मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंधार वाचणारे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

अंधार वाचणारे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

स्वातंत्र्य हरवलेले नाहीत शोधणारे

आता पुन्हा गुलामी आलेत मागणारे

 *

विपरीत चाल खोटी योजून खेळणारे

करतात सर्व धंदे हैदोस घालणारे

 *

प्रेमातली चलाखी कळणे कठीण आहे

सगळेच आंधळे ते असतात गुंतणारे

 *

आदर्श आज कोठे शोधून सापडेना

झालेत थोर नेते भोंदूस भाळणारे

 *

बदलून काळ गेला म्हणतात आज सारे

सत्तांध तेच झाले खैरात लाटणारे

 *

करतोय काय आम्ही आम्हास ही कळेन

झालोत दास वेडे लाचार वागणारे

 *

झालोय आज आम्ही मारेकरी स्वतःचे

डोळे मिटून काळा अंधार वाचणारे

गरजे नुसार प्रेमी करतात प्रेम थोडे

चवचाल लोक इथले आनंद वेचणारे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

आयुष्य उत्फुल्ल पणे, आनंदाने जगणे ही एक कला आहे. त्यासाठी अंतरीच्या भाव भावना जागृत असणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीकडे, आजूबाजूच्या परिसराकडे जाणीव पूर्वक पाहणे हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. असे करताना निसर्गाशी एकरूप न होणारे मन अतिशय विरळाच.. त्यातून ते जर कवी मन असेल तर भावनांची प्रतिबिंबे त्यात शब्द बध्द करणे हे ओघानेच आले. कधी आनंद देणारा तर कधी दुःख देणारा अनुभव कवितेत शब्दांकित होतो. असाच अनुभव व्यक्त करणारी “धुंद वाऱ्या” ही डॉ निशिकांत श्रोत्री सरांची कविता मनाला भुरळ घालते.

वाऱ्यावर वाऱ्यासवे विहरताना मन वाऱ्याप्रमाणे तरल झालेले असते. त्यात हा वारा धुंद करणारा असेल तर प्रीतीचे विचार मनामध्ये येणे साहजिक आहे. आणि मग ते काव्य रुपात प्रकट होताना डॉ श्रोत्री सरांसारख्या प्रतिभावंत कवीला प्रतिभेचे वेगळेच धुमारे गवसललेले दिसतात.

☆ धुंद वाऱ्या… ☆ कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

*

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

*

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

*

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

*

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

*

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

*

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

धुंद वाऱ्या हे शीर्षक कवीची वाऱ्याशी असलेली सलगी जाणवून देते. त्या वाऱ्याने कवी मनाला आगळी धुंदी प्राप्त झालेली आहे हे समजते. तसेच हा वारा स्वतः ही धुंद झालेला आहे हे लक्षात येते.

धुंद वाऱ्यामुळे धुंद होणारे कवी मन खुलून आले नाही तरच नवल!! अशा वातावरणात अपुले मन, त्यात जपलेल्या गूजाला/गुपिताला प्रकर्षाने उधाण येते. पण त्याच वेळी ते गूज दडविण्यास मन आतुर असते. ते कुणाला ही कळू नये अशी मनाची भावावस्था असते. अगदी हीच भावना सखोलपणे, सहजपणे कवी डॉ निशिकांत श्रोत्री यांनी या कवितेत व्यक्त केली आहे.

या कवितेत व्यक्त केलेल्या भावना स्री च्या आहेत हे कळते. भिन्नलिंगी काव्य रचताना कवी डॉ निशिकांत श्रोत्री स्त्री भावनांशी एकरुप होऊन तशा तऱ्हेने व्यक्त झाले आहेत. हे आवर्जून उल्लेख करण्यासारखे व तितकेच कौतुकास्पद ही !!

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

एखाद्या सख्याशी, मित्राशी बोलावे तसा संवाद वाऱ्याशी घडतो आहे. या धुंद करणाऱ्या वाऱ्याला ती विनंती करते की तू इथेच थांब. दूर कुठेही जाऊ नकोस. या धुंद वाऱ्यामुळे मनाला लाभलेली धुंदी तिला विसरायची नाहीये. कदाचित तिच्या मनातल्या गुपितामुळे ही वारा धुंद झाला असावा असे वाटत असावे.
लहरत, विहरत जाणाऱ्या वाऱ्यासवे मनातले गूज सर्व दूर पसरु नये अशी तिची इच्छा आहे. अतिशय सहजपणे सुलभ भाषेतून केलेले हे आर्जव आर्त भासते. व त्यातला खरेपणा अधोरेखित होवून तिची प्रांजळ भावना मनाला मोहविते. बोजड शब्दांना जाणीव पूर्वक दूर ठेवल्याने काव्य मनाला भावते. यथार्थ शब्दांनी गेयता लाभली आहे. वाऱ्याला थांबवताना लाभलेल्या धुंदीने ही थांबावे असा संकेत, संदेश जाणवतो.

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

ती वाऱ्याला म्हणते की तिच्या स्वतःच्या मनात जपलेले प्रीतीचे गूज मात्र उगाचच दूरवर पसरू नको. प्रीत भावनेच्या जाणीवेने लज्जेने गालांवर आलेली लाल गुलाबी लाली नभास देवू नको. यातला गर्भितार्थ फार सुंदर. तो अतिशय सूचकपणे मांडला आहे.. लाजरी शब्दावरील श्लेष मोहक.. अर्थाला अर्थ देणारा.. लाजरी ती स्वतः व लज्जा..
स्वप्नवत वाटणारी भावना तशीच शिल्लक राहू दे. रात्र सरु नये. व प्रातः काळी नभास उषेची लाली लाभू नये. ती तिच्या गालांवर तशीच राहावी असा अर्थ. रात्रीस जागणारी ही प्रेम भावना रात्रीच्या कुशीत तशीच निरंतर राहू दे.

माझ्या मनात दाटून आलेल्या प्रीत भावना माझ्या पुरत्या मर्यादित राहोत. त्या तू साऱ्या जगाला सांगू नको असे आर्जव करुन पुन्हा एकदा ती वाऱ्याला तिचे ते गुपित गुप्त ठेवण्याविषयी सांगत आहे. नको या नकारात्मक क्रियापदाचा वापर कवी मनाची प्रगल्भता दर्शवितो.. त्यातून गूज इतरांना कळू नये यासाठीची धडपड प्रकर्षाने जाणवते.. दाटले या शब्दाची योजना ही लक्ष व लक्ष्यवेधी.. साधारणपणे दाटले हा शब्द नकारात्मक विचार, भावना सूचित करतात. पण इथे प्रीतीची भावना दाटून आली असे म्हणताना प्रेम भावनेची सखोलता कळते. भावनेची व्यापकता व संपृक्तता जाणवते..

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

वाऱ्याला आहे तिथेच थांबण्याची आजर्वी विनंती ती अजूनही करतेच आहे.

पुढे ती म्हणते की माझ्या मनातले हे प्रीतीचे भाव जर तू वाऱ्यावरी वाहून नेले तर हे भाव, माझी ही प्रेम भावना मी माझ्या मुखाने माझ्या सखयाला कशी सांगणार? आणि ते तर मलाच त्याला सांगायचे आहे. तू विनाकारण लुडबूड करू नकोस अशी विनवणी करत थोडेसे दटावणी वजा सूचित करते.

ती पुढे वाऱ्याला जाणीव करून देते जर तिचे बोल त्याने (वाऱ्याने) व्यक्त केले तर ते बोल बोल ना राहता त्या बोलांची मधुर शीळ होईल व अशा वातावरणात ती तरी अबोल कशी राहू शकेल? तिची भावना व्यक्त न करता ती मूक कशी राहील? तिलाही काही बोलावे लागेल. बोलण्याने तिची ही स्वप्नवत धुंदी नाहीशी होईल याचे भय तिला वाटते.. पण मग अशी भावनेने वेडी झालेली व अश्या स्वप्नगंधात बुडालेली/डुबलेली छेड वाऱ्याने काढूच नये अशी विनंती ती करते.

व पुन्हा एकदा तिचे गूज त्याने पसरवू नये अशी आंतरीक भाक/ आण त्याला देते.

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

या भाक देण्यापलीकडे जाऊन ती त्याला विनंती करते की या धुंद वाऱ्याने तिचे अंतर /हृदय दाटून यावे. अर्थात ही धुंद करणारी बेधुंद धुंदी तिच्या अंतःकरणात दाटून राहावी. वाऱ्याने स्वतःचे अस्तित्व विसरून जावे व तिच्या अंतरंगात विरून तिचे स्वप्न म्हणून सतत तिच्या डोळ्यांत/ हृदयात स्थान मांडून राहावे. अशा प्रकारे वागण्याची आण ती वाऱ्याला देत आहे. आणि विनवते आहे की ही तिची प्रीतीची आण त्याने त्याच्या हृदयातून त्याच्या अंतरातून मोडू नये. त्याने ही तिला तसाच प्रतिसाद द्यावा.
आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको या ओळीतील श्लेष कवीच्या साहित्यिक जाणीवांकडे निर्देश करणारा.. वाऱ्याने प्रीतीची आण त्याच्या अंतरातून तसेच तिच्या अंतरातली प्रीती ची आण मोडू नये असा अर्थ!!

या कवितेत धुंद वारा हा तिचा प्रियकरच असावा.. या वाऱ्याला चेतनागुणोत्तिचे रूप देऊन तसेच वाऱ्याचे रूपक योजून या कवितेच्या अर्थाला आगळा वेगळा आयाम दिला आहे..

सोपी परंतु तरीही कवितेतील भावनेला, आशयाला न्याय देणारी चपखल शब्दयोजना साधली आहे. त्याच वेळी माझ्या मनी, माझे मी मुके असे योजलेले अनुप्रास व त्या व्यतिरिक्त रुपक, श्लेष, चेतना गुणोक्ती, यमक इ. साहित्यिक अलंकारांनी ही कविता एक उत्तम भावगीत ठरते..
या कवितेला श्री विलास आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. व माधुरी सुतावणे यांनी नावाप्रमाणेच मधुर आवाजात गायले आहे.. हे गीत ऐकून रसिकजन मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही..

धुंद वाऱ्यासवे पसरु नये अशी कामना करणारी कवितेतील धुंदी वाचकांच्या मनात घर करून राहते हे नक्की..

© नीलिमा खरे

६-५-२०२४

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर

सामाजिक माध्यमातील फेसबुक नंतर व्हाट्सअप समूह हा सर्वांचाच आवडता प्रकार आहे. व्हाट्सअपचा वापर करणारे, त्यावर व्यक्त होणारे लाखो रसिक असतील परंतु प्रकाशित होणाऱ्या पोस्टवर प्रतिसाद देणारे वाचक फार कमी आहेत.

व्हाट्सअप समूहाचे काही प्रकार अस्तित्वात आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे सर्व सदस्यांना स्वतःचे मत व्यक्त करता येणारा समूह. यात काही उपप्रकार आहेत. अनेक समूहावर सुप्रभात ते शुभरात्री असे अभिवादनाचे प्रकार, विशेष दिनी किंवा विशिष्ट कामगिरीसाठी अभिनंदन, शुभेच्छा तर दुःखदायक घटनांसाठी त्या प्रकारचे संदेश पाठविण्याची मोकळीक या समूहात असते. तसेच काही समूहांवर लेख, प्रतिसाद यांची मांदियाळी असते. काही समूहांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा, संवेदना यांना बंदी असते. अशा समूहांवर फक्त लेख, पुस्तक परिचय अशा गोष्टींना परवानगी असते परंतु अनेकदा नियमावलीत नसणाऱ्या गोष्टींचाही भडिमार होत असतो. समूह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, प्रसंगी दिलेली ताकीद याकडे कानाडोळा करून समूहाच्या नियमावलीत नसणाऱ्या गोष्टी सररास पोस्ट केल्या जातात त्यामुळे समूह प्रमुख काही सदस्यांना समूहाच्या बाहेर करतात. शेवटचा उपाय म्हणून समूह ‘ओन्ली फॉर ॲडमीन’ केल्या जातो. त्यामुळे सर्व सदस्यांच्या साद-प्रतिसादाला वाव नसतो.

अनेक समूह यापेक्षा स्वतःचे वेगळेपण राखून असतात. अशा ठिकाणी कादंबरी, कथा, पुस्तक परिचय, कविता, चारोळ्या असे साहित्य पोस्ट केल्या जाते. काही समूहांवर केवळ पुस्तक परिचय करून देण्याची संधी असते. यामुळे नवीन, जुन्या पुस्तकांचा परिचय होतो. गाजलेल्या पुस्तकांची माहिती मिळते.

अशा विशिष्ट समूहांवर इतर गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. विविध साहित्य प्रकाराचे लेखन वाचायला मिळते, त्या लेखनास प्रतिसाद देण्याची संधी असते. अनेक लेखक -वाचक प्रकाशित साहित्यावर साधकबाधक चर्चा करतात, त्या मंथनातून अक्षर-अमृताचे घट समोर येतात. ज्यातून उपयुक्त माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. विविध समूहांवर सातत्याने लेखन करणारे अनेक लेखक आहेत. त्यांच्या लेखनावर मिळणारा प्रतिसाद कुठे नगण्य असतो तर कुठे भरभरून मिळतो. जे लेखक इतर लेखकांच्या पोस्टवर स्वतःचं मत, अभिप्राय देतात त्यांना त्यांच्या लेखनावर चांगला प्रतिसाद मिळतो. जे लेखक स्वतः भरपूर पोस्ट टाकतात परंतु इतरांच्या लेखनावर व्यक्त होत नाहीत त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो. असा अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या लेखकांचे असे मत होते की, त्यांच्या लेखनावर जाणूनबुजून अल्प प्रतिसाद मिळतो तर इतर लेखकांना त्यांच्या लेखनावर उदंड प्रतिसाद मिळतो. हा प्रकार म्हणजे ‘पेराल तसे उगवेल’ असा असतो. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा ‘एक हात से दीजिए, दूसरे हाथ से लीजिए।’ असा प्रकार असतो. त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद मिळावा असे वाटत असेल तर मीही इतरांना तसाच प्रतिसाद दिला पाहिजे. काही लेखक-वाचक यांना जो लेखन प्रकार आवडतो त्यावर ते निश्चितपणे व्यक्त होतात. जसे ज्यांना विनोद आवडतो, जे स्वतः विनोदी लेखन करतात ते विनोदी लेखनावर व्यक्त होतात. कुणाला कविता, कुणाला चारोळ्या आवडतात ते त्या प्रकारच्या साहित्यावर व्यक्त होतात.

व्यक्त होण्याचे प्रकार म्हणजे अंगठा दाखवणे, विविध प्रकारच्या इमोजी पाठवणे ह्या गोष्टी खूप जण वापरतात. आजकाल रेडिमेड संदेश टाकण्याचे छंदही वाढताहेत. परंतु स्वतःच्या शब्दांमध्ये दिलेल्या प्रतिसादामध्ये एकप्रकारची आपुलकी असते, जवळीक निर्माण होते. त्यामुळे शाब्दिक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. अनेक सदस्य असतात, जे स्वतः काही पोस्ट टाकत नाहीत इतरांच्या पोस्टवर कधीच व्यक्त होत नाहीत. काही सदस्य आले, वाचले, पुढे ढकलले अर्थात इतरांच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचे काम इमानेइतबारे करतात.

बहुतांश व्हाट्सअप समूहांवर साधकबाधक चर्चा होतात, विनोदाच्या फुलझडी उडतात, समोरासमोर कधीही न भेटता ही मैत्रीचे बंध निर्माण होतात, काही समूह दरवर्षी समूहातील लेखकांसाठी दिवाळी अंक, ‌ई दिवाळी अंक प्रकाशित करतात. काही समूह दरवर्षी गेट टुगेदरचे आयोजन करतात इत्यादी चांगल्या बाबीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतात. ही बाब महत्वाची आहे…

‘लिहा, वाचा, भरभरून प्रतिसाद द्या. साधकबाधक चर्चा करा. ‘ हा मुख्य मंत्र असायला हवा.

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “चहावाल्याची डायरी…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “चहावाल्याची डायरी…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुणे स्टेशन, 2018. 

पुणे स्टेशनच्या बाहेर एक चहाचा स्टॉल होता. मालक होते रमेश अण्णा. वय 62. एका पायाने अपंग. रोज सकाळी 5 ला स्टॉल उघडायचा… रात्री 11 ला बंद. चहा एक कप 5 रुपयाला… आणि त्यासोबत एक गोष्ट मोफत – “चेहर्‍यावरचं हसू”.

लोक यायचे… चहा प्यायचे… 10 मिनिटं बोलायचे… आणि मन हलकं होऊन जायचे. कोणी म्हणायचं, “अण्णा, तुम्ही मानसोपचारतज्ज्ञ आहात. “

अण्णा हसायचे, “नाही रे बाळा, मी फक्त चहावाला आहे. पण दुःख बघितलंय ना… म्हणून चहात साखर कमी आणि माया जास्त टाकतो. “

एकदा एक 25 वर्षाचा मुलगा आला. इंजिनिअर. सुटाबुटात… पण डोळे सुजलेले. रात्रभर रडल्यासारखे. म्हणाला, “अण्णा, एक कटिंग. कडक. “

अण्णांनी चहा दिला. मुलाने तो एका घोटात संपवला. खिशातून 100 ची नोट काढली, टेबलवर ठेवली… आणि म्हणाला, “अण्णा, उरलेले पैसे तुम्ही ठेवा. हा माझा शेवटचा चहा आहे. “

अण्णांचे हात थरथरले. ते कप धुतांना थांबले. म्हणाले, “बाळा, कुठे निघालास?” 

मुलगा हसला… कोरडं हसू… “ट्रेनखाली. जॉब गेला. गर्लफ्रेंड सोडून गेली. घरावर कर्ज. जगून तरी काय करू?”

अण्णा स्टॉलबाहेर लंगडत लंगडत आले. मुलाचा हात हातात धरला… आणि त्याला स्टॉलच्या मागे नेलं. तिथे एक जुनी, फाटकी डायरी होती. अण्णा म्हणाले “वाच. “

|| अण्णांच्या डायरीतलं पहिलं पान || 1985 ||

 “आज माझा पाय ट्रकखाली आला. डॉक्टर म्हणाले ‘कापावा लागेल’. बायको 8 महिन्याची गरोदर होती. घरात फक्त 23 रुपये होते. रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर गेलो… उडी मारणार होतो तेवढ्यात बायकोचा फोन आला, ‘अहो, बाळ लाथ मारतंय. म्हणतंय बाबा लढा. ‘ 

 मी रडलो… आणि परत आलो.

 दुसऱ्या दिवशी पाय गेला… पण हिंमत नाही गेली. स्टेशनबाहेर 2 भांडी, 1 किटली घेऊन बसलो. ‘चहाऽऽऽ’ ओरडलो. पहिला दिवस- 17 रुपये कमावले. रडलो… पण जगलो. “

|| डायरीचं दुसरं पान || 1993 ||

“आज बायको कॅन्सरने गेली. हातात 6 वर्षाचं पोर. लोक म्हणाले ‘पोरगं अनाथाश्रमात टाक’. मी म्हणालो, ‘माझा एक पाय गेला… पण बापपण नाही जाऊ देणार. ‘ दिवस-रात्र चहा विकला. पोराला शिकवलं. इंजिनिअर केलं. आज तो अमेरिकेत आहे. म्हणतो ‘बाबा तिकडे या’. मी म्हणतो – ‘बाळा, माझे ग्राहक कोण सांभाळेल? त्यांचं दुःख कोण ऐकेल?'”

|| डायरीचं शेवटचं पान || 2018 ||

 “आज 62 वर्षांचा झालो. एक पाय नाही. बायको नाही. पोरगं लांब. पण रोज 200 लोक मला ‘अण्णा’ म्हणतात. त्यांचं दुःख ऐकतो… चहा पाजतो… आणि सांगतो – ‘जग रे बाळा’.

 मला देव भेटला नाही… पण माणसातला देव रोज भेटतो. म्हणून मी अजून जिवंत आहे… आणि आनंदी आहे. कारण माझ्याकडे ‘देण्यासारखं’ फक्त चहा आणि वेळ. ” आहे.

 मुलगा डायरी वाचून लहान मुलासारखा रडू लागला…. अण्णा म्हणाले, “बाळा, तुझे 2 हात आहेत… 2 पाय आहेत… डिग्री आहे… आणि तरी तू मरायला निघालास? माझ्याकडे काय होतं? 23 रुपये आणि एक तुटलेला पाय. पण मी ‘नसलेलं’ रडत बसलो नाही… ‘असलेलं’ वापरत राहिलो. तू पण तेच कर. नोकरी गेली? दुसरी शोध. पोरगी गेली? चांगली येईल. पण जीवन गेलं… तर परत येत नाही रे राजा. “

 अण्णांनी त्याला 100 रुपये परत दिले… आणि एक फुकट चहा. म्हणाले, “हा ‘जिंदगीचा चहा’ आहे. एकदम संपवू नकोस… घोट घोट पी. “

 तो मुलगा आज बेंगलोरला मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. दर महिन्याला अण्णांना फोन करतो आणि पुण्याला आला की पहिलं अण्णांच्या स्टॉलवर जातो. दोन चहा घेतो – एक स्वतःसाठी… एक अण्णांसाठी. आणि म्हणतो – “अण्णा, तुमच्या 5 रुपयाच्या चहाने माझं 50 लाखाचं जीवन वाचवलं. “

या सत्य कथेतून 5 बोध मिळतात. ते मनात जपून ठेवा.

1. || समस्या सगळ्यांनाच असते… प्रॉब्लेम नाही, पर्स्पेक्टिव्ह असतो ||

अण्णांचा पाय गेला… पण नजर नाही गेली. तुझी नोकरी गेली… पण आयुष्य नाही गेलं. “गेलेलं” मोजू नकोस… “उरलेलं” वापर.

  1. || आत्महत्या करणारा ‘कमजोर’ नसतो… तो ‘एकटा’ असतो ||

 त्या मुलाला फक्त “ऐकणारा” हवा होता. अण्णांनी 10 मिनिटं दिली… त्याने 10 वर्षं दिली. कधी कधी 1 कप चहा = 1 जीव वाचवू शकतो. ऐकायला शिका.

  1. || देव मदत करायला ‘माणूस’ बनून येतो ||

 अण्णांच्या रूपात स्वामीच आले होते. मंदिरात जाण्याआधी माणसातला देव ओळखा. तो चहावाला, रिक्षावाला, पोस्टमन… कोणाच्याही रूपात असेल.

  1. || “देणारा” कधीच गरीब नसतो || 

 अण्णांकडे एक पाय नाही… पण रोज 200 लोकांना हसवतात. तुझ्याकडे सगळं आहे… पण तू एकालाही हसवत नाहीस. श्रीमंती खिशात नसते… वागण्यात असते.

  1. || शेवटचा चहा कधीच नसतो ||

 जोवर श्वास आहे… तोवर “नवीन सुरुवात” आहे. “End” म्हणणं तू ठरवायचं… देवाने अजून “Interval” लिहिलंय.

 || अण्णांचा शेवटचा संदेश || तुमच्यासाठी ||

“बाळांनो, जीवन कटिंग चहासारखं आहे… कधी कडू लागेल… कधी गोड लागेल… पण संपवू नका… घोट घोट प्या… कारण शेवटचा घोट सगळ्यात गोड असतो… त्याला ‘अनुभव’ म्हणतात.

रमेश अण्णा आजही पुणे स्टेशनबाहेर आहेत. 5 रुपयाचा चहा… आणि फुकटचा जीवन-पाठ. कधी गेलात तर भेटा… सांगा ‘स्वामींनी पाठवलं’ ||

|| जय श्री स्वामी समर्थ ||

ही कथा वाचून कोणासाठी तरी “अण्णा” व्हा? आणि आज एका दुःखी माणसाला फक्त 10 मिनिटं द्या… त्याचा “शेवटचा चहा” तुमच्यामुळे “पहिला चहा” होईल.

हीच खरी स्वामीसेवा आहे.

(जीवनावर आधारित हृदयस्पर्शी बोधकथा. ही फक्त कथा नाही. ही प्रत्यक्षात घडलेली सत्यकथा आहे. पुणे स्टेशनबाहेर आजही तो चहाचा स्टॉल आहे.) 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ते चुकीचे नाहीत.. ते वेगळे आहेत..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ते चुकीचे नाहीत.. ते वेगळे आहेत.. ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे भिशी होती. मी ताईच्या मदतीला नेहमीप्रमाणेच होते. ताई माझ्यापेक्षा पाच वर्ष मोठी. म्हणजे पंचाहत्तरीची.

तस आजकाल एकंदरीत एक गोष्ट लक्षात येते की overall बायकांचे. राहणीमान सुधारले आहे. व्यवस्थित राहणे त्यांच्या सवयीत उतरले आहे. छान अगदी मॉडर्न dresses पण घालतात. आपल्या मुली, सुनांना बघून त्यांच ड्रेसिंग सेन्स बदलला आहे. आज पंचाहत्तरीत असलेली स्त्री सुद्धा स्वतःला जेष्ठ समजते. म्हातारपणाची झलक जरी दिसत असली तरी ती स्वतः तस डिक्लेअर करत नाही. ही चांगली गोष्ट आहे. भिशी, वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ यांचे कार्यक्रम अटेंड करणे, आपल्या आवडीनुसार विविध कार्यक्रमात भाग घेणे. नाटक, सिनेमा, ट्रीप ला बिनधास्त जाण जमतय तिला. स्वतः ला एक्टिव ठेवणे जमतय तिला.

स्वतःवर पैसे खर्च करणे म्हणजे गुन्हा नव्हे, हे समजलय तिला. मी आनंदी राहण्याची जबाबदारी माझीच आहे. हेही ती समजून आहे.

आयुष्याची second inning खेळायची ही चांगली पद्धत आहे.

बायका एकत्र येणे, बसणे म्हणजे अनंत गप्पा. Alphabets जरी A to Z असले तरी गप्पांची RANGE त्या पार सहज जाते. कुठून गप्पा कूठ पर्यंत पोचतील ? याचा अनुमान कोणीच लावू शकत नाही. खरतर गप्पा थांबवाव्या लागतात.

अग बाई!! अंधार झालाय.

अरे! घरी सूनबाई यायची वेळ झालीय. घराची किल्ली तर माझ्याकडे आहे …

अस म्हणून काही जणी आता निघावच लागेल, म्हणून निघायची तयारी करतात. काही बिनधास्त अजिबात घाई नसलेल्या मैत्रीणी पण असतातच की. त्यांचे गप्पा सेशन चालूच असत.

बरे असो… मी मात्र बोलायचे काम कमी, पण ऐकायचे काम जास्त करत होते.

गृपमध्ये लक्ष देऊन ऐकायचे काम केले तर बर्‍याच गोष्टी समजतात.

मी नंतर ताईला म्हंटल… अग ताई ! काय ग ! किती त्या गप्पा. एखादया विषयाचा किती कीस पाडता तुम्ही. म्हणजे अगदी expert असल्यासारखे comments देतात या सर्व. कोणी कोणाच पान खाली पडू देत नाही.

आजच्या मुली, सूना… त्यांचे ड्रेसेस, त्याच्या सवयी, boy friends / girl friends, हाॅटेलिंग, स्वीगी, झोमॅटो, तो अंधाधुंध खर्च…

हा विषय तर खूपच रंगला. तसा हा जेष्ठांचा आवडता विषय आहेच म्हणा.

अग पण ताई ! त्या मीनाताई किती वेगळच बोलत होत्या. अग ! त्यांना नवीन जनरेशन च काहीच पटत नाही का ? नवीन जनरेशनवर फारच नाराज दिसत होत्या त्या.

त्या मेधा ताई आणि कल्पना काकूंची वादावादी बघून मला वाटल आता या दोघी भांडतात की काय ?

त्या सुमेधा ताई बर्यापैकी शांत होत्या. खरय प्रत्येक चर्चेत आपल मत दिलच पाहिजे. असा नियमही कुठे लिहिलेला नाहिये. जे बोलत होत्या, ते मात्र छान, पॉझिटिव्ह, पटण्यासारख बोलत होत्या.

 खूपदा विचार न करता, भावनांच्या आहारी जाऊन आपल मत मांडण्याच्या घाईत, दुसर्याच्या मताचा अपमान होण्याची शक्यता असते. थोडा विचार करून, वेळ घेऊन आपले मत मांडल्यास, situation सहज हाताळता येते. आपल्या भावनांना आपल्या ताब्यात ठेवण गरजेच असत. शब्दांची निवड आणि शब्दांच्या मांडणीकडे पण लक्ष देण आवश्यक असत. नाहीतर सहज डिस्कस करता करता मारामारीवर ते डिस्कशन जायचे.

ताई म्हणाली… अग !खरय.

एकाच situation वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतातच. वेगवेगळ्या प्रतिक्रियेबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. त्यात त्यांचा स्वभाव, सवयी, परिस्थिती यांचा पण प्रभाव पडतोच. त्यांच्या दृष्टीने

त्यांची प्रतिक्रिया अगदी बरोबरच असते.

त्यामुळे चूक अस कोणीच नसत.

खरतर प्रत्येक वेळेस, प्रत्येक गोष्टीवर, आपण आपल मत द्यायची काही गरजही नसते. कधी कधी तर स्पष्ट आणि खर बोलण लोकांना आवडतही नाही. काळ वेळ जागा आणि खासकरून विषय परिस्थिती बघून प्रतिक्रिया देण्यातच शहाणपण असत. आजकाल तसही लोक प्रतिसाद कमी आणि प्रतिक्रिया जास्त देतात.

प्रतिक्रिया देताना माझच बरोबर… असा अट्टाहास ही नसावा.

खरतर शांतपणे सर्वांच बोलण ऐकल तर, एकाच गोष्टीकडे बघायचे. वेगवेगळे दृष्टीकोन लक्षात येतात.

आपल्याला आयुष्यात येणारे अनुभव, आपल्या घरातील मोठ्या माणसांनी प्रत्त्येक घटनेवर दिलेली प्रतिक्रिया बघून आपला स्वभाव तयार होत असतो.

आपली आवड निवड याचाही आपल्या मत व्यक्त करण्यात वाटा असतोच.

जनरेशन गॅपमुळे जेष्ठ नागरिकांना काही विषय तर अजिबात पटत नाही. सध्याची जनरेशन तर एवढी फास्ट धावतेय की दररोजच नवनवीन गोष्टी ऐकू येतात / दिसतात.

पण काय करणार ?…

जमाने के साथ तो चलना पडेगाही । 

थोड adjust, थोड दुर्लक्ष करायला शिकावच लागेल. तरच आपल अन् त्यांच आयुष्य सुखकर होईल.

चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली तर तो विषय स्पष्ट होतो. एकमेकाच्या मताचा आदर करता आला पाहिजे.

 मी बरोबर आणि तू चूक.

 अस कधी म्हणता येत नाही.

प्रत्येक जण, त्याचे मत मांडतो.

ते चूक नसत, वेगळ असतं.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

आपल्या सर्वांनाच सकारात्मकतेची तीव्र गरज असते – सोमवारी सकाळी जरा जास्तच.

वर्तमानपत्रे असतात, असंख्य वृत्तवाहिन्या आहेत पण TRP व circulation वाढवण्यासाठी अथवा त्यांच्या मालकांच्या आदेशानुसार आपल्याला serve केल्या जातात त्या फक्त खून, बलात्कार, दरोडे यांच्या बातम्या.

या नकारात्मकतेचा कळत नकळत cumulative पध्दतीने sub conscious level ला खूप परिणाम होत जातो, मनातल्या Negative विचारांचे प्रत्यक्ष अनुभवात आणि अनुभूतीत रूपांतर होत जातं, आपल्या मनातले नकारात्मक भाव अधिक दृढ होत जातात आणि एक कधीही न संपणारे नष्टचर्य सुरू रहाते.

या सर्व चक्रात वारकऱ्यांच्या ठायी असलेली श्रद्धा गमावून बसलो आहोत. महिनाभर घरदार सोडून, खरेतर घरदार विसरून, हा अडाणी अशिक्षित वारकरी आपला सर्व भार त्या विठुरायावर टाकतो आणि सुखेनैव मार्गक्रमण करू लागतो. त्या विठूमाऊलीच्या दर्शनाइतकंच त्याच्यासाठी ही वारीच्या पायपीटीची प्रक्रियाही तेवढीच लोभस, आनंददायी आणि फलदायी असते. आणि त्या प्रवासाच्या अंती जेव्हा त्या विठोबाचे दर्शन घडते तेव्हा पूर्ण श्रद्धेने तो माऊलीच्या चरणी मस्तक ठेवता होतो. आपण प्रयत्न करीत रहायचे, पांडुरंग करेल ते योग्यच करेल हा विश्वास, ही खात्री त्याच्या सर्व अडचणी, चिंता दूर करते. प्रयत्न करण्याचा पण श्रेय स्वतःकडे न घेता पांडुरंगाला देण्याचा हा त्याचा निष्काम कर्मयोग आपल्याला साधता येईल का ?

TV वरील सासू सुना, विवाहबाह्य संबंध, कपटीपणा चघळणाऱ्या मालिका न बघता सृजनशीलतेला चालना देणारे, ज्ञानात भर टाकणारे, challenge देणारे काही कार्यक्रम बघता येतील का ? National Geographic आहे, वेगवेगळे sports channel आहेत, अगदी मास्टरशेफ; खानाखजाना; खवय्ये आहेत, tours and travel चे channel आहेत, खूप पर्याय उपलब्ध आहेत.

Internet वर तर अशा positive बातम्यांचे भंडार आहे. Good news network आणि chicken soup for soul आपल्याला आंजारतात, गोंजारतात, या जगात फक्त आपणच दु:खी कष्टी नाही; लोकांनी आपल्याहूनही भीषण परिस्थितीला तोंड देत तिच्यावर मात केली आहे याची आपल्याला जाण करून देतात.

You Tube वरील TED talks – Technology, Entertainment, Design आपल्याला माहितीची आणि प्रेरणेची अनेकानेक नवी दालने उघडून देतात.

नियमित व्यायाम, meditation, प्राणायाम शरीराबरोबरच मनही ताब्यात ठेवते व सुदृढ ठेवते.

जे काही होते ते चांगल्यासाठीच ही खात्री मनाशी बाळगली की प्रयत्न करायला हुरूप येतो. आपणच निर्माण केलेल्या ध्येयांच्या मागे धावताना आपण त्या प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला विसरून गेलो आहोत आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत नवीन target उभं राहिलं असतं त्यामुळे पहिला ध्येयप्राप्तीचा आनंदही आपण घेत नाही.

यातून आपण बाहेर पडण्याची गरज आहे. वारकऱ्यांसारखं त्या प्रवासाचाही आनंद घ्यायचा आहे, संकल्पपूर्तीचाही आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींतून चांगले, positive, शिकण्यासारखे काय आहे ते आत्मसात करू या. सकारात्मक दृष्टीकोन स्वत: ठेवू या, इतरांनाही देऊ या.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

ईव्हा ईव्हॉन ऊर्फ सावित्रीबाई विक्रम खानोलकर 

जिनेव्हाचा समुद्रकिनारा… छात्र सैनिकांच्या गटा बरोबर विक्रम खानोलकर सुट्टी घालवायला आलेले. नियतीने काहीतरी योजले असावे, म्हणूनच स्वित्झर्लंड निवासी ईव्हा ईव्हॉन ची आणि विक्रम जीं ची भेट होते.

भारताचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती याचं प्रचंड आकर्षण असलेली ईव्हा, पहिल्याच भेटीत आणि दोघांत झालेल्या संवादामुळे विक्रम जीं च्या प्रेमात पडते. जणू काही हा भविष्यात घडणाऱ्या एका ऐतिहासिक प्रक्रियेच्या रूजवातीचा संकेतच होता.

ईव्हाचे वडील, जे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते… त्यांना हे प्रेम मान्य नव्हते. पण तरीही ईव्हाने त्यांच्या मनाविरुद्ध तिच्या पेक्षा ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर ईव्हाने हिंदू धर्म स्वीकारला. तिचं विक्रम इतकंच प्रेम भारतीय संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान, हिंदू धर्मग्रंथ यांच्यावरही होतं.

ईव्हाने लग्नानंतर स्वतः चे नाव बदलून सावित्रीबाई करून घेतले, आणि भारतीयत्व स्वीकारले. हे नाव जणू काही एक प्रतीकात्मक संकेत होता… एक आपलेपणाची घोषणा होती… भारतभूमी आणि आत्मा यां प्रती, भविष्यातील केल्या जाणाऱ्या समर्पणाचं वचन होतं.

भारतीय आत्मा असलेली युरोपीय… असंच म्हणावं लागेल त्यांच्या विषयी. कारण लग्नानंतर नावानेच नाही तर कामाने ही हळूहळू भारतीय संस्कृती शी समरस होत एकरूप झाल्या सावित्रीबाई! त्यांना आत्म्याने ही भारतीय व्हायचे होते, म्हणूनच पतीवरील प्रेम, निष्ठा आणि त्यागाचा आदर्श असलेले नाव त्यांनी निवडले.

सावित्रीबाई या नावाने हा फक्त ईव्हा चाच पुनर्जन्म नव्हता तर… त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्माची सुरूवात होती ती!!

साधी सुती साडी, कपाळावर मोठे कुंकू, आणि पायात कोल्हापुरी चपला… असा अस्सल भारतीय पेहराव असलेल्या सावित्रीबाई खरंच बाहेरूनच नाही तर आतून ही… अंतर्बाह्य भारतीय रंगात रंगून गेल्या. भारतीय संस्कृती चा सखोल अभ्यास करून, नालंदा विद्यापीठातून पदवी मिळवली.

इतकंच नाही तर हिंदू परंपरा आणि आदर्श यांच्या प्रेमात आकंठ बुडून, अगदी दुधात साखर विरघळावी तशा विरघळून एकरूप झाल्या. अवघा रंग एक झाला!!! 

त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा अवगत केल्या. इतकंच नाही तर… भारतीय संगीत, नृत्य, चित्रकलेचा ही अभ्यास केला. नृत्याचा अभ्यास पं उदयशंकर यांना गुरू मानून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला. अनेक पौराणिक कथा आणि त्याचा इतिहास याचा ही सखोल अभ्यास केला. यावरून लक्षात येतं ते त्याचं भारतीय संस्कृती वरचं प्रचंड प्रेम, आस्था आणि आकर्षण! यासाठी भारतीय संस्कृती शी जुळलेल्या प्रत्येकच गोष्टीशी अद्वैत साधण्यासाठी ही समिधा आपल्या ज्ञान लालसेच्या तृप्ती साठी, आपल्या अथक, अविरत मेहनतीत… अगदी अभिराम रूपात चैतन्य मयी राहून, चेतलेली राहिली. महाराष्ट्रातील संत हे पुस्तक आणि संस्कृत भाषेतील नावांचा एक शब्दकोश ही तयार केला त्यांनी.

त्या म्हणत… ” माझा जन्म चुकून युरोपात झालेला आहे. “

अशा या बहुमुखी प्रतिभा असलेल्या, बहुपेडी व्यक्तीवर, पारखी नजर पडली ती… मेजर जनरल हिरालाल अटल यांची! त्यांच्या समोर इंग्लंड मधील… ‘ व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च शौर्य पुरस्काराच्या तोडीचा पुरस्कार बनविण्याचे आव्हान होते. सावित्रीबाईंचा वेदांचा अभ्यास बघून त्यांनी त्यांची मदत घेण्याचे ठरविले आणि भारतातील सर्वोच्च शौर्याचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परमवीरचक्र च्या पदकाची निर्मिती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

आणि बघता-बघता स्विस वंशाच्या सावित्रीबाई भारतीय इतिहासातील एका अविस्मरणीय प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनल्या.

 सावित्रीबाईंनी हे पदक बनविण्यासाठी पुराण कथांचा आधार घेतला.

वाईटावर चांगुलपणाचा विजय…

दुष्टांवर सुष्टांचा विजय… हे दाखविणारं प्रतीक म्हणून त्यांनी, इंद्राचे शस्त्र असलेल्या वज्राची प्रेरणा घेतली. कास्य धातूचं एक गोलाकार पदक बनवलं… आणि त्यावर… ऋषी दधिचींच्या आत्मबलिदानाचं, त्यागाचं सर्वोच्च उदाहरण वज्र प्रतिकात्मक रूपात घेतल. या वज्राच्या ४ प्रतिकृती, चार ही बाजूंना घेतल्या. मध्यभागी अशोकस्तंभ! पदकावर शिवरायांची भवानी तलवार ही आहे.

आत्मबलिदानाचं प्रतीक असलेलं वज्र जणू त्या शौर्य पदकाचा, परमवीरचक्राचा आत्मा बनलं आणि दधिचींची कथा सुद्धा प्रेरणा स्थानचा आत्मा झाली. असं म्हंटलं जातं की,…

“सावित्रीबाईंनी फक्त प्रतीक नाही बनवलं तर… एक नैतिक आव्हान केलं ब्रह्मांडाला. जिथे साहस, बलिदान हे ब्रह्मांडीय कर्तव्य आहे. या पदकात आध्यात्मिक प्रतिध्वनी सुद्धा ध्वनीत होतोय.

यानंतर सावित्रीबाईंनी… अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र,… अशा अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली.

 “सावित्रीबाईंनी केवळ पदकाचीच रचना नाही केली तर… भारताच्या प्राचीन त्याग आणि पराक्रमाच्या परंपरेला आधुनिक सैनिकांच्या छातीवर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे हे पदकावरचे डिझाइन म्हणजे… राष्ट्रभक्ती आणि कलेचा सर्वोच्च संगम आहे. “

स्वित्झर्लंड ची ईव्हा जेव्हा भारताची सावित्री झाली, तेव्हा तिने देशाच्या वीर पुत्रांना त्यांच्या शौर्याचा सर्वात मोठा बहुमान मिळवून दिला.

लष्करी वर्तुळात आणि इतिहास लेखनात सावित्रीबाईंचा उल्लेख एक *मराठमोळी विदुषी* असा केला जातो. ही विदुषी परमवीर चक्राच्या रूपात अमर झाली.

सावित्रीबाईंनी पती निधनानंतर रामकृष्ण मठात आपलं उर्वरित आयुष्य घालवल. शहिदांच्या कुटुंबियांना, निर्वासित झालेल्या कुटुंबांना मदत करत राहिल्या. वाहून घेतलं त्यांनी समाजकार्यात स्वतःला!! लष्करी रूग्णालयात जाऊन जखमी सैनिकांची शुश्रूषा ही करत असत त्या फावल्या वेळात. शेवटी सतत कार्यमग्न राहणारी, कर्तव्य निष्ठ, भारतीय संस्कृतीत तद्रूप झालेली ही… तेजस्वी समिधा… ही ज्ञान तपस्विनी… ही… कर्मयोगिनी २६ नोव्हेंबर १९९० या दिवशी… हळुवार… जणू… कृतकृत्य झाल्यासारखी… विझली. निमाली.!!

– लेख क्र. १६ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपली प्रिय व्यक्ती मृत्यूशय्येवर असाहाय्यपणे पडून असलेली पहावे लागणे हा आपल्या नशिबातला फार मोठा भोग म्हणावा लागेल! त्यात त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतील तर जवळच्या व्यक्तींना होणा-या मानसिक वेदना कल्पनातीत असतात. त्या व्यक्तीची या जगण्यातून मरणाने सुटका करावी, अशीच मनोमन प्रार्थना केली जाते, हे वास्तव आहे! 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जीवनाचा मोह सुटत नाही, हे नैसर्गिक आणि स्वाभाविकच आहे. याला फार मोजके लोक अपवाद असतील! जगण्याची नसली तरी शरीर श्वास घेणं स्वत:हून थांबवत नाही.

असाध्य व्याधी असलेली व्यक्ती तिच्या शेवटच्या क्षणांत कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसते. अनेकवेळा व्यक्ती दीर्घ किंवा कायमच्या बेशुद्धावस्थेत असते. काहीवेळा कधीही बरे न होण्याची स्थिती समोर नजरेला दिसत असते. ज्यांना शक्य आहे असे लोक या व्यक्तीला आधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करतात. प्रचलित वैद्यकीय कायद्यांनुसार व्यक्तीची जीवन रक्षक प्रणाली काढून टाकता येत नाही. उपचार थांबवायचे झाल्यासही एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. यातून अनेक प्रकारची आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि विशेषत: नैतिक गुंतागुंत निर्माण होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्थितीत खूप कठीण काळ समोर उभा थकतो.

व्यक्ती फार काळ तग धरू शकणार नाही, हे सर्वांना ठाऊक असते. पण प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जीवन रक्षक प्रणाली अजूनही खूप खर्चिक आहेत. विविध शस्त्रक्रिया केल्यानंतरही विविध गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नातेवाईकांची मोठी आर्थिक हानी सुद्धा होत राहतेच. रुग्ण घरी आणणे आणि त्याची सुश्रुषा करणे विविध कारणांनी जिकीरीचे होऊन बसले आहे. मुळात उपचार थांबवणे, रुग्णाला दुस-या रुग्णालयात किंवा पर्यायी व्यवस्थेत हलवणे इत्यादी निर्णय कुणी घ्यायचे यावर एकमत होत नाही… आणि तोवर रुग्ण जन्मा-मरणाच्या उंबरठ्यावर निष्कारण ताटकळत राहतो. आणि रुग्णाची मन:स्थिती समजण्याची काहीही सोय नसते… केवळ अंदाज लावावा लागतो. रुग्णाच्या अत्यंत जवळच्या अर्थात पती, पत्नी, मुलगा या नातलगांवर या गोष्टीचा प्रचंड मोठा ताण येतो. त्यांची स्वत:ची मानसिक कुचंबणा तर होत असतेच, शिवाय अपराधीपणाची भावनाही मूळ धरू शकते! 

यावर उपाय शोधणे ही परिस्थितीची निकड बनलेली असताना भारतात यासंबंधी कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. परंतू २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार व्यक्तीला स्वत:ला स्वत:वर होणारे उपचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे. याला कायदेशीर भाषेत लिविंग विल अशी संज्ञा आहे.

अत्यवस्थ रुग्णावर Ventilator अर्थात कृत्रिम किंवा यंत्राच्या साहाय्याने श्वासोच्छवास देणे, CPR (Cardiopulmonary Resuscitation) अर्थात विशिष्ट वैद्यकीय कृती, उपकरणाच्या साहाय्याने हृद्य कार्यान्वित करणे, नळीवाटे, शीरेतून पोषण पुरवणे, Dialysis अर्थात यंत्राच्या साहाय्याने रक्त शुद्धीकरण करणे इत्यादी प्रकारांनी प्राणरक्षक उपचार केले जातात. जे खर्चिक आहेतच, शिवाय रुग्णाला वेदनादायक आहेत, असे दिसून येते. अर्थात इतक्या वेदना होत असतानाही रुग्णाला जगायचे आहे की नाही, हे समजणे शक्य नसते! अगदी मरावेसे वाटण्याची अत्याधिक इच्छा असली तरी अखेरीस तसं व्हावं, अशी रुग्णाची इच्छा असेलच असंही निश्चित म्हणता येत नाही!… मरणाचा अनुभव हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असला पाहिजे, असे वाटते. असो. या विषयाला विविध बाजू आहेत.

आपल्या अंतकाळी आपल्या जवळच्या नातलगांना कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ नये, अशी कायदासंमत व्यवस्था आता अस्तित्वात आलेली असून प्रक्रिया सोपी आहे. आपण मानसिकदृष्ट्या निर्णय घेण्यास सक्षम असतानाच आता लिविंग विल अर्थात आपल्यावर शेवटी कसे उपचार व्हावेत किंवा होऊ नयेत, हे आपण ठरवू शकतो. महाराष्ट्र राज्य या कायद्याची अंमलबजावणी करू पाहणारे पहिले राज्य ठरले आहे. इच्छामरण या पेक्षा हा कायदा वेगळा आहे, अये विधिज्ञ लोकांनी स्पष्ट केले आहे.

थोडक्यात आपण जर अत्यवस्थ अवस्थेत गेलो, तर आपल्यावर कोणते उपचार करावेत किंवा करू नयेत याबाबत आपण आधीच कायदेशीर सूचना देऊन ठेवायच्या. आपण अशा अवस्थेत पोहोचेपर्यतच्या कालापर्यंत आपण या सूचना रद्दही करू शकतो, ही यातील महत्त्वाची तरतूद आहे! 

मी वर जे काही लिहिलं आहे, ते माझ्या समजूतीनुसार लिहिले आहे, आणि हा लेख म्हणजे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हे! परंतू विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने, व अनेक लोकांना याबाबत कल्पना नसण्याची शक्यता असल्याने मी आपलं समोर मांडलं आहे. तज्ज्ञ, विचारवंत, वैद्यकीय व्यावसायिक, कायदेतज्ज्ञ याबाबत आणखी माहितीप्रद लेखन करतीलच, अशी आशा आहे.

वेळेपूर्वीच प्रत्येकाने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असं वाटतं! 

संदर्भांसाठी आजच्या दैनिक सकाळ, पुणे मधील एका बातमीचे छायाचित्र सोबत जोडले आहे. सर्वांना शुभेच्छा. जीवेत शरद: शतम!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा” –  लेखक : श्री वैभव सुरेश मोरे ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा” –  लेखक : श्री वैभव सुरेश मोरे ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा

लेखक : वैभव सुरेश मोरे

पुस्तकासाठी संपर्क : ७०५७५६७२५२

एकूण पृष्ठे : ८० 

किंमत : ₹१५०

‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे वैभव मोरे यांचे छोटेखानी पुस्तक वाचायला हातात घेतले आणि ते संपल्यावरच खाली ठेवले; एवढे या पुस्तकाने मला गुंतवून टाकले. ‘पृष्ठ संख्या लहान, पण विचारांची समृद्धी महान’ असलेल्या या पुस्तकातील एकेक वाक्य हे एकेका सुविचारासारखे लाख मोलाचे आहे, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. त्यातील काही वाक्ये वाचल्यावर वाचकहो, तुम्हीही अंतर्मुख होऊन विचार करायला लागाल, याची मला खात्री आहे.

१) एखादा भ्रष्ट अधिकारी जेव्हा लाच घेऊन आपले काम करून देतो, तेव्हा आपण त्याच्या त्या ‘सोयीस्कर’ प्रामाणिकपणाला दाद देतो. पैसे खाऊ दे, पण काम तरी करून देतो, अशी आपली धारणा होते. आजच्या काळात जर कोणी प्रामाणिकपणे सेवा दिली, तर आपल्यालाच आश्चर्य वाटते आणि आपला विश्वास बसत नाही. इतका शुद्ध प्रामाणिकपणा पचवण्याची ताकद आता आपल्या पचनशक्तीत उरलेली नाही, कारण चांगले काही पचवण्याची सवयच आपल्याला राहिलेली नाही.

२) दारूच्या बाटलीवरील, सिगारेटच्या पाकिटावरील किंवा शेअर मार्केटच्या जोखमीवरील वैधनिक इशारे ग्राहकाला सावध करण्यासाठी नसून, उद्या जर कोणी आजारी पडले किंवा कोणाचा मृत्यू झाला किंवा आर्थिक नुकसान झाले तर कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठीची एक ढाल आहे. ‘आम्ही तर आधीच सांगितले होते’, असे म्हणून स्वतःला निर्दोष सिद्ध करणे, हा या व्यवसायातील सर्वात मोठा ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ आहे.

३) कायद्याचा धाक हा शिस्तीसाठी असावा, पण जेव्हा तो दडपशाहीसाठी वापरला जातो तेव्हा तो लोकशाही विरोधी ठरतो. नियमांचा धाक दाखवून मिळालेली शांतता ही खरी शिस्त नसते खरी शिस्त ही परस्परांच्या आदरातून येते.

४) एखादा रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा तो केवळ शरीर घेऊन जात नाही, तर एक विश्वास घेऊन जात असतो. पण जेव्हा हा विश्वास विशिष्ट मेडिकल स्टोअर आणि अनाकलनीय लिपीतील प्रिस्क्रिप्शनच्या आड गहाण ठेवला जातो तेव्हा खरं ‘वैद्यकीय प्रदूषण’ सुरू होतं.

५) आज तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, पण मानवी नियत मात्र आजही त्याच स्वार्थाच्या अंधारात चाचपडत आहे.

६) ‘बाईला काय कळतंय?’ हा अट्टाहास इतका खोलवर रुजला आहे की, एखादी महिला जर स्वतःहून निर्णय घेऊ लागली तर तिला सहकार्य करण्याच्या ऐवजी पुरुषसत्तेकडून तिची कोंडी केली जाते.

७) आजची प्रशासकीय यंत्रणा ही भीतीवर आधारलेली आहे. या भीतीमुळे माणूस आपली सद्विवेकबुद्धी गमावून बसतो. तो फक्त एक आज्ञाधारक यंत्र बनतो. यंत्राला संवेदना नसतात, त्याला फक्त इनपुट आणि आउटपुट माहीत असते. जेव्हा नियमांची भीती माणुसकीपेक्षा मोठी होते तेव्हा एक जिवंत माणूस केवळ एका मृतयंत्रणेसारखा वागू लागतो.

८) एक मोठा विरोधाभास असा आहे की, आपण निसर्गाने शरीरावर उमटवलेल्या खुणांपेक्षा हाताने बनवलेल्या कागदावर जास्त विश्वास ठेवतो. मानवनिर्मित मतदान कार्डाने नैसर्गिक पुराव्याला हरवणे हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. कारण आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यापेक्षा कागदावर लिहिलेल्या अक्षरांना जास्त महत्त्व देतो.

९) जिथे नियमामुळे माणुसकीचा गळा घोटला जातो तिथे तो नियम पाळणारा माणूस प्रामाणिक असला तरी तो नैतिकदृष्ट्या अप्रामाणिकच असतो. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा कागदाच्या तुकड्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील सत्य आणि वेदना ओळखण्याची ताकद व्यवस्थेत येईल.

१०) शिक्षणात आपण विद्यार्थ्यांवर केवळ गुणांची उधळण केली, पण ज्ञानाची पेरणी मात्र शून्यावर राहिली. हाच तो प्रामाणिक व्यवस्थेतील सर्वात मोठा अप्रमाणिकपणा आहे.

११) तुम्ही बाहेरून खूप प्रामाणिक असल्याचा दिखावा आणता, अहवाल चकाचक बनवता. पण आतून त्या उपक्रमाचा आत्माच मेलेला असतो. जेव्हा एखाद्या संस्थेचे यश हे विद्यार्थ्यांच्या परिवर्तनावर नाही तर अल्बममधील फोटोवर मोजले जाते तेव्हा शिक्षण पद्धतीतला प्रामाणिकपणा संपलेला असतो. ही कागदी प्रगती समाजाला पुढे नेण्याऐवजी फक्त फाइल्सची जाडी वाढवत राहते.

१२) ईश्वराच्या दरबारात जिथे माणुसकी आणि समानता शिकवली जाते, तिथेच आता मंदिरातील व्हीआयपी पासमुळे श्रीमंत आणि गरीब अशा दोन रांगा तयार झालेल्या आहेत. ज्या देवाला भक्ती हवी तिथे आज शक्ती आणि पैसा चालतो. हाच तो प्रामाणिक भक्तीतील अप्रामाणिक व्यवहार आहे.

१३) आपण स्वतःला प्रामाणिक म्हणवतो, पण उघड्या डोळ्यांनी अन्याय होत असताना आपण गप्प बसतो, हाच आपला सर्वात मोठा अप्रामाणिकपणा आहे.

१४) जिवंतपणी ज्याला अन्नाच्या एका एका घासासाठी तडफडावं लागतं आणि मेल्यावर मात्र त्याच्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी धडपड केली जाते. हा आपल्या समाजातील सर्वात मोठा आणि क्लेशकारक विरोधाभास आहे. जिवंतपणी ज्याच्या मुखात पाण्याचा थेंब दिला नाही त्याच्यासाठी गंगेच्या काठी पिंडदानाचा सोहळा मांडणारी ही पिढी खरच त्याच्याप्रती कृतज्ञ आहे का?

१५) भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचे स्थान दिले आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकतो; पण आजच्या आधुनिक जगात हा मंत्र भिंतीवरच्या फोटो पुरताच उरला आहे की काय अशी शंका येते.

१६) जिवंत माणसाची सेवा करण्यापेक्षा मेलेल्या माणसाच्या नावाने दान करणे सोपे असते. कारण तिथे संवाद नसतो, फक्त दिखावा असतो. थोडक्यात हे वर्षश्राद्ध म्हणजे मृत व्यक्तींबद्दलचे प्रेम नसून समाजासमोर स्वतःची धार्मिक आणि प्रामाणिक प्रतिमा टिकवून ठेवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.

१७) खरा धर्म कर्मकांडात नसून प्रामाणिकपणे केलेल्या कर्मात आहे.

१८) आपण उत्सवापुरते प्रामाणिक असतो, पण कर्तव्याच्या वेळी अप्रामाणिक होतो.

१९) प्रतीके ही प्रदर्शनासाठी नसून प्रेरणेसाठी असतात.

२०) जोपर्यंत सामान्य माणसाला आपल्या पदाचे कार्ड न दाखवता न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला समाज खऱ्या अर्थाने प्रामाणिक होऊ शकणार नाही.

२१) आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिलं

पण आम्ही त्यांना नागरिक म्हणून घडवू शकलो का?

२२) संविधान केवळ शाळेतील पुस्तकांच्या मुखपृष्ठावर किंवा न्यायालयाच्या भिंतीवर असून चालणार नाही. ते रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकाच्या वागण्यात उतरले पाहिजे.

२३) व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. आपण बदललो की व्यवस्था बदलते.

२४) भ्रष्टाचाराच्या अंधारावर ओरडण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक समाज निर्मितीसाठी स्वतःच्या वाटणीचा एक छोटा दिवा लावणे केव्हाही श्रेष्ठ असते.

२५) ज्या दिवशी आपण आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकू की, आज मी माझं कर्तव्य चोख बजावलं त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा संपायला सुरुवात होईल.

 

पुस्तकातील ही वाक्ये वाचल्यावर आपण अस्वस्थच होतो असे नाही तर या अस्वस्थतेतून आपला एक नवा जन्म होत आहे असे आपल्याला वाटते. लेखकाने प्रामाणिकपणे स्वतःबद्दल तसेच जगात वावरताना डोळे उघडे ठेवून केलेल्या निरीक्षणांची मांडणी एवढी प्रभावी केलेली आहे की प्रत्येक वाचकाला हा लेखक आपल्या मनातलेच बोलतो आहे असे वाटते. पण आपण असे वागायला कचरलो, हेही मनातल्या मनात तो कबूल करतो.

 

मग आपण खरोखर प्रामाणिक आहोत का? हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. आपल्याला वाटतं आपण खूप प्रामाणिक आहोत, पण व्यवस्थेच्या गुंतागुंतीत वावरताना आपण नकळतपणे भ्रष्टाचाराचे छोटे छोटे भाग कसे बनतो? शाळेच्या डोनेशनपासून ते हॉस्पिटलच्या बिलापर्यंत आणि ट्रॅफिक सिग्नलपासून ते व्ही. आय. पी. ट्रीटमेंटच्या मोहापर्यंत… आपण प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणा जपतो आहोत का? हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील ‘प्रामाणिकपणाचा मुखवटा’ सोलून काढणारा एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. म्हणूनच संवेदनाशील माणसाला हे पुस्तक हालवून सोडते, त्याच्या हृदयाला हात घालते आणि त्याच्या बुद्धीला झंझोडते. ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे पुस्तकाचे शीर्षक अशाच असंख्य प्रश्नातून जन्माला आले आहे. पण जिथे अंधारच प्रकाशाचा मुखवटा घालून फिरतो तिथे प्रामाणिकपणापेक्षा अप्रामाणिकपणालाच उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही तरच नवल!

 

आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की, जग भारताकडे एका वेगळ्या आकांक्षेने पाहत आहे. आपली भारतीय संस्कृती ही उच्च आहे. पण आपण या भारतीय संस्कृतीला आपल्या दुटप्पी वागण्याने काळीमा फासत आहोत, हे आपल्या कसे लक्षात येत नाही? हे पुस्तक आजच्या राज्यकर्त्यांपासून सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाचा दांभिक मुखवटा टराटरा फाडत आरशासमोर त्याला नागडेउघडे करते. या नागडेउघडेपणाला जेव्हा आपण धाडसाने सामोरे जाऊ तेव्हाच आपल्या समाजात परिवर्तनाला सुरुवात होईल. तसे जेव्हा होईल तेव्हाच या पुस्तकाच्या लेखकाच्या लेखणीचे सार्थक होईल. एवंच हे पुस्तक प्रत्येकाने डोके ताळ्यावर ठेवून वाचलेच पाहिजे अशी मी शिफारस करत आहे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३४३ ☆ व्यंग्य – बाबाओं का स्वर्णकाल ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम एवं विचारणीय व्यंग्य  – ‘बाबाओं का स्वर्णकाल‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३४३ ☆

☆ व्यंग्य ☆ बाबाओं का स्वर्णकाल ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

शिब्बू ऐसे ही दोस्तों के कहने पर बाबा के दरबार में चला गया था। दरबार में हज़ारों की भीड़ थी, महिलाएं संख्या में ज़्यादा। बाबा का प्रवचन चल रहा था। एक तरफ गायन-मंडली बैठी थी। बाबा प्रवचन के बीच में कोई धुन छेड़ देते और फिर गायन मंडली उसे उठा लेती। इस तरह बाबा को थोड़ी राहत मिल जाती थी।

बाबा की शोहरत कुछ दिनों में बड़ी तेज़ी से फैली थी। चर्चा थी कि वे  बड़े ज्ञानी थे। सब शंकाओं का समाधान कर देते थे। इसीलिए देर रात तक आश्रम में भक्तों की भीड़ बनी रहती थी।

शिब्बू और उसके दोस्त बाबा की गद्दी के पास ही बैठे थे। बाबा के दाढ़ी-मूंछ से ढंके चेहरे को देखते-देखते शिब्बू को लगा बाबा को उसने पहले देखा है। अचानक वह उठकर खड़ा हो गया, बाबा को संबोधन करके बोला, ‘आप तिरलोकी नाथ मासाब तो नहीं हैं?’

सवाल सुनकर बाबा का चेहरा उतर गया, संभल कर बोले, ‘अरे शिवदयाल, तुम यहां कैसे?’

शिब्बू बोला, ‘बस ऐसे ही दोस्तों के साथ आ गया।’

बाबा बोले, ‘इस सत्संग के बाद हमारे कक्ष में मिलना।’

सत्संग खत्म हुआ तो शिब्बू बाबा के कक्ष में पहुंचा। बाबा मसनद के सहारे उठंगे थे। शिब्बू उनके चरन छूकर बैठ गया। फिर पूछा, ‘आपने तीन साल मुझे स्कूल में पढ़ाया था। आप बाबा कैसे बन गये?’

बाबा कुछ असमंजस में दिखे, फिर बोले, ‘यह मेरा दूसरा जनम है। पिछला सब छोड़ दिया है।’

शिब्बू बोला, ‘आप तो अच्छा पढ़ाते थे, फिर यह बाबा बनने की बात कैसे आपके मन में आयी?’

बाबा कुछ देर आंखें बंद किये मौन बैठे रहे, फिर बोले, ‘एक घटना के बाद मेरा मन अचानक मास्टरी से उचट गया। हमारे क्षेत्र के मंत्री चमनलाल के पास एक दिन स्कूल के लिए अतिरिक्त फंड मंज़ूर कराने का प्रस्ताव लेकर गया था। मंत्री जी अपने चुनाव क्षेत्र का दौरा करके लौटे थे। सोफे पर लंबे लेटे थे। मुझे जानते थे लेकिन देख कर भी उठे नहीं। लेटे ही लेटे बात की। बीच-बीच में झपकी लेते रहे। मुझे बैठने को भी नहीं कहा। कहा कि आवेदन बाहर पीए को दे दूं। तीन चार दिन बाद स्थानीय अखबार में देखा कि वे एक बीस पच्चीस साल के बारहवीं पास बाबा के चरणों में औंधे पड़े हैं। बस तभी मास्टरी छोड़कर बाबा बनने का निश्चय कर लिया। हमारे पास इन बाबाओं से ज़्यादा ज्ञान है, बोलने की कला है, लेकिन ये अनपढ़ बाबा हमसे ज्यादा इज़्ज़त पाते हैं। यही ऐसा धंधा है जिसमें पैसा और सम्मान दोनों एक साथ मिलते हैं। जो बाबा भक्तों को माया से दूर रहने का उपदेश देते हैं वे खुद चार करोड़ की गाड़ी में घूमते हैं और पांच करोड़ का सोना शरीर पर पहनते हैं। पूछने पर जवाब मिलता है सब भक्तों का दिया हुआ है, उनकी नज़र में तो सोने और मिट्टी में कोई फर्क नहीं है। पुलिस वाले इन पर हाथ डालने से डरते हैं। इन पर आयकर लागू नहीं होता। मास्टर को देश की भावी पीढ़ी का निर्माता कहा जाता है, लेकिन समाज में बाबा ज़्यादा पुज रहे हैं। हमारी क्लास में बीस छात्र भी नहीं जुटते, इनके दरबार में लाखों जुटते हैं क्योंकि इनके अनुसार इनके पास आदमी के हर दु:ख की दवा मिलती है।

‘मास्टर से अपेक्षा की जाती है कि मेहनत से पढ़ाये और अच्छा रिज़ल्ट लाये। अच्छा रिज़ल्ट न लाने पर मास्टर को दंड मिलता है। लेकिन एक बाबा बिना पढ़े पास होने का नुस्खा बताते हैं और उन पर कोई कार्रवाई नहीं होती। इन बाबा के हिसाब से पढ़ाई-लिखाई की कोई ज़रूरत नहीं है। यही बाबा भक्तों से पूछते हैं कि उन्हें रात में सफेद साड़ी और बड़ी बिन्दी वाली चुड़ैल दिखी थी या नहीं। एक बाबा सीधे रावण और हनुमान जी से बात करते हैं और अपने दरबार में प्रेतबाधा से ग्रस्त आदमी को बीस पच्चीस फीट दूर से थप्पड़ मारते हैं। आदमी भी उनके हाथ की हरकत के साथ ज़मीन पर लुढ़कता पुढ़कता है, जैसे कि बाबा का थप्पड़ उसे लग रहा हो। विडंबना यह है कि सैकड़ों उच्च शिक्षा प्राप्त लोग दरबार में हाजि़र होकर चुपचाप यह तमाशा देखते हैं। सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश और सेनाध्यक्ष उनके सामने सिर नवाते हैं। कई साल पहले उत्तर प्रदेश के एक बाबा भक्तों से कहते थे कि रात को उनके घर शिवजी आये थे, फिर पूछते थे कि क्या उन्होंने डमरू की आवाज़ सुनी थी, और भक्त एक स्वर में जवाब देते थे कि उन्होंने सुनी थी।

‘स्वतंत्रता के पचहत्तर साल बाद तरक्की यह हुई है कि बाबागीरी का विस्फोट हुआ है। रोज़ दस बीस बाबा पैदा हो रहे हैं। कोई जीभ निकाले दौड़ रहा है तो कोई आंखें फाड़े। एक युवा साध्वी दिखीं जो शरीर पर भभूत लपेटे थीं और भभूत को घिस घिस कर, उतारकर भक्तों में बांट रही थीं। संविधान के मूल कर्तव्यों में कहा गया है कि देश में वैज्ञानिक सोच को प्रोत्साहन मिलना चाहिए, लेकिन वैज्ञानिक सोच कितना बढ़ रहा है यह सबके सामने है। ऐसे में बेचारा मास्टर बच्चों को क्या पढ़ाये?

‘बाबाओं के दरबार में शंका करने की इजाज़त नहीं होती। ज़्यादा सवाल पूछोगे तो भक्त लाठी लेकर दौड़ेंगे और शंकालु की कपाल-क्रिया हो जाएगी। बाबा स्त्रियों पर ज़्यादा भरोसा करते हैं क्योंकि वे सवाल नहीं पूछतीं, बाबा जिस तरफ इशारा करे उधर ही सिर पर कलश रखकर चल पड़ती हैं।’

शिब्बू ने पूछा, ‘तो क्या आप अब बाबा ही बने रहेंगे?’

मासाब बोले, ‘हम धर्म का असली मर्म समझाने के लिए इस लाइन में आये हैं। अभी धर्म के नाम पर महज़ कर्मकांड और अंधानुकरण हो रहा है। हम तो कुछ अच्छा करने की कोशिश करेंगे, लेकिन देखना यह है कि ये धंधे वाले बाबा हमें कब तक टिकने देते हैं।’

—–

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares
1