या लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. या स्टेशनची जबाबदारी उषा मेहता व इतर त्यांचे सहकारी यांनी घेतली.
ही बातमी ब्रिटिश सरकारला कळणार व ते प्रसारणाचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. त्यामुळे उषा मेहता व त्यांचे सहकारी रोज गुप्तपणे जागा बदलत होते. कधी वेष बदलून, कधी जंगलात जाऊन, कधी रात्रीतल्या रात्री नवीन ठिकाण शोधून, आणि नुसता एक माणूस नाही तर सगळे सहकारी, सगळे समान, हलवावे लागत होते. उषा मेहता यांनी धाडसाने, अगदी बेमालूमपणे कार्य सुरू ठेवले होते.
पण आपला इतिहासच असा आहे की कोणीतरी घरभेदीच शत्रूला बातम्या पोचविण्याचे काम करतो. थोड्याशा पैशाची, सत्तेची लालुच पुरेशी असते, स्वार्थापुढे देशाचा विचार केला जात नाही, सहकाऱ्यांच्या जीवाचा विचारही केला जात नाही. इथेही असेच झाले.
जिवावर उदार होऊन काही लोकांनी चालवलेले हे रेडिओ केंद्र ८८ दिवस चालले, आणि अखेरीस एका कामगाराने फितूरी केली व १२ नोव्हेंबर १९४२ ला उषा मेहता यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला भरला गेला. त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना सांगितले की जर तुम्ही पुन्हा कोणत्याही आंदोलनात भाग घेणार नाही असे कबूल करत असाल किंवा लिहून देत असाल तर आम्ही तुम्हाला आत्ता इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी पाठवू. त्यांनी अर्थातच नकार दिला. जजच्या परवानगीने त्यांनी खटला सुरू असताना एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, स्वतःच्या बचावासाठी ही काहीही बोलल्या नाहीत. त्यांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
स्वतंत्र भारतात त्यांना ‘भारताची रेडिओ वुमन’ हा किताब मिळाला. त्यांनी पुढे शिक्षकी पेशा स्वीकारला व अविरत गांधीजींच्या मतांचा, तत्त्वांचा प्रसार केला. त्यांना १९९८ ला ‘पद्मभूषण’ने गौरविले गेले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे ११ ऑगस्ट २००० ला निधन झाले.
☆ काही वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी…– लेखिका : सुश्री जयंती देशमुख ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
“ काही वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी “ प्रस्तुती : मनोहर जांबोटकर
…
दोघींना समोरासमोर उभं केलं, तर कदाचित एकमेकींना ओळखायलाही थोडा वेळ लागेल.
पूर्वी आयुष्य म्हणजे सगळं काही नीटनेटके, वेळच्या वेळी आणि आपल्या मनासारखं असणं, असंच वाटायचं. कुणी काही चुकीचं बोललं की त्याचा खुलासा हवा असायचा. कुणी मन दुखावलं की त्याला ते कळायलाच हवं असं वाटायचं. घरातलं एखादं काम राहिलं की बेचैनी यायची.
आता?
आता पडदा थोडा तिरका राहिला तरी चालतो.
कपाटातली एखादी साडी जागच्या जागी नसली तरी चालते.
कुणी गैरसमज करून घेतला तर प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.
बहुतेक…
आता मला सगळं “बरोबर” करण्यापेक्षा स्वतःचं मन “ठीक” ठेवणं महत्त्वाचं वाटतं.
एकदा जुन्या वस्तू आवरत होते. कितीतरी वर्षांपासून जपून ठेवलेल्या गोष्टी हातात येत होत्या—पहिल्या पगाराची पावती, मुलांनी लहानपणी काढलेली चित्रं, जुन्या शुभेच्छापत्रिका, काही पत्रं…
पूर्वी प्रत्येक गोष्ट जपून ठेवली असती.
त्या दिवशी मात्र काही वस्तू हातात घेतल्या आणि शांतपणे बाजूला केल्या.
आठवणी ठेवायला वस्तूंची गरज नसते, हे कळलं.
काही आठवणी कपाटात नसतातच…
त्या आपल्यात राहतात.
आणि काही वस्तू सोडताना वस्तू जात नाहीत—
आपण त्या काळाला अलगद निरोप देत असतो.
हल्ली एखाद्या कार्यक्रमाला जाताना “सगळ्यांना भेटायचं” हा अट्टहास नसतो.
कुणी भेटलं तर आनंद.
नाही भेटलं तरी मनात राग नाही.
पूर्वी एखाद्याने आपल्याला फोन केला नाही की प्रश्न पडायचा—“काय झालं असेल? ”
आता वाटतं, कदाचित त्याच्याही आयुष्यात त्याची काही कारणं असतील.
प्रत्येक शांततेचा अर्थ नाराजी नसतो.
हे कळायला थोडी वर्षं जावी लागतात.
एकदा मुलाने माझ्याकडे एक जुना शर्ट दाखवला.
“आई, हा आता ठेवू नकोस. देऊन टाक. ”
मी सहज म्हणाले, “अजून चांगला आहे. ”
तो हसला.
“तुझ्याकडे प्रत्येक गोष्ट ‘अजून चांगली’ असते. माणसंही! ”
त्या वाक्यावर मी बराच वेळ शांत होते.
खरंच…
माणसांनाही आपण त्यांच्या जुन्या रूपातच धरून ठेवतो का?
कुणीतरी बदललेलं असतं, कुणाची परिस्थिती बदललेली असते, कुणाच्या प्राधान्यक्रमांचा अर्थ बदललेला असतो…
आणि तरी आपण म्हणत राहतो—
“पूर्वी असा नव्हता. ”
आता मात्र एखाद्याला बदलू देण्याइतकी मोकळीक मनात आलीय.
आणि स्वतःलाही.
हल्ली आरोग्य, सौंदर्य, वय या सगळ्यांबद्दलची माझी भाषाच बदलली आहे.
आरशात एखादी सुरकुती दिसली की पूर्वीसारखी नाराजी होत नाही.
ही सुरकुती म्हणजे वयाचं चिन्ह नाही…
ती हसलेल्या असंख्य क्षणांची सही आहे, असं वाटतं.
केसांमध्ये आलेलं एखादं पांढरं केस आता उपटून काढावंसं वाटत नाही.
त्याला माझ्या आयुष्याने दिलेला छोटासा पदक समजते.
आणि गंमत म्हणजे…
आता सुंदर दिसण्यापेक्षा आनंदी दिसणं मला जास्त आवडतं.
पूर्वी एखाद्या फोटोमध्ये आपला चेहरा कसा दिसतोय, याची चिंता असायची.
आता फोटो सुंदर आहे की नाही यापेक्षा त्या क्षणी आपण खरंच हसलो होतो का, हे आठवतं.
हल्ली प्रवासाला निघाले की “काही राहिलं तर? ” या काळजीपेक्षा “काही सुंदर दिसलं तर थांबूया” असं वाटतं.