मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२० ☆ दिव्यत्वाची शक्ती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२० ?

दिव्यत्वाची शक्ती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मी दगड कोरला देवा तू त्यात भेटला होता

अन् छन्नी हातोड्याचा आघात सोसला होता

*

देवा तू सोबत होता मी म्हणून चुकलो नाही

तू माझ्या ह्या हाताचा सन्मान राखला होता

*

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली डोळ्यांदेखत

डोळ्यांचे सोने झाले मी श्वास रोखला होता

*

मज बहाल केली देवा तू दिव्यत्वाची शक्ती

पाषाण म्हणूनच मी तो नेमका जोखला होता

*

असुरांची टोळी होती मूर्तीला दगड म्हणाली

थडग्यांना पुजणारांनी तो डाव फेकला होता

*

मातेची आज्ञा झाली तू वनात गेला तेव्हा

वनवास पाच शतकांचा कलियुगी भोगला होता

*

ह्या आयोध्या नगरीचे प्रारब्ध उजळले आता

त्या जुलमी सत्तेनंतर तू उभा ठाकला होता

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्भाव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

अंतर्भाव... ☆ श्रीशैल चौगुले ☆

थांबते जरासे घन इथे

सांडते जरासे मन इथे.

*

आसवा जराशी वाट इथे

विरते जराशी लाट इथे.

*

आठवा जरासा भाव इथे

जीवना जरासा वाव इथे.

*

टोचती जरासे घाव इथे

भेटती जरासे राव इथे.

*

पाखरा जरासे पंख इथे

कोसली जरासे रंक इथे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

श्री दिवाकर बुरसे

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

©️ यंत्रदास

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

वरील कवितेचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आजवर प्राप्त झाल्या आहेत. त्यातली वानगी म्हणून पुढील रसग्रहणात्मक प्रदीर्घ प्रतिक्रिया वचकांनाही आवडावी. दुर्दैवाने प्रतिक्रिया देणाऱ्या रसिकाचे नाव मात्र ठाऊक नाही. त्या अज्ञात रसिक वाचकाचे मनःपूर्वक आभार!

🪷

तुझा तूच त्राता — सजगतेचा जागर

रसास्वाद : अज्ञात

१९९२ साली लिहिलेल्या या कवितेतील विचार आणि संदेश आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.

ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नाही;

ती कारखान्याच्या सायरनसारखी कर्णकर्कश नाही,

तर अंतर्मनात घुमणारी सावधानतेची घंटा आहे.

४ ते १० मार्च या कालावधीत देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या भावनेला साजेशी ही रचना, National Safety Council यांच्या ध्येयवाक्याला काव्यरूप देते—

“Safety First” हे केवळ फलकावरचे वाक्य नाही;

ते जगण्याची पद्धत असायला हवी.

यंत्रयुगातील मानवा, थांब क्षणभर!

मानेवरी बैसली जोखडे

ही ओळ वाचताक्षणी आपण स्वतःला एखाद्या वेगवान कन्वेयर बेल्टवर उभे असल्याचे पाहतो.

यंत्रांनी आपले आयुष्य सुलभ केले,

पण वेगाच्या मोहाने आपणच स्वतःला जोखडात अडकवून घेतले नाही ना?

कवी येथे उपदेश देत नाही—

तो आरसा दाखवतो.

वेग, प्रवाह आणि पैलतीर

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

ही ओळ चटका लावते.

जीवंत राहायचे असेल, तर सदैव जागृत राहावे लागेल.

जीवन हा प्रवाह आहे;

परंतु पैलतीर गाठायचे असेल, तर पोहता आले पाहिजे—

आणि पोहताना नियम पाळले पाहिजेत.

सुरक्षितता म्हणजे भीती नव्हे;

तीच खरी शौर्याची जननी आहे.

 

अग्नीशी खेळणाऱ्यांची प्रार्थना

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

उद्योगक्षेत्रातील कामगारांचे हे जिवंत चित्र आहे.

उपजीविकेसाठी जोखीम स्वीकारावी लागते;

पण जोखीम आणि निष्काळजीपणा यात फरक आहे.

हेल्मेट, हातमोजे, इशारे, नियम—

हे केवळ औपचारिकतेचे भाग नाहीत;

ते जीवाचे कवच आहे.

Safety First म्हणजे

काम थांबवणे नव्हे,

तर काम जिवंत राहून पूर्ण करणे!

 

जीवसृष्टी विवेके चाले

गोगलगाय कवच घेऊन फिरते.

मधमाशी शिस्तीत उडते,

भविष्यासाठी अन्नसंग्रह करून ठेवते.

अस्वल साठवण करते.

निसर्गातील प्रत्येक जीव सावध आहे.

मग बुद्धिमान मानवच निष्काळजी का?

प्रश्न टोकदार आहे;

पण तो टोचण्यासाठी नाही—

जागवण्यासाठी आहे.

 

तुझा तूच त्राताघोष नव्हे, मंत्र

ही कविता शेवटी घोषणेत परिवर्तित होते.

धृपदाची पुनरावृत्ती म्हणजे जणू प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला घेतलेली सुरक्षिततेची प्रतिज्ञा—

सुरक्षीतता पाहणे काम तुझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे.

कोणी पाहो वा न पाहो,

सीसीटीव्ही असो वा नसो,

देवावर श्रद्धा असो वा नसो—

सजगतेची जबाबदारी स्वतःचीच आहे.

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो

हे वाक्य म्हणजे तर एक सुभाषितच आहे

येथे श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम आहे.

देव सहाय्य करतो—

पण आधी आपण स्वतःच स्वतःला सहाय्य केले पाहिजे.

 

काव्यवैशिष्ट्यांचा तेजोमय आविष्कार

घोषवाक्यात्मक क्षमता – प्रत्येक कडवे जणू पोस्टरवर उमटावे असे!

प्रातिनिधिक प्रतिमा – यंत्र, वाहन, अग्नी, प्राणी—जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श.

सरळ पण परिणामकारक भाषा – वाचक थेट संवादात ओढला जातो.

प्रेरणादायी स्वर – भीती नव्हे, आत्मविश्वास जागवणारा.

हो, काही ठिकाणी कविता प्रचारात्मक भासते;

पण सुरक्षिततेसारख्या विषयात तोच तिचा अलंकार ठरतो.

कारण येथे सौंदर्यापेक्षा प्राण महत्त्वाचा आहे.

 

अंतिम संदेश

ही कविता वाचून मनात एकच ओळ घुमत राहते—

Safety First म्हणजे Life Always.

तुझा तूच त्राता

हे केवळ एक शीर्षक नाही,

तो जीवनरक्षणाचा मंत्र आहे.

कारखान्यात, रस्त्यावर, प्रयोगशाळेत, घरात—

जिथे जिथे जोखीम आहे,

तिथे तिथे ही कविता जपमाळेसारखी अंतरात असावी.

🪷

सजग राहूया.

सुरक्षित राहूया.

प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वतःलाच सांगूया—

सुरक्षीतता पाहणे काम माझे!

🙏🏽🙏🏽🙏🏽

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भाग्याची अस्पष्ट रेषा… – २ काव्ये ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भाग्याची अस्पष्ट रेषा… – २ काव्ये ? श्री आशिष  बिवलकर ☆

(१) 

दोलायमान आयुष्य,

दोलायमान दोरी |

जो तो सांभाळतो,

तोल आपल्यापरी |

*

ज्याची त्याची चाले,

जगण्यासाठी स्वतःची लढत |

जो तो कर्माचा बांधलेला,

नाही बसत परिस्थितीशी कुढत |

*

इवलीशी जरी असली,

ही डोंबाऱ्याची पोर |

कोवळ्या तिच्या जीवाला,

लागे कुटुंबाचा घोर |

*

भटके जीवन नशीबी,

ना घराचा थांगपत्ता |

पिढीजात लोककला,

गिरवते कुटुंबाचा कित्ता |

*

शिक्षणाचा नाही श्रीगणेशा,

नाही घातला शाळेचा गणवेश |

मुख्य प्रवाहापासून गेलीय दूर,

अस्पष्ट राही भाग्याची रेष |

*

कुचकामी सरकारी व्यवस्था,

बंद करी डोळे, बंद करी कान |

‘सर्व शिक्षा अभियान’ नावाला,

जळलं मेलं योजनांचं दुकान |

*

(२) 

*

जगासाठी असते मनोरंजन,

तिच्यासाठी जगण्याचा संघर्ष |

तोल सांभाळत कसरत तिची,

पोटाला व्हावा भाकरीचा स्पर्श ।। 

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ युद्ध धुराचे चटके… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ युद्ध धुराचे चटके...श्री प्रमोद वामन वर्तक ☆

वसंतात ग्रीष्माचे चटके 

बसती विवाह सोहळ्यांना 

नववधू वरांची सुखं स्वप्ने 

मी पहातो उध्‍वस्त होतांना

*

आता वधूच्या वधू परीक्षेत 

एक प्रश्न खास ऍड होणार 

चुलीवरचा स्वयंपाक येतो का?

भावी सासू तिला विचारणार

*

लाजा होमाच्या धूरा आधी 

धूर कोळशाचा डोळ्यात जाणार 

नवरा नवरीसह सारे वऱ्हाडी 

काळ्याकुट्ट धुराने बेजार होणार

*

खानावळी हॉटेल्सची दारं 

हळू हळू बंद पडत जाणार 

देवस्थानातली अन्नछत्र सुद्धा 

त्याच वाटेनं बघा जाणार 

*

या साऱ्याचा कर्ता करविता 

तात्या नामानिराळा राहणार 

एवढं जगाचं नुकसान करून 

निर्लज्जपणे नोबेल मागणार

निर्लज्जपणे नोबेल मागणार

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग … ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मुखी नाम घेता घेता

खुले अंतरंग

सखा तेव्हा भेटे मज

माझा पांडुरंग

*

गाठीभेटी होता होता

घडले संत संग

चंद्रभागे वाळवंटी

भक्तिचाच रंग

*

टाळविणा झंकारते

वाजतो मृदंग

विठ्ठलच नाचतोय

विठ्ठलाच्या संग

*

स्वर्ग सुख धरेवरी

होत जाते गुंग

कैवल्याच्या मागणीचा

रंगतो अभंग

*

द्वैतभाव हरपला

झालो एकसंध

विठ्ठल जागृती

विठ्ठल उमंग

*

धन्य तुकोबांची गाथा

ज्ञानियांची ज्ञानेश्वरी

नामदेवांचे किर्तन

वारकरी झाले गुंग

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

भावना प्रधान, भावुक मन आजूबाजूला व समाजात घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने आणि सहृदयतेने पाहत असते. जागृत झालेल्या जाणिवा आणि आलेल्या अनुभूती यांच्याशी भावनांचा संबंध जोडू पाहते. त्यात आपल्या जगण्याच्या आचार- विचारांचे प्रतिबिंब शोधू लागते. प्रत्येक वेळी/ दरवेळी ते मनाला आवडेल, रुचेल असे असेलच असेही नाही. अशावेळी मनातल्या विचारांना केवळ स्वतःच्या आचरणाची जोड देऊन भागणार नाही हे लक्षात येते. समाजातल्या लोकांच्या मनाचे परिवर्तन घडावे, त्यात चांगले हितकारक बदल व्हावेत असे मनोमन वाटू लागते. परंतु हे विचार प्रत्यक्षात उतरणे आणि उतरवणे खूप अवघड असते. काही वेळा प्रत्यक्ष कृती करूनही ध्येय साध्य होईलच असेही नाही. साहजिकच हतबल, व्याकुळ झालेले मन नेहमीप्रमाणेच सर्व विश्वाचा स्वामी, निर्माता, कर्ता करविता जो ईश्वर त्याच्याकडे धाव घेते. त्याला भक्तिभावाने साद घालते. अशा आर्त भक्ती भावनेचा प्रत्यय देणारी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची “श्रीपाद वल्लभ दिगंबरा “ही कविता आज आपण वाचणार आहोत. त्यातील विचार, त्यातला भक्तिभाव जाणून घेणार आहोत. ही नुसती कविता नाही तर भक्ती भावनांनी ओथंबलेले कवन आहे..

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा – डाॅ. निशिकान्त श्रोत्री ☆

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ
दत्तजयंती – २६ डिसेंबर २०२३

☆ रसग्रहण ☆

श्रीपाद वल्लभ दिगंबरा या शीर्षकातून ही कविता सदृश्य आरती श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रती लिहिलेली आहे हे लक्षात येते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा या त्रि अक्षरी नामाचा महिमा इतका जबरदस्त आहे की निव्वळ शीर्षक वाचल्यावर आपल्या मनातही भक्तीचे भावतरंग उमटू लागतात. आपल्या डोळ्यासमोर श्री दत्तगुरूंची सात्विक मूर्ती साकार होते. साहजिकच ही कविता वाचताना त्या भक्ती भावाने ती आतुरतेने वाचण्याची इच्छा होते.

*

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

कलियुगातील अस्थिर, अनैतिक, अनिर्बंध, अविचारी, अविवेकी आचार विचार सुज्ञ माणसाला रुचणे खरंच अवघड आहे. चुकीच्या मार्गाचा विचार करणारी व त्या नुसार जगणारी माणसे ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन करणे /होणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी केवळ मानवी प्रयत्न पूरे पडणारे नाहीत हे सत्य आहे. हा बदल घडवून आणणे केवळ ईश्वरालाच शक्य आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या अनुक्रमे सृष्टीचा निर्माता, पालक व विनाश या तिन्ही शक्तींचे प्रतीक असलेल्या श्री दत्तगुरूंना कवी आवाहन करतो आहे. या जगती कलियुगाच्या बजबजपुरीतला अंधःकार दूर करण्यासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार घ्या असे कवी विनवतो आहे. “अवतार घेऊन या “यातील श्लेष महत्त्वाचा. स्वतः श्री दत्तगुरूंनी अवतरावे. किंवा निदान अशी शक्ती /विभूती बनून भूतलावर यावे जी दैवी अवतारा सम असेल. त्याला घेऊन/ तसे बनून तुम्ही पृथ्वीवर या अशी याचना/आंतरिक प्रार्थना कवी करत आहे. “दिगंबरा दिगंबरा “या सुप्रसिद्ध जपातून कवी श्री दत्तगुरूंना आवाहन करतो आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सारे शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहेत. संस्कृत ही देववाणी असल्याने या शब्दांना मंत्र रूप लागले आहे, मंत्र सामर्थ्य लाभलेले आहे. या मंत्ररुपाने कवी श्री दत्तगुरूंची आराधना करून त्यांना साद घालतो आहे. हा मंत्र सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या परे आहे. अशा या परमात्म्याचे अनुसंधान करून त्याला जगताच्या उद्धारासाठी कवी मनापासून आवाहन करतो आहे. जगती जगदोद्वारा हा अनुप्रास व अवतारा- दिगंबरा हे यमक अतिशय सहजतेने या कवितेच्या ध्रुवपदात आले आहे. त्यामुळे ध्रुव पदाला एक उत्तम लय लाभलेली आहे. साहजिकच ध्रुवपदापासूनच या कवितेची गेयता लक्षात येते जी या आरती स्वरुप कवितेच्या रचनेसाठी अत्यंत जरुरी आहे.. यामुळे कवीच्या साहित्यिक जाणीवांची जाण वाचकांना होते.
*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

समाजातील परिस्थितीचे /वातावरणाचे अतिशय मोजक्या व प्रांजल शब्दांत वर्णन केले आहे. ही परिस्थिती पूर्णपणे वास्तविक, सत्यदर्शी आहे. यात कुठेही कवी कल्पना नाही. धर्माच्या आधारावर विशिष्ट गट निहाय संस्कृती /धर्म जाणून-बुजून निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना कोणीही मानत नाही/ जाणत नाही. परधर्माविषयीचा आदर, त्यासंबंधी जाणीव, त्यातील जीवनमूल्ये, धर्मविषयक विचार कुणालाही जाणून घेण्याची इच्छा नाही. परधर्माला नावे ठेवणे एवढा एकच क्षुल्लक आणि निकृष्ट विचार सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे. साहजिकच परधर्माविषयी आदरभाव मनात नाही आणि त्याचवेळी स्वधर्माची ही पुरेशी किंबहुना किंचितही जाणीव नाही असे आढळून येते. स्वधर्म आणि परधर्म या शब्दांवरील श्लेष अतिशय उत्तम. येथे केवळ धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ, वेद पुराणे यांचा संदर्भ नक्कीच अपेक्षित नाही. स्वतः सोडून जो दुसरा तो परका असे मानले जाते. अशा व्यक्तीविषयी माणूस म्हणून काही धर्म, काही कर्तव्ये आहेत असा विचार किंवा असे आचरण बिलकुल ही नाही. अशा दृष्टीने परधर्माविषयी आदरभाव/जाण नाही. एवढेच काय स्वधर्म म्हणजे स्वतःची स्वतःबद्दलची व इतरांना अपेक्षित असलेली कर्तव्ये यांचीही पुरेशी जाणीव नाही. थोडक्यात परधर्म आणि स्वधर्म या दोन्ही विषयी समाजात घोर अज्ञान आहे किंवा ज्ञान असूनही त्याप्रमाणे वागण्याचा सूज्ञपणा व विवेक बुद्धी नाही. मी, माझा स्वार्थ, माझे हित इतक्या संकुचित वृत्तीत जनसामान्यांचे मन गुरफटून गेले आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही भावना, वेदना, संवेदना कुणाच्याही मनात जागी होत नाही. एखाद्या दु:खी, खिन्न, गरजू व्यक्तीला पाहून मनात आपुलकीचा झरा वाहत नाही. ही खरंतर सहज सोपी गोष्ट ती ही अतिशय दुर्मिळ झाली आहे. कुणाच्याही मनाला पाझर फुटत नाही. सर्वांची मने पाषाण हृदय झालेली आहेत. येथे “मन गुरफटून गेले आहे” हा जो शब्द प्रयोग केला आहे तो अतिशय समर्पक. या शब्दातून एखाद्या गोष्टींमध्ये अडकणे, गुंतणे, गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडणे ही अपेक्षित भावना सुस्पष्टपणे व्यक्त होते. ती या कवितेतील आशयाला पूरक आहे.

कुणाला वेदना /पीडा असतील तर त्यांना मदत करून त्या दूर करणे हा साधा विचारही हल्ली पटकन कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे आचरण करणे तर दूरच!! सर्वज्ञानी परमेशाने जगाची निर्मिती करून संसाराचा/ भवसागराचा हा खेळ मांडला आहे असे पण मानतो. आता कवी त्याला विनवितो आहे की हे ईश्वरा! तू आता माणुसकीचा खेळ मांड. कुठल्याही खेळात माणूस जसा रमून जातो तसा माणुसकीच्या खेळात माणसाने रमावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्या मनात माणुसकी जागव, त्याचे महत्व त्यांना पटवून दे आणि असे करून मानवाचा उद्धार कर असे प्रतिपादन कवीने केले आहे. येथे संपूर्ण मानवजातीचा उद्धार अपेक्षित आहे.
परधर्म व स्वधर्म यातील श्लेष, पीडितास -पाहुनी मधील अनुप्रास, झरा -उद्धरा हे यमक हे अतिशय सुलभतेने साधले आहे. त्यामुळे ध्रुवपदापासून कवितेला लाभलेली गेयता जपली गेली आहे..

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

मानवतेची ओळख मानवालाच राहिली नाही हे सखेदपूर्वक मांडून कवी म्हणतो की माणसाने स्वार्थ फक्त जाणले नाही तर ते जोपासले. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मानवतेची माणसाचीच ओळख उरलेली नाही. संबंध उरला नाही. किंवा त्याला त्याची जाण नाही, जाणीव नाही या अर्थानेही ओळख हा शब्द वापरलेला आहे. ओळख या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आहे. येथे जाणीवपूर्वक स्वार्थाने वागणे या सत्याकडे निर्देश केला आहे. चैन, दाम म्हणजे पैसा व ऐशोराम यालाच आणि याच्यातच देव पाहिला. स्वार्थ लोलुप, स्वार्थाने अंध झालेला हा समाज आहे. कितीही लाभले तरी अजून हवेच हा माणसाच्या मनाचा व मनातला जप काही संपत नाही. त्याला सतत” अजून काहीतरी हवे “याची आसक्ती आहे, त्याचा मोह आहे. या मोहाच्या जाळ्यात मानव गुंतला. मोहाचे जाळे मधील श्लेष अतिशय समर्पक.. अजून हवे हा मोह व ते मिळवण्यासाठी वापरले जाणारे चुकीचे मार्ग यांचा मोह..

येथे अजून एक अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. सध्याच्या युगात देवाची मंदिरे ही पूजा, अर्चना, साधना, आराधना यासाठीची ठिकाणे राहिली नसून तेथेही देवाला अद्ययावत सुख सोयी देऊन त्याला करोडोंचे अलंकार घालण्याची प्रथा रुजली आहे. देवाला दागिन्यांनी मढवून स्वतःच्या वैभवाचा तोरा मिळवणे म्हणजेच भक्ती असा चुकीचा अर्थ लोकांच्या मनात रुजू पाहत आहे. वैभवाचा तोरा मिरवणे यातच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता वाटते. वैभव मिळवणे त्यासाठी प्रयत्न करणे हे पाप नाही, गुन्हा नाही. पण त्यासाठी/ त्याच्या प्राप्तीसाठी माणूस मोहाच्या जाळ्यात गुंतला. या वास्तवाकडे सुस्पष्टपणे निर्देश केला आहे अतिशय सहजतेने आणि प्रभावीपणाने. वैभवाचा तोरा मिरवणे यामध्ये बडे जाव दाखवण्याची आसक्ती दिसून येते. हा शब्दप्रयोग एकदम यथार्थ आहे. कवितेतील आशयाला ठोसपणे मांडणारा व पुष्टी देणारा. वैभवाचा तोरा मोहाच्या जाळ्यात गुंतला.. येथे योजलेल्या रुपक व चेतना गुणोत्ति अलंकारांनी कवितेतील भावना प्रकर्षाने मांडली आहे. भव सागरात नर म्हणजे मानव जात बुडून गेली आहे असे म्हणून कवी मानवाला तारा, त्याला सांभाळा असे विनवतो आहे. “बुडून” या शब्दावरील श्लेष अतिशय उत्तम. एक अर्थ त्यात गुरफटला, गुंतला व दुसरा अर्थ म्हणजे लोप पावला, हरवला, त्याचे अस्तित्व संपले. अशा या बुडणाऱ्या नराला आधाराचा हात देऊन, त्याला योग्य ज्ञान देऊन, मार्गदर्शन करून त्याचा तारणहार बना असे कवी श्री गुरुदेव दत्तांना विनवितो आहे. नराचा नारायण करायचा असेल तर खुद्द नारायणाने, ईश्वरानेच त्याला मदत करणे आता आवश्यक आहे व ते केवळ त्याला शक्य आहे. वैभवाने आणि दिखाऊ पणाने देव मूर्तीला सजवून आपल्या भक्तीचे प्रदर्शन करणे ही चुकीची प्रथा सध्या रुजलेली दिसते. देव मूर्तीत नाही, त्याच्या सजावटीत नाही तर मानवतेच्या/ माणुसकीच्या आचरणात देव असतो. माणसाने माणसाशी चांगले वागणे हाच खरा धर्म आणि हीच खरी देवपूजा. आता नारायणाने स्वतः अवतार घेऊन नराला या सर्व परिस्थितीत तारावे अशी कामना कवी व्यक्त करतो आहे.

जोपासले -पाहिले, तोरा -तारा अशी शब्द योजना करून सहजपणे यमक अलंकार साधला आहे. तसेच ओळख व बुडून या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर..

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

माणसाला स्वतःच्या बुद्धीचा सार्थ अभिमान न उरता तो माजला आहे. तसे पाहिले तर बुद्धीचे दान हे ही ईश्वर मर्जीनेच /ईश्वर कृपेनेच लाभलेले आहे. तरीही त्या बुद्धीच्या जोरावर वाटेल ते करता येते आणि तसे केले तरी अडवणार कोण असा मस्तीचा /मिजाशीचा भाव मानवाच्या मनात राज्य करतो आहे. मला हवे तसे, हवे तेव्हा, हवे तेवढे मिळवण्यासाठी बुध्दीचा वापर करणे यात त्याला काही ही गैर वाटत नाही. असे करताना इतरांना त्रास झाला, काही गोष्टींचा ऱ्हास झाला तरी तो बेफिकीर असतो. ज्ञानाने सर्वांचे हित साधावे कुणाला त्रास देऊ नये हा अर्थ तो सोईस्करपणे विसरला आहे येथील ज्ञानयोग या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर आणि समर्पक. जीव, जगत व परब्रम्ह यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या, वेदांच्या अभ्यासाने व गुरुच्या साह्याने करून घेणे आणि त्यातून ब्रह्म ऐक्य जपणे/ अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात. पण दुर्दैवाने माणूस हेही विसरला आहे. त्या प्रती त्याच्या मनात आस्था उरलेली नाही. या प्रमाणे अध्यात्मिक ज्ञान व विविध विषयांबाबतचे ज्ञान असे दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत. माणूस ज्ञानयोग तर विसरलाच पण कर्मयोगाची ही जाणीव तो बाळगत नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म फळाची अपेक्षा न करता करावे हा खरंतर कर्मयोग! कर्मयोग साधता साधता मोक्षाची अपेक्षा करणे, त्या दिशेने प्रवास करणे हा भावही मनात उरलेला नाही. केवळ कर्मकांडात म्हणजे मूर्ती पूजा, जपतप, व्रत वैकल्ये यातच तो रमला. त्याचा खरा अर्थ जाणून न घेता मंदिरात व घरीही विविध याग, होम अशा प्रकारे कर्मकांड करण्यात तो धन्यता मानत आहे. देवा संबंधी विविध कर्मे करणे चूक नाही. किंवा वाईट तर मुळीच नाही. पण त्यामागचा खरा अर्थ जाणण्याची इच्छाशक्ती किंवा प्रयत्न माणूस करत नाही. हे सर्व केले म्हणजे आपण देवधर्म केला असा खोटा अहंकार आणि खोटा आनंद माणूस मिळवतो आहे. हा समज नक्कीच चुकीचा आहे. खरा भक्ती भाव, समर्पण भाव दूरच राहिला एवढेच नव्हे तर त्याचा केवळ बाजार मांडला आहे. बाजार शब्द योजिताना त्याचे केलेले प्रदर्शन हा भाव अभिप्रेत आहे. तसेच येथे बुवाबाजीकडे अंगुली निर्देश असावा असे वाटते. हे लोक देव असल्याचा आविर्भाव आणतात, त्यातून स्वतःचे हित साधतात. या भक्तीतून समाजाचे प्रबोधन किंवा हित करणे हा हेतू बरेचदा मनात नसतो ही. भक्तीचा बाजार मांडून त्यात विपुल धनाचा /संपत्तीचा देखावा मांडतात. त्याचा गुबारा म्हणजे फुगा होतो ही शब्दयोजना अप्रतिम. केवळ टाचणीने फुटणारा हा गुबारा किंवा फुगा अर्थात त्याला तेवढे मोल नाही, महत्त्व नाही तो खोटा पोकळ अभिमान आहे हे लक्षात आणून दिले आहे. अशा बेभान बेफाम, बेलगाम वर्तनापासून /वागण्यापासून मानवाला आवरण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे ईश्वरा! द्यू लोक म्हणजे स्वर्गलोक जेथे देवांचा वास आहे(जिथे देव राहतात अशी कल्पना /धारणा आहे) सोडून पृथ्वीवर सत्वर या असे आवाहन कवीने केले आहे. विसरला -रमला, गुबारा -आवरा हे सहज सुंदर यमक कवितेला नादमयता प्राप्त करून देते. तसेच ज्ञानयोग आणि कर्मकांड या दोन शब्दांवरील श्लेष खरोखर अप्रतिम आहेत. कांड करणे म्हणजे चांगला मार्ग सोडून त्याचा त्याग करून चुकीचा मार्ग अनुसरणे, वाईट वागणे जसे द्वेष, वैषयिक वासना इत्यादी.. तसेच दुसरा अर्थ आपल्या वाट्याला आलेले कार्य किंवा कर्म करताना त्याविषयी प्रामाणिक नसणे.

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

*

स्वतःला चराचराचा, सृष्टीचा, तिच्या वैभवाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा स्वामी समजून मानव हा माजला आहे. ज्या गोष्टींची निर्मिती करता येत नाही त्या निसर्गाकडून लुटणे, लुबाडणे हेच मानवाचे ध्येय बनले आहे. स्वतःच्या सुखा पलीकडे त्याला दुसरे काहीही लक्षात येत नाही. सृष्टीचे जतन, संवर्धन याविषयी जराही जाण तो मनात बाळगत नाही. स्वामी जसा उपलब्ध साधन सामग्रीचा/ संपत्तीचा उपभोग घेण्यात धन्यता मानतो, त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करतो तद्वतच मानवाची मनोधारणा झाली आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल, प्राणी पक्षी यां बद्दल, झाडांबद्दल कसलीही दया, कणव या भावना मनात उरलेल्या नाहीत. क्रौर्याचा स्वार्थांध पुतळा म्हणावा असे रूप त्याने धारण केले आहे. क्रोध, राग, संताप, वध/ हत्या, असूया, इर्षा, सुखलोलुपता, वासनांधता अशा काम क्रोधादी विकारांनी त्याला पछाडले आहे, तो त्यांच्या अधीन झाला आहे. लता- वेली, झाडे झुडपे, पशुपक्षी यांच्या विषयी कसलाही ममत्त्वाचा, कृतज्ञपणाचा भाव त्याच्या मनात शिल्लक नाही. त्यांची निर्घृण हत्या करताना तो मागे पुढे पाहत नाही. जी झाडे त्याला सावली देतात, फळे -फुले देतात त्यांच्या जतनाबद्दल, त्यांच्या संवर्धनाबाबत अजिबात जागरुकता दिसून येत नाही. मन मानेल तसे झाडे, फुले, पाने तोडणे, झाडे मुळासकट नष्ट करणे, त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत करून त्या जमिनी बळकावणे असे कृतघ्न पणाचे कार्य मात्र अविरत चालू आहे. पक्षांची -प्राण्यांची शिकार करणे हेही तो साहसाचे/धाडसाचे लक्षण समजतो त्यामुळे त्यांचा जीव जातो त्याची थोडीही जाण तो ठेवत नाही. संपूर्ण सृष्टीच्या जीवन चक्राचा ऱ्हास होतोय हे लक्षात घेत नाही किंवा लक्षात आले तरी तसे आचरण करत नाही. साऱ्या चराचराचा स्वामी स्वतःला समजून, अप्पलपोटेपणा मनात बाळगून, स्वार्थ साधून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन, चराचराचा ऱ्हास मात्र तो करतो आहे. कवी श्री दत्तगुरुना विनंती करतो आहे की इहलोकी अवतार घेऊन या सृष्टीला सावरा, सांभाळा. अन्यथा तिला अपरिमित हानी पोहोचवण्याचे क्रूर काम मानव करतच राहील. म्हणून- मानव हा अनुप्रास, हत्यारा -सावरा हे यमक सहजपणे साधून कवितेतील लय आणि नादमयता जपली आहे.

अतिशय वास्तववादी कविता आहे ही. सांप्रत स्थितीचे विदारक शब्दचित्र रेखाटले आहे कवितेतून. साध्या सोप्या शब्दातून, बोजड शब्दांचा वा अतिरेकी अलंकारिक भाषेचा मोह अजिबात ठेवलेला नाही. साहजिकच सर्व स्तरातील लोकांना समजेल, कळेल अशी ही कविता. कवितेतील वास्तव/ सत्यता नाकारता न येण्यासारखी आहे. डोळ्यात अंजन घालणारी, माणसाला माणूसकीच्या भावनांची जाणीव करून देणारी कविता. सध्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे, हाताबाहेर गेली आहे ही केवळ परमेश्वरच या परिस्थितीतून मानवाला आणि सृष्टीला तारून नेऊ शकतो. माणसाला लवकरात लवकर या साऱ्या परिस्थितीचे भान येवो, सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. उच्च शिक्षित, विद्याविभूषित डॉक्टर या नात्याने जगताना संवेदनशील जाणीव जपल्याने कवीला या भावना समजल्या आहेत. आणि त्यांनी त्या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत. ही कविता म्हणजे एक सामाजिक भक्ती काव्य आहे. मानवतावादी प्रार्थना आहे असे म्हणणे उचित ठरेल. मानवतेप्रती/समाजाप्रती अतिशय दुर्मिळ ठरेल अशा ध्येयवादी भक्ती भावनेने शब्दबद्ध केलेली प्रार्थना आहे. अशा प्रकारची प्रचारक, सुधारक भूमिका मांडण्याचे धैर्य आणि धाडस कवीने केले आहे. त्या साठी सादर प्रणाम!!!

© नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ संसार दोघांचा + संपादकीय निवेदन – डॉ. सोनिया कस्तुरे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

🎇अ भि नं द न 🎇

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि शब्दांगण साहित्यिक सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन मिरज येथे संपन्न झाले. या संमेलनात आपल्या समुहातील कवयित्री डॉ. सोनिया कस्तुरे यांना,  नाही उमगत ‘ ती ‘ अजूनही या त्यांच्या काव्यसंग्रहाला ‘ऋतुजा माने साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे डॉ सोनिया कस्तुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐🌹💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त काव्य संग्रहातील कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “संसार दोघांचा” ☆ डॉ सोनिया कस्तुरे

तू म्हणतोस संसार दोघांचा,

मग दोघ मिळून करु या ना…

*

तू चूल पेटवं, मी भाकरी करते,

तू भाजी चीर मी फोडणी देते,

मी कपडे धुते, तू वाळत टाक;

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

*

भातुकलीत मी स्वयंपाक केला,

आता ही मीच सगळं करते ;

झोपडीत तर मी खूप राबते,

महालात ही मीच…

मी कोणत्याही पदावर असूदे

घर कामातून माझी सुटका नाही

तू म्हणतोस घर दोघांचं,

घर काम ही मिळून करु या ना,

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

*

मी आई हे “सत्य”,

तू बाप हा “विश्वास”

मी जन्म देणं निसर्ग नियम,

तू संगोपनाला हातभार लाव ना,

 सत्य आणि विश्वास पेरत

मिळून मुलांना घडवूया ना…

तू म्हणतोस कुटुंब सर्वस्व तर

टी. व्ही, मोबाईल बाजूला ठेवून

पालक सभेला मिळून जाऊया ना…

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

*

तुझ्या सुखदुःखाची मी सोबती

घराच घरपण मी, म्हणतोस,

मी थोडी “बाप” होते

तू थोडा “आई” हो ना…

मी तुझी आर्धांगिनी

तू माझं अर्धांग हो ना…

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

*

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? क्षण सृजनाचा ?

🤣 ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(प्राजक्ता, माझी मुलगी सिंगापूरला नुकतीच Standard Chartered बँकेत Executive Director झाली, त्यावर केलेली रचना! 🙏)

🕺🤣 EDचा बाप! 😅🕺

EDचा बाप होण्याचं भाग्य

मिळालं प्राजक्तामुळे काल परवा

आता माझ्याशी कसं वागायचं

तुम्ही आपल्या मनाशी ठरवा

*

तसं घाबरायचं कारण नाही

सांगून ठेवतो आत्ताच तुम्हांला

कारण तुम्हावर ‘रेड टाकायचा’

अधिकार नाही बरं कां आम्हांला

*

आम्ही टाकलीच जर कधी ‘रेड’

तुमच्यावरील प्रेमाने घरावर

खात्री असू द्यावी मनातून

तुम्हांला धरणार नाही धारेवर

*

बोळवण करावी अशावेळी

आमची तुम्ही गोडधोड देऊन

अन्यथा सुखदुःखाच्या गोष्टी करू

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ११ वा – – 

जनी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना तूचि शोधूनि पाहे|

मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|

अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?

म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!

परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.

हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.

म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

  • जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
  • पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
  • वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
  • माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)

– – – – 

श्लोक १२ वा – – 

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद :: 

  • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
  • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
  • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
  • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

 – क्रमशः श्लोक ११ आणि १२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares