ही कविता आयुष्याच्या त्या वळणावर उभी आहे जिथे धावपळ थांबली आहे आणि आठवणींचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे. कवयित्रीने ‘विसावा’ या संकल्पनेला केवळ विश्रांती म्हणून न पाहता, आयुष्यातील संघर्षांनंतरची एक ‘स्वस्थ स्थिती’ म्हणून मांडले आहे. ‘सावल्या बनलेल्या आठवणी’ हे रूपक अतिशय सुंदर आहे. ज्या आठवणींनी एकेकाळी दुखावले होते, त्या आता केवळ शांत सोबती बनल्या आहेत. कवितेची भाषा साधी, प्रवाही आणि मनात घर करणारी आहे. मानवी आयुष्यात आपण कितीतरी भावनांचे ओझे वाहतो. ते ओझे आता ‘परतीच्या मार्गावर’ कमी होत चालल्याचे कवयित्रीने मांडले आहे. ‘नात्यांची दुःखाला ओढ नाही’ ही ओळ खूप सखोल आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर अपेक्षा संपतात आणि त्यामुळे दुःखाची तीव्रताही कमी होते. ‘मौन विसरणे’ किंवा ‘मनाच्या कातळावर झिरपणे’ यांसारख्या प्रतिमा मानवी मनातील खोलवर असलेल्या शांततेचे दर्शन घडवतात.
कवयित्रीने दुःखाला कुरवाळण्याऐवजी, त्याला सावरून पुढे जाण्याची जी वृत्ती दाखवली आहे, ती खऱ्या अर्थाने ‘विसाव्या’ची प्रचिती देते.
‘विसाव्याचे क्षण’ ही कविता म्हणजे जीवनाचा एक परिपक्व आढावा आहे. धावपळीच्या या युगात, जिथे प्रत्येकजण काहीतर मिळवण्यासाठी धडपडत आहे, तिथे कवयित्रीने ‘काहीही न हवे असण्याची’ स्थिती किती शांत असू शकते, याचे सुंदर वर्णन केले आहे. ही कविता वाचकाला अंतर्मुख करते आणि आपल्याच आयुष्यातील ‘विसाव्याच्या क्षणांचा’ शोध घ्यायला प्रवृत्त करते.
थोडक्यात सांगायचे तर ही कविता केवळ शब्दांची मांडणी नसून ती जगण्याचा एक शांत आणि समाधानी दृष्टिकोन देणारी एक कलाकृती आहे.
विस्कटलेल्या पसाऱ्यांमध्ये
वेचावे आता थोडे क्षण,
आयुष्याचा सडा अंगणी
देह निर्माल्य राहो कण..
हे चरण कवितेचा गाभा आहे.
‘विस्कटलेला पसारा’ हे शब्द आपल्या आयुष्यातील सुख-दुःख, धावपळ, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि जुन्या आठवणींचे प्रतीक आहेत. या विस्कटलेल्या आयुष्यातून आता केवळ ‘क्षण’ वेचायचे आहेत, म्हणजेच आता कसलीही मोठी ध्येये न ठेवता, वर्तमानातील शांततेचा आनंद घ्यायचा आहे, असा अर्थ यातून निघतो. ‘देह निर्माल्य राहो कण’ ही ओळ अतिशय प्रभावी आहे. मंदिरात वाहिलेली फुले (निर्माल्य) जशी देवाला अर्पण झाल्यावर आपले अस्तित्व विसरतात, तशीच इच्छा कवयित्रीने व्यक्त केली आहे. आयुष्यभर कष्ट सोसलेला देह आता थकल्यानंतर, तो निसर्गाच्या किंवा ईश्वरी चरणी शांतपणे समर्पित व्हावा, ही त्यातील गांभीर्य आणि पावित्र्य दर्शवते.
आयुष्याच्या शेवटी ‘सडा अंगणी’ असावा, म्हणजे सर्व काही प्रसन्न आणि नीटनेटके असावे, ही ओळ मनातील विचारांची स्पष्टता दर्शवते. गोंधळ, कलह किंवा अपेक्षांचे ओझे आता उरलेले नाही. आता देहाचे कण कण जरी निसर्गाला परत द्यावे लागले, तरी त्यात एक प्रकारचे समाधान आणि तृप्ती आहे.
हे चरण आयुष्याच्या अंतिम सत्याचा अत्यंत हळुवारपणे स्वीकार करते. भीती न बाळगता, एक प्रकारचे ‘निर्लेप’ होऊन जीवनाच्या प्रवासाची सांगता करणे, हे या ओळींचे मुख्य सौंदर्य आहे.
थोडक्यात हे अंतिम चरण कवितेला एका आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते. “जे काही राहिले आहे, ते आता आनंदाने उपभोगावे आणि जाताना मागे फक्त सकारात्मकतेचा सुगंध सोडावा, ” हा संदेश या चरणातून मिळतो. हे शब्द केवळ मृत्यूचे वर्णन करत नाहीत, तर ते ‘जगावे कसे’ आणि ‘जावे कसे’, याचे एक सुंदर मार्गदर्शन करतात.
रसग्रहण – श्री उदय माने
काव्यानंद.. प्रस्तुती सुरेखा चिखलकर
8806913315
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.
सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.
कळी फुल होताच धुंदावली
वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥
ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.
सुगंधात न्हाऊन सुस्नात ही
दवाची गळा माळ घालोन ही
कशी ऐट दावीत गंधाळली
वसंतासवे…
हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.
अली चुंबिता रोखुनी पाहते
तरी मुग्ध होऊनिया लाजते
मनाने अलीशी असे बांधली
वसंतासवे…
या दुसऱ्या अंतर्यात त्या फुलावर लुब्ध होऊन
अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.
मिटे पाकळ्यांना हळू रुपसी
खुले रूप लावण्य हे राजसी
जणू मेनका रूप ही ल्यायली
वसंतासवे…
राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.
पहाटेस निहार सुस्तावता
चकाकून देहावरी थांबता
शहारुन ती बावरू लागली
वसंतासवे, गर्विता जाहली.
या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.
हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.
एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे. तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.
चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.
भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी राजसी, सुस्तावता थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.
अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६१ – – –
उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे |
तया अंतरी सर्वदा ते चि आहे |
जनी सज्जनी वाद हा वाढवावा |
पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१|
अर्थ : एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल.
(वाहे- सुरू राहील, सज्जन- साधू पुरुष, वाद- निरर्थक चर्चा)
विवेचन :आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी फार कमनशिबी आहे. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अशा प्रकारचे निराशेचे विचार त्यांच्या मनामध्ये कायम घोळत असतात. आणि परिणामी दुःखच त्यांच्या वाट्याला येते. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की असे लोक कल्पवृक्षाच्या खाली बसूनही दुःखच करीत राहतात त्यांच्या इतके अभागी कोणीच नाही.
खरे संत किंवा साधू पुरुष मुळातच भेटणे दुर्मिळ असते. ते आपल्यासाठी मोक्षमार्गाचे दिशादर्शक असतात. त्या मार्गावर कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या मनात सदैव आपल्या कल्याणाचीच इच्छा असते. म्हणूनच संतांबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी, ” संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू” असे म्हटलेआहे. पण काही व्यक्ती संतांजवळ आपले कल्याण करून घेण्याच्या हेतूने जात नाहीत. त्यांना नको ते प्रश्न विचारून किंवा त्यांच्याशी निरर्थक वाद घालून आपली विद्वत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरंच देव आहे का? तुम्ही पाहिला आहे का? देव आहे हे कशावरून? हे सगळे परमेश्वराच्याच मर्जीने घडते याचा काय पुरावा आहे? यासारखे निरर्थक प्रश्न असे लोक विचारत राहतात आणि निरर्थक व्यर्थ वाद घालत राहतात.
परमेश्वराच्या भक्तीचे महत्व, परमेश्वराची भक्ती कशी करावी, अनुसंधान कसे टिकवून ठेवावे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी जर आपण अशा निरर्थक गोष्टींवर वाद घालत राहिलो तर आपल्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येणार हे निश्चित! आणि वेळ निघून गेल्यानंतर आपली चूक कळली तरी काही उपयोग नसतो.
परमेश्वर सर्वव्यापी आहे. या अर्थाने आपण २४ तास कल्पवृक्षाच्या खाली उभे असतो. कल्पवृक्ष म्हणजे मागितलेले सगळे काही देणारा. या कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण ज्या काही इच्छा व्यक्त करू, त्यांना ‘तथास्तु’ म्हणून तो आशीर्वाद देत असतो. म्हणून नेहमी विधायक बोलणे, चांगल्या इच्छा ठेवणे आणि चांगले गोष्टींची कामना करणे हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी त्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद लाभेल. तो तथास्तु म्हणेल आणि त्या गोष्टी आपल्याकडे परत येतील. परंतु आपण जर दुःख देणाऱ्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टींची अपेक्षा ठेवली तर त्याच गोष्टी आपल्याकडे परत येणार आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो.
या ठिकाणी आपला असाही गैरसमज होण्याची शक्यता आहे की वाईट इच्छा आपण कशाला व्यक्त करू? परंतु आपण कामना करतो ते दुःख देणार्या गोष्टींचीच. भौतिक सुखे, ऐहिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण त्या अंतिमतः दुःखच देतात. श्रेयस मागण्याऐवजी आपण प्रेयसाचीच कामना करतो. म्हणून आपल्या विचाराने आपणच आपले भविष्य घडवत असतो. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो.
समजा प्रत्यक्ष परमेश्वर भेटला किंवा अचानक कल्पवृक्षाच्या खाली बसण्याचे भाग्य लागले तर अशावेळी काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. एका भिकारी माणसाने एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि अशी इच्छा करत बसला की मला जर ही लॉटरी लागली तर मी खूप श्रीमंत होईल आणि गाडीत बसून भीक मागेन. तेव्हा काय मागायचे किंवा इच्छा सुद्धा काय करायची याचेही ज्ञान हवे. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. मनामध्ये लोककल्याणाची भावना हवी. साधुसंत भेटल्यानंतर त्यांच्याकडून आत्मोद्धार कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता यायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या इंद्रियांना वळण लावायला हवे. त्यासाठी वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्यथा नंतर केवळ पश्चातापच हाती उरतो.
म्हणूनच समर्थ या श्लोकातून आपल्याला बजावतात की कल्पवृक्षाची सावली सदैव आपल्यावर आहे, परंतु त्या सावलीचा लाभ घेण्यासाठी आपले मन शुद्ध, विवेकी आणि श्रेयसाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. संतांची संगती हे त्याचेच साधन. आणि ते साधन वाया घालवणे म्हणजे स्वतःच स्वतःला दुःखाच्या गर्तेत लोटणे होय.
स्वसंवाद ::
१. माझ्या आयुष्यात कल्पवृक्ष म्हणजे परमेश्वर सदैव सोबत आहे, हे मला खरोखर मनापासून वाटते का?
२. मी रोज जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो, ते विधायक असतात की निराशेचे? माझ्या मनाचा कल कोणत्या दिशेने जास्त आहे?
३. एखाद्या संत, ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूंशी बोलताना मी खरोखर काही शिकण्यासाठी जातो की माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी?
४. “श्रेयस” आणि “प्रेयस” यांतला फरक मला कळतो पण मी प्रत्यक्ष आयुष्यात श्रेयसाची निवड किती वेळा करतो?
५. माझ्या जीवनातील एखाद्या दुःखाचे मूळ माझ्याच विचारांत किंवा चुकीच्या इच्छांमध्ये होते असे आता वाटते का? (क्रमशः)
– – – –
श्लोक क्र. ६२ – – –
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला |
बळे अंतरे शोक संताप ठेला |
सुखानंद आनंद भेदे बुडाला |
मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला |६२|
अर्थ :भगवंताच्या भक्तीचा किंवा स्वस्वरूपाचा ध्यास एकदा तुटला की मनामध्ये शोक, संताप बळजबरीने ठाण मांडतात. सुख आणि आनंद नष्ट होतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा मनामध्ये केलेला निश्चय देखील नष्ट होतो.
(निजध्यास – स्व स्वरूपाचे अनुसंधान, तूटोनी गेला – खंड पडला)
विवेचन :परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सातत्य आवश्यक असते. त्याचा ध्यास किंवा वेड मनाला लागणे आवश्यक असते. सततचे अनुसंधान किंवा स्व स्वरूपाचे चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. परंतु आपले मन जेव्हा वादात अडकते तेव्हा हे अनुसंधान तुटते. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शंका येऊ लागतात. मनाला काहीतरी काम देणे आवश्यक असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे आपण म्हणतो. जेव्हा परमेश्वराचे अनुसंधान तुटते तेव्हा या रिकाम्या मनामध्ये नको ते विचार गर्दी करू लागतात.
मनाचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. जेव्हा सातत्याने परमेश्वराचे अनुसंधान, नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टी सुरू असतात, तेव्हा मनामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी नांदत असतात. परंतु ही शांतता, समाधान आणि आनंद मग भंग पावतात. शोक आणि संताप बळजबरीने मनाचा ताबा घेतात आणि मग आपण स्वतःला दुःखी करून घेत असतो.
अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची द्विधा स्थिती असते तेव्हा होते. संतांनी सांगितलेला उपदेश ऐकल्यानंतर किंवा कीर्तन, प्रवचन ऐकल्यानंतर आपण परमेश्वराची उपासना करावी अशी तीव्रतेने इच्छा होते. परंतु काही काळ गेल्यानंतर संतांच्या उपदेशाचा प्रभाव ओसरतो. परमेश्वरावर असलेली श्रद्धा डळमळीत होऊ लागते मग असे वाटते की परमेश्वर भेटेल की नाही माहिती नाही परंतु आज जो आनंद आपल्या हातात आहे तो उपभोगावा. जो निजध्यास घेतलेला असतो तो आपण सोडतो. तेवढे धैर्य किंवा तेवढी वाट पाहण्याची तयारी आपली राहत नाही. परिणामी चित्तात शोक आणि संताप घर करतात.
श्रद्धावान लभते ज्ञानम! श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होते. अर्थात हे ज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा स्व स्वरूपाचे ज्ञान. परंतु त्यासाठी संयम, विवेक आणि वैराग्य या गुणांची आवश्यकता असते. सामान्य माणसाजवळ एवढा धीर नसतो. म्हणून त्याने जी काही दोन चार पावले परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकलेली असतात, तिथून तो मागे येतो. सद्गुरूंनी मला अमुक इतका जप करायला सांगितला होता. तेवढ्या संख्येमध्ये मी तो केला परंतु मला कोणताही अनुभव आला नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. असा विचार करून सामान्य माणूस अध्यात्ममार्गापासून ढळतो. पण ज्याची श्रद्धा अविचल असते, तो कितीही संकटे आली किंवा कितीही तपश्चर्या करावी लागली तरी त्यापासून ढळत नाही. जर त्याला कोणी सांगितले की तू एवढा जप केलास परंतु तेवढा पुरेसा नाही. तुला आणखी इतकाच जप करावा लागेल किंवा आणखी अमुक इतकी वर्षे तपश्चर्या करावी लागेल तर तो त्यासाठी आनंदाने तयार होतो. कारण त्याला माहिती असते की त्यानंतर परमेश्वर आपल्याला निश्चितपणे भेटेल. आणि अशा रीतीने ज्यांची श्रद्धा अविचल असते अशा लोकांना परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून आपण संतसंगतीचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्याशी निरर्थक वाद न घालता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाटचाल करावी. वेळीच सावध होणे गरजेचे आहे हेच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात. तेव्हा निजध्यास सोडू नका. संत सोहिरोबा म्हणतात, ” हरी भजनावीण काळ घालवू नको रे. “
स्वसंवाद ::
१. निजध्यास केव्हा आणि का तुटतो?
२. कीर्तन-प्रवचनानंतर वाटणारी तीव्र भक्तिभावना काही दिवसांत का ओसरते? यावर उपाय काय?
३. “श्रद्धावान लभते ज्ञानम्” या वचनावर तुमचं दृढ विश्वास आहे का?
४. सद्गुरूंनी सांगितलेला जप केला पण अनुभव आला नाही. अशा वेळी मनात कोणते विचार येतात? तुम्ही त्याला कसे सामोरे जाता?
५. संत सोहिरोबांची ओळ “हरी भजनावीण काळ घालवू नको रे” हे मला माझ्या व्यस्त आयुष्यात कसे साधता येईल?