मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७३  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

माणूस

एक गोष्ट निश्चित, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की प्रपंचात रमणारी माझ्यासारखी आणि माझ्यासारखीच अनेक, कितीही म्हणोत की, ” आयुष्यात जे जे करायचं ते ते सर्व अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्य बुद्धीने पार पाडलंय. आता निवांत निवृत्ती अनुभवावी. ”पण खरंच असं होतं का?

दोन्ही मुलींचे विवाह पार पाडल्यानंतर काहीसे असेच आम्हालाही वाटले होतेच पण थोड्याच दिवसांनी हेही लक्षात आले की तसे नसते. फक्त वाट बदलते, वळण बदलते. पुढच्या बदललेल्या वळणावरही निरनिराळ्या प्रकारची जीवनातली गुंतवणूक ही नाही सुटत पण तरीही “आता आपापले छंद, आवडीनिवडी जोपासायच्या, जमेल तितका प्रवास करायचा, देश विदेशातल्या आयकॉन ठिकाणांना भेटी द्यायच्या” हे मात्र आम्ही ठरवले.

आम्हाला दोघांनाही तशी प्रवासाची खूप आवड पण आयुष्याचा एक मोठा काळ मुलांचे संगोपन, शिक्षण, आर्थिक सुबत्तेसाठीची धावपळ, नातीगोती, रीती परंपरा, घरातल्या वृद्धांची काळजी यात अडकून पडलेला असतो. तरीही दरवर्षी आम्ही चौघं कधी मित्र-मैत्रिणींबरोबर कधी बहिणींच्या परिवाराबरोबर छोट्या-मोठ्या सहली, प्रवास करतच होतो आणि प्रत्येक वेळी प्रवासात आलेल्या अनुभवांच्या आठवणींनी नकळत समृद्ध होत असू. त्याचत्याच चक्रातून बाहेर पडून काही दिवसांसाठी तरी जगलेलं वेगळं जीवन मनाला दर वेळेस एक वेगळे चैतन्य, उभारी देते हे नक्कीच.

“केल्याने देशाटन मनुजा येई शहाणपण”

अशा घोकून पाठ केलेल्या सुभाषितांच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की रिक्रीएशन किंवा बदल नेहमीच मनाला ताजेतवाने करतात म्हणून जशी जमेल तशी यथाशक्ती भ्रमंती प्रत्येकाने जरूर करावी.

खरं म्हणजे प्रवास ही एक संस्कृती आहे. लहानपणी जर आम्हाला कोणी या वाटेवर चालायला शिकवलं असेल ते वडिलांनी आणि आजोबांनी. जवळजवळ प्रत्येक सुट्टीत आजोबा आम्हाला आणि माझ्या मावशीच्या परिवाराला घेऊन दूरच्या प्रवासाचे बेत आखत आणि अत्यंत उत्तमरीत्या ते पारही पडत. जवळजवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आमचा आजोबांमुळे घडला आणि त्या अनुषंगाने पर्यटनाची आवड आणि गरजही आयुष्यात निर्माण झाली. नकळतच या बालपणी केलेल्या प्रवासाने वेगळेच भौगोलिक, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक संस्कार आमच्या बालमनावर झाले. काही काही प्रसंग अजूनही स्मरणातून गेलेले नाहीत. एक छोटासा पण तरीही माणूसपणाचं दर्शन घडवणारा एक प्रसंग सांगते.

आम्ही गोव्याहून परतत होतो. त्यावेळी आंबोलीच्या घाटात आमची बस नादुरुस्त झाली. (त्यावेळी आता सारखे वेगवेगळे महामार्ग, दुपदरी चौपदरी रस्ते नव्हते) किर्र काळोख, गर्द झाडी, भयाण सामसूम, एकाकी रस्ता! मुख्य म्हणजे सहलीतील सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. जवळ खायलाही काहीच उरले नव्हते. पुढच्या टप्प्यावर एका ठिकाणी रात्रीचे जेवण घेण्याचा बेत ठरलेला होता पण तोही बस फेल झाल्यामुळे लांबला होता. आम्ही सारे हताशपणे, भुकेले बसच्या बाहेर येऊन त्या जंगलाने वेढलेल्या रस्त्यावर उभे होतो. तेवढ्यात कुठूनतरी दोन माणसं आमच्याजवळ आली. त्यांच्या हातात काठ्या आणि अंगावर फक्त देह झाकण्यापुरतीच वस्त्रं होती. गरीब, आदिवासी, जंगलात राहणारी ही लोकं आम्हाला म्हणाली, ” इथं जवळच आमची वस्ती हाय. चला तुमी पावनं. तुमच्या खाण्यापिण्याची बेस सोय करतालो. ”

ते भराभरर चालत गेले त्यांच्यापाठी काट्याकुट्यातून आम्हीही. त्यांनी घरात आवरावर करून निवांत बसलेल्या त्यांच्या बायकांना आमच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले आणि काय आश्चर्य त्या बायकांनी बघता बघता आम्हा पंधरा-सोळा जणांसाठी इतकं आनंदाने रांधलं आणि वाढलं! “हुलग्याची आमटी आणि तांदळाची भाकरी. ” आमटी चांगलीच झणझणीत होती. खाताना सारेच घामाघूम झाले होते. पांढऱ्या शुभ्र मऊसूत भाकऱ्यांची चवही खरपूस न्यारीच होती. आजही त्या जेवणाची चव माझ्या जिभेवर आहे आणि त्याहीपेक्षा त्यांचा प्रेमळ पाहूणचार आणि आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो. यांना का गरीब म्हणायचं?  हाच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात उमटला होता. ना नात्याचे ना गोत्याचे. पोटातल्या भुकेने जोडले गेलो होतो इतकेच. आम्ही देऊ केलेले पैसे त्यांनी घेतले की नाही ते मला आठवत नाही पण खरं म्हणजे आम्हीच कर्म दरिद्री म्हणून त्यांच्या अर्जवीपणाचा, प्रेमाचा आणि कष्टाचा हिशोब मात्र मांडला. असो!

प्रवास बालपणीचे, लग्नाआधी मित्र मैत्रिणींबरोबरचे, शाळा कॉलेजातल्या सहली आणि नंतरच्या आयुष्यात नवरा, मुलींबरोबर आणि आम्ही दोघांनीच नामांकित ट्रॅव्हल कंपनीं बरोबर केलेले अनेक प्रवास म्हणजे अनुभवांची, आनंदाची मनोरंजक भलीमोठी शिदोरीच म्हणावी लागेल.

अजंठा वेरूळच्या लेणी आणि तिथल्या पेंटिंग पासून ते पॅरिसच्या लुओरे (louvre)म्युझियम मधल्या कलाकृती पर्यंतचे सर्वच प्रवास अनोखे आणि आनंददायी होतेच पण तुमच्या कानात हळूच एक सांगते, ” प्रचंड तंगडतोड करत पॅरिसच्या जगद्विख्यात म्युझियम मधले जगभरात गाजलेले, खूप बंदोबस्तात ठेवलेले “मोनालिसाचे” पेंटिंग आम्ही पाहिले आणि मला अजंठाच्या दगडात कोरलेल्या पद्मपाणीच्या अलौकिक सुंदर लयबद्ध, भावपूर्ण आणि चिंतनयुक्त पेंटिंगची आठवण झाली आणि मी खरोखरच सहजपणे उद्गारले “कुठे ते आणि कुठे हे? ”

“मोनालीसा” पेंटिंग वरचे अनेक कलाकारांचे. ” ते का आणि कसे छान आहे” हे सांगणारे अनेक लेख मी वाचले आहेत त्यांचा सन्मान ठेवून मी माझे हे मत व्यक्त केले. बाकी म्युझियम मधल्या अनेक इतर कलाकृती बघतानाना मात्र खरोखरच आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.

अशाच प्रकारचे आणखीही अनेक अनुभव मला माझ्या परदेश सफारीत आले. अमेरिकेत कुठेही कॅस्केड (छोटा धबधबा) पाह्यला आलेले अनेक टुरिस्ट्स मी अशा पर्यटन स्थळी पाहिलेत. आम्हीही त्यात असायचो. भव्य, सुंदर, आखीव रेखीव आणि अत्यंत स्वच्छ, देखणा पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेला परिसर. खूप पायपीट करून कॅस्केड पर्यंत पोहोचल्यानंतर कुठल्यातरी डोंगरातून एखादी बारीकशी पाण्याची धार वाहत असताना पाहिली की मनात “फूस्स” व्हायचं. वाटायचं त्यापेक्षा पावसाळ्यात आमच्या लोणावळा खंडाळ्याला सह्याद्रीतून वाहणारे झरे-धबधबे पाहायला या की! पण परदेशात फिरताना सतत जाणवतं ते पर्यटनाचे राष्ट्रीय महत्त्व आणि त्यासाठी प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा (यात प्रामुख्याने स्वच्छतागृहे)आणि शिस्तबद्ध प्रवासीही. एकेका स्थळाचं जपलेलं सौंदर्य आणि महत्त्व मग तो *नायगारा* असो किंवा असाच एखादा छोटासा झरा- कॅसकेड! नैसर्गिक सौंदर्याची अपार जपणूक हा गुण तिथे विशेषत्त्वाने जाणवतो. आपल्याकडे स्थळांपेक्षा भेळपुरीचे कागद, खाल्लेले बुट्टे, रिकाम्या बाटल्या, असंख्य कागदांचा देखावा सभोवताली माजलेला पाहायला मिळतो. असो!

असाच आणखी एक मनाला छेदून जाणारा प्रसंग.

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातली ती सुरेख कोरीव कामशिल्पं पाहताना आम्ही सारेच अंतर्मुख झालो होतो. शिवपार्वतीच्या अनेक नृत्यांतून, पदन्यासातून, स्थिती आणि लयबद्ध आसनांतून साकार झालेली ती शृंगारिक लेणी आणि त्यातून झिरपणारं पावित्र्य, मांगल्याचं कामसूत्र न्याहाळताना मन अगदी हरखून गेलं होतं. डोळ्यात मावत नव्हतं असं ते सौंदर्य आणि ती कला किमया तृप्त मनाने नजरेत साठवून आम्ही पचमढीला जाण्यासाठी इटारसी स्टेशनवर आलो. गाडी यायला थोडा अवकाश होता. खजुराहो मंदिराला भेट दिल्यानंतर आता अनुभवत असलेला हा स्टेशनवरचा परिसर अत्यंत बकाल आणि दरिद्री होता आणि त्यातच कुठून तरी अचानक एक वेडगळ! बडबड करणारी, मातकट, केस पिंजरलेली पण संपूर्ण नग्न स्त्री भीक मागत स्टेशनवरच्या त्या गर्दीत केविलवाणी पण तरीही काहीशी बेफिकीर आणि बेशरमपणे फिरताना आम्ही पाहिली आणि मन इतकं कळवळलं! खरं म्हणजे एकच नग्नता! दगडात कोरलेली ती सुंदर, पवित्र भासणारी निर्जीव नग्नता आणि ही साक्षात समोर येऊन ठाकलेली बकाल, ओंगळ पण सजीव करूण, हतबल नग्नता. नाही विसरू शकत भ्रमंतीतले हे दृष्य कधीही.

आमची पहिली परदेश सफर म्हणजे १९९६ सालची लंडनची टूर. त्यावेळी ज्योतिका लंडनला होती. एमबीटी कंपनीतर्फे तिची तिथे नेमणूक झाली होती आणि तिथे ती शेअरिंग मध्ये एका सुंदर बंगल्यात राहत होती. मी विलास आणि मयुरा आम्ही ज्योतिकाला भेटण्याच्या निमित्ताने लंडनला गेलो होतो. दीड दोन महिने आम्ही लंडनला राहिलो आणि अर्थातच त्या संपूर्ण वास्तव्यात आम्ही लंडन ब्रिज फॉलींग, पासून ते आपल्या कोहिनूर हिऱ्यापर्यंत, तिथले हिरवेगार पार्क्स, तलावात पोहणारी मुक्त बदकं, तिथले कॅसल्स, मादाम तुसाड(जिथे अनेक जगप्रसिद्ध लोकांचे मेणाचे पुतळेआहेत) तिथल्या बिन गर्दीच्या आरामशीर लोकल ट्रेन्स, गुलाबी थंडी, भुरभुरणारा पाऊस, धुकं आणि मुख्य म्हणजे शिस्त आणि स्वच्छता अगदी भरपूर अनुभवली. अगदी भारावून जाऊन अनुभवली पण याही सहलीतला एक क्षण मात्र माझ्या मनात अजूनही ताजा आहे. वेगळ्या कारणाकरिता.

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवलं आणि मनात आलं आज आपण राणीच्या देशात आलोय. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्या ब्रिटिशांच्या भूमीत आज आपण आहोत. अतिशय विलक्षण क्षण होता तो! संमिश्र भावनांचा. आम्ही आमचं इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगेजसह बाहेर आलो आणि ज्योतिकाने दूरूनच धावत येऊन विमानतळावर आम्हाला इतकी घट्ट मिठी मारली की आम्हा सर्वांचे डोळे त्यावेळी ‘वियोगानंतरची भेट” म्हणून पाणावलेले पाहून एक ब्रिटिश सहप्रवासी आमच्या शेजारीच हातातल्या बॅगा खाली ठेवून क्षणभर स्तब्ध उभा राहिला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाला “व्हॉट अ ब्यूटीफुल फॅमिली यु आर! ”

सर्वसाधारणपणे ही ब्रिटिश माणसं खूप शिष्ट असतात. उगीच कुणाशी बोलतही नाहीत या पार्श्वभूमीवर मात्र जाणवलं की, “जगात तुम्ही कुठेही जा माणूस हा मूलभूत कुटुंबवत्सल असतो” आणि हे मी माझ्या अनेक देश विदेशी केलेल्या सफरीत नेहमीच अनुभवत आले आहे.

मी किती फिरले, किती देश पाहिले आणि त्या त्या ठिकाणच्या सुंदर पर्यटन स्थळांबद्दलची वर्णने येथे करत बसण्यात मला अजिबात रस नाही(आजकाल विविध टूर कंपन्यांमुळे अथवा इतर कारणांमुळे बहुसंख्य लोक प्रवास करत असतात) पण विविध देश, विविध ठिकाणं पाहताना तिथली सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, वैचारिक, कला गुणसंपन्न जीवनपद्धती अनुभवताना मला अगदी सातत्याने एकच जाणवत राहतं की विविध पेहरावांच्या, विविध चेहऱ्यांच्या आतला माणूस मात्र अगदी एकच आहे. काळ्या गोऱ्या मागे अदृश्यपणे वाहत असलेल्या भावनिक झऱ्यांमध्ये मात्र कमालीचे साम्य आहे, एकच ”ग्लोबल सेन्सिटीव्हीटी” जागतिक संवेदनशीलता.

म्हणूनच आपल्या बहिणाबाईने माणसाला मारलेली ती आर्त हाक पृथ्वीच्या कणाकणात सामावलेली आहे असेच वाटते.

– क्रमशः भाग ७३.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग -२ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग – २ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भारत माता : एक राष्ट्रीय दैवत संकल्पना, उगम आणि विकास 

(— या चित्रणामुळे स्वातंत्र्यसैनिकांमध्ये एक प्रकारची धार्मिक जिद्द निर्माण झाली. देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणे हे केवळ राजकीय कर्तव्य नसून ते एक धार्मिक पवित्र कार्य आहे, अशी भावना जनमानसात रुजली.) 

इथून पुढे – – 

अबनिंद्रनाथ टागोर

भारत मातेचे दृश्य स्वरूप साहित्य आणि भाषणांमधून निर्माण झालेली भारत मातेची प्रतिमा प्रत्यक्षात चित्राच्या रूपात मांडण्याचे काम १९०५ मध्ये अबनिंद्रनाथ टागोर यांनी केले. बंगालच्या फाळणीविरुद्ध सुरू असलेल्या स्वदेशी चळवळीच्या काळात त्यांनी हे चित्र रेखाटले.

चित्रातील प्रतिकात्मकता – – 

अबनिंद्रनाथांनी रेखाटलेली भारत माता ही एक चतुर्भुज तपस्विनी आहे, जिने भगवी वस्त्रे परिधान केली आहेत. तिच्या चार हातांमध्ये चार महत्त्वाच्या वस्तू आहेत, ज्या भारताच्या संस्कृतीचे आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात:

 * वेद (हस्तलिखित): हे शिक्षणाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

 * तांदळाची लोंबी (धान्य): ही देशाच्या अन्नाचे आणि सुजलाम-सुफलाम भूमीचे प्रतीक आहे.

 * जपमाळ: ही भारताच्या आध्यात्मिक वारशाचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे.

 * पांढरे वस्त्र: हे देशातील कापूस उत्पादन आणि आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक आहे.

– – भगिनी निवेदिता यांनी या चित्राचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या मते, हे चित्र राष्ट्रवादाला मानवी रूप देण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न होता. भारत माता ही केवळ जमिनीचा तुकडा नसून ती आपल्या मुलांना ‘शिक्षा, दीक्षा, अन्न आणि वस्त्र’ देणारी एक साक्षात देवता आहे, हे या चित्रातून स्पष्ट झाले.

भारत मातेची मंदिरे : राष्ट्रभक्तीचे तीर्थस्थान

भारत मातेची संकल्पना केवळ चित्रात किंवा साहित्यात मर्यादित राहिली नाही, तर तिला प्रत्यक्ष मंदिरांचे स्वरूप देऊन एक सार्वजनिक धार्मिक श्रद्धास्थान बनवण्यात आले.

वाराणसीचे भारत माता मंदिर (१९३६)

भारतातील पहिले ‘भारत माता मंदिर’ वाराणसी येथे महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आले. शिवप्रसाद गुप्ता यांनी हे मंदिर बांधले आणि १९३६ मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही देवाची मूर्ती नसून जमिनीवर संगमरवरात कोरलेला भारताचा अखंड नकाशा आहे.

– – गांधीजींनी उद्घाटनावेळी म्हटले की, “हे मंदिर सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांसाठी एका वैश्विक व्यासपीठाप्रमाणे काम करेल आणि देशात धार्मिक एकता, शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी मदत करेल”. या मंदिरात मैथिलीशरण गुप्त यांची कविता भिंतीवर कोरलेली आहे, जी सर्व भारतीयांना एकतेचा संदेश देते.

हरिद्वारचे भारत माता मंदिर (१९८३)

स्वामी सत्यमित्रानंद यांनी हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी ८ मजली भारत माता मंदिर उभारले. १९८३ मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या मंदिराचा प्रत्येक मजला वेगळ्या विषयाला समर्पित आहे:

 * पहिला मजला: भारत मातेची भव्य मूर्ती.

 * दुसरा मजला (शूर मंदिर): झाशीची राणी, भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा.

 * तिसरा मजला (मातृ मंदिर): अहिल्याबाई होळकर, मीराबाई यांसारख्या महान महिलांच्या प्रतिमा.

 * चौथा मजला (संत मंदिर): भारताच्या महान संतांच्या प्रतिमा.

– – | भारत माता मंदिर | वाराणसी | १९३६ | महात्मा गांधी (उद्घाटक) | संगमरवरी नकाशा, मूर्ती नाही. |

– – | भारत माता मंदिर | हरिद्वार | १९८३ | इंदिरा गांधी (उद्घाटक) | ८ मजली भव्य इमारत, संतांचे आणि शूरवीरांचे दर्शन. |

– – | जातीय शक्तिपीठ | कोलकाता | २०१५ | केशरी नाथ त्रिपाठी | जगत्तारिणी दुर्गेच्या रूपात भारत मातेची पूजा. |

भगिनी निवेदिता आणि राष्ट्रप्रेमाचा मंत्र

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी भारत मातेच्या संकल्पनेला प्रचंड गती दिली. त्या स्वतः जपमाळेवर ‘भारतवर्ष’ या मंत्राचा जप करत असत. त्यांच्या मते, भारतीयांनी दररोज संध्याकाळी ‘आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला कोणीही विभागू शकत नाही’ असा विचार करणे हीच खरी देशपूजा आहे. निवेदिता यांनी अबनिंद्रनाथ टागोरांच्या भारत मातेच्या चित्राचा प्रसार केला आणि भारतीयांच्या मनात आपल्या देशाबद्दल एक प्रकारची ‘भक्ती’ निर्माण केली. “देशासाठी जगणे आणि स्वतःला भारत मातेच्या चरणी अर्पण करणे” हाच त्यांच्या जीवनाचा संदेश होता.

भारत माता की जय : वाद आणि संवाद

‘भारत माता की जय’ ही घोषणा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि आजही अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, अलीकडच्या काळात यावरून काही राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाले आहेत. काही समुदायांचे म्हणणे आहे की, त्यांच्या धर्मात ईश्वराव्यतिरिक्त इतर कोणत्याही मानवी रूपाची किंवा प्रतिमेची पूजा करण्यास मनाई आहे.

तथापि, अनेक विचारवंतांच्या मते ‘भारत माता’ हे केवळ धार्मिक प्रतीक नसून ते एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या जन्मदात्री मातेला मान देतो, त्याचप्रमाणे ज्या भूमीवर आपण लहानाचे मोठे झालो, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ‘भारत माता की जय’ म्हणणे होय. भारतीय सैन्यात देखील या घोषणेचा वापर शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून केला जातो.

विनायक दामोदर सावरकर आणि भारत माता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील भारत मातेच्या संकल्पनेला अत्यंत प्रखर राष्ट्रवादाची जोड दिली. सावरकरांच्या मते, ही भूमी केवळ आपली पितृभूमी (वडिलोपार्जित जमीन) नसून ती आपली पुण्यभूमी (पवित्र जमीन) देखील आहे. त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून आणि भाषणांमधून भारत मातेला दैवताचे स्थान देऊन तिच्या मुक्तीसाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन तरुणांना केले. सावरकरांच्या राष्ट्रवादात भारत माता ही एक जिंतंत, चैतन्यमयी शक्ती होती, जिच्या संरक्षणासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्गही समर्थनीय होता.

एक शाश्वत प्रेरणा – – 

“भारत माता हेच दैवत” असे पहिल्यांदा किरण चंद्र बॅनर्जी यांनी आपल्या नाटकाद्वारे मांडले असले, तरी या विचाराला जनचळवळीचे आणि आध्यात्मिक क्रांतीचे रूप स्वामी विवेकानंदांनी दिले. १८७३ पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तितकाच जिवंत आहे. भारत माता ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नसून, ती कोट्यवधी भारतीयांच्या अस्मितेचे, श्रद्धेचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

– – विवेकानंदांनी सांगितलेली ती ‘पन्नास वर्षे’ संपून आता काळ पुढे निघून गेला असला, तरी आजही भारतापुढील आव्हाने पाहता त्यांच्या विचारांची गरज संपलेली नाही. “स्वदेशासाठी सेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा मंत्र जोपर्यंत भारतीयांच्या मनात जिवंत आहे, तोपर्यंत भारत माता हे दैवत भारतीयांना प्रगतीच्या आणि एकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करत राहील.

 समाप्त –

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन धजावत नव्हतं…

ऑक्सिजन ८२… ८०…  मॉनिटरचा तो लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज!

NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजांची सवय असते, पण कालची रात्र वेगळी होती.

 

२२ दिवसांचं बाळ. फुफ्फुसात संसर्ग (Sepsis). श्वासासाठी आम्ही त्याला बबल CPAP (कृत्रिम श्वास) मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक्स, सलाईन, नेब्युलायझर… सगळं सुरू होतं… पण बाळ मशीनला रिस्पॉन्सदेत नव्हतं. ते चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. ते जेवढं रडायचं, तेवढं ऑक्सिजन लेव्हल खाली पडायचं.

 

माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं,

बाळ खूप रेस्टलेसआहे. सिडेटिव्ह (झोपेचं इंजेक्शन) द्यायचं का? “

इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. अशा औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न (Respiratory Drive) मंदावण्याची भीती होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं, त्यात जर श्वास आणखी मंदावला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

 

ती रिस्क घ्यायला माझं मन धजावत नव्हतं.

मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती. डोळे सुजलेले, जीव कासावीस.

मी टीमला म्हणालो, “इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. “

तिला आम्ही पूर्ण गाउन-मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हाताने त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा, सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला…

बाळा… “

– – पुढच्या ३० सेकंदात जे झालं, ते बघून आम्ही डॉक्टर्स असूनही अवाक झालो.

 

जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईचा स्पर्श होताच एकदम शांत झालं.

त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली.

श्वास लयीत आला.

– – आणि मॉनिटर?

जे ऑक्सिजन ८० वर अडकलं होतं, ते बघता बघता ८८… ९२… ९५… ९८% वर गेलं!

हे कुठलंही मॅजिकनव्हतं. हे सायन्स होतं.

.. आईच्या स्पर्शाने बाळाच्या शरीरात ऑक्सिटोसिन‘ (Love Hormone) तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन-किलर आणि स्ट्रेस-बस्टर आहे.

– – जेव्हा बाळ रिलॅक्स होतं, तेव्हा आमची औषधं सुद्धा १००% काम करतात.

 

बाळ आता धोक्याबाहेर आहे.

जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो,

ताई, आभार आमचे नका मानू. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला बरंतुमच्या स्पर्शाने केलंय. “

– – कधीकधी स्टेथस्कोप ला जिंकायला ‘आईच्या स्पर्शाची’ही साथ लागते.

* * * *

लेखक : डॉ. सुजित भरत पाटील

बालरोगतज्ज्ञ, पुणे

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क्ष…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क्ष…” – भाग – ३ ☆ श्री कौस्तुभ परांजपे

क्ष…  481

अक्षर ओळख करतांना अगदी क्ष किरणासारखा शिरलेला हा क्ष तंबूत शिरलेल्या उंटासारखा ठाण मांडून बसला आहे. अनेक शब्दात तो येतो.

सुरुवातीला सुटे, दशक…… लक्ष, दशलक्ष यापासून अंकात आला, मग क्ष ची किंमत काढा अस म्हणत गणितात शिरला. लक्ष देण्यावरून मनात बिंबला. पुढे पुढे तर भाषा बदलत एक्स आणि वाय अक्ष असा क्ष आणि य करत आलेखाच्या कागदावर पण अवतरला. आणि इथेच आमचा वाढत जाईल अस वाटणारा आलेख क्ष आणि य या दोन्ही अक्षावर क्षय ग्रस्त झाला. य अक्षावर तो वाढला नाही. क्ष अक्षावर तो पसरलाच नाही.

गणितात या क्ष ची किंमत शोधावी लागली. तर मित्रांमधे बरीचशी गुपितं सांगणारी व्यक्ती ही क्ष च असायची. क्ष व्यक्तीने सांगितल असं म्हणत त्या व्यक्तीच नांव गुप्त ठेवलं जायचं.

क्षमा या शब्दात तो नम्रता आणि मोठेपणा घेऊन आला, तर क्षोभ या शब्दात जहालपणा शिकवून गेला. क्षय या शब्दात अस्ताकडे जाणारा वाटला, तर क्षीण मधे तो कमजोर झाला. क्षेमकुशल विचारतांना प्रेमासोबत भावनांसह वावरला. तर क्षमता सिध्द करतांना सगळ्या गोष्टींवर मात करण्याची हिंमत देणारा ठरला.

तो साक्षरात आहे, निरक्षरातही आहे. क्षणात आहे, लक्षणात आहे. विलक्षणातही आहे. लक्ष आणी लक्ष्य यात आहे, पण सगळीकडे अर्थ वेगळा आहे. तो एकटा आला तसाच जोडाक्षरात पण आला. तीक्ष्ण मधला टोकदार वाटला, सुक्ष्म मधला शोधावा लागला.

तो पक्षात जाणवला, भक्षात गिळंकृत करून गेला. कधी कधी तो लक्षात आला नाही. आणि भक्तीत साक्षात दिसलाच नाही. संस्कृत मधे क्षीर या पदार्थाच्या नावाने आला, तर पदार्थ विज्ञानात क्षार नावाने मिसळला. क्षेत्रीय आणि क्षत्रिय यातही आला. वृक्षात सावली धरली, रुक्षात निरस वाटला, क्षितीजात विस्तीर्ण जाणवला.

अशा पध्दतीने क्ष हा अक्षर ओळखीपासून ओळखापाहू या वेगवेगळ्या सदरात वेगवेगळ्या पध्दतीने येतच राहिला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कराचीची ट्रंक!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ ती कराचीची ट्रंक!!! डॉ. माधुरी जोशी 

पेपरमधे रावळपिंडीला आपलं घर पहायला जाणाऱ्या आजींची बातमी वाचली. १५ वर्षाच्या असतांना फाळणीत त्या भारतात आल्या. आता ७५ वर्षं झाली…. नव्वदीच्या झाल्या त्या…. पण ते जुनं घर, मित्रमैत्रिणी, गल्ल्या, रस्ते, घरं, कॉलेज सगळं पहावसं वाटलं परत….. आणि परवानगी घेऊन त्या गेल्या गतकाळातल्या स्म्रुती जागवायला……

.. क्षणात मला ४७ च्या फाळणीत नेसत्या वस्त्रानिशी, जीव मुठीत धरून, कसेबसे हिंदुस्थानात पोहोचलेले माझे सासूसासरे आठवले. तेंव्हा त्यांच्या डोळ्यापुढे सगळा अंधार…. कुठे जायचं? कुठे रहायचं? हातात कामंच नसेल तर कसं जगायचं? खरंच… केवढी भयाण पोकळी ही…. अनपेक्षित…. भयप्रद… जरी नातेवाईक असले तरी काही काळासाठी… कायम कसं चालेल भार टाकून!! आणि हिंदुस्थानात पण ऑलवेल नव्हतंच ना.. सगळं अस्वस्थ, कासावीस, अस्थिर, उधळलेलं….. स्थिरं व्हायला काळ लागणारंच होता.

एकीकडे बोटीनं काही सामान आलं. होतं. ज्यात काही भांडीकुंडी, एक लोखंडी ट्रंक असं काहीबाही होतं. एक सुखवस्तू जीवन, शिक्षकी पेशाच्या उत्तम नोकऱ्या, रहायला बऱ्यापैकी घर, घरात सोयीचं सारं सामान, आसपास ओळखीची घरं….. अशा सगळ्या कराचीतल्या सम्रुद्ध वातावरणातून आता जिवंत तरी पोहोचू की नाही आणि पोहोचलो तरी जगायचं कसं असे भयाण प्रश्न अचानक आ वासून उभे राहिले. जरी नातेवाईक असले तरी किती काळ? आपलं आपण उभं रहायलाच हवं…. पण कसं? कधी? कुठे??? सारी प्रश्नचिन्हंच प्रश्नचिन्हं….

सासुबाई मूळच्या धारवाडच्या. त्या काळातल्या ग्रँज्युएट.. संस्क्रुत वर प्रभुत्व असणाऱ्या…. ते घरंच सुशिक्षितांचं…. घरात वकील, डॉक्टर्स असे वडीलधारे… स्वतःचं मोठसं घर…. घरात राहणारी चुलत, मामे, मावस, आते भावंडं….. घराघरात अशी प्रथाच होती एकत्र जगण्याची…. एक सुशिक्षित, सुखरूप, सुखवस्तू, सम्रुद्ध जगणं होतं त्यांचं….

धारवाड फुलांचं, रसरशीत मातीचं, सुंदर हवामानाचं शांत गाव असं म्हणत त्या….. घरापासून कॉलेजपर्यंत जातांना येणारा मोगरीचा गंध, तिची टपोऱ्या मोत्यांसारखी फुलं, अबोलीनं बहरलेली सदैव टवटवीत शेंदरट अबोली घोसांची अगणित झुडपं, लाल पाठीच्या कुंदाच्या चांदण वेली, शेवंतीवर डोलणारे गुच्छांचे ताटवे…. लाल मातीवर केशरी, पिवळी, पांढरी, पखरण आणि सुगंध पण जपणारी रंगपंचमी…. आणि शांत, चढ उताऱ्याच्या रस्त्यांवरून बहिणी, मैत्रिणींबरोबर रोजचं चालंत जाणंयेणं….. असं सुंदर धारवाड…. त्यांना पाकिस्तानात कराचीला शिक्षकाची नोकरी करणाऱ्या सासऱ्यांचं स्थळ आलं. ते गणिताचे स्कॉलर, विद्यार्थी प्रिय शिक्षक, दिसायला चांगले… नीटस… कसल्या जबाबदाऱ्या नसणारे… तरी पण घालमेल झालीच.. ।एकदम पाकिस्तान? काय करायचं? पण तो बंध नियतीनंच बांधलेला होता… लग्न झालं आणि त्या कराचीला म्हणजे चक्क फॉरेनलाच गेल्या की….. शिक्षणामुळे त्यांनाही नोकरी मिळाली आणि एक छान, सुखाचा, सुरक्षित संसार सुरू झाला.

कराची पण भावलं त्यांना. सम्रुद्ध, संपन्न कराची…. शांत, समजूतदार शहर…. त्या सांगत आपल्याकडे भाजीची गाडी येते तशी ड्रायफ्रूट येत ढिगानी विकायला…. शेंगदाण्यासारखे पिस्ते बदाम आक्रोड खायचो आम्ही…. सुंदर ताज्या भाज्या… रसरशीत सगळं….. माणसं जिवाला जीव देणारी…. शिक्षक म्हणून जरा जास्त मान…. संध्याकाळी शाळेतून आल्यावर जरा फेरफटका मारून यावं तर वाटेवर दमदमीत सुगंधाच्या जुई मोगरीच्या लदलेल्या गाड्या… साऱ्या गल्लीत दरवळ… ।….

असं छान चाललेलं असतांना अचानक वादळ उठलं सुसाट… भयाण विचारांचे वारे.. ।।आपण सुरक्षित नाही अशा चर्चा.. त्या भितीदायक भावनेन ंशाश्वतीच उरली नाही आनंदानं जगण्याची… ।नव्हे!! जगण्याचीच… मग घाबरलेले सगळे भारतीय एकत्र आले… लपूनछपून कुठे कुठे आश्रय घेतले आणि एक दिवस त्या ट्रेननी ना जाणो कोणकोण, कुठून, कसे, कुणाच्या मदतीनं हिंदुस्थानात परत  आले. इथलं जगणंही नव्या लढाईचं होतं. एक मात्र सबळ, भक्कम गोष्ट होती ती म्हणजे दोघांच्या हातातलं शिक्षण… शिक्षकी नोकरीचा अनुभव… कासव गतीनं का होईना हळुहळू गणितं सुटली आणि एका अपमानित, अस्थिर, भयाण वातावरणाला पूर्णविराम मिळाला.

पुण्यात सुरवातीला त्यांच्याकडे ती ट्रंक होती. त्यात त्या वाण्याकडून आणलेल्या सामानाच्या पुड्या ठेवत. तेच कपाट आणि तेवढीच ग्रोसरी…. लागेल तेवढीच आणायची… जपून, पुरवून वापरायची…. ती ट्रंक नव्या संसाराच्या सुरवातीचा आधार… हळुहळूहळू स्थिरावत गेलं. सरकारी नोकऱ्या मिळाल्या. कधी एकत्र कधी वेगळ्या बदल्या झाल्या. महाराष्ट्रभर…. पण आता लढाई जरा वेगळ्या अर्थी सोपी होती…. जगणं आर्थिक, मानसिक सुरक्षित झालं. अक्षरशः शून्यातून त्यांनी पुन्हा संसार उभा केला.

या सगळ्या प्रवासात ही ती ट्रंक, जी सोबत होती. साक्षीदार होती. साधारण सव्वा फूट उंची, रुंदी, खोलीची चौकोनी, लोखंडी, काळी, भक्कम कडीकोयंड्याची… दोन्हीकडे धरायला कड्या आणि चांगलं दीड दोन इंचाचं उंच झाकण असलेली ती ट्रंक मग माझ्या घरात आली. त्यावर ऑईलपेंटनं नाव लिहीलं होतं S. M. Joshi Karachi असं….. मग आमच्या घरातले हातोडी, पाने, स्क्रू ड्रायव्हर, पकड, वायर्स, पिना असं नेहमी न लागणारं पण कामाचं सामान त्यात राहिलं. मग नको असलेली वाट्या भांडी किसणी स्टीलची गाळणी…. मग असंच काहीबाही…. शेवटी काही न ठेवता ट्रंक अडगळीत माळ्यावर गेली. जणू विस्मरणात गेली. जुनी झाली, , गंजली…

अलीकडे रंगकाम आवश्यक झालं माळ्याला ओल आल्यानं… सगळ्या सामानाबरोबर ट्रंक खाली आली. एकदम वाटलं काय करावं हिचं!! १९४७ ते २०२२!! बापरे!! अम्रुत महोत्सव की हिचा. ७५ वर्षांची झाली ही… जरा जास्त गंज धरला होता… झाकण जरा वाकडं झालं होतं… पण बरीचशी होती तशीच होती. भंगारात देण्याचा प्रश्नंच नव्हता. कराचीपासून या क्षणापर्यंत तिनं सोबत केली. केवढा काळ, केवढी स्थि्त्यंतरं, सभोवती कायकाय बदलतांना पाहिलं हिनं…. त्या ट्रेन प्रवासात ती पण भेदरली असेल मालकासारखी? पण तिनं साथ सोडली नाही हे मात्र नक्कीच…..

एकदम मनात आलं हिला चांगली घासूनपुसून लख्खं करावी. सुंदरसा मेटल स्प्रे कलर करावा आणि नव्या रुपात, ऐटीत, समाधानानं, क्रुतज्ञतेनं माळ्यावर नाही तर अगदी बैठकीत सन्मानानं ठेवावं हिला. तिचा गौरव करावा. मग शोध घेतला. पर्याय सापडला आणि ती गंजलेली, S. M. Joshi Karachi नावाची पेटी गेली पुढच्या रुपांतराला…. १०/१२ दिवस झाले. आणि नीतळ, झुळझुळीत, सिल्व्हर कलरची ट्रंक घरी आली. मुलांना या उद्योगातलं काहीच माहिती नव्हतं… पण त्या काळ्या ट्रंकेचा हा सुखद कायापालट भावला सगळ्यांना…. त्यांच्या आजीआजोबांची ती आठवण अधिक सुंदर होऊन अगदी हॉलमधे विराजमान झाली आहे. जणू आम्ही तिचे ऋण मानले. ७५ वर्षांपूर्वी कराचीच्या तिच्या अस्तित्वानंतर आज तिला नवजीवन मिळालं.

आता माझ्या शोभेच्या नाजुक वस्तू, फुलांचे हार, तोरणं, नाजुक पणत्या, यांना छान जागा मिळाल्येय त्या ७५ वर्षांच्या बुजुर्ग ट्रंकेच्या कुशीत!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग – १ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग – १ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भारत माता : एक राष्ट्रीय दैवत संकल्पना, उगम आणि विकास 

भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासात ‘भारत माता’ ही संकल्पना केवळ भौगोलिक सीमांचे वर्णन करणारी संज्ञा नसून, ती एक अत्यंत प्रबळ राजकीय, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती म्हणून उदयाला आली. “भारत माता हेच आमचे दैवत” किंवा “पुढील पन्नास वर्षे केवळ भारत माता हेच आमचे एकमेव दैवत असेल” असे क्रांतिकारी विचार मांडून भारतीय जनमानसात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचे श्रेय प्रामुख्याने स्वामी विवेकानंद यांना जाते. तथापि, या संकल्पनेचा उगम, तिचा साहित्यिक विकास आणि तिला मिळालेले दृश्य स्वरूप यामागे एक मोठा ऐतिहासिक प्रवास आहे.

१८ व्या शतकातील दुष्काळ, १९ व्या शतकातील बंगाली साहित्य आणि २० व्या शतकातील स्वातंत्र्यसंग्राम या सर्व कालखंडांनी मिळून ‘भारत माता’ या दैवताची जडणघडण केली आहे.

संकल्पनेचा ऐतिहासिक आणि साहित्यिक उगम

भारत मातेच्या संकल्पनेचा शोध घेताना आपल्याला १९ व्या शतकातील बंगालकडे वळावे लागते. जरी वैदिक काळात ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः’ (पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे) अशा संकल्पना अस्तित्वात होत्या, तरी आधुनिक राष्ट्र-राज्याच्या संदर्भात ‘भारत माता’ ही संज्ञा प्रथम १८६० च्या दशकात प्रकर्षाने उमटू लागली.

भूदेव मुखोपाध्याय आणि उनाबिमसा पुराण

भारत मातेच्या प्रतिमेची पहिली साहित्यिक पाळेमुळे भूदेव मुखोपाध्याय यांच्या ‘उनाबिमसा पुराण’ (एकोणिसावे पुराण) या उपरोधिक लेखनकृतीत आढळतात. १८६६ मध्ये अनामिकपणे प्रकाशित झालेल्या या ग्रंथात ‘आदि-भारती’ या पात्राचा उल्लेख आहे. ही ‘आदि-भारती’ म्हणजे आर्य स्वामींची विधवा पत्नी असून ती ‘आर्य’ संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक मानली गेली. एका छळलेल्या आणि असहाय्य मातेच्या रूपात भारताचे मानवीकरण करण्याची ही पहिली मोठी पायरी होती. या साहित्याने भारतीयांच्या मनात आपल्या मातृभूमीबद्दल एक भावनिक नाते निर्माण करण्यास सुरुवात केली.

किरण चंद्र बॅनर्जी आणि १८७३ चे भारत मातानाटक

ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी या संकल्पनेला आध्यात्मिक अधिष्ठान दिले, त्याआधी ‘भारत माता’ या नावाचे पहिले नाटक १८७३ मध्ये किरण चंद्र बॅनर्जी यांनी सादर केले होते. या नाटकाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण यात पहिल्यांदाच भारताला ‘माता’ म्हणून संबोधित करून तिला एका दैवताचे रूप देण्यात आले होते. हे नाटक १७७० च्या बंगालमधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बेतलेले होते. या नाटकाच्या कथानकात एक स्त्री आणि तिचा पती दुष्काळामुळे जंगलात आश्रयाला जातात, जिथे त्यांची भेट काही बंडखोरांशी होते. तेथील एक पुजारी या दांपत्याला एका मंदिरात घेऊन जातो आणि तिथे त्यांना ‘भारत माते’चे दर्शन घडवतो. हे दृश्य पाहून ते पती-पत्नी इतके प्रेरित होतात की ते ब्रिटिशांविरुद्धच्या बंडात सामील होतात आणि शेवटी ब्रिटिशांचा पराभव करतात. या नाटकातूनच ‘भारत माता की जय’ ही घोषणा सर्वत्र पसरू लागली. किरण चंद्र बॅनर्जी यांनी मातृभूमीला मंदिरातील एका दैवताच्या रूपात मांडून राष्ट्रवादाला धार्मिक पवित्रता प्राप्त करून दिली.

| १८६६ | उनाबिमसा पुराण | भूदेव मुखोपाध्याय | ‘आदि-भारती’ ही संकल्पना मांडली.

| १८७३ | भारत माता (नाटक) | किरण चंद्र बॅनर्जी | भारताला ‘माता’ म्हणून संबोधिले आणि मंदिरात प्रतिमा मांडली.

| १८८२ | आनंदमठ (कादंबरी) | बंकिम चंद्र चॅटर्जी | ‘वंदे मातरम’ गीताद्वारे देशप्रेमाची लाट निर्माण केली.

| १८९७ | मद्रास व्याख्यान | स्वामी विवेकानंद | पुढील ५० वर्षे भारत माता हेच एकमेव दैवत मानण्याचे आवाहन केले.

| १९०५ | भारत माता (चित्र) | अबनिंद्रनाथ टागोर | भारत मातेचे भगवी वस्त्र परिधान केलेले चतुर्भुज रूप साकारले.

स्वामी विवेकानंद : राष्ट्रवादाचे आध्यात्मिक प्रणेते

स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताच्या राष्ट्रवादाचे मुख्य शिल्पकार मानले जातात. १८९३ च्या शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत भारतीय संस्कृतीचा डंका वाजवल्यानंतर, १८९७ मध्ये जेव्हा ते भारतात परतले, तेव्हा त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने देऊन तरुणांना जागृत केले. मद्रास येथील त्यांच्या भाषणात त्यांनी एक ऐतिहासिक विधान केले, जे आजही भारतीय राष्ट्रवादाचा पाया मानले जाते.

“पुढील पन्नास वर्षे हेच आमचे दैवत”

स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात म्हटले, “पुढील पन्नास वर्षे हीच आमची मुख्य प्रेरणा असेल – ही आमची महान भारत माता. इतर सर्व व्यर्थ देवादिकांना या काळासाठी आपल्या मनातून दूर होऊ द्या. आपल्या सभोवताली पसरलेली आपली जनता, आपला समाज हेच एकमेव दैवत आहे जे सध्या जागे आहे”.

– – या विधानाचा खोलवर अर्थ असा होता की, जोपर्यंत भारत गुलामगिरीत आहे, जोपर्यंत भारतीय जनता दारिद्र्य आणि अज्ञानात बुडालेली आहे, तोपर्यंत केवळ मंदिरातील मूर्तींची पूजा करण्यापेक्षा आपल्या जिवंत देशबांधवांची सेवा करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे. विवेकानंदांनी ‘विराट’ उपासनेचा पुरस्कार केला, ज्याचा अर्थ आपल्या सभोवतालच्या मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्येच ईश्वराचे रूप पाहणे असा होता. त्यांनी तरुणांना सांगितले की, “तुम्ही गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अधिक जवळ जाल, ” कारण त्यांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या कणखर तरुणांची गरज होती, जे देशासाठी बलिदान देऊ शकतील….. योगायोगाने, विवेकानंदांनी १८९७ मध्ये हे ‘पन्नास वर्षांचे’ लक्ष्य दिले होते आणि बरोबर पन्नास वर्षांनी, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या या विचारांनी सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद आणि सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली.

बंकिम चंद्र चॅटर्जी आणि वंदे मातरम

किरण चंद्र बॅनर्जींच्या नाटकानंतर भारत मातेच्या संकल्पनेला सर्वात मोठे वलय प्राप्त करून दिले ते बंकिम चंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या ‘आनंदमठ’ (१८८२) या कादंबरीद्वारे. या कादंबरीत त्यांनी ‘वंदे मातरम’ हे गीत समाविष्ट केले, जे पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महामंत्र बनले.

बंकिम चंद्रांनी देशमातेला दुर्गा आणि काली या देवींच्या रूपात पाहिले. त्यांनी मातेची तीन रूपे मांडली होती:

१. मातृभूमीचे भूतकाळातले रूप: संपत्ती आणि वैभवाने नटलेली माता.

२. मातृभूमीचे वर्तमान रूप: ब्रिटिशांच्या अत्याचाराने विखुरलेली आणि दु:खी झालेली नग्न माता (कालीचे रूप).

३. मातृभूमीचे भविष्यकालीन रूप: दहा हातात दहा शस्त्रे घेऊन शत्रूचा संहार करणारी विजयी माता (दुर्गेचे रूप).

— या चित्रणामुळे स्वातंत्र्यसैनिकांमध्ये एक प्रकारची धार्मिक जिद्द निर्माण झाली. देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणे हे केवळ राजकीय कर्तव्य नसून ते एक धार्मिक पवित्र कार्य आहे, अशी भावना जनमानसात रुजली.

– क्रमशः भाग पहिला 

*******

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

महाभारत युद्ध संपले. योद्ध्यांचे फाटलेले कपडे, मुकुट, तुटलेली शस्त्रे, तुटलेली रथाची चाके, आणि वातावरणात एक खोल दुःख पसरले होते.

त्या उजाड भूमीत, गिधाडे, कुत्रे आणि कोल्हे यांच्या दुःखद आणि भयावह हाकांमध्ये, द्वापरचा महान योद्धा देवव्रत भीष्म, मृत्युशय्येवर झोपलेला होता, सूर्य उगवण्याची वाट पाहत होता. एकटाच… तेव्हा त्याच्या कानावर एक परिचित आवाज आला, “प्रणाम (नमस्कार) आजोबा. “

भीष्मांच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटले. तो म्हणाला, “देवकीच्या पुत्रा, ये… स्वागत आहे! मी खूप दिवसांपासून तुमचा विचार करत आहे. “

कृष्ण म्हणाला, “मी काय बोलू, आजोबा? आता मी विचारूही शकत नाही की तुम्ही कसे आहात. “

भीष्म गप्प राहिले. काही क्षणांनी तो म्हणाला, “केशव, तू तुझ्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक केलास का? त्याची काळजी घे. त्याला आता तुझी सर्वात जास्त गरज आहे, आता या राजवाड्यात, कुटुंबातील वडीलधारी लोक नाहीत. “

कृष्ण गप्प राहिला.

भीष्म पुन्हा म्हणाले, “केशव, मी तुला काही विचारू शकतो का? तू खूप चांगल्या वेळी आला आहेस. कदाचित मी ही पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी माझ्या अनेक शंका दूर होतील. “

कृष्ण म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

मला एक गोष्ट सांगा, प्रभू! तुम्ही देव आहात, नाही का?

कृष्णाने मध्येच सांगितले, “नाही, आजोबा! मी देव नाही. मी तुमचा नातू आहे, आजोबा, देव नाही.”

भीष्म त्याच्या तीव्र वेदनांमध्येही हसले. तो म्हणाला, “कृष्णा, मी माझ्या आयुष्याचे कधीच मूल्यांकन करू शकलो नाही, म्हणून ते चांगले होते की वाईट हे मला माहित नाही. पण आता मी ही पृथ्वी सोडून जात आहे, कन्हैया, कृपया मला फसवणे थांबवा… “

कसे तरी, कृष्ण भीष्मांच्या जवळ गेला, त्याचा हात धरला आणि म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

भीष्म म्हणाला, “मला एक गोष्ट सांग, कन्हैया! या युद्धात जे घडले ते बरोबर होते का? “

“आजोबा, कोणाच्या बाजूने? पांडवांच्या बाजूने? “

“कनहैया, आता कौरवांच्या कृतींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण पांडवांच्या बाजूने जे घडले ते बरोबर होते का? आचार्य द्रोणाचा वध, दुर्योधनाच्या मांडीखाली हल्ला, दुशासनाची छाती कापणे, जयद्रथाची फसवणूक, निःशस्त्र कर्णाचा वध – हे सर्व बरोबर होते का? हे सर्व न्याय्य होते का? “

– आजोबा, मी याचे उत्तर कसे देऊ? ज्यांनी ते केले त्यांनी हे उत्तर द्यावे. दुर्योधनाचा वध करणाऱ्या भीमाला उत्तर देऊ द्या; कर्ण आणि जयद्रथाचा वध करणाऱ्या अर्जुनाला उत्तर देऊ द्या. मी या युद्धात अजिबात नव्हतो, आजोबा! “

“कृष्णा, तू मला फसवणं थांबवणार नाहीस का? जग म्हणेल की अर्जुन आणि भीमाने महाभारत जिंकला, पण मला माहिती आहे, कन्हैया, हा विजय तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे. मी तुला विचारेन, कृष्णा! “

-“तर ऐका, आजोबा! काहीही वाईट घडले नाही, काहीही अनैतिक घडले नाही. जे घडले तेच घडले पाहिजे होते. “

-केशव, तू हे म्हणत आहेस का? सर्वात प्रतिष्ठित पुरुष रामाचा अवतार असलेला कृष्ण हे म्हणत आहे? ही क्रूरता कोणत्याही युगात आपल्या शाश्वत परंपरेचा भाग नव्हती, मग ते कसे न्याय्य आहे? “

-इतिहासातून शिकायला मिळते, आजोबा, पण निर्णय सध्याच्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. प्रत्येक युग स्वतःच्या तर्क आणि गरजांनुसार आपला नेता निवडतो. राम त्रेता युगाचा नायक होता, द्वापर युग माझे भाग्य होते. “आम्हा दोघांचा निर्णय सारखा असू शकत नाही, आजोबा. “

-मला समजले नाही, कृष्णा! कृपया समजावून सांगा…

-राम आणि कृष्णाच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आजोबा! रामाच्या काळात, रावणसारखा खलनायक देखील शिवभक्त होता. रावणसारख्या नकारात्मक शक्तीच्या कुटुंबातही विभीषण आणि कुंभकर्णसारखे संत होते. बालीसारख्या खलनायकाच्या कुटुंबातही तारासारख्या विद्वान स्त्रिया आणि अंगदसारखे उदात्त पुत्र होते. त्या काळात, खलनायकांनाही धर्माचे ज्ञान होते. म्हणूनच रामाने त्यांना कधीही फसवले नाही. पण माझ्या काळात कंस, जरासंध, दुर्योधन, दुशासन, शकुनी आणि जयद्रथ सारखे गंभीर पापी पाहिले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रत्येक फसवणूक न्याय्य आहे, आजोबा. पापाचा अंत करणे आवश्यक आहे, आजोबा, पद्धत काहीही असो.

-तर, तुमच्या या निर्णयांमुळे केशव, चुकीची परंपरा सुरू होणार नाही का? भविष्य तुमच्या फसवणुकीचे अनुसरण करणार नाही का? आणि जर तो असे करेल तर ते योग्य असेल का? “

– भविष्य आणखी नकारात्मक दिसत आहे, आजोबा. कलियुगात, हे देखील पुरेसे नाही. तिथे, मानवांना कृष्णापेक्षाही अधिक निर्दयी व्हावे लागेल, नाहीतर धर्माचा नाश होईल. जेव्हा क्रूर आणि अनैतिक शक्ती धर्म पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकता निरर्थक बनते, आजोबा! मग जे महत्त्वाचे आहे ते विजय आहे, फक्त विजय. भविष्याने हे शिकले पाहिजे, आजोबा. “

-“धर्माचा नाश देखील होऊ शकतो का, केशव? आणि जर धर्माचा नाश होणारच असेल, तर मानव ते थांबवू शकतो का? “

-“सर्वकाही देवाच्या दयेवर सोपवणे मूर्खपणाचे आहे, आजोबा! देव स्वतः काहीही करत नाही; मानवांना सर्व काही करावे लागते. तुम्ही मलाही देव म्हणता! तर मला सांगा, आजोबा, मी या युद्धात वैयक्तिकरित्या काही केले का? सर्व पांडवांना ते करावे लागले, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी मी अर्जुनाला हेच सांगितले होते. हेच अंतिम सत्य आहे. “

भीष्म आता समाधानी दिसत होता. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते. तो म्हणाला, “चला कृष्णा! ही माझी पृथ्वीवरील शेवटची रात्र आहे. ” उद्या मला निघून जावे लागू शकते… तुमच्या या दुर्दैवी भक्तावर दया करा, कृष्ण! ”

कृष्णाने स्वतःशी काहीतरी बडबड केली, भीष्मांना नमस्कार केला आणि मागे वळले. पण युद्धभूमीच्या त्या भयानक अंधारात, भविष्याने जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकला होता.

जेव्हा अनैतिक आणि क्रूर शक्ती धर्माचा नाश करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकतेचा धडा आत्मघातकी असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! ☆ श्री हेमंत तांबे 

तुम्हाला ते मुकेश अंबानींचं “दुनिया मुठ्ठी में” हे वाक्य आठवतं काय? दुनिया मुठीत ठेवून तुम्ही काय मिळवता? आणि खरंच तशी ती तुमच्या मुठीत येते काय?

इतिहास ते आज वर्तमान जर आपण समाजाचं बारीक निरीक्षण केलं तर दिसून येईल की, माणसाचं आयुष्य म्हणजे एक धावण्याची निरंतर स्पर्धा झालंय. प्रत्येकजण काहितरी जिंकण्यासाठी धावतोय. कोणी पैसा धन दौलत मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी सत्ता अधिकार मिळवण्यासाठी धावतोय. कोणी स्वतःचं नाव होण्यासाठी प्रसिद्धी किर्ती मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी धावतोय! तुम्ही एक लाख लोकांना विचारलंत की, “सफलता म्हणजे निश्चित काय? ” तर 99. 99% लोक सांगतील दुसऱ्याच्या पुढं जाणं, दुसऱ्याला हरवणं, दुसऱ्या पेक्षा जास्त काहितरी मिळवणं म्हणजे सफलता! … जर आपण बारकाईनं लक्ष दिलं, नव्हे द्या. तर आपल्याला दिसून येईल की, दुसऱ्याला जिंकण्याच्या नादात किंवा या रॅट रेस मध्ये तुम्ही आतून हरलेले असता, आतून तुम्ही भिकारी झालेले असता. करोडो रुपये तुमच्या कडे असूद्यात, लोकांकडून तुमच्या विजयासाठी टाळ्यांचा कडकडाट होवो, आपल्या मनाला जोपर्यंत आपण जिंकत नाही, तोपर्यंत आपण शांत समाधानी आनंदी नसतो. कारण अंततः तुम्ही एकटेच असता आणि एकट्यालाच तर जगायचं असतं!…

तुमच्या रात्रीची झोप, तुमच्या हृदयातील शांती, तुमच्या आतील मौन आणि ध्यान हिच तर तुमची खरी धन, दौलत, संपदा असते. पण आपण बाह्यांगी पाहिलं तर आपण जगभर वेगवेगळ्या गोष्टींसाठी धावत असतो, जग जिंकण्याची, सर्वोच्च होण्याची, प्रत्येकावर अधिकार गाजवण्याची आपली इच्छा पूर्ण होतच नाही. विजय जेवढा मोठा, आपली इच्छा त्याहून मोठी होत जाते. आज तुम्ही एक स्पर्धा जिंकलीत तर उद्या दुसरी स्पर्धा आयोजित झालेली असते. बाहेरचा विजय अंतहीन आहे, बाहेरची स्पर्धा अंतहीन आहे, कारण ती तुमच्या इच्छेवर इर्षेवर अवलंबून आहे. खरं म्हणजे आपल्या आतील युद्धभूमीवर आपण मिळवलेला विजय महत्वाचा. तिथला विजय आपल्याला सौंदर्य, तृप्ती, शांती, आनंद देतो. जी व्यक्ती तिथं जिंकते त्या व्यक्तीचं जीवनच एक उत्सव बनून जातं! तुकोबा म्हणतात तसं, “निरंजनी आम्ही बांधियेले घर | निराकार निरंतर राहिलो आम्ही || निराभास पूर्ण झालो समरस | अखंड ऐक्यास पावलो आम्ही ||” असं काही वैचारिक मंथन करताना कुणाचं नाव घेऊ नये, लालबागच्या राजा समोर त्याच्या भक्तांचे जोडलेले हात आणि चेहरे पाहा, थोडक्यात त्यांची देहबोली पाहा. ते दीन, पतित, अन्यायी, हरलेले किंवा त्यांची भावमुद्रा अतृप्त दिसते. खरं म्हणजे माझं जे इष्ट आहे त्यासमोर मी दीन, दरिद्री, दुःखी, अगतिक असेनच कसा? तिथं तर माझा चेहरा शांत, समाधानी किंवा आनंदानं उत्फुल्ल झालेला दिसला पाहिजे ना? त्या राजा समोर मी तर राजा सारखाच जाईन… कारण माझं तर त्याच्या कडे काही मागणंच असणार नाही, मला तर कसलीही हाव नाही आणि हाव तर तोही पूर्ण करू शकत नाही! … लक्षात ठेवा, मनाच्या गाभाऱ्यातील शांतता कधीही बाहेरून आत येत नाही. तुम्ही ज्ञानेश्वर, बुद्ध, महावीर, कृष्ण, राम यांचे चेहरे पाहा. तुम्हाला तृप्ती आणि शांती आतून बाहेर पडताना दिसेल. कारण बाहेरचं जिंकणं अस्थायी असतं, आज तुम्ही जिंकलात तर उद्या दुसरा कुणी जिंकेल. आज तुम्ही सर्वांत पुढं असाल तर उद्या दुसरा कोणी पुढं असणारच. बाहेरचं जिंकणं फक्त आणि फक्त तुमचा अहंकार वाढवतं, ज्यानं तुम्हाला आतून जास्त पिडा सुरू होते. म्हणून प्रथम आपण आपल्या मनाला जिंकलं पाहिजे. समर्थ रामदास कधीही दुसऱ्याला उपदेश करत नाहीत, तर मना सज्जना… ! म्हणून आपल्या मनाला उपदेश करताना दिसतात.

आपल्या आत क्रोध, वासना, इर्षा, हाव असते. जर यांना तुम्ही ओळखलं नाहीत, तर तुम्ही यांचे गुलाम होणारच. त्यामुळे बाहेरचं यश, पद, पैसा, प्रतिष्ठा तुम्हाला दास म्हणूनच वागवणार. समजा एखाद्यानं भरपूर धन दौलत मिळवली, पण रागात आपल्याच परिवाराला दुःखी केलंत तर? तुम्ही सत्तेची खुर्ची जिंकता, पण तिच खुर्ची दुसरा कुणी घेईल म्हणून तुम्ही सुखानं झोपू शकत नाही. आता सांगा हे जिंकणं झालं की हरणं? तुम्ही याला विजय म्हणू शकता का? तर नाही, हा पराभवच आहे. भले पूर्ण दुनिया तुम्हाला विजेता म्हणूद्या… तुम्ही खरे विजयी होता, जेव्हा तुम्हाला आंतरिक तृप्ती, समाधान, शांती मिळते! जे तुमच्या जवळ आहे त्यात तुम्ही सुखी, संतुष्ट, प्रसन्न असता, तेव्हा तुमच्या हृदयातील प्रेमाचा पाझर सुरू होतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी लढू शकत नाही किंवा लढू इच्छित नाही. लक्षात ठेवा जिंकणं दुसऱ्याच्या विरोधात असून असं चालेल? ते तर, आपल्याच भरकटलेल्या मना विरोधात असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मनावर विजय मिळवतो, तेव्हा बाहेरील जग स्वतः बदलतं. आता तुम्हाला दुसऱ्या कुणावर विजय मिळवण्याची गरज नसते, तर तुमचं जगणं हेच विजय झालेलं असतं! … जिंकण्याचा खरा अर्थ हा आहे की, आपल्या मनावर विजय मिळवणं. फारच कठीण आहे हे, पण जमलं तर फारच सुंदर आहे, तेव्हा तुम्ही खरे राजे असता. तुमच्या डोक्यावर मुकुट नसूदे, बसायला सिंहासन नसूदे, कोणी दासदासी किंवा सैन्य साम्राज्य नसूदे. राजा तर तुम्हीच असता, तुमच्या राज्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली असते, हिच सुरूवात असते तुम्ही आनंदयात्री होण्याची!

गरज नसताना आपण दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धी मानत असतो, कधी भावाला तर कधी शेजाऱ्याला, कधी समाजाला तर कधी राजकीय सामाजिक अस्तित्वाला. आपण असं समजून जातो की यासर्व गोष्टी मला साह्यभूत होतील, तर आपण जिंकू आणि पुढं जाऊ. पण जरा थांबा व शांतपणं विचार करा की, कधी बाहेरची परिस्थिती तुम्हाला दुःखी करते? की दुःखाचं खरं कारण आपल्या अंतरंगात दडलंय? आपले खरे शत्रू बाहेर नसून आपल्या आतच असतात. आपल्यातील राग, अहंकार, मत्सर, द्वेष आपली मुळ शांतवृत्ती, तृप्ती, समाधान यांना नष्ट करत असतात. समोरच्यानं शिवी दिली तर आपण रागावतो (मी सुद्धा) पण त्या शिवीनं खरी जखम कुणाला झालेली असते? तर जखम आपल्यातील अहंकाराला झालेली असते. आता क्रोध तुमचा ताबा घेतो आणि पुढील गोष्टी घडत जातात. लोभ तुम्हाला गुलाम बनवतो आणि इर्षा तुमच्या हृदयात आग लावते. हे तर आपले जवळचे शत्रू आहेत. आपल्या मनाची शांती, आपली झोप हेच तर घालवतात!

आपण जिथं शरिरानं असतो तिथं खरं म्हणजे मनानं नसतो. आता आपलं पुढील ध्येय काय? पुढील पद कोणतं? आता कशावर, कुणावर आणि कसा विजय मिळवायचा? कुणाचा प्रतिकार कसा आणि कुणा मार्फत मोडून काढायचा? ही तुमची बेचैनीच सांगून जाते की, खरा पराभव तुमच्या आत झालेला आहे. तुम्ही ज्याला अलेक्झांडर द ग्रेट म्हणता, ज्यानं अख्ख्या जगाशी लढाई केली, ज्यानं दुसऱ्यांना हरवलं, तो खरा म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट इडियट होता. रात्री तो शांत झोपत नसे. आपल्याच सैन्यातील कोणी उठाव करील म्हणून कायम चिंतेत असायचा. त्याचे विचार चिंता यामुळं तो कायम अस्वस्थ असायचा. बाहेर मिळालेल्या विजया नंतरही आत तो हरलेला माणूस होता. हाच त्याचा खरा पराभव होता. तो जिथं जिथं गेला, तिथं तिथं त्यानं तलवारीच्या जोरावर राज्ये जिंकली. पण गोष्ट इथं संपत नाही. जग जिंकत जिंकत तो जेव्हा मृत्यूच्या द्वारावर गेला तेव्हा त्याला सार्वजनीन सत्याचा बोध झाला. एका चिरंतन सत्याची जाणीव त्याला झाली. त्यानं पूर्ण जग जिंकलं असेल किंवा नसेल, पण एवढं निश्चित की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर! त्याला स्वतःवर विजय मिळवता आला नाही. खरंतर त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं नाही. विचार करा, ही केवढी मोठी विटंबना आहे की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर, त्याची इच्छा अपूर्णच राहिली, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही! जोपर्यंत तुम्ही आपले आंतरिक शत्रू कोण आहेत हे ओळखून त्यावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत तुम्ही पराजयीच असता. आतले शत्रू तलवारीनं नाही, तर बोधानं जिंकले जातात. पण हा बोध होण्यासाठी बुद्ध म्हणतो ध्यानात जा, महावीर म्हणतो मौनात जा आणि कृष्ण म्हणतो योग आचरा. थोडक्यात आपल्या मनाशी संवाद साधा. अलेक्झांडर द ग्रेट इडियटला मरण्यापूर्वी काहीच काळ आधी बोध झाला. त्यानं त्याच्या अंतकाळी सर्वांना सांगितलं, “माझी तिरडी जेव्हा बांधाल, तेव्हा माझे हात तिरडी बाहेर दिसूद्यात. जगाला कळूदे की अलेक्झांडर द ग्रेट रिकाम्या हातानं गेला! ” अलेक्झांडर द ग्रेट इडियटचा मृत्यू आपल्याला ही शिकवण देतो की, तुम्ही कितीही प्रतिष्ठा, संपत्ती, साम्राज्य मिळवा शेवटी सर्व इथंच राहाणार आहे. सोबत जाणारच असेल तर तो तुमचा जीवनानंद! … आपल्याला अलेक्झांडर द ग्रेट इडियट होऊन चालणार नाही. आपल्याला आपल्या आतील युद्धभूमीवर विजय मिळवायचा आहे. जर आपण वासना, राग, लोभ, द्वेष व अहंकारावर विजय मिळवला तर, आणखी कशावरही विजय मिळवण्याची आवश्यकता नाही… दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! 🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संबंध… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ संबंध… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Graceful, durable old furniture आणि New fashionable furniture ची सांगड घालून घर सजवू या. ” 

काल छायाचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला तिने विचारले, “मागच्या वर्षी तुझ्या नेहाचे लग्न झाले ना. तुमच्या काय अपेक्षा होत्या ग?? नेहाच्या काय अटी होत्या?? “

मी म्हंटले, “काय ग?? काय झाले आज?? अचानक हा प्रश्न कुठुन डोक्यात आला?? असं का विचारते आहेस?? “

छाया म्हणाली, “अग!! यावर्षी अजयचे लग्न करायचा विचार आहे. एका विवाह संस्थेत‌ नाव नोंदवले होते. काही मुलींची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. मुलींकडच्यांचे फोन पण येत आहेतच. मला तर हे खूप कठीण काम वाटतंय ग. कसं करावं की मुलींची पण dignity राहिल, व सर्व दृष्टीने समाधान होईल. खूप जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत आमच्या, आपल्या सारखीच असावी. एकदा वाटतं मुलीला आधी आम्ही बघून, मग अजयने बघावी का? एकदा वाटतं, आधी अजयनेच बघावी, तिच्याशी बोलावे, भेटावे व नंतर जर गोष्टी पूढे गेल्या तर मग पूढच्या गोष्टी कराव्यात. “

 छाया पुढे म्हणाली, “मला वाटलं तुझ्याशी थोडं बोलावं म्हणजे, माझे‌ विचार थोडे स्पष्ट होतील. तुला मुलीच्या आईचा अनुभव आहे ना. तेंव्हा मुलीकडे कसा आणि काय विचार करतात हे कळेल. खूप अपेक्षा असतात का ग?? आजकाल म्हणे मुली आधी मुलाचे पॅकेज किती?? व प्रोपर्टी किती आहे?? हेच बघतात. खरं आहे का?? “

मी म्हंटले, “खरं सांगू का?? अग! प्रत्त्येक घर वेगळं असतं. अग! आपली मुलगी आनंदी रहावी यापेक्षा दुसरे काय हवं असतं ग?? आम्ही नेहाला पहिल्या पासून हेच सांगत आलो, की लग्न झाल्यावर दोनाचे चार हात होतात. तेंव्हा दोघे मिळून खूप कमवू शकता. मुलगा चांगला पाहिजे व घरचे अन्य सदस्य पण महत्वाचे असतातच. पैशापेक्षा माणसं महत्वाची.

मला अस वाटते, आधी तुम्हीच बघा. घरदार बघून बरंच लक्षात येतं. चौकशी करा. एखादी चांगली फॅमिली, म्हणजे तुमचे, त्यांचे विचार जुळत असतील तर, दोन्ही कडील पूर्ण फॅमिलीने दोन तिनदा भेटण्यास काही हरकत नाही. गप्पांमध्ये बरेच कळते. तुमचे विचार, अपेक्षा, परिस्थिती, त्यांच्या घरचे सणवार लक्षात येतात.

आजकाल मुली शिकलेल्या असतात, त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही. तेंव्हा अशा भेटीत सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. बोलताना त्यांचा विचारांचा कल कळतो. व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कळतो. चांगले होमवर्क करून जा, म्हणजे बोलण्यात कोणते विषय काढायचे??? याची तयारी होईल.

सध्याची‌ परिस्थीती म्हणजे, समाजात सध्या चालू असलेली प्रथा बदलायला हवी आहे. मुलींचे विचारही सध्या वेगळ्या दिशेने जात आहेत. घरातील माणसांपेक्षा घरातील वस्तूं जास्त महत्त्वाच्या वाटतायेत.

आजकाल मुलांचे आई-वडीलही आधीच माघार घेतात. आधीच ठरवून मोकळे होतात. आधीच असे दाखवतात की लग्न झाल्यावर वेगळे राहणेच बरं राहील. व त्याअर्थाचे वक्तव्य देतात. तयारी करतात. हा शेवटचा option असावा. “

“मुलाला मुलगी पसंत पडली की, तिने अजयला नीट साथ द्यावी. बस, एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी आमची काही अपेक्षा नाही. आमचा भार आमच्या मुलावर नाही. ते वेगळे राहिले तरी चालेल, वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात. आधी पासून असे सिग्नल आपल्या बोलण्यातून द्यायची काय गरज?? त्यापेक्षा आम्हाला सून मुलीच्या रुपात हवी आहे, घराला सांभाळणारी, आमच्यात मिळुन मिसळून राहणारी. तिच्या नोकरी करण्याला आमचे बंधन नसेल. दोघांना दोन्ही घरचा आधार असणारच आहे. दोन्ही घरी अडीअडचणी ला ही मुलं असतीलच.

लग्न म्हणजे दोन्ही घरचा नेहमीचा संबंध असायला हवा. दोन्ही घरच्या सुख दुःखात एकमेकांची साथ हवी.

अहो! एकाच घरच्या दोन भावांची घरे वेगळी असतात. कारण दोन्ही घरच्या बायका वेगवेगळ्या घरातुन येतात ना म्हणून. आपल्या बाबतीत तर आपण अगदी दोन वेगळ्या फॅमिलीज आहोत. तेंव्हा फरक असणारच आहे. तुमच्या आणि आमच्या काही चांगल्या पद्धती मिळुन‌ नवीन काही चांगल्या पध्दती दोन्ही घरात सुरू होतील. नक्कीच चांगले होईल. आणि घाई कशाचीच नाही. adjust व्हायला थोडा वेळ लागेल एवढंच. ‘ अशा अर्थाचे बोलणे जास्त चांगले व‌ positive वातावरण निर्माण करेल.

मुलगा लग्न झाल्यावर आपला रहात नाही असा विचारच करायचा नाही. मी छायाला म्हंटलं, “तू आपल्या सूनेबद्दल जे चित्र मनात रेखाटलं आहे ते तसंच व्हायला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघ आरामदायी म्हातारपण हवे असेल तर एकत्र राहणं तुमच्या करिता चांगलेच आहे व नोकरी करणाऱ्या सूनेकरिता पण ते सोईस्करच असणार आहे. दोन पीढी एकत्र रहायचे म्हणजे सोपं गणित नाही. तडजोड करावीच लागणार आहे. कारण जनरेशन गॅप एवढा मोठा आहे की सर्वांचे सर्वांना सर्व पटेल हे शक्यच नाही.

अग! पस्तीस वर्षे झाली आम्हा दोघांना बरोबर राहून. तरी प्रत्त्येक गोष्टी वर एकमत असतंच असं नाही. पण आपल्या माणसांसाठी तडजोड केली तर काय हरकत आहे?? नोकरी करणारी सून पाहिजे तर तडजोड जास्तच करावी लागेल. स्पष्ट व गोड बोलून सर्व सहज शक्य होऊ शकतं. मनातल्या मनात धूसफूस, भुणभुण करणे, बाहेरच्या लोकांना घरातील गोष्टी सांगण्यापेक्षा घरातील लोकांशी स्पष्ट बोलून मार्ग काढणे जास्त चांगले नाही का?? त्यामुळे कान भरणे हा प्रकार होणारच नाही.

सून म्हणजे, तुझ्या एवढाच तिचा पण मान‌ या घरात असायला हवा आहे. ती तुमची पूढची पीढी आहे. तुझ्या लाडक्याची अर्धांगिनी आहे. मुलगा तेवढा माझा, मग सून‌ तुझी नाही का?? हा दूजाभाव नको.

अजयला नुसता खोकला झाला तरी तू काळजी करते, तेवढेच प्रेम आपल्या सूनेवरही करायचे. आपण आपल्या कडून पूढाकार घ्यायचा. सूनेला आपलं मानणे व ते आपल्या कृतीतून दाखविणे ही या नात्याची सर्वात महत्त्वाची व आवश्यक पहिली पायरी आहे.

माझी आजी म्हणायची, मुलगा तर माझा आहेच. सूनेला आपलसं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते. तिच्या घरच्यांचा मान ठेवते. शेतावरून आंबे आले, धान्य आले की आधी त्यातले थोडे तरी मी सूनेच्या माहेरी नक्की पाठवते. सूनेचा वाढदिवस मी आठवणीने साजरा करते. हे असे प्रसंग नातं घट्ट करतात.

माझा मुलगा आता फक्त माझा नाही त्याच्यावर माझ्या इतकाच हक्क असणारी त्यांची बायको ही आहे, हे सत्य पचले पाहिजे. आता सूनेचे माहेर ही माझ्या मुलाची extended फॅमिली असणार आहे. हे ही सत्य पचले पाहिजे.

मन मोठ्ठं व मोकळं ठेवावे लागेल. लहान सहान गोष्टींवर दुर्लक्ष करणे, प्रतिक्रिया न देणे, body language वर लक्ष देणे हे प्रयत्नपुर्वक शिकावे लागेल.

सूनेच्या नावाने बोंब मारणे, सर्वात सोप्पे काम आहे. पण त्यात आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात कमी पडलो‌ का?? हाही अर्थ निघतोच. तेंव्हा home work खूप करायचे आहे.

Ego, पैसा, practical approach, प्रतिष्ठा, formal relations, चढाओढ, शोबाजी, property, माणसांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा, ही समज या सध्याच्या परिस्थितीत हावी आहे. या पेक्षा प्रेम, संबंध, आत्मियता, एकमेकांची काळजी, आधार, समाधान या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा समाजात युवा मंडळीला समजावयाची गरज आहे. सुरवात करायला हवी आहे. वेळ लागेल, उशिरा का होईना पण परीणाम नक्की दिसतील.

पैसा व माणसं हे दोन्ही आयुष्यात महत्वाचे व आवश्यक आहेत पण त्याचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे.

कुठे थांबायचे??? हे प्रत्येकाला प्रत्त्येक क्षेत्रात नेहमी समजलंच पाहिजे. मग ते प्रकृतीवर अतिक्रमण असो किंवा पैशामागे धावणे असो. जूनी पीढी असो नाही तर नवीन पिढी असो.

आपली पीढी म्हणजे नवीन व‌ जून्या पद्धती रितीरिवाज, संस्कार यांना जोडणारा ब्रिज आहे व त्यामधून मार्ग काढायला आपण शिकलो आहोत. अनेक challenges बघीतले आहेत, झेलले आहेत, व यशस्वीपणे पार केले आहेत. आता हे challenge ही सफलतेने पार पाडू या. नवीन वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलायचा प्रयत्न करू या. विचारांचे नातं इतकं घट्ट करूया की मतभेद पण हसत हसत स्विकारायला शिकूया. Graceful, durable Old furniture व New fashionable furniture ची सांगड घालून पुन्हा एकदा घर सजवू या.

सामान्य जीवन जगणे हे खरंतर प्रत्येकाकरिता व त्याच्या कुटुंबीयांकरिता असामान्य व आनंददायी गोष्ट असते.

सूनेला पारखायचा नाही, समजायचा प्रयत्न करावा. म्हणतात ना, ‘रिश्ते बरकरार रखने के लिए एकही शर्त है, किसी की कमियां नहीं, अच्छाइयां देखें। ईश्वर तो सिर्फ मिलाने का काम करता हैं। संबंधों में नजदीकियां और दूरियां बढ़ाने का काम तो इन्सानही करता हैं।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय लष्कर दिनानिमित्त विशेष – “एकांतात उमलणा-या वेदनेच्या कळ्या!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय लष्कर दिनानिमित्त विशेष – “एकांतात उमलणा-या वेदनेच्या कळ्या!” ☆ श्री संभाजी बबन गायके

(१५ जानेवारी – भारतीय लष्कर दिनानिमित्त विशेष लेख!)

सेकंड लेफ्टनंट राकेश सिंग मल्हन

कर्नल राज सिंग मल्हन… त्यांच्यासाठी मृत्यू आणि छिन्न-विछीन्न झालेले देह, रक्ता-मांसाचा चिखल, जीवाच्या आकांताने मारल्या जाणा-या किंकाळ्या काही नव्या नव्हत्या. एक नव्हे तर दोन-दोन युद्धं लढून ते निवृत्त झाले होते!

दुस-या पिढीतले जातीवंत शिपाईगडी असले तरी त्यांच्या आयुष्याच्या शब्दकोशात भीती आणि शोक हे शब्द होतेच. पण या दोन्ही गोष्टींवर पक्कं नियंत्रण ठेवण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं होतं. त्यांचे वडीलही याच अनुभवातून गेले होते. आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून ते ज्यावेळी फौजेत गेले, त्यावेळी त्यांना निरोप देताना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांत त्यांनी एक अनामिक भावना दाटून आलेली पाहिली होती. “काळजी करू नकोस.. आमची. स्वत:ला जप. ” असं म्हणणारा बाप त्यांची गाडी निघाली तेंव्हा तोंड फिरवून मागे कुठेतरी पहात असलेला त्यांनी पाहिला होता… लढाईला जाता जाता!

आणि आता कर्नल साहेबांचा स्वत:चा मुलगाही पलटणीत भरती झाला त्यावेळी त्याला निरोप देताना त्यांची अवस्थाही काही निराळी नव्हती! जन्मत:च देखणेपणा घेऊन आलेलं पोरगं सेकंड लेफ्टनंट झालं तेंव्हा लष्करी अधिका-याच्या गणवेशात मोठं देखणं दिसत होतं… कुणाचीही दृष्ट लागेल असं!

आजही कर्नल कुणासमोर रडून चालणारं नव्हतं. त्यांनी शांतपणे लेकाचा मृतदेह ताब्यात घेतला.. आणि तिरंगा ध्वजसुद्धा! तशी त्याची खबर फौजेने त्यांना सकाळीच मिळाली होती. लेकाच्या पलताणीतून अवेळी येणा-या निरोपाचा अर्थ त्यांना अगदी नीट ठाऊक होता. असे निरोप त्यांनी स्वत: अनेकांच्या घरच्यांना दिले होते… कितीतरी बापांना सांगितले होते… ”आपका बेटा बडी बहादुरीसे लडा… लेकिन उसने देश के लिये अपना सर्वोच्च बलिदान दिया! ”

आज तोच निरोप त्यांना कुणीतरी देत होतं… ”आपका बेटा.. सेकंड लेफ्टनंट राकेश सिंग मल्हन बडी बहादुरी से लडा! ”

राकेश नाव ठेवलं होतं त्याचं. राकेश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा स्वामी असा अर्थ असतो असं कुणीतरी सांगितलं होतं… आज हा चंद्र सकाळचा सूर्य उगवल्या उगवल्या मावळून गेला!

त्या दिवशी राकेशला मोठी कामगिरी मिळाली होती… सोबत असलेल्या सैनिकांची संख्या अतिरेक्यांच्या संख्येच्या तुलनेत दुप्पट आहे हे कारण सांगून तो मोहिमेतून मागे सरकू शकला असता! पण अवघं बावीस साडे एकवीस वर्षांचं वय… नुकताच सेकंड लेफ्टनंट म्हणून ग्रेनेडीयर्स मध्ये रुजू झालेला अधिकारी. सळसळतं रक्त आणि अतीव उत्साह. आठ परदेशी अतिरेकी आपल्या तावडीतून निसटून जाऊ देणं परवडणार नव्हतं देशाला. एन. डी. ए. , आय. एम. ए. मधलं खडतर प्रशिक्षण प्रत्यक्ष उपयोगात आणायची हीच तर वेळ होती. राकेश यांनी सोबतच्या तीन सैनिकांसह त्या जंगलात आत प्रवेश केला. एक मोठा हल्ला करून जंगलात लपण्याच्या ठिकाणाकडे निघालेल्या आठ अफगाणी मुजाहिद अतिरेक्यांची वाट अडवून त्यांना नेस्तनाबुद करण्याचं मिशन होतं.

हे आठही जण अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आणि तिथून भारतात घुसले होते. त्यांना भारतीय सैनिकांनी हुडकून काढले पण त्यांनी जंगल, अंधार यांचा फायदा घेत त्यांच्या वाटेत असलेल्या एका सैन्य तुकडीला चकवा दिला होता. राकेशसिंग यांना ही खबर मिळताच त्यांनी धोका पत्करत तीन सैनिक आणि स्वत: अशा चार जणांच्या जोरावर त्या आठ जणांची वाट अडवली… त्यांपैकी दोन जणांना अचूक टिपले. उरलेले अतिरेकी गडबडून इतस्त: पांगले. राकेश सिंग आणि त्यांच्या या तीन सैनिकांनी त्यांना चारही बाजूने घेरले. सहा अतिरेकी होते… त्यांपैकी एक-दोघे ज्या बाजूला पळाले होते… नेमके त्याच बाजूला आपला एक सैनिक दबा धरून बसला होता… त्या दोघांच्या गोळीबारामुळे या एका सैनिकाला काही करता येईना… ते दोघे पुढे पुढे जात होते… आता या एकट्या सैनिकाचा जीव धोक्यात आला होता. राकेश यांनी हे पाहताच दुस-या बाजूने मुसंडी मारत त्या दोघांवर गोळीबाराच्या फैरी झाडायला आरंभ केला… आपल्या सैनिकाला कव्हर देण्याचा राकेश यांचा इरादा होता… या प्रयत्नात त्यांच्या हाताला, खांद्याला अनेक गोळ्या लागल्या… कारण अतिरेक्यांचा गोळ्यांचा वर्षाव सुरु होता… त्याच्यामधून राकेश सिंग पळत आले होते!

कोसळलेले राकेश सिंग पुन्हा उठले आणि त्यांनी त्या दोघा अतिरेक्यांना यमसदनी धाडले. आता उरले चार… आपल्या इतर तीन सैनिकांनी राकेश सिंग साहेबांच्या पराक्रमाने प्रेरित होत जोरदार प्रतिकार केला आणि उर्वरीत चारही जणांना ठार मारले… चार जणांनी आठ अतिरेकी संपवले होते. मात्र या दरम्यान प्रचंड रक्तस्राव झाल्याने राकेश सिंग यांचे प्राण वैद्यकीय मदत मिळेपर्यंत निघून गेले होते! १३ जून, १९९२ रोजी सैन्यात दाखल झालेला हा नवतरुण अवघ्या पाच महिने आणि बावीस दिवसांनी, म्हणजे ५ डिसेंबर, १९९२ रोजी देशाच्या कामी आला! … वय होतं अवघं… २२ वर्षे, २ महिने आणि १७ दिवस!

लष्कराच्या गाडीतून हुतात्मा सैनिकाचा देह घराच्या अंगणात आणला गेला. सोबत जबाबदार लष्करी अधिकारी होतेच. हजारोंचा जमाव होता… अमर रहे घोषणा होत होत्या!

तोवर अंधारून आले होते. कुणी महत्त्वाचे नातलग दूर गावावरून येणार असल्याने त्यांना उशीर होणार होता. त्यामुळे अंत्यसंस्कार दुसरे दिवशी करायचं ठरलं! ही रात्र आता सरता सरणार नव्हती!

कर्नल साहेबांनी घरातल्या सर्वांना धीर दिला. चेहरा करारी आणि डोळे कोरडे. हालचाली संयत. इतरांशी बोलताना, त्यांना सूचना देतानाचा स्वर मवाळ. पोटचं पोर गेल्याचं दु:ख चेह-यावर दिसत नव्हतं… उलट अभिमान होता!

राकेश यांचा देह फुलांनी शाकारलेला. त्यांच्या चेह-यावर कापड. सकाळपर्यंत देह त्याच्या आवडीच्या खोलीत ठेवायचं ठरलं. धूप जळत होता… आणि बापाचं काळीजही.. नि:शब्द! . दिवा तेवत होता… पण त्यावर काजळी होती! आई तर दु:खातिशयाने अर्धवट ग्लानीत, पण ती रडू शकत होती… शुद्ध आल्यावर. कर्नल साहेबांना मात्र ही सवलत नव्हती… पुरुषांना तशीही नसतेच!

कर्नल साहेबांनी सर्वांना बाहेरच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले. राकेशचे मोठे बंधू, बहीण इतर नातलग बाहेरच्या खोल्यांत भिंतीस टेकून बसले… आणि काही वेळाने आडवे झाले… सकाळची वाट पाहत पाहत पडून राहिले… आणि त्यांचा डोळा लागला! मेरे बेटे के साथ मुझे अकेला छोड दो… असं म्हणत कर्नल साहेब स्वत: मात्र शांतपणे राकेशच्या देहाशेजारी बसून राहिले… त्याचं बालपण आठवत! राकेशला लहानपणी बॉबी म्हणत सर्वजण. अत्यंत खेळकर आणि धाडसी. मी मोठेपणी सैन्यातच जाणार हे त्याने ठरवून टाकले होते. अभ्यासात आणि अनेक खेळांत अत्यंत प्रवीण… आज मात्र राकेश केवळ देहाने दिसत होता.. बावीस वर्षे वय… आयुष्य तिथेच थबकलेलं!

मंद मंद पावले टाकीत रात्र पुढे सरकत राहिली… दोन वाजले असावेत. कर्नल साहेबांच्या मोठ्या मुलाला काही जाणवलं… राकेश यांच्या खोलीतून मुसमुसण्याचा आवाज येत होता. त्यानं हलक्या पावलाने खोलीजवळ जात डोकावून पाहिले… कर्नल साहेबांनी राकेशच्या चेह-यावरचे कापड बाजूला केलेलं होतं… त्याच्या केसांतून ते हलकाच हात फिरवत होते… आणि आवाज बाहेर फुटू नये या बेताने रडत होते! एका पाषाणाला पाझर फुटत होता… पण पाषाण प्रयासाने ते पाणी आतल्या आत अडवून धरत होता! एकांतात वेदनेच्या झाडाला कळ्या लगडल्या होत्या… आणि त्यांची फुले होऊन गालांवरून खाली ओघळून त्यांचा सडा पडत होता… पोराच्या चेह-यावर आसवांचे थेंब पडत होते… मोतीच जणू!

चाहूल लागताच कर्नल साहेबांनी राकेशच्या चेह-यावर ते कापड पुन्हा होतं तसं केलं… डोळे पुसले… तोंड भिंतीच्या दिशेला फिरवलं… आणि थोरल्या मुलाला हातानं इशारा केला… तू जा… पड… मी ठीक आहे!

थोरला जाऊन त्यांना पाठीमागून बिलगला… कर्नल साहेबांचा देह थरथरत होता… रात्र पुढं सरकत होती!

या अतुलनीय शौर्याबद्दल राकेश सिंग मल्हान यांना शांतता काळातील प्रथम क्रमांकाचे ‘अशोक चक्र’ पदक मरणोत्तर देण्यात आले.

१९६५ आणि १९७१च्या युद्धांत सहभाग घेतलेल्या आणि चंदिगढ येथील रहिवासी कर्नल राज सिंग मल्हान यांचे आणि सावित्री देवी यांचे राकेश हे धाकटे सुपुत्र. पुण्याच्या सेंट जोसेफ शाळेत सुरुवातीचे शिक्षण घेतलेले राकेश पुढे रोहतक येथे शिकायला गेले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ७९व्या सत्रासाठी त्यांची निवड झाली. पायदळाचे आकर्षण असल्याने त्यांनी पायदळात प्रवेश घेतला होता. पुलवामा-शोपियां मध्ये अतिरेक्यांशी झालेल्या संघर्षात ते वीरगतीला प्राप्त झाले!

९, PARA SF चे संजोग छेत्री, सेकंड लेफ्टनंट पुनीत नाथ दत्त, कॅप्टन राधाकृष्णन नायर हर्षन, लेफ्टनंट नवदीप सिंग या लष्करी अधिकारी आणि नीरजा भानोत या नागरी हवाई सेवेतील, अगदी कमी वयात अशोक चक्र प्राप्त करणा-या निवडक व्यक्तींमध्ये राकेश सिंग मल्हन हे नाव सामील झाले. युद्धभूमीला तरुण रक्ताची तहान असते जणू! आणि आपल्या देशात हे रक्त सांडणारे सैनिक आहेत, त्यांना फौजेत धाडणारे आई-बाप आहे म्हणून देश सुरक्षित आहे आणि राहील!

सर्व हुतात्मा सैनिकांना वंदन आणि त्यांच्या शूर जन्मदात्यांना प्रणाम!!!

सर्व भारतीयांना भारतीय लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा! जय हिंद. 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares