बीज एका मातीत रुजतं, वाढतं आणि मोठं होत राहतं आणि कालांतरानं तिथंच आणि त्याच मातीत मिसळून जातं. पण मानवी समाजातल्या मुलगी नावाच्या बीजाला एका मातीत वाढावं लागतं आणि मुळांसह उपटल जात दुस-या मातीत स्वत:ला गाडून घ्यावं लागतं… आणि तिथंही नुसतं रुजावं लागणार नसतं तर वाढावं लागतं… इतरांना सावली, फळं आणि आधार देण्यासाठी. या झाडाला दुसरी ओळख लगडलेली असते… एखादी नदी सागरात विलीन झाली की ती सागरच होऊन जाते, तशी!
पण मुलीचं एकाच मातीत रुजून तिथंच नष्ट होणा-या बीजापेक्षा किंचित बरं असतं… तिला नव्या मातीत एका आधीच वाढलेल्या झाडाचा आधार मिळतो… नव-याचा! किंबहुना या नात्यात नव-याचं हेच तर मुख्य काम असतं… अन्यथा त्याच्या संसाराची बाग फुलणार नाही!
जसं बाळाचं सर्वांत जवळचं जर कुणी असेल तर ती आई असते, तसे विवाहोत्तर आयुष्यात मुलीचं त्या नव्या घरात सख्खे जर कुणी असेल तर तो नवरा असतो… किंबहुना असावा लागतो. त्याच्या आधारे, त्याच्या साठी ती नवी नाती स्वीकारते आणि फुलवत राहते. रातराणी जसं फुलून येण्यासाठी चंद्र उगवण्याची प्रतीक्षा करत दिवस ढकलते, तशी नवपरिणिता नवरा घरी येण्याची वाट पहात राहते दिवसभर. कारण या अनोळखी जगात संवाद साधायचा तरी कुणाशी आणि किती? अर्थात, उलटत जाणारे दिवस हे सुसह्य करू शकतात… अनुभवाने नाती घट्ट किंवा ढिली होत जातात! अर्भकाला केवळ स्पर्शावरून समजतं… कुणाच्या खांद्यावर मान टाकली की झोप येते आणि जीवाला घोर रहात नाही!
ती याच मुलींची प्रतिनिधी. आईबापाचं नाव राखण्यासाठी त्यांचं नाव त्यागून नवं नाव, नवी भूमिका स्वीकारत जीवनाच्या रंगमंचावर एक पात्र जगून दाखवण्यासाठी उभी राहणारी.
लग्नाच्या धामधुमीत पहिले काही दिवस निघून गेले असतील… त्यात देवकार्य झालं असेल, एकदा सूनबाईला घेऊन घरी येऊन जा या आग्रहाखातर नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या असतील. आणि मग सर्वांच्या शोधक नजरांच्या पल्याड जाण्यासाठी दूर जावं लागलं असेल… मधुचंद्र म्हणजे केवळ एकांगी प्रवास नसतो… चंद्राच्या साक्षीने एकमेकांना प्रदक्षिणा घालत राहण्याच्या आणाभाका आणि कक्षा ठरवायचे हे दिवस!
नव-याकडून अनेक गोष्टी समजत जातात, नात्यांचे अर्थ, त्यांच्या सीमा, त्यांच्या बोलण्याचे, कटाक्षांचे मतितार्थ ध्यानात येतात. हे अगदी भरात आलेलं असताना, मोकळ्या आकाशाखाली तिच्या माथ्यावर मध्यान्हीचा सूर्य आग ओकून गेला… कपाळावरचं कुंकू मृत्यू नावाच्या रसायनाने रक्ताचा लाल रंग वागवू लागले!
त्याला निरोप देईपर्यंत सर्व काही लक्षात आलं… पण त्याला मूठमाती देऊन आपल्या देहाची माती घरी आणल्यावर, ज्यावर तांदळाचं माप ठेवलं होतं आणि ते माप हलकेच उलटवून जीवनाच्या अक्षता भूमीच्या स्वाधीन केल्या होत्या… तो उंबरा ओलांडताच समजलं की घरातल्या या गर्दीत आपलं कुणीच नाही! जे आहेत त्यांना आपलं मानावं लागणार आहे… कुणाच्याही आधाराशिवाय अर्धवट वाढलेल्या नाजूक वेलीला आभाळाकडे वाटचाल सुरु ठेवावी लागणार आहे!
ओले मूळ, खडकाचे अंग भेदी हे खरं असलं तरी काळाचा खडक भेदत राहणं म्हणजे प्रत्येक क्षणी बोटं रक्तबंबाळ करीत राहणे… खडक कित्येक वर्षांच्या अनुभवाने अधिकाधिक कणखर झालेला असतो. त्याला सुरुवातीला तर मूळाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ गुदगुली वाटत असेल! अशी अनेक मूळं या खडकांनी सुकून गेलेली पाहिलेली असतात!
ती मात्र अजूनही तग धरून आहे. ती बाहेर पडते पण तिला घरी यावं लागतंच. तिचे आईबाप तिच्या माहेरी आहेत, तिला त्याच्या आईबापाला त्याची कमतरता जाणवू द्यायची नसते. तिला काही सांगायचं असतं… भिंती ऐकून घेतात पण काही प्रतिसाद देत नाहीत. रात्रीचा अंधार पूर्णवेळ हिच्या बंद पापण्यांआड उघड्या असलेल्या डोळ्यांकडेच तर पहात जागत राहतो! सूर्याचं पहिलं किरण दिसत नाही… कारण दमून गेलेल्या पापण्या उघडता उघडत नाहीत… त्यांच्यावर मनाचं आणि मणा-मणाचं ओझं असतं.
वेलीच्या पोटी एखादं फूल असेल तर त्याचा आधार मिळतो… पण इथं तर तेही नाही. जाणारा प्रत्येक क्षण नवीनवी आव्हानं समोर उभे करत राहतो. गर्दीतला हा एकांतवास नरकापेक्षाही भयावह. भावनांच्या आहारी जायचं की व्यवहाराच्या हा तिढा सुटता सुटत नाही. हे सोडलं तर पळून गेलेलं चालणारं नसतं आणि धरून बसलं की ओरखाडे सुरूच राहतात… खूप कठीण असतं हे… खूप कठीण असतं हे!
या अंधा-या गुहेचं प्रकाशाच्या बाजूला उघडणारं टोक या पावलांना कधी तरी गवसू दे… देवा!
आशेया… पहलगाम मध्ये सर्वस्व गमावून परत आली आहे… एक वर्ष म्हणजे आपल्यासाठी फार कमी कालवधी असला तरी तिच्यासाठी एक युग असेल… आणखी अशी किती युगं तिच्या नशिबी आहेत देवच जाणो! आपण केवळ प्रार्थना करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो तिला! ह्या ओल्या जखमा सुकाव्यात, त्यांवर आशेचं आवरण चढत जावं आणि एक नवं जग तिच्यासाठी आकाराला यावं!
☆ ‘गोपाळाची मुरली, गोरक्षाचा कल्याण’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज गुरुवार. जरा सावकाश उठायचे ठरवले होते; पण सवयीप्रमाणे लौकरच जाग आली. वातावरण आल्हाददायक होते. किंचित गारवा होता. आन्हिके, स्नान, संध्या, पूजा-अर्चना उरकून मन प्रसन्न झाले. सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो आणि पावले जंगली महाराजांच्या मंदिराकडे वळली.
मंदिराच्या द्वाराजवळील विक्रेत्याकडून हार-फुले घेतली आणि पायऱ्या चढून समाधीपाशी गेलो. समाधीवरील भरजरी चादर सूर्यप्रकाशात चमकत होती. निशिगंध, गुलाब आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. उदबत्त्यांच्या धूम्ररेखा आवर्तने घेत वर चढत होत्या. समोरचे धूपपात्र धुमसत होते.
हार, फुले वाहून साष्टांग दंडवत घातला. एका कोपऱ्यात शुभ्र वस्त्रांतील, दाढी वाढवलेली, केशरी टोपीधारी एक वृद्ध ऋषितुल्य व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. ते हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रा. स. भट असावेत. त्यांनाही नमस्कार करून मी एका कोपऱ्यात ध्यानाला बसलो.
अर्ध्या तासाने बाहेर आलो. समोर ‘ओम चेंबर्स’ दिसत होते. अचानक आठवले — योगिनी सुमनताई ताडे सध्या इथेच त्यांच्या बहिणीकडे राहायला आहेत. वाटलं, आलोच आहोत तर त्यांनाही भेटून जावं.
ताईंच्या सदनिकेवर टकटक केली. दार एका शिष्येने उघडले.
“कोण पाहिजे?”
“सुमनमावशी आहेत का? मी त्यांच्या थोरल्या बहिणीचा जावई — दिवाकर. ”
“या, बसा. ताई खाली पाहुण्यांना निरोप द्यायला गेल्यात. येतीलच. ”
ताई नसताना घरात बसणे प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. खाली पदपथावर ताई एका प्रौढ, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेशी बोलत उभ्या होत्या. मोतिया रंगाची रेशमी साडी, मरून काठ, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर, डोळ्यावर चष्मा आणि हातात बिल्वरांची झळाळी…
त्या व्यक्ती परिचित वाटत होत्या.
तेवढ्यात रिक्षा आली. त्या बाईंनी ताईंना निरोप दिला आणि रिक्षात बसल्या. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत दोघी एकमेकींना हात हलवत राहिल्या.
थोड्याच वेळात ताई वर आल्या. मला पाहताच उत्साहाने म्हणाल्या,
“अरे, जरा लौकर आला असतास तर एका थोर व्यक्तीची ओळख करून दिली असती!”
मी विचारले, “कोण होत्या त्या?”
ताई हसल्या.
“अरे, ती साक्षात भगवंताची मुरली होती!”
“म्हणजे?”
“माणिक वर्मा! श्रीहरीची मधुर मुरली!”
क्षणभर मी अवाक् झालो.
“साक्षात माणिकताई? त्या इथे कशा काय?”
ताई म्हणाल्या,
“काल रात्री त्यांचा फोन आला. म्हणाल्या — ‘उद्या भेटायला येऊ का? मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. ’”
“तुमच्याकडून?”
“हो. त्यांना ‘गोरक्षकल्याण’ रागातील काही दुर्मीळ चीजा शिकायच्या होत्या. कुठूनतरी त्यांना समजलं होतं की माझ्याकडे त्या आहेत. ”
मी आश्चर्यचकित झालो.
“पण तुम्ही गाणं शिकलात कधी?”
त्यावर ताई शांतपणे म्हणाल्या,
“मी कुणाकडेही शास्त्रीय संगीत शिकले नाही रे. हे सगळं संतांचा प्रसाद आहे. ”
आणि मग त्यांनी सांगितलेली कथा विलक्षण रोमांचकारी होती.
बेळगावला योगिनी कलावती देवींच्या सान्निध्यात त्या काही काळ होत्या. एकदा पाद्यपूजेनंतर आईंनी स्वतः घेतलेल्या केशर-वेलचीच्या दुधातील अर्धे दूध सुमनताईंना पाजले.
ताई सांगत होत्या,
“त्या क्षणापासून, कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, माझ्या मुखातून रागदारी उमटू लागली. एकच भजन अनेक रागांत गाता येऊ लागले. विविध चीजा, रचना सहज सुचू लागल्या. हीच संतकृपा. ”
हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.
ताई पुढे म्हणाल्या,
“पण खरी थोरवी माणिकताईंची आहे. संगीतविश्वात एवढं मोठं स्थान असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. अजूनही नवीन शिकायची तळमळ! सुरांच्या शोधात त्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आल्या — हीच त्यांची महानता. ”
त्यांचे शब्द ऐकता ऐकता माझे डोळे नकळत ओलावले.
इतक्यात दाराची बेल वाजली.
दार उघडले तर साक्षात माणिकताई समोर उभ्या!
मी गोंधळलोच.
त्या हसत म्हणाल्या,
“योगिनीताई, माझी पर्स इथेच राहिली वाटतं. त्या गोरखकल्याणच्या नादात विसरून गेले. ”
खरंच, पर्स गादीवरच पडली होती. मी ती त्यांच्या हातात दिली.
ताईंनी माझा परिचय करून दिला.
“हे दिवाकर. संगीताची फार आवड आहे यांना. ”
मी पटकन म्हणालो,
“ऐकण्याची आवड बरं का! गाता-वाजवता काही येत नाही. ”
त्यावर माणिकताई मनमोकळं हसल्या.
“असू द्या हो. आम्हाला रसिक श्रोतेच लागतात. श्रोते आहेत म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तेच आमचे अन्नदाते, तेच आमचे दैवत. ”
आम्ही दोघे खाली आलो. रिक्षा उभीच होती.
माणिकताई म्हणाल्या,
“या, तुम्हाला वाटेत सोडते. ”
मी संकोचत म्हणालो,
“नको ताई. मला समोरच जंगली महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. ”
त्या हसल्या. रिक्षा निघाली.
रिक्षा दिसेनाशी झाली…
आणि मी तिथेच उभा राहिलो — भारावलेला, स्तब्ध.
माझ्यासमोर साक्षात ‘गोपाळाची मुरली’ होती…
आणि त्या मुरलीच्या अंतर्यामी घुमत होता — ‘गोरक्षाचा कल्याण’!
(पावस निवासी परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अंतरंग शिष्या, वैकुंठवासी परमपूज्य *योगिनीताई ताडे* यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन वैशाख वद्य दशमी अर्थात मंगळवार दिनांक १२ मे २०२६ या दिवशी होता.. त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख)
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस १५ मे. रविंद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ या.
महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू देवेंद्रनाथ हे राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे ज्येष्ठ पुत्र.
देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोड़ासाँको भागातील प्रसिद्ध वडिलोपार्जित वाड्यात १५ मे १८१७ रोजी झाला.
ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. फार पूर्वी तेथून या कुटुंबाने यशोहर गावी स्थलांतर केले. कालांतराने जातीबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली.
त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय, यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले.
द्वारकानाथ टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. त्यामुळे देवेंद्रनाथांना लहानपणापासूनच राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राजा राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राजा राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र, देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. बंगाली ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे.
राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. त्यांनी एकेश्वरवादाचा (एकाच ईश्वराची पूजा) प्रसार केला.
(अपूर्ण-उरलेला भाग पुढील भागात)
—–
☆ गीत : ६७ ☆
THOU art the sky and thou art the nest as well.
O thou beautiful, there in the nest it is thy love that encloses the soul with colours and sounds and odours.
There comes the morning with the golden basket in her right hand bearing the wreath of beauty, silently to crown the earth.
And there comes the evening over the lonely meadows deserted by herds, through trackless paths, carrying cool draughts of peace in her golden pitcher from the western ocean of rest.
But there, where spreads the infinite sky for the soul to take her flight in, reigns the stainless white radiance. There is no day nor night, nor form nor colour, and never, never a word.
THY sunbeam comes upon this earth of mine with arms outstretched and stands at my door the livelong day to carry back to thy feet clouds made of my tears and sighs and songs.
With fond delight thou wrappest about thy starry breast that mantle of misty cloud, turning it into numberless shapes and folds and colouring it with hues ever changing.
It is so light and so fleeting, tender and tearful and dark, that is why thou lovest it, O thou spotless and serene. And that is why it may cover thy awful white light with its pathetic shadows.
THE same stream of life that runs through my veins night and day runs through the world and dances in rhythmic measures.
It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers.
It is the same life that is rocked in the ocean-cradle of birth and of death, in ebb and in flow.
I feel my limbs are made glorious by the touch of this world of life. And my pride is from the life-throb of ages dancing in my blood this moment.
☆ मदर्स डे – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
ॲना जार्विस
ज्या माऊलीनं हा दिवस सुरू केला, तिनंच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं…!!_
आपल्यासाठी ‘मदर्स डे’ म्हणजे फक्त आईला महागडं गिफ्ट देणं, सोशल मीडियावर फोटो टाकणं आणि एखादा छान केक कापणं इतकाच मर्यादित आहे… परंतु जेव्हा या दिवसामागचा खरा इतिहास समजतो, तेव्हा डोळ्यांत पाणी येतं आणि मनात एक अस्वस्थता घर करून बसते!
१० मे २०२६. सगळीकडे ‘मदर्स डे’चा उत्साह आहे, पण या उत्साहाच्या मागे एक शोकांतिका दडलेली आहे.
ही गोष्ट आहे *ॲना जार्विस* नावाच्या एका जिद्दी महिलेची, जिनं १९०८ मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ या दिवसाची सुरुवात केली होती.
ॲनाला वाटत होतं की, हा दिवस अतिशय वैयक्तिक, शांत आणि जिव्हाळ्याचा असावा. तिच्या कल्पनेतला ‘मदर्स डे’ म्हणजे आईला स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक साधं पत्र आणि तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा एक क्षण होता.
परंतु अवघ्या दहा वर्षांत या भावनेचा अक्षरशः बाजार मांडला गेला.
कल्पना करा, ज्या भावनेला ॲनानं पवित्र मानलं होतं, त्याच भावनेचा ‘हॉस्टाईल टेकओव्हर’ झाला… हॉलमार्कसारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’साठी खास ग्रीटिंग कार्ड्स छापायला सुरुवात केली, फुलांच्या व्यापाऱ्यांनी दर दुप्पट-तिप्पट केले आणि चॉकलेट कंपन्यांनी जाहिरातींचा पाऊस पाडला.
ॲना जार्विसला हे सगळं बघून प्रचंड संताप आला. तिनं या नफेखोर व्यापाऱ्यांना ‘लफंगे’, ‘चाचे’ _(Pirates)_ आणि ‘दरोडेखोर’ अशी शेलकी विशेषणं लावली. आईच्या आठवणीचा हा व्यापार म्हणजे माणुसकीचा अपमान आहे, असं तिचं मत होतं.
खरी लढाई तर इथून पुढं सुरू झाली… ॲनानं या व्यापारीकरणाविरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि आपली उरलीसुरली सर्व संपत्ती या कायदेशीर लढायांमध्ये खर्च करून टाकली. ती इतकी हतबल झाली होती की, तिनं हा दिवस अधिकृतपणे रद्द करण्यासाठी चक्क याचिका दाखल केली होती!
ज्या दिवसासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्याच दिवसानं तिला कंगाल केलं. १९४८ मध्ये ॲना जार्विसचा मृत्यू एका सॅनिटोरियममध्ये झाला.
पण इथं एक भयानक ट्विस्ट आहे… ॲनानं ज्या फ्लोरिस्ट आणि ग्रीटिंग कार्ड कंपन्यांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला, त्याच कंपन्यांनी तिचं हॉस्पिटलचं बिल गुपचूप भरलं होतं!
आज २०२६ मध्ये आपण पाहतोय की मदर्स डेच्या नावाखाली अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होतेय. तरीही यंदा एक बदल जाणवतोय… अनेक तरुण आता महागड्या गिफ्ट्सपेक्षा ‘क्वालिटी टाइम’ आणि साध्या घरगुती जेवणाला पसंती देताहेत. कदाचित ॲना जार्विसला हेच हवं होतं.
एका साध्या भावनेचं कॉर्पोरेट साम्राज्यात झालेलं रूपांतर आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंच एखाद्या ‘ब्रँडेड’ वस्तूची गरज असते का?
ॲना जार्विसची ही कहाणी ऐकल्यानंतर, तुम्ही यंदाचा मदर्स डे कसा साजरा करायचं ठरवलंय?
***
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परमार्थात काय करावे हे तर महत्त्वाचे आहेच पण काय करु नये हे अधिक महत्त्वाचे आहे !!
उदा जप करणे उत्तमच पण एकवेळ जप नाही जमला तर इतकं बिघडणार नाही पण न सांगितलेली गोष्ट केली तर फार नुकसान होतं
परमार्थात ‘विधिनिषेध’ (काय करावे आणि काय करू नये) याला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा आपण काय करावे (उदा. जप, तप, पूजा) यात इतके गुंततो की काय टाळावे याकडे दुर्लक्ष होते.
१. ‘न करणे’ हे ‘करण्या’पेक्षा कठीण असते
परमार्थात साधना करणे म्हणजे काहीतरी ‘मिळवणे’ नसून स्वतःमधील दोष ‘कमी करणे’ असते.
उदाहरण: दिवसातून एक तास जप करणे सोपे आहे, पण उरलेले २३ तास कोणाची निंदा न करणे, कोणावर न रागावणे किंवा असत्य न बोलणे हे जास्त कठीण आहे.
जर आपण जपाची बादली भरत असू, पण ‘निंदा’ किंवा ‘अहंकार’ नावाच्या छिद्रातून ती रिकामी होत असेल, तर त्या साधनेचा उपयोग शून्य होतो.
२. आज्ञापालन: हे सर्वात मोठे नुकसान
“न सांगितलेली गोष्ट करणे” हे साधनेत घातक ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे अहंकार.
जेव्हा साधक स्वतःच्या बुद्धीने “मला हे जास्त चांगलं वाटतं” म्हणून गुरुंनी न सांगितलेली गोष्ट करतो, तेव्हा त्याचा ‘मी’ बळावतो.
परमार्थात साध्या कृतीपेक्षा त्यामागील समर्पण महत्त्वाचे असते. जप चुकला तर तो अनावधानाने झालेला प्रमाद असू शकतो, पण मनाप्रमाणे वागणे हा जाणुनबुजून केलेला स्वैराचार असतो.
३. साधनेतील ‘छिद्रे’ बुजवणे आवश्यक
संत तुकाराम महाराज म्हणतात, “काय थोर झाले तीर्थाचे दर्शन । जरि नाही मन शुद्ध झाले ॥”
जर एखादा माणूस खूप दानधर्म करतोय, पण घरातल्या माणसांना त्रास देतोय, तर त्या दानाला काही अर्थ उरत नाही.
परमार्थात ‘काय करू नये’ याची यादी (जसे की: परनिंदा, मत्सर, क्रोध, दंभ) पाळल्यास अंतःकरण लवकर शुद्ध होते. शुद्ध अंतःकरणात मग थोडा केलेला जपही लवकर फळाला येतो.
४. पथ्य आणि औषध
परमार्थ हा एखाद्या आजारावरील उपचारासारखा आहे. औषध (जप/साधना) घेणे जितके गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व ‘पथ्य’ (काय करू नये) पाळण्याला असते.
जर रुग्ण औषध घेतोय पण पथ्य पाळत नसेल, तर औषध लागू पडत नाही.
त्याचप्रमाणे, साधनेचे औषध तेव्हाच काम करते जेव्हा आपण कुसंगती, विषयांची ओढ आणि नकारात्मक विचारांचे पथ्य पाळतो.
थोडक्यात सांगायचे तर, ‘साधना’ ही शिडी आहे, तर ‘संयम’ हा तिचा आधार आहे. डबके कितीही मोठे असले तरी त्याला छिद्र असेल तर ते कधीच भरणार नाही. म्हणून दोषांचा त्याग (काय करू नये) हे साधनेचा पाया मजबूत करण्याचे काम करते.
“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या उक्तीसोबतच “काय सोसावे आणि काय टाळावे” याचे भान असणे हाच खरा शहाणपणा आहे.
परमार्थात ‘काय करू नये’ या विषयाला पुष्टी देणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि सार्थ संस्कृत श्लोक ‘श्रीमद्भगवद्गीते’ मध्ये येतो. हा श्लोक साधनेतील सर्वात मोठ्या अडथळ्यांना (म्हणजेच काय टाळावे याला) अधोरेखित करतो:
मुख्य श्लोक
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत ॥
(भगवद्गीता – १६. २१)
या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की:
“काम (वासना), क्रोध (राग) आणि लोभ (हाव) हे नरकाचे तीन प्रकारचे दरवाजे आहेत, जे आत्म्याचा नाश करणारे आहेत; म्हणून या तिन्हींचा त्याग करावा (हे करू नये).“
या श्लोकाचे तुमच्या विचारांशी असलेले नाते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल:
आत्म्याचा नाश: येथे ‘नाश’ म्हणजे मृत्यू नव्हे, तर साधकाच्या प्रगतीचा पूर्णतः थांबणे. तुम्ही कितीही जप केला, तरी जर तुम्ही काम-क्रोध-लोभाच्या आहारी जात असाल, तर तुमची सर्व साधना व्यर्थ जाते.
‘हे करू नये’ याचे महत्त्व: भगवंतांनी येथे “हे करा” म्हणण्याऐवजी “हे टाळा” (त्यजेत) यावर जास्त भर दिला आहे. कारण जोपर्यंत या तीन गोष्टी मनात आहेत, तोपर्यंत केलेली कोणतीही साधना फळ देणार नाही.
पायाभूत नियम: परमार्थात जप-तप ही वरची मजली आहे, पण काम-क्रोध-लोभाचा त्याग हा पाया आहे. पायाच नसेल तर मजला कोसळणारच.
आणखी एक पूरक सुभाषित (पथ्याबाबत)
परमार्थात ‘काय करू नये’ हे पथ्यासारखे असते. त्या संदर्भात हे सुभाषित खूप प्रसिद्ध आहे:
विना पथ्यं कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ।
सपथ्यस्य कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ॥
अर्थ: जर एखादा रुग्ण ‘पथ्य’ (काय खाऊ नये) पाळत नसेल, तर त्याला औषध देऊन काय उपयोग? (कारण औषध लागू होणार नाही). आणि जर रुग्ण ‘पथ्य’ व्यवस्थित पाळत असेल, तर त्याला औषधाचीही फारशी गरज उरत नाही (कारण तो आपोआपच बरा होईल).
परमार्थात लागू पडताना:
पथ्य = काय करू नये (उदा. निंदा, मत्सर, आज्ञाभंग).
औषध = काय करावे (उदा. जप, पूजा).
जर आपण ‘काय करू नये’ हे पाळले नाही, तर जपाचे औषध लागू होत नाही.
परमार्थातील ‘निषेध’ (काय करू नये) आणि ‘पथ्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर भाष्य करतात. विशेषतः सोळाव्या अध्यायात, जिथे दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन आहे, तिथे ते एका ओवीतून हा विचार मांडतात:
संत ज्ञानेश्वरांची ओवी (अध्याय १६)
विधी निषिद्ध सांडूनि। जे वर्तती स्वेच्छाचारिणी।
ते न पावती गा दोन्ही। इहपर लोक॥
अर्थ: जे लोक शास्त्राने सांगितलेले ‘विधी’ (काय करावे) आणि ‘निषिद्ध’ (काय करू नये) या दोन्ही मर्यादा सोडून केवळ आपल्या मनाप्रमाणे (स्वेच्छेने) वागतात, त्यांना इहलोक (या जगातील सुख) आणि परलोक (परमार्थातील गती) यांपैकी काहीही प्राप्त होत नाही.
विवेचन (ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात)
ज्ञानेश्वर महाराज येथे ‘मनासारखे वागणे’ (स्वेच्छाचार) हा साधनेतील सर्वात मोठा अडथळा मानतात. तुमच्या मूळ विचाराला पुष्टी देणारे काही महत्त्वाचे मुद्दे:
मर्यादेचे महत्त्व: जसा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही म्हणून तो टिकून आहे, तसाच साधक जेव्हा ‘काय करू नये’ याची मर्यादा पाळतो, तेव्हाच त्याची साधना सुरक्षित राहते.
आज्ञाभंग हीच मोठी हानी: तुम्ही म्हटल्याप्रमाणे, “न सांगितलेली गोष्ट करणे” म्हणजे गुरूंनी किंवा शास्त्रांनी आखून दिलेली रेषा ओलांडणे होय. माउली म्हणतात की, अशी व्यक्ती कितीही जप करत असली, तरी ती विस्कटलेल्या घरासारखी असते; तिथे लक्ष्मी (दैवी गुण) वास करत नाही.
शुद्ध अंतःकरण: जेव्हा आपण निषिद्ध गोष्टी टाळतो (उदा. निंदा, दंभ, अहंकार), तेव्हाच अंतःकरण आरशासारखे स्वच्छ होते. त्या स्वच्छ आरशात मग ईश्वराचे रूप चटकन दिसते. उलट, आरसाच मळलेला असेल (म्हणजेच आपण चुकीच्या गोष्टी करत असू), तर कितीही प्रकाशाचा (साधनेचा) झोत टाकला तरी प्रतिबिंब दिसणार नाही.
संत तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन
तुकोबा एका अभंगात म्हणतात:
“भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या माथी हाणू काठी ॥”
येथे ‘नाठाळ’ म्हणजे केवळ बाहेरची व्यक्ती नव्हे, तर आपल्या मनातील ‘अयोग्य विचार’ होय. तुकोबा सांगतात की, जो विचारांनी शुद्ध नाही, त्याने कितीही बाह्य उपचार केले तरी ते व्यर्थ आहेत.
सारांश
तुमचा मूळ विचार की “जप नाही जमला तरी चालेल, पण चुकीची गोष्ट करू नये”, हेच संतांनाही अभिप्रेत आहे. कारण ‘साधना’ ही शिडी आहे, पण ‘सदाचार’ ही ती शिडी ज्या भिंतीला लावली आहे, ती भिंत आहे. भिंतच कच्ची असेल, तर शिडी कितीही उंच असली तरी उपयोग काय?
परमार्थात ‘काय करू नये’ हे ‘काय करावे’ पेक्षा का महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करण्यासाठी एक अत्यंत चपखल आणि जुना ‘दुधाच्या घागरीचा’ दृष्टांत दिला जातो.
दृष्टांत: दुधाची घागर आणि विषाचा थेंब
एका भक्ताने खूप कष्ट करून, पहाटे उठून गाईचे धारोष्ण आणि शुद्ध दूध एका मोठ्या घागरीत जमा केले. ते दूध त्याने अत्यंत श्रद्धेने ईश्वराला अर्पण करण्यासाठी किंवा त्याचे दही-तूप करण्यासाठी स्वच्छ करून ठेवले होते. हे दूध म्हणजे तुमची ‘साधना’ (जप, तप, वाचन) आहे.
पण, त्याच वेळी त्या घागरीत एका विषाच्या सुईचे टोक किंवा सापाच्या विषाचा एक छोटासा थेंब पडला.
आता विचार करा:
१. दूध कितीही शुद्ध असले, तरी ते आता पिण्यायोग्य राहिले का? नाही.
२. त्या दुधाची चव बिघडली नसेल, रंगही बदलला नसेल, पण त्यातील तो एक ‘निषिद्ध’ थेंब (विषाचा अंश) संपूर्ण दुधाला घातक ठरला.
विवेचन:
दूध जमा करणे = विधी (जप, ध्यान, कीर्तन करणे).
विषाचा थेंब = निषिद्ध (अहंकार, परनिंदा, किंवा गुरूंनी ‘नको’ म्हटलेली गोष्ट करणे).
जर आपण दिवसभर जप केला (दूध जमा केले), पण मनात एखाद्याबद्दल मत्सर ठेवला किंवा कोणाचा तरी अपमान केला (विषाचा थेंब), तर आपली सर्व साधना त्या एका कृतीने ‘विषारी’ किंवा निष्फळ होते.
दुसरा छोटा दृष्टांत: ‘छिद्र असलेल्या नावेचा’
समजा तुम्हाला नदी पार करायची आहे. तुमच्याकडे एक सुंदर नाव आहे आणि तुम्ही जोरात वल्हवत आहात. वल्हवणे ही तुमची ‘साधना’ आहे. पण जर त्या नावेला तळाशी एक छोटेसे छिद्र असेल, तर तुम्ही कितीही जोरात वल्हवले तरी ती नाव पैलतीराला पोहोचणार नाही; उलट ती मध्येच बुडेल.
येथे वल्हवणे (काय करावे) महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षा छिद्र बुजवणे (काय करू नये / दोष टाळणे) हे अधिक महत्त्वाचे आहे. छिद्र असेल तर तुमचे सर्व श्रम वाया जातात.
तुमच्या विषयासाठी निष्कर्ष:
“न सांगितलेली गोष्ट” करणे म्हणजे त्या नावेला मुद्दाम छिद्र पाडण्यासारखे आहे. जप राहिला तर प्रगती थांबेल, पण चुकीची गोष्ट केली तर अधोगती सुरू होते. म्हणूनच परमार्थात ‘साधनेच्या वेगा’पेक्षा ‘दोषांचा त्याग’ याला संत जास्त महत्त्व देतात.
असा हा अत्यंत महत्त्वाचा विचार करणे त्यावरच चिंतन व कृती करण्याचा निश्चय करणे आपले कर्तव्य आहे जर रामरायाची कृपा हवी असेल तर!
काल एका ऑटो रिक्षाच्या मागे अजित दोवालभारताचे NSA म्हणजेNational Security Advisor यांचा फोटो असलेला एक sticker /poster बघीतला खाली लिहिलेले होते.
” My Hero “
अजित दोवाल म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्त्व, विलक्षण बुद्धी, चाणाक्ष चतुर, Risk घेणे व त्यासाठी perfect planning for any operations. हे त्यांच्या स्वभावातच आहे. शत्रुच्या घरात घुसून मारायची हिम्मत ठेवणारे. यांच्या नावानेच थरथर कापतात शत्रू. कोणतेही operation दोवालांच्या नेतृत्वाखाली होणार, असे समजल्यावर दुश्मन तेथेच ढेर होतात.
” Real life Real HERO”
भारताचे जेम्स बॉन्ड आहेत. वयाची पंचाहत्तरी पार केली असली तरी कमालीची बुद्धी व कौशल्य.
मी रिक्षावाल्याला विचारले. हे poster कोणी लावले ??? तेव्हा तो म्हणाला…
मॅडम एक कॉलेज का लडका लगाया ये।मुझे बोला ये सिनेमा के हिरो का poster निकालो। और ये लगाओ। ये असली हिरो है। औरउसने ‘दोवालसहाब ‘के बारे मेंबहुत जानकारी भी दिया। मैं तुरंत तैयार हो गया। अभी मैं अपनी सवारी को भी poster के बारे में जितनामुझे पता है मैं बताता हूं।
मला त्या मुलाचे तर कौतुक वाटलेच. व या रिक्षावाल्याचे पण. त्याला सुध्दा खरा हिरो कोण??? हे लगेच लक्षात आले. खरी आणि चांगली गोष्ट कोणालाही कळते. फक्त सांगणाऱ्याचे सांगणे दमदार असले पाहिजे. मार्गदर्शन करणारा बरोबर असला, तर गोष्टी पटतात. आणि विचारही बदलतात.
“मेरा देश बदल रहा है “
हे आजकाल ऐकू येणारं वाक्य. देश नक्कीच बदलत आहे. जगाची भारताकडे बघायची नजर बदलली आहे. कोरोनानंतर आपली संस्कृती किती चांगली आहे. हेही जगाला कळले आहे. Hello म्हणत ‘Shake hand ‘ ची जागा आता ‘नमस्ते’ नी घेतली आहे.
देश अचानक बदलत नसतो. तो प्रयत्न करून बदलावा लागतो. ज्या देशात तरूणांची संख्या जास्त आहे, तेथे सर्व शक्यही आहे.
याची सुरुवात प्रत्येकाने करायला हवी. अगदी प्रत्त्येक घरात, शाळेत, नोकरी च्या जागी, प्रसार माध्यमे /मिडिया सर्वांच्या सहकार्याने देश नक्की बदलू शकतो.
सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेवढी चांगली नाही. दिवसभर breaking news च्या नावाने TV वर ओरडून ओरडून त्याच त्याच बातम्या सांगत असतात. शंभरापैकी पहिल्या पन्नास काय त्यापेक्षाही जास्त बातम्या negative असतात. खून, मारामाऱ्या बलात्कार, चोऱ्या, गोळीबार, एकमेकांना शिव्या देणे. मानहानी करणे. हे सर्व बघून/ ऐकुन आपल्या देशात फक्त अशाच गोष्टी घडतात का ????? हेच मनात येत.
आपल्या देशात चांगल्या गोष्टी घडतच नाही का ???? देशात सर्व वाईटच घडत असतं का???
बातम्या मधे जर पहिल्या पन्नास बातम्या चांगल्या सांगितल्या, तर त्याचा प्रभावी परिणामही दिसेल. Freedom of speech चा योग्य, सकारात्मक उपयोग ही करता येतो.
या भोवऱ्यातुन बाहेर पडणे, म्हणजे पहिली कठीण परिक्षा. एकशे चाळीस करोड लोकांचा हा देश आहे. आपल्या देशात काही तरी, कुठे तरी रोजच चांगलं नक्कीच घडत असणार. शंभर बातम्या मधे चांगली बातमी केंव्हा येते आणि जाते कळतही नाही. .
चांगली बातमी काहीही असू शकते. एखाद्या सामान्य माणसाचे असामान्य कार्य.
एखाद्या विद्यार्थ्याने मिळविलेले असामान्य यश. जसे 2020 च्या NEET परिक्षेत ओडीसा च्या Soyeb Aftab व दिल्ली ची आकांक्षा सिंग ने 720/720 असे perfect 720 marks मिळविले.
हरियाणा मधील ‘किरोडी’ नावाच्या एका गावाने एक नवा इतिहास रचला. त्या गावात असलेल्या एकुण २५० पैकी प्रत्त्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली आहे. हरियाणा सारख्या राज्यात उचलेले हे पाऊल खूप कौतुकास्पद, सकारात्मक, आणि अनुकरणीय आहे.
एका सोळा वर्षांच्या Priyavrath Patil नावाच्या मुलाने संस्कृत च्या सर्व महापरिक्षा पास केल्या. He is the youngest ever to pass all exams.
ओडिशा च्या तटावर पृथ्वी ll मिसाइल चे successful परिक्षण झाले. ,
उत्तराखंडची मशरूम queen नावाने प्रसिद्ध ‘दिव्या रावत’ जगभरात आपला व्यवसाय करते. किती तरी लोकांना तिने रोजगार दिला आहे.
BRO ‘ Border Road organisation ने एका वर्षात 54 पूल बांधले.
‘ Breaking news :म्हणून चांगली बातमी पण लोकांना आकर्षित करू शकते.
अशा चांगल्या बातम्या कुठे तरी एका कोपऱ्यात दडून असतात. बहुतेक फक्त बातम्यांचा शंभर आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांचा समावेश होतो. पण पत्नीने प्रिकराच्या मदतीने पतीला मारून, त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले, ही बातमी मात्र आठवडाभर चघळली जाते.
एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची मेहनत discipline, dedication, regular practice त्यांचे training अशा कितीतरी गोष्टी बातम्या मधे चर्चेचे विषय असू शकतात. यांचा परिणाम/ प्रभाव वेगळा पडेल. एक positive उर्जेचा संचार होईल. अशी स्वप्ने बघणाऱ्या अनेक मुलांना दिशा मिळेल.
नवीन पीढीला मार्गदर्शन मिळेल.
तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय वाटतं ?? आपला देश कसा प्रगती करू शकतो?? देशात काय बदल करावासा वाटतो ?? असे प्रश्न तरूण पीढ़ी ला विचारले तर त्यांच्या विचारांना चालना मिळेल. दिशा मिळेल.
विचारांची direction बदलेल..
आणि कौतुक म्हणजे, एवढा मोठा देश सांभाळणारे आमचे माननीय प्रधानमंत्रीना हे सर्व माहिती असतं. आपल्या मन की बात कार्यक्रमात ते अशा सर्व गोष्टींचा उल्लेख न विसरता आवर्जुन करतात. व त्या सर्वांचे अभिनंदन ही करतात.
कोणता देश किती श्रीमंत आहे ???? हे त्या देशाची प्राकृतिक संपदा, व त्या देशातील जनतेचे आचार विचार, संस्कृती, सवयी, त्यांचे देशप्रेम यावर अवलंबून असते.
देश सर्वोपरी आहे ही भावना असली तर सर्व सहज शक्य आहे.
☆ “पैसा नाती बदलतो हेच खरं !!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की…
गाडी सर्व्हिसिंगला दिली म्हणून बसनं ऑफिसला निघालो. दहा-पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर बस आली बऱ्यापैकी गर्दी होती. लांबचा प्रवास असल्यानं मागच्या सीटवर का होईना पण बसायला जागा मिळाल्याचा आनंद झाला. स्थिरस्थावर झाल्यावर सहज लक्ष गेलं तेव्हा पुढच्या सीटवर बसलेला दाढीवाला ओळखीचा वाटला. निरखून पाहिलं. तो पम्या होता. माझा मित्र. एकाच शहरात असून देखील तब्बल दहा वर्षानी आम्ही भेटत होतो. मी हाक मारणार इतक्यात पम्यानचं मागे वळून पाहिलं पण मला पाहून त्याचा चेहरा खारकन उतरला. पम्याचं पडलेलं तोंड बघून राग आला अन वाईटही वाटलं. दोघं औपचारीक हसलो. तोंडदेखले विचारपूस झाली. बोलताना पम्या नजर चुकवत होता आणि अचानक उभं राहत म्हणाला “बाय, परत भेटू. माझा स्टॉप आला”बस थांबल्यावर घाईघाईनं उतरून पम्या भरभरा चालायला लागला.
“काय पण एकेक नमुने असतात. ”कंडक्टर.
“काय झालं”मी विचारलं.
“यानं लास्ट स्टॉपचं तिकीट काढलं पण मध्येच उतरला”कंडक्टर हसत म्हणाला. मी काहीच बोललो नाही.
पम्या आणि मी, लहानपणापासूनचे मित्र. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मार्ग वेगवेगळे झाले तरी मैत्री शाबूत होती. नोकरी सोडून पम्यानं व्यवसाय सुरू केला. कामाच्या व्यापात हळुहळू आमचं भेटणं कमी झालं तरी आधीमधी सणाला भेटीगाठी व्हायच्या. आठ-पंधरा दिवसातून फोन व्हायचे.
एकदा सकाळी सातलाच पम्या भेटायला आला. त्याचं असं अवेळी भेटण्यानं मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अंदाज खरा ठरला. पम्यानं उसने पैसे मागितले. शक्यतो मैत्रीत पैशाचा व्यवहार करू नये आणि केलाच तर पूर्ण पारदर्शकता हवी असं माझं स्पष्ट मत. आजतागायत मी असे व्यवहार टाळलेत. पम्याला स्पष्ट ‘नाही’सांगितलं पण त्यानं पिच्छाच पुरवला. रोज फोन किवा मेसेज करत होता. “यावेळेला मदत कर. परत कधीच मागणार नाही. दोस्तीची शपथ” “खूपच गरज आहे” “आयुष्यभर लक्षात ठेवीन” हेच पुन्हा पुन्हा सांगत होता. शेवटी मैत्रीखातर तीन महिन्यात परत करण्याच्या बोलीवर पैसे दिले. त्यानंतर काही दिवसांनी पैशाचा विषय काढला पण ‘देतो रे, लक्षात आहे”एवढंच उत्तर मिळालं. आमची मैत्री आणि माझा भिडस्त स्वभाव यामुळे सारखं सारखं पैसे मागणं योग्य वाटलं नाही. याविषयी घरीही सांगता येत नव्हतं. पैसे मिळाल्यावर पम्याचं वागणं बदललं. त्यानं घर, मोबाइल नंबर बदलला. नवीन पत्ता कोणालाच माहिती नव्हता. आमच्या कॉमन मित्रांशी बोलताना समजलं की पम्याला पैसे दिलेले माझ्यासारखे अजून एकदोघं आहेत.
दहा वर्षे झाली अजून एक रुपायाही परत मिळालेला नाही. उसने दिलेले वीस हजार रुपये अक्कल खाती जमा केलेत.
मैत्रीत अडीअडचणीला मदत केलीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. गरजेच्या वेळी मलाही मित्रांनी मदत केलीय. त्याची जाणीव आजही आहे. प्रत्येक मित्र ‘पम्या’ नसतो हे शंभर टक्के मान्य पण उसने पैसे मागणारा आणि वेळीच परतफेड न करणारा एकतरी ‘पम्या’ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. गायब झालेला पम्या अचानक भेटला आणि लगेच पळून गेला. प्रश्न पैशाचा नव्हता तर मैत्रीचा, विश्वासाचा होता. तोंड लपवण्यापेक्षा पैसे देऊ शकत नाही स्पष्ट सांगितलं असतं तरी चाललं असतं पण पम्यानं मैत्रीपेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं. वाईट याचचं वाटतं. जवळच्या माणसाकडून फसवलं जाणं फार त्रासदायक असतं. पैसा नाती बदलतो हेच खरं!!
☆ ‘परशुराम : न्यायाचा कठोर पण आवश्यक निनाद’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
परशुराम हे हिंदू परंपरेतील एक अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व आहे—योद्धा आणि ऋषी, क्रोध आणि तपश्चर्या, शक्ती आणि ज्ञान यांचा अद्वितीय संगम. भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणून त्यांची भूमिका धर्माचे रक्षण करणे ही होती.
परशुरामांविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे त्यांचा “क्षत्रिय संहार”.
हा सर्व क्षत्रियांवर केलेला आंधळा हल्ला नव्हता, तर अन्यायी आणि धर्मभ्रष्ट सत्ताधाऱ्यांविरुद्धचा कठोर हस्तक्षेप होता. त्यांचा क्रोध हा वैयक्तिक सूड नसून, सामाजिक संतुलन पुनर्स्थापित करण्याचे साधन होता.
श्रीरामासोबतचा त्यांचा प्रसंग हा अहंकाराचा संघर्ष नसून, एका युगातून दुसऱ्या युगात होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. तसेच, कर्णाला दिलेला शाप हा सत्य आणि अनुशासन यांवरील त्यांच्या अढळ भूमिकेचे द्योतक आहे—जरी तो आधुनिक दृष्टिकोनातून कठोर वाटला तरी.
परशुराम हे केवळ योद्धे नव्हते; ते भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचे गुरु होते. त्यांनी युद्धकलेसोबतच नैतिकता, कर्तव्य आणि संयम यांचेही शिक्षण दिले. प्रचंड शक्ती असूनही त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला—हीच त्यांची खरी महानता.
त्यांची प्रतिमा केवळ “क्रोधी योद्धा” अशी पाहणे अपूर्ण आहे. ते धर्मसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कठोर निर्णयांचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो—
खरी शक्ती ही केवळ सामर्थ्यात नसून, ती शहाणपण, अनुशासन आणि न्याय यांच्या संतुलनात असते.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३७ – –
सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|
अर्थ :चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
(मार्तंड – सूर्य, निशाण – एक रणवाद्य/डंका, घाव – त्या वाद्यावरील प्रहार)
विवेचन :भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.
चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.
या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.
श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.
ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे. भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.
स्वसंवाद :
१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?
२) “जीवाचे शिवाशी मिलन” हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?
३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ?
– – – –
श्लोक क्र. ३८ – –
मना प्रार्थना तुजला एक आहे|
रघुराज थक्कित होऊनि पाहे |
अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|
अर्थ :या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा (म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे). मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.
(थक्कित – आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी – या बाबतीत)
विवेचन :आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.
ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.
तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.
शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.
स्वसंवाद :
१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?
२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?
३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः